स्वाभिमान …किती जणांना असतो ? तुम्ही म्हणाल ” स्वाभिमान तर प्रत्येक मनुष्याला असतोच “. तुमच्या म्हणण्यात खोट नाही परंतु त्यामध्ये यथार्थता नाही हे अधिक खरं आहे. बहुतांशी लोकांचा एक गोड गैरसमज असा असतो की ते स्वाभिमानी आहेत.या गोड गैरसमजात माणसे जगतात आणि मरतात देखील . पण स्वाभिमान या शब्दाची नेमकी जाणीव व त्याचा गाभा किती जणांना आकळलेला असतो ? कोण जाणे. स्वाभिमान हा शब्द मानवी जीवनात अगदी अलिकडे दाखल झाला असावा.याचे कारण असे की , मुख्यतः विज्ञानयुगानंतरच मनुष्याच्या वैयक्तिक व विश्वात्मक भावनांना काही एक निश्चित अशी चौकट उपलब्ध झाली आहे. तत्पूर्वी स्वाभिमान हा शब्द इतर वेगळ्या अर्थाने कार्यरत असावा. त्याच्या मध्ये सखोलतेची व व्यापकतेची त्रुटी असावी.
स्वाभिमान …शब्द उच्चारताना अंग किती मोहरून येते. आपण स्वाभिमानी बाण्याचे आहोत हा गोड गैरसमज बहुतांशी लोकांना सन्मान पुरवत असतो. पण या बहुतांशी लोकांनी स्वाभिमान या शब्दाची परीक्षा आपल्या जीवनात सखोलपणे अभ्यासलेलीच नसते हे कटू वास्तव आहे. स्वाभिमान या शब्दाचा शब्दशः अर्थ स्वतः विषयीचा अभिमान असा होईल. पण हा अर्थ या शब्दाला सखोलपण पुरवत नाही . स्वाभिमान या शब्दांत जोपर्यंत ” स्व जाणण्याची प्रक्रिया ” पार पडत नाही तोवर मनुष्याला स्वाभिमान कळणार नाही .हा ” स्व जाणण्याची प्रक्रिया ” अध्यात्मवादी धारणेची नसून ती वेगळ्या पण योग्य अर्थाची आहे. स्व जाणणे म्हणजे ज्या नैसर्गिक घडणीतून तुमची जडणघडण झाली आहे ती नैसर्गिक प्रक्रिया जाणून तिच्यानुसार प्रामाणिक वर्तन करणे होय. यामध्ये नक्कीच कालसुसंगत लवचिकता असतेच मात्र यामध्ये आशयाला धक्का पोचेल असे असत्य असू नये.मनुष्याच्या नैसर्गिक स्वभावाला मुरड घालून काही अन्य स्वार्थापोटी जेव्हा तो दुसरा एखादा मुखवटा चढवून समाजात वावरतो तेव्हा ” स्वाभिमान ” हा शब्द गळून पडलेला असतो. तुम्ही तुमच्या नैसर्गिक धाटणीशी प्रामाणिक राहून वर्तन करत असाल तर तुम्ही ” स्व ” जाणलेला आहे आणि त्या ” स्व ” चा योग्य अभिमान तुमच्या मनाच्या तळाशी आहे. हा तळ म्हणजेच तुमचा स्वाभिमान असतो. हा तळ ढवळावा लागतो आणि त्या मंथनातून बाहेर पडते तुमचे नैसर्गिक रुप. हे रुप जसेच्या तसे समाजात घेऊन वावरणे म्हणजेच स्वाभिमान जागृत ठेवणे असा होतो. हीच आहे स्वाभिमान शब्दाची जाणीव व यथार्थता …
बहुतांशी लोकांना वरवरचा व शाब्दिक अर्थच अपेक्षित असतो. शब्दाच्या तळाशी असणारे रंग त्यांना जाणवत नाहीत की पृष्ठभागावर तरंगणारे नैसर्गिक तवंग त्यांना दिसत नाहीत . त्यांना फक्त शब्दाच्या समुद्रात दिसतो आपला चेहरा .हा चेहरा फसवा असतो. कारण या चेहऱ्याने ” स्व ” जाणण्याची प्रक्रिया पार पाडलेली नसते. अशावेळी केवळ शब्दजंजाळात अडकून स्वाभिमान बाळगण्यात कोणतीही यथार्थता नाही . स्वाभिमान बाळगायचाच असेल तर पहिल्यांदा ” स्व जाणण्याची प्रक्रिया ” पार पाडा. नंतर त्या ” स्व ” चा मनापासून स्विकार करा. त्यानुसार तुमचे वर्तन करा…” स्वाभिमान ” तिथेच सापडेल.
काल एका गुरुजींनी आशिर्वाद देताना म्हंटले “सुखी व्हा, समाधानी रहा,” आशिर्वाद जाम आवडला आणि पटला. समाधान ह्या शब्दामध्ये मन गुंतले आणि विचारात देखील पाडले.समाधान ही गोष्ट आपल्याला मिळवावी लागते, अनुभवावी लागते.”स्वाद लियो तो जानो”ह्या सारखं ती अनुभवल्या वरच खरी तिची लज्जत, खुमारी ही कळते.समाधान म्हणजे खरतंर वर्णन करायला शब्दही तोकडे पडतात अशी गोष्ट.समाधान ही अनुभवण्याची एक गोष्ट.बरं ही गोष्ट अनुभवली तर अगदी इटुकल्या पिटुकल्या ,साध्यासुध्या गोष्टीतही मिळते.फक्त ही गोष्ट मिळवण्याचं कसब मात्र हवं हं.
अलार्म बंद केल्यानंतर जी पुन्हा डुलकी लागले ती खरी झोप.आणि ह्या साखरझोपेतून मिळतं एक वेगळंच स्वप्नाळू समाधान.
महिनाअखेर अचानक साडीच्या घडीतून मिळालेले पैसे म्हणजे खरा धनलाभ. आणि ह्या अचानक धनलाभातून मिळतं घबाडाएवढं समाधान.
कडकडून भूक लागली असता मस्त जमून आलेली पिठलं भाताची पंगत म्हणजे खरी मेजवानी.आणि ह्या मेजवानीतून मिळतं एक भरपेट ओतप्रोत,तुडुंब आनंदायी समाधान.
एखाद्या गोष्टीचे अप्रुप वाटत असतांनाच अचानक अलगद ओंजळीत पडलेली ती गोष्ट म्हणजे खरे सुदैव.आणि ह्या सुदैवातून मिळतो “अच्छे दिन” वालं साक्षात्कारी समाधान.
आपल्याला काय मिळाले ह्याचा ताळेबंद बघुन यापेक्षा आपल्याला खूप काही मिळाले ह्याची जाणीव म्हणजे खरी त्रुप्ती.आणि ह्या त्रुप्तीतुनचं मिळते उद्याचे उज्ज्वल आशादायी समाधान.
रात्री गादीवर पाठ टेकताच लागलेला डोळा म्हणजे खरे सुख.आणि ह्या सुखातुनचं मिळतं एक आत्मिक समाधान.
मी तरी स्वतः ला खूप नशीबवान समजते.कारण ह्याची अनुभुती मी पावलोपावली घेते.तुम्हीही समजून बघा खूप मस्त वाटेल. ह्या जन्मावर,ह्या जगण्यावर,शतदा प्रेम करावे.
असा तो.देवकीने प्रसवला,यशोदेने वाढवला,आणि तो झटला पांडवांकरता.वसुदेवाचा अंश होता, पण नंदाचे भाग्य झाला.अष्टनायिकांचा नाथ,सोळा सहस्रांचा आधार.गोपिकांचे सुखनिधान,राधिकेचा प्राण.गोपालकांचा सखा,गोधनाचा पाठीराखा.दुष्टांचा मारक,सज्जनांचा तारक.अधर्माचा विच्छेदक आणि धर्माचा संस्थापक.परम ईश्वराचा पूर्णावतार आणि मानवपणाचा साक्षात्कार.
सर्वांना तो त्यांचा वाटे.कदंबाखाली गोपालांशी खेळताना किंवा वृंदावनात रस रचताना त्यातल्या प्रत्येकाला वाटे,तो आपलाच.सुदाम्याला वाटले हा माझा सहचर ,कुब्जेला वाटले ‘हे माझ्यास्तव.’
पण साऱ्यांचा असून तो कुणाचाच नव्हता. गोकुळ सोडलं,प्राणप्रिय बासरी परत कधी अधरावर धरली नाही.अष्टनायिकांच्या मोहात, राधिकेच्या त्यागात, कृष्णेच्या सख्यत्वात,कुंतीच्या ममत्वात कशा कशात गुंतला नाही तो.
जिथे गेला तिथे पूर्णांशाने त्यात होता. तिथले प्रयोजन संपताच कमलपत्राच्या निर्लेपपणे आपला आभाळासारखा निळा शेला उचलून निघून जायची त्याची रीत. पण एका जागी मात्र हा जगन्नायक गुंतून पडला.त्याच्या शेल्याचं टोक अडकून पडावं अशी एकच जागा होती -अर्जुन !
धर्म भीमांना नमस्कार करणारा,नकुल सहदेवांना आशीर्वाद देणारा कृष्ण अर्जुनाला मात्र उराउरी भेटत असे.’पांडवांमध्ये मी अर्जुन’ असे त्याने म्हणावे इतके त्याचे याचे एकत्व! ‘अप्रांतमती’ लेखात द.भि. कुलकर्णी म्हणाले, ‘देवकी,यशोदा,गोप-गोपी,राधा,द्रौपदी सारेजण कृष्णाला दर्पण करून आत्मदर्शन घेत होते;एकटा अर्जुन असा होता की जो कृष्णाचा आरसा झाला होता-कृष्ण अर्जुनात आत्मदर्शन घेत होता!’ काय नितळ मन असेल अर्जुनाचं!
हे कृष्णाचं गुंतणं जाणलं ज्ञानदेवांनी.गीतेचं तत्त्वज्ञान सांगताना योगेश्वराचा स्वर कुठे हळुवार झाला, कुठे त्याचा कंठ दाटून आला, कुठे त्याला अर्जुनप्रीतीचे भरते आले, कुठे त्याला काळजी वाटली, कुठे तो हलके रागे भरला,हे त्यांच्या हळुवार अंतःकरणानं हलकेच टिपलं.त्या अर्थी ज्ञानेश्वरही आरसा झाले.ज्ञानेश्वरीत त्यांनी कृष्ण होऊन श्रोत्यांना अर्जुनाच्या जागी बसवलं,आणि कृष्णाहून हळुवार होऊन आपल्यातील अर्जुनाला समजावलं!
दभि म्हणाले तसं ‘ज्ञानेश्वरांना कृष्णाचे सर्वस्पर्शित्व नेमके आकळले आणि त्याचे केंद्रही गवसले होते. त्याचे पूर्णकाम,निरिच्छ,जीवन्मुक्त असणे त्यांनी जाणले.आणि तसेच अर्जुनातले त्याचे गुंतणेही!’ ज्ञानेश्वरांचे निर्मळ,उन्नत आणि संवेदनशील मनच हे जाणू शकते.
ज्ञानेश्वरीतले कृष्णार्जुन प्रेमाचे दाखले फार लोभस आहेत!
पाचव्या अध्यायात योगशास्त्राचे महत्व ऐकल्यावर अर्जुन म्हणतो की हे सारं फार छान आहे. हे मला पुन्हा एकदा नीट समजाव .आणि अर्जुनाला योगमार्गाविषयी गोडी निर्माण होते आहे हे जाणून आनंदलेल्या कृष्णाचे वर्णन करताना माऊलींनाही आनंदाचे भरते आले आहे .
आधींच चित्त मायेचे, वरी मिष जाहले पढियंताचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे, कवण जाणे!
आधीच प्रेमाचं माणूस ,त्यात शिकायची इच्छा,त्यामुळे आता जो अपूर्व भाव उमलेल तो अद्भुत असेल खास !
जे अमृताची वोतली,की प्रेमचि पिउनी मातली,म्हणोनि अर्जुन मोहे गुंतली,निघो नेणे!
श्रीहरीचे ते पार्थाकडे पाहणे कसे होते म्हणून सांगू ?त्यात कारुण्याची वृष्टी आहे की नव्याने उचंबळलेल्या स्नेहाने परिपूर्ण अशी भगवंताची दृष्टी आहे ? ती दृष्टी म्हणजे जणू अमृताची वोतीव पुतळी होती, जी त्या अद्भुत क्षणात निर्माण झालेला प्रेमरस पिऊन अशी मातली, की अर्जुनाच्या प्रेमाच्या विळख्यातून तिचा पाय निघेना !
पुढे ज्ञानदेव म्हणतात की ही कल्पना किती फुलवावी तितकी फुलेल पण मला त्या प्रेम दृष्टीचे अचूक वर्णन करता येणार नाही .परमात्म्याचे प्रेम इतके अथांग आहे त्याचे वर्णन कसे शक्य आहे? पण ज्याअर्थी त्यांनी अर्जुनाला आधी ‘परिस बापा’ असे संबोधले त्या अर्थी हा प्रेमाचा गुंता आहे असे मला खचित वाटते !
पुढे सहाव्या अध्यायात ब्रह्मविद्या सांगताना तर ज्ञानदेवांच्या योगेश्वराच्या मनात भय दाटून येते. की खरेच मी ही गुह्यविद्या याला देणे योग्य आहे का ? अर्जुनाच्या मनात जर अद्वैताचा भाव जागा झाला आणि हा याचा देहाचा अहंभाव विसरून माझ्यात मिसळून गेला तर मी याच्या प्रेमाच्या सुखाला मुकेन !मी एकटा करू काय ?
विपाये अहंभाव याचा जाईल, मी तेची हा जरी होईल, तरी मग काय कीजेल, एकलेया..
दिठीचि पाहतां निविजे, कां तोंड भरुनी बोलिजे, नातरी दाटून खेंव दीजे,असे कोण आहे!
आपुलिया मना बरवी, असमाई गोठी जीवी, ते कवणेंसी चावळावी, जरी ऐक्य जाहले..
ज्याला पाहताच दृष्टी निवावी आणि ज्याच्यापाशी मन मोकळे करावे किंवा उत्कटपणे ज्याला मिठी मारावी असं अर्जुना वाचून दुसरं आहे कोण ? हा जर माझ्याशी एकरूप झाला तर माझ्या मनाला भावलेली एखादी गोष्ट मी सांगावी कुणाला ?आनंदाने माझे अंतःकरण उचंबळून येईल आणि मनात हर्ष अगदी मावेनासा होईल तेव्हा मी ते कुणापुढे ओतावे ? आणि मग योगेश्वराने एक तलम पडदा तसाच ठेवला जेणे करून दोघांचे द्वैत अबाधित राहील.
या ओव्या वाचताना वाटलं,ज्ञानदेवांनी भोगलेलं एकटेपणच या ओव्यांमधून हळुवार संयतपणे व्यक्त झालंय.कोवळ्या वयात हरपलेले मायबापांचे छत्र,सोसावे लागलेले समाजाचे वार,निवृत्तीनाथांची योग्यता जाणून त्यांची गुरु म्हणून केलेली सेवा,लहानग्या मुक्ता सोपानाची काढावी लागणारी समजूत,समाजापुढे स्वतःला सिध्द करण्यासाठी करावी लागलेली दिव्ये ..या साऱ्या झंझावातात हा बालयोगी निचळ एकटा उभा राहिला.या साऱ्या सोसण्याचा अस्फुटसाही उद्गार साऱ्या साहित्यात कुठेही नाही.पुसटसाही नाही.पण साऱ्या विश्वाचा भार वहाणारा जगजेठी एकटा असतो,अगदी एकटा,हे ज्ञानदेवांइतकं कुणाला समजेल ?
ज्याला आपले बालसुलभ हर्षखेद सांगावेत,कधी शोक झाला,हृदय विव्हल झालं तर खांद्यावर डोकं ठेवावं,आनंदाने विभोर होऊन मिठी मारावी असं बरोबरीचं मैत्र त्यांच्या वाट्याला होतं कुठे ? मग साऱ्या भूतमात्रांनाच मित्र केलं त्यांनी.गुरु-शिष्य,माता-बालक, ईश्वर-भक्त अशी अनेक नाती ज्ञानेश्वरीत उलगडली पण पसायदानात स्थान मिळालं ते मैत्रभावाला.भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे !
गीता समजून घेताना कृष्ण त्यांचा सखा बनला असणार.गीतेचं तत्त्वज्ञान आत्मसात करताना त्यांच्या तरल प्रज्ञेला गीतेतलं कृष्णार्जुनाचं भावविश्व जाणवलं असणार.त्यामुळंच कृष्ण जे थेट बोलला ते आणि न बोलताही त्यानं जे सांगितलं ते,दोन्ही त्यांनी आपल्याला उलगडून दाखवलं..
एकाच तिथीला जन्मलेली ही दोन अप्रांतमती व्यक्तित्वे एकमेकांत अशी मिसळून गेलेली वाटतात.
तूं तो माझें, मी तो तुझे ,ऐक्य जाले तेथें कैचें दुजें !
पुढे धाव घेण्याची, झोकून देण्याची, समर्पणाची, एकरूप होण्याची असोशी आपल्या अल्पाक्षरी रूपात व्यक्त करणारा लक्षवेधी शब्द म्हणजे ओढ!
ओढ म्हणजे अंतर्मनात अस्वस्थ खळबळ माजवणारी अनिवार भावना!
आकाशात झेप घेणाऱ्या पक्षाच्या मनातली घरट्याकडे परतण्याची असो, आईच्या मनातली बाळाला कवटाळण्याची वा बाळाच्या अबोध मनातली आईच्या कुशीत शिरण्याची असो,एखाद्याच्या मनातील मैत्रीची असो,कलासक्त मनातील नवनिर्मितीची असो वा भक्तियुक्त अंत:करणातील ईश्वरप्राप्तीची असो या सर्व विविधरुपरंगी ओढींचे उत्कटता हे अविभाज्य अंग असते.उत्कट भावनेशिवाय ओढ निर्माण होऊच शकत नाही आणि मनात कळकळ,तळमळ नसेल तर उत्कटताही निर्माण होत नाही.ही अशी तळमळ निर्माण व्हायला त्या क्षणापुरता कां होईना ‘स्व’चा विसर अपेक्षित असतो आणि अपरिहार्यही.
प्रेम, माया, कल, प्रवृत्ती, पसंती, आवड,ओढा,आकर्षण असे ओढ या शब्दाचे विविध अर्थरंग या शब्दातला भाव व्यक्त करण्यास पुरेसे नाहीत.कारण सकारात्मक भावनांनी युक्त अशा या अर्थशब्दांना परस्पर छेद देतात ते गरीबी,अभाव दर्शवणारा ओढग्रस्त, जोर लावणे,ताणणे या अर्थाचा ओढणे,दडपण व्यक्त करु पहाणारा ओढाताण मनाची चंचलता,स्वैरता,द्वाडपणाचं प्रतिबिंब सामावून घेणारा ओढाळ असे अनेक शब्द! ही सगळी ओढ या शब्दाचीच विविधरंगी रुपे!
पण तरीही ही होती सर्वसामान्य माणसांच्या भावविश्वातली,मर्यादीत पैस असणारी ओढ! सर्वसाधारण माणसाच्या मनातली उत्कटता ध्वनित करणारी! या प्रकारची ओढ व्यक्तिगत परिघात वावरणाऱ्या सामान्य माणसाच्या सुखदु:खातून निर्माण होत असते. या परिघाला अंगभूत मर्यादा असणे स्वाभाविकच.पण स्वतःच्या सुखाचा,स्वास्थ्याचाच नव्हे तर सर्वस्वाचा होम करुन देशहितासाठी हालअपेष्टा सोसणाऱ्या देशभक्तांच्या मनातली मातृभूमीची ओढ ही सर्वांनाच सतत प्रेरणादायी ठरणारी अशीच असते.
काळ्यापाण्याच्या प्रदीर्घ काळातील जन्मठेपेची शिक्षा भोगताना स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या वीरयोध्यांच्या मनातील मातृभूमीची ओढ त्यांच्याच शब्दांत व्यक्त होते तेव्हा त्या शब्दाशब्दांत भरुन राहिलेले असते ते हेच देशप्रेम!
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मनातली ही ओढ जेव्हा काव्यरूप धारण करते तेव्हा त्या ओढीतली असोशी आणि तळमळ….
‘ ने मजसी ने s परत मातृभूमीला….
सागरा प्राण तळमळला..’
अशा उस्फुर्त,उत्कट शब्दातून नेमकी व्यक्त होते..!
स्वार्थाचा लवलेशही नसलेली उत्कट देशप्रेमातून निर्माण झालेली ही तळमळ कुणीही नकळत नतमस्तक व्हावे अशीच म्हणावी लागेल!!
अष्टमीचा अर्धचंद्र विलक्षण सौंदर्यानं लकाकत होता … समुद्राच्या लाटा त्याला भेटायला अधीर झालेल्या … आणि तशात पांढऱ्या शुभ्र वाळूवर प्रकाशाचा प्रकाशझोत पडला … तेज:पुंज पुष्पक विमान वाळूवर अलगद उतरलं … आणि दरवाजा उघडला तसा इवलासा कान्हा धावत बाहेर आला … पाठोपाठ पेंद्या आणि बाकीचे बालगोपाल उतरले … कान्हा वळला आणि उत्साहात म्हणाला … सखे हो … आज किमान दहा हंड्या फोडायच्या बरं .. दही .. दूध .. लोणी .. सगळी चंगळ करून टाकायची … पेंद्या पुढे आला आणि कान्हाच्या डोईवरचं उत्साहानं थरथरणारं मोरपीस सरळ करत म्हणाला .. आधी वाटणी ठरवायची … कान्हा … कान्हाला काही कळेना … तो म्हणाला .. माझ्या हातचा दहीभाताचा घास मोत्यांच्या घासापेक्षा मौल्यवान मानणारी तुम्ही मंडळी .. अचानक .. पेंद्या म्हणाला … काळ बदलला .. कान्हा … आता हंड्या दह्याच्या नाही .. रुपयांच्या लागतात. लाखांत बोली लागते .. मग आम्ही दहीभाताच्या घासावर समाधान कसं मानायचं ? कान्हा समजुतीच्या स्वरात म्हणाला .. मग काय हवं तुम्हाला .. ? पेंद्यानं एकवार बाकीच्या बालगोपालांकडे पाहिलं … नि म्हणाला … बक्षिसात सारखा वाटा … सेलिब्रिटी बरोबर फोटो .. स्टेजवर एन्ट्री … मिडियासमोर बाईट ची संधी … आणि अपघाती विमा … कान्हाला आता हसू आवरेना. तो थेट पुष्पक विमानाच्या दिशेनं चालायला लागला … पेंद्या गोंधळला … म्हणाला … इतकं टोकाचं का वागतोयस … ? काहीतरी सुवर्णमध्य काढू हवं तर … काही मागण्या कमी जास्त करून .. कान्हा वळला … हसला. पेंद्याजवळ आला .. खांद्यावर हात ठेवून ममत्वानं म्हणाला .. प्रयोजनच संपलंय रे सगळं … ! पेंद्या .. मला घरात दूध दही मिळत नव्हतं म्हणून हंड्या फोडायचो का रे मी .. ? एकत्र या … मनोरा बांधा आणि ध्येय साध्य करा … इतका साधा सरळ विचार … पण ते चार हात एकमेकांच्या खांद्यावर ठेवण्यामागे माणसं जोडण्याची प्रेरणा होती … मुठभर दहीभात घासाघासाने खाण्यात अर्धी भाकरी प्रेमानं वाटून घेण्याची दीक्षा होती .. तेव्हा कान्हा हाच सेलिब्रिटी होता … त्याचा सहवास ही मोक्षाची संधी होती आणि कान्हाची बासरी ऐकायला मिळणं ही बक्षिसाची सर्वोच्च कल्पना होती … अपघात होईल अशी साधी कल्पना ही कधी मनाला शिवायची नाही .. कारण साक्षात शिव सोबत असताना जीवाची भिती कसली … ? पण आता तुझ्या बोलण्यातून जाणवलं .. आता तो विश्वास संपलाय … एकत्र येण्याची उमेद संपलीय … थर वाढले … पण श्रद्धा संपलीय … माझा जन्म हा आता सोहळा न रहाता इव्हेंट बनलाय … आता इथे न आलेलंच उत्तम .. आणि त्यानं विमानात पहिलं पाऊल ठेवलं सुद्धा … पेंद्याला एव्हाना चूक कळली होती … तो घाईनं म्हणाला .. पण कान्हा … कान्हा शांत स्वरात म्हणाला .. अष्टमी येत राहील … पण त्यात कान्हा नसेल … आणि काळजी करू नकोस … कॉर्पोरेट विश्वात रमलेली माझी भक्त मंडळी कान्हा शिवाय हा सण असाच साजरा करत रहातील .. असा म्हणून तो आत गेला सुद्धा … क्षणात आतून बासरीचे करुण स्वर ऐकू येऊ लागले आणि पेंद्यासह बालगोपाल मंडळी जड पावलांनी विमानाच्या दिशेने चालायला लागली..
– अनामिक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ शिक्षक –बदलते स्वरूप… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆
डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हे समाजातील सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या हातूनच समाजाचा पाया रचला जातो. शिक्षकांची गुणवत्ता जितकी दर्जेदार तितकेच चांगले विद्यार्थी घडले जातात. समाजाचा मुलभूत घटक खरेतर शिक्षकच आहे. पुर्वी समाजात कोणतेही शुभकार्य असो , शिक्षकांची उपस्थिती महत्त्वाची मानली जात होती. इतकेच नाही तर गुरूजी, सर समोरून येताना दिसले की, आपोआप नजर खाली जाऊन शिक्षकांबद्दल विलक्षण आदर, त्यांचा दरारा मनात येत असे. पण आज कुठेतरी हे चित्र बदलताना दिसत आहे.
पुर्वी ज्ञान मिळवण्याचे एकमेव साधन शाळा आणि गुरूजी अथवा सर हेच होते. पण आज संगणक युग आले, लहान मुलांपासून ते काॅलेजात जाणाऱ्या युवकांपर्यंत हातात मोबाईल आले आहेत. जरूरी असणारी सर्व माहीती गुगलवर मिळू लागली आहे. त्यामुळे शिक्षकांचे महत्त्व कमी होत चालले आहे. दुसरे म्हणजे आज गल्ली गल्लीतून शिकवणी वर्ग घेतले जात आहेत. यामुळे ज्ञानाचे मुख्य केंद्र असणारे, शाळा आणि शिक्षक यांचे समाजातील स्थान ढासळत चालले आहे. शिक्षकांबद्दल असणारा आदर, त्यांचा दरारा आजच्या विद्यार्थ्यांमध्ये फारसा दिसून येत नाही. काही ठिकाणी तर शिक्षकांना अपमानित करणे, उध्दटपणे बोलणे असे घृणास्पद प्रकार घडताना दिसतात. एकेकाळी शिक्षक हे समाजातले आदरस्थान होते. पण आज शिक्षकांचे समाजातील महत्त्व कमी होत चालले आहे. ही स्थिती समाजासाठी घातकच ठरेल. कारण आजचे विद्यार्थी हे उद्याचे, भावी नागरिक असतात. शिक्षकांच्या हाताखालीच हे समाजाचे खांब मजबूत, गुणवंत, आदर्शवादी होत असतात. त्यामुळे शिक्षक हेच भावी समाजाचे ‘आधारवड ‘ आहेत. समाजाने सुध्दा शिक्षकांचे आजचे ढासळणारे स्थान, महत्त्व इ. बाबींना सावरले पाहिजे. ‘ शिक्षक हेच गावातील बहुमूल्य व्यक्तिमत्त्व आहे ‘ हा विचार समाजमनावर कोरला जावा.
दुसरे म्हणजे स्वतः शिक्षकांनी सुध्दा आपले शाळेतील ,समाजातील स्थान अबाधित राहील याकडे लक्ष देऊन उत्तम ज्ञानदान करावे. वर्गात शिकविताना ज्या विषयाचे संपूर्ण ज्ञान आहे असाच विषय अध्यापनास निवडावा. शिक्षकांनी आपल्यातील गुणवत्ता ही फक्त हुशार विद्यार्थी अधिक हुशार कसा होईल याकरताच न वापरता, वर्गातील सर्वसामान्य विद्यार्थीसुध्दा उत्तम व्हावा याकडे लक्ष केंद्रित करावे. आपले ज्ञान हे आभ्यासात मंद असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचेल ह्याकरिता प्रयत्न करावेत. दर्जेदार शिक्षक , शाळा आणि विद्यार्थी या गोष्टीवर सुध्दा समाजाचे भवितव्य अवलंबून असते. वर्गात शेवटच्या बाकावरील विद्यार्थी आणि पहिल्या बाकावरील विद्यार्थी यात शिक्षकांची समदृष्टी असावी. “आदर्श विद्यार्थी ,आदर्श शाळा ,आदर्श समाज हे प्रत्येक शिक्षकाचे लक्ष्य असावे. शाळा हेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे त्यामुळे शाळेसारख्या पुण्यस्थानी शिक्षणाचा बाजार होवू नये याचे ध्यान आपण सर्व पालक ,विद्यार्थी आणि सर्व शिक्षक मिळून ठेवले पाहिजेत.
सर्व शिक्षक बंधू -भगिनींना शिक्षकदिनाच्या खुप खुप शुभेच्छा !
बालपणीच्या आठवणी जागवणारी एक व्यक्ती आहे. मी लहान असताना आमच्या घरासमोर एक कल्हईवाला बसायचा.कल्हई म्हणजे पितळी भांड्यांना शुद्ध कथिलाचा पातळ लेप लावणे.
रोज भांड्याचा ढीग त्याच्या पुढे असायचा आणि त्याची कारागिरी बघणे हा आमचा आवडता उद्योग.काम करता करता तो गाणी म्हणायचा, गप्पा मारायचा.त्याचे ते भांडे लाल लाल तापवणे त्यात ती चमकदार काडी थोडीशीच लावणे आणि जादू केल्या प्रमाणे भांडे चकचकित करणे हे बघणे फार आवडायचे.
सगळ्या गावाची भांडी त्याच्याकडे येतात याचा त्याला फार अभिमान असायचा.बघ मी सगळ्यांचे आरोग्य कसे छान ठेवतो म्हणायचा. त्याचा आविर्भाव कोणत्याही राजा,डॉक्टर पेक्षा कमी नसायचा.त्याचे महत्व आत्ता पटत आहे.
या लेखाच्या निमित्ताने मी हे महत्व सांगण्याचा एक छोटा प्रयत्न करणार आहे.जे माझ्या वाचनात आले.काही मोठ्या जाणत्या लोकांकडून समजले व काही अनुभवाने समजले.शुद्ध कथिल विषारी नसते.त्यात लोणचे,दही कळकत नाही.
कल्हई साठी कथिल वापरले जाते ते आपल्या शरीराला खूप आवश्यक असते.सध्या तेच मिळत नसल्याने बऱ्याच आजारांना तोंड द्यावे लागते.
‘सार्थ भावप्रकाश’ या आयुर्वेदावरील ग्रंथात एक श्लोक आहे. त्याचा अर्थ पुढे देत आहे. ‘कथिल हे हलके, रुक्ष, उष्ण असून मधुमेह, कफ, कृमी, पांडुरोग व दम यांचा नाश करते. ते पित्तवर्धक असून डोळ्याला हितकार आहे. ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या समुदायाचा नाश करतो त्याप्रमाणे कथिल मधुमेहाचा नाश करते. ते सेवन केले तर सर्व इंद्रिये शुद्ध होऊन देहाला सुख लाभते.’
हा अर्थ वाचल्यावर एक विचार आला ‘हल्ली बऱ्याच लोकांना डायबेटीस (मधुमेह) का आहे?
२०-२५ वर्षांपूर्वी एवढा नव्हता. कारण पूर्वी कल्हई केलेली भांडी स्वयंपाकासाठी वापरली जात होती. तेव्हा स्टेनलेस स्टील,
ॲल्युमिनियम, कोटिंग केलेली भांडी नव्हती. पितळेच्या भांड्याला कल्हई करून वापरली जात होती. त्यामुळे कल्हईच्या भांड्यातील स्वयंपाकामुळे नकळत कथिल धातू शरीराला मिळत होता. आता ती भांडी नसल्याने कथिल शरीराला मिळत नाही.
कथिल शरीराला मिळत नाही. मी प्रयोग म्हणून कथिल आणले व स्टीलच्या भांड्यात पाणी घेऊन उकळले आणि ते पाणी पिऊ लागताच चार दिवसात आम्हा घरातील सर्वांना शौचास साफ होऊ लागली. शरीरातील घाण बाहेर फेकली जात आहे अशी जाणीव झाली.
या मुळे पुढील फायदे होतात.
१ पिंपल्स कमी होणे
२ पित्ताचा त्रास कमी होणे
३ मधुमेह खूप कमी होणे
४ पोट साफ होणे
५ दम लागणे बंद होते
६ पंडुरोग नष्ट होणे
७ कृमी नष्ट होणे
८ शरीर शुद्धी होणे
पूर्वी असे आजार दिसत नव्हते.
याला अजूनही कारणे आहेत पण लेखाच्या अनुषंगाने आज कल्हईचे महत्व माझ्या अल्पमतीने व थोड्या अभ्यासाने सांगण्याचा प्रयत्न केला.
गेली सतरा वर्षे आयुर्वेदिक डॉक्टर पितळी पट्टीला दोन्ही बाजूला केलेल्या कल्हई चे महत्व लोकांना सांगत आहेत.ही पट्टी स्टीलच्या पातेल्यात एक लिटर पाण्यात उकळून, गार केलेले पाणी पिऊन त्याचा फायदा झाल्याचे अनेकांनी सांगीतले आहे.
आमच्या पूर्वजांना ही माहिती होती. या माहिती पासून त्यांनी समाजाचे हित बघितले स्वतःपैसा केला नाही म्हणून ते अडाणी होते का? नक्कीच नव्हते.आपल्या पेक्षा आरोग्यदायी जीवन जगत होते.
आपल्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी नुसार आपल्या सवयी बनत जातात. गाण्याची म्हणजे गाणे ऐकण्याची आवड असली की आपोआप गाणे ऐकल्यावर मन प्रसन्न होत. त्यामुळं रात्री झोपताना एक मस्त गाणं ऐकून झोपल. की झोपेचं समाधान मिळतं. सहसा ह्या गाण्यांमध्ये जुन्या आणि आमच्या काळातील गाण्यांचा समावेश असतो. अगदीं कधी मधी हल्लीच लोकप्रीय गाणं ऐकण्याचा योग आणते.
“चलो एकबार फिरसे अजनबी बन जाय हमदोनो” ह्या गाण्याची व्हिडीओ क्लीप काल बघण्यात आली. सुनील दत्त चा अभिनय आणि मालासिन्हा चे दिसणे मस्तच पण खरंतर हे गाणे लक्षात राहतं त्या गाण्याच्या बोलांनी,चालीनी,आणि त्याच्यातील खूप अर्थपूर्ण शब्दांनी.खरचं किती अफलातून कल्पना नं. आपल्या परिचीत व्यक्तीला अनोळखी समजून त्याची परत नव्याने ओळख करून घेणे.खूपदा या परत ओळखण्याने आपल्याला पहिल्यांदा न दिसलेले गुण दिसतील.कदाचित परत एकदा स्वभावाची नीट ओळख पटेल.परत एकदा एकमेकांना नव्याने ओळखू लागू.जुने काही मनात उगीचच किल्मिष असतील तर आपल्या चुकीची,गैरसमजाची जाणीव होऊन परत एकदा मने साफ होतील.
काहीवेळा अतिपरिचयाने आपण दुस-याच्या मनाचा विचार न करता एकमेकांना ग्रुहीत धरायला लागतो.ह्या परत एकदा एकमेकांना जाणून घ्यायच्या कल्पनेतून कदाचित स्वतः च्या आधी दुस-याचा विचार करायला शिकू.
सेन्सेक्सने उसळी घेऊन पासष्ट हजाराचा टप्पा पार केल्यावर, एक सामान्य माणूस म्हणून, मी माझी प्रतिक्रिया नोंदवू इच्छितो, जी प्रत्येकाने आपापल्या जोखमीवर वाचावी, ही नम्र विनंती !
ही जी काय उसळ अठ्ठावन्न हजाराच्या तापमानला आज उसळी घेऊन रटरटते आहे, तिचा खरा बॉयलिंग पॉईंट काय असेल, असावा, हे भले भले स्वतः अर्थशास्त्र कोळून प्यायलेले अभ्यासक सुद्धा आज पर्यंत सांगू शकले नाहीत, तिथे तुमच्या, माझ्या सारख्या सामान्य लोकांचा काय पाडाव लागणार ? कारण ही जी उसळ ज्या जी जी भाय टॉवर नावाच्या भांड्यात शिजायला ठेवली आहे, त्या भांड्या खालचा गॅस कोणता अदृश्य हात, स्वतःच्या मर्जीनुसार कमी जास्त करतो ते कळतच नाही ! त्यामुळे होतं काय, या उसळीचा स्वाद घ्यायला येणारे नवीन नवीन खवय्ये, ती थोडीशी चाखून सुद्धा, स्वतः गॅसवर गेल्याची अनेक उदाहरणं आपण सगळ्यांनी पहिली आहेत !
फार पूर्वी, शेअर मार्केटरुपी सट्ट्याच्या मुदपाकखान्याच्या वाटेला जाणे हे सामान्य मराठी मध्यमवर्गात निशिद्ध मानलं जात होतं !
माझ्या माहितीतले असेच अनेक मराठी मध्यमवर्गीय जे पूर्वी “कोटात” कामाला जायचे, ते या मुदपाखान्याची पायरीच काय, त्याच्या फुटपाथवरून (तेव्हा ते खरंच होते हो) सुद्धा जात नसत ! उगाच आत शिजणाऱ्या उसळीचा गंध नाकात जाऊन ती उसळ खायची दुर्बुद्धी व्हायला नको ! ही मंडळी तेंव्हा, आपल्या महिन्याच्या पगारात टुकीने संसार करून, त्यातून थोडे फार पैसे वर्षं भरात वाचलेच तर बँकेत किंवा पोस्टात FD रुपी खात्रीशीर “जनता थाळी” घेण्यात धन्यता मानत असतं ! असो ! जशी दृष्टी तसा कोन आणि तसे त्याचे फळ !
मला विचाराल तर माझ्या मते, ही जी जी भायच्या भांड्यात सतत शिजणारी, रटरटणारी उसळ म्हणजे एक अगम्य साईड डिश आहे ! ही उसळ काहींना कधीतरी चविष्ट लागते तर काहींची जीभ (आणि पर्यायाने खिसा) त्यातील तिखटामुळे पोळते ! त्यामुळे या जी जी भायच्या टॉवरमधे जाऊन त्या उसळीचा स्वाद घ्यायचा, का खात्रीशीर “जनता थाळी” घ्यायची हे ज्याचे त्याने ठरवलेले बरे !
प्रचंड वेग,तीक्ष्ण धार आणि तीव्र प्रतिक्रिया या सगळ्यांना अतिशय मनापासून स्वतःत सामावून घेऊनही वरवर शांत,सौम्य वाटणारा पण त्या वेग,धार किंवा तीव्रतेमुळे अंतरंगी अफाट सामर्थ्य धारण करणारा असा हा अनोखा शब्द..आवेग!
या शब्दाचे विविध अर्थ पाहिले तर तो प्रत्येक अर्थ स्वबळावर ‘आवेग’ या शब्दाचा पैस सर्वांगाने व्यक्त करण्यास असमर्थ ठरतोय हे लक्षात येईल.
जोर, जोम,आवेश,झपाटा हे अर्थ आवेगाची सूचक रेखाकृती फारतर रेखाटू शकतील पण त्यात इतर विविध अर्थरंगभरण त्यांना शक्य होत नाही.तिरीमिरी, त्वेष, क्षोभ, प्रक्षोभ, मन:क्षोभ हे अर्थशब्द ‘आवेग’ या शब्दाच्या मुख्यत: करड्या रंगछटाच ठळकपणे व्यक्त करु शकतील. सळ,उबळ,उद्रेक,झटका, हे अर्थ फक्त आवेगामागची असह्यता सांगू शकतील तर त्वरा, घाई, लहर, लाट, हे अर्थ त्याक्षणीच्या मनोवस्थेतली अधीरता सूचित करतील आणि लोंढा,तीव्रता,धार,तडाखा यासारखे अर्थ वरवर शांतपणे तेवणाऱ्या ज्योतीसारख्या भासणाऱ्या ‘आवेग’ या शब्दातला चटका प्रत्ययास आणून देतील.
या सगळ्याच वरवर भिन्न वाटणाऱ्या अर्थशब्दांत आवेगाचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवणारी एकेक परस्परवेगळी रंगछटा लपलेली आहे!
असं जरी असलं तरी या सर्व अर्थशब्दांत एक समान धागाही आहेच.हे सगळे शब्द त्या त्या क्षणीची भावविवशता आणि भावनोत्कटताच व्यक्त करत असतात आणि त्याद्वारे या दोन्हीत लपलेल्या अधीर, उत्सुक, असह्य अशा विविध मनोवस्थाच सूचित करीत असतात.ते सूचन विविध रंगांमधून असलं तरी त्याक्षणीची मनाची अधीर हतबलताच व्यक्त करीत असते!
एका अल्पाक्षरी शब्दाचा हा अर्थपसारा खरोखरच अचंबित करणारा आहे. जोर, जोम, आवेश,द्वेष यातला प्रतिकारासाठीचा ठामपणा, तिरीमिरी,उद्रेक,झटका यातली असहायतेतून निर्माण झालेली अतिरेकी प्रतिक्रिया,क्षोभ,प्रक्षोभ यामधला तीव्र संताप, उमाळा,लाट यामधला मायेचा झरा, लोंढा,तडाखा,झपाटा यातून वेगाने होऊ घातलेला आघात,आणि उग्रता,धार यातली भयभित करणारी संतापाची तीव्रता हा सारा ऐवज सामावून घेणाऱ्या आवेगाचं या सर्व अर्थशब्दांतही लपलेलं एक वैशिष्ट्य म्हणजे भावना वेगात उमटणाऱ्या भल्याबुऱ्या, तीव्र, लोभस, उत्कट वा अतिरेकी अशा सर्वच प्रतिक्रियांमागची नेमकी मनोवस्था! त्या अवस्थेतल्या अधीर, उत्सुक, अस्वस्थ मनाला सारासार विचार ओझरता स्पर्शही करु शकत नाही. त्या अवस्थेत भावनांची उत्कटता एवढी पराकोटीची असते की सारासार विचारासाठी आवश्यक असणारं स्वस्थपणच त्याक्षणी मन हरवून बसलेलं असतं.मनाच्या त्या गारुडअवस्थेत आनंद असो दु:ख असो वा प्रेम, माया किंवा क्षोभही ते इतकं उत्कट किंवा तीव्र असतं की त्या झपाटलेल्या आवेगात उमटणारी प्रतिक्रिया त्या अंगभूत उत्फुर्ततेनेच व्यक्त होते.ती जाणिवपूर्वक व्यक्त केली जात नाही तर ती नकळत व्यक्त होते! संतापाच्या भरात उचलला गेलेला हात असो, अत्यानंदाने होणारी थरथर न् डोळ्यात दाटणारे अश्रू असोत, किंवा प्रेमाने दिलेलं उत्स्फुर्त आलिंगन असो ते सगळं नकळतच घडत असतं आणि त्या त्यावेळी भावनातिरेकातून नकळत उमटणाऱ्या या सगळ्याच अस्सल नैसर्गिक प्रतिक्रिया ही त्या भावनांमधील आवेगाचीच परिणती असते!!