सुश्री प्रभा हर्षे
🌸 विविधा 🌸
☆ ‘पानशेत’ नंतर… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
१२ जुलै १९६१. पानशेत धरण फुटलं. नदीकाठच्या पेठा वाहून गेल्या. संसार उध्वस्त झाले. वाडे पडले. घरं वाहून गेली. माणसं गेली, पैसाआडका गेला, दागिने वाहून गेले, पुण्याचं होत्याचं नव्हतं झालं.
त्याआधीचं पुणं वेगळं होतं. पुण्यात गुरांचे गोठे होते. बरेच बोळ होते. रस्त्यांवर फारसा प्रकाश नसे. घोड्यांच्या पागा होत्या, टांगे होते, बग्ग्या होत्या. खूप साऱ्या सायकली होत्या. घरोघरी चुली होत्या, शेगड्या होत्या, कोळशाच्या वखारी होत्या. कंदील होते. पलंग होते. खाटा होत्या. हौद होते…
पहाटे पिंगळे यायचे, सकाळी वासुदेव यायचे. दुपारी डोंबारी आणि दगडफोडे आपापला खेळ करून पैसे मागायचे. खोकड्यातला सिनेमा यायचा. मुलं त्याला डोळा लावून ‘शिणूमा’ बघायची. माकडाचे खेळ यायचे. नागसापवाले गारूडी यायचे. डोंबारी दोरीवरून चालायचे. ‘जमूरे’ चादरीत लपून गायब व्हायचे.
पुणं पहाटेचंच उठायचं. पूजाअर्चा चालायच्या. खूप मंदिरं होती. त्यात घंटानाद व्हायचे. धूपदीपांचा सुगंध दरवळायचा. आरती नैवेद्य व्हायचे. व्रतवैकल्यं असायची. सण जोरात साजरे व्हायचे. त्यात धार्मिकता ठासून भरलेली असे. अगदी पाडव्यापासून सुरू होऊन, वटसावित्री, श्रावण, मंगळागौरी, नारळीपौर्णीमा, रक्षाबंधन, गणपती, नवरात्र, दिवाळी, रथसप्तमी, होळीपर्यंत सण उत्साहात साजरे होत. गणपतीत वाड्यावाड्यात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होत. गणपती चौकात सतरंज्या टाकून लोक गजानन वाटव्यांची गाणी ऐकत. घरोघरी धार्मिकतेनं गणपती बसे. सत्यनारायण वगैरेही जोरात होई. घरोघरी नवरात्र बसे. वाड्यावाड्यात भोंडले होत. ‘ऐलोमा पैलोमा गणेश देवा…’ ऐकू येई. अनेक बायकांच्या अंगात देवी येई. दिवाळीत घरोघरी फराळाचे पदार्थ बनत. मुलं किल्ले करत. मुली रांगोळ्या काढत. वर्षभर सणसमारंभ चालत.
त्याकाळी बरेच पुरुष धोतर नेसत. बायका नऊवारी साडी नेसत. पाचवारी साडी अजून रूळायची होती. बालगंधर्व बायकांचे आवडते होते. त्यांचे हावभाव, साडी नेसणं याची बायका नक्कल करत. ‘असा बालगंधर्व पुन्हा न होणे…’ हे सर्वमान्य होतं.
मुलं पतंग उडवत, विट्टीदांडू खेळत. आट्यापाट्या, लगोरी, सूरपारंब्या वगैरे मुलांचे आवडते खेळ होते. मुली सागरगोटे, बिट्ट्या वगैरे खेळत. भातुकली हा मुलींचा आवडीचा खेळ होता. मुलं चड्ड्या घालत. मुली परकर पोलकं घालत. बायका अंबाडा घालत. त्यात एक फूल खोचत. ठसठशीत कुंकू लावत. मंगळसूत्र घालत. मुली कानात डूल घालत. काही मुलं शेंडी ठेवत.
पानशेत पुरामुळेच पुण्याचं रूप पालटलं. मुकुंदनगर, महर्षीनगर, सहकारनगर, दत्तवाडी, पानमळा असे अनेक नवीन भाग उदयाला आले. वाड्यांच्या पुण्यात बंगल्यांची एंट्री झाली. तिथून पुणं वाढायला सुरुवात झाली. पेठांमध्ये वसलेलं पुणं, ही पुण्याची ओळख पुसून नवीन पुढारलेलं पुणं दिसू लागलं. जसं ते रहाणीमानात बदललं, तसं ते आचारविचार आणि संस्कृतीतही बदलू लागलं. कर्मठ पुण्याचं आता प्रगतीशील पुण्यात रुपांतर होऊ लागलं. संस्कृती, आचारविचार, रुढी, परंपरा या मागासलेपणाचं निदर्शक मानल्या जाऊ लागल्या. साठच्या दशकात संसाराला लागलेल्या पिढीची तारेवरची कसरात झाली. रुढी परंपरांवर त्यांच्या आईवडिलांच्या दबावामुळे असलेला अर्धवट विश्वास आणि आभासी प्रागतिक विचारांचं सुप्त आकर्षण यात त्यांची कुतरओढ झाली. म्हणून ते आपल्या मुलांवर कुठलेच संस्कार नीट करू शकले नाहीत. कर्मठपणावरून त्यांचा विश्वास उडाला होता आणि नवीन, प्रागतिक विचार पचवायला ते असमर्थ होते.
या दरम्यान पुणं वाढतच होतं. साठच्या दशकात जन्माला आलेली नवीन पिढी मोठी होत होती. धार्मिकता, कट्टरता यावर आपल्या आईवडिलांचा डळमळीत झालेला विश्वास त्यांना जाणवत होता. ही पिढी प्रागतिक विचार बोलू लागली होती. त्यांच्या या विचारांपुढे त्यांचे आईवडील हतबल झालेसे वाटत होते. आईवडीलांच्या पिढीत आईवडील मोठे असत. मुलं त्यांच मनोभावे ऐकत असत. पुढच्या पिढीत आईवडील मुलांच्या प्रागतिकतेनं मंत्रमुग्ध झाल्यानं आईवडील मुलांचं ऐकू लागले.
नव्वदच्या दशकात पुढची पिढी आली. तिच्या आईवडिलांवरच पुरेसे संस्कार झालेले नव्हते. तिच्यावर कसलेच संस्कार करायला तिच्या आईवडिलांना वेळ नव्हता. वेळही नव्हता आणि माहितीही नव्हती. आजी आजोबा ही स्थानं संपली होती. गोष्टी सांगणारी आजी लुप्त झाली होती. ‘ममा, पप्पां’ना गोष्टी सांगता येत नाहीत. त्यांना तेवढा वेळही नाही. त्यात टीव्ही घरात आले. आजीपासून नातवापर्यंत सगळे निरनिराळ्या सिरीयल्समध्ये अडकले. त्यात ‘डिस्टर्ब’ नको, म्हणून आईबापांनीं मुलांच्या हातात मोबाईल दिला. त्यानं ती व्हिडिओ गेम्सच्या आहारी गेली. बहुतेकसे आईवडील एकपुत्र असल्यानं मुलांना बोलायला घाबरू लागले. आपल्या मास्तरांनी मारलेल्या छड्यांचे वळ अभिमानाने मिरवणारे आईबाप मुलांच्या अंगावर हात टाकायला बिचकू लागले. मुलांच्याही ते लक्षात आले. ती अवास्तव मागण्या करू लागली. त्यांचे हट्ट पुरवले जाऊ लागले. आजीआजोबा किंवा आईवडीलांचा ‘धाक’ संपला. धाक हा शब्द डिक्शनरीत जाऊन पडला. शिक्षकांनी मुलांना मारणं गुन्हा ठरू लागला. मारलं तर मुलं आत्महत्या करू लागली. शिक्षकांना जेल होऊ लागली. मुलांवरचा धाक संपला!
त्यात आय.टी. इंडस्ट्री पुण्यात आली. जो तो आयटीत पळू लागला. त्यांना अवाच्यासवा पगार मिळू लागले. त्यातल्या प्रत्येकानं दोनदोन चारचार फ्लॅट्स विकत घेतले. त्यानं पुणं अजूनच विस्तारलं. पुण्याची राक्षसी वाढ होऊ लागली. खराडी, वाकड, धानोरी, अशी अनेक पूर्वी कधी पुण्यात न ऐकलेली नावं सर्रास ऐकू येऊ लागली. पेठेत रहाणारी लोकं आपापली घरं व्यापाऱ्यांना विकून तिकडे रहायला जाऊ लागली. आयटी क्षेत्रानं पुण्याची संस्कृती अजून रसातळाला गेली. आजचं आणि आत्ताचं पहा, आम्हाला कोणी मोठे नाहीत. अगदी आईवडील सुद्धा नाहीत. त्यांना असा कितीसा पगार होता. आत्ताच आम्ही त्यांच्या दसपट कमावतो, असा गंड मनात मूळ धरू लागला. मुली सर्रास दारू पिऊ लागल्या. रस्त्यावर सिगारेटी पिऊ लागल्या. वीतभर चड्ड्या घालून रस्त्यावरून फिरू लागल्या. लग्न करायची गरज कमी होऊ लागली. ‘लिव्हिंग रिलेशनशिप’ नावाचा नवीन विचार पुढे आला. आईवडील अधिकच हतबल होऊन पहात राहिले. अनेक कुटुंबं आयटीमधल्या मुलींच्या पैशावर पोसली जात असल्यानं, आईवडील मुलींना काही बोलू शकत नव्हते. आता पुणं, आयटी पुणं झालं होतं. जागांच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. खूप हॉटेलं झाली होती. अनेकांच्या घरी स्वयंपाक बनत नव्हता. बाहेरचं खाण्याची संस्कृती रुजत चालली होती. दारू फारच सामान्य झाली होती. ड्रग्जचे नवनवीन प्रकार येत होते. एकमेकांच्या संगतीनं नवी पिढी त्यात ओढली जात होती.
आयटी बरोबर परप्रांतीयही पुण्यात खूप आले. त्यांनी त्यांची संस्कृती पुण्यात मिसळली. रंगपंचमी बंद होऊन पुण्यात धुळवड जोरात खेळली जाऊ लागली. प्रचंड पैसा घेऊन पुण्यात शिकायला आणि नोकरीला आलेल्यांनी नीतिमत्ता पूर्णपणे धाब्यावर बसवली. पुण्यात बुद्धिमत्ता कमी झाली आणि पैसा बोलू लागला.
या आयटीयन्स् मुळे जागांना प्रचंड भाव आले. पुण्याभोवतालचे शेतकरी शेती बंद करून ‘स्कीमा’ करू लागले. बिल्डर बनू लागले. ‘गुंठामंत्री’ नावाची एक नवीन जमात उदयाला आली.
साठ वर्षांत पुणं आता पूर्णपणे बदललं आहे. ब्राम्हणी पुणं तर केव्हाच लोप पावलंय. सांस्कृतिक, बौद्धिक, वैचारिक अशी पुण्याची ओळख पुसली गेली आहे. पुरणावरणाच्या पुण्यात, सदाशिव पेठेत मटण आणि बिर्याणीची दुकानं दाटी करू लागली आहेत.
आता पुण्यात फारसे वाडे शिल्लक नाहीत. सकाळी वासुदेव येत नाही. दगडफोडे, डोंबारी, भुते, ‘जग्ग’ डोक्यावर घेऊन फिरणाऱ्या बायका, कुडमुडे, पोपटवाले ज्योतिषी, ‘जमूरे’ वाले नाहीसे झालेत. नदीचं आता गटार झालंय. पानशेतफुटीपूर्वी ओंकारेश्वराजवळ सुद्धा नदीचं पाणी पिता यायचं. आता त्यात पाय घालायचीही किळस येते. पानशेत फुटीनंतर पुणं बदललं, वाढलं, विस्तारलं. पण जे रूप बदललं, ते पुणं नाही राहिलं. ते बौद्धिक, तात्विक, विचारवंतांचं, शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणं पानशेतच्या पुरात वाहून गेलं. उरलं आणि वाढलं ते पुणं नाहीये, एक अक्राळविक्राळ संस्कृतीहीन, चेहेरा नसलेलं, मुंबईच्या पावलावर पाऊल टाकायला निघालेलं एक चेहेराहीन, पानशेतफुटीनं बकाल केलेलं गर्दीचं एक शहर!
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈