सौ. सुचित्रा पवार
जीवनरंग
☆ विविधा ☆ कोपरा … ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
कोपरा ..प्रत्येकाच्या घरातला ,अंगणातला ,समाजातला मंदिरातला आणि देशातलासुद्धा ! प्रत्येक कोपऱ्याला त्याचं त्याचं स्वतःचं असं एक स्थान अन कामही असतं .बघा , घराच्या एका कोपऱ्यात चूल असायची अन तिथं जळणासाठीचा कोपरा असायचा ,कोपऱ्यातील जळण संपलं की मग तो स्वच्छ झाडायचा अन मग दुसरा भारा तिथं रचायचा! बरेचदा घरधणीन या कोपऱ्यात भिशी पुरून ठेवायची व पै पै टाकत रहायची कारण हा कोपरा फक्त तिचाच असायचा तिथं सहजासहजी कुणी जात नसे .
पूर्वीच्या काळी म्हणजे फार नाही वीसेक वर्षांपूर्वीपर्यन्त घराच्या एका कोपऱ्यात मडक्यांची उतरंड असायची ,सर्वात मोठं मडकं खाली टेकू देऊन ठेवायचं मग त्यापेक्षा लहान लहान असं करत उतरंड रचलेली असायची . या मडक्यात राखेत ठेवलेला बी बेवळा ,बिबा , हळकुंड अन असच किडुक मिडुक काही बाही ठेवलेलं असायचं ,जेव्हा नड असेल तेव्हा त्या वस्तू उतरंडीतून हळूच काढायच्या कधी मधी मधल्या अधल्या लोटक्यात चिल्लर साठायची -पाच ,दहा ,पंचवीस ,पन्नास पैशांची !
शेतकऱ्याच्या घरात एक कोपरा असायचा अवजारांचा … जिथं कुदळ ,खोरं ,पाटी ,जनावरांची दावी ,बैलांच्या घुंगुरमाळा अन असंच काहीसं …बाजूच्या कोपऱ्यात जातं, अन उखळ मुसळ अन सूप.
एक कोपरा देवाचा ..जिकडं जास्त वर्दळ नसेल अश्या ठिकाणी देवाचा कोपरा असायचा. फक्त घरातील देवपूजा करणारी जेष्ठ अन म्हाताऱ्या कोताऱ्या माणसांचा तिकडं वावर असायचा .एकूण काय तर कोपऱ्यातल्या वस्तूंचं काम झालं की कोपऱ्यातच विश्रांती घेत. कितीही महत्त्वाच्या असल्या तरी घरातल्या मध्यभागी त्यांना स्थान नसते .
आधुनिक घरातले कोपरे आता शो पिस चे किंवा तत्सम वस्तूंचे असतात किंवा वास्तुशास्त्रां प्रमाणे विशिष्ट वस्तूंसाठीच म्हणजे अमुक कोपऱ्यात कमळ ठेवा तमुक कोपऱ्यात लाल दिवा लावा अश्या पद्धतीने !
मंदिराच्या कोपऱ्यात असतात खणा -नारळांचे ढीग ,हार तुऱ्यांचे ढीग आशाळभूत पणे कुणीतरी उचलून योग्य ठिकाणी ठेवण्याच्या प्रतीक्षेत !
अंगणाच्या कोपऱ्यात पूर्वी असायचे रहाट अन आड ,तुळस , न्हाणी अन कपडे -भांडी धुण्याची जागा. आता अंगणच आकसले त्यामुळे आड मुजला अन तुळस शोपिस झाली !
समाजाचेही असे विविध कोपरे असतात …महत्वाच्या व्यक्ती ,देशाच्या विकासात हातभार लावणाऱ्या किंवा खूप काही करून साधे जीवन जगणाऱ्या समूहाचे कोपरे, दुर्लक्षित लोकजीवनाचे कोपरे , प्रवाहात नसणाऱ्या समूहाचे कोपरे ..हे लोक तिथेच जन्मतात ,वाढतात अन मरतातही ! ते मध्यभागी कधीच येत नाहीत विशिष्ट कोपऱ्यातून !
देशाच्या कानाकोपऱ्याचेही असेच असते कुठल्या कोपऱ्यात काय काय घडत असते पण सगळेच उजेडात येत नसते प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी लपून राहतेच !
आपल्या मनाच्या कोपऱ्याचेही असेच आहे ना ? बघा, प्रत्येक कोपऱ्यात काही न काही नक्कीच असते ,छान छान आठवणी ,मनावर अधीराज्य करणारी माणसे ,काही दबलेली स्वप्ने ,काही पुसट झालेल्या आठवणी ,काही अपुरी स्वप्ने , राग ,द्वेष ,असूया ,भूतकाळ ,भविष्यकाळ ,सुविचार ,कुविचार ,देव अन सैतानसुद्धा !
ज्या कोपऱ्याचे प्राबल्य अधिक तो कोपरा मनावर ,शरीरावर ,जीवनावर अधिराज्य घडवतो ;म्हणजे असं ,सैतानाचा कोपरा प्रबळ असेल तर माणूस सैतानासारखा वागतो, कुविचारांचा असेल तर मनात नेहमी दुसऱ्यांच वाईटच येणार ,सुविचारांचं प्राबल्य अधिक असेल तर माणसाचे आचार विचार शुद्ध होणार अन देवाचं प्राबल्य अधिक असेल तर माणूस देवगुणी होतो .
ज्याच्या मनाचे कोपरे लखलखीत तो माणूस सदा उत्साही ,आनंदी आणि आशावादी असतो .
प्रत्येकानेच मनातली द्वेष ,अहंकार ,असूयेचीअडगळ काढून ,चिंतेच्या जाळ्या झाडून तिथे चांगुलपणाचे दिवे लावले तर मन लक्ख उजळून मंदिर होईल ,अन जीवन उजळून जाऊन माणुसकीचे दिवे प्रत्येक कोपऱ्यात लागतील …
(लेख आवडला तर नावासह नक्की शेअर करा)
© सौ.सुचित्रा पवार
१९ मे २०१९
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈