विविधा
☆ “निर्व्याज…” ☆ सुश्री धनश्री लेले ☆
रत्नागिरीला एका कार्यक्रमासाठी गेले होते, पावसाळ्याचे दिवस होते. तुफान पाऊस पडत होता. कार्यक्रम रात्री ९ चा होता. संध्याकाळी ७ नंतर आवरायला घेतलं, एवढय़ात दार वाजलं. आत्ता कोण? अशा प्रश्नांकित चेहऱ्यानेच मी दार उघडलं. एक पासष्टीच्या काकू उभ्या होत्या.
‘‘धनश्री लेले तुम्हीच ना?’’
मी म्हटलं, ‘‘हो. या ना आत.’’
त्या आत आल्या. बऱ्याचशा भिजल्या होत्या. दोन हातांत दोन मोठय़ा पिशव्या होत्या. त्या बसल्या. मनात आलं, ‘आवरायचं आहे, साडेसातपर्यंत थिएटरला पोहोचायचंय, आता किती वेळ जाणार आहे काय माहीत.’ माझ्या मनातला हा प्रश्न समजून घेऊनच जणू त्या म्हणाल्या, ‘‘अगं, तुझा वेळ नाही घेत. खरंतर बसतही नाही, पण जिने चढून आले ना, थोडी धाप लागली म्हणून बसले.’’
‘‘छे छे बसा की. माझं होईल वेळेत आवरून..’’ मी असं म्हटलं होतं खरं.. पण या कोण काकू? आणि यांचं माझ्याकडे नेमकं काय काम आहे? हा पुढचा प्रश्न मनात उभा. जणू त्यांना तोही कळला. म्हणाल्या, ‘‘तू मला ओळखणार नाहीस म्हणजे गरजच नाही ओळखण्याची. मी पाध्ये काकू. माझं काही काम नाही हो तुझ्याकडे. सहज तू रत्नागिरीत येणार आहेस कळलं म्हणून तुला भेटायला आले.’’
‘‘इथेच असता का तुम्ही?,’’ मी विचारलं.
‘‘नाही इथे माझी मुलगा-मुलगी असतात, पण मी राजापूरजवळ भू गावात राहते. महाराष्ट्रातलं एकाक्षरी एकच गाव भू..’’ त्यांनी माहिती पुरवली. ‘‘काकू तुम्ही शिक्षिका होतात का?’’ असं अगदी ओठावर आलं होतं. पण नाही विचारलं.
‘‘काकू तुम्ही मला कसं ओळखता? मी काही टीव्हीवर वगैरे नसते त्यामुळे इतक्या आत भूपर्यंत माझ्याबद्दल कसं कळलं?’’ अगदी सहज ओघात विचारलं.
‘‘अगं, मागे तुझ्यावर चिटणीस सरांनी एका पुस्तकात लेख लिहिला होता, ते पुस्तक वाचलं होतं.. आम्ही tv नाही गं जास्त बघत. हां पुस्तकं वाचतो. तर ते पुस्तक वाचल्यापासून तुला भेटायची इच्छा होती मनात.. आज वृत्तपत्रामध्ये तुमच्या कार्यक्रमाची जाहिरात बघितली नि आले..’’
‘‘अहो, पण एवढय़ा पावसात?’’
‘‘अगं, पावसाचं काय? आमच्या कोकणाचा जावईच तो.. पडायचाच.. एस.टी. असते ना संध्याकाळची.. मग निघाले. दीड-दोन तास लागतात भू गावातून यायला..’’ काकू म्हणाल्या.
‘‘बसा, चहा सांगते तुम्हाला.’’
‘‘अगो छे, तुझं आवर तू.. तुला या पिशव्या दिल्या की मी निघाले..’’ असं म्हणून काकूंनी त्या मोठय़ा दोन पिशव्या माझ्या हातात दिल्या..
‘‘काय आहे यात?’’
‘‘काही नाही गो, आम्ही कोकणातले लोक काय देणार? पानाची डावी बाजू आहे..’’, काकू म्हणाल्या.
‘‘म्हणजे?’’ मी चक्रावून विचारलं.
‘‘अगं, त्या पुस्तकातून कळलं की तुझे बाहेर खूप दौरे असतात, बराच प्रवास करतेस.. घरात रोजच्या कामालाही वेळ होत नसेल मग डाव्या बाजूच्या गोष्टी काय करणार तुम्ही मुली? म्हणून आंब्याचं, आमोशीचं लोणचं. सांडगी मिरच्या, मेतकूट, दोन-तीन प्रकारचे मुरंबे, दोन-तीन प्रकारच्या कोरडय़ा चटण्या, खाराची मिरची, आंब्याची साठं, कुळथाचं पीठ असं थोडं थोडं घेऊन आलीय..’’
थोडं थोडं? बाप रे.. मला पिशव्या उचलवत नव्हत्या.. आणि या काकू एस.टी.ने पावसात एवढय़ा जड पिशव्या घेऊन आल्या..
‘‘अगं, डावी बाजू अशी तयार असली ना की पोळी पटकन खाता येते मुलांना.. पोळीशी काय? हा प्रश्न राहत नाही.. तूही रात्री यायला उशीरबिशीर झाला तर पोळीबरोबर हे खा हो..’’
भरल्या डोळ्यांनी, नि:शब्द होऊन मी एकदा काकूंकडे आणि एकदा त्या पिशव्यांकडे पाहत उभी होते.. पिशव्या खाली ठेवल्या आणि काकूंना मिठी मारली..
कोण होते मी त्यांची? काय नातं होतं आमचं? घरची माणसंही कदाचित हा विचार करणार नाहीत मग काहीशे किलोमीटर लांब राहणाऱ्या काकूंनी एवढा विचार का करावा? स्वत:ला होणाऱ्या त्रासाचा विचारही न करता केवळ मला हे सगळं देता यावं म्हणून एवढय़ा लांब आल्या त्या? काय बोलू?
शब्दापेक्षा कृती नेहमीच मोठी असते हे शब्दांना कळलं असावं म्हणून शब्द खूप आत दडून बसले असावेत.. धन्यवादाचा एक शब्द मी उच्चारू शकले नाही.. ‘धन्यवाद.. थॅंक्यू..’ या शब्दांना इथे काय मोल होतं? नाही म्हणायला एकच शब्द मनात उभा होता. निर्व्याज.. खरंच निर्व्याज.. काय मिळवायचं होतं त्यांना?
‘‘जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, बघतील त्याचं ते..’’ अशी वृत्ती अवतीभोवती सतत दिसत असताना .. गेल्या युगात शोभेल अशी ही निर्व्याज वृत्ती काकूंनी कशी काय सांभाळली? खरंच! माझा काय फायदा? मला काय मिळणार आहे? कृती करण्यापूर्वीच हे प्रश्न पडतात सध्या आपल्याला.. सध्या कशाला? दासबोधाची पहिली ओवी.. त्यात ही ‘श्रवण केलियाने काय प्राप्त’ असा सवाल श्रोते विचारतील. श्रवण करण्यापूर्वीच असा विचार समर्थानीही केला. फायद्याशिवाय जन नाही.
पण इथे मात्र संपूर्ण वेगळं चित्र पाहत होते. कोण कुठली दुसरी व्यक्ती. जिचा आपल्याशी दूरान्वयेही संबंध नाही तिचा एवढा विचार करून, तिला आपण थोडं तरी सहकार्य करू या. हा असा विचार म्हणजे रामराज्यच! आपण या गोष्टीला ‘लष्कराच्या भाकऱ्या भाजणे’ अशी रोखठोक म्हण देऊन ठेवलेली आहे. पण लष्करालाही भाकऱ्या लागतात आणि त्या भाजणारेही कोणीतरी असतातच. स्वातंत्र्य दिनाला कमरेएवढय़ा पाण्यात उभं राहून गस्त घालणाऱ्या सैनिकाचा फोटो ..सबसे तेज ..व्हॉट्स अपवर अपलोड करून व्हर्च्युअल अश्रू गाळणारे आपण असं कोणी करत असेल निर्व्याज प्रेम तर लष्कराच्या भाकऱ्या भाजतोय.. असं म्हणून मोकळं होतो.
मनात विचार आला हे असं निर्व्याज वागायला कधी तरी जमणार आहे का आपल्याला? निसर्ग निर्व्याजच वागत असतो.. झाडं स्वत:ची फळं स्वत: खात नाही.. नदी स्वत:चं पाणी स्वत: पीत नाही, गाई स्वत:चं दूध स्वत: पीत नाहीत.. आठवीत संस्कृतमध्ये या आशयाचा श्लोक पाठ केला होता.. त्यात नदी होती, गाय होती, झाडं होती, पण माणूस नव्हता.. कारण तो सुभाषितकार या काकूंना भेटला नव्हता. ‘ऐंशी कळवळ्याची जाति करी लाभाविण प्रीती’ लाभाविण प्रीती.. बाप रे. कल्पनाही सहन होणार नाही आजच्या काळात..
‘‘पुन्हा येशील तेव्हा कळवून ये हो.. म्हणजे छान मोदक वगैरे करून आणीन..’’ काकूंच्या बोलण्याने मी भानावर आले.. ‘‘आणि यातलं काही संपलं आवडलं तर नि:संकोच सांग. पाठवून देईन मुंबईस.’’ मनात आलं म्हणावं, काकू नका आता आणखी काही बोलू. तुमचं हे निर्व्याज प्रेम घ्यायला आमच्या ओंजळी समर्थ नाहीत हो.. ‘तुझमे कोई कमी नही ..मेरी ही झोली तंग है’..’’
काळ्या ढगांनी भरलेल्या आभाळात लख्ख वीज चमकावी आणि तेजाने सगळा आसमंत उजळून निघावा.. तशा त्या कोसळणाऱ्या पावसात आलेल्या काकू मला वाटल्या. एक ज्योत उजळली त्यांनी मनात. आता बाहेरच्या ‘मी, माझा’च्या वाऱ्यापासून तिला जपण्याचं काम करायचं होतं.. खूप कठीण..
© सुश्री धनश्री लेले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈