आज आम्ही पहेलगामला भेट देणार होतो. अगदी उत्साहात सर्वजण तयार होऊन निघाले. अनंतनाग जिल्ह्यातले हे ठिकाण सृष्टी सौंदर्य आणि उत्साहवर्धक हवेसाठी प्रसिद्ध आहे. इथे वर्षात चार ऋतू व्यवस्थितपणे अनुभवता येतात. सभोवती हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे, आसमंतात उंचचउंच पाईन आणि देवदार वृक्ष, हिरवळीची मैदाने आणि पाण्याचे प्रवाह दिसतात. हे सर्व पहात पहात आमचा प्रवास सुरू होता. रस्त्याच्या जवळून खळाळत वाहणारी लिद्दर नदी, पाण्याचा खळखळ आवाज, हिरवीगार वृक्षराजी यामुळे वातावरण खूप छान होते. जाताना वाटेत प्रसिद्ध अनंतनाग मधून पुढे गेलो. काश्मिरी भाषेत नाग म्हणजे पाण्याचा झरा किंवा प्रवाह. झेलम नदी बेहरीनाग मधून उगम पावते. संगम गावात झेलम नदी आणि लिद्दर नदीचा संगम होतो.
आम्ही पामपूरमधे केशर मळ्याला भेट दिली. इथे ५० स्क्वेअर किलोमीटरच्या टापूत केशर पिकवतात. ऑक्टोबर-नोव्हेंबर हा त्याचा सीझन असतो. त्याबद्दलची अगदी सविस्तर माहिती घेतली. केशर खरेदी बरोबर कावा चहाचा आस्वादही घेतला.
इथून पुढे ‘अवंतीपुर मंदिर अवशेषां’ना भेट दिली. अवंतीपूर राजा अवंतीवर्मांची राजधानी होती. इथे अवंती स्वामी म्हणजे विष्णू आणि अवंतीश्वर म्हणजे शिव अशी दोन दगडी मंदिरे होती. या मंदिरात अतिशय सुंदर कोरीव काम, भव्य मूर्ती होत्या. पण भूकंप आणि भूस्खलनात मंदिराचे अवशेषात रूपांतर झाल्याचे समजले. अजूनही तिथे काही मूर्ती, खांब वगैरे शाबूत आहेत. त्यावरील कोरीव काम अप्रतिम आहे. आता पुन्हा हे मंदिर पुनरुज्जीवीत करण्यासाठी काम सुरू आहे. याच ठिकाणी ऑंधी सिनेमातील ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा नही’ हे गाणे चित्रीत झाल्याचे समजले.
पहेलगाम हे गाव छोटसं पण पर्यटकांचं आवडतं पर्यटनस्थळ आहे. पहेलगाम म्हणजे मेंढपाळांचं गाव. इथून छोट्या वाहनांनी आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे पाहायला गेलो. सुरुवातीला पोहोचलो चंदनवाडीला. प्रसिद्ध अमरनाथ यात्रेचे हे प्रवेशस्थळ आहे. इथल्या पायऱ्या चढून अमरनाथ यात्रा सुरू होते आणि पुढे जाते. प्रत्यक्ष अमरनाथाला नाही पण पहिल्या पायरीला हात टेकून अमरनाथाला मनोभावे नमस्कार केला.
समोर सगळीकडे बर्फचबर्फ होता. इथला बर्फ थोडा कडक घसरडा असल्याने हातात काठ्या घेऊन गमबूट घालून पर्यटक फिरत होते. बर्फात खेळत होते. बर्फाखालून वहाणारा खळाळता पाण्याचा प्रवाह मध्येच उघडा झाल्याने छोटे ग्लेशियर तयार झाले होते. सर्वांचे फोटो सेशन उत्साहात सुरू होते. नजर जाईल तिथवर पसरलेला बर्फ, बर्फाच्छादित झाडे, शिखरे यामुळे निसर्गाची अद्भुत लीला इथेही अनुभवायला मिळत होती.
इथून परत येताना बेताब व्हॅलीला गेलो. या व्हॅलीचे मूळ नाव हजन व्हॅली असे होते. पण इथे हिंदी चित्रपट ‘बेताब’चे शुटिंग झाले आहे आणि त्यानंतर ही व्हॅली ‘बेताब व्हॅली’ म्हणून ओळखली जाऊ लागली. समोर बर्फाच्छादित पर्वतशिखरे, पाईन आणि देवदार वृक्षांची जंगलासारखी दाट झाडी, आभाळाला स्पर्श करू पाहणारी उंच उंच झाडे, दूरवर पसरलेली हिरवीगार कुरणे, जवळच वहाणारा खळाळता जलप्रवाह असे अतिशय विलोभनीय सृष्टी सौंदर्य सभोवार दिसत होते. त्याला कॅमेऱ्यात बंदिस्त करीत तृप्त मनाने परत फिरलो.
वाटेत पुढे क्रिकेट बॅट बनविणाऱ्या फॅक्टरीला भेट दिली. विलोची झाडाच्या लाकडापासून या बॅट्स बनवितात. हे लाकूड थंडी, उन, वारा, पाऊस या कसल्याही परिस्थितीत अजिबात खराब न होता आहे असेच राहते हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. हा उद्योग इथे खूप मोठ्या प्रमाणावर चालतो.
एकूणच आजचे स्थल दर्शन खूप छान झाले होते. मनाला भुरळ घालणारे अप्रतिम निसर्गसौंदर्य, धार्मिक स्थळांचे दर्शन, उदरनिर्वाहासाठी स्थानिकांची चालणारी धावपळ अशा संमिश्र भावनात निसर्ग किमयेला मनोमन नमस्कार करीत उद्याच्या सोनमर्ग भेटीची आस घेऊनच हॉटेलवर परतलो.
आम्ही आज गुलमर्गला भेट देणार होतो. प्रत्यक्ष हिमशिखरावर चढाई. मनात खूप उत्सुकता होती. पहाटे साडेपाच वाजता आमची बस निघाली. त्यामुळे गाडीतून सूर्योदय बघायला मिळाला. अगदी सूर्योदयापासूनची निसर्गाची विविध रूपे बघायला मिळत होती. रस्त्याच्या दुतर्फा उंच उंच देवदार वृक्ष, सूचीपर्णी झाडे, सफेदाची झाडे होती.
तो धावता निसर्ग अक्षरशः नजर खेचून घेत होता. मधूनच हिमशिखरे दिसत होती. शिखर दिसले की एकमेकांना हाका मारून दाखवणे आणि त्याचे वर्णन करणे अखंड सुरू होते. सगळेच जण अतिशय उत्साहीत होते.
गुलमर्गच्या आधी तांगमर्गला सर्वांनी फरकोट, हातमोजे आणि गमबूट घेतले. तिथून छोट्या गाड्यांनी सर्वजण पुढे गुलमर्गला गेलो. वळणावळणाचा घाटरस्ता आणि त्यातून दिसणारा निसर्ग खुणावत होता. इथून आता खास आकर्षण असणाऱ्या गोंडोला राईडने म्हणजेच केबल कारने पर्वतावर जायचे होते.
सुरुवातीला केबल कारने पहिला टप्पा कांडोरी स्टेशनवर गेलो. आम्ही अंदाजे दहा हजार फूट उंचीवर पोहोचलो होतो. एकदम वातावरणात फरक जाणवत होता. उंचावरची बर्फाच्छादित शिखरे, धुके, खोल दरी यांचे दृश्य खूपच सुंदर होते. ज्यांना हवेचा त्रास जाणवत होता, पुढे उंचावर जायचे नव्हते असे अनेक जण याच टप्प्यावर हाती काठी घेऊन किंवा घोड्यावरून समोरील उंच टेकडीवर चढत होते. इथला बर्फ जुना असल्याने खूप टणक आणि घसरडा होता. इथे काचेचे इग्लू रेस्टॉरंट आहे.
या स्टेशनवरून आम्ही केबल कारने अफरवत पर्वतावरील दुसऱ्या टप्प्यावर गेलो. तिथे आम्ही १३५०० फूट उंचीवर आलो होतो. केबल कारने वर जाताना खाली खोल खोल दरी, उतारावरील उंच उंच पाईन वृक्ष आणि वरची एकदम उंच शिखरे यामुळे पोटात खड्डा पडल्यासारखे वाटत होते. असे अधांतरी तरंगत जाण्यातला थरार मात्र जबरदस्त होता. आजूबाजूचे दृश्य अतिशय मनमोहक होते. सर्व झाडे, पर्वताचा बराचसा भाग बर्फाच्छादित असल्याने पांढरा दिसत होता. दुसऱ्या टप्प्यावर आलो आणि शब्दशः बर्फात उतरलो. चारीबाजूने बर्फाच्छादित शिखरावर पोहोचलो होतो. समोरचे दृश्य बघून अक्षरशः नजरबंदीच झाली.
शिव शंभूची पवित्र भूमी
बर्फाच्छादित शुभ्र कडे
विलोभनीय निसर्गाचे
भव्य दिव्य दर्शन घडे ||
तिथे एकदम खूपच थंड हवा होती. सर्वांनी सर्व जामानिमा परिधान केलेला असल्याने थंडीचा त्रास होत नव्हता. बर्फ एकदम ताजा होता. अगदी भुरभूरीत. हाताने गोळा करता येत होता. तिथे आल्यावर सर्वच पर्यटकांचे बर्फातले खेळ सुरू झाले. नातवंडांनी गोळे केले, बाहुल्या बनवल्या, चक्क बर्फावर लोळणही घेतली. बर्फावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशाने डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून सर्वांनी गॉगल्स घातले होते. एकंदरीतच प्रत्येकाचे रूप एकदम इथे वेगळेच झाले होते.
या ठिकाणी फोटो काढायची तर पर्वणीच होती. विविध पोज मध्ये सर्वांचेच फोटो सेशन सुरू होते. बरेच जण बर्फात स्किईंग, स्नो-बोर्डिंग करत होते. इतके दिवस ऐकू येणारी हिमशिखरांची साद इथे वरती आल्यावर शांत झाली होती. आम्ही वरपर्यंत येऊ शकलो याचे समाधान खूप मोठे होते. त्यामुळे एक खूप मोठा आनंददायी अनुभव मिळाला होता
जवळजवळ दोन अडीच तास इथे घालवायला मिळाले. किती बघू आणि किती नको असं झालं होतं. कितीही पाहिलं तरी मनाचं समाधानच होत नव्हतं. ऐकणं, सांगणं आणि प्रत्यक्ष अनुभवणं यात फार फरक असतो त्याची इथे चांगलीच प्रचिती आली. निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार प्रत्यक्ष अनुभवण्याच्या समाधानात केबल कारने पुन्हा खाली आलो.
गुलमर्ग हे पीर पंजाब रेंजमध्ये आहे. ते पूर्वी ‘गौरी मार्ग’ म्हणून ओळखले जात असे. केबल कारने म्हणजेच गोंडोलाने अफरवत पर्वतावर आपण जातो. इथून खिल्लनमर्गचे विलोभनीय दर्शन होते. अप्रतिम नजारा दिसतो. काश्मीर ट्रीपचे खास आकर्षण म्हणजे ही गुलमर्गची गोंडोला राईड. ही गोंडोला आशियातील सर्वात उंच तर जगातील दुसरी सर्वोच्च आणि दुसरी सर्वात लांब केबल कार आहे. एका कारने सहा जणांना जाता येते. इतरांच्या केबल कार वर जाता येता पाहणे, आपण स्वतः जाता येतानाचा अनुभव घेणे, त्या वेळेचे निसर्गदर्शन हा एक खूप वेगळाच पण सर्वांगसुंदर अनुभव आहे. पांढरे झालेले असंख्य उंचच उंच पाईन वृक्ष, बर्फाच्छादित उंच शिखरे आणि खाली खोल दरी यामध्येच ऊन आणि धुक्याचा पाठशिवणीचा खेळ हे अतिशय मनोरम दृश्य असते. केवळ एक अविस्मरणीय असा बेजोड अनुभव घेऊन आम्ही खाली उतरलो.
परत येताना काश्मिरी कार्पेट फॅक्टरीला भेट दिली. प्रत्येक प्रांताचे एकेक वैशिष्ट्य असते. काश्मिरी गालिचे ही इथली खास निर्मिती. कार्पेट कसे बनवतात याची झलक आणि असंख्य सुंदर असे नमुने बघितले. अगदी लाखाच्या पुढे किंमत असलेला अप्रतिम गालिचा बघीतला. एक अतिशय उत्तम आणि खास अशी ही कलाकारी आहे. ही कार्पेटस् घराच्या दिवाणखान्याला किंवा बैठकीच्या खोलीला एकदम खानदानी रूबाब बहाल करतात. अशा रीतीने आजचा दिवसही अतिशय छान गेला. हिमशिखरांचा एक अविस्मरणीय असा सहवास अनुभवता आला. आता वेध होते ते पहेलगामचे.
दरवेळी हे नाट्यगीत ऐकताना हिमालयाची ओढ जागी व्हायची. खरं तर ती शुभ्र हिमशिखरे डोळा भरून पाहण्याची माझ्याप्रमाणे अनेकांची इच्छा असते. पण ती प्रत्यक्षात येणे इतके सोपे नसते. इतकी वर्ष ती शिखरं साद घालीत होती. यावर्षी आम्ही तिला प्रतिसाद दिला. या सुट्टीत काश्मीरला भेट देण्याचे ते स्वप्न प्रत्यक्षात आले.
भारतभूच्या ‘नंदनवना’ची सफर ठरली. नियोजनाचे सर्व सव्यापसव्य पार करीत आम्ही अगदी सहकुटुंब त्या देवभूमीत जाऊन पोहोचलो. त्यावेळी संध्याकाळ झालेली होती. त्या संधीप्रकाशात ‘दल’ सरोवरात एका शिकाऱ्यातून आमच्या नियोजित हाऊस बोटवर जाऊन पोहोचलो. विविध रंगात, विविध प्रकाराने, रोषणाईने सजविलेले शिकारे, मोठ्या हाऊस बोटस् आणि त्यांची पाण्यातील प्रतिबिंबे ! एकूणच भुरळ घालणारं मोठं मोहक वातावरण होतं.
आत्तापर्यंत सिनेमातून पाहिलेली शिकाऱ्यातली गाणी आठवली. काश्मिरी गालिचे, कलाकारी, लाकडी कलाकुसर, झुंबरं यामुळे हाऊस बोट मधील वातावरणात आपोआपच शाही महालाचा आभास जाणवत होता. या बोटीवर राहण्याचा अनुभव खूप खास होता. एक वेगळाच आनंद मिळला.
या हाऊस बोटची संपूर्ण लाकडी बांधणी आणि रचना खूप वेगळी असते. देवदार वृक्षापासून ती बनवतात. हे लाकूड पाण्यामधे खराब न होता सुरक्षित रहाते. एक बोट बनवायला अंदाजे ३ ते ५ कोटी पर्यंत खर्च येतो. या बोटी इथल्या पर्यटनाच्या खासियत आहेत. करोना काळानंतर आता पर्यटनाने पुन्हा वेग पकडला आहे.
चार चिनार’च्या बेटावर जाताना फक्त आपापल्या कुटुंबासोबत केलेली अडीच तीन तासांची शिकारा राईड केवळ अविस्मरणीय होती. साथीला ‘आपलं माणूस’, संथपणे जाणारी बोट, आजूबाजूला जाणारे असंख्य शिकारे, दूरवर पसरलेले दल सरोवर, पार्श्वभूमी वरती उंच उंच चिनार, देवदारची झाडे, पर्वतरांगा केवळ अप्रतिम ! अगदी स्वप्नवत अनुभव होता तो.
चार चिनारच्या बेटावर प्रसन्न, आल्हाददायक वातावरण होते. दूरवर दिसणारे अप्रतिम निसर्गसौंदर्य, ‘कावा’ चहाची सुंदर चव, कश्मिरी फिरन / फेरन मधील फोटो सेशन असे सुखद क्षण घेऊन परत फिरलो.
परत येताना फ्लोटिंग मार्केटमध्ये काश्मिरी साड्या, ड्रेस मटेरियल, कार्पेट्स, लाकडी वस्तू, ज्वेलरी यांच्या शोरूमस्, दुकाने बघितली. या सरोवरात गवताच्या बेटांवर वाफे बनवून शेती केली जाते ही गोष्ट खूप वेगळी होती.
यानंतर बघितले ते पुरातन धार्मिकस्थळ म्हणजे शंकराचार्य मंदिर. गोपाद्री पर्वत किंवा शंकराचार्य टेकडीवरील शंकराचार्य मंदिराला ‘जेष्ठेश्वर मंदिर ‘ असेही म्हणतात. या मंदिरात शंकराचे अति भव्य लिंग आहे. शंकराचार्यांचे साधना स्थळ पण तिथे आहे. उंच पायऱ्या चढण्याचा काहीही त्रास न होता आध्यात्मिक महत्त्व असणाऱ्या या पवित्र मंदिराला भेट देता आली याचे मनाला खूप समाधान मिळाले. या मंदिर परिसरातून श्रीनगरचे आणि भव्य निसर्गाचे विलोभनीय दर्शन झाले. हा मंदिर परिसर मिलिटरीच्या अधिपत्याखाली असल्याने सर्व व्यवस्था, स्वच्छता वगैरे गोष्टी उत्तम आहेत.
त्यानंतर श्रीनगरमधील प्रसिद्ध ‘निशात बागे’ला भेट दिली. असंख्य नमुन्याचे गुलाब पाहून मन अतिप्रसन्न झाले. अगदी छोट्या गुलाबापासून खूप मोठ्या आकाराचे कलमी गुलाब होते. असंख्य रंग, आकार, एकाच फुलात वेगवेगळ्या रंगछटा, वेली गुलाब असे एकाहून एक वेगवेगळे गुलाब पाहून ‘हे पाहून का ते’, ‘ हे सुंदर का ते जास्त सुंदर ‘ असे होऊन गेले. शोभेची छोटी छोटी फुले सुद्धा तितकीच विविध आकार आणि रंगात आकर्षित करीत होती. चिनारचे मोठे मोठे वृक्ष वातावरण जास्तच शितल आणि आल्हाददायक बनवीत होते. बागेच्या मध्यातून वाहणारा पाण्याचा धबधबा, कारंजी नेत्रसुखद होती. एकंदरीत ही बाग ‘ दि गार्डन ऑफ प्लेजर’ हे नाव सार्थ करत होती.
त्यानंतर ‘शालिमार बागे’ला भेट दिली. इथेही मोठे मोठे चिनार वृक्ष, असंख्य रंगीत गुलाब, धबधबा, कारंजी, राणीमहाल, इतर दोन-तीन जुन्या इमारती आहेत. प्रचंड मोठी अशी ही बाग माणसांनी पण भरलेली होती.
एकंदरीतच अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्य, शिकारा सफर, शंकराचार्य मंदिर दर्शन यामुळे श्रीनगर मधील पहिला दिवस खूप आनंद देऊन गेला. आता प्रत्यक्ष हिमशिखरावर जायची जास्ती उत्सुकता होती.
गणेश स्थापनेमागील लोकमान्य टिळकांचा असलेला उद्देश आज पूर्णत्वास गेलेला दिसतो का?
गणेशस्थापने मागील लोकमान्य टिळकांचा असलेला उद्देश आज पूर्णत्वास गेलेला दिसतो का? या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही याच फूटपट्टीत अपेक्षित असावं. “हो” तर म्हणू शकतच नाही. उत्तर “नाही” हेच असले तरी नाही असे म्हणतानाही मनात अनेक विचार आणि प्रश्न वाहत राहतात. त्याबद्दल लिहिण्यापूर्वी आधी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या गणेशोत्सवाची उद्दिष्टे, हेतू काय होते, यावर बोलूया.
देश पारतंत्र्यात होता. ब्रिटिशांच्या गुलामगिरीमुळे पिचलेला होता. समाज विस्कटलेला होता. अनेक जाती वंश, वर्ण, अंधश्रद्धा आज्ञान यामुळे समाज एकसंध नव्हता. ब्रिटिशांचेच लांगुलचालन करणारा एक भारतीय वर्गही होता. मात्र सामान्य जनांना, परकीय सत्तेचा जुलूम आणि अत्याचार याविरुद्ध एकत्र आणणे हे जरुरीचे आहे असा विचार जाज्वल्य देशाभिमानी आणि राष्ट्रवादी, स्वातंत्र्यप्रेमी लोकमान्य टिळकांच्या मनात सतत असे.
वास्तविक तेल्या तांबोळ्यांचा नेता म्हणूनही त्यांचा उपहास करण्यात आला होता. ब्रिटिशांच्या मते तर भारतीय असंतोषाचे ते जनकच होते. ब्रिटिशांशी सामना हा केवळ अर्ज विनंत्या करून होणार नाही हे जसे टिळकांनी जाणले होते तसेच लोक भावनेची ही नस त्यांनी ओळखली होती. जाती, उपजातीच्या जंजाळात अडकलेल्या जनतेला धार्मिक आवाहन केल्यास हेवेदावे विसरून, ही जनता एकत्र येऊ शकेल हे लोकमान्य टिळकांनी जाणले आणि त्यातूनच सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना त्यांना सुचली. म्हणजेच या गणेशोत्सवाची मूळ कल्पना स्वराज्यासाठी संघटन ही होती. आणि म्हणूनच घराघरातला गणेशोत्सव त्यांनी हमरस्त्यावर आणला. हा खाजगी उत्सव सार्वजनिक केला.
लोकमान्य टिळकांनी १८९३साली केसरी वाड्यात त्याची सुरुवातही केली. समाज प्रबोधन हा या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मागचा मूळ हेतू होता. या माध्यमातून त्यांनी क्षात्रतेज आणि देशप्रेम यांची अलौकिक सांगड घातली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांनी अशा पद्धतीने लोकांच्या मनावर बिंबवले. थोडक्यात लोकमान्य टिळकांच्या या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागे राष्ट्रकारण होते. एक अत्यंत उदात्त, प्रेरक असे कारण होते. धर्मकार्य हा केवळ बहाणा होता. स्वराज्य निर्मितीची आस उत्पन्न व्हावी हेच ध्येय होते.
या सार्वजनिक गणेशोत्सवाची किर्ती चहुदूर पसरली आणि गावोगावी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापन होऊ लागली. आणि ती परंपरा आज सव्वाशे वर्षानंतरही टिकून आहे.
मात्र आजच्या गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्सवातील उद्दिष्टे दिसतात का या प्रश्नाचे “नाही” असे ठाम उत्तर देताना माझ्या मनात काही विचार येतात आणि तेही मला इथे व्यक्त करावेसे वाटतात.
माझा जन्म स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झाला. पारतंत्र्याच्या काळाचा फक्त इतिहास मी मनापासून अभ्यासला आणि त्याचा मला आजही अभिमान आहे. या लेखाच्या निमित्ताने मला माझे बालपणी अनुभवलेले कित्येक सार्वजनिक गणेशोत्सव आठवले. गणेश मूर्तीभोवती केलेले ते सुंदर महाभारत, रामायणातल्या कथा सांगणारे देखावे आठवले. गणेशोत्सवात सादर केलेली नाटके आठवली. कित्येक नामवंत कलाकार या गणेशोत्सवांनी रंगभूमीला दिले. उत्तम वक्त्यांची प्रबोधन पर भाषणे ऐकली.कीर्तने ऐकली. संगीत मैफिलीतले नामवंत गायक आठवले. ते परिसंवाद, बौद्धिके सारं काही आठवलं आणि त्या पार्श्वभूमीवर आजचे गणेशोत्सव अनुभवताना नक्कीच उदासीनता येते. लोकमान्य टिळक तर यातून हरवलेलेच आहेत. आता उद्दिष्ट हरवले आहे आणि उत्सव राहिला आहे. त्यातही पैसा, दिखावा, राजकारण यांचा प्रवेश झालाय. सण उत्सव हे संघटनात्मक असतात. समाजात ऐक्य, बंधुभाव प्रेम, समता, निर्माण करण्यासाठी असतात ही भावना न दिसता स्पर्धात्मक वादच दिसतात. अहमहमिका, चढाओढ दिसते. राष्ट्र कारण न दिसता राजकारण जाणवते. गोंगाट आणि धिंगाणा अनुभवायला मिळतो. शहरात तर कित्येक वेळा सार्वजनिक गणेशोत्सवामुळे गल्लोगल्ली वाहनांची कोंडी होऊन जनजीवनच विस्कळीत होते. म्हणूनच आजच्या गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कल्पना टिकून आहेत का? या प्रश्नाचे नाही असे उत्तर देतानाही एकच वाटते की आता काळ बदललाय. देश स्वतंत्र ही झालाय.
देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे झाली. स्वातंत्र्यासाठी जनजागृती किंवा संघटन हे या गणेशोत्सवा मागचे टिळकांचे उद्दिष्ट आज ऊरले नसले तरी उद्दिष्टे बदलू शकतात. ती अधिक सकारात्मक असू शकतात. आज देश स्वतंत्र असला तरीही मानसिक गुलामगिरीत आहेच. आजच्या सार्वजनिक गणेशोत्सवात आपण आपला देश, आपल्या राष्ट्रीय समस्या, आपले विज्ञान प्रगत जीवन, त्याचबरोबर आपली घसरत चाललेली नीती मूल्ये, देशाभिमान यासंदर्भात पुन्हा एकदा देशाला संघटित करण्याची, ऐक्याच्या प्रवाहात आणण्याची प्रेरणा बाळगली पाहिजे.नव्या पिढीला आपल्या प्रेरक इतिहासाची ओळख करून द्यायला हवी.
म्हणूनच नुसतेच ढोल ताशे नकोत. थिल्लरपणा नको. एकापेक्षा एक गणेश मूर्तींचे प्रदर्शन नको. नुसताच उत्सव नको. सोहळा नको. तर जी परंपरा सव्वाशे वर्ष आपण टिकवली आहे त्यात नवी आवाहने पेलण्याचं सामर्थ्य दिसलं पाहिजे. आणि हे इतर अनेक सार्वजनिक उत्सवासाठीही लागू आहे.
तर आणि तरच लोकमान्य टिळकांच्या या सार्वजनिक उत्सवाला दिलेला मान ठरेल आणि आजच्या ‘नाही” चे उद्याच्या ‘हो’ मध्ये परिवर्तन होऊ शकेल. असे मला वाटते…
1995 साली आजच्या तारखेला मृत्यंजय ह्या जगप्रसिद्ध लोकप्रीय पुस्तकाला,” भारतीय ज्ञानपीठ”ह्या संस्थेतर्फे मुर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला होता. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक होते.
माझ्या स्वतः च्या अत्यंत आवडत्या पुस्तकांच्या यादीत “मृत्युंजय” हे अगदीं वरच्या लेव्हल वर विराजमान झालंय.ह्या पुस्तकाने मला एक नवी दृष्टी दिली. ह्या पुस्तकाने नव्या भूमिकेत शिरून अंतरंग कसे जाणून घ्यायचे हे खूप छान शिकविले. बरेचदा आपण ज्यांना खलनायक समजतो ते कधी कधी परिस्थिती मुळे खलनायक बनतात हे समजावून सांगितले. प्रत्येकाचे वागणे त्यांच्या दृष्टिकोनातून बरोबरच असतं हे मृत्युंजयमधून शिकायला मिळाले. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा अभ्यासता आल्या.कुठलीही अजरामर, असामान्य कलाकृती निर्माण करतांना त्यात स्वतःला झोकून द्याव लागतं हे सावंत ह्यांनी मृत्यूंजय लिहीतांना दाखवून दिलं. मृत्युंजय कादंबरीच्या लेखनासाठी शिवाजी सावंत ह्यांनी थेट कुरुक्षेत्रात मुक्काम ठोकला होता. प्रदीर्घ संशोधन, चिंतन आणि मनन यांतून रससंपन्न अशा ‘मृत्युंजय’ या वास्तववादी कादंबरीचा जन्म झाला आणि शिवाजी सावंत हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचले.
महाभारतातील सामान्यत: खलनायक म्हणून परिचित असलेल्या महावीर कर्णाच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मागोवा ही कादंबरी घेते. बऱ्याच कथा सर्वांनाच परिचित आहेत. नायक असूनही बहुतांशी सगळीकडे तो एक खलनायक भासतो. पण शिवाजी सावंत लिखित “मृत्युंजय ” कादंबरी हाती घेतली आणि जणू कर्णाचे जीवन नव्याने माझ्या मनात उलगडले गेले. कर्णासारखा दानशूर या भूमीवर कधी झाला नाही हे माहीत होते . ही कादंबरी अनेक परिचित अपरिचित प्रसंगांशी आपली अगदी जवळून ओळख करून देते . वाचकांना,मराठी साहित्याला ,शिवाजी सावंत यांसकडून मिळालेली ही एक अद्भूत देणगीच म्हणावी लागेल.कादंबरीचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे ही इतर कादंबऱ्याप्रमाणे एकसुरी गोष्ट नाही आहे. तर महाभारतातील विविध पात्रांच्या मुखांतून पुस्तकाच्या प्रत्येक पानावर झरझर उतरणारा सगळया भूमिकांचा परिपाक आहे. कुंतीला मिळालेले असामान्य वरदान , त्यातून झालेला कर्णाचा असामान्य जन्म ,जगाच्या भीतीने कुंतीने घेतलेला कठोर निर्णय , गुरू द्रोण आणि पांडवांकडून कर्णाचा झालेला अपमान, त्यातूनच दुर्योधानासोबत जन्मास आलेले मित्रप्रेम , द्रौपदी वस्त्रहरण , कुरुक्षेत्रातील युद्ध या सर्वच गोष्टी वरवर प्रत्येकास माहित आहेतच . पण या प्रत्येक गोष्टींत काही बारीक बारीक अशा कितीतरी गोष्टी दडलेल्या आहेत ज्या पुस्तक हाती घेण्याआधी आपल्या विचारांतही नसतात किंबहुना आपण कधी ह्या अँगल ने विचारच केला नसतो. हे पुस्तक आपल्या कित्येक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं नीट खुलासेवार, पटण्याजोगे समजावून सांगत.
हे पुस्तक वाचण्या आधी मला असलेल्या जुजबी माहितीमुळे महाभारतातील खूप प्रश्न मला भेडसवायचे त्यांची उत्तरे मला ह्या पुस्तकानेच मिळवून दिलीत.
ज्यांनी हे पुस्तक वाचले नसेल त्यांनी आवर्जून वाचावे , एकदा हातात हे पुस्तक घेतले की वाचून पूर्ण केल्याखेरीज तुमच्याच हातून हे पुस्तक खाली ठेववणार हे नक्की.
श्वास, घास आणि ध्यास या तीन गोष्टी ज्याच्या त्यालाच कराव्या लागतात. हाती कितीही पैसा असला तरी या गोष्टी घेण्यासाठी नोकर ठेवता येत नाहीत. या गोष्टी ज्याच्या त्याला सहजपणे करता येतील अशी मनुष्यदेहाची रचना विधात्यानेच केली असून त्यासाठी आवश्यक साधने व ऊर्जास्त्रोत या देहाच्याच ठायी देऊन ठेवले आहेत.
छानसा देह, त्यात विविध इंद्रिये आणि त्या प्रत्येक इंद्रियाच्या ठायी एक विशेष शक्ती, असे वरदान विधात्याने मनुष्याला दिले आहे. डोळयांना पाहण्याची, हातांना काम करण्याची, पायाला चालण्याची, कानाला ऐकण्याची अशा रितीने सर्वच अवयवांना विशेष शक्तीचे वरदान देऊन विधात्याने मुनष्य देहाची निर्मिती केली आहे. हे शक्तीचे वरदान देतांनाच या शक्तीचा वापर केला नाही तर ती शक्ती कमी कमी होत जाऊन लयाला जाईल, असा कठोर न्यायही जोडीला ठेवलेला आहे. हा कठोर न्याय अनुभवास यावयाची सुरुवात झाली की लागलीच सावध होऊन, ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’, या मंत्राची अंमलबजावणी, पुढील शक्तीक्षय थांबविण्यासाठी आवश्यक आहे. ‘काही वर्षापूर्वी मी विहिरीच्या कठडयावर उभा राहून पाणी विहिरीतून काढत होतो, हातात दोन बादल्या घेऊन अर्धा किलोमीटरवरुन पाणी भरत होतो. आता मात्र बाथरुममधली पाण्याने भरलेली बादली इकडून तिकडे करतांनाही कठीण जाते. पूर्वी मी तीन किलोमीटर पायी चालत शाळेत जात होतो. आता पाच मिनिटे चाललो तरी दम लागतो’, ही आणि असेच साधर्म्य असलेली वाक्ये आपण आपल्या बाबतीत म्हणत असतो वा दुसऱ्यांकडून त्यांचा अनुभव म्हणून ऐकत असतो. इंद्रियांच्या शक्तींचा वापर न केल्याने त्यांची शक्ती कमी होण्याचा कठोर न्याय यात झालेला असतो. हा कठोर न्याय होणे टाळायचे असल्यास, कष्ट करणे आणि त्यासाठी इंद्रियांना कृतीत व्यग्र ठेवणे आवश्यक आहे.
इंद्रियांना शक्ती देतांना तिचा वापर करणे अनिवार्य होईल, अशी परिस्थीती खरे तर विधात्याने निर्माण करून ठेवलेलीच आहे. माणसाला भूक दिली. भूकेसाठी अन्न मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी उदनिर्वाहाचे साधन आले. त्यासाठी पायपीट आली, काम करणे आले. ‘उदरभरणाची व्यथा, बसली सर्वांच्या माथा’, असे प्रत्येकाचे करून,प्रत्येकाला कृती करणे अनिवार्य करून ठेवले आहे. जोडीला चांगली वस्त्रं, चांगाला निवारा, चांगले शिक्षण यांचा ध्यास लावल्याने यासाठी अधिक अर्थार्जन व अधिक अर्थाजनासाठी अधिक कष्ट या कर्मचक्रात विधात्याने माणसाला सहजपणे गुंतवून ठेवले आहे. प्राण्यांना, वृक्षांना जसे ऋतुचक्राशी जुळवून घ्यावे लागते, तसेच माणसालाही या कर्मचक्राशी जुळवून घेणे भाग आहे. हे प्रत्येकाने ओळखून कर्म करत राहिले पाहिजे.
मूठभर गर्भश्रीमंत व्यक्ती सोडल्या तर प्रत्येकाच्याच आयुष्यात आधी कष्टाच्या वेदना व भविष्यात सुख असाच प्रवास होतो. गर्भश्रीमंत कुटुंबातील सदस्यांनाही आहे ते टिकविण्यासाठी कष्ट घ्यावेच लागतात. ‘खूप आहे’ म्हणून, काही न करता आळसाचे सुख घेणाऱ्या व्यक्तींचा भविष्यकाळ वेदनादायी असतो. अनेक श्रीमंत व्यक्ती यथायोग्य कष्ट न घेतल्याने देशोधडीला लागल्याचेही आपण पहातो. हे देशोधडीला लागणे आर्थिक दृष्टीने असते तसेच ते शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीनेही असते.
शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने देशोधडीला लागणे हे बऱ्याचदा आर्थिकदृष्ट्या सुबत्ता आल्याने होते. बुद्धीच्या वापरातून समृद्धी निर्माण करायची आणि आपणच निर्माण केलेल्या या समृद्धीच्या कोशात गुदमरून जायचे, असेच घडताना हल्ली दिसते. भौतिक सुखे पायाशी लोळण घेत असली तरी त्यांचा उपभोग घेण्यासाठी देह, इंद्रिय धडधाकड हवीत. देहइंद्रिये आर्थिक सुबत्तेने नाही तर शरीरश्रमानेच धडधाकट, बलवान राहतात. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाला शरीरसौष्ठव टिकविण्याठी शरीरश्रम आवश्यक आहेत.
वीरशैव तत्वज्ञानाचे प्रणेते महात्मा बसवेश्वर यांनी यासाठीच शरीरश्रमाचा गौरव करणारा मंत्र मानवजातीला दिला. ‘कायक वे कैलास’. ‘कायक’ म्हणजे कायेने (देहाने) केलेले काम. हाच ईश्वर. प्रत्येकानेच जमेल तेव्हढे शारीरिक श्रम हे केलेच पाहिजेत. यामुळे इंद्रियांची शक्ती अबाधित राहते आणि त्या शारीरिक श्रमात स्वत: त्यातील काठिण्य, कष्ट अनुभवल्याने, कष्ट करणाऱ्या इतर माणसांचेही मूल्य आपल्याला जाणवते. नकळत त्यांच्याविषयीचा आपला आदर वाढतो. स्वयंपाक, धुणे-भांडी करणाऱ्या मावशी आल्या नाहीत की आपण ते काम जेव्हा करतो, तेव्हा त्यांच्या कष्टाचे मोल जाणवते. यासाठी ..’आधी केलेच पाहिजे’.
जीविकेसाठी आणि शरीरस्वास्थ्यासाठी कष्ट अनिवार्य आहे, ही बाब प्रत्येकालाच ज्ञात असते. तरीही बरेच जण या दोन्ही गोष्टींसाठी कष्ट घेणे किंवा त्यापैकी एका गोष्टीसाठी कष्ट घेणे टाळत असल्याचे दिसून येते. यामागील कारणांचा शोध घेतला तर कंटाळा, आळस, थकवा ही कारणे आढळतात. यात ‘कंटाळा येणे’ हा सहज स्वभावधर्म आहे. पण ‘कंटाळा करणे’ हा इच्छाशक्तीचा आलेख खाली आल्याने आळसाकडे झुकणारा नकारात्मक प्रवास आहे. एकच एक काम करायला लागणे, इच्छा नसताना एखादे काम करावे लागणे, गुंतागुंतीची, आकडेमोडीची कामे करावी लागणे यामुळे कंटाळा येऊ शकतो. ढगाळ वातावरण, वीज गेलेली असणे व त्यामुळे होणारा असह्य उकाडा यामुळेही कंटाळा येऊ शकतो. कंटाळा हा प्रकृती
स्वभावधर्मावर अवलंबून असतो. तो प्रत्येकालाच येतो. माणसांचा येतो, जागेचा येतो, नोकरीचा येतो, पावसाचा येतो. अशा अनेक गोष्टींचा कंटाळा येतो. प्रकृती स्वभावाने असा कंटाळा आला, तरी सर्वसाधारण विवेकी माणूस परिस्थितीचा अंदाज घेऊन ‘कंटाळा करायचा’आणि स्वस्थ बसायचे की कंटाळ्यावर मात करून ती गोष्ट पुर्तीस न्यायची, याचा निर्णय घेत असतो.
नेमून दिलेले काम कालमर्यादेत करावयाचे काम असेल आणि ते वेळेत केले नाही तर आर्थिक दंड वा नुकसान होणार असेल तर माणूस कंटाळ्यावर मात करतो. आपला प्रकृती स्वभाव बाजूला ठेवतो आणि काम तडीस नेतो. पण विवेकाची जागा आळसाच्या तात्कालिक सुखाने घेतली तर मात्र तो कंटाळा येताच ‘कंटाळा करतो’. ‘आळसे काम नासते’, असे होऊन कामात आणि त्याच्या सुखात विघ्ने येतात. अशी माणसे खरे तर व्यवसाय, नोकरी वा कुटुंब यात अडसर आणि बोजाच. व्यक्ती म्हणून त्या चांगल्या असतील व कृतिशून्यते मागच्या त्यांच्या मानसिक स्थितीशी संबंधित कारणे समर्थनीय असतील, तर बऱ्याचदा तिथे अन्य सदस्य त्यांचा भार स्वतः उचलून, त्यांची कामे करताना दिसतात. कामे तडीस जातात. पण यात कोणालाच मनापासून आनंद नसतो. एकाला निष्क्रियतेच्या जाणिवेने नैराश्य. तर दुसऱ्याला जादा भाराच्या वेदना. हे टाळण्यासाठी ‘कंटाळा आला’ तरी ‘कंटाळा करून’ चालणार नाही, अशी कर्तव्याची जाणीव स्वतःला करून देऊन नियोजित कामे करत राहिली पाहिजे.
शारीरिक श्रमात ‘थकवा’, ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे. आर्थिक ऐपत आणि शारीरिक कुवत यांची जाणीव प्रत्येकालाच असते. त्यापलीकडे जाऊन काही करण्यापूर्वी विचार करायला हवा. देह कष्टविण्यासाठीच आहे, उपजीविकेसाठी अर्थार्जन आवश्यक व अर्थार्जनासाठी काम करत राहणे आवश्यक, हे जरी खरे असले तरी आवश्यक गोष्टी कोणत्या व किती? अर्थार्जन किती आवश्यक ? व त्यासाठी देहाला कुवती बाहेर पळवायचे का? कुवतीबाहेर ओझे उचलायला लावायचे का? याचाही विचार करायला हवा. व्याप हा, आवश्यक तेवढाच व त्याच मर्यादेत हवा. व्याप आहे म्हणून तो सारण्यासाठी कृतिशीलता आहे. कृतिशीलतेचा रियाझ हा कर्तृत्वाला गती देत असला तरी तो आपल्याला झेपणाऱ्या सुरात हवा, झेपेल एवढाच हवा. ‘आळस’ हा जसा शत्रू तसेच ‘अतिश्रम’ हाही शत्रूच. रात्र विश्रांतीसाठी, शरीर स्वास्थ्यासाठी असते. आपण रात्रीचा दिवस करतो, तेव्हा नकळत शरीर स्वास्थ्य गहाण टाकून रात्री कडून वेळ उसना घेत असतो. ही उसनवारी टाळली पाहिजे. अंगावर वस्त्र असतात इतपतच व्याप हवा. वस्त्रावर पुन्हा दुसरे वस्त्र चढवणे, म्हणजे व्याप नको तेवढा वाढवणे. क्षमतेबाहेर हा व्याप वाढला की अस्वस्थ वाटायला, गुदमरायला सुरुवात झालीच म्हणून समजा.
स्वभावधर्मानुसार कंटाळा, आळस आला तरी अर्थार्जनाची निकड म्हणून नियोजित काम करणे आवश्यक असेल तर आळस झटकून ते काम करण्यासाठी… अर्थार्जनाची निकड तेवढीशी नसली तरी शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक त्या किमान कृती करण्यासाठी ‘ केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’, याची जाणीव जागे करणारे अलार्मचे घड्याळ नेहमी उशाशी हवे.
त्याचवेळी अवाजवी स्वप्ने आणि त्यासाठी क्षमतेबाहेरचे कष्ट होत असतील, तर ते थांबवून योग्य दिशा दाखवणारे संयमाचे होकायंत्रही नेहमी जवळ हवे. हे दोन्ही सोबत असले की ‘केल्याने होत आहे रे..’ याची, सारखी आठवण करून द्यावी लागत नाही. कृतिशीलतेचा रियाझ योग्य पद्धतीने होतो आणि जीवन गाणे अधिकाधिक रंगत जाते.
माहेरवाशीण म्हणून बर्याच ठिकाणी पुजली जाणारी गौर, काही घरात गणपतीची आई म्हणून आपल्या बाळाचं कौतुक, ,गणपतीचं कौतुक डोळे भरून पाहण्यासाठी तर कधी जगन्माता “श्रेष्ठा- कनिष्ठा”अशा बहिणींच्या रूपात आगमन करते .
महाराष्ट्र तसेच कर्नाटकात गणपतीच्या आगमनानंतर गौरीपूजनाची परंपरा आहे.
प्रदेशानुसार पूजा पद्धतीत फरक असला तरी देव लोकात वास करणाऱ्या या लेकी बद्दलचे प्रेम ,आपुलकी सगळीकडे सारखीच असते.
“लेक”बनून आलेल्या या माऊलीचे यथाशक्ती पूजन करणे हाच भाव असतो. महाराष्ट्रात गौरीपूजनाची विविध रूपे पहावयास मिळतात. प्रदेशानुसार गौरीपूजनाची पद्धत वेगवेगळी असते.
कोकणस्थ व कऱ्हाडे ब्राह्मण खड्यांची गौर पुजतात. सकाळी स्नान करून शुचिर्भूत होऊन नदीकाठी जाऊन तिथले पाच खडे किंवा सात खडे ताम्हणात कोऱ्या वस्त्रावर ठेवून आणतात .कापसाचे वस्त्र घालून, त्यांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवून घरी आणतात .गौरी माहेरवाशिण म्हणून येत असल्याने हा मान माहेरवाशीण मुलींचा किंवा कुमारीकेचा असतो.
कोकणस्थामध्ये गौर घेऊन येणारी स्त्री तोंडात पाण्याची चूळ ठेवते (त्या मागचे कारण की गौरी घरी येताना माहेरवाशीणीने सासरची गाऱ्हाणी सांगणे , मनस्वास्थ्य बिघडविणारे विचार तिच्या मनात येऊ नयेत) नदीवरून आणलेल्या या गौरीला उंबऱ्या बाहेर पायावर दूध पाणी घालून ,ओवाळून ,रांगोळीने काढलेल्या पावलावरून गौर घरात आणतात .तिला सर्व खोलीत फिरवून घरची स्त्री” इथे काय आहे “असा प्रश्न विचारते .ती गौर आणणारी मुलगी” उदंड “आहे असे मनातल्या मनात तीन वेळा उच्चारते. त्यानंतर तिला गणपती जवळ बसविले जाते .नंतर माहेरवाशीण तोंडातील पाणी टाकून बोलू शकते. आगमना दिवशी गौरीला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो .दुसऱ्या दिवशी “घावन घाटल्याचा “नैवेद्य असतो तर कराडे ब्राह्मण लोक पुरणावरणाचा नैवेद्य दाखवतात. तिसऱ्या दिवशी ओल्या नारळाच्या करंज्या केल्या जातात. तिन्ही दिवस गौरीची खण नारळाने आणि तांदुळाने ओटी भरतात .निरोपादिवशी दही पोह्याचा नैवेद्य दाखवून अक्षता टाकून तिला स्थानावरून हलवले जाते. तिची कृपादृष्टी सगळीकडे राहू दे म्हणून तिला सर्व घरातून फिरवून आणले जाते.
देशस्थांच्या घरी उभ्या च्या गौरी बसवतात .त्यांना “महालक्ष्मी “असे म्हटले जाते. गौरींचे मुखवटे पितळेचे ,चांदीचे किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस असतात. घरातल्या सवाष्णी दोन सुपामध्ये धान्याच्या राशीवर महालक्ष्मीचे मुखवटे ठेवून घरात आणतात .त्यापैकी “जेष्ठा गौरीला” तुळशी वृंदावना पर्यंत मिरवत नेले जाते .तिथे तिला” कनिष्ठा गौर “भेटते. दोघी नाही हळदी कुंकू लावून वाजत गाजत उंबऱ्यापर्यंत आणतात. उंबऱ्यावरील माप ओलांडून महालक्ष्मी घरात प्रवेश करते. घरभर काढलेल्या पावलावरून गौरीला फिरविले जाते .लक्ष्मी कोणत्या पावलांनी आली यावर “सोन्याच्या ,चांदीच्या , रुपयाच्यापावलांनी, धनधान्याच्या समृद्धीच्या पावलांनी” असे म्हणून तिला घरभर फिरवून गणेश मूर्ती शेजारी तिची स्थापना करतात नंतर घरातील स्त्री गौरी आणणाऱ्या सवाष्णीला कुंकू लावून साखर देते, लक्ष्मी तयार केलेल्या साच्यामध्ये गहू ज्वारी असे धान्य भरून त्यात पैसे ठेवतात व त्यावर मुखवटे ठेवतात .त्यांना साड्या नेसून दागदागिने घालून सजविले जाते .आलेल्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य असतो.
दुसऱ्या दिवशी पत्रे फुले वाहून पूजा करून तिची प्रतिष्ठापना करतात. दुपारी पुरणपोळी ,16 भाज्या, चटणी ,कोशिंबीर असा नैवेद्य दाखवून सवाष्ण वाढली जाते .तिसऱ्या दिवशी दहीभात, मुरडीचे कानवले नैवेद्य दाखवून संध्याकाळी अक्षता टाकून विसर्जन केले जाते.
कोल्हापूर भागात तांब्यावरची गौर असते .पूर्वी मातीच्या सुगडाचा वापर केला जाई. परंतु हल्ली तांब्याचा तांब्या रंगवून त्यावर एका बाजूला गौरीचा चेहरा ,दाग दागिने ,हात काढले जातात .तर मागील बाजूस गो पद्म ,चंद्र, सूर्य ,शंख ,गदा चुडा इत्यादी शुभचिन्हे काढली जातात.
कोकणात वेंगुर्ले परिसरात सारस्वतांच्या घरी गणपतीची आई म्हणून गौरी पूजली जात असल्यामुळे गणपती आगमनाच्या आधी एक दिवस गौर येते महादेवासह. सुपात तांदूळ घेऊन त्यात पाच झाडांच्या फांद्या ठेवतात आणि त्या भोवती महादेव पार्वतीचे चित्र असलेला कागद गुंडाळतात .गणपतीच्या आधी आई-वडिलांची पूजा होते. हळदीच्या पानातल्या पातोळ्या आणि पाच प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो .आगमनानंतर आणि विसर्जना आधीही काकडी, नारळ, तांदूळ घेऊन गौरीची ओटी भरली जाते .या गौरीचे विसर्जन तिसऱ्या दिवशी झाडाखाली केले जाते.
सी.के.पी लोकाकडे तेरडा व खड्यांच्या गौरी पूजल्या जातात . माहेरवाशीण ही गौर घरात आणते .तेरडा व सात खडे सुपात घेऊन आणलेल्या माहेरवाशीच्या पायावर दूध पाणी घालून तिला ओवाळून घरात घेतले जाते .कुंकवाचे पाणी केलेल्या परातीत पावलं बुडवून घरात काढलेल्या रांगोळीच्या पावलावरून लाल ठसे उमटवत माहेरवाशीण चालते ,प्रत्येक खोली तिला औक्षण करून विचारले जाते ,”गौरी कुठे आलीस “ती उत्तर ते दिवाणखान्यात मग दिवाणखान्यात काय दिसले ?गौर घेतलेली माहेरवाशीण यजमानांच्या वैभवाचे, प्रगतीचे वर्णन करते नंतर सर्व खोलीत गौर फिरवल्यानंतर गणपतीच्या शेजारी तिला बसवतात मग मुखवटा लावून साडीचोळी नेसून शृंगारण्यात येते .सौभाग्यवाणासह गौरीची खणा नारळाने ओटी भरतात. या दिवशी खीर भाजी भाकरीचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा व तिसऱ्या दिवशी खीर व मुरड घातलेले कान्होले नैवेद्य असतो. पुन्हा मुरडून आमच्या घरातील असं मागणी करतात.
अशा रीतीने प्रत्येकाच्या घरी गौरीचे पूजन होत असते.
वाचनात आलेली माहिती
संग्राहिका – सौ. अर्चना सुरेश देशपांडे
पुणे
मो. ९९६०२१९८३६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
प्रत्येक भाषेत प्रत्येक शब्दाला पर्यायी शब्द उपलब्ध असतातच.ते समानार्थी तरी असतात किंवा त्या शब्दाच्या अर्थछटेशी जवळीक दाखवणारे तरी. मात्र क्वचित कधी वरवर एकाच अर्थाचे वाटणाऱ्या दोन शब्दांमधे ठळकपणे विरोधी सूर उमटत असल्याचे प्रत्ययास येते. ‘अधिक’ आणि ‘अति ‘ हे मराठी भाषेतले असे दोन शब्द! यातील ‘अधिक’ या शब्दात सकारात्मकता ओतप्रत भरलेली तर ‘अति’ हा शब्द थेट नकारात्मकतेकडे झुकणारा!
‘अधिक’म्हणजे जास्त, जादा. हे झाले त्याचे सर्वसाधारण अर्थ. पण त्याच्या वरकड, वरचढ या अर्थांतून वेगळीच छटा दृश्यरूप होते. अतिरिक्त, फार हे दोन्ही अर्थ अपेक्षा आणि वास्तव यातील संख्यात्मक किंवा गुणात्मक प्राबल्य ध्वनित करतात. गैरवाजवी, सव्याज, बहुसंख्य या अर्थांचा रोख वर उल्लेखित अर्थांपेक्षा सर्वस्वी वेगळ्या बाबींकडे जाणवतो.
‘अधिक’ या शब्दाच्या संयोगाने तयार झालेल्या इतर अनेक शब्दांचे अर्थ,रंग,रुप आणि आवाका विचारात घेतला तर एखाद्या शब्दाची व्याप्ती किती थक्क करणारी असू शकते याची प्रचिती नक्कीच येईल.उदाहरणार्थ अर्धेअधिक,निम्मेअधिक, सर्वाधिक, अधिकउणा, अधिकरण, अधिकाधिक, अधिकार,अधिकाराग्रहण यासारखे ‘अधिक’ शब्दाचे बोट धरून आपली स्वतंत्र वाटचाल करणारे कितीतरी शब्द! ‘अधिक’ या शब्दाला अपेक्षित असणारे ‘अधिक्य’ या शब्दांनाही अभिप्रेत आहेच आणि हे अधिक्य हाच या सर्व शब्दांचा ठळक असा गुणविशेष आहे!
‘अधिक’ आणि ‘उणे’ या परस्परविरुद्ध अर्थ असणाऱ्या दोन भिन्न शब्दांची न् आपली पहिली भेट आणि ओळख होते ती एकत्रितपणेच आणि तीही अगदी आपल्या बालवयात.याला निमित्त असतं प्रथमच नव्याने परिचय होणाऱ्या गणित या विषयाचं! तेव्हापासूनच ‘अधिक ‘ आणि ‘उणे’ हे शब्द एरवीही कधी कानावर पडले तरी नजरेसमोर येतात ती गणिताला अभिप्रेत असणारी त्यांची विशिष्ट अशी चिन्हांकित रुपेच.
या दोन्ही शब्दांना अपेक्षित असणारी बेरीज आणि वजाबाकी आयुष्यातही समजून घेतली तर जगणं अधिकच अर्थपूर्ण होईल.जगणं खरंतर सर्वांनाच आनंदी असावं असंच वाटतं खरं,पण त्या आनंदाचं गणित मात्र सांख्यिकी गणितासारखं किचकट होऊन बसतं बऱ्याचदा.योग्यवेळी हितकारक गोष्टींची बेरीज आणि अहितकारक गोष्टींची वजाबाकी करता आली तर किचकट वाटणारं आनंदाचं गणित नकळत सहज सोडवता येईल.ते कसं सोडवायचं हे सांगायला वेळोवेळी आपल्याला सहाय्यभूत होतात त्या अनेक अर्थपूर्ण शब्दांच्या सहाय्याने आकाराला आलेले सार्थ वाक्प्रचार न् म्हणीच!
अगदी ‘अधिक’ या शब्दाच्या संदर्भापुरता विचार केला तरी अशा कितीतरी म्हणी चटकन् आठवतात.’अधिकस्य अधिकं फलं’ असा संदेश देत सत्कर्मांना प्रवृत्त करतानाच त्या ‘अति सर्वत्र वर्जयेत’ अशा उपदेशाबराबरच ‘अति तेथे माती’ असा सावधानतेचा इशाराही देतात.त्या सगळ्याच जगण्याची दिशा दाखवणाऱ्या म्हणींना अभिप्रेत असणारं जगणं समजून घेतलं तरच आयुष्यातलं आनंदाचं गणित किचकट न वाटता सहजपणे सुटणं अधिकच सुलभ होईल एवढं खरं!!
केस मोकळे सोडलेले,कपाळावर ठसठशीत कुंकू,डोईच्या मधोमध पाडलेल्या भांगामध्ये कुंकवाची जाडसर रेघ,गळ्यात लांब मंगळसूत्र…अशी ती,बहुदा नवविवाहिता,अनवाणी पायांनी लोकल रेल्वेगाडीच्या पुढ्यात उभी होती. मोटरमनने शक्य होईल तितक्या जोराने हॉर्न वाजवला तेंव्हा ती पटकन बाजूला झाली….आणि गाडी आणखी पुढे सरकताच पुन्हा गाडी समोर आली. यावेळी मात्र ती दोन्ही रूळांच्या मधोमध पालथी पडली…मान एका रूळावर ठेवून. ‘हे भगवान! मध्यम वयाचा तो मोटरमन उदगारला…त्याची इच्छा असूनही गाडी थांबू शकणार नव्हती! गाडी तिला स्पर्श करणार त्या अगदी शेवटच्या क्षणाला तिने चटकन आपली मान बाजूला घेतली! पण तिचं शरीर तर दोन्ही रूळांच्या मधोमध होतंच….मोटरमनने एक क्षणासाठी डोळे बहुदा मिटून घेतले असावेत. खाडकन आवाज झाला…रेल्वेचा एक डबा तिला ओलांडून पुढे गेला होता…मोटरमनने पटकन गाडीमधून खाली उडी मारली. ती गाडीखाली निपचित पडलेली. तो पुन्हा गाडीत चढला आणि गाडी मागे घेतली. तिच्या किंकाळ्यांनी ऐकणा-यांची मनं बधीर झाली होती! उजव्या हाताची चार बोटं जागेवर नव्हती आणि डोक्याला डाव्या बाजूला मोठी खोल जखम! तिला दवाखान्यात न्यायला किमान वीस मिनिटे लागणार होती….ती वाचण्याची शक्यता नव्हती आणि तिच्या डोळ्यांतली जगण्याची आशा केविलवाण्या नजरेने सभोवार पहात होती…….का नाही बघणार? कुणाला मरायचं असतं?
तो कितीतरी वेळ त्या उंच पुलाच्या अलीकडे असलेल्या दिव्याच्या खांबाखाली बसून राहिला. पुलाखाली खोल समुद्र शांतपणे वा-यावर डुलत होता. येणारे-जाणारे आपापल्या येण्या-जाण्यात मश्गूल होते. तो तिथून उठणार इतक्यात तिथून जाणारी एक महिला त्याच्याजवळ थांबली. तिला तिच्या लहानग्या मुलीसोबत त्या पुलाच्या आणि समुद्राच्या पार्श्वभूमीवर एक छानसा फोटो काढून हवा होता. त्याने मोठ्या आनंदाने त्या मायलेकींचे फोटो काढून दिले. ती महिला आणि ती लहान मुलगी त्याला हसून टाटा करीत तेथून निघून गेले. कुणीतरी थोड्यावेळासाठी का होईना,खोटं खोटं का होईना छान बोललं, याचं समाधान त्याला मिळालं. पण पुन्हा त्याचं मन त्याच्या खाजगी आयुष्यात डोकावलं आणि तो पुलाकडे निघाला. कितीतरी वेळ त्या पुलाच्या कठड्यावर खोल समुद्राकडे पाय सोडून बसून राहिला….आणि एका क्षणी त्याने स्वत:ला खाली झोकून दिले! खाली पाण्यापर्यंत त्याचं शरीर पोहोचायला काही सेकंद तर लागणारच…ते पाच-सहा सेकंद त्याला युगासारखे भासले…आपण चूक करतो आहोत…नव्हे केलीच आहे याची त्याला जाणीव झाली! आता फार उशीर तर झाला नाही ना….हा विचार करायला? कुणीतरी आपल्याला वाचवायला हवं! आता त्याला मरायचं नव्हतं! कुणाला असं मरायचं असतं?
तिला जणू आता काहीही जाणवत नव्हतं…वेदनेच्या संवेदना मेंदूकडे वाहून नेणा-या नसा काळवंडून गेल्या होत्या…स्वत:चाच चेहरा आरशामध्ये बघण्याची सोय नव्हती राहिली….आणि दुसरं कुणीही या तिच्या चेह-याकडे पाहण्याची हिंमत दाखवत नव्हतं! त्यांना माहित होतं की आगीच्या धगीनं हिच्या शरीरातली धुगधुगी जवळ जवळ विझवत आणलेली आहे…फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे…हीची सुटका होईल आणि आपलीही! तिने तिच्या आयुष्यात असं कुणाला तरी मरताना पाहिलं होतं…पण तिला नाही मरायचं असं..आणि इतक्यात. कुणाला असं मरायचं असतं?
आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं ही तर समस्त प्राणी जगताची अंत:स्थ प्रेरणा. मग का कुणी असं या स्वत:च्या अस्तित्वच्या जीवावर उठतं? एरव्ही आपल्याला वेदना होतील,आपला जीव जाईल म्हणून स्वत:ला पदोपदी जपणारं माणूस,अगदी एवढ्याशा काट्यच्या एवढ्याशा टोकालाही बिचकणारा माणूस असा एकदम स्वत:ला त्या अंध:कारात का बरं झोकून देत असेल…काही समजत नाही!
दुस-या कुणीतरी आपल्याला जन्माला घातलं आहे…त्यामुळे दिला गेलेला जन्म आपला आपण मरणात परावर्तीत करण्याचा अधिकार आपल्याला नाही…असा विचार शहाणी माणसं करतात आणि प्राक्तन भोगत जीवनाच्या वाटेवर रक्ताळलेल्या पावलांनी चालत राहतात. त्यांना ठाऊक असतं की या वाटेवर कुठे न कुठे तरी एखादं सावलीचं झाड असतंच,त्याच्या खाली चार-दोन मखमली फुलं पडलेली असतात. इथं क्षणभर विश्रांती घेता येईल की. कुठंतरी एखादा झरा आढळेल आणि जन्माची तृष्णा निववता येईल. अगदीच आणि काहीही सुख नाही असं आयुष्य असूच शकत नाही मूळी. श्वास घेणं काय कमी सुखावह आहे? पाण्याखाली मिनिटभर डोकं बुडवून पाहिल्यावर कळतं की श्वासांमधलं सुख!
एखाद्या जागी पोहोचण्याचे दोन मार्ग असतात…लांबचा मार्ग अवघड पण सुरक्षित. जवळचा मार्ग त्याचं हशील वसूल करून घेतो वाटसरूंकडून. याच जवळच्या मार्गावरून काहीजण जाण्याचा प्रयत्न करतात आणि अकाली मरणाच्या वाटमारांना बळी पडतात!
समस्त जगताच्या कल्याणासाठी प्राणार्पण करणारे दधिची मान्य आणि पुज्य! पण संघर्षाला पाठ दाखवून पळणारे कोणत्याही दयेस पात्र नाहीत. किमान त्या दुस-या दुनियेत तर नाहीतच नाहीत. अर्थात हा विचार धर्मपरत्वे बदलत जात असावाही. पण कुठंही गेलं तरी आगंतुकपणे जाणे स्वत:ला अपमानास्पद तर आहेच पण जिथं जातो आहोत त्यांनाही संकोचून टाकणारं!
राग,चिंता,निराशा,वैफल्य,मान-सन्मानाच्या,अपमानाच्या बेगडी कल्पना इत्यादी शेकडो कारणांनी माणसं आपल्याच हातांनी जेंव्हा आपली जीवनपुष्पे कुस्करून टाकतात तेंव्हा ती मागे राहिलेल्यांसाठी दुर्गंधीच सोडून जातात… वेदनांची! मृत्यूनंतर काय? हा प्रश्न कदाचित जगन्नियंत्यास कायम अनुत्तरीत रहावा, असं वाटत असावं असं वाटतं…कारण आजवर त्याचं विश्वासर्ह उत्तर नाही गवसलेलं! किंवा मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या लोकोक्तीनुसार प्रत्यक्ष अनुभवता न येणारं हे उत्तर असल्यानं…ते अविश्वसनीय वाटणंही साहजिकच आणि क्षम्यही! पण जाणारा कदाचित सुटून गेला असं वाटत असलं तरी त्याच्या मागे राहणारे आयुष्यभर पितामह भिष्मा सारखे बाणांच्या शय्येवर निजत असतात….हे मात्र अनुभवास येऊ शकते!
एखाद्याला आपल्यातून उठून जावंसं वाटतं याचाच अर्थ आपलं त्याच्याकडे पुरेसे लक्ष नव्हतं. त्याचं ऐकून घेण्याची तसदी आपण नाही घेऊ शकलो..उलट त्यालाच ऐकवत राहिलो आपण..आपलंच रडगाणं!
मग त्यांनाही वाटूच शकतं ना…आपण गेल्यावर यांनाच त्रास होईल,मग कळेल यांना आपली किंमत!
दरवर्षी असं जगातल्या सात लाख लोकांना वाटतं! १० स्पटेंबर हा दिवस अशाच माणसांसाठी आहे. आपल्या प्रेमाच्या माणसांच्या सतत आगेमागे रहा..त्यांना उपद्रव होणार नाही अशा बेतानं. देवानं आपल्याला दोन कान दिलेत…एक हृदय दिलंय…दोन डोळे दिलेत…ऐकायला,विचार करायला आणि बघायला. एक मेंदू दिलाय अंदाज घ्यायला…धोके ओळखायला. आपल्या लोकांना याचा लाभ द्यायला आपण मागे राहून चालणार नाही!
कुणालाही मरायचं नसतं…स्वत:चं स्वत: तर कधीच मरायचं नसतं…म्हणूनच मरू पाहणारी शेवटच्या क्षणी जगू पाहतात! चला, या जागतिक आत्महत्या विरोधी दिनाच्या निमित्ताने आपल्या माणसांशी संवाद साधायला आरंभ करूयात! ज्यांच्याशी आपण रक्ताने,नात्याने आणि समाजाने बांधले गेलो आहोत..ती सर्व आपलीच माणसे आहेत. कुणालाही एकटं पडू देता कामा नये!
कुणाला जगण्यानं छळलं असलं तरी मरणानं सुटका करेपर्यंत थांबण्याचं धैर्य त्याच्यात निर्माण करणं म्हणजे आपण त्याचं हितचिंतक असणं! शतदा नव्हे तर अगणितदा प्रेम करावं, असा जन्म लाभलेले आपण….प्रेम करीत रहावे…बोलावणे येईपर्यंत!
(दहा सप्टेंबर…जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन. यानिमित्त सुचलेलं. यातील पहिला प्रसंग नजरेसमोर घडलेला पंचवीस वर्षांपूर्वी घडलेला…अजून जसाच्या तसा नजरेसमोर तरळणारा. यातून सकारात्मक विचार प्रसारीत व्हावेत, अशी भाबडी आशा मनात ठेवून केलेला अभिनिवेशविरहीत शब्दप्रपंच. संभाजी बबन गायके. ९८८१२९८२६०)