सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “स्वतःला ओळखा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट☆
कित्येक दिवसांपासून रोज मनाशी ठरवित होते,आज तरी नक्की करु करु म्हणत साचल्या गेलेली कामं करायचीच. शेवटी ह्या एक दोन दिवसात मनावर घेऊन जुन्या भाषेत पदर खोचला,कंबर कसली वगैरे वगैरे…….
शेवटी एकदाचा अत्यावश्यक कामाला मुहूर्त निघाला. कधीची दारावर नेमप्लेट नव्हती, ती अगदी फुरसत काढून करायला टाकली, छान हव्वी होती तशी मनासारखी नेमप्लेट बसवल्याने एकदम दिल खुश.
खरंच म्हंटली तर अगदी लहानशी साधीसुधी पण अत्यावश्यक गोष्ट, नेमप्लेट म्हणजे नावाची पाटी. आपल्या घरी पहिल्यांदा येणाऱ्या व्यक्ती, कुरीयर आणणारी व्यक्ती किंवा पोस्टमन ह्या सगळ्यांच्या आणि आपल्या सोयीसाठी हवीच असणारी ही बाब.
नावाची पाटी बघितल्यावर एकदम मनात विचार आला,ही असते आपली ओळख. पण खरंच व्यक्तीचं नाव हीच असते का फक्त त्या व्यक्तीची ओळख ?
व्यक्ती ची ओळख ही नावामुळे तर होते पण त्याचबरोबर त्याच्या दिसण्यावरुन, वागण्याबोलण्या वरुन, त्याच्या एकूण व्यक्तीमत्वावरुन,स्वभावावरुन,कर्मावरुन पण ओळख ही ठरतेच. अगदी सुरवातीला जन्माला आल्याबरोबर आपल्याला नाव आडनाव मिळतं ही आपली पहिली ओळख. स्त्रियांना लग्नानंतर पण आडनाव बदलून अजून एकदा नावावरून ओळख मिळते.
माणसाला ओळख त्याच्या हुशारीवरुंन, कर्तबगारीवरुन,सफलतेवरुन वा यशस्वी झाल्यावर पण मिळते.
व्यक्तीला ओळख ही त्याच्या स्वभावावरुन पण मिळते. त्यामुळे व्यक्तीच्या कायम स्मरणात राहणाऱ्या गोष्टी ही त्याची ओळख बनते.
ह्या ओळखीवरच मागेही एकदा एक पोस्ट लिहीली होती.त्यातील काही भाग परत एकदा ह्यात आलायं.
मागे एकदा गौरगोपालदासजींची छान बोधपर क्लिप बघण्यात आली. त्यात त्यांनी उदाहरण देऊन समजावून सांगितले की बहुतांश लोकांची धडपड ही दुसऱ्या सारखे बनण्यासाठी सुरू असते. मान्य आहे प्रत्येकाचे कोणी ना कोणी आयडाँल म्हणजेच आदर्श असतात. ह्या आदर्शवत व्यक्तींच्या व्यक्तीमत्वा मुळे ,सदगुणांमुळे आपल्याला भुरळ पडते आणि आपण आपली सगळी ताकद, एनर्जी ही त्या आदर्शमागे धावण्यात घालवतो आणि शेवटी खरोखरच थकून जातो. आपण त्या व्यक्तीची काँपी करुन संपूर्णतः त्या व्यक्तीसारखे बनण्याच्या नादात आपले कलागुण, आपली ओळख आपली ओरिजनँलिटी घालवून बसतो. बस आपली स्वतःला घडवितांना सगळ्यात मोठी चूक हीच असते.
एकदा असचं सहज झेरॉक्स काढताकाढता सहज लक्षात आलं मूळ प्रतीची काँपी करुन झेरॉक्स कामं तर भागलं पण मूळ प्रतीच्या क्वालिटी ची सर झेरॉक्स ला नाही.
बँकेच्या कामकाजात ग्राहकांची ओळखपत्रे घेणे,त्यांची ओळख पटवून घेणे ही नित्याचीच बाब.पण खरचं ओळखपत्रांवर अवलंबून असलेली एवढीच असते आपली ओळख?, निश्चितच नाही. आपली स्वतःची ओळख ही त्यापलीकडे पण स्वतःला तरी निश्चितच व्हायला हवी.बरेचदा अनूभवांती लक्षात येत व्यक्ती ह्या आपली स्वतःची ओळख सांगतांना आपल्या स्वतःबद्दल कमी बोलून आपली ओळख इतरांना माध्यम बनवून, त्यांचा परिचय देऊन केला जाते.
मुळात प्रत्येक व्यक्ती ही बहुआयामी असते. तिच्यामध्ये अनेक सुप्त गुण दडलेले असतात. फक्त गुणांवर,कौशल्यावर थोडी राख बसलेली असते, ती राख प्रयत्नपूर्वक एकदा का झटकली तर तुमच्यातील कलागुण, वैशिष्ट्य ही ठळकपणे जाणवायला लागतात. स्वतःची ओळख तयार करणं हे फारस कठीण नसतं, फक्त आपण त्याचा इंन्फेरीअर काँम्प्लेक्समुळे बाऊ करतो. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागाल,स्वतः मधील स्व ला प्राधान्य, महत्त्व द्याल.
मला विचाराल तर मी ठामपणे सांगेन मी माझ्या लेखनामुळे फार काही मोठी लेखिका नाही बनू शकणार, पण एक निश्चित मी माझी निराळी आगळीवेगळी लेखनशैली तर निर्माण करूच शकते.
थोडक्यात काय तर तुम्ही इतरांना स्पेस आवर्जून द्या पण त्याचबरोबर स्वतःमधील स्व ला सुद्धा प्राधान्य द्या.तुम्ही जर स्वतः वर प्रेम केलतं तरच जग पण तुम्हाला मान देईल महत्त्व देईल हे नक्की.
© सौ.कल्याणी केळकर बापट
18/12/2022
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈