मराठी साहित्य – विविधा ☆ “इतकं पण धावू नका…” ☆ डाॅ.धनंजय देशपांडे ☆

? विविधा ?

☆ “इतकं पण धावू नका…” ☆ डाॅ.धनंजय देशपांडे ☆

इतकं पण धावू नका…

आणि अकालीच वरती जाऊ नका !

अनेकदा आपण आपल्या कामाला झोकून देऊन इतका वेळ देत असतो की, आपल्याजवळ ‘आपल्यासाठीच’ वेळ उरत नाही. आणि मग एक दिवस असा येतो की, धाव धाव धावून आपण जे काही कमवलं, बँक बॅलन्स, फ्लॅट, गाडी…. ऐश्वर्य.. जे जे काही कमवलं ते पाहण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी आपणच जिवंत नसतो.

मित्रानो…. ही कहाणी आहे जामनगर (गुजरात) च्या अत्यंत यशस्वी अशा डॉक्टरची अचानक थांबलेली जीवनयात्रा !

आजवर १६ हजार हृदयविकार रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवनदान मिळवून दिले होते असे हे डॉ. गौरव गांधी स्वतः प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट (हृदयविकार तज्ज्ञ) होते. इतकंच नव्हे तर कमी वयात हल्ली अटॅक येत आहेत हे पाहून त्यांनी स्वतः एक मिशन सुरु करून त्याद्वारे सर्वाना जागे करत होते.

इतक्या लहान वयात १६ हजार ऑपरेशन्स त्यांनी केले म्हणजे ते रोज सुमारे सतरा ते अठरा तास काम करत असणार. तेही हृदयाचे ऑपरेशन्स म्हणजे अत्यंत नाजूक व तितकंच स्ट्रेसफुल्ल काम !

असेच एके दिवशी ते दवाखान्यात जायला निघाले अन रस्त्यातच त्यांना छातीत कळ आली आणि दवाखाण्यात पोहचेपर्यंत सगळं संपलं होतं. हजारोंचे जीव वाचवणाऱ्याचा जीव मात्र कुणालाच वाचवता आला नाही, इतका त्यांना आलेला तो अटॅक तीव्र होता.

दोन तीन कारणांसाठी मनात हळहळ दाटून येते. एक तर ४१ हे काही जायचे वयच नाही, आणि त्यातही अशा बुद्धिमान डॉक्टरचे, ज्याची समाजाला प्रचंड गरज होती. शिवाय इतरांनी गाफील राहू नये म्हणून जागे करणारे डॉ गांधी स्वतःच कसे स्वतःबद्दल गाफील राहिले ?

मला एकदम आपल्या डॉ. नितु मांडके यांची आठवण आली. तेही असेच झोकून देऊन काम करणारे हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर ! ते तर म्हणायचे की, “मला आजारी पडायला देखील वेळ नाही, इतकी ऑपरेशन्स पेंडिंग आहेत. वेटिंग लिस्ट मोठी आहे”

मात्र तेच अटॅकने तडकाफडकी गेले !

कामाचा प्रचंड ताण आणि त्यातून होणारा मानसिक ताण, आणि त्यातून मग ओघानेच येणारा अटॅक !!

खूप वाईट वाटतं अशावेळी !

अर्थात एकेकाळी ऐन चाळीशीतच असताना मलाही अटॅक आलेला. पूना हॉस्पिटल मध्ये आयसीयू मध्ये मी ऍडमिट ! मात्र डॉ. जगदीश हिरेमठ सारखा देवदूत तिथं मला लाभला अन त्यांनी मला त्या आजारातून बाहेर तर काढलेच पण त्यांनी कान टोचून जे काही सांगितलं ते मी आजवर पाळलं, त्यामुळे थेट ट्रेकिंग करू शकतोय, गडकिल्ले चढून जातोय ! नाहीतर ”चार जिने सुद्धा यापुढं चढता येणार नाहीत’ असं त्यांनी सांगितलं होतं.

थोडक्यात सांगतो, ‘वेळेत जेवण, पुरेसा आहार आणि नो जागरण’ हि त्रिसूत्री त्यांनी दिलेली. जी आजवर काटेकोर पाळतोय. कितीही अर्जंट काम असलं तरी जेवणाची वेळ कधीच चुकवत नाही, आणि झोपेचीही ! झोपताना कपभर गार दूध, सकाळी अर्धा तास चालणे, अर्धा तास योगासने किंवा व्यायाम, बास ! इतकंच पुरते !!

मनात आलं की सरळ गाडी काढून गोवा, महाबळेश्वर फिरून येतो. मनाला मस्त ठेवलं की जिंदगी पण मस्तमौला होते. चार लोक काय म्हणतील याला फाट्यावर मारा. ते मनावर घेत बसून ताण घेतला तर तुम्ही फोटोत जाऊन बसाल आणि तेच ‘चार’ लोक तुमच्या फोटोला हार घालायला येतील. त्यामुळे फोटोत जायचं नसेल तर ताण घेणे सोडा.

डॉ. डी डी क्लास : मंडळी… स्वतःला कामात इतकं पण झोकून देऊ नका, की तुम्ही कोणत्याच कामाचे राहणार नाही. किंवा मग ‘राहणारच’ नाही. स्वतःच स्वतःवर इतका अन्याय करू नका. स्वतः स्वतःला थोडासा वेळ जरूर द्या. स्वतःची काळजी घ्या ! तुम्ही फक्त तुमचे नाहीत तर समाजाचे देखील आहात. त्यांना असं वाऱ्यावर सोडून देऊन कसे चालेल ?

बिझिनेसमध्ये अप डाऊन सुरु आहे ? असू द्या. काही फरक पडत नाही. जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो !

नोकरीच्या जागी…. बॉसिंगचा त्रास आहे ? काही फरक पडत नाही. जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो !  

घरात नातेवाईकांत वादविवाद, भांडण सुरु आहे ? काही फरक पडत नाही. जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो !

विचार करा मंडळी…. वेळ अजून गेलेली नाही. सावध व्हा. काम तर केलंच पाहिजे, पण त्यात ताण निर्माण होऊ देऊ नका. कुत्रा मागे लागल्यासारखे धावू नका. शांतपणे पण दमदारपणे वाटचाल करा. मग अटॅक येणार नाही. हे नक्की ! त्यासाठी शुभेच्छा !

© डाॅ. धनंजय देशपांडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “नावात काय आहे?…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “नावात काय आहे?…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

हे वाक्य कोणाचं या बद्दल मी बोलणार नाही. पण आपल्याकडे नावातच सगळं काही आहे. मग त्या नावाचा संबंध कुठेही आणि कसाही असो. अगदी व्यक्ती, वस्तू, प्राणी, अन्न काहीही.

घरात मुल जन्माला आलं की पहिला आणि त्यातल्यात्यात मोठा सोहळा हा नांव ठेवण्याचाच असतो. मग नंतर भलेही घरातले लाडाने त्याला सोन्या, बाळा, छोट्या म्हणत असतील. किंवा वयस्कर त्याला तु रमेशचा का? तु प्रकाशचा का? असं विचारात असतील. पण नंतर तुझं नांव काय? असंच विचारतात.

पीटरसन, सॅमसन असं वडीलांच्या नावावरुनच मुलांचं नांव ठेवण्याची रीत काही ठिकाणी असेल. आपल्याकडे मात्र तसं नाही.

नांव ठेवण्याबद्दल आपला हात आणि काही वेळा तोंड कोणी धरणार नाही. आपल्याकडे मुलांच नांव ठेवण्याचा कार्यक्रम होतोच. पण काही कार्यक्रमांना नांवं ठेवायला सुद्धा आपण मागे नसतो. भलेही मागून म्हणजे कार्यक्रम झाल्यावर नावं ठेवत असलो तरी नांवं ठेवतांना मात्र मागे नसतो‌.

लग्नात सुध्दा नवरीमुलीचे नांव बदलण्याची पद्धत काही प्रमाणात आहे. यावेळी नांव काय ठेवलं हे कौतुकाने विचारतातच, पण ते घेण्याचा आग्रह देखील होतो. नांव ठेऊन नांव घेण्याची, किंवा नांव घेउन नावं ठेवण्याची सुरुवात इथूनच होत असावी. ठिक आहे आपल्याला आत्ता त्याबद्दल नांव ठेवायचं नाही.

मुलांचीच काय…… आपल्या कडच्या पाळीव प्राण्यांना सुद्धा आपण ठेवलेलं नांव असतं. मग कुत्रा, बैल, गाय, घोडा, मांजर, पोपट यांचा टायगर, सर्जा, कपीला, चेतक असं होतं. आणि त्या ठेवलेल्या नावानेच त्यांना प्रेमाने हाक मारली जाते.

तसच आजुबाजूच्या काही जणांना त्यांच्या दिसण्यावरुन, वागण्यावरून, राहण्यावरुन सुध्दा नावं ठेवतो‌‌. पण बऱ्याचदा अशी आपण ठेवलेली नांव प्राण्यांचीच असतात. म्हैस, पाल, बोकड, मांजर, गाढव इ…. या सारख्या नावांनी आपण त्यांचा प्रेमळपणे उल्लेख करतो. जाड्या, बारक्या, काळ्या अशी सुध्दा काही नावं आपण ठेवतो. म्हणजे प्राण्यांची चांगल्या नांवाने आणि माणसांची प्राण्यांच्या नांवाने ओळख आपल्याकडेच असावी.

एकाच देवाला अनेक नांवं आपल्याकडेच असतील. सुर्य, गणपती, विष्णू, हनुमान या सारख्या अनेक देवांना अनेक नावं आहेत. देव कशाला… झाड, तरु, वृक्ष… फुलं, सुमन… जल, पाणी. आभाळ, गगन, आकाश, नभ….. अशी एकाच गोष्टीला अनेक नावं असणारी अनेक उदाहरणं आहेत.

लहानपणी तर समानअर्थी शब्द लिहा…… असा प्रश्न सुद्धा परिक्षेत असायचा.

आपल्या नावामुळे त्या क्षेत्राचं आणि देशाचं नांव मोठं करणाऱ्यांची संख्या आपल्याकडे इतकी आहे की सांगतासुध्दा येणार नाही. आणि अशी असंख्य नांवं प्रत्येक क्षेत्रात आहेत. यात व्यक्ती, वस्तू, निसर्ग, वनौषधी, स्थळ या सगळ्यांचा हातभार आहे. पण ओळखले जातात सगळे नावानेच‌‌.

नावाचा प्रभाव आपल्या कडे इतका आहे की आजही काही ठिकाणी काही काम करुन घ्यायचे असेल तर आपण कोणाच्या तरी नावाचा आधार घेतोच.

पण… अरे तो कोपऱ्यावर पानवाला आहे ना…… त्याला माझं नांव सांग तो बरोबर माझं पान देईल……… इतका विश्वास नावात असतो..

ठेवलेलं नांव उच्चारतांना झालेली चूक आपल्याकडे काही वेळा चालते. जसं प्रवीण ला परवीन, प्रमोद ला परमोद, लक्ष्मी ला लक्शमी अशी हाक मारणारे सापडतील. पण कागदोपत्री नावाची अशी चूक चालत नाही. पण तरीही नावाच्या बाबतीत काही वेळा तशी चूक  होतेच. आणि नांवातली चूक बदलण्यासाठी खटाटोप करावा लागतो. शुद्ध नावाच्या बाबतीत असलेला हा अशुद्ध पणा सुध्दा आपल्याकडेच असेल.

राजकारणात तर नावाचं महत्त्व विचारु नका. नांव आहे म्हणून गोंधळ, नांव नाही म्हणून नाराजी, नांव बदललं तर विरोध, नावात बदल करण्यासाठी गदारोळ. काही नांव तर फक्त घराण्यामुळे ओळखली जातात. तर काही नावामुळे घराण्याचा मोठेपणा आजही शाबूत आहे. हे सगळं फक्त नावामुळेच होतं.

देश आणि त्यातले भाग यांना नांव बहुतेक सगळ्याच ठिकाणी असतील. पण आपल्याकडे खाद्यपदार्थ सुद्धा भागानुसार ओळखले जातात. जसं पंजाबी डिश, गुजराती थाळी, महाराष्ट्रीयन जेवण, साऊथ इंडियन डिश आणि हे सगळीकडे मिळतात. आज असंख्य पदार्थ नावामुळेच ओळखले, मागवले, आणि खाल्ले जातात. फक्त पदार्थांच्या नावामुळेच बऱ्याच ठिकाणी मेनू कार्ड गरजेपेक्षा जास्त मोठी, लांबलचक वाटतात. या बाबतीत आपण आपल्या सीमा खूप वाढवल्या आहेत. म्हणजे आज छोट्या छोट्या गावात सुद्धा चायनीज सहज मिळतं.

फक्त रोटी या नावाखाली पाच सहा प्रकार, डोसा या नावाखाली पंधरा विविध प्रकारचे डोसे मेनू कार्ड वर पाहिले आहेत. तांदूळ, गहू, आंबा यात चिनोर, कोलम, बासमती, चंदूसी, लोकवन, हापूस, लंगडा, केशर, बदाम अशी अनेक नांवं आहेत.

आंबा यात केशर, बदाम हा प्रकार आहे. पण केशर आणि बदाम यात आंबा हा प्रकार नाही.

जसं खाण्याच आहे तसंच कपड्यांच, वस्तूंचं, दागिन्यांच सुद्धा आहे. पंजाबी ड्रेस, गुजराती साडी, जोधपुरी, पुणेरी पगडी, कोल्हापुरी फेटा, साज, चप्पल.

असं किती आणि काय काय सांगणार. आणि हे सगळे प्रकार नावावरुच ओळखले जातात.

आजही नावावरुन भविष्य सांगणारे, आणि भविष्यात आपले नांव उज्वल करणारे अनेक जण आहेत, आणि होतील.

देशापासून वेशा पर्यंत, खाण्यापासून नटण्यापर्यंत, आणि वस्तू पासून व्यक्ती पर्यंत नावातच खूप काही आहे.

हे तर फक्त नावाचेच आहे. आडनावाचा भाग अजून वेगळाच आहे. पण त्याच्या आड बऱ्याच गोष्टी येत असल्याने त्याचे नाव आत्ता नको………

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झाडपण… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ झाडपण… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

जिवे मारणार्‍याला फाशी, झाड उखडणार्‍याला दंड असे कायदे आले.

कोणी म्हणे बरे झाले ; हत्येचे प्रमाण कमी झाले.

पण हाऽऽय!!

लोक अती शहाणे झाले आणि हाफ मर्डरचे प्रमाण वाढले.

मग काय? कायद्यात राहून माणूस माणसाचा एक प्रकारे बळीच घेऊ लागला.

तोच नियम त्याने झाडालाही लावला. रस्ता रुंदीकरण, अतिरिक्त बांधकाम, क्षेत्राचा विकास या नावाखाली मोठमोठी झाडे भुंडी करून टाकली तर काही उखडूनच टाकली.

झाडांनाही जीव असतो हे माहित असूनही का एवढी क्रूरता?

प्राणवायू दात्याचे प्राण हरण केले म्हणून फक्त काही पैशांचा दंड एवढीच शिक्षा?

मुके झाड•••• बोलता येत नसले तरी कृती करणे सोडत नाही.

झाडाला भुंडे केले तरी संकटांवर मात करण्याची शिकवण ते देत रहाते.

पाऊस पडला की जीव जगवते. पालवी फुटून चैतन्य जागवते आणि शक्य असेल तर फळा फुलांनी याच माणसाचे मन पोटही भरते••••

आता तरी जागे व्हायला पाहिजे. या उपयुक्त झाडांची कत्तल थांबवायला पाहिजे.

मरणासन्न झाड झाले

तरी दातृत्व त्याचे न मेले

शिकवण घे रे माणसा तू

पाहिजेस तुझ्यात झाडपण जपले

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पैंजण…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “पैंजण” ☆ सौ राधिका भांडारकर

पैंजण या शब्दाच्या उच्चारातच एक मधुर छुमछुम जाणवते.  या शब्दाबरोबर मनात जणू अमृतधाराच बरसतात.

पैंजण हा एक तीन अक्षरी अनुनासिक शब्द.  पण तो ओठावर येता क्षणीच निसर्गातली संपूर्ण रसमय रुणझुण घेऊनच अवतरतो.  पैंजण या शब्दात लाडीक भाव आहेत. लडिवाळपणा आहे,  वात्सल्य आहे,  गुलाबासारखा बाल पावलांचा स्पर्श आहे,  एक मधुर ठेका आहे.  पैंजण या शब्दात गुलकंदाचा रस आहे.  आणि एक लाजरा बुजरा, हळुवार, गुदगुल्या करणारा, गोड शृंगारही आहे. त्या शृंगारात भक्ती आहे आणि कामातुरताही आहे.

मराठी भाषेत शब्दांचे भांडार अथांग आहे.  त्यातलाच हा एक तीन अक्षरी शब्द, पैंजण.  मधुर रसात घोळूनच तो ओठावर येतो.  पैजण या शब्दात जसा नाद आहे तसाच त्यात अंतरातला  लपलेला साजणही  आहे. त्याला प्रीतीची ही रुणझुणाती चाहूल कळावी म्हणूनच हे पैंजण.

पैंजण हा एक स्त्रियांचा अलंकार.  भारतीय स्त्री ही नखशिखांत अलंकारांनी मढलेली असते.  तसे गोठ, पाटल्या, चपलाहार,ठुशी,वज्रटीक, बाजूबंद,  एकदाणी,  या काहीशा अहंकारी, रुबाबदार,प्रदर्शनीय अलंकारात तसे पाहिले तर पैंजण हा पायातला अगदीच चतुर्थ श्रेणीतला अलंकार म्हणावा लागेल.  एकतर पायातला म्हणून चांदीचा. हलका, जरासा नाजूकच.  चांदीच्या नक्षीदार साखळीत लटकवलेले चांदीचे छोटे किणकिणणारे नूपुर.  पण पावलावर हे घुंगुरवाळे चढवले की त्या पावलांचं  रूपच पालटतं.  नुसतं रूपच नव्हे तर चालही  बदलते.  या चालीलाही एक खट्याळ, लडिवाळ, गोडवा प्राप्त होतो.अलौकिक सौंदर्य देतात हे पैंजण. आणि मग कुणा प्रेमिकाच्या तोंडून सहज उद्गार येतात,

” आपके पाव देखे, बहुत हसीन है, इन्हे जमीन पर मत उतारिएगा, मैले हो जायेंगे”… क्या बात है!

पैंजण हा शब्द इतका गोजिरा आहे की तो लहान बाळाच्या पावलांशी एक निरागस नातं जोडतो.  नुकतंच पावलं उचलायला लागलेलं बाळ पायात पैंजण घालून दुडदुड चालू लागतं तेव्हा ती हलकी छुमछुम इतकी कर्णमधुर वाटते की कितीही कामात गुंतलेली माय असो, ती नाजूक छुमछुम ऐकून धावत आपल्या बाळाला उचलून घेते आणि त्याचे वात्सल्याने असंख्य पापे घेते.  या मायेच्या दृश्यात त्या पैंजणांची छम छम एका  लडिवाळ भूमिकेत असते.  त्यावेळी ती माय कौसल्या असते आणि ते बाळ पायी पैंजण घालून राजवाड्यात दुडदुडणार्‍या रामा सारखंच असतं.

पैंजण हा शब्द कधीकधी  पार यमुना तिरी घेऊन जातो. नटखट कान्हा आणि बावरी राधा यांच्या प्रणयात पैंजणांची एक कोमल भूमिका आहे.  प्रेमाचं ते पार्श्वसंगीतच म्हणा ना.

। पायी पैंजण पैंजण वाजती।

 ।ही  राधा गौळण हरीला लाजती।।

एका अद्वैत प्रेमाचं आणि भक्तीचं दर्शनच जणू या राधेच्या पायातले पैंजण करून देतात.  या शब्दाबरोबर राधा— कृष्णाची प्रणय रंगात दंग झालेली  मूर्तीच डोळ्यासमोर येते.  त्या रुणझुण नादाबरोबर कृष्णाच्या बासरीचे सूरही कानात घुमायला लागतात.

कधी कधी प्रेमाचे काही उडते भाव या पैंजणात जाणवतात.

“चाळ माझ्या पायात

पाय माझे तालात

नाचते मी तोऱ्यात मोरा वाणी रे

काय तुझ्या मनात

सांग माझ्या कानात

गोड गोड गुपित तुझ्या मनी रे ..”

किती बोलतात हे  पैंजण!  किती भाव किती रस ते व्यक्त करतात!

वास्तविक पैंजण, नूपुर, चाळ, घुंगुर, हे सारेच एकधर्मीय पद आभूषणे.  पदालंकार.  त्यांचे संबंध पदन्यासाशी.त्यांचे नाद जरी वेगळे असले,  त्यांच्या रुणझुणतेची,  छन-छनीची पट्टी जरी वेगळी असली तरी नातं पदन्यासाशीच,  पावलांच्या तालाशीच.  पण तरीही त्यांची घराणी वेगळी आहेत.  घुंगुर म्हटले की ते थेट आपल्याला मैफलित घेऊन जातात.

” राजसा जवळी जरा बसा” किंवा “पाडाला पिकलाय आंबा” नाहीतर,

“ठाडे रहियो ओ बाँके यार” अशा गाण्यांची आठवण करून देतात.त्यांचं सख्य ढोलकीशी किंवा सारंगीशी. पण पैंजण कसे अंगणातले वाटतात.  प्राजक्ताच्या फुलासारखे ते हळुवार टपटपतात.  हरित पर्णातून एखादी हलकी झुळूक यावी तसा त्यांचा नाद भासतो.  पैंजण नादात  एक स्निग्धता जाणवते, मार्दव आणि माधुर्याचा अनुभव येतो. पैंजण झुळझुळणाऱ्या नदीची आठवण देतात.  किनाऱ्यावर हलकेच चुबकणाऱ्या लाटेसारखे ते असतात. पैंजणात तांडव नसते, क्रोध नसतो, थयथयाट  नसतो,  वादळ नसते.  पैंजणांची रुणझुण केतकीच्या बनात नेते.  अलगद हळुवार मोरपिसासारखी ती कानाशी हुळहुळते.

भराभर डोंगर चढून जाणारी, नाभीच्या खाली गुडघ्यापर्यंत घट्ट वस्त्र लपेटलेली एखादी आदिवासी शिसवी कांती असलेली कातकरीण दिसली की माझी नजर तिच्या भेगाळलेल्या पावलांवर जाते आणि तशातही त्या रापलेल्या,तुकतुकीत, काळ्याभोर पावलांवरचे छुम छुमणारे पैंजण कसे एखाद्या प्रेमळ सखी सारखे मला भासतात.  पायातलं ते बंधन न वाटता प्रेमाने गोंजारणारं  ते साधन वाटतं.  शिवाय पैंजणाला धनवान, श्रीमंत, गरीब, गळीत असा भेदभाव नसतो.  ते कुणाचीही पावलं खुलवतात.

हे सगळं लिहीत असताना मी माझ्या पावलांकडे सहजच पाहिलं, आता तिथे थंडीपासून रक्षण करणारे लोकरीचे मोजे होते.  आणि मग सहज मनात आलं, खरंच पैंजण म्हणजे मूर्तिमंत बालपण.  पैंजण म्हणजे हिरवाईचे तारुण्य. एक सुरेल छन छना छन, सप्तसूरातला लटका शृंगारच जणू!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दुरंगी… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ दुरंगी… ☆ श्री अरविंद लिमये ☆

माणूस सहज दिसतो, जाणवतो तसाच असतो असं नाही.तो खऱ्या अर्थाने समजतो ते दीर्घ सहवासानंतरच.माणसाचं हे वैशिष्ट्य कांही अपवादात्मक शब्दांमधेही जाणवतं.दाद हा असाच एक शब्द.हा शब्द ऐकताच त्याचा ‘उत्स्फुर्त प्रतिक्रिया ‘ हा आपल्या मनाला भावलेला अर्थच चटकन् जाणवतो.पण ‘दाद’ या शब्दाचा पैस असा एका अर्थाच्या मर्यादेत मावणारा नाहीय.

एखादी चांगली गोष्ट मनाला स्पर्शून गेली की त्या स्पर्शाची नकळत उमटणारी प्रतिक्रिया म्हणजे ‘दाद’ ! ही उस्फुर्त प्रतिक्रिया व्यक्त करणे म्हणजे ‘दाद’ देणे.ही दाद म्हणजे ‘ग्रेट’,’मस्तच’,’वाह..क्या बात है..’ यासारखे मनाच्या तळातून उमटलेले तत्पर उद्गार असतील,किंवा नकळत वाजलेल्या टाळ्याही असतील.

क्वचित कधी एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दलची आपली सकारात्मक प्रतिक्रिया उघडपणे सहज व्यक्त न करणारेच बरेच जण असतात.त्यांची अंत:प्रेरणा तेवढी सशक्त नसल्यामुळेही असेल कदाचित,पण त्यांना व्यक्त होण्यासाठी बाह्यप्रेरणेची गरज लागते.एखादं भाषण ऐकताना किंवा नाटक बघताना मनाला स्पर्शून गेलेल्या एखाद्या वाक्यानंतर किंवा उत्कट प्रसंगादरम्यान क्षणिक कां होईना शांतता पसरते.लगेच टाळ्यांचा आवाज येत नाही.मग क्षणार्धात कुणी दोन चार जणांनी टाळ्या वाजवल्याचा आवाज येताक्षणी त्याने प्रेरित झालेल्या असंख्य प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट सुरु होतो.’ दाद ‘ या शब्दाला ती देण्यासाठी अशी ‘प्रतिक्षा’ अपेक्षित नाहीय. ‘उत्फुर्तपणा’ हा या शब्दात मुरलेला अविभाज्य घटकच आहे.

‘दाद’ हा कांही कौतुक किंवा शाबासकी या शब्दांचा समानार्थी, पर्यायी शब्द नाहीय.तरीही कौतुकाने पाठीवर दिलेली शाबासकी जसा ती  मिळवणाऱ्याला आनंद, प्रोत्साहन,समाधान देते तसाच आनंद,समाधान न् प्रोत्साहन उत्फुर्तपणे दिली गेलेली दादही देते.आणि देणारा आणि घेणारा दोघांनाही सकारात्मक उर्जा देणारी दादतर दाद या शब्दाला अधिकच अर्थपूर्ण बनवते. ‘कौतुक’ आणि ‘दाद’ या दोन्ही शब्दा़ंत आणखी एक साम्य आहे. सतत होणाऱ्या कौतुकाची जशी चटक लागते,तशीच एखाद्या कलाकाराला ठराविक वेळी मिळणारी ‘दाद’ इतकी सवयीची होऊन गेलेली असते की एखाद्या प्रयोगांत ‘त्या’ क्षणी, त्या ठराविक प्रसंगात किंवा त्या ठराविक वाक्याला टाळ्या मिळाल्या नाहीत तर कांहीतरी हरवल्यासारखा तो कलाकार अस्वस्थ होऊन त्या भूमिकेतला ताल न् तोल हरवून बसल्याची उदाहरणेही आहेत.

मोकळेपणाने एखाद्याचे कौतुक करण्यासाठी मन मोठे असावे लागते हे खरे,पण दाद देण्यासाठी फक्त त्या क्षणकाळापुरता स्वत:चाच विसर पडणे हेच अपेक्षित असते.आपलं ‘मी’पण त्या क्षणापुरतं कां होईना गळून जातं तेव्हाच आपल्याकडून उमटणारी प्रतिक्रिया ‘उत्स्फुर्त’ असू शकते. आणि हेच ‘दाद’ या शब्दाला अपेक्षित असते.

‘दाद’ या शब्दाला मी ‘दुरंगी’ म्हणतो ते एका वेगळ्याच कारणाने.या शब्दाचं परस्पर विरुद्ध असं दुसरंही एक रुप आहे.आत्तापर्यंत वर उल्लेखित विवेचन वाचले की ‘दाद’ ही द्यायची असते असेच वाटेल.पण कांहीबाबतीत ‘दाद’ ही मागावीही लागते.स्वत:वर अन्याय होतो तेव्हा त्याविरुध्द तक्रार केली जाते ते एक प्रकारचे ‘दाद’ मागणेच असते.दाद मागितली तरी न्याय मिळतोच असे नाही पण न्याय मिळण्यासाठी दाद मागावीच लागते असं विरोधाभासी वास्तव ‘दाद’ या शब्दांत सामावलेलं आहे.

दाद’ या शब्दाचे हे पूर्णत: वेगळे दोन्ही अर्थरंग मात्र अर्थपूर्ण आहेत एवढे खरे.अशा विविधरंगी अर्थपूर्ण शब्दांमुळे अधिकच खुलणाऱ्या भाषासौंदर्याला म्हणूनच मनापासून दाद द्यावीशी वाटते.

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सी.सी.टि.व्ही. आणि बुट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “सी.सी.टि.व्ही. आणि बुट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

तो भुंकण्याचा आवाज आला, आणि घरातली सोडून सगळ्या मोकाट कुत्र्यांना समजलं की आपल्याला एकत्र बोलवलं आहे.

गल्लीत घरांच्या, झाडांच्या आडोश्याला असलेली, कडक उन्हापासून गारवा मिळावा म्हणून गटारीच्या पाण्यात बसलेली, किंवा चारचाकी गाडीच्या सावलीत विसावलेली सगळी कुत्री अंग झटकत, शेपटी, मान, कान हलवून, पुढचे पाय शक्य तेवढे पुढे, आणि मागचे पाय शक्य तितके मागे घेत आळस झटकून तयार झाली.

अस काय झालं? की सगळ्यांना बोलवावं  लागतंय याच विचारात ती सगळी आवाजाच्या दिशेने निघाली.

कोणत्याही वेळी सगळ्यांना सहज पळता यावं म्हणून मुद्दामच मोकळ्या पटांगणात झाडाखाली सगळे जमले होते. वेळ सुद्धा भर दुपारची निवडली होती. कारण उन्हामुळे शक्यतो कोणी माणसं बाहेर पडत नाहीत.

जवळपास सगळे आले आहेत याची खात्री झाल्यावर त्यातील वयस्कर कुत्र्याने बोलायला सुरुवात केली.

काल एका कुत्र्याने एका गावात बंगल्यातून बुट पळवल्याच सी.सी.टि.व्ही. मुळे सगळ्यांना समजलं. आणि त्याची बातमी झाली.

एक तरूण कुत्रा – वा मस्त……. त्यामुळे आपली वेगळी बातमी आली…… नाहीतर आजपर्यंतच्या सगळ्या बातम्यांमध्ये आपल्याला मोकाट, भटकी असं म्हणत फक्त भटकतांनाच दाखवलं आहे.

वयस्कर कुत्रा – प्रश्न तो नाहीच. आता आपण बंगल्यातले बुट पळवायला लागलो म्हणून आपलं जगणं अजून कठीण होणार आहे.

आता हि बातमी आणि ते सी.सी.टि.व्ही. मधे झालेलं शुटिंग मोबाईल मुळे गावागावात, गल्ली गल्लीत पसरेल. ज्याने बुट पळवला त्याला तर मारतीलच, पण नाहक इतर कुत्र्यांना सुध्दा मार पडेल.

अरे……. एखादा माणूस चोरी करतांना सापडला तर त्याला लोक बेदम मारतात. वर म्हणतात कुत्र्यासारखं मारलं म्हणून.

आता आपल्याला तसंच मारल्यावर काय म्हणतील ते……… आहे काही बोलायला जागा…….

अरे हि माणसं सुद्धा चोरी करतांना चेहरा दिसू नये म्हणून तोंड झाकून घेतात. आपलं काय?……. आपलं सगळं उघडंच असतं, आणि आपणही उघड्यावर असतो.

मी म्हणतो आपण बंगल्यात जायचंच कशाला? तिथे त्यांची पाळलेली कुत्री असतातच. अजून आपली भर कशाला?… बऱ्याच बंगल्यावर कुत्र्यापासून सावध रहा अशी पाटी असते. जास्त चांगलं समजावं म्हणून कुत्र्याच्या तोंडाच चित्र सुध्दा असतं. मग आपण समजायला पाहिजे नां…………

बरं बुट पळवायचा तर एखादं साधं घर बघितलं असतं. कुत्रा बुट पळवतोय म्हटल्यावर घरातल्या किंवा आजुबाजूच्या कोणी बघितलं असतं तर कदाचित दुसरा बुट अंगावर भिरकावला असता. आता बंगल्यातूनच बुट पळवला म्हटल्यावर आपल्याला दिसतील तिथून दिसतील तसे पकडण्याचा बुट निघाला तर…… मग काय करणार…

आधीच आपलं जगणं कुत्र्याचं त्यात ही जास्तीची धावपळ कशी करणार……. लोकं उरलं सुरलं आपल्याला खायला टाकतातच. किंवा त्यांनी टाकल्यावर आपण ते खायला जातो. मग बुटाचा हव्यास कशासाठी? एक बुट पळवल्यामुळे लोक आता आपल्याला जोड्याने मारतील.

एरवी आपल्या भागात कोणी अनोळखी आल्यावर आपण भूंकतो, त्यामुळे लोकं सावध होतात. आता आपल्या भूंकण्याने लोक सावध होतील, पण अगोदर काठी हातात घेऊन त्यांचे बुट जागेवर आहेत ना हे बघतील.

आधीच माणसांमध्येच माणसं पळवापळवीच्या बातम्या येत आहेत. त्यात आपण हे बुट पळवापळवीचे उद्योग करायचेच कशाला? आता कोणी इतरांनी बुट पळवला तरी आपलंच नांव येईल. त्यामुळे आता पुढील काही दिवस काळजी घ्या. असे म्हणत सगळे परत आपापल्या आडोशाला जायला निघाले.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “डॉक्टर काका सांभाळा !” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

 🌸 विविधा 🌸

☆ “डॉक्टर काका सांभाळा !” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

लहानपणी डॉक्टर हा आमच्या कुटुंबाचाच एक भाग असायचा. सहसा त्याला फॅमिली डॉक्टर म्हटलं जायचं. आमच्या कोणत्याही दुखण्या खुपण्यावर तेच उपचार करायचे.  फारसे स्पेश्यालिस्ट त्यावेळी नसायचे अन त्याची फार मोठी गरज भासल्याच कांही आठवत नाही. ऑपरेशन वगैरे साठी साधारणपणे जिल्ह्याच्या गावी जावे लागत असे. तरीही फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्यानेच ते चालत असे. फॅमिली डॉक्टर म्हणजे काका मामाच !  आम्ही त्यांना डॉक्टरकाकाच म्हणायचो. डॉक्टरना मारणे तर दूरच पण सगळे डॉक्टरकाकांच्या नजरेच्या धाकात असायचे. डॉक्टरांचा सूरही नेहमी आश्वासक, चेहरा हसरा, वाणी मधुर, कधी कधी आम्हा मुलांना दटावणारी सुद्धा !  पण हे खूपच छान कौटुंबिक संबंधांचं नातं असायचं. अगदी आम्हाला मुलं होई पर्यंतच्या वेळेपर्यंत हे असं चांगल्या कौटुंबिक संबंधांचं वर्तुळ होतं. डॉक्टरांच्या प्रामाणिकपणाविषयी संशय नव्हता. कांही वाईट घडल्यास डॉक्टरांना नव्हे दैवाला दोष दिला जायचा.

असे छान दिवस चालले होते. आम्ही मोठे झालो आमचे मित्रही डॉक्टर झाले. आणि एके दिवशी आमच्या डॉक्टर मित्राकडून ती बातमी समजली. कोर्टाच्या एका निकालाने वैद्यकीय सेवा ही ग्राहक संरक्षण कायद्याखाली आणली.  खरं म्हणजे तिथंच या सर्व संबंधाची फाटाफूट झाली असावी.  कौटुंबिक नाती कायदेशीर झाली. विश्वास जाऊन कायदा आला.. समजुतदारपणा जाऊन कोर्ट कचे-या आल्या. आपली ट्रीटमेंट बरोबर होती हे कायद्याने सिद्ध करण्याची जबाबदारी डॉक्टरांवर आली. त्यासाठी कायदेशीर रेकॉर्ड्स आली. मग ऑपरेशन पूर्व तपासणी ऑपरेशन नंतर  तपासणी, ट्रीटमेंट रेकॉर्ड वगैरे सर्व सर्व आवश्यक ठरू लागलं. त्यासाठी स्टाफ, रुग्णालयांची अद्ययावत कार्यालये,, असिस्टंट्स, लॅबोरेटरीज वेगवेगळ्या टेस्ट्स, अद्यायावत यंत्रसामुग्री, मल्टीस्पेशालिटी  हॉस्पिटल्स, कोट्यावधीची यंत्रसामुग्री आणि उपकरणांसाठी आवश्यक म्हणून वातानुकूलन यंत्रणा, या सर्वांचा देखभाल खर्च आणि त्या साऱ्यांसाठी लागणारा प्रचंड पैसा. वाढती महागाई व वाढलेले स्टॅंडर्ड ऑफ लिविंग  या सर्वाना आवश्यक असणाऱ्या प्रचंड पगार व मानधनाच्या रकमा. एक एक वाढतच गेले. आणि शेवटी या सर्व रकमांची भरपाई करण्याची जबाबदारी पेशंटवर !

एवढ्या प्रचंड रकमा भरताना पेशंट सुद्धा मग त्या पैशातून पंचतारांकित सुविधा मागू लागले. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून यांना आकर्षित करण्यासाठी मार्केटींग यंत्रणा, कमिशन्स. एवढ्या मोठ्या रकमा भरताना घडून येणारे कटू प्रसंग. मग आधी पैसे भरा, डिपॉझिट भरा, मगच ऍडमिट असा ट्रेंड सुरु झाला.  पेशंट साठी वापरल्या गेलेल्या मटेरियलच्या  हिशोबात सुरुवातीला योग्य वाटणाऱ्या हॉस्पिटलना सुद्धा आकार वाढल्यावर स्टाफवर  कंट्रोल ठेवता येईनासा झाला. मग स्टाफ कडून होणारे गैर प्रकार, कधी कधी डॉक्टर सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करू लागले कारण प्रशिक्षित स्टाफ दुर्मिळ काय करणार ?  त्यातूनच नव्या नव्या प्रकारचे रोग आणि लोकसंख्या वाढीच्या विस्फोटामुळे वाढणारी पेशंटची संख्या. हा वाढीचा फुगा फुगतोच आहे. या सर्वात डॉक्टरांचा दोष कुठे ?  पण जबाबदारी मात्र डॉक्टरांवर !  व्यवसाय वाढला कि गैरप्रकार वाढतात.  जसं सरकारचा व्यवसाय सर्वात मोठा म्हणून त्यात गैरप्रकार सर्वात जास्त कारण कंट्रोल ठेवणे अवघड.  नंतर काही खासगी हॉस्पिटलची अवस्थाही सरकारी हॉस्पिटलसारखी झाली पण पैसे मात्र सरकारी हॉस्पिटल पेक्षा प्रचंड जास्त. या दुष्टचक्राची व्याप्ती मात्र वाढता वाढता वाढे भेदिलें आरोग्यमंडळा अशी होत गेली.

आता या सर्वांचेच दुष्परिणाम दिसू लागलेत. व्यापारी आणि ग्राहक हा नाते संबंध सतत लुटणारा आणि लुटला जाणारा असेच समीकरण फार पूर्वीपासून मनावर ठसवले गेले आहेच, त्यात डॉक्टर व पेशंट या नातेसंबंधांची भर  पडली. डॉक्टरांचे अनुभव जसे खरे तसेच पेशन्टचेही अनुभव खोटे नव्हते. यातूनच वाढती आहे दरी.

डॉ अरुण लिमयेचें  ‘क्लोरोफॉर्म ‘ वाचले आणि आम्हीच तोंडात बोटे घातली  हे असं असतं ?  खरं  तर त्याच वेळेला सरकार व डॉक्टर्स यांनी अशा गैरप्रकारांना कसा आळा घालता येईल ? याचा विचार केला असता तर आज चाळीस वर्षानंतर वेगळेच चित्र दिसले असते. दुर्दैवाने तसे घडले नाही.  त्यातून डॉक्टर हॉस्पिटल्स यांचे गैरप्रकार कमी न होता वाढतच गेले.  समाजातील दोन घटकांमधील दरी वाढतच गेली.

समाज मनातील संशयाच्या भुताने आज उग्र रूप धारण केले आहे. कायदा व कोर्ट हे कोणत्याही गोष्टीचं समाधानकारक उत्तर असू शकत नाही. कायद्याला भावना नसतात पण माणसांना असतात. कोर्टामध्ये  निर्णय मिळतो न्यायाबद्दल खात्री देता येत नाही. समोर आलेले पुरावे व त्याचा अन्वयार्थ लावण्यामागची तार्किकता यात माणसामाणसात फरक असतो. एका कोर्टाने फाशी दिलेला माणूस दुसंं-या कोर्टात निर्दोष सुटू शकतो. खरं काय ? न्याय कोणता ?  आपण सर्वसामान्य  माणसं ! आपण नातेसंबंध सुधारू शकलो तरच यातून उत्तर मिळू शकेल.  आमच्या लहानपणीची डॉक्टरशी असलेल्या नातेसंबंधांची व कौटुंबिक संबंधांची पुनर्स्थापना होऊ शकेल का ? आमची नातवंडे नव्या डॉक्टरांच्या अंगाखांद्यावर डॉक्टरकाका म्हणून खेळू शकतील का ?  आज तरी भविष्य धूसर दिसतंय !

डॉक्टर काका सांभाळा  स्वतःला !!!

©  श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सोशल मीडिया पासून सावधान… भाग – ३ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ सोशल मीडिया पासून सावधान… भाग – ३ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

मागच्या आठवड्यात मला एक फोन आला.लाईट बिल भरले नाही.एम.एस. ई.बी.मधून बोलतो आहे असे सांगणारा.त्यांना बिल भरल्याचे सांगितले.त्यावर पलीकडून पत्ता,बिलाची रक्कम,कसे भरले आहे याचे डिटेल्स सांगण्यात आले.पण त्या ॲप मधून भरल्यामुळे बिल मिळाले नाही असे सांगितले.बिल आज भरले नाही तर वीज कट होईल सांगितले.मी ऑफीसमध्ये जाऊन बघते असे सांगितले.तर म्हणे आम्ही बिल अपडेट करून देतो.फक्त एक ॲप डाऊनलोड करा.आणि त्या वर येणारा ओ टी पी सांगा.बाकीचे आम्ही बघतो असे सांगितले. ओ टी पी पाठवा म्हंटल्यावर मी सावध झाले.डोक्यात धोक्याची घंटा वाजली.मी सांगितले माझे सगळे कॉल आपोआप रेकॉर्ड होतात.हा कॉल पोलिसांना ऐकवते आणि मग ठरवते.हे ऐकल्या बरोबर पलीकडून कॉल कट झाला.आणि मी बँक रिकामी होण्यापासून वाचले.नंतर असे बरेच किस्से समजले.म्हणून हे लिहावे वाटले.

सध्या नेट वरून फसवणुकीचे असे प्रकार खूप वाढले आहेत.आपल्याला घाबरवून अशी माहिती मागवतात आणि त्या आधारे पैसे लुबाडतात.

हे एक प्रकारचे सायबर फिशिंग असते.जसे मासेमारी साठी गळ टाकतात तसेच होते.यात एखादे ॲप किंवा लिंक गळ म्हणून वापरले जाते.ते ॲप डाऊनलोड केले.किंवा लिंक क्लिक केली की आपण त्यात अडकतो.आणि आपली सगळी माहिती गुन्हेगारांना मिळते.

कोणतीही सुविधा आली की त्याचे फायदे तोटे दोन्ही असते.कोणत्याही सुविधा किंवा आधुनिक तंत्रज्ञान वाईट नसते.गरज असते ती आपण पूर्ण माहिती घेऊन ते काळजी पूर्वक वापरण्याची.जसे सिगारेट पाकिटावर वैधानिक इशारा असतो.तसेच इशारे याच सोशल मीडिया वर वारंवार दिले जातात.पण आपण सोयीस्कर दुर्लक्ष करतो.आणि अशा सापळ्यात अडकतो.तरी सावध राहून व्यवहार करावेत.ते आपल्या सोयी साठीच असतात.

अजून एक सांगावेसे वाटते.आपण ज्या देवदेवतांच्या इमेज किंवा संदेश असलेल्या इमेज पाठवतो त्या मुद्दाम फोन मध्ये व्हायरस सोडण्यासाठी बनवलेल्या असतात.अगदी सगळ्याच तशा नसतात.पण आपण काळजी घ्यावी.आपल्याला सुद्धा चांगले विचार सुचतात की,ते टाईप करून पाठवावेत.आणि आलेल्या इमेज डाऊनलोड न करता डिलीट कराव्यात.

आपली थोडी सावधगिरी

नेट घेई भरारी…

अवघड कामे सहज करी

आपली वाचवे फेरी…

मीडिया धरू करी

वेळ श्रम वाचवू परोपरी

तंत्रज्ञानाची कास धरी

परी बाळगू सावधगिरी

© सुश्री विभावरी कुलकर्णी

१०/६/२०२३

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्यास पौर्णिमा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? विविधा ?

व्यास पौर्णिमा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

(नुकत्याच  झालेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त)

महर्षी व्यासांचा जन्म आषाढ शुद्ध पौर्णिमेला झाला म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा असे म्हणतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे

      नाना कथा रुपे भारती

      प्रकटली असे त्रिजगती

      आविष्करौनी महामती

      व्यासाचिये

म्हणूनच आपण सगळे रोज त्यांना प्रातःवंदना देताना म्हणतो

      अश्वत्थामा बलिर्व्यासो

      हनुमानश्च बिभीषण:

      कृप: परशुरामश्च

      सप्तैते चिरंजीविन:

      सप्तैतान् स्मरेनित्यम्

      सर्वव्याधिविवर्जितम्

या सात चिरंजीवांचे स्मरण जो करेल तो निरोगी असेल. आचार्य किशोरजी व्यास म्हणतात “महर्षी व्यास हे जगातील साहित्यिकांचे मेरुमणी आहेत”. त्यांनी भरपूर ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यांचे मूळ नाव द्वैपायन .वेदांचा विस्तार केला म्हणून त्यांना वेद व्यास असे म्हणतात. पूर्वी एकच वेद होता. पण तो मोठा असल्यामुळे लोक वाचू शकत नव्हते. त्यातील ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावे या तळमळीने व्यासांनी त्याचे चार भाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, आणि सामवेद. एके दिवशी नैमिषारण्यात निमंत्रितांसाठी धर्मसभा भरली. धौम्य ऋषी म्हणाले, वेदांचा अमूल्य ज्ञाननिधी आता सुरक्षित झाला. द्वैपायनाच्या या कार्याचा आम्ही कृतज्ञतापूर्वक गौरव करतो. आणि आजपासून त्याला या युगाचा व्यास निर्धारित करतो. त्याचप्रमाणे ज्या पीठावरून त्याने सर्वांच्या शंकांचं समाधान केलं ते पीठ यापुढे “व्यासपीठ” म्हणून संबोधित करण्यात येईल. यापुढे महत्त्वाच्या सभांमध्ये देखील ज्ञानी वक्त्यांसाठी किंवा पारंपारिक विषयांच्या सभांमध्ये निर्माण केलेल्या पीठालाही व्यासपीठ हीच अधिकृत संज्ञा असेल. सामान्य विषयांच्या चर्चेसाठी उपयोगात आणले जाणारे पीठ मंच असतील. (उदाहरणार्थ, राजकीय मंच, काव्य मंच वगैरे ).आणि अभिनयासाठी असलेले ते रंगमंच. अशा भिन्नपीठांसाठी विविध संज्ञांचा प्रयोग करावा. ब्रम्हर्षी वशिष्ठ हे व्यासांचे पणजोबा. त्यांनी आपल्या पणतवाला हृदयाशी कवटाळले. आनंदाश्रूंचा अभिषेक केला.  त्यांच्या खांद्यावर व्यासपदाचा सन्मान असलेलं वस्त्र पांघरले.  द्वैपायन आता व्यास झाले. हा अनुपम सोहळा अनुभवताना सारे सभागृह आनंदाश्रूंनी न्हाऊन निघाले. ते मूळ व्यासपीठ म्हणजेच व्यास गद्दी नैमिषारण्यात अजूनही सुस्थितीत आहे.

पण वेदातील तत्त्वज्ञान सुद्धा लोकांना समजेना. अशा लोकांसाठी त्यांनी पुराणे लिहिली. सर्वांना कथा आवडतात .पुराणांमध्ये विश्वातल्या प्रत्येक विषयावर त्यांनी लिहिलं. त्यांनी अठरा पुराणे रचली. उपनिषदे लिहिली.

     परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम्

     अष्टादश पुराणानि व्यासस्य वचन द्वयं

त्यानंतर त्यांनी महाभारत रचले. त्यावेळी त्यांनी 18 पर्व आणि 18 अध्याय यांचा प्रयोग केला होता. महाभारताचे युद्ध 18 दिवस चालले. या युद्धाच्या वेळी 18 औक्षहिणी सैन्य होते .दोन्ही बाजूंनी फक्त अठरा महारथी होते. जेव्हा महाभारत युद्ध संपले त्यावेळी सर्व लोक मारले गेले .फक्त 18 लोक शिल्लक होते. गीतेचे अध्याय देखील अठराच आहेत. महाभारताला पाचवा वेद असेही म्हणतात.

आपला अंध पुत्र धृतराष्ट्र याला महाभारत युद्ध पाहता यावे म्हणून संजयला दिव्यदृष्टी देऊन महर्षी व्यासांनी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद ऐकवला. तीच भगवद्गीता. विश्व साहित्यात तिचे निर्विवाद उच्च स्थान आहे. गीतेचा पाठ करण्यापूर्वी खालील श्लोक म्हणतात

     ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता

      नारायणेन स्वयम्,|

      व्यासेन प्रथितां पुराणमुनिना

      मध्ये महाभारतम् ||

      अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम्

      अष्टादशाध्यायिनीम्ब|

      त्वामनुसंदधामी भगवद्गीते

      भगवद्वेषिणीम्||

याचा अर्थ:- भगवान नारायणांनी स्वतः पार्थाला म्हणजे अर्जुनाला सांगितली होती आणि जी महाभारतात प्राचीन ऋषी व्यासांनी रचली होती, हे देवी माते, पुनर्जन्माचा नाश करणारी ,अद्वैताच्या अमृताचा वर्षाव करणारी आणि अठरा प्रवचनांनी युक्त अशा या गीतामाते,मी तुझ्यावर ध्यान करतो. आणि त्यानंतर महर्षी व्यासांना नमस्कार करण्यासाठी खालील श्लोक म्हणायचा असतो.

      नमोस्तुते व्यास विशालबुद्धे

      फुल्लारवींदयातपत्रनेत्र

      येन त्वया भारतातैलपूर्ण:

       प्रज्वलितो जनमय: प्रदीप:

याचा अर्थ :- हे व्यास, व्यापक बुद्धीच्या आणि फुललेल्या कमळाच्या पाकळ्यांसारख्या डोळ्यांनी ज्यांच्या हातून महाभारताच्या तेलाने भरलेला ज्ञानाचा दिवा प्रज्वलित झाला आहे अशा तुला नमस्कार असो.

“व्यासो$च्छिस्टं जगत्सर्वम्” असे म्हणतात.  व्यासांना सर्व विषयांचे ज्ञान होते. संपूर्ण जगात एकही गोष्ट अशी नाही की जिला व्यासांनी स्पर्श केलेला नाही. ते अलौकिक मानसशास्त्रज्ञ होते.

अखेर ते थकले. त्यांना मुक्त व्हावे असे वाटू लागले. ते गंगेच्या तिरावर आले. त्यांचे गुरु देवर्षी नारद मुनी त्यांना भेटायला आले. ते म्हणाले ,”मी भगवंताचा निरोप सांगण्यासाठी आलो आहे. तुमची स्थिती भगवंतांनी ओळखली. आता त्यांचा निरोप आहे. जोपर्यंत भगवंत आज्ञा देत नाहीत तोपर्यंत आपण पृथ्वीवरच राहावं.” महर्षी व्यास मनापासून हसले. ते म्हणाले, भगवंतांची आज्ञा शिरसावंद्य. मी इथेच राहीन. माझं एकच ध्येय आहे, लोककल्याण आणि भगवंतांचं सतत नामस्मरण.

        अचतुर्वदनो ब्रह्मा,द्विबाहूरपरो हरि:,

       अभाललोचन: शंभुर्भगवान् बादरायण:

त्यांना चार मुखे नाहीत पण ते ब्रह्मा आहेत. दोन बाहू असले तरी हरी आहेत. कपाळावर तिसरा डोळा नाही पण शंकर आहेत. असे हे बादरायण आहेत. अशा या वंदनीय महर्षी व्यासमुनी यांना कोटी कोटी नमन.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सोशल मीडिया पासून सावधान… भाग – २ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ सोशल मीडिया पासून सावधान… भाग – २ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सोशल मीडिया विषयी बोलताना आपण फक्त जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात वापरले जाणारे दुसरे माध्यम म्हणजे फेसबुक या विषयी बघू.

आज पहाटे मला एक रिल मुलाने पाठवले.हा एक लोकप्रिय होत असलेला नवीन प्रकार काही सेकंदात आपले म्हणणे दुसऱ्यांच्या गळी उतरवणे कधी विनोद,कधी सावध करणे हे याचे काम.तर या रिल मध्ये एक नवीन फसवणुकीचा प्रकार सांगितला आहे.आपल्याला फेसबुक वर Look who died in an accident असा मेसेज येतो.त्यात एक लिंक येते.त्यावर क्लिक केले की आपले log in चे डिटेल्स विचारतात.ते दिले की आपण out आणि विचारणारा in होतो.आणि आपल्यालाच मोठा अपघात होतो.आपले बँक खाते रिकामे होते.थोडा तपास केला असता दुर्दैवाने यात फसलेले लोक सापडले.

अजून एक उदाहरण मी बघितले.एकीने घरातील लग्न सोहळ्याचे सतत रोज होणारे कार्यक्रम फेसबुक वर टाकले.अगदी फोटो सहित.येणारे लाइक्स बघून खुश झाली.घरी बसल्या बसल्या सर्वांना सगळे कार्यक्रम फोटो,व्हिडिओ याच्या माध्यमातून दाखवू शकली.आणि या वयात मी किती जगा बरोबर आहे ( हम भी कुछ कम नही ) हे ऐटीत दाखवू शकली.मग त्यात सगळेच फोटो,विधी अगदी कव्हर केले.लग्न छान झाले.लग्नात एक आकर्षक पाकीट आले.त्यात हरखून सोडणारे गिफ्ट सगळ्या फॅमिली साठी चार दिवसाची ट्रीप मिळाली अगदी तिकिटे सुद्धा मिळाली. मंडळी खूप आनंदली.लगबगीने तयारी करून निघाली.आणि या मॅडमचे फेसबुक वर अपडेट सुरू झाले.प्रवासाचे फोटो येऊ लागले.सगळे डिटेल्स आम्हाला कळू लागले.मोठ्या आनंदात घरी आले.बघतात तर घर पूर्ण रिकामे.आंघोळीची बादली सुद्धा घरात राहिली नव्हती.हे घरातील फेसबुक वर केलेले प्रसारण किती महागात पडले?

अशा फसवणूका पण मोठ्या प्रमाणावर चालू आहेत.यात चोरांना आपणच माहिती पुरवतो.ते फक्त त्यांची थोडी हुशारी वापरतात आणि आपल्याला अद्दल घडवतात.

एक घटना तर मन बधीर करणारी समजली.एका घरात राहणारी चार माणसे.घरातील वयस्कर आजोबा वारले.मुलाने ही बातमी सगळी कडे टाकली अर्थातच सोशल मीडिया वर. सांत्वन करण्यासाठी भरभरून संदेश आले.पण प्रत्यक्ष एकही माणूस फिरकला नाही.शेवटी ८/१० तास उलटून गेल्यानंतर इमारती समोर भाजी विकणारा भाजीवाला त्याचे मित्र घेऊन मदतीला आला.

काही मंडळी तर अशी आहेत की घरात आणलेले/ केलेले किंवा आत्ता जे खायचे ते  पदार्थ देवाला नैवेद्य दाखवावा त्या प्रमाणे मोठ्या निष्ठेने फेसबुक वर पोस्ट केल्या शिवाय खात नाहीत.

मला तर हा प्रश्न पडतो आपणच आपले आयुष्य इतके सार्वजनिक ( जुन्या काळातील भाषेत सांगायचे तर चव्हाट्यावर मांडणे ) का करतो?

या काही घटना व सध्या फेसबुकवर जे सगळे बघायला मिळते ते बघून मन सुन्न होते.आणि वाटते समोरा समोर माणसांशी न बोलणारे आपण कुठे चाललो आहोत?कुठे पोहोचणार आहोत?आणि नवीन पिढीला कोणते संस्कार देणार आहोत?

हे सगळ्या घटनांनी माझ्या मनात अनेक तरंग उमटले.तरंग कसले वादळच उठले.आणि वाटले आपल्याच मंडळींना थोडे सावध करावे.नाहीतरी विष हे प्रत्येकाने थोडेच अनुभवायचे असते? त्या वरचे लेबल किंवा कोणी सांगितले तर आपण विश्वास ठेवून त्या पासून दूर जातोच की.तसेच लेबल दाखवण्याचा मी थोडा प्रयत्न केला.

माझी अगदी मनापासून विनंती आहे.ही सगळी साधने जगाची माहिती मिळवणे.परदेशातील आपल्या व्यक्तींशी संपर्क साधणे.चांगले विचार,चांगले कार्य यांचा प्रसार करणे.अशा कारणांसाठी करावा.माझी आजी कायम म्हणायची आपण आपलं जपावं आणि यश द्यावं घ्यावं हे अगदी पटते.

एक गाणे आठवते सावधान होई वेड्या सावधान होई आणि हीच सर्वांना विनंती आहे.

धन्यवाद

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares