मराठी साहित्य – विविधा ☆ “नारळी पौर्णिमा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “नारळी पौर्णिमा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

ह्यावेळी अधिक महिन्यामुळे सगळया सणाना जरा विलंबच झाला . कधीपासून श्रावणाची वाट बघत होतो, नुकतेच श्रावणाचे आगमन झाल्याने एक प्रकारचा उत्साह आला.  नारळीपोर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण कधीकधी एकाच दिवशी तर कधीकधी लागोपाठच्या दोन वेगवेगळ्या दिवशी येतात.पोर्णिमेची तिथी दोन दिवसात विभागल्या गेली तर आधीचा दिवस नारळी पोर्णिमा आणि नंतरचा दिवस राखीपोर्णिमा.

सणसमारंभ आले की बाजारात जरा चहलपहल,लोकांमध्ये जरा उत्साह आलेला नजरेस पडतो. आपले हे सणसमारंभ आपल्याला मानसिक मरगळतेतून बाहेर काढतात आणि मनाला एकप्रकारची उभारी आणतात.

तसे हे दोन्हीही सण विदर्भातील नाहीत. नारळीपोर्णिमा हा सण कोकणातील, प्रामुख्याने सागरीकिनारा लाभलेल्या भागातील. तर रक्षाबंधन वा राखीपोर्णिमा हा सण प्रामुख्याने उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश ह्या भागातील, पण आजकाल सगळे सणवार हे बहुतेक सगळ्या भागांमध्ये साजरे केल्या जातात.

नारळीपोर्णिमा हा सण कोळी लोकं वा समुद्रकिनारी राहणाऱ्या, तेथे वस्ती करणाऱ्या लोकांसाठी अतिमहत्त्वाचा सण.नारळीपोर्णिमेच्या दिवशी समुद्राच्या किनाऱ्यावर कोळी लोकं नारळ  वाढवून खवळलेल्या समुद्राला शांत होण्याकरिता प्रार्थना करतात. ह्या दिवसापासून मासेमारी

 साठी ते आपापल्या होड्या घेऊन सागरात उतरतात आणि गेले काही दिवस त्यांनी बंद ठेवलेल्या व्यवसायाचा परत एकदा श्रीगणेशा करतात. आता हा दर्याच त्यांचा मायबाप, देव सगळंकाही असतो.नारळीपोर्णिमेचा खास  पदार्थ म्हणजे नारळीभात. ओल्या नारळाचा चवं,लवंग, बेदाणा,साखर आणि चांगल्या प्रतीचे तांदूळ ह्यापासून नारळीभात करतात. ह्यात केशराच्या काड्या मिसळल्या तर सोने पे सुहागाच. नारळीभातासाठी लागणारे मुख्य साहित्य हे कोकणात पिकणारे तसेच समुद्रकाठावरील.कोळी लोकं हा दिवस त्यांची पारंपरिक नाच,गाणी करीत खूप उत्साहाने साजरा करतात.

रक्षाबंधन वा राखीपोर्णिमा हा सण बहीणभावाच्या प्रेमाचे,स्नेहाचे प्रतीक म्हणून साजरा केल्या जातो.परगावी असलेल्या. बहीणी आठवणीने, न चुकता भावाला राखी पाठवतात. आपली संस्कृती, सणांची जपणूक ह्यामुळे ह्यादिवशी हाताला राखी न बांधलेला पुरुष अभावानेच आढळत असेल.ह्यादिवशी कित्येक भगिनी आपल्या सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांना राखी बांधायला जातात वा राखी पाठवितात.

लहानपणी साजरी केल्या गेलेले रक्षाबंधन खूप अनोखे असायचे.माझा भाऊ तर आधी पूर्ण बाजार हिंडून त्याला आवडलेल्या राख्या आणि ते दुकान सांगायचा.तेथून आम्ही बहीणी राख्या आणायचो,मोठ्ठ्या चमकीच्या आणि नोटांनी सजविलेल्या वगैरे.तेव्हाच तो एक कर्तबगार, यशस्वी बँकर होणार ह्याची नांदी असावी. असो लहानपण खूप छान आणि निरागस,अल्लड असतं.

राखीपोर्णिमा वा रक्षाबंधन ह्या संकल्पनेचा संबंध हा रक्षणाशी निगडित आहे. भाऊ आणि बहीण ह्यांच नातं प्रेमाचं,जिव्हाळ्याचं स्नेहाचं आणि तितक्याच हक्काचं सुद्धा असतं. ह्या दिवशीच्या निमित्ताने हे एकमेकांना भक्कम आधार देणारं नातं ,संकटसमयी रक्षा करण्याचं वचन देणारं नात तर महत्वपूर्णच, पण ह्या सणा च्या निमित्ताने अजूनही कितीतरी भक्कम आधार देणारी, रक्षा करणारी,अशी अजूनही कितीतरी नाती असतात.ह्या दिवशी हटकून ह्या नात्यांची,ह्मा भावनांची जपणूक करणाऱ्यांची हटकून आठवणं येते आणि त्यासाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त कराविशी वाटते.ह्या भक्कम आधारामध्ये आपल्याला सुरक्षित ठेवणारे लष्करातील जवान,आपल्या जिवीताची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असणारी प्रत्येक व्यक्ती, आपल्या नागरी सुरक्षा राखणा-या पोलीस खात्यातील प्रत्येक व्यक्ती, आपल्या आरोग्याच्या काळजीत मोलाची मदत करणारे सफाई कामगार तसेच ह्या प्रकारच्या तत्सम क्षेत्रातील आपली रक्षा करणारी,आधार देणारी कुठल्याही व्यक्ती चे ह्या  त्यांनी पुरविलेल्या रक्षणाच्या कार्याप्रती मी मनापासून आदर,कृतज्ञता व्यक्त करते.ह्या दिवशी आपल्याला आधार देणा-या वनसंपदेला पण विसरून चालणार नाही. तेव्हा ह्या सगळ्यांची आठवण काढून त्यांच्याप्रती असलेल्या अभिमानाने खूप छान वाटतं.

आपल्याला भावनिक आधार देणारी,आपलं मनोबलं वाढविण्यास मदत करणारी एक शक्ती असते,मी त्या शक्तीला “देव” म्हणते,ह्या शक्तीलाही माझे कायम रक्षण करण्यासाठी एक राखी अर्पण.

खरंच धन्य आपली विवीधतेने नटलेली भारतभूमी, जेथे आपण सर्वधर्मसमभाव जोपासून सगळे सणवार गुण्यागोविंदाने, प्रेमानेआत्मियतेने आणि उत्साहाने साजरे करतो.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नाती विणता विणता… ☆ श्री सतीश मोघे ☆

श्री सतीश मोघे

🌸 विविधा 🌸

नाती विणता विणता… ☆ श्री सतीश मोघे

ऊबदार आणि रेशीमस्पर्शी नाती प्रत्येकालाच हवीहवीशी वाटतात. तहहयात अशा नात्यांचा अनुभव येणे हा नशिबाचा भाग. पण प्रत्येकानेच अश्या नात्यांचा अनुभव केव्हातरी, काहीकाळ तरी घेतलेलाच असतो. एकाच नात्यातही हा अनुभव कधी येतो तर कधी येत नाही. नात्यात जेव्हा हा अनुभव येतो, तेव्हा आपण त्याचे श्रेय मनातल्या मनात स्वत:ला आणि समोरच्यालाही देत असतो. अर्थात त्यातही बऱ्याच नात्यात जादा श्रेय आपण स्वत:कडेच घेत असतो. याच न्यायाने ऊबदार, रेशीमस्पर्शी अनुभव येत नाही,तेव्हाही खरे तर याचा दोष दोघांनी वाटून घेणे आणि त्यातही दोषातला अधिक वाटा आपण घेणे उचित ठरते. पण असे घडत नाही. अशा प्रसंगात सर्व दोष समोरच्याच्याच माथी मारुन आपण मोकळे होतो.

सुज्ञ व्यक्ती मात्र असे करत नाहीत. नात्याचे वस्त्र सुखकर, सुंदर विणले गेले नाही, ‘मन नाती विणता विणता, मन ठेवी करुनि गुंता’ असे घडले, तर या गुंत्याचा दोष त्या व्यक्ती स्वत:कडे घेतात. आपणच या नात्याचे वस्त्र विणण्याच्या कौशल्यात कमी पडलो, असे म्हणून ते कौशल्य आत्मसात करण्याच्या प्रयत्नाला लागतात. गुलजारांची एक सुंदर कविता आहे. कवयित्री शांता शेळके यांनी या कवितेचा तेवढाच सुंदर मराठी भावानुवाद केला आहे. ही कविता विणकाम करणाऱ्या विणकराला उद्देशून आहे. गुलजार म्हणतात, ‘हे विणकरा, तूझे विणकाम अखंड चालू आहे. धागा कधी तुटतो, कधी संपतो. तू पुन्हा नव्याने विणकाम सुरु करतोस. पण एकसंध. त्यात कुठेही गाठी नाहीत. मी एकदाच नात्याचे वस्त्र विणायला घेतले मात्र… त्याच्या अनेक गाठी मला दिसत आहेत. तेव्हा हे विणकरा, गुंता होऊ न देता, गाठी पडू न देता वस्त्र विणण्याचे हे तुझे कौशल्य तू मला शिकव. या कवितेतला संदेश मोलाचा आहे. किमान हवीहवीशी वाटणारी, पण तरीही दूरावत आहेत असे दिसणारी नाती तरी, हे कौशल्य आत्मसात करून सांभाळणे, पुन्हा त्यात जवळीकता आणणे आवश्यक आहे.

नात्यात कौशल्याचा वापर करण्यावर आक्षेपही असू शकतो. प्रेमाच्या, आपलेपणाच्या नात्यात कौशल्यासारखी तांत्रिक गोष्ट का? आणि कशाला हवी? हे प्रश्नही उपस्थित होऊ शकतात. त्याची उत्तरे देणेही आवश्यक आहे. कोणतेही कौशल्य शिकतांना सुरुवातीस तांत्रिक वाटते, पण तेच एकदा पूर्णतः आत्मसात झाले की तो आपला सहजस्वभाव होते. आपल्या घरी दुरुस्तीसाठी येणारा इलेक्ट्रिशियन, विद्युत प्रवाह सुरू असतांनाही दुरुस्तीचे काम करत असतो. त्याने प्राप्त केलेले कौशल्य त्याचा सहजस्वभाव होऊन जाते. त्याला आल्यावर आधी पुस्तक उघडून काही वाचावे लागत नाही वा थांबून पुढचा टप्पा काय? असे आठवावेही लागत नाही. नात्यांच्या विणकामातले कौशल्यही असेच आहे. सुरुवातीस ते शिकावे लागेल. पण एकदा का अंगवळणी पडले की ते सहजस्वभाव होऊन राहील. गाठी न पडता वस्त्रांची वीण करणे सुलभ होऊन जाईल.

अन्य कामातले कौशल्य हे बुद्धीचे असते. बुद्धीच ते आत्मसात करते आणि बुद्धीपर्यंतच ते सीमीत रहाते. फार तर हात, पाय असे आवश्यक देहांचे अवयव करावयाच्या कामाच्या आवश्यकतेनुसार त्यात सहजपणे सामील होतात. पण मनाने स्वतंत्रपणे त्यात करण्यासारखे काही नसते. नात्यांतील विणकामाचे कौशल्य मात्र मनाचे असते,मनापासून असते. ते वापरत असतांना बुद्धीला काय वाटते आहे, याचा फार विचार न करता पुढे जायचे असते. कारण  नात्यांच्या विणकामातले हे कौशल्य स्वतःच्या हितापेक्षा समोरच्याच्या  हिताचाच अधिक विचार डोळ्यासमोर ठेऊन मनाने आत्मसात केलेले असते व मनाकडून त्याचा वापर होत असतो.बऱ्याचदा समोरच्याला हे कळायला वेळ लागतो. पण कधीतरी ते कळतेच . 

समोरच्याच्या हिताच्या विचाराबरोबरच समोरच्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याची वृत्ती आणि  नात्यात समोरच्याची वारंवार परीक्षा न घेण्याची वृत्ती, ही  नात्यांच्या विणकामातील आवश्यक दोन मुख्य कौशल्ये आहेत. पत्नीच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण जर असा विचार करायला लागलो की, बघू या हिचे प्रेम खरे आहे का? आज काहीच भेट नको नेऊ या.तरी तिचे प्रेम तसेच राहते  का बघू या…तर गुंता झाला आणि गाठ  पडलीच म्हणून समजा. असा विचार करण्यापेक्षा आपण मोगऱ्याचा गजरा, सोनचाफ्याची फुले आणि एखादी छोटीशी भेटवस्तू घेऊन गेलो तर ती पाहून तिला किती आनंद होईल ! असा विचार प्रबळ होऊन तिचा आनंदी चेहरा डोळ्यासमोर आला की नकळत आपल्याकडून तशी कृती होते. त्यातून दोघांना आनंद होतो. नात्याची वीण अधिक घट्ट होते. विणकाम नवीन उत्साहात सुरु होते. केवळ पती- पत्नी नात्यात नव्हे तर कोणत्याही नात्यात वारंवार समोरच्याची परीक्षा घेणे टाळणे आणि ज्या काही छोट्या छोट्या गोष्टींनी त्याला आनंद होईल, अशा गोष्टी करणे, नाती सुखदायी होण्यासाठी आवश्यक असते.

नात्याचे वस्त्र विणतांना त्याग करण्याची वृत्ती असणेही आवश्यक असते. हा त्याग काही फार मोठा असा अपेक्षित नसतो. समोरच्याला ‘तू माझ्यासाठी खूप विशेष आहेस’,असे सांगणारी लहानशी कृतीही यात पुरेशी असते. आपला मित्र एखादे पुस्तक किंवा औषध त्याच्या गावी मिळत नसल्याचे आपल्याला कळवितो व  मिळालेच तर पाठव,असे सांगतो.खरे तर वाट पाहण्याची त्याची तयारी असते. पण आपण त्याच दिवशी खास वेळ काढतो, बाजारात शोधून ते पुस्तक किंवा औषध मिळवितो आणि त्याला कळवितो, ‘तुझे काम केले आहे.’ या आपल्या कृतीतून आपल्यासाठी तो ‘विशेष आहे’ हा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचतो. मैत्रीचे नाते अधिक घट्ट होते.   

जीवनप्रवासात आलेल्या नात्यांपैकी काहीच नाती आपण हदयाशी जपतो. ही अशी जपलेली  नाती आठवून पाहा. यातील प्रत्येकाने, किमान एकदातरी ‘तुम्ही त्याच्यासाठी विशेष आहात’, हा अनुभव तुम्हाला देणारी कृती तुमच्यासाठी आणि तुम्हीही त्याच्यासाठी केल्याचे नक्कीच आठवेल.

नात्याचे वस्त्र विणण्याची अशी अनेक कौशल्य सांगता येतील. लेखनमर्यादा लक्षात घेता, शेवटची  आणखी दोन कौशल्ये नमूद करतो. त्यातले पहिले म्हणजे समोरचा सुखात असतांना आपले दुःख व्यक्त न करणे  आणि समोरचा दुःखी असतांना आपले सुख लपविणे आणि दुसरे म्हणजे नात्यात केवळ ‘सांगणारे’ न होता ‘ऐकणारे’ही होणे. समोरच्याच्या सुखात सहभागी होऊन त्याचे सुख दुप्पट करणे आणि दुःखात सहभागी होऊन दुःख निम्मे करणे ही भावना मनात रुजलीच पाहिजे. अनेकदा मित्रांच्या व्हाट्सॲप ग्रुपवर एखाद्याच्या जवळच्या नातलगाच्या दुःखद निधनाची बातमी येते. किमान त्या दिवशी तरी हास्य, विनोदाच्या पोस्ट ग्रुपवर टाकणे टाळले पाहिजे. तेच एखाद्याने आधीच आनंदाची पोस्ट शेअर केली असेल तर दुसऱ्याने ग्रुपवर दुःखाची बातमी शेअर करणे टाळले पाहिजे. ही साधी सोपी पथ्ये आहेत. परस्परांच्या सुखदुःखाशी एकरूप झाले तरच ही पाळली जातात.ही पाळली गेली तरच मनात अढी बसत नाही,नात्याच्या वस्त्राच्या विणकामात गाठी पडत नाहीत. अशी संवेदनशीलता असेल तरच दुसऱ्याला समजून घेणे,ऐकून घेणेही घडते.

काही नाती जन्मताच मिळतात. काही नाती विवाहाने व त्यानंतर जीव जन्माला घालून आपण  निर्माण करतो. काही मैत्रीची, सख्यत्वाची नाती असतात. तर काही नाती कारणपरत्वे आयुष्यात ये-जा करणारी असतात. या सर्व प्रकारच्या नात्यात प्रत्येक व्यक्तीशी असणाऱ्या नात्याचे वस्त्र स्वतंत्र असते, त्याचे विणकाम स्वतंत्र असते. पण या प्रत्येक विणकामात गुंता,गाठी न होण्यासाठी वर सांगितलेली कौशल्ये आवश्यकच असतात. यासोबतच  अलिप्तता आणि भावनिक गुंतवणूक या दोन रंगांच्या धाग्यांपैकी कुठला धागा, कुठल्या वस्त्राच्या विणकामात जास्त वापरायचा?याचे विवेकी ज्ञान देखील आवश्यक आहे. कौशल्ये प्राप्त होऊनही या रंगांचे प्रमाण चुकले तरी फसगत होते. ‘मन नको त्यावरि बसते, मन स्वत: स्वत:चि फसते, नसत्याच्या धावे मागे’, असे होऊन बसते. यासाठी अलिप्तता आणि भावनिक गुंतवणूक यांचे योग्य प्रमाण ठेवण्याचे कौशल्यही आवश्यक आहे. काही नाती सुटावीशी वाटत असूनही सुटत नाहीत, तोडावीशी वाटत असूनही तोडता येत नाहीत. काही तुटतात, त्यातली काही पुन्हा येऊन जुळतात. नात्यांचे हे असेच असते,हेही समजून असले पाहिजे. सर्व कौशल्य आणि अलिप्तता-भावनिक गुंतवणुकीचे योग्य प्रमाण राखूनही नात्यांची वीण जुळत नसेल, जमत नसेल, तर  त्या नात्यांवर जास्त वेळ खर्च न करता ,काही काळ ती नाती आणि विणकाम बाजूला ठेवलेले बरे.

प्रत्येक नात्याच्या मधुमासाचा एक काळ असतो. काही नात्यात तो अल्पकाळ, तर काही नात्यात तो दीर्घकाळ चालतो. या सुरुवातीच्या मधुमासाच्या काळात परस्परांना समजून घेतले आणि ते नाते टिकविण्यासाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत, हे समजून घेऊन,प्राप्त करून घेऊन, योग्य प्रमाणात अलिप्तता आणि भावनिक गुंतवणूकीची गुंतवणूक केली तरच ती नाती मधुमास संपल्यावरही लाभदायी, आनंददायी ठरतात. असे होण्यासाठी  गुलजारांनी केलेली प्रार्थनाच आपणही विणकराला करू या. ‘प्रिय विणकरा, नात्याचे वस्त्र विणण्यासाठी तुझे कौशल्य आम्हाला तू शिकव.’

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सत्ते पे सत्ता..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

सत्ते पे सत्ता..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

 सत्ताया शब्दाला वेढून राहिलेला माजोरीचा उग्र दर्प या शब्दातील विविध चांगल्या अर्थाचे कोंब झाकोळून टाकणारा ठरतो.

खरंतर सत्ता वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नसतेच. रक्ताच्या असो वा मैत्रीच्या,जोडलेल्या,मानलेल्या विविध अतूट नात्यांचा अविभाज्य  भाग असणारी मायेची, प्रेमाची सत्ता कधीच विध्वंसक नसते. ती संजीवकच असते.

आईवडिलांना त्यांच्या अपत्यांवरील मायेच्या नात्यातून मिळणाऱ्या सत्ता/अधिकारात मायेचा पाझर आणि आपल्या अधिपत्याखाली असणाऱ्या पाल्याच्या हिताची काळजी यांचेच प्राबल्य असते आणि सत्ता या शब्दाला तेच अपेक्षित आहे. म्हणूनच कौटुंबिक पातळीवरील अशा गृहीत सत्तेच्या बाबतीतही प्रेम आणि आदर यांची जागा जेव्हा अधिकार आणि वचक घेऊ लागते तेव्हा मात्र ती सत्ताही संजीवक न रहाता विध्वंसक बनू लागते.

खरंतर सत्ताही निसर्गानेच स्वतःचं अधिपत्य अबाधित ठेवून निसर्गावर अवलंबून असणाऱ्या सर्वच निसर्ग घटकांच्या व्यवस्थापन सुविहित रहावं या उद्देशाने निसर्गनिर्मितीपासूनच अस्तित्वात आणलेली एक व्यवस्था आहे. सर्व प्राणीमात्रांमधे या सत्तेचं स्वरूप अर्थातच वेगवेगळं असतं. आपण माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे असं म्हणतो. पण खरं तर विविध पक्षी आणि प्राणी यांचे जीवनपद्धती पाहिली की त्यात वैविध्य असलं तरी एकमेकांच्या सोबतीने राहण्याची त्यांच्यातील असोशी हा एक समान धागा असल्याचं आपल्या लक्षात येतं. पक्ष्यांचे थवे, माकडांचे कळप, हत्तींची एकत्रकुटुंबे,समुहाने ‌चरणारी जनावरे ही याचीच प्रतिके म्हणता येतील. या विविध पक्षीप्राण्यांमधे त्यांच्या त्यांच्या जीवन पद्धतीनुसार असणार सत्ताकेंद्र आणि त्याचं स्वरूप हा सखोल अभ्यासाचाच विषय ठरावा. अशा जाणीवपूर्वक केलेल्या अभ्यासातून आकाराला आलेली व्यंकटेश माडगूळकर यांची सत्तांतरही कादंबरी माकडांच्या कळपातील प्रमुखाची सत्ता/वर्चस्व आणि योग्य वेळ येताच त्यात होणार सत्तांतर यांचं अतिशय अचूक आणि नेमकं चित्र करते.

या नैसर्गिक व्यवस्थेत सत्तेमुळे मिळणारा अधिकार आणि वर्चस्व हे गृहीत आहेच पण ते सत्तेमुळे आलेल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पूर्ण करून अवलंबितांचं संगोपन, रक्षण, हित आणि समाधान जपण्याचं मुख्य कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडता यावं यासाठीच. याचं भान पर्यावरणाच्या घातक पडझड विध्वंसानंतरही इतर सर्व निसर्ग घटकांनी आवर्जून जपलेले दिसून येतं. अपवाद अर्थातच फक्त माणसाचा!!

म्हणूनच सत्ताया शब्दात मुरलेल्या माजोरीच्या उग्र दर्पाला जबाबदार आहोत आपणच.सत्तेला अपेक्षित असणारी कर्तव्य आणि जबाबदाऱ्या विसरून सत्तेचे थेट नातं राजकारणाशी जोडलं गेल्याचा हा परिणाम! खुर्चीच्या असंख्य किश्शांमधे सत्तेचा लोभ महत्त्वाचा घटक ठरत गेल्याचं आपल्या लक्षात येईल. त्यामुळेच सत्ता प्राप्त होताच ती अबाधित ठेवण्याच्या अतिरेकी हव्यासामुळे सत्य न् स्वत्वाचं मोलही सहजी खर्ची घालण्याची अतिरेकी प्रवृत्ती मूळ धरु लागते आणि हळूहळू फोफावते.मग राजकारण ही व्यवस्था न रहाता विधिनिषेध धाब्यावर बसवून खेळला जाणारा क्रूर खेळ होऊन जातो.अशा परिस्थितीत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीच्या कटकारस्थाने सत्तेपे सत्ताहा जशास तसे या न्यायाने परवलीचा शब्द होऊन बसतो!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सेल्फी… ☆ डॅा. सौ. पुष्पा सुभाष तायडे ☆

डॅा. सौ. पुष्पा सुभाष तायडे

? विविधा ?

☆ सेल्फी… ☆ डॅा. सौ. पुष्पा सुभाष तायडे ☆

आजच्या या आधुनिक युगात प्रत्येकाकडे मोबाईल आहेत. मोबाईल मध्ये फोटो काढायचा कॅमेरा देखील असल्यामुळे फोटो काढायचे वेड दिवसेंदिवस वाढतच आहे. फोटो काढून देणारा व्यक्ती नसेल तेव्हा सेल्फी काढला जातो. स्वतःलाच स्वतःचा फोटो काढता येत असल्याने त्याची मजा काही औरच आहे. अलीकडील तरूण पिढी तर सेल्फी काढण्यासाठी वेडी झालेली दिसतात. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी पाण्याच्या जवळ समुद्रकिनारी प्रेक्षणीय स्थळी  परिसर चांगला असेल तिथे  वाटेल त्या त्या प्रसंगाचे सेल्फी फोटो काढून आठवणीच्या संग्रहात ते ठेवले जातात. अशा फोटोमुळे निश्चितच आयुष्यातील चिरस्मरणीय प्रसंगाच्या स्मृती जपता येतात. हा एक महत्त्वाचा भाग आहे.

त्यामुळे सेल्फीने मानवाला दिलेला हा अमूल्य ठेवाच आहे.

अलीकडच्या तरुणांना तर या सेल्फीने वेडच लावले आहे. दिवसातून कितीतरी वेळा ते आपला स्वतःचा सेल्फी फोटो काढतात. मग पाहतात त्या अँगलने फोटो चांगला निघतो की या अँगलने चांगला निघतो याचा विचार करतात. चांगले निघालेले फोटो ठेवतात. खराब निघालेले डिलीट मारतात. आपल्या मित्रमंडळींसोबत ,कुटुंबातील व्यक्तींसोबत,गर्लफ्रेंड वा बॉयफ्रेंड सोबत असे सेल्फी फोटो काढण्यात त्यांना काही गैर वाटत नाही. गर्लफ्रेन्ड किंवा बॉयफ्रेंड सोबत पुढे लग्न झाले तर काही बिघडत नाही. परंतु दुसऱ्या व्यक्ती सोबत लग्न झाले तर अशा फोटोंचा गैरवापर करून ब्लॅकमेल करणारीही काही मंडळी असतात. आपले प्रेम यशस्वी झाले नाही तर नैराश्य येऊन दुसऱ्या व्यक्तीला देखील सुखाने जगू द्यायचे नाही असे मनाशी ठरवून अशा फोटोंचा गैरवापर करणारेही समाजात आढळतात. तेव्हा सेल्फी काढताना सावध राहणे आवश्यक आहे.सेल्फी काढताना प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहणे हा एक गमतीदार अनुभव असतो कधी रागाचे भाव चेहऱ्यावर असतात तर कधी हास्याचे भाव असतात. कधी चेहरा वाकडा तर कधी  हसमुख निघालेले फोटो ही गमतीदार असतात आपण आपल्या फोटोकडे पाहून हसायला लागतो.

सेल्फी म्हणजे स्वतःचा फोटो काढणे असा अर्थ आपण लक्षात  घेतो.  सेल्फी काढण्याच्या नादात काही अपघात घडून गेल्याचे व्हिडिओ आपण व्हाट्सअप वर पाहिले आहेत यात नदीच्या काठावर सेल्फी काढणाऱ्या मुलाचा पाय मगरीने धरला व मुलाला ओढून नेले कड्यावर उभे राहून सेल्फी काढताना खाली पडणे किंवा पाण्यात पडणे सेल्फी काढताना फोन पाण्यात पडणे अशा काही अपघाताची उदाहरणे आपण पाहिली आहेत. तेव्हा सेल्फी काढताना अपघात होणार नाही स्वतः सुरक्षित राहू याची काळजी घेणे देखील आपले कर्तव्य आहे. सेल्फी म्हणजे स्वतःचा फोटो काढणे असा वरवरचा अर्थ असला तरी आपण कसे आहोत हे पाहणे महत्त्वाचे आहे. स्वतःचे व्यक्तिमत्व जर प्रभावी बनवायचे असेल तर स्वतःच्या अंतरंगाचा सेल्फी काढायला पाहिजे. सेल्फी म्हणजे कॅमेरातून काढलेला बाह्य  स्वरूपाचा फोटो होय. परंतु बाह्य रंगापेक्षाही अंतरंग पाहणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या स्वतःच्या अंतरंगाचा फोटो काढायचा असेल तर मला एका दिवसात किती वेळा राग येतो.

लहान सहान गोष्टींवरून माझी चिडचिड होते का?.

चिडचिड कमी करायची असेल तर मला या रागावर नियंत्रण कसे मिळवता येईल त्यासाठी मी काय करायला पाहिजे. माझ्यात या दिशेने परिवर्तन व्हायला पाहिजे. मला पैशाचा मोह होतो का अवैध मार्गाने पैसा गोळा करण्यासाठी माझे मन तयार होते का? हा मोह टाळून कष्टाने मिळवलेल्या पैशात समाधानाने राहण्याची वृत्ती माझी वाढीस लागलेली आहे का?

या दिशेने विचार करणे योग्य ठरते.

कोणतीही सुंदर स्त्री दिसली की कामांध होणे किंवा कोणत्याही सुंदर पुरुषाशी लगट करण्याची इच्छा होणे ही विकृतीच होय. संयमाने मनावर व अशा भावनांवर नियंत्रण ठेवण्याची पावले उचलायला हवीत. आजची तरुण पिढी तर अशा भावनांच्या अधिकच आहारी गेलेली आपल्याला दिसते. स्वतःच्याच रूपाचा व्यक्तिमत्त्वाचा अहंकार वाटणे व माझ्यापेक्षा कोणीही चांगले नाहीच. इतर सारे तुच्छ असे लेखण्याची भावना खूप लोकांमध्ये आढळते. हिंदी चित्रपटात गाणे आहे. गोरे रंगपे न ईतना गुमान कर. गोरा रंग दो दीनमे ढल जायेगा हेच सत्य आहे.  अहंकार जाईल व इतरांचा सन्मान करण्याची भावना वाढीस लागेल या दृष्टीने विचार करून पावले उचलावी. द्वेष आणि मत्सराची भावना ही जीवनात अस्वस्थता निर्माण करते.

कोणाचा न करी द्वेष , दया मैत्री वसे मनी!

असे रामदास स्वामींनी म्हटले आहे. द्वेष आणि मत्सराच्या भावनेला क्रोधाची जोड मिळून नको त्या घटना जीवनात घडून आलेली अनेक उदाहरणे आपण रोजच वर्तमानपत्रांमध्ये वाचतो. वेळीच या भावनेला लगाम घातला तर सर्व मंगल होईल. लोभापाई इतरांवर अन्याय करणारे लोक समाजात दिसतात अधिक धन प्राप्त करण्याचा लोभ व तेही विशेष कष्ट न करता मिळत असेल तर चांगलेच म्हणून त्यामागे धावणारे लोक लोभाने मनःशांती गमावतात. सातवा रिकामा हंडा भरावा म्हणून मरेस्तोवर काम करूनही तो भरत नाही म्हणून चिंताग्रस्त होण्याची कथा आपण ऐकली आहे. लोभापाई दिवसभर धावून जमीन पायाखाली घालणारा माणूस शेवटी पूर्वीच्या जागेपर्यंत पोहोचू शकत नाही आणि  अति धावल्यामुळे त्याचा मृत्यू होतो. ही कथा  सर्वांना माहिती आहे. लोभापाई जीवनाची माती करण्यात काय अर्थ आहे. काम क्रोध मद मोह आणि मत्सर या साऱ्या विकार विचारांना ताब्यात ठेवून जीवन जगाल तर तुमचा सेल्फी आनंदी हसमुख आणि शांत चेहऱ्याचा निघेल एवढे निश्चित.

© डॅा. सौ. पुष्पा सुभाष तायडे

नागपूर 

मो 9422119221.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवन… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? विविधा ?

☆ जीवन… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

प्रत्येकालाच जीवन हे जन्मानंतर लाभतं.कसं असतं बरं मानवी जीवन ?जीवन हवहवसं तेंव्हाच वाटतं जेंव्हा तुम्ही त्यात काही आनंदाचे ,सुखाचे क्षण निर्माण करता.जन्मानंतर जेंव्हा तुम्ही मोठे होता,संस्कारातून  सुजाण बनता,तेंव्हा मंगेश पाडगावकर जी म्हणतात त्याप्रमाणे “या जन्मावर,या जगण्यावर शतदा प्रेम करावे ,”या त्यांच्या गीतानुसार

जीवनाची वाटचाल आनंदानं,प्रेमानं,स्नेह जोपासत करणं श्रेयस्कर ठरतं.जीवनात प्रत्येक वेळी समोर सुखच येतं असं नाही पण भगवदगीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यानुसार

“सुखदु:ख समेत्कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ” ही वृत्ती जर आपण ठेवली तर सुख लाभो किंवा वाट्याला दु:ख येवो,यश मिळो किंवा पराभवाचा सामना करायला लागो,आपण दोन्ही गोष्टींकडे तटस्थ वृत्तीने पाहावे हे तत्वज्ञान अंगिकारता येते.अर्थात हे सोपे नाही.

जीवन प्रत्येकाला जसं तो पाहतो तसं त्याच्या दृष्टिकोनानुसार भासतं.दृष्टीकोनाबाबत बोलताना मला नुकतीच वाचलेली एक गोष्ट आठवते.एके ठिकाणी तीन पाथरवट दगडावर छिन्नीचे घाव घालीत होते.जवळच बांधकाम सुरू असलेलं एक मंदिर होतं.रस्त्याने एक वाटसरू चालला होता.त्याने त्या तिघांपैकी एकाला विचारले,”तू काय करतो आहेस ?”तो त्रासिक स्वरात उत्तर देतो,”मी छिन्नीने दगड फोडतो आहे.त्रासाचं काम बघा.”नि घाम पुसतो.वाटसरु दुसर्या पाथरवटास तोच प्रश्न विचारतो.तेंव्हा तो मोठा उसासा टाकतो नि म्हणतो,”अरे बाबा,पैटासाठी कष्टाचं काम करतोय मी.”वाटसरु तिसर्या पाथरवटासही तोच प्रश्न विचारतो,”बाबा रे,काय चाललय तुझं?” तेंव्हा तो मात्र अभिमानाने म्ज्ञणतो,इथं हे जे मंदिर उभं होतय ना,ते बांधण्यास मी मदत करीत आहे.”तीनही पाथरवट एकच काम करीत होते.दगडाला आकार देण्याचे.पण एकाला ते त्रासिक,कंटाळवाणे वाटत होते,दुसर्याला पोटासाठी राबणे वाटत होते नि तिसर्याला मात्र एका सुंदर निर्मितीस आपण हातभार लावीत आहोत याचा अभिमान वाटत होता -आनंद वाटत होता. तसच कोणाला जीवन पहाटेच्या सुंदर दवासारखं  वाटतं,तर कोणाला शीतल वायुच्या झुळकी सारखं, एखाद्या खवय्याला ते रसास्वादी जिव्हेच्या तृप्तीसारखं भासतं,तर एखाद्या लढवय्याला ते रणांगणासारखं वाटतं.नि मल्लाला आखाड्यासारखं.जीवन हवहवसं तेंव्हाच वाटतं जेंव्हा आपण प्रत्येक क्षणी ते समरस होऊन जगतो.आपल्या जीवनात बालपणापासून वार्धक्यापर्यंत आपल्या वाट्याला अनेक भूमिका येतात.बालपणी विद्यार्जन,ज्येष्ठांच आज्ञापालन केलं तर शिक्षणात यवस्वी होऊन आपण नोकरी किंवा व्यवसायात स्थिरस्थावर होतो.विविध भावना नि नात्यांची जपणूक करुन वृद्धापकाळी आपण मार्गदर्शकाची भूमिका पार पाडू शकतो.फक्त जीवनात उद्योग शीलता जपणे महत्त्वाचे ठरते.एक सुभाषितच  सांगते –

उद्यमेनहि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथै:। 

नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृग: ॥ 

याचा अर्थ असा कि, उद्योग केल्यानेच आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात ‌झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण आपोआप प्रवेश करीत नाही. तर त्यासाठी त्याला शिकार करावी लागते.

जीवनात कुठेतरी श्रद्धा नि समोर एखादे ध्येय असूल तर जीवनाचा प्रवास योग्य दिशेनं होतो.नाहीतर ते भरकटते.अलिकडे वृत्तपत्रात जीवनाचा आस्वाद न घेताच ते संपवू पाहणारी तरुणाई दिसते नि मन अगदी विषण्ण होतं.विवेकाने,सकारात्मक दृष्टिकोनातून जर विचार पूर्वक वर्तन केलं तर जीवन हवहवसं वाटतंनि सार्थकी लावता येतं.आकाशातील इंद्रधनुष्य जसं तानापिहिनिपाजातुन खुलतं ,तसं मानवता,श्रम , सहिष्णू वृत्ती,प्रमाणिकपणा,सत्शील वृत्ती,त्याग,प्रेम,यासारख्या सदगुणातून बुद्धीला कृतीची जोड देऊन मानवी जीवन सार्थकी लागततं.म्हणून शेवटी इतकं म्हणावं वाटतं

     जीवनाला रंग कसा ?

      मानवा तू देशी तसा.

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

हैदराबाद

मो.नं. ९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “खरेदीचे साइड इफेक्ट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “खरेदीचे साइड इफेक्ट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

साइड इफेक्ट बऱ्याचदा औषधांचे, तेलाचे, क्रिमचेच असतात आणि ते नंतर दिसतात किंवा जाणवतात अस काही नाही. त्याचा त्रास ते घेणाऱ्याला होतो हे खरंय. पण लागोपाठच्या आणि सततच्या खरेदीचे सुद्धा साइड इफेक्ट असतात आणि ते आपल्या वागण्यात दिसतात अस लक्षात आल. आणि त्याचा त्रास समोरच्याला होतो.

खरेदी करायला कोणाला आवडत नाही… पण पुरुषांना सगळ्याच खरेदीत तेवढाच उत्साह असतो अस नाही. काही खरेदीत तो असतो… तर काहीवेळा तो आणावा लागतो. बायकांच्या बाबतीत खरेदी म्हणजे नशाच असते. उतरल्याच जाणवतच नाही. खरेदी जेवढी जास्त तेवढी ती चढतच जाते. मग आपली स्वतःची नसली तरीही.

आमच्याकडे एक कार्य होत. मग काय? खरेदीचा सुळसुळाट आणि उत्साहाचा महापूर आला होता. महापुरात सगळीकडे पाणीच पाणी दिसत. तसच या सुळसुळाटात आणि उत्साहात हातात पिशव्या आणि खिशात यादीच सापडत होती. याशिवाय अनेक सुचना होत्या त्या वेगळ्या. कुठे जायच, काय घ्यायच, तिथे काय घ्यायच नाही. भाव किती असेल. भावाच्या बाबतीत तुम्ही बोलू नका. त्यातल तुम्हाला काही कळत नाही. (नाहीतरी कशातल कळतंय….. अस पण हळूच बोलून होत होत.) सामान उचलण्याची घाई करू नका. हल्ली सामान घरपोच देतात. या आणि अनेक. या सुचनांमुळे काहीवेळा सुचेनासे होत.

घरचा माणूस म्हणून जवळपास सगळ्याच ठिकाणी माझी उपस्थिती अगदी प्रार्थनीय नसली तरी हवी होती. निदान गाडी घेऊन तरी चला…….. बाकीच आम्ही पाहून घेऊ. असे सांगत प्रार्थनीय उपस्थिती असणाऱ्यांची सोय झाली होती. गरज होती ती गाडीची आणि त्यांच्या सोयीच्या वेळेत. (याला म्हणतात काॅन्फिडन्स…….)

कार्यासाठी दागिने खरेदी करतांना यातच पण वेगळी डिझाईन, हिच डिझाईन पण वजनाला यापेक्षा थोड कमी किंवा जास्त. थोड लांब किंवा अखूड. दोन पदरी किंवा मोठं पेंडेंट. असा संवाद सारखा कानावर पडत होता. सोनं पिवळंच असल्याने त्यात वेगळा रंग मागायची सोय नव्हती. पण ती रंगाची कमी आम्ही दागिन्यांवर लावलेल्या खड्यांच्या रंगात आणि आकारात उभ्या उभ्या म्हणजे खडेखडेच शोधत होतो. घडणावळ जास्त आहे, हे वाक्य. आणि मधे मधे कॅरेट हा शब्द होताच. रेट मात्र फिक्स होता.

सोन्याच्या दुकानात भाव करण्याची सोय नसते. पण त्या विकणाऱ्याल्याच एक दोन दिवसात भाव काही कमी होण्याची शक्यता आहे काहो?…… अशीही विचारणा होत होती… कमी नाहीच पण वाढण्याची शक्यता आहे….. असे तो चेहऱ्यावरचे भाव न बदलता सांगायचा. त्याच बोलणं मनाला बरं वाटतं होतं. एकतर आज थोड स्वस्त मिळेल याचा आनंद. नाहीतर दोन दिवसांनी याच तिकीटावर हाच खेळ परत करायला लागेल याची काळजी.

इतर खरेदित या रंगात, त्या डिझाईन मध्ये, आणि त्या प्रकारात अशी विचारणा हातरुमाल, पर्स, पिशव्या, साड्या, पॅन्ट आणि शर्ट पिस, चप्पल, बुट अशा शक्य त्या सगळ्या वस्तुंच्या बाबतीत झाली. डिस्काउंट वर घसघशीत घासाघीस झाली.

किराणा मालातील साबण आणि पेस्ट या सारख्या काही वस्तू सोडल्या तर तांदूळ, पोहे, रवा, डोक्याला लावायचे तेल, चहा या सारख्या वस्तू सुद्धा सुटल्या नाहीत. रवा जाड हवा. पोहे जास्त पातळ हवे, किंवा नको. वेगवेगळ्या नावाचे पण पोहे असतात हे मला याचवेळी समजले. चहा मिक्स हवा, ममरी नको, हे माझ्या मेमरीत फिट्ट बसले. तांदूळ बासमतीच हवा, चिनोर, कोलम नको. तुकडा चालणार नाही. असं पाहतांना एक एक वस्तू आणि त्यांची खरेदी याचा तुकडा पाडला जात होता. म्हणजे खरेदी संपत नसली तरी काही प्रमाणात आटोपत होती.

त्यामुळे प्रकार, रंग, डिझाईन, भाव, डिस्काउंट या गोष्टी त्या काही दिवसात पाठ झाल्या होत्या. पाठ म्हणजे इतक्या पाठ की त्या पाठ सोडायला तयार नव्हत्या.

पण या सगळ्या खरेदीचा साइड इफेक्ट कार्य संपल्यावर जाणवला. नंतर परत बॅंकेतून पैसे काढण्यासाठी गेलो तेव्हा कॅशीयरला सुध्दा सांगितले. सगळ्या एकाच प्रकारच्या नोटा देऊ नका. वेगवेगळ्या द्या.  त्यावर त्याने सुद्धा विचारले. काही कार्यक्रम आहे का?… हे झाले पैशाचे.

सलून मध्ये पण असंच झालं. कटिंग करायला बसल्यावर त्याने विचारले. कसे कापू? जास्त की साधारण?…..  मी विचारल पैसे दोघांचे सारखेच लागतील नं? त्यावर त्याने ज्या नजरेने माझ्याकडे पाहिल ते त्याच्या आरशात मला दिसल…..

कार्याची दगदग झाल्यावर नंतर तब्येत थोडी नरमगरम वाटली. डाॅक्टरांकडे गेलो. त्यांनी तपासून तीनचार गोळ्या व एक बटलीतले औषध लिहून दिले.

औषधाच्या दुकानात तोच प्रकार. अरे या पॅकिंगमध्ये गोळ्या कशा आहेत ते दिसत नाही. जरा आकार आणि रंग दिसणाऱ्या दाखवा ना…… बाटलीत यापेक्षा वेगळा आणि लहान आकाराच्या नाही का?… किमतीत काही कमी जास्त…… गोळ्या यातच लहान नाही का?…. गिळायला बऱ्या असतात.

मी अस विचारल्यावर औषध विकणाऱ्याने चेहरा खाऊ का गिळू असा केला. पण साइडने त्याच्या चेहऱ्यावर माझ्या बोलण्याचा झालेला इफेक्ट मला दिसलाच…..

माझ्या लक्षात आलं. सतत रंग, डिझाईन, वजन, लहान, मोठ अस विचारत  केलेल्या सततच्या खरेदीचा हा साइड इफेक्ट आहे……

असच एक कार्य बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्याचसाठी घडवून आणल होत. त्याही कार्याचे काही साईड आणि वाईड इफेक्ट आता दिसायला लागले आहेत. पण त्यावर नंतर बोलू.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चांदोबाला अनावृत्त पत्र… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? विविधा ?

☆ चांदोबाला अनावृत्त पत्र… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

प्रिय चांदोमामा,

         सस्नेह नमस्कार !

आज आबालवृद्ध भारतीयांना तुझी खूप खूप आठवण येत आहे. तुझ्या प्रत्यक्ष भेटीसाठी आम्ही नेहमीच आतुर राहिलो.आमच्यापासून तू आता फार दूर राहिलेला नाहीस. आमचा दूत चांद्रयान-3 तुझ्या कक्षेत आलाय.

चंदामामा, तुझा स्वतःभोवती आणि पृथ्वीभोवती फिरण्याचा वेग एकसमान असल्यामुळे तुझी दुसरी बाजू आम्हाला इथून कधीच दिसत नाही.पण आमच्या दूतानं त्याही बाजूची छायाचित्रं आम्हाला पाठवलीत. आजवर आम्ही तुझ्या छातीवर अंकित असलेला ससा पाहिला आणि त्यावरून तुला “शशांक’ असं नावही दिलं. आता तुझी दुसरी बाजूही आम्हाला दिसली आणि तीही तितकीच सुंदर आहे.

तुझं आणि आमचं नातं प्रभू श्री रामरायांपासून आहे.तुझ्याकडे पाहून लहानग्या रामचंद्रांनी तुझ्याशी खेळण्याचा हट्ट केला आणि कौसल्यामातेनं रामचंद्रांच्या हाती आरसा दिला. त्यात तुझं रूप पाहून प्रभू रामचंद्रांची कळी खुलली. तेव्हाच कदाचित राम आणि चंद्र हे शब्द एकत्र येऊन ‘रामचंद्र’ शब्दाचा उदय झाला असावा. तेव्हापासूनच प्रत्येक माता आपल्या बाळाला तुझं रूप दाखवते आणि बाळंही तुझ्याकडे पाहून हरखून जातात.

‘निंबोनीच्या झाडामागे । चंद्र झोपला गं बाई हे’। अंगाई गीत ऐकत येथे बाळ लहानाचं मोठं होतं. ‘चांदोबा, चांदोबा भागलास का? निंबोनीच्या झाडामागे लपलास का?’ हे पिढ्यानुपिढ्या लोकप्रिय बालगीत आजही कायम आहे.’चांदोबाची शाळा’ पाहण्याची उत्सुकता बालमनाला असते.’सुंदर चांदण्या,चंद्र हा सुंदर,चांदणे सुंदर पडे त्याचे’ ह्या प्रार्थनेतल्या ओळींनी शालेय शिक्षणाला सुरुवात होते.’चंदा है तू ,मेरा सुरज है तू’।,’उगवला चंद्र पुनवेचा’, ‘कैवल्याच्या चांदण्याला ,भुकेला चकोर’, ‘चंद्र व्हा हो पांडुरंगा। मन करा थोर।,’ चंद्र आहे साक्षीला’, ‘कोणता मानू चंद्रमा?’, ‘चौदाहवी का चाँद’, ‘हे सुरांनो,चंद्र व्हा।’ अशी कितीतरी गाणी येथल्या मनामनात रुजली आहेत.

प्रत्येक माता तुला मनोमन भाऊ मानते आणि त्यामुळे प्रत्येक बाळाचा तू ‘मामा’ बनतोस. तुझी आणि गणपतीबाप्पांची गोष्ट ऐकून आम्ही लहानाचे मोठे होतो. तरुणपणात तुला साक्षीदार मानून प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात. प्रेमात यश मिळो वा अपयश, प्रेमाचं आजन्म स्मरण राहतं ते तुझ्यामुळेच. त्या आठवणी जपत लोक म्हातारे होतात. वयाला ऐंशी वर्षे पूर्ण होतात, तेव्हाही आम्ही ‘सहस्रचंद्रदर्शन’साजरं करतो.

तात्पर्य, जिथल्या प्रत्येक माणसाचा जन्मभर तुझ्याशी संपर्क असतो, अशा भारत देशाचे आम्ही नागरिक आहोत आणि आज तुझ्याशी प्रत्यक्ष संपर्क स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

आज दि.23 ऑगस्ट 2023 संध्याकाळची 6 वाजून 4 मिनिटं ही वेळ आमच्यासाठी आणि आमचा नातलग असल्यामुळे तुझ्यासाठीही खूप महत्त्वाची आहे.चांद्रयान-3चं ‘विक्रम लॅंडर’ तुझ्या दक्षिण ध्रुवाला स्पर्श करण्यास व्याकूळ झालंय.

अपयशातून बोध घेऊन पुढे जाणाऱ्यांचा हा देश आहे. मागील वेळी अल्गोरिदमच्या अपयशामुळे तुला कवेत घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. हा दोष यावेळी आम्ही दूर केलाय. यशापयशाचा खेळ आजन्म सुरूच असतो; पण आम्ही थकणारी माणसं नाही. तीनच दिवसांपूर्वी रशियाच्या “लुना-25′ यानाचा तुला स्पर्श करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि मिखैल मारोव नावाच्या शास्त्रज्ञाला रुग्णालयात दाखल करावं लागलं. तुझ्या भेटीची आस किती तीव्र असते, हे एवढ्यावरूनच तू समजून जा!

आम्हा भारतवासीयांचं आणि तुझं नातं तर विज्ञानाच्या पलीकडचं. आमच्या भावविश्‍वात तुझं स्थान अढळ. म्हणूनच ‘विक्रम’ची आणि तुझी भेट होणं हा आमच्यासाठी केवळ ‘विक्रम’नसून, ते भावनिक मिलन आहे, हे ध्यानात ठेव.

शास्त्रज्ञांच्या मते, शेवटची पंधरा मिनिटं खूप महत्त्वाची आहेत. शास्त्रीय भाषेत ज्याला ‘सॉफ्ट लॅंडिंग’ म्हणतात, तीच खरी कसोटी. चांदोमामा, ही आपल्या नात्याचीही कसोटी आहे, असं समजून आम्हाला यश दे. रक्षाबंधनाचा दिवस फार दूर नाही. तुझ्या कोट्यवधी भारतीय बहिणींची माया फळाला येऊ दे. तुझे कोट्यवधी भाचे श्‍वास रोखून बसलेत. आम्हा सर्वांसाठी ‘मामाचा गाव’ किती महत्त्वाचा आहे, हे तू जाणतोस. आता तो हाकेच्या अंतरावर आलाय. तुझ्या ‘विक्रम’ला प्रेमानं कुशीत घे.एवढंच आत्मीय मागणं.

विश्वास वाटतो की,तू आमची मनस्वी इच्छा पूर्ण करशील.मामाला भेटण्याची अशी संधी पुन्हा पुन्हा मिळू दे.

बाकी सारे क्षेम.भेटीत अधिक बोलूयाच.

             तुझे लाडके,

तमाम भारतीय बंधू-भगिनी व भाचे मंडळी

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “घनिष्ठ मैत्री…” ☆ श्री वैभव चौगुले ☆

? विविधा ?

☆ “घनिष्ठ मैत्री…” ☆ श्री वैभव चौगुले ☆

निस्वार्थ विश्वास जिथे असतो,  मानवी परिवर्तन जिथे होते, मर्यादितता, बंदिस्तता मधून जिथे मोकळा श्वास घेता येतो अशा ठिकाणी मैत्रीचे भक्कम कायमस्वरूपी वसलेले घर असते.

कृष्ण सुदामासारखी, कर्ण दुर्योधनासारखी मैत्री हल्ली कोठे अनुभवयाला मिळत नाही. मला मैत्रीची नक्की व्याख्या आपल्याला सांगता येणार नाही. पण माझ्या कल्पनेने, अनुभवानी,समोर घडलेल्या गोष्टी, ऐकलेल्या गोष्टी ज्या मैत्री या विषयाशी जोडल्या गेल्या आहेत त्यावरून मी मैत्रीवर थोडं लिहीत आहे.

घनिष्ठ मैत्री आयुष्याचा अविस्मरणीय ठेवा असतो हे खरे, पण केव्हा? जर मैत्री निभवली तर. ती ही मरेपर्यत!  ही मैत्री भविष्यकाळात येणा-या परिस्थितीवर बदलणा-या  मनावर, क्षणीक सुखाच्या मोहावर अंवलबून असेल तर ती कशी टिकेल?

घनिष्ठ मैत्री होण्यासाठी खूप वेळ जातो. ही मैत्री कुठे विकत मिळत नाही. या मैत्रीला कोणती कंपनी नाही. मैत्री सर्वांशी होत नाही आणि मुद्दाम कोणीशी मैत्री जाऊ न करावी म्हटली तरीही ती करता येत नाही.

आजारावर औषधं डॉक्टरांच्या सल्याने आपण घेत असतो. योगासनामध्ये हसण्याचे भाग घेतले जातात. कारण तो भाग योग अभ्यासामध्ये येतो. हसण्याने माणसाचे आयुष्यमान वाढते. असं मी नेहमीच ऐकतो. वरवरून नाईलाज म्हणून आपण खोटे हसू चेह-यावर आणत असतो.

एक सांगू ?  आनंदावर, मनातून येणा-या हसण्यावर जर का प्रभावी औषध असेल  तर ते औषध अंतरमनातून निखळ निर्माण झालेल्या मैत्रीतूनच मिळत असते. असे मला वाटते.

मैत्रीत एक हात धरून दुसरा हात दुस -या ठिकाणी बळकट करत, पहिला हात सोडून पुन्हा पहिला हात रिकामा ठेवून दुस-या हात शोधत मैत्रीला डाग लावत फिरणा-या मैत्रीचा प्रकार ही पहावयास मिळतो. मी या मैत्रीला न्यू आफ्टर ब्रेकअप फ्रेडशीप म्हणेन 😊 हे कधी होतं मनात काही गोष्टी लपवून ठेवणे, काही गोष्टीचा त्याग न करता सर्वच गोष्टाीना महत्व देत बसणे, अशा गोष्टी समोर येवू  लागल्या की मैत्रीमधला दुरावा निश्चित होत जातो. पण या सवयीमध्ये एक मन निर्णय घेण्यात यशस्वी होतं आणि दुसरं मन मानसिकतेचं शिकार होवून जातं. किती प्रकार आहेत मैत्रीचे माहित नाहीत. मी घनिष्ठ मैत्रीवर लिहीत आहे हे लक्षात घ्या.

प्रेमांनी ओंजळ भरणे, भावनांच मोल जपणे, मळभ भरणे, मनाला निरभ्र करणे, आयुष्य वाटून घेणे, दिलासा देणे, काळवंडल्या क्षणातून बाहेर पाडणे. ही घनिष्ठ मैत्रीतले घटक मी म्हणेन! न बंधन न कुंपण घालता दुस-याच्या जीवनात फुलपाखरासारखे बागडणे, विचाराचे आदान प्रदान निखळपणे, निस्वार्थीपणे करणे पण हे शक्य होतं का हा प्रश्नच?

माणसाला मेल्यानंतर दफन करायला किंवा जाळायला जितकी जागा लागते ना तितक्याच मैत्रीच्या जागेत स्वर्गसुखाचा आनंद मिळतो. पण या जगा मध्ये अनेक नको असलेल्या गोष्टीकडे माणसाचं चंचल मन वळत असतं! काय तर मनाचं मनोरंजन होत नाही. म्हणून जीवाला जीव देणारं मन भेटलं तर वाळल्या उचापती होतात का? हे कळत नाही.काय लागतं जीवन जगायला दोन प्रेमाचे शब्द,  अन्न, वस्त्र व निवारा या तीन गोष्टी सोबत एक गोष्ट वाढली आहे ती म्हणजे इटरनेट..🙂 इंटरनेट नसेल तर माणसाचे आयुष्य संपल्यासारखेच आहे. दोन चार दिवस माणसाला इन्टरनेट नाही मिळालं की डायरेक्ट सलाईनच लावावे लागेल. कारण जाळं, खूप पसरलेलं आहे. मनाचं पण आणि इंटरनेटचं पण. उभे आयुष्य कोणताही मोह न करता सुखाने जगता येतं, फक्त आयुष्यात एका मनाशी घनीष्ठ मैत्री होवून मरेपर्यत टिकली पाहिजे. हे तितकेच खरे वाटते . पण त्या जागेमध्ये आणि  मैत्रीमध्ये कोणत्याही आमीश दाखवणा-या चिटपाखरूचा चुकून सुध्दा वावर होवू न देणे.

कमळाच्या फुलातील परागकण खाण्यासाठी भुंगा ज्याप्रमाणे त्याच्या आजुबाजूच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करतो त्याच प्रमाणे घनिष्ठ मैत्री जपण्यासाठी आजुबाजूच्या परिस्थितीकडे दुलर्क्ष केले किंवा मनावर न घेता त्या गोष्टी व्यवहाराने हातळल्या की घनिष्ठ मैत्रीमध्ये दुरावा निर्माण होणार नाही. पण हे करताना आपल्या दुस-या मनाला सांगून विचारात घेऊन निर्णय घेणे तितकेच आवश्यक आहे.

भावनेशी संबंध असलेलं हे एकच नातं जे रक्तांच्या अनेक नात्यापेक्षा पवित्र आणि परिपूर्ण असलेलं घनीष्ठ मैत्रीचं नातं आहे. असे म्हणावे लागेल. मैत्री टिकवून ठेवणं हे सर्वानाच जमते असे नाही. हव्यासा पोटी मोहाला बळी पडून चांगली मैत्री संपुष्टातसुध्दा आलेली पाहिली आहे.

When I am free you should also free..असं जर समजलं तर मैत्रीमध्ये दुरावा होत जातो. येथे समजून घेण्याची ताकत कमी पडते आणि मनाची चिडचिड होते, मानसिकता खचते. संयम सुटतो व नको ते होवून जाते. मैत्री ही मोहक वा-याची झुळूक असते. मैत्री करताना त्यांच्या गुणदोषासंगे स्वीकार करण्याची तयारी दर्शिवलेली असते. पण ज्यावेळी दोन मनांचे रस्ते एक होतात त्यावेळी आपला स्वभाव व चंचलपणा बदलावा लागतो, एकमेकांचा आदर करावा लागतो, कित्येक गोष्टीचा त्याग करावा लागतो. चालायला लागले की मग मागे हटण्याचा विचार मनात यायलाच नाही पाहिजे. जिथे अपेक्षा संपतात, जिथे शोध संपतो, जिथे अपेक्षाच राहत नाहीत तिथे अपेक्षा येतात कोठून आणि मग अपेक्षा भंग होण्याचे कारण तरी काय असू शकते. द्या ना जितका वेळ द्यायचा तितका  तुमच्या मैत्रीला. सर्व सोडून मैत्रीमध्ये सर्वस्व अर्पण केलेलं असतं. मात्र तिथे कानाडोळा, लपवाछपवी केली तर ख-या मैत्रीचा स्वप्नचुरा होण्यास कितीसा वेळ लागणार आहे.

मैत्री ही अशी भावना आहे जी दोन मनांना अंतःकरणापासून जोडते. खरा मित्र त्याला योग्य सल्ला आणि योग्य दिशाच दाखवत असतो. मैत्री ही फक्त आनंदातील क्षणांची सोबत नसून दु:खात ढाल होवून समोर येण्याची ताकत असते.

घनिष्ठ मैत्रीचा विश्वास हाच पाया असतो. मैत्रीही दु:खात हसवते, संकटावर मात करायला शिकवते, जगायला शिकवते. संयमी राहायला शिकवते, चांगले कठोर निर्णय घ्यायला शिकवते. मैत्री ही आधार होऊन राहते. आणि शेवटी इतकच म्हणेन मैत्री ही हृदयाचे निखळ सौंदर्य दाखवणारा आरसा असते…

© श्री वैभव चौगुले

सांगली

मो 9923102664

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “शब्द… आणि… हुंकार…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “शब्द… आणि… हुंकार…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

शब्दांचा आधार घेतल्याशिवाय आपण मनातल काहीच व्यक्त करु शकत नाही. मनातल्या भावना पोहोचवण्याच प्रभावी माध्यम म्हणजे शब्द आणि हुंकार. आपल्या चेहऱ्यावर काही भाव दिसतात. पण भावनांना प्रकट करतात ते शब्द. म्हणूनच शब्दातून प्रेम, राग, तिरस्कार, अभिमान, कौतुक सगळ व्यक्त होत. *शब्दात धार आहे. शब्दात मार आहे. शब्दात प्रेमाचा सार देखील आहे. शब्द कठोर आहेत तसेच मवाळ, व मधाळ सुध्दा आहेत.

शब्दात प्रार्थना, याचना, मागणं आहे,  स्तुती, गौरव, क्षमा आहे. त्यात विश्वास, आधार आहे. आपलेपणा, परकेपणा आहे. उदारता आहे, स्वार्थीपणा सुद्धा आहे.*

एकदा शब्द दिला म्हणजे दिला असे म्हटले की यात ठाम विश्वास असतो. तर….. तर त्याच्या शब्दांवर भरवसा नाही.‌…. असं म्हटलं की अविश्वास. आपल वागण हिच आपल्या शब्दांची किंमत असते.

खूप आनंद झाला की बोलायला शब्द सुचत नाही. तर कठीण प्रसंगी शब्द फुटत नाहीत. काही वेळा म्हणतो, शब्दात कस सांगू तेच कळत नाही. किंवा सांगायला शब्द अपुरे आहेत.

शाहण्याला शब्दांचा मार असेही म्हणतात. माणूस नि:शब्द झाला की सुचेनासे होते, किंवा सुचेनासे झाले की माणूस नि:शब्द होतो.

एकाच गोष्टीसाठी अनेक शब्द असले तरी त्या शब्दांना आपला एक अर्थ आणि त्यात एक भाव असतो. थोड सविस्तर सांगायच तर प्रवीण दवणे यांनी एका गीतामध्ये आभाळ आणि आकाश असे दोन्ही शब्द आले त्या बद्दल विचारलेला किस्सा (बहुतेक शांताबाई शेळके यांनी लिहिलेले गीत आहे.) त्यावर मिळालेल उत्तर  निरभ्र असते ते आकाश. भरुन येत ते आभाळ. यावर पुढे असं सुद्धा म्हणता येईल की बरसात ते मेघ. असे समर्पक अर्थ शब्दात आहेत.

हुंकाराच ही तसच काहीसं आहे.  बऱ्याचदा विचारलेल्या गोष्टींना आपण हुंकाराने उत्तर देतो किंवा आपल्या प्रश्नांना हुंकाराने उत्तर मिळत. अं…. हं….. अंह….. उं….. असे काही हुंकार परिस्थिती नुसार आपण काढतो, किंवा ते नकळत निघतात.

या हुंकारात सुध्दा ते आनंदाचे, नाराजीचे, सकारात्मक, नकारात्मक, आळसावलेले असे असतात.  हुंकार कसा आहे हे त्याचा निघालेला आवाज आणि त्याची लय यावरून समजतो.

भावना पोहचवण्याच काम शब्द करतात. आणि आपण प्रेमाचे दोन शब्द ऐकायला आतुर असतो. शब्द तेच किंवा तसेच असतात. आपल्या भावना त्यात जाणीव निर्माण करतात.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गझलेतला हवासा हसरा श्रावण… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ गझलेतला हवासा हसरा श्रावण ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

श्रावण ! प्रत्येक कवीचा आवडता विषय ! अगदी बालकवींच्या ” श्रावणमास “ या कवितेपासून तर आजच्या अगदी नवोदित कवी पर्यंत पिढी दरपिढी अनेक कवितांमधून श्रावण रसिकांच्या भेटीला येतोच आहे. मग गझलकार तरी याला अपवाद कसा असणार ? कारण आधी गझलकार हाही कवीच आहे ! फक्त त्याने गझलेच्या तंत्राकडे म्हणजेच शरीरशास्त्राकडे अतिशय गंभीरपणे बघायला हवे ! केवळ मंत्राच्या मागे लागून जर गझलेच्या आकृतीबंधाकडे दुर्लक्ष झाले तर ती कविताही राहत नाही आणि गझलही होत नाही , हे मी अत्यंत जबाबदारीने विधान करीत आहे. गझलेतील लय , यती आणि एकूणच आकृतीबंध सांभाळून वाचकाला आवडणारी रचना / गझल देणे हे साधे सोपे नसते ! यासाठी प्रचंड मोठा शब्दसाठा , किमान व्याकरणाची माहिती , शुद्धलेखन याची गरज असतेच . पण त्याच बरोबर भौगोलिक / प्रादेशिक जाणीवा असणे हे सुद्धा गरजेचे असते ! अन्यथा आषाढात रिमझिम पाऊस आणि श्रावणात कोसळधारा कवितेतून बरसतात ! काही गझलांमधे उन्हाळ्यात प्राजक्त फुलतो तर पावसात पानझड होते . हे हास्यास्पद प्रकार होऊ नयेत याचीही काळजी गझलकाराने घ्यायला हवी !

सध्या आणखी एक प्रकार बघायला मिळतो की , हवी तेवढी सूट घेऊ नवोदित गझलकार गझल लिहितात ! अगदी एक शेर झाला की त्यात भरीचे ४ शेर घालून गझल पूर्ण करून समाज माध्यमावर पोस्ट करतात ! बरं त्यावर कुणी प्रश्न विचारलाच तर ” अमुक तमुक प्रस्थापित गझलकाराने ही सूट घेतली होती म्हणून मीही घेतली !” हे सांगतात . यावर काय बोलणार ? आम्हीच आमची जबाबदारी ढिसाळपणे वापरत असू तर नवीन लोकांना कां दोष द्यायचा ?

गझल तंत्राधिष्ठीत पण काव्यात्म लेखन प्रकार आहे ! गझल असते किंवा नसतेच ! त्यात ” गझले सारखे किंवा गझलवजा ” म्हणण्याचा प्रघात आताशा रूढ होत आहे. याच्याशी अनेक कारणे निगडीत आहेत , त्यातील ” गझलगुरू ” हाही प्रकार महत्वाचा आहे. ते गझलतंत्र तर सोडाच , पण चक्क गझल शिकवतात . (?) त्यामुळे आज गझलेची संख्यात्मक वाढ होत आहे , पण गुणात्मकतेची काळजी वाटते ! अष्टाक्षरी , ओवी , अभंग , गवळण , भावगीत , भक्तीगीत , भारूड , पोवाडा , पाळणे , आरत्या , श्लोक , आर्या , दिंडी असे अनेक प्रकार मान्य करणाऱ्यांना गझलचे तंत्रच तेवढे का खटकते / का खुपते हा अभ्यासाचा विषय आहे ! त्यावर कृत्रिमतेचाही आरोप होतो . असो !

हीच बाब विषयांशीही निगडीत आहे . आज जुने , नवे जेवढे हात गझल लिहू लागले आहेत , त्या गझलेतला श्रावण शोधावाच लागतो . समाज , सुधारणा , भूक , दारिद्रय यांच्याच परीघात रमलेली गझल प्रेम , माया , निसर्ग यापासून दूर जाते आहे की काय ही भिती वाटते . पण तेव्हाच काही दादलेवा शेर वाचले की कळतं ” पेला अर्धा भरला आहे “.

मिठीत होती अधीरता अन् दिठीत होता साजण

सायंकाळी . ढगात आला श्रावण

हा श्रावणाचा माझाच एक शेर आहे ! अस्ताचलास जाणारा सूर्य , त्याची ढगावर पडलेली किरणे आणि उमटलेलं इंद्रधनुष्य , ही श्रावणाची ओळख चट्कन पटते ती सायंकाळी .

तुझ्या फुलांचा सडा पहाया रोज अंगणी

श्रावण येतो मज भेटाया रोज अंगणी

कोल्हापूर येथील श्री .नरहर कुलकर्णी यांचा हा राजस शेर मनाला भावतो !

हासरा नाचरा श्रावण कुसुमाग्रज दाखवतात ! तर ” ऋतू हिरवा ऋतू बरवा या ओळीनी श्रावण वेगळाच भासतो !

समीक्षक प्रकाश क्षीरसागर त्यांच्या एका शेरात म्हणतात ,

गझलेस भावलेला श्रावण किती निराळा

सृष्टीस भाळलेला श्रावण किती निराळा

श्रावण सुरू झाला की कवीच्या प्रतिभेला धुमारे फुटू लागतात , असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही . नयनरम्य श्रावण , रंगाने , गंधाने आपल्याला मोहून टाकतो . अशाच अर्थाचा प्रसाद कुलकर्णी यांचा एक शेर बघा !

तनही बरवा मनही बरवा श्रावण हिरवा

धुंद करी ही बेधुंद हवा श्रावण हिरवा

श्रावणावर अनेक कविता आहेत पण गझल मात्र मोजक्याच आहेत . त्यातही तुरळक शेर सापडतात . नवोदित आणि जेष्ठ गझलकारांना असे सुचवावेसे वाटते की सृष्टीतला कण न् कण आपल्या काव्याचा विषय होऊ शकतो . फक्त ती दृष्टी हवी ! त्यामुळे त्याच त्या विषयांच्या रिंगणात फिरण्यापेक्षा नवनवे विषय घेऊन आपली गझल पूर्ण करावी ! आज नवोदित गझलकारांमध्ये काही आश्वासक हात नक्कीच आहेत . त्यामुळे तंत्र सांभाळून गझलेचा मंत्र सांभाळला जात आहेच . एवढेच नाही तर नाण्याला जशा दोन बाजू असतात , आणि दोन्ही खणखणीत असाव्या लागतात , तीच गोष्ट गझलेची आहे . तंत्र मंत्र योग्यच असायला हवे एवढेच नाही तर नाण्याला एक तिसरी बाजू म्हणजे एक कडापण असते . अत्यंत गरजेची ! तशीच मराठी गझलेची कडा म्हणजे , मराठी व्याकरण आणि शुद्धलेखन सांभाळून , निर्दोष तंत्रात आलेली  गझलेतली गझलियत .

या तीनही बाजुंचा सारासार विचार करून गझलेकडे वळणारे बघितले की ,

” विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही “

ही भट साहेबांची ओळ सार्थ झाली असे वाटेल .

विस्तारभयास्तव इथेच थांबते माझ्या एका गझलेसह !

 घरात आला श्रावण ☆

संध्याकाळी मी जपलेला घरात आला श्रावण

मृद्गंधाची हाक ऐकुनी नभात आला श्रावण

 

या हळदीच्या देहावरती सोनरुपेरी आभा

केस मोकळे पाठीवरती मनात आला श्रावण

 

सायंकाळी शुभशकुनाच्या आज पाहिल्या रेषा

इंद्रधनूला झुला बांधुनी ढगात आला श्रावण

 

उत्साहाची घरात माझ्या अवघी पखरण झाली

ओलेती तू समोर येता क्षणात आला श्रावण

 

मल्हाराचे गूज उकलले वर्षत अमृत धारा

कूजन सरले तरी कुणाच्या स्वरात आला श्रावण

 

लयतालाने येत समेवर मैफल जिंकत गेले

गुणगुणताना गझल मनीची सुरात आला श्रावण

 

ओठावरती पुन्हा उमटली मेघसावळी नक्षी

पहाट होता प्रणयाची मग भरात आला श्रावण

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print