श्री विश्वास विष्णु देशपांडे
विविधा
☆ स्वदेशीचा जादू… भाग – ३ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे…
रेडिओवर तुकोबांचा अभंग लागला होता. लताबाई गात होत्या. त्या गाण्याच्या तालावर श्यामरावांनी ठेका धरला होता. तेही गुणगुणू लागले होते, ‘ वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे…’ एवढ्यात राजेशने त्यांची तंद्री भंग केली.. ‘ बाबा, ऐका ना मी काय म्हणतोय ते…? ‘ श्यामराव आपल्या तंद्रीतून बाहेर येत म्हणाले, ‘ हं, बोला राजे. ‘ राजेश म्हणाला, ‘ बाबा, हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना ? ‘ श्यामराव राजेशच्या ज्ञानावर खुश होत म्हणाले, ‘ अगदी बरोबर. बेटा, तुला आवडला का हा अभंग ? लता मंगेशकरांनी फार सुंदर गायला आहे बरं .’ ‘ अहो बाबा, अभंग तर सुदंर आहेच. पण मला विचारायचे ते वेगळेच आहे. ‘ ‘ बोल बोल काय विचारायचे आहे तुला ? ‘ बाबा म्हणाले.. राजेश म्हणाला, ‘ बाबा, आता जसे शाळेत पर्यावरणाचे महत्व शिकवतात. झाडे लावा वगैरे सांगतात. तसे तुकाराम महाराजांच्या काळी पण सांगत असावेत का हो ? ‘ हा प्रश्न ऐकल्याबरोबर बाबांना हसू फुटले. तशी पिंकी मध्ये येत म्हणाली, ‘ बाबा, हा राजेश ना काय विचारेल काही सांगता येत नाही..’
‘ नाही नाही पिंके, अग आपल्या राजेशला पडलेला प्रश्न बरोबरच आहे. या प्रश्नाचे उत्तर मी सांगतो. पण त्याआधी तू एक काम कर. तू आईला आपल्या सगळ्यांसाठी मस्त गरमागरम पोहे करायला सांग. आणि पोहे झाले की तिला पण इकडे ये म्हणावं. ‘
‘ हो बाबा, आता सांगते आईला ‘ असं म्हणत पिंकी स्वयंपाकघराकडे पळाली. ती गेली तशी परतलीही.
राजेश म्हणाला, ‘ आता सांगा ना बाबा माझ्या प्रश्नाचे उत्तर. ‘
‘ हो सांगतो. त्याचं काय आहे राजेश, त्या वेळी आजच्यासारख्या शाळा वगैरे नव्हत्या. गुरुजी किंवा पंतोजी घरी येऊन शिकवायचे. काही ठिकाणी गुरुकुलासारखी पद्धतही होती. पण वृक्षांचे, पर्यावरणाचे महत्व वेगळे सांगावे लागत नव्हते. कारण त्याची जाण त्या काळातील लोकांना म्हणजेच आपल्या पूर्वजांना मुळातच होती. ते स्वतःच पर्यावरणाला जपायचे, त्याची काळजी घ्यायचे. त्याचे संस्कार आपोआपच त्या काळातील लहान मुलांवर व्हायचे. वृक्षांना पवित्र मानून त्यांची पूजा केली जायची. कामापुरतीच विशिष्ट झाडे तोडली जायची. जंगले शाबूत होती, घनदाट होती. त्यावर लोकांची उपजीविका चालायची. आणि तुकाराम महाराजांसारखे संत तर वनातच राहायचे. तिथेच त्यांची उपासना, ध्यान, जपतप इ. गोष्टी व्हायच्या. त्या वनातील वृक्ष, प्राणी हेच त्यांचे सखेसोबती असायचे. त्यांच्या संगतीत त्यांचा वनवासही सुखकर व्हायचा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या साधूसंतांना मुळातच पर्यावरणाची जाण होती, त्याचे महत्व कळले होते. समर्थ रामदासांच्या दासबोधात सुद्धा कितीतरी ठिकाणी वेगवेगळ्या कारणाने वृक्षांचा उल्लेख त्यांनी केला आहे. ‘ बाबांनी सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला.
‘ बरोबर आहे बाबा तुमचं, ‘ पिंकी म्हणाली. आमच्या शाळेतल्या बाईंनी आम्हाला एक पुस्तक वाचायला सांगितलं आहे. अं, काय बरं त्याचं नाव ? हं , आठवलं. ‘ दास डोंगरी राहतो ‘ असं काहीतरी नाव आहे. म्हणजे समर्थ डोंगरातच राहत होते ना.. ?
‘ हो बरोबर आहे पिंकी,’ आई पोह्याच्या डिश ठेवत म्हणाली. ‘ अगं, गो नी दांडेकरांची आहे ती कादंबरी. आपल्याकडे आहे. मी देईन तुला काढून. ‘
‘ अहो, मी काय म्हणते ? उद्या रविवार आहे. आपण बऱ्याच दिवसात कुठे बाहेर गेलो नाही. आपण मुलांना घेऊन कुठेतरी जाऊ या का ? ‘
पिंकी, राजेश दोघांनी आनंदानं टाळ्या वाजवल्या. ‘ बाबा, जाऊ या ना मस्त कुठेतरी. ‘ पिंकी म्हणाली.
‘ बरं बरं आता तुम्ही सगळे म्हणताय तर जाऊ या. आपल्या गावाजवळ एक अभयारण्य आहे. तिथे शंकराचं एक हेमाडपंती देऊळ पण आहे. तुम्हाला मस्तपैकी झाडं, प्राणी सुद्धा बघायला मिळतील. ‘ श्यामराव म्हणाले. चला, जा आता. तुमचा गृहपाठ पूर्ण करा. मग थोडावेळ बाहेर खेळायला जा. ‘ मुलं आनंदानं तिथून निघून गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच श्यामराव, श्यामलाताई, राजेश, पिंकी आणि त्यांची पिंकी जंगल सफारीला निघाले. काही ठिकाणी रस्ता कच्चा होता. त्यामुळे प्रवासाला वेळ लागत होता. आता ऊन झाले होते आणि मुलांना भूक लागली होती. रस्त्यात एक विस्तीर्ण पसरलेले वडाचे झाड श्यामरावांना दिसले. त्यांनी तिथे गाडी थांबवली. सगळे गाडीतून खाली उतरले. श्यामलाताईंनी गाडीतून जेवणाचे डबे काढले. श्यामरावांनी राजेश आणि पिंकीला गाडीतील सतरंजी काढून खाली टाकायला सांगितली. आता सगळेच छानपैकी बसून जेवणाचा आस्वाद घेऊ लागले. राजेश म्हणाले, ‘ बाबा, इथे किती छान, फ्रेश आणि थंड वाटते आहे ! हवा पण छान आहे. ‘
‘ राजेश, हे कोणते झाड आहे माहिती आहे का ? ‘ बाबांनी विचारले. ‘बाबा, मी सांगू ? ‘ पिंकीने विचारले.
‘ हो सांग की ‘
‘ हे वडाचे झाड आहे. बाबा, बघाना याला पारंब्या किती फुटल्या आहेत ! पिंकी म्हणाली.
‘ अगदी बरोबर आहे पिंकी. वडाच्या झाडाला खूप पारंब्या फुटतात. त्या पुन्हा जमिनीत जाऊन वाढतात. हे झाड खूप मोठे वाढते. काही काही वटवृक्ष तर एवढे मोठे असतात की त्यांच्या छायेत एकाच वेळी पाच ते दहा हजार लोक सुद्धा बसू शकतात. प्राचीन काळामध्ये व्यापारी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी या झाडाच्या सावलीत थांबत असत म्हणून या झाडाला इंग्रजीमध्ये बनियन ट्री असेही म्हटले जाते. आणि ही झाडे दीर्घायुषी असतात बरं का राजेश. काही झाडे तर हजार वर्षांपर्यंत जगतात. ‘
‘ बापरे, आश्चर्यच आहे. माणसापेक्षा सुद्धा ही झाडे जास्त जगतात. ‘ राजेश उदगारला.
‘ हो राजेश, वड, पिंपळ यासारखी झाडे खूप वर्षे जगतात. हे अक्षय वृक्ष आहेत. यांना पवित्र मानून त्यांची पूजा केली जाते. ‘
राजेशची आई शाळेत विज्ञान विषय शिकवायची. ती म्हणाली, ‘ राजेश, पिंकी , तुम्हाला माहिती आहे का की वड, पिंपळ, औदुंबर, चिंच, कडुलिंब यासारखी झाडे वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात आणि आपल्याला शुद्ध प्राणवायूचा पुरवठा करतात. पिंपळ वातावरणातील १००% कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतो तर वड आणि कडुलिंब अनुक्रमे ८० आणि ७५ टक्के कॉ डा ऑक्साईड शोषून घेतात. वातावरण शुद्ध करणाऱ्या या निसर्गाच्या गाळण्याच आहेत. ‘
‘ अरे वा, झाडे किती उपयोगी पडतात मानवाच्या !’ राजेश म्हणाला.
‘ अगदी बरोबर आहे राजेश, ‘ बाबा म्हणाले. पण राजेश आणि पिंकी तुम्हाला सांगतो की ही सगळी आपली देशी झाडं बरं का ! पर्यावरण शुद्धीसाठी ही फार मदत करतात. पण गुलमोहर, निलगिरी यासारखी झाडे मात्र या दृष्टीने फारशी उपयोगाची नाहीत. या झाडांची सावली फारशी पडत नाहीत. या झाडांवर पशुपक्षीही घरटे करत नाहीत. पण जे पशुपक्षांना कळते, ते मानवाला मात्र कळत नाही. बाळांनो, तुम्ही थोडावेळ आईशी बोला. तोपर्यंत मी जवळपास आणखी काही बघण्यासारखे आहे का त्याचा तपास करतो. ‘ असं म्हणून श्यामराव तिथून निघाले.
श्यामलाताई म्हणाल्या, ‘ बाळांनो, वड, पिंपळ, कडुलिंब, औदुंबर आणि आपली सगळीच झाडे अतिशय औषधी आहेत बरं का ! ते आपल्याला ऑक्सिजन तर देतातच पण आपले अनेक आजारही बरे करतात. कडुलिंबाच्या काडीने नियमितपणे दात घासल्यास दातांना कीड लागत नाही. पिंपळाची पाने तर किती सुंदर असतात. हृदयाच्या आकाराची ! जेव्हा नवीन पालवी फुटते तेव्हा ते छान गुलाबी, तांबूस असतात. मग हिरवी होतात. त्यांची सळसळ, वाऱ्यावर डोलणं किती मनमोहक असतं. पिंपळाची पाने, साल आणि मुळे औषधी असतात. पोटाच्या आजारांवर त्यांचा उपयोग होतो. पिंपळ पानांचा काढा आपले शरीर डिटॉक्स करतो म्हणजे त्यातील दोष किंवा टॉक्सिन्स काढून टाकतो. पिंपळाची फळे पक्षांचे आवडते खाद्य आहे. या वृक्षाला अश्वत्थ वृक्ष असेही म्हटले जाते. याचा उल्लेख भगवद्गीतेत सुद्धा येतो. गौतम बुद्धानी याच वृक्षाखाली तप केले. त्यांना त्या ठिकाणी दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणून त्या वृक्षाला बोधिवृक्ष असेही म्हटले जाते. बिहारमधील बोधगया येथे हा वृक्ष आहे.
पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या मारुतीचे म्हणजे अश्वत्थ मारुतीचे दर्शन पुण्यप्रद मानले जाते. श्रावण महिन्यात तर दर शनिवारी पिंपळाची पूजा करतात. पिंपळ वृक्षाचे महत्व सांगणारा एक छान श्लोक आहे. तू आता मी तुम्हाला सांगते. तुम्ही लक्षात ठेवा आणि पाठ करा तो.
मूले ब्रह्मा, त्वचा विष्णू , शाखा शंकरमेवच
पत्रे पत्रे सर्वदेवायाम, वृक्ष रादन्यो नमोस्तुते.
म्हणजे ज्या वृक्षाच्या मुळांमध्ये ब्रह्मा, सालीमध्ये विष्णू, फांद्यांमध्ये भगवान शंकर आणि प्रत्येक पानात देवीदेवतांचा निवास असतो, अशा वृक्षराजाला ( पिंपळाला ) नमन असो. ‘
‘अरे वा, आई किती माहिती आहे ग तुला! आज तर आम्हाला खूप नवीन गोष्टी कळल्या. ‘ पिंकी म्हणाली.
राजेश म्हणाला, ‘ आई या वडाच्या झाडाभोवती नुसत्या फेऱ्या मारल्या तरी किती छान वाटते. ‘ श्यामलाताई हसल्या आणि म्हणाल्या, ‘ तुम्हाला माहिती आहे का की वटपौर्णिमेच्या दिवशी आम्ही याच झाडाची पूजा करतो. त्याला प्रदक्षिणा घालतो. ‘ पिंकी म्हणाली, ‘ आई, ते माहितीये, पण का पूजा करतात आणि प्रदक्षिणा का करतात ते सांग ना… ?’
श्यामलाताई म्हणाल्या, ‘ पिंकी तू सावित्री आणि सत्यवान यांची कथा ऐकली असशीलच. तरी मी सांगते. सावित्री ही पतिव्रता होती. यमाने सत्यवानाचे प्राण हरण केले होते. पण सावित्रीने आपल्या सामर्थ्याच्या आणि चातुर्याच्या बळावर यमाकडून त्याचे प्राण परत मागून घेतले. वटवृक्षाखालीच सत्यवानाचे प्राण पुन्हा परत आले. तेव्हापासून सवाष्ण स्त्रिया या वृक्षाची पूजा करतात. आपल्या पतीसाठी दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. त्याला प्रदक्षिणाही करतात. वडाचे झाड भरपूर ऑक्सिजन देणारे आहे. त्यामुळे त्याच्याभोवती प्रदक्षिणा केल्याने आपोआपच शुद्ध प्राणवायूचा आपल्या फुफ्फुसांना होऊन आपले आरोग्य सुधारण्यास मदत होते. शिवाय वडाची मुळे, साल, पाने औषधी असतात. सांधेदुखीवर त्यांचा चांगला उपयोग होतो.
तसेच केस वाढण्यासाठी वडाच्या झाडाचा उपयोग करून तेल बनवतात.
कडुलिंबाचे झाड सुद्धा असेच औषधी असते. त्याची सावली तर खूप थंड असते. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कडुलिंबाच्या कोवळ्या पानांपासून चटणी बनवतो. ती आरोग्यासाठी अतिशय चांगली असते, आपली प्रतिकारशक्ती वाढवणारी असते.
‘अबब ! किती उपयोगी असतात ही झाडे, नाही का ? पिंकी म्हणाली.
‘हो तर. म्हणून बाळांनो, आपल्याला नैसर्गिक आपत्तीपासून आणि ग्लोबल वार्मिंगपासून वाचायचे असेल, आपली वसुंधरा हिरवीगार ठेवायची असेल तर विदेशी झाडांचा मोह सोडून देऊन प्रत्येक १०० मीटर अंतरावर प्रत्येकी एक औदुंबर, वड, पिंपळ, कडुलिंब यासारखी झाडे लावली पाहिजेत. तसेच प्रत्येक घरासमोर, परसबागेत किंवा आपल्या गच्चीवर तुळस अवश्य लावावी. तुळस अत्यंत औषधी तर आहेच पण पण ती भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा करणारी वनस्पती आहे. ‘
‘आई, आता कळले की तुकाराम महाराज, ‘ वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ‘ असं का म्हणत असावेत. ‘
एवढ्यात श्यामराव परत आले. ‘ अरे, मायलेकांच्या गप्पा अजून संपल्या नाहीत का ? चला, आपल्याला अजून बरेच काही पाहायचे आहे. ‘
सगळे परत गाडीत बसले. गाडी जंगलाकडे मार्गस्थ झाली.
क्रमशः…
©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे
चाळीसगाव.
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈