सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ विविधा ☆ चाहूल ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
पंचमहाभूतांनी भरलेल्या या निसर्गाचे काहीच सांगता येत नाही! पृथ्वी,आप, तेज,वायू, आकाश सारी तुझीच रूपे! कोणी त्याला निसर्ग म्हणोत तर कोणी परमेश्वर !पण या मानवप्राण्यासाठी हे सारे महत्त्वाचे! त्यांचे अस्तित्व रोजच्या जीवन व्यवहारात आपल्या लक्षातच येत नाही. आणि मग कधी एकदम वादळे येतात, आकाश कोसळते , सूर्याचा प्रकोप होतो तर कधी ही जमीन हादरते!असं झालं की आपल्याला निसर्गाच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागते आणि सत्य दिसायला लागते!
निसर्गाचा अभ्यास म्हणून हवामान खात्याची यंत्रणा निर्माण झाली. आता ती बरीच शास्त्रशुद्ध झाली आहे. काही वर्षापूर्वी हवामान खात्याचा अंदाज ही विनोद करण्याची गोष्ट वाटे. ‘हवामान खात्याने अंदाज दिला आहे ना पाऊस पडेल म्हणून,मग हमखास येणार नाही’ अशा प्रतिक्रिया नोंदवल्या जात पण आता मात्र हे शास्त्र खूपच प्रगत झालंय.त्यामुळे पुढील दोन दिवस पावसाचा धुमाकूळ राहणारच आणि त्यासाठी जमेल तेवढी काळजी घेत आपण राहायचे!
वादळाचे भोवरे समुद्रात अखंड फिरत असतात, त्यांना आपण आवर घालू शकत नाही हे खरे! कधी कधी आपली नजर चुकून मुंबईला न जाता वारे कोकणाकडे वळतात किंवा आपल्या प्रभावाने एखादी किनारपट्टी नाश करतात .
एकमेकांवर अवलंबून असणारी ही पंचमहाभूते आर्यांच्या काळात देव म्हणून मानली गेली. निसर्ग पूजा महत्त्वाची होती. निसर्गात असणाऱ्या प्रत्येक बदलाचा विचार करून माणसाने त्याचे महत्त्व मानले असेल!
यंदाचे २०२० हे वर्ष काळाच्या कसोटीवर संकटाचे वर्ष म्हणून आले आहे. करोना महामारी च्या छायेत सारे जग सापडले आहे. पुन्हा एकदा निसर्ग आणि मानव या लढाईत आपले अस्तित्व टिकवायचे आहे. काही वर्षापूर्वी नाॅस्टरडॅम नावाच्या एका शास्त्रज्ञाने असे भाकीत केले होते की पृथ्वीवरील या जीवसृष्टीचे अस्तित्व २०२५ मध्ये संपेल!
तरी यापूर्वी 2005 मध्ये मुंबई बुडणार असेही भाकीत होते. तेव्हा मुंबई खरंच जलमय झाली. अगदी संपली नाही तरी मुंबईला निसर्गाचा खूप मोठा धक्का सहन करावा लागला.एका अरिष्टाची
चाहूल तेव्हापासून चालू झाली असेच वाटते. 2005 मध्ये पाण्याचा प्रवेश सांगली ,कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्राच्या शहरांमधून सुरू झाला. दरवर्षी खूप पाऊस आणि भरलेल्या धरणातून होणारा विसर्ग यामुळे या भागाला सतत पुराचा धोका निर्माण झाला. गेल्यावर्षी महाराष्ट्र ‘न भूतो न भविष्यती’ अशा स्वरूपात नद्यांचे पाणी वाढले आणि सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वीची रेकॉर्डस् मोडली गेली.
शेतीची, वित्ताची हानी तर झालीच पण मनुष्य आणि जनावरे यांची ही हानी झाली.
यंदा जुलै, ऑगस्ट मध्ये वादळाचा तडाखा श्रीवर्धन, अलिबाग या भागाला अधिक बसला आणि नारळी पोफळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या .त्याच दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर झाला. सुदैवाने मृत्यू संख्या त्यामानाने कमी होती.
गेले दोन दिवस सतत कोसळणारा पाऊस पुन्हा एकदा वाईटाची चाहूल देत आहे. आधीच कोरोनाने ग्रासलेल्या लोकांना वादळाचा क्षोभ सहन करावा लागत आहे. नकळत माणसाला आपण निसर्गासमोर किती लहान आहोत हे जाणवते आहे !
आज दोन दिवसानंतर पावसाने विश्रांती घेतली असे दिसते. नवरात्रीची सुरुवात चांगल्या प्रकारे झाली असं समजायला हरकत नाही. देवीच्या कृपेने यापुढे सर्व चांगले होईल अशी आशा वाटते आणि
चांगल्या दिवसाची चाहूल आजच्या घटस्थापनेपासून लागलेली आहे असे मनाला वाटते ! ?
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈