श्रावणात येणाऱ्या पौर्णिमेला नारळीपौर्णिमा, राखी पौर्णिमा, पोवती पौर्णिमा, श्रावणी पौर्णिमा” अशी नावे आहेत.
पूर्वीपासूनच नारळी पौर्णिमा म्हणून या दिवशी नारळाचे अनेक पदार्थ केले जातात. नारळीभात, करंज्या, वड्या, पोळ्या यांचा नेवैद्य देवाला दाखवून आनंदाने खातात.
कोळी लोक समुद्राची पूजा करतात. पावसाळ्याच्या सुरूवातीचे दिवस म्हणजे माशांचा प्रजनन काळ. म्हणून या काळात ते मासेमारी बंद ठेवतात. नारळी पौर्णिमेला समुद्र पूजन करून श्रीफळ अर्पण करून ते समुद्रात होड्या नेतात व मासेमारी सुरू करतात. समुद्र हे वरुण देवतेचे स्थान मानले जाते. वरूण पश्चिमेचा दिक्पाल आहे. या पौर्णिमेला त्याला श्रीफळ अर्पून कृतज्ञता व्यक्त केली जाते.
राखी पौर्णिमा हा खरेतर उत्तर भारतातला सण. पण आज पूर्ण भारतात बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून सर्वांना हवाहवासा वाटतो.
राखी या शब्दातच खूप मोठा अर्थ आहे. राख म्हणजे सांभाळ कर असे सांगणे. धर्मशास्त्रामध्ये या पौर्णिमेला राखी बांधावी असे सांगितले आहे. या विधीला ” पवित्रारोपण ” असे म्हणतात. आपल्याकडे भावाचा उत्कर्ष व्हावा, त्याचे प्रेम व पाठबळ आपल्याला मिळावे या हेतूने बहीण भावाला राखी बांधते. काही प्रांतात नोकर मालकाला, ब्राह्मण यजमानाला, मुलगी वडिलांना, पत्नी पतीला राखी बांधते. त्यामागे एकच भावना असते आपल्यापेक्षा सक्षम माणसाने आपले रक्षण करावे. एका रेशमी धाग्याने नात्यांचे रक्षण व्हावे एकमेकांना भेटावे हात हेतू आहे.
यामागे अशी कथा आहे की एकदा देव आणि दानव यांच्या त तुंबळ युद्ध झाले. दानवांचा राजा होता बलाढ्य वृत्रासुर. देवांचा राजा होता इंद्र. दोघेही पराक्रमी होते. इंद्राचा विजय व्हावा म्हणून त्याच्या पत्नीने तिला भगवान विष्णूंच्या कडून मिळालेला एक दोरा म्हणजेच राखी त्याच्या हातात श्रद्धेने बांधली. इंद्राचा विजय झाला. त्याचे सगळे वैभव त्याला परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून दरवर्षी रक्षाबंधन साजरे करु लागले.
एक ऐतिहासिक कथा सुद्धा आहे. बहादूरशहाने चितोड वर स्वारी केली. चितोडची राणी कर्मवती हवालदिल झाली. तिने हुमायूँ बादशहाला राखी पाठवली. त्या राखीचा सन्मान करून हुमायूँ बादशहाने तिला बहीण मानून मदतीचा हात दिला. आपले सैन्य पाठवले व बहादुर शहा ला पळवून लावले. रक्षाबंधनाला जाती-पातीचे बंधन नाही हेच यावरून सिद्ध होते.
पूर्वी राज्याचा मंत्री राजाला राखी बांधत असे. त्यावेळी तांदूळ, सोने व पांढर्या मोहर्या एकत्र करून त्याची पुरचुंडी बांधून रक्षा म्हणजे राखी तयार करत. तिची पूजा करत. त्यावेळी खालील मंत्र म्हणून राज्याचा मंत्री राजाला राखी बांधत असे
येनबघ्दो बळीराजा
दानवेन्द्रो महाबल:
तेनत्वामपि बध्नामि
रक्षे मा चलमाचल.
याचा अर्थ असा आहे की महाबली दानवेन्द्र बळीराजा जिने बद्ध झाला त्या रक्षेने मी तुला हि बांधतो. हे रक्षे, तू चलित होऊ नकोस” यावरून मुळचे रक्षाबंधन राजासाठी होते असे दिसते. आज मात्र बंधू व बंधू समान असलेल्या सर्वांना राखी बांधली जाते.
” पोवती पौर्णिमा” असेही एक नाव आहे. कापसाच्या सुताच्या नऊ धाग्यांची जुडी करून तिला. 8-12 किंवा 24 गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रम्हा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादी देवतांना आवाहन करून हे पोवते प्रथम देवाला वाहून तसलीच पोवती तयार करून कुटुंबातील इतर सदस्यांना मनगटावर बांधली जातात.
श्रावणी पौर्णिमा या दिवशी पूर्वी कुमारांना शिक्षण घेण्याचा मुहूर्त समजला जात असे. ब्राम्हण लोक या दिवशी यज्ञोपवीत बदलण्याचा कार्यक्रम करतात.
तमिळी पंचांगाप्रमाणे या पौर्णिमेला” अवनी” असे नाव आहे. तमिळ महिना ते अवनी या कालाला ” अवित्तम ” असे म्हणतात.
अवित्तम म्हणजे धनिष्ठा. श्रावणात जेव्हा लागोपाठ दोन दिवस पौर्णिमा येते तेव्हा दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असतो. लागोपाठ दोन दिवस पौर्णिमा आली तर पहिल्या दिवशी ऋग्वेदी दुसऱ्या दिवशी यजुर्वेदी ब्राह्मण श्रावणी साजरी करतात.
जैन लोक हा दिवस रक्षा पर्व म्हणून पाळतात. जैन मंदिरामध्ये राख्या ठेवल्या जातात. जैन मुनि त्यांचे आदराने स्वागत करतात.
उत्तर भारतात नौकर मालकांच्या हाताला राखी बांधतात.
उत्तराखंडमध्ये चंपावत जिल्हा आहे. तेथील देईपुरी इलाख्यात बरही नावाची देवी आहे. तिला खूष करण्यासाठी गावातल्या दोन गटात दगडफेक चालू करतात. यात अनेक लोक जखमी होतात म्हणून आत्ता हायकोर्टाने त्यावर बंदी घातली आता तेथील लोक दगडां ऐवजी एकमेकांना सफरचंद मारतात.
उत्तर भारतात एकादशी ते पौर्णिमा झुलन यात्रा उत्सव असतो. श्रावण पौर्णिमेला राधा व कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसवून झोके देत गीते गातात.
अशाप्रकारे श्रावण पौर्णिमा हा आनंददायी सण सर्वत्र साजरा केला जातो.
लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “वक्त ने आजमाया, लेकिन हरा नहीं पाया…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆
भारत पाकिस्तानची T 20 World Cup मॅच बघत होते. अनेक चढ उतार मॅच मध्ये घडत होते, आणि त्याबरोबर प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चूकत होते. शेवटचा ओव्हर तर ‘full of activities ‘ होता. बहुतेक क्रिकेट मधील सर्व टर्म्स त्या ओव्हर मध्ये ‘commentators ‘ ना वापराव्या लागल्या. ••••
त्या ओव्हर मध्ये काय नाही झालं.?? •••
एक, दोन, तीन, चार, सिक्स रनस्, नो बॉल, फ्री हिट Wide Ball, stumps उडाले, दोन प्लेअर आउट होतात. कॅप्टन चे एंपायर बरोबर डिस्कशन वगैरे वगैरे. तो एक ओव्हर म्हणजे पूर्ण मॅच होता. ••••
खेळ कसा प्रत्येक बॉलवर बदलू शकतो. ते समजे पर्यंत दुसरी घटना घडते. प्लेअर्स ची कमाल तर होतीच, बरोबर एंपायर्स ची पण परीक्षाच होती. एवढी कठीण परीक्षा त्यांनीही यापूर्वी कधी दिली नसेल बहुतेक. जणू काही सर्वांच्या डोक्यात Super computer fit असतात, तसे ते निर्णय देत होते. ••••
खेळ कसा खेळावा याची अनेक उदाहरण प्रत्यक्षात बघायला मिळत होती. •••
म्हणजे पूढे एखादा कोच आपल्या शिष्याला कोचिंग देताना हा over नक्की दाखवेल असा हा over होता. •••
कोणाकोणाचे किती आणि कशा कशाचे कौतुक करावं हेच कळत नाही. हा over म्हणजे तासोंतास चर्चा करण्याचा विषय आहे. •••
विराटचे तर विराट कौतुक. त्याची बॉडी लॅंगवेज, aggressive approach, presence of mind, stamina, awareness, quick decisios. एवढ्या प्रेशर मध्ये असताना तो घेत होता. कुठेही give up, surrender ची बॉडी लॅंग्वेज नव्हती. ‘मी जिंकणारच ‘हाच भाव चेहऱ्यावर होता. ••••
त्याला साथ देणारा हार्दिक चे योगदान पण तेवढेच. आश्विनचां एवढ्या प्रेशर मध्ये असताना wide ball समजून, सोडणे. खरंच खूप कौतुकास्पद. दोन बॉल खेळायला आलेल्या अश्विन चा वर्ल्ड क्लास दिसला. अनुभव कामी आला. ••••
पूर्ण टीम वर्क. positive attitude, Never say die approach.
हारलेला मॅच जिंकला. ••••
कुठे, कधी, किती, कसा, केंव्हा, काय?? समतोल साधावा?? हे कोणीही मॅच बघून शिकावं. आयुष्याचे सार सांगणारा असा हा over होता. ••••
मला तर वाटतं मनातील मरगळ काढायला प्रत्येकाने हा मॅच मधून मधून नक्की बघावा. •••
एक लाखाच्या आसपास उपस्थित दर्शकांसमोर आपले concentration कायम ठेवणे. ध्येयाकडे वाटचाल करत असताना प्रत्येक बॉल वर होणारा प्रेक्षकांचा हल्ला तुम्हाला विचलित करत नाही, म्हणजे किती मानसिक शक्ती, टफनेस, विल पावर, आणि काय म्हणाव?? शब्द/ विशेषण कमी पडतायेत. •••
त्यानंतर मी कितीदा तरी हा मॅच बघीतला. प्रत्येक वेळी अनेक नवीन विचार मनात येत होते. •••
हाच का तो कोहली?? मधल्या पिरेडमध्ये अगदी डाऊन होता. प्रत्येक वेळेस खेळायला यायचा आणि लगेच पॅव्हेलियन मध्ये परत जायचा. तेंव्हा अनेकांना बोलायचा चान्स मिळाला होता. •••
पुन्हा बाऊन्स होऊन पुर्वी पेक्षा जास्त दमदार वापसी. व्वा!! कौतुक च आहे. •••
तो काळ म्हणजे त्याच्या क्रिकेट जीवनात आलेला ‘Bad Patch ‘ च होता. शिखरावर असताना खाली घसरण. पुन्हा शिखरावर पोहचण. यामधील काळ म्हणजे अनेक मानसिक, शारीरिक उलाढाली चां काळ असणार नाही का?? त्यात पब्लिक फिगर असल्यावर लोकांच्या अपेक्षा असतातच. कौतुक करताना अगदी डोक्यावरच नाही तर, देवघरात बसवतील, तर अपेक्षा भंग झाल्यास काय करतील?? त्यांचाही भरवसा नसतो.. •••
भारतीय तर तसेच क्रिकेट प्रेमी म्हणजे क्रिकेट मागे वेडेच, •••
* क्रिकेट के लिये कुछ भी करेगा वाले * •••
* त्यात पाकिस्तान बरोबर मॅच म्हणजे
* “इज्जत का सवाल * असतो. •••
BAD PATCH मध्ये, •••
खेळताना येणाऱ्या अडचणींवर लक्ष देणे, काही खेळण्याचे टेक्नीक बदलणे. कुठे सतर्क रहायचे?? कुठे समर्पित रहायचे?? हे ठरविणे. योग्य वेळी दोन पावले मागे घेणे.
खेळण्या बरोबर मानसिक अनुशासन असणेही आवश्यक आहे. हे काम खेळाडूंच्या कोचचे जरी असले तरी ते खेळाडू ने ऐकणेही महत्वाचे आहे. •••
जो काळानुसार स्वतः मध्ये बदल करतो तो प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो. घसरत असताना ताठ उभं राहून चालत नाही. झुकता आलं पाहिजे. शिक्षण घेणे आणि त्याचा उपयोग परीक्षेत करणे, दोन्हीं मध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. खेळाच्या मैदानावर common sense and Presence of mind चे महत्व जास्त असते. ••••
या काळात, •••
“जब कोई बात बिगड जाए, जब कोई मुश्किल आ जाए, तुम देना साथ मेरा. ” •••
असा कोचही पाहिजे. ‘धोनी’ सारखा साथ देणारा मित्रही पाहिजे. ••••
हा विश्वास कोच आणि प्लेअर मध्ये असायला हवा. •••
“वक्त ने विराट को आजमाया बहुत लेकिन हरा नहीं पाया ।••••
हेच म्हणावे लागेल. •••
Bad Patch ••••
हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच. त्यांचा सामना करणे म्हणजे, •••स्वतः चे परिक्षण निरिक्षण करेक्शन करता आले पाहिजे. पुन्हा RESTART चे बटन दाबून पुन्हा जोमाने कष्ट करता आले पाहिजे. ••••
स्वतः लाच Push and run करणे जमले पाहिजे. प्रत्येक area त double XL पेक्षा जास्त मेहनत करणे जमले पाहिजे. •••
म्हणतात ना ••••
” जिंदगी में तोता नहीं बाज बनिए, क्योंकि तोता बोलता बहुत हैं और उड़ता कम हैं । बाज शांत रहता है, लेकिन आसमां छूने की ताकत रखता हैं। “••••
☆ चातुर्मास – श्रावण – — भाग १ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
ऐका परमेश्वरा गणेशा, तुमची कहाणी, निर्मळ मळे, उदकाचे तळें, बेलाचा वृक्ष, सुवर्णाचीं कमळें, विनायकाचीं देवळें रावळें. मनाचा गणेश मनीं वसावा. हा वसा कधीं घ्यावा? श्रावण्या चौथीं घ्यावा. माही चौथीं संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशापायलीचं पीठ कांडावं. अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे, सहा ब्राह्मणाला द्यावे, सहाचं सहकुटुंबी भोजन करावं. अल्प दान, महापुण्य. असा गणराज मनीं ध्यायीजे, मनी पाविजे, चिंत्त लाभिजे, मनकामना निर्विघ्न कार्यसिध्दि किजे. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.
अशी गणपतीच्या कहाणीने दिवसाला सुरुवात झाली की, श्रावण महिन्याचे आगमन झाले हे लक्षात येते. आता हे फार दुर्मिळ झाले आहे. पण आमच्या लहानपणी हे प्रत्येक घरी ऐकू यायचे. घरातील आजी, आई यांचा ऐका परमेश्वरा गणेशा….
स्वर कानी पडताच आपलेही कान तिकडे लागायचे. त्या बरोबर आघाडा, दुर्वा, फुले यांचा हार त्याचा मंद सुगंध वातावरण भारून टाकायचा. त्या बरोबर घराघरात लावला जाणारा जिवतीचा कागद. घरात आधीच तयारी केली जायची. तो कागद आधीच आणून तो एखाद्या जाड पुठ्ठ्यावर चिकटवला जायचा किंवा एखाद्या जुन्या आरशावर लावला जायचा. अशा घरीच तयार केलेल्या फ्रेमला “हार घालायची सोय कर” अशी प्रेमळ सूचना वजा धमकी मिळायची. आणि मग ती फ्रेम श्रावण अमावस्ये पर्यंत फार महत्वाची असायची. श्रावण अमावस्या या दिवशी तो कागद पालथा घालून दुसऱ्या दिवशी त्याचे विसर्जन केले जायचे. तो कागद व त्यावरील चित्रे यांचा अर्थ लहानपणी कळायचा नाही. पण त्यातील प्रसंगाच्या कथा ऐकून काही गोष्टी लक्षात आल्या. या सगळ्या गोष्टी व्रते मुख्यतः घरातील मुलांच्यासाठी केल्या जातात. त्यातील चित्रे बघितली तर ती वेगवेगळी असतात.
जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध – बृहस्पती (गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पुजले जाते. या सगळ्या चित्रांचे अर्थ आपण हळूहळू समजून घेऊ. पण ही चित्रे बघितली आणि एकूणच क्रम लक्षात घेतला, तर प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता, आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम! एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना म्हणजेच जिवती पुजन!
विशेष म्हणजे या चित्रात आपले बाप्पा कुठेच नाहीत. पण श्रावणातील रोज होणाऱ्या या खास पूजेतील कथा श्रवण करताना प्रथम मान आपल्या बाप्पाला असतो. आणि त्याच्या कथेनेच सुरुवात होते. गणपती ही विघ्नहर्ता देवता आहे, तिची पूजा वेगळ्या पद्धतीने केली जाते. जिवती देवी आणि गणपती यांच्या पूजेच्या पद्धती आणि उद्देश वेगळे आहेत. त्यामुळे जिवतीच्या या कागदातील चित्रात गणपती नसतो.
(पूर्वसूत्र – तारामावशीचा निरोप घेताना हातून कांहीतरी निसटून गेल्याची भावना मनात होती. भिडेकाकांचं बोलणं ऐकल्यानंतर मात्र मनातली ती अस्वस्थता बऱ्याच अंशी कमी झाली. इथे येताना मनात असणारे कांही प्रश्न अनुत्तरीतच राहिलेले होते हे खरे, तरीही खूप काही गवसल्याची भावना मनात भरून राहिलेली होती!)
भिडेकाकांनी सांगितलेला संपूर्ण घटनाक्रम अगदी सहज योगायोगाने घडलेला वाटावा असाच होता. तरीही ती मूर्ती मला भेट म्हणून देण्यासाठी विकत घ्यायची प्रेरणा तारामावशीला मिळणं, तिने ती पुढे आमची भेटच होऊ न शकल्याने तीन वर्षे स्वतःकडे सांभाळून ठेवणं, त्यानंतर माझ्या आईचं कांही कारणांनी मुंबईला जाणं, तिथल्या अल्पवास्तव्यातही तिला उभ्या उभ्या कां होईना तारामावशीला भेटून यावंसं वाटणं, त्याच भेटीत मावशीने ती मूर्ती ट्रंकेतून काढून मला देण्यासाठी आईकडे आठवणीने देणं, आणि ती देण्यासाठीच केवळ आईने परतीच्या प्रवासात थेट कोल्हापूरला न जाता आवर्जून सांगलीला उतरून माझ्याकडे येणं, नेमक्या त्याआधी अशीच एखादी मूर्ती पुण्याला नवीन जागी रुजू होण्यासाठी निघण्यापूर्वी विकत घेण्यासाठी मी गेलो असता अनेक ठिकाणी शोध घेऊनही मला मनासारखी मूर्ती न मिळणं आणि त्याच अस्वस्थतेत घरी आल्यानंतर आईने बॅग उघडून त्यातली ही मूर्ती माझ्याकडे सोपवणं या सगळ्या घटनाक्रमातल्या असंख्य धाग्यांची घट्ट वीण ही केवळ योगायोगाने गुंफली जाणं शक्यच नाही हे मला नव्यानं जाणवलं. त्याचा थांग लावण्यासाठी आवर्जून आटापिटा करूनही फारसं कांही हाताला लागलं नसलं तरीही ते जाणून घ्यायचा बंद दरवाजा थोडातरी किलकिला झाल्याचं समाधान भिडेकाकांकडून समजलेल्या घटनांमुळे मला मिळालं होतंच. रिकाम्या देव्हाऱ्यात प्रतिष्ठापित केलेल्या त्याच मूर्तीला नमस्कार करून मी बँकेत जाण्यासाठी बाहेर पडलो तेव्हा हेच सगळे विचार मनात होते. तोपर्यंतच्या प्रतिकूल परिस्थितीतल्या अकोल्यातल्या माझ्या अधांतरी वास्तव्यातल्या निराधार मनाला या अनुभवांमधून ध्वनित होणारा ‘त्या’चा ‘मी आहे’ हा आश्वासक दिलासा मिळाला आणि डोक्यावरचं सगळं ओझं कुणीतरी अलगद उतरवून घ्यावं तसा मी निश्चिंत झालो!
मी अकोल्यात पाऊल ठेवल्यापासूनच्या सहजासहजी अंगवळणी पडूच न शकणाऱ्या पूर्णत: प्रतिकूल परिस्थितीतही त्या त्या वेळी मला आधार देऊन गेलेले कितीतरी सकारात्मक क्षण होतेच की. याचा अर्थ मी इथे ‘त्या’च्या निगराणीखालीच तर होतो, या विचाराचा स्पर्श मनाला उभारी देणाराच नव्हता फक्त तर तो लवकरच घडणाऱ्या सकारात्मक घडामोडींचं सूतोवाचच करत असावा असंच नंतर घडलेल्या उत्साहवर्धक घटनांनंतर मला वाटत राहिलं होतं. कारण मी त्यादिवशी बॅंकेत पोचल्यानंतर अतिशय वेगाने आणि अनपेक्षितपणे अशा कांही घटना घडत गेल्या कीं त्यातून जाणवलेला अनपेक्षित सुखद धक्का अचंबित व्हावं असाच होता!
बॅंक तीच, जबाबदाऱ्या, दडपणं, गर्दी सगळं तेच.. क्षणाचीही उसंत न देणारं हे सगळं तसंच असूनही तो दिवस मात्र नेहमीपेक्षा वेगळाच ठरला तो मी ब्रॅंचमधे पोचताच आलेल्या एका फोनमुळे. फोन क्रिमिनल लाॅयरच्या आॅफिसमधून आलेला आणि शक्य असेल तर तातडीने भेटून जायला सांगणारा होता. या फोनची खरंतर मी वाट पहायची नाही असंच ठरवलं होतं. क्रिमिनल केसेस् फाईल करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे मी वकिलांच्या सूचनाबरहुकूम काळजीपूर्वक पूर्ण करून त्यांच्याकडे सुपूर्द केली होती त्याला आठच दिवस तर झाले होते. ‘फायनल ड्राफ्ट तयार झाला कीं मी आपण होऊन तुम्हाला निरोप देईन” असं त्या वकिलांनी मला सांगितलं होतं. तरीही हे तातडीने होण्याची निकड मी त्यांना बोलून दाखवली होती ती त्यात अडकलेल्या बॅंकेच्या मोठ्या रकमेचा विचार करून. आणि तसंही हेच निस्तरण्यासाठी मला अकोल्याला पाठवलं असल्यामुळे ते प्राधान्यक्रमाने पूर्ण करणं माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचंही होतं. तरीही आजवरच्या अनुभवांनुसार मी डायरीत फाॅलोअपसाठीचं डायरायझेशन केलं होतं ते पंधरा दिवसांनंतरचं. आणि आश्चर्य म्हणजे हे क्रिमिनल लॉयर अतिशय व्यस्त असूनही या केसचं महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी माझ्या पाठपुराव्याची वाट न पहाता आठ दिवसातच सगळं प्राथमिक काम पूर्ण करून दिलं होतं!
माझ्या समोरच्या त्या महत्त्वाच्या तातडीच्या कामाची माझ्यापुरती सांगता झाली ती आरोपपत्रासोबत जोडाव्या लागणाऱ्या सगळ्या दस्तावेज व पुराव्यांच्या कागदपत्रांवर मॅनेजर म्हणून सही करून मी स्वत: ती फाईल आमच्या क्रिमिनल लाॅयरकडे सुपूर्त केली तेव्हा!
तोवरच्या माझ्या बँकिंग करिअरमधे मला सामोरं जावी लागलेली अशी अनेक आव्हानं होती हे खरं पण त्यांचं असं दडपण कधीच जाणवलेलं नव्हतं. वरिष्ठ कार्यालयाकडून वेळोवेळी मिळणारं मार्गदर्शन, सहकार्य आणि प्रोत्साहन यामुळे ती आव्हानं सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध कामाची अपेक्षा करणारी असूनही सुसह्यच नव्हे तर आनंददायीही असायची. इथं मात्र माझ्यासमोरचं हे आव्हान केवळ माझ्यासाठीच नव्हे तर या ब्रॅंचच्या रिजनल आणि झोनल ऑफिससाठीही टांगती तलवारच होती. त्यामुळे त्यातला एक अंक मनासारखा पूर्ण होण्याचं समाधान त्या क्षणापुरतं कां होईना माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं! ‘त्या क्षणापुरतं’ असं म्हणायचं कारण मला त्या समाधानात तरंगत राहून चालणारच नव्हतं. कारण थकीत कर्जांची इतरही अनेक खाती पिंजून काढण्याच्या जिकिरीच्या कामावर लक्ष केंद्रीत करणं माझ्यासाठी आता तितकंच महत्त्वाचं होतं!
या सगळ्या जबाबदाऱ्या अतिशय काळजीपूर्वक काटेकोर नियमांनुसार पूर्ण करत असताना मिळणाऱ्या समाधानावर, बेजबाबदारपणे काम करणाऱ्या इतरांच्या चुकांची ही धुणी आपल्याला धुवावी लागतायत या विचाराचं सावट असायचंच. अर्थात हा असा अनुभव मी प्रथमच घेत असल्यामुळे ते सहाजिकच होतं. म्हणूनच अपवादात्मक असला तरी हा अनुभव निदान त्याला सामोरं जाताना तरी माझ्यासाठी क्लेशकारकच ठरला होता!
या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या दिवशी अकोल्यातल्या कडक उन्हाइतकेच चटके देणाऱ्या अशा अनुभवांमुळे मन उद्विग्न असतानाच अकल्पितपणे उल्हसित करणारा गारवा स्पर्शून गेला तो बाहेरच्या उन्हाला शांतवण्यासाठीच आल्यासारख्या बरसू लागलेल्या वळवाच्या पाऊसधारांमुळे! अकोल्यात गेल्यापासून हा असा गारवा अल्पकाळ का असेना मी प्रथमच अनुभवत होतो आणि म्हणूनच मनातलं मळभ नकळत विरून गेलं. गंमत म्हणजे हा पाऊस या सगळ्या अडचणीतून मला अतिशय सन्मानपूर्वक अलगद बाहेर काढू पहाणाऱ्या, माझ्या मनातली काहिली शांतवू पहाणाऱ्या अशा हाकेच्या अंतरावर वाट पहात उभ्या असणाऱ्या एका अनपेक्षित घटनेचं शुभसूचनच करत होता जसाकांही.. , पण त्याक्षणी मला त्याची कल्पना नव्हती एवढंच!
श्रावण म्हणजे सण आणि उत्सवांचा राजा. सृष्टीही नटलेली असते. म्हणून श्रावणाचे वर्णन गीतकार ‘हासरा नाचरा श्रावण’ असे करतात. प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व. सोमवार- शिवपूजन, मंगळवार- मंगळागौर, बुधवार -बुध पूजन, गुरुवार – ब्रहस्पती पूजन, शुक्रवार जिवंतिका (जिवती), शनिवार -अश्वत्थ, मारुती पूजन.
नागपंचमी – श्रावण शुद्ध पंचमी. भारतीय संस्कृती निसर्ग प्रधान. वृक्ष प्राणी इत्यादी निसर्गाच्या विविध रूपाना देव मानणारी. देव देवता नागरूपाने प्रगट होतात असे मानणारी. म्हणूनच शंकराने आपल्या गळ्यात तर गणपतीने आपल्या कमरेला नागाला स्थान दिले. तर विष्णु शेषशाही झाला. संपूर्ण पृथ्वी शेषाने आपल्या पुस्तकावर तोलली आहे असे मानले जाते. समुद्रमंथनाच्या वेळी वासुकी सर्पाचा दोरीसारखा उपयोग केला गेला. इतका नागकुळाचा देवांशी संबंध. जिथे देवांची व मानवी शक्ती अपुरी पडते, तेथे अशा अमानवी शक्ती योजल्या जातात.
व्यवहारिक दृष्टीने शेतीचे नुकसान करणारे उंदीर हे नागाचे खाद्य. म्हणून नाग हा शेतकऱ्यांचा मित्र झाला. श्रावणाच्या सुरुवातीला पाऊस थोडा कमी झालेला असतो. सर्वत्र हिरवगार झालेले असते. त्यामुळे नाग आपल्या शरीराचे उष्णता कायम ठेवण्यासाठी उन्हात येऊ लागतात. त्यांच्याविषयी भीती व त्यांची उपयुक्तता जाणून नागाची पूजा सुरू झाली. मग मोठ्या दगडी किंवा धातूच्या नाग प्रतिमांची पूजा देवळात, तर घरोघरी मातीच्या नागांची पूजा करतात. त्याला दुर्वा, लाह्या व दूध वाहतात. नाग कधीच दूध पीत नाहीत. पण ती प्रथा पडली. अनवधानाने देखील नागाची हत्या होऊ नये. म्हणून या दिवशी उकरत नाहीत. घरात चिरत व भाजत नाहीत. कणकेचे पुरण घालून केलेले दिंड नैवेद्याला करतात. ते उकडलेले असतात.
लोककथा मधून नागाला स्त्रियांचा भाऊ मानले आहे. या सणाला स्त्रिया माहेरी येतात. एकत्र जमून गाणी म्हणतात. खेळ खेळतात. नवीन वस्त्र घालतात. मेहंदी काढतात. झोपाळ्याचा आनंद लुटतात. म्हणून स्त्रियांसाठी हा महत्त्वाचा सण. या दिवशी यमुनेचे पाणी दूषित करणाऱ्या कालिया नागाला श्रीकृष्णाने दूर पाठवले. साऱ्या मानव जातीचा मित्र असणाऱ्या नागाबद्दल कृतजंता व्यक्त करायचा हा दिवस असला तरी गारुडी त्याचा गैरफायदा घेतात. दात काढलेले नाग घरोघरी फिरवून पैसे गोळा करतात. बत्तिसशिराळ्याला जिवंत नागाच्या पूजेची प्रथा होती. यापेक्षा प्रतिमापूजन श्रेष्ठ. नागाना त्यांचे त्यांचे अधिवासात राहू द्यावे. हल्ली सर्पमित्र गावात वावरणाऱ्या नागांना सहजपणे पकडून जंगलात सोडतात.
नागपंचमी म्हटली की ग. दि. मांचे गीत आठवते ‘फांद्यावरी बांधिले व मुलीने हिंदोळे। पंचमीचा सण आला डोळे माझे ओले।’. राजस्थान, गुजरात, केरळ, तामिळनाडू मध्येही नाग पूजेची प्रथा आहे.
“अगं काय हे सुनबाई ? निदान आज तरी माझ्या चहात साखर घालायलाचीस ! आज काय आहे विसरलीस वाटतं ?”
“माझी अजून तुमच्या सारखी साठी थोडीच झाल्ये विसरायला ?”
“नाही नां, मग ?”
“आई, आज तुमचा एक्सष्टावा वाढदिवस आहे, हे माझ्या चांगलं लक्षात आहे आणि म्हणून तर रोजच्या अर्ध्या कप चहा ऐवजी तुम्हांला आज चांगला पाऊण कप चहा दिला आहे ! अर्ध्या कप चहावर पाव फ्री ! एंजॉय युअर बर्थ डे !”
“अगं पण सुनबाई मला तर पाव कुठेच दिसत नाही या चहा बरोबर !”
“आई, मला असं म्हणायचंय की रोजच्या अर्धा कप चहावर पाव कप चहा फ्री !”
“पण त्या पाव कप एक्सट्रा चहा ऐवजी, थोडी साखर घातली असतीस आज चहात, तर तुझे हात काय मोडणार होते का गं ?”
“अजिबात नाही आई, पण तुमच्या हाय डायबेटीसमुळे मी तुम्हांला रोज इन्शुलीनच इंजेकशन देते, हे विसरलात वाटतं ?”
“मी बरी विसरेन ! माझ्या सासूबाई होत्या, तेंव्हा मला येता जाता टोचून, टोचून बोलायच्या आणि आज माझी सून मला तोंडाने नाही पण इंजेकशनच्या सुईने रोज टोचत्ये ! काय माझं मेलीच नशीब ! मला कोणाला टोचून बोलायचं भाग्यच मिळाल नाही या जन्मात !”
“पण तुम्ही मला अधून मधून जे तीरकस बोलता, ते आणखी काय वेगळं असतं का हॊ आई ?”
“ते जाऊ दे, मला सांग निदान आज तरी माझ्या चहात थोडीशी एक दोन चमचे साखर का नाही घातलीस ?
तेवढ्याने का होईना, पण माझ्या आजच्या स्पेशल डेची सुरवात गोड झाली असती !”
” ए sss क दो sss न चमचे साखर मी तुमच्या कपात घालायची आणि विलासचा ओरडा खायचा?”
“अगं त्याला कसं कळेल तू माझ्या चहात साखर घातल्येस ते ? ती तर विरघळून जाणार नां कपात !”
“ते जरी खरं असलं, तरी माझ्या मनांत ते कसं राहील आई ? आपल्या बायकांची जीभ पोटात कमी आणि ओठात जास्त ठेवते, हे मी का तुम्हांला सांगायला हवं ?”
“म्हणजे तुला काय म्हणायचं आहे सुनबाई ? माझ्या पोटात काही रहात नाही म्हणून ?”
“मी तुमच्या पोटात असं कुठे म्हटलं ? एकंदरीत बायकांच्या बाबतीत एक जनरल स्टेटमेंट केलं इतकंच !”
“पुरे झालं तुझं पोटात आणि ओठात ! मला सांग आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने काय सरप्राईज देणार आहात तुम्ही सगळे ?”
“बघा, स्वतःच म्हणता सरप्राईज आणि वर विचारता पण कसलं सरप्राईज म्हणून ?”
“अगं सांग गपचूप तू मला ते सरप्राईज. ते मिळाल्यावर मी चकित झाल्याचा अभिनय नक्की करीन, तू अजिबात काळजी करू नकोस !”
“बघा हं, नाहीतर मला तोंडघाशी पाडालं. “
“तू काळजीच करू नकोस सुनबाई, कसा मस्त अभिनय करते बघ संध्याकाळी ! हां आता सांग काय सरप्राईज आहे ते !”
“आजच्या तुमच्या एकसष्टीच्या निमित्त, या वर्षीच्या तुमच्या बर्थडे केकवर ६१ मेणबत्या लावायचं आम्ही ठरवलंय आणि तो केक दरवर्षी सारखा शुगरलेस नसणार ! काय, कसं वाटलं आमचं सरप्राईज ?”
“चुलीत घाला त्या सरप्राईजला !”
“म्हणजे काय आई, आवडलं नाही का सरप्राईज ?”
“अगं त्यातली एकच गोष्ट बरी आहे म्हणायची !”
“कोणती ?”
“या वेळचा केक शुगरलेस नसणार आहे, ती !”
“मग झालं तर !”
“अगं हॊ, पण त्या केकवरच्या ६१ मेणबत्या फुकर मारून विझवता विझवता माझा म्हातारीचा जीव जाईल त्याच काय ?”
“अहो आई तुम्हीं अजिबात काळजी करू नका त्याची, आम्ही सगळे तुम्हांला मदत करू नां त्या मेणबत्या विझवायला !”
“नकोच ती भानगड सुनबाई ! त्या पेक्षा तुम्हीं या वर्षी माझी ‘तुला’ करा !”
“हां हां, ही आयडिया पण युनिक आहे, पण कशानं करायची तुमची तुला ?”
“अगं सोप्प आहे, ६१ किलो वजनाची मिठाई सगळ्या सोसायटीत वाटून टाका, म्हणजे झालं !”
“बरं बरं, मी असं करते तुमचा चहा नाष्टा झाला की जरा बाहेर जाऊन येते !”
“कशाला ?”
“आपल्या घराच्या आसपास कुठे लाकडाची वखार आहे का बघून येते !”
“लाकडाची वखार ? सुनबाई काय विचार काय आहे तुझा ?”
“आई, तुमच्या जे डोक्यात आहे ते माझ्या मनांत पण नाही !”
“मग लाकडाची…… “
“अहो आई, आता तुमची ‘तुला’ करायची म्हणजे तेवढा मोठा वजन काटा हवा नां ?”
“हॊ बरोबर. “
“मग तो लाकडाच्या वखारी शिवाय दुसरीकडे मिळेल का ?”
“नाही !”
“म्हणून तर लाकडाची वखार शोधायला बाहेर पडीन म्हणते. आता तुमची ‘तुला’ करायची म्हणजे त्या वजन काट्याच्या एका पारड्यात तुम्हीं बसणार आणि दुसऱ्या पारड्यात तुमच्या वजना इतकी मिठाई तोलायची बरोबर नां ?”
“हॊ बरोबर !”
“पण मग ते कसं जमणार आई ?”
“का, न जमायला काय झालं?”
“अहो आई, तुमचं वजन आहे ८५ किलोच्या आसपास आणि मिठाई तोलायची ६१ किलो ! हे गणित काही जुळणार नाही बघा !”
“सुनबाई, कळली बरं तुझी अक्कल ! आता एक कामं कर. “
“कोणतं?”
“माझ्या बाबुला म्हणजे तुझ्या नवऱ्याला फोन कर आणि त्याला सांग या वेळचा माझ्या बर्थडेचा केक पण शुगरलेसच आण आणि…..
हे नाव तुमच्या ओळखीच आहे का? नागपंचमीच्या सणादिवशी मला त्याची नेमकी आठवण होते. पुन्हा ते हातात घेऊन गावभर हुंडराव असं वाटतंय. पंचमी दिवशी आमच्या गावातल्या प्रत्येक पोरांच्या हातात ते दिसणारच. कुणाच्या मेपट्याचा बार मोठा निघतोय याची चढाओढ लागायची पोरांच्यात. म्हणून पोरं मेपट्यांचे बार टाकत गावभर हुंडरत फिरायची .
आता मेपटं म्हणजे काय ते सांगतो. आमच्या गावातले कसबी लोहार ही मेपटी तयार करण्यात तरबेज होते. ते पंचमीच्या अगोदरचे पंधरा दिवस याच कामात गढून गेलेले असायचे. जाड पत्र्याची एक पोकळ नळी तयार करायची. ती बुडा कडून तोंडाकडे निमूळती होत गेलेली असायची. ती चांगली पॅकबंद असायची. नळीतून मधून कुठूनही हवा बाहेर जाऊनये म्हणून तिला तिच्या जोडावर टाकनखारलाऊन सीलबंद करायची. माग त्या नळीच्या मापाने तिच्यात मागेपुढे करता येईल अशी एक दणकट सळी घ्यायची तिची लांबी पोकळ नळी पेक्षा बोटभर कमी अशा बेतान लाकडी मूठ बसवायची ती मूठ बसवलेली सळी दट्याच काम करायची.
आमच्या गावाशेजारच्या डोंगरात कारीच्या जाळ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आसाच्या त्यांना कारं लगडलेले असायची. ती पंचमीच्या दोन दिवस आधीच पोरं तोडून आणायची. तयार झालेल मेपटं घ्यायचं त्यांच्या मागच्या रुंद भागात कार ठोकून गच्च बसवायचं मग ते मूठ बसवलेल्या सळीनं पुढे ढकलायच. ते नळीच्या पुढच्या निमुळत्या जागेत अधीकच घट्ट बसायचं मग पुन्हा मागच्या बाजून दुसरं काय ठोकून बसवायचं आणि त्याला मुठ बसवलेल्या सळीन पुढं ढकलायच. मागच्या वाढत जाणा-या हवेच्या दाबान पुढचं कार मोठा आवाज करत पिस्तूलच्या गोळी सारखं पुढं जायचं. असलं हे मेपटं म्हणजे पोरांची ठासणीची बंदूकच बनायची. पोरं ती घिऊन मिजास करत गल्लीभर फिरायची. आज कालौघात ते लुप्त झालेल आहे. पण आमच्या स्मरणात त्याचं ते कौतुक कायमच नोंदलं गेलं आहे. असं होत आमचं पंचमीच्या खेळातलं मेपटं.
डोंबिवलीत ९० वे अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून माझी निवड झाली होती. डोंबिवलीलाच माझा मावसभाऊ राहातहोता.
” ईश्वरभाऊ चार तारखेला साहित्य संमेलनात येत आहे काव्यवाचनासाठी ” ” अग माई, माझ्याकडे अवश्य ये. जेवणही सोबतच करू. वर्किंग डे (working day) असल्याने तुझी वहिनी घरी नसेल, पण मी घरीच आहे. मी असं करतो, तुला संमेलन स्थळी न्यायलाच येतो. तुझा कार्यक्रम संपला कि येऊ आपण घरी “.
” ओ. के. भाऊ ” मी फोन ठेवला. मी संमेलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच माझा भाऊ तिथे हजर होता. माझं काव्यवाचन झालं व आम्ही डोंबिवलीतील माझ्या भावाच्या घराकडे निघालो.
हसत खेळत आमची जेवणं झाली तसेच गप्पाही. मामा, मावशी, अगदी जवळचे लांबचे सगळ्या नातेवाईकांविषयी गप्पा झाल्या ” कोण आता कोठे आहे? काय करतंय? सगळी कुशलता, कोणाच्या समस्या गप्पांमधून कळत होत्या. आजकाल एवढा मनमोकळा संवाद माझा कोणाशीच झाला नव्हता. नोकरी, घरकाम, जवाबदार्या पार पाडण्यातच वेळ जात होता. कितीतरी दिवसातून आज मनमोकळ्या गप्पा होत होत्या, संवाद साधला जात होता. कारण भाऊही सेवानिवृत्त झाला होता व मी सुद्धा.
” काय करावं माई, मनमोकळं बोलायलाही कोणी हवं असतं ग. आता तर आम्ही दोघंच. मुले त्यांच्या व्यापात, मुलगी सासरी, तर मुलगा नोकरीच्या गावाला. पूर्वी नोकरी व जवाबदार्यात वेळ नव्हता. जुजबी संवाद पत्नी व मुलांशी व्हायचा. त्यांना काय हवं, काय नको, ते पुरविलं, पण मनमोकळं, मनसोक्त, स्वच्छंदीपणे आम्ही काही जगू शकलो नाही. निलीमाची नोकरी, मुलांच्या शाळा, इतर अॅक्टिव्हीटीज (activities) मध्ये ते व्यस्त.
अनेकदा मनांतील गोष्टी मनांतच राहिल्या ” मी हळूवारपणे त्याच्या हाताच्या तळव्यावर माझा हात ठेवला. त्या स्पर्शातच त्याला खूप काही जाणवलं, तो मंदसा हसला.
” चल माई, आपण चहा घेऊया का अर्धा अर्धा कप “.
” होय, घेऊया की. मी बनविते चहा “
“ ए, नाही हं, मलाही बनविता येतो छानपैकी चहा “
सायंकाळी त्याचा निरोप घेऊन मी परतीच्या प्रवासाला लागले, अंतःर्मुख होऊनच. खरंच आज प्रत्येक घराची हीच कहाणी आहे. विभक्त कुटुंबपध्दती राजा राणीचा संसार, चौकोनी कुटुंब, अर्थार्जनासाठी धाव धाव धावायचं, मुलांना पाळणाघरात ठेवायचं, त्यामुळे मुलेही दुर्मुखलेली, आईबाबा कामावर, शाळेतून मुलांनी यायचं, स्वतःच घराचं कुलूप काढायचं, आईने केलेला स्वयंपाक स्वतःच वाढून घ्यायचा. होमवर्क करायचा. ही आजची जीवनपध्दती.
शाळा सुटल्यावर मस्तपैकी हुंदडत यायचं, घरात आजी आजोबा आहेत, ” आलाग बाई माझा बाळ ” म्हणत स्वागत व्हावं, लाडे लाडे त्यांच्या गळ्यात पडावं, आजीने कपडे बदलून द्यावे, जेवण गरम करून वाढावं “मुलांची ही स्वप्ने, स्वप्नेच राहातात कारण घरात आजी आजोबा नसतात. त्यांची रवानगी वृृध्दाश्रमात झालेली असते. वृृध्दाश्रमात ते कुटुंब सुखाला तरसतात तर इकडे नातवंडे दुर्मुखलेली राहातात.
पूर्वीच्याकाळी लग्न समारंभही चार /पाच दिवस चालायचे. चार मांड्यांची हळद, सात मांड्यांची हळद राहायची. सगळे नातेवाईक गणगोत जमायचे, सगळ्यांच्या भेटीगाठी व्हायच्या, मनं मोकळी व्हायची व सर्वात महत्वाचे प्रेमभावना वाढीस लागायची.
आजची लग्ने चार तासात उरकावी लागतात. कारण तासांनीच मॅरेज हाॅल भाड्याने मिळतात. सगळं काही आज रेडीमेड मिळतं. अगदी आगत स्वागताला माणसे देखिल. पूर्वीच्या लग्नांमध्ये अगदी रुखवताच्या सामानापासून, लाडू, वडे, कुरडई, पापड सगळी कामे समूहातून केली जात होती. हळद, बिदाई, मेहंदी, बांगड्या (चूडा) समारंभासाठी आळीतील सगळ्या स्त्रिया एकत्रित होत असत. आज मात्र तसे नाही. ” केव्हा एकदाचे लग्न लागते व आॅफीस गाठता येईल” हीच सगळ्यांची धावपळ. या धावपळीत मुक्तपणे संवाद होऊच शकत नाही. सगळी च औपचारीकता.
लग्नसमारंभाला न येऊ शकलेली माणसे whats app वरून शुभाशिर्वाद देऊन मोकळी होतात व न येऊ शकल्यामुळे माफी मागितली कि झाले काम.
दुपारच्या वेळी गृहिणी निवांत बसली आहे व चार मैत्रिणी आल्यात असे होतच नाही आजकाल. कारण प्रत्येकजण दुपारच्या मालिका पाहाण्यात गर्क.
किंवा whats app वर बिझी. मग कसा झडणार हो संवाद.?
दुपारी किंवा रात्री सगळा परीवार एकत्रितपणे जेवायला बसलाय असेही घडत नाही दिवसा नोकरी व्यवसाय व मुलांच्या शाळांमुळे ते शक्य होत नाही, पण रात्री ते ही जमत नाही. पतीराजांना महत्वाची मिटींग असते. कधी फाॅरेन डेलिगेटस् आलेलै असतात मम्मीच्याही कधी पार्टीज असतात. मुले मित्रांसमवेत मौजमजा करतात. मग एकमेकांमध्ये संवाद होणार तरी कसा?
पार्टी, मित्रता, whats app, face book, twitter, यावरून संवाद तर झडतो, पण ऐनवेळी, अडी अडचणीत ही माणसे उपयोगाला येतात काय हो? मुळीच नाही. कारण त्यात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा कोठून आणणार हो? तो तर अंतःप्रेरणेतून यायला हवा.
“कालाय तस्मै नमः” आजचे बदलते युग, बदल हा होणारच. तो अपेक्षितही आहे. पण यारोबरच प्रेम, जिव्हाळाही जपावा. कुटुंबातही स्वतःसाठी तर आपण जगतोच, इतरांसाठीही जगावं त्यांच्या समस्या, अडी अडचणींवर मार्ग काढावा. संवाद आपोआपच बोलका होईल. मुका तरी राहणार नाही. पशु पक्षीही आपसात बोलतात, आनंदगाणी गातात, मग आपण का नाही? बघा, विचार करा, उत्तर तुम्हांला गवसेल. कृती तुम्हांला आनंद देईल “
☆ “कृत्रिम बुद्धिमत्ता (AI): इतिहास आणि वर्तमान ” ☆ श्री जगदीश काबरे ☆
’AI मुळे मनुष्यबळ घटना असा ॲमेझॉनच्या मुख्य अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना इशारा दिलेला आहे. कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानामुळे कंपनीच्या मनुष्यबळात मोठी घट होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नवीन कृत्रिम तंत्रज्ञान शिकून घ्यावे असा इशारासुद्धा त्यांनी दिला. ’ नुकतीच ही बातमी वर्तमानपत्रात आपण वाचली असेलच. ही बातमी वाचल्यावर अनेक संगणक कर्मचाऱ्यांचे धावे दणाणले. यानिमित्ताने कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास आणि वर्तमान जाणून घेणे महत्त्वाचे आहे आणि AI नेमके कसे कार्य करते हेही समजून घेणे महत्त्वाचे आहे.
21व्या शतकाच्या सुरुवातीला तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग एवढा वाढला आहे की त्याने सर्व क्षेत्रांत क्रांती घडवून आणली आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिगत्ता (Artificial Intelligence – AI) हे सर्वात क्रांतिकारी आणि महत्त्वपूर्ण क्षेत्र ठरले आहे. यंत्राने मानवासारखा विचार करणे, शिकणे, निर्णय घेणे आणि संवाद साधणे यामध्ये आश्चर्यकारकरीत्या अचूकता व स्वायतता निर्माण झाली आहे. AI नवा दृष्टिकोन आणि तंत्रज्ञान शोधण्यासाठी कार्यरत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे अशी प्रणाली जी संगणक, रोबोट किंवा अन्य यांत्रिक प्रणालीला मानवाच्या बुद्धिमत्तेसारखे वर्तन करण्याची क्षमता देईल, यामध्ये मशीन लर्निंग (Machine Learning), डीप लर्निंग (Deep Learning), न्यूरल नेटवर्क्स, नॅचरल लैंग्वेज प्रोसेसिंग (NLP), रोबोटिक्स, आणि इतर अनेक प्रगतीशील तंत्रज्ञानांचा समावेश होतो, AI ही एक अशी प्रणाली असते जी स्वतः शिकते, समस्येचे विश्लेषण करते, निर्णय घेते आणि समस्यांचे निराकरण करते. या AI चा इतिहास खूपच रंजक आहे
अँलन ट्युरिंग यांनी AI ची सुरुवात मागच्या शतकातील 40-50 च्या दशकात केली. तेव्हा अँलन ट्युरिंग यांनी ‘यंत्र विचार करू शकते काय? ‘ असा प्रश्न विचारला होता. त्यांनी ट्युरिंग चाचणीची कल्पना माडली, जी नंतर मानवी बुद्धिमत्तेच्या मानकावर आधारित तपासणी म्हणून वापरली गेली. त्यावेळी संगणकांमध्ये न्यूरॉन नेटववर्स किंवा मोठ्या डेटा प्रोरोरिंग क्षमतेची कल्पना आली नव्हती, परंतु ट्युरिंग यांनी संगणकाद्वारे विचार शिकण्याची शक्यता मांडली होती.
1956 मध्ये जॉन मॅकार्थी, मार्विन मिनस्की आणि ॲलन नोवेल यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI’ या संकल्पनेला जन्म दिला. त्यांनी डार्टमाऊथ कार्यशाळा आयोजित केली, या कार्यशाळेमध्ये AI ला एक स्वतंत्र शाखा महणून परिभाषित करण्यात आले. येथे संगणक तज्ञांनी कल्पना केली की, संगणक मानवासारखा विचार करू शकतो. या काळात AI संशोधनाची लाट सुरू झाली आणि विविध अल्गोरिदम व प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने काम सुरू झाले,
1980 च्या दशकात संगणकीय शक्तीच्या कमतरतेमुळे आणि न्यूरल नेटवर्क्स आणि अल्गोरिदमच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असलेल्या जटिलतेमुळे AI मध्ये मंदी आली. या काळात Al शीतझोपेची संकल्पना प्रचलित झाली. जेव्हा काही मोठ्या AI प्रकल्पांमध्ये अपयश आले, तेव्हा या क्षेत्रात गुंतवणूक कमी झाली. त्याचचरोबर काही समस्यांचे निराकरण करण्यासाठी अधिक प्रमाणावर माणूस-मशीन संवादाची आवश्यकता होती.
1990 च्या दशकात AI च्या क्षेत्रात दुसरी लाट तज्ञ प्रणालीच्या उगमामुळे आली. या प्रणाली विशेष ज्ञानावर आधारित असत. त्या एका विशिष्ट क्षेत्रात तज्ज्ञांप्रमाणे निर्णय घेत होत्या. MYCIN ही एक अशी प्रणाली होती जी वैद्यकीय निदान करण्यात तज्ज्ञासारखी काम करत होती, पण त्या काळात ही प्रणाली फक्त विशिष्ट क्षेत्रातील माहितीवर आधारित होती म्हणून ती जास्त लवचिक नव्हती.
1990 च्या दशकातच मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग या नवनवीन तंत्रज्ञानामुळे AI मध्ये नवे वळण आले. या तंत्रज्ञानामुळे डेटा व अल्गोरिदमवर आधारित निर्णय घेण्याची क्षमता Al प्रणालींमध्ये वाढवली. 2012 नंतर सखोल तटस्थ नेटवर्कचा वापर वाढला आणि संगणकांनी अनुत्पादक कामे, आवाज ओळख, चेहरा ओळख, भाषांतर यांसारख्या जटील कार्याचा नवा स्तर गाठला.
Al ची मुख्य तांत्रिक पायाभूत तत्त्वे अशी आहेत…
विदा (Data): AI प्रणालींच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असलेली मुख्य गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणावर विदा उपलब्ध असणे. AI ला शिकवण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी विविध प्रकारे संकलित केलेली विदा आवश्यक आहे. Mining चे महत्व खूप वाढले आहे. यामुळे Al ला त्याच्या सर्व कार्यांमध्ये योग्य विदा मिळवणे सोपे झाले आहे.
AI चे काम सुरळीत व्हावे म्हणून सर्वात आधी आपल्याला भरपूर विदा लागते. उदाहरणार्थ, जर आपण एका संगणकाला ‘फळ ओळखा’ शिकवायचं असेल, तर आपण त्याला वेगवेगळ्या सफरचंद, केळी, संत्री यांचे फोटो (आणि योग्य लेबले–म्हणजे“हे सफरचंद आहे) दाखवतो. पण कच्च्या डेटामध्ये चुकीची, अर्धवट किंवा अचूक नसलेली माहिती असू शकते. त्यामुळे आपण ती स्वच्छ करतो. म्हणजे असे की हरवलेली माहिती भरून काढणे, चित्रांना एकाच आकारात बदलणे, किंवा आकड्यांना मानक स्वरूपात आणणे, इ. मग मशीनला योग्य माहितीवर लक्ष केंद्रित करता यावं म्हणून त्या वस्तूची वैशिष्ट्ये स्पष्ट करतो. उदाहरणार्थ, फळांच्या ओळखीकरिता रंग, आकार, वजन, पोत अशी वैशिष्ट्ये महत्त्वाची ठरतात. त्यासाठी एक निश्चित मॉडेल ठरवावे लागते. हे मॉडेल म्हणजे एक गणिती संरचना असते जी डेटा पाहून नियम (पॅटर्न) शिकते. कोणते मॉडेल वापरायचे आहे हे समस्या कशा स्वरूपाची आहे त्यावर अवलंबून असतं. हे मशीन लर्निंगमधलं “शिकवण्याचं” खरं काम आहे. मशीन आपल्याला दिलेल्या डेटावरून काय काय नियम असू शकतात ते शिकतं. उदाहरणार्थ, मशीन अनेक सफरचंदांचे फोटो पाहून शिकते की, “जर लालसर व गोलसर असेल तर बहुधा सफरचंद. ” शिकताना मशीन “पॅटर्न” शोधते आणि स्वतःच काही नियम बदलते. मग मॉडेल योग्य प्रकारे शिकले की नाही ते तपासण्यासाठी नवीन डेटा वापरून पाहते. ते अचूक अंदाज लावतं का हे पाहीले जाते. चुकीचे अंदाज लागत असतील तर पुन्हा प्रशिक्षण किंवा सुधारणा केली जाते. शेवटी हे तयार मॉडेल प्रत्यक्ष वापरासाठी दिलं जातं. उदाहरणार्थ, तुम्ही मोबाईलमधील ‘फेस अनलॉक’ वापरता तेव्हा मशीन लर्निंग मॉडेल तुमचं चेहरा ओळखतं. कारण आधी ते अशाच डेटावर शिकलेलं आहे.
गणनशक्ती (Computing Power): AI चे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया करण्याची क्षमता राखणाऱ्या मशीनवर आधारित आहे. प्रचंड डेटावर आधारित मशीन लर्निंग, डीप लर्निंगचे मॉडेल्स तयार करण्यासाठी GPU (Graphics Processing Units) आणि TPU (Tensor Processing Units) सारख्या उच्च कार्यक्षमतेच्या चिप्सचा वापर केला जातो. यामुळे शिकण्याच्या प्रक्रियेतील वेग वाढला आहे.
अल्गोरिदम (Algorithms): मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगचे कार्य खूप प्रभावी अल्गोरिदमवर आधारित आहे. बॅकप्रॉपगेशन, यादृच्छिक जंगल, सपोर्ट वेक्टर मशीन (SVM) —हा एक प्रकारचा पर्यवेक्षित शिक्षण अल्गोरिथम आहे, जो मशीन लर्निंगमध्ये वर्गीकरण सोडवण्यासाठी वापरला जातो, रीइन्फोर्समेंट लर्निंग या प्रकारच्या अल्गोरिदमने AI ची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. मशीन लर्निंग हे म्हणजे एकप्रकारे विदेपासून अनुभव घेणं आहे. माणूस जसा अनुभवातून शिकतो तसे मशीन विदा पाहून नियम शिकते, आणि नंतर त्याचा वापर करून निर्णय घेते. त्यामुळे, जितकी जास्त विदा आणि चांगली प्रणाली, तितकं मशीन लर्निंग प्रभावी ठरतं.
मानवी संशोधन व सहकार्य: मुक्त स्त्रोत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आणि विविध शास्त्रज्ञांचा सहकार्यामुळे AI मध्ये प्रगती होऊ शकली आहे. Python, TensorFlow, PyTorch सारख्या मुक्त स्त्रोत चौकटीच्या मदतीने AI शोध आणखी वेगवान झाले आहेत.
आता आपण पाहूया आधुनिक AI चा वापर कुठे आणि कसा होतो तसेच त्याचे परिणाम काय होत होतील?
भाषाविज्ञान (Natural Language Processing): भाषांतर, भाषेचे स्वरूप ओळखणे, पाठ वाचन, संवाद साधणे या सर्व कार्यासाठी AI चा वापर सुरू झाला आहे. गुगल ट्रान्सलेटर, चॅटGPT सारखे चॅटबॉट्स ही त्याची आपल्याला परिचित असलेली उदाहरणे आहेत. AI ला विविध भाषांमधील भाषांतर करण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी शिकवले गेले आहे.
दृश्य विश्लेषण (Computer Vision): चेहरा ओळखणे, वस्तू ओळखणे, दृश्य माध्यमातील विश्लेषण करण्यासाठी AI वापरला जाते. स्वयंचलित वाहने (Autonomous Vehicles), आणि चेहरा ओळख प्रणाली यासाठी AI प्रणाली उपयोगात आणल्या जातात.
आरोग्य व औद्योगिक क्षेत्र: AI च्या मदतीने आरोग्य क्षेत्रात रोग निदान, वैद्यकीय प्रतिमा विश्लेषण, टेलिमेडिसिन आणि औद्योगिक क्षेत्रात स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, उत्पादन प्रक्रियांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. भारतात ई-संजीवनीसारख्या प्लॅटफॉर्मवर AI चा वापर केला जातो.
भारत सरकारच्या ‘सगळ्यांसाठी Al’ धोरणामुळे देशात AI चा वापर विविध क्षेत्रांत होऊ लागला आहे. नीती आयोगच्या Al रोड मॅपवर आधारित कृषी तंत्रज्ञानामध्ये, शिक्षण व आरोग्य क्षेत्रांमध्ये AI च्या मदतीने प्रगती साधता येते. भारत सरकारने “भाषिनी” प्रकल्पाची घोषणा केली आहे. त्याद्वारे विविध भारतीय भाषांमध्ये AI आचारित भाषांतर केले जाईल.
असे असले तरी याचा काही लोक गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे AI ने नैतिक, कायदेशीर व सामाजिक आव्हाने निर्माण केलेली आहेत. AI मुळे काही गोष्टींचा धोका आहे. उदा. गोपनीयता, डेटा संरक्षण, विना मानवी हस्तक्षेप निर्णय घेणे. अन्यथा सामाजिक शोषण होण्याची शक्यता असते. बेरोजगारी व डिजिटल दरी (Digital Divide) वाढू शकते आणि यामुळे AI मुळे सामाजिक फटका बसू शकतो. असे असले तरी AI चा भविष्यातील वापर, कृषी, ओद्योगिक, आरोग्य व शिक्षण यांसारख्या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर होईल. तथापि, Al च्या नैतिक व सामाजिकदृष्ट्या योग्य वापरासाठी एक नियामक चौकट तयार करणे गरजेचे ठरणार आहे.
थोडक्यात काय तर कृत्रिम बुद्धिमत्ता जगभरातील विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणत आहे. भारतासारख्या विकसनशील देशात AI च्या मदतीने सामाजिक, आर्थिक प्रगती आणि जीवनमान सुधारणे शक्य होईल, मात्र, या नव-तंत्रज्ञानाचा वापर विवेक व जबाबदारीने होणे आवश्यक आहे, त्यासाठी सरकार, उद्योग आणि संशोधक या सर्वांनी एकत्र येऊन काम करणे महत्त्वाचे आहे.