मराठी साहित्य – विविधा ☆ ल‌क्ष्मीपूजन  ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ विविधा ☆ धनत्रयोदिशी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

? दिन दिन दिवाळी—४ ?

!! ल‌क्ष्मीपूजन  !!

ॐ  महालक्ष्मी च विद्महे

विष्णुपत्नीच धीमही

तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात् !!

आज दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा दिवस. आज समृद्धीची, संपन्नतेची पूजा केली जाते‌. यावेळी निसर्ग सुद्धा सर्वांगाने बहरून आलेला असतो. पावसामुळे धरणी हिरवीगार आणि शरद ऋतूचे आल्हाददायक वातावरण असते.  शेतामध्ये धनधान्याचा हंगाम असतो. त्यामुळे आनंदाचे, चैतन्याचे वातावरण असते आणि हाच आनंद दिवाळीत ओसंडून वाहत असतो.

दारापुढे सुंदर रांगोळ्या, दाराला पाना फुलांचे तोरण, दिव्यांच्या माळा, फुलांच्या माळा, तेवत्या पणत्या, प्रकाशमान आकाश कंदील अशा थाटामध्ये प्रत्येक घर उजळून निघालेले असते. महालक्ष्मीच्या स्वागतासाठी सज्ज झालेले असते.  मोठ्या उत्साहामध्ये लक्ष्मीपूजन केले जाते. दारिद्र्याचा अंधार दूर सारून समृद्धीचा दीप चेतवावा हा संदेश यावेळी सर्वार्थानं प्रकट होतो.

घरामध्ये, व्यवसायात समृद्धी रहावी, दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लक्ष्मीची पूजा करायची. त्याच बरोबरीने कुबेराची पूजा केली जाते. कुबेर हा देवांच्या संपत्तीचा राखणदार समजला जातो. तो संपत्ती संग्राहक,  धनाधिपती, पैसा कसा राखावा हे शिकवणारा, स्वतःला संपत्तीचा मोह नसणारा, अतिशय निरोगी आहे असे त्याचे गुण सांगितलेले आहेत. तेव्हा धनधान्य प्राप्त झाल्यावर मनुष्याला अहंकाराची बाधा होऊ नये यासाठी कुबेराचे स्मरण करायचे.

‘लक्ष्मी’ला चंचल म्हणतात. पण लक्ष्मी चंचल नसते. लक्ष्मीवान माणसाची मनोवृत्ती चंचल असते. वित्त ही एक शक्ती आहे. त्यामुळे मानव देवही बनू शकतो आणि दानवही बनू शकतो. लक्ष्मीला भोग प्राप्तीचे साधन समजणाऱ्या माणसांचा ऱ्हास हा ठरलेलाच असतो. लक्ष्मीची पूजा करून तिचा योग्य सन्मान करणार्‍याची भरभराट तर होतेच. पण इतरांनाही तो सहाय्यभूत होतो. म्हणूनच दैन्य जाणवेल इतके कमी पण नको आणि बुद्धीचा तोल ढळेल इतके जास्त पण नको,  इतकेच धन देवाने द्यावे अशी त्याची प्रार्थना करायला हवी.

लक्ष्मीचा वापर कोण, कशासाठी करतो यावर तिचे फळ अवलंबून असते. विपरीत मार्गाने वापरली जाते ती ‘अलक्ष्मी’,  स्वार्थात वापरतात ते वितरण , दुसऱ्यासाठी वापरली जाते ती ‘लक्ष्मी ‘आणि देवकार्यासाठी वापरली जाते तिला ‘महालक्ष्मी ‘ म्हणतात. उदारहस्ते सांस्कृतिक कार्यात, सत्कार्यात लक्ष्मी खर्च करणाऱ्याच्या घरी ती पिढ्यानपिढ्या वास करते. म्हणूनच म्हणतात, ‘लक्ष्मी ही एक महान शक्ती असल्याने ती चांगल्या लोकांच्या हातातच राहिली पाहिजे, तरच तिचा सुयोग्य वापर होतो.

लक्ष्मी प्रमाणातच मिळाली पाहिजे. कारण लक्ष्मीच्या नाण्याला दोन बाजू असतात. तिचा वापर स्वार्थासाठी करायचा का परमार्थासाठी हे आपणच ठरवतो. तेव्हा या वित्ताला अनर्थ न मानता जीवन सार्थकी लावणारी शक्ती मानून तिचे पूजन करायचे. बुद्धीचा समतोल राहू दे अशी प्रार्थना करायची.

एक गोष्ट महत्त्वाची आहे गैर मार्गाने आलेली लक्ष्मी कधीही स्थिर राहत नसते. तिच्यापासून शाश्वत सुख मिळत नाही तर प्रामाणिकपणे मिळवले लक्ष्मी शाश्‍वत सुखासमाधानाने आपली झोळी भरते. म्हणूनच असे सांगितले जाते की, “जो दुसऱ्याचे ओरबाडून खातो त्याला विकृती म्हणतात, जो आपले स्वतःचे खातो त्याला प्रकृती म्हणतात आणि जो आपल्यातले इतरांना  खाऊ घालतो त्याला संस्कृती म्हणतात”. हेच या लक्ष्मीपूजनाचे सार आहे. लक्ष्मीमातेने सर्वांवर भरभरून कृपा करावी अशी तिच्या चरणी प्रार्थना करूयात.

शुभ दीपावली.  ?

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ !! दिवाळी !! ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ विविधा ☆ !! दिवाळी !! ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

आकाशाचा निळा गाभारा सजला

चंदेरी चांदण्यांनी

थंडीचा अत्तर स्पर्श मऊ- मुलायम

बनवला उन्हालाही

केला दूर अंधकार केसरी- पिवळसर

प्रकाश दिव्यांनी

प्रसन्न उत्सव प्रकाशाचा

दीपावलीचा

चैतन्याच्या पहाटेचा… !!

 

काळानुरुप प्रत्येक गोष्टीत बदल होणे अपरिहार्य आहे. तसाच बदल मुंबईत साजरा होणा-या दिवाळीत झाला आहे… दिवाळी ही धनश्रीमंतांचे इमलेही उजळते व मन श्रीमंतांचे दरवाजेही उघडते..मुंबईची दिवाळी म्हणजे फटाक्यांचा दणदणाट, आतषबाजी,  चमचमीत फराळ, सुगंधी उटणे, दिव्यांची रोषणाई असे बरेच काही असते..

दिव्यांची रोषणाई म्हणजे फक्त दिवे लावून अंगण उजळणं एवढचं नाही तर या दिव्यांनी मनाचा गाभारा भरला पाहिजे उजळला पाहिजे. आज माणसांचं मन अंधारात चाचपडतयं त्याला स्वतःचा उजेड मिळेनासा झालाय त्यासाठी त्यानं स्वतःच स्वतःचा  दिवा लावायला पाहिजे. दिव्यांचे प्रतीक असलेली ही इवलीशी पणती समाजाच्या प्रत्येक घटकाला आपलसं करून समसमान प्रकाश देते ना अगदी तसच्चं…

मोबाईलच्या जमान्याने शुभेच्छा पत्र, मेसेजेस कालबाह्य झाली आणि आपली मन बँकवर्ड झालीत.

एकमेकांच्या संवादाचे सूर धुसर झालेले दिसतात. दिवाळीच्या निमित्ताने ख-या अर्थाने प्रत्यक्ष जगण्यातचं स्वतःला झोकून द्यावं . चारचौघांबरोबर, समाजाबरोबर संवादाच्या भिंती बांधाव्यात त्यामुळे जीवनात नवचैतन्य निर्माण होईल.

सामाजिक बांधिलकी जोपासण्याचाही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करायला हवा तसेच या कालावधीतही वक्तृत्व स्पर्धा, प्रश्न मंजुषा, स्पर्धा, कविता पाठांतर, गायन कथा-कथन अश्या स्पर्धांचे आयोजन करावे त्यामुळे आपण एकत्र येतो व एकत्रित संवादही साधला जातो.

दिवाळी पहाट ही संकल्पना तर अतिशय सुंदर… सांस्कृतिक क्षेत्रातून केला गेलेला एक अनोखा कार्यक्रम.. दिवाळी पहाट संगीतमय व्हावी हा हेतू विविध कला असलेले कलाकार एकत्र येऊन कलेचे सादरीकरण घरघुती स्वरूपात करत होते. कालांतराने त्याचे सार्वजनिक स्वरूप झाले.आता तसे न करता ” दिवाळी पहाट ” ही घरघुती स्वरूपाचीच  असावी त्यामुळे सर्वांना अगदी सर्वांनाच त्याचा लाभ घेता येईल व आनंदही लुटता येईल.

खरी ” दिवाळी पहाट ” झाल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसून येईल.

आपल्या समाजात असेही काही उपेक्षित लोक आहेत जे या सगळ्या आनंदा पासून वंचित आहेत या आनंदाला मुकले आहेत. अश्या लोकांबरोबर जर दिवाळी साजरी केली तर आपल्या बरोबरच सर्वांची दिवाळी सुखाची जाईल आणि सर्वांच्याच चेह-यावर आनंद दिसेल.

अनाथ मुले, ज्येष्ठ नागरिक अशांसाठी कामे करणा-या संस्थांना देणग्या द्याव्यात. त्यांच्या बरोबर जर आपण दिवाळी साजरी केली तर त्यांच्या चेह-यावरचे हसू आनंद आपल्या मनाला आत्मिक समाधान देऊन जातं ख-या अर्थाने दिवाळी साजरी होईल असे मी मनापासून नमूद करीन.. या सणामागचा उदात्त हेतू असा की कृतज्ञतापूर्वक माणुसकी जोपासून परोपकार करावा. सर्वांना आपल्या आनंदात सहभागी करून घ्यावे. तसेच विश्वाचं पालन करणा-या महाशक्तीलाही विसरू नये..

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

ठाणे

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नरकचतुर्दशी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ विविधा ☆ धनत्रयोदिशी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

? दिन दिन दिवाळी—३ ?

!! नरकचतुर्दशी !!

आज ‘नरक चतुर्दशी’.  आजची पहाट रांगोळ्यांनी सजलेली, दिव्यांनी उजळलेली मंगल-प्रसन्न पहाट असते. आज पहाटेचे अभंगस्नान, यमाचे तर्पण, नरकभय निवारणासाठी दिवा लावणे, देवदर्शन, फराळाचा आस्वाद, रात्री दिव्यांची आरास असा दिवसाचा दिनक्रम असतो.

स्वर्ग आणि नरक या संकल्पना बहुतेक सगळीकडेच रूढ आहेत. आयुष्यात चांगली कृत्ये केल्यास मृत्युनंतर स्वर्ग मिळतो आणि वाईट कृत्यांमुळे नरकात जावे लागते अशी समजूत आहे. या नरकाचे सर्वांनाच भय असते. तेव्हा या नरकभयापासून मुक्त होण्यासाठी आजच्या दिवशी एक दिवा लावावा आणि संध्याकाळी घर, मंदिर, मठ या ठिकाणी दिव्यांची आरास करावी असे सांगितले आहे.

आजच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासूराचा वध केला. नरकासूर प्रागज्योतिष्पूर नगरीचा राजा होता. आपल्या असूरी शक्तीने तो देव आणि मानव सर्वांना त्रास देत असे. त्याने सोळासहस्र राजकन्यांना पळवून आणून आपल्या कैदेत ठेवले.  त्यांच्या सुटकेसाठी भगवान श्रीकृष्णाने युद्ध करून त्याला ठार मारले.  त्या आनंदाप्रीत्यर्थ लोकांनी उत्सव साजरा केला. दिवे लावून अंधाराला, संकटाला, भीतीला दूर पळवले.

मरताना नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला. आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. श्रीकृष्णाने तसा वर दिला. म्हणूनच आज पहाटेच्यावेळी अभ्यंगस्नान करतात. आसूरी शक्तींचा, आसूरी महत्त्वाकांक्षेचा शेवटी नाशच होतो असा संदेश ही कथा देते. म्हणून प्रत्येकाने या दिवशी चांगले वागणे, चांगल्याची साथ देणे असा संकल्प केला पाहिजे.

स्त्री उध्दाराच्या या कामासाठी सत्यभामेने पुढाकार घेतलेला होता. नरकासूराच्या बंदीवासात राहिल्याने या राजकन्यांना कलंकित मानले जाऊ नये, त्यांचे सामाजिक स्थान हीन होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने त्या सर्व राजकन्यांशी विवाह केला अशीही कथा आहे.

स्त्रियांवरील अत्याचाराच्या बातम्या सतत ऐकायला मिळतात. त्यांना आळा कसा घालायचा हा खरा प्रश्न आहे.  यासाठी कोणी श्रीकृष्ण धावून येईल असा चमत्कार होणार नाही. त्यासाठी सर्वांनीच आपल्या मनात श्रीकृष्णाचे विचार जागृत करून स्त्री शक्तीचे रक्षण केले पाहिजे. यामधे स्त्रियांनी सुद्धा सहभागी व्हायला हवे. आपले रक्षण आपणच करण्यासाठी आवश्यक गोष्टी लहानपणापासून शिकायला हव्यात. मन कणखर बनून अंगी धिटाई येईल.  मुली स्वयंपूर्ण बनतील.  त्याचबरोबर मुलांना लहानपणापासून स्त्रीचा आदर करायचा, स्त्री-पुरुष दोघेही समान आहेत, कोणत्याही प्रसंगात त्रास द्यायचा नाही असेच संस्कार द्यायला हवेत. त्यामुळे मुला-मुलींची मानसिकता विवेकी, सुदृढ व निकोप बनून ते मोठेपणी सुजाण, जबाबदार नागरिक बनतील.

प्रत्येकाने आपल्या मनातल्या परमेश्वराचे स्मरण ठेवले ; तर हातून वाईट कृत्य घडणारच नाहीत. जीवनाला नरक बनवणाऱ्या अस्वच्छता, आळस, प्रमाद, वासनांधता, व्यसनाधीनता या गोष्टी नरकासूरच आहेत. त्यांना आज नष्ट करायचे. वाईटातून चांगल्याची, अंधारातून उजेडाची वाट धरायची. तेव्हा चांगल्याचे रक्षण व्हावे,  नाती जास्त जवळ यावीत यासाठी एकत्रितपणे पण नियम पाळत,  सामाजिक भान राखत श्रध्देने,  आनंदाने हा सण साजरा करू या.

शुभ दीपावली.  ?

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बदलती दिवाळी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ बदलती दिवाळी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆      

दिवाळीची चाहूल तर  लागली! मनात असंख्य दिव्यांची आरास तयार झाली! आठवणींच्या पणत्या  तेल,वात  घालून प्रज्वलित होऊ लागल्या!या पणत्यांच्या ज्योतींनी मन उजळून निघाले. त्याचा प्रकाश मनभर पसरला!  पुन्हा पुन्हा आठवू लागल्या त्या सोनसळी दिवाळ्या!

आमच्या लहानपणी आत्ता सारखा लखलखाट नसला तरी मांगल्याने, पवित्र्याने भारलेली दिवाळी असे. पहाटेच्या वेळी मंदिरात काकड आरतीचे प्रसन्न वातावरण अनुभवता येई! कोजागिरी पौर्णिमा  आली की दिवाळी जवळ आल्याची जाणीव होत असे. पहाटेचा गारवा सुखद वाटत असे. घराघरातून स्वच्छता होऊन नवरात्र पार पडले की बायका दिवाळीच्या तयारीला लागायच्या!

डबे घासणे, अनारसा पीठ तयार करणे, चकली कडबोळी ची भाजणी भाजणे ही कामे सुरू होत असत! दिवाळीची खरेदी फार मोठी नसे. तरीही खिशाच्या परवानगीनुसार प्रत्येकी एखादा तरी नवीन कपडा आणि थोडे फटाके आणले जात. कधीकधी घरासाठी म्हणून काही खरेदी असे! दिवाळीची वाट पाहिली जायची ती मुख्यतः फराळासाठी! लाडू, चिवडा, शंकरपाळी, चकली,  करंजी सगळे कसे आतुरतेने वाट पाहत असायचे!

दिवाळी अगदी उद्यावर आली की पहिला फटाका कोण, किती वाजता वाजवणार याची चुरस असे. फटाके अंगणात उन्हात टाकलेले असत. कारण जेवढे सुके असतील तितके ते जोरात वाजत! दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे आकाश कंदील बहुदा घरीच बनवले जात. अंगणाच्या कोपर्‍यात मुलांची दगड, माती गोळा करून किल्ला करायची गडबड असे.त्यावर शिवाजी महाराज आणि मावळे कसे लावायचे यावर जोरदार चर्चा होत असे. सगळं वातावरण कसं चैतन्याने भारलेले असे. नवलाईने आणलेले सुगंधी तेल, उटणे, साबण यांचे वास दरवळत असायचे. अशी ही दिवाळी आम्ही आमच्या लहानपणी अनुभवली!

आमच्या मुलांनाही अशीच दिवाळी अनुभवायला मिळाली!

पण गेल्या पंधरा वीस वर्षात दिवाळीचे स्वरूप थोडे बदलले आहे असे म्हणायला हरकत नाही. घरी फराळाचे पदार्थ करणे कमी झाले. त्यामुळे फराळाची ताटं शेजारी देण्याची पद्धत कमी झाली. त्याच बरोबर काही चांगले बदल आता झाले आहेत. दिवाळी निमित्ताने काही सेवाभावी संस्था सुवासिक तेल, साबण, फराळाचे पदार्थ ,मुलांसाठी खाऊ, फटाके अशा गोष्टींचे वाटप करतात. अनाथाश्रम, वृद्धाश्रम अशा ठिकाणी फराळ देणे, कपडे देणे यासारख्या गोष्टी केल्या जातात. दिवाळी पहाट गाण्यांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच घरी दिवाळी न करता ट्रीपला जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दिवाळी अंकांची मेजवानी या सुट्टीत अनुभवयाला मिळत असते. एकूण काय तर दिवाळीचे स्वरूप बदलले असले तरी दिवाळी आनंदमय  आहे! रूटीन मध्ये बदल म्हणून आपण दिवाळीचा आनंद घेतो. दिव्यांच्या माळा आणि लायटिंग यामुळे  पणत्यांची शोभा कमी झाली असली तरी अजूनही तुळशी वृंदावना पुढे पणती लावणारी एक पिढी शिल्लक आहे, ती या बाहेरच्या झगमगाटापासून लांब शांतपणे तेवत असते.

बदलत्या दिवाळीचे अनुभव आठवता आठवता या सगळ्या दिवाळींपेक्षा वेगळी दिवाळी यंदा येत आहे. गेले सात-आठ महिने कोरोनामुळे वातावरणात एक प्रकारची मरगळ आली. अजूनही कोरोनाची भीती माणसाच्या मनात आहेच पण कोरोनाबद्दल बऱ्याच गोष्टी आता कळल्यामुळे सावधगिरी बाळगून का होईना माणूस उत्साह दाखवत वावरत आहे! मास्क, सॅनिटायझर  आणि सोशल डिस्टंसिंग ही त्रिसूत्री वापरून लोक बाजारात गर्दी करत आहेत. बाजारात नव्या साड्या बरोबर नवीन नवीन मॅचिंग मास्क ही मिळू लागले आहेत. माणूस हा समूह प्रिय प्राणी आहे त्यामुळे कोणत्या तरी कारणाने एकत्र जमणे हे माणसाला आवडते! तरी अलीकडच्या काळात प्रत्येकाच्या कार्यबाहुल्यामुळे एकमेकांकडे असलेले येणे जाणे कमी झाले आणि कोरोनामुळे तर आणखीनच कमी झाले आहे. व्यवसाय, नोकरीतील मंदीमुळे लोकांच्या हातात पैसाही कमी झाला आहे. या सर्वांचा बाजारपेठेवर थोडा परिणाम होणारच असला तरी आहे त्या परिस्थितीत माणसं दिवाळीचा सण साजरा करणारच! दिवाळी सारखा वर्षातून एकदा येणारा मोठा सण सुना जावा असं वाटत नाही ना!

लोक आहे त्या परिस्थितीत जमेल तेवढा आनंद साजरा करतील. लवकरच कोरोना वर लस येईल आणि आपण कोरोनामुक्त होऊ! तोच दिवस आपल्यासाठी खरतर दिवाळीचा असणार आहे एवढे मात्र नक्की!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ धनत्रयोदिशी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ विविधा ☆ धनत्रयोदिशी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

? दिन दिन दिवाळी—२ ?

आज ‘ धनत्रयोदशीचा ‘ दिवस. दिवाळी सणाच्या रुपाने सुखाचे, समाधानाचे, समृद्धीचे जीवन लाभावे अशी कामना प्रत्येकजणच करतो. त्यासाठी समृद्धीची म्हणजे धनाची पूजा केली जाते. आज संध्याकाळी धने, गुळ, पिवळी फुले वाहून धनाची म्हणजे पैशांची पूजा करतात.  आणखी एक गोष्ट म्हणजे संपन्न जगण्यासाठी बुद्धी आणि धन जितके महत्त्वाचे तितकेच आरोग्यही महत्त्वाचे असते. म्हणूनच आज आरोग्यदेवतेचे सुद्धा पूजन करतात.

समुद्र मंथनातून निघालेले पाचवे रत्न म्हणजे ‘धन्वंतरी’. याच धन्वंतरीला आरोग्याची देवता मानतात. याच धन्वंतरीची आज पूजा करून उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी तिची प्रार्थना करतात.

याशिवाय आजच्या दिवशी आणखी एक गोष्ट सांगितली आहे;ती म्हणजे अपमृत्यू टाळण्यासाठी यमाला म्हणजे मृत्यूच्या देवतेला दक्षिणेकडे तोंड करून दीपदान करावे. पद्म पुराणानुसार अपमृत्युच्या विनाशा करता आणि यमाच्या सत्कारासाठी दीप लावावेत असे सांगितलेले आहे.

याबाबतची एक आख्यायिका सांगतात.  हैमराजाला पुत्रप्राप्ती झाली. त्या पुत्राची कुंडली पाहून ज्योतिषांनी भाकीत केले की, त्याच्या विवाहानंतर चौथ्या दिवशी सर्पदंशाने त्याचा मृत्यू होईल. तो मृत्यू टाळण्यासाठी राजाने शक्य ते सर्व प्रयत्न केले. पण अखेर ज्योतिषाची भविष्यवाणी खरी ठरली. राजाला आणि प्रजेला अतोनात दुःख झाले.  हे पाहून यमदूतही व्यथित झाले. त्यांनी यमराजाला प्रार्थना केली की, ‘असा अपमृत्यू कोणाच्याही वाट्याला येऊ नये’. यमराज गंभीर झाले आणि त्यांनी असा वर दिला की ‘दिवाळीचे पाच दिवस जे लोक दीपोत्सव करतील त्यांच्या वाट्याला असं दुःख येणार नाही.’

माणूस वृद्धापकाळाने जाणे हा झाला नैसर्गिक मृत्यू. तो कुणालाही चुकलेला नाही आणि चुकविता येतही नाही. पण आजारपणाने, रोगराईने, सर्पदंशाने अवेळी जाणे म्हणजे अपमृत्यू.  पूर्वी अशा मृत्यूंचे प्रमाण फार होते. त्यामुळेच असे अपमृत्यू टाळण्यासाठी देवाची प्रार्थना केली जायची.

आज-काल वैद्यक शास्त्र अतिशय प्रगत झालेले आहे. इतरही सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे अशा मृत्यूंचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे. पण आज-काल वेगळ्या अपमृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. अपघात, घातपात, आत्महत्या, व्यसनाधीनतेमुळे होणारे मृत्यू खूप वाढलेले आहे. हे सर्व अपमृत्यूच आहेत. शिवाय पूर्वी प्लेग, कॉलरा असे आजार होते. तर आता काविळ, डेंग्यू ताप, स्वाईन फ्ल्यू, कोविड-१९ असे आजार आले आहेत.

पण यातल्या बऱ्याच गोष्टी टाळणे तर आपल्याच हातात आहे.  या सणांचा हाच मूळ उद्देश असतो. परिसराची जशी स्वच्छता करायची तशीच मनाची सुद्धा करायची. म्हणजे दुरावा विसरून नाती पुन्हा घट्ट करायची. थोडं आत्मचिंतन,थोडं आत्मपरीक्षण करायचं. व्यसनं दूर सारून, अती राग, द्वेष, अतीवेगावर नियंत्रण करून हे अपमृत्यू नक्कीच कमी करता येतील.

आजच्या दिवशी आरोग्याला घातक व्यसनांचा त्याग करून आरोग्यपूर्ण जीवनाचा निश्चयच आपण सगळ्यांनी केला पाहिजे. सगळ्यांनी या मागचा विचार समजून घेतला पाहिजे म्हणजे, या सणांचा आनंद निश्चितच द्विगुणित होणार आहे. म्हणूनच आज दीपदान करायचे.

मुळामध्ये दिवाळी हा दीपोत्सव असल्यामुळे  दिवा हा केंद्रस्थानीच असतो. म्हणूनच घराघरांमध्ये आणि  सार्वजनिक ठिकाणी विविध प्रकारांनी  दिव्यांची आरास केली जाते.  सारा आसमंत उजळून जातो. मन आनंदाने, उत्साहाने भरून जाते.

सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा.

शुभ दीपावली.  ?

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दीप ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

 ☆ विविधा ☆ दीप ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

‌दीप म्हणजेच दिवा. अंधारातून प्रकाशाकडे नेणारे एक माध्यम, साधन! पृथ्वीच्या उत्पत्तीपासून जगाच्या नाशापर्यंत ज्याचे अस्तीत्व असणार आहे तो सूर्य मानवाच्या आयुष्यातला प्रथम दीप, दिवा ! काही दिवे अत्यंत दीप्तीमान असतात तर काही अत्यंत शांतपणे तेवणारे असतात.सूर्य हा असाच अत्यंत दीप्तीमान दिवा ज्याशिवाय आपले जगणे अशक्य!

मानवाच्या गरजेतून निर्माण झालेला पहिला दिवा! दिवा म्हणजे गारगोटीच्या घर्षणातून निर्माण झालेली ठिणगी. मानवाला लागलेला अग्नीचा शोध ही दिव्याची सुरवात होय. दिवटी, पणती, सम ई, कंदील, बत्ती आणि विद्युत अशी दीप, दिव्याची अनेक रुपे म.वि. कुलकर्णी यांच्या कवितेत आढळतात.

‌अंधार नष्ट करून प्रकाश देणे हे दिप, दिव्याचे काम असून त्या प्रकाशाने आपल्याला आनंद होतो. मग तो अंधार आसमंतातील असो वा मनातील !

‌सूर्य अस्ताला गेला की देवापुढे दिवा लावून ‘ शुभंकरोती कल्याणम्’ म्हणायचे संस्कार आपल्यावर लहानपणीच झालेले आहेत. त्यातील ‘दिव्या दिव्या दिपत्कार, कानी कुंडलं मोतीहार’ ही ओळ आपल्याला दीपज्योतीचे महत्व सांगते.देवघरात सम ईत तेवणारी दोन वातींची, दिव्यांची ज्योत म्हणजे देवाच्या कानातील प्रकाशमान कुंडल असावीत आणि त्या  ज्योतीभोवती निर्माण झालेले तेजोवलय म्हणजे मोत्यांचा हारच वाटतो.ते तेजोवलय आपणआपल्या डोळयांत साठवितो. ही साठवण आपल्याला बरेच काही देऊन जातो.

आपल्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा दीप म्हणजे ज्ञानदीप आपल्या बौद्धिक कुवतीप्रमाणे प्रकाशित होऊन आपले आयुष्य उजळून टाकतो.

काही वेळा बौध्दिक ज्ञानदीप प्रकाशित होणारा असूनही एखाद्याच्या आयुष्यात अंधारी रात्र येते त्यांमुळे त्याच्या स्वप्नांचे आशादीप मंदावतात तर कधी कधी नैराश्य आले असताना अचानक आशादीप प्रज्वलित झालेलेही पहावयास सापडतात.

पूर्वी वंश वृध्दीसाठी वंशदिप म्हणजे पुत्रजन्माला फार महत्व होते. आता काळ बदलत चालला असून दीपाचे दुसरे रूप पणती लोक आनंदाने स्वीकारू लागले आहेत.

दीप कोणताही असो तो समाजाला,मनाला प्रज्वलित करत असतो. अर्थात दीपाचे प्रज्वलित होणे त्याला मिळणाऱ्या तेलवातीवर अवलंबून असते हे विसरून चालणार नाही दीपावलीच्या सणाच्या निमित्ताने आपल्या मनातला सर्व अंधकार संपून जावा, प्रत्येकाने आपला मनाचा दीप संस्कार, सत्कार्यासाठी प्रज्वलित ठेवण्याचा प्रयत्न करत सतत, ‘दिव्या दिव्या दीपत्काराचे स्मरण ठेवणे गरजेचे आहे आपली गरज सतत स्मरणात रहावी यासाठीच दीपांची आरास! दीपावली साजरी करावयाची !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वसुबारस ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ विविधा ☆ वसुबारस ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

? दिन दिन दिवाळी—१ ?

आज पासून दिवाळीचा सण सुरू होतो आहे. गेल्या सात-आठ महिन्यातील सणांप्रमाणे दिवाळी सणावर सुध्दा करोनाच्या साथीचे सावट आहे. उत्सवाला धास्तीची किनार आहे. पण सर्व नियम पाळत, स्वच्छता राखत, अगदी साधेपणाने आपण हा सण साजरा करणार आहोत. सामाजिक अंतर राखत पण  मनामनातलं अंतर कमी करत नाती जास्त सुदृढ करणार आहोत. कारण प्रत्येक सणाचे हेच तर प्रयोजन असते. हा तर ‘दिवाळीचा सण’

दिवाळी हा फक्त एकच उत्सव नाही बरं का ! तर हे उत्सवांचे स्नेहसंमेलन आहे.  हा फक्त एकाच देवतेचा उत्सव नसून तो लोकव्यवहाराशी जास्ती जोडलेला आहे. मुख्य म्हणजे हा प्रकाशाचा उत्सव, नात्यांचा उत्सव, लक्ष्मीचा उत्सव, निसर्गाचा उत्सव,  विजयाचा उत्सव असे  अनेकरंगी पदर असणारा उत्सव आहे.

अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असे सहा दिवस हा उत्सव साजरा होतो. त्यातला पहिला दिवस म्हणजे ‘गोवत्स द्वादशी’.  यालाच “वसुबारस ” असेही म्हणतात.  आपल्या संस्कृतीत गाय फार पवित्र मानली जाते.  लक्ष्मीच्या अंशापासून उत्पन्न झालेली सवत्स धेनु म्हणजे “सुरभि”. हीच गोमातांची अधिदेवता आहे.  दिवाळीत हिचे पूजन केले जाते. एरवी सुद्धा ‘गो-ग्रास’ म्हणून पोळी-भाताचा नैवेद्य काढून ठेवला जातो.  वसुबारस तर  काय गायींचाच उत्सव त्यामुळे या दिवशी तिचे विशेष कौतुक होते.

यानिमित्ताने प्राण्यांचे रक्षण करणे, निसर्गाच्या प्रती ऋण  व्यक्त करणे हा मुख्य  संदेश दिलेला आहे. हाच या सणामागचा मुख्य उद्देश आहे. अनेक उपकारक प्राण्यांचे ऋण आपण व्यक्त करतो , त्यातलाच हा एक दिवस. या दिवशी गायींचा गोठा स्वच्छ करून रंगवतात. तिथे पणत्या लावतात.  मुख्य म्हणजे गायींना ओवाळून नैवेद्य देतात.  त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. ग्रामीण भागात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गायीसमोर गाणी म्हटली जातात. गाण्यांमधून गाईच्या गुणांचे,  शेतीच्या कामांचे वर्णन केलेले असते. या गाण्यांमधून एकमेकांना कोडी घालण्याचा खेळ खेळला जातो.

कृतज्ञता व्यक्त करणे हा आपल्या भारतीय संस्कृतीचा स्थायीभाव आहे. वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने निसर्गाचे पूजन करून त्याच्या प्रती ऋण व्यक्त केले जाते. आपला देश हा कृषिप्रधान देश आहे आपल्या संस्कृतीत गाई-वासरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या निसर्गातील प्राणिमात्रांचे रक्षण केले पाहिजे. कोणत्याही कारणाने,  कोणत्याही प्रकारे निसर्गाला हानी पोहोचवायची नाही.  ध्वनी-वायू प्रदूषण रोखले पाहिजे. निसर्गाचे रक्षण, संवर्धन केलं पाहिजे. हा संदेश या सणातून घ्यायचा आहे. निसर्ग संवर्धन मोहीम,  वसुंधरा महोत्सव या अभियानांचे हेच उद्दिष्ट आहे.  “निसर्ग धरतीचे लेणे हो ! त्यांचे रक्षण करणे हो !!” हे कायम स्मरणात ठेवायला हवे.

तेव्हा या निमित्ताने आपण पुन्हा निसर्गाच्या जास्ती जवळ जाऊ या. त्याच्याशी आपले नाते पुन्हा घट्ट करू या.  दिवाळीची सुरुवात आनंदाची करू या.

शुभ दीपावली.  ?

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवनगाणे गातच रहावे ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ. मेधा फणसळकर

☆ विविधा ☆ जीवनगाणे गातच रहावे ☆ डॉ मेधा फणसळकर

परवा पुस्तकांच्या कपाटातून सारखी खुडबुड ऐकू येऊ लागली. मनात म्हटले ,“एवढा बंदोबस्त करुनही खारुताईने आपल्यावर कुरघोडी केलेली दिसतेय. पुन्हा घरटे बांधले वाटते.” असे म्हणून त्या बाजूचे दार उघडले तर खारुताई ऐवजी उंदीरमहाशयांनी दर्शन दिले. मी घाबरून पटकन दार बंद करुन घेतले. आमच्या  कपाटाच्या मागच्या बाजूला खिडकी आहे.   ती एका बाजूने कायम थोडीशी उघडी राहते आणि त्याच चोरवाटेने प्रवेश करुन या खारुताईनी दोन वर्षे आपले बस्तान बसवले होते. बिचारी मोठ्या कष्टाने घरटे बनवते आणि तेव्हा लेकुरवाळी पण असते. म्हणून मी पहिल्या वर्षी तिचे बाळंतपण संपेपर्यंत धीर धरला. नंतर सर्व बाजूनी कडेकोट बंदोबस्त केला. पण बाईसाहेब माझ्यापेक्षा हुश्शार निघाल्या. अगदी लहान राहिलेल्या फटीतून त्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा आपला कार्यभाग साधला. यावर्षी मग मी अधिक जोमाने बंदोबस्त केला. आणि बाईसाहेब तिकडे फिरकल्या नाहीत. मी एकदम आनंदात होते. आणि एक दिवस दुसऱ्या बाजूचे कपाट उघडले तर बाईसाहेब दिमाखात घरट्यात बसून माझ्याकडे “ जितम् मया।” अशा अविर्भावात बघत होत्या. तिच्या जिद्दीला मी सलाम केला आणि बाईसाहेब निघून गेल्यावर त्यांच्या घरात आश्रय घेतलेल्या या  मूषकमहाशयांनी दर्शन दिले. आता यांचा बंदोबस्त कसा करायचा या विवंचनेत मी असतानाच आणखी एक समस्या उद्भवली. आमच्या बाथरूमचे आउटलेट तुंबू लागले होते. आणि चाचपणी केली असता लक्षात आले की बाथरूमच्या बाहेरच्या बाजूला उगवलेल्या झाडाच्या मुळ्यांनी पाण्याशी मैत्री करत त्या पाईपमध्ये हात- पाय पसरले होते. ते बघितले आणि मनात विचार आला ,“शेवटी  प्रत्येक जीवाची ही जगण्याचीच तर धडपड आहे. जगण्याची हीच उर्मी त्याची संजीवनी देत असते.”

मध्यंतरी  परदेशातील एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. एका तीन ते चार वर्षाच्या  मुलाचे आई- वडील एका विघातक घटनेत मृत झाले होते आणि ‛मृत्यू’ या शब्दाचाही अर्थ माहीत नसलेला  आणि आपल्या आईच्या आठवणीने  रडणारा तो चिमुरडा बघून वाटले,“ कसे जगणार हे पिल्लू ?” पण तरीही तो जगतो आहेच की! आपल्या आजूबाजूला पण अशी अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात. आपण त्यावेळी हळहळतो आणि काही दिवसांनी विसरून पण जातो. पण त्या जीवांची जगण्याची धडपड आणि उर्मी तशीच असते. म्हणूनच जीवनप्रवाहसुद्धा अविरत चालू राहतो.

आज अनेकदा पर्यावरणप्रेमी- अभ्यासक सतत आपल्याला म्हणजेच मानवाला जाणीव करुन देत आहेत की आम्ही पर्यावरणाचा ऱ्हास करत आहोत आणि पर्यायाने तेथे निवास करणाऱ्या जीवसृष्टीचा पण! गोष्ट शंभर टक्के खरीच आहे. पण एका दृष्टीने हीसुद्धा माणसाची जगण्याचीच धडपड नाही का? पण त्यात मूलभूत फरक हा आहे की बाकीची जीवसृष्टी आपल्या गरजेपुरताच निसर्गाचा विनियोग करते. आम्ही मात्र आमच्या भौतिक सुखाच्या हव्यासापोटी त्या संपत्तीचा हवा तसा उपयोग करुन घेत आहोत आणि म्हणूनच ही केवळ जगण्याची उर्मी न राहता हाव बनली आहे. म्हणूनच कदाचित बाकीच्या सजीवांना जगण्यासाठी नवनवीन मार्ग शोधावे लागत आहेत. सिंधुदुर्गमध्ये उद्भवलेला हत्तींचा प्रश्न , हल्ली वारंवार ऐकू येणाऱ्या मानववस्तीतील बिबट्याचा वावर, माझ्या घरात घरटे बांधणारी खारुताई किंवा भिंतीत मूळे रुजवणारी वनस्पती हे त्याच समस्येतून निर्माण झालेले प्रश्न आहेत. जगण्यासाठी त्यांनी शोधलेले हे नवीन पर्याय आहेत.अर्थात सजीवांची खासियत हीच आहे की आहे त्या परिस्थितीला तोंड देत जीवन चालू ठेवायचे. आधार शोधून घेऊन नवीन मार्ग निवडायचा! तर काहीवेळा आमच्यातीलच सहृदय व्यक्ती स्वतःहून आधाराचा हात पुढे करतात.म्हणूनच अनाथ मुलांचे आश्रयस्थान एखादी सिंधुताई सकपाळ बनते, तर आमच्याच सिंधुदुर्गातील संदीप परब वृद्धांना सहारा देणारा आधारवड  बनतो. दिव्यांगाना आपल्या मायेची ऊब देत एखादी नसीमादीदी स्वतःच्या शारीरिक मर्यादांवर मात करत त्यांना नवीन पंख देते. एखादी तमक्का  आयुष्यभर वृक्षांना मुले मानून त्यासाठी देशभरात बिया रुजवत फिरते आणि लाखो वृक्षांना जन्म देऊन त्यांची आई बनते. तर जंगल अधिवास  नष्ट होऊ नये म्हणून एखादा आसाममधला मोलाई अख्खे जंगल निर्माण करतो.  तात्पर्य काय तर प्रत्येक सजीवाला जगण्याचा अधिकार आहे आणि  जगण्याची उर्मी हा त्याचा स्रोत आहे.

 

©️ डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नकोसा तो लखपती ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ.पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ☆ विविधा ☆ नकोसा तो लखपती ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

एका देखण्या आणि हुशार कुत्र्याने स्वतःच्या कर्तृत्वावर लखपती होऊन जागतिक कीर्ती मिळविलेली कुठे ऐकली आहे का ?..होय आहे!!!

एका वयस्कर जोडप्याने एक का़ँली़ जातीचा कुत्रा पाळला होता त्याचं नाव पाँल. अत्यंत हूड होता. तो कोणाच्याही अंगावर जायचा. मिळेल ते  फाडायचा. गाड्यांच्या मागे धावायचा. वयस्क असल्याने मालकाला त्रास व्हायला लागला. अखेर त्यांनी त्याला ‘श्वान प्रशिक्षण’ केंद्रात दाखल केले. थोडा मोठा असल्याने नाखुषीतच त्यांनी त्याला ठेवून. घेतले पाँलचे तेथे शिक्षण सुरू झाले.एका महिन्यातच ‌शिक्षक विदरवँ त्याच्यावरक्स त्याच्यावर बेहद्द खुश झाले .आता तो नविन मालकाचा, शिक्षकाचा लाडका झाला. त्याचा हूडपणा कमी झाला.पाच ते सहा महिन्यात अत्यंत अवघड कामे तो चपळाईने आणि डौलदार पणे करायला लागला. पाणीदार डोळे,  सुळसुळणारे पिंगट केस, पन्नास पौंड वजन यामुळे तो देखणा आणि रुबाबदार दिसायला लागला.

सात आठ महिने गेले. एक दिवस पाँ आणि त्याचे शिक्षकल आणि त्याचे शिक्षक विदरवँक्स यांना सुवर्णसंधी आली. उज्ज्वल भविष्य दिसायला लागलं. चित्रपटासाठी ‘काँली जातीचा कुत्रा पाहिजे’  अशी जाहिरात आली. हॉलीवूडमध्ये निवड करण्यासाठी 300 कुत्रे आले होते. पाँलने स्टुडिओमध्ये उत्तम आणि अवघड कामे रुबाबात करून दाखवून वाहवा व टाळ्या मिळविल्या. अनेक चाचण्या झाल्या आणि त्यात पाँल हा चित्रपटासाठी निवडला गेला. चित्रपटाचे नाव “लँसी कम होम” या चित्रपटाचा नायक म्हणून पाँलचे काम सुरू झाले. एका चाचणीत नदीमध्ये होडीतून उडी मारून नदीच्या दुसऱ्या टोकाला पोचताच थकल्यासारखे रांगत जाऊन नंतर उभं रहायचं हे काम त्याने अतिशय उत्तमरीत्या वठविले.  विदरवँक्सना धन्यता वाटली आणि आनंदाने डोळ्यात आनंदाश्रू तरळू लागले .चित्रपट अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी ठरला. तो काळ 1943. लँसीचे आणखी चित्रपट काढण्यासाठी अनेक देशातून पत्रे येऊ लागली. अनेक करारही झाले. आणखी चित्रपट यायला लागले .आता लँसीची स्वतःची कमाई किती झाली असेल ?? आश्चर्य वाटेल…!!!

वार्षिक 50000 डॉलर (1945-46)

दुसऱ्या महायुद्धाच्या लढाईत शत्रूचे संकट पुढे असताना सैनिकांना मार्गदर्शन करून त्यांचे प्राण वाचविण्याचे काम, बर्फाळ प्रदेशात सैनिकांबरोबर पँराशूट मधून उतरून शत्रूला जेरीस आणण्याचे काम लँसी-पाँलने अतिशय उत्तमरितीने पार पाडून शाबासकी मिळवली. काहीवेळा प्रेक्षकात हास्याचे फवारे उडविले.तसेच डोळ्यात अश्रू उभे करण्याची खुबी आणि तंत्रही त्याला जमले होते. त्याच्या देखण्या रुपाची आणि कर्तबगारीची स्तुती करणारी हजारो पत्रे यायला लागली. त्याच्या पायाचा ठसा आणि फोटोसाठी मागण्या यायला लागल्या.त्याच्या रेखा चित्रांची मासिके निघाली. त्याच्या स्वामीनिष्ठेच्या गोष्टी शाळेतले शिक्षक विद्यार्थ्यांना सांगायला लागले. त्याच्या निष्ठेवर धर्म उपदेशक प्रवचन सांगायला लागले . लँसी-पाँल हॉलीवूडचा एक अमोल कुत्रा होता. केवळ श्वान प्रदर्शनात उपस्थित राहण्यासाठी त्याला दिवसाचे 1000 डॉलर्स मिळत होते. आता चित्रीकरणासाठी लांबचा प्रवास तो स्वतःच्या विमानातून, रेल्वेचा प्रवास वातानुकूलित खास डब्यातून आणि इतर प्रवास खास बांधणीच्या गाडीतून करत होता.

लँसीच्या मोठेपणाचे आणि समजूतदारपणा चे उदाहरण सांगता येईल. चित्रीकरणासाठी त्याचा कॅनडाला मुक्काम होता. त्यावेळी जखमी झालेल्या सैनिकांच्या हॉस्पिटल मध्ये जवानानीच पाँलला आमंत्रित केले .त्याचे चित्रपट पाहून सैनिकांना त्याला प्रत्यक्ष पहाण्याची उत्सुकता होती. हॉस्पिटल मध्ये पाँल-लँसी फिरू लागला. सैनिकांना खूप आनंद झाला. त्यांचे चेहरे खुलले. अनेक जण त्याला हात लावण्याची इच्छा व्यक्त करू लागले .निराश होऊन शय्येवर पडलेला सैनिक त्याला पहाताच उठून बसला. त्याने सैनिकाचा हात चाटून शेक हँड केले. सैनिकाला आनंद  झाला .डॉक्टर आणि औषधाचे काम पाँल-लँसीने केले.

मूळ मालकाला नकोसा झालेला, शिक्षकांनीही थोड्या नापसंतीने ठेवून घेतलेला पाँल-लँसी लखपती झाला.

© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

पत्ता- ‘पुष्पानंद’ बुधगावकर मळा रस्ता मिरज, जि. सांगली

फो नं. ०२३३-२२१२१५१ मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गतकाल..पुढील आयुष्याचे श्वास… ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ गतकाल..पुढील आयुष्याचे श्वास… ☆ श्री अरविंद लिमये ☆

आत्ताचा श्वास उच्छवासात रुपांतर होताच भूतकाळात जमा होत जातो. कधीच न थांबणारं हे निरंतर चक्र. . !सृष्टीच्या उत्पत्तीपासून सतत दमछाक न होता एका लयीत ते फिरतं ठेवण्याची ही किमया अचंबित करणारीच. भूतकाळात जमा होणाऱ्या या आपल्या साऱ्या श्वासांचा चोख हिशोब ठेवण्यासाठीचं आवश्यक साॅफ्टवेअर या व्यवस्थेत In Builtच असतं. तिथं ना निष्काळजीपणा ना चूकभूल. आपल्या प्रत्येक बऱ्यावाईट कृतीचीच नव्हे तर त्या त्या क्षणी मनात उमटलेल्या पण कृतीत न उतरलेल्या बऱ्या-वाईट विचारांचीही त्याच क्षणी नेमकी अचूक नोंद होत असतेच. या नोंदी म्हणजेच आपली कर्मे. याचाच अर्थ आपला भूतकाळ आपणच घडवत किंवा बिघडवत असतो आणि त्याचीच कर्मानुसार कडू-गोड फळं भविष्यकाळात कर्मफलांच्या परिपक्व होण्याच्या क्षमतेनुसार आपल्यालाच मिळणार असतात. ती स्विकारण्याचा किंवा नाकारण्याचा कोणताच अधिकार आपल्याला नसतो. सत्कर्माच्या गोड फळांच्या आस्वादाचं सुख उपभोगणारे आपणच आणि कडू फळांचे भोग भोगणारेही आपणच. भविष्यकाळांत काय घडणाराय हे आपल्याला माहित नसतं असं म्हणतात. पण हे पूर्ण सत्य नव्हे. कारण आपल्या कर्मांच्या नियतीच्या नोंदवहीत होणाऱ्या नोंदी त्या त्या क्षणी आठवणींच्या रुपात आपल्या मनातही होत असतातच. त्यामुळे आपल्या बऱ्यावाईटाचे आपणच साक्षीदार असतो आणि म्हणून त्याची जबाबदारीही आपलीच. या गतकाळातल्या चांगल्या आठवणी आपला भविष्यकाळ सुखकर करीत असतात. नकोशा आठवणी सोईस्करपणे विसरायचा प्रयत्न करणारेही त्या आठवणीरुपी कर्माची कडू फळं टाळू शकत नाहीत.

याचाच अर्थ आपला भविष्यकाळ आपल्याला माहित नसला, तरी तो घडवणारे आपल्या आयुष्याचे शिल्पकार आपणच असतो. आपला प्रत्येक श्वास  उच्छवासाबरोबरच भूतकाळात जमा होत असतो. तो सत्कर्माने सजलेला हवा कि कुकर्माने बाधित हे ज्याचे त्याने ठरवायचे. पण हा निर्णय योग्य आणि सुखकर व्हायला हवा असेल तर आपणच क्षणोक्षणी निर्माण करीत असलेला आपला गतकाल हाच आपला भविष्यकाळातला श्वास असणार आहे हे विसरायचं नाही. . !!

 

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print