मराठी साहित्य – विविधा ☆ आजच्या दहिहंडी वरील छान विवेचन!!! ☆ अनामिक ☆

🌸 विविधा 🌸

☆ आजच्या दहिहंडी वरील छान विवेचन!!! ☆ अनामिक ☆

अष्टमीचा अर्धचंद्र विलक्षण सौंदर्यानं लकाकत होता … समुद्राच्या लाटा त्याला भेटायला अधीर झालेल्या … आणि तशात पांढऱ्या शुभ्र वाळूवर प्रकाशाचा प्रकाशझोत पडला … तेज:पुंज पुष्पक विमान वाळूवर अलगद उतरलं … आणि दरवाजा उघडला तसा इवलासा कान्हा धावत बाहेर आला … पाठोपाठ पेंद्या आणि बाकीचे बालगोपाल उतरले … कान्हा वळला आणि उत्साहात म्हणाला … सखे हो … आज किमान दहा हंड्या फोडायच्या बरं .. दही .. दूध .. लोणी .. सगळी चंगळ करून टाकायची … पेंद्या पुढे आला आणि कान्हाच्या डोईवरचं उत्साहानं थरथरणारं मोरपीस सरळ करत म्हणाला .. आधी वाटणी ठरवायची … कान्हा … कान्हाला काही कळेना … तो म्हणाला .. माझ्या हातचा दहीभाताचा घास मोत्यांच्या घासापेक्षा मौल्यवान मानणारी तुम्ही मंडळी .. अचानक .. पेंद्या म्हणाला … काळ बदलला .. कान्हा … आता हंड्या दह्याच्या नाही .. रुपयांच्या लागतात. लाखांत बोली लागते .. मग आम्ही दहीभाताच्या घासावर समाधान कसं मानायचं ? कान्हा समजुतीच्या स्वरात म्हणाला .. मग काय हवं तुम्हाला .. ? पेंद्यानं एकवार बाकीच्या बालगोपालांकडे पाहिलं … नि म्हणाला … बक्षिसात सारखा वाटा … सेलिब्रिटी बरोबर फोटो .. स्टेजवर एन्ट्री … मिडियासमोर बाईट ची संधी … आणि अपघाती विमा … कान्हाला आता हसू आवरेना. तो थेट पुष्पक विमानाच्या दिशेनं चालायला लागला … पेंद्या गोंधळला … म्हणाला … इतकं टोकाचं का वागतोयस … ? काहीतरी सुवर्णमध्य काढू हवं तर … काही मागण्या कमी जास्त करून .. कान्हा वळला … हसला. पेंद्याजवळ आला .. खांद्यावर हात ठेवून ममत्वानं म्हणाला .. प्रयोजनच संपलंय रे सगळं … ! पेंद्या .. मला घरात दूध दही मिळत नव्हतं म्हणून हंड्या फोडायचो का रे मी .. ? एकत्र या … मनोरा बांधा आणि ध्येय साध्य करा … इतका साधा सरळ विचार … पण ते चार हात एकमेकांच्या खांद्यावर ठेवण्यामागे माणसं जोडण्याची प्रेरणा होती … मुठभर दहीभात घासाघासाने खाण्यात अर्धी भाकरी प्रेमानं वाटून घेण्याची दीक्षा होती .. तेव्हा कान्हा हाच सेलिब्रिटी होता … त्याचा सहवास ही मोक्षाची संधी होती आणि कान्हाची बासरी ऐकायला मिळणं ही बक्षिसाची सर्वोच्च कल्पना होती … अपघात होईल अशी साधी कल्पना ही कधी मनाला शिवायची नाही .. कारण साक्षात शिव सोबत असताना जीवाची भिती कसली … ? पण आता तुझ्या बोलण्यातून जाणवलं .. आता तो विश्वास संपलाय … एकत्र येण्याची उमेद संपलीय … थर वाढले … पण श्रद्धा संपलीय … माझा जन्म हा आता सोहळा न रहाता इव्हेंट बनलाय … आता इथे न आलेलंच उत्तम .. आणि त्यानं विमानात पहिलं पाऊल ठेवलं सुद्धा … पेंद्याला एव्हाना चूक कळली होती … तो घाईनं म्हणाला .. पण कान्हा … कान्हा शांत स्वरात म्हणाला .. अष्टमी येत राहील … पण त्यात कान्हा नसेल … आणि काळजी करू नकोस … कॉर्पोरेट विश्वात रमलेली माझी भक्त मंडळी कान्हा शिवाय हा सण असाच साजरा करत रहातील .. असा म्हणून तो आत गेला सुद्धा … क्षणात आतून बासरीचे करुण स्वर ऐकू येऊ लागले आणि पेंद्यासह बालगोपाल मंडळी जड पावलांनी विमानाच्या दिशेने चालायला लागली..

– अनामिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शिक्षक –बदलते स्वरूप… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ शिक्षक –बदलते स्वरूप… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.  शिक्षक हे समाजातील सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या हातूनच समाजाचा पाया रचला जातो. शिक्षकांची गुणवत्ता जितकी दर्जेदार तितकेच चांगले विद्यार्थी घडले जातात. समाजाचा मुलभूत घटक खरेतर शिक्षकच आहे. पुर्वी समाजात कोणतेही शुभकार्य असो , शिक्षकांची उपस्थिती महत्त्वाची मानली जात होती. इतकेच नाही तर गुरूजी, सर समोरून येताना दिसले की, आपोआप नजर खाली जाऊन शिक्षकांबद्दल विलक्षण आदर, त्यांचा दरारा मनात येत असे. पण आज कुठेतरी हे चित्र बदलताना दिसत आहे.

पुर्वी ज्ञान मिळवण्याचे एकमेव साधन शाळा आणि गुरूजी अथवा सर हेच होते. पण आज संगणक युग आले, लहान मुलांपासून ते काॅलेजात जाणाऱ्या युवकांपर्यंत हातात मोबाईल आले आहेत. जरूरी असणारी सर्व माहीती गुगलवर मिळू लागली आहे.  त्यामुळे शिक्षकांचे महत्त्व कमी होत चालले आहे. दुसरे म्हणजे आज गल्ली गल्लीतून शिकवणी वर्ग घेतले जात आहेत. यामुळे ज्ञानाचे मुख्य केंद्र असणारे, शाळा आणि शिक्षक यांचे समाजातील स्थान ढासळत चालले आहे. शिक्षकांबद्दल असणारा आदर, त्यांचा दरारा आजच्या विद्यार्थ्यांमध्ये फारसा दिसून येत नाही.  काही ठिकाणी तर शिक्षकांना अपमानित करणे, उध्दटपणे बोलणे  असे घृणास्पद प्रकार घडताना दिसतात.  एकेकाळी शिक्षक हे समाजातले आदरस्थान होते. पण आज शिक्षकांचे समाजातील महत्त्व कमी होत चालले आहे.  ही स्थिती समाजासाठी घातकच ठरेल.  कारण आजचे विद्यार्थी हे उद्याचे, भावी नागरिक असतात.  शिक्षकांच्या हाताखालीच हे समाजाचे खांब मजबूत, गुणवंत, आदर्शवादी होत असतात. त्यामुळे शिक्षक हेच भावी समाजाचे ‘आधारवड ‘ आहेत. समाजाने सुध्दा शिक्षकांचे आजचे ढासळणारे स्थान,  महत्त्व इ. बाबींना सावरले पाहिजे.  ‘ शिक्षक हेच गावातील बहुमूल्य व्यक्तिमत्त्व आहे  ‘ हा विचार समाजमनावर कोरला जावा.

दुसरे म्हणजे स्वतः शिक्षकांनी सुध्दा आपले शाळेतील  ,समाजातील स्थान अबाधित राहील याकडे लक्ष देऊन उत्तम ज्ञानदान करावे. वर्गात शिकविताना ज्या विषयाचे संपूर्ण ज्ञान आहे असाच विषय अध्यापनास निवडावा. शिक्षकांनी आपल्यातील गुणवत्ता ही फक्त हुशार विद्यार्थी अधिक हुशार कसा होईल याकरताच न वापरता, वर्गातील सर्वसामान्य विद्यार्थीसुध्दा उत्तम व्हावा याकडे लक्ष केंद्रित करावे. आपले ज्ञान हे आभ्यासात मंद असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचेल ह्याकरिता प्रयत्न करावेत.  दर्जेदार शिक्षक , शाळा आणि विद्यार्थी या गोष्टीवर सुध्दा समाजाचे भवितव्य अवलंबून असते. वर्गात शेवटच्या बाकावरील विद्यार्थी आणि पहिल्या बाकावरील विद्यार्थी यात शिक्षकांची समदृष्टी असावी.  “आदर्श विद्यार्थी  ,आदर्श शाळा  ,आदर्श समाज  हे प्रत्येक शिक्षकाचे लक्ष्य असावे. शाळा हेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे त्यामुळे शाळेसारख्या पुण्यस्थानी शिक्षणाचा बाजार होवू नये याचे ध्यान आपण सर्व पालक ,विद्यार्थी  आणि सर्व शिक्षक मिळून ठेवले पाहिजेत.

सर्व शिक्षक बंधू -भगिनींना शिक्षकदिनाच्या खुप खुप शुभेच्छा !

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कल्हईवाला… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ कल्हईवाला… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

बालपणीच्या आठवणी जागवणारी एक व्यक्ती आहे. मी लहान असताना आमच्या घरासमोर एक कल्हईवाला बसायचा.कल्हई म्हणजे पितळी भांड्यांना शुद्ध कथिलाचा पातळ लेप लावणे.

रोज भांड्याचा ढीग त्याच्या पुढे असायचा आणि त्याची कारागिरी बघणे हा आमचा आवडता उद्योग.काम करता करता तो गाणी म्हणायचा, गप्पा मारायचा.त्याचे ते भांडे लाल लाल तापवणे त्यात ती चमकदार काडी थोडीशीच लावणे आणि जादू केल्या प्रमाणे भांडे चकचकित करणे हे बघणे फार आवडायचे.

सगळ्या गावाची भांडी त्याच्याकडे येतात याचा त्याला फार अभिमान असायचा.बघ मी सगळ्यांचे आरोग्य कसे छान ठेवतो म्हणायचा. त्याचा आविर्भाव कोणत्याही राजा,डॉक्टर पेक्षा कमी नसायचा.त्याचे महत्व आत्ता पटत आहे.

या लेखाच्या निमित्ताने मी हे महत्व सांगण्याचा एक छोटा प्रयत्न करणार आहे.जे माझ्या वाचनात आले.काही मोठ्या जाणत्या लोकांकडून समजले व काही अनुभवाने समजले.शुद्ध कथिल विषारी नसते.त्यात लोणचे,दही कळकत नाही.

कल्हई साठी कथिल वापरले जाते ते आपल्या शरीराला खूप आवश्यक असते.सध्या तेच मिळत नसल्याने बऱ्याच आजारांना तोंड द्यावे लागते.

‘सार्थ भावप्रकाश’ या आयुर्वेदावरील ग्रंथात एक श्लोक आहे. त्याचा अर्थ पुढे देत आहे. ‘कथिल  हे हलके, रुक्ष, उष्ण असून मधुमेह, कफ, कृमी, पांडुरोग व दम यांचा नाश करते. ते पित्तवर्धक असून डोळ्याला हितकार आहे. ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या समुदायाचा नाश करतो त्याप्रमाणे कथिल मधुमेहाचा नाश करते. ते सेवन केले तर सर्व इंद्रिये शुद्ध होऊन देहाला सुख लाभते.’

हा अर्थ वाचल्यावर एक विचार आला ‘हल्ली बऱ्याच लोकांना डायबेटीस (मधुमेह) का आहे?

२०-२५ वर्षांपूर्वी एवढा नव्हता. कारण पूर्वी कल्हई केलेली भांडी स्वयंपाकासाठी वापरली जात होती. तेव्हा स्टेनलेस स्टील,

ॲल्युमिनियम, कोटिंग केलेली भांडी नव्हती. पितळेच्या भांड्याला कल्हई करून वापरली जात होती. त्यामुळे कल्हईच्या भांड्यातील स्वयंपाकामुळे नकळत कथिल धातू शरीराला मिळत होता. आता ती भांडी नसल्याने कथिल शरीराला मिळत नाही.

कथिल शरीराला मिळत नाही. मी प्रयोग म्हणून कथिल आणले व स्टीलच्या भांड्यात पाणी घेऊन उकळले आणि ते पाणी पिऊ लागताच चार दिवसात आम्हा घरातील सर्वांना शौचास साफ होऊ लागली. शरीरातील घाण बाहेर फेकली जात आहे अशी जाणीव झाली.

या मुळे पुढील फायदे होतात.

१ पिंपल्स कमी होणे

२ पित्ताचा त्रास कमी होणे

३ मधुमेह खूप कमी होणे

४ पोट साफ होणे

५ दम लागणे बंद होते

६ पंडुरोग नष्ट होणे

७ कृमी नष्ट होणे

८ शरीर शुद्धी होणे

पूर्वी असे आजार दिसत नव्हते.

याला अजूनही कारणे आहेत पण लेखाच्या अनुषंगाने आज कल्हईचे महत्व माझ्या अल्पमतीने व थोड्या अभ्यासाने सांगण्याचा प्रयत्न केला.

गेली सतरा वर्षे आयुर्वेदिक डॉक्टर पितळी पट्टीला दोन्ही बाजूला केलेल्या कल्हई चे महत्व लोकांना सांगत आहेत.ही पट्टी स्टीलच्या पातेल्यात एक लिटर पाण्यात उकळून, गार केलेले पाणी पिऊन त्याचा फायदा झाल्याचे अनेकांनी सांगीतले आहे.

आमच्या पूर्वजांना ही माहिती होती. या माहिती पासून त्यांनी समाजाचे हित बघितले स्वतःपैसा केला नाही म्हणून ते अडाणी होते का? नक्कीच नव्हते.आपल्या पेक्षा आरोग्यदायी जीवन जगत होते.

यातील पटेल ते अंगीकारावे ही विनंती आहे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ओळखावे नव्याने…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “ओळखावे नव्याने…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

आपल्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी नुसार आपल्या सवयी बनत जातात. गाण्याची म्हणजे गाणे ऐकण्याची आवड असली की आपोआप गाणे ऐकल्यावर मन प्रसन्न होत. त्यामुळं रात्री झोपताना एक मस्त गाणं ऐकून झोपल. की झोपेचं समाधान मिळतं. सहसा ह्या गाण्यांमध्ये जुन्या आणि आमच्या काळातील गाण्यांचा समावेश असतो. अगदीं कधी मधी हल्लीच लोकप्रीय गाणं ऐकण्याचा योग आणते.

“चलो एकबार फिरसे अजनबी बन जाय हमदोनो” ह्या गाण्याची व्हिडीओ क्लीप काल बघण्यात आली. सुनील दत्त चा अभिनय आणि मालासिन्हा चे दिसणे मस्तच पण खरंतर हे गाणे लक्षात राहतं त्या गाण्याच्या बोलांनी,चालीनी,आणि त्याच्यातील खूप अर्थपूर्ण शब्दांनी.खरचं किती अफलातून कल्पना नं. आपल्या परिचीत व्यक्तीला अनोळखी समजून त्याची परत नव्याने ओळख करून घेणे.खूपदा या परत ओळखण्याने आपल्याला पहिल्यांदा न दिसलेले गुण दिसतील.कदाचित परत एकदा स्वभावाची नीट ओळख पटेल.परत एकदा एकमेकांना नव्याने ओळखू लागू.जुने काही मनात उगीचच किल्मिष असतील तर आपल्या चुकीची,गैरसमजाची जाणीव होऊन परत एकदा मने साफ होतील.

काहीवेळा अतिपरिचयाने आपण दुस-याच्या मनाचा विचार न करता एकमेकांना ग्रुहीत धरायला लागतो.ह्या परत एकदा एकमेकांना जाणून घ्यायच्या कल्पनेतून कदाचित स्वतः च्या आधी दुस-याचा विचार करायला शिकू.

          “कितीदा नव्याने तुला ओळखावे,

              स्नेहाच्या धाग्यात गुंतत जावे,

              मौनातील इशारे उमजून घ्यावे,

                        शब्दही त्यासमोर फिके पडावे ।।।

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उसळ आणि उसळी ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

🌸 विविधा 🌸 

😅 उसळ आणि उसळी ! 😅🤣😇 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

सेन्सेक्सने उसळी घेऊन पासष्ट हजाराचा टप्पा पार केल्यावर, एक सामान्य माणूस म्हणून, मी माझी प्रतिक्रिया नोंदवू इच्छितो, जी प्रत्येकाने आपापल्या जोखमीवर वाचावी, ही नम्र विनंती !

ही जी काय उसळ अठ्ठावन्न हजाराच्या तापमानला आज उसळी घेऊन रटरटते आहे, तिचा खरा बॉयलिंग पॉईंट काय असेल, असावा, हे भले भले स्वतः अर्थशास्त्र कोळून प्यायलेले अभ्यासक सुद्धा आज पर्यंत सांगू शकले नाहीत, तिथे तुमच्या, माझ्या सारख्या सामान्य लोकांचा काय पाडाव लागणार ? कारण ही जी उसळ ज्या जी जी भाय टॉवर नावाच्या भांड्यात शिजायला ठेवली आहे, त्या भांड्या खालचा गॅस कोणता अदृश्य हात, स्वतःच्या मर्जीनुसार कमी जास्त करतो ते कळतच नाही ! त्यामुळे होतं काय, या उसळीचा स्वाद घ्यायला येणारे नवीन नवीन खवय्ये, ती थोडीशी चाखून सुद्धा, स्वतः गॅसवर गेल्याची अनेक उदाहरणं आपण सगळ्यांनी पहिली आहेत !

फार पूर्वी, शेअर मार्केटरुपी सट्ट्याच्या मुदपाकखान्याच्या वाटेला जाणे हे सामान्य मराठी मध्यमवर्गात निशिद्ध मानलं जात होतं !

माझ्या माहितीतले असेच अनेक मराठी मध्यमवर्गीय जे पूर्वी “कोटात” कामाला जायचे, ते या मुदपाखान्याची पायरीच काय, त्याच्या फुटपाथवरून (तेव्हा ते खरंच होते हो) सुद्धा जात नसत ! उगाच आत शिजणाऱ्या उसळीचा गंध नाकात जाऊन ती उसळ खायची दुर्बुद्धी व्हायला नको !  ही मंडळी तेंव्हा, आपल्या महिन्याच्या पगारात टुकीने संसार करून, त्यातून थोडे फार पैसे वर्षं भरात वाचलेच तर बँकेत किंवा पोस्टात FD रुपी खात्रीशीर “जनता थाळी” घेण्यात धन्यता मानत असतं ! असो ! जशी दृष्टी तसा कोन आणि तसे त्याचे फळ !

मला विचाराल तर माझ्या मते, ही जी जी भायच्या भांड्यात सतत शिजणारी, रटरटणारी उसळ म्हणजे एक अगम्य साईड डिश आहे ! ही  उसळ काहींना कधीतरी चविष्ट लागते तर काहींची जीभ (आणि पर्यायाने खिसा) त्यातील तिखटामुळे पोळते ! त्यामुळे या जी जी भायच्या टॉवरमधे जाऊन त्या उसळीचा स्वाद घ्यायचा, का खात्रीशीर “जनता थाळी” घ्यायची हे ज्याचे त्याने ठरवलेले बरे !

सुज्ञास अधिक मी अज्ञानी काय सांगणार ?

आपापल्याला जिभेला पर्यायाने खिशाला जपा!

शुभं भवतु !

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नकळत सारे घडते..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

नकळत सारे घडते..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

प्रचंड वेग,तीक्ष्ण धार आणि तीव्र प्रतिक्रिया या सगळ्यांना अतिशय मनापासून स्वतःत सामावून घेऊनही वरवर शांत,सौम्य वाटणारा पण त्या वेग,धार किंवा तीव्रतेमुळे अंतरंगी अफाट सामर्थ्य धारण करणारा असा हा अनोखा शब्द..आवेग!

या शब्दाचे विविध अर्थ पाहिले तर तो प्रत्येक अर्थ स्वबळावर ‘आवेग’ या शब्दाचा पैस सर्वांगाने व्यक्त करण्यास असमर्थ ठरतोय हे लक्षात येईल.

जोर, जोम,आवेश,झपाटा हे अर्थ आवेगाची सूचक रेखाकृती फारतर रेखाटू शकतील पण त्यात इतर विविध अर्थरंगभरण त्यांना शक्य होत नाही.तिरीमिरी, त्वेष, क्षोभ, प्रक्षोभ, मन:क्षोभ हे अर्थशब्द ‘आवेग’ या शब्दाच्या मुख्यत: करड्या रंगछटाच ठळकपणे व्यक्त करु शकतील. सळ,उबळ,उद्रेक,झटका, हे अर्थ फक्त आवेगामागची असह्यता  सांगू शकतील तर त्वरा, घाई, लहर, लाट, हे अर्थ त्याक्षणीच्या मनोवस्थेतली अधीरता सूचित करतील आणि लोंढा,तीव्रता,धार,तडाखा यासारखे अर्थ वरवर शांतपणे तेवणाऱ्या ज्योतीसारख्या भासणाऱ्या ‘आवेग’ या शब्दातला चटका प्रत्ययास आणून देतील.

या सगळ्याच वरवर भिन्न वाटणाऱ्या अर्थशब्दांत आवेगाचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवणारी एकेक परस्परवेगळी रंगछटा लपलेली आहे!

असं जरी असलं तरी या सर्व अर्थशब्दांत एक समान धागाही आहेच.हे सगळे शब्द त्या त्या क्षणीची भावविवशता आणि भावनोत्कटताच व्यक्त करत असतात आणि त्याद्वारे या दोन्हीत लपलेल्या अधीर, उत्सुक, असह्य अशा विविध मनोवस्थाच सूचित करीत असतात.ते सूचन विविध रंगांमधून असलं तरी त्याक्षणीची मनाची अधीर हतबलताच व्यक्त करीत असते!

एका अल्पाक्षरी शब्दाचा हा अर्थपसारा खरोखरच अचंबित करणारा आहे. जोर, जोम, आवेश,द्वेष यातला प्रतिकारासाठीचा ठामपणा, तिरीमिरी,उद्रेक,झटका यातली असहायतेतून निर्माण झालेली अतिरेकी प्रतिक्रिया,क्षोभ,प्रक्षोभ यामधला तीव्र संताप, उमाळा,लाट यामधला मायेचा झरा, लोंढा,तडाखा,झपाटा यातून वेगाने होऊ घातलेला आघात,आणि उग्रता,धार यातली भयभित करणारी संतापाची तीव्रता हा सारा ऐवज सामावून घेणाऱ्या आवेगाचं या सर्व अर्थशब्दांतही लपलेलं एक वैशिष्ट्य म्हणजे भावना वेगात उमटणाऱ्या भल्याबुऱ्या, तीव्र, लोभस, उत्कट वा अतिरेकी अशा सर्वच प्रतिक्रियांमागची नेमकी मनोवस्था! त्या अवस्थेतल्या अधीर, उत्सुक, अस्वस्थ मनाला सारासार विचार ओझरता स्पर्शही करु शकत नाही. त्या अवस्थेत भावनांची उत्कटता एवढी पराकोटीची असते की सारासार विचारासाठी आवश्यक असणारं स्वस्थपणच त्याक्षणी  मन हरवून बसलेलं असतं.मनाच्या त्या गारुडअवस्थेत आनंद असो  दु:ख असो वा प्रेम, माया किंवा क्षोभही ते इतकं उत्कट किंवा तीव्र असतं की त्या झपाटलेल्या आवेगात उमटणारी प्रतिक्रिया त्या अंगभूत उत्फुर्ततेनेच व्यक्त होते.ती जाणिवपूर्वक व्यक्त केली जात नाही तर ती नकळत व्यक्त होते! संतापाच्या भरात उचलला गेलेला हात असो, अत्यानंदाने होणारी थरथर न् डोळ्यात दाटणारे अश्रू असोत, किंवा प्रेमाने दिलेलं उत्स्फुर्त आलिंगन असो ते सगळं नकळतच घडत असतं आणि त्या त्यावेळी भावनातिरेकातून नकळत उमटणाऱ्या या सगळ्याच अस्सल नैसर्गिक प्रतिक्रिया ही त्या भावनांमधील आवेगाचीच परिणती असते!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शिक्षक दिनानिमीत्त्त – “एस्.राधाकृष्णन्…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ शिक्षक दिनानिमीत्त्त – “एस्.राधाकृष्णन्…” ☆ सौ राधिका भांडारकर 

डॉ. राधाकृष्णन् हे एक महान, विद्वान व्यक्तीमत्व! शालेय जीवनात,५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतानाच या महान व्यक्तीमत्वाची, शैक्षणिक पुरस्कर्ता, शिक्षकांचे समाजातील योगदान मौल्यवान मानणारे म्हणून ओळख झाली. प्रचंड आदराची भावना त्यावेळीही होती आणि आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात ती  आहेच.

डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म ५सप्टेंबर १८८८ रोजी .

तामीळनाडूत तिरुमणी या छोट्याशा ,गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला.त्यांचे वडील,सर्वपल्ली विरस्वामी हे गरीब असले तरी विद्वान होते. आपल्या मुलानेही पंडीत व्हावे ही त्यांची इच्छा होती.

डॉ राधाकृष्णन हे अतिशय हुशार विद्यार्थी होते.आयुष्यभर त्यांनी शिक्षणक्षेत्रातल्या अनेक शिष्यवृत्त्या प्राप्त केल्या.

१९०६ मध्ये त्यांनी तत्वज्ञान (philosophy) या विषयात एम ए केले. आणि त्यांची मद्रास रेसीडेन्सी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. पुढे ,लंडन  आॉक्सफर्ड विद्यापीठात भारतीय तत्वज्ञानाचे शिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती.बनारस विद्यापीठाचे कुलगुरु असताना, त्यांनी तत्वज्ञानावर अनेक पुस्तके  लिहीली.

डाॅ. राधाकृष्णन् विवेकानंद आणि वीर सावरकर यांना आपले आदर्श मानतात. लेख आणि भाषणाद्वारे त्यांनी भारतीय तत्वज्ञान संपूर्ण जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. बहुआयामी व्यक्तीमत्व होते त्यांचे. भारतीय प्रतिभा आणि संस्कृतीवर त्यांचे प्रेम होते.

१९४७ साली देश स्वतंत्र झाला. पंडीत नेहरु पंतप्रधान झाले. त्यावेळी नेहरूंनी त्यांना ,सोव्हीएत युनीअन बरोबर खास राजदूत म्हणून मुत्सद्देपणाची कामगिरी करण्यासाठी आवाहन केले.अशा रितीने ते राजकारणात आले. स्वातत्र्यानंतर दहा  वर्षांनी आपल्या देशाच्या घटनेत उपराष्ट्रपतीचे पद नेमले गेले. आणि भारताचे पहिले ऊपराष्ट्रपती म्हणून त्यांची नेमणूक झाली.

 १९५८ साली भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. १९६२ ते १९६७ दरम्यान त्यांनी भारताचे दुसरे  राष्ट्रपती म्हणून हे पद भूषविले.

या दरम्यान भारतीय राजकारणात बरेच चढऊतार झाले. दोन पंतप्रधानांच्या मृत्युसमवेत भारत चीनच्या भयंकर युद्धातल्या पराभवाचा सामना त्यांना कणखरपणे करावा लागला.

जर्मन ऑर्डर पौल ले मेरीट फाॅर आर्ट्स अँड सायन्स पुरस्कार,शांतता पुरस्कार, ब्रिटीश ऑर्डर ऑफ मेरीट अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. ब्रिटीश सरकारने त्यांना सर ही पदवी बहाल केली.

शिक्षण आणि शांततेसाठी मिळणार्‍या नोबेल पारितोषिकासाठी त्यांना १६वेळा नामांकित केले गेले.

विद्यार्थ्यांमध्ये ते अतिशय लोकप्रिय होते.पाच सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन.तो वैशिष्ट्यपूर्ण साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे परवानगी मागितली. डॉ. राधाकृष्णन यांना शिक्षकांविषयी खूप आदर होता.नव्या पीढीचे शिल्पकार म्हणून ते त्यांना मान देत.म्हणून राधाकृष्णन यांनी त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करावा असे विद्यार्थ्यांना सुचवले. आणि तेव्हांपासून शाळांमधून ५ सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणून धूमधामपणे साजरा होतो. या दिवशी विद्यार्थीच शिक्षकाची भूमिका पार पाडतात.

१९६७ साली डॉ. राधाकृष्णन निवृत्त झाले आणि मद्रासला येउन स्थायिक झाले.

वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचे शिवकामु या त्यांच्या नात्यातल्या मुलीशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना पाच मुलगे आणि एक मुलगी होती. मात्र त्यांच्या पत्नीचे अकाली निधन झाल्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन विस्कटले.

अखेरच्या दिवसात त्यांना गंभीर आजाराचा सामना करावा लागला. १७एप्रील १९७५ साली वयाच्या ८६व्या वर्षी ते अनंतात विलीन झाले.

भारतीयांसाठी अत्यंत भूषणीय  बहुआयामी व्यक्तीत्व!

।। झाले बहु होतील बहु आहेत बहु। परि यासम हाच।।

त्यांना त्यांच्या जयंती निमीत्त ही आदरांजली वाहूया..

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “प्रेमा तुझा रंग….?” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

🌸 विविधा 🌸

☆ “प्रेमा तुझा रंग…?” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

प्रेमाचे प्रकार अनेक.  प्रत्येक प्रकाराचे रंगही अनेक.  आयुष्यात प्रेमाची सुरुवात ही मातृप्रेमाने होते. त्यानंतर पितृप्रेम. त्यानंतर भ्रातृ व भगिनी प्रेम.  अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रेमाच्या विविध प्रकारांची आपल्याशी गाठ पडते.

प्रेमा तुझा रंग कसा हे नाव प्रा. वसंत कानेटकर यांच्या एका सुंदर नाटकाचे. प्रेमाच्या अर्थात मी वर्णन केलेल्या प्रेम प्रकारां व्यतिरिक्त, स्त्री-पुरुषांच्या तारुण्यापासून निर्माण झालेल्या प्रेमाच्या विविध रंगांच्या छटा त्यामध्ये खूप सुंदर तऱ्हेने दाखवल्या आहेत.  प्रेम हे  विरोधाभासातूनही निर्माण होऊ शकते. आयुष्यात प्रेमाची जपणूक करताना  विविध प्रकारे अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते.

आपण याच प्रकारच्या प्रेमाबाबत विचार करूया.

प्रेमाचे विविध रंग, त्याच्या विविध छटा आपणाला लहानपणापासूनच  श्रीकृष्णाच्या चरित्रफ्रसंगातूनच ओळख देऊन जातात. राधा, रुक्मिणी, सत्यभामा, द्रौपदी, मीरा ! 

किती वेगवेगळे रंग!

राधा, मनामनांच्या एकरुपतेमधून शारिरीक ही म्हणता येणार नाही आणि अशारिरीकही म्हणता येणार नाही असे अनोखे प्रेम. मानसिक एकतानता, त्यातून निर्माण झालेले अद्वैत व अद्भुत प्रेमरंग. या प्रेमाला काय नाव द्यावे हे कुणाला समजणारच नाही किंवा कोणतेही नावच देता येणार नाही.  पण एक अनोखी सुंदर आणि भावनिक रंगछटा या प्रेमातून व्यक्त होत असते. भावुकतेची उधळण भावनांची जपणूक या सर्वातून निर्माण झालेल्या या विविध रंग छटा!  श्रीकृष्णाच्या बालपणीच्या या अगम्य अद्भुत प्रेमलीलांना कृष्णचरित्रात एक अक्षय अढळ स्थान प्राप्त झाले आहे.

प्रथमदर्शना पासूनच समर्पण भावनेतून निर्माण झालेले अलौकिक प्रेम.  प्रथम दर्शनानंतर दुसऱ्या कोणाचाच विचार मनात येऊ शकणार नाही एवढे उत्कट प्रेम !  ही एक अद्भुत रंगछटा रुक्मिणीच्या प्रेमातून दिसते.

प्रेम आणि क्रोध हे एकमेकांच्या विरोधी आहेत का पूरक आहेत याचा संभ्रम पडावा कृतककोपापासून ते क्रोधागाराच्या भितीपलीकडे घेऊन जाणारे, पण प्रेमच!  सत्यभामेच्या या प्रेमाला काय नाव द्यावे ?  एक अनोखा रंग हे चरित्र उधळून जाते.

एखाद्या स्त्रीला भगिनी मानून एक उच्च कोटीचा भगिनी प्रेमाचा उदात्त अनुभव देणारा, कृष्ण द्रौपदीच्या अद्वितीय प्रेमाचा एक अभिनव रंग !

मीरेचे भक्तिमय पण कालातीत असे प्रेम ! शारिरीक आकर्षणापलीकडचे स्वप्निल भावनेतून निर्माण झालेले अगम्य, अनाकलनीय असे भक्तीरसपूर्ण पण कालमर्यादांना भेदणारे प्रेम !

एका श्रीकृष्णाच्या चरित्रातच स्त्री-पुरुष प्रेमाच्या किती विविध रंगछटा पहावयास मिळतात हे एक अद्भुतच.

आपल्याला असे वाटेल की अशा रंगांचे प्रेम अलीकडे कुठे बघायला मिळेल ? एकाच व्यक्तीच्या जीवनात  एवढ्या विविध प्रेम रंगांची उतरण सापडणे अवघड आहे.  परंतु विविध व्यक्तींच्या जीवनात यापैकी काही रंगांची उधळण अवश्य दिसून येईल.

पाहताक्षणी प्रेम ही माझ्या तरुणपणात मला भाकड कथा वाटत असे.  परंतु माझाच एक अत्यंत जवळचा मित्र त्याच्या आयुष्यात हे घडले, प्रत्यक्ष ! त्याला मी साक्षीदार आहे.  त्यांचे लग्नही झाले. पळून जाऊन नाही.  आई-वडिलांच्या संमतीने रीतसर.  पन्नास वर्षाचा संसारही झाला.  त्या अत्यंत उत्कट आणि सुंदर प्रेमाशी माझा परिचय ही झाला.

अमृता प्रीतम यांचे चरित्र वाचताना एका आगळ्यावेगळ्या आणि उत्कट प्रेमाचा एक नवीन अनुभव वाचायला मिळाला. अमृता व साहिर लुधियानवी.  हा त्यांच्या चरित्रातील एक उतारा वाचा

‘अमृता लाहोरला होत्या तेंव्हा साहिर त्यांना भेटायला त्यांच्या घरी यायचे. घरी आले की या दोघांच्या मनसोक्त गप्पा व्हायच्या. गप्पा मारता मारता साहीर सिगारेटी फस्त करत राहायचे. अमृता मात्र साहिरनी सोडलेल्या धुम्रवलयात आपली स्वप्ने पाहायच्या. साहिर तिथून गेल्यावर त्यांनी पिऊन टाकलेल्या सिगारेटची थोटके त्या गोळा करायच्या, अन हळूहळू त्यांना पुन्हा शिलगावून ओठी लावायच्या ! त्या आपल्या ओठांवर साहिरना अनुभवायच्या ! या नादात अमृतांना सिगारेटचे व्यसन जडले. अमृता साहिरला कधीच विसरू शकल्या नाहीत.’

त्यांचे हे प्रेम शारीरिक पातळीवर कधीच गेले नाही.  हा किती अनोखा प्रेमरंग!  अशा तऱ्हेचे उत्कट प्रेम कधी ऐकले नव्हते. बहुधा असे प्रेम हे फक्त अमृता प्रीतम यांचे  एकमेवाद्वितीयच.

त्यांचे संपूर्ण चरित्र हे विविध प्रेमांचा एक अद्वितीय आणि अतिंद्रीय अनुभव देऊन जाते.

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि गोपाळराव जोशी यांचे विरोधाभासात्मक प्रेम. चिडचिडेपणा,  क्रोध, धाक ही प्रेमाची अंगे असू शकतात ? परंतु यातून ही  एक विरोधाभासात्मक प्रेमाचे उदाहरण आपणाला दिसते. त्यांच्या चरित्रातून आपल्याला जाणवते.  प्रेमाच्या विरोधी अर्थातून प्रेमाचे विविध पैलू आणि प्रेमरंग आपल्याला  अनुभवायला मिळतात.

भगिनी निवेदिता यांच्या चरित्रातून आपणाला भगिनी प्रेमाचे एक अलौकिक दर्शन घडते.  साता समुद्रा पार असलेली एक मुलगी एका अनोख्या देशात येते. एका तेजस्वी वाणीने आणि समृद्ध ज्ञानाने प्रभावित होऊन एका परधर्माच्या धर्मकार्यात स्वतःला झोकून देते.  स्वामी विवेकानंदांची ही मानस भगिनीं, त्यांच्या कार्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करते. हे अद्भुत भगिनी प्रेम एकमेवाद्वितीयच.

बाबा आमटे आणि साधनाताई यांचे प्रेम ही सुद्धा मला नतमस्तक करणारी भावोत्कट प्रेमाची कहाणी, साधनाताईंच्या चरित्रात आपल्याला वाचायला मिळते.  बाबांच्या कार्यात आपले आयुष्य झोकून देणाऱ्या परंतु वेळप्रसंगी बाबांच्या वैचारिक भूमिकेला विरोधही करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमाची आपणास ओळख होते. बाबा नास्तिक तर साधनाताई देवपूजक. बाबांनी साधनाताईंना त्यांच्या देवधर्मासाठी विरोध केला नाही, पण सहकार्य ही केले नाही. कुष्ठरोग्यांची लग्ने लावण्याबाबत बाबांचा विरोध मोडून काढून साधनाताईंनी त्यांच्या आयुष्यात विविध रंग भरले. प्रेमाच्या समर्पणातून सुद्धा स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्व घडवता येते आणि प्रेमातून फुलवता येते हा प्रेमाचा कुठला रंग म्हणावा ?

या सगळ्या प्रेमाच्या रंगांची उधळण पहात असताना वेगवेगळ्या रंगछटांचे एक इंद्रधनुष्य आपण पाहत असतो या सगळ्या पार्श्वभूमीवर अलीकडे या रंगांतून आयुष्य फुलवण्याला नवी पिढी पारखी होत आहे काय, असे वाटू लागते. या सर्व प्रेमाच्या रंगावरून समर्पणाच्या भावनेतूनही स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवता येते हे वारंवार सिद्ध होत असते,  समर्पणाची भावना नसली तरी किमान समन्वयाची भावना ठेवून  तडजोडीने आपले आयुष्य रंगीत करता येते याची जाणीव नवीन पिढीतील अनेकांना का असू नये ?

या सर्व प्रेम रंगातून आणखीही एक रंग त्याबाबत जास्त विवेचन न करता व नामोल्लेख न करता त्या प्रेमाचा उल्लेख करावासा वाटतो.  सामाजिक नीती मूल्यांना तडा देत, स्वतःच्या जीवनात प्रेम रंगाची उधळण करणारी काही उदाहरणे आहेत. समाजाने त्यांना बदनाम केले असेल, बहिष्कृतही केले असेल किंवा त्यांची निंदानालस्ती ही केली असेल.  त्यांचे बद्दल अनेक गैरसमज  पसरवले असतील. त्यांच्याशी समाज फटकूनही वाढला असेल. परंतु त्यांनी स्वतःचे आयुष्य त्यागाने प्रेमाने आणि समन्वयाने वेगळ्या तऱ्हेने रंगीत बनवले.  परंतु हे रंग त्यांच्या आयुष्यापुरतेच मर्यादित राहिले.  समाजात मात्र त्यांच्या प्रेम रंगांची एक ग्रे शेड ज्याला म्हणतो तो फक्त एक पारवा रंगच दिसून आला आहे.  हा सुद्धा एक प्रेमाचा रंगच नव्हे काय ?

व्यक्ती स्वातंत्र्याचा हट्टाग्रह न धरता समन्वयाने आणि एकमेकांना पूरक भूमिका घेत भले भांडण होत असेल, भले अबोला होत असेल, भले चिडचिड होत असेल, काहीही असो.  परंतु प्रेमाच्या भावनेने एकमेकांना धरून ठेवण्यातच रंगांची उधळण होत असते हे नवीन पिढीतील मुलांना समजावून सांगण्याची खरोखरच गरज आहे असे वाटते. त्यासाठी मी एक विशेष मंगलाष्टक बनवले होते.  सावधानता ही लग्नातच अधोरेखित का केली जाते हे समजले पाहिजे.

शुभमंगल सावधान…

शुभमंगल जरी आज होतसे, जीवनी सावधचित्त असावे

शुभमंगल या दिनी म्हणूनी, सारे म्हणती सावधान,

शुभमंगल सावधान………

 

मुखी कुणाच्या वह्नी येता, दुज्या मुखाने पाणी व्हावे

मी मी तू तू कुणी बोलता, दुज्या मुखाने मौनी व्हावे

एक मुखाने मौनी होता, दुज्या मुखाने प्रेमी व्हावे

दिनी आजच्या शुभमंगल पण, जीवनी सावधचित्त असावे

शुभमंगल जरी आज होतसे, जीवनी सावधचित्त असावे

शुभमंगल या दिनी म्हणूनी, सारे म्हणती सावधान,

शुभमंगल सावधान………

कुणी कुणाला काय बोलले,

भांडण मिटता विसरुन जावे

मोठ्यांचे कटुबोल कोणते,

मनात कधीही नच ठेवावे

मनास होता जखम कोणती,

प्रेम दुज्याचे औषध व्हावे

दिनी आजच्या शुभमंगल पण, जीवनभर ते प्रेम जपावे

शुभमंगल जरी आज होतसे,

जीवनी सावधचित्त असावे

शुभमंगल या दिनी म्हणूनी,

सारे म्हणती सावधान,

शुभमंगल सावधान………

एका क्षणी भाळलात तरीही, जीवनभर तुम्ही सांभाळावे

क्षण एक पुरे तो तुटण्यासाठी, जीवनभर जे जुळवून घ्यावे

म्हणून सांभाळावे क्षण क्षण,

कायम सावधचित्त असावे

आज भरून घ्या आशिर्वचने,

जीवन सारे मंगल व्हावे

शुभमंगल जरी आज होतसे,

जीवनी सावधचित्त असावे

शुभमंगल या दिनी म्हणूनी,

सारे म्हणती सावधान,

शुभमंगल सावधान………

सहजीवनाच्या सुरुवातीलाच पुढे येणाऱ्या अनेक अडचणीच्या प्रसंगी समन्वयाची भूमिका घेऊन आयुष्य प्रेममय केल्यास रंगांची उधळण होत राहील. अर्थात हे सर्व तात्विक विवेचन ही वाटेल परंतु आमच्या पिढीच्या सर्वसामान्यांच्या जीवनातही विविध अडचणीचे संघर्षाचे प्रसंग येऊनही आज आमचे सहजीवन यशस्वी झाले असे लोक म्हणतात. परंतु प्रत्यक्ष जीवनाचा अनुभव घेताना काय घडत होते हे सुद्धा माझ्या एका कवितेत सांगितले आहे.

हे आम्हा सर्वसाधारण सामान्यांचे प्रेमाचे रंग.

काय म्हणावे याला

त्याला आणि तिला

जीवन असह्य होत गेले

पण सहन करत राहिले

त्यालाच जग प्रेम म्हणत राहिले

तो आणि ती

भांड भांड भांडले

थोबाडावे वाटले

पण मन आवरत राहिले

त्यालाच जग प्रेम म्हणत राहिले

त्याला आणि तिला

वेगळे व्हावे वाटले

घटस्फोट घेण्यासाठी

वकील नाही गाठले

त्यालाच जग प्रेम म्हणत राहिले

त्याला आणि तिला

नको संसार वाटले

लेक सून मुलगा जावई

सारे गोत जमले

त्यालाच जग प्रेम म्हणत राहिले

चव्वेचाळीस वर्षे

आमचे तसेच घडले

आम्हालाही तेच मग

प्रेम म्हणावे वाटले

यशस्वी संसार जग म्हणत राहिले

एकटे नको जगणे

असे आता वाटते

तुझ्या आधी मीं

असे व्हावे वाटते

वेगळे काय यात जग म्हणत राहिले

कुणास ठाऊक याला

प्रेम म्हणतात का

आय लव्ह यू

कधीच नाही म्हटले

किती प्रेमळ जोडपे जग म्हणत राहिले

©  श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रक्षाबंधन- बदलणारे स्वरूप… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

रक्षाबंधन – बदलणारे स्वरूप… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

भावना त्याच पण माझ्या नजरेला त्याचे बदलणारे स्वरूप जाणवले.

बालपणीचे रक्षाबंधन म्हणजे मज्जा!महत्वाचे म्हणजे शाळेला सुट्टी.नारळाचे पदार्थ खाणे.घरी येणारे आणि लाड करणारे मामा.आणि मामा घरी आल्यावर आमच्या खोड्यांना उधाण!एक दिवस मोठ्यांच्या शिस्तीतून सुटका.

हळूहळू या सणाचे महत्व लक्षात येऊ लागले.पण त्यातील गंमत होतीच.पण वय वाढले तसा एक वेगळाच जाच सुरु झाला.आणि राखी पौर्णिमा नावाचा निबंध रुपी त्रास उभा राहिला.बरं माझी गंमत अशी व्हायची की मला वाटायचे जसा सण साजरा केला तसे लिहायचे.आणि फजिती व्हायची.एकंदरीतच साहित्य,कल्पना विस्तार,रसग्रहण यातील माझी बालबुद्धी काही मोठी झाली नाही. त्यामुळे संदर्भा सहित स्पष्टीकरण या बाबत पहिल्या पासून मी सलाईन वरच असते.तर ज्यांच्या निबंधाला शाबासकी मिळायची ते जग जिंकल्याच्या आनंदात असायचे.आणि यांनी निबंधात लिहिलेले केव्हा घडले,किंवा यांनी हा सण असा कधी साजरा केला याचा विचार मी करत रहायची.मग एका मैत्रिणीने सांगितले त्यात कल्पना असतात.माहिती असते.काही गाण्याच्या ओळी असतात.मग तो निबंध छान होतो.हे समजले आणि माझा निबंध म्हणजे समालोचन आहे हे समजले.

जसे जसे वय मोठे होत गेले तसे सणाची तयारी.त्यातील अडचणी लक्षात येऊ लागल्या.आणि विविध वाचन,मिळणारी माहिती यातून रक्षाबंधन याचा अर्थ कळू लागला.

अजून एक बाल मनाला पडलेला प्रश्न असा होता की इतकी सुंदर राखी असते मग त्याला बंधन का म्हणायचे?आणि दुसऱ्यावर असे बंधन का टाकायचे?मग त्यात आनंद कसा?आणि भाऊ लहान असेल तर तो बहिणीचे रक्षण कसे करणार? ज्यांना भाऊच नाही त्यांचे काय?

मग वाचनातून, मोठ्या माणसांकडून याची उत्तरे मिळाली..

ते मायेचे,प्रेमाचे बंधन आहे.कोणतीही गोष्ट थोड्या बंधनात असेल तर ती योग्य वाटेने जाते आणि आनंद देते.जसे नदीला काठ,बांध गरजेचे असतात नाहीतर ती विध्वंस करेल.शाळेतील विद्यार्थ्यांना पण शालेय बंधने आवश्यक असतात.वाद्यांवर पण काही बंधने,ताण असेल तरच ती सुरात वाजतात.

या सणातून दोन व्यक्तींमध्ये एक नाते निर्माण होते.असलेले दृढ होते.आणि आपण एकमेकांच्या वेळेला उपयोगी पडायचे आहे याची जाणीव टिकून राहते.जरी हा सण बहीण भाऊ यांचा मानत असले तरी रक्षणकर्ता कोणीही असू शकते.तिथे नाते,वय  असा भेदभाव नसतोच.एक मानसिक आधार असतो.

आम्ही आमच्या शाळांमध्ये हा मोठ्या उत्साहात साजरा करतो.त्यामुळे शाळेतील मुलांमध्ये न कळत संस्कार होतात.सैनिक हॉस्पिटल मध्ये जाऊन तेथील सैनिकांना राखी बांधतो.त्या मुळे आपले खरे रक्षक त्यांना समजतात. आणि शाळेतील झाडांना पण मुले राखी बांधतात.त्या मुळे निसर्ग आपला सोबती,रक्षक आहे व आपण त्याचे जतन,रक्षण केले पाहिजे ही भावना वाढीस लागते. बहुतेक सगळे देवाला राखी बांधतात.आम्ही बहिणी एकमेकींना राखी बांधतो.

तर माझ्या दृष्टीने मज्जा ते व्यापक जबाबदारी, भावना अशी अनेक रुपे रक्षाबंधन याची समोर आलेली आणि अनुभवलेली आहेत.

न बदललेली मात्र एकच गोष्ट अनुभवली आहे,ती म्हणजे आकाशवाणी वर लागणारी हिंदी,मराठी गाणी तेथील गाणी लावणारे बदलले किंवा गायक निवर्तले आहेत.पण प्रसारित होणारी गाणी मात्र त्रिकालाबाधित आहेत.

असे हे बंधन मनापासून स्वीकारु या.आणि कोणाचा तरी मानसिक आधार बनू या.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

३१/८/२०२३

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आनंदाचे डोही… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

☆ आनंदाचे डोही… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

मॉर्निंग वॉकवरून येताना गणपती मंदिरा जवळ रथ बाहेर काढलेला बघून एकदम मन आनंदाने उसळले.एक नवचैतन्य सळसळले.का बरं असं होत असावं ?माझाच मला मी प्रश्न विचारला.एखादी गोष्ट आपल्या बालपणाशी निगडित असली की आपण खूप आनंदी होतो.कारण त्या गोष्टीमागे,गोष्टीसोबत बऱ्याच घटना,बऱ्याच आठवणी निगडित असतात.एखादी मोत्यांची माळ सुटत जावी तशी आठवणींची लड सुटत राहते न आपण प्रफुल्लित होतो.उत्सव म्हणलं की चैतन्य,उत्साह,आनंद,परंपरा,ऊर्जा आणि गजबज.कोणताही सार्वजनिक उत्सव माणसांनी याचसाठी चालू केला की दररोजच्या त्याच त्या रुटीन मधून वेगळेपणा जगावा,सर्वांनी एकत्र येऊन आनंदी क्षणांची देवाणघेवाण करावी आणि जगण्यासाठी नव ऊर्जा प्राप्त व्हावी.मरगळलेपणा जाऊन उत्साह यावा,नवचैतन्य यावे.वेगळा आहार- विहार करावा अन अगदी सर्वच तळागाळातील शेवटच्या घटकाचे समाजमन देखील आनंदी व्हावे.

गणेश चतुर्थी आली की तासगाव संस्थानच्या गणपती मंदिरातला गणपतीचा तीन मजली लाकडी रथ बाहेर काढला जातो व स्वच्छ केला जातो.गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी खूप मोठी यात्रा भरते व या रथातून श्रींची मिरवणूक काढली जाते.त्यासाठी पंचधातूच्या धातूची मूर्ती मंदिरातून बाहेर काढली जाते.

उत्सवाच्या अगोदर ठिकठिकाणी गणपती मूर्तींचे स्टॉल लागले जातात.वेगवेगळ्या आकाराच्या,रूपाच्या,रंगांच्या आकर्षक लोभस मूर्ती पाहून  मन हरखून,भान हरपून जाते.सजावटीच्या वेगवेगळ्या साहित्याचा बाजार भरतो.

श्रीमंत भाऊसाहेब पटवर्धन गणपतीपुळेच्या सिद्धी विनायकाचे निस्सीम भक्त होते.त्यांना गणपतीने दृष्टांत देऊन तासगावचे मंदिर बांधून घेतले व पूजा करायला सांगितले.त्यानुसार त्यांनी तासगावात सांगली रस्त्यावर पूर्वाभिमुख मंदिर बांधले.इथला गणपती उजव्या सोंडेचा असून तो नवसाला पावतो असा समज आहे.मंदिराच्या पुढं दाक्षिणात्य पद्धतीची गोपुरे आहेत.सम्पूर्ण बांधकाम विशिष्ट दगड-चुन्यातील असून स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे.राजवाड्यातील दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जना प्रित्यर्थ इथे मोठी रथयात्रा भरते.कोरोनाची दोन वर्षे सोडली तर अखंड अडीचशे वर्षांची परंपरा इथल्या यात्रेला आहे.

रिमझिम पाऊस,उन्हाचे मधूनच डोकावणे,हिरवेगार पीक,कडधान्याची काढणी,मळणी,विशिष्ट प्रकारचे गवततुरे,गवतफुले,भिरभिर रंगीत फुलपाखरे,वातावरणातील अनामिक चैतन्यआणि त्यासोबत येणारा गणपती उत्सव आणि त्या अनुषंगाने होणारी लगबग मला बालपणीच्या सगळ्या आठवणीत घेऊन जाते.

उत्सव…गणेश प्रतिष्ठापना,त्यासाठी लागणारी पाने,फुले..मग घरोघरी गौरी,त्यासाठी लागणारा फुलोरा शोधण्यासाठी सगळ्या गावंदरी पालथ्या घालणे,गौरींची घरोघरींची सजावट बघायला जाणे,सार्वजनिक मंडळाचे देखावे बघायला जाणे,त्यांनी ठेवलेले फुकटचे पिक्चर बघायला जाणे,गौरींचे कान उघडायला काटवटी, पराती जोरजोरात करकर वाजवणे,जत्रेसाठी घरोघरी पाहुण्यांचे आगमन सर्वच आठवते न मन  उल्हसित होते.

आमच्या गल्लीत रमेश (आमच्या भाषेत रमशा)गणपती करतो अगदी दहावीत असल्यापासून त्याने शाडूच्या मूर्ती बनवायला सुरुवात केली.बेंदराच्या अगोदरच तो माती भिजवून चिखल करून मूर्तीच्या तयारीला लागायचा.दुपारी शाळेतून आलं की तो मूर्ती बनवताना,रंगकाम करताना आमचे तास न तास हरवणे सगळं आठवतेय.लहानपणी गणपतीची सर्वात लहान मूर्ती सव्वा रुपयाला मिळायची.रात्री आणायला गेलं की मग एकच रुपयाला.सव्वा दोन रु,पाच रुपये,दहा रुपये अशी मूर्तींची किंमत असायची.सर्वात महाग गणपतीमूर्ती पंचवीस रुपयाला मिळायची.

पण सर्वजण घरोघरी लहान मूर्तीच आणत.खरेतर दिवळीपूर्वीचे सर्व सण निसर्गाच्या वेगवेगळ्या रुपांच्या संगतीने पार पडतात;अर्थात भौगोलिक परिस्थितीनुसार मग देवाला नैवेद्यही तसाच शेती भातीशी निगडित असतो.आमच्याकडे गौरीला शेपूची भाजी आणि ज्वारीच्या भाकरीचा नैवेद्य असतो.पाच दिवस घरोघरी आरती करायला जायचे.चुरमुऱ्याचा प्रसाद खायचा.दोन दिवस सलग सुट्टी असायची.ओढे,विहिरी,तळी जिकडे तिकडे पाणी असायचे.पाचव्या दिवशी विहिरीत ओढ्यात घरगुती गणपतीचे विसर्जन करून मनात अपार उत्साह भरून माणसे आपापल्या कामाला लागायची.घरातून एखादा माणूस गावाला गेल्यासारखे जीवाला हुरहूर लागायची  गणपती विसर्जनानंतर.

आता काळ बदललाय.साधेपणा जाऊन दिखाऊपणा आलाय,सार्वजनिक मंडळाचे स्वरूप देखील बदललंय. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती,रासायनिक रंगामुळे उरल्या सुरल्या स्वच्छ पाण्याचे साठे प्रदूषित होत आहेत. नद्या,तलाव प्रदूषित होत आहेत,पण त्याची कुणाला फिकीर नाही.जो तो आपापल्या नादात आहे.

मला निसर्गाबरोबर रहायला आवडते.आम्ही आम्हाला परवडेल अशी शाडूची मूर्ती आणतो.यावर्षी तर ठरवलंय की पुढील वर्षी धातूची मूर्ती आणायची अन तीच पुजायची.मातीचा छोटा गणोबा कुंभारवाड्यातून आणून सोबत त्याचेही पूजन करायचे व त्याचेच विसर्जन करायचे.

आराशीला तर आम्ही कधीच थर्माकोल वापरत नाही त्यामुळं दिव्याची रोषणाई आणि कृत्रिम फुलांच्या माळा वापरून परत ते सर्व काढून बांधून ठेवतो.

तुम्हालाही एक विनंती.जमले तर शाडूचीच मूर्ती आणा आणि पर्यावरण रक्षणात खारीची भूमिका बजवा.येणारा गणेशोत्सव तुम्हा सर्वांना आनंददायी,आरोग्यदायी ठेवो हीच मंगल, शुभ कामना.

मंगल मूर्ती मोरया ss

गणपती बाप्पा मोरया ss

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print