आधार हा शब्द इतका सोपा आहे का? कोणाचा आणि कशाचा आधार वाटावा हे प्रत्येकाच्या नजरेतून आणि विचारातून वेगवेगळा असू शकतो. म्हणजे त्याची व्याख्या करणे कठीण आहे ना. पण आधार वाटावा ही भावनाही खूप सुखद आहे. ते मला जास्त भावते. प्रत्येकाला आधार हा हवा असतो पण स्वतःचा अहंम आड येतो. काहीजण खरच मान्य करतात की खरच आधार हा माझ्यासाठी खूप मोठे काम करतो माझ्या आयुष्यात. पण अशी ही काही लोक असतात त्यांना आधार हवा असतो पण त्यांना तो दाखवायचा नसतो. समोरून आधाराचा हात आला तरी तिथे त्यांचा अहंम आड येतो. अशी लोक मला खूप केविलवाणी वाटतात आणि मग त्यांच्यासाठी जिव कळवळतो पण ते ही त्यांना कळत नाही. हे असे का व्हावे हे कळत नाही पण असे असू नये असे माझे निर्मळ मत आहे. हे मान्य आहे की आपल्या कमकुवत बाजूचा लोक गैरफायदा घेतील ही पण मनात एक भीती असते. पण त्यावेळेला हे तरी विचारात घेण्यासारखे असते की आधार देणारा हात कोणाचा आहे. आणि प्रत्येक वेळेला आधारासाठी पुढे आलेला हात हा काही स्वार्थ मनात ठेऊनच आधार देत नसावा. त्याच्या मागे त्याचे निर्मळ मन न दिसावे ही खंत आहे. आणि कदाचित आधाराला पुढे येणारा हात हा मैत्रीचा असू शकतो किंवा त्याला पण तुमच्यातला चांगुलपणाची जाणीव असावी म्हणून पुढे येत असेल? खूप मोठे प्रश्न चिन्ह आहे माझ्या मनात???
आधार हा खूप गोष्टीं मधून मिळू शकतो. तो शब्दातून मिळतो, स्पर्शातून मिळतो किंवा निव्वळ नजरेच्या एक कटाक्षात पण आधार असतो. किती छान भावना आहे खरं तर ही… सोपी निर्मळ निस्वार्थी… ज्याला आपली गरज आहे त्याच्या पाठीशी नाहीतर त्याच्या सोबत राहणे आणि त्याच्या बरोबरीने त्याला साथ देणे.
प्रत्येक वेळेला पैसा हाच आधाराचा मुद्दा नसतो ना? नुसते…. मी आहे ना…. हे शब्द ही खूप समाधान देऊन जातात. मनातला एक कोपरा त्याने चिंब भिजून जातो… ओलावा वाढतो… मनाची ताकत वाढवतो.
आधार घेणे किंवा मागणे हे कमीपणाचे असूच शकत नाही. खूप निर्मळ संवेदना आहे ही जी एकाच्या मनात दुसऱ्या बद्दल निर्माण होते. आधार देणारा हा मनाने खंबीर असतो पण प्रत्येक वेळेला नाही होत असे. समोरच्यावर जीव ओवाळून टाकताना आधार देणारा हा मनाने खचला असला तरी त्या समोरच्या माणसाला आधार देतोच ना…
आधार या भावनेला वयाचे बंधन नसतेच मुळी. आपल्या लहान बाळाच्या प्रांजळ नजरेचा त्याच्या स्पर्शाचा ही आपल्याला कधी कधी आधार असतो जगण्याची उमेद देतो. आपण पण तो आधार खूप प्रामाणिक पणे मान्य करायला शिकायला हवे.
खऱ्या मित्र मैत्रिणीच्या मैत्रीला पण आपण आधारच म्हणतो ना… राधेला कृष्णाच्या बासरीच्या सुरांचा आधार मान्य करतो… वारकऱ्याला वारी मध्ये विठ्ठलाच्या भक्तीचा आधार असतो. बुडत्याला काठीचा आधार अशी म्हण पण मराठीत आहेच की… अशी किती पैलू आहेत आधार या शब्दाला.
देव आहे की नाही हा मुद्दा मला इथे मांडायचा नाहीये तो विषयच नाहीये माझा कारण मी कामालाच देव मानते आणि त्याच्याशी खूप प्रामाणिक राहते. हीच माझी देवाबद्दल श्रद्धा आहे. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या रूपाने तो देव सापडतो आणि त्याची श्रद्धा पण तो मनात बाळगत असतो. मग ही श्रद्धा म्हणजेच आधार आहे का? हा विचार माझ्या मनात रुंजी घालतोय आणि असे वाटते खरंच ही देवावरची कामावरची श्रद्धा म्हणजे पणआधारच आहे. आपण त्या देवावर कामावर विश्वास ठेवतो आणि जगणे आनंदी व्हावे म्हणून आपण नकळत किंवा जाणून बुजून त्याचा आधारच घेत असतो.
☆ विचार–पुष्प – भाग 16 – मी कोण होऊ? ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
आपल्याकडची सामाजिक परिस्थिति बघून नरेंद्र ने सामाजिक कामात लक्ष घालायचे ठरवले होतेच .त्याप्रमाणे शहरातील सामाजिक घडामोडींवर तो लक्ष ठेऊन होता. यावेळी ब्राह्मो समाजाचे काम पण सुरू झाले होते. हिंदू धर्मातील बराचसा भाग कालबाह्य रूढीवर आधारलेला होता. असे दिसत असले तरी आधुनिक काळात उपयोगी असलेल्या अशा पुष्कळ गोष्टी भारतीय अध्यात्मविचारात होत्या. आणि पश्चात्यांकडच्या चांगल्या गोष्टी आपण स्वीकाराव्यात अशाही होत्या. त्या समाजाला माहिती करून देणं आवश्यक होतं.
मग राजाराम मोहन राय यांनी सुवर्ण मध्य काढून ब्राह्मो समाज स्थापन केला. इथे पारंपरिक धर्मात सुधारणा करण्याचा उद्देश होता. धर्म सुधारला तर आचरण सुधारेल, आचरण शुद्ध झाले तर, सामाजिक प्रगतीचा पाया घातला जाईल. पुढे पुढे अनेक सुधारणा व कार्य या ब्राह्मो समाजाने केलं. त्यात जातीभेद निर्मूलन, सर्व मानव समानता, स्त्री शिक्षणाला महत्व, विवाहाची वयोमार्यादा वाढवणे, मिशनर्यांच्या कार्याला आळा घालणे अशी कामे होत होती. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, केशवचंद्र सेन हे तरुणांच्या स्फूर्तीस्थान बनले होते.
ब्राह्मो समाजाचे काम नरेंद्रला आवडत होते. सामाजिक सुधारणा या उद्दिष्टामुळे तो याकडे आकर्षित झाला होता. पण त्याची अध्यात्माची ओढ तशीच कायम होती. ती कमी नाही झाली. ईश्वर विषयक जिज्ञासा पण कायम होती. उलट जस जसे वाचन होत होते, अनुभव मिळत होता तसतसे त्याची चिकित्सक वृत्ती जास्तच धारदार झाली होती. कारण त्याच्या अंत:करणात अध्यात्मिकतेचा नंदादीप लहानपणापासून सतत तेवत राहिला होता. याही काळात त्याची ध्यानधारणा चालूच होती.
रोज रात्री अंथरुणावर पडल्यावर त्याला आपल्या भावी जीवनाचे प्रश्न सतावत असत. जीवनात आपण काय करावयाचे? कोण व्हायचे? आपल्याला काय साध्य करायचे आहे ? आणि मग त्याच्या डोळ्यासमोर याचे उत्तर म्हणून दोन चित्रं उभी राहत. एक म्हणजे, लौकिक जीवनात सर्वार्थाने यशस्वी आणि कीर्तीमंत झालेला कर्तृत्ववान पुरुष. ज्याच्याकडे उत्तम ज्ञान आहे, समाजात ज्याला श्रेष्ठ स्थान आहे. सत्ता अधिकार आहे. पायाशी लक्ष्मी दासी होऊन उभी आहे. असा यशस्वी पुरुष.
आणि दुसरे चित्रं म्हणजे, याच्या अगदी उलटे. अंगावर भगवी वस्त्रे घालून हातात दंड, दुसर्या हातात कमंडलू, निर्मोही, निर्लेप आणि तृप्त वृत्तीने संचार करणारा सर्वसंगपरित्यागी सन्यासी. आपण संकल्प केला तर असा सन्यासी होऊ शकू. ते आपल्याला शक्य आहे अशी त्याला खात्री पण वाटत असे. संन्यासी का यशस्वी पुरुष? असा प्रश्न आलटून पालटून त्याच्या मनात सतत येत असायचा. असा विचार करता करता केंव्हा झोप लागायची ते कळायचेही नाही.
“शय्या भूमितलं दिशो~पि वसनं ज्ञानामृतं भोजनं” असे भर्तृहरींनी वर्णन केल्याप्रमाणे, ‘भूमी हीच शय्या, मोकळ्या दिशा हेच अंगावरील वस्त्र, आणि अमृतरूप आत्मज्ञान हेच भोजन’. असा पूर्णकाम संन्यासी एक साक्षात्कारी पुरुष असतो. साक्षात्कारी पुरुष म्हणजे ज्याला ईश्वराचे दर्शन झाले आहे तो. नरेंद्रला वाटे ईश्वर दर्शनाचा मार्ग कोण सांगू शकेल? ज्याला स्वताला ईश्वराचे दर्शन झाले आहे तोच आणि इथेच त्याच्या मनात तीव्र इच्छा निर्माण होई की, आपल्याला असे सांगणारा कोणीतरी भेटावा ज्याने देव पहिला आहे. अशी तळमळ त्याला सतत अस्वस्थ करीत असे. जे अधिकारी व श्रेष्ठ असे भेटत त्यांनाही तो जाऊन थेट प्रश्न विचारात असे. हे जाणून घ्यायला तो व्याकुळ व्हायचा.
याच वेळी नरेंद्रच्या लग्नासाठी विषय सुरू झाला होता. भुवनेश्वरी देवी आणि विश्वनाथ बाबू यांनी नरेंद्रला सर्व प्रकारे सांगून बघितले, चांगली स्थळ आणली. अनेक विद्वान व वडीलधार्यांनी समजाऊन सांगितले. पण नरेंद्रचा विवाहाला नकार कायम होता.
या वयात आपल्या आयुष्याचा इतका गंभीर पणे विचार करणे खरच किती आश्चर्याची गोष्ट होती. आजचा ग्रज्युएट होत असलेला तरुण आज त्याच्या आयुष्याच्या अशा वळणावर काय विचार करतो ? भविष्याबद्दल त्याला काही अंदाज बांधता येतात का? असा विचार मनात येतो.
☆ आंतरराष्ट्रीय रेडक्राॅस दिनानिमित्त – रेडक्रास सोसायटी ☆ डाॅ.ए.पी.कुलकर्णी ☆
कांही वर्षांपूर्वी प्रत्येक रूग्णवाहिकेवर तसेच डाक्टरांचे वाहनांवर रेडक्रास असावयाचा. डाक्टर वा अॕम्ब्युलंस चटकन ओळखता ये असे.
त्याच रेडक्रास बद्दल आज माहिती करून घेऊया.
आज ८मे जागतिक रेडक्रास दिन म्हणून साजरा केला जातो.
रेडक्रास या संस्थेची स्थापना हेन्री ड्युरंट यांनी (१८2८-१९१०)जिनेव्हा येथे केली.
यांची जन्मतारीख ८मे आहे. त्यांच्या स्मृती निमीत्त हा दिवस जागतिक रेडक्रास दिन म्हणुन साजराकेला जातो.
युध्दात जखमी, आजारी सैनिकांना कोणताही भेदभाव न करता योग्य ती मदत करणे हे या संस्थेचे मुख्य काम आहे.
ही संस्था स्थापण्या पुर्वी सुमारे १५८६ मध्ये जखमी सैनिकांना उपचार वा शुश्रूषा करणे साठी (फादर्स आॕफ गुडक्राॕस) स्थापन केली होती. याच सुमारास फ्रान्सचे सत्ताधारी ४थे लुईस यानीही शत्रू सैनिकांना ही चांगली वागणूक द्यावी असा आदेश दिला होता.
रेडक्राॕस संस्था स्थापण्या पूर्वी फ्लाॕरेंस नाईटिंगेल या परिचारिकेने युध्द भुमीवर जाऊन जखमी सैनिकांची सेवा शुश्रूषा केली होती.
२४जून १८५९ ला फ्रेंच व इटाली ही राष्ट्रे आणि आॕस्ट्रिया यांच्या मध्ये युध्द झाले. या युध्दात जवळपास चाळीस हजार सैनिक मृत झाले होते. जखमी सैनिकांची संख्याही खूप होती. जखमी सैनिकांकडे होणारे दुर्लक्ष व अनास्था पाहून हेन्री ड्युरंट खूप दुःखी झाले.
लढाईच्या जवळच्या गावातील चर्च मध्ये तात्पुरते रूग्णालय उभे करून सैनिकाना जमेल तेवढी मदत केली.
सन १८६२ मध्ये या कटू आठवणी लिहल्या. धर्म, जात, पंथ नागरीकत्व यात भेद भाव न करता या पीडीत सैनिकाना कशी मदत करता येईल असा विचार त्यांच्या मनात आला. या विचारांना संपूर्ण युरोप मध्ये अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला.
हेंन्री ड्युरंट व आणखी पाच स्वीस नागरिकानी समिती स्थापन केली.
या समितीसच आंतरराष्ट्रीय रेडक्राॕस समिती असे ओळखू लागले.
या नंतरच्या काळात थोर स्वीस मानवतावादी ड्युरंट हेन्री यानी रेडक्राॕस या संस्थेस संघटीत स्वरूप व स्थैर्य प्राप्त करून दिले म्हणूनच त्याना रेडक्राॕस चळवळीचे जनक मानले जाते.
आॕगष्ट १८६3 वर्षी झालेल्या बैठकीत संस्थेची मूलतत्वे व बोधचिन्ह निश्चित केले.
☆ वनौषधी संरक्षण…एक आव्हान आणि उपाय – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(ऋग्ण सेवा प्रकल्प तर्फे झालेल्या निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला लेख.)
वनौषधी संरक्षण – एक आव्हान आणि उपाय.
पैशाच्या लोभापायी झालेली वृक्षतोड, हा फार मोठा शाप त्याला लागलेला आहे.
दीड-दोनशे वयाची वड पिंपळाची झाडे काही वेळातच बिनधास्त तोडली जात आहेत. नव्हे त्यांची कत्तल होते आहे. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे “ही तुकोबांची उक्ती विसरत चालली आहे. त्यांच्या आधाराने राहणार्या पशु पक्षांची संख्या प्रमाणाबाहेर घडायला लागली आहे. अमृतासारखी कॅन्सर वर उपयुक्त औषध असणारी वनस्पतीची तस्करी व्हायला लागली आहे. चंदनाच्या बाबतीत तर काय सांगावे, त्याचा सुगंध हाच त्याचा शाप ठरला आहे. रक्तचंदन तर त्याहूनही दुर्मिळ होत चालले आहे. पुढील पिढ्यांना चंदन चित्रातच पहायला मिळते की काय, असं वाटायला लागलं आहे. चाळीस वर्षात औद्योगीकरण वाढलं. धूर, धूळ यामुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाली. 35 ते 40 टक्के जंगलक्षेत्र असायला हवे. पण ते फक्त 15 टक्केच उरलेले आहे. हे सँटेलाइट वरून स्पष्ट दिसते. निसर्ग साखळीच तुटायला लागली आहे. सोमवल्ली सारखी वनस्पती, आज फक्त केरळ व हिमाचलमध्ये आणि तीही अगदी अल्प प्रमाणात शिल्लक आहे. कमी अधिक प्रमाणात सगळ्याच वनौषधींची तस्करी व्हायला लागली आहे. हळदीसारख्या रोजच्या वापरातील गोष्टी बद्दल काय सांगायचे? तर अमेरिकेने त्याचे पेटंट मिळवले आणि खेदाची आणि निराशाजनक गोष्ट म्हणजे आपण सगळं निवांतपणे पहात बसलोय. नुसतच भुई थोपटत बसण्यात अर्थ नाही. वनऔषधी टिकवणं हे आपलं अत्यंत महत्त्वाचं आणि आद्यकर्तव्य आहे.
वनौषधींचा संरक्षण देणं इतकं महत्त्वाचं आहे की, ते आहे म्हणून आपलं अस्तित्व आहे विकास करताना, विनाश होत नाही ना तिकडे पहायला हवं. प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडायचं असेल तर, वैश्विक उपक्रम घेऊन जंगलांची वाढ करायला हवी. वृक्ष मोठ्या प्रमाणावर लावायला हवेत. वनस्पतींच्या विज्ञानाच्या अभ्यासाचा प्राचीन ठेवा तळागाळापर्यंत पोचवायला हवा.
मूल ब्रम्हा, तवचा विष्णूः, शाखायश्च महेश्वराः।
पत्रे पत्रे च देवानाम वृक्षराज नमोस्तुते।।
अशा तऱ्हेने वनस्पतींना देव मानण्याची प्राचीन संस्कृती जपायला हवी. वाहनांचे उपयोग कमी करुन सायकलचा वापर व पायी जास्त जावे. शालेय स्तरापासून शिक्षणात वेगवेगळ्या वनस्पतीं बद्दल माहिती करून द्यावी. पर्यावरणासारखा विषय चार भिंतीत न शिकविता, नद्या, डोंगर, समुद्र, चांदणे प्रत्यक्ष दाखवत शिकवला तर विद्यार्थ्यांना तो एक वेगळा आनंद मिळेल. सौर शक्तीचा वापर जास्तीत जास्त केल्यास, तीच वीज दुसऱ्या कारणासाठी वापरता येईल. झाडांची कत्तल करणाऱ्यांना कडक शिक्षा द्यायला हव्यात. रस्त्यावर झाडे लावताना त्या त्या भागातील लोकांना त्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी द्यायला हवी. आणि स्वयंप्रेरणेने बाकीच्यांनीही ती स्वीकारायला हवी. प्रत्येक कुटुंबाने आपल्याकडे जागा नसली तरी, कुंडीमध्ये का होईना पण तुळस गवती चहा पुदिना अशी छोटी रोपे लावायला काहीच हरकत नाही. प्राणी-पक्ष्यांच्या अभयारण्या प्रमाणे वनौषधींसाठीही राखीव जागा ठेवायला हव्यात. मोठमोठी प्रदर्शने भरवून सर्वसामान्यांना त्याची ओळख व उपयोग सांगितले जावेत. इस्राईल सारख्या देशात कमी पाण्यावर केली जाणारी शेती पाहिली की, आश्चर्याने तोंडात बोट घालावे असे वाटते. त्याचा अभ्यास करून ते तंत्रज्ञान आपण स्वीकारायला हवे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना त्याचे महत्त्व, तंत्रज्ञान आणि महत्त्वाचं म्हणजे हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली तर, शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. नवनवीन संशोधनातून, उत्तम बी बियाणे तयार करून, त्याची लागवड करायला हवी. आज बालाजी तांबे, रामदेवबाबा यांची उत्पादने लोक मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर युरोप, अमेरिकेत दरवर्षी आयुर्वेदिक कॉन्फरन्स घेतली जातात. त्याद्वारे या वनौषधींचा आणखी प्रचार होत आहे. युरोपमध्येही लागवडी केल्या जात आहेत. भारत, युरोप अमेरिका सर्वांनी मिळून नव नवीन संशोधन चालू केले आहे. अलीकडं वाचनात आलं की, साध्या रेल्वेच्या परीक्षा ऑनलाइन घेतल्या त्यामुळे चार लाख झाडे आणि 319 कोटी कागदांची बचत झाली. असेच उपक्रम जास्तीत जास्त क्षेत्रात व्हायला हवेत. अनेक ठिकाणी “मियावाकी” जंगलेही केली जात आहेत. सर्व बाजूंनी प्रयत्न चालू आहेत. पण त्याला अजून वेग द्यायला हवा. या आदर्शाचा नवीन पिढी निश्चित आदर करेल. ही जबाबदारी एकट्याची नसून, प्रत्येक नागरिकाच्या अविश्रांत आणि उत्स्फूर्त परिश्रमाची गरज आहे.
रवींद्रनाथ टागोर हे जगप्रसिद्ध भारतीय कवी, गीतकार, कादंबरीकार, कथाकार, संगीतकार, कलावंत, तत्त्वचिंतक, शिक्षणतज्ज्ञ,नाटककार, चित्रकार, नट, निबंध लेखक आणि समीक्षक होते. त्यांच्या काव्याप्रमाणेच त्यांच्या कथा हे बंगाली साहित्याचेच नव्हे, तर भारतीय साहित्याचे अमूल्य धन आहे. रवींद्रनाथ टागोर अनुभूती शब्दात पेरतात. बालपणी ते लिहितात..
‘अभिलाष’ ही कविता ,१२व्या वर्षी त्यांनी लिहिली आणि प्रसिद्ध झाली. या कवीचे प्राण्यांवर अतिशय प्रेम होते. मूकजनावरांमधील स्वाभिमान आणि शांतीने त्यांना प्रेरणा मिळाली . बर्फाच्या कणांबरोबर सुद्धा त्यांचे तादात्म्य पावून “छोटयाशा गोष्टी सुद्धा जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतात” अशा आशयाची एक सुंदर कविता त्यांच्या कडून लिहिली गेली.
निसर्गतःच त्यांना रूपसौंदर्य लाभलं.तसेच त्यांना मधुर आवाजाची देणगी होती.त्यांनी रचलेल्या शेकडो गीतांत चालीची विविधता आढळून येते.रवींद्रनाथ टागोर हे नाव ‘ रवींद्र संगीत’ म्हणून सुद्धा सुप्रसिद्ध आहे.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची मातृभाषेत बांग्ला भाषेत रचित, अखिल विश्वाकडून प्रशंसित झालेली,सर्वाधिक वाचली गेलेली, गेयात्मक,पद्यात्मक, साहित्यकृती म्हणजे नोबेल पुरस्काराने सन्मानित अशी ‘गीतांजली’ . गीतांजली स्वतंत्र कलाकृती आहे. गीतांजली हा काव्यसंग्रह आशावादी आहे.रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेची साक्ष देणारी सर्जनशील निर्मिती म्हणजे गीतांजली हे काव्य.यात त्यांचं भाषाप्रभुत्व , परमेश्वर प्राप्तीची ओढ,उत्कट इच्छा काव्य रसिकांच्या अंतःकरणाला हात घालते.१९१३ साली महाकवी रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली ‘ ह्या काव्यसंग्रहाला आशियातील पहिले नोबेल पारितोषिक मिळाले. या संग्रहामध्ये गीतांजली,गीतिमाल्य, नैवेद्य,शिशू, चैताली,स्मरण, कल्पना,उत्सर्ग,अचलायतन या काव्यसंग्रहातून घेतलेल्या निवडक कवितांचा समावेश आहे.
रवींद्रनाथ टागोर यांच्या साधारण १०४ सर्वोत्कृष्ठ कलाकृतींचे संकलन गीतांजली रूपाने काव्यरसिकांना अनमोल भेट मिळाली आहे.
आपल्या देशबांधवांमधील अज्ञान,निरक्षरता, फूट,आळस आणि संकुचित वृत्ती पाहून टागोर अस्वस्थ होत. हा कवी विचारवंत तसेच दार्शनिक असल्याने आपल्या राष्ट्राला स्वातंत्र्याच्या स्वर्गात नेण्यासाठीच वैविध्यपूर्ण अशा असंख्य साहित्यकृती त्यांनी निर्माण केल्या आहेत असे वाटते. डिसेंबर १८८६ मध्ये कलकत्ता येथे राष्ट्रीय सभेच्या दुसऱ्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी ‘आमरा मिले छि आज मात्र डाके’ ह्या कवितेचे लेखन आणि गायन ही केलं होतं.
१८९०साली ”विसर्जन’ या नाटकाचे लेखन आणि प्रयोग केले.१८९६ ला कलकत्ता येथे काॅंग्रेस अधिवेशनात बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या ‘वंदेमातरम्’ या देशभक्तीपर गीताला चाल लावली आणि त्यांनी स्वतः ते गायले.१९११च्या राष्ट्रीय सभेच्या वेळी ‘जन गण मन’ हे गीत लिहून संगीतबद्ध केले. स्वतः ते त्यांनी गायले . पुढं हे गीत स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे.
१९०१ मध्ये त्यांनी’ शांतिनिकेतन, आश्रम शाळा’ स्थापन केली. या अभिनव प्रयोगाने जीवनशिक्षण कार्य सफल करून दाखवले.
तसेच १९१८ला ‘ यत्र विश्वं भवत्येक नीडम्’ या भावनेने त्यांनी ‘ विश्वभारती’ संस्थेची पायाभरणी केली.
ब्रिटिश सरकारने दिलेला ‘ सर’ हा किताब प्रखर देशभक्त अशा टागोरांनी १९१९ ला परत दिला.
आशा-निराशेवर हिंदकळणारं टागोरांचे मन कवितांमधून प्रकट होते.काही कविता वाचकांना गूढ वाटतात.
काव्यामध्ये रस व गती असणाऱ्या प्रत्येकाला गीतांजली रूपी काव्यचंद्राचे कधी ना कधी दर्शन घ्यावे असे वाटतेच.
‘ चित्त जेथा भयशून्य उच्च जेथा शिर ‘ … (या सदा मुक्त स्वर्गात माझ्या देशाला जागृत होऊ दे..)
ही त्यांची सुप्रसिद्ध प्रार्थना सारे जीवन समजावून घेण्याचा ध्येयवाद प्रकट करते.
या काव्यसंग्रहातून एक हळुवार कवी,नितळ मनाचा माणूस उलगडत जातो.टागोरांची वैविध्यपूर्ण शैली, विविध विषय, असंख्य प्रसंग आणि मनोभाव यांचा यथार्थ परिचय या दिव्य , अलौकिक कलाविष्काराच्या माध्यमातून वाचकांना होतो.यातील काव्यरचनांचे भाषांतर अनेक अभ्यासकांनी त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेत केले आहे .
‘जाबार दिने एई कथाटि बोले जेनो जाई।’ या कवितेतील आरंभिक पंक्तिंचे हिंदी रूपांतर – ‘जाने के दिन यह बात मैं कहकर जाऊं। यहां जो कुछ देखा-पाया, उसकी तुलना नहीं। ज्योति के इस सिंधु में जो शतदल कमल शोभित है, उसी का मधु पीता रहा, इसीलिए मैं धन्य हूं।’ असं वाचताना प्रत्येकाच्या मनात सकारात्मक विचारांना चालना मिळते.
समर्पक शब्दांत जीवनविषयक मांडलेले तत्वज्ञान,प्रतिमांचा समर्पक वापर,सहज सुलभ भावाविष्कार अशा वैशिष्ट्यांसह टागोरांची कविता व्यक्त होते.
गीतांजली हा १५६ ते१५७ मूळ बंगाली कवितांचा संग्रह , त्यांनी इंग्रजी मध्ये Songs of Offspring असं केलेलं भाषांतर काव्य रसिकांना खुप भावले.पहिल्या महायुद्धाच्या काठावर उभ्या असलेल्या पाश्चात्य कवींना ऐन अशान्त युगात शीतरस देणारा हा कवी काही अपू्र्वच वाटला.गीतांजली कविता वाचकाला वेगळ्याच भावविश्वाची सफर घडवून आणते.टागोरांची कविता वाचल्यावर एक प्रकारची शांती दरवळत राहते.
‘गीतांजली’ तील कविता या ईश्वराबद्दलच्या कविता नाहीत तर ‘ईश्वरपणा’ बद्दलच्या आहेत.एझ्रा पाउंड ला गीतांजली मधील अपूर्व अशी मनस्थिती आवडली.त्यामुळेच तो म्हणतो,” There is in Tagore the stillness of nature.” सर्व जगात आधुनिक तरीही ऋषितुल्य कवी म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे.
गीतांजलि’ च्या कवितांचं क्षेत्र खुप विस्तृत आहे. त्यांत प्रेम, शांति आहे. दलितांच्या विषयी ‘अपमानित’ शीर्षक असलेली कविता सुद्धा आहे. ‘अपमानित’ में रवींद्रनाथांनी जातिगत भेदभावाचा तीव्र प्रतिकार केला आहे – ‘हे मोर दुर्भागा देश, जादेर करेछ अपमान, अपमानेर होते होबे ताहादेर सबार समान।’ ‘ ‘अपमानित’ सारख्या कविता लिहून रवींद्रनाथ दलितांच्या प्रति उच्च जातिंना संवेदनशील बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ‘भारत तीर्थ’ या कवितेत रवींद्रनाथ सांगत आहेत कि भारताचा समस्त मानव समाज एक कुटुम्ब, एक शरीरा सारखं आहे. -‘आर्य, अनार्य, द्रविड़, चीनी, शक, हूण, पठान, मुगल सर्व इथं एका देहात लीन झाले आहेत.हा देहच भारतबोध आहे.’ १९४० ला रवींद्रनाथ टागोरांना ‘डाॅक्टरेट’ पदवी प्रदान करून आॅक्सफर्ड विद्यापीठाकडून सन्मानित करण्यात आले.
“तू सतत माझ्याबरोबर असतोस. मला नवजीवन देतोस. माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझ्या समवेत असतोस. मला आशा देतोस. माझ्या अस्तित्वाच्या प्रत्येक कणासाठी मी तुझा आभारी आहे.” …असं म्हणत .
१९४१ ला ‘ जन्मदिने ‘ हा त्यांचा शेवटचा कविता संग्रह प्रकाशित करण्यात आला.
७आॅगस्ट१९४२ या दिवशी आपल्या जीवन देवतेला गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी दिलेले हे शेवटचे अर्घ्य कृती आणि उक्ती यातील अद्वैत आचरणातून सिद्ध करणाऱ्या उपनिषदांच्या अभ्यासाला अनुसरून पिंडी ते ब्रम्हांडी पाहणाऱ्या साहित्य, संगीत, कला आणि विचारांचे बहुविध आणि बहुमोल भांडार अवघ्या मानवतेला देणाऱ्या या विश्वकवीची प्राणज्योत मावळली.
जीवनमूल्यांचा ऱ्हास, असुरक्षितता आणि स्पर्धा यांच्या अंधारात भरकटलेल्या समाजासाठी ‘गीतांजली’ तील प्रेम, सत्यम्, शिवम्, सुंदरम् वरील श्रद्धा व मानवी जीवनाला अर्थ असतो, हा विश्वासच मला दीपस्तंभ वाटतो.
☆ वनौषधी संरक्षण…एक आव्हान आणि उपाय – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(ऋग्ण सेवा प्रकल्प तर्फे झालेल्या निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला लेख.)
एकदा वाचनात आलेली गोष्ट आठवली. एक ऋषी आपल्या विद्यार्थ्यांना शिकवीत असताना, त्यांनी मुलांना सांगितले, आज तुम्हाला सगळ्यांना फिरायला सोडणार आहे. त्याच बरोबर एक काम पण आहे. सर्वत्र फिरत असताना, ज्या ज्या वनस्पतींचा काही उपयोग नाही, अशा घेऊन यायच्या. संध्याकाळी बऱ्याच जणांनी भारेच्या भारे आणले. एक जण मात्र संकोचून बाजूला गप्प उभा राहिला. तो मोकळ्याच हाताने परत आला. त्याच्याबद्दल, बाकीचे ” आळशीपणाचे लक्षण ” असे म्हणू लागले. ऋषींनी सर्वांना उभे केले. जो मोकळा आणि मूक उभा होता त्याला मोठे बक्षीस दिले. बाकीच्यांना आश्चर्य वाटले. गुरुजींनी सांगितले की मी तुम्हाला सांगितले होते की, ” ज्या वनस्पतींचा काही उपयोग नाही त्या घेऊन या “. पण या मुलाला बक्षीस का दिले तर त्याने ओळखले की निरुपयोगी अशी एकही वनस्पती नाही. प्रत्येकाचा काही ना काही उपयोग हा आहेच. नंतर गुरुजींनी निरूपयोगी अशी कोणतीच वनस्पती नाही सगळ्या वनस्पती या औषधी आहेत. आणि उपयुक्तही आहेत.
चरक, सुश्रुता, वाग्भट, शारंगधर चवन अशा अनेक ऋषींनी वनस्पतींच्या पंचांगांचा (मूळ, खोड, पान, फुल, फळ) अभ्यास केला. त्याला त्यांनी शास्त्राचा दर्जा दिला. आयुर्वेद. (यजुर्वेदाचा उपवेद). )आताच्या दृष्टिकोनातून या ऋषींना सुपर स्पेशालिस्ट म्हणायला हरकत नाही.
आपली भारतीय संस्कृती ही निसर्गाधिष्टीत आणि विज्ञानाधिष्ठित अशी आहे. पंच महाशक्तीना माणसांनी देवत्व दिलं. (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) आदरणीय ठरवलं. आपले सण, उत्सव व्रतवैकल्य या सर्व गोष्टी निसर्गाशी संपर्क साधणाऱ्याच आहेत. गुढीपाडव्याला गुढी बरोबर डोलणारा कडुलिंबाचा आणि आंब्याच्या पानाचा ढाळा, वटसावित्रीची वडाच्या झाडाची पूजा, हरतालिकेला वाहिली जाणारी सोळा प्रकारची पत्री, फूलं, शंकराला आवडणारा बेल, दसऱ्याच सोन, म्हणजे आपट्याची पाने आणि गव्हांकूर, यज्ञात वाहिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या समिधा , अशी कितीही उदाहरणं दिली तरी कमीच! अन्न वस्त्र , निवारा या मूलभूत गोष्टीही या वनश्री पासूनच आपल्याला मिळतात. आपल्या संस्कृतीत झाडं , वेली , फुलं देणाऱ्या वनश्री कडे निर्जीव म्हणून पाहिलं जात नाही. तर सजीव म्हणजे भावभावना असलेल्या, असं समजून त्या परिसरात जोपासल्या जायच्या. जोपासना, संगोपन , वर्धन आदरान केलं जायचं. हंगामाप्रमाणे त्या साठविल्या जायच्या. त्यावर संस्कार केले जायचे. ज्यांना आपण देववृक्ष म्हणतो (वड, पिंपळ, औदुंबर, पारिजात, शमी, आणि चिंच) कारण ते वृक्ष 24 तास हवेत ऑक्सिजन सोडतात. ज्यावर आपलं जीवन जगणं अवलंबून आहे. त्याच प्रमाणे ज्याला आपण ‘ पंचवट, ‘ म्हणतो, ते व , पिंपळ, औदुंबर, बेल, आणि पारिजात हे होत. त्यांचे वैशिष्ट्य असे की या वृक्षां मधून ओझोन वायू प्रक्षेपित होतो. जो वातावरणात दुर्मिळ असतो. किती महत्व आहे बरं या वृक्षांच! मोठ्या वृक्षांप्रमाणेच लहान वेली, छोटी झुडपेही तितकीच उपयुक्त व महत्त्वाची आहेत.
प्रत्येकाच्या दारात सन्मानाने डोलत राहणारी व देवाच्या नैवेद्यावर ताठ्यात उभ्या असणाऱ्या तुळशीचे महत्त्व किती सांगावे तितके कमीच! छोटसच रोपट पण छत्तीस रोगांवर उपचार करतं म्हणतात. आपण तर सोडाच, पण ग्रीसमधील ‘ईस्टर्न चर्च, ‘ नावाच्या संप्रदायात ही तुळशीची पूजा करतात. चरक, धनवंतरी, सुश्रुत यांनी, तिचे सौंदर्यवर्धक, त्रिदोषनाशक असं वर्णन केले आहे. कोरफड, शतावरी, अश्वगंधा, जेष्ठमध, गुळवेल, विजयसार, वावडिंग किती औषधी सांगायच्या! सौंदर्यासाठी, पोटासाठी, तापासाठी, अनेक आजारांवर उपाय तर आहेतच पण आजार होऊ नयेत, प्रतिकारशक्ती वाढावी यासाठीही आयुर्वेदात वनौषधींची यादीच सांगितली आहे. या वनौषधींनी आपल्यावरच उपकार केले आहेत असे नाही , तर त्यावर राहणारे, जगणारे कीटक, पशुपक्षी यांनाही जीवन दिले आहे. अत्यंत सूत्रबद्ध अशी निसर्ग साखळी आहे. आपल्यावर उपकार करणाऱ्या, आपल्या जीवनाशी एक अविभाज्य अंग बनलेल्या, या वनस्पती आपल्या भारतासारख्या खंडप्राय देशात प्रचंड प्रमाणावर होत्या. सह्याद्री, सातपुडा, हिमालयासारख्या पर्वतराजीत तर जगातील सर्वात जास्त व सर्व रोगांवर उपयुक्त अशा वनस्पतींचे भांडारच आहे म्हणा ना! पण पैशाचा लोभापायी झालेली वृक्षतोड हा फार मोठा शाप त्याला लागलेला आहे.
☆ जागतिक व्यंगचित्रकार दिन ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆
जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त सर्व सामान्य नागरिकांचे, राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांचे, पुढाऱ्यांचे, साहित्यिकांचे आणि व्यंगचित्रकारांचे मन:पूर्वक अभिनंदन !
आपल्या प्राचीन अन उन्नत अश्या भारतीय संस्कृतीने सर्व समावेशक ६४ कलांना मान्यता दिलेली आहे. यात व्यंगचित्रकलेचा समावेश आहे की नाही, याची खात्री मला देता येत नाही. पण अर्वाचीन काळात व्यंगचित्रे हि एक स्वतंत्र कला म्हणून विकसित झालेली आहे. एखादा चित्रकार व्यक्तिचित्रे रेखाटतांना मूळ व्यक्तीचे प्रमाणबद्ध चित्र रेखाटून त्या व्यक्ती विषयीची माहिती एक लेख लिहून व्यक्त करू शकतो. पण अर्कचित्रकला किंवा … व्यंगचित्रकला हि तर एक पराकोटीचीच कला आहे असे मला वाटते ! कारण एक वेळ सरळ सरळ चित्रे रेखाटणे त्या मानाने सोप्पे.. कारण ती तत्सम प्रमाणबद्धतेने काढायची असतात.. पण एखाद्या व्यक्तीचे अतिशयोक्तीपूर्ण, उपरोधिक, प्रमाणाबाहेर असूनही प्रमाणातच चित्र काढणे केवळ अशक्यच… ती कला साधणे हे एक कठीण कार्य आहे. किंबहुना ती कला उपजतच असावी. प्रमाणाबाहेरच्या रेषांनी देखील ती व्यक्ती बघणाऱ्यात ओळखायला येणे हे अत्यंत अवघड असे काम आहे. स्व इंदिरा गांधी यांचे चित्र आर के लक्ष्मण यांच्या अर्कचित्रांमध्ये बघताना इंदिराजींचे नाक बाकदार आणि प्रमाणाबाहेर मोठे असे काढलेले असायचे.. त्यावर इंदिरा गांधींनी आर के लक्ष्मण यांना विचारले, ” आप मेरी नाक इतनी लंबी क्यूँ बनते हो..? ” त्यावर हसून आर के नी तो विषय टाळला. पण इंदिराजींचे नाक, केश रचना इत्यादी त्यांची एक ओळख होती, ते वैशिष्ट्ये होते. त्यावर अधिक बल देऊन त्यांचे व्यंगचित्र अनेक कार्टूनिस्ट काढत होते. त्याला स्व बाळा साहेब ठाकरे हे देखील अपवाद नव्हते. बाळासाहेब ठाकरे हे जसे व्यंगचित्रकार होते, तसेच ते अन्य व्यंगचित्रकाराच्या दृष्टीने राजनेता देखील होते.. त्यामुळे ते देखील अनेकांच्या अर्कचित्राचे विषय असत.
एखाद्या प्रसंगातील विरोधाभास ओळखून, त्यातील फोलपणा सिद्ध करण्यासाठी , टीका करण्यासाठी, एका गंभीर विषयाचे विडंबन , त्यातील मेख ओळखून आपल्या चित्रांद्वारे समाजापुढे विचारार्थ ठेवणे एवढे प्रचंड सामर्थ्य अर्कचित्रकारांमध्ये असावे लागते. त्यात विनोद आला, अतिशयोक्ती आली, मौन देखील आले.. रिडींग बिटवीन द लाईन्स हे या रेषांमध्ये साहित्या इतकेच नव्हे तर त्यापेक्षा अधिकच दिसते. मला आठवते, आणीबाणीच्या काळात टाइम्स ऑफ इंडियाने कार्टूनची जागा हि कोरीच ठेवली.. पण संपादकांची ती कृती निरंकुश राजकीय नेतृत्वाची, अहंकाराची निर्देशक ठरली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी दर्शवणारी होती. एकदा एका वर्तमानपत्रातील संपादकीय अग्रलेखाची जागा देखील व्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेप्या वृत्ती निषेधार्थ संपादकांनी कोरी ठेवलेली होती. मौनं सर्वार्थ साधनम्… दोन्ही कृती ह्या तश्या तुल्यबळच ! कदाचित कोऱ्या संपादकीयाने किंवा कोऱ्या अग्रलेखाने जे साध्य केले असेल, नसेल त्याहीपेक्षा अधिक व्यंगचित्राने साधल्या गेले असेल. एखादा अक्षरशत्रू देखील, व्यंगचित्राने व्यंगचित्रकाराच्या मनातील कटाक्ष, भाष्य, विरोधाभास, विपर्यास, उपहास एका क्षणात समजू शकतो.
सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांनीं ” द डिस्टोरटेड मिरर” ह्या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीत त्यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांची पार्श्वभूमी, भूमिका विशद केली. ” द डिस्टोरटेड मिरर” हे अतिशय समर्पक असे शीर्षक त्यांच्या या अजोड कलाकृतीचे होते. आरश्यातील प्रतिमा हि प्रतिबिंबच असतो.. पण आपण स्वतःला आरश्यात बघतो तेंव्हा अगदी तंतोतंत जसे च्या तसे प्रतिबिंब दिसत नाही .. डाव्यांचे उजवे, अन उजव्याचे डावे त्या प्रतिबिंबात दिसते. तसे ट्रू मिरर मध्ये मात्र जसेच्या तसे दिसते. याशिवाय अंतर्गोल, बाह्यगोल अर्थात कोन्वेक्स वा कोन्केव्ह आरसे हे त्या त्या व्यक्तीचे जणू व्यंगचित्रच दर्शवतात. एक प्रमाणबद्ध नसलेली, अवास्तव वेडीवाकडी प्रतिमा.. तरीही ओळखू येणारी त्यात दिसते. ती प्रतिमा, ते प्रतिबिंब आपले व्यंगचित्र आपण समजू या.
एखाद्या परिस्थितीचे आकलन एक तटस्थ, त्रयस्थ भूमिकेतून करून, सर्व सामान्यजनांपुढे शब्द विरहित, अक्षर विरहित किंवा मितभाषिक अशी रेषांची अभिव्यक्ती हि साधी कला नव्हे. अर्कचित्रकार हा अभ्यासू असायलाच हवा, त्याला परिस्थितीचे भान देखील असायला हवे .
Should cartoonists have a slant when it comes to their satire? “ I don’t feel that cartoonists have to take any side. I believe that a cartoonist is never a leftist or a rightist but can be a sadist”
राजकारणात व्यंगचित्रकाराने पक्षपाती असूच नये. डावा अतिडावा, उजवा अति उजवा असे कदापि असू नये. टीका टिप्पणी करताना त्याची भूमिका एखाद्या स्थितप्रज्ञा सारखीच असावी. त्याची संवेदनशीलता समाज हिताची, राष्ट्रहिताची असावी.
पूर्वी जातक कथांमध्ये, विविध प्राणी आपापसात बोलतांना दाखवीत .. आणि त्यातून एक संदेश, एक बोध, एक संस्कार मुलांना मिळायचा. अलीकडे राजकीय पक्षाला न रुचणारे विचार कार्टून द्वारे प्रकाशित झाल्याने, व्यंगचित्रकाराला जबर शिक्षा करण्यात आली. एवढेच नव्हे तर व्यंगचित्रकाराच्या हत्या देखील आपण बघितल्या . एवढे सामर्थ्य या कलेत आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वृत्तपत्रात तसेच साप्ताहिक, मासिकांत राजकीय व्यंगचित्राला मोठे करण्याचे काम शंकर्स विकलीचे शंकर आणि प्रसिद्ध चित्रकार व व्यंगचित्रकार दीनानाथ दलाल वगैरेंचे. त्यानंतरची पिढी अर्थातच आर. के. लक्ष्मण, ‘मार्मिक’कार बाळ ठाकरे, मारिओ मिरांडा, अबू इब्राहिम, सुधीर दास, कूटी वगैरे पिढीने गाजवली आणि भारतीय राजकारणात सत्ताधाऱ्यांना कायम चर्चेत आणि नैतिक धाकात ठेवत आपली व्यंगचित्र कारकीर्द गाजवली.
स्व बाळासाहेब ठाकरे यांनी तर आपल्या कुंचल्याने मार्मिक या त्यांच्या साप्ताहिकातून जागृती करून मराठी मन चेतवले, त्यांना संघटित करून एक बलाढ्य राजकीय पक्ष उभारला.
व्यंगचित्र कला हि साहित्य या प्रकारात देखील मोडावी असे वाटते.. शब्दातीत असूनही, किंवा मितभाषी ही असून साहित्याचे कार्य ती साधते, ती एक परिपूर्ण अशी अभिव्यक्तीच आहे.
रविवार, 5 मे, 1895 रोजी, न्यूयॉर्क वर्ल्डच्या वाचकांना त्यांच्या रोजच्या वर्तमान पत्रात एक नवीन पुरवणी मिळाली. ती पुरवणी म्हणजे त्या वर्तमान पत्राच्या पृष्ठांवर, वाचकांना रिचर्ड आउटकॉल्टची पूर्ण-रंगीत रेखाचित्रे आढळली. त्यात मोठ्या कानाचा, अनवाणी पायांचा लहान मुलगा खोडकर हसत असलेला दाखवल्या गेला. होगन आल्ये या नावाच्या कार्टूनची पहिली व्यक्तिरेखा कालांतराने द यलो किड म्हणून ओळखल्या जाऊ लागली. तीच व्यक्तीरेखा व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी कार्टून आयकॉन ठरली. स्व आर के लक्ष्मण यांची कॉमन मॅन हि व्यक्तिरेखा वाचकांच्या मनात यशस्वीपणे रुजली. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील तिला मानाचे स्थान मिळाले. न्यूयॉर्क वर्ल्डच्या त्या ५ मे रोजी सुरु केलेल्या यशस्वी बदलामुळे दरवर्षी ५ मे हा राष्ट्रीय व्यंगचित्रकार दिन म्हणून पाळल्या जातो. अश्या या अद्भुत कलेचे आपण साक्षीदार आहोत, हि एक सन्मान्य बाब आहे.
– श्री मिलिंद रतकंठीवार
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ऐसे हळुवारपणे…अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
ऐसे हळूवारपण…
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. मी आणि माझी एक लग्न झालेली मैत्रीण सुमती, तिच्या घरी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत होतो. नागपूरचे उन्हाळ्याचे दिवस. कडक उन्हाळा पण कुलरमध्ये आम्हाला दोघीनाही घुस्मटल्यासारखं व्हायचं, म्हणून चक्क खिडक्या उघड्या ठेऊन आम्ही पंखे लावून बसायचो.
ज्ञानेश्वर महाराज पहिल्याच अध्यायात सांगतात,’ अध्यात्म शिकायला पाहिजे ते ‘चकोर तलग्यासारखं’ – चकोराच्या पिल्लासारखं! त्याप्रमाणे हळूवार मन करून ही कथा ऐका. चांदणं पिऊन जगणारा हळूवार चाकोर, त्याची पिल्लं – म्हणजे किती नाजूक कल्पना. हळूवारपणाच्या या व्याख्येनेच वाचतावाचत्ता आम्ही मुग्ध झालो. क्षणभर स्तब्ध होऊन बाहेर पहात होतो. रस्त्यावर शुकशुकाट होता. काम्पौडच्या बाहेर एक बाई होती. नऊवारी पातळाचा पदर डोक्यावरून घेतलेला. डोक्यावर पाटयाचा दगड, हातात अवजारांची पिशवी, पायात टायरच्या रबराच्या केलेल्या चपला. उन्हाने दमलेली होती. घामाघूम झाली होती. बाहेरच्या झाडाखाली ती थांबली. डोक्यावरचा पाटा खाली ठेवला. पदराने घाम पुसत व त्यानेच वारा घेत ती उभी होती. रस्त्यावरच्या त्या झाडाजवळ बसायला जागा नव्हती. ती तशीच उभी राहिली.
सुमती पटकन उठली, बाहेर जाऊन त्या बाईला घरात बोलावून आणलं.
बाई व्हरांड्यात आली. उन्हातून आल्यावर नुसतं पाणी पिऊ नये म्हणून सुमतीने तिला गुळ आणि पाणी दिलं. बाई खुश झाली. ‘बाई, केव्हढ उन्ह आहे बाहेर…’ बाईच्या रापलेल्या चेहऱ्याकडे आणि घट्टे पडलेल्या हातांकडे पहात सुमती म्हणाली. बाईचं जळून गेलेले नाजूकपण ती न्याहळत होती. छिन्नी हतोडा घेऊन दिवसभर काम करणारी ही बाई ,वयाने फार नसावी, पण उन्हाने का परीस्थीतीने वाळली होती. पाटा फार घासला की त्याला पुन्हा ठोके पाडून घेतात ते ‘पाटे टाकवण्याच’ काम ती करीत होती.
‘किती घेता पाटयाचे?’
‘दोन रुपये?’
‘अशी किती कामं मिळतात दिवसाची तुम्हाला?‘
‘दहा मिळाले तर डोक्याहून पानी’ ती
‘नवरा आहे?’
‘नाही, सोडचिट्ठी दिली त्याने, दुसरा पाट बी मांडला.’ किती सहज ती ‘डिव्होर्स’ बद्दल बोलत होती? उन्हात रापता रापता हिच्या संवेदनाही रापल्या असतील का?
‘मुलं आहेत?’ सुमती
‘दोन हायेत.’ ती
‘शाळेत जातात?’
‘कधी मधी! पाऊस झाला अन् शेण गोळा कराया न्हाई गेले तर सालेत जातात. कारप-रेशनच्या’
२० रुपये रोजात दोन मुलं आणि ही बाई रहातात. त्यासाठी ही बाई दिवसभर उन्हात हिंडते. मुलं जमलं तर जातात शाळेत. नवरा नाही. किती अवघड आयुष्य!
सुमतीच्या डोळ्यात पाणी आलं. ‘ऐसे हळूवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल…’ चा मला साक्षात्कार होत होता. सुमतीची सहृदयता मला माहीत होती. घरची मोलकरीण, पोळयावाली, धोबी हे सगळे जणूकाय तिचे ‘कुटुंबिय’च होते. पण ही कोण कुठली बाई, तिच्या कष्टांचाही सुमतीला ताप होत होता. ‘केळीचे सुकले बाग असुनिया पाणी’ तशी इतरांच्या दु:खात ही कोमेजते.
‘पन्ह घ्याल?’ सुमतीने तिला विचारलं.
‘नाही बाई, काम शोधाया पाहिजे. ‘येर’(वेळ) घालवून कसं व्हईल?’
‘एक मिनिट थांबा, माझा पाटा टाकवून द्या’ सुमतीने आतून पाटा आणला. तिच्यासाठी काम काढलं. त्याचे २ रुपये झाले. सुमतीने तिला पाच रुपये दिले
‘बर, थांबा एक मिनिट’ आणखी काम द्यायचं, म्हणून सुमतीने आतून वरवंटा आणला.
‘याला टाकवा.’ तिने वरवंटा पुढे केला.
बाईने तो वरवंटा चटकन जवळ घेतला. छातिशी घट्ट धरला. आणि म्हणाली, ‘’लेकरू आहे ते! त्याला टाकवत नाही.’’ जणू काय एखाद्या बाळाला गोंजारावं तशी ती त्याला गोंजारत होती. बारशाच्या वेळी गोप्या म्हणून वरवंटा ठेवतात, तो संदर्भ! अशा ‘लेकराला’ छिन्नी हातोड्याचे घाव घालायचे या कल्पनेनेच तिच्या अंगावर शहारे आले होते. अक्षरशः दगड फोडण्याचे काम करणारी ही बाई- हळूवारपणे गोप्याला गोंजारत होती. त्या दगडाकडे मायेनं पहात होती. जसं काही झाल्या प्रकाराबद्दल त्याची माफी मागत होती. नमस्कार करावा तसा तो वरवंटा तिने डोक्याला लावला व नंतर परत दिला.
‘ऐसे हळूवारपण जरी येईल’ … चकोरतलग्याचं हळूवारपण त्या दोघींच्या रुपाने माझ्यापुढे जिवंत उभं होतं.
– अग्रेषित.
संग्राहिका – सौ. स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्यदिनानिमित्त लेख – वृत्तपत्र स्वातंत्र्य … ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆
भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. भारतीय संविधान हे एक श्रेष्ठ संविधान आहे. या संविधानानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला आचार, विचार, संचार यांचे स्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य,भाषा स्वातंत्र्य वगैरे वेगवेगळ्या प्रकारची स्वातंत्र्ये मिळाली आहेत. तो आता प्रत्येकाचा हक्क झाला आहे.
त्यात लेखन स्वातंत्र्यामध्ये वृत्तपत्रातील लेखन हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. कारण देशातील सर्वच भागात वृत्तसेवा सुरू आहे. सगळीकडे वृत्तपत्रे प्रकाशित होतात. ती देशात तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे त्या त्या वृत्तपत्रातील विचारही तिथे पोहोचतात. वृत्तपत्रे हा भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. त्यासाठी वृत्तपत्रात लेखन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आवश्यक आहे.
पण हे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे! हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यावरही कायद्याची काही बंधने आहेत. तसे वृत्तपत्र स्वातंत्र्याचे रक्षण आणि नियंत्रण करणारे कायदे संविधानात अस्तित्वात आहेत. शिवाय बंधने घालणारे कायदेही आहेत. प्रत्येक व्यक्तीला ते लागू आहेत.
वृत्तपत्रे छापणे व वितरित करणे हा केवळ धंदा नाही तर ते लोकांपर्यंत व्यवस्थितपणे विचार पोहोचविणे ,त्यांचे विचार जाणून घेणे यांचे एक उत्तम माध्यम आहे.त्यासाठीही कायद्याने संरक्षण आहे पण त्याचा अनिर्बंध वापर गेल्या काही वर्षांपासून होत आहे.
छापलेली वृत्तपत्रे लोकांपर्यंत वितरित करण्याचा ही वृत्तपत्र काढणाऱ्या लोकांना हक्क आहे. तरीही न्यायालयाचा अवमान होईल,कुणाची अब्रूनुकसानी होईल,असे काहीही करण्यास पुरता मज्जाव आहे.अश्लीलता विरोध,गोपनीयता हे सरकारचे तसेच लोकांचे अधिकार आहेत.त्याविरूद्ध आक्षेपार्ह मजकूर छापणे हा कायद्याने गुन्हा ठरू शकतो.
आणीबाणी जाहीर झाली होती तेव्हा एकदा सारी बंधने झुगारून देऊन वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आली होती. आता सुद्धा काही राजकारण्याचा हस्तक्षेप म्हणा किंवा वरदहस्त म्हणा या काही वृत्तपत्रांना मिळालेला आहे. त्या काही वृत्तपत्रांमधून अगदीच एकतर्फी बातम्या छापल्या जातात. हे अत्यंत चुकीचे आहे. असे न करता वृत्तपत्रांनी सर्वच प्रकारच्या विचारांना प्राधान्य दिले पाहिजे.
लोकशाहीचा चौथा महत्वाचा हा स्तंभ या दृष्टीने त्यांनी हक्कांबरोबर कर्तव्याचेही पालन करायला हवे. कायदेशीर बंधने पाळलीच पाहिजेत.
बाकी वृत्तपत्रांचा खप वाढविण्यासाठी समाजाचा कल पाहून ती छापली गेली पाहिजेत. तिथे निरपेक्षपणा अपेक्षित आहे.
त्यानुसार वृत्तपत्रे छापणे, वितरण करणे, आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवणे हे भारतीय लोकशाही मध्ये कायद्याने दिलेले स्वातंत्र्य आहे. ते गैर मार्गाने वापरले जाऊ नये आणि विपरीत गोष्टी पसरविण्यासाठी उपयोगात येऊ नये.हीच इच्छा !!