मराठी साहित्य – विविधा ☆ जगातील पहिले प्रेमपत्र… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

? विविधा ?

☆ जगातील पहिले प्रेमपत्र… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

आजकाल मोबाईलच्या वापरामुळे पत्रलेखन जवळपास थांबल्यासारखेच झाले आहे. पण काही वर्षांपूर्वीचा काळ म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीच्या पत्राची वाट पाहण्याचा काळ होता. पत्र लिहिणाऱ्याच्या भावना पत्रात उतरत आणि ते ज्याला लिहिले आहे त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचत. म्हणून तर प्रिय व्यक्तीची पत्रे जपून ठेवली जात. त्यांची पुन्हा पुन्हा पारायणे होत असत. हिंदी चित्रपटात तर या गोष्टीचा उपयोग करून गीतलेखकांनी अनेक गाणी लिहिली आहेत. आणि ती कमालीची लोकप्रिय होऊन लोकांच्या ओठांवर आली. नायिकेने नायकाला प्रेमपत्र लिहावे, पोस्टमन हा त्यांच्यामधला पत्र पोहोचवणारा दूत. कधी कधी नायिकेला पत्र लिहिता येत नाही. मग ती पोस्टमनलाच सांगते

खत लिख दे सावरियाके के नाम बाबू

कोरे कागज पे लिख दे सलाम बाबू

वो जान जायेंगे, पहचान जायेंगे.

त्या नायिकेला एवढा विश्वास आहे की आपले फक्त नाव असलेले पत्र त्या प्रियकराला मिळाले की बाकी सगळं तो समजून जाईल.

पण तुम्हाला माहित आहे का की रुख्मिणीने श्रीकृष्णाला लिहिलेले पत्र हे जगातील पहिले प्रेमपत्र असावे. किती बुद्धिमान म्हणावी रुख्मिणी ! आणि तिच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमीच. मी असे का म्हणतो त्याला कारण म्हणजे त्या वेळची परिस्थिती. रुख्मिणी ही विदर्भराजा भीमकाची सुंदर आणि बुद्धिमान कन्या. लहानपणापासूनच श्रीकृष्णाच्या पराक्रमाच्या कथा तिच्या कानावर आल्या होत्या. आणि त्या ‘ सावळ्या सुंदरास ‘ तिने मनानेच वरले होते. पण तिचा भाऊ रुख्मी हा श्रीकृष्णाचा द्वेष करणारा होता. त्याच्या मनात तिचा विवाह शिशुपालाशी व्हावा अशी इच्छा होती. शिशुपाल हा सुद्धा श्रीकृष्णाचा द्वेष करणारा होता. रुख्मीने आपल्या बहिणीवर म्हणजे रुख्मिणीवर अनेक बंधने लादली होती. ती तिच्या स्वतःच्या मर्जीने कोठेही जाऊ शकत नव्हती. अशा वेळी तिच्या हातात काहीही नव्हते. तिचे आईवडील सुद्धा रुख्मीपुढे हतबल झाले होते.

त्यामुळे अशा परिस्थितीत तिच्या डोक्यात श्रीकृष्णाला पत्र लिहिण्याचा विचार येणे ही गोष्टच तिच्या बुद्धिमत्तेची निदर्शक आहे. पत्र लिहिणे आणि ते श्रीकृष्णाला पाठवणे आणि नंतर त्याच्यासोबत पळून जाऊन विवाह करण्याचे धाडस दाखवणे या तिच्या कृतीचे, गुणांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

आपल्या पत्रात  ती श्रीकृष्णाला म्हणते

” हे भुवनसुंदरा, जेव्हापासून मी तुझे गुण ऐकले आहेत, तेव्हापासून मी तुझ्या प्रेमात पडले आहे. आणि तुला समर्पित झाले आहे. तू माझे हरण करून घेऊन जा. तुझ्यासारख्या सिंहाचा भाग शिशुपालरूपी कोल्हा नेतो आहे असे कदापि होऊ नये.

साधना, संस्कार, प्रीती, भक्ती इत्यादि धन घेऊन मी येईन. मी सतत तुझी पूजा करून काही पुण्यकृत्ये केली आहेत, आणि मनाने तुला वरले आहे. आता प्रत्यक्षात माझा स्वीकार कर.

अंबेच्या देवळात मी गौरीपूजेसाठी जाईन, तेव्हा तू माझे मंदिरातून हरण कर. आणि पराक्रमाने शिशुपालादिकांना हरवून राक्षसविधीने माझे पाणिग्रहण कर.

तू आला नाहीस तर मी समजेन की माझ्या साधनेत काही कमतरता राहिली असेल. तू मला या जन्मी लाभला नाहीस तर मी प्राणत्याग करीन, पण जन्मोजन्मी तुझी वाट पाहीन, आणि अंती तुझीच होईन !!”

या पत्रातला मला आवडलेले वाक्य म्हणजे ती श्रीकृष्णाला म्हणते , ” साधना, संस्कार, प्रीती, भक्ती इ धन घेऊन मी येईन. ” किती सुंदर विचार. आणि लाख मोलाचे धन. पैसा नाही, हुंडा नाही, वस्तू नाही. तर साधना, संस्कार, प्रीती आणि भक्ती या सुंदर भावना हेच धन. आणि तेच ती घेऊन येते. आणि श्रीकृष्ण जिचा सखा आहे, पती आहे तिला आणखी काय हवे ? आणि त्या श्यामसुंदराला सुद्धा कशाची अपेक्षा असते ? तुमची साधना महत्वाची. संस्कार महत्वाचे. प्रीती आणि भक्ती महत्वाची. तुम्ही भक्तिभावाने आपले हृदय त्याला अर्पण करा, म्हणजे तो रुख्मिणीप्रमाणे तुमचेही हरण करील. तुम्ही त्याचे होऊन जाल. हाच तर या पत्रातला आपल्या सगळ्यांसाठी संदेश आहे,  नाही का?

©️ विश्वास देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दत्त दर्शना जायाचं,जायाचं… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ दत्त दर्शना जायाचं,जायाचं… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

हवीहवीशी वाटणारी थंडी आणि उत्साहवर्धक वातावरण ही डिसेंबर ची खास वैशिष्ट्य. डिसेंबर मध्ये रानमेव्याची सुद्धा लयलूट असते . त्यामुळे भाजीपाला आणि  फळफळावळ ह्यांची पण चंगळ असल्याने हा काळ खूप संपन्न वाटतो. बोरं,गाजरं,हरबरा, ऊस,वाटाणा, वाल,अंबाडीची बोंड,भरताची वांगी ह्यांनी जेवणाचे चार घास जरा जास्तच जातात आणि मग ह्या अशा सकस घरी केलेल्या पदार्थांवर ताव मारल्याने जरा थोडसं वजन हे वाढतंच आणि त्या वाढत्या वजनाचा   दोष मात्र आपल्या माथी येतो.बरं एकदा हिवाळ्यात वाढलेलं वजन उन्हाळ्यात कमी होईल अस म्हणता का, तर अजिबात तसूभरही वजन कमी होण्याचं मुळी नावच घेत नाही.

डिसेंबर महिना अजून एका गोष्टीसाठी आवडतो.  दत्तजयंती ! उत्साहात साजरा होणारा एक उत्सव. जसजसं आयुष्य पुढेपुढे जातं तसतसे नवनवीन अनुभव गाठीशी लागत असतात. काही भले तर काही बुरे. भले अनुभव लक्षात ठेवावे आणि बुरे अनुभव तेथेच विसरून सोडून द्यावे. दरवर्षी संपूर्ण सप्ताह दत्तमंदिरात जाणे व्हायचे नाही फक्त दत्तजयंती ला मात्र न चुकता मंदिरात जायचे. ह्यावर्षी मात्र हा संपूर्ण सप्ताह दत्तमंदिरात जावसं आपणहून वाटलं. त्यामुळे रात्री बँकेतून आल्यावर दत्तगुरुंच्या दर्शनासाठी दररोज झिरी येथील दत्तमंदिरात जायचे. दिवसभराचा सगळा शीण,मरगळ ह्या दर्शनाने कुठल्याकुठे गायब व्हायची.त्या मंदिराच्या शांत,पवित्र वातावरणाच्या परिसरात रात्री भक्तीसंगीताचे सुमधुर सूर कानात साठवत दोन घटका तेथे टेकल्यानंतर एका अतीव शांत, समाधानी वृत्तीची अनुभूती मिळायची. 

ह्यावेळी दररोज झिरी येथील दत्तमंदिरात काही काळ घालवतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. दत्ततत्वाने भारलेल्या परिसरात आपण वास्तव्य करतांना आपोआप एक प्रकारचा  अलिप्तपणा,निर्मोही वृत्ती मनात ठसायला लागते. मोह,लालसा काही क्षण का होईना मनातून हद्दपार झाल्यागत वाटतं.जणू कमळाच्या पानावरील दवबिंदू आपल्यात वास करीत असल्याचा अनुभव येतो. जसं कमळा च्या पानावरील थेंबाच अस्तित्व तर असतं पण तो थेंब मात्र कुठल्याही गोष्टी ला न चिकटता अलिप्त होऊन जगतो.

ह्या  महिन्यात बहुतेकांचे आराध्य दैवत, श्रद्धास्थान असलेल्या श्री.दत्तगुरुंची जयंती.मार्गशीर्ष पोर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर श्री दत्तगुरुंचा जन्म झाला. आपले प्रमुख चार अवतारी दैवत असलेल्या दैवतांपैकी श्री दत्तगुरुंचा जन्म संध्याकाळी सहाचा तर शक्तीचे दैवत मारुतीरायांचा जन्म पहाटे सहाचा, श्रीरामचंद्रांचा जन्म दुपारी बारा तर कृष्ण जन्म रात्री बाराला साजरा केल्या जातो.

दत्तजयंती ला “दत्ततत्व”हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने अधिक कार्यरत असते.म्हणून ह्या दिवशी दत्तगुरुंची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्वाचा अधिकाधिक लाभ मिळतो अशी आख्यायिका आहे.दत्तात्रयांच्या हातातील जपमाळ ब्रम्हदेवाचे शंखचक्र श्री विष्णूंचे,तर त्रिशूळ डमरू हे भगवान शंकराचे प्रतीक समजल्या जातं.दत्तजन्माच्या सात दिवस आधीपासूनच गुरुचरीत्राचे पारायण करायला सुरवात केली जाते.

श्री दत्तगुरुंच्या प्रमुख अवतारांपैकी पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ,दुसरा अवतार नृसिंह सरस्वती तर तिसरा अवतार श्री स्वामी समर्थांचा मानला जातो.

आपल्या भागातील जागृत देवस्थांनां विषयी आपल्या मनात काकणभर श्रद्धा जरा जास्तच असते त्यामुळे मला अमरावती जवळील कारंजा आणि झिरी ही दोन्ही ठिकाणं जरा जास्तच जवळची आपली वाटतात.

बडने-या जवळच दोन किमी. वर “झिरी”नावाचे दत्तगुरुंचे जागृत देवस्थान आहे. काही ठिकाणं,काही स्थानचं अशी असतात की प्रत्यक्ष परमेश्वर तेथे वास करीत असतील असं आपल्याला मनोमन जाणवतं.झिरी येथील पवित्रता परमेश्वराच्या अस्तित्वाची ग्वाही देत निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं झिरीचे दत्तमंदिर हे मानसिक स्वस्थता, शांतता,तृप्ती, व समाधान देणा-या स्थानांपैकीच एक.ह्या मंदिरातील शांत,हसरी,तेजस्वी मुर्ती आपल्याला सकारात्मक ऊर्जा, संकटातही तारुन नेणारे पाठबळ आणि कितीही संपन्नता असली तरी जमिनीवर दोन पाय घट्ट रोवण्यासाठी आवश्यक असलेली थोडी विरक्ती शिकविते.ह्या मंदिराजवळच एक भव्य असे श्रीराममंदिरही आहे.दोन्ही मंदिरांचा परिसर हा जवळपास सव्वाशे ते दिडशे वयाच्या वटवृक्षांनी घेरलेला आहे. हे धीरगंभीर वटवृक्ष आणि त्याच्या पारंब्या आपल्याला चांगल्या सकारात्मक गोष्टी ह्या चिरंतर वा शाश्वत असतात हे शिकवून जातात.

मन ओढ घेऊन दर्शनासाठी जावे असे उद्मेगून वाटणारे दुसरे ठिकाण म्हणजे अमरावती जवळ चाळीस किमीवर असलेले श्री नृसिंह सरस्वतींचे कारजांलाड येथील जागृत देवस्थान. ह्या मंदिरातील प्रसन्न, मानसिक स्थैर्य सकारात्मक ऊर्जा देणारे. ते स्वामींचा प्रत्यक्ष वास असल्याची जाणीव देणारे ते सभागृह.ह्या मंदिरात उपनयन संस्कार करण्यासाठी शुभवेळ

शुभदिवस, शुभघडी हे काहीही बघण्याची गरजच नसते असा समज,अशी श्रद्धा आहे.स्वामींच्या नजरेच्या समोर झालेले उपनयन संस्कार आयुष्यात खूपकाही देऊन जातात असा ब-याच भक्तांचा अनुभव आणि श्रद्धा आहे.

दत्तजयंती च्या निमीत्ताने झिरीला दर्शनासाठी गेल्यावर मंदिराच्या पवित्र वातावरणात आपल्याला आलेले अनुभव आठवतात, आस्तिकता जागृत होते आणि आपोआपच त्याची महती आपल्याला अजून पटायला लागते.आणि ह्या सगळ्याचा परिणाम आपली कार्यक्षमता, सकारात्मकता, उत्साह वाढून आपल्यात चुकून शिरलेल्या नकारात्मकतेला पिटाळून लावण्यात होतो.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पंढरपूर — एक शाश्वत धाम… ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

? विविधा ? 

☆ पंढरपूर — एक शाश्वत धाम… ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆ 

पंढरपूर तीर्थक्षेत्र सर्वांना ज्ञात आहे. ते एक पवित्र धाम तर आहेच.पण ते शाश्वत धाम आहे. प्रलय कालात सुद्धा धाम नष्ट होत नाहीत. त्यापैकी पंढरपूर एक आहे.चंद्रभागा नदीला पूर्ण पंढरपूर बुडून जाईल इतके पूर अनेक वेळा आले.तरीही पंढरपूर होते तसेच आहे. आता उजनी धरणामुळे जास्तीचे पाणी रोखले जाते पण धरणात पाणी जास्त प्रमाणात असेल तर नदीपात्रात सोडले जाते.तेव्हा पंढरपूरला अजूनही वेढा पडतोच.

पंढरपूरचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण देवाचे चरणस्पर्श करू शकतो. ते अन्यत्र कुठेही नाही. कित्येक संतांना देवाने आलिंगन दिले होते यांचेही पुरावे अभंगात व इतर संतसाहित्यात आहेत. म्हणजे उराउरी भेट, आणि चरणस्पर्श फक्त श्री विठ्ठल रखुमाईलाच भक्त करू शकतात. मुख्य गाभाऱ्याच्या समोर गरूडखांब आहे. त्याला आलिंगन देण्याची प्रथा आजही आहे.

पंढरपूर जवळ पूर्वी दिंडीर नावाचा राक्षस मातला होता. देवाने त्याला ठार केलं. पण देवाच्या हातून मरण आले म्हणून  स्वतःला धन्य समजून त्याने देवाला वरदान मागितले की या क्षेत्राला माझ्या नावाने ओळखले जावे. म्हणून पंढरपूर परिसर दिंडीरवन या नावाने प्रसिद्ध होता. देवावर रूसून रूक्मिणी माता याच दिंडीरवनात येऊन राहिली.अशा आख्यायिका प्रसिद्ध आहेत.

रूक्मिणीच्या पाठोपाठ देव दिंडीरवनात आले. ( विठ्ठल हे श्रीकृष्णाचेच रूप मानले जाते.) इतर ठिकाणी भक्त भगवंताच्या भेटीला जातात. पण पंढरपूरला भगवंत भक्तांची वाट पहात विटेवर उभा राहिला आहे.कटीवरती हात आणि समचरण हे इथे देवाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्यक्ष संत नामदेव महाराजांना देवाने दृष्टांत दिला होता की मी इथे तुमच्यास्तव उभा आहे. आषाढी , कार्तिकी एकादशीला तरी  मला भक्त भेटावेत.

इतर सर्वत्र देव अलंकारविभूषित व शस्त्रे धारण केलेले दिसतात.पण देवशयनी एकादशीला देव गोपवेषात असतात. विनाअलंकृत आणि तुळशीमाळा धारण केलेले देवाचे स्वरूप असते.

पंढरपुरातली ही विठ्ठल मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात की, जो ही मूर्ती घडविलेली आहे असे म्हणेल त्याला पाप लागेल. संत कधीच कुणाला दूषणे देत नाहीत. तरीही तुकाराम महाराज असे म्हणतात कारण ही मूर्ती खरोखरच स्वयंभू आहे.

त्या काळात लोक इतके गरीब होते की त्यांनाच खायला अन्न नसायचे. मग ते देवाला नैवेद्य कशाचा दाखविणार ? पंढरपुरात लोक ताकात पीठ कालवून तो नैवेद्य देवाला दाखवीत असत.अशी आख्यायिका आहे. पश्चिम द्वारा जवळ एका गल्लीत हे ताकपिठे विठोबा मंदिर आजही अस्तित्वात आहे. दहा वर्षापूर्वी सरकारी निकालानुसार बडवे आणि उत्पात यांचे देवाच्या पूजेचे व उत्पन्नाचे अधिकार काढून घेतले गेले. त्यानंतर पंढरपूरला बडवे मंडळींनी विठोबाचे एक मंदिर दुसऱ्या ठिकाणी बांधले आहे. तसेच उत्पात मंडळींनी रूक्मिणी मातेचे मंदिर बांधले आहे.

विठ्ठल हे श्रीकृष्णाचेच रूप मानले जाते कारण पंढरपूरला त्याच मंदिरात रूक्मिणी मातेचे मंदिर आहे. त्याच्या जवळच देवाच्या पत्नी राही, सत्यभामा यांच्या मूर्ती असलेले गाभारे देखील आहेत. श्रीविष्णूंनी वेंकटेश अवतार  घेतला,ते वेंकटेश मंदिर ही मुख्य मंदिराच्या आवारात आहे.इतरही अनेक देव देवतांचे दर्शन तिथे घडते.

गोपाळपूर येथे दोन्ही वाऱ्या झाल्यानंतर गोपाळकाला होतो. तिथे श्रीकृष्ण मंदिर आहे. जवळच विष्णुपद मंदिर आहे. देव प्रथम पंढरपूरला आले, ते विष्णुपद मंदिर परिसरात आले. त्यांचे पाऊल इथे एका दगडावर उमटले आहे. चंद्रभागा नदीच्या पात्रात हे मंदिर आहे. दर मार्गशीर्ष महिन्यात देव इथेच येऊन राहतात,असे मानतात. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात लोक होडीतून किंवा चालत इकडे दर्शनासाठी आणि सहलीसाठी येतात.मार्गशीर्ष अमावस्येला पालखीतून मिरवणूकीने ,वाजत गाजत देवांच्या पादुका पुन्हा मुख्य मंदिरात आणल्या जातात.

चंद्रभागा नदी हीच गंगा नदी आहे .असे म्हटले जाते. विष्णुपदाजवळ चंद्रभागेला पुष्पावती नावाची नदी येऊन मिळते. तीच यमुना आहे असेही मानतात.

संत नामदेवांनी सांगितलेच आहे की

जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर ||

असे आहे हे शाश्वत धाम.

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – नवकोट नारायणाचे सँडविच ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 😂 चं म त ग ! 😅 🥪 नवकोट नारायणाचे सँडविच ! 🥪 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“घ्या पंत, तुम्हाला आवडत म्हणून कोपऱ्यावरच्या सँडविचवाल्या कडून मस्त बटर आणि चटणी जादा मारके असं सँडविच आणले आहे, घ्या खाऊन घ्या.”

“मी सँडविच सोडल आहे.”

“काय झालं, तुमच्या नात्यात कोणी गेल…. “

“काहीतरी बोलू नकोस.  माझे सगळे नातेवाईक अगदी ठणठणीत आहेत.”

“नाही, तुम्ही सँडविच सोडल असं म्हणालात आणि कोणीतरी गेल्यावरच त्याच्या आवडीचा एक…… “

“तू मला अक्कल शिकवू नकोस. तुला एकदा सांगितले ना की माझे सगळे नातेवाईक ठणठणीत आहेत म्हणून.”

“मग सँडविच सोडल असं का म्हणालात आणि कधी पासून सोडलंत ?”

“आत्ता पासून.”

“पण मग सँडविच सोडायला काही वेगळे कारण घडले का ?”

“होय, अरे ती बातमी वाचली आणि मी या पुढे सँडविचला आजन्म हात लावणार नाही अशी बटर आणि चटणीच्या देखत शपथ घेतली.”

“कोणती बातमी ?”

“अरे भारतीय वंशाच्या एका नवकोट नारायणाने ज्या बँकेत तो काम करतो, त्याच बँकेच्या कॅन्टीन मधून सॅन्डविच चोरले आणि…. “

“काय सांगता काय पंत ? आणि नवकोट नारायण हे…. “

“त्याचे नांव अजिबात नाही.  त्याला वर्षाला ती बँके नऊ कोटी वीस लाख रुपये पगार देत होती म्हणून मी त्याला नवकोट नारायण म्हटले. त्याचे खरे नांव…. “

“बापरे, काय सांगता काय पंत? ही बातमी तुम्हाला…. “

“कोणी दिली असच ना ?  अरे नेट बिट बघतोस ना? मग तुला अजून ही बातमी कळली नाही म्हणजे नवलच आहे.  अरे खरं तर तूच मला ही बातमी….. “

“अहो वाचलीच नाही तर काय सांगणार आणि तुम्ही त्याला पगार मिळायचा असं का म्हणालात …… “

“अरे बँकेने त्याला ताबडतोब निलंबित केले आहे म्हणून पगार मिळायचा असे मी म्हटले.”

“माझा अजूनही या बातमीवर विश्वास बसत नाहीये.  पण तुम्ही म्हणता…. “

“मी म्हणतो म्हणजे काय? मी माझ्या मनांत येतील तशा बातम्या तयार करतो, असे तर तुला… “

“नाही पंत, पण तुम्ही मला खरं खरं अगदी मनापासून सांगा, तुमचा या बातमीवर, वाचल्या वाचल्या लगेच विश्वास बसला, का तुमच्या मनांत शंकेची पाल चुकचुकली ?”

“अरे सुरवातीला खरच वाटेना, पण बातमी नावानिशी, अगदी बँकेचे नांव, तो कुठल्या पदावर होता, आधी कुठल्या बँकेत किती वर्ष होता, हा सगळा तपशील वाचल्यावर मला…. “

“विश्वास ठेवणे भाग पडले, असच ना?”

“हो, नाहीतर त्या नवकोट नारायणाने अब्रुनुकसानीचा दावा नसता का ठोकला त्या बातमी देणाऱ्यावर ?”

“पंत, पण मी तुम्हाला सांगतो हा गडी त्या आरोपातून सहीसलामत सुटणार बघा.”

“हे कसं काय बुवा तू छातीठोकपणे सांगतोस ?”

“सांगतो, सांगतो.  काही काही लोक खरच सज्जन असतात,  पण त्यांना आपल्या मनांत नसतांना, उगीचच एखाद्या गोष्टीची चोरी करावी असे वाटते आणि ते आपल्याच नकळत ती चोरी करतात त्याला….. “

“क्लेप्टोमनिया म्हणतात हे मला ठाऊक आहे रे, पण अशी  गोष्ट खरच अस्तित्वात आहे यावरच माझा विश्वास नाही, त्याचे काय ?”

“तुम्हाला मेगन फॉक्स ही हाँलिवुडची प्रसिद्ध नटी माहित्ये ?”

“इथे मला बॉलिवूडच्या नट नट्यांची नावे माहित नाहीत, तिथे तू हॉलिवूडच्या त्या मेगन का फेगन च्या काय गोष्टी करतोयस !”

“बर, बर कळलं.  तर या मेगनला पण तिकडे अनेक वेळा असे हस्तलाघव करतांना कितीतरी मॉलमधे रंगे हात पकडले होते.  एव्हढेच कशाला, वॉलमार्ट या जगप्रसिद्ध स्टोरने तर तिच्यावर आजन्म बंदी घातली आहे, आता बोला.”

“मी काय बोलणार, पण ही बंदी का आणि कशासाठी ?”

“अहो या अब्जाधीश बयेला त्या मार्ट मधे लीप ग्लॉसची चोरी करतांना पकडले, ज्याची किंमत होती फक्त सात डॉलर.”

“काय सांगतोस काय ?”

“अहो पंत खरे तेच सांगतोय. पण नंतर ती या रोगाची शिकार आहे असा बचाव तिच्या वकिलांनी कोर्टात केला होता तिच्या सुटकेसाठी.”

“कळलं, कळलं मला तुला काय म्हणायचे आहे ते.  दे आता ते सँडविच मला. “

“पण पंत तुम्ही तर सँडविच सोडल…. “

“होत आत्ता आत्ता पर्यंत, पण  आत्ताचे तुझे बोलणे ऐकून मी ते सँडविच कधी एकदा फस्त करतोय असे झाले आहे मला.”

 

© प्रमोद वामन वर्तक

स्थळ – बेडॉक रिझरवायर, सिंगापूर.

मो – 9892561086, (सिंगापूर)+6594708959

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग -४७ – सर्वधर्म परिषद उद्घाटन ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग -४७ – सर्वधर्म परिषद उद्घाटन☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

‘सर्वधर्मपरिषद’ ही मानवजातीच्या धार्मिक इतिहासातली सर्वात महत्वाची घटना. ही परिषद म्हणजे आपल्याला वाटेल की नेहमी संस्थांच्या होतात तशीच काहीशी ही परिषद असणार. शिकागोला सुरूवातीलाच स्वामी विवेकानंद यांनी ज्या भव्य औद्योगिक प्रदर्शनला भेट दिली होती, ते प्रदर्शन एका महत्वाच्या निमित्तानं भरवलं गेलं होतं. त्याला पार्श्वभूमी आहे. कोलंबस अमेरिकेत उतरलेल्या घटनेला चारशे वर्ष पूर्ण झाली म्हणून अमेरिकेत प्रचंड मोठा महोत्सव होत होता. त्या निमित्ताने जागतिक पातळीवरील अनेक परिषदा आणि प्रदर्शने आयोजित केली गेली होती. हे औद्योगिक प्रदर्शन त्याचाच एक भाग होता. म्हणून यात मनुष्याच्या भौतिक क्षेत्रातली प्रगती आणि अमेरिकेबरोबरच जगातल्या सुधारलेल्या तसेच, अनेक रानटी समाजाचे दर्शन घडवणार्‍या माणसांचे पूर्ण पुतळे, त्यांचे पोशाख, त्यांची अवजारे व हत्यारे, त्यांची खाद्यसंस्कृती, याची माहितीपर मांडणी केली होती. 

त्याचप्रमाणे मानवाने केलेली बौद्धिक ज्ञान शाखांची आणि विचारांची वाटचाल याचाही विचार व्हायला पाहिजे असे आयोजकांच्या लक्षात आले. म्हणून १५ ते २८ ऑक्टोबर १८९३ अशा पाच महिन्यांमध्ये वीस परिषदांचं नियोजन करण्यात आल होतं .त्यात अर्थशास्त्र, संगीत, वृत्तपत्रांचे कार्य, महिलांची प्रगती, औषधे आणि शस्त्रक्रिया, व्यापार आणि अर्थव्यवहार, राजव्यवहार आणि कायदा सुधारणा, यांच्या परिषदा झाल्या.

या परिषदेत  जगातल्या त्या त्या विषयांचे तज्ञ सहभागी झाले होते. पण मानवाचे वैचारिक क्षेत्र याची उणीव राहिली असे आयोजकांना वाटून, त्यांनी धर्म आणि तत्वज्ञान या विषयांचे जगातले तज्ञ एका व्यासपीठावर येऊन वैचारिक देवाण घेवाण करतील  तर ते तुलनेने व्यापक ठरेल.या दिशेने विचार सुरू झाला . प्रसिद्ध वकील, विचारवंत चार्ल्स कॅरोल बॉनी यांना ही कल्पना सुचली. सर्वांनी ती उचलून धरली.

यासाठी १८९० ला एक समिति स्थापन करण्यात आली. अध्यक्षपद अर्थातच बोनी यांच्याकडे आले. जगात असणारे धर्मपीठं, पंथ, संप्रदाय यांची माहिती गोळा करण्यात आली. सर्व प्रमुखांना पत्रे आणि पत्रके पाठवली. या अडीच वर्षांच्या काळात दहा हजार पत्र आणि चाळीस हजार परिपत्रके पाठवण्यात आली. जगभरात सल्लागार समित्या स्थापन करण्यात आल्या. त्याच तीन हजार समित्या होत्या. या आकडेवारीवरून आपल्याला ही परिषद किती मोठ्या प्रमाणावर होती ते लक्षात येत.                      

आपला भारत देश यात असणारच, होय होता. प्रचंड भारतातली विविधता, धर्म पंथ संप्रदाय पण कितीतरी. तरी भारताला एकच समिती होती. या समितीत सामाजिक सुधारणा पुरस्कर्ते आणि रूढी व परंपरांना विरोध करणारे, मद्रासच्या हिंदू वृत्तपत्राचे संपादक जी एस अय्यर, ब्राह्म समाजाचे मुंबईचे बी बी नगरकर व  कलकत्त्याचे प्रतापचंद्र मुजूमदार हे होते. इथे हे लक्षात येते की एव्हढी मोठी धर्म परिषद पद्धतशिरपणे आखणी करून केलेली होती.

नियोजन करताना जगातल्या सर्व धर्माच्या प्रवक्त्यांना एकत्र आणणे,सर्व धर्मात मानी असलेली आणि शिकवली जाणारी समान तत्वे लक्षात घेऊन त्यावर अभ्यासकांची व्याख्याने ठेवणे, कोणत्या धर्माचे काय वैशिष्ट्य आहे त्याचा शोध घेणे, एका धर्म कडून दुसर्‍या धर्माला काय घेता येईल अशा गोष्टी शोधून आणि त्याच बरोबर शिक्षण ,श्रम, संपत्ति, दारिद्र्य मद्यपान निषेध अशा चालू असणार्‍या समस्या सोडवण्यासाठी मार्ग सुचविणे जगत शांतता नांदण्यासाठी ,राष्ट्रीय बंधुभावाच्या आधारे सर्वांना एकत्र आणणे या उद्देशाने ही परिषद भरवली जात होती. यामुळे परस्पर सामंजस्य वाढेल. समाज एकमेकांच्या जवळ येतील, असे त्यांना वाटत होते. खरच या परिषदेचा हेतु किती छान व उपयोगी होता. पण यावर उलट सुलट प्रतिक्रिया येत राहिल्या.   

कोणाला वाटत होते, ही परिषद म्हणजे ख्रिस्त धर्मविरोधी कट आहे, तर कोणी म्हणे ख्रिस्त धर्माच्या तत्वांना हरताळ फासला जाईल, कोणी म्हणे जगात सर्वश्रेष्ठ धर्म ख्रिस्त धर्म आहे, मग इतर धर्मांबरोबर परिषद कशाला हवी? अशी अनेक मते होती. मात्र संयोजकांचा हेतु चांगलाच होता. जगातली जी जी राष्ट्र समृद्ध प्रगत आणि सामर्थ्यसंपन्न होती  ती राष्ट्र ख्रिस्त धर्मियांची होती. पण धर्माचे श्रेष्ठत्व नुसते भौतिक प्रगतीवर आणि समृद्धीवर न ठरता माणसाच्या मनाचे सुसंस्कृत, सदाचरणाने व्यापक असलेले सामर्थ्य यावर पण असते, तेच त्याचे सामर्थ्य असते.असा विचार यामागे होता. त्यामुळे काही विरोध असतांनाही परिषद होऊ घातली होती.

ही सर्वधर्म परिषद शिकागो मधील आर्ट इंस्टिट्यूट च्या भव्य अशा इमारतीत भरली होती. कोलंबस आणि वॉशिंग्टन ही दोन भव्य सभागृह या इमारतीत होती. आजूबाजूला तीस लहान मोठ्या खोल्या होत्या. इथे सत्र दिवस परिषदेचे काम चालले होते. विषया नुसार गट पाडण्यात आले होते.कोलंबस सभगृहात चार हजार जण मावतील अशी आसन व्यवस्था होती. तर मोकळ्या जागेत एक हजार प्रेक्षक उभे राहू शकत होते एव्हढी जागा होती. याशिवाय उरलेले तेव्हढेच प्रेक्षक शेजारच्या वॉशिंग्टन सभागृहात बसून राहत आणि त्यांच्यासाठी तीन दिवसांनंतर कोलंबस मध्ये होणारा प्रत्येक कार्यक्रम पुन्हा होत असे.

११ सप्टेंबर १८९३ उजाडला. सकाळचे दहा वाजले. आर्ट इंस्टिट्यूट च्या आवारात भल्यामोठ्या घंटेचे दहा टोले वाजले. हे दहा टोले म्हणजे, जगातील दहा धर्माच्या वतीन दिले गेले होते. बोनी यांनी जगातल्या प्रमुख दहा धर्मांची निवड केली होती. हा घंटानाद झाला आणि जगातून आलेले सर्व धर्माचे प्रतींनिधी मिरवणुकीने सभागृहकडे निघाले. या मिरवणुकीत सर्वात पुढे अमेरिकेतील चर्चचे मुख्य पदाधिकारी कार्डिनल गिबन्स आणि परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स कॅरोल बॉनी, त्यामागे कोलंबियन एक्स्पोझिशन च्या महिला अध्यक्षा मिसेस पॉटर पामर व उपाध्यक्षा मिसेस चार्ल्स एच. हेंरोटीन आणि त्यामागे सर्व प्रतींनिधी या क्रमाने मिरवणुकीत सहभागी झाले होते. यातून जागतिक सर्वधर्माचे, अनेकरंगी विविधतेचे दर्शन होत होते.चार ते पाच हजार लोक उपस्थित होते तरी निस्तब्ध शांतता पसरली होती. सर्वांच लक्ष वेधून घेणारे ते दृश्य होतं. सर्वांच्या मनात कुतूहल आणि उत्कंठा होती. मिरवणूक सभागृहात प्रवेशली. सभागृहात पाश्चात्य आणि पौर्वात्य अशा दोन प्रमुख गटात प्रतींनिधींना बसण्याची व्यवस्था केली होती. हे व्यासपीठ पन्नास फुट लांबीचे आणि दहा फुट रुंदीचे होते.

भारतातून आलेले इतर प्रतींनिधी होते, बुद्धधर्माचे धर्मपाल,जैन धर्माचे विरचंद गांधी, ब्राह्म समाजाचे प्रतापचंद्र मुजूमदार व बी. बी. नगरकर, थिओसोफिकल सोसायटीच्या डॉ. अॅनी बेझंट व ज्ञानचंद्र चक्रवर्ती.

सर्वजण आसनास्थ झाले. सभागृहात ऑर्गनचे गंभीर सूर उमटले आणि सर्वांनी उभं राहून प्रार्थना व श्लोक म्हटले. एका सुरात जणू सर्वजण जगन्नियंत्याची प्रार्थना करत होते, हा ऐतिहासिक क्षण होता.

पहिला दिवस उद्घाटन कार्यक्रमाचा होता.सुरूवातीला सर्व धर्म प्रतींनिधींचे स्वागत करणारी भाषणे झाली. एमजी त्याला उत्तर देणारी प्रतिनिधींची आठ भाषणे झाली. विवेकानंद हे सारं वातावरण भारलेल्या मनाने पाहत होते अनुभवत होते. विशाल जंसमूह पद्धतशिरपणे आखलेला एक सुंदर कार्यक्रम त्यांना प्रथमच पाहायला मिळत होता. याचवेळी त्यांना आपल्यावरच्या जबाबदारीची जाणीव झाली होती. नाव पुकारल्या नंतर एकामागून एक वक्त्यांची भाषणे होत होती .उत्तम प्रतिसाद मिळत होता.

विवेकानंद पुरते गोंधळून गेले होते, आत्मविश्वास वाटेना, आपण बोलू शकू का? घसा कोरडा पडला . छाती धडधडत होती. शब्द फुटेना. कारण ते काहीच तयारी करून आले नव्हते. सर्वजण तयारीने आले होते . दोन तीन वेळा नाव पुकारले तर आता नको म्हणून ते उठले नव्हते. ते अनेक वेळा असे बोलले असतांनाही भीती वाटत होती कारण आताचा प्रेक्षक वेगळा होता,

शिकागो शहरातले उच्च विद्याविभूषित श्रोते समोर होते. ख्यातनाम विद्वान होते. विचारवंत होते, पत्रकार होते. सार्‍या जगातून आलेले प्रतींनिधी विद्वान प्रवक्ते तर होतेच, पण ते अधिकृत प्रतिनिधी होते. त्यांच्या मागे त्यांची संस्था उभी होती. आपल्या मागे तर कोणीच नाही. म्हणून विवेकानंद यांचा धीर सुटला होता एका क्षणी. पण अचानक उपनिषदातील ‘अहम ब्रह्मास्मि’ हे वचन मनात चमकले आणि त्याच क्षणी त्यांच्या हृदयात सामर्थ्य संचारले.

दुपारच्या सत्रात चार प्रतिनिधींची भाषणे झाली. आता पुन्हा विवेकानंदांचे नाव पुकारले गेले. तेंव्हा त्यांच्या शेजारी बसलेल्या फ्रेंच प्रतींनिधी जी.बॉनेट मॉवरी त्यांना म्हणाले, ‘आता थांबू नका, बोला! तेंव्हा विवेकानंद आसनावरून उठले, विद्येची देवता सरस्वतीचे मनोमन स्मरण केले. समोरील प्रेक्षकांवरुन दृष्टी फिरवली आणि म्हणाले,

“अमेरिकेतील भगिनींनो आणि बंधुनो” या पाहिल्याच वाक्याला कंठाळ्या बसणारा टाळ्यांचा कडकडाट झाला. अनेकांच्या भाषणाला टाळ्या पडल्या होत्या पण पाहिल्याच संबोधनाला असा प्रतिसाद नव्हता मिळाला, त्यांनाही आश्चर्य वाटले. टाळ्या थांबण्याची वाट पाहत विवेकानंद थांबले होते. शांतता झाल्यावर पुन्हा बोलायला सुरुवात केले. “सुंदर शब्दांमध्ये जे आपले स्वागत केले गेले आहे त्याबद्दलचा आनंद अवर्णनीय आहे. जगातील सर्वात प्राचीन असा हिंदू धर्म, त्यातील सर्वसंगपरित्यागी संन्याशांची परंपरा यांच्या वतीने मी जगातील सर्वात नवीन अशा अमेरिकन राष्ट्राला मन:पूर्वक धन्यवाद देतो”.  त्यांनी परिषदेच्या आयोजकांचे आभार मानले. आधी बोललेल्या वक्त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. प्रत्येक मताबद्दलची सहिष्णुता आणि सर्व जगातील धर्म विचारांच्या बाबतीतली स्वीकारशीलता हे हिंदू धर्माचे वैशिष्ठ्य आहे असे सांगून, पारशी लोक आपल्या जन्मभूमीतून बाहेर फेकले गेल्यानंतर त्यांनी भारताचा आश्रय घेतला. त्यांना निश्चिंत पणे राहण्यासाठी आसरा मिळाला. ही ऐतिहासिक घटना सांगून, अशा देशातून आपण आलो आहोत आणि अशा धर्माचा मी प्रतींनिधी आहे याचा आपल्याला अभिमान वाटतो. सार्‍या जगातून इथे आलेल्या सर्व धर्म प्रतिनिधींच्या स्वागतासाठी आज सकाळी जी घंटा वाजवली गेली, ती सर्व प्रकारच्या धर्म वेडेपणाची मृत्युघंटा ठरेल, लेखणी किंवा तलवार यांच्या सहाय्याने केल्या जाणार्‍या मानवाच्या सर्व प्रकारच्या छळाच्या तो अंतिम क्षण असेल आणि आपआपल्या मार्गाने एकाच ध्येयाच्या दिशेने चाललेल्या मानवांपैकी कोणाविषयीही कोणाचाही कोणत्याही प्रकारचा अनुदार भाव यानंतर शिल्लक राहणार नाही. असा मला पूर्ण विश्वास आहे”. असे पाच मिनिटांचे आपले भाषण विवेकानंदांनी थांबवले. आणि पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.

हे छोट भाषण उत्स्फूर्त आविष्कार होता. विवेकानंदांनी  परिषदेच्या उद्दिष्टालाच स्पर्श केला होता. स्वागतपर भाषणाला उत्तर म्हणून अशी चोवीस भाषणे झाली त्यात विवेकानंदांचे विसावे भाषण होते. अजून खरा विषय तर मांडला जायचा होता. ही परिषद सतरा दिवस चालू होती. रोजतीन तीन तासांची तीन सत्रे होत.

  पहिल्याच दिवशीच्या प्रतिसादाने आणि एव्हढ्या अडचणी पार पाडून झालेल्या सहभागाने विवेकानंद खर तर शिणले होते पण रात्री अंथरुणावर पडल्यावर झोप न लागता डोळ्यासमोर समृद्ध अमेरिका आणि आपली दीन दरिद्री मातृभूमी यामधलं प्रचंड अंतर बघून आपल्या देशबांधवांच्या विषयी त्यांच्या मनात करुणा दाटून आली, अस्वस्थ होऊन डोळ्यातून अश्रु वाहू लागले. सकाळच्या यशानंतर पण ते हुरळून नाही गेले तर, जगन्मातेला त्यांनी म्हटले, “माझ्या देशबांधवांचं अपार दारिद्र्य दूर होणार नसेल तर हे नाव आणि किर्ती घेऊन मला काय करायचं आहे? कोण जाग आणेल भारतातल्या सर्व सामान्य जनतेला? जगन्माते कृपा कर, ते कसं करता येईल याचा मला काही मार्ग दाखव”.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कापणे….एक इव्हेंट… भाग 2 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 ☆ कापणे….एक इव्हेंट… भाग 2 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

 (कारण डोक्यावरच जंगल कंगव्याने केस फिरवण्या इतकं वाढलं रे वाढलं, की लगेच “भावजाला” फर्मान जाई ! ) पुढे चालू…..

सिनेमाचा विषय निघाला म्हणून एक आठवण सांगण्या सारखी आहे, तेव्हढी सांगतो आणि पुढे जातो. “पुरश्या” नावाचा आमचा एक मामा होता. तो म्हसळा या गावी (श्रीवर्धन-दिवेअगार जवळ) शेती वाडी करत असे. त्याच्या सुपारीच्या बागा होत्या आणि तो आपला माल तेंव्हा मुंबईला “मार्केटात” पाठवत असे व त्याचे पैसे वसुल करायला दर सहा महिन्याने मुंबईला यायचा. अर्थात दोन चार दिवसाचा त्याचा मुक्काम आमच्या घरी ठरलेला. त्याच पैसे वसुलीच काम झालं की तो आमच्या आईला “बयो उद्या सकाळच्या एस्टीनं जातोय गं परत !” असं सांगायचा. मगं आम्ही मुलं त्याला “मामा उद्या तू परत गावी जाणार, मग आज रात्री ‘हिंदमाताला’ सिनेमाला जाऊया नां !” असा घोषा लावत असू. पण आमचा मामा पक्का बेरका होता. तोंडात कुड्याची पेटती विडी ठेवून म्हणायचा, “त्या सिनेमात बघण्यासारखं काय असत मला कळत नाही ! अरे बाहेर जे तुमच्या हिरो हिरोईनचे फोटो लावलेत नां, ते फक्त आत थेटरात पडद्यावर हलतात आणि बोलतात, एवढाच काय तो फरक ! त्यासाठी आपल्या दिडक्या कशास खर्च करायच्या म्हणतो मी ? त्यापेक्षा ही पाचाची नोट घ्या आणि आईस्क्रीम खा बघू सगळ्यांनी !” अस म्हणून आमच्या तोंडाला आईस्क्रीम पुसायचा, सॉरी पान पुसायचा !

आज वयाच्या सत्तरीत “डोक्याने” किंवा “डोक्याची” कामं करून म्हणा, अथवा अनूवांशीक जीन्समुळे म्हणा, आजमितीस मानेवर जी काय पांढऱ्या केसांची तुरळक झालर उरल्ये, ती वाढल्यावर कापायला सटी सामाशी “सलूनमधे” जायचा योग येतो, तोच काय तो ! पण आता पूर्वीसारखी “भावजा” समोर लहानपणी जशी मान तुकवावी लागत असे, तशी आता सलूनमध्ये तुकवावी लागत नाही, हेच काय ते त्यातल्या त्यात मनाला समाधान ! फक्त या बाबत एकच तक्रार मी मनातल्या मनांत स्वतःलाच करत असतो मंडळी.  माझ्या मानेवरची केसांची पांढरी तुरळक झालर कापायलासुद्धा, एखाद्याच्या डोक्यावरील संपूर्ण जंगल कापण्या इतकेच पैसे द्यावे लागतात ! त्यामुळे वेगळ्या अर्थाने आपलं पाकीट किंवा खिसा कापला जातोय, याच नाही म्हटलं तरी माझ्या सारख्या पेन्शनराला आत कुठेतरी दुःख होतच !

खिसा आणि पाकीट कापण्यावरून आठवलं, साधारण तीस पस्तीस वर्षापूर्वी ट्रेनच्या किंवा बेस्ट बसच्या प्रवासात ज्याच पाकीट किंवा खिसा कापला गेला नाही, असा चाकरमानी मिळणं विरळाच !  आणि कोणी फुशारकीने तसं म्हटलं तर त्याने त्यावेळच्या ट्रेनच्या “थर्ड क्लासने” गर्दीच्या वेळेस डोंबिवली किंवा विरार लोकल मधून, संध्याकाळच्या रश अवर मधे प्रवास केलेलाच नसावा, हे तुम्ही त्याला खात्रीपूर्वक सांगू शकता.

त्यावेळच्या ट्रेनमधल्या खिसा कापण्याच्या एक एक चमत्कारिक आणि सुरस कथा आज नुसत्या आठवल्या तरी खूपच मनोरंजन होतं. सध्या पाकीट आणि खिसा कापणाऱ्या टोळ्या अस्तित्वात आहेत की नाहीत, अशी शंका घेण्या इतपत सध्याची परिस्थिती आहे. कारण आत्ताच्या कलियुगी अशा चिल्लर चोऱ्या करण्यापेक्षा, आजकाल सगळ्यांनाच स्वतःच्या जिवापेक्षा प्यारा झालेल्या एखाद्या महागड्या “मोबाईलची” चोरी करण्यावर सांप्रत काळातील चोरांच्या नवीन पिढीने आपला मोर्चा वळवला आहे, हे आपण सुद्धा मान्य कराल. त्यामुळे पुन्हा एकदा मी “कालाय तस्मै नमः” म्हटलं, तर आपल्याला त्यात वावगं वाटणार नाही अशी आशा करतो !

एखाद्या वास्तूच उदघाटन त्याच्या दाराला लावलेल्या आडव्या “लाल फीतीला” कापून, कोणा मान्यवरच्या हाती करायची पद्धत आपल्याकडे कधी पासून आली, हा एक संशोधनाचा विषय ठरावा. कारण स्वातंत्र्यापुर्व काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा काही वर्ष मान्यवरांच्या हस्ते “दिप प्रज्वलनकरून” एखाद्या कार्यक्रमाची सुरवात व्हायची, हे आपल्याला आठवत असेलच.  स्वातंत्र्यानंतरच्या काळात तेव्हांच्या स्वतःला फॉरवर्ड समजणाऱ्या उच्चभ्रू लोकांनी अशा समारंभात ही फीत कापायची पद्धत सुरु केली असावी, असा आपला माझा अंदाज ! अर्थात त्याचा उगम नक्कीच त्यांच्या डोक्यतून न हॊता, त्यांनी या बाबतीत सुद्धा इंग्रजांचेच अनुकरण करण्यातून झाला असावा, हे ही तितकंच खरं असण्याची शक्यता जास्त !

हल्ली गल्ली बोळात स्वतःला “नेता” म्हणवणाऱ्या लोकांना तोटा नाही आणि त्यांच्या निरुद्योगी अनुनायांचे तर “सगळं काही” फुकट मिळत असल्यामुळे मोहोळच उठलेलं आपल्याला पाहिला मिळतं. अशा या स्वयंभू नेत्यांना काही उत्साही लोकं आपल्या कुठल्याही “वास्तूची” उदघाटनाची फीत कापायला बोलवत असतात आणि हे नेतेही तेवढ्याच तत्परतेने, उत्साहाने असे समारंभ अगदी अगत्यपूर्वक अटेंड करत असतानां आपण पाहिले असेल. मी वर “कुठल्याही वास्तूची” उदघाटनाची फीत असं म्हटलं, कारण सध्या आधीच नावापुरत्या राहिलेल्या फुटपाथवर, एखाद्या नवीन बांधलेल्या “सार्वजनिक शौचालयाची” फीत कापून त्याच उदघाटन सुद्धा असे नेते करत असतात ! एवढच कशाला, त्या सार्वजनिक शौचालयावर स्वतःचा मोठा फोटो आपल्या नावासकट, मोठ्या आणि भडक रंगात रंगवला आहे की नाही याची आधी खात्री करून घेतात आणि मगच त्या शौचालयाचे फीत कापून उदघाटन करतात !

“सकल उत्पन्नाच्या मूलभूत गुंतवणूकीवर मुळापासून कर कापला जाईल !” हे एखाद्या कंपनीच्या गुंतवणूक विषयीच्या फॉर्मवरच्या सर्वात छोट्या फॉन्ट मधलं प्रिंट केलेलं वाक्य, शुद्ध मराठीत असलं तरी, वाचायला म्हणण्यापेक्षा “कळायला” बऱ्याच जणांना जरा जड जाईल ! म्हणून सोप्या भाषेत सांगायचं तर, “Tax will be deducted at source !” असं म्हणतो, म्हणजे 99% वाचकांचा जीव भांड्यात पडेल, याची मला खात्री आहे !

“अरे काय सांगू तुला, या वेळेस मी दीड लाखाचं फुल सेव्हिंग केलं, तरी पंचावन्न हजार टॅक्स भरायला लागला !”

“टॅक्स !” तुमच्या माझ्यासारख्या जगातल्या तमाम मध्यमवर्गीयांचा, अगदी कधीही, कुठेही आणि कोणाबरोबरही उगाच “फुकट” चर्चा करण्याचा जागतिक विषय ! आता या आधीच्या वाक्यात मी जो “फुकट” शब्द वापरला त्याला कारण म्हणजे, आपल्या सारख्या लोकांनी या विषयावर कितीही वायफळ चर्चा केली तरी, त्याचा सरकारवर दबाव पडून, सरकार टॅक्सच्या टक्केवारीच्या स्लॅबमधे बदल करेल ही शक्यता अजिबातच नसते. हे जरी आपल्या सारख्या लोकांना दरवर्षीच्या अनुभवावरून माहित असलं तरी, त्यावर चर्चासत्र किंवा परिसंवाद हे सगळ्याच बजेट नंतर झडतच असतात !

मंडळी, अजूनही कुठं कुठच्या “कापण्याचे इव्हेंट” होऊ शकतील असे अनेक प्रकार जे मला माहित आहेत, ते आपल्याला सुद्धा माहित असतील. पण एखाद्या लेखाची पण काही शब्दमर्यादा असते हे सुद्धा आपल्या सारख्या चाणाक्ष वाचकांना माहित असेलच ! त्यामुळे वरील लेख कोणी छापणार असेल तर, त्यांच्या “एडिटरकडून” मूळ लेखाची (मला) नको इतकी “काट छाट” होण्याआधीच लेख संपवतो !

 – समाप्त –

© प्रमोद वामन वर्तक

स्थळ – बेडॉक रिझरवायर, सिंगापूर.

मो – 9892561086, (सिंगापूर)+6594708959

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कापणे….एक इव्हेंट… भाग 1 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 ☆ कापणे….एक इव्हेंट… भाग 1 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

कापणे – एक इव्हेंट ! 😂😢😟

माझ्या समवयस्क पिढीतील लोकांना लहानपणी हातात पडलेल्या पहिल्या “शिस पेन्सिलीच” त्या काळी, त्या वयात काय अप्रूप होतं ते नक्कीच आठवत असेल ! मला आज सत्तरीत आठवतंय त्याप्रमाणे तेंव्हा मराठी चौथीपर्यंत काळीशार दगडी पाटी आणि चुन्याची पांढरी षटकोनी किंवा चौकोनी पेन्सिल, यावरच ‘लिहित्या हाताच्या’ बोटांना आम्हां मुलांना समाधान मानावं लागत असे ! या वाक्यातील ‘लिहित्या हाताच्या’ या माझ्या शब्दप्रयोगावर आपली वाचनाची गाडी अडखळली असेल, तर त्याबद्दल आपलं समाधान होईल असा खुलासा आधी करतो,  म्हणजे मग तुम्ही पुढचा लेख वाचायला आणि मी पुढे लिहायला मोकळा !

आपण म्हणालं आता हे काय तुमच नवीनच ? “लिहिता हात” म्हणजे काय ?  तर त्याच कसं आहे मंडळी, जसं काही काही लोकं बोलतांना “खाता हात” आणि “धुता हात” असे शब्दप्रयोग करतात, तसा मी “लिहिता हात” असा शब्दप्रयोग केला तर कुठे बिघडलं ? कारण आपल्यापैकी बरेच जण डावरे (का डावखुरे?) असण्याची शक्यता गृहीत धरूनच मी या नवीन हाताचा “शोध” सॉरी, नवीन शब्दप्रयोगाचा शोध लावलाय ! दुसरं असं की समस्त डावऱ्यां मंडळींकडून, मी माझ्या सारख्या उजव्यांना उजवं माप देतोय, असा बिनबुडाचा आरोप कशाला  ऐकून घेवू ? काय बरोबर ना मंडळी ?

हां, तर काय सांगत होतो मंडळी, हातात आलेल्या पहिल्या शिस पेन्सिलीच अप्रूप ! तर अशी ही शिस पेन्सिल आपल्या स्वतःच्या मालकीची म्हणून पाचवीत हाती येई पर्यंत, जर आपण कुतूहलापोटी आपल्या ताई किंवा दादाच्या शिस पेन्सिलीला नुसता हात जरी लावला असेल, तरी आपण तिचा किंवा त्याचा ओरडा त्याकाळी नक्कीच खाल्ला असेल. शिवाय एखाद्याचा दादा किंवा ताई जास्तच रागीष्ट असेल तर ? त्या ओरडयाबरोबर त्याची किंवा तिच्या हातची चापटपोळी खायचा प्रसंग पण आपल्यावर नक्कीच ओढवला असेल, बघा आठवून ! आपण म्हणालं, हे सगळं जरी काही प्रमाणात खरं असलं, तरी या सगळ्याचा आणि आजच्या लेखाच्या शीर्षकाचा संबंध काय ? सांगतो, सांगतो मंडळी, जरा सबुरीन घ्या !

तर पाचवीत पहिल्यांदाच हाती आलेल्या नव्या कोऱ्या “शिस पेन्सिलीला” टोक काढायला, त्याकाळी आजची “शार्प” लहान मुलांची पिढी जे “शार्पनर” वापरते, त्याचा शोध बहुतेक लागायचा होता म्हणा किंवा माझ्या सारख्या मध्यमवर्गातल्या मुलांना त्याकाळी ते विकत घेणं परवडत नव्हतं म्हणा, पण तेव्हा आम्ही मुलं शिस पेन्सिलीला टोक काढण्यासाठी एखाद जुनं अर्ध “भारत ब्लेड” वापरत असू. पण मंडळी, त्या शिस पेन्सिलीला अर्ध्या ब्लेडने टोक काढता काढता, पेन्सिलीतून तीच टोक बाहेर येण्या आधीच हाताच्या एखाद्या बोटातून हमखास लाल भडक रक्त बाहेर येई !  मग काय, अशावेळी माझी जी काय रडारड सुरु व्हायची त्याला तोड नसायची ! कारण त्या वयात असं एखाद “कठीण” काम, स्वतःच स्वतः अभिमानाने करतांना, आपल्याच हातून आपल्याच चुकीमुळे बोटातून रक्त आलेला, बहुदा तो आयुष्यातला पहिलाच प्रसंग असायचा.  मग हे सगळं आईला कळताच तिची बोलणी खात खात, कधी त्या सोबत तिच्या हातचे धपाटे तोंडीलावण्यासारखे खाता खाता, तिने आठवणीने बरोबर आणलेला मातकट रंगाचा “रामबाण कापूस” ती मला बोटावर झालेल्या माझ्या जखमेवर लावी. तो लावता लावता तोंडाने, “साधी एका शिस पेन्सिलला टोक काढता येत नाही आणि म्हणे मला पेन्सिलचा अख्खा नवीन बॉक्स हवाय ! टोक काढतांना गाढवासारखं (?) स्वतःच बोट कापून घेतलंस, तरी त्या नावाखाली आज तुझी अभ्यासातून मुळीच सुटका नाही, कळलं?”

मंडळी, तेंव्हा जरी साने गुरुजींची “श्यामची आई” त्याकाळच्या आयांच्या कितीही आवडीची असली, तरी सगळ्याच मुलांच्या आया काही “श्यामच्या आईसारख्या” आपापल्या मुलांशी वागत नव्हत्या नां ! त्यामुळे माझ्या आईच्या तोंडातल्या वरच्या डायलॉगचा शेवट, माझ्या शरीराचा कुठला अवयव त्यातल्या त्यात तिच्या उजव्या हाताच्या जवळच्या टप्प्यात असेल, त्यावर त्याच हाताची एक सणसणीत बसूनच होत असे !

मंडळी, त्या औषधी “रामबाण कापसाची” एक खासियत होती. तो नुसता जखमेवर दाबून धरताच एका क्षणात जखमेतून येणार रक्त, रेड सिग्नल मिळाल्यावर पूर्वी जशा गाड्या थांबत तसं थांबत असे !  हल्ली रेड सिग्नल आणि त्याच्या जोडीला पोलिसाचा आडवा हात व त्याच्या जोडीला त्याच्या तोंडातली शिट्टी, याला सुद्धा कोणी जुमानत नाही हा भाग निराळा. दुसरं असं की आजच्या सारखा तो काही “वॉटरप्रूफ बँडेडचा” जमाना नव्हता. त्यामुळे औषधी “रामबाण कापसाच्या” फर्स्टएडवरच अशा जखमांची तेंव्हा बोळवण केली जायची. अशी “रामबाण कापसाची” त्या काळातली फर्स्टएड मलमपट्टी आपण सुद्धा कधीतरी अनुभवली असेल ! आजकाल कशातच “राम”  उरला नाही, मग हा “रामबाण कापूस” तरी कसा उरेल, खरं की नाही ? असो ! कालाय तस्मै नमः !

“भावजा, रविवारी सकाळी ७ !” “भावजा, बुधवारी सकाळी ९ !” “भावजा,….  सकाळी………. !” असे निरनिराळे आदेश वजा सूचना, आमचा “भावजा” खाली रस्त्यावरून जातांना दिसला की त्याला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात, चाळी चाळीच्या कॉमन गॅलेरीतून ऐकायला येत.

मंडळी “भावजा” हे आमच्या आठ चाळीच्या मिळून वसलेल्या समूहातल्या, अंदाजे पाचशेपैकी चारशे खोल्यातील लहान लहान मुलं आणि त्या प्रत्येक खोलीतली वडील मंडळी, साधारण साठ वर्षांपूर्वी ज्याच्या समोर दर दोन ते तीन महिन्यांनी स्वतःच डोकं भादरून घ्यायला “नतमस्तक” होत त्या “नाभिकाचे” नांव !

तुम्ही म्हणालं, “भावजा” हे काय नांव आहे ? पण मंडळी मी तुम्हांला शपथेवर सांगतो, माझ्या जन्मापासूनच्या चाळीतल्या पन्नास वर्षाच्या वास्तव्यात मला कळायला लागल्या पासून तरी, त्याला आठही चाळीतले समस्त चाळकरी आणि पोरं टोरसुद्धा त्याच नावाने हाकमारीत असत. त्यामुळे त्याच्या खऱ्या नावाचा पत्ता, मी माझा चाळीतला पत्ता बदलेपर्यंत तरी मला लागला नाही. शिवाय त्याच खरं नांव जाणून घ्यावं असं त्याकाळी मलाच काय, इतर चाळकऱ्यांना सुद्धा कधी वाटलं नाही, हे ही तितकंच खरं ! तरी सुद्धा आज त्याच “भावजा” हे नांव आठवताच, त्याची वामन मूर्ती अजूनही इतक्या वर्षांनी माझ्या डोळ्यासमोर उभी राहते !

पांढरं स्वच्छ धोतर, त्यावर निळा ढगळ म्हणावा असा, समोर दोन मोठे खिसे असलेला आणि त्या दोन खिशांना बाहेरून बटनाने बंद करायला असलेले दोन फ्लॅप असलेला शर्ट, डोक्यावर काळी गोल टोपी, पायात कोल्हापुरी चपला आणि उजव्या हातात पत्र्याची, त्याला लागणाऱ्या सगळ्या आयुधांची पेटी ! अशा अवतारातली त्याची ठेंगणी ठुसकी वामन मूर्ती, आठही चाळीचे जिने चढता उतरतांना मी तेंव्हा अनेक वेळा बघितली आहे.

असा हा “भावजा” आपल्या डाव्या शर्टाच्या खिशात चांदीची साखळी असलेलं एक छोटेखानी गोल घड्याळ बाळगत असे. अर्थात त्या घडाळ्याचा उपयोग तो त्या वेळेस तरी, आजच्या भाषेत सांगायचं तर “शायनींग” मारण्यासाठीच करत असावा. कारण त्याला तुम्ही जरी एखाद्या दिवशी सकाळी सात वाजता बोलावलं असेल आणि त्यानं तसं तुमच्या नावासकट खिश्यातल्या छोट्या डायरीत लिहिलं असेल, तरी स्वारी त्या ठरलेल्या दिवशी दहाच्या आत उगवेल तर शपथ !

याला कारण पण तसंच होत. तेंव्हा आजच्या सारखी गल्ली बोळात उगवलेली, वेगवेगळ्या हेअर स्टाईल करणारी महागडी एसी “सलोन” तर सोडाच, पण साधी “शंकर केश कर्तनालय” सारखी “सलून” सुद्धा शहरातल्या ठराविक उच्चभ्रू वस्तीत हाताच्या बोटावर मोजण्या इतकी सुद्धा नव्हती ! आणि त्यावेळेस ती असली काय किंवा नसली काय, तेंव्हा त्याची पायरी चढून स्वतःच डोकं भादरण चाळीतल्या कोणालाच त्या वेळेस तरी परवडण्यासारखं नव्हतं ! किंबहुना त्या सलूनमधे जाऊन एका वेळच्या डोकं भादरायच्या खर्चात, “भावजा” पुढे अख्खी दोन वर्ष नतमस्तक होता आलं असतं, असा साधा सरळसोट मध्यमवर्गीय हिशेब त्यात होता, हे ही तितकंच खरं ! त्यामुळे “भावजाच्या” सकाळच्या सातच्या अपॉइंटमेंटसाठी चाळकऱ्यांना दहा दहा वाजेपर्यंत वाट पहात बसण्याशिवाय पर्याय नसायचा. कधी कधी त्याला जास्तच उशीर झाला, तर घरातली वडील मंडळी आम्हां पोरांना त्याची स्वारी कुठल्या चाळीत आपल्या हातातलं कसब दाखवत बसली आहे, याचा शोध घेण्यासाठी पाठवत असे.  आता मी जरी “भावजाच्या” केस कापण्याला त्याच्या हातातलं कसब म्हटलं, तरी तेंव्हा बहुतेक “क्रू कटचा” शोध त्याच्याच “मशीन” मधूनच जन्माला आला असावा, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.  पुढे आमच्या या “भावजाचा” तो “क्रू कट” त्यावेळच्या पोलीस शिपायांच्या माथी जाण्यामागे आमच्या “भावजाचाच” तर हात नाही ना ? इतपत शंका घेण्यास काही चाळकऱ्यांची मजल तेंव्हा गेली होती.

केस कापायला आपल्यापुढे कोण बसलंय, त्याच वय काय, त्याला कसे केस कापून हवेत अशा क्षुल्लक गोष्टींची चर्चा न करता, समोरच्या व्यक्तीच डोकं आपल्यापुढे त्याची मान दुखेपर्यंत जास्तीत जास्त वाकवून, दिसला केस काप करत, तो डोक्यावरील केसांची “कतले आम” त्याच्या पद्धतीने करत सुटे !  या त्याच्या केस कापण्याच्या स्वतःच्या स्टाईलमुळे एखाद्या सोमवारी, आठ चाळीतल्या समस्त आयांचा आपापली मुलं मागच्या बाजूने ओळखण्यात फारच गोंधळ उडे मंडळी. कारण केस कापल्यावर सगळी मुलं मागून थोडे दिवस तरी सारखीच दिसायची ! मग काही कारणाने एखाद्या मुलाला दुसऱ्याच आईचा फटका खायचा प्रसंग सुद्धा ओढवायचा !

त्या जमान्यात हिंदी सिनेमे पाहण्यापेक्षा लोकं मराठी संगीत नाटकं पहाणं जास्त पसंत करीत असतं. त्यामुळे हिंदी सिनेमांतल्या एखाद्या “कुमारा” सारखी आपण पण हेअरस्टाईल करावी असं कोणाला वाटत नसे.  शिवाय तशी फॅशन पण तेंव्हाच्या तरुण मंडळीत फोफावली नव्हती आणि मराठी संगीत नाटकातल्या एखाद्या कळलाव्या नारदा सारखी हेअरस्टाईल (?) करायचा तर प्रश्नच नव्हता. कारण डोक्यावरच जंगल कंगव्याने केस फिरवण्या इतकं वाढलं रे वाढलं, की लगेच “भावजाला” फर्मान जाई !

क्रमशः…

© प्रमोद वामन वर्तक

स्थळ – बेडॉक रिझरवायर, सिंगापूर.

मो – 9892561086, (सिंगापूर)+6594708959

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बदल… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ बदल…  ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

एका प्रसिद्ध टीव्ही  मालिकेतील नायिका सोज्वळ आहे. जुन्या काळातील नायिकांसारखी ती दोन वेण्या घालते. अलीकडं कोणी वेण्या घालत नाहीत. आंबाडा, एक वेणी या हेअरस्टाईल्स तर कालबाह्य झाल्या आहेत. पॉनिटेल फक्त मध्यमवयीन महिलांनी घातलेला दिसतो. तरूणी, नवयौवना यांच्या हेअरस्टाईलनं क्रांतिकारक बदल केलेला दिसतो. खरं तर या नवयुवती हेअरस्टाईल करतच नाहीत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण या सगळ्या आजकाल केस बांधतच नाहीत. केस मोकळे सोडणं हीच सध्याची फॅशन आहे.

एक काळ असा होता की केस मोकळे सोडणं असभ्य मानलं जाई. आंबाडा, एक वेणी, दोन वेण्या एवढेच पर्याय उपलब्ध असत. पोनीटेल ची फॅशन ही लहान केस असणाऱ्यांसाठी वरदान ठरली. ज्या मुलींचे केस खरोखरच टेल सारखे, शेपटी सारखे लहान होते त्या मुली एक आडवी क्लिप लावून पोनी बांधू लागल्या. मानेच्या नाजूक झटक्यानं ही पोनी डौलदार झोका घेऊ लागली. आकर्षक दिसणं कोणाला नको असतं बरं? ही स्टाईल वेगानं समस्त महिला वर्गानं उचलून धरली. लांब केसांचा आता कंटाळा येऊ लागला. वेळ वाचतो या नावाखाली लहानथोर सगळ्याच महिला पोनी बांधण्यासाठी केसांची लांबी मर्यादित ठेवू लागल्या. वेणी घालणं ही जुनाट फॅशन झाली. काकूबाई स्टाईल म्हणून ओळखली जाऊ लागली. आणि काकूबाई म्हणवून घेणं कोणाला चालेल, हो ना?

मधल्या काळात साधना कट, बॉबकट, बॉयकट अशा काही कटस्टाईल्स लोकप्रिय झाल्या. पण त्यांची लोकप्रियता फारशी मोठी नव्हती. बघता बघता हिंदी सिनेमा, टीव्ही मालिकांतील नायिका केस मोकळे सोडून फिरू लागल्या. ग्लॅमरस लूक मिळवण्यासाठी आमच्या मुली, सुना देखील मुक्त केस आणि मुक्त मनानं मोकळ्या ढाकळ्या बिनधास्त जगू लागल्या. स्वच्छता, हायजिन साठी घातलेली बंधनं या मुलींनी झुगारून दिली. घरभर केस पडू नयेत म्हणून एका जागी बसून केस विंचरणं, स्वयंपाक करताना, घरकाम करताना ते बांधून ठेवणं हे नियम जाचक वाटू लागले. मोकळे केस हे मुक्त जगण्याचं, मुक्त विचारांच प्रतीक ठरलं. इथंपर्यंत थोडं ठीक आहे असं वाटतंय तोच कुरळे केस नकोसे वाटू लागले. स्ट्रेट, स्मूथ, सिल्कि केस पसंतीची पावती मिळवू लागले.त्यासाठी महागड्या ट्रिटमेंटस् केल्या जाऊ लागल्या. पण केसांची नवी मुक्त स्टाईल वाऱ्याच्या वेगानं पसरली.

मुक्तांगण कितीही प्रिय असलं तरी वैविध्यपूर्ण केशरचना देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत असं दिसतं. फ्रेंच रोल, हाय बन, लो बन आणि अगणित हेअरस्टाईल्स सण समारंभ, लग्न मुंजीत मानाचा मुजरा घेतात.

चांगलं दिसणं, आधुनिक राहणं, काळाबरोबर चालणं जमायल हवंच. तो आपला हक्कच आहे. फॅशन करताना स्थळकाळाचं भान मात्र असायला हवं. आपण कुठं आहोत, कोणत्या समारंभाला जाणार आहोत, आजूबाजूला कोणत्या वयोगटातील लोक आहेत, अशा काही गोष्टींचा विचार करावा इतकंच. स्वयंपाक करताना बांधलेले केस कामात अडथळा आणत नाहीत . शिवाय ते हायजेनिक आहे.

पूजा असेल, धार्मिक विधी असतील तर बांधलेले केस बरे. आजूबाजूला पणत्या,दिवे,समया असतील तर मोकळे केस धोकादायक ठरू शकतात. वयस्कर किंवा आदरणीय मोठी माणसं आजूबाजूला असतील तर केस मोकळे सोडू नयेत. ते छानसे बांधावेत.अशा वागण्यातून आदर, नम्रता व्यक्त होते. आधुनिकपणाचा स्वीकार करताना तारतम्य ठेवायला हवंच.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शिक्षकी पेशा… अनामिक ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा  ?

☆ शिक्षकी पेशा… अनामिक ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(मूळ इंग्रजीतील पोस्टचा प्रकाश भागवत कृत मराठी अनुवाद- वाचनिय आणि चिंतनशील सुद्धा.)

दीक्षांत समारोहात भाषण करतांना प्रमुख वक्ते जे स्वतः एका शिक्षण संस्थेत प्राचार्य पदावर होते, ते म्हणाले,  डॉक्टर असणाऱ्या बापाला आपल्या मुलांनाही डॉक्टर व्हावं असं वाटतं, इंजिनीयर बापाला आपल्या मुलांनाही आपल्यासारखंच इंजिनियर व्हावं असं वाटतं, उद्योग धंदा करणाऱ्या बापाला आपल्या मुलांना एखाद्या कंपनीचा सीईओ व्हावं असं वाटतं. तसं शिक्षकी पेशा असणाऱ्या बापालाही आपल्या मुलानं यांच्यापैकीच कांहीतरी एक व्हावं असं वाटत असतं पण शिक्षक व्हावं असं कुणालाही स्वतःहून वाटत नाही.

ही परिस्थिती दुर्दैवी आहे परंतु हीच वास्तविकता देखील आहे.

रात्रीभोजच्या प्रसंगी जेवायला आलेले पाहुणे जेवणाच्या टेबल भोवती बसून आपापसात चर्चा करीत होते. त्यापैकी एक व्यक्ती जो एका कंपनीमध्ये सीईओ होता, त्याला शिक्षण क्षेत्राबद्दल फारशी आस्था नव्हती. हे क्षेत्र समाजोपपोगी नसल्याचं त्याचं मत होतं. तो म्हणाला, “ज्यानं केवळ शिक्षक होणं हाच आपल्या जीवनातला सर्वोत्तम पर्याय आहे असं ठरवलं तो मुलांसमोर काय आदर्श ठेवणार बोडख्याचा?*”

आपला मुद्दा पुढे रेटत तो बाजूलाच बसलेल्या एका शिक्षिकेला बोलला, ” दातार ताई, तुम्ही स्वतः एक शिक्षक आहात, अगदी प्रामाणिकपणे सांगा तुम्ही काय असं महत्वाचं कार्य करता तुम्हाला वाटतं?”

दातार ताई आपल्या प्रामाणिकपणाबद्दल आणि फटकळपणाबद्दल प्रसिद्ध होत्या. त्या म्हणाल्या, मी काय काम करते हे तुम्हाला ऐकायचय ना ऐका तर मग?

त्या एक क्षणभर थांबल्या आणि मग त्यांनी बोलायला सुरुवात केली.

आपण जितके परिश्रम करू शकतो असं मुलांना वाटतं त्यापेक्षा अधिक परिश्रम मी मुलांकडून करवून घेते.

शिक्षिका होऊन मला अतिशय मोलाचा पुरस्कार मिळाला आहे असं मला वाटतं.

मुलांचे आई-बाप स्वतःच्याच मुलांना आय पाॅड, गेम क्यूब किंवा टीव्हीवर सिनेमा दाखविल्याशिवाय पाच मिनिटं देखील एका ठिकाणी बसवून ठेवू शकत नाहीत आणि मी या सर्वच मुलांना वर्गामध्ये ४० मिनिट किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ बसवून ठेवू शकते.

मी काय करते हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना? एक दीर्घ श्वास घेत त्या टेबलभोवती जमलेल्या सर्व पाहुण्यांकडे बघत म्हणाल्या –

मी मुलांचं शैक्षणिक मनोरंजन करते.

मी त्यांना प्रश्न विचारायला लावते.

मी त्यांना माफी मागायला शिकवते आणि माफी का मागायची त्याचं कारणही त्यांना सांगते. संस्कार, संस्कृती, सदाचार आणि नैतिकता शिकवून त्याप्रमाणे वागायला सांगते.

मी त्यांना इतरांबद्दल आदर बाळगायला शिकवते आणि त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल जबाबदारी घ्यायलाही शिकवते.

मी त्यांना सुंदर हस्ताक्षरात लिहायचं कसं हे शिकवते आणि त्यांच्याकडून लिहूनही घेते.

केवळ अभ्यास करवून घेणं हेच काही सर्वस्व नाही, मी त्यांना सतत (पुस्तकं) वाचायला लावते.

मी त्यांच्याकडून प्रत्यक्ष आकडेमोड करवून घेते. मुलांनी, देवानं दिलेल्या त्यांच्या बुद्धिचा वापर करायला हवा माणसानं बनविलेल्या कॅल्क्युलेटरचा नव्हे.

इतर देशातल्या माझ्या विद्यार्थ्यांना, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक ओळख अबाधित राखील, भारताबद्दल त्यांना जे काही जाणून घ्यावयाचे आहे त्याचा अभ्यास त्यांना करायला लावते.

माझ्या सर्व विद्यार्थ्यांना  सुरक्षित वाटेल असा माझा वर्ग असावा हा माझा प्रयत्न असतो.

आणि शेवटचं हे की मी त्यांना हे समजावून सांगते की तुम्हाला देवाकडून जी कांही देणगी मिळाली आहे तिचा जर तुम्ही उपयोग करून घेतलात, खूप परिश्रम केलेत, आणि आपल्या मनाचं ऐकून वागलात तर जीवनात तुम्ही यशस्वी होऊ शकाल.

श्रीमती दातार पुन्हा काही क्षण थांबून म्हणाल्या, पैसा हेच काही सर्वस्व नाही असं मानणार्‍या मला, जेव्हा लोक मी काय काम करते यावरून माझी समाजातली पत ठरवतात तेव्हा मी माझं डोकं वर करून जगात वावरते आणि अशा लोकांकडे मी ढुंकूनही पाहात नाही कारण ते निर्बुद्ध, अशिक्षित, अज्ञानी, तर्कशुन्य आणि तत्वहीन असतात. मी काय करत असते ते तुम्हाला जाणून घ्यायचंय?

मुलांना शिक्षण देऊन मी त्यांना त्यांनी डॉक्टर, इंजिनियर किंवा सीईओ होण्यासाठी तयार करते. तुम्ही काय करता मिस्टर सीईओ फक्त पैसा मिळवता?

तुम्ही डॉक्टर, इंजिनिअर, सीईओ किंवा यशस्वी उद्योजक होतात पण भावी पिढीला तेच बनण्यासाठी त्यांचा प्राथमिक स्तर किंवा पाया उभारु शकत नाहीत.

आता त्या सीईओ चं ‘थोबाड’ पाहण्यासारखं झालं होतं. तो गप्प बसला. क्षणभरच तिथे शांतता पसरली आणि त्यानंतर प्रत्येक जण आदरानं उभा राहून टाळ्या वाजवू लागला.

अनुवादक: प्रकाश भागवत

प्रस्तुती: सौ.उज्वला केळकर

मो. 9403310170 email-id – [email protected]  

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कारात् द्विज उच्यते… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ संस्कारात् द्विज उच्यते… ☆ श्री अरविंद लिमये ☆

सर्वसाधारणपणे मानवेतर प्राणी नैसर्गिक प्रेरणेनुसारच प्रत्येक कृती करीत असतात. मानवाला बुद्धीची देणगी असल्याने त्याने मात्र बुद्धीचा योग्य उपयोग करून कोणतीही कृती करणे अपेक्षित असते. त्याची प्रत्येक कृती सर्वांगीण विचार करुन,तिची योग्यायोग्यता विचारात घेऊन कशी आणि कां करायची याचे महत्त्व संस्कारच नकळत मनात रुजवत असतात. ही रुजवण संस्कारक्षम वयातच खोलवर होऊ शकते.म्हणूनच लहानपणापासूनच कौटुंबिक पातळीवर पालकांनी आणि शालेयस्तरावर शिक्षकांनी मुलांच्या मनोभूमीवर संस्कार बीजांची पेरणी करणं आवश्यक ठरतं. या संस्कारांची गुणात्मकता संस्कारांइतकीच ते कसे केले जातात यावरही अवलंबून असते. लहान वयात मुलांनी एखाद्या  गोष्टीचा हट्ट केला तर त्याला पटकन् होकार किंवा नकार न देणे ही संस्कारांच्या रुजवणीतील पहिली पायरी.कारण या दोन्हीही गोष्टींचा दीर्घकाळ टिकणारा नकारात्मक परिणाम हानिकारक ठरणारा असतो. त्याच्या मागणीप्रमाणे एखादी वस्तू देताना ती कशी वापरायची, कशी सांभाळायची, तिची कशी काळजी घ्यायची हे समजावून सांगणं जसं महत्त्वाचं तसंच ती वस्तू देणं त्याच्या हिताचं नसेल तर ते कां हे त्याला समजेल अशा पध्दतीने त्याला सांगणंही!तसेच ती वस्तू आवश्यक असूनही देता येणे शक्य नसेल तर त्याला त्याची कारणे त्याच्या कलाने समजावून सांगणेही अगत्याचेच.

मुलांना चांगल्या गोष्टींची सवय लावण्यासाठी त्यांना सतत उपदेशाचे डोस पाजत राहिलं तर ते त्याना कडवट औषधासारखेच वाटणार. ‘हे कर’, ‘ते करू नको’ याचा त्यांना आधी नावड मग कंटाळा या क्रमाने अखेर तिरस्कारच वाटू लागेल. ‘हे करायलाच हवं’ असं अट्टाहासाने सांगत राहिल्यास ते तोंडदेखलं तेवढ्यापुरतं करून एरवी ते करणं सातत्याने टाळण्याकडेच बालसुलभ कल रहाणं अपरिहार्यच असतं. म्हणूनच जे मुलांनी करावं अशी आपली अपेक्षा असते ते आपल्या कृतीने त्याला जाणवेल असे सहजपणे आपणही करीत रहाणे महत्त्वाचे ठरते. त्यांना गोडीगुलाबीने एकदा समजून सांगितले तरी आपल्या अनुकरणानेच तसे वागण्यास मुलेही आपसूकच उद्युक्त होतात. म्हणूनच मुलांना खरं बोलावं असं सांगतानाच मोठ्या माणसांनीही खोटं न बोलण्याचं पथ्य आवर्जून पाळायला हवं. लवकर उठणे, दोन्ही जेवणानंतर दात घासणे, जेवताना आनंदी वातावरण ठेवणे, झोपून न वाचणे, मोबाईल व टीव्हीचा अतिरेकी वापर न करणे,पाण्याचा अपव्यय टाळणे, कोणाचाही वावर नसणाऱ्या खोल्यातील लाईटस् वेळोवेळी बंद करणे यासारख्या गोष्टी उपदेशाने नव्हे तर मोठ्या माणसांनी स्वतःच अंगिकारलेल्या पाहूनच मुले सहज सुलभपणे त्या अंगी बाणवण्यास नकळत प्रवृत्त होतात.

संस्कार हे अट्टाहासाने करायचे नसतातच.ते सहजपणेच व्हायला हवेत. एखाद्या चांगल्या गोष्टीचे महत्त्व ती एकदा अंगवळणी पडली की समजतेच. नैसर्गिक उपलब्धीचा काटकसरीने वापर करण्याची सवय,कष्टाने पैसे मिळवता येईपर्यंत ते वाचवण्याची सवय, या गोष्टी स्वतः पैसे मिळवू लागल्यानंतरही बचतीला पूरकच ठरतात. नम्रतेने वागायची सवय कितीही राग आला तरी कुणापुढेही आवाजावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम बनवते, माणुसकीचा संस्कार ‘नाही रे’ वर्गातल्या गरीब मित्राबद्दल तिरस्कार किंवा घृणा निर्माण न करता त्याच्याशी आपुलकीने वागण्यास प्रवृत्त करते.. हे असे संस्कार म्हणजेच कालातीत अशा मूल्यांचे रोपणच.हे मूल्यसंस्कारच घरातील वातावरण निकोप, निरोगी,मनमोकळं ठेवतील.अशा वातावरणातले संस्कार मुलांवर लादले जाणार नाहीत तर ते त्यांच्या मनात आपसूक  झिरपत जातील.आणि तेच मुलांच्या शारीरिक आणि मानसिक सक्षमतेला पूरकही ठरतील. परस्परांमधील संवादातून, सहवासातून, स्वानुभवातून योग्य विचार करायला ती मुले स्वतःच प्रवृत्त होतील.

स्वतः खाताना दुसऱ्याला न देता खाणे ही प्रकृती, दुसऱ्याचे हिसकावून घेऊन खाणे ही विकृती, आणि आपल्या घासातला घास काढून तो दुसऱ्याला देणे ही संस्कृती. मुलांवर संस्कारक्षम वयात केलेले संस्कार त्याना विकृतीपासून दूर ठेवत सुसंस्कृत बनवतील ते या अर्थाने!

माणूस जन्मतः द्विपाद प्राणी म्हणूनच जन्माला येतो आणि उचित संस्कारातूनच त्याचा  दुसरा जन्म होतो तो ‘सांस्कृतिक जन्म’ या अर्थाने! द्विज म्हणजे ब्राम्हणच नव्हे तर असा दोनदा जन्म घेऊन सुसंस्कारित झालेला कुणीही. प्रत्येक धर्माचेच असे विविध संस्कार असतातच. ते महत्त्वाचे मानले तरीही त्यांना जेव्हा अवास्तव महत्त्व दिले जाते तेव्हा माणूस संस्कारीत न होता संस्कारबध्द होतो आणि त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा संकोचच होतो.

‘जन्मना जायते शूद्र:

संस्कारात् द्विज उच्यतेl’

या श्लोकाचा व्यापक अर्थ घेतला तर  संस्कारांचे नेमके महत्त्व त्यातच लपलेले आहे हे लक्षात येईल. सखोल ज्ञान प्राप्त करणारा माणूस ज्ञानी,विद्वान म्हणता येईलही पण तो सुसंस्कारित नसेल तर मात्र फक्त शिक्षितच राहील. खऱ्या अर्थाने सुसंस्कारित असणारा माणूस मात्र ज्ञानी, विद्वान माणसाइतका शिक्षित नसला तरीही सत्प्रवृत्त आणि

सूज्ञ असेल आणि म्हणून तोच खऱ्या अर्थाने दोनदा जन्म घेणारा म्हणून ‘द्विज’ बनून संस्कारात् द्विज उच्यते’  या श्लोकाचा अर्थही पूर्णतः सार्थ करेल!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares