मराठी साहित्य – विविधा ☆ बंधने… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? विविधा ❤️

☆ बंधने… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

बंधनात रहाणे कोणाला आवडते? अर्थातच कोणालाच नाही. एखादी गोष्ट करायची नाही असे बंधन आले की तीच गोष्ट करण्याची अगदी आबालवृद्धांची प्रवृत्ती असते. मधुमेह जडण्यापूर्वी माणसाला गोड खाणे आवडतही नसेल कदाचित, परंतु मधुमेहीअवस्था झाली की त्याला गोड खाण्याचीच लालसा होते. कधी कधी तर तो चोरूनही खातो. सांगायचा उद्देश बंधने झुगारणे ही माणसाची मानसिकता आहे. पिंजर्‍यातला पक्षी फडफड करतो, मग तो पिंजरा सोन्याचा का असेना!साखळीने बांधलेला कुत्रा त्याला सोडविण्यासाठी भुंकून भुंकून त्याच्या धन्याला हैराण करतो. बंध तोडून स्वैर, स्वच्छंद विहार करण्यासाठी प्रत्येकच सजीव आतूर असतो.

ही झाली नाण्याची एक बाजू, परंतु दुसर्‍या बाजूला जीवन जगताना त्यात शिस्त, नियमन असावेच लागते नाहीतर सर्वत्र सावळा गोंधळ आणि अराजक माजेल.

अगदी पार वेदिक कालात आपण पाहीले तर चातुर्वण्य पद्धतीने समाजाची रचना केली गेली होती. ब्राम्हणांनी यज्ञयाग, जपजाप्य, वेद पठण ह्या गोष्टी करायच्या, क्षत्रियांनी रणांगणावर आपली कामगिरी बजवायची, वैश्यांनी व्यापार करायचा आणि शूद्रांनी नगरात स्वच्छता राखायची. कामांची वाटणी केल्याने समाजात सुख, शांती, समाधान नांदेल हा त्यामागील उद्देश. कोणी उच्च, कोणी नीच ही भावना वर्णाश्रम पद्धति अंमलात आणताना नव्हती.

आजही आपण सर्व आवश्यक ती बंधने पाळून जगत आहोत. विद्यार्थीदशेतील बंधने~वेळेत शाळेत गेले पाहीजे, अभ्यास केला पाहीजे, परीक्षा दिलीच पाहीजे, खेळलेही पाहीजे.

विवाह बंधन, आईमुलांचे नाते, भावंडांतील परस्परांचे नाते, मित्रमंडळींशी नातेही सर्व नाती निभावताना काही ठराविक बंधने पाळणे आवश्यक आहे. लग्नाशिवाय स्त्री~पुरुषाचे एकत्र रहाणे हे आपल्या भारतीय संस्कृतीत बसणारे नाही. संसार हेच कितीतरी मोठे प्रिय बंधन आहे. ही बंधने हसत हसत पाळून आपण कर्तव्य पालन करावे.

वेळेचे बंधन पाळणे ही तर यशाची पहिली पायरी आहे. कोणतेही कार्य करताना नियोजन फार महत्वाचे असते. नियोजन नसेल तर कामात सुसुत्रता निच्छितच रहाणार नाही.

निर्मात्याने मानवाआधी निसर्गनिर्मिती केली. त्या निसर्गाचा आणि आपला फार जवळचा संबंध आहे. निसर्ग आपल्याला आवश्यक असलेला प्राणवायू देतो, अन्न देतो, पाणी देतो, जीवन देतो. निसर्गाचा आणि मानवाचा समतोल त्या विधात्याने राखला आहे. एका आवर्तनाच्या बारा महिन्यात उन्हाळा, पावसाळा आणि हिंवाळा असे तीन मुख्य ऋतू त्या निर्मात्याने तयार केले. किती नियमबद्धता आहे त्यात!माणसाने नंतर त्याचे सहा ऋतू केले. पण वातावरणाचे बंधन पाळल्यामुळेच माणसाचे आरोग्य राखले जाते. त्या विश्वंभराची ही योजना आहे. शिशिरात पानगळ झाली की वसंतात  पुन्हा बहर येतो. ऊष्णतेने प्राणीमात्रांची लाही लाही झाली की वर्षा येते आणि सर्वत्र गारवा निर्माण होतो, शुष्क झालेल्या नद्या पुन्हा दुथड्याभरून वाहू  लागतात. निसर्गाने माणसाला आयुष्यातले चढउतार दाखवून दिले आहेत.

बंधने जाचक मात्र कधीही नसावीत. आजही रूढी परंपरा याच्या नावाखाली कित्येक स्त्रियांवर अन्याय होताना आपण पहातो. समाजहितासाठी कायदे केले गेले असले तरी त्यांना धाब्यावर बसवून अत्याचार घडत आहेत. हुंडाबळी अजूनही पूर्णपणे थांबलेले नाहीत. स्त्रीभृणहत्येचे प्रमाण कमी झाले असले तरी खेडोपाडी अजूनही त्या होतच आहेत. हे सर्व पूर्णतया थांबावयास हवे.

बंधने हवीतही आणि नकोतही!

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कृष्णा-(दहीकाल्याच्या निमित्ताने….) ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ कृष्णा-(दहीकाल्याच्या निमित्ताने….) ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

कृष्णा, बंदिवासातून स्वातंत्र्याकडे तुझी वाटचाल काल रात्रीपासून सुरू झाली! कंसाच्या बंदिवासात देवकीच्या पोटी जन्माला येताच, दुसऱ्या क्षणी तुला तिथून स्थलांतर करावे लागले! विष्णू अवतारातील एक म्हणून पृथ्वीवर जन्माला आल्या बरोबरच तुला इथले मानवी जीवनाचे वनवास भोगावे लागले आणि गोकुळात जाऊन तू साधा गोपाल म्हणून जगलास ! इतर गोकुळवासी मित्रांबरोबर तुझे खेळ रंगले पण ते करता करताच तू किती राक्षसांचे पारिपत्य केलेस आणि दुष्टांच्या निर्दालनासाठी असलेला तुझा मानवी अवतार कार्यरत झाला ! गरीब बिचाऱ्या गोपांना घरचे दूध,दही, लोणी मिळत नाही म्हणून गोपींची मडकी फोडली. सर्वांसोबत त्यांच्या दही काल्यात रंंगून गेलास आणि समाजवादाचा एक धडा शिकवलास! जे आहे ते सर्वांनी वाटून घ्यायचं !थोडा मोठा झाल्यावर  सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिकण्यासाठी गेलास! तेथे गरीब सुदाम्याशी मैत्रीचे बंध ठेवून पुढील काळात त्याचा उद्धार केलास! किशोरावस्था संपून मोठा झालास आणि कंसाचा वध करून मथुऱेचे राज्य मिळवलेस !

 तारुण्यसुलभ भावनेने स्वयंवरासाठी गेलास ,तुला द्रौपदीची आस होती पण पुढे काय घडणार याचे दृश्यरूप बहुदा तुला दिसले असावे!त्यामुळे पांडवांच्या पदरी द्रौपदी देऊन तू तिचा सखा बनलास !दुर्गा भागवत म्हणतात की मित्र या नात्याला ‘सखा ‘हे रूप देऊन स्त्री-पुरुषातील  हे नाते तू अधिक उदात्त केलेस ! आयुष्यभर पांडवांची साथ देत कौरव-पांडव युद्धात तू अर्जुनाचा सारथी बनून कुरुक्षेत्रावर उतरलास योद्धा म्हणून नाही तर   सारथी बनून !एक सहज विचार मनात आला, द्रौपदीने कर्णाला ‘ सूतपुत्र ‘म्हणून नाकारले!सारथ्य करणारा माणूस समाजात खालच्या स्तरावर  असतो हे तिने दाखवून दिले पण शेवटी युद्धात तू सारथी बनून जी  पांडवांना मदत केलीस त्यातून तू सारथी हा सुद्धा किती महत्वाचा असतो हे  द्रौपदीला दाखवून  दिलंस का? तुझं सगळं अस्तित्वच  देवरूप  आणि  मानव  रूप यांच्या सीमेवर होतं!  जन्म घेतलास त्यात तू त्याच रंगाचा रंगून गेलास! मगध देशाच्या लढायांना कंटाळून तू गोकुळ मथुरा सोडून  द्वारकेला पळून गेलास आणि स्वतंत्र राज्य स्थापन केलंस म्हणून तुला रणछोडदास नाव मिळालं! वेगवेगळ्या राज्यातील राजकन्याशी विवाह करून

तू साऱ्या भरत खंडाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलास! आणि अवतार कार्य समाप्त करताना

एका भिल्लाच्या हातून तुझ्या तळपायाला बाण लागून तुझे जीवन कार्य संपवलेस! कृष्णा, तुझे नाव घेतले की आपोआपच गुणा दोषातून मुक्ती मिळते असं वाटतं !कारण आपण काहीही घडलं तरी ‘कृष्णार्पण’ असा शब्द वापरून ते संपवतो .सगळं हलाहल जणू संपून जातं तुझ्या

स्मरणात! तुझा जन्म काळ मध्यरात्री येतो ,तेव्हाही आम्ही वाजत गाजत तुझा जन्मोत्सव साजरा करतो कारण अंधाराची रात्र संपून तुझ्या जन्माने उत्साहाचा आणि कर्तुत्वाचा जन्म होणार असतो .आजचा गोपाळ काला म्हणजे उत्साही कामाची सुरुवात !पावसाच्या सरी बरोबरच  पुढील वर्ष आनंदात जाऊदे हीच इच्छा! आधुनिकतेच्या नावाखाली कृष्ण – ना किंवा परमेश्वराचे अस्तित्व न माणणारे आता ‘करोना’ पुढे शरणागत झाले आहे आणि आणि त्यावरून विज्ञानाने कितीही मात केली तरी  एक हातचा तुझ्याकडे , परमात्म्याकडे आहे हे मात्र मान्य केले पाहिजे !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ शालन, मालन आणि मोरू ! (भाग 1) ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

😂 शालन, मालन आणि मोरू ! (भाग 1) 😅 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“पंत, पंत, पंत हे तुम्ही काय चालवलं आहे ?”

“अरे मोऱ्या मी काय चालवलं आहे ते नंतर, आधी मला सांग, किती दिवस झाले आपल्याला भेटून, काय पत्ता काय तुझा?”

“माझा पत्ता तोच आहे, जो गेली पाच वर्ष आहे तो. पंत तुम्हीच सासू सुनेच्या गोष्टीत रमला होतात गेले काही महिने, त्याच काय ?”

“ते जाऊदे रे ! पण आता इतक्या दिवसांनी आलास ते बरंच झाले.”

“का ?”

“हा प्रसाद घे, कालच श्रावणातली सत्यनारायणाची पूजा केली होती, घरातल्या घरात.”

“मी प्रसाद घ्यायला नंतर येतो पंत, माझी अजून अंघोळ व्हायची आहे.”

“मोऱ्या गाढवा, दुपारची जेवायची वेळ झाली तरी अजून तुझी अंघोळ नाही झाली ?”

“हॊ !”

“कारण कळेल मला मोऱ्या ?”

“तुम्ही !”

“अरे मी काय तुला रोज अंघोळ घालायला घरी येतो की काय तुझ्या ?आणि आज आलो नाही म्हणून अजून पारोसा राहिलायस ते ?”

“तसं नाही पंत, पण सकाळ पासून आम्ही नवरा बायको भांडतोय नुसते, त्यामुळे वेळच नाही मिळाला मला अंघोळीला.”

“अरे मोऱ्या पण तुमच्या भांडणाचं कारण काय ?”

“तुम्ही !”

“परत तुम्ही ! अरे काय सारखं तुम्ही, तुम्ही लावलंयस, नीट काय सविस्तर सांगशील की नाही ? आणि असा नुसती लुंगी लावून कसा आलास ? पावसामुळे कपडे वाळले नाही का तुझे ?”

“पंत इथे माझं लग्न मोडायची वेळ आल्ये आणि तुम्ही मला माझ्या कपड्याबद्दल विचारताय ?”

“बरं बाबा नाही विचारात, आता मला सांग तुझं लग्न मोडायची वेळ कुणी आणली बाबा तुझ्यावर ?”

“तुम्ही !”

“मी ? आणि ती कशी काय बुवा ?”

“सांगतो, आपल्या सोसायटीची पावसाळी पिकनिक जाणार आहे १२ सप्टेंबरला, बरोबर ?”

“हॊ, मीच सगळी व्यवस्था करतोय त्याची, जवळ जवळ ६० लोकांचे प्रत्येकी १,५००/- रुपये पण जमा झालेत ! आणि तुमच्या दोघांचे पैसे सुद्धा आलेत बरं का पावसाळी पिकनिकचे.”

” हॊ ना, मग हे सगळं शालनला सांगा !”

“मी कशाला सांगू सुनबाईला, तू नाही  सांगितलंस ?”

“सांगितलं ना ! पण तिचा विश्वास बसायला तयार नाही.”

“का ?”

“अहो आज सकाळी उठल्या उठल्या  मला म्हणते १,५००/- रुपये द्या आधी, मला सोसायटीच्या पावसाळी पिकनिकला जायचं आहे !”

“अरे पण तू तर सुनबाईचे आणि तुझे पिकनिकचे पैसे कधीच भरलेस, हे मी तुला आत्ताच सांगितलं ना ?”

“हॊ पंत, पण ती मला म्हणाली, तुम्ही माझे कुठे पैसे भरलेत पिकनिकचे ? तुम्ही तर त्या सटविला घेवून जाणार आहात ना पिकनिकला आणि लागली भांडायला.”

“आता ही सटवि कोण मोऱ्या ?”

“मालन !”

“कोण मालन ?”

“मला काय ठाऊक ?”

“अरे तू आत्ताच तीच नांव सांगितलंस ना मला मालन म्हणून ?”

“हॊ पंत, पण तुम्ही ते मला सांगितलंत म्हणून, मी ते नांव तुम्हाला सांगितलं.”

“असं कोड्यात बोलू नकोस मोऱ्या गधडया. मी कधी तुला सांगितलं मोऱ्या?”

“अहो पंत, तुम्ही या पावसाळी पिकनिकसाठी व्हाट्स अपचा एक वेगळा ग्रुप बनवला आहे आपल्या सोसायटीचा, हॊ की नाही ?”

“हॊ !”

“त्यात ज्या, ज्या लोकांनी पावसाळी पिकनिकसाठी पैसे दिलेत त्यांची नांव आणि इतर माहिती दिली आहे, बरोबर ?”

“अगदी बरोब्बर मोऱ्या !”

“इथंच लफड झालं पंत !”

“कसलं लफड ?”

“अहो पंत, तुम्ही माझ्या नावापुढे माझ्या बायकोच नांव म्हणून मालन असं टाकलं आहे, शालनच्या ऐवजी!”

“अच्छा, अच्छा असा घोळ झालाय तर !”

“पंत नुसता घोळ नाही, महाघोळ घातलाय तुम्ही. तुमच्या एका ‘शा’च्या ऐवजी ‘मा’मुळे ध चा मा करणाऱ्या आंनदीबाईच्या पंक्तीत तुम्ही जाऊन बसलात आणि मला आता ‘पंत मला वाचवा वाचवा’ असं गार्द्याऐवजी, शालन माझ्या मागे लाटण घेवून लागल्यामुळे ओरडायची वेळ आल्ये माझ्यावर, त्याच काय ?”

“त्यावर माझ्याकडे एक उपाय आहे मोऱ्या.”

“कोणता पंत ?”

“मी एक काम करतो, सुनबाईला फोन करून माझी चूक कबूल करतो आणि तू दुसरं एक काम कर.”

“काय ?”

“बायकांचा वीक पॉईंट काय सांग बघू.”

“नवीन साडी खरेदी, दुसरं काय.”

“बरोब्बर, म्हणून तू माझ्या चुकीमुळे तुला झालेला त्रास कमी करायला सुनबाईला नवीन साडीच प्रॉमिस करून टाक, म्हणजे बघ तिचा राग कुठल्या कुठे पळून जाईल ते !”

“म्हणजे हे बरं आहे पंत, चूक तुम्ही करायची आणि माझ्या खिशाला खड्डा !”

“खड्डा ? कसला खड्डा ?”

“अहो आता नवीन साडी घ्यायची म्हणजे तीन चार हजार गेले ना.”

“मोऱ्या, मी तुला काय सांगितलं ते तू नीट ऐकलं नाहीस.”

“अहो तुम्हीच सांगितलंत ना शालनचा राग घालवायला तिला नवीन साडी घे म्हणून ?”

“बघ तू परत चूक करयोयस.”

“कसली चूक पंत ?”

“मोऱ्या मी म्हटलं तिला नवीन साडी घ्यायच ‘प्रॉमिस’ कर, नवीन साडी कुठे घे म्हटलं ?”

“म्हणजे ?”

“अरे फक्त प्रॉमिस करायच, आपल्या नेत्यां सारखं ! त्याने सुद्धा सुनबाईचा राग जावून ती खूष होते की नाही बघ.”

“कमाल झाली तुमची पंत, आत्ताच घरी जातो आणि तुमचा उपाय अंमलात आणतो. येतो मी पंत. “

“जा वत्सा, तुजप्रत कल्याण असो !”

© प्रमोद वामन वर्तक

१९-०८-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मूलाधार जगण्याचा..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ मूलाधार जगण्याचा..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

कांही शब्द अगदी सहज जरी कानावर पडले तरी आपल्या मनाला होणाऱ्या त्यांच्या स्पर्शाने मनात भावनांचे तरंग उमटतात. पण एखादाच शब्द असा असतो की त्याच्या स्पर्शाने मनात उमटणारे असे भावतरंग विविधरंगी असतात. रस हा शब्द भावनांचे असे अनेक रंग स्वतःत सामावून घेतच आकाराला आलेला आहे आणि म्हणूनच तो अल्पाक्षरी असला तरी अनेक अर्थाने बहुरंगी, बहुपेडी शब्द आहे असे मला वाटते.

रस म्हणजे चव, रुचि, गोडी, आवड. रस म्हणजे औत्सुक्य, कुतूहल, जिज्ञासाही. रस म्हणजे द्रव या अर्थाने जलांश, चीक, स्त्राव,अर्क, पाक असंही बरंच कांही. एका दोन अक्षरी छोट्याशा शब्दातल्या सहज सुचणाऱ्या अर्थांच्या या विविध रंगछटा !

रसद हा ‘अन्नपदार्थ’ किंवा ‘साधन’ या अर्थाचा शब्द रस या शब्दावरुनच तयार झाला असावा असे मला वाटते ते रस या शब्दाच्या अनेक अन्न/खाद्यपदार्थांशी असलेल्या जवळीकीमुळे. रस या शब्दाचं अन्नपदार्थांशी असणारं थेट नातं ध्वनित करणारी ‘रसगुल्ला’, ‘आमरस’ ,’सुधारस’ या सारखी मिष्टान्ने आणि सामीष आहारामधला सर्वप्रिय असा कोल्हापूरी तांबडा-पांढरा ‘रस्सा’ ही कांही प्रातिनिधिक उदाहरणे ! यातील मिष्ट पदार्थ असोत वा सामिष त्यांच्याशी चव, रुचि, गोडी,आवड यासारख्या रस या शब्दाच्या अर्थांचे थेट नाते तर चटकन् जाणवणारेच.

रस या शब्दाचं मला जाणवलेलं वेगळेपण हे की त्याच्या चव ,रुचि, गोडी, आवड या अर्थांची रसनातृप्तीशी असणारी सांगड ही एक बाजू असली तरी चव, रुचि, गोडी, आवड या अर्थांचा संबंध फक्त रसनेशीच नाहीय.  एखादा छंद आवडीचा असेल तर तो जोपासण्यात ‘रस’ असतो म्हणजेच ‘गोडी’ वाटते,एखाद्या कामात ‘रुचि’ असेल तर ते काम करणे कटाळवाणे म्हणजेच ‘बेचव’ वाटत नाही.जगणं असं आनंदी, तृप्त करणारं होण्यासाठी जगण्यात  ‘चव’, ‘रुचि’, ‘गोडी’, ‘आवड’ या अर्थाने ‘रस’ हा असायलाच हवा. एरवी ते ‘निरस’च होईल. यामुळेच रस हा जसा जिव्हेचा विषय आहे तसाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त तो जगण्याचा विषय आहे !

रस या शब्दाच्या अर्थांमधील अशा विविध छटांमुळे या शब्दातून निर्माण झालेली रसदार, रसरशीत, रसपूर्ण, रसभरित, रसहीन, निरस, रसाळ अशी अनेक विशेषणे भाषेचे सौंदर्य खुलवणारी आहेत.

गुणग्रहण, गुणदोष विवेचन, रसास्वाद, रसविमर्श, मूल्यमापन, परीक्षण, आलोचना, समीक्षा, टीका अशा विविध अर्थछटांनी युक्त असा ‘रसग्रहण’ हा शब्द, तसेच रसज्ञ (रसिक), रसपरिपोष किंवा रसवत्ता (कवित्व), रसज्ञता (अभिरुचि), रसवंती(वाणी), रसायन (सरमिसळ, औषध), रसभंग (विरस), रसोत्कर्ष (बहर) यासारखे विविधरंगी शब्दही रस या शब्दातूनच आकाराला आलेले आलेले आहेत. 

शृंगार, वीर, करुण, अद्भूत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र, शांत  हे मनातल्या भावना व्यक्त करणारे नवरसच नाहीयेत फक्त तर जीवनाशी असं अतूट नातं असलेले जीवनरसच आहेत. ही अशी रसयुक्त विविधता नसती तर जगणं निरस, कंटाळवाणंच झालं असतं. या अर्थाने हे वैविध्यपूर्ण, अनेकरंगी रस हे आपल्या जगण्याचे मूलाधारच म्हणायला हवेत!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हर पल यहाँ जी भर जियो … ☆ सौ. सीमा राजोपाध्ये ☆

? विविधा ?

☆ हर पल यहाँ जी भर जियो … ☆ सौ. सीमा राजोपाध्ये ☆

हर पल यहाँ जी भर जियो …

खरंच…

जे क्षण मिळतात ते  जसे मिळतात जसं आयुष्य मिळतं तसं खूप चांगलं चांगलं छान छान सकारात्मक आनंदी जगून घ्यावं माणसानं…..

कारण..

जो है समा कल हो ना हो…

हेच अंतिम सत्य…

आता एकदम असं वेगळ्याच प्रकारचं तत्त्वज्ञान मी का सांगते आहे ?..असा नक्कीच प्रश्न तुमच्या मनात आला असेल …

 

तर मंडळी ..

माझी जीवस्य  मैत्रीण मागील वर्षी अनंताच्या प्रवासाला निघून गेली…

वय अवघं ४० वर्षांचं..

इतक्या लहान वयात असं तिचं  न परतीच्या मार्गावर जाणं… वेदनादायक तर आहेच.. पण विचार करायला लावणारं देखील आहे..

तीचा च विचार चालू आहे खरं तर मनात…

वाटलं..

किती आणि काय काय राहिलं असेल मनात..  किती स्वप्न असतील..  स्वतःलाही आयुष्यात खूप काही करायचं राहून गेलं असेल ना तिचं…

असे सगळे विचार मनात गोफ धरत असताना पटकन असं वाटलं ..

हर पल यहा जी भर जियो..

जो है समा.. कल हो ना हो…

 नेहमीच  सगळे लेखक कवी आयुष्य क्षणभंगुर आहे .. असं म्हणतात..

येणं .. जाणं हे कधीच आपल्या हातात नाही…

हेआपल्याला माहिती  असूनही आपण इतक्या दिमाखात  … मीच आहे…

मी सगळं काही करू शकतो…

मुठ मारेन तिथे पाणी काढेन  अशा  अविर्भावात..

 खरंच चालत असतो..

 वेगवेगळ्या नको असलेल्या अनेक गोष्टी  राग लोभ मस्तर … बाळगून असतो..

 परमेश्वराने दिलेले हे सुंदर असं जीवन  हे अशा सगळ्या गोष्टींनी मलिन करून जगायची काय आवश्यकता आहे..?

 

खरं तर..

 माणूस म्हणजे हे सगळं आलंच मन आहे.. भावना आहे.. विचार आहेत.. नाती आहेत असे खूप गुंते आयुष्यात असतातच …

आणि खरं सांगू का..

 एक वय ही असतं..

 जे व्हा असतो ..

थोडा  अविर्भाव ..

थोडा बेफिकीरपणा..

 थोडा अहंकार ही…

 तरी कुठेतरी एक कायम लक्षात असू द्यायचं की परमेश्वरानं दिलेलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्या परमेश्वराला आपल्याकडून  चांगल्याचीच अपेक्षा आहे..

साने गुरुजी म्हणतात की..

 झाडावर येणार फुल त्याचा जन्म किती लहान..

 पण ते आपल्या अस्तित्वानं सगळ्या जगाला आनंद देतं… तर मग माणसाकडून परमेश्वरांनं किती अपेक्षा करावी ..

माणसं म्हणजे देवाच्या  या नंदनवनातील फुले च आहेत..

म्हणून म्हणते..

आनंद द्या..

दिलखुलास पणे कौतुक करा.. फुकाचा हव्यास..

फुकाचा डामडोल..

फुकाचा मान्यस्थपणा..

फार काळ नाही टिकत..

म्हणूनच महाराजा…

जे वाटतं ना.. ते करून घ्यावं माणसानं…

खरंच..

 मोगऱ्याचा सुगंध अनुभवावा.. कधी पावसात भिजण्याची मजा घ्यावी..

 कधी शांत निरव रात्री आकाश तारकांनी भरलेलं असताना ते निहाळत बसावं…

नदीचं वहाणं…

समुद्राच्या आवेगात येणाऱ्या लाटा…

पक्ष्यांचा किलबिलाट…

सारं.. सारं मुक्तपणे कवेत घ्यावं कधीतरी..

निसर्ग जे भरभरून आपल्याला देतोय त्याची जाणीव ठेवावी त्याचे अनुभव घ्यावेत..

आपले विचार आपली वाणी आपला आचार नेहमी सौम्य सकारात्मक असू द्यावा

 नात्यांचा गुंता हळुवार सोडवावा..

सुख.. दुःख.. आशा ..निराशा या हिंदोळ्यावर आयुष्य झुलत राहणारच हो..

निसर्गात सुध्दा रातकिड्यांची किरकिर नकोशी वाटते .. पण कोकीळेचं कूजन मोहून टाकतच ना… आणि सोनचाफ्याचा सुगंध..सोन्याचा नाही दिला .. परमेश्वराने …

 म्हणून च जे आहे ते आनंदाने स्विकारणं योग्य….

आणि..

 मन प्रसन्न असेल तर असं सगळं सहज निभावणं शक्य असतं .. आपण स्वतः बरोबर सभोवतालच्या वातावरण ही असंच प्रसन्न आनंदी ठेवू शकतो..

 हीच तर त्या परमेश्वराची अपेक्षा आहे माणसाकडून..

 खरंच असा विचार केला पाहिजे नक्की आपण…

  कारण शेवटी…

 पल पल बदल रही है

 रूप जिंदगी..

 धूप है कभी..

कभी हे छॉव जिंदगी..

 हर पल यहॉ जी भर जियो..

 जो है समा..

 कल हो ना हो..

© सौ.सीमा राजोपाध्ये..

8308684324

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ३० परिव्राजक ८. अलवर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३० परिव्राजक ८. अलवर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

‘अलवर’ हे राजस्थानातले त्या काळातले एक संस्थान. संस्थानिक तिथले राजे असत आणि सर्व प्रजा त्यांना मानत असे. परंपरागत राजसत्तेचे ऐश्वर्य आणि इंग्रजी सत्तेचा प्रभाव असे मिश्र वातावरण तिथे होते. याचा प्रभाव तिथल्या थोड्या सुशिक्षितांवर होता. पण मोठ्या प्रमाणात प्रजा अशिक्षित, उपेक्षित, दारिद्र्य असणारी, जुन्या परंपरा पाळणारी आणि मर्यादित विश्वात राहणारी अशी होती.

अलवरच्या स्थानकावर उतरून स्वामीजी रस्त्यावरून पायी चालू लागले, संस्थानच्या शासकीय रुग्णालयासमोर ते पोहोचले तेंव्हा तिथे एक बंगाली गृहस्थ गुरुचरण लष्कर उभे होते. ते त्या रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर होते. स्वामीजींनी त्यांना विचारले, इथे संन्याशांना राहण्यास एखादी जागा कोठे मिळेल? हे ऐकताच गुरुचरण स्वत: त्यांना बाजारात घेऊन गेले आणि एक खोली दाखवली. चालेल ना? स्वामीजी म्हणाले, ‘अगदी आनंदाने’. त्यांची प्राथमिक सोय करून देऊन डॉक्टर तिथून निघून थेट त्यांच्या मुस्लिम मित्राकडे गेले. ते माध्यमिक शाळेत उर्दू आणि पर्शियन शिकवणारे शिक्षक होते. डॉक्टर उत्साहाने त्यांना सांगत होते की, “मौलवीसाहेब आताच एक बंगाली साधू आला आहे. मी तर असा महात्मा आजपर्यंत पाहिला नाही. तुम्ही लगेच चला. थोडं त्यांच्याशी बोला तोवर मी काम आवरून येतोच. डॉक्टर आणि मौलवी स्वामीजींकडे आले. बोलणे सुरू झाले अर्थातच धर्म विषय निघाला. स्वामीजी म्हणाले, “ कुराणाचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे, अकराशे वर्षापूर्वी ते निर्माण झालं, तेंव्हा ते जसं होतं, त्याच स्वरुपात ते जसच्या तसं आजही आपल्या समोर आहे. त्यात कोणताही प्रक्षिप्त भाग शिरलेला नाही.” मौलवी भेटून परत गेले. डॉक्टर आणि मौलवींनी जाता येतं ज्याला त्याला स्वामिजींबद्दल सांगितले. त्याचा परिणाम असा झालं की, दोनच दिवसात अनेकजण स्वामीजींच्या भेटीला येऊ लागले.

स्वामीजींच्या अमोघ शैलीमुळे सर्वजण भारावून जात. आपले विचार मांडताना ते हिन्दी, संस्कृत,बंगाली, उर्दू  या भाषांचाही उपयोग करत. गीता, उपनिषद,कधी बायबल यांचाही संदर्भ देत असत. विषयाचे विवेचन करताना ते कधी विद्यापती, चंडीदास ,रामप्रसाद ,कबीर, तुलसीदास यांची भजने सुद्धा म्हणत. गौतम बुद्ध , शंकराचार्य यांच्या चरित्रातला प्रसंग सांगत. श्रोत्यांमध्ये कुणी सुशिक्षित दिसला तर इंग्रजी किंवा पाश्चात्य तत्वज्ञान याचा आधार घेत. आणि राजस्थान मध्ये श्रीकृष्ण भक्त असल्याने तिथे विशेषता श्रीकृष्ण चरित्रातील रोमहर्षक प्रसंग सांगत, प्रेम आणि भक्ति सांगत. ते सांगताना तन्मय होत तर श्रोते ऐकताना भावुक होत. असे बरेच दिवस चालले होते. त्यानंतर, अलवर संस्थांनचे निवृत्त इंजिनीअर पंडित शंभुनाथ, स्वामीजींना आपल्या घरी घेऊन गेले. तिथे सकाळी नऊ वाजल्यापासून लोक जमायला सुरुवात होई.

हे लोक म्हणजे सर्व प्रकारचे, हिंदू, मुसलमान, शैव, वैष्णव, कुणी गाढे अभ्यासक, वेदांती, कुणी परंपरावादी, तर कुणी आधुनिक सुद्धा असत. गावातले श्रीमंत, गरीब, प्रतिष्ठित, सामान्य असे सर्वच लोक स्वामीजींकडे  येत. अनेक विषयांवर संवाद चालत असे. काही वेळा नेहमीप्रमाणे भक्तीगीत होई. श्रोते धुंद होत आणि संगीताची बैठक असलेली पाहून आश्चर्य चकित होत. हे सर्व ऐकून हा तरुण संन्यासी प्रेमळ, विद्वान, विनम्र बघून काही जणांना त्यांच्या जातीबद्दल उत्सुकता असे. ते विचारत, स्वामीजी आपण कोणत्या जातीचे? पण स्वामी विवेकानंद कसलाही संकोच न करता स्पष्ट सांगत, “मी कायस्थ होतो.” आपण ब्राम्हण आहोत असा गैरसमज होऊ नये आणि तो झालाच तर विनाकारण श्रेष्ठ जातीमुळे मिळणारा आदर आपल्याला देऊ नये म्हणून ते स्पष्ट सांगत.

असे प्रश्न आले की, यावरून त्यांना आपला समाज कसा आहे, तो एखाद्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टीकोणातून पाहतो? कोणत्या जातीत त्यांच्या परांपरानुसार कोणते विचार आहेत? ते त्यांच्या वागण्यातून कसे उमटतात हे त्यांना अनुभवायला येत होते. अशा प्रकारे भारतीय समाजाचे खरेखुरे दर्शन अशा ठिकाणी त्यांना होत होते. लोकांना जसे स्वामीजींकडून मोलाचे विचार ऐकायला मिळत होते. तसेच स्वामीजींना पण त्यांचे विचार कळत. त्यांच्याही ज्ञानात भर पडे.

मौलवी तर सुरुवाती पासूनच स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले होते. त्यांना मनापासून वाटत होतं की अशा तपस्वी माणसाचे पाय आपल्या घरालाही लागले पाहिजेत. त्यांनी हे, शंभुनाथांना सांगितलं, म्हणाले, “ मी कोणातरी ब्राम्हणाकडून माझी खोली स्वच्छ करून घेईन, खुर्च्या सुद्धा पुसून घेईन, भांडीकुंडी ब्राम्हणाच्या हातून पाणी घालून शुद्ध करून घेईन. कोणीतरी ब्राह्मण शिधा घेऊन येईल, त्याच्याकडूनच स्वयंपाक करून घेईन. पण स्वामीजींनी माझ्या घरी एकदा येऊन भोजन करावं अशी माझी इच्छा आहे. मी लांब उभा राहून त्यांना जेवताना पाहीन.”

केव्हढा हा प्रभाव? शंभु नाथांनी त्यांना सांगितलं ते सन्यासी आहेत, धर्म, जात,पंथ  या भेदापलीकडे आहेत. ते नक्की येतील अशी खात्रीच दिली त्यांनी. कारण शंभुनाथ पण उदार दृष्टीकोनाचे होते.

आणि खरच एकदा दोघही मौलवींकडे जेवायला गेले. त्यानंतर अनेक जणांकडे जेवायला जात होते. आसपासच्या परिसरात स्वामीजींची ख्याती वाढत चालली होती. लोकसंपर्क वाढत होता.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विक्रांत..वेदकुमार ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ विक्रांत..वेदकुमार ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

🇮🇳 IAC विक्रांत 🇮🇳

अलीकडेच चीनने एक नवीन विमानवाहू नौका आपल्या नौदलात समाविष्ट केली आहे. चीनकडून येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतही आपल्या नौदलाची ताकद वाढवत आहे. भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका विक्रांत ही 15 ऑगस्ट रोजी नौदलात सामील होण्यासाठी सज्ज झाली आहे..

विक्रांत म्हणजे समुद्रात तरंगणारी जणू एक विशाल 18 मजली इमारतच! त्याच्या हल च्या बांधकामात तब्बल 21 हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. इतके स्टील 3 आयफेल टॉवर बांधण्यासाठी पुरेसे आहे. विक्रांतचे फ्लाईट डेक तब्बल 2 फुटबाल स्टेडियम इतके मोठे आहे..

विक्रांतचे हँगर इतके मोठे आहे की 30 विमाने आणि हेलिकॉप्टर सामावून घेऊ शकतो. विक्रांतवर तैनातीसाठी मोदी सरकार बोईंग F/A-18 सुपर हॉर्नेट किंवा राफेल-M लढाऊ विमाने विकत घेत आहे. तोपर्यंत मिग-29K विक्रांत वर तैनात असेल. कामोव्ह-31 व MH-60R मल्टीरोल हेलिकॉप्टरही तैनात करण्यात येणार आहेत.

विक्रांतचे वजन 40000 टनांपेक्षा जास्त आहे. ते बनवण्यासाठी 23000 कोटींहून अधिक खर्च झाला आहे. त्याची लांबी 262 मीटर, रुंदी 62 मीटर आणि उंची 59 मीटर आहे. या जहाजात 2300 पेक्षा जास्त कंपार्टमेंट्स आहेत. त्यावर 1700 नौसैनिक तैनात केले जाऊ शकतात!

विक्रांत चा कमाल वेग ताशी 51.85 किलोमीटर आहे तर क्रुजिंग स्पीड 33 किलोमीटर प्रती तास आहे. विक्रांत एकाच वेळी 13890 किलोमीटर प्रवास करत जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाऊ शकतो..

कोचीन शिपयार्ड व भारतीय नौदलाने बांधलेल्या विक्रांत च्या निर्मिती मध्ये 76% पेक्षा जास्त स्वदेशी वस्तू व तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. विक्रांत ही भारतातील आजवरची सर्वात मोठी युद्धनौका आहे..!!

वेल डन भारत सरकार, भारतीय नौदलाचे अभिनंदन व ‘विक्रांत’ला शुभेच्छा..💐

जय हिंद..🇮🇳

 

– वेद कुमार

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ऐक सखे श्रावण कहाणी… ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

? विविधा ?

☆ ऐक सखे श्रावण कहाणी… ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

“आला आला श्रावण.

घेऊन संगे सण “

माणसाच्या सुखदःखाची नाळ निसर्गाशी जोडलेली आहे.

म्हणून ज्येष्ठ आषाढातील धुवाधार पावसामुळे समाधान पावलेला निसर्ग नंतर येणाऱ्या श्रावणात आनंदाची  ऊधळण करतो .आणि माणुसही त्या आनंदात सामावून सणांची लयलूट करतो,निसर्गाप्रत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पृथ्वी,आप,तेज,वायू ,आकाश या निसर्गातील चैतन्यशक्तींचे पुजन –हीच सणावारांची बैठक .

आणि श्रावणमास म्हणजे सणांची लयलुट –उत्साहाची ,ऊल्हासाची,खाण्यापिण्याची बरसात.

श्रावणात–

सोमवार ते रविवार ,आणि प्रतिपदा ते पोर्णिमा-अमावस्या प्रत्येकाची वेगळीच कहाणी,.

कहाणीवरुन आठवले लहानपण.

माहेरचा श्रावण,–रोज रात्री त्या त्या दिवसाच्या कहाणीचे आईच्या गोड स्वरातील वाचन.हातात मोत्याच्या नसल्या तरी तांदळाच्याअक्षता घेऊन आमचे उडत उडत ऐकणे.

बालबुद्धीमुळे मनात काहीबाही शंका जरुर येत असत.पण एकंदरित तो कार्यक्रम आवडायचा.

परवाच   श्रावणाच्या आधीची साफसफाई करतांना आईने दिलेले ,”सचित्र कहाणी संग्रह” पुस्तक हाती आले.अन् मनात विचारचक्र सुरु झाले. पूर्वापार ,एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे चालत आलेल्या या कहाण्या–पुर्वी कदाचित बोधप्रद असतील.पण आता कालबाह्य झाल्या.

कारण या कहाण्या म्हणजे धार्मिक रितीरिवाजांच्या ,व्रतवैकल्यांच्या सामान्य माणसाकडून त्यांचे पालन व्हावे म्हणुन सांगितलेल्या कथा—लोककथा.

सुरवातीला मौखिक प्रचार नंतर  लिखित स्वरुपात आल्यावर त्यांना साहित्यिक दर्जा प्राप्त झाला.

त्या माहितीपर आहेतच पण साधे शब्द,सुटसुटीत वाक्ये,एक लयबद्धता त्यामुळे गोडवा निर्माण होऊन लोकप्रिय झाल्या.

कथेची सुरवात साधारणपणे

“आटपाट नगर होते—“

पासुन म्हणजे आठ पेठांचे- मोठे नगर.,आणि शेवट “साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपुर्ण” अपवाद गणेशाच्या कहाणीचा.ती मात्र पाचा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

दिवस कोणताही असो,  कहाणी वाचनाची सुरवात ,

“ऐका गणेशा तुमची कहाणी–“

अशीच करायची,”श्रावण्या चौथी घ्यावा,माही चौथी संपुर्ण करावा” आणि वसा पुर्ण करतांना सांगितलेले दानाचे, –सत्पात्री दानाचे महत्व या कहाणीतुन आपण  आजही लक्षात घेऊ शकतो.आचरणात आणु शकतो.

श्रावणाच्या आदले दिवशी—on the eve of—श्रावण -येते ती “दिव्याची अवस” — उंदरावर खाण्याचा खोटा आळ घेणाऱ्या सुनेच्या चुकीचे परिमार्जन ती नियमित करत असलेल्या प्रकाशपुजनाने कसे होते हे या कहाणीत सांगितले अज्ञानामुळे अन्याय होतो,त्यावर उपाय  ज्ञानरूपी प्रकाश, त्या अर्थाने हे ज्ञानाचे च पुजन आहे.

ॠण काढुन सण साजरा करणे हा एक गैरसमज कालाच्या ओघात जनमानसात रूढ झाला होता,म्हणुन पुढेपुढे सणांविषयी नकारात्मकता वाढत गेली. पण  दित्यराणुबाईची कहाणी नीट वाचली तर एखादी गोष्ट परवडत नसतांनाही ठराविक पध्दतीने,केलीच पाहिजे असे मुळीच नाही .हे लक्षात येते.,”संपुर्णास काय करावे “?  “—–चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळेसरी द्यावी,आणि नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी” असे सांगितले आहे.या कहाणीतुन आणखी एक बोध घेता येतो,सासरी कितीही श्रीमंती असली,किंवा आपण कितीही उच्चपदस्थ गेलो तरी जन्मदात्याचा –पित्याचा  अनादर करु नये.

श्रावणी सोमवारच्या तशा २,४ कहाण्या आहेत. पण म्हातारीची—आणि तिच्या खुलभर दुधाची कहाणी सर्वांना भावते.

शेकडो घागरी दुध ओतुनही न भरलेला महादेवाचा गाभारा तिच्या खुलभर दुधाने भरतो. यावर राजाने विचारलेल्या प्रश्नाचे तिने दिलेले उत्तर अध्यात्मिक संदेश देते. देव देवळात नाही तर प्रत्येक प्राणीमात्रांत आहे. त्यांची सेवा, त्यांना संतुष्ट  ठेवणे हीच देवाची पुजा, ही एक प्रकारची कर्मपुजाच म्हणता येईल.

श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरी पुजनानंतर मंगळागौरीची कहाणी वाचलीच जाते. पतीला वाचवण्यासाठी वेळप्रसंगी पत्नी ढाल बनते, साहस करते हे या कहाणीत आहे. आजच्या स्त्रीला तर “रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग” म्हणुन लढावे लागतेच.

बुध बृहस्पती—-बुध, गुरू हे दोघेही बुध्दीचे अधिष्ठाते. नकळत चुक होऊ शकते पण झालेल्या चुकीला सद् सद् विवेकबुद्धीने सुधारता येते हे बुधबृहस्पतीच्या कहाणीतली धाकटी सुन सांगून जाते.

सत्य कितीही लपवले तरी शेवटी ते बाहेर येतेच हे  शुक्रवारची जीवतीची कहाणी सांगते. तर गरीब बहिणीचे नाते झिडकारून उपरती होणाऱ्या भावाची –शुक्रवारची देवीची कहाणी आहे. लक्ष्मी चंचल आहे, आज नसेल तर उद्या उदंड वर्षाव करते –दिवस पालटणार, म्हणुन  श्रीमंतीचा वृथा अभिमान बाळगु नये हा बोध या कहाणीतुन मिळतो.

शनिवारची मारुतीची कहाणी आहे. तसेच संपत शनिवारची कहाणी आहे. आपल्याकडे जे आहे त्यातले थोडे तरी गरजूंना द्यावे –हीच खरी संस्कृती, हे या कहाणीत सांगितले आहे, “अतिथी देवो भव” हा विचारही या कहाणीतुन दिसतो.

सात वारांच्या या कहाण्या प्रमाणेच इतरही सणांच्या कहाण्या श्रावणात आवर्जुन वाचल्या जातात, नागपंचमीच्या दोन्ही कहाण्यातुन पशुप्राण्यांबाबत कसे भाव असावेत हा बोध मिळतो,आपण प्रेमाने जोपासना केली तर त्यांच्यापासून भय बाळगण्याचे कारण नाही हे लांडोबा पुंडोबाच्या कहाणीत दिसुन येते..

नागपुजा प्रातिनिधिक म्हणुन केली जात असेल पण तशीच प्रेरणा घेऊन सर्पमित्र सारख्या संघटना काम करत असतात.

वर्णसटीच्या कहाणीतील ७व्या मुलीने दिलेले उत्तर “मी माझ्या नशीबाची” यावरुन व्यक्तिचे यशापयश  स्वकर्तृत्वावर ठरते. पण त्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा असतो.  अलिकडच्या काळात सिनेजगत, राजकारण, काही व्यवसायातील वाढते नेपोटिझम बघतांना या कहाणीची आठवण होते.

निसर्गाच्या चेतनाशक्तीतला महत्वाचा स्त्रोत “आप” “जल”. त्याचे महत्व आणि पुजन शितलासप्तमीच्या कहाणीत आहे. सध्या आपल्यापुढे “पाणी” हा ज्वलंत प्रश्न आहे भविष्यात आणखी गंभीर होणार आहे, म्हणुन जलसंधारण, जलसंवर्धन,काटकसरीने वापर, —एवढे मार्गदर्शन या कहाणीतुन घेतले पाहिजे.

पिठोरी अमावस्येची कहाणी—

मुलाबाळांचे आरोग्यसंवर्धन — म्हणजे पुढची पिढी सुदृढ बनवणे — याचे महत्व त्रिकालाबाधित आहे, हल्ली, १, २च अपत्ये असल्यामुळे, नानाविध सुविधांमुळे जागरुकता नक्कीच निर्माण झाली आहे, पण बरेचवेळा बाहेरचे, फास्टफूड, डबाबंद पदार्थ यांचे वाढते प्रमाण, तसेच बदलती जीवन शैली —यामुळे लहान वयात च गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात, अर्थात, हे सार्वत्रिक विधान नाही, तरीही जागरुकता हा बोध या कहाणीतुन घेता येईल.

अशी ही श्रावण महिन्यातील कहाण्यांमधुन घेता येणाऱ्या बोधाची —   साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपुर्ण.

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पा य री ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 ☆ पा य री ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“स्वतःची पायरी ओळखून वागायला शिका !”

असा उपदेश देणारे आणि तो ज्या व्यक्तीला योग्य प्रकारे कळेल असे घेणारे, असे दोघेही सांप्रतकाळी लोप पावलेले आहेत ! त्याला कारणं काहीही असतील, पण हे वाक्य ऐकून घेणाऱ्याला त्या काळी या एका वाक्या मागील शब्दांचा मार इतका जिव्हारी लागायचा, की ती व्यक्ती एखाद्या फिनिक्स पक्षा प्रमाणे चांगल्या अर्थाने बंड करून उठे !

हल्ली असा शेलका उपदेश कोणी कोणाला द्यायच्या भानगडीत पडत नाही, कारण आजकाल सगळ्याच लोकांची मानसिकता वेगळ्याच पायरीवर गेल्यामुळे असं होत असावं ! मुळात वर म्हटल्या प्रमाणे असं कोणी कोणाला बोलायच्या भानगडीत हल्ली पडतच नाही, लोकं लगेच त्याच्या पुढची पायरी गाठून हात घाईवरच येतात आणि ताबडतोब मुद्द्यावरून गुद्यावर ! भांडण तंटा मिटवायची मधली कुठली तरी पायरी असते हे रागाच्या भरात विसरूनच जातात ! मग अशा वेळी त्या तंट्याचे पर्यवसान कशा प्रकारे होतं, हे आपण रोज पेपरात वाचत असतोच ! जसं की, बापाने तरण्या ताठ्या मुलावर हात उचलला, म्हणून रागाच्या भरात त्याने आत्महत्या करण्या पर्यंतची पायरी गाठली किंवा एखाद्या मुलाने, आपल्या वडिलांनी नवीन मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून स्वतःच्या जन्मदात्यावरच चाकूने हल्ला करून, नको इतकी टोकाची पायरी गाठलेली असते ! असो !

“अहो काय सांगू तुम्हांला, या वयात सुद्धा मी त्या अमुक तमुक देवळाच्या आठ हजार पायऱ्या चढलो ! अजिबात कसला त्रास म्हणून झाला नाही बघा, सगळी त्याचीच कृपा !”

आपण कुठंतरी घाई घाईत महत्वाच्या कामाला, चाळीच्या जिन्याच्या पायऱ्या उतरून जात असतो आणि आपल्याला एखाद्या पायरीवर उभं करून, चाळीतले अप्पासाहेब आपल्याला हे ऐकवत असतात ! चाळीच्या दोन जिन्याच्या फक्त चाळीस पायऱ्या चढून वर आलेल्या अप्पाना, वरील वाक्य बोलतांना खरं तर धाप लागलेली असते, पण आपण सुद्धा, “हॊ का, खरंच कमाल आहे तुमची अप्पासाहेब, या वयात सुद्धा तुम्ही बाजी मारलीत बुवा !” असं बोलून आपली सुटका करून घेतो !  देव दर्शनाला कोणी किती पायऱ्या कुठे चढाव्या अथवा कुठे उतराव्या, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न ! मी बापडा उगाच त्यांच्या श्रद्धेच्या पायऱ्यांच्या आड कशाला येऊ ? मग याच अप्पाकडून कधीतरी ऐकलेले “ईश्वर सर्वव्यापी आहे, फक्त तो बघायचा भाव मनी हवा, की त्याचे दर्शन झालेच म्हणून समजा !” हे त्यांचे वाक्य आठवते ! पण मी स्वतःची पायरी ओळखून असल्यामुळे, अप्पासाहेबांना त्यांच्या या वाक्याची आठवण करून देत नाही इतकंच ! उगाच कशाला आपण आपली पायरी सोडून बोला !

“शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये” असा उपदेश पूर्वीचे बुजुर्ग लोकं त्या काळच्या तरुण पिढीला करत ! हे सांगतांना त्यांनी स्वतः किती वेळा, किती कारणांनी कोर्टाची ती पायरी चढल्ये हे सांगण्याचे मात्र शिताफिने टाळत ! एकंदरीतच कोर्टाची पायरी चढण्या मागे कुठलाच शहाणपणा नाही, उलट वेळ आणि पैशाचा नको इतका अपव्यय ती एक पायरी चढल्या मुळे होतो, हे खरं तर त्यांना यातून सांगायचं असावं ! या  सिद्धांता मागची कारणं काहीही असली तरी, काही वेळा काही भांडण तंट्यानी इतकी टोकाची पायरी गाठलेली असते, की ती सोडवण्यासाठी शेवटी दोन्ही वादी आणि प्रतिवादींना ती नको असलेली कोर्टाची पायरी चढल्या शिवाय गत्यंतरच उरत नाही ! मग स्वतःच्या सांपत्तीक पायरी प्रमाणे, ते वादी आणि प्रतिवादी दोन नामांकित वकील करून आपापली केस, कोर्टाच्या कंटाळवण्या पायरीवर सोडवायचा चंग बांधतात ! त्यांना त्यांची कोर्टाची पायरी लखलाभ ! असो !

काही थोर लोकांनी समाजाबद्दलची बांधिलकी जपतांना, स्वतः वेगळ्या अर्थाने पायरीचा दगड बनून, अनेक जणांना यशाच्या शिखरावर बसवलेल आपण पाहिलं असेलच ! अशा प्रकारचा पायरीचा दगड बनणे सर्वांनाच जमतं असं नाही ! त्यासाठी मुळात अशा दगडाची जडण घडणच वेगळ्या प्रकारची झालेली असावी लागते ! अनेक न दिसणारे, छिन्नी हातोड्याचे घाव, अशा दगडांनी आपल्या आत झेलून लपवलेले असतात, याची आपल्या सारख्या सामान्य लोकांना कल्पनाच नसते ! याच घावांना लक्षात ठेवून हे दगड, आपल्या पुढच्या पिढीला असे घाव सोसावे लागू नयेत म्हणून, अनेकांसाठी पायरीचे दगड बनून समाजऋण फेडायच कामं इमाने इतबारे, स्वतः अलिप्त राहून करत असतात ! समाजातील अशा महान व्यक्तींचा हा आदर्श, थोडया फार प्रमाणात जरी आपण डोळयांपुढे ठेवून, आपल्या कुवती प्रमाणे, समाजाच्या कल्याणासाठी छोटीशी का होई ना, पायरी बनायला कोणाला कुठलीच अडचण नसावी असं मला वाटतं ! मंडळी, मला स्वतःला असं वाटून काय उपयोग आहे म्हणा ? शेवटी, हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक, वैचारिक पातळीवरील पायरीचा प्रश्न आहे ! पण आपण सर्वांनीच, अगदी माझ्यासकट, अशी छोटीशी पायरी होण्याचा प्रयत्न करायला कोणाची हरकत नसावी, असं मला मनापासून वाटतं ! बघा विचार करून !

शुभं भवतु !

© प्रमोद वामन वर्तक

१६-०३-२०२२

मोबाईल – 9892561086

ताजा कलम – आता थोडयाच दिवसात आपल्याला “पायरी हा ss पू ss स ss” अशा आरोळ्या कानावर यायला लागतील, तर त्यातील त्या “पायरीवर” पुन्हा कधीतरी !

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डाॅ. एस्. आर. रंगनाथन् ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

डाॅ. एस्. आर. रंगनाथन् ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

विज्ञानाचे किंवा शास्त्राचे अनेक प्रकार आपल्याला माहित आहेत.पण असेही एक शास्त्र आहे की आपण त्याचा उपभोग घेतो,पण ते शास्त्र आहे हे आपल्या सहजपणे लक्षात येत नाही.हे शास्त्र म्हणजे ग्रंथालय शास्त्र.

आज 12ऑगस्ट.हा दिवस  रंगनाथन यांचा जन्मदिवस.हा दिवस भारतात रंगनाथन् दिन म्हणून  साजरा होतो. कारण त्यांना भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक मानले जाते.

शियाली राममृत रंगनाथन् यांचा जन्म 12/08/1892 ला तामिळनाडूत झाला. त्यांनी गणित विषयात एम्.ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. कोईमतूर, वाराणसी, उज्जैन, दिल्ली विश्वविद्यालय अशा अनेक ठिकाणी त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. 1924मध्ये त्यांना मद्रास विश्वविद्यालय पहिले ग्रंथपाल प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. 1945 ते 1947 या काळात त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात ग्रंथालय अध्यक्ष व ग्रंथालय शास्त्र अध्यापक या पदावर काम केले. 1962 साली बंगलोर येथे त्यांनी प्रलेखन अनुसंधान व प्रशिक्षण केंद्र या संस्थेची स्थापना केली व अखेरपर्यंत तेथे कार्यरत राहिले. 1965 साली भारत सरकारने त्यांना ग्रंथालय शास्त्रातील राष्ट्रीय शोध प्राध्यापक या पदवीने सन्मानित केले.

ग्रंथशास्त्राविषयी त्यांनी केलेले कार्य हे विशेष उल्लेखनीय आहे. ग्रंथांचे वर्गीकरण करणे, ते सूचीबद्ध करणे हे आज सोपे वाटत असले तरी त्याची सुरुवात रंगनाथन् यांनी केली. पुस्तक शास्त्राविषयी त्यांनी 50 कारणेअधिक पुस्तके लिहिली आहेत. शिवाय एक हजार हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. ग्रंथालय प्रशासन, ग्रंथालय शास्त्र, पुस्तकांविषयी कायदे अशा विषयांशी संबंधित पंचवीसहून अधिक  समित्यांचे  अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे व पदाधिकारी म्हणून काम केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या ग्रंथालयासाठी धोरण ठरवण्यातही त्यांचा सहभाग होता. या सर्व कार्याची दखल घेऊनच त्यांना ग्रंथालय  शास्त्राचे जनक असे म्हटले जाते. 1957 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री ने सन्मानित केले. तसेच विद्यापीठ अनुदान मंडळाच्या सल्लागार समितीतही त्यांना स्थान देण्यात आले होते.

ग्रंथाना गुरू मानण्याची आपली परंपरा आहे. पण या गुरूची सेवा कशी करावी याचेही एक शास्त्र आहे. ते आजच्या रंगनाथन्  दिनामुळे आपल्याला समजले आहे. आता हे शास्त्र समजून घेऊन ते आत्मसात करण्याने रंगनाथन् यांचा खरा गौरव होणार आहे.

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares