आज त्रिपुरी पौर्णिमा! दसरा- दिवाळीपासून सुरू झालेल्या सर्व सणांची सांगता या त्रिपुरी पौर्णिमेने होते! त्रिपुरी पौर्णिमा आली की डोळ्यासमोर आपोआपच आठवणींचा त्रिपुर उभा राहतो!
तेलाच्या पणत्यांनी उजळलेली असंख्य दिव्यांची दीपमाळ दिसावी तसा हा आठवणींचा त्रिपुर डोळ्यासमोर येतो. लहानपणी त्रिपुर पाहायला संध्याकाळी सर्व देवळातून फिरत असू! वर्षभर उभी असलेली दगडी त्रिपुर माळ उजळून गेलेली दिसत असे.गोव्यातील तसेच कोकणातील देवळातून अशा दीपमाळा मी खूप पाहिल्या..
त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही,असा वर मागून घेतला.या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांना मुद्दाम खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना .देवांनी भगवान शंकराची प्रार्थना केली, तेव्हा शंकरांनी त्रिपुरासुराची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाऊ लागले.
या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते. तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात. एकादशी पासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. बौद्ध आणि शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.
पण….. माझ्यासाठी ही त्रिपुरी पौर्णिमा मोठी भाग्याची होती बहुतेक! कारण यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेला झाला. सासुबाई सांगत, “समोर देवळात त्रिपुर लावून आले आणि मग यांचा जन्म झाला.” त्याकाळी जन्म वेळ अगदी परफेक्ट नोंदली जाण्याची शक्यता कमी असे, पण यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी झाला एवढे मात्र खरे! त्यामुळे लग्नानंतर तारखेपेक्षा त्रिपुरी पौर्णिमेला यांचा वाढदिवस साजरा केला जाई!
सांगलीला आमच्या घरासमोर असलेल्या मारुती मंदिरात संध्याकाळी त्रिपुर लावण्यात माझे धाकटे दीर आणि मुले यांचा पुढाकार असे. आम्ही सर्वजण पणत्या, मेणबत्ती घेऊन त्रिपुर लावण्यास मदत करत असू. मंदिराचे सौंदर्य पणत्यांच्या प्रकाशाने उजळून गेलेले पाहण्यात आम्हाला खूप आनंद मिळत असे. या काळात आकाश साधारणपणे निरभ्र असे.शांत वातावरणात वाऱ्याची झुळूक आणि गारवा असला तरी पणत्या तेवण्यासाठी योग्य हवा असे. सगळीकडे निरव शांतता आणि अंधार असताना ते दिवे खूपच उजळून दिसत! अगदी बघत राहावे असे!
प्रत्येक सण आपले वैशिष्ट्य घेऊन येतो. तसा हा त्रिपुरी पौर्णिमेचा दिवस! यानंतर थंडीचे दिवस ऊबदार शालीत गुरफटून घेत डिसेंबर, जानेवारी येतात., पण बरेचसे मोठे सण संपलेले असतात. संक्रांतीचे संक्रमण सोडले तर फाल्गुनातील होळी आणि चैत्र पाडव्यापर्यंत सर्व निवांत असते.
ह्यांच्या आयुष्याचा एक एक त्रिपुर पूर्ण होत असताना मनाला खूप आनंद होतो! या त्रिपुरी पौर्णिमेच्या आनंदात आम्ही परिपूर्ण जीवन जगलो, असेच आनंदाचे, आरोग्याचे टिपूर चांदणे ह्यांना कायम मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना! जीवेत शरदः शतम्!
वाचनाची गोडी लागल्यामुळे मराठी मधील अनेक उत्तमोत्तम साहित्य वाचनात आले ह्याचा आनंद हा आहेच, परंतू वेळेअभावी म्हणा किंवा अन्य काही कारणांमुळे मराठी सोडून इतर भाषांमधील साहित्याचा फारसा आस्वाद घेता आला नाही ह्याचं शल्य अजुनही मनात हे आहेच. असो
मराठी वाचतांना ऐतिहासिक, पौराणिक कथा, कादंबऱ्या, कविता ह्यांचे वाचन झपाटल्यागत सूरु झाले आणि मग ही गोडी वाढता वाढता वाढतच गेलीं. कविता वाचत असताना काही कविता हया मनात आणि हृदयात कायमच्या विराजमान झाल्यात त्या कवितांपैकी एक कविता, “प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई”. प्रथम ही कविता माधव ज्युलियन ह्याची आहे हे कळल्यावर हे कवी महाशय आधी अमराठी असेच वाटले आणि पुढे त्यांच्याबद्दल माहिती घेतल्यावर मग माझे अज्ञान दूर झाले.
माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन ह्यांचा जन्म 21 जानेवारी बडोद्याला झाला होता. हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते. ते फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी. लिट. पदवीचे मानकरी आहेत. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी “जूलियन” असे टोपणनाव धारण केले. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते. माधव ज्युलियनांनी दित्जू, मा. जू. आणि एम्. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. त्यांनी कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. उत्कृष्ट संपादनाचा हा एक नमुना मानला जातो. पटवर्धनांचे काही लिखाण इंग्रजीतही आहे.
पटवर्धनांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखन पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे. शिक्षणानंतर इ. स. 1918 ते इ. स. 1924 या कालखंडात ते फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे फारसी भाषा शिकवत होते. त्यानंतर ते कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात फारसीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी इ. स. 1925 ते इ. स. 1939 या काळात अध्यापन केले. माधव त्र्यंबक पटवर्धनांना त्यांच्या ’छंदोरचना’ या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाने 1डिसेंबर 1938 रोजी डी. लिट्. ही सन्माननीय पदवी दिली. मुंबई विद्यापीठाने मराठी साहित्यासाठी दिलेली ही पहिली डी. लिट. होती.
29 नोव्हेंबर 1939 साली ह्यांचे निधन झाले तरीही साहित्य रूपाने ते अजूनही आपल्यात आहेतच. प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधू आई, बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी, ह्या कवितेने तर त्यांना अजरामर केले. त्यांना स्मृती दिनी विनम्र अभिवादन.
अरे किती मोठ्ठा घास घेतला आहेस. चावता तरी येतय का? तोंड बघ…… फुगलय नुसत. येवढा मोठ्ठा घास घेतात का? अस दरडावून, रागाने, किंवा प्रेमाने विचारणाऱ्यांच तोंड पाणीपुरी खाताना याच पद्धतीने भरलेल असत. पाणीपुरी खाण्याची दुसरी पद्धतच नाही.
इतर पदार्थांचा घास किती मोठा असावा हे आपण ठरवू शकतो. पण छोटा छोटा घास घेऊन पाणीपुरी खाताच येत नाही. पाणीपुरीचा घास हा फक्त आणि फक्त त्या पुरीच्या आकारावरच ठरत असतो. या पुरीच्या आकारात स्माॅल, मिडीयम, लार्ज असा प्रकार माझ्या पाहण्यात नाही.
वेगवेगळ्या चवीच चवदार पाणी एकत्र त्या पुरीत भरून जेव्हा ती तोंडात भरतो किंवा सरकवतो तेव्हा त्यातलं पाणी तोंडावाटे बाहेर पडणार नाही ना याचीच कसरत करावी लागते.
ही कसरत करुन ती पूरी तोंडात सरकवल्यावर जर आतल तिखट पाणी पटकन घशात उतरल तर मात्र काही क्षण जिवाचं पाणी पाणी होतच आणि नकळत डोळ्यांच्या कडांना देखील पाणी जमा झाल्यासारखं वाटत. कधी कधी तर नाकावाटे सुध्दा……
जळजळ हा शब्द आपण कधी कधी वापरतो. पण तो समजवून सांगायचा असेल तर….. पाणीपुरी तोंडात सरकवल्यावर ती खातांना नकळत आणि पटकन जे तिखट पाणी घशातून छातीपर्यंत गेल्यावर जी जाणीव होते ती जळजळ. आणि ही तात्पुरती असली तरी पाणीपुरी खाताना व्यवस्थित जाणवते.
या पुरीला नाजूकपणे व हळूवार हाताळाव लागत. नाहीतर आपला जबडा उघडण्या अगोदरच ती तिचा जबडा उघडते आणि त्यातल्या पाण्याने बोटं चिकट होतात. त्यामुळे तिने तिचा जबडा उघडण्याअगोदर आपला जबडा उघडा करून ती त्यात ढकलण्याची काळजी घ्यावी लागते.
पाणीपुरी मधल पाणी कमी वाटत कि काय, त्यात अजून उकडून बारीक केलेला बटाटा आणि उकडून किंवा भिजवून ठेवलेले हरभरे घालून परीक्षा थोडी कठीण करतात.
पाणीपुरी ही तोंडात भरावी, सरकवावी, किंवा ढकलावीच लागते. या पध्दतीने खाल्ली तरच तिला न्याय दिल्यासारख होत. नाहीतर तिच्यावर झालेला अन्याय ती पाणी अंगावर किंवा प्लेटमध्ये काढून व्यक्त करते.
ही तोंडात भरण्याची सुध्दा एक खास पध्दत आहे. दोन बोट आणि अंगठा यात तिला धरून तोंडाचा जबडा उघडा करून तोंडाजवळ आणली की लगेच वेळ न घालवता तर्जनीने तोंडात सरकवतात.
यावेळी मला सहज शेव, चकली, कुरडइ यांच ओल पिठ, किंवा चिक त्या मोकळ्या साच्यात भरतात त्याची आठवण होते.
पाणीपुरी खायला वेळेच बंधन नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र. जेवणाअगोदर किंवा नंतर अशी कोणतीही वेळ त्यासाठी योग्य असते. पण ठिकाण मात्र बऱ्याचदा बाग, मैदान, तलाव याच्या जवळ आणि जवळजवळ रस्त्यावरच असत. बंद वातावरणात मजा नाही. आता घरातल्या सगळ्यांना घरातच करतो तेव्हा पर्याय नाही. पण शक्यतो उघड्यावर खाण्यातच मजा येते.
पाणीपुरी साधारण एकाचवेळी बऱ्याच जणांना एक एक करून दिली जाते. त्यामुळे पहिली तोंडात सरकवल्यावर दुसरीचा नंबर लागेपर्यंत पहिली संपवावीच लागते.
पाणीपुरी हा काही जणांचा विकपाॅइंट असतो. तर विकली कुठल्या कुठल्या पाॅइंटवर पाणीपुरी खायची हे काही जणांच ठरलेल असत. तरीसुद्धा गावात पाणीपुरी कुठे चांगली मिळते याची माहिती घेण्याचा प्रयत्न असतोच. आणि तिथे भेट देणं गरजेचं वाटतं.
बरेच पदार्थ हे हातगाडीवर उभ्या उभ्या खाल्ले जात असले तरी एक दोन बाक त्या गाडीजवळ बसण्यासाठी असतात. पण पाणीपुरीच्या गाडी जवळ असे बाक क्वचित दिसतात. त्यामुळे स्टॅंडींग ओवेशन देउन खायचा मान पाणीपुरीला आहे.
☆ ☘️ ही तर निसर्ग पूजा 🌿 ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)☆
विविध रंगांच्या आतषबाजीने, रंगलेली, प्रकाशलेली दीपावली हा प्रकाशाचा सण संपत आलेला. आता त्याची गडबड संपलेली. तिखट गोड पदार्थांची सुस्ती जाणवते. आज दुपारीच मी तुळशी वृंदावन साफसूफ करून थोडं पाणी घातलं आणि वृंदावनही रंगून ठेवलं.तसं तर वसुबारसे पासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दिवाळी असते.या दीपोत्सवाची तेव्हाच सांगता होते . कार्तिक शुद्ध एकादशी पासून तुलसी विवाह सुरू होतात ते पौर्णिमेपर्यंत. त्यानंतर लग्नाचे मुहूर्त असतात .आधी देवाचं लग्न त्यासाठी तर वृंदावन छान रंगवलं.ऊसाचे खांब करुन,मांडव सजवायचा आणि छान आरास करायची .तोरण बांधायचं. देव्हाऱ्यातला बाळकृष्ण वृंदावनात तुळशीजवळ ठेवायचा. तुळशीची , बाळ कृष्णाची पूजा करायची पण त्याआधी सुपारीच्या गणपतीच प्रथम पूजन!
तुळशीला, बाळ कृष्णाला नवीन वस्त्र वस्त्र घालायची तुळशीच्या हातात म्हणजे फांद्यांना हिरव्यागार बांगड्या घालायच्या. मंगलाष्टक म्हणून अक्षदा वहायच्या की झालं तुळशीचं लग्न. मग फटाके उडवायचे वाजंत्री म्हणून. मणी मंगळसूत्र तुळशीला वहायच.म्हणजे फांदीवर अडकवायचे.फणी करंडा, आरसा ,खण पुढे ठेवायचा.तुळशीची ओटी भरायची.आरती करायची.मनोभावे नमस्कार करायचा.असा हा विवाह सोहळा म्हणजे आनंदोत्सवच! जणू घरच्या लेकीचा विवाहसोहळा.
आमच्या लहानपणी तुळशीचं लग्न लावायला भटजी यायचे. दादा म्हणजे माझे वडील रेशमी कद नेसून तर आई रेशमी जरीची साडी दागिने घालून नटायची .जणू त्यांच्याच लेकीचं लग्न आणि करवली म्हणजे मी नटून थटून तबकात तेवत्या निरांजनांचा. करादिवा घेऊन वृंदावनाच्या मागे उभी राहायची. भटजी अंतर पाठ धरायचे अन मंगलाष्टक म्हणायचे .आईची नैवेद्याची धांदल ,भावंड नव्या कपड्यात ,झाडं-चक्र,अशा आतषबाजीच्या तयारीत असायची.
शेजारचे सगळे यायचे ते व-हाडी म्हणूनच. धुमधडाक्यात, फटाक्यांच्या आवाजात तुलसी विवाह व्हायचा. बायकांना हळदी कुंकू द्यायचे .सर्वांना साखर खोबऱ्याचा, पेढ्याचा प्रसाद वाटायचा. पान सुपारी द्यायची. ते दिवस वेगळेच होते.
लग्नानंतर आम्ही दारातल्या तुळशीचं लग्न कधी चुकवलं नाही ,घरच्या घरी लग्न लावायचो.आमची लेक करवली व्हायची .हा दिवस साधून सगळ्यांना फराळाचं आमंत्रण करायचो.
आता काळ काम वेगाच्या चक्रात सगळ्यांना हे एवढं जमतच असं नाही हे मात्र खर आहे.
आपले सगळे सण उत्सव धार्मिक असले तरी शास्त्रीय तत्वावर आधारलेले असतात .ओटी भरायची तुळशीची तीही चिंचा, आवळे ,बोरं अशा मोसमी फळांनी. आता तुळशीच पहा, पानं , खोड ,मंजि-या या सगळ्यांचे आयुर्वेदात औषधी गुणधर्म आहेत.या विवाह सोहळ्यामुळे आपण तुळशीजवळ किती वेळ बसतो मनांपासून सगळी पूजा करतो . ही मनाची प्रसन्नता आपल्या आरोग्याला पोषकच आहे.
विवाह सोहळा संपन्न झाला आणि नातवंडांनी फटाक्यांची माळ लावली.
खरंच दिव्यांच्या रोषणाईत उसाच्या मांडवात विवाह वेदीवरील अंगभर मंजिऱ्यांनी डवरलेली तुळस कशी साजरी दिसत होती. अगदी नव्या नवरी सारखी..! हळदी कुंकू आणि नंतर प्रसाद वाटप झालं.बाळकृष्ण- तुळशीला नमस्कार करताना नकळत डोळे ओलावले. आज केवळ वेळ नसला तरी कुंडीतल्या तुळशीजवळ देव्हाऱ्यातला बाळकृष्ण ठेवून नुसतं हळदीकुंकू वहावं.अक्षता टाकाव्यात. सौभाग्याचं म्हणजे केवळ सुवासिनीचंच असं नाही संपन्नतेच भाग्याचं दान मागाव. श्रद्धेन एवढं जरी केलं तरी ही हरिप्रिया नक्कीच प्रसन्न होईल आरोग्याचं वरदानही देईल.
निवृत्त उपप्राचार्य, निवृत्त असोसिएट प्रोफेसर,इंग्रजी विभाग ,मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली.
एम्.फील साठी यु.जी.सी. ची संशोधन शिष्यवृत्ती.
संशोधक व विद्यार्थी उपयुक्त पुस्तके:
A comparative study of Robert ब्राउनिंग and Diwakar
Literary perceptions
संपादन:
गोपुर दिवाळी अंक 1980
झेप- गौरवग्रंथ 2003
संवेदना – अनाथ मुलांमुलींवरील
कथासंग्रह 1984
लेखमालिका :
भारतीय स्वातंत्र्य वीरांनी तुरुंगातून लिहीलेली पत्रे
प्रेरणादायी पुस्तके
वृत्तपत्रे, मासिके यांतून नियमित लेखन-कथा, कविता, पुस्तक परिचय इत्यादी.
विद्यापीठ अनुदान मंडळ संमत दोन संशोधन प्रकल्प पूर्ण.
विविध संशोधन नियतकालिकांतून संशोधन निबंध प्रकाशित.
विविधा
☆ राॅबर्ट फ्राॅस्ट यांच्या कवितेचे शताब्दी वर्ष -२०२२ ☆ श्री सुबोध अनंत जोशी ☆
Stopping by Woods on a Snowy Evening. (1922.)
राॅबर्ट फ्राॅस्ट यांच्या कवितेचे शताब्दी वर्ष -२०२२.-त्या निमित्त:
रॉबर्ट फ्रॉस्ट(१८७४-१९६३) हा अमेरिकन कवी,परंतु त्यांच्या कविता प्रथम इंग्लंडमध्ये प्रकाशित झाल्या. निसर्ग वर्णन,अमेरिकन बोलीभाषेचा वापर, ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांचे चित्र ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. ज्यावेळी औद्योगीकरणाला सुरुवात झाली होती, त्याचवेळी रॉबर्ट फ्राॅस्ट लिहीत होते. तरी देखील औद्योगिक शहराबद्दल, आयुष्याबद्दल त्यांनी फारसं लिहीलं नाही. त्यांच्या बऱ्याच कविता स्मरणरंजन विषयक(sweet nostalgia) आहेत.The Road not taken,Birches,Mending Wall, Nothing Gold can Stay, Stopping by Woods on a Snowy Evening या त्यांच्या लोकप्रिय कविता होत.New Hampshire या काव्यसंग्रहासाठी त्यांना पुलिट्झर प्राईझ मिळाले होते.
Stopping by Woods on a Snowy Evening ही चार कडव्याची चिमुकली कविता आहे.या कवितेचे अनेक अर्थ, अन्वयार्थ काव्य समीक्षकांनी सांगितले आहेत आणि ते साहजिक आहे .कारण एखाद्या सर्वोत्कृष्ट ठरलेल्या कवितेची चिकित्सा अनेक जण अनेक प्रकाराने करतात. खरे तर, प्रत्येकाने स्वतंत्र बुद्धीने स्वतंत्र दृष्टीने ही कविता समजून घ्यावी.
ही एक साधीसुधी भावकविता आहे. निवेदक आपला एक छोटा अनुभव सांगतो आहे. तो घोडागाडीतून जंगलातून जात आहे आणि त्याला पहिला प्रश्न पडतो” हे कोणाच्या मालकीचे जंगल आहे ? ” त्या जंगलाचा मालक निवेदकाच्या परिचयाचा असावा.म्हणून तो सांगतो की त्या मालकाचे घर गावात आहे आणि तो इथे थांबला आहे हे त्या मालकाला माहीत होणार नाही. पुढच्या ओळीत निवेदक सांगतो की ते जंगल बर्फाने भरून जात आहे आणि ते बर्फाळलेले जंगल पाहण्यासाठीच कवीला तेथे थांबावे असे वाटत आहे.इथे सृष्टिसौंदर्य एवढे मंत्रमुग्ध करणारे आहे की थोडा वेळ तरी तेथे थांबून ते सौंदर्य न्याहाळावेसे कवीला वाटते.
दुसऱ्या कडव्यात आपण थांबल्याबद्दल आपल्या घोड्याला काय वाटलं असेल याची तो कल्पना करतो.(निवेदक घोडागाडीतून प्रवास करत आहे.) कोणतेही शेतघर जवळ नाही. असं असलं तरी गोठून गेलेलं तळं आणि जंगल यामध्ये आपण त्या अंधारलेल्या संध्याकाळी थांबलोय हे त्या घोड्याला चमत्कारीक वाटत असणार अशी तो कल्पना करतो.खरे तर हे सर्व कवीच्या मनातलेच विचार आहेत.घोड्याच्या माध्यमातून तो आपल्या भावना वाचकांपर्यंत पोचवितो.
तिसऱ्या कडव्यात निवेदक सांगतो की घोडा मान हलवतो आणि तिथे लावलेल्या घंटीची किणकिण होते.निवेदकाची कल्पना अशी की मान हलवून घोडा विचारतो आहे की तिथे अवेळी, संध्याकाळी जंगलाजवळच्या वाटेवर थांबणं चुकीचं तर नाही ना? या ध्वनीव्यतिरिक्त दुसरा ध्वनी तेथे उमटत असतो तो म्हणजे वाऱ्याच्या झोताचा आणि बर्फवृष्टीचा. कवीची अशी ही दोन मने आहेत. एक मन त्याला तिथे थांबायला सांगते, तिथल्या सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घ्यायला सांगते आणि दुसरे मन हे घोड्याच्या मनात काय चालले आहे अशी कल्पना करून त्याचे मन त्याला तिथे न थांबण्याचा सल्ला देत असते. त्याच्या मनाची स्थिती काहीशी अशी द्विधा झालेली आहे.परतु अशी दोलायमान अवस्था फार वेळ राहणे शक्य नसते. नंतरच्या, चौथ्या आणि शेवटच्या कडव्यात कवी ठामपणे सांगतो की जंगल सुंदर, घनदाट,अंधारं आहे, परंतु मला मी दिलेल्या वचनांची पूर्तता करायची आहे.झोपण्यापूर्वी कितीतरी अंतर मला पार करायचे आहे.
The woods are lovely,dark and deep
But I have promises to keep
And miles to go before I sleep
And miles to go before I sleep.
तिथे न थांबता पुढे जाण्याचा आणि आपल्या इप्सितस्थळी जाण्याचा निर्धार कवीने व्यक्त केला आहे आणि तोच त्याचा अंतिम निर्णय आहे असे त्यानं केलेल्या पुनरूक्तीवरून स्पष्ट होते.
But I have promises to keep ही ओळ समुद्रात अचानक एखादी मोठी लाट उचंबळून यावी तशी येते आणि या ओळीपासून मूड बदलतो. आता ही निसर्गकविता रहात नाही. ही एकच ओळ अशी आहे की त्यात शंभर टक्के भौतिक, व्यवहारिक गरजेची निकड स्पष्ट केली आहे.बाकीचे शब्द आणि शब्दप्रयोग प्रतिमांच्या रूपात वापरलेले आहेत.Promises to keep हा खूप अर्थघन शब्दप्रयोग आहे.व्यवहारी जगात माणूस वचनबद्ध असतो. कुटुंब,समाज,देश अशा अनेक घटकांशी आपली बांधिलकी असते.कौटुंबिक, सामाजिक,कायदेशीर, नैतिक अशा कित्येक नियमांचे पालन आपल्याला करावे लागते.ही वचनबद्धता आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असते.त्यासाठी खूप कांहीं करावे लागते.खूप संघर्ष करावा लागतो.विसावा घ्यायचा तो नंतरच.किंबहुना,आपला मृत्यू ही झोप असे मानले तर मृत्यूपूर्वी आपली कर्तव्ये पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे.”कर्मण्येवाधिकारस्ते” हाच तो संदेश आहे आणि या संदेशामुळेच या चार ओळी जगप्रसिद्ध झाल्या आहेत . यशस्वी आयुष्याचे सूत्र या ओळीमध्ये आहे. कवितेचा हा ध्वन्यार्थ आपल्या मनावर गारुड करतो. वाच्यार्थ एवढाच होता की सुंदर जंगल पहात थांबावं वाटतं पण तसं केलं तर झोपण्यापूर्वी आपल्याला आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचता येणार नाही.वाच्यार्थापेक्षा ध्वन्यार्थातला उदात्त संदेश आपल्या मनाला खूप भावतो.
या संदेशामुळेच ही कविता कित्येक वर्षे शालेय विद्यार्थ्यांपासून जगप्रसिद्ध व्यक्तीपर्यंत सर्व थरातील वाचकांना आवडत आली आहे. निसर्ग कविता म्हणून या कवितेकडे पाहता येते.निसर्गातील सौंदर्य woods, snow अशा प्रतीकातून, तर भयाची जाणीव dark, deep अशा प्रतीकात्मक शब्दातून कवी व्यक्त करतो.निसर्गातले सौंदर्य आणि त्याला जोडून येणारी किंचित् भयाची जाणीव यामधून अचानक उसळी घेते स्वकर्तव्याची जाणीव.यामुळेच And miles to go before I sleep या ओळीबरोबर ही कविता फक्त निसर्ग कविता रहात नाही. प्रौढ वाचक या कवितेतील संदेश आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करतात. कर्तव्यपूर्ती हे लक्ष्य असणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या भारतीय नेत्याला हा संदेश मृत्यूपूर्वी आपल्या टेबलावरील कागदावर लिहून ठेवावा असे वाटणे साहजिकच आहे.
एक रचना (structure) म्हणून देखील या कवितेचा अभ्यास करता येईल. Mcleish या समीक्षकाने कवितेने कांहीही सांगू नये, ती एक रचना असावी,असे म्हटले आहे.(A poem should not mean but be) एक रचना म्हणून या कवितेचा असल्यास केला तर असे दिसेल की या कवितेत रुबायतचा Stanza form आणि डॅन्टे या इटालियन कवीच्या कवितेतील terza Rima वापरून नाविन्यपूर्ण काव्यरचना केली आहे.
कवितेत निवेदक स्वतःशीच बोलतो आहे म्हणजे एक प्रकारे हे स्वगतच आहे आणि ते स्वगत कुजबूज या स्वरूपातले. त्यामुळेच त्याचे शब्द संभाषणात्मक आहेत. सॅम्युअल कोलरीजने कवितेची व्याख्या A lyrical, linguistic shorthand अशी केली आहे.ही कविता तशीच आहे.भावमधुर आणि अल्पाक्षरी.काहींच्या मते ही संपूर्ण कविता म्हणजे जीवनमृत्यूचे रूपक आहे . बर्फाने भरलेले जंगल म्हणजेच मृत्यू आणि घोडा गाडी म्हणजे आयुष्य अशी कल्पना केली आहे.कवितेतील प्रेरणादायी संदेश मनाला सर्वात जास्त भावतो. यामुळेच काव्य म्हणजे जीवनाचे भाष्य(Poetry is the criticism of life) ही मॅथ्यू अर्नोल्ड यांनी केलेली काव्याची व्याख्या या कवितेला चपखलपणे लागू पडते.
१९२२ या वर्षी राॅबर्ट फ्राॅस्ट यांनी लिहिलेल्या, Stopping by Woods on a Snowy Evening या कवितेला २०२२ साली शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत.एवढे मार्गक्रमण करूनही ही चिमुकली कविता काव्यरसिकांच्या मनात घर करून राहिली आहे.जीवनाचे सूत्र सांगणा-या अशा कविता स्थलकालातीत असतात हे खरे!
ले. सुबोध अनंत जोशी
सांगली
मो 9423661068.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ गणितातील एका संकल्पनेची गोष्ट ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆
आज अक्षय जरा लवकरच उठला आपला आपला, कांही रागावून न घेता ब्रश करून दूध घेऊन, अंघोळीला गेला, ते सुद्धा टॉवेल घेऊन! भराभर आवरून शाळेसाठी तयार!
“अरे, विक्रम! जरा खिडकी उघडतोस का?”
“कां गं?”
“सूर्य कुणीकडे उगवलाय बघते.”
“तुझं बाळ आता शहाणं, मोठ्ठ झालंय”
“हो का? मग दृष्टच काढायला हवी!”
“अगं पण काही कारण कळलं का? अक्षय! आज शाळा लवकर आहे का?”
“नाही.”
” मग इतक्या लवकर आवरलंस!”
” बाबा, आज विसापुरे सरांचा तास आहे. आणि पहिलाच आहे. त्यामुळं अजिबात उशीर करून चालणार नाही. प्रार्थनेच्या आधी पोचायला पाहिजे नाहीतर मागं बसावं लागतं.”
“तुला तर आवडतं की मागं बसायला.”
“बाबा, तो नावडता तास असेल तर! विसापूरे सर गणित शिकवतात ते ही गोष्टीतून! छान छान गोष्टी सांगतात. जाम एक्साईट झालोय, आज कुठली गोष्ट ऐकायला मिळणार म्हणून! बाबा, तुम्हाला माहित आहे? ते म्हणतात, तुम्ही शास्त्र विषयाला घाबरत नाही पण तुम्हाला गणित म्हटलं की भिती वाटते. पण या विषयाला आपण गणित का म्हणायचं? ते तर फक्त संख्याशास्त्र आहे. त्यामुळं माझ्या तासाला गणिताचा न म्हणता संख्याशास्त्राचा म्हणायचं.”
“बरं, बरं पुरे. चल मग तुला 5 मिनिटे लवकरच सोडतो.”
अक्षा, मक्या आणि पिट्या हे त्रिकुट आज लवकर येऊन पहिल्या बाकावर बसलं सुद्धा!विसापूरे सर तासावर आले आणि एकच गलका सुरू झाला. ‘सर, गोष्ट!सर, गोष्ट!—
सर म्हणाले,” आज आधी एक हुमान घालणार आहे, हुमान म्हणजे कोडं! ‘ओघराळ्याखाली अडकले बाई, हात पाय किती मारले, बाहेर यायला मार्गच नाही, ओघराळ्याखाली अडकले बाई, हात पाय किती मारले, बाहेर यायला मार्गच नाही’, सांगा कोण?”
सगळी एकमेकांकडे बघायला लागली, कुणालाच कळेना.
सर म्हणाले,”ओघराळं माहीत आहे कां? माठातून, समोर बसलेल्या नव्हे हं! डेऱ्यातून पाणी काढण्यासाठी वापरायची पळी म्हणा हवंतर. तीचा आकार कसा, मध्ये एक दांडी, तिच्या एका टोकाला पाणी भरून घ्यायची वाटी आणि दुसऱ्या टोकाला आडवा दांडा, हातात धरायचा.”
दोन चार मुलं म्हणाली, माहीत आहे म्हणून, पण ते विसापुरे सर होते. प्रत्यक्ष ओघराळं घेऊन आले होते, मुलांना दाखवायला. सर म्हणाले,” आता मला सांगा, अशी कुठली संख्या आहे? तिला काय नाव आहे?”
मुलं डोकं खाजवायला लागली तेवढ्यात मकरंद उठला.” डोक्यावर ओघराळं असणारी संख्या म्हणजे वर्गमुळातली संख्या असणार.”
“बरोबर”
अक्षय उठला,” तिला बाहेर पडायला मार्ग नाही, म्हणजे तिचं वर्गमूळ निघत नाही.”
“बरोबर”
“पण सर अशा पुष्कळ संख्या आहेत. 2,3,5,6,7 सारख्या!” पिट्या म्हणाला.
सरांनी त्या सगळ्या संख्या ओघराळ्यासह फळ्यावर लिहिल्या.म्हणाले,” तुम्हाला भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढता येतं. अशी कुठलीही एक संख्या घेऊन तिचं वर्गमूळ काढा बघू. पण एका बाकावरच्या तिघांनी वेगवेगळ्या संख्या घ्यायच्या.”
थोड्या वेळाने मुलांची कुजबुज सुरू झाली. पान भरलं तरी उत्तर निघत नाही. शेवटी राधा उठली, ” सर, किती दशांश स्थळापर्यंत उत्तर काढायचं?”
“वर्गमूळ निघेपर्यंत!”
” निघणार नाही, सर. कारण भागाकार संपत नाही आणि आवर्ती पण येत नाही.”
एक वल्ली उठलाच,” सर माझं निघालं.”
“किती आलं?”
“सहा”
“संख्या किती घेतली होतीस?”
“36”
“ज्याचं वर्गमूळ अवयव पाडून निघत नाही किंवा ज्या मूळ संख्या आहेत, अशा घ्यायच्या.”
सगळी मुलं रडत सर, एक पान भरलं, कुणी सर, दोन पानं भरली. संपतच नाही.
“थांबा, मग!”फळ्यावर लिहीत लिहीत सर मुलांना सांगू लागले. “ज्या संख्या आपण दशांशात किंवा आवर्ती दशांशात लिहू शकतो, म्हणजेच अ/ब या रुपात लिहू शकतो, त्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. ज्या परिमेय नाहीत त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात.आणि परिमेय संख्येच्या अपरिमेय वर्गमुळाला करणी संख्या म्हणतात. या ओघराळ्यात अडकलेल्या संख्या म्हणजे सगळ्या करणी संख्या. ह्या करणी नावाची एक गंमतशीर गोष्ट आहे. फळ्यावरच्या महत्वाच्या गोष्टी लिहून घ्या मग गोष्ट सुरू करूया.
सरांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली.” भारतीय गणितज्ञ हे सगळ्या जगाच्या पुढे होते. इसविसन पूर्व म्हणजे पायथागोरस च्या कितीतरी आधी ‘सुलभ सूत्र नावाचा ( म्हणजे ज्याला आपण पायथगोरस चा सिद्धांत म्हणतो) सिद्धांत होता. काटकोन त्रिकोणाच्या दोन्ही बाजूच्या वर्गांची बेरीज करून त्याचे वर्गमूळ काढले की कर्णाची लांबी येते. पण बऱ्याच वेळा कर्णाचे वर्गमूळ निघत नाही त्यामुळे कर्णाची अचूक लांबी काढता येत नाही. त्यामुळे कर्णाचे दोन प्रकार पडले, वर्गमूळ निघणारा सुकर्ण आणि न निघणारा अकर्ण. ह्या अकर्णाच्या उत्तराचं नाव झालं करणी संख्या.
भारतात इसविसन पूर्व काळात दोन मोठी विद्यापीठे होती. सगळ्यात जुनं तक्षशिला आणि त्यानंतरचं नालंदा. या विद्यापीठात प्रचंड मोठी वाचनालये होती. त्या काळात छपाईचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळं निरनिराळ्या विषयावरची लाखो पुस्तकं हाताने लिहिलेली होती. या अफाट ज्ञानाची किंमत माहीत नसणाऱ्या माणसांनी हल्ला करून नालंदा नगर काबीज केलं आणि विद्यापीठाला आग लावली. असं म्हणतात की इतक्या चांगल्या प्रकारे जपलेली ती पुस्तकं महिनोनमहिने जळत होती. अरे! हे जाऊ दे!आपलं विषयांतर व्हायला लागलं आहे.”
“नाही सर सांगा की!”मुलं मागं लागली.
” अरे, आपली करणीची गोष्ट पुरी करूया. विद्यापिठाच्या गोष्टी फार मोठ्या आहेत. त्याला स्वतंत्र तास लागेल. ऑफ पिरियड असला की मला बोलवा, तेंव्हा सांगतो.
तर आपण करणी संख्या या नावाची गम्मत बघत होतो. तर भारतात आसपासच्या देशातून शिकण्यासाठी मुलं येत असत. असाच एक अलख्वारिझमी नावाचा पर्शियन खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होता. तो बगदाद च्या सर्वात मोठ्या लायब्ररीचा प्रमुख होता. तो साधारण नवव्या शतकात भारतात आला. त्याला माहित नसलेल्या गोष्टी शिकून, कांही पुस्तकं मिळवून परत गेला. तो आपल्या १ ते ९ व शून्य या संख्यांच्या शोधामुळे प्रभावित झाला होता. त्यानं Hindu- Arabic Numeral system नावाचं पुस्तक अरेबिक मध्ये लिहिलं. नंतर त्याचं लॅटिन, इंग्लिश व युरोपियन भाषांत भाषांतर झालं.संस्कृत चं अरेबिक मध्ये भाषांतर करताना कर्ण म्हणजे कान हा अर्थ घेतल्यामुळे अकर्ण म्हणजे कान नसलेला म्हणून असम हा शब्द आला.लॅटिन मध्ये त्याच अर्थाचा सर्ड्स हा शब्द आला आणि इंग्रजीत सर्ड ! म्हणजे जसं कानगोष्टी खेळताना मूळ शब्द बाजूलाच राहतो आणि नवीन निर्माण होतो तसं करणी संख्या या नावाचा मूळ अर्थ बाजूलाच राहिला आणि अर्थाशी कांहीही संबंध नसलेले शब्द तयार झाले.
आपल्याकडे आजकाल ” सगळे शोध आपणच लावले आहेत असं म्हणायची फॅशन झाली आहे” हे वाक्य ऐकायला मिळतं. पण अशी एखादी गोष्ट ऐकली की मग पटतं, की आपला अभिमान निरर्थक नाही. नाहीतर सगळ्या भाषांमध्ये असा असंबद्ध शब्द कां तयार झाला असता? आपल्या शास्त्रज्ञांनी एक चूक केली की कोणत्याही सिद्धांताला संशोधकाचं नाव दिलं नाही,कोणतही चांगलं, बुद्धीचं काम हे आपल्या हातून दैवी शक्ती घडवून आणते, त्यात आपलं कर्तुत्व काही नसतं, असं मानण्याची आपल्याकडे परंपराच आहे. आपण तर वेद ही अपौरुषेय मानतो, म्हणजे कोणत्यातरी अज्ञात शक्ती कडून त्यांची निर्मिती झाली आहे. नाहीतर वेदांवर सुध्दा ऋषींना हक्क सांगता आला असता. चला, तास संपल्याची घंटा झाली.”
सरांचा तास संपला पण अक्षय च्या डोक्यातून ती अडकलेली बया जाईल तर नां! घरी गेल्या गेल्या आज त्याला खायला नको होतं, खेळायला नको होतं. हातात वही पेन घेऊन बसला आणि लिहायला सुरुवात झाली. आईनं किती विचारलं, पण “थांब गं, नंतर सगळं सांगतो.” तासाभरानंतर एक कविता लिहून दाखवायला आईकडे आला. विसापुरे सरांच्या तासाला काय झालं ते सगळं इत्यंभूत सांगितलं आणि मग आईला कविता दाखवली.आई गहिवरली, मनोमन असेच शिक्षक त्याला आयुष्यभर लाभू देत अशी देवाकडे प्रार्थना केली आणि आपल्या डोळ्यातल्या काजळाचे बोट त्याच्या गालावर टेकवायला विसरली नाही. अक्षय बिचारा भांबावून आईकडे बघतच राहिला.
त्याची कविता तर तुम्हाला वाचायला आवडेल नं!
मी कोण समजायला सोपं आहे
नका करू कुणाची मनधरणी
एक पानावर ज्या गणिताचे उत्तर
मावत नाही ती नां मी ‘करणी’
हे नाव कसं, कुठून, कधी आलं
कथा आहे रंजक, ऐका पूर्ण
पायथागोरसच्या आधी आपल्या
गणितात होता सुकर्ण,अकर्ण
सुकर्णाचे निघत होते वर्गमूळ
अकर्णाचे मात्र बाकीत उरले
पण कर्णाचा दुसरा अर्थ कान
घोळ घालायला निमित्त पुरले
अलख्वारिझमीने केलं मला असम अन् झाले बहिरी अरेबिकमध्ये
लॅटिनमध्ये झाले सर्ड्स – बधिर, अन् मूक- सर्ड इंग्रजीमध्ये
आपण सध्या पाहतच आहोत की रस्त्यावर रहदारी प्रचंड वाढली आहे. मुळात रस्ते जसे आणि जेवढे आहेत तेवढेच आहेत. मात्र वाहनांची संख्या मात्र भरमसाठ वाढतच आहे. त्यामुळे अपघातांचा आलेख चढत्या दिशेने नोंदवला जात आहे..
कदाचित जेवढे लोक एखादया देशात युद्धात मरण पावत असतील त्यापेक्षा जास्त आपल्या देशात रस्ते अपघातात मरण पावतात. अपघातात अंशतः किंवा पूर्णतः अपंगत्व येणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. त्यामुळे अशा कुटुंबांवर फार मोठा आघात होतो.
एका वृत्तपत्रातील बातमीनुसार गेल्या वर्षभरात आपल्या देशात रस्ते अपघातामुळे 1,68,491 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
रस्ते अपघातांच्या कारणांमध्ये खूप विविधता आहे. पण मुख्य कारण अतिशय वेगाने व बेदरकार गाडी चालविणे यामुळे जास्तीत जास्त अपघात होत असतात. चुकीच्या दिशेने गाडी चालवल्यामुळे, मद्यपान करून गाडी चालवल्यामुळे, गाडी चालविताना मोबाईल फोनचा वापर केल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते. काहीजण अचानक मुख्य रस्त्यावर येतात. वाहन वळवताना हाताने इशारा न करणे किंवा इंडिकेटरचा वापर न करणे,रस्त्यात वाहतुकीस अडथळा होईल अशी गाडी उभी करून ठेवणे वा गप्पा मारत उभे राहणे.
रात्री गाडी चालवताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे मोठ्या गाड्यांचे लाईट्स. एकतर आता नवीन गाड्यांना एल.ई.डी. लॅम्प आहेत. त्यात बऱ्याच वाहन चालकांकडून अप्पर आणि डिपर लाईटचा योग्य पद्धतीने वापर केला जात नाही.
आणि तीव्र प्रकाशझोत वाहन चालकाच्या डोळ्यावर पडून अपघात घडतात.
खरंतर अलीकडील काळात वाहतूकीचे नियम अधिक कडक करण्यात आलेआहेत. दंडाच्या रकमेत व शिक्षेच्या तरतुदीत वाढ करण्यात आली आहे. मात्र अनेक पालक आपल्या अल्पवयीन पाल्यास गाडी चालवायला देतात. (काही हौस म्हणून, मोठेपणा मिरवण्यासाठी, तर काही गरज म्हणून) तेही अतिशय धोकादायक आहे.
अशी बरीच कारणे या अपघात आणि त्यातून घडणारे मृत्यू किंवा अपंगत्व यामागे आहेत.
रस्त्यावरून जात असताना आपणच निरीक्षण केले तर आपणाला असे दिसून येईल की, बरेच टु व्हिलर वा फोर व्हीलर मधील गाडी चालवणारी मंडळी सर्रास व सराईत पणे मोबाईल वर बोलत गाडी ड्राईव्ह करत असतात. काही तर असे महामानव आपणाला पहायला मिळतात की, जे मोबाईल वर टाईप करत करत चॅटिंग करत करत गाडी चालवतात. कळत नसेल का हो यांना? कळतंय पण वळत नाही. गांभीर्य नाही.
त्यात भरीस भर म्हणून आता सध्या साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे तर रहदारी मध्ये प्रचंड वाढ तर झाली आहेच पण या ऊसाच्या गाड्यांमुळे रस्ताच आक्रसून गेला आहे. त्यातही आपणाला व्हरायटी पाहायला मिळते. काही गाडीवान अगदी व्यवस्थित शिस्तबद्ध गाडी चालवताना दिसतात. तर काही ऊस ओव्हरलोड घेऊन जाताना दिसतात, तर काही ऊस खच्चून भरुनही अतिशय वेगाने वाकडी तिकडी गाडी चालवत जाताना दिसतात. काही एवढा प्रचंड ऊस घेऊन जात असूनही दुसऱ्या ट्रॅक्टर ला ओव्हरटेक करताना दिसतात.
त्यामुळे शक्य असल्यासच आपण जरा सावकाशीने यांना ओव्हरटेक करायला हवे अन्यथा सुरक्षित अंतर ठेवून मार्गक्रमण केलेले बरे. नाही का?
मुळात या लेखाचा उद्देश तुम्हा मंडळींना घाबरवण्याचा नाही. तर आपण सर्वच जण सजगतेने आणि सुरक्षिततेने रस्त्यावर प्रवास करूया. तुमच्या कुटुंबीयांसाठी तर तुम्ही मौल्यवान आहातच तसेच भारतवर्षासाठीही तुम्ही मौल्यवान आहात.
या वाक्यात आता नवीन काही नाही. निर्णय काय घ्यावा? हो… कि नाही… किंवा समोर असलेल्या पर्यायांपैकी कोणता चांगला. आणि कोणता निवडावा. असा प्रश्न पडला की हे वाक्य ऐकायला मिळत.
बऱ्याचदा विचारशक्ती वाढण्यासाठी, निर्णयक्षमता येण्यासाठी, गरज असल्यास थोडी जोखीम पत्कर काही लागल, चुकल तर मी आहे असा धीर देण्यासाठी वडीलधारी या वाक्याचा आधार घेतात. पण…
सध्या घरात जेव्हा मला काही विचारल जात, आणि मी हे वाक्य म्हणतो, तेव्हा माझ्या निर्णयाची फक्त औपचारिकता असते. बाकी जवळपास त्यांचं सगळ ठरलेल असत. डिसिजन जवळपास झालेला असतो.
जसं… जेव्हा मला विचारल जात, मी काय म्हणते… मुलं विचारतात की संध्याकाळी खायला ऑनलाईन काय मागवायच?…
यात मागवायच का? हो का नाही हा प्रश्न नसतो. मागवायच हे ठरलेल असत.
यात मुलांना घरातल काही नकोय. आणि बायकोला देखील आपणच काही करण्याची इच्छा नसते. म्हणजे यात घरातल नकोच हा निर्णय त्यांचा झालेला असतो.
यातही ऑनलाईन अस विचारल्यावर आपण कुठेही जायच नाही. आवडणाऱ्या ठिकाणाहून घरीच मागावयच आणि आरामात खायच. हे सुध्दा ठरलेल असत. माझ्या निर्णयाची गरज नसते. फक्त मला विचारल जात. मग मी म्हणतो… टेक युवर ओन डिसिजन. यात माझाही गाडी चालवायचा आणि पार्किंग साठी जागा शोधायचा त्रास वाचणार असतो.
तसं नाही… पिझ्झा मागवायचा कि बर्गर…?
म्हणजे पदार्थ सुध्दा त्यांचे ठरलेले असतात. त्या दोन व्यतिरिक्त तीसरा नसतोच. कदाचित त्याचा नंबर पुढे नजीकच्या काळात येणार असावा. किंवा आज या दोन पदार्थांवर त्यांच्या भाषेत जम्बो डिस्काउंट असावा. आता त्यांच्या निर्णयात मी डिस क्वालीफाय सारखा डिस काउंट असतो. पण मला विचारतात. मी परत म्हणतो. टेक युवर ओन डिसिजन.
हे झालं खाण्याच. दुसऱ्या गोष्टी सुध्दा याच पद्धतीने विचारल्या जातात.
मला वाटतं… या दिवाळीत कपड्यांऐवजी एखादा दागिना घ्यावा. नाही छोटासा असला तरी चालेल. यात छोटासा म्हणताना हाताची चिमटी जेवढी लहान करता येईल तेवढी लहान करता करता आवाज वाढवता येईल तेवढा वाढवला जातो. पण आवाजात गोडवा आणि नाजूकपणा असेल याची काळजी घेतली जाते.
आता दागिना छोटासा म्हटला तरी कमीतकमी आठ ते दहा ग्रॅम पासून सुरुवात. परत यांच्या तब्येतीला तो शोभून दिसला पाहिजे. थोडक्यात ठसठशीत हवा. सांगा कपडे आणि दागिना यांच बजेट जवळपास कुठे जमत का?
परत पुढे वाक्य असतच. मागे आम्ही एक पाहून आलो आहे. छान आहे. आणि डिझाईन पण नवीन आहे. हां… थोडीफार भर मीपण घालीन की. यांच भर घालणं म्हणजे दागिना घ्यायला भरीस घालण असत. थोडक्यात वस्तू पाहून झालेली असते. निर्णय झालेला असतो. आपल्याला विचारण्याची औपचारिकता असते. मग म्हणावच लागत. टेक युवर ओन डिसिजन…
माझ्या कपड्यांच्या बाबतीत सुद्धा तेच होत. नेहमी नेहमी पॅन्ट शर्ट हेच असत. कामावर तेच बरे असतात. पण झब्बा लेंगा कमीवेळा घेतला जातो. तो सुटसुटीत सुध्दा असतो. यावेळी झब्बा लेंगा पहा… असं मला वाटत. तुम्हाला त्याची सवय नाही. पण अगदीच काही वाइट दिसणार नाही. (हे वाक्य माझ्यासाठी असत का झब्बा लेंगा याच्यासाठी हा डिसिजन मात्र मी घ्यायचा असतो. ) पण पुढे तेच मला म्हणतात. टेक युवर ओन डिसिजन…
दिवाळीच्या फराळाचही आता तसच होणार… घरी काय करायच आणि बाहेरुन काय घ्यायच, किंवा करून घ्यायच हे जवळपास निश्चित नक्की झालेल असत. पण सुरुवात अशीच होईल.
ऑफिसमुळे सगळ्या गोष्टी घरी करण शक्य होणार नाही. काही पदार्थ घरी करू आणि काही तयार आणू. लाडू घरचेच आवडतात मुलांना. ते घरीच करु. आणि बाहेरुन काय आणायच त्याची यादी मी देते. त्या प्रमाणे तुम्ही घेऊन या. तयार पदार्थांसाठी ऑर्डर मी देईन. चालेल ना? तुम्हाला काय वाटतं… म्हणजे कुठे ऑर्डर द्यायची ते सुद्धा त्यांच ठरलेलं असतं किंवा तेच ठरवणार असतात. मी म्हणतो.
टेक युवर ओन डिसिजन…
पण ऑफिस किंवा इतर गोष्टी सांभाळून घरच सगळ व्यवस्थित आणि वेळच्या वेळी करण्याचा त्यांचा जो आटापिटा असतो त्या त्यांच्या डिसिजन ला मात्र सलाम… तेच करु जाणे… तिथे मी म्हणतो, तुझ्या निर्णयाला आणि कामाला सलाम…
परवा श्रीकृष्ण मालिका पाहत असतानाचा एक प्रसंग आठवला. कंसाच्या आमंत्रणावरून श्रीकृष्ण मथुरा नगरीत येतो. मथुरेत फेरफटका करीत असताना, श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या दृष्टीस एक कुबड असलेली आणि त्यामुळे अत्यंत वाकून चाललेली स्त्री दृष्टीस पडते. ती कंसासाठी तयार केलेला एक सुगंधी लेप घेऊन जात असते. श्रीकृष्ण तिला थांबवून म्हणतो, ‘ हे सुंदरी, तुझ्याजवळ सुगंधी अशी कोणती वस्तू आहे आणि तू ती घेऊन कुठे जात आहेस ? ‘ तेव्हा ती म्हणते, ‘ मी कुब्जा आहे. मी कुरूप असल्यामुळे सगळे लोक मला कुब्जा म्हणतात. एक वेळ मला कुब्जा म्हटले असतेस, तर चालले असते. पण तू मला सुंदरी म्हणून माझा उपहास केला आहेस. त्यामुळे मी व्यथित झाले आहे. ” त्यावेळेस श्रीकुष्ण तिला जे सांगतो, ते मला खूप आवडले. तो म्हणतो, ‘ कुरूपता ही शरीराची असू शकते. पण तुझ्याजवळ मनाचे सौंदर्य आहे. आत्म्याचे सौंदर्य आहे. म्हणूनच मी तुला सुंदरी असे म्हटले. ‘
आपण सर्वसामान्य माणसे. वरवरचे सौंदर्य पाहण्याची सवय आपल्याला लागलेली असते. पण वरवर दिसणाऱ्या सौंदर्यापलीकडे किंवा कुरुपतेपलीकडे सुद्धा सौंदर्य असू शकते, याचा अंदाज आपल्याला येत नाही. कधी कधी मला असे वाटते की सौंदर्य आणि कुरूपता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या सापेक्ष गोष्टी आहेत. असं म्हणतात की वस्तूत, व्यक्तीत सौंदर्य नसते. सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते. जी गोष्ट एखाद्या व्यक्तीला सुंदर वाटेल, तीच गोष्ट दुसऱ्याला तितकी आकर्षक वाटणार नाही. एखाद्या व्यक्तीला अगदी साधारण वाटणाऱ्या गोष्टीतही सौंदर्याचा साक्षात्कार होतो. गवतफुलासारखी सामान्य गोष्ट. पण एखाद्या कवीला त्यातही सौंदर्य दिसते आणि तो सहज म्हणून जातो
रंगरंगुल्या, सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे सांग लागला, सांग तुझा रे तुझा लळा.
कुरुपतेतूनही सौंदर्य जन्म घेते. काट्यांवर गुलाब फुलतात. चिखलात कमळ उगवते. ओबडधोबड अशा दगडातून सुंदर मूर्ती तयार होते. सुंदर घरांची निर्मिती होते. आंतरिक ओढ कशाची आहे ते महत्वाचे. कमळाला आतूनच फुलण्याची ओढ असते. काट्यांवर असला तरी खेद न मानता गुलाबाला फुलायचे असते. आणि ज्याला फुलायचे असते, आपले सौंदर्य जगापुढे आणायचे असते, त्याला कोणी रोखू शकत नाही. कारण ती तुमची आंतरिक ओढ असते. मग परिस्थिती कशीही असो. चिखल असो वा काटे. चिखलात फुलणारे कमळ , काट्यांवर फुलणारा गुलाब जणू आपल्याला संदेश देतात, की बघ, मी कसा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा पूर्णांशाने फ़ुललो आहे. माझे सौंदर्य जराही कमी होऊ दिले नाही. ओबडधोबड दगडातून सुंदर मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारात सुद्धा अंतरात सौंदर्याची ओढ असते. म्हणूनच अशी सुंदर कलाकृती जन्म घेते.
फुलपाखरांचा जन्म कसा होतो माहितीये ? कुरूप अशा दिसणाऱ्या अळ्यांमधून फुलपाखरे जन्म घेतात. इतक्या कुरूप अळ्यांमधून इतकी सुंदर मन मोहून टाकणारी फुलपाखरे जन्माची हा निसर्गाचा एक चमत्कारच नाही का ?
मग त्यांना जन्म देणाऱ्या अळ्यांना कुरूप तरी कसे म्हणावे ? आकाशात दिसणारे पांढरे मेघ छान दिसतात. पण त्यांचा काहीच उपयोग नसतो. काळे ढग कदाचित दिसायला सुंदर नसतील, पण आपल्या जलवर्षावाने ते अवघ्या सृष्टीला नवसंजीवनी देतात, म्हणून त्यांचे बाह्य रूप न विचारात घेता, आंतरिक सौंदर्य विचारात घ्यायला हवे. जे सौंदर्य इतरांना आनंद देते, इतरांच्या उपयोगी पडते, ते खरे सौंदर्य. इतरांसाठी जे स्वतःचं सर्वस्व झोकून देऊन काम करतात, त्यांच्या कार्याचा कीर्तिसुंगंध आपोआपच पसरतो. नुसते सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणे महत्वाचे आहे. ही सुंदरता विचारांची आहे. कृतीची आहे.
आपल्या देवादिकांचे फोटो पाहिले तर त्यांच्या पाठीमागे एक तेजोवलय आपल्याला दिसते. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज, एक प्रकारची आभा दिसते. ते जे सौंदर्य आहे ते सत्याचे प्रतीक आहे. तेच शिव आहे आणि तेच सुंदर आहे. इंग्रजी कवी किट्स म्हणतो, ‘ Truth is beauty and beauty is truth . ‘ त्याचा अर्थ हाच आहे. आणि त्याचे आणखी एक वाक्य प्रसिद्ध आहे ‘ A thing of beauty is joy forever .’ जी गोष्ट सुंदर असते, ती नेहमीच आनंद देते. कृत्रिम सौंदर्य फार काळ आनंद देऊ शकत नाही. सौंदर्य प्रसाधने, पोशाख इ च्या साहाय्याने आपण आपले सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करतो. पण जी गोष्ट मुळचीच सुंदर असते, तिला दिखाव्याची गरज असत नाही. चेहऱ्यावरचे निर्मळ आणि नैसर्गिक हास्य, आपले काम करताना भाळावर येणारे घामाचे मोती या गोष्टी सुंदरच दिसतात. आपले आरोग्य चांगले असेल, विचार चांगले असतील आणि मन प्रसन्न असेल, तर सौंदर्य तुमच्या व्यक्तिमत्त्वातून आपोआपच प्रकट होईल. त्यासाठी मेकअप किंवा दिखाव्याची गरज भासणार नाही.
‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख …’ हे गाणं आपल्या सगळ्यांना माहिती असेल. त्या तळ्यात बदकांसमवेत एक राजहंस वाढत असतो. त्याला आपल्या सौंदर्याची जाणीव नसते. बदकांची पिले तो वेगळा असल्याने त्याला कुरूप समजतात. म्हणून तोही दुःखी असतो. पण एके दिवशी त्याला उमजते की आपण बदक नसून राजहंस आहोत, तेव्हा त्याचे भय, वेड सगळे पळून जाते. कारण त्याने त्याच्यातील ‘ स्व ‘ ला ओळखले असते. असाच आपल्या प्रत्येकामध्ये सुद्धा राजहंस दडलेला असतो. फक्त आपल्याला त्याला ओळखता आले पाहिजे, जागे करता आले पाहिजे.
लेखक – श्री विश्वास देशपांडे,
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ सर्व अंधश्रद्धांविरूद्ध लढणारा झुंजार योद्धा – जेम्स रँडी – भाग-२ – लेखक – डाॅ प्रदीप पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
(त्याच्या या कामाची दखल घेऊन त्याला मॅक आर्थर फाउंडेशनचा प्रतिष्ठित पुरस्कार व फेलोशिप जरी मिळाली तरी त्याचे वेगवेगळ्या चाचण्या व प्रयोग करणे काही थांबले नाही. बायोरिदम या खूळाच्या त्याने मजेशीर चाचण्या घेतल्या. सेक्रेटरीचा चार्ट एका बाईस देऊन नोंदी ठेवायला सांगितल्या आणि त्या बाईने तो तिचा चार्ट समजून ऍक्युरेट नोंदीचा निर्वाळा दिला !!)
क्रमशः…
जेम्स रँडीने वैद्यकीय क्षेत्रातल्या ‘हम्बग्ज’चाही चांगलाच समाचार घेतला. ब्राझील-फिलिपिन्समधील स्वयंघोषीत डाॅक्टर आरिगो मुळे प्रसिद्ध पावलेल्या ‘सायकिक सर्जरी’ या प्रकारात कोणतेही शस्त्र न वापरता शस्त्रक्रिया केली जाते असा दावा होता… पण ती चलाखीची शस्त्रक्रिया ज्याला तो हस्तक्रिया असे म्हणायचा, ती कशी होती हे फिलिपिन्समध्ये जाऊन रँडी ने दाखविले. ऑपरेशनच्या वेळी अरिगो व त्याच्यासारख्या इतर अनेकांनी सायकिक सर्जरीचा दावा करणाऱ्या लोकांनी ऑपरेशन नंतर दाखविलेले रक्त व मांस हे बोकडाचे किंवा गाईचे असायचे हे रिपोर्ट सहित दाखविले.
व्हाईट हाऊस मध्ये बेटी फोर्ड या बाईं समोर अतींद्रिय शक्तीचे तथाकथित पण साधार प्रयोग दाखविणारा जेम्स रँडी हा एकमेव विज्ञानवादी होय.
कॉर्नेल, हॉर्वर्ड, एम.आय.टी, ऑक्सफर्ड, प्रिन्स्टन, येल अशा अनेक विद्यापीठात जेम्सने व्याख्याने दिली. चलाखी व विज्ञान यांच्यावर चर्चासत्रे घडवीत एक्सॉन रिसर्च लॅब पासून नासा, नॅशनल जिओग्राफिक सोसायटी पर्यंतच्या अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये व्याख्याता म्हणून जाऊनही सामान्यातल्या सामान्य भोंदूच्या चाचण्या घेण्यास जेम्स रँडी कचरला नाही. तो या चाचण्या अतिशय हुशारीने, गूढ अतिंद्रिय दाव्यासाठी, वेगवेगळ्या तयार करीत असे.
कॅलिफोर्निया हुन आलेल्या विन्स वायबर्ग या पाणाड्याने ‘डाऊझिंग’ म्हणजे काठी घेऊन विशिष्ट पद्धतीने जमिनीतील अचूक पाणी दाखवण्याचा दावा केला तेव्हा त्याने जमिनीखाली पाण्याच्या पाईप टाकून काही मधून पाणी जाणारे पाईप्स शोधून काढण्याच्या तयार केलेल्या चाचणीची तर खूपच प्रशंसा झाली. विन्स अर्थातच दावा हरला. स्यू वॅलेस नावाची पिरॅमिड व चुंबक विकणारी तरुणी मानवी रोगांचे निदान मॅग्नेट थेरपीने करीत असे. रँडीने तिच्या दाव्यांची डबल ब्लाइंड, कंट्रोल टेस्ट घेऊन तिचा चुंबकोपचाराचा दावा फोल कसा आहे हे दाखवून दिले.
1978 मध्ये ‘सायकिक न्यूज’ नावाच्या मासिकाने जाहीर केले की बिंगो स्वान हा सर्व ग्रहांवर सूक्ष्म देह आधारानं जाऊन आला आहे व मरिनर 10 आणि पायोनियर 10 या कृत्रिम उपग्रहांनी गुरु ग्रहाची माहिती जी नंतर दिली ती स्वानने पूर्वीच दिली आहे, हे दावे जसेच्या तसे एडगर मिशेल या अंतराळवीराने मान्य केले आहेत,.. याही दाव्यांची खोलवर छाननी करून रँडीने त्याच्या दाव्यांची व वैज्ञानिक दाव्यांची तुलना केल्यावर आलेल्या निष्कर्षांची जी माहिती दिली आहे ती वैज्ञानिक चाचण्या कशा कराव्यात याचा सुरेख नमुना आहे.
रँडी चा प्रोजेक्ट अल्फा नावाचा अतिंद्रिय बुवा-महाराज-परामानसशास्त्री यांची परीक्षा घेणारा आराखडा खूपच गाजला आहे.
विसाव्या शतकातील असामान्य नास्तिक म्हणून ‘दि कमिटी फॉर द सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन ऑफ क्लेम्स ऑफ द पॅरानॉर्मल’ तर्फे वैज्ञानिक व नास्तिक विचारवंत यांची यादी करून निवड करण्यास सांगितली असता कार्ल सेगन, मार्टिन गार्डनर, पॉल कुर्टझ, रे हॅमन, अल्बर्ट आईन्स्टाईन, बर्ट्रांड रसेल, फिलीप क्लास, कार्ल पॉपर, रिचर्ड डॉकिन्स अशा दिग्गजांनाही मागे सारून जेम्स रँडी सर्वाधिक मते घेऊन प्रथम क्रमांकावर राहिला होता ते केवळ तो कार्यकर्त्यांच्या अभिनिवेशाने सर्वत्र आव्हाने देत राहिल्याने. प्रबोधनाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा रँडी हा अंधश्रद्धांच्या विरोधी लढाई करणारा खरातर योद्धाच!
रँडीने लिहिलेल्या तेरा पुस्तकांपैकी एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रसिद्ध लेखक आर्थर क्लार्क म्हणतो, ” रँडीची ही पुस्तके म्हणजे पुस्तक दुकानातून हजारोंचे मेंदू सडविणाऱ्या अवैज्ञानिक गोष्टींना योग्य मार्गावर घेऊन जाणारे दीपस्तंभ आहेत”
धर्माचा आधार घेऊन प्रचंड शोषण व फसवणूक चाललेल्या पीटर पॉपहॉफ सारख्या ख्रिस्तोपदेशकाचे बिंग फोडताना व्यथित झालेला रँडी म्हणतो…
‘मानवाचे शहाणपण, पैसा आणि कधीकधी जीवसुद्धा हिरावून घेणाऱ्या अवैज्ञानिक अतिंद्रिय गुढ गोष्टींची हकालपट्टी केली पाहिजे.’
यावर वॉशिंग्टन स्टार या दैनिकाने टीका करून हे सारे अस्तित्वात कुठे आहे असे विचारले. तेव्हा रँडीने फटकारले…..
“लिहिणाऱ्याने त्या गरीब पालकांचे चेहरे पाहिले नाहीयेत ज्यांची मुले गूढ संप्रदायामध्ये सामील होऊन वहावत गेली आहेत…त्याने अशी माणसे पाहिली नाहीत ज्यांनी शापाचा धसका घेऊन जीव घालविला… अशी स्त्री पाहिली नाही की ज्या स्त्रीने धर्म बैठकातुन प्रियकराचा धावा केला पण ती तेथेच लुटली गेली… महाशय जा त्या गयानात जेथे 950 मुडदे केवळ रेव्हरंड जिम जोन्स मुळे हेवन गेट कडे गेलेत…!! उकरून काढाल ते मुडदे?”
20 ऑक्टोबर 2020 ला रँडी विश्वात विलीन झालाय.
आतड्याच्या कॅन्सरशी झुंज देत 92 वर्षांपर्यंतच्या प्रवास करणे सोपे नसते..10 वर्षापूर्वी तो म्हणाला होता..” मृत्यू कधीतरी येणार आहेच. या पृथ्वीने मला प्राणवायू एवढी वर्षे पुरवलाय हेच खूप नाही का?….!”