मराठी साहित्य – विविधा ☆ तुम्ही श्रीमंत आहात की गरीब? ☆ मेघःशाम सोनवणे ☆

? विविधा ? 

☆  तुम्ही श्रीमंत आहात की गरीब? ☆ मेघःशाम सोनवणे ☆ 

तुम्ही श्रीमंत आहात की गरीब!

माझी मुलगी गरीब माणसाशी लग्न का करू शकत नाही? -एलोन मस्क.

एलोन मस्क सांगतात की त्यांची मुलगी गरीब माणसाशी लग्न का करू शकत नाही.

काही वर्षांपूर्वी अमेरिकेत ‘वित्त आणि गुंतवणूक’ या विषयावर एक परिषद झाली होती. वक्त्यांपैकी एक होते एलोन मस्क आणि प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की सर्वजण हसले. प्रश्न होता, “तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात, तुमच्या मुलीने गरीब किंवा शामळू पुरुषाशी लग्न केले तर तुम्ही ते मान्य कराल का?.”

त्यांनी दिलेले उत्तर आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी बदल घडवू शकते.

एलोन मस्क म्हणाले, “सर्वप्रथम हे समजून घ्या की, ‘संपत्ती’ म्हणजे आपल्या बँकेच्या खात्यात खूप पैसे असणे नव्हे. संपत्ती ही प्रामुख्याने संपत्ती निर्माण करण्याचे एक साधन असते.

उदाहरणार्थ लॉटरी किंवा जुगार जिंकणारी व्यक्ती. जरी त्याने शंभर कोटी जिंकले तरी तो श्रीमंत माणूस होत नाही: तो खूप पैसा असलेला गरीब माणूस आहे. कारण लॉटरी चे बक्षीस मिळाल्याने करोडपती झालेले नव्वद टक्के लोक पाच वर्षांनंतर पुन्हा गरीब झालेले आढळून आले आहे.

आपल्याकडे पैसे नसूनही श्रीमंत असलेल्या अनेक व्यक्तीही आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर बहुतेक उद्योजकांचे देता येईल. त्यांच्याकडे पैसा नसतानाही ते संपत्तीच्या मार्गावर अग्रेसर आहेत, कारण ते त्यांची आर्थिक बुद्धिमत्ता विकसित करत आहेत आणि ती म्हणजे संपत्ती होय.

श्रीमंत आणि गरीब कसे वेगळे आहेत? सोप्या भाषेत सांगायचे तर: श्रीमंत अजून श्रीमंत होण्यासाठी मरतात, तर गरीब हे श्रीमंत होण्यासाठी मारू शकतात.

जर तुम्हाला एखादी तरुण व्यक्ती प्रशिक्षण घेण्याचा, नवीन गोष्टी शिकण्याचा निर्णय घेतांना, जो सतत स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो, तर समजून घ्या की तो/ती एक श्रीमंत व्यक्ती आहे.

जर तुम्ही एखादी तरुण व्यक्ती बघाल जी सतत सरकार ला दोष देते, आणि श्रीमंत असलेले सगळे चोर आहेत असे समजणारा आणि सतत टीका करत रहाणारा तरुण दिसला तर तो गरीब माणूस आहे हे समजून चला.

श्रीमंतांना खात्री आहे की त्यांना उड्डाण भरण्यासाठी फक्त माहिती आणि प्रशिक्षण आवश्यक आहे, गरीबांना वाटते की प्रगती साधण्यासाठी इतरांनी त्यांना पैसे दिले पाहिजेत.

शेवटी, जेव्हा मी म्हणतो की माझी मुलगी गरीब माणसाशी लग्न करणार नाही, तेव्हा मी पैशांबद्दल बोलत नाही. मी त्या माणसामधील संपत्ती निर्माण करण्याच्या क्षमतेबद्दल बोलत आहे.

हे बोलल्याबद्दल मला माफ करा, पण बहुतेक गुन्हेगार हे गरीब लोक असतात. जेव्हा त्यांना समोर पैसे दिसतात तेव्हा त्यांचे डोके फिरते, म्हणूनच ते लुटतात, चोरी वगैरे करतात … ते याच्याकडे एक संधी म्हणून बघतात कारण ते स्वतःहून पैसे कसे कमवू शकतील हे त्यांना माहित नसते.

एके दिवशी एका बँकेच्या सुरक्षा रक्षकाला (गार्ड) पैशांनी भरलेली बॅग सापडली, ती बॅग घेऊन तो बँक मॅनेजरकडे द्यायला गेला.

लोक या माणसाला मूर्खशिरोमणी म्हणाले, पण प्रत्यक्षात हा स्वतःकडे पैसे नसलेला असा एक श्रीमंत माणूस होता.

एका वर्षानंतर, बँकेने त्याला स्वागतकक्षात रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीची संधी दिली, तीन वर्षांनंतर तो ग्राहक व्यवस्थापक (कस्टमर मॅनेजर) झाला होता आणि दहा वर्षांनंतर तो या बँकेचा प्रादेशिक व्यवस्थापक (रिजनल मॅनेजर) म्हणून काम पहात आहे. त्याच्या हाताखाली शेकडो कर्मचारी आहेत आणि ती सापडलेली बॅग त्याने चोरली असती तर त्यातील रकमेपेक्षा त्याच्या वार्षिक बोनसची रक्कम जास्त आहे.

‘संपत्ती’ ही सर्वप्रथम मनाची एक अवस्था मात्र असते!

तर…  तुम्ही श्रीमंत आहात की गरीब? स्वतःच ठरवा.

मुळ इंग्रजी लेखाचा स्वैर मराठी अनुवाद करून मी हा लेख तयार केला आहे. आवडल्यास शेअर करतांना लेखात बदल न करता नावासह शेअर करा ही विनंती.

-मेघःशाम सोनवणे

इंग्रजी लेखाचे लेखक – अनामिक.

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एकवीस जून… ☆ सौ अश्विनी संजीव कुलकर्णी ☆

? विविधा ? 

☆ एकवीस जून… ☆ सौ अश्विनी संजीव कुलकर्णी ☆ 

एकवीस जून च्या निमित्ताने

21 जून—-वर्षातील सर्वात मोठा दिवस…जवळपास 14 तासांचा दिवस आज…आज सूर्यास्त जरा उशिराच होतो…आजच्या दिवसाला सोल्सटाइस (Solstice)असहि म्हणतात.

सर्वानाच माहीत आहे कि, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आणि पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे दिवस मोठा असतो.पृथ्वीच्या अक्षाच्या सूर्याशी असलेल्या कोनानुसार , संपूर्ण उत्तर गोलार्धात 21 जून हा वर्षातील मोठा नी दक्षिण गोलार्धात सगळ्यात लहान दिवस असतो.

उत्तरायणात,सूर्याचा हळूहळू उत्तरेकडे प्रवास सुरु होतो…तो उत्तरेकडे सरकत असता,दिवसाचा कालावधी वाढतो. उत्तरेकडच्या सूर्याचा हा प्रवास 21 जून पर्यंत चालतो. सूर्य या दिवशी विश्वववृत्ताच्या जास्त उत्तरेकडे असतो म्हणून ह्या दिवसाचा कालावधी अधिक असतो.

आता योग:-

योग माझ्या गुरूंनी सांगितलेला…माझ्या  वाचनातला,आचरणातला आणि जाणिवेतला!!!

योग हि साधना आहे…हे शास्त्र आहे…हा अभ्यास आहे! भगवान श्रीकृष्णांनी शिकवलेला मूळ योग आहे. हा श्रद्धेचा सर्वोच्च दिव्य मार्ग आहे.शास्त्रीय,नियमित आणि भावनापूर्ण परमेश्वर ध्यानाचा मार्ग आहे.

मानवाला अज्ञानातून मुक्त करून, शारीरिक,मानसिक नी अध्यात्मिक संतुलन राखण्यासाठी महत्वपूर्ण असा हा योग!!!💐

योग साधनेत, त्यातील अभ्यासाच्या प्रकारांमध्ये योग किंवा योगा प्रकार करणेअसाच विचार माणसाना येतो. किंवा तसाच विचार लोक करतातही.

पण नुसत्याच व्यायाम प्रकारांनी आपल्या शरीरात ऊर्जा हवी तेवढी निर्माण होत नाही. ते प्रकार शास्त्र शुद्ध हवेत.शरीराला प्राण शक्तीची गरज असते.

शरीराच्या पेशींना,अधिकाधिक क्रियाशील बनवण्यासाठी सुर्यप्रकाश,शुद्ध हवा, सात्विक व शुद्ध तरल पदार्थ,पाणी आणि फळाची आवश्यकता असते.

शरीरातील स्नायू,पेशी,हाडं, मज्जासंस्था, रक्त या सर्वांमध्ये ऊर्जा साठवलेली असते. हि ऊर्जा दैनंदिन जीवनात सतत वापरली जाते,पण अशीच आणि अधिकाधिक ऊर्जा आपण आपल्या इच्छाशक्तीच्या वापराने व्यायामाच्या शास्त्र शुद्ध पद्धतीतून साधनेतून निर्माण जर शकतो.आणि आपली प्राणशक्ती अधिकाधिक चैतन्यमय बनवू शकतो.

हा योग म्हणजे आपल्याला वाटणारा नुसताच शरीराचा व्यायाम नसून, त्याद्वारे आपल्या देहात,अंतरात प्राणशक्ती निर्माण करणे आणि शरीर हे प्रत्यक्ष ऊर्जेचे स्रोत बनवणे .

यातील विशिष्ट व्यायाम, प्राणायाम,श्वासावर नियंत्रण या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे शरीरात निर्माण होणारी शक्ती(ऊर्जा) आणि त्याद्वारे राखले जाणारे शारीरिक,मानसिक संतुलन!!!

यात ध्यान साधना खूप महत्वाची आहे.ध्यानाने मन शांत होते. चंचल मन एकाग्र होते. ध्यानाचेही शुद्ध शास्त्र आहे. ध्यानाचा शास्त्रोक्त अभ्यास करणे महत्वाचे आहे. ध्यान म्हणजे आपल्या प्राणशक्तीला – इच्छा शक्तीच्या अधिन आणणारी शक्ती!

ध्यानाच्या विज्ञानाला राजयोग म्हणूनही ओळखले जाते.. म्हणजेच ईश्वर प्राप्तीचा राजमार्ग!!!💐

आजचा 21 जून सर्वात मोठा दिवस,  हा भौगोलिक दृष्ट्या आहे. आणि आपले पंतप्रधान मोदीजींनी 21 जून 2015 मध्ये जाहीर केलेला व तेव्हा पासून सुरु असलेला, योग दिवस याचा तसा काही सबंध नाही…

पण आजच्या योग दिवसाचा व सर्वात मोठ्या दिवसाचा योगायोग म्हणजे अगदी दुग्ध शर्करा योग म्हणावयास हरकत नाही. आणि हे लक्षात घेता मला आलेले विचार….

नेहमीच सूर्योदयाच्या नव्या किरणांना आकर्षित होणारी मी… नव्या दिवसाचे नवे स्वप्न उराशी बाळगणारी मी…नव्या अरुणोदयला साक्ष ठेऊन इच्छा आकांक्षा नी आव्हानांना सामोरी जाणारी मी…आज खूप आनंदाने आपण सर्वाना ह्या मोठ्या दिवसाच्या शुभेच्छा देते!💐

नेहमीपेक्षा आज मोठा दिवस, म्हणचे जास्त वेळ प्रकाश,तेज,सूर्याच्या किरणांचा तेजाचा जास्त वेळ संपर्क!

वेळ तीच, घड्याळहि तेज,रोजचे दैनंदिन कामकाजहि तेच! पण तो सूर्य संपूर्ण त्रिलोक्याला तेजाळणारा… आज सूर्योदय नवी कांती देणारा… नुसते आपल्यालाच नव्हे, तर पर्वताना, नद्यांना,झाडांना,पक्षांना,प्राण्यांना,साऱ्या चराचराला एका दिव्या प्रमाणे मिळालेले तेज… दिवसभरात अगदी सूर्यास्तापर्यंत विविध रंगांनी, ढंगानी मिळेल… सकाळ, दुपार व संध्याकाळच्या विविधरंगी छटा सर्वाना सुखी करोत… दिवसभरातील विविध रंगी छटांनी केलेले नृत्य प्रत्येकाच्या आयुष्यातील अंधःकार नष्ट करून, नव दिशा दाखवू देत…

सूर्याचा हा प्रकाश…हे तेज…नी तेजाळणे सर्वांचे रक्षण करो!💐👍

आज धकाधकीच्या , धावपळीच्या योगात आपल्याला आपल्या मनाकडे लक्ष द्यायला अजिबात फुरसत नसते…पण आजच्या दिवशी मनाकडे आवर्जून लक्ष द्यावं… आणि ते सुदृढ व्हावं यासाठी करावा योग!!💐

योग दिवसाच्या व सर्वात मोठ्या दिवसाच्या सानिध्यात ध्यानस्थ होऊन सूर्याच्या सोनेरी किरणांच्या स्नानाने, आपल्या मनातील राग, लोभ, मोह, मत्सर, असूया, घृणा, भेदभाव, जातीयवाद यांचा नाश होवो. तन मन निरामय होऊन अंतःकरण व चित्त शुद्धी होवो ….सायंकाळच्या ध्यानाच्या  तेजाने म्हणजेच संधिप्रकाशाची लाली जणू  गुलाल उधळलाय असे वाटावे… 

आजच्या दिवशी सुर्याचे तेज जास्त असणार! त्यामुळे दिवसभरात त्या तेजाचे , कुटस्थाकडे (दोन भुवयांमधील स्थान) न पाहताही ‘अद्वितीय चक्षु’ म्हणून सतत दर्शन होणार… त्याचे दर्शन किती घ्यायचे हे आपली हाती आहे!👍💐

आजचा योग  दिवस नी  मोठा  दिवस म्हणून हि योग साधना!  हि रोजचीच का होऊ नये??  हा योग दिवस सर्वांचाच रोजचा असावा… कारण रोजच्या नियमित  योगाने, रोजच्या ध्यानाने आपल्या अंतरातील तेज वाढून, आपल्याला एक अनामिक आत्मिक आनंद मिळणार आहे, मग तो दिवस मोठा असो किंवा लहान…आपल्याच कुटस्थातील तेज, शांती, आणि ब्रह्मानंद 🙏🏻 … काय वर्णावा!!!!👍💐 

© सौ अश्विनी संजीव कुलकर्णी

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निसर्गायन – खेड्यामधले घर कौलारू ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

? विविधा ?

☆ निसर्गायन – खेड्यामधले घर कौलारू ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

निसर्ग जेवढा आपल्या डोळ्यांनी आपल्याला बाहेर दिसतो, तेवढाच तो मनामनात खोलवर रुजलेला असतो. आपलं बालपण  गेलं, त्या ठिकाणच्या आठवणी या बहुतांशी निसर्गाशी निगडित असतात. कोणाला आपल्या गावातली नदी आठवते, कोणाला आपली शेत, त्या शेतातली झाडं , त्या झाडांशी निगडित असलेल्या अनेक आठवणी असं हे निसर्गचित्र तुमच्या आमच्या मनात पक्कं रुजलेलं असतं . ती  झाडं , ते पशुपक्षी तुमच्या आमच्या मनाच्या आठवणींचा एक कप्पा व्यापून असतात. आपल्याकडे निरनिराळ्या समारंभाचे फोटो काढलेले असतात. त्याचे विविध अल्बम आपण आठवणी म्हणून जपून ठेवतो. पण कधी कधी या फोटोंमधले रंग फिके होऊ लागतात. चित्र धूसर होतात. पण मनामधला निसर्ग मात्र पक्का असतो. त्याचे रंग कधीही फिके होत नाहीत. उलट जसजसे वय वाढत जाते,  तसतसे ते रंग गडद, अधिक गहिरे होत जातात. त्याचा हिरवा रंग मनाला मोहवीत असतो. 

तुम्ही कामानिमित्त शहरात राहायला गेलेले असा, लॉकडाऊन मुळे घरात अडकलेले असा, तुमचा फ्लॅट, तुमचं घर छोटं असो की मोठं, तुमच्या मनात बालपणाचा तो निसर्ग ठाण मांडून बसलेला असतो. कोकणातून मुंबईत कामानिमित्त येणारे चाकरमानी, खेड्यापाड्यातून कामानिमित्त मुंबई पुण्याला स्थायिक झालेली माणसं ही सगळी वर्षातून एकदा तरी आपल्या गावी जायला मिळावं म्हणून केवढी आसुसलेली असतात. त्यांचं गाव, त्या गावातला निसर्ग त्यांना बोलावत असतो. त्याची ओढ असते. आणि तिथे गेल्यावर काय होतं  ? जणू जादू होते. शहरामध्ये दररोजच्या कामाने त्रासलेला तो जीव, तिथे गेल्यानंतर ताजातवाना होतो. जणू जादूची कांडी फिरते. काय विशेष असते त्या गावात असे ? पण ते विशेष त्यालाच माहिती असते, ज्याने तिथे आपले बालपण घालवलेले असते.   कवी अनिल भारती यांची ‘ खेड्यामधले घर कौलारू ..’ ही रचना पहा. किती साधे आणि सोपे शब्द.. ! पण त्यातला गोडवा किती कमालीचा…! मालती पांडे यांनी गायीलेलं हे गीत आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलंही असेल. 

आज अचानक एकाएकी 

मानस तेथे लागे विहरू 

खेड्यामधले घर कौलारू. 

पूर्व दिशेला नदी वाहते 

त्यात बालपण वाहत येते 

उंबरठ्याशी येऊन मिळते 

यौवन लागे उगा बावरू 

माहेरची प्रेमळ माती 

त्या मातीतून पिकते प्रीती 

कणसावरची माणिक मोती 

तिथे भिरभिरे स्मृती पाखरू 

आयुष्याच्या पाऊलवाटा 

किती तुडविल्या येता-जाता 

परि आईची आठवण येता 

मनी वादळे होती सुरु. 

अगदी साधे सोपे शब्द. पण त्या शब्दात ताकद केवढी ! जणू तुम्हाला त्या वातावरणात घेऊन जातात ते शब्द.

शब्द आपल्याला वाटतात तेवढे साधे नसतात. त्यांना आठवणींचा गंध असतो. पहिल्या पावसाने माती ओली होते. एक अनामिक पण हवाहवासा वाटणारा गंध आपल्यापर्यंत पोहचवते. जसं आपण म्हणतो, फुलाला सुगंध मातीचा, तसाच मातीलाही स्वतःचा एक सुगंध असतो. तो सुगंध आणतात त्या पावसाच्या धारा. जसा मातीला गंध असतो, तसाच शब्दांनाही गंध असतो. आणि तो गंध अनेक आठवणी आपल्यासोबत घेऊन येतो. 

वरच्या कवितेतलं दुसरं कडवं नदीशी संबंधित आहे. कुणीतरी असं म्हटलंय की ज्याच्या गावात नदी असते, त्याचं बालपण समृद्ध असतं . आणि ते खरंच आहे. नद्यांना केवढं मोठं स्थान आपल्या जीवनात आहे ! प्रत्येकाच्या गावातली नदी छोटी असेल किंवा मोठी, पण तिच्याशी त्याच्या अनेक आठवणी निगडित असतात. गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांची नुसती नावं घेतली तरी त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी आपल्याला आठवतात. कुठेतरी लग्नात गुरुजींनी म्हटलेले मंगलाष्टक आठवते. कुठे अलाहाबादचा त्रिवेणी संगम आठवतो. तसंही ज्याच्या त्याच्या गावातली नदी ही त्याच्यासाठी गंगेसारखीच पवित्र असते. जेव्हा लोक नासिकला जातात आणि गोदावरीत स्नान करतात, किंवा तिथे जाऊन येतात, तेव्हा मी गोदावरीवर गेलो होतो असं म्हणत नाहीत. मी गंगेवर गेलो होतो असंच म्हटलं जातं . 

या कवितेचं तिसरं कडवं बघा. गावाकडची ओढ का असते लोकांना ? तर ‘ माहेरची प्रेमळ माती..’ ही माती केवळ अन्नधान्य पिकवीत नाही. त्या मातीतून प्रीती म्हणजेच प्रेमही पिकतं. शेतातल्या कणसांना जे दाणे लागतात, ते माणिक मोत्यांसारखे मौल्यवान आहेत. आणि त्याच्याशी कवीच्या स्मृती निगडित आहेत. स्मृतींचं पाखरू जणू तिथं घिरट्या घालत असतं . आणि शेवटचं कडवं तर अप्रतिमच. आयुष्यात आपण सुख दुःखाच्या, संकटांच्या अनेक पाऊलवाटा तुडवतो. पण त्याचं फार काही वाटत नाही आपल्याला. पण जेव्हा आईची आठवण होते, मग ती आपली आई असो वा काळी आई म्हणजे शेती, तिची आठवण आली की मनात वादळे सुरु होतात. मन तिच्या आठवणीने आणि ओढीने बेचैन होते. 

असा हा निसर्ग आपल्याला समृद्ध करीत असतो. त्याच्यात आणि आपल्यात एक अतूट नातं असतं . खरं म्हणजे आपणही निसर्गाचाच एक भाग असतो. पण आपलं अलीकडंच जीवनच असं काही झालं आहे, की ते नातं तुटायची वेळ जणू काही येते. आणि माणसाच्या जीवनातून निसर्ग वजा केला तर, काहीच शिल्लक राहणार नाही.

मला कधी कधी भीती वाटते ती पुढच्या पिढीची. जी शहरातून राहते आहे. आणि निसर्गाच्या या सुंदर वातावरणाला आणि अनुभवाला पारखी होते आहे. याचा बराचसा दोष आमच्याकडेही जातो. आम्ही लहानपणी जी नदी पाहिली , अनुभवली ती आता आम्ही आमच्या मुलांना, भावी पिढीला अनुभवायला देऊ शकू का ? आम्हाला जसा निसर्गाचा लळा लागला, तसा त्यांना लावता येईल का ? त्यांच्या चार भिंतीच्या पुस्तकी शिक्षणात निसर्ग शिक्षणाला स्थान असेल का ? पुस्तकातल्या माहितीवर जशी आम्ही त्यांची परीक्षा घेतो, तशी त्यांना निसर्गज्ञान, निसर्ग अनुभव देऊन घेता येईल का ? त्यांना जंगलं , प्राणी, पक्षी हे अनुभवायला देता येतील का ?  मोबाईल, टीव्ही, सिनेमे, पुस्तके यांच्यापलीकडेही एक वेगळे जग अस्तित्वात आहे याची जाणीव आम्हाला त्यांना करून देता येईल का ? सध्या तरी या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. त्यासाठी वेगळे स्वतंत्र प्रयत्न करावे लागतील. अन्यथा पर्यावरण दिवस, वसुंधरा दिन इ साजरे करून आपण आपल्या मनाचे समाधान फक्त करून घेऊ. 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! नळ आणि बादली ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 नळ आणि बादली ! 😅  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“अगं ऐकलंस का, जरा घोटभर आल्याचा चहा देतेस का ? घसा अगदी सुखून गेलाय !”

“पाणी नाहीये !”

“म्हणजे ? आज पाणी आलंच नाही नळाला ?”

“मी असं कुठे म्हटलं ?”

“अगं पण तू आत्ताच म्हणालीस ना की पाणी नाहीये म्हणून !”

“हजारदा सांगितलं कान तपासून घ्या, कान तपासून घ्या, पण माझं मेलीच कोण ऐकतोय ?”

“आता यात माझे कान तपासायच काय मधेच ? मला नीट ऐकू येतंय आणि तूच म्हणालीस की पाणी नाहीये म्हणून, हॊ की नाही ?”

“हॊ मी म्हणाले तसं, पण नळाला पाणी नाहीये असं कुठं म्हणाले ?”

“बरं बाई, चुकलं माझं !”

“नेहमीप्रमाणे !”

“कबूल ! नेहमीप्रमाणे चुकलं ! तू नुसतंच पाणी नाहीये असं म्हणालीस ! पण चहा पुरतं तरी पाणी असेल ना घरात ?”

“अहो यंदा पावसाने सगळ्यांच्या तोंडच पाणी पळवलंय आणि तुम्हांला आल्याचा चहा प्यायची हौस आल्ये ?”

“अगं येईल तो त्याच्या कला कलाने, त्यात काय एवढं ? आता तरी मला जरा घोटभर चहा देशील का ?”

“अजिबात नाही, आधी मला पाच हजार द्या, नवीन साडी घ्यायला मग करते तुमच्यासाठी आल्याचा चहा !”

“आता हे काय मधेच साडीच काढलयस तू ? अजून कपाटातल्या 10-12 साडया एकदा तरी तुझ्या अंगाला लागल्येत का सांग बरं मला ? आणि त्यात ही आणखी एक नवीन साडी घेणार आहेस आणि ती सुद्धा पाच हजाराची ?”

“अहो कालच आमच्या ‘ढालगज महिला मंडळाने’ एक ठराव पास केलाय आणि त्या नुसारच आम्ही सगळयांजणी ही विशिष्ट डिझाईनची नवीन साडी घालून लग्नाला जाणार आहोत !”

“सध्या तरी लग्नाचा कुठलाच मुहूर्त नाही, मग ही पाच हजाराची विशिष्ट डिझाईनची साडी नेसून तुमचं महिला मंडळ कुणाच लग्न अटेंड करणार आहे, हे कळेल का मला ?”

“अहो मी मगाशी म्हटलं नाही का ? या मेल्या पावसाने गडप होऊन सगळ्यांच्या तोंडच पाणी पळवलं आहे म्हणून ?”

“हॊ, पण त्या मेल्या पावसाचा आणि तुम्ही जाणार असलेल्या लग्नाचा काय संबंध ?”

“सांगते नां, तुम्हांला माहितच आहे आपल्याकडे गावा गावातून, जर पाऊस पडला नाही तर तो पडावा म्हणून, भावला भावलीच किंवा बेडूक बेडकीच लग्न लावतात !”

“हॊ, वाचलंय खरं तसं मी पेपरात, पण अशी अनोखी लग्न लावून खरंच पाऊस पडतो यावर माझा अजिबात विश्वास नाही हं !”

“पण आमच्या महिला मंडळाचा आहे नां !”

“म्हणजे आता तुम्ही पाऊस पडावा म्हणून तुमच्या मंडळात असं बेडका बेडकीच किंवा भावला भावलीच लग्न लावणार की काय ? आणि त्या साठी पाच हजाराची नवीन साडी ?”

“अहो आपल्या मुंबईत कुठे मिळणार बेडूक आणि बेडकी लग्न लावायला ?”

“का नाही मिळणार ? अगं तुम्ही क्रॉफर्ड मार्केटला गेलात तर बेडूक आणि बेडकीच काय, मगर किंवा सुसरीची जिवंत जोडी सुद्धा मिळेल त्यांच लग्न लावायला !”

“मिळेल हॊ पण काही प्राणी प्रेमी बायकांचा त्याला विरोध आहे म्हणून….”

“मग भावला भावलीच लग्न लावा की ?”

“अहो आता आम्ही सगळ्याजणी दिसत नसलो, तरी आज्या झालोय म्हटलं ! मग आम्ही भावला भावलीच लग्न लावलं तर लोकं हसतील नाही का आम्हांला !”

“आता भावला भावली नाही, बेडूक बेडकी नाही म्हणतेस, मग तुमच्या लग्नात नवरा नवरी कोण असणार आहेत ते तरी सांग मला ?”

“नळ आणि बादली !”

“का ssss य ssss ?”

“अहो केवढ्यानं ओरडताय ?”

“नळाच आणि बादलीच लग्न लावणार आहे तुमचं ढालगज महिला मंडळ ?”

“मग, त्याला काय झालं ? आपण शहरात राहातो आणि या दोन गोष्टींचा पाण्याशी अत्यंत जवळचा संबंध आहे हे विसरू नका तुम्ही ! आणि पाऊस जर चांगला झाला तरच आपल्या घरात नळाला पाणी येतं हे पण तितकंच खरं आहे नां ?”

“हॊ खरं आहे तू म्हणतेस ते !”

“नेहमीप्रमाणे !”

“हॊ नेहमीप्रमाणे, पण म्हणून या लग्नाला पाच हजाराची साडी ?”

“अहो मी सुरवातीलाच म्हटलं नाही का, आम्ही सगळ्याजणी या लग्नात विशिष्ट डिझाईन केलेली साडी नेसणार आहोत म्हणून !”

“हॊ, पण म्हणून या अशा लग्नाला पाच हजारची साडी घ्यायची म्हणजे….. !”

“अहो आमची प्रत्येक साडी, प्रोफेशनल साडी डिझाईनर कडून स्पेशली बनवून घेतल्यामुळे त्याची किंमत तेवढी असणारच ना आता ?”

“एवढं कसलं डिझाईन असणार आहे त्या साड्यांवर ?”

“अहो मी आत्ताच म्हटलं नां तुम्हांला, की पाऊस पडावा म्हणून आम्ही आमच्या मंडळात नळाच आणि बादलीच लग्न लावणार आहोत म्हणून ?”

“हॊ ! “

“अहो म्हणूनच आमच्या प्रत्येकीच्या साडीचा रंग जरी वेगळा असला, तरी या लग्नाचा पावसावर इम्पॅक्ट पडण्यासाठी आमच्या सगळ्या साड्यांवर वेगवेगळ्या साईझचे व डिझाईनचे नळ असणार आहेत आणि त्याच्या जोडीला वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगाच्या बादल्या पण असणार आहेत !”

“धन्य आहे तुमच्या मंडळाच्या ढालगजपणाची !”

© प्रमोद वामन वर्तक

१९-०६-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवा काळ आणि समस्या ☆ श्री गौतम रामराव कांबळे ☆

श्री गौतम रामराव कांबळे

? विविधा ?

☆नवा काळ आणि समस्या ☆ श्री गौतम रामराव कांबळे

साधारण चाळीसेक वर्षापूर्वीची गोष्ट असावी. आजही स्मरणात घर करून बसली आहे. मी चौथीला असेन त्यावेळी. वडीलांच्या कडक शिस्तीत वाढत होतो.

त्यांचे काही नियमही होते. त्यापैकी एक म्हणजे, घर व गल्लीचा परिसर सोडून खेळायला लांब जायचे नाही. आमच्या खेडेगावात  बहुतेक सगळ्या पालकांचा या बाबतीत नियम सारखाच.

आमचे घर गावाच्या दक्षिण टोकाला. एकदा असाच मी शाळेतील मित्रांच्या नादाने गावाच्या उत्तरेकडील गल्लीत खेळायला गेलो होतो. चांगलाच रमलो होतो.  त्या गल्लीतील एका ज्येष्ठ माणसाने मला पाहिले. मी या गल्लीत नवीन आहे हे त्यांनी ओळखले. मला त्यांनी हटकले. जवळ बोलावून म्हणाले,

“कुणाचा रं तू?”

मी वडीलांचे नाव सांगितले.

“मग इकडं कसा आलायस?”

मी गप्प.

“तुज्या ‘बा’ला म्हाईत हाय का?”

बापाचं नाव काढल्यावर पोटात गोळा आला.

मी काही न बोलता नकारार्थी मान हलवली.

“चाटदिशी घरला जायाचं. न्हायतर मार खाशील. तुजा बा इचारू दे. मग त्येला पण सांगतो.” ते अधिकारवाणीने बोलले.

मागं न बघता नीट घर गाठलं. पण मनात भीती होती. वडीलांना समजलं तर काय खरं नव्हतं. कशानं हाणतील याचा नेम नव्हता.

वडील संध्याकाळी शेतातून आले. मूड चांगला वाटला त्यांचा. विचार केला, त्या माणसानं सांगण्या अगोदर आपणच सांगितलं तर बरं होईल. थोडक्यात तरी भागंल.

मी म्हणलं, “तात्या, आज मी वाण्याच्या गल्लीत गेल्तो.”

“कशाला”

“पंडासंगं”

पंडीत देसाई हा माझा मित्र. त्याला सगळे पंडाच म्हणायचे. त्यांच्या आणि आमच्या घरचे चांगले होते. त्यामुळे फार अडचण येणार नव्हती.

“बर मग?” तात्यांचा प्रश्न.

तिथंले काका इकडं का आलायस म्हणून रागावले मला. “मार खाशील म्हणाले”

 “का?”

“घरात माहीत हाय का म्हणून इचारलं”

“तू काय सांगितलंस?”

“न्हाय म्हणालो”

“त्येच्या पायात पायताण न्हवतं का? तोंडानं बोलण्यापेक्षा हाणायला पाहिजे होतं.” वडीलांचा शेरा.

मी गप्प बसलो. असंच वातावरण असायचं गावाकडं. गल्लीतल्याच काय गावातल्या प्रत्येक माणसाचं सगळ्या मुलांकडं लक्ष असायचं. धाक असायचा.  कुणाच्या मुलाला कुणीही  रागवलं तर आई बापाला राग यायचा नाही.

आई, बापाची न्हायतर मामाची भीती घालायची. बाप काकाची भीती घालायचा. म्हाताऱ्या माणसांना तर कुणालाही रागवण्याचा अधिकारच असायचा. त्यामुळे मुलं, तरुण टरकून असायचे.

हल्ली एक समस्या होऊन बसली आहे. मुलं आई वडीलांची खूप लाडकी झाली आहेत. बाप, आत्या किंवा काका रागवला तर आईला राग येतो. आणि आई किंवा मुलाचा मामा रागावला तर बापाला राग येतो. मग गावातीलच काय शेजाऱ्या पाजाऱ्यानाही कुणाच्या मुलाला बोलायचे धाडस होत नाही.   परिणामी मुलांना कुणाचा धाक असा राहिलेलाच नाही.

चौकोनी कुटुंब पद्धतीचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. मुलं आपल्या मनाला वाटेल तशी वागत आहेत. व्यसनाधीनता वाढत आहे. याचा विचार कोण आणि कधी करणार हा प्रश्न उरतोय.

© श्री गौतम रामराव कांबळे

शामरावनगर,सांगली.

9421222834

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “तिनं काय करायचं?” ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ “तिनं काय करायचं?” ☆ सौ. अमृता देशपांडे 

तिचा स्वभाव मुळातच थोडा अस्थिर. बहिणी ,भाऊ आणि  आई यांच्या नजरेत आणि प्रेमात मोठं झालं हे शेवटचं अपत्य.

लग्न करुन दिलेला परिवार ही  मोठाच. कोल्हापूर जवळचं खेडेगाव. ही घरची सर्वात मोठी सून. मिस्टरांचे नोकरी निमित्ताने मुंबईत वास्तव्य. त्यांचा स्वभाव ” संत माणूस “. आपलं काम, अणि योगी, ऋषी,  संत, अध्यात्म यात सदैव मग्न.

लग्नानंतर ती पण मुंबईत गेली. आर्थिक परिस्थिती त्यावेळी 40 -43 वर्षापूर्वी सर्वांचीच जेमतेम. तिने मशीन वर शिलाई करुन, साड्या फॉल पिको करुन आर्थिक बाजू आपल्या परीने उचलून धरली. मुंबई सारख्या

मायापूरीत छोटेसे घर घेणे शक्य करुन दाखवले.पुढे तर एकावर एक 1 +2 इमले उभे केले.दोन मुले मोठी झाली.उच्च शिक्षित झाली.यथावकाश लग्ने झाली. दोघानाही 2-2 मुले झाली. तिचे मिस्टर 60 व्या वर्षी निवृत्त झाले. मुले, सुना, नोकरी करणा-या . नातवंडे आज्जीजवळ. आज्जी निगुतिनं सगळं करत होती. दोन्ही मुलांनी आपले संसार थाटले. हिचं स्वयंपाकघर मोठ्या सुनेनं ताब्यात घेतलं. धाकट्यानं  जवळच घर घेतलं. आज्जिची विभागणी झाली. तिनं ही साठी ओलांडलीच की. शरीर आणि मन यांची सांगड घालताना तिची

घालमेल होऊ लागली आणि इथेच तिचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं. आता तिचा कामा पुरताच उपयोग राहिला. काम होत नाही तर सहवास ही नकोसा झाला होता.

त्यातच गावाकडे तिचे सासरे निवर्तले. खेडेगाव च्या पद्धतीप्रमाणे सासुबाईचे लेणे काढण्यात आले.हिला त्यांचे  भुंडे हात बघवले नाहीत. पठ्ठीन आपल्या हातातल्या पाटल्या ( ज्या तिच्या  आईन तिला लग्नात घातल्या होत्या) सासूच्या हातात चढवल्या.

🤦🏻‍♀️ हे कळताच नवरा, मुले, सुना तिच्यावर इतक्या नाराज झाल्या की तिच्याशी बोलणेच बंद केले. मोबाइल चालू ठेवायला ही पैसे देत नाहीत.

आता ना तिच्या हातात पैसा, ना कुणाचा शब्द!

आयुष्यभर तिने पार पाडलेल्या जबाबदा-या, खस्ता, कष्ट, पतीला दिलेली साथ, प्रेमाने एकत्र बांधून ठेवलेला परिवार, सुनाना वेळोवेळी  केलेली मदत, नातवंडांचं प्रेम हे सगळं इतक्या सहजतेनं संपतं?

काय चुकलं तिचं?

काय करायचं तिनं?

ती साधी?

ती भोळी?

ती बावळट?

की ती खुळी?

 

मला तरी या प्रश्नांनी  भंडावून सोडलय…..

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 22 – मठातली साधना ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 22 – मठातली साधना ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

वराहनगर मठात श्री रामकृष्ण संघाचं काम सर्व शिष्य नरेंद्रनाथांच्या मार्गदर्शनाखाली करत होते. उत्तर भारतातले आखाड्यातले साधू बैरागी, वैष्णव पंथातले साधू समाजाला परिचित होते. पण शंकराचार्यांच्या परंपरेतल्या संन्याशांची फार माहिती नव्हती. त्यामुळे वराहनगर मठातल्या तरुण संन्याशांबद्दल समाजाची उपेक्षित वृत्ती होती. चांगले शिकले सवरलेले असून सुद्धा काही उद्योगधंदा न करता, संन्यास घेऊन हे तरुण लौकिक उन्नतीचा मार्ग दूर ठेवत आहेत, हे पाहून लोक खेद करत, उपेक्षा करत, कधी अपमान करत. तिरस्कार करत. कधी कधी कणव येई, तर कधी टिंगल होई.

पण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काही करायचे म्हणजे असेच सर्व गोष्टींना सामोरे जावे लागते. समाजाने स्वीकारे पर्यन्त, बदल होण्याची वाट बघत हळूहळू पुढे जावे लागते. तसे सर्व शिष्यांमधे हा वाट पाहण्याचा संयम होता. दूरदर्शीपणा होता. कारण तसे ध्येय ठरवूनच त्यांनी घरादारचा त्याग केला होता आणि संन्यस्त वृत्ती स्वीकारली होती. हे तरुण यात्रिक अध्यात्म मार्गावरचे एकेक पाऊल पुढे टाकत चालले होते. भारताच्या आध्यात्मिक जीवनात संन्यस्त जीवनाचा सामूहिक प्रयोग नवा होता.

“आपल्याला सार्‍या मानवजातीला आध्यात्मिक प्रेरणा द्यायची आहे, तेंव्हा आपला भर तत्वांचा, मूल्यांचा,आणि विचारांचा प्रसार करण्यावर हवा. संन्यास घेतलेल्यांनी किरकोळ कर्मकांडात गुंतू  नये”. असे मत नरेंद्रनाथांचे होते. या मठातलं जीवन, साधनेला वाहिलेलं होतं.

शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास, संस्कृत ग्रंथ व धर्म आणि अध्यात्म संबंधित ग्रंथांचे वाचन होत असे. हिंदूधर्म याबरोबर ख्रिस्तधर्म आणि बुद्धधर्म यांचाही अभ्यास केला जात होता. या धर्मांचा तुलनात्मक अभ्यास व्हायचा. इथे धर्मभेदाला पहिल्यापासूनच थारा नव्हता असे दिसते. शंकराचार्य आणि कांट यांच्या तत्वज्ञानाचा तौलनिक अभ्यास पण इथे होत होता. हे सर्व अनुभवास आल्यानंतर जाणकारांची उपेक्षा जरा कमी झाली आणि जिज्ञासा वाढली.

कधी ख्रिस्त धर्माचे प्रचारक मिशनरी येत त्यांच्या बरोबर चर्चेत हिंदू धर्माच्या तुलनेत ख्रिस्त धर्म कसा उणा आहे ते चातुर्याने आणि प्रभावी युक्तिवादाने नरेंद्र पटवून देत असत. ख्रिस्ताचे खरे मोठेपण कशात आहे तेही समजाऊन सांगत. हे विवेचन ऐकून धर्मोपदेशक सुद्धा थक्क होऊन जात.

हिंदू धर्मातील इतर पंथांचाही इथे अभ्यास चाले. तत्वज्ञानाच्या आधुनिक विचारवंतांनाही इथे स्थान होते. जडवादी आणि निरीश्वरवादी विचारसरणीचा परिचय करून घेतला जात होता. फ्रेंच राज्यक्रांतीचं महत्व सुद्धा नरेंद्रनाथ समजाऊन सांगत असत. साधनेच्या जोडीला अभ्यास हे वराहनगरच्या मठाचं वैशिष्ठ्य होतं. श्री रामकृष्ण यांच्या गृहस्थाश्रमी शिष्यांना एकत्र यायला हा मठ एक स्थान झालं होत. हळूहळू लोकांच्या मनातील दुरावा कमी झाला होता.

तीर्थयात्रा ही आपली पूर्वापार चालत आलेली परंपरा आणि धार्मिक जीवनाचा एक भाग पण. शिवाय श्रीरामकृष्ण यांनीही एकदा संगितले होते, की, “संन्याशाने एका जागी स्थिर राहू नये. वाहते पाणी जसे स्वच्छ राहते, तसे फिरत राहणारा संन्यासी आध्यात्मिक दृष्ट्या स्थिर आणि निर्मळ राहतो”.

या मठातील गुरुबंधूंना तीर्थयात्रेची उर्मी येत असे. त्याप्रमाणे नरेंद्रनाथांना पण एका क्षणी वाटले की, आपणच नाही तर सर्व गुरुबंधूंनी पण परिभ्रमण करावे. अनुभव घ्यावेत, त्यातून शिकावे. त्यामुळे प्रत्येकाच्या आंतरिक शक्तींचा विकास होईल. वराहनगर मठ हा एक मध्यवर्ती केंद्र म्हणून असेल, कोणी कुठे ही गेलं तरी सर्वांनी या केंद्राशी संपर्कात राहावं. शशी यांनी हा मठ सांभाळण्याची जबाबदारी घेतली. दोन वर्षानी १८८८ मध्ये नरेंद्रने वराहनगर मठ अर्थात कलकत्ता सोडले आणि त्यांच्या परिव्राजक पर्वाचा प्रारंभ झाला.

सुरूवातीला ते वाराणशीला आले. प्रवासात ते आपली ओळख फक्त एक संन्यासी म्हणून देत. अंगावर भगवी वस्त्रे, हातात दंड व कमंडलू, खांद्यावरील झोळीत एकदोन वस्त्रे, एखादे पांघरुण एव्हढेच सामान घेऊन भ्रमण करत. शिवाय बरोबर ‘भगवद्गीता’ आणि ‘द इमिटेशन ऑफ ख्राईस्ट’ ही दोन पुस्तके असायची. रोख पैशांना स्पर्श करायचा नाही, कोणाकडे काही मागायचे नाही हे त्यांचे व्रत होते.

सर्व गुरुबंधुना पण ते प्रोत्साहित करू लागले की, भारत देश बघावा लागेल, समजावा लागेल. लक्षावधी माणसांच्या जीवनातील विभिन्न थरांमध्ये काय वेदना आहेत, त्यांच्या आकांक्षा पूर्ण न होण्याची कारणे काय आहेत ते शोधावे लागेल. हे ध्येय समोर ठेऊन ,भारतीय मनुष्याच्या कल्याणाचे व्रत घेऊन स्वामी विवेकानंद यांचे हिंदुस्थानात भ्रमण सुरू झाले.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ काल्या आणि पंडी… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? विविधा ? 

☆ काल्या आणि पंडी… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

काल्या म्हणजे आमच्या घरादाराचं रक्षण करणारा आमचा लाडका ईमानी कुत्रा..अगदी काळ्या कुट्ट रंगाचा… 

म्हणून त्याला आम्ही सगळे काल्याच म्हणतो…काही वर्षापूर्वी गावात उंट घेऊन आलेल्या भटक्या कुटूंबासोबत काल्या आला होता.उंटवाले गेले पण काल्या मागे राहिला.घरातल्या भाकरी तुकड्यावर मोठा झाला आणि घरातला रक्षक सदस्यच बनून राहीला..

तशीच आमची मनी माऊ पंडी…घरभर फिरून पायात लुडबूड करणारी आमची मनी तिला आम्ही सगळेच पंडी म्हणतो. काल्या आणि पंडी दोघांची जाम मैत्री…दोघेही आपल्या आपल्या तोऱ्यात अंगणभर वावरत असतात.

आम्ही गावी गेलो की काल्याला खूप आनंद होतो. काल्या अंगावर झेप घेत कडकडून भेटायला हमखास अंगणात असतोच.त्याचं काळं नूळनूळीत शरीर आणि तशीच वळवणारी शेपटी सारखी हलत असते…आणि पंडी तर म्याऊ म्याऊ करत पायात घुटमळत येत असते.. रात्री आणि दिवसभर कोणीही अनोळखी दिसला तर काल्या गुरगुरला म्हणून समजाच…. रस्त्यावर,अंगणात, झाडाखाली आणि शेडमध्ये ऐटीत बसून जागरूक राहणारा काल्या..तर  अंगणात आणि झाडावर फिरून भक्ष पकडून घरभर मिरवत मट्ट करणारी पंडी…!

सगळ्यांची जेवणावळ बसली की पंडी ताटाभोवती लुडबुडत राहते आणि काल्या दारात शेपटी हलवत जिभळ्या चाटत केविलवाण्या चेहर्‍याने बसलेला असतो.संध्याकाळी अंगणात जागरूक असलेला काल्या आणि शांत झोपलेलं घर असतं.पंडी मात्र पायात घरघरत मस्त झोप घेत राहते…. अंगणातल्या शेळ्या,गाई आणि कोंबड्यांच्या रखवालीची जबाबदारी काल्या घेतो.आणि पंडी घरातली जबाबदारी पार पाडते..कधी कधी चोरून दुध गट्ट्म करताना आईच्या हातचा फटका बसतो तिला.मग दूर जाऊन पाय आणि तोंड जिभेने साफ करत बसलेली असते पंडी….. मोकळ्या वेळात आरामात लोळण घेत पडलेली निरागस वाटते पंडी..पण तशी ती नसते.. पंडी आणि काल्या कधी कधी मजेत खेळत असतात… त्यांच्यातल्या अनोख्या मैत्रीने अंगण खेळकर बनून राहते.पहाटे आम्ही बच्चे कंपनी खडीवर भटकायला निघालो की काल्या आमच्या पुढे असतोच..त्याच्या शिवाय भटकंतीला मजा येत नाही. लहानपणी ‘पदी ‘नावाची कुत्री पण अशीच आठवण ठेवून गेलेली.

अशा मुक्या प्राण्यांनी आणि पक्षांनी गावचे घर अंगण असं सजून नेहमी किलबिलत असतं…सगळेजण घरादाराशी दिवस रात्र गप्पा मारत राहतात.मुक्या प्राण्यांची अशी बोलकी प्रीत काळजात जपून ठेवावी अशीच असते….अशी ही आमची मैत्री गावाकडे गेलो की हमखास एकमेंकांच्या स्वागतासाठी सज्ज असते…!

चित्र – प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

‘काळजातला बाप ‘कार..

मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

९४२११२५३५७…

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बालकामगार निषेध दिनानिमित्त… भाग-2 ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?  विविधा ?

☆ बालकामगार निषेध दिनानिमित्त… भाग-2 ☆ सुश्री त्रिशला शहा 

(बालकामगार निषेध दिन (12जून) त्यानिमीत्त)

यामधे अगदी थोडीच मुले शिक्षणाकरिता हातभार म्हणून मजूरी करतात.पण बऱ्याचवेळेला शिक्षणाची आवड नसणारे, शाळेत न जाता चैनी करण्यासाठी मजूरी करुन पैसे मिळवतात.फँक्टरी मालक,हाँटेलमालक सुध्दा अशा मुलांना कामावर ठेऊन घेतात. कारण या मुलांना मजूरी कमी दिली तरी चालते.म्हणून कमी पैशात अशा बालकांकडून काम करुन घेण्याचा त्यांचा मनोदय असतो.एकदा का मजूरी करुन का होईना पैसे मिळतात म्हटल्यावर ही मुले शिक्षणाला रामराम ठोकतात आणि अशा तुटपुंज्या मजूरीवर  राबत रहातात.

फैक्ट्री एक्ट १९६९ मधे अशा बालमजूरांना कामावर ठेऊन घेतल्यास फँक्टरी मालकावर गुन्हा दाखल करण्याची तरतुद आहे.यामधे मालकाला दंड व कारावासाची शिक्षा सुनावली जाते.भारतात  १९८६ ला बालकामगार विरोधी कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर १ सप्टेंबर २०१६  रोजी या कायद्यात दुरुस्ती करुन १४ वर्षाखालील मुलांना काम करण्यास कायद्याने बंदी घातली.मुलांनी शिक्षण घ्यावे म्हणून शाळेत माध्यान्ह भोजनाची तरतूद करण्यात आली.तरीसुध्दा म्हणावा तितका बालमजुरीचा प्रश्न संपुष्टात आलेला नाही.मात्र काही राज्यातून यासाठीच्या प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.याबाबतीत एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ओरीसा राज्यातील मयुरभंज या गावात बालमजूरी पुर्णपणे बंद आहे. इथे मुलांकडून काम करुन घेतले जात नाही.आंध्रप्रदेश मधे पण अशी पावले उचलली जात आहेत.

पं. नेहरुंना लहान मुले खूप आवडायची. आपणही या मुलांच बालपण जपण्यासाठी प्रयत्नशील राहुया.तरचं बालमजूरी आणि बालकामगार याविषयीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.आणि त्यांच्यासाठी म्हणूया.

‘प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा ‘

समाप्त

(लेख 12 जून ला प्रसिद्ध करू शकलो नाही.क्षमस्व. संपादक मंडळ)

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बालकामगार निषेध दिनानिमित्त… भाग-1 ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?  विविधा ?

☆ बालकामगार निषेध दिनानिमित्त… भाग-1☆ सुश्री त्रिशला शहा 

(बालकामगार निषेध दिन (12जून) त्यानिमीत्त)

‘बाळपणीचा काळ सुखाचा’ असं म्हटल जात,कारण या वयात कशाची चिंता,काळजी नसते.खाणे,पिणे,खेळणे आणि शाळेत जाणेएवढच काम लहान मुलांच असत.मोठ्यांना असणाऱ्या काळज्या,समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत.पैसे मिळवण,घर चालवण हा त्रास मुलांना नसतो.त्यामुळेच की काय ‘ रम्य ते बालपण’ अस म्हटल जात.पण काही मुलांच्या बाबतीत हे बालपण रम्य नसते.ज्या वयात या मुलांच्या हाती वह्या,पुस्तके असायला हवीत त्या वयात या मुलांना मजूरीवर जाव लागत.

 घरातील पैशाची कमी, उपासमार, गरजेच्या वस्तू न मिळण शाळेच्या फी, पुस्तकासाठी पैसे नसणे अशा परिस्थिती मुळे मुलांना मजूरी करावी लागते. आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी त्यांना पालकांची मदत मिळत नाही. त्यामुळे सहाजिकच शाळेला  पूर्णविराम देऊन ही मुल, हाँटेलमधे टेबल पुसणे, भांडी घासणे, बांधकामावरच्या विटा उचलणे अशी काम करत रहातात.यालाच बालमजुरी किंवा बालकामगार असे म्हणतात, वयाची ९ वर्षे ते १६ वर्षे वयातील मुलांना बालकामगार म्हणतात.

काही वेळा पालकांना कामानिमित्त स्थलांतर करावे लागते.तसेच पालक शिक्षीत नसतील तर मुलंही शिक्षणापासून वंचित रहातात. त्यामुळे ही मुले मजूरीकडे वळतात.

बालमजूरी किंवा बालकामगार ही जागतिक समस्या आहे. पण अजूनही हा प्रश्न म्हणावा तितका सुटला नाही. भारतासारख्या संख्येने जास्त असलेल्या गरीब लोकांमधे ही समस्या अतिशय मोठ्या प्रमाणात दिसून येते. बऱ्याच गावात विशेषतः खेड्यामध्ये लहान मुलांना कामावर जावे लागते. उसतोड कामगारांची मुलं, बांधकामावर कामाला जाणाऱ्यांची मुलं बालमजूर म्हणून आई वडिलांबरोबर कामाला जातात. बरीच मुलं हाँटेल, कार्यालय, बार, वीटभट्टी, फँक्टरी अशा ठिकाणी मजूरी करताना दिसतात. फटाक्यांच्या फँक्टरीत तर असंख्य मुले काम करतात. अशा फँक्टरीमधे दुर्दैवाने काही अपघात झाला तर या मुलांना कायमचं अपंगत्व येण्याचीही शक्यता असते.

आईवडिलांचे कमी उत्पन्न,दारु पिणारे वडील, अनाथ मुले,घरातील कौटुंबिक वादविवाद, हिंसाचार अशा कारणांमुळे ही मुलं बालमजूर म्हणून काम करताना दिसतात.काही मुलं टि.व्ही.,सिनेमाच्या वेडापायी घरातून पळून जातात आणि त्यांना कुठेच आधार नाही मिळाला तर ते आपोआपचं मजूरीकडे वळतात.

क्रमशः…

(लेख 12 जून ला प्रसिद्ध करू शकलो नाही.क्षमस्व. संपादक मंडळ)

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares