सौ ज्योती विलास जोशी
☆ विविधा ☆ शब्दांच्या पलीकडले ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆
सुरेल आवाजाची निसर्गदत्त देणगी असलेल्या सुमन कल्याणपुर यांचे ‘शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी ‘हे गाणं माझं अगदी फेवरेट! ते ऐकताना गाण्यातला एक विषण्ण भाव त्या नाजूक सुरातून माझ्या मनात डोकावला. अर्थातच माझं मन माझ्याशी हितगूज करायला लागलं. या गाण्यातील शब्दांना म्हणजे त्या बकुळीच्या नाजूक फुलांना कुठे साठवू कसे जपू असं झालं मला……
कुठेतरी असही वाटलं की या शब्दांची सुंदर लेणी तयार झाली तर ती डोळ्यात साठवता येतील. या शब्द रुपी कमळाच्या भावविश्वात माझ्या मनाचा भुंगा रुंजी घालू लागला आणि मकरंद चाखू लागला. माझं शब्दांवर प्रेम जडलं. मी शब्द वेचू लागले.
शब्दांचे बुडबुडे माझ्या भावविश्वात तरंगायला लागले आणि माझ्या विचाराच्या लोलकातून परावर्तित होऊन माझ्याच कोऱ्या मनावर एक इंद्रधनुष्य उमटलं अर्थातच माझा मन मोर पिसारा फुलवून नाचू लागला
अडीच अध्याक्षरा पासून तयार झालेला हा शब्द! याचं वर्णन शब्दातीत आहे!! शब्द शब्द जोडून त्याचे वाक्य, वाक्यांच्या सरी गुंफून लेख, अनेक लेख एकत्र येऊन ग्रंथ, ग्रंथांच्या भांडारामुळे ज्ञान आणि ज्ञान हाच आपला खरा श्वास! श्वास हेच जीवन ,जीवन हेच अस्तित्व आणि अस्तित्व हाच सन्मान म्हणून शब्दाचा सन्मान केलाच पाहिजे.
संत तुकाराम महाराजांचा आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने हा भीमसेन जोशी यांनी गायलेला अभंग शब्दरूप रत्नांचा सन्मान करतो.
शब्दाचा ध्वनी कानात शिरला की भावविश्वात भावतरंग निर्माण होतात आणि मन डोलायला लागतं. सुंदर शब्द पेरलेली गाणी हे त्याचे जिवंत उदाहरण….
शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना
आवरू किती गडे मी या लोचना
शब्द सौंदर्यानेच तर अशा कविता सजतात आणि पदन्यास घालतात.
शब्द हे एक प्रकारचं रसना चाळवणारं भोजन आहे .ते कसं वाढायचं हे सुगरणीच्या हातात असतं. जेवणात खडा आला की कसं अन्नावरची वासना जाते ना तसंच काहीसं संवादात काटेरी शब्द मन दुखावतात. गोड जेवण जसे मन तृप्त करते तसेच चार गोड शब्द हे खारीच्या पाठीवरून प्रेमाने फिरवलेल्या हाताच्या बोटा सारखे हळुवार असतात.
शब्दांना एक गंध असतो सुवासिक फुलांसारखा !लेखकाच्या लेखणीतून श्वासागणिक एकेक शब्द कागदावर उतरतो जसा काही फुलांचा सडा… वेगवेगळ्या रंगरूपात त्यांचं साहित्य फुलतं अगदी सुरेख सुवासिक फुलांसारखं आणि आपलं मन त्यांच्या भोवती रुंजी घालत.
शब्द इतिहास घडवतो.पेशवाईत आनंदीबाईनी ध चा मा केला हे सर्वश्रुतच आहे.’ लक्ष्मण रेषा’ या शब्दाने रामायण घडले. गैरसमजाच्या साथीचा रोग या शब्दांनीच पसरवलाय असे म्हणावे लागेल. राजकारणातही रोज एक नवीन गैरसमज ही शब्दांचीच खेळी करते आहे.घडलयं बिघडलयं हे आवर्तन सतत शब्द घडवतात.
मुद्राराक्षसाचे विनोद शब्दांच्या फेरफारीने घडतात. उदाहरणार्थ वृत्तपत्रांमध्ये पत्रकारांना असे छापायचे होते की, मंत्री महोदयांना बरे नसल्यामुळे ते गाढ झोपले होते परंतु मुद्राराक्षसामुळे झालेला विनोद असा की मंत्रिमहोदयांना बरे नसल्यामुळे ते गाढव झोपले होते. दोन शब्दात आलेल्या व या शब्दाने अर्थाचा अनर्थ केला.
शब्दांच्या काना मात्रा यामधील मधील फरकामुळे मारू चे मरू असे होते आणि वाक्याचे अर्थ बदलतात शिर आणि शीर या शब्दांचेही असेच…… दोन वेगवेगळ्या शब्दांमध्ये एक शब्द आला तरी अर्थ बदलतो उदाहरणार्थ.. बायको आणि प्रियकर या दोन शब्दांमध्ये चा हा शब्द आला तर बायकोचा प्रियकर असा अनर्थ ओढवतो.
एकाच अर्थाचे दोन शब्द एकमेकांशेजारी आल्यासही गम्मत घडते .हाडांचा अस्थिपिंजरा, पिवळ पितांबर, काळी चंद्रकळा वगैरे वगैरे
शब्दालाही पाण्यासारखा रंग आहे तो ज्या प्रकारच्या लेखनामध्ये वावरतो त्या प्रकारचं सौंदर्य त्याला मिळतं .पाण्या तुझा रंग कसा असा प्रश्न जसा आपण पाण्याला विचारतो तसेच शब्दाला विचारला तरी त्याचे हेच उत्तर मिळेल.
शब्द जादूगार आहेत म्हणूनच अनाकलनीय असे साहित्य, गाणी जन्माला येतात. शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले या ओळीत अभिप्रेत असलेल्या शब्दांच्या पलीकडे हे शब्द घेऊन जातात. आणि मौनाचे भाषांतर होते.
शब्दाने शब्द वाढतो. त्याचे पर्यावसान गैरसमज आणि भांडण्यात होते. मनं दुखावली जातात पण गंमत अशी आहे की पुन:मैत्रीचे आव्हानही शब्द स्वीकारतात अशा वेळी शब्द एखाद्या कुलुपाच्या किल्ली सारखे काम करतात किल्ली सुलटी फिरवून मनं मोकळी करतात आणि किल्ली उलटी फिरवून गप, चूप, कट, पुरे असे शब्द तोंड बंद ही करतात. प्रेमळ शब्दांचे दोन थेंब कलह रुपी पोलिओ नष्ट करतात.
अहंकार, अबोला ही शब्दवस्त्रे उतरवून आपुलकी, आनंद ही शब्द वस्त्रे ल्याली तर परमानंद होतो तो निराळाच!
शब्दाचा शोध घेतला तर अनेक अर्थ निघतात.शब्द झेलणे, शब्द जोडणे, शब्दाबाहेर नसणे, शब्द पडू न देणे ,शब्द देणे, शब्दाचं पक्कं असणे ,शब्दाचा बाण ,शब्द संस्कार या आणि अशा अनेक वाक्प्रयोगातून ते शोधता येतात.
शब्दांच्या मोत्यांचा सर संवादाचा हार बनतो. त्या हाराचे पावित्र्य पुन्हा शब्दांचा सन्मान करतात.
अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
शब्द जुळवुनी घट्ट करू नात्यांच्या गाठी
© सौ ज्योती विलास जोशी
इचलकरंजी
मो 9822553857
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈