सौ. राधिका भांडारकर
☆ विविधा ☆ स्व. इलाही जमादार …… भावपूर्ण श्रद्धांजलि ☆ सौ. राधिका भांडारकर ☆
(जन्म – 1 मार्च 1946 मृत्यु – 31 जनवरी 2021)
आकाशाला, भास म्हणालो, चुकले का हो?
धरतीला, इतिहास म्हणालो, चुकले का हो?
चिरंजीव वेदना, अंतरी, दरवळणारी
जखमांना, मधुमास म्हणालो, चुकले का हो?
कलेवराला, जगण्यासाठी, काय लागते?
आठवणींना, श्वास म्हणालो, चुकले का हो?
मरण्याआधी, नाव सांग त्या, हत्याऱ्याचे
मी त्याना, विश्वास म्हणालो, चुकले का हो?
निंदानालस्तीही, केवळ, मिळवत गेलो
प्रीतीला, हव्यास म्हणालो, चुकले का हो?
लिहिल्या कविता, लिहिल्या ग़ज़ला, गीते लिहिली
सरस्वतीचा, दास म्हणालो, चुकले का हो?
चौदा वर्षे, पतीविना, राहिली उर्मिला
हाच खरा, वनवास म्हणालो, चुकले का हो?
घात आप्त, आघात सगे, अपघात सोयरे
ह्रदयाची, आरास म्हणालो, चुकले का हो?
चुकले का हो? चुकले का हो? म्हणणाऱ्यांनो!
याचनेस, गळफास म्हणालो, चुकले का हो?
जन्मठेप, आत्म्याला कोणी, दिली `इलाही’?
कुडीस, कारावास म्हणालो, चुकले का हो?
– इलाही जमादार
एक ऊत्तुंग मराठी गझलकार आज आपल्यांत नाही हे स्वीकारणं खूप कठीण आहे!
एक मार्च १९४६ साली दूधगाव सांगली येथे त्यांचा जन्म झाला. गझलकार सुरेश भट यांच्यानंतर गझलकार म्हणून इलाही जमादार यांचेच नांव घेतले जाते.
पुण्यात एका लहानशा आऊट हाऊसमधे रहात.. पुस्तके आणि मांजरांच्या पसार्यात हा अवलिया गढलेला असायचा. खोली लहान असली तरी कवी मन फार मोठे.. प्रत्येक मित्रासाठी हे मनाचे दार ऊघडे असायचे..
गझल क्लिनीकच्या माध्यमातून ते नवोदित कवींसाठी कार्यशाळा घेत…
काठावरी ऊतरली। स्वप्ने तहानलेली।
डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा।
किंवा,
जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला।
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा।
अशा त्यांच्या काळीज भेदणार्या रचना मनात साठलेल्या आहेत….
आज ते नसले तरी हा शब्दगंध वातावरणात दरवळतच राहणार….!!
एक कलाकार, एक गझलकार म्हणून इलाही जमादार सदैव स्मरणात राहणार…
त्यांच्या स्मृतींस भावपूर्ण श्रद्धांजली….????
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈