मराठी साहित्य – विविधा ☆ गणरायांचं आगमन ☆ श्रीमती उज्ज्वला अनंत केळकर

श्रीमती उज्ज्वला अनंत केळकर

संक्षिप्त परिचय 

शिक्षण – एम.ए. एम.एड. व्यवसाय – अध्यापन , क.ज्युनि. कॉलेज ऑफ एज्यकेशन, ३० वर्षे अध्यापन, सद्य: निवृत्त

प्रकाशित पुस्तके –  एकूण – ६५  बालवाङ्मय – एकूण २९ पुस्तके – कविता संग्रह – २, नाटिका -४, चरित्र – १,बाल कादंबरी – १ भौगोलिक – 1, बालकथा – १२ प्रौढ वाङ्मय –  मौलिक एकूण ८ पुस्तके कथासंग्रह –४, कविता संग्रह – २   संकीर्ण –  २ अनुवादित – अनुवाद हिंदी भाषेतून – एकूण २७ पुस्तके लघुतम कथासंग्रह – एकूण – ६ , लघुकथा  (हिंदीतील कहानी)  संग्रह – अनुवादित – १३  कादंबर्‍या – ६, व्यंग रचना -२ , तत्वज्ञान -अध्यात्म – ५  पुरस्कार –     बालकविता, बालकथा, बालनाटिका आणि एकंदर बालसाहित्याचे लेखन यांना पुरस्कार  अनुवादासाठी – स्पॉटलाईट, त्रिधारा या पुस्तकांना, एकंदर लेखनासाठी पंजाब साहित्य कला अकादमीचा विशिष्ट पुरस्कार  अन्य – सांगली जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्कार  अनुवाद  (हिंदी मध्ये)- काही लघुतम कथा व कही कथा यांचा हिंदी मध्ये अनुवाद व समकालिन भारतीय साहित्य, भाषा पत्रिका, मधुमती, हिमप्रस्थ इ. मासिके व कथा आणि लघुतम कथा संकलाच्या पुस्तकात प्रकाशित गणवेश कथा हिंदी, तेलुगु, कन्नड तिन्ही भाषांमध्ये प्रकाशित

सन्मान- कोटा – शब्दसरोज, जबलपूर – डॉ. श्रीराम दादा ठाकुर संस्कारधानी

आकाशवाणी प्रसारण – 1. प्रतिबिंब- कौतुंबिक श्रुतिका – १००च्या वर श्रुतिकांचे लेखन, २. नभोनाट्य – ५ नभोनाट्यांचे लेखन

शोध प्रकल्प – २ – १. किशोर मासिकातील प्रकाशित साहित्य, २. सांगली संस्थातील स्त्री शिक्षणाचा विकास – १८७५ ते १९५०

 

☆ विविधा : गणरायांचं आगमन – श्रीमती उज्ज्वला अनंत केळकर 

पार्वती मातेची परवानगी घेऊन, गणेशोत्सवासाठी गणराय महाराष्ट्रात आले आणि  घरोघरी नि विविध मंडळात अंश रुपाने स्थानापन्न झाले. या वर्षी त्यांना थोडं  बरं वाटत होतं. गर्दी फारशी नसल्याने मोकळा श्वास घेता येत होता. एरवी मिरवणुकीने येताना तो लोकांचा गोंधळ, आवाजाचा कल्लोळ यामुळे ते पार शिणून जायचे. स्वस्थपणे स्थानापन्न झाल्यावर त्यांना पार्वती मातेशी झालेला संवाद आठवला आणि त्यांच्या ओठांवर हसू फुटलं.

पार्वती माता म्हणाली होती, ‘यंदा जगभर सगळीकडे कोरोना… कोरोना…  ऐकू येतय. महाराष्ट्रात तर कोरोनाचा कहर आहे म्हणे… सांभाळून रहारे बाळा॰..’

आई माणसाची असो,  की देवाची, तिची काळजी आणि काळीज सारखच.

‘आई, लोक मला ‘सुखकर्ता… विघ्नहर्ता’ मानतात. कोरोनाचा कहर कमी कर, असं ते मला साकडं घालणार आणि कोरोना… कोरोना… म्हणत तूच मला घाबरवून टाकतीयस….’

‘तसं नाही रे… पण …’

‘कळलं … कळलं … आईचं काळीज…!’

‘मी पण तुझ्या पाठोपाठ २५ तारखेला येतेच आहे. लोकं मला माहेरवाशीण मानतात. तिच्यासारखं माझं कौतुक करतात पण मी जाणार घराघरातून. तुझा  वावर घरी.. दारी. यत्र… तत्र.. सर्वत्र.’

माता पार्वती आणि गणरायांचा संवाद चालू असताना, बाप्पांचा सारथी अर्थात उंदीर मामा यांचीही लगबग सुरू झाली.  बाप्पाला ब्रह्मदेवाकडे जाऊन E- पास घेण्याची त्यांनी आठवण केली. एका गोष्टीने मात्र उंदीर मामा खुश होते की यंदा लॉकडाऊनमुळे, मुळातच रस्त्यावर वाहतूक कमी झाल्याने रस्त्यावर खड्डे जरा कमी असतील.  त्यामुळे बाप्पांची स्वारी घेऊन जायला त्रास होणार नाही. यंदा मिरवणूक नसल्याने लांबत जाणारी पूजा नाही, त्यामुळे प्रसादाचे मोदक अगदी दुपारीच म्हणजे अगदी वेळेवर मिळणार. मामा आत्तापासूनच मनाचे मोदक खाऊ लागले.

यंदा ध्वनीप्रदुषण फारसे नसल्याने कानात घायलाला बोळे नकोत.  हा,  फक्त सॅनीटायझरची बाटली  आठवणीनं बरोबर घ्यायला पाहिजे, असं ठरवून उंदीर मामा पुढच्या तयारीला लागले आणि त्यांना एकदम मास्कची आठवण झाली. आपल्याला चिंधीही पुरे पण बाप्पांच्या मास्कचं काय करायचं? कोण शिवून देईल त्यांना मास्क, याची त्यांना विवंचना पडली.

गणरायांना एकीकडे  थोडं स्वस्थ, निवांत, वाटत होतं. यंदाचा उत्सव आपल्याला खरोखरच आरामदायी होईल, अशी त्यांना खात्री वाटू लागली होती पण दुसरीकडे आपल्या भक्तांविषयी कणवही त्यांच्या मनात… हृदयात दाटून आली होती. त्यांचा आनंद, उत्साह, जोश याच्यावर विरजण पडलं होतं. आता जाता जाता पहिलं काम म्हणजे धन्वंतरींना कोरोंनावर लस तयार करायला सांगणे.

आणखी काय अपेक्षा असेल बरं भक्ताची?  हां! येता येता लोक म्हणत होते, ‘कोरोंनात आता आणखी महापुराचं संकट तेवढं नको.’  मंडप आता रिकामा होता. गणरायांनी विचार केला आणि इंद्रदेवांना त्यांनी दूरध्वनी म्हणजे आकाशध्वनी लावला आणि त्यांच्याशी ते ऑन लाईन बोलू लागले. म्हणाले,  ‘इंद्रदेवा सांभाळून बरं! गोवर्धन पर्वतावर तू  कृष्णकाळात पाऊस पाडला होतास, तसा पाऊस गेल्या वर्षी पाडलास. केवढी तरी मालमत्तेची हानी झाली. माणसं, गुरं – ढोरं दगावली. यंदा देवा, पाऊस पाडा, नद्या-तळी- धरणं भरू देत. पण महापूर घेऊन येऊ नका. आताच्या काळात पुराचं पाणी अडवणारा कुणी शिष्योत्तम अरुणीही उरला नाही.’

मंडपात चार-सहा जण आरतीचं तबक घेऊन येताना त्यांना दिसले. मग त्यांनी आपला आकाशध्वनी बंद केला आणि ते सुहास्य मुद्रेने वरदहस्ताची नेहमीची पोझ घेऊन बसून राहिले.

 

©  श्रीमती उज्ज्वला केळकर, सम्पादिका – ई-अभिव्यक्ति (मराठी)

176/2 ‘गायत्री ‘ प्लॉट नं12, वसंत साखर कामगार भवन जवळ , सांगली 416416 मो.-  9403310170

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तिन्हीसांजा ☆ सुश्री अपर्णा कुलकर्णी

☆ विविधा: तिन्हीसांजा ☆ सुश्री अपर्णा कुलकर्णी ☆

आज सकाळी एका मैत्रिणीने विचारलं होतं की कविवर्य भा०रा० तांबे ह्यांच्या एका कवितेत ‘तिन्ही सांजा’ असा शब्दप्रयोग आढळतो : “तिन्ही सांजा सखे मिळाल्या/देई वचन तुला…”

तसेच ‘झाल्या तिन्ही सांजा, करून शिंगार साजा..’ या गाण्यातही तिन्ही सांजा असा अनेकवचनातच शब्द प्रयोग केला आहे.. असं का बरं..?

मग मलाही हे लक्षात आलं की खरंच,

ह्यात  ‘तिन्ही सांजा’ म्हणजे काय? एरवी आपण ‘सांज झाली’ असे म्हणतो; ‘सांजा झाल्या’ असे म्हणत नाही. ‘तिन्हीसांजेची वेळ झाली’ असे म्हणतो; ‘तिन्ही सांजांची वेळ झाली’ असे म्हणत नाही. तर , ‘तिन्ही सांजा’ या शब्दप्रयोगाला काही संदर्भ आहे का?

तिन्हीसांजा हा खरंतर आपल्या नेहमीच्या वापरातला आणि सोपा शब्द आहे. पण आज मात्र तोच अवघड वाटायला लागला.

आणि मनात प्रश्न आला, सांज म्हणजे संध्याकाळ. सांजा हे त्याचे अनेकवचन असेल …पण मग तिन्ही सांजा म्हणजे काय? कुतूहलाने शब्दकोशात पाहिले. तिथे तिन्ही सांजा म्हणजे सायंकाळ, संध्याकाळची वेळ असेच दिलेले. पण तिन्ही म्हणजे काय?

…आणि  मग दोन्ही गाण्यांचे lyrics पुन्हा पुन्हा ऐकले..त्यातून काही संदर्भ लागतोय का हे चाचपडून पाहिलं..

मग अर्थातच गुगल ची मदत घेतली. प्रथम तर गुगल वर तिन्ही सांजा असे टाइप करताच भराभरा चार पाच सांज्याच्या रेसिप्यांचे व्हिडीओज दिसायला लागले…!!

पण मग आणखी नेटाने गुगलून पाहिलं तर ही अशी माहिती मिळाली की-

तिन्ही सांजा’ हा शब्दप्रयोग ‘त्रिसंध्या’ ह्या संस्कृत शब्दावरून आला असावा असे डॉ० अशोक केळकर (भाषा तज्ञ) ह्यांनी सुचविले आहे. ‘त्रिसंध्या’ हा शब्द आपटयांच्या तीन खंडांच्या संस्कृत-इंग्रजी कोशात (सुधारित आवृत्ती संपा० प्रा० गोडे, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९) आढळतो.

पहाट आणि सायंकाळ  ह्या दिवस व रात्रीच्या सीमारेषेवरील दोन संध्या व माध्याह्न ही सकाळ व दुपार ह्यांच्या सीमारेषेवरील संध्या अशा ह्या तीन संध्या….तिन्ही सांजा !!*

तिन्हीसांज’ प्रमाणे त्रिकाल’ (तिन्ही त्रिकाळ) हाही शब्द रूढ आहे.

हा अर्थ समजल्यानंतर जेंव्हा

तिन्ही सांजा सखे मिळाल्या हे गीत परत वाचलं तेंव्हा वाटलं..की रात्र सम्पून दिवस सुरू होताना रात्र व सकाळ एकजीव असलेली एक सुंदरशी पहाट म्हणजे पहिली सांज..

दिवस वर येऊन सकाळ व दुपार एकजीव असतानाची ती दुसरी सांज..

व दिवस सम्पताना दिवस व रात्रीच्या सुरवातीच्या जो एक एकजीव काळ असतो ती म्हणजे तिसरी सांज..

दिवसाच्या या चक्रात असे तीन संधिकाल असतात पण पहिल्या संधिकाली-म्हणजेच  सांजवेळी आपण रात्र व दिवसाची सुरवात वेगळी करू शकत नाही… दुसऱ्या व तिसऱ्या संधिकाली – सांजवेळीही असेच!!

त्यामुळे, “तिन्ही सांजा”  हे कदाचित एकजीवतेचे प्रतीक म्हणून वापरले असावे.. असे मला वाटते.

तिन्ही सांजा गीताच्या पहिल्या कडव्यात सर्व शाश्वत गोष्टीना साक्षी मानून तुझा हात हाती घेतला आहे ,तो ही तिन्ही सांजांची एकजीवता स्मरून..असा भावार्थ जाणवतो.

दुसऱ्या कडव्यात नाद- बासरी, रस- कविता, पाणी- मोती..अशा उदाहरणातून द्वैत- अद्वैत ही कल्पना मांडली आहे..माझ्या हृदयातील जीव म्हणजे तू अशी एकजीवता  म्हणजेच द्वैतातील अद्वैत सांगून पुन्हा तिन्ही सांजा हे रूपक वापरत गाणे समेवर येते..

झाल्या तिन्ही सांजा या गाण्यात ही अशीच एकजीवता अपेक्षित आहे, असे वाटते.

हा मला समजलेला अर्थ आहे.

आज त्या मैत्रिणीने तिन्ही सांजा बद्दल विचारलं म्हणून मी ही बारकाईने शब्द व अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला.

संदर्भासाठी ‘तिन्ही सांजा ..’हे गीत दिले आहे..

तिन्ही सांजा

तिन्ही सांजा सखे मिळाल्या,

देई वचन तुला

आजपासुनी जिवे अधिक तू माझ्या हृदयाला

तिन्ही सांजा सखे मिळाल्या..

 

कनकगोल हा मरीचिमाली

कनकगोल हा मरीचिमाली

जोडी जो सुयशा

चक्रवाल हे पवित्र,

ये जी शांत गभीर निशा

त्रिलोकगामी मारुत,

तैशा निर्मल दाहि दिशा

साक्षी ऐसे अमर करुनी हे तव

कर करी धरिला

तिन्ही सांजा सखे मिळाल्या…

 

नाद जसा वेणूंत, रस जसा सुंदर कवनांत

गंध जसा सुमनांत, रस जसा बघ या द्राक्षांत

पाणी जसे मोत्यांत

पाणी जसे मोत्यांत,

मनोहर वर्ण सुवर्णांत

मनोहर वर्ण सुवर्णांत

हृदयीं मी साठवीं तुज तसा

जीवित तो मजला

तिन्ही सांजा सखे मिळाल्या,

देई वचन तुला

तिन्ही सांजा सखे मिळाल्या..

-भा रा तांबे

© सुश्री अपर्णा कुलकर्णी

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ललित: पर्णसंभार ☆ सुश्री मीनाक्षी सरदेसाई

सुश्री मीनाक्षी सरदेसाई

जीवन परिचय

नियतकालिके, मासिके यामध्ये कथा, ललित, कविता, बालसाहित्य  प्रकाशित. आकाशवाणीमध्ये कथाकथन, नभोनाट्ये , बालनाट्ये सादर. मराठी प्रकाशित साहित्य – कथा संग्रह — ५, ललित — ७, कादंबरी – २. बालसाहित्य – कथा संग्रह – १६,  नाटिका – २, कादंबरी – ३, कविता संग्रह – २, अनुवाद- हिंदी चार पुस्तकांचे मराठी अनुवाद. पुरस्कार/सन्मान – राज्यपुरस्कारासह एकूण अकरा पुरस्कार.

☆ विविधा: ललित : पर्णसंभार  – सुश्री मीनाक्षी सरदेसाई ☆

(१९ तारखेच्या ई-अभिव्यक्ती मराठीच्या अंकात सुश्री मीनाक्षी सरदेसाई यांचा ‘पर्णसंभार’ हा लेख  नजरचुकीने पूर्ण आला नव्हता. तो संपूर्ण लेख आता प्रकाशित करीत आहोत.-संपादक, ई-अभिव्यक्ती .)

झाडं झाडांसारखी दिसतात ती त्यांच्या गर्द पानांमुळे.जंगलं गडदगहन होतात ती हिरव्या पर्णराजीमुळे. शिशिरात पानं संप केल्या सारखी झाडांना सोडून जातात तेव्हा झाडं विरहगीत गातात. “रंग न उरला गाली ओठी,—–श्रुंगाराचा साज उतरला” अशी त्यांची अवस्था होते. पोपटी ,कोवळ्या पालवी पासून काळपट  हिरव्या राठपणापर्यत सर्व अवस्थांतील पर्णसंभार हे झाडांचं वैभव.ह्या श्रीमंतीचा उपभोग आपण वेगवेगळ्या प्रकारे घेत असतो.

मला आठवतंय, सकाळी उठल्यानंतर काही न बोलता आम्ही केळीशी जायचो.तिच्या पानांवरच दंव केसांना लावायचो. का?तर केस तिच्या सोपटासारखे लांब होतात असं आईने सांगितलेलं. त्यात काय औषध होतं माहीत नाही, पण केळीचा तो रसरशीत सहवास मनाला खूप आनंद द्यायचा. टवटवीत, हिरव्या पानावरच्या ब्रेललिपी सारख्या उठावदार, समांतर शिरा, हळूहळू  अरुंद होत जाणारी नि टोकाशी संपणारी कोरीव पन्हळ, काही गडद हिरवी तर काही गर्भरेशमी पोपटी विशाल पानं,केळीबाईचं हे रुपलाघव बघताना भान हरपायचं.

सणावारी अशा पांनांवरचं लाल,पिवळं,शूभ्र,रसभरीत जेवण, म्हणजे स्वर्गसुखच.देवाचा नैवेद्य, कावळ्याना घास, हे सगळं केळीच्या फाळक्यांवर.आमची पाच वर्षांची लली एकदा त्या प्रशस्त पानावर झोपली. “किती गाल वात्तय” म्हणाली. हिरव्या पानावरची, गोरी उघडी लली म्हणजे एक निसर्गचित्र होऊन बसललं.

वड, पळस, फणस यांच्या पानांच्या पत्रावळी म्हणजे  हिरव्या डिशेस. पानं जोडण्यासाठी नारळाच्या झावळ्यांच्या काड्या. झाडं इतकी परिपूर्ण असतात की दुसरीकडे जावच लागत नाही. गप्पा मारता मारता हात चालू. हा हिरवा कचरा पुन्हा झाडं सत्व म्हणून घेतात. वर्तूळ पुरं. घासापुसायचं कामच नाही.

सणासुदीला आंब्याची पानं तोरण होतात.पानांची एखादी फांदी दाराला शोभा आणतात. कर्दळी चौरंगावरच्या पूजेला आणखी मंगल शोभा आणते.कोकणातली मुलं अंगणातल्या फणसाच्या पानांचे बैल करतात. मळ्यात खर्ऱ्या बैलांची औत नि अंगणात मुलांची औतं फिरत भाताची लावणी लावतात. थंडीत ह्याच पानांची शेकोटी वत्सल ऊब देते.

पानांच्या साथीने साधीसुधी पक्वान्न किंवा न्याहरी बनते. हळदीच्या पानावर गुळपीठ सारवायचं.ती पान वाफवायची. लवंग वेलचीचं  कामच नाही. हळदीचा वासच पानग्याना खमंग करतो. चातुर्मासात कांदा लसूण वर्ज,पण ओव्याची पानं उणीव भरून काढतात. त्यांची भजी खमंग, चविष्ट होतात. पानांचा छाप भज्याच्या आत उमटलेला.

एक सुंदर सजावट.पूर्वी तान्हया बाळांच्या आया बाळाच्या टाळूवर कापसाच किंवा एरंडाचं पान टोपर्ऱ्याखाली सारून ठेवत.कडक उन्ह बाधू नये म्हणून. संध्याकाळपर्यंत पान कुरकुरीत व्हायच.बाळाच्या मेंदू पर्यंत उष्णता पोचायची नाही.

पान खाणारे आपल्या चंचीत विड्याच्या पानांच्या चळती नोटांसारख्या जपून ठेवतात. पानाच व्यसन असणाऱ्याना ती पानं पैशासारखी मौल्यवानच की. अशी  ही पानं.घर सजवतात, औषध करतात, खेळणी होतात, स्त्रियांच्या नटण्याथटण्यालाही मदत करतात. मेंदी नाही का स्त्रियांचे हात, पाय केस रंगवते. अंगणात श्रावण सजलाय.त्यामुळेच मनात रंगला हा हिरवा पानांचा उत्सव.

 

© मीनाक्षी सरदेसाई

‘अनुबंध’, कृष्णा हास्पिटलजवळ, पत्रकार नगर, सांगली.४१६४१६.

मोबाईल  नंबर   9561582372, 8806955070

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ललित: चहा ☆ श्री अविनाश सगरे

☆ विविधा – ललित : ☕️ चहा ☕️ ☆ श्री अविनाश सगरे

कसं मस्तमस्त वाटतंय सकाळीसकाळी वाफाळलेला चहा हातात पडल्यावर,म्हणजे कप हातात घेतल्यांवर!घराच्या बाल्कनीतून ओसरीतून गच्चीतून पार्किंग जागेतून हवं तर अंगणातून म्हणा नाही तर सोफ्यातून म्हणा ना! समोरचा दिसणारा हिरवागार निसर्ग,निळाशुभ्र तर कधी मेघांनी हा  आक्रमिलेला नभ आसमंत! जगवणारी ऑक्सीजनची ही स्वच्छ हवा,आपण सोडलेला कार्बनडायऑक्साईडचा हा फवारा शोषून घेणारा तो लतावेलीं वृक्षराजींचा परिसर. हं सांगायचं म्हणजे अंगाखांद्यावर हवेहवेसेच असे वाटणारे खेळणारे सोनेरी सूर्यकिरणे आणि त्याचा तो प्रकाशझोत.

पाखरांचे मधुर सुगमसंगीत,त्यातच कोकिळेचा स्वरसाज. तन मन कसे प्रसन्न उत्तम उत्साही सळसळीत अन उभारी देवून जातं.या सर्वाबरोबरच वाफाळलेला चहा घेत असतां चहाची वाफ कशी गोलाई करत हळुवार वरवर जाते तसा उगवलेला दिवसही शांत शांत हळुवार जावा असे वाटते.

तो सर्व तयारीनिशी सज्ज आहे तुमच्यां भैरवी भूपाळीला, तुमच्या अणुरेणूंत उर्जा भरायला आणि धमन्यातलं रक्त सळसळावायला. आणि सूर्यास्तापर्यंतच्या कष्टाने व्याकूळ दमलेल्या मनाला शरीराला शांत समाधानी करत ती रात्र आहे तुम्हांला निद्रादेवीच्या आधीन करायला,सुखाच्या या आपल्यां झोपेसाठी मऊमुलायम चादरअंगावर ओढायला चहा निमित्तही आहे व हवासाही आहे दिवस आरंभाला!परंतु त्यांमूळे माणूस आत्मध्यानात  न राहता विश्वाच्या या उदार उदात्त कृपाळू अभय अमोघ अथांग असिमितआणि  बहुसहस्त्र पसारयांशी एकरुप होतो तद्रुप तादात्म्य पावतो अर्थात ते जाणले ओळखले मानले तर आणि तरच आहे!

पंचमहाभूतां देणगी मुक्तहस्ते। घे झोळी भरुन शुभकरांते.

 

©  श्री अविनाश सगरे

मूळ हिंगणगांव सध्या जयसिंगपूर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ललित : श्रावणमासी ☆ सुश्री सुनीता दामले

सुश्री सुनीता दामले 

 ☆ विविधा – ललित : श्रावणमासी ☆ सुश्री सुनीता दामले

आषाढातल्या पावसाच्या मुसळधारेनंतर लगेचच येतो ‘हासरा नाचरा, सुंदर साजिरा’ श्रावण महिना.. पेरणी-लावणी ची लगबग-धांदल आटोपून बळीराजा म्हणजे शेतकरी राजा आता जरा निवांत झालेला असतो. रोपांची छान उगवण होऊन ती माना वर उंचावून उभी असतात शेतात, आणखी काहीच दिवसांनी येणाऱ्या सुगीची-सुखसमृद्धीची चाहूल देत..

हिरवागार शेला पांघरलेली धरती, डोंगरांच्या अंगाखांद्यावरून उड्या मारत खाली येत आनंद-तुषार पसरवणारे निर्झर, इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांनी नटलेले आकाश.. आहाहा, काय सुंदर रूप श्रावणातील या निसर्गाचे.. हा निसर्गोत्सव हलकेच माणसांच्या मनामनातही झिरपतो आणि मग तो साजरा करण्यासाठी येतात श्रावणातले विविध सणवार..

हा पाऊस, सृजनाचा म्हणजेच नवीन काहीतरी निर्माण होण्याचा एक उत्सवच घेऊन येतो नाही? म्हणजे बघा ना, मातीच्या कुशीत रुजलेले एक चांगले बी रोप बनून शेकडो-हजारो दाण्यांना जन्म देते, अनेकांच्या तोंडचा घास बनण्यासाठी.. विचारांचंही तसंच आहे. मनात रुजलेला एक चांगला विचार शेकडो चांगली कामे हातून घडवतो आणि जीवन सुंदर बनवतो.

श्रावणातले सणवारही मला वाटतं असंच मनामध्ये चांगल्या विचारांचं शिंपण आणि रोपण करत असतात. नारळी पौर्णिमेला केली जाणारी समुद्राची पूजा किंवा बैलपोळ्याला केले जाणारे बैलांचे पूजन, यामागे कृतज्ञतेचा सुंदर विचार असतो. एरवी भीतीदायक वाटणाऱ्या नाग-सापांची उपयुक्तता व त्यांचा गौरव नागपंचमीच्या पूजेतून व्यक्त होते.. मंगळागौर, गोकुळाष्टमी यासारखे सण उत्सव स्त्री-पुरुष-बालांना सर्व काळज्या-विवंचना विसरायला लावून आनंदात न्हाऊ घालतात.

या महिन्यातली आणखी एक विशेष गोष्ट मला आठवते.. श्रावण महिना म्हटला की आमच्या घरातल्या  देवांमध्ये अजून एक भर पडायची; जिवतीचा कागद आणला जायचा, पुठ्ठ्यावर चिकटवून देवांच्या फोटो शेजारी टांगला जायचा. नागोबा, श्रीकृष्ण, नरसिंह, बुध-बृहस्पति आणि जिवत्या म्हणजे दोन लेकुरवाळ्या स्त्रिया अशी चित्रं असायची त्यावर. त्यापैकी प्रत्येकाची वेगवेगळ्या वारी पूजा व्हायचीआणि मग त्या त्या देवाची कहाणी आई वाचायची.कहाणी म्हणजे गोष्ट.. ‘ऐका परमेश्वरा तुमची कहाणी’ असं म्हणत कहाणीला सुरुवात व्हायची आणि ‘ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण’ म्हणून सांगता व्हायची.

या श्रावणातल्या शुक्रवारची एक हळवी आठवण माझ्या मनात आहे. शुक्रवारी माझी आई जिवतीची पूजा करायची. जिवतीची पूजा आईने आपल्या लहान मुलांच्या स्वास्थ्यासाठी आणि सुखरूपते साठी करायची असते. माझी आई पूजा आणि कहाणी वाचून झाली की मला पाटावर बसून ओवाळायची आणि मग एकाग्रतेने नमस्कार करून म्हणायची “जिवतीबाई, सगळ्यांच्या लेकरांना सुखी ठेव”.. मी माझ्या आईची एकुलती एक मुलगी, तिला लग्नानंतर सोळा वर्षांनी झालेली! थोडी मोठी झाल्यावर एकदा मी आईला विचारलं,” आई, तू ही पूजा माझ्यासाठी करतेस ना? मग ‘माझ्या मुलीला सुखी ठेव’ असं का नाही म्हणत?” त्यावर आई म्हणाली,” अगं, आपण देवाकडे मागतोय. केवढा मोठा दाता तो! मग त्याच्याकडे कंजुषपणानं फक्त आपल्यासाठीच मागायचं? सगळ्यांसाठी मागितलं तर कुठं बिघडलं ? मन मोठं ठेवावं माणसानं, आपल्या पुरतंच नै बघू… आणखी एक गोष्ट लक्षात ठेव,’जे चिंती परा ते येई घरा’ दुसर्याचं वाईट चिंतलं तर आपल्या पदरी तेच येणार हे नक्की, आणि दुसऱ्याचं चांगलं चिंतलं तर आपलंही चांगलंच होणार.” आज जेव्हा मी ‘सगळ्यांच्या लेकरांना सुखी ठेव’ अशी प्रार्थना श्रावण शुक्रवारी जिवतीकडे करते तेव्हा मला हा प्रसंग आणि आईचे हे शब्द आठवतात. वाटते, अरे हा तर उपनिषदातील ‘सर्वेपि सुखिन: संतु, सर्वे संतु निरामया:, सर्वे भद्राणि पश्यन्तु,मा कश्चिद दु:खमाप्नुयात्’ या ऋषिविचारांचाच आईच्या तोंडून झालेला उद्घोष!!!

आज माझी आई या जगात नाही पण या संस्कारांच्या रुपाने ती माझ्या मनात कायम जिवंत आहे.

 

© सुश्री सुनीता दामले 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्फुट लेख – ताण (टेंशन) ☆ सुश्री अनुराधा फाटक

☆ विविधा: स्फुट लेख – सुश्री अनुराधा फाटक   ☆

संध्याकाळची वेळ होती.मी अंगणात तांदूळ निवडत बसले होते.

‘काय करताय काकू?’ म्हणतच शेजारची रमा माझ्याजवळ येऊन बसली .

‘रिकामा वेत्र आहे. दुसरं काही काम नाही म्हणून बषले आपली तांदूळ निवडत पण तू आता इथं कशी?’

‘उद्या दहावीचा रिझर्ल्ट असल्याचे आता बातम्यात सांगितले आणि एकदम टेन्शन आलं काही सुचेना आले तुमच्याकडं ‘ तांदळात हात घालत रमा म्हणाली.

‘इतकं कसलं टेन्शन घ्यायचं? तुम्ही अलिकडची मुलं म्हणजे..कशाचं टेन्शन घ्याल काही कळत नाही.

‘काकू, सध्या आमच्याकडंच प्रत्येकाचं लक्ष आहे. किती मार्कस मिळतील? पुढं काय करायचं ?याचा विचार आमच्यापूक्षा आमचे आईवडीलच करतात.आता बाबा ऑफिसमधून आले की तोच विषय घरात असणार’

रमा बोलत असतनाच रमाच्या आईची हाक आली. पटकन तांदळातला हात काढून रमा घरी गेली.मीही शरद येईपर्यंत स्वयंपाक व्हायला हवा म्हणत उठलेरात्रीची जेवणं झाली.सर्व आवराआवरी करून मिही अंथरुणाला पाठ टेकली. आणि रमा नजरेसमोर आली.

‘आमचा विचार आमच्यापेक्षा आमचे आईवडीलच करतात’

रमाचं ते वाक्य आठवलं आणि मला आमचं शालेय जीवन आठवलं शाळेत नाव घातलं की आईवडिलांची जबाबदारी संपायची. शाळेसाठी लागणारी वह्या पुस्तके, भरावयाची फी याची आठवण केली तरी वडील ओरडायचे. कधी जुनी पुस्तके मिळायची कधी तीही नसायची, वह्याचे तेच.. फी थकलेली असायची. सारखं विचारलं की, शाळा सोडा हे उत्तर ठरलेलं असायचं.मग आमचे प्रश्न आम्हीच सोडवायचो. कुणाची तरी पुस्तकं, पाठकोऱ्या वह्या वापरून अभ्यास व्हायचा, वरच्या वर्गात जायचो.. पण त्यामुळं आम्ही स्वावलंबी झालो.सुटीत काहीतरी उद्योग करून शाळेची तयारी व्हायची. परीक्षेचे तेच घरात परीक्षा झालेली कळायची नाही की निकाल लागलेला. तरीही आम्ही शिकलो. आता सर्वच बदलंल. मुलांच्या आधी पालकानाच सगळी घाई!

‘आई, झोपायचं नाही कां?’

शरदच्या आवाजाने भानावर आले घड्याळ बघितले.बराच उशीर झाला होता आज रमाचा रिझर्ल्ट! असं म्हणतच मीशरद ऑफिसला गेला तसं भरभर घरातलं आवरलं.केव्हा एकदा रमाला भेटत्येय असं मला झालं होतं.’ रमा नक्कीच चागल्या मार्कानी पास झाली असणार. तिला काहीतरी घेऊन जावं.. नको काय हवं ते तिलाच विचारावं. ‘स्वतःशी बोलतच मी रमाचं घर गाठलं. मी दरवाजाला हात लावताच नुसता पुढं ओढलेला दरवाजा लगेच उघडला.घरातलं वातावरण

एकदम शांत होतं. स्वयंपाक घरातल्या आवाजाने रमाची आई

स्वयंपाकघरात असल्याचे सांगितले आणि मी इकडंतिकडं न बघता स्वयंपाक घरातच गेले.

‘काय चाललयं?’

रमाची आई स्वयंपाक करताना दिसत असतानाही मी विचारलं.

तसं त्यानी माझ्याकडं वळून बघितलं. त्यांचा चेहरा उतरलेला होता.

‘काय झालं?’

रमाच्या आईजवळ जात मी विचारलं.

‘आमची रमा..’ डोळ्याला पदर लावत त्या म्हणाल्या.

‘कुठं आहे रमा?’ मी तिच्यासाठीच म्हणजे तिचं अभिनंदन करण्यासाठीच आले.’

‘कसलं अभिनंदन आणि कसलं काय? दार लावून बसली आहे ती आपल्या खोलीत. किती वेळ झाला. मी हाका मारल्या पण ती दारच उघडत नाही. काय करायचं हो शरदची आई? ‘मार्कस फार कमी पडले कां?’

नव्वद टक्के मिळाले. पण तिच्या वडिलांची तिच्याकडून यापेक्षा जास्त अपेक्षा होती. त्यांच्या ऑफिसमधल्या शिपायाच्या मुलाला नव्व्याण्णव टक्के मिळाले आहेत त्यामुळं त्याना ते कमी वाटले ‘

मी पटकन तिच्या खोलीजवळ जाऊन तिला हाक मारली. माझा आवाज ऐकताच तिनं दार उघडलं.रडूनरडून तिचे डोळे लाल झाले होते.

‘रमा, तुझे मार्कस चांगले आहेत मी तुला बक्षीसही देणार आहे’

मी असं म्हणताच रमा पटकन माझ्या गळ्यात पडून रडू लागली. थोडावेळ मी तिला रडू दिलं ती शांत होताच मी म्हणाले,

‘इतकं वाईट वाटून घ्यायचं नाही. तू लहान असल्यापासून तुझी हुशारी मी बघत आहे आणि मार्कसही वाईट नाहीत’

पण बाबा..’

‘मी सांगते बाबांना, तुझ्यामुळं तुझी आईही.. जा तोंड धू. दोघी जेवा. संध्याकाळी तुझे बाबा आल्यावर मी तुझे बक्षीस घेऊन येते’ रमाची समजूत काढून मी घरी आले पण रमाचेच विचार मनात होते.

रमा सर्व क्षेत्रात हुशार! शाळेतील सर्वांगीण विकासाचे बक्षीसही तिला मिळाले होते पण हल्ली मुलांच्याऐवजी मुलांच्या पालकांच्याच आपल्या मुलांकडून अपेक्षा वाढल्या आहे. मुलांची आवड, कुवत याचा विचारच केला जात नाही. दहावीत असतानाही स्वतःच्या इच्छेने रमाने वेगवेगळ्या स्पर्धात भाग घेतला होता, नंबरही मिळवले होते. ती केवळ पुस्तकातला किडा नव्हती. याचा विचार न करता  तिच्या वडालांनी कमी मार्क मिळाले म्हणून दुखवले होते. हे मलाही पटले नाही. दहावीची परीक्षा म्हणजे आयुष्याचे सर्वस्व नाही.पुढच्या शिक्षणासाठी कॉलेजला प्रवेश मिळण्यासाठी ते पुरेसे होते.शिपायाच्या मुलाचे मार्क नक्कीच कौतुकास्पद पण याचा अर्थ रमाचे मार्कस कौतुकास्पद नाहीत असे होत नाही. उलट अशा पालकांनी आपल्या मुलांचे अधिक कौतुक करून त्याना प्रोत्साहन दिले पाहिजे आताच्या काळात पुस्तकी शिक्षणाच्या बरोबरीने इतर कलांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणून आपल्या अपेक्षेपेक्षा मुलांची आवड महत्त्वाची समजून त्याना जे हवे ते द्यावे प्रत्येकवेळा आमच्यावेळी असे नव्हते म्हणून मुलांना नाराज करू नये. या विस्तारलेल्या जगात त्याना त्यांच्या पंखानी उडू द्यावे

© सुश्री अनुराधा फाटक

मोबाइल – 9011058658

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ललित – आठवणींच असच असतं… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ विविधा: ललित – आठवणींच असच असतं…☆

संपादकांचा फोन आला आणि नाही म्हटलं तरी मी सुखावलोच. दिवाळी अंकासाठी काही ना काही लिहून पाठवल्याशिवाय ते काही गप्प बसणार नाहीत,हे माहित होत मला. आता मस्त एखादी दीर्घकथा लिहावी आणि द्यावी पाठवून अशा विचारात मी होतो. पण यंदाचा दिवाळी अंक अगदी छोटासा निघणार आहे, त्यामुळे काहीतरी छोटंसं पाठवा, एखादी जुनी आठवणही चालेल असं जेव्हा ते म्हणाले तेव्हा मी जरा हिरमुसलोच. तरी त्यांना होकार दिला आणि फोन ठेवला.

आता छोटंस काय बरं लिहावं? जुनी एखादी आठवण लिहायची म्हटलं तरी ते सोपं नव्हतं. कारण थोडं जरी मागे वळून बघितलं तरी आठवणी कशा झुंडीन पुढं येतात. त्यातली नेमकी कोणती सांगायची हे ठरविणं खूप अवघड असतं.  प्रत्येक आठवणीच महत्व,सौंदर्य वेगळंच असतं. खर तर,सगळ्या आठवणी डोळ्यासमोर आल्या की जरा गोंधळायलाच होतं. अशा वेळी आठवणी या स्त्री सारख्या वाटू लागतात.

खरंच, आठवणी या स्त्री सारख्याच असतात. स्त्रीची जशी अनेक रुपं पहायला मिळतात,तशीच आठवणींनाही विविध रुपं असतात. अल्लडपणानं बागडणारी बालिका,उमलत्या कळीप्रमाणे षोडशा,यौवनाने बहरलेली युवती, तारुण्याच्या उंबरठ्यावरून सौख्याचं माप ओलांडून संसारात पदार्पण करायला उत्सुक असणारी नवोढा, मातृत्वाने तृप्त झालेली माता, सर्व काही सोसून प्रौढपणाची जबाबदारी संयमाने पेलणारी गृहिणी आणि वृद्धत्वाकडे झुकत असताना नातवंडांच्या आगमनाने उल्हासित होणारी आजी ! स्त्रीची किती ही विविध रूप!

आठवणींचही असच असतं. त्यांच प्रत्येक रूप मोहविणारच असतं. बालपणीच्या आठवणींनी मन बागडत नाही असं कधी झालय का ? तारूण्यातल्या आठवणी त्यावेळच्या स्वप्नांना घेऊन येत असतात. तुमची स्वप्न सत्यात उतरलेली असोत किंवा नसोत, त्यांच्या नुसत्या आठवणींनी सुद्धा तुम्ही पुन्हा त्या काळात जाऊन पोहोचता. तुम्हाला यशाकडे घेऊन जाणारी एखादी आठवण असेल तर तुमच्या मनाला नव्याने बहर येईल. तुमच्या कर्तृत्वाच्या आठवणी, तुम्ही भोगलेलं, तुम्ही सोसलेलं, तुम्ही मिळवलेलं आणि काही वेळेला तुम्ही अगदी गमावलेलं सुद्धा ! सगळं सगळं तुम्हाला जेव्हा आठवायला लागतं तेव्हा त्या त्या काळातंल ते ते चित्रच तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. तुमचं वय जसं वाढत जाईल तशी या आठवणींची किंमत वाढतच जाईल. म्हणून तर या आठवणी मनाच्या खोल कप्प्यात अगदी नाजूकपणे जपून ठेवायच्या असतात. सौख्याच्या आठवणी सर्वांना वाटाव्यात तर सोसलेलं सारं आपल्यासाठी ठेवावं.

आणि हो, या आठवणी आणखी एका बाबतीत अगदी स्त्री सारख्या असतात बरं का !

तुमची खरीखुरी सखी जशी तुमच्यापासून दूर जात नाही तशाच या आठवणी सुद्धा तुम्हाला कधी अंतर देत नाहीत. अगदी शेवटपर्यंत तुमच्याच होऊन राहिलेल्या असतात. आणि मग ? मग आपल्यानंतर आपण स्वतः दुसर्यासाठी आठवण बनून जातो. आठवणी जपण्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी. !

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली
मो 9421225491

Please share your Post !

Shares
image_print