मराठी साहित्य – विविधा ☆ “स्थळ…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “स्थळ…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

आपली आवड,आपला कल हे आपले कुटुंबीय,आपली जवळची माणसं आणि आपल्याला पुरेपुर जाणून असणारी आपली मित्रमंडळी हे अगदी नस पकडल्या सारखं जाणतात. ही सगळी आपली माणसं अगदी मनकवडीच असतात असं म्हंटलं तरी चालेल. त्यामुळेच माझी एक आवड म्हणजे भिन्न भिन्न भाषेतील,निरनिराळ्या कलाकारांनी कामं केलेल्या दर्जेदार शाँर्टफिल्म्स बघणे हे जाणून माझी मैत्रीण मधुर कुळकर्णी हीने मला एका शाँर्टफिल्म चे नाव सुचविले. त्या  मराठी शाँर्टफिल्म चे नाव  “शंभरावं स्थळ”.

त्या नावामधील “स्थळ” हा शब्द आमच्या पिढीपर्यंत तरी अगदी परिचीत आणि नवीन पिढीमध्ये “ठरवून लग्नं” यानेकी “अरेंज्ड मँरेज” करणाऱ्या लग्नाळू उपवर मुलामुलींना थोडाफार फँमिलीअर म्हणजे ओळखीचा.

आमच्या पिढीपर्यंत सरसकट अरेंज्ड मँरेज आणि स्पेशल केस म्हणून तुरळक लव्हमँरेज असा रेशो होता. आता रेशो तोच कायम आहे फक्त बाजूंची अदलाबदल झालीयं. आता लव्हमँरेज सरसकट आणि ठरवून लग्न तुरळक असं बघायला मिळतं, कालाय तस्मै नमः, असो.

आमच्या वेळी होत असलेले ते टिपीकल दाखवण्याचे कार्यक्रम, संपूर्ण माहिती असतांना पण त्याबद्दलच ती अगदी ठराविक प्रकारची प्रश्नोत्तरे हे सगळं बघून, अनुभवून प्रकर्षाने जाणवायचं, खरचं इतक्या जुजबी ओळखीवर दोघही हा भलामोठा संसाराचा डाव मांडतोयं खरा,पण खरचं होतील का हे संसार यशस्वी ? 

मग मनात यायचं खरंच ओळखीतून किंवा परिचयातून, एकमेकांना जाणून घेऊन तसेच आचारविचार ह्यांची देवाणघेवाण करुन मग मात्र नक्कीच  संसार यशस्वी होत असतील. पण ज्यांना अरेंज्ड मँरेज करायचेयं त्यांच्या साठी ह्या “कांदेपोहे”कार्यक्रमाशिवाय पर्यायही नव्हता,वा नाही.

जसाजसा काळ बदलला,पिढी खूप जागरुक, स्वतंत्र विचारांची घडायला लागली,तेव्हा मग ठरवून लग्न करतांना काही जास्तीच्या पाय-या जोडल्या गेल्या. त्यात मग मुलामुलींना एकमेकांशी बोलतांना स्पेस,प्रायव्हसी देणं हे प्रकार सुरू झालेत. हे बघितल्यावर असं वाटलं आता नक्कीच असे विचारविनमयांची चर्चा, देवाणघेवाण झाल्यावर परस्परांना नक्कीच एकमेकांचा पूरेपूर अंदाज येऊन मग हा संसाराचा पाया भक्कम उभा राहून सगळीकडे “आनंदी आनंद घडे” हे वातावरण राहील. पण हा अंदाज ही सपशेल चुकला असे काहीसे अनुभव आलेत कारण कितीही स्पेस, प्रायव्हसी मिळाल्यानंतरही चर्चा, विचारविनिमय ह्यांत फक्त स्वतःकडील व्हाईट साईड वा उजवी बाजू ही फक्त प्रत्यक्षात समोरच्याला दाखविली जाते. नंतर प्रत्यक्ष संसार सुरू झाल्यावर मात्र ह्या दोघांमधील डार्क साईड सामोरी येते,जी त्यांना आता नव्याने कळते. आणि मग संसार हा बहरु लागण्याऐवजी ईगोपाँईंटजवळ येऊन हळूहळू कोमेजायला लागतो.

शेवटी मग एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली लग्न हे ठरवून करा की लव्हमँरेज ,हे यशस्वी करण्याचा एक प्रमुख मार्ग म्हणजे तडजोड. कदाचित तडजोडीचे दुसरे नावं संसार असं म्हंटले तरी चालेल. आता फक्त ही जुजबी तडजोड करतांना फक्त दोघांनीही मनात आणायचं, हे आपणं आपल्या जीवाभावाच्या, प्रेमाच्या माणसासाठी करतोय, बस मग पुढे सगळं सुरळीत होतंच. फक्त ह्या तडजोडी जुजबी बाबतीत हव्यात, कारण एकदम पराकोटीच्या तडजोडी दोघांपैकी कुणी करु शकत नाही, आणि खरतरं स्वत्व गमावून तडजोड करुन जगण्यात मजाही नसते.

आता पुढे ह्या शाँर्टफिल्म विषयी पण नक्की लिहेनच. पण नुसतं शाँर्टफिल्म चे नाव वाचले आणि हे विचार भराभर डोक्यातून, मनातून उतरले आणि शब्द बनून बसले.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कालाय तस्मै नमः ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ कालाय तस्मै नमः ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘मग्न’ हा सकारात्मकतेच्या शिडकाव्यांनी बहरून येणारा अर्थपूर्ण शब्द आहे असं म्हटलं तर ते अतिशयोक्तिचं  होणार नाही ‘ याच्याशी मी अगदी परवा परवापर्यंत तरी नक्कीच पूर्णतः सहमत झालो असतो पण आज नाही. कारण नुकतीच घडलेली एक दुर्घटना या समजाला परस्पर छेद देऊन गेलीय आणि म्हणूनच मग्नतेचं ते अकल्पित विद्रूप मला विचार करायला प्रवृत्त करतेय.

लहान मुलं खेळात रममाण होत असतात, वाचनाची आवड असणारे वाचनात गर्क होतात, एखादा आळशी माणूसमुध्दा त्याच्या आवडीचं काम मात्र नेहमीच तन्मयतेने करीत असतो, काहीतरी निमित्त होतं आणि मनात निर्माण येणाऱ्या उलट सुलट विचारांमुळे आपण विचारमग्न होऊन जातो, नामस्मरण करताना साधक तद्रूप होतं असतो, गायक गाताना तसंच श्रोते त्याचं गाणं ऐकताना अगदी तल्लीन होऊन देहभान विसरुन जातात,कोणतेही काम मनापासून करणारे त्यांच्या कामात क्षणार्धात गढून जातात. या प्रत्येकाच्या बाबतीत त्या त्या वेळी वेळेचे भान नसणे, तहानभूक विसरणे हे ओघाने येतेच. इथे वर उल्लेखलेली रममाण, गर्क, तन्मय, विचारमग्न, तद्रूप   तल्लीन, देहभान विसरणे,  वेळेचे भान नसणे, तहानभूक विसरणे गढून जाणे ही सगळी शब्दरूपे म्हणजेच मग्न या शब्दाचीच

विविधरंगी अर्थरुपे आहेत ! निमग्न, तदाकार, धुंद, चूर, एकरूप, गढलेला, मश्गूल, व्यग्र,समाधिस्थ, ही सुध्दा मग्नतेची सख्खी भावंडेच!

मग्न या शब्दात अशी विशुद्ध सकारात्मकताच ठासून भरलेली आहे याबाबत एरवी दुमत असायचं काही कारणच नव्हतं. पण नुकत्याच घडलेल्या एका घटनेने मग्न या शब्दातली सकारात्मकता कांही अंशी का होईना प्रदूषित केलेली आहे असेच मला वाटू लागलेय.

‘गरज ही शोधाची जननी आहे ‘ असं म्हणतात. विज्ञानाच्या मदतीने लावले गेलेले विविध शोध हे गरजेच्या पूर्ततेसाठीच असले तरी त्यांचा वापर गरजेपुरताच करायची गरज मात्र सर्रास दुर्लक्षिलीच जात असते. नित्योपयोगी उपकरणे असोत वा करमणुकीची साधने कुणीच याला अपवाद नाहीत. तत्पर प्रसारासाठी शोधलं गेलेलं मोबाईलतंत्र हे याचे प्रतिनिधिक उदाहरण!

मोबाईलचा अतिरेकी वापर करताना बहुतांशी सर्वांनाच ताळतंत्र राहिलेलं नाही हेच खरे.विशेषत: कानाला इअरपाॅड लावून मोबाईल ऐकण्यात मग्न होत भरधाव वाहने चालवणारे नकळतपणे जसे स्वतःचा जीव पणाला लावत असतात तसेच इतरांचा जीव जायलाही निमित्त ठरत असतात. पण याची जाणीव नसणे हे ठेच लागल्यानंतरही न येणाऱ्या शहाणपणा सारखेच असते.

अशी एखादी दुर्घटना आपल्या परिचितांपैकी कुणाच्यातरी बाबतीत घडते तेव्हाच आपल्याला त्याची झळ तीव्रतेने जाणवते याला मीही अपवाद नव्हतोच. मिरजेला रहाणारे माझे एक भाचेजावई. निवृत्तीनंतरचं कृतार्थ आयुष्य समाधानाने जगणारे. निवृत्तीनंतरही स्वतःची जमीन आवड म्हणून स्वतः कसणारे.ते एक दिवस नेहमीप्रमाणे पहाटे फिरायला म्हणून बाहेर पडले. परतीच्या वाटेवर असताना नुकतेच उजाडलेले.रहदारीही तुरळक.ते रस्त्याच्या कडेने शांतपणे चालत असताना मोबाईलवर बोलण्यात मग्न असणाऱ्या एका मोटारसायकलस्वाराने त्यांना मागून धडक देऊन उडवले.अंगाखाली दडपल्या गेलेल्या डाव्या हाताच्या कोपराच्या हाडाचे फ्रॅक्चर आणि जबरदस्त मुका मार यामुळे ते अडीच-तीन महिने जायबंदी होते.त्यांची विचारपूस करायला त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांची केविलवाणी अस्वस्था पाहून मी अस्वस्थ झालो.’नशीब डाव्या हाताचे कोपर फ्रॅक्चर झालेय,तो उजवा हात असता तर माझं कांही खरं नव्हतं’ हे स्वतःचं दुःख विसरून हसत बोलणाऱ्या त्यांच्या विचारातली सकारात्मकता कौतुकास्पद वाटली खरी तरीही त्या मोटरसायकलस्वाराच्या मोबाईल मग्नतेचं काय? हा प्रश्न निरुत्तर करणाराच राहिला. यासंबंधी कायदे कितीही कडक असले तरी व्यवहारातली त्याची उपयुक्तता फारशी व्यावहारिक नसतेच. अशा घटना टाळण्यासाठी

‘कालाय तस्मै नमः’ म्हणत जे जे होईल ते ते पहात न  रहाता नको त्या गोष्टीतल्या अशा हानिकारक मग्नतेतली नकारात्मकता प्रत्येकानेच वेळीच ओळखायला हवी एवढे खरे.

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पर्यटन – एक अनुभव…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “पर्यटन – एक अनुभव…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

पर्यटन हा बहुतेकांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. मात्र पर्यटन ह्या विषयाकडे वळतांना प्रत्येक जण वेगवेगळ्या अँगल ने विचार करुन त्याची दिशा ठरवितात. काही व्यक्ती निसर्गसौंदर्याचा विचार करुन तशी स्थळं नि्डतात तर काही द-याख़ो-या,गड किल्ले ह्यामध्ये रमतात. काही देवदर्शनासाठी नवसाला पावणा-या सुप्रसिद्ध देवस्थानांची निवड करतात तर काही आपापल्या गावी असलेल्या कुलदेवतांकडे आपला मोर्चा वळवितात.

पर्यटनाला कुठेही जावं पण जेथे जाऊ तेथली इत्यंभूत माहिती,तिथला इतिहास, हवामान, भौगोलिक परिस्थिती, त्या स्थानाचे वैशिष्ट्य हे सगळं माहितीपूर्ण अभ्यासून घ्यावं.

खेदाची बाब अशी की हल्ली त्या फ़ोटो व सेल्फी ह्यांच्या अतिरेकी आवडीने आपण त्या निसर्गसौंदर्याचे, त्या स्थानाचे महत्त्व ना धड डोळ्याने टिपंत,ना मनावर बिंबवत,ना मेंदूत ठसवतं. आपल्या इंद्रियांना निकामी करुन फक्त तंत्रज्ञानावर अवलंबून असण्याची ही सवय तशी घातकच.

ह्या बाबतीत आम्ही उभयता दोघेही आणि आमचा लेक आधी सगळे डोळ्या़ंनी बघणार, हिंडून सगळं अभ्यासणार, संपूर्ण माहिती गोळा करणार आणि मग जसा वेळ उरेल तसे फोटो काढणार. आजकाल सर्रास एखाद्या स्थळी लोक पोहोचल्या पोहोचल्या आधी सेल्फी व फोटोसेशन नी मग लगेच त्या फोटोंचे सोशलमिडीया वर अपलोडींग. आजकाल सोशलमिडीया वर कुटूंबाचे वा मित्रमैत्रीणींचे फोटो टाकले तरच प्रेम वा मैत्री असं नसतं कारण सोशल मिडीयावरील फेसबुक, व्हाँटसअप हे सगळं आभासी जगं असतं. असो काही स्थळं ही आपण आयुष्यात बघायचीच असं ठरविलेल्या काही स्थळांपैकी एक कन्याकुमारी. अहो,मी आणि व्यंकटेश आम्ही तिघही कन्याकुमारी स्मारकावर पोहोचलो तो क्षण आम्हा तिघांसाठी अविस्मरणीय असा  क्षण होता. त्या स्थळाचे पावित्र्य, शांतता बघून आम्ही तिघही एकमेकांशी न बोलता स्तब्धतेनं ते सगंळ वैभव डोळ्यात साठवायला लागलो. हे सगळं आज आठवायचे कारण म्हणजे आजच्या तारखेला म्हणजे सात जानेवारी ला ह्या स्थानकाचे काम पूर्ण झाले होते.

विवेकानंद स्मारक  हे तामिळनाडूच्या कन्याकुमारी शहरात स्थित एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. 1892 मध्ये स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले. एके दिवशी ते पोहत या प्रचंड खडकावर पोहोचले. या निर्जन स्थळी साधना केल्यानंतर जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी त्यांना मार्गदर्शन लाभले होते. आणि ह्या स्थळाला परमहंस ह्यांच्या शिष्याने अजरामर केले.विवेकानंदांच्या त्या अनुभवाचा संपूर्ण जगाला फायदा झाला, कारण त्यानंतर काही वेळातच ते शिकागो परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले होते. या परिषदेत सहभागी होऊन त्यांनी भारताचे नाव उंचावले होते.

1970 मध्ये स्वामी विवेकानंदांच्या स्मृती प्रित्यर्थ  त्या प्रचंड खडकावर एक भव्य स्मारक  बांधण्यात आले. समुद्राच्या लाटांनी वेढलेल्या या खडकापर्यंत पोहोचणे हाही एक वेगळा अनुभव असतो. खळाळत येऊन त्या खडकवर आदळणा-या महाकाय लाटा बघितल्यावर परत एकदा पंचमहाभूतांचे अस्तित्व मनाला स्पर्शून गेले.

स्मारक इमारतीचा मुख्य दरवाजा अतिशय सुंदर आहे. अजिंठा-एलोरा लेण्यांतील दगडी शिल्पांची प्रकर्षाने आठवण येते. लाल रंगाच्या दगडाने बनवलेल्या या स्मारकाला 70 फूट उंच घुमट आहे.इमारतीच्या आतील बाजूस चार फुटांपेक्षा उंच व्यासपीठावर ज्ञानी,धीरगंभीर  स्वामी विवेकानंद यांची आकर्षक मूर्ती आहे. ही मूर्ती पितळेची असून, तिची उंची साडेआठ फूट आहे. ही मूर्ती इतकी प्रभावी आहे की त्यात स्वामीजींचे व्यक्तिमत्त्व जिवंत असल्याचे दिसते.जमिनीच्या किनार्‍यापासून सुमारे 500 मीटर अंतरावर समुद्रात असलेल्या दोन खडकांपैकी एकावर बांधले गेले आहे. एकनाथ रानडे यांनी विवेकानंद स्मारक मंदिर बांधण्याचे विशेष कार्य केले. एकनाथ रानडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह होते. समुद्रकिनाऱ्या पासून पन्नास फूट उंचीवर बांधलेले हे भव्य आणि प्रचंड दगडी बांधकाम जगाच्या पर्यटन नकाशावर एक महत्त्वाचे आकर्षण ठरले आहे. तेथे विवेकानंद ह्यांच्या वरीले पुस्तके, त्यांच्या स्मरणार्थ तयार केलेल्या दिनदर्शिका, डाय-या ह्यांचे दालन आहे .

स्मारक तयार करण्यासाठी समुद्रकिना-यावर असलेल्या वर्कशॉपमध्ये सुमारे 73 हजार प्रचंड दगडांचे ब्लॉक्स कलाकृतींनी सुसज्ज केले गेले आणि समुद्र मार्गाने खडकापर्यंत नेले गेले. यातील किती दगडी तुकड्यांचे वजन 13 टनांपर्यंत होते. याशिवाय स्मारकाच्या मजल्यासाठी वापरल्या जाणार्‍या दगडी ब्लॉक्सच्या आकृत्या आहेत. या स्मारकाच्या उभारणीसाठी सुमारे 650 कारागिरांनी 2081 दिवस रात्रंदिवस काम केले. या मंदिराच्या दगडी शरीराला आकार देण्यासाठी एकूण 78 लाख मानवी तास खर्ची पडले. 2 सप्टेंबर 1970 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. व्ही. तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भव्य समारंभात गिरी यांनी स्मारकाचे उद्घाटन झाले.

कन्याकुमारी बघून आल्यावर प्रकर्षाने जाणवले खरंच आपला भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ घर दोघांचे… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

?  विविधा ?

☆ घर दोघांचे… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆ 

‘परस्परांशी नाती असलेला माणसांचा समूह ‘ अशी कुटुंबाची व्याख्या केली जाते.माणसांमधली ही नाती जन्मावरून,विवाहावरून किंवा दत्तक घेण्यावरून निर्माण होतात. कुटुंब ही समाजातील सार्वभौम संस्था असली तरी स्थळकाळसापेक्ष तिच्या स्वरूपात भिन्नता आढळून येते.

कुटुंबाचे प्रकार –

१. आप्तसंबंधावर आधारित कुटुंबप्रकार –

अ.केंद्रकुटुंब: अशा प्रकारची कुटुंबे बहुधा सर्वत्र आढळतात. यात पति, पत्नी आणि त्यांची अविवाहित किंवा दत्तक मुलांचा समावेश होतो.

ब. विस्तारित कुटुंब: यात कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त असते.प्रामुख्याने शेती व्यवसायातील कुटुंबांचा यांत समावेश होतो.

२. विवाह प्रकारावर आधारित-

अ. एक विवाही कुटुंब- एक पुरुष आणि एक स्त्री यांच्या वैवाहिक संबंधांद्वारा अशी कुटुंबे निर्माण होतात. पती आणि  पत्नी जीवंत असेपर्यंत दोघांपैकी कुणा एकाला दुसरा विवाह करता येत नाही.

ब. बहुपती कुटुंब- अनेक पुरुष एका स्त्रीबरोबर विवाह करून कुटुंब निर्माण करतात.

क. बहुपत्नी कुटुंब- यात एक पुरुष अनेक स्त्रियांसोबत विवाह करतात.

३. वंश आणि अधिसत्ता यावर आधारित-

अ. मातृसत्ताक कुटुंब: या प्रकारात कुटुंबात अधिसत्ता ही स्त्रीची असते .शिवाय कुटुंबाचा वंशही स्त्रीच्या नावाने चालला जातो.

ब.पीतृवंशीय कुटुंब: या प्रकारात कुटुंबात अधिसत्ता ही पुरुषाची असते.शिवाय कुटुंबाचा वंशही पुरुषाच्या नावाने चालतो.

४.काबीली कुटुंब: जनजातीमध्ये असलेली ही पध्दत सामाजिक विकासक्रमाच्या आदिम अवस्थेच्या जवळची आहे.

कुटुंब हा समाजशास्त्र आणि  मानसशास्त्राच्या दृष्टीने मूलभूत असा प्राथमिक गट आहे.

कुटुंबाची कार्ये-

१. प्रजनन करणे .

२. पालनपोषण करणे.

३.नव्या पिढीचे वेगवेगळ्या पध्दतींनी सामाजिकरण करणे.

४. व्यक्तीला निस्चित स्थान आणि दर्जा प्राप्त करून देणे.

वरील कार्यांपैकी प्रत्येक कार्य तत्वत:  दुसऱ्या संस्थांकडून होऊ शकते.पण आजवर तरी

कुटुंबाऐवजी दुसरी पर्यायी समाजसंस्था ही कार्ये तेवढया परिणामाने करू शकलेली नाही.

कुटुंबसंस्थेवर मुख्यत: पुढील शक्तींचे वेळोवेळी आघात होतात;

१.आर्थिक- औद्योगिकीकरण व शहरीकरण.

२.वैज्ञानिक यंत्रतंत्रशक्ति.

३.मूल्यात्मक व्यक्तिवाद किंवा समूहवाद.

४.विवाहनीतीत पूर्ण स्वातंत्र्याचा आग्रह.

हे बदल मुख्यत: पाश्चात्य समाजात होतात तरी,आपल्या समाजातील कुटुंबावरही त्याचे आघात होत आहेत. कोणत्याही प्रकारच्या कुटुंबात प्रमुख घटक पती आणि पत्नी असतात. त्यांच्या संबंधाला तडा जातो घटस्फोटामुळे.

घटस्फोट: पती आणि पत्नीचे निर्माण झालेले वैध वैवाहिक संबंध कायदेशीररीत्या संपुष्टात येणे म्हणजे घटस्फोट होय. घटस्फोटामुळे तापदायक वैवाहिक संबंधापासून फारकत घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले तरी त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात उदा.

– घटस्फोटित स्त्रीला अनेक कठीण प्रश्नांना तोंड द्यावे लागते.

– ती जर मिळवती किंवा आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण नसेल तर हे प्रश्न अधिक जटील होतात.

– घटस्फोटित स्त्रीचा पुनर्विवाह सहसा होत नाही.

– तिच्याकडे पहाण्याचा समाजाचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित असतो.

-घटस्फोटित स्त्रीला मुले असतील तर तिचा पुनर्विवाह होणे अवघड असतो.

– झालाच तरी तिच्या लग्नापूर्वीच्या मुलांना सावत्रपणाचा जाच सोसावा लागतो,अनेकांच्या स्वभावात काही दोष आढळून येतात, अनेक जण एकाकी आणि पोरकी होतात.

घटस्फोटामुळे असे प्रश्न केवळ स्त्रियांतच दिसतात असे नाही तर पुरुषांमध्येही अनेक समस्या दिसून येतात. अनेक आर्थिक,मानसिक, सामाजिक आणि लैंगिक समस्या निर्माण होतात, घटस्फोटित व्यक्तिविषयी समाजाचा दृष्टिकोन चांगला नसतो.याशिवाय मुलांची कस्टडी आणि मालमत्तेचे प्रश्न निर्माण होतात.

घटस्फोटाची दिसून येणारी कारणे :

-पुरुष किंवा स्त्रीचे विवाहपूर्व संबंध नंतर उघडकीस येणे.

– विवाहानंतर विवाहबाह्य संबंध.

– परस्परांची होणारी भांडणे,उडणारे खटके.

-व्यसने, जुगार.

– भावनिक छळ,अत्याचार.

– दोघांतील पुढीलपैकी फरक ;

– वय, भाषा,चालीरिती, आवडीनिवडी, छंद, खाण्यापिण्याच्या सवयी,भौगोलिक बाबी,उत्पन्नाची साधने,दोघांतील विवाहापूर्वीची अनेक बाबतीतील तफावत इ.

अनेकदा विवाहापूर्वी हवाहवासा होणारा सहवास विवाहानंतर नकोसा वाटतो परस्परांबद्दलच्या प्रेमाची जागा घृणा, तिटकारा घेते.अनेकदा संयुक्त कुटुंबातील मतभेद याला कारणीभूत ठरतात. परस्परांमधील दरी दिवसेंदिवस  वाढतच जाते. एकमेकांतील दोष दिसू लागतात, आपण कसे डावललो जातो,आपल्याला कशी किंमत दिली जात नाही हे ते सतत बोलत जातात. समाजातील आपली प्रतिमा कशी असेल आणि आपले कुटुंब म्हणून ऐक्य याची तमा न बाळगता ते  एकमेकांची उणीदुणी काढण्यातच धन्यता मानतात.

हे नक्कीच चिंतेचे असते.

याला जबाबदार कोण? या प्रश्नावर एकच एक उत्तर देता येणार नाही.कुटुंबनिहाय यात वेगवेगळेपणा असतो.

घटस्फोटाच्या वर दिलेल्या कारणांव्यतिरिक्त पुढील बाबींचाही गांभीर्याने विचार करावा लागेल;

– अनेक ठिकाणी कुणी एकजण याला जबाबदार नसतो.परिस्थिती त्यांना हे करण्याला भाग पाडते

– विवाह टिकवणे हे अनेकदा अशक्य बनते.पण कधी कधी परस्परांना समजून न घेणे किंवा गृहीत धरणे हेही एक कारण असते.

-अनेकदा एक घटक आपला कोणत्यातरी बाबतीतचा हेका  सोडत नाही.आणि ते घटस्फोटाचे कारण बनते.

-कुटुंबात व्यक्तिस्वातंत्र्याला  महत्त्व असलेच पाहिजे.मात्र त्यासोबतच कुटुंबसंस्थेच्या महत्त्वाचीही जाणीव असलीच पाहिजे.

जगात भारताची ओळख ही भक्कम कुटुंबसंस्था असणारी संस्कृती अशी आहे.कुटुंबात कुणा एकावर अन्याय न होताही सर्वांच्या हिताच्या दृष्टीने आणि समाजस्वास्थाच्या साठीही कुटुंबातील पतीपत्नींनी व्यक्तिस्वातंत्र्य,

स्वाभिमान याचा विचार करतानाच परस्परांशी सतत संवाद साधत राहीले पाहिजे.परस्परांविषयी गैरसमज हे आपापसात बोलूनच नाहीसे केले पाहिजे.

पती आणि पत्नी ही संसाराच्या गाडीची दोन चाके असतात असे समजले जाते.ही दोन्ही चाके (सामाजिक दर्जा,व्यक्तिस्वातंत्र्य या अर्थाने) समान आकाराची असलीच पाहीजे.गाडी चालताना या दोहोंत ठराविक अंतर असावे.मात्र या त्यांना सतत  विश्वासाचे वंगण दिले पाहिजे.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

ईमेल- [email protected]

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मकर संक्रांत…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “मकर संक्रांत…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

इंग्रजी नवीन वर्ष सुरू झाले की पहिला  येणारा सण म्हणजे मकरसंक्रांत. कुणाच्याही मनात घर करायचं असेल तर त्याचा रस्ता हा आपल्या वाणीमार्फत जातो.तुमच्या वाणीवरच तुमच्याशी जोडल्या गेलेली माणसं ही जुळून राहतात की दुरावतात हे संपूर्णपणे अवलंबून असतं.म्हणून ह्या सणाचा मूलमंत्रच मुळी “तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला”असा आहे. ह्या सणाद्वारे गैरसमजाने निर्माण झालेले मनमुटाव,नाराजी क्षणात दूर होऊन निरभ्र आकाशासारखं मनं स्वच्छ होतं. अर्थातच” गोड बोला” हे शब्द अगदी स्वच्छ पारदर्शी मनातून आणि मनापासून सुद्धा उमटले तरच त्याला अर्थ आहे.

पुराणात मकरसंक्रांतीची अशी कथा सांगतात की, संकरासूर नावाच्या राक्षसाला जगदंबेने या दिवशी मारले म्हणून तिला संक्रांतीदेवी असे म्हटले जाऊ लागले.

…हा सण साजरा करण्याच्या पद्धती ह्या प्रांतानुरूप थोड्या बदलतात.मकर संक्रांतीच्या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगड्यांची पूजा केली जाते. या सुगड्यांना दोरा गुंडाळतात.. त्यानंतर हळद-कुंकू लावून त्यामध्ये ऊसाचे काप टाकले जातात, त्याबरोबरच तीळ गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, बोरं टाकली जातात. यानंतर एका शुभ्र वस्त्राने कपडे झाकून प्रार्थना केली जाते. ही पूजा आटोपल्यानंतर गृहिणी आपल्या सवडीप्रमाणे एकमेकींना भेटण्यासाठी जातात. तीळ गुळ देऊन छोट्या भेटवस्तू देऊन हा सण साजरा करतात. या भेटवस्तूंना वाण देणे म्हणते. नवविवाहित जोडप्याचा दोन्ही घरी संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करतात. एरवी आपण काळा रंग अशुभ मानतो परंतु ह्या संक्रांतीच्या सणाला काळ्या वस्त्रांच महत्त्व असतात त्यामुळे बाजारात ह्या दिवसात काळ्या साड्या व काळे पंजाबी ड्रेसेस खप असल्या कारणाने भरपूर बघायला मिळतात.

मकरसंक्रांतीला उत्तरायण सुरू होते. उत्तरायण हा शुभ काल मानला जातो. याबद्दल अशी गोष्ट आहे की, महाभारतातील कौरव –  पांडवांचे युद्ध चालू होते. अर्जुन भीष्मांशी लढत होता पण ते त्याला जड जात होते. तेव्हा श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून अर्जुनाने शिखंडी ला पुढे उभे केले आणि तो त्याच्याआडून लढू लागला. शिखंडी हा अगोदर अंबा नावाची राजकन्या होता. भीष्मांनी आपल्या सावत्र भावासाठी अंबा, अंबिका व अंबालिका अशा तीन राजकन्या पळवून आणल्या होत्या.

अंबेचे दुसर्‍या राजावर प्रेम होते म्हणून भीष्मांनी तिला त्याच्याकडे पाठवले; पण पळवून नेलेल्या मुलीचा स्वीकार करायला त्याने नकार दिला. ज्या भीष्मांमुळे हे सारे झाले त्यांचा सूड घेण्याचे अंबेने ठरवले. ती तपश्चर्या करून शिखंडी नावाचा पुरुष झाली आणि भीष्मांशी लढायला आली. पण ती पूर्वी स्त्री होती म्हणून भीष्म शिखंडीशी लढेनात. तेव्हा अर्जुनाने शिखंडीच्या आडून सोडलेल्या बाणांनी जखमी होऊन भीष्म कोसळले. त्यांच्या अंगामध्ये इतके बाण घुसले होते की, ते जमिनीवर खाली न पडता बाणांच्याच गादीवर आडवे झाले. तेव्हा दक्षिणायन सुरू होते. पण भीष्म इच्छामरणी होते म्हणून त्यांनी उत्तरायणाचा शुभ काल सुरू होण्याची वाट पाहिली आणि मगच प्राण सोडले.

अशा ह्या स्नेहबंधाचे धागे गुंफणा-या सणाची महती सांगणारी माझी एक रचना  पुढीलप्रमाणे

मकरसंक्रांतीची शिकवण

ह्या सणाला काय महत्त्व सांगतो काटेरी हलवा

तीळ गुळासंगे मुखी ठेऊनी राग मनीचा घालवा

ह्याला काय महत्त्व सांगतात ती आंबटगोड बोरं

मनातील किल्मिष पूर्ण घालवा मनं करा कोरं

ह्याला काय महत्त्व सांगतात गोड ऊसाचे कांडे

गोड बोलून टाळावे जरी लागले भांड्याला भांडे

ह्या सणाला काय महत्त्व सांगतो टप्पोरा तीळ

आढ्यता आता सोडा घालवा मनातील पीळ

ह्याला काय महत्त्व सांगतो पिवळाधम्म गूळ

स्वच्छ निरभ्र करा मनं सोडून गैरसमजाचे खूळ

ह्याला काय महत्त्व सांगते मिश्रडाळीची खिचडी

फटकळ तोंडाळपणा पेक्षा बरी ती लाडीगोडी

काय महत्त्व सांगतात ती लालचुटुक गाजरं,

मनात शिरूर राह्यलं की आयुष्य होतं साजरं

द्वेष आता सोडा माणसं आता  जोडा ,

तीळगूळ घेऊन गोड बोलून गाठ मनीची सोडा.,

गाठ मनीची सोडा…

परत एकदा तीळगूळ घ्या अन् गोडगोड बोला. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – शकुनी महिला मंडळ ! – ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 😂 चं म त ग ! 🎲 शकुनी महिला मंडळ ! 💃☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

चाळीतले “शकुनी” महिला मंडळ सकाळची काम आटपून, रोजच्या प्रमाणे दुपारी जिन्या जवळच्या मोकळ्या चौकात, चाळगोष्टी करायला जमले होते.  प्रत्येकीच्या हातात काही ना काही निवड, टिपण, शिवण (स्वतःच्या घरचे) होतेच ! आता तुम्ही म्हणाल “शकुनी” महिला मंडळ म्हणजे ? शकुनी तर कपटी पुरुष होता आणि महिला मंडळाला “शकुनी” महिला मंडळ हे नांव कसे काय पडले ? मी तुम्हाला शकुनीच्या फाशांची शपथ घेवून सांगतो, की महिला मंडळाला हे असे नांव ठेवण्यात माझा फाशां प्रमाणे त्याच्या पटाचाही संबंध नाही ! पण तुमचा प्रश्न रास्तच आहे आणि त्याचे उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसण्याचा पण संभव आहे !  त्या महिला मंडळाला असे नांव सर्वानुमते त्यांच्याच मुला मुलींनी दिले होते, आता बोला !  त्या सगळ्यांनीच सध्या टीव्ही वर चालू असलेले महाभारत बघून त्यात दाखवलेल्या शकुनीच्या द्यूतामुळे महाभारताचे रामायण घडले, अशी आपल्या बाल मनांची समजूत करून घेतली असावी ! त्यामुळे चाळीत आपापल्या आयांमुळं, अगदी महाभारत होत नसले,  तरी कायम शीतयुद्ध सुरूच असते,  या समजुतीतून त्यांनी हे नांव महिला मंडळाला दिल्याची शक्यता नाकारता येत नाही !

तशी “शकुनी” महिला मंडळाची सभासद संख्या जरी जास्त असली, तरी यंग टर्क्सच्या मते त्यांच्या पैकी शहाणे, कुलकर्णी आणि निफाडकर काकू, चाळीतल्या आतल्या बातम्या काढण्यात जेम्स बॉण्डवर मात करतील अशा ! त्यामुळे त्या तिघींच्या आडनावाचे आद्याक्षर वापरून “शकुनी” हे नांव त्यांनी मंडळाला बहाल केले होते असे पण काही लोक म्हणतात !

आज जरा बऱ्या पैकी ऑडियन्स जमलेला बघून जोशीणीने पहिला फासा टाकला !  “तळ मजल्यावरची चितळ्यांची नलू बहुतेक पळून गेली वाटत !” हे ऐकताच सगळ्या महिला मंडळाचे हात, जे काही निवड,  टिपण करत होते, ते एकदमच कोणीतरी स्टॅचू केल्यागत थिजल्या सारखे झाले ! पण स्वतः जोशीण मात्र काहीच झालं नाही अशा अविर्भावात पुन्हा तांदूळ निवडायला लागली.  हा धक्का पचवायला सकल महिला मंडळाला साधारण सारखाच वेळ लागला आणि सगळ्यांनी एकदमच बोलायला सुरवात केली.  “काय सांगतेस काय? कुणाबरोबर गं?” “माझा तर बाई विश्वासच बसत नाहीये” “नेहमी खाली मान घालून जाणारी, साधी राहणारी असं काही…. ” “हो ना, तिच्या वयाच्या मुली नको नको ती फॅशन करत असतांना, ही अजून साडीत…. ” “म्हणजे अगदी खाली मुंडी पातळ धुंडी निघाली…. ” तो गलका ऐकून जोशी काकू म्हणाल्या “माझं जरा ऐका, मी म्हटलं ‘चितळ्यांची नलू बहुतेक पळून गेली !’ अजून तशी खात्रीलाय बातमी यायची…. ” तिला मधेच तोडत साने काकू म्हणाल्या “म्हणजे अजून तुला नक्की माहित नाही, तर कशाला उगाच तीच नांव खराब करतेस ? अशांन तीच लग्नतरी होईल का ?” यावर साठे काकूंनी पण जोशी काकुंवरचा आपला राग व्यक्त केला आणि म्हणाल्या “तुला ना त्या टीव्ही वरच्या बातम्या देणाऱ्यांसारखी घाई असते, बघा आमच्याच चॅनेलने ही बातमी प्रथम तुमच्या पर्यंत आणली….”  तेवढ्याच ठसक्यात जोशीण म्हणाली “अग बरेच दिवसात दिसली नाही म्हणून म्हटलं पळून गेली की काय, कारण तीच्या प्रेम

प्रकरणाची बातमी तूच तर  आम्हाला दिली होतीस !” हे ऐकताच साठे काकू परत खाली मान घालून गहू निवडायला लागल्या. ते बघून जोशीणीला मनोमन आनंद झाला आणि तिने आपला मोर्चा साने काकूंकडे वळवला “आणि साने काकू लग्न न व्हायला काय झालंय नलूच,  हिरा कितीही लपवला तरी चमकायचा राहतो का ?” हे ऐकताच सावंत काकू म्हणाल्या “आता ही हिरा कोण ?” त्यांच हे बोलण ऐकून मंडळात एक हास्याची लहर उठली.  सावंत काकूना काही कळेना, पण आपल्या प्रश्नाचे कोणीच उत्तर देत नाहीत हे बघितल्यावर त्या पुन्हा हातातली गोधडी शिवायला लागल्या.

त्या हास्य लहरीत वातावरण थोडं निवळत असतानांच, हातात दोन मेथीच्या जुड्या घेवून स्वतः चितळे काकू हजर ! त्यांना पाहताच जणू काहीच झाले नाही, या थाटात साने काकू त्यांना म्हणाल्या “छान दिसत्ये मेथी, कुठून आणलीस गं ?” “अग यांच्या ओळखीचा एक भाजीवाला आहे नाशिकचा, त्याच्या कडून हे घेवून आले !” “पुढच्या वेळेस मला पण दोन जुड्या सांग हं, आमच्यकडे पण मेथी फार आवडते सगळ्यांना.” “हो सांगीन ना, त्यात काय एवढं आणि हो आणखी कोणाकोणाला हवी असेल तर आत्ताच सांगा म्हणजे एकदम आणायला बरी.” मग प्रत्येकीनं आपआपली ऑर्डर दिली पण जोशीण काही बोलायला तयार नव्हती.

ते बघून साठीणीला पण चेव आला आणि ती मुद्दामच तिला म्हणते कशी “काय गं, तुला नको का नाशिकची मेथी ?” “नको हो, आमच्याकडे माझ्याशिवाय कोणीच खात नाही.  पण तुम्ही एक कामं करा, तुम्ही भाजी केलीत की द्या वाटीभर पाठवून, कडू असली तरी गोड मानून खाईन हो !” हे ऐकताच साठीणीचा चेहरा पाहण्या सारखा झाला.  पण ती खमकी तशी जोशीणीची पाठ सोडायला तयार नव्हती. वरकरणी हसत म्हणाली “हो देईन की त्यात काय एवढं !” पण मनांतून जोशीणीच्या बातमीची खात्री करायला, स्वतः चितळे काकू हजर असल्याचा फायदा घेण्याचे ठरवून, तिने जोशीणीकडे पहात चितळे काकूंना डायरेक्ट सवाल केला, “काय हो काकू, हल्ली तुमची नलू दिसली नाही बरेच दिवसात. तब्बेत वगैरे बरी आहे ना तिची ?” “हो अगदी मजेत आहे, तिला काय होतंय !” “तसं नाही पण जोशी काकू म्हणत होत्या….. ” साठीणीला मधेच थांबवत जोशीण म्हणाली “हो बरेच दिवसात दिसली नाही ना,  म्हणून जरा काळजी पोटी विचारत होते की नलूला कुणी बघितलीत का !” जोशी काकूंच्या या बोलण्यावर साठे काकूंनी बोलायला तोंड उघडले, पण त्या आधीच चितळीण बोलती झाली, “नाही तुमच सगळ्यांचे म्हणणे बरोबरच आहे, पण तिची तब्येत अगदी ठणठणीत आहे, काळजी करायच काहीच कारण नाही.” “ते चांगलंच आहे, पण चाळीत कुठे दिसली नाही…. ” “अहो साठे काकू ती घरात असेल तर दिसेल ना?” “म्हणजे मग आम्ही जे ऐकलं ते खरच…” “हो खरच आहे ते,  ती सध्या ओबेरॉय मध्ये  राहते आहे !” “म्हणजे ?” “अहो ती गेल्याच महिन्यात US वरून आली आणि सेल्फ क्वारंटाईन साठी म्हणून एअरपोर्ट वरून डायरेक्ट ओबेरॉयला अठ्ठावीस दिवसासाठी !”  चितळे काकूंचे बोलणे ऐकून तमाम महिला मंडळ जोशीणीकडे खाऊ का गिळू नजरेने बघायला लागले आणि जोशीण खाली मान घालून परत तांदूळ निवडायला लागली.  आणि एकीकडे  मंडळाच्या तीन आधारस्तंभानी म्हणजे शहाणे, कुलकर्णी आणि निफाडकर काकूंनी सुटकेचा निश्वास टाकला !

© श्री प्रमोद वामन वर्तक

१७-०१-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग – ५२ – डेट्रॉईट आणि वृत्तपत्रातील वादळ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग –५२ – डेट्रॉईट आणि वृत्तपत्रातील वादळ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

मेंफिसहून स्वामीजी शिकागोला परतले. २५ जानेवारीला, तिथेही एक कार्यक्रम झाला. तीन आठवडे राहून ते आता डेट्रॉईट ला आले होते. सांस्कृतिक शहर होतं डेट्रॉईट. तिथे सतत काही न काही घडत तरी असे, किंवा काही तरी उपक्रम चालत असे. असे नवचैतन्य असलेले शहर, इथे नवीन उपक्रमाचे नेहमी स्वागत होत असे,स्वामींचा तिथे तीन वेळा मुक्काम झाला. त्या काळात त्यांची ८ सार्वजनिक व्याख्याने झाली.

डेट्रॉईट मध्ये स्वामीजी मिसेस जे.बॅगले यांच्या राजेशाही प्रासादात मुक्कामाला होते.

बॅगले साठीच्या होत्या. स्वतंत्र विचारांच्या, तडफदार आणि मनाने उदार होत्या. त्यांचे पती मिशिगन चे निवृत्त गव्हर्नर होते ,पण दुर्दैवाने त्यांचे खूप लवकर निधन झाले. व्यापक दृष्टी असलेल्या बॅगले अनेक सार्वजनिक कामात विविध ठिकाणी पदांवर होत्या. जबाबदारी सांभाळत होत्या. शिकागो चे जे प्रदर्शन भरले होते त्याच्या महिला विभागाच्या व्यवस्थापक मंडळावर त्या होत्या. सर्व धर्म परिषदेत त्यांनी विवेकानंदांची भाषणे ऐकली होती. तेंव्हाच त्यांच्यावर स्वामीजींचा प्रभाव पडला होता. त्यामुळे तर काय त्यांनी स्वामीजींना अगदी आनंदाने डेट्रॉईटला आपल्याकडे ठेऊन घेतले होते.

स्वामीजींच्या स्वागताप्रीत्यर्थ अल्पोपाहाराचा खास कार्यक्रम आयोजित केला होता.त्याला सर्व चर्च चे बिश्यप, धर्मोपदेशक, महापौर,पत्रकार, प्राध्यापक, विचारवंत अशा सर्वांना निमंत्रित केलं होतं. याआधी सुद्धा बॅगले यांनी नामवंतांसाठी असे कार्यक्रम आयोजित केले होते पण त्याहीपेक्षा हा कार्यक्रम चांगला झाला असे वृत्तपत्रातल्या प्रसिद्धीत म्हटले होते.

पण या सुंदर नियोजित कार्यक्रमाला गालबोट लागले ते तिथे आलेल्या एका स्त्रीने स्वामीजींना उद्देशून अपमानकारक काही शब्द वापरले होते म्हणून. ते बॅगले यांना अजिबात आवडले नाही. ही तर स्वामीजींना विरोधाची नांदी च ठरली होती जणू. वाचकांच्या पत्रात वृत्तपत्रात हे छापून आले होते. दुसर्‍या दिवशी फ्री प्रेस च्या पत्रकारांनी घेतलेली त्यांची मुलाखत छापताना सुरुवातीलाच काही उपहासात्मक चार ओळी सुद्धा लिहिल्या होत्या मुलाखतित मेंफिस ला प्रश्न विचारले होते तसेच विचारले होते. ही मुलाखत डेट्रॉईट इव्हिंनिंग न्यूज मध्ये सविस्तर छापली होती.

डेट्रॉईटच्या युनिटेरियन चर्च मध्ये स्वामीजींचे पहिले व्याख्यान झाले. मिसेस मेरी फंकी या वेळी उपस्थित होत्या. 

स्वामी विवेकानंद, भारतातील अध्यात्मिकता गुलामगिरीत सुद्धा टिकून राहिली होती,ती प्राचीन संस्कृती, खोलवर पोहोचलेली नीतीमूल्य यावर स्वामीजी बोलले. अशा आमच्या देशात ख्रिस्ती उपदेशकांची काहीही आवश्यकता नाही ,त्यांनी हवं तर भारतात यावं आणि तिथल्या संस्कृतीकडून धडे घ्यावेत”.झालं! ही टीका सहन न होऊन स्वामीजींच्या याच मुद्दयाचा आधार घेऊन आता विवेकानंदांविरूद्ध टीका सुरू झाली.विवेकानंद यांच्या आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक करायला सुद्धा आता लोक नाही म्हणू लागले. आणि आता विवेकानंद आपले पाहुणे नाहीत सर्वधर्म परिषद आता संपली आहे. आपण त्यांच्या बोलण्यावर जोरदार प्रहार केला पाहिजे. मिशनर्‍यांनी उठवलेले हे वादळ ट्रिब्युन जर्नल, इव्हिंनिंग न्यूज, फ्री प्रेस या तिथल्या प्रमुख वृत्तपत्रातून आल्याने आता स्वामीजी एका बाजूला तर मिशनरी एका बाजूला अशी स्थिति निर्माण झाली.

डेट्रॉईट मध्ये तर वृत्तपत्रात वाचकांची पत्रे आणि संपादकीय याचा वर्षाव झाला जणू. स्वामीजींचे दुसरे व्याख्यान हिंदूंचा तत्वज्ञानविचार या विषयावर झाले.काहीजण योग्य विचार करून स्वामीजींबद्दल लिहिणारे होते तेही छापून येत होते.

विवेकानंद यांना सभेनंतर प्रश्न विचारत किंवा प्रश्नोत्तरचा कार्यक्रम होई त्यात विचारत. त्यातील मते अशी असत. “भारत एक अतिशय मागासलेला देश आहे. आदिम समाज असावा तसा किंवा त्या अवस्थेतून नुकताच बाहेर पडत असलेला देश. दगड धोंड्यांची तसेच, वड किंवा तुळस अशा झाडांची, नाग, वानर अशा प्राण्यांची, पुजा तेथे चालते.पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीला सरळ त्याच्या बरोबर चितेवर चढवतात . तेथील लोक आपली मुले विशेषत मुली गंगेत सुसरीपुढे टाकतात किंवा जगन्नाथाच्या रथयात्रेवेळी चाकाखाली आपले शरीर झोकून देऊन अनेक जण प्राणत्याग करतात”. अशा तिथे भारताबद्दल समजुती होत्या. हेच प्रश्न लोक तिथे विचारात असत. विवेकानंद यांनी या सर्व प्रश्नांना वेगवेगळ्या कार्यक्रमात ,मुलाखतीत,सभेच्या शेवटी योग्य ती सत्य उत्तरे दिली. नेमके त्या मागचे विचार आणि वस्तुस्थिती स्पष्टपणे समजावून सांगितली.काहीही लपविले नाही.

त्या लोकांची दुसरी समजूत अशी होती, ‘भारतात चमत्कार करणारे काही फकीर आणि बैरागी आहेत, ते आकाशात दोर ताठ फेकून त्यावर चढून नाहीसे होतात. पुन्हा खाली येतात. आपले शरीर जमिनीपासून वर अधांतरी उचलतात,पाण्यावरून चालत जातात, हिमालयात तर अनेक योगी व महात्मे असे आहेत की, अनेक दिवस अन्न पाण्याशिवाय राहू शकतात. भूत भविष्य सांगतात. निसर्गाचा कोणताही नियम त्यांना अडवू शकत नाही. शंभर शंभर वर्षे जगतात’ अशा या समजुतीचे विवेकानंद यांनी स्पष्ट नकारार्थी उत्तर दिले. काही वेळा क्वचित चमत्कार घडतात पण त्यामागे काही नियम असला पाहिजे तो आपल्याला माहिती नसतो एव्हढच. आपण हिमालयात फिरलेलो आहोत. असा कुठलाही महात्मा आपल्याला भेटलेला नाही असे ठणकाऊन सांगितले. पुढे जाऊन असेही स्पष्ट केले की, हिंदू धर्मातील तत्वज्ञानामध्ये चमत्कारांना कोणतेही महत्व दिलेले नाही. सामान्य माणूस त्यांना भुलतो. पण ते त्याचे अज्ञान असते. आध्यात्मिक धारणा महत्वाची आहे. आणि तिचा संबंध माणसाच्या आत्मिक विकासाशी आणि विशुद्ध आचरणाशी आहे. ही भारतीय तत्वज्ञानाची शिकवणूक आहे. हे स्वामी विवेकानंद यांचे बुद्धिनिष्ठ विचार थिओसॉफीच्या विचारसरणीचा पाया च डळमळीत करणारे ठरले आणि पुन्हा एकदा त्यांना शत्रुत्व पत्करावे लागले.एव्हढी समाधानकारक उत्तरे त्यांनी दिली होती, तरी सुद्धा यानंतरच्या अंकात विवेकानंद यांचे स्वागत करताना ‘आम्हाला काही चमत्कार दाखवा’ असा अग्रलेख प्रसिद्ध झाला. त्याच्या दुसर्‍या दिवशी पुन्हा एक अग्रलेख .त्यात लिहिलं होतं, चमत्कार करता येत नाहीत तेंव्हा विवेकानंद यांच्या विषयीचा भ्रमाचा भोपळा फुटला.

पण आता मात्र ओ.पी. डेलडॉक जे स्वामीजींच्या विचारांचे पुरस्कर्ते होते त्यांनी वृत्तपत्राची मागणी आणि विसंगती दाखवणारं सविस्तर पत्रच पाठवलं, जे प्रसिद्ध झालं. धार्मिक विषयात विवेकानंद यांची उघडपणे बाजू घेणारे लोकही तिथे होते.

युनिटेरियन चर्च मध्ये १८ फेब्रुवारी ला धर्म प्रवचनासाठी रेव्हरंड रीड स्टुअर्ट यांनी ‘पूर्व दिशेचा उघडत असलेला दरवाजा’  असा विषय मांडला.विवेकानंद यांच्या विचारधारेशी समन्वय साधणारे भाषण त्यांनी केले, पश्चिमेकडे विज्ञान आहे ,तर पूर्वेकडे अध्यात्म आहे. पश्चिमेकडे पंथ आहे तर पूर्वेकडे अनेक पंथांना सामावून घेणारा धर्म आहे.असे सांगितले.

तर बेथ एल या मंदिरात रॅब्बी ग्रोसमन यांनी, ‘विवेकानंदांनी आपल्याला काय दिले?’ हाच विषय प्रवचनाला निवडला.अगदी ऐकण्यासारख आहे हे . रॅब्बी म्हणतात, “ विवेकानंदांचे विचार ऐकताना मन  अगदी उल्हसित होऊन जाते. धर्म आणि ईश्वर संकल्पना या बाबतीत आपण पाश्चात्य फार मागे आहोत. धर्म म्हणजे नुसता विचार नव्हे, तर साक्षात दैनंदिन जीवन. आपल्याजवळ फार मोठ्या सुरेख आणि आकर्षक कल्पना आहेत. पण त्या हवेत तरंगत असतात. आपणा पाश्च्यात्यांचा देव आकाशात आहे. आणि रविवार सकाळपुरतेच काही कार्य आपण त्याच्यावर सोपविलेले आहे.विवेकानंदांचा ईश्वर पृथ्वीवर आहे. तो परमेश्वर नित्य क्षणाक्षणाला आपल्याजवळ आहे.बागेतील प्रत्येक फुलात, वार्‍याच्या झुळुकीत,आपल्या शरीरातील रक्ताच्या क्षणाक्षणातील स्पंदनात परमेश्वर भरून राहिला आहे. हा विचार आपण हिंदूंकडून उचलला पाहिजे. आपल्या पंथांना भिंती आहेत. पूर्वेकडील धर्म चहू दिशांनी खुला आणि स्वीकारशील आहे.

एखाद्या अगदी गरीब माणसाच्या दरात अकस्मात कोणीतरी येतो तेंव्हा घरातील लहान मूल ओरडून सांगते अतिथि अतिथि. त्या अतिथि साठी घरातले सर्वजण त्याच्यासमोर उभे राहतात. कारण त्याच्या रूपाने दरात परमेश्वर आला आहे अशी शिकवणूक त्या माणसांना मिळालेली असते. ही केव्हढी सुंदर कल्पना आहे. पाश्च्यात्यांच्या घरी बाहेरच्या खोलीत येणार्‍याला किती उपचार(formality) सांभाळावे लागतात.हे आपल्याला माहिती आहे. आपले चर्च पवित्र आहे तेही फक्त रविवारी”.अशा पद्धतीने ग्रोसमन यांनी त्यांना समजलेले विवेकानंद यांचे विचार मांडले. म्हणजेच विवेकानंद यांनी आपल्या धर्माचे काय महत्व आहे ,आपला धर्म काय शिकवण देतो, ते तिथे अशा प्रकारे मोठ्या अभिमानानेच सांगितले असणार.ग्रोसमन चे हे प्रवचन इव्हनिंग न्यूजला मानवले नाही. त्याने ग्रोसमन यांच्यावर टीका केली.

पुढे पुढे तर विवेकानंदा यांच्या विधांनांचा विपर्यास करून तशा बातम्या,लेख प्रसिद्ध होऊ लागले. कोणी स्वामीजींची बाजू मांडू लागले आणि आश्वस्त करू लागले की, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. सगळेच लोक हलक्या मनाचे व संकुचित वृत्तीचे नाहीत, आम्ही ख्रिस्ता ची शिकवणूक मानणारे तुमचं स्वागत करतो. आणि ज्या शिवराळ भाषेत विवेकानंद यांच्या बद्दल लिहिले जात आहे ते ख्रिस्ताच्या शिकवणुकीला न शोभणारे आहे असे खडसावले होते. एव्हढी टिका  चालू होती पण विवेकानंद यांच्या व्यख्यांनाना प्रचंड गर्दी होत होतीच.अनेक जण त्यांना भेटायला येत. स्वामीजींना भोजन आणि अल्पोपहार याची सतत निमंत्रणे येत.

एक तरुण उद्योजक, मिशिगन-पेनिनशूलर कार कंपनीचे भागीदार चार्ल्स एल. फ्रिअर एक धनवंत होते.  त्यानेही स्वामीजींसाठी भोजन समारंभ आयोजित केला होता. तो खूप थाटामाटाचा होता.शिवाय विवेकानंद यांना त्यांच्या कामासाठी तेंव्हा २०० डॉलर्सची देणगी ही दिली होती.         

मिसेस बॅगले म्हणतात, आमच्या घरातील विवेकानंद यांच्या वास्तव्याचा प्रत्येक दिवस आनंद पूर्ण झाला.बॅगले ज्या भागात राहत होत्या तिथे सर्व धनवान मंडळी राहत होती.त्यांनी आपल्या निवासस्थानी स्वामीजींचे एक व्याख्यान ठेवले. सर्वांना जाहीर निमंत्रण असल्याने खूप गर्दी झाली.स्वामीजी दोन तास बोलले. चर्चा, वाद उत्तर प्रतिउत्तर सुरूच राहिले. सडेतोड व्याख्यान झाले.केवळ आठ दहा दिवसात मिशनरी हादरून गेले होते.

पण डेट्रॉईट च्या बाहेरून विरोध ऐकू यायला लागला होता.रेव्हरंड आर. ए. हयूम यांनी विवेकानंद यांना त्यांच्या भाषणावर आक्षेप घेणारे पत्र लिहिले,विवेकानंद यांनी त्याला लगेच उत्तर दिले. हयूम भारतात जन्मलेले,वाढलेले आणि मिशनरी म्हणून भारतात काम केलेले गृहस्थ. आता त्यांनी पुन्हा पत्र पाठवले. मात्र स्वामीजींनी त्याला उत्तर दिले नाही, कारण सार्वजनिक वादात आपल्याला ओढण्याचा प्रयत्न त्यांच्या लक्षात आला. हयूम यांनी मद्रास मध्ये ‘हिंदू’ या वृत्तपत्रात आलेला अग्रलेख याचा आधार घेऊन हे पत्र लिहिले होते. हा अग्रलेख संपादक जी. सुब्रम्हण्यम अय्यर यांनी लिहिला होता. जे भारतात सर्व धर्म परिषदेसाठी समिति नेमली होती त्यात ते एक सदस्य होते.

हयूम यांनी मार्च मध्ये पाठवलेली पत्रे एप्रिल मध्ये डेट्रॉईट फ्री प्रेस मध्ये प्रसिद्ध झाली. विवेकानंद या वादात नसतानाही त्यांना त्यात ओढण्याचा घाट घातला होता. त्याला वृत्तपत्रातून त्या पत्राच्या बाजूने आणि विरुद्ध बाजूने ही उत्तरे देण्यात आली. धर्मोपदेशकांनी तर स्वामीजींच्या वागण्या बोलण्यावर आणि चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यास सुरुवात केली.  ही सर्व वार्ता विवेकानंद आलसिंगा पेरूमल यांना पत्राने कळवत होते.

आता ही सर्व बातमी मिसेस बॅगले यांच्या कानावर आली. त्यांच्या ओळखीच्या मिसेस स्मिथ यांनी कळवले की विवेकानंद यांच्यावर नाना तर्‍हेच्या गोष्टी बोलल्या जात आहेत. ते संतापी आहेत, त्यांचे वर्तन शुद्ध नाही, असे आरोप ही केले जात आहेत. हे ऐकून आपण अस्वस्थ झालो आहोत. बॅगले यांनी आपले मत सांगावे असे विचारले होते. स्वामीजी तर तेंव्हा बॅगले यांच्याकडेच राहत होते.पण बॅगले आता नेमक्या अॅनिस्क्व्यामला गेल्या होत्या.तिथून त्यांनी पत्र लिहिले आणि म्हटले ….

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भव्य स्वयंपाक उत्तम… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? विविधा ?

☆ भव्य स्वयंपाक उत्तम… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

भव्य स्वयंपाक उत्तमस्वयंपाक कसा असावा ह्या बद्दल

 श्री समर्थ  रामदास स्वामी महाराज लिहितात —

           शक्ती बुद्धी विशेष ।

           नाही आलस्याचा विशेष ।

           कार्यभागाचा संतोष ।

                  अतिशयेसी ॥

स्त्रियांना काम करावयाचे तर शक्ती पाहिजे आणि काम कसे करावे यासाठी बुद्धीही पाहिजे आणि काम करताना आळस नसावा. समर्थांच्या मते आळस हा मनुष्याचा शत्रू आहे. केलेल्या कामाचा संतोष असावा. कोणालाही खाऊ घालताना तृप्त वृत्ती असावी.

ही ओवी समर्थ रामदास स्वामींच्या ‘स्वयंपाकिणी’ या स्फूट समासातील आहे. समर्थ रामदास हे असे संत आहेत की, ज्यांनी जीवनातील प्रत्येक गोष्टींवर मार्गदर्शन केले आहे.

            आता ऐका स्वयंपाकिणी ।

            बहुत नेटक्या सुगरणी ।

            अचूक जयांची करणी ।

                    नेमस्त दीक्षा ॥

स्वयंपाक करताना पदार्थ नीट करावे ते कसे असावे –

           गोड स्वादिष्ट रुचिकर ।

            येकाहून येक तत्पर ।

            न्यून पूर्णाचा विचार ।

               कदापि न घडे ॥

घरात होणारा स्वयंपाक हा घरातील सर्व व्यक्तींना योग्य अशा प्रकारचा असला पाहिजे.

             रोगी अत्यंत खंगले ।

         तेणे ते अन्न पाहिजे भक्षिले ।

              भोजन रुचीने गेले ।

                 दुखणे तयाचे ॥

अत्यंत खंगलेल्या रोग्यालाही उत्तम वाटेल असे अन्न सुगरणीने करावे जेणे करून ते अन्न खाल्ल्याने त्याचे दुखणेही दूर होईल.

           उत्तम अन्ने निर्माण केली ।

              नेणो अमृते घोळिली ।

            अगत्य पाहिजे भक्षिली ।

                    ब्रह्मादिप्ती॥

स्वयंपाक असा असावा की, जणुकाही अमृतच टाकले आहे असे वाटावे. देवांनाही आवडेल असा रुचकर स्वयंपाक करणे हे सुगरणीचे काम असते.

           सुवासेची निवती प्राण ।

           तृप्त चक्षू आणि घ्राण ।

           कोठून आणिले गोडपण ।

                 काही कळेना ॥

स्वयंपाकाच्या नुसत्या वासाने अंत:करण आनंदित झाले पाहिजे. डोळे आणि नाक तृप्त झाले पाहिजे. या पदार्थांची चव इतकी छान असावी की इतकी सुंदर चव कशी आली असा खाणार्‍याला प्रश्‍न पडला पाहिजे. याचे नेहमी पाहत असलेले उदाहरण म्हणजे महाप्रसादाचे जेवण होय. काही विशेष न टाकताही देवासाठी आत्मीयतेने केल्यामुळे महाप्रसादाचा स्वयंपाक अप्रतिमच होतो. तसा घरी कितीही मसाले टाका पण होत नाही.

एवढा उत्तम स्वयंपाक केला की मग प्रथम देवाला नैवेद्य दाखवावा.

             देव वासाचा भोक्ता ।

             सुवासेचि होये तृप्तता ।

                येरवी त्या समर्था ।

                    काय द्यावे ॥

देवाला आपण नैवेद्य दाखवितो. देव फक्त वासानेच तृप्त होतो. आपण सामान्य माणसे देवाला काय देणार. देवाला नैवेद्य दाखविल्यानंतरच बाकीच्यांना जेवावयास वाढावे. जेवताना देवाचे नामस्मरण करावे.

            जनी भोजनी नाम वाचे वदावे ।

           अति आदरे गद्यघोषे म्हणावे ।

           हरीचिंतने अन्न सेवीत जावे ।

           तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे ॥

अशा प्रकारे गृहिणीने स्वयंपाक केला तर सर्व कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहील. सुदृढ कुटुंब सुदृढ समाज निर्माण करेल. अशा या स्वयंपाकाची फलश्रुती समर्थ सांगतात-

          भव्य स्वयंपाक उत्तम |

           भोजनकर्ते उत्तमोत्तम |

           दास म्हणे भोक्ता राम |

                    जगदांतरे ||

अशाप्रकारे केलेले मिष्टान्न चवीने ग्रहण करणारे लोक तृप्त झाले म्हणजे श्रीरामच संतोष पावतात. कारण श्रीरामच सर्वांच्या अंतरी असतात. 🍀

– लेखक कोण ते माहित नाही पण ह्या लेखाबद्दल त्यांना शतशः प्रणाम.

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “रिॲक्ट ॲन्ड रिसपाॅन्ड…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

 

? विविधा ?

☆ “रिॲक्ट ॲन्ड रिसपाॅन्ड…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

एकदा प्रवासात असतांना रेल्वेत एक कोल्ड्रिंक बाँटल आणि एक बिसलरी बाँटल घेण्याचा प्रसंग आला तेव्हा मला एकदम गौरगोपालदासजींचा “रिअँक्ट आँर रिस्पाँड” ह्या  शिर्षकाची  नेहमीप्रमाणेच माँरल असलेली व्हिडीओ क्लिप आठवली.

गौरगोपालदासजींच्या छोट्या छोट्या व्हिडीओ क्लिप्स मध्येही मोठ्ठ तत्वज्ञान दडलेलं असत. त्यांच्या क्लिपमध्ये त्यांनी खूप छान पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी समजावून दिल्या आहेत. पहिलं उदाहरण त्यांनी क्रिकेट ह्या खेळामधील दिले.प्रतिस्पर्धी खेळाडू कित्येकदा आपल्याला उकसवायला वा आपला ताबा गमावण्यासाठी शिव्यांचा वा गैरशब्दांचा वापर करतात जर त्याला बळी न पडता आपण आपला ताबा याने की कंट्रोल स्वतःजवळच ठेवला तर क्रिकेटमधील स्थितप्रज्ञ खेळाडू सचिन तेंडूलकर सारखे आपण होऊच शकू.

ह्या क्लिप मधील मला सगळ्यात आवडलेलं उदाहरण म्हणजे कोल्ड्रिंक आणि साध्या पाण्याचं .हे बघून माझ्याही मनात काही विचार आलेत ते पुढीलप्रमाणे.

खरंच आयुष्य वा जीवन हे साध्या पाण्यासारखं शांत,निर्मळ, समाधान देणारं तसंच स्थिर, खळखळाट नसलेलं,एका स्थितप्रज्ञासारखं असावं वा आपण घालवावं न की कोल्ड्रिंक्स सारख फसफसून वर उचंबळणार,खळखळाट असणारं,आतड्यांना इजा पोहोचवणारं आणि कधीच तृप्तता न देणार.

ह्या बाबतीत मला अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. आपलं वागणं हे कायम आपल्या हातात असतं पण दुसऱ्याचे वागणे आपल्या  हातात अजिबात नसतं त्यामुळे आपण आपल्या जागी शांतपणे वागलं तर मग कुठल्याही अडचणींचा सामना आपण योग्य त-हेने करु शकतो.

थोडक्यात काय तर  गौरगोपालदासजींच्या ह्या क्लिप मधून इतकं मात्र शिकले माणसाने कोल्ड्रिंक्स  सारख न जगता पाण्यासारखं जगलं तर आयुष्य नक्कीच समाधानात, शांत व्यतीत होतं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जिच्या हाती … ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ जिच्या हाती … ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

 ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी’ अशी एक म्हण आपल्या मराठी भाषेत प्रचलित आहे (म्हणजे आता होती म्हणावी लागेल.)आपल्या सुदृढ,सुसंस्कृत भारतीय समाजात ही म्हण अगदी तंतोतंत चपखल होती.जिच्या हाती पाळण्याची दोरी याचा अर्थ असा की जिला मातृत्व लाभलेय तिने आपल्या मुलांची योग्य काळजी घेऊन त्याला सुदृढ,सशक्त,सुसंस्कारी बनवू शकते.असा सुदृढ,सशक्त,सुसंस्कारी तेजस्वी युवक पुढं राष्ट्र मजबूत बनवेल आणि आपल्या राष्ट्राचा उद्धार करेल.स्वामी विवेकानंदासारखा एखादा युवक जग सुद्धा उद्घारेल.

पूर्वी स्त्रिया अशिक्षित होत्या,कदाचित त्यावेळची ही जाहिरातही असेल किंवा देश पारतंत्र्यात असल्यामुळे देशाला अशा तेजस्वी,सुदृढ सशक्त तरुणांची आवश्यकता असेल म्हणूनही कदाचित कुणी विचारवंताने आपल्या या विचाराला समाजासमोर ठेवले असेल.तसेही हा विचार सर्वच काळासाठी लागू आहे कारण ज्या देशातील तरुण  सुदृढ,तेजस्वी,संस्कारी आणि तगडे असतील तर देश सुद्धा तितकाच बलवान व सूनसंस्कृत होईल

“बलसागर भारत होवो

विश्वात शोभूनी राहो..”

अशी प्रार्थना म्हणून तर साने गुरुजी करत असतील.

आपले मूल आपले असले तरीही तो समाजाचा एक घटक असतो न पर्यायाने तो उद्याच्या देशाचा एक सुविद्य, सुसंस्कृत नागरिक असतो आणि हीच खरी आपल्या राष्ट्राची संपत्ती असते पर्यायाने उज्वल देश.त्यासाठी प्रत्येक मातेने आपल्या बालकाला त्या दृष्टिकोनातून घडवायचे असते आणि आपले मूल राष्ट्राला अर्पण करायचे असते.शिवरायांच्या काळात,पारतंत्र्याच्या काळात असे अनेक युवक आपल्या मातेने राष्ट्रार्पण केले म्हणूनच देश स्वतंत्र झाला,शिवरायांनी अशाच मूठभर तगड्या मावळ्यांच्या साथीने आपले स्वराज्य उभे केले.

अगदी नवजात शिशूपासून ते बालक सज्ञान होईतो ते आईच्या सहवासात जास्त असते.त्यामुळं आईच्या संस्कारांचा प्रभाव मुलावर पडत असतोच पण बालकाच्या सशक्ततेसाठी ,त्याच्या सदृढ ,संपन्न,निरोगी आरोग्य पूर्ण जीवनाची पण जबाबदारी मातेवरच येत असते,त्या दृष्टीने मुलाचा आहार विहार,खेळ,व्यायाम याकडेही तिचे जाणीवपूर्वक लक्ष असेल तरच ते बालक उद्याचा सशक्त युवक आणि सुसंस्कारी नागरिक बनेल.असे नागरिक मग देशावर प्रेम करतील, स्वच्छता व सामाजिक आरोग्य जपतील व आपल्या देशाचा सर्वांगीण विकास करतील.देशातील कायदा सुव्यवस्थेचे पालन करतील,कर प्रणाली मजबूत करतील आणि देश प्रगतीपथावर नेतील.यासाठी प्रथम लोकसंख्या नियंत्रण हवे जेणेकरून मर्यादित लोकसंख्येमुळे आपल्याला हवे तसे सुनिश्चित आणि चांगले बदल घडवता येतील.

पण आज आपल्या देशातील युवकांची स्थिती बघता काय दिसते?कुटुंबे विभक्त झालीत,आर्थिक बाजू मजबूत करत असताना घरातील बालकांच्या आरोग्याकडे, संगोपणाकडे दुर्लक्ष होत आहे,शहरात सुशिक्षित जोडप्यांच्या मुलांचे बालपण पाळणा घरात संपत आहे.बरेचदा रविवारी सुद्धा आपल्याला विश्रांती मिळावी म्हणून काही आया मुलाला पाळणा घरात सोडतात.एका बाजूला हे चित्र आहे,दुसऱ्या बाजूला अति सजग आया थोडक्यात माता पिता पालक अगदी नर्सरी /बालवाडी पासून मुलाला करिअरच्या  चक्कीत ढकलतात की ते मूल मोकळा श्वास सुद्धा घेऊ शकत नाही.स्पर्धेचे युग आहे म्हणून त्याला तीन वर्षापासूनच स्पर्धेच्या शर्यतीत ढकलले जाते त्यामुळं ते तिशीतच थकते,म्हातारे होते.अभ्यास,वेगवेगळे क्लास ,वेगवेगळ्या स्पर्धात त्याचे बाल्य करपतेआणि तारुण्य कोमेजते,उमलायच्या,फुलायच्या वयातच त्यांचे निर्माल्य होते.

बदललेली सामाजिक स्थिती,अत्याधुनिक मनोरंजनाची साधने,मोबाईल यामुळं ७०%तरुणाई भरकटत चालली आहे म्हणलं तरी वावगे ठरणार नाही.पूर्वी घरात पाच पन्नास माणसे असत त्यामुळं मोठ्यांच्या वागण्या बोलण्यातील शिस्त,आदर्श, सुसंस्कार आपोआपच मुलांच्या अंगी येत.घरातील सर्वच स्त्रियांचे सर्व मुलांकडे लक्ष असायचं,त्यामुळं मुलं सुरक्षित वातावरणात वाढत,त्यांना आपसूकच कुटुंबाचा भक्कम आधार मिळायचा,आणि सगळे प्रेमळ पालकही.आज उलट चित्र आहे,घरा घरात कलह वाढत आहे,संयुक्त कुटुंबाकडून  विभक्ता कुटुंबाकडे आपण गेलोच आहोत पण भविष्यात आई किंवा वडील यापैकी एकच पालक मुलाला असेल की काय अशी भीती निर्माण झाली आहे.मुले दिशाहीन होत आहेत.नैराश्य आणि गुन्हेगारी वाढत आहे,चंगळवाद फोपावल्याने सामाजिक अस्थिरता आणि विषमता वाढीस लागली आहे.

पूर्वी स्त्रिया अर्थार्जन करत नसत त्यामुळं चोवीस तास आपल्या मुलांसोबत असल्याने मुलांच्या सवयी,मुलांचे खेळ,आरोग्य,अभ्यास याकडे लक्ष देता येत असे.आज अर्थार्जन ही काळाची गरज आहे,गरज असली न नसली तरीही स्त्रिया अर्थार्जन करत आहेत आणि अर्थातच मुलांकडे दुर्लक्ष होते,बरेचदा आयुष्यात पैसा खूप असतो पण मुले बिघडलेली असतात,वाया गेलेली असतात.याउलट मध्यम आर्थिक स्थिती असणारे,किंवा ग्रामीण भागातील मुले तुलनेत जास्त समंजस आणि जबाबदार असतात.

असो, ज्यावेळी देशातील स्त्री पुरुष दोन्ही अर्थार्जनासाठी बाहेर पडतात,तेव्हा सरकारने बालकांची काळजी घेणारी व्यवस्था उभी करायला हवी असते,कामाच्या ठिकाणीच त्या त्या कम्पन्यांनी सुद्धा अशा व्यवस्था उभ्या करायला हव्यात.अण्णाभाऊ साठेंच्या एका लेखात मी वाचलं होतं की एक रशियन माता रेल्वेतून प्रवास करत आहे आणि तिचे बाळ (अर्थातच भावी रशियन नागरिक) तिथंच पाळण्यात शांतपणे झोपले आहे.)समाजातील अगदी खालच्या स्तरापासून वरच्या स्तरावरील मुलांची अशी सोय होणे गरजेचे आहे. तिथल्या सरकारने सरकारने तिथल्या रेल्वेतून अशी सोय केली आहे.असे चित्र मला आपल्या देशात कुठं दिसलं नाही,आता या चार दोन वर्षात झाली असेल सोय तर माहीत नाही.

काळाची चाके चालत राहतात कधी हळू तर कधी जलद पण फिरून पुन्हा तिथंच कधीतरी येतो त्याला बराच कालावधी लागतो पण या कालावधीत बरेच काही निसटते, हरवते. आज आपल्या देशातील कुमारांची/कुमारीची,तरुण/तरुणींची स्थिती खरेच चिंतनीय आहे.

आपली मुले प्रथम आपली संपत्ती आहे त्यानंतर समाजाची व पर्यायाने देशाची,तिची जपणूक व्यवस्थित रित्या झाली तरच एका सशक्त राष्ट्राची निर्मिती होईल असे मला तरी प्रामाणिकपणे वाटते.

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares