मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 25 – परिव्राजक –३. गाजीपूर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 25 – परिव्राजक –३. गाजीपूरडाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

गाजीपूरच्या लोकांबरोबर स्वामीजींच्या खूप छान वैचारिक चर्चा होत होत्या. आपल्या समाजात दूरवर शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. आपल्या संस्कृतीतील सत्वांश जाणून घेऊन समाजाला प्रेमाने विश्वासात घेऊन सुधारकांनी सुधारणा घडवून आणली पाहिजे. ती सहज प्रक्रियेतून व्हायला हवी. लादली जाऊ नये. शिक्षणाचा पाया आणि त्यातील तत्वे हिंदू विचारधारेवर आधारित असली पाहिजेत. जे चांगलं आहे ते गौरवपूर्वक मांडलं गेलं पाहिजे. हिंदू धर्मात मानले गेलेले आदर्श नीट समजून घेऊन समाजासमोर ठेवले पाहिजेत. असं समाजसुधारकांना बजावून सांगताना स्वामीजी म्हणतात, “ध्यानात ठेवा हिंदू धर्म हे काही केवळ चुकीच्या गोष्टींचे एक गाठोडे नाही. खोलवर बुडी मारा, तुमच्या हाताला अनमोल रत्ने लागतील. परक्या लोकांची संस्कृती आणि चालीरीती, यांच्या डामडौलावर भुलून जाऊ नका. आपली ही मातृभूमी कशी आहे ते समजून घ्या. आपल्या भारतीय समाजाचा जीवनहेतु काय आहे आणि त्याच्या अस्तित्वाची प्रेरणा कशात आहे, याचा तुम्ही शोध घ्या. आपल्या संस्कृतीतील आध्यात्मिक आदर्श आपण विसरून गेलो आहोत, हे आपले खरे दारिद्र्यपण आहे. आपल्या ठायी स्वत:च्या अस्मितेचे भान उत्पन्न होईल तेंव्हाच आपले सारे प्रश्न सुटतील”.

इथेच गाजीपूरमध्ये स्वामीजींच्या विचारांना एक आकार येत चालला होता. सतत आध्यात्मिक विचार तर होतेच डोक्यात, पण देशाच्या वर्तमानस्थितीबद्दल त्यांना चिंता सतावत होती आणि त्यातून बाहेर येण्याचा मार्ग शोधताना भविष्यातला दृष्टीकोण आकार घेत होता असे दिसते.

गाजीपूरला काही इंग्रज अधिकारीही होते. त्यातील दोघांशी स्वामीजींचा संवाद होत होता. अफू विभागात रॉस म्हणून एक अधिकारी होते, त्यांना हिंदू धर्म व त्यातले देवदेवता, उत्सव, सामाजिक चालीरीती, याचे खूप कुतूहल होते. काही रूढी आणि आचार उघड उघड सदोष होते, अशा आचारांना हिंदूच्या धर्मग्रंथात काही आधार आहे का याचं त्यांना कोडं पडलं होतं. मग स्वामीजींनी प्रतिसाद देत, धार्मिक कल्पनांचा विकास, आणि सामाजिक आचारांच्या मागे उभी असणारी आध्यात्मिक बैठक त्यांनी सांगितली. हे ऐकून हिंदू धर्मातला व्यापक दृष्टीकोण रॉस यांच्या लक्षात आला.

एकदा, रॉस यांनी तिथले जिल्हा न्यायाधीश पेंनिंग्टन यांची स्वामीजींशी भेट घडवून आणली. स्वामीजींनी त्यांच्या बरोबर हिंदू धर्माचे पुनरुत्थान, आजच्या विज्ञानामुळे होऊ घातलेले परिवर्तन, योगाच्या मागचा शास्त्रीय विचार, सन्याशांचा संयम आणि मनोनिग्रह यावर आधारित जीवननिष्ठा यावर संवाद साधला. स्वामीजींचा, मुलभूत मानवी शक्ति, प्रेरणा आणि साधना याबद्दलचा वेगळा दृष्टीकोण  पेंनिंग्टन यांना खूप आवडला. त्यांना वाटलं याचं तर आधुनिक मानसशास्त्राच्या आधारे विश्लेषण होऊ शकतं की. ते एव्हढे प्रभावित झाले की, ते म्हणाले, “हिंदूंचा धर्म आणि त्यांचा सामाजिक आचार याविषयीचे आपले विचार तुम्ही इंग्लंडला जाऊन तेथील विचारवंतांपुढे ठेवले पाहिजेत.”

“वादे वादे जायते तत्वबोध:” सतत तत्वचिंतन सुरू असल्याने स्वामीजींचे हे विचार  आतापर्यंत फक्त गुरुबंधु, आपल्या समाजाचे लोक यांच्यापुरताच मर्यादित होते. आज मात्र ते निराळ्या संस्कृतीत वाढलेल्या विचारवंतांपुढे मांडल्यामुळे त्याचे परिमाणच बदलले होते.

स्वामीजींच्या या समाधानकारक चर्चा तर चालू होत्याच, पण गाजीपूरला येण्याचा त्यांचा मूळ उद्देश होता, श्रेष्ठ आध्यात्मिक विभूति पवहारी बाबा यांची भेट घेणं. न्याय, वेदान्त, व्याकरण अशा सर्व शास्त्रांचा अभ्यास, भारतभर केलेला प्रवास, संस्कृत बरोबर इतर भाषांचे ज्ञान, सद्गुरूंकडून योगमार्गाची मिळालेली दीक्षा, त्याप्रमाणे वर्षानुवर्षे केलेली साधना आणि शेवटी शेवटी चालू असलेला निराहार अवस्थेतला एकांतवास व मौनाचा स्वीकार अशा तपश्चर्येचं तेज असणारे पवहारी बाबा. स्वामीजींची यांची भेट घेण्याची तीव्र इच्छा होती. त्यानंतर ते वाराणशी करून वराहनगर मठात आले. कारणही तसच होतं,  बलराम बाबू यांचं निधन झालं होतं, त्या पाठोपाठ सुरेन्द्र नाथांचे पण निधन झाले, त्यांच्या आध्यात्मिक परिवारात खूप मोठी पोकळी निर्माण झाली.

वराहनगर मठाची  व्यवस्था लावून, नंतर त्यांना हिमालयात जाऊन गढवाल च्या शांत परिसरात साधना करण्याची इच्छा होती. यावेळी त्यांचा भ्रमणाचा काळ जवळ जवळ सलग पावणेतीन वर्ष होता. आणि प्रदेश थेट हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंतचा, विविध प्रांत, भाषा, प्रदेश, अनेक प्रकारच्या व्यक्ती असा विविधतेने नटलेल्या भारताच्या भागात त्यांनी संचार केला. त्यांनी गाजीपूरला समाजसुधारकांना म्हटलं होतं की, ‘आपली मातृभूमी समजून घ्या’ त्याप्रमाणे ते ही याच उद्देशाने स्वदेश संचाराला निघाले होते.    

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बोलक्या भिंती….भाग 6 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बोलक्या भिंती….भाग 6 ☆ सौ. अमृता देशपांडे 

अंदमानच्या कारागृहाच्या भिंती मात्र स्वतःला धन्य समजत असतील. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांना तिथे बंदिवासात ठेवलं होतं.त्यांच्या कर्तृत्वाची आणि कवनांच्या शब्दांची उंची इतकी भव्यदिव्य होती की ती  कारागृहाच्या भिंती भेदून, छत फाडून गगनस्पर्शी झाली. कारागृहाच्या भिंतीही तेजःपुंज आणि पवित्र झाल्या.

या सृष्टीमध्ये निर्जीव वस्तूला सजीवता देऊन अमरत्व प्राप्त होण्याचा मान कुणाला मिळाला असेल तर तो छोट्याशा भिंतीलाच. ज्ञानतपस्वी श्री चांगदेवयोगी वयाच्या 113व्या वर्षी जेव्हा वायुमार्गाने वाघावरून

ज्ञानेश्वरांना भेटायला आले, तेव्हा श्री ज्ञानेश्वर माऊली आपल्या भावंडांसह छोट्याशा भिंतीवर सकाळी बसले होते. त्रिकालज्ञानी ज्ञानमाऊलीने बसलेल्या भिंतीलाच त्यांना सामोरे जाण्याची विनंती केली आणि ती निर्जीव भिंत आपले निश्चलत्व टाकून चारी भावंडांना आकाशमार्गे चांगदेवांना भेटायला घेऊन गेली. ते बघता क्षणीच चांगदेवांना अहंकार गळून पडला आणि त्यांनी चारी भावंडांच्या पायी लोळण घेतलं. ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत अमर झाली.

ही कथा आजच्या युगात अविश्वसनीय वाटेल , पण तेव्हा तसे घडले होते, हे खरे मानले तर ज्ञानेश्वरांचे देवत्व आणि भिंतीला मिळालेले सजीवत्व व अमरत्व हे ही खरे वाटू लागते.

अशा या भिंती,  बोलक्या आणि मुक्या सुद्धा! स्वतःचे अस्तित्व दाखवणा-या, ख-या, सुंदर, सकारात्मक आणि आनंदी.  सर्वच भिंती अशाच असाव्यात यासाठी आपण प्रयत्न करूया.  हो! फक्त घराच्याच नाही तर मनातल्या सुद्धा……

समाप्त…..🙏🏻

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बोलक्या भिंती….भाग 5 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बोलक्या भिंती….भाग 5 ☆ सौ. अमृता देशपांडे 

भिंतीवर कॅलेंडर लावले जाते, हे ठीक. पण कॅलेंडरच्याच भिंती पण तयार होतात. कुठे ??????

अहो, रसवंती गृहात!

नवनाथ, गणपती, शंकरपार्वती,  दत्तगुरू, साईबाबा, रामलक्ष्मणसीता, ज्योतिबा,  तुळजाभवानी,  अंबाबाई, तिरूपती यांच्या कॅलेंडरनीच बनलेल्या असतात त्या भिंती! हे सगळे जणू उसाचा रस प्यायला आलेले असतात, त्याचबरोबर राजेश खन्ना पासून रणवीर पर्यंत,  वैजयंती मालापासून आलिया भट पर्यंत  सर्व नटनट्या नटूनथटून हजर असतात. अशा रंगीबेरंगी भिंती,  चिमुकली टेबले आणि बाक, चरकाच्या घुंगरांचा खुळखुळ आवाज आणि आलेलिंबू घालून केलेला तो गोड गार उसाचा रस…अहाहा! त्या छोट्याश्या जागेत केवढा परमानंद असतो, ते तिथे बसून रस प्याल्याशिवाय कळणार नाही. अजूनपर्यंत अशा भिंती शिवाय असलेलं  एकही रसवंतीगृह मी बघितलं नाही.

माझ्या बाबांचे एक मित्र पोलीस होते.त्यांना भेटायला बाबा पोलीस चौकीत गेले होते, मी पण बरोबर होते. तिथे भिंतीवरचे ते गुन्हेगारांचे फोटो बघून मी इतकी घाबरले होते की त्या दिवशी जेवलेच नाही. पुढे कित्येक दिवस त्या भिंतींच्या आठवणींचा धसका मनात होता.

कारागृहाच्या भिंती हे अतिशय दारूण सत्य गुन्हेगारांना स्वीकारावंच लागतं. काळ्याभोर दगडांच्या उंच उंच भिंतींच्या आत काय आहे, हे बाहेरून कधीच कळत नाही. जगापासून दूर ठेवणा-या भिंतीही गुन्हेगारांना काही शिकवत असतील का?

क्रमशः…

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बोलक्या भिंती….भाग 4 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बोलक्या भिंती….भाग 4 ☆ सौ. अमृता देशपांडे 

घरांप्रमाणे आता कार्यालयातही भिंतीना असेच महत्त्वाचे स्थान आहे. नवीन पद्धतीप्रमाणे Corporate offices मध्ये कमी उंचीच्या फायबर ग्लासच्या पार्टिशन्स करतात,  हेतु हा की प्रत्येक कर्मचा-याची काम करताना एकाग्रता साधणे, अलगपणा जपणे, त्याचबरोबर सहका-यांना मदतही करणे. या छोट्या उंचीच्या  भिंतींचे विचार किती उच्च आहेत नाही?

चीनची भिंत पूर्वी पासून प्रसिद्ध. गेल्या शतकापासून या भिंतीला फक्त लांबीचे महत्त्व उरले आहे. कारण जगाने चीनकडे किंवा चीनने जगाकडे ही भिंत ओलांडून संबंध प्रस्थापित केले आहेत. त्याची उपयुक्तता आणि परिणाम किंवा सौहार्द की विनाश,  हा विषय वेगळा!

पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी मधली भिंत पडली. पण ती पडल्यानंतर खरंच पूर्व-पश्चिम जर्मनी तले अंतर कमी झाले व संबंध चांगले झाले.

शाळेच्या भिंतींची प्रत्येक वीट,  प्रत्येक चिरा वंदनीय असतात. भिंतीवरचे बाराखडीचे, अक्षरांचे, शब्दांचे, अंकांचे, पाढ्यांचे तक्ते,  सुविचारांनी रंगलेल्या भिंती कोणीच विसरणार नाही.  वर्गात आता भिंतीवर फळ्याबरोबर digital screens ही असतात. मातीच्या गोळ्याला सुबक आकार देऊन छोटुल्याला मोठा करणा-या शाळेच्या भिंतीं…..

क्रमशः…

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ते, ती आणि मी कुकरी क्लासेस ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 ते, ती आणि मी कुकरी क्लासेस !😅💃श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“पंत, पंत, पंत हे आता तुम्हीं नवीन कुकरी क्लासच काय काढलंय मधेच ?”

“अरे मोऱ्या थांब थांब, असं ओरडायला काय झालं तुला एकदम आणि आमचा पेपर आणलास का ते सांग आधी ?”

“आणलाय, हा घ्या आणि बोला !”

“काय बोलू मोऱ्या ? मस्त पावसाला सुरवात झाल्ये ! वाटलं नव्हतं की हा परत इतक्या लवकर येईल !”

“पंत, मी तुम्हांला तुम्हीं चाळीत चालू करणार असलेल्या कुकरी क्लास बद्दल विचारतोय आणि तुम्ही पावसाचं काय सांगता आहात मला !”

“अरे मोऱ्या मला वाटलं असा मस्त पाऊस पडतोय तर तुला काकूच्या हातचा आलं घातलेला चहा हवा असेल आधी, म्हणून म्हटलं !”

“पंत चहाच नंतर बघू ! आधी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या !”

“कुठला प्रश्न मोऱ्या ?”

“तुम्ही चाळीत कुकरी क्लास चालू करणार आहात आणि त्याला लेले काका, जोशी काकांच ऑब्जेकशन आहे आणि चाळीचा सेक्रेटरी या नात्याने त्या दोघांनी माझ्याकडे तशी लेखी तक्रार पण केली आहे !”

“मोऱ्या, त्या घाऱ्या जोशाला आणि त्या बिनडोक लेल्याला काडीची नाही  अक्कल, तेव्हा तू त्यांच्याकडे अजिबात लक्ष देवू नकोस !”

“असं कसं पंत, चाळीचा सेक्रेटरी या नात्याने मला त्यांच्या तक्रारीची दखल घेणं भाग आहे !”

“बरं बरं, काय तक्रार आहे त्यांची?”

“तुम्ही हा कुकरी क्लास चाळीत सुरु करू नये असं त्यांच म्हणणं आहे आणि त्या लेखी तक्रारीवर पाठिंबा म्हणून 23 चाळकऱ्यानी सह्या पण केल्या आहेत !”

“अरे पण का ?”

“पंत, कारण मागे तुम्हीं चाळीत योगासनाचे फुकट वर्ग चालू केलेत, त्यात जोशी काकूंचा पाय फ्र्याक्चर झाला होता, आठवतंय ना ?”

“नं आठवायला काय झालंय मोऱ्या ? अरे ही गेल्या महिन्यातच घडलेली गोष्ट ! अरे मी त्या बयेला सांगितल, की हे विचित्रासन तू करू नकोस, तुझं वजन जास्त आहे ! तरी ऐकायला म्हणून तयार नाही ती बया आणि घेतलान पाय फ्र्याक्चर करून, त्याला मी काय करणार ?”

“आणि लेले काकूंच्या हाताचं काय ?”

“अरे मोऱ्या मी त्या महामयेला म्हटलं, हे मयुरासन तुला जमेल असं वाटत नाही तर तू ते करू नकोस, त्या ऐवजी मी तुला दुसरं आसन सांगतो !”

“मग ?”

“मग काय मग मोऱ्या ? अरे लेल्याची बायको शोभयला नको ती महामाया, तो एक हट्टी तर ही दहा हट्टी !”

“म्हणजे ?”

“अरे हट्टास पेटून केलेन तीन मयुरासन आणि घेतलान हात मोडून, त्याला मी कसा जबाबदार सांग बरं मला ?”

“बरोबर आहे तुमच पंत, पण तुम्ही हा कुकरी क्लास चालू करू नये असं त्यानी तक्रारीत म्हटलंय, म्हणून मी तुमच्याकडे आलो !”

“अरे पण मोऱ्या, हा कुकरी क्लास सुद्धा मी योगाच्या क्लास सारखा फुकट चालू करतोय, तर त्याला त्यांच का ऑब्जेक्शन हे सांगशील का मला जरा ?”

“सांगतो ना पंत, हा कुकरी क्लास चाळीत सुरु करून तुम्ही चाळीत हिंसेचा प्रचार आणि प्रसार करणार आहात, असं त्यांच म्हणणं आहे !”

“हिंसा ?”

“हॊ, आता तुम्ही कुकरीचे क्लास घेतांना, ती कशी चालवायची, कसे वार करायचे, कशी फेकून मारायची हेच शिकवणार नां? मग एक प्रकारे हा हिंसेचा प्रचार आणि प्रसारच नाही का ?”

“बघितलंस, बघितलंस काय अकलेचे दिवे पाजळतायत तुझे लेले काका आणि जोशी काका !”

“म्हणजे ? मी नाही समजलो पंत !”

“मोऱ्या, अरे त्या दोन बैलांना वाटलं मी कुकरी क्लास घेतोय म्हणजे नेपाळी गुरखा लोकं जी कुकरी वापरतात, ती कशी चालवायची हे मी त्या क्लास मध्ये शिकवणार म्हणून !”

“हॊ, मला पण तसंच वाटलं, म्हणून मी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नां पंत !”

“मोऱ्या गाढवा, अरे तू तर चांगला शिकला सवरलेला आजचा तरुण आणि तुला कुकरीचा तोच एक अर्थ माहित आहे ? दुसरा अर्थ माहित नाही ?”

“आहे ना पंत, जेवण बनवणे !”

“अरे बैला, मग त्या दोन नंदी बैलांना सांगितलं का नाहीस तसं ?”

“सॉरी पंत, पण तेंव्हा लक्षात आलं नाही माझ्या.  पण मग तुम्ही तुमच्या क्लासच नांव ‘ते, ति आणि मी कुकरी क्लासेस’ असं विचित्र का ठेवलंय ?”

“मोऱ्या, जेवण करतांना अत्यावश्यक असलेल्या तीन पदार्थांच्या नावांचे शॉर्टकट आहेत ते !”

“म्हणजे काय पंत ?”

“अरे बल्लवा, तू…”

“पंत मी मोरू, हा बल्लव कोण आणलात तुम्ही मधेच ?”

“मोऱ्या, अरे मला तुला बैला म्हणायचं होतं पण चुकून बल्लवा असं तोंडातून बाहेर पडलं !”

“ठीक आहे पंत, पण ते तुम्ही तुमच्या कुकरी क्लासच्या नावाच्या शॉर्टकटच काहीतरी सांगत होतात !”

“हां, म्हणजे असं बघ, कुठलही जेवण करतांना आपल्याला तेल, तिखट आणि मीठ यांची गरज लागतेच लागते, हॊ की नाही ?”

“बरोबर पंत !”

“मोऱ्या, म्हणूनच आजच्या तुमच्या जमान्यात शोभेल असं ट्रेंडी नांव मी माझ्या कुकरी क्लासला दिलं आहे !”

“धन्य आहे तुमची पंत !”

© प्रमोद वामन वर्तक

०८-०७-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बोलक्या भिंती….भाग 3 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बोलक्या भिंती….भाग 3 ☆ सौ. अमृता देशपांडे 

सर्वसाधारणपणे घराच्या बाहेरच्या भिंतींवरून इमारतीचे आकारमान,  घरमालकाची आर्थिक सुस्थिती आणि बांधकामाचे कौशल्य व्यक्त होते. खरी ओळख असते ती, घरातल्या आतल्या भिंतींची,.

पूर्वी भिंतीवर पूर्वजांचे फोटो, अर्थात ब्लॅक अॅड व्हाईट.  देवांचे फोटो,  राजा रविवर्म्याची चित्रे ओळीने लावलेली असत. आता एखादी कलाकृती,  नैसर्गिक देखावा यांच्या फ्रेम्स असतात. हल्ली चायनीज शुभचिन्हे लावायची फॅशन आहे. भिंतीवर ची अशी प्रतिके घरातल्यांची मनोवृत्ती व्यक्त करतात.

हल्ली खूपशा घरात वास्तुशास्त्रानुसार फ्रेम्स आणि पिरॅमिड्स असतात. जास्त करून बहुमजली सदनिकांमध्ये अशा प्रकाराच्या वस्तू असतात. सहाजिकच आहे, कष्टांनं मिळवलेल्या वास्तूमध्ये सुख, शांती, समाधान,  प्रगती असावी असे वाटणे नैसर्गिक आहे आणि तसे उपाय करणे, आवश्यक आहे.

मी एकदा माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते.  तिच्या घरात एकदम सुने सुने वाटत होते. एकाही भिंती वर एकही चित्र, फोटो, फ्रेम्स काहीच नाही.  भिंती अगदी ओक्याबोक्या दिसत होत्या. मला तिची मनःस्थिती माहीत होती. 5-7 वर्षापूर्वी तिचे यजमान गेले. मुले लहान होती. बिचारी कशीबशी संसार पुढे रेटत होती. त्या भिंतींच्या मुकेपणाने तिचं मुकेपण व्यक्त होत होतं.

काही वर्षांपूर्वी भिंतीवर कॅलेंडर असायचेच. एकच नव्हे तर अनेक दिनदर्शिका लावल्या जायच्या. पण आता कॅलेंडर मोबाईल वर उपलब्ध आहे.  त्यामुळे कॅलेंडर भिंतीवरून हातात आले आहे.

ठराविक भिंती ला ठराविक रंग देणे याचाही नियम आहे. अंतर्गत सजावट करणारे व रंगारी लोकां ना ते बरोबर माहीत असतं. भिंतींच्या रंगाचा तिथे रहाणा-या लोकांवर व त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो.

क्रमशः…

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बोलक्या भिंती….भाग 2 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बोलक्या भिंती….भाग 2 ☆ सौ. अमृता देशपांडे 

औद्योगिकीकरण, शहरीकरण,  पाश्च्यात्यांचे अनुकरण यांच्या प्रभावाने पुढे पुढे जाणारा काळ नवी नवी स्थित्यंतरं घडवू लागला. सामाजिक आणि कौटुंबिक जीवन झपाट्याने बदलले. नवीन बदलांना आत्मसात करताना काही आधीच्या गोष्टी,  वस्तू,  चालीरीतींची जागा नवीन बदलांनी घेतली.

वाडांच्या जागी चाळी आल्या. घरे आली, अपार्टमेंट्स आली. बंगले बांधले गेले. बहुमजली इमारती आल्या. या बदलात एक घटना प्रकर्षाने जाणवली.  ती म्हणजे घरांची संख्या वाढली.  भिंती वाढल्या. तशाच नात्यातही भिंती आल्या. हे कालानुरूप घडणारच होतं.

त्याचबरोबर एक चांगली गोष्ट ही घडली,  ती म्हणजे प्रत्येक भिंती प्रमाणे त्या घरात रहाणा-या प्रत्येक व्यक्तीला स्वतःची ओळख मिळाली. भिंत म्हणजे व्यक्तिचं प्रातिनिधिक रूप असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये.  प्रत्येक भिंतीला, प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं व्यक्तिमत्व प्राप्त झाले. शतक ओलांडताना झालेला हा बदल अपरिहार्य होता.

कुठलाही बदल होताना सुरवातीला विरोध होणे, धुसफूस, भांडणे,  नाराजी,  असहकार व्यक्त होणे असतेच. इथेच मनावर झालेले संस्कार आपला प्रभाव दाखवतात. घडणारे बदल स्वीकारताना,  त्यानुसार स्वतःत बदल करताना मानसिक क्षमता गरजेची असते. ती नसेल, तर अशा व्यक्तीच्या मनात नेहमीच असुरक्षितता असते.

पूर्वी चे एकत्र कुटुंब अलग होऊन प्रत्येकाचे घर वेगळे,  संसार वेगळा,  राहणीमान वेगळे झाले. एकत्र असण्याचे संस्कार असलेलीच मने अशा प्रसंगी न दुरावता, प्रत्येकाच्या अस्तित्वाची प्रतिष्ठा जपत,  आपुलकीने घट्ट बांधलेली असतात. पण दुस-याच्या मनाचा विचार करण्याचा मोठेपणाही घरातल्या वडीलधा-या व्यक्तींच्या जवळ असला तरच हे शक्य होते.

अशा मनांचे,  व्यक्तित्वांचे प्रातिनिधिक रूप म्हणजेच या भिंती,  काही बोलक्या,  काही मुक्या !

क्रमशः…

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बोलक्या भिंती….भाग 1 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बोलक्या भिंती….भाग 1 ☆ सौ. अमृता देशपांडे 

भिंतीला कान असतात.  हो, खरंय! आणि त्या दोन कानांमधला चेहराही असतो. त्यावर नाक, डोळे,  गाल, कपाळ,  ओठ  सर्व असतं. त्यामागे अव्यक्त मनही असतं.

लहानपणी आम्ही वर्षातून एकदा बाबांच्या आजोळी जायचो. मोठ्ठा वाडा होता. पडवीतून पाच सहा पाय-या चढून गेलो की सोपा होता, तिथे  एक मोठा कडीपाटाचा झोपाळा होता. भिंतीवर खुंट्या,  आणि कोनाडे होते. कलाकृतींच्या फ्रेम्स होत्या. बटणांचे बदक आणि कापसाचा ससा.  कुणाची कलाकुसर कोण जाणे! खूप जुनी वाटत होती.

त्याकाळी भिंतीवरच्या खुंट्या हे टोप्या, पगड्या, फेटे,आजोबांच्या काठ्या,  कोट, बंड्या, छत्-या, यांचे निवासस्थान असे. शेतक-याच्या घरात खुंट्यावर टोपल्या, इरली,  कोयते, विळे, चाबूक,  शेतातली गोफण टांगलेली असे. जमीनदारांच्या घरात खुंट्यांवर,  भिंतींवर बंदुका,  घोड्यावरचे जीन, वाघाचे तोंड, हरणाचे कातडे,सांबराची शिंगे अशा वस्तू मालकांच्या शौर्याची व मर्दुमकीची ओळख देत. माजघरातल्या खुंट्यांवर लुगड्यांचे वळे, परकर, पोलक्यांच्या घड्या टांगलेल्या असायच्या. काचेच्या बांगड्या ही असत. परसदारीच्या सोप्याला खुंट्यांवर कोयता, रहाट, विळे  असत. एका खुंटीवर कै-या, चिंचा, पेरू पाडायची लगोरी रहाटाच्या मागे लपवून ठेवलेली असे. पालेभाजीच्या बुट्ट्या ही खुंटीवर असत. स्वयंपाकघरात खुंटाळीवर झारा, उलथने, डाव, चिमटा अडकवून ठेवत.

शहरातल्या घरातून खुंट्या छत्री, रेनकोट,  पिशव्या, मुलांची दप्तरे सांभाळत.

भिंतीतले कोनाडे ही नित्य लागणा-या वस्तू ठेवण्याची जागा. सोप्यातल्या कोनाड्यात चकचकीत पितळेचं तांब्याभांडं गार पाणी भरून ठेवलेलं असे. दुस-या कोनाड्यात पानदाणी,  माजघरातल्या कोनाड्यात फणेरपेटी,  सागरगोटे,  बिट्ट्या,  भातुकलीचा खेळ ठेवले जात.

अशा प्रकारे प्रत्येक वस्तूची जागा ठरलेली असल्याने घरातल्या प्रत्येकाला शिस्तीची सवय असे. कारण, घरातील जेष्ठ आजोबा आणि आज्जी यांची कडक, करारी, तितकीच प्रेमळ नजर सर्वांवर असे.

पूर्वीच्या भिंतींना मातीचा गिलावा असे. त्यामुळे नैसर्गिक रित्या घरात गारवा असे.

अशा शिस्तीच्या,  स्वच्छतेच्या बाबतीत काटेकोर असलेल्या पण तितक्याच एकमेकांच्या सहवासात प्रेमळपणे रहाणा-या अनेक सदस्यांचा परिवार प्रत्येकालाच साहचर्य,  सुखवस्तुपणा, याबरोबरच शारिरीक, मानसिक व भावनिक सुरक्षितता देत असे. जे पुढील काळात दुर्मिळ झाले.

क्रमशः…

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 24 – परिव्राजक – २. उत्तर भारत ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 24 – परिव्राजक – २. उत्तर भारत डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

हाथरस इथं स्वामीजी एकटे आले होते. मात्र आता तिथून निघताना बरोबर शरदचंद्र होते. हृषीकेशला जाताना सहारनपूरला उतरून साडेतीनशे किलोमीटर पायी अंतर कापायचे होते. स्वामीजींना सवय होती पण शरदचंद्र यांना हे सर्व परिवर्तन नवीन होते. सवय नव्हती. अंगावर सामान घेऊन पायी चालणे, जागा मिळेल की नाही विश्रांतीसाठी, याची खात्री नाही, मुक्काम कुठे असेल माहिती नाही, अशा अनिश्चित परिस्थितीत मध्ये प्रवास सुरू होता. तो त्यांना झेपत नव्हता. ओझं घेऊन चालू शकत नव्हते, स्वामीजींच्या हे लक्षात आलं आणि ते सामान त्यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतलं. शरदचंद्रांच्या लक्षात आलं की, हिमालयातील भ्रमणासाठी आपण घेतलेले बूट त्या सामानात आहेत. खूप शरमल्यासारखं झालं त्यांना. आपण ज्यांना गुरु मानतो त्यांच्याच खांद्यावर आपले बूट? पण स्वामीजींना त्याचं काहीही वाटलं नव्हतं.

नदी ओलांडताना तर बरं नसलेल्या शरदचंद्रांना घोड्यावर बसवून स्वत: घोड्याबरोबर पायी चालत गेले. काही वेळा पायी चालताना स्वामीजींनी शरदचंद्रांना खांद्यावर घेऊन प्रवास केला. अशी स्वामीजींनी आपली सेवा केली यामुळे त्यांचा स्वामीजींबद्दलचा आदरभाव आणखीन वाढला. त्या विचाराने मन भरून आलं. माणुसकीच्या दृष्टीकोणातून आपल्या शिष्याची जबाबदारी आणि काळजी घेणं हे स्वामीजींनी आपलं कर्तव्य मानलेलं दिसतं. एकूणच स्वामी सदांनंदांचे मठातले आगमन म्हणजे रामकृष्ण संघाच्या पुढच्या विस्ताराची नांदी ठरली होती.  

स्वामी विवेकानंदांना हे कार्य उभं करतांना सुरुवातीपासूनच अनेक खाचखळग्यातून व प्रसंगातून जावं लागलं. मठांमध्ये वेद वाड:ग्मयाचा अभ्यास झाला पाहिजे असं स्वामीजींचं मत होतं. वेदांच्या अभ्यासाकडे बंगाल मध्ये फार दुर्लक्ष झालं होतं. असं त्यांच्या लक्षात आल होतं. वेदांच्या अभ्यासासाठी एक उत्तम सोय असलेली संस्था उभी करावी असं त्यांना वाटत होतं. ते स्वत: भारतभ्रमण करतांना कोणी संस्कृत व्याकरणाचा पंडित भेटला की त्यांच्याकडून पाणीनीच्या व्याकरणाचे धडे घेत असत. भारतीय संस्कृतीचा वारसा स्पष्ट करत असताना त्यांच्या डोळ्यासमोर नेहमीच वेदातील ज्ञानकांडाचा भाग आणि उपनिषदे असत. कर्मकांडांचा अतिरेक झाल्यामुळेच समाजरचनेत दोष निर्माण झाला आणि त्यामुळेच संस्कृतीचा र्‍हास झाला असे त्यांचे निरीक्षण होते.

स्वामी विवेकानंद असेच बिहार आणि उत्तरेतील भागात खेड्यापाड्यातून पायी फिरले. खूप तीर्थाटन झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आचार-विचार, रिती-नीती, यांचा जवळून परिचय झाला. त्यांना दिसलं की जनतेत धर्माबद्दल आस्था आहे पण सामाजिक जीवनात गतीशीलता नाही. दोष धर्माचा नाही पण धर्माचा धंदा झाल्यामुळे समाजजीवन पंगु झालं आहे. अशा अनेक गोष्टी त्यांच्या लक्षात येत होत्या. त्यामुळे पुढे काय योजना करायची याचा विचार सतत त्यांच्या मनात चालू असे. मध्ये मध्ये वराहनगरला मठात पण फेरी व्हायची. सर्व गुरु बंधु एकमेकांना भेटल्यामुळे सर्वजणच आनंदी व्हायचे. पुन्हा आपापल्या ठरलेल्या भ्रमणास निघायचे.

कलकत्याहून ते पुढे गाझीपूरला जाताना मधेच अलाहाबादला महिनाभर थांबले. इथेही बंगाली समाज स्वामीजींचे विचार आणि त्यांचे व्यक्तिमत्व यामुळे भारावून गेला होता. समाजव्यवस्थेतील दोष आणि विषमता यावर स्वामीजींनी इथेही टीका केली होती.

स्वामीजी गाझीपूरला गेले आणि त्यांचा कलकत्त्यातलाच मित्र बाबू सतीशचंद्र मुखर्जी यांच्याकडे राहिले. इथेही अलाहाबादसारखाच बंगाली समाज गोळा झाला. इथे त्यांना वेगळाच अनुभव आला. इथल्या बंगाली समाजावर पाश्चिमात्य सुखवादी संस्कृतीचा मोठाच पगडा आहे असे त्यांनी पहिले. भारतीय संस्कृतीतला त्याग, सेवा, संयम अशा उदात्त असलेल्या जीवन मूल्यांचा पाश्चात्य संस्कृतीच्या झगमगाटामुळे आपल्या देशबांधवांना साफ विसर पडला आहे. याचे स्वामीजींना दु:ख झाले.

हे सगळे पाहता आजही पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा आपल्या समाजावर दिसतोच आहे. मुख्य म्हणजे संस्कृती वर प्रभाव पडून काही बदल होत आहेत. आज परिस्थिति तर खूप वेगळी आहे. त्याकाळात इंग्रजांचे राज्य होते त्यामुळे हा प्रभाव होता. आता तर सारं जगच एक खेडं झालं आहे. अंतर खूप असलं तरी तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलं आहे. पण आज कोरोंना सारख्या साथी नं सर्व जगालाच एका पातळीवर आणून ठेवलं आहे. पण त्याग, सेवा व संयम ही आपली भारतीय मूल्येच आज यातून बाहेर पडायला आपल्याला मदत करताहेत असं दिसतंय.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वच्छ मनाने जग बघू या… ☆ सौ. सीमा राजोपाध्ये ☆

? विविधा ?

☆ स्वच्छ मनाने जग बघू या… ☆ सौ. सीमा राजोपाध्ये ☆

सकाळपासून मन थोडं अस्वस्थ आहे  त्याचं कारण असं की सकाळी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली ..

कुरुंदवाडच्या अपंग चहा वाल्याची मुलगी वेटलिफ्टींग मध्ये मेक्सिको त देशाचं नेतृत्व करणार…

आता तुम्ही म्हणाल ..

ही इतक्या अभिमानाची गोष्ट आहे ..

आनंदाची गोष्ट आहे..

मग मला अस्वस्थ का वाटलं??तर त्याचं कारण असं की.. निश्चितच…..

इतक्या छोट्या गावातून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व एक मुलगी करते आणि तेही वेट लिफ्टिंग सारख्या प्रकारांमध्ये..

 ही गोष्ट अभिमानाची आहे कौतुकाची आहे..

पण त्या बातमीचा मथळा होता ना..

तो मला अस्वस्थ करून गेला..  कुरुंदवाडच्या अपंग चहा वाल्या ची मुलगी…

ही अशी करूण किनार या बातमीला  लावणे गरजेचे आहे का??

 जे घडले ते अभिमानास्पद आहे .कौतुकास्पद आहे..

त्यामागे त्या मुलीचे कष्ट आहेत मेहनत आहे ..

त्याच बरोबर अपंग असून चहा विकत असून आपल्या अत्यंत गरीब अशा परिस्थितीतून मुलीला अशा प्रकारामध्ये तयार केलं गेलं… त्या वडिलांचं ही खूप कौतुक आहे त्यांच्या घरी  आई मोलमजुरी करते आजीआजोबा भाजीपाला विकतात.

आर्थिक बळ कमीच ..

अशा परिस्थितीत देखील त्या कुटुंबानं आपल्या मुलीसाठी किंवा आपल्या मुलीच्या स्वप्नासाठी लागेल ते सर्व काही केल..

आणि समाजाला सार्थ अभिमान वाटावा असं त्या मुलींना काही करून दाखवलं..

 हे खरोखरच आनंद… अभिमाना  उत्साहाचं असताना अपंग चहा वाल्या ची मुलगी…

असा मथळा  का???

 

जे चांगले आहे त्याचं कौतुक करा ना …त्या चांगल्या मधला कमी पणा दाखवण्यात कसला आलाय मोठेपणा…

ती व्यक्ती अपंग आहे.. चहा विकते..  गरीब आहे. यांत तिचा काय दोष???

तिच्या मनाचा मोठेपणा बघा ना…

आपल्या मुलीसाठी वाट्टेल ते करायची त्याची तयारी बघा ना..  हातीपायी नीटअसलेली.. श्रीमंत माणसं मुलांसाठी मोठी मोठी स्वप्न बघतात.. सर्व काही मुलांना पुरवत असतात..

पण सगळ्यांचीच मुलं काही अभिमानाची कामं करतात च असं नाही ना..

उलट आपण अपंग असताना देखील मान वर करून स्वाभिमानानं ते लोक जीवन जगत आहेत आणि काहीतरी वेगळं  करूनही दाखवले आहे आयुष्यात..

हे कौतुकास्पद आहे .. त्याकडे लक्ष द्या ना…

 

मला काय वाटतं माहितीए का……

शारीरिक अपंगत्वापेक्षा मानसिक अपंग असलेल्या अशा व्यक्ती समाजासाठी घातक आहेत..

 ज्याना कोणत्या गोष्टीतून कसा आणि कोणता संदेश या समाजाला द्यावा हे समजत नाही…

कोणी हाता  पायानं अधू… कोणी डोळ्यांनं कमी..

मूक बधिर ..कर्ण बधिर..  असतात हो समाजात..

त् त्यांना आपला कमीपणा माहीत असतो..पण  तो स्विकारून त्याच्या बरोबर च अशी माणसं ही चांगलं जीवन जगतात… कधी कधी काही वेगळे .. अभिमानास्पद करून दाखवतात…

पण ..

अशा प्रकारच्या बातम्या देताना..मुख्य गोष्ट महत्त्वाची न मानता आशा प्रकारे त्यांची करूण कहाणी च समाजासमोर आणणं..

अशा बातम्या आपल्या चॅनेलवर दाखवून टीआरपी वाढवणे..

खरं तर…

हे असे लोक मानसिक अपंग आहेत.. आणि १००% हे  अयोग्य आहे..

 

वाजपेयी एका कवितेत म्हणतात

तन से हारा तो कुछ नही हारा…

पर..

मन से हारा वो सब कुछ हारा..

अगदी खरे आहे  हे..

आपण सगळीच परमेश्वराची लेकरे..

कुणाला काही जास्त..

कोणाला काही कमी.

देतो परमेश्वर ..

कमी आहे ते स्वीकारून आपण चारचौघांसारखं नाही हे मान्य करून… जर खरोखरच काही आदर्श अशा लोकांनी घालून दिले असतील तर त्याचं कौतुक झालं पाहिजे ना..

तसे करत असताना देखील त्यांची दयनीयता.. त्यांची लाचारी  जास्त ठळकपणे दाखवण्यात खरं मानसिक अपंगत्व  आहे..

 

तर मुद्दा असा की..

जे चांगलं आहे..

कौतुकास्पद आहे ..

त्यापासून समाजाला प्रेरणा मिळू शकते..

काहीतरी नवं करून दाखवायची आवड निर्माण होऊ शकते अशा गोष्टींना प्राधान्य देऊया…

अशा गोष्टी सर्वांसमोर येऊ द्या.. चुकून एखादा छोटा मोठा दोष.. कमीपणा असेल ..

तर  विशेष करून त्याच गोष्टीचं जास्त प्रदर्शन नको..

स्वच्छ मनाने जग बघू या..!!

© सौ.सीमा राजोपाध्ये..

8308684324

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares