सौ ज्योती विलास जोशी
☆ विविधा ☆ जागतिक महिला दिन ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆
आज जागतिक महिला दिन! ‘आजचा दिवस माझा’ असं म्हणत प्रत्येक महिलेनं स्वतःच्या हक्कासाठी लढायचा हा दिवस!! सध्या प्रत्येक गोष्टीला अधोरेखित करण्यासाठी एक दिवस ठरवण्याची पद्धत आहे. जागतिक महिला दिन हा सुद्धा एक असा दिवस! महिलांप्रती पुरुषांनी सजग करण्याचा दिवस!!
पदोपदी महिलांच्या आकांक्षांचा विचार करून आपल्या बरोबरीने समाजामध्ये त्यांना संधी मिळाली पाहिजे एवढी सजगता पुरुषांमध्ये यावी याची जाणीव करून देणारा हा दिवस!
पुरुषांची शारीरिक शक्ती जास्त असेल परंतु स्त्रीची मानसिक आणि आंतरिक शक्ती अतुलनीय आहे. शक्ती म्हणजे पाशवी शक्ती असेल तर ती पुरुषाकडे अधिक आहे परंतु नैतिक शक्ती अनंत परीनी स्त्रीजवळ जास्ती आहे हे विसरता कामा नये.या शक्तीला त्रिवार वंदन केलं पाहिजे.
जे जे उत्तम,उदात्त, उन्नत, महन्, मधुर ते ते सर्व स्त्री मध्ये आहे. तिच्याकडं जीवनाचं गांभीर्य आहे. स्त्री प्रेरणादायी आहे. तिच्या सर्व गुणांची कदर केली पाहिजे.
स्त्री विना अस्तित्व नाही. ती उद्याची माता आहे. ती स्वतः जन्म घेऊन नाते जोडते आणि जन्म देऊन नाते निर्मिते…. म्हणून ती विश्वाचा प्राण आहे असे म्हणायला हरकत नाही. तसा तिचा सन्मान व्हायला हवा.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हटलं गेलं आहे. एक सुशिक्षित माता सुसंस्कृत समाज उभा करते म्हणून महिलांच्या साक्षरतेला प्राधान्य दिलं पाहिजे. स्त्रियांच्या शिक्षणासाठी घराचा उंबरठा ओलांडून जाणारी स्त्री ‘सावित्रीबाई’ हिची आठवण या दिवशी व्हावी असा हा दिवस!
स्त्री ही समाजाच्या नीतिमत्तेचा कणा आहे.त्यामुळे समाज तिला कसा वागवतो यावर समाजाचं आरोग्य अवलंबून आहे. सध्या स्त्रीला समाजाची वागणूक ‘बंदिनी… स्त्री ही हृदयी पान्हा नयनी पाणी’ अशी आहे. हे दुर्दैव आहे.हा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.
स्त्री जन्माच सार्थक मातृ रूपात आहे. शिवरायांच्या मातोश्री जिजाऊ,मुलाला पाठीला बांधून लढणाऱ्या ‘लक्ष्मीबाई’ यासारखा मातांचं स्मरण आजच्या दिवशी व्हायला हवं.
आज जगाच्या लोकसंख्येचा मोठा भाग महिलांनी व्यापलेला आहे.कर्तबगारी असूनही उपेक्षित असा हा महिला समाज… त्यांच्या सक्षमतेची जाणीव सर्वांना व्हावी हे या दिवसाचे प्रयोजन आहे आहे. महिलांच्या वाट्याला आलेलं अर्ध आभाळ अजून काळवंडलेलं आहे. हे मळभ घालवण्यासाठी तिचा निकराचा लढा चालू आहे. या तिच्या लढ्याला पुरुष वर्गाची उत्तम साथ हवी याची जाणीव आजच्या दिनी पुरुषांना झाली पाहिजे.
जगणं हे तिच्यासाठी एक आव्हान आहे.जगातल्या सर्वात सुरक्षित अशा जागी म्हणजेच आईच्या उदरात तिला नखं लागताहेत. त्यात दुर्दैवाने तिचे जन्मदाते आई-वडील सामील आहेत.
अर्थात आईला हे मान्य नाही. तिचं स्त्रीमन तिला साद घालतं, पण ती इथे अबला ठरते. तिच्या मनाविरुद्ध गोष्ट घडते.तिच्या वात्सल्याचया, प्रेमाच्या चिंधड्या होताहेत. हे दुर्दैवी आहे.
मुलीने या जगात प्रवेश केलाच तर…’ भय इथले संपत नाही’ अशा अवस्थेत ती जगते. अगदी अनोळख्या व्यक्ती पासून ते अगदी घरातल्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांची ती शिकार होते. शिवाय तोंड दाबून बुक्क्यांचा मार तो निराळाच…..
या सर्व संकटातून सहीसलामत सुटलेली पोर नशीब घेऊनच जन्माला येते म्हणायची…..खूप खबरदारीनं तळहातावरच्या फोडासारखं जपलेली ही पोर एक दिवस लग्न होऊन आपल्या घरी जाते. आईवडिलांची जबाबदारी कमी होते पण तिची वाढते.
सासू ही स्त्री असूनही तिच्याशी व्यवहारांनं वागते.संवेदना प्रेम यांची उणीव तिच्या वागण्यात जाणवते.सून आपल्या मुलीसारखी असं वारंवार म्हणते पण मुलगी म्हणायला तयार होत नाही.
ज्याच्या प्रेमाला ती आसुसलेली असते तो पुरुष…. नव्हे त्या पुरुषाची मानसिकता हा तिचा शत्रू आहे. आपल्या फायद्यासाठी तो तिला कशीही वापरतो. त्याचा पुरुषी अहंगंड त्याच्या भाषेत ही उतरला आहे. हेही ती पचवत आली आहे.
हा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. तिच्या वर होत असणाऱ्या अन्यायाची जाणीव होणं हे या दिवसाचं महत्त्व आहे.
तिच्या डोळ्यात अन्याया विरुध्द लढण्याचा अंगार आहे. फक्त त्याला कायद्याचे कवच हवं…. ते आहे पण ते आणखी सुरक्षित हवं.मग तो अंगार अगदी सगळी दुष्कृत्ये जाळून टाकेल.
महिलांच्या सबलीकरणापासून इतरही सर्व कायद्यात आज पर्यंत काहीच बदल झाले नाहीत असं माझं म्हणणं नाही पण त्याची गती कमी आहे. महिलांच्या बाबतीतले कायदे आणखी कडक व्हायला पाहिजेत जेणेकरून हे गुन्हे आटोक्यात येतील. आजच्या दिनी या गोष्टीचा परामर्श घेतला पाहिजे.
आजच्या या जागतिक महिला दिनी तिच्या या अर्धा आभाळात विश्वासाचा सूर्य कधी न मावळो ही इच्छा!
© सौ ज्योती विलास जोशी
इचलकरंजी
मो 9822553857
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈