मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ “चला बालीला…” – भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “चला बालीला…” – भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर 

२७/११/२३

बाली इंडोनेशियातील एक बेट.  जावा बेटाच्या पूर्वेकडचे हे बेट.  वास्तविक जावा, सुमित्रा, या हिंदी महासागरातल्या बेटांबद्दल शालेय जीवनात भूगोलातून अभ्यास केला होताच. बाली हेही याच बेटांपैकी असलेलं एक सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ.  कला, संगीत,  नृत्य,समुद्र किनारे आणि मंदिरे यासाठी प्रसिद्ध असलेलं एक नितांत सुंदर बेट आणि मित्र परिवारांच्या समवेत या बेटास प्रत्यक्ष भेट देण्याचे माझे एक बकेट लिस्ट मधले स्वप्न पूर्ण होण्याची संधी मला मिळाली.  जीवनातल्या अनेक भाग्य क्षणांच्या संग्रहात याही अनमोल क्षणाची भर पडली.

दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी आम्ही चक्क सिंगापूर एअरलाइन्सच्या एस क्यू 423 या फ्लाईटने *मुंबई ते सिंगापूर (चांगी विमानतळ) ते डेन पसार (न्गुराह राय विमानतळ) असा प्रवास करून बाली या बेटावर येऊन पोहोचलो. आम्ही बुक केलेले रिसाॉर्ट कर्मा चांडीसार हे विमानतळापासून जवळजवळ दोन तासाच्या अंतरावर होते. पण ड्राईव्ह अतिशय रमणीय होता.  सुंदर रस्ते,सभोवती अथांग सागर, झाडी, डोंगर आणि चौकाचौकातले उंच, कलात्मक, रामायणातली कॅरेक्टर्स शिल्पे! भव्य बांधकाम असलेली प्रवेशद्वारे. कोणती कोणती छायाचित्रे टिपावीत हेच कळेनासं झालं होतं.  मग ठरवलं आजचा तर पहिलाच दिवस आहे. छायाचित्रे टिपायला आपल्याजवळ अजून पुढचे सहा दिवस आहेतच की.

पण डेनपसार शहरात प्रवेश करता क्षणीच जाणवले होते ते इथली हिंदू धर्मीय जीवन पद्धती.  रामायण या पवित्र ग्रंथांशी त्यांचं असलेलं जन्मजात खोल नातं.  कसं असतं ना माणसाचं ? धर्म, संस्कृती, कला यांचं एकात्म्य हे क्षणात आपल्याला आपुलकीच्या नाते बंधनात जोडतं. मग वातावरणातल्या बदलाशी आपण नकळत तुलनात्मक रित्या बांधले जातो.

मी पटकन म्हणाले,” मला तर इथे आल्यापासून गोव्यात आल्यासारखंच वाटतंय!  इथल्या बोगन वेली, जास्वंदी, चाफा, कर्दळ, शिवाय नारळ, केळी, बांबू हे तर सारं कोकण —केरळ यांचीच आठवण करून देत होतं.  भारत आणि इंडोनेशियाचं हे मनातल्या मनात केलेलं एकत्रीकरण अर्थातच खूप गंमतीदार होतं.

आमचा सहा जणांचा ग्रुप.  मी, विलास, सतीश, साधना, सुमन आणि प्रमोद.  सतीश चे कर्मा ग्रुपचे सदस्यत्व असल्यामुळे आम्हाला कर्मा चांडीसार या प्राॅपर्टी मध्ये एक सुंदर ऐसपैस बंगला मिळाला होता.  तोही अगदी समुद्रकिनाऱ्याला लागूनच.  हिंदी महासागराचं जवळून  झालेलं ते नयनरम्य दर्शन केवळ अप्रतिम! आमचा सहा जणांचा ग्रुप एकदम आनंदला.

आम्ही सारे पंच्याहत्तरी  पार केलेले, खूप वर्षांपासून मैत्रीच्या घट्ट बंधनात बांधलेले. क्षणात अक्षरशः केवढे तरी तरुण झालो आणि या सहलीत आपण काय काय साहसे करू शकतो याविषयीचे बेत आखू लागलो. चालू ,चढू, पोहू करू की सारं…!! अंतर्मन म्हणायचं,” वय विसरू नका.” पण निसर्गाच्या सानिध्यात माणूस वय विसरतो हे मात्र खरं.

२८/११/२३ 

बालीत (इंडोनेशिया) प्रवेश केल्यावर हवाई अड्ड्यावरच आपण एकदम मिलियाॅनिअर झाल्याचा भास का असेना पण सुखद अनुभव आला. 

पोहोचल्याबरोबरच आम्ही प्रथम व्हिसाची प्रक्रिया पूर्ण केली. इथे व्हिसा ऑन अरायव्हल असतो. व्हिसासाठी आम्हाला प्रत्येकी ३३ डॉलर भरावे लागले. नंतर मनी चेंजरकडून इंडोनेशियन रुपयाची (आयडीआर) करन्सी घेतली आणि काय सांगू अक्षरशः पैशांचा पाऊसच पडला. केवळ ५० हजारा.चे जवळजवळ ८८ लाख इंडोनेशियन रुपये हातात आले. एकेक लाखाच्या, पन्नास हजारांच्या, वीस हजारांच्या च्या भरपूर नोटा.  पर्समध्ये मावेनात. क्षणात खूप श्रीमंत झाल्याचा एक मजेशीर अनुभव मात्र घेतला.

पहिल्या दिवशी टॅक्सीने आम्ही आमच्या आरक्षित बंगल्यावर जेव्हा आलो तेव्हा टॅक्सीचे बिल साडेनऊ लाख इंडोनेशीयन  रुपये झाले होते, त्याचीही गंमत वाटली.

तसे आम्ही दुपारीच पोहोचलो होतो.  विमानात खाणे झालेच होते तरीही थोडे ताजेतवाने होत बरोबर आणलेल्या खाद्यपदार्थांचा आम्ही समाचार घेतला.  सोबत सॉफ्ट ड्रिंक्स, रेड वाइन वगैरे होतंच. 

आमचा बंगला अगदी वेल फर्निश्ड आणि सर्व सुविधायुक्त होता. सुरेख सजवलेले अद्ययावत किचनही  होते.

पहिल्या दिवशी थोडा आरामच करायचे ठरवले. बंगल्याजवळच स्विमिंग पूल होता व तेथे असणार्‍या रेस्टॉरंट पलीकडे अथांग पसरलेला शांत. गूढ, हिंदी महासागर. या सागरात ठिकठिकाणी मोठ मोठी  जहाजे दिसत होती.   काही व्यापारीही असतील कारण बाली हे सुप्रसिद्ध व्यापारी बेट आहे. काही पर्यटन बोटीही असतील तर काही मच्छीमारांच्या बोटी होत्या.  मच्छीमारी हा इथला महत्त्वाचा व्यवसाय आहे.बालीचं हे प्राथमिक दर्शन मनभावन होतं.

हळूहळू सूर्य क्षितिजा पलीकडे गेला. सोनेरी किरणांनी आकाश रंगले आणि मग त्यातूनच अंधाराची वाट पसरत गेली. मात्र मानवनिर्मित रोषणाईने संपूर्ण सागर किनारा चमकू लागला. परिसरातील संमीश्र शांतता, गुढता अनुभवत आम्ही परतलो.  सतीशने दुसऱ्या दिवशीचा साईट सीईंगचा कार्यक्रम आखलेला होताच.

– क्रमश: भाग पहिला 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मनोवेधक मेघालय…भाग -६ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग -६ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(मावफ्लांगचे पवित्र जंगल)

प्रिय वाचकांनो,

आपल्याला दर वेळी प्रमाणे आजही कुमनो! (मेघालयच्या खासी या खास भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

मागील भागात मी वायदा केला होता की, आपल्याला मावफ्लांग (Mawphlang) च्या सेक्रेड ग्रोव्हज/ सेक्रेड वूड्स/ सेक्रेड फॉरेस्ट्स मध्ये जायचंय! चला तर मग तयार व्हा एका रोमांचक आणि अद्भुत प्रवासाकरता! सेक्रेड ग्रोव्हज/ सेक्रेड वूड्स/ सेक्रेड फॉरेस्ट्स अर्थात पवित्र जंगले किंवा उपवने यांना कांही विशिष्ट संस्कृतीत विशेष धार्मिक महत्व आहे. जगभरातील विविध संस्कृतींमध्ये ही पवित्र उपवने त्यांच्या वैशिष्ट्यांसह अस्तित्वात आहेत. ती जरी आपल्याला सुंदर लॅण्डस्केप्स (नुसती बघण्यापुरती किंवा चित्रे किंवा फोटो काढण्यापुरती प्रेक्षणीय स्थळे) म्हणून दिसत असलीत तरी कांही पंथी किंवा धर्मियांसाठीं ती त्यापलीकडे जाऊन अत्यंत महत्वाची पवित्र स्थळे आहेत. त्यातल्या त्यात काही विशिष्ट वृक्ष तर अत्यंत पवित्र मानले जातात. या समुदायाचे लोक ही वनराजी प्राणापलीकडे जपतात. याच जपणुकीमुळे येथील वृक्षवल्ली हजारो वर्षे जुनी असूनही सुरक्षित आहेत.

या पर्वतीय राज्याच्या वनराजीतच काही महत्वाच्या सांस्कृतिक परंपरांचा उगम आहे. खासी समाजाला अतिप्रिय अश्या या मावफ्लांगच्या पवित्र जंगलाने प्राचीन गुह्य इतिहास, गूढरम्य दंतकथा आणि विद्या आपल्या विस्तीर्ण हिरवाईत दडवून ठेवल्या आहेत. इथल्या उंचनिंच नैसर्गिक पायऱ्या अन पायवाटा, लहान थोर वृक्षसमूह, त्यांना लगडलेल्या लता, चित्रविचित्र पुष्पभार, झाडांवर आणि त्याखाली पसरलेली फळे, विस्तीर्ण पर्णराशी, जागोजागी विखुरलेले पाषाण (एकाश्म/ मोनोलिथ), मध्येच विविध सप्तकातील कूजनाने वनाची शांतता भंग करणारे पक्षी, बागडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे,  यत्र तत्र अन सर्वत्र  प्रवाही जलाचे ओहोळ, सारे कसे गूढ रम्य कादंबरीतील पात्रांसारखे, जणू प्रत्येकाला “मला काही सांगायचंय!” हेच वाटत असावं! येथील जमातींचे सकळ आयुष्यच मुळी या वनराजींशी जुळलेले, त्यांचे रक्षणकर्ते आणि त्यांना भयभीत करणारे जंगल एकच! 

शिलॉंग शहरापासून केवळ २६ किलोमीटर दूर असलेले हे मावफ्लांगचं सॅक्रेड ग्रूव्ह! आपली उपवनाची/जंगलाची कल्पना म्हणजे चांगल्या दगडी, काँक्रीट, संगमरवरी पायऱ्या, रस्ते, बसायला बेंच, कृत्रिम कारंजी, तरणतलाव, उपहारगृह, इत्यादी इत्यादी! मंडळी, इथं यातलं कांही कांही नाही. जंगल जसंच्या तसं! खालचा पालापाचोळा सुद्धा अस्पर्श, इथल्या कुठल्याही गोष्टीला माणसाचा स्पर्श वर्जित! अर्थात आपण रान तुडवतांना नाइलाजाने होतो तितकाच! मैत्रांनो, हेच ते अनामिक, अभूतपूर्व, अप्रतिम, अलौकिक, अनुपम, अनाहत, अनवट अन अस्पर्शित सौंदर्य! आम्हाला आमच्या गाईडने (वय वर्षे २१) या जंगलाचा हृदयाला भिडणारा विलक्षण असा संदेश सांगितला, “इथे या, डोळे भरून इथली निसर्गाची लयलूट बघा (कांहीही लुटून मात्र नेऊ नका), इथून नेणार असाल तर इथल्या सौंदर्याच्या स्मृती न्या अन जतन करा, हृदयात किंवा फार तर फार कॅमेऱ्यात! इथून एक वाळलेले पान तर सोडाच, काडी देखील उचलून नेऊ नका! मित्रांनो, ही अशी सक्ती असल्यावर जंगलतोड हा शब्द आपण स्वप्नांत देखील आठवणार नाही! अशी झाडांची जपणूक आपण करतो का? जमेल तिथे अन जमेल तशी पाने-फुले ओरबाडून घेणे आणि झाडांना इजा पोचवणे, हा उद्योग इतका कॉमन आहे की काय बोलावे! (आपल्याकरता प्रत्येक महिना श्रावणच असतो, पूजेकरिता पाने अन फुले नकोत का!!!)

सेक्रेड ग्रोव्हस मध्ये याला वाव नाही, उलट “असे कराल तर मृत्यू होतो, पासून तर कांही बाही होते”, हीच शिकवण या जमातीच्या दर पिढीला दिली गेलीय. इथं स्थानिक एक साधा नियम पाळतात (आपणही पाळायचा) “या जंगलातून कांहीही बाहेर जात नाही.” जर तुम्ही मृत लाकूड किंवा मृत पान चोरले तर काय होईल असा तुम्हाला प्रश्न पडेल. दंतकथा सांगतात “जो कोणी या जंगलातून काहीही घेऊन जाण्याचे धाडस करतो, तो गूढपणे आजारी पडतो. कधी कधी तर हे प्राणांवर देखील बेतते”. म्हणूनच तर इथे काही झाडे १००० वर्षांच्यावर जगताहेत, नैसर्गिक ऊर्जा, पाणी, खत, सर्व काही आहे त्यांच्याजवळ, सुदैवाने एकच गोष्ट नाही, माणसाची बुभुक्षित अन क्रूर नजर!!! ही वनसंपदा धार्मिक कारणांनी का होईना, राखली आहे इथल्या तिन्ही जमातींनी! इथे जैवविविधता उत्तमरित्या जतन केलेली आहे. वनस्पती आणि झाडांच्या प्रजातींच्या विस्तृत श्रेणी (यात दुर्मिळ प्रजाती सुद्धा आल्या बरं का!) फोफावल्या आहेत, निर्भय होऊन जगताहेत. मंत्रमुग्ध करणारी ही हिरवीकंच पर्जन्यवनराई इतकी कशी बहरते? याला कारण हिचे उष्णकटिबंधीय उगमस्थान! इथे वारा अन पाऊस फोफावतो, आनंदाचं उधाण येऊन! सोसाट्याचा वारा अन “घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा!” हे होणारच. (गाणं टाकलय शेवटी!)

प्रिय मैत्रांनो, इथला टाइम पाळणे अत्यावश्यक (सकाळी ९ ते संध्याकाळी ४.३०). उशीरा जंगलात जाणाऱ्यास आणि जंगलातून उशीरा बाहेर येणाऱ्यास माफी नाही! आपण या जंगलाला सरावलेलो नाही, त्यामुळे भटकणे टाळा. बघण्यासारखे बरेच काही असूनही तुमच्या डोळ्यांना ते दिसणारच नाही याची खात्री बाळगा. इथल्याच प्रशिक्षित स्थानिक वाटाड्या/ गाईडला पर्याय नाही. तुमचा हा गाईड इथली समृद्ध वनसंपदाच दाखवणार नाही तर तो इथला वनरक्षक आणि सांस्कृतिक वारसदार आहे, हे लक्ष्यात असू द्या! हा पथप्रदर्शक रोमहर्षक तऱ्हेनं या जंगलातले गूढ उलगडून दाखवेल, तसेच खासी जमातींच्या धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धेचा अन या जंगलाचा संबंध तपशीलासह सांगेल! मंडळी, तो इथले पानंपान बघता बघताच मोठा झालाय! इथल्या दंतकथा त्याच्याच प्रभावी निवेदनातून ऐकाव्या मित्रांनो. गंमत म्हणजे सर्व गाईड्सची जबानी सारखीच (समान प्रशिक्षण!), आमचा तरुण गाईड तर अस्खलित इंग्रजी बोलत होता. त्यानंच आम्हाला खासी भाषेची जुजबी माहिती दिली.    

आता या वनसंपदेतील नेत्रदीपक व विस्मयकारक गोष्टी बघू या:

नयनरम्य जंगलातील पायवाट (फॉरेस्ट ट्रेल)

इथल्या या वेड्यावाकड्या वाटा पर्यटकांना अगम्य वाटाव्यात अशाच आहेत! इथे फिरतांना वृक्ष वल्लींच्या आपसूक सजलेल्या मंडपातून किंवा छताखालून जातच जावं. हे सदाहरित घनतिमिर बन आपल्यावर मायेची पाखर घालत सूर्यकिरणांचा स्पर्श सुद्धा घडू देत नाही! इथली पानगळीची विलक्षण नक्षी हिरव्या अन हळदी रंगांनी सजलेली! हे निबिड वनवैभव कायम वाऱ्याच्या संगीतावर दोलायमान होऊन सळसळत असतं! या पायवाटा आपल्याला घेऊन जातात इथल्या सांस्कृतिक परंपरेच्या जगात!  

वर्षा ऋतूतील मुसळधार पाऊस असेल तर हा प्रवास कैकपटीने दुस्तर! याच सुगम्य वाटा आता निसरड्या अन शेवाळल्या होतात! (आमचे अनुभवाचे बोल!) आम्ही निम्म्याहून अधिक वन पाहिले, पण नंतर पायवाट सुद्धा चालणे कठीण झाले. एक नदी ओलांडून मगच पुढे जावे लागेल, शिवाय परतीची वाट नाही, अशी माहिती गाईडने दिली अन आम्ही माघारी फिरलो. प्रिय वाचकांनो, सप्टेंबर-ऑक्टोबर हे महिने या परिसराला भेट द्यायला उत्तम!

एकाश्म/ मोनोलिथ्स

या वनाचे गूढ वर्धित करणाऱ्या अनाकलनीय स्थानांवर एकाश्म/मोनोलिथ्स (monoliths) आहेत. मोनोलिथ म्हणजे एक उभा विशाल पाषाण किंवा एकाश्म/ एकल शिळा! गाईडने सांगितले की, एकाश्म ही खासी लोकांच्या पूजेची ठिकाणे आहेत. यांचा वापर प्राण्यांचा बळी देण्यासाठी करतात. आपण ज्या सहजतेने मंदिरात जाऊन घंटा वाजवतो, त्याच प्रकारे हे लोक प्राण्यांचा बळी देतात. इथे एक मोनोलिथ फेस्टिव्हल (उत्सव) देखील असते, आदिवासींचा सांस्कृतिक वारसा आणि वैभव बघायची ही उत्तम संधी! या वेळी हे संपूर्ण जंगल जिवंत होऊन स्वतःची कथाच जणू विशद करत असावे!

खासी हेरिटेज गाव

गावकऱ्यांच्या हस्तकलेचे दर्शन आणि आदिवासी झोपड्या असलेले हे गाव प्रदर्शनासाठी तयार केले जात आहे! याचे काम विविध स्तरावर सुरु आहे असे स्थानिकांनी सांगितले.

लबासा, जंगलाची देवता

लबासा, ही आहे शक्तिशाली देवता, याच जंगलात संचार करणारी, या प्रदेशातील सर्व लोकांची तारणहार अन श्रद्धास्थान! म्हणूनच बघा ना, तिच्या कृपेने गावकऱ्यांची संपूर्ण उपजीविका जंगलाभोवतीच फिरत आहे. रोग असो, नशिबाचे फेरे असो किंवा दैनंदिन समस्या असोत, ही देवता त्यांच्या विश्वासाचा प्रमुख आधारवड आहे. आदिवासी लोकांचे रक्षण करण्यासाठी ही देवता वाघ किंवा बिबट्याचे रूप धारण करू शकते अशी आख्यायिका आहे. देवतेला प्रसन्न करण्यासाठी कोंबडा किंवा बकऱ्यांचा बळी दिल्या जातो. गावकरी त्यांच्या मृतांना या वनातच जाळतात.

पुढील भागात सफर करू या एका अत्यंत दुष्कर ट्रेलची!

तर आतापुरते खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

टीप – लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो आणि वीडियो (काही अपवाद वगळून) व्यक्तिगत आहेत!

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ धीर समीरे सरयू तीरे ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

धीर समीरे सरयू तीरे ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

राम राम वाचकहो!

२०२२ च्या रामनवमीचा पावन दिन, ठाण्यातील ‘राम गणेश गडकरी सभागृहात’ गीत रामायणाचे आवर्तन सुरु होते.  श्रीधर फडके यांचे स्वर! गाणे होते आपले सर्वांचे कंठस्थ अन हृदयस्थ, ‘सरयू तीरा वरी अयोध्या, मनू निर्मित नगरी’! देहभान हरपून गाणे हृदयात सामावून घेण्याची माझी ही पहिली वेळ नव्हे!

‘सामवेदसे बाळ बोलती, सर्गामागुन सर्ग चालती,

सचीव, मुनिजन, स्त्रिया डोलती, आंसवे गाली ओघळती

कुश लव रामायण गाती’

अशी अवस्था प्रत्येक वेळी प्रेक्षकांची होते, तशीच त्या दिनी होती. मात्र तशातच (होऊ नये असे वाटत असतांना नेमके) मध्यांतर झाले. या मध्यंतरात अचानक एखादी ‘देववाणी’ कानी पडावी तसे श्रीधरजींचे भावपूर्ण शब्द कानी पडले. “मी अयोध्येत गीत रामायण सादर करणार आहे जुलै २०२२ ला! शरयू किनारी, तेव्हाही कोरस मध्ये अशीच साथ द्यायला या मला!” तेव्हां मी अंतर्बाह्य मोहरून गेले! स्वप्नात, गाण्यात अन पुस्तकात कल्पिलेली अयोध्या, रामाच्या वास्तव्याने जिचा कण कण पुनीत झाला आहे, ज्या सरयू नामक सरितेच्या किनारी प्रत्यक्ष मनू (प्रथम मानव) ने निर्माण केलेली ती भव्य दिव्य नगरी, जिथे रामाचे आदर्श ‘रामराज्य’ प्रत्यक्ष साकारले ती अयोध्या! याची देही, याची डोळा अन याची हृदया बघायला मिळेल. डोळ्यात प्राण आणून ही नगरी बघावी, अन कानात जीव ओतून श्रीधरजींच्या मुखातून गीत रामायण ऐकावे, यालाच मणी कांचन योग म्हणावे! या अमृतमय योगायोगात अजूनच माधुर्य यायचे होते. त्याच अवधीत जेष्ठ गायक आणि कीर्तनकार श्री चारुदत्त आफळे रामकीर्तनरंगाने अयोध्येचे आसमंत उजळून टाकणार होते. आणखी काय हवे! सर्व कांही मनासारखे घडत असतांना मी अचानक आजारी पडले, माझी कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह होती! मात्र डॉक्टरांचा उचित सल्ला घेतल्यावर लक्षात आले की, गाडी सुटण्याच्या आदल्या दिवशी माझ्या कोरोनाचा ‘एकांतवास’ संपणार होता. मनातल्या मनात रामनामाचा गजर सुरु होता. सोबत असलेल्या अशक्तपणावर हेच ‘रामबाण’ औषध होते.

मंडळी, यात्रेच्या निर्धारित कार्यक्रमानुसार  मध्यरात्री जवळपास १२ च्या सुमारास आम्ही अयोध्येत पाऊल ठेवले. तीर्थक्षेत्राला अनुरूप अशा ‘जानकी महल’ या बऱ्यापैकी मोठ्या वास्तूतील आम्ही आरक्षित केलेल्या खोल्यांमध्ये प्रवेश मिळाला. सक्काळी सक्काळी तेथील भित्त्तिचित्रांतील रामाच्या जीवनातील विविध प्रसंग दर्शवणारे सुंदर रंगकाम, राम सीता, लक्ष्मण, तसेच हनुमान यांची प्रेक्षणीय देवालये बघून रात्रीचा थकवा कुठल्याकुठे पळून गेला. सकाळी सात्विक अल्पाहार, नंतर लगेच चारुदत्तजींचे कीर्तन अन संध्याकाळी श्रीधरजींचे गीत रामायण याप्रमाणे बहुपेडी रामसंकीर्तन, भजन, नामस्मरण अन गायन असा भरगच्च सत्संग कार्यक्रम होता.

‘अशनि राम पाणि राम, वदनि राम, नयनी राम

ध्यानी मनी एक राम, वृत्ती राम जाणिल काय

रामचंद्र मन मोहन नेत्र भरून पाहिन काय!’

हे माणिक बाईंचे भक्तिरसाने ओथंबलेले शब्द मनात गुंजायमान होत होते.! सकाळ संध्याकाळचे राम नाम संकीर्तनाचे तास वगळून, मी आणि माझ्या मैत्रिणीने अयोध्या दर्शनाचा जमेल तसा अन जमेल तितका लाभ घेण्याचे ठरवले.    

सर्वप्रथम श्रीराम जन्मभूमी बघण्याची ओढ होती, मात्र मी गेले तेव्हा भाविकांसाठी त्या स्थळी एक तात्पुरते छोटेसे राम मंदिर बघायला मिळाले. त्याच मंदिराचे मनोभावे दर्शन घेता घेता रामजन्म भूमीचा विस्तीर्ण परिसर बघितला. मजबूत लोखंडी जाळ्यांच्या आडून मंदिराचे निर्माणकार्य वेगात सुरु असलेले दृष्टिपथास पडत होते.  शेकडो कारागिरांकडून अहोरात्र हस्त शिल्पे साकारण्यात येत होती. मंडळी, आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपणासाठी अयोध्येत कोणते सामान कुठून आले, रामाची मूर्ती कुणी बनवली या आणि इतर गोष्टी लहान मोठ्या पडद्यांवर उपलब्ध आहेत. मात्र ‘स्थानमाहात्म्य’ लक्षात घेतले तर, ज्या रजकणांना रामाच्या चरणांचा स्पर्श झाला आहे, तेच कण आपल्यासाठी श्रद्धासुमने आहेत. होय ना!   

हनुमानगढी, दशरथ महल, कौशल्या महल, इत्यादी मंदिरे बघण्याचे आम्हाला अहोभाग्य लाभले. ‘हनुमान गढी’ नावाच्या टेकाडावर हनुमानाचे दहाव्या शतकातील प्राचीन मंदिर आहे. व्यवस्थित बांधलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर हनुमानाचे मंदिर नजरेस पडते. 

आमच्यापैकी बरीच मंडळी रोज पहाटे उठून सरयू किनाऱ्यावर पायीच जात स्नानाचा लाभ घेत असत. तिथे ‘राम की पौडी’ नावाने प्रसिद्ध असलेले घाट आणि कपडे बदलण्यासाठी (महिला आणि पुरुष यांचे वेगळे) आडोसे आहेत.  आम्ही जुलै २०२२ च्या पहिल्या आठवड्यात गेलो तेव्हा उन्हाळा सुरूच होता. क्वचित दोन वेळी पाऊस झाला. अशा तप्त वातावरणात प्रभातकाळीं सरयूच्या तीरावर चालत जातांना हलकेच स्पर्श करणाऱ्या आनंदी वायुलहरी अति सुखद आणि शीतल प्रतीत होत होत्या. हा सरयू किनारीचा संपूर्ण परिसर श्री रामचंद्राच्या वास्तव्याने पुनीत झालेला असल्याने अधिकच भक्तिमय झाला होता. सरयू किनारी लक्ष्मण मंदिर (तिथेच स्थित लक्ष्मण घाट आहे. रामाच्या त्यागाने दुःखसागरात बुडालेल्या लक्ष्मणाने आपला पार्थिव देह इथेच सरयू नदीत अर्पण केला) आणि जवळच रामचंद्र घाट आहे. इथे रामाने आपला देह सरयूत विसर्जित केला. त्यापाठोपाठ त्याचे बंधू बांधव आणि प्रजाजन या सर्वांनी देखील जलसमाधी घेतली! मित्रांनो, सरयू नदीत नौकानयन उपलब्ध आहे, त्या दरम्यान हे दोन घाट बघितले! 

सरयू नदीच्या पावन जलात नौकानयन करतांना तीराच्या लगत असलेली मंदिरे अत्यंत रमणीय दिसतात. नौकेत बसल्यावर ‘ धीर समीरे सरयू तीरे ‘ चा अनुभव अमृतसम होता. मन गुंतले होते श्रीराम प्रभूच्या चिंतनात! त्या तरंगिणीची प्रत्येक लहर जणू रामनामाचा गजर करीत नौकेवर आदळत होती. त्या प्रभात समयी सरयूच्या पावन स्पर्शाने धन्य झाले. मंडळी, नदीकिनारी आढळले एक अतिशय सुबक, सुंदर मंदिर, काळारामाचे! हुबेहूब नाशिकच्या काळाराम मंदिरासारखेच, एका अखंड काळ्याभोर शिळेत कोरलेल्या राम, सीता आणि रामबंधूंचे! तिथे नाशिकहून (स्वप्नात श्रीरामप्रभूंनी दिलेल्या आज्ञेनुसार) इथे सरयू तीरी राममंदिर निर्माण करणाऱ्या मराठी पुजाऱ्यांचे वंशज, भिंतींवर मराठी भाषेत लिहिलेली माहिती, इत्यादी बघून मन अभिमानाने भरून आले.

या प्राचीन मंदिरांच्या मांदियाळीत एक आगळेवेगळे मंदिर खूपच भावले. ते म्हणजे मनात संचित करून ठेवलेले अयोध्येतील लक्षवेधी वाल्मिकी मंदिर! तेथे आद्यकवी वाल्मिकी आणि त्यांचे शिष्य कुश लव यांच्या कोरीव, सुरेख देखण्या शुभ्र धवल मूर्ती तर आहेतच, पण विस्तीर्ण मंदिराच्या संगमरवरी भिंतींवर कोरलेले संपूर्ण वाल्मिकी रामायण आणि त्या त्या प्रसंगांना अनुरूप चितारलेली भित्तिचित्रे. बघता क्षणी भान हरपावे अशी कलाकुसर! मंडळी हे मंदिर बघून अतीव समाधान लाभले. अयोध्येतील गुरु-शिष्यांचे हे अलौकिक स्मारक प्रेक्षणीय आणि अविस्मरणीय, पुरातन मंदिर नसूनही!

आणखी किती देवालये, अन किती आठवणी स्मराव्यात परमपवित्र तीर्थक्षेत्र अयोध्येच्या! सप्तपुरीतील एक पुरी अयोध्येतील ते मंतरलेले दिवस, तिथला एक एक क्षण आयुष्याला समृद्ध करून गेला.  

जानकी महालाच्याच परिसरात असलेल्या शामियान्यात रामसंकीर्तन आयोजित केले गेले होते. सकाळी चारुदत्त आफळेजींच्या कीर्तनादरम्यान रामकथेतील मुख्य कथाबीज ऐकतांना आणि त्यांच्या मुखातून भक्तिरसात न्ह्यायलेली गाणी आणि अभंग ऐकतांना किती म्हणून समरस झालोत. त्यांच्या आवाजाला शास्त्रीय संगीताची बैठक असल्याने ही गाणी उत्कृष्ट संगीताची मेजवानीच असायची. कीर्तनात भक्तिरंगासोबतच हास्यरंग भरीत चारुदत्तजी यांनी आपल्या आख्यानात कित्येक सुंदर कथा सांगितल्या आणि त्यांचे निरूपण केले. तसेच त्यांच्या सोबत संपूर्ण भक्त समूहाने समर्पित होऊन साथ देत

गायलेले ‘नादातुनी या नाद निर्मितो, श्रीराम जय राम जय जय राम’ हे मधुरतम राम संकीर्तन आणि ताल मृदूंगासमवेत गायलेल्या समूह आरत्या, भक्तीच्या पराकाष्ठेची अनुभूती देत असत. 

संध्या समयी श्रीधरजींचे गीत रामायण सादर होत असे! कांही दिवशी श्रीधरजींनी रामचंद्रांची भक्तिगीते देखील सादर केली.  अयोध्येच्या रम्य परिसरात ‘सरयू तीरावरी अयोध्या’ हे अयोध्येचे चित्रवत वर्णन करणारे गाणे आणि ‘राम जन्मला ग सखी’ हे राम जन्माचे अजरामर गाणे अक्षरशः कृतकृत्य करून गेले! (आयोजकांनी कल्पकता दाखवीत या गाण्याच्या जोडीला प्रशिक्षित कथक नृत्यांगनांचे समर्पक नृत्य ही सादर केले) श्रीधरजींसोबत कोरसमध्ये गातांना एक अनवट ऊर्जा अंगात संचारली होती. मनाला भिडणारी सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे दोघांचा सुरस समन्वय, त्यामुळे आम्हा भक्तगणांना रामकथेचे कीर्तनरंग आणि गीतरंग या दोहोंचा उत्कृष्टरित्या आस्वाद घेता आला. एकंदरीत या कार्यक्रमात मला आलेला असा भावानुभव विरळा. त्याकरता आफळे गुरुजी आणि श्रीधरजी या द्वयीला सादर वंदन आणि त्यांचे अमाप आभार!    

हे रघुकुलभूषण श्रीराघवेंद्रा! या शब्दांकुरांच्या अंती आता तुलाच साकडे घालायचे राहिले! हे कृपासिंधू रामराया, परत एकवार अयोध्येत तुझ्या चरण सेवेशी रुजू व्हायचे आहे. पूर्णत्वास गेलेले राममंदिर अन तिथे अधिष्ठित झालेली तुझी साजिरी गोजिरी मूर्ती नजरेत भरून घ्यायची आहे! संपूर्ण मंदिर क्रमाक्रमाने नयनांच्या ज्योतीत आणि हृदयाच्या गर्भगृहात दाखल करून घ्यायचे आहे. तवरीक परत एकदा ज. के. उपाध्ये यांचे अमृताहुनी गोड असे माणिकबाईंच्या भक्तिमय स्वरांतील शब्द फिरफिरुनि स्मरते!

‘रामचंद्र मनमोहन नेत्र भरून पाहिन काय!

सतत रमवि जे मनास, ज्यात सकल सुखनिवास

सुधाधवल विमल हास, अनुभवास येईल काय?

जाऊ तरी कुणास शरण, करील कोण दुःख हरण

मजवरि होऊन करूण, प्रभुचं चरण दावील काय?’

अयोध्यापती श्रीरामाच्या दर्शनाच्या अनिवार इच्छेसमवेत ही शब्दकुसुमांजली त्याच्याच चरणकमली रुजू करते! जय श्रीराम!

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मनोवेधक मेघालय…भाग -५ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग -५ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(चेरापुंजीच्या गुहा आणखीन बरंच कांही बाही!)

प्रिय वाचकांनो,

परत परत कुमनो! (मेघालयच्या खासी या खास भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

मेघालय आणि इतर स्थानांची सफर वेगळ्याच विश्वात, अगदी आकाशातील मेघात घेऊन जाणारी आहे! मी तिथे आपल्या सोबत परत एकदा पर्यटन करते आहे याचा “आनंद पोटात माज्या माईना” असं होतंय! मी भरून पावले! येथील अगदी खासम-खास वैशिष्ठे म्हणजे जिवंत मूळ पूल, जिथे आपण फिरलोय आणि अजून एक (हाये की), जिथे आपण आज आश्चर्यजनक प्रवास करणार आहोत! मैत्रांनो, आता चेरापुंजीला आलोच आहोत तर, आधी इथल्या गुह्य ठिकाणांचे अन्वेषण करायला निघू या! इथे आहेत कित्येक रहस्यमयी गुंफा! चला आत, बघू या अन शोधू या काय दडलंय या अंधारात!

मावसमई गुहा (Mawsmai Cave)

मेघालयची एक खासियत म्हणजे भूमिगत गुहांचे विस्तीर्ण मायाजाल, काही तर अजून गवसलेल्या नाहीत, तर काहींमध्ये चक्रव्यूहाची रचना, आत जा, बाहेर यायचं काय खरं नाय! काहींच्या वाटा खास, फक्त खासींना ठाव्या! आत्ता म्हणे एक ३५ किलोमीटर लांब गुहा सापडलीय इथे! ऐकावे ते नवल नाहीच मैत्रांनो! मावसमाई गुहा सोहरा (चेरापुंजी) पासून दगडफेकीच्या अंतरावर (स्टोन्स थ्रो) आणि याच नांवाच्या लहान गावात आहे (शिलाँगपासून ५७ किलोमीटर). ही गुहा कधी सुंदर, आश्चर्यचकित करणारी, कधी भयंकर, कधी भयचकित करणारी, असं काही, जे मी एकदाच पाहिलं, रोमांचकारी अन रोमहर्षक! इथे आम्ही गेलो तेव्हा (माझ्या नशिबाने) प्रवास्यांचे जत्थेच होते, फायदा हा की परत जाणे कठीण, त्यातच गुहेची सफर केवळ २० मिनिटांची, आतापर्यंत साथ देणारे ट्रेकर्स शूज बाहेरच ठेवलेत. अनवाणी पायांनी अन रिकाम्या डोक्याने जायचे ठरवले. मोबाइलचा उपयोग शून्य, कारण इथे स्वतःलाच सांभाळणे जिकिरीचे! लहान मोठे पाषाण, कुठे पाणी, शेवाळे, चिखल, अत्यंत वेडीवाकडी वाट, कधी अरुंद कधी निमुळती, कधी खूप वाकून जा, नाही तर कपाळमोक्ष ठरलेला! काही ठिकाणी आतल्या दिव्यांचा उजेड, तर काही ठिकाणं आपण (विजेरीचा) थोडा तरी उजेड पाडावा म्हणून अंधारलेली! मी ट्रेकर नव्हे, पण गुहेचं हे सगळं अंतर कसं पार केलं हे ‘कळेना अजुनी माझे मला!!!’ (मंडळी या लेखाच्या शेवटी गुहेच्या सौंदर्याचा (!) कुणीतरी यू ट्यूब वर टाकलेला विडिओ जरूर बघा! कुणाला काय अन कोण सुंदर वाटेल याचा नेम नाय!)

मात्र तिथे आठवतील त्या देवांचे नाव घेत असतांनाच माझ्या मदतीला धावून आल्या दोन मुली (हैद्राबाद इथल्या). ना ओळख ना पाळख! माझी फॅमिली मागे होती. या मुली अन त्यांच्या आयांनी माझा जणू ताबाच घेतला! एखाद्या लहान मुलीला जसे हात धरून चालायला शिकवावे त्याहीपेक्षा मायेनं त्यांनी मला अक्षरशः चालवलं, उतरवलं अन चढवलं. जणू काही मीच एकटी तिथे होते! अन या अगदी राम लक्ष्मणासारख्या एक पुढती अन एक मागुती, अशा दोघी माझ्या बरोबर होत्या! मित्रांनो, बाहेर आल्यावर तर “माझे डोळे पाण्याने भरले” अशी अवस्था होती, माझ्या फॅमिलीने त्यांचे आभार मानले.  आपले नेहमीचे सेलेब्रेशन खाण्याभोवती फिरते, म्हणून मी त्यांना गुहेतून बाहेर आल्याबरोबर म्हटलं “चला काही खाऊ या!” त्यांनी इतकं भारी उत्तर दिलं, “नानी, आप बस हमें blessings दीजिये!” १४-१५ वर्षांच्या त्या मुली, हे त्यांचे संस्कार बोलत होते! (ग्रुप फोटोत बसलेल्या उजवीकडील दोघी)! त्यांना कुठं माहित होतं की गुहेच्या संपूर्ण गहन, गहिऱ्या अन गर्भार कुशीत मी त्यांनाच देव समजत होते, आशीर्वाद देण्याची पत कुठून आणू? मंडळी, तुम्ही प्रवासात कधी अश्या देवांना भेटलात का? आत्ता हे लिहितांना देखील त्या दोन गोड साजऱ्या अन गोजिऱ्या अनोळखी मुलींना मी गहिवरून खूप खूप blessings देतेय!!! जियो!!! 

आरवाह गुहा (Arwah Cave)

चेरापुंजी बस स्थानकापासून ३ किलोमीटर अंतरावर आहे आरवाह गुहा, ही मोठी गुहा Khliehshnong या परिसरात आहे. यात खास बघण्यासारखे काय तर चुनखडीच्या रचना आणि जीवाश्म! अत्यंत घनदाट जंगलाने वेढलेली, साहसी ट्रेकर्स अन पुरातत्व तत्वांच्या प्रेमात असलेल्यांसाठी पर्वणीच जणू! ही गुहा मावसमई गुहेपेक्षा मोठी, पण हिचा थोडाच भाग पर्यटकांना बघायला मिळतो. ३०० मीटर बघायला २०-३० मिनिटे लागतात. मात्र यात गाईड हवाच, गुहेत गडद अंधाराचे साम्राज्य, तर कुठे कुठे अत्यंत अरुंद बोगद्यातून, कधी निसरड्या दगडांच्या वाटेतून, तर कधी पाण्याच्या प्रवाहातून सरपटत पुढे जातांना त्रेधा उडणार! भितीदायक वातावरणात अन विजेरीचा प्रकाश पाडल्यावर अनेक कक्ष दिसतात, त्यांत गुहेच्या भिंतींवर, छतावर आणि पाषाणांवर जीवाश्म (मासे, कुत्र्याची कवटी इत्यादी) आढळतात. यातील चुनखडीच्या रचना व जीवाश्म लाखों वर्षांपूर्वीचे असू शकतात. मंडळी, ही माझ्या घरच्या लोकांनी पुरवलेली माहिती बरं कां! गुहेपर्यंत ३ किलोमीटर पायऱ्यांचा रस्ता, आजूबाजूला घनदाट हिरवे वनवैभव, मी गुहेच्या द्वाराच्या अवघ्या ५० मीटर अंतरावरच थांबले. मला गुहेचे दर्शन अप्राप्यच होते. या बाबत तिथला गाईड आणि आमचा आसामी (असा तसा नसलेला हा असामी!) ड्रायव्हर अजय, यांचे मत फार महत्वाचे! घरची मंडळी गुहेत जाऊन दर्शन घेऊन आली, तवरीक मी एका व्ह्यू पॉईंट वरून नयनाभिराम स्फटिकासम शुभ्र जलप्रपात, मलमली तलम ओढणीसम धुके, गुलाबदाणीतून शिंपडल्या जाणाऱ्या गुलाबजलाच्या नाजूक शिड्काव्यासारखी पावसाची हलकी रिमझिम अन मंद गुलबक्षी मावळत अनुभवत होते. मित्रांनो, ज्यांना शक्य आहे त्यांनी या अगम्य गुहेचे रहस्य जाणण्याचा जरूर प्रयत्न करावा! 

रामकृष्ण मिशन, सोहरा

येथील टेकडीच्या माथ्यावर रामकृष्ण मिशनचे कार्यालय, मंदिर, संस्थेची शाळा आणि वसतिगृह फार देखणे आहेत. तसेच इथे उत्तरपूर्व भागातील विविध जमातींची माहिती, त्यांचे विशिष्ट पेहराव, त्यांच्या कलाकृती आणि बांबूंच्या वस्तू असलेले एक संग्रहालय अतिशय सुंदर आहे. त्याचप्रमाणे मेघालयातील गारो, जैंतिया आणि खासी जमातींवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कलाकृती, मॉडेल्स आणि त्यांची सखोल माहिती असलेली खोली देखील फार प्रेक्षणीय आहे. रामकृष्ण मिशनच्या कार्यालयात इथल्या खास वस्तूंचे तसेच रामकृष्ण परमहंस, शारदा माता व स्वामी विवेकानंद यांचे फोटो अणि अन्य वस्तू, तथा परंपरागत वस्तूंची विक्री देखील होते. आम्ही येथे बऱ्याच सुंदर वस्तू खरेदी केल्या.

सायंकाळी रामकृष्ण परमहंस मंदिरात झालेली आरती सर्वांना एका वेगळ्याच भक्तिपूर्ण वातावरणात घेऊन गेली. आरतीची परमपावन वेळ जणू कांही आमच्यासाठीच दैवयोगाने जुळून आली व अत्यंत आनंदाची गोष्ट ही की, आम्हाला या पवित्र वास्तूचे दर्शन झाले! एकंदरीत हे अतिशय रम्य, भावस्पर्शी आणि भक्तिरसाने परिपूर्ण स्थान पर्यटकांनी नक्की बघावे असे मला वाटते. (संग्रहालयाच्या वेळांची माहिती काढणे गरजेचे आहे.)

मेघालय दर्शनच्या पुढच्या भागात, मी तुम्हाला मावफ्लांग, पवित्र ग्रोव्ह्स/ सेक्रेड वूड्स/ पवित्र जंगलात आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या अद्भुत स्थळांकडे घेऊन जाईन. मंडळी, आहात ना तयार? 

सध्यातरी खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

टीप- लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो आणि वीडियो (काही अपवाद वगळून) व्यक्तिगत आहेत!

 

मेघालय, मेघों की मातृभूमि! “सुवर्ण जयंती उत्सव गीत”

(Meghalaya Homeland of the Clouds, “Golden Jubilee Celebration Song”)

मावसमई गुफा (Mawsmai Caves) 

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मनोवेधक मेघालय…भाग -४ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग -४ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(डॉकी, चेरापुंजी आणि बरंच कांही!)

प्रिय वाचकांनो,

कुमनो! (मेघालयच्या खासी या खास भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

आज आपण डॉकी आणि चेरापुंजी येथे अद्भुत प्रवास करणार आहोत. झाली नव्ह तयारी! सोप्पंय! बॅग भरो और निकल पडो! 

डॉकी /उम्न्गोट (Dawki/Umngot) नदीवरील नयनरम्य नौकानयन

आम्ही सैलीच्या सुंदर “साफी होम कॉटेज” (Safi home cottage) चा निरोप घेतला अन पुढील प्रवासाला लागलो. मॉलीन्नोन्गपासून साधारण ३० किलोमीटर दूर डौकी (Dawki) कडे आम्ही निघालो. मुंबई ते गुवाहाटी हा प्रवास विमानातून केल्यानंतरचा मेघालयचा सर्व प्रवास आम्ही कारनेच केला, इथे रेल्वे नाही बरं का मंडळी! हे गाव मेघालयच्या पश्चिम जयन्तिया हिल्स जिल्ह्यात आहे. डॉकी(उम्न्गोट) नदीवर एक कर्षण सेतु (traction bridge) बनलेला आहे. १९३२ मध्ये इंग्रजांनी हा पूल बांधला. या नदीचे पाणी इतके स्वच्छ आहे की कधी कधी आपली नाव हवेत तरंगल्याचाच भास होऊ शकतो. इथले नयनाभिराम दृश्य अन नौकाविहार हेच प्रमुख आकर्षण! हे गाव भारत अन बांगला देशच्या सीमेवर आहे! नदी देखील अशीच विभागली गेली आहे. एकाच नदीवर विहार करणाऱ्या बांगला देशाच्या मोटर बोटी अन भारत देशाच्या नाविकांच्या वल्हवत्या साध्या बोटी! हा दोन्ही देशांना जोडणारा एक सडक मार्गी रस्ता! जातांना दोन्ही देशांच्या चेक पोस्ट दिसतात. डॉकी ही भारताची चेकपोस्ट तर तमाबील ही बांगला देशाची चेकपोस्ट!

मित्रांनो, या नौकाविहाराचे स्वर्गीय सुख काही आगळेच, हृदयात अन नेत्रात सकल संपूर्णरित्या साठवावे असेच,  नाविकाने हळू हळू चालवत नेलेली विलंबित तालासारखी डुलत डुलत सरकणारी नौका, आजूबाजूला नौकेला भिडून नितळाहून नितळ असे संगीतमय झालेले जलतरंग, दोन्ही काठांवर नदीला जणू घट्ट कवेत घेणारे वृक्षवल्लींचे हिरवे बाहुपाश! निर्मल नीर असल्याने त्यांची सावली हिरवीगार तर तिला लगटून निळ्याशार  किंवा मेघाच्छादित गहिऱ्या रंगाची सावली, मध्येच नदीच्या तळाचे वेगवेगळे पाषाण देखील आपली छटा उमटवत होते! थोडक्यात काय तर सिनेमास्कोपिक पॅनोरमा! कुठेही कॅमेरा लावा अन निसर्गाच्या रंगांची क्रीडा टिपून घ्या! मध्येच या सिनेमास्कोप सिनेमाचा इंटर्वल समजा हवं तर, छोटासा रेतीचा किनारा, तिथे देखील मॅगी, चिप्स अन तत्सम पदार्थांची सर्विस द्यायला एक मेघालय सुंदरी हजर होतीच! कोल्ड ड्रिंक कोल्ड ठेवण्याकरता नदीच्या किनारी छोटयाश्या फ्रिज सारखं जुगाड करणारा तिचा नवरा खासच! नदीकिनारी लहान मोठे पर्यटक सुंदर धोंडे (नाही तर काय!) किंवा दगड गोळा करीत सुटले. परतीचा प्रवास नकोसा होत होता. पण “नाविका रे” ला नाही म्हणता म्हणता त्याने नाव किनारी लावलीच.

टाइम प्लीज!!!      

प्रिय वाचकांनो समजा तुम्ही एक घड्याळ मनगटाला लावलय अन एक बघायला सोप्पं घड्याळ तुमच्या स्मार्ट फोनवर असणारच. तुम्ही जे सोपे असेल ते बघणार नाही का! मात्र तुम्ही बांगला देशच्या सीमेच्या आसपास फिरत असाल तर गम्मतच येते, आम्हाला स्थानिकांनी सांगितलं म्हणून, नाही तर वाद तर होणारच. बांगला देशचे (फक्त) घड्याळ आपल्या देशापेक्षा ३० मिनिटे पुढे आहे, अन आपल्या स्मार्ट फोनला (नको तेव्हा) जास्त स्मार्टनेस दाखवायची सवय आहेच! त्यानं त्या देशाचं नेटवर्क पकडलं की स्मार्टफोनचं घड्याळ पुढं, अन मनगटी घड्याळ आपलं इथलं टाइम सांगणार! तेव्हा अशा ठिकाणी (बांगला देशच्या सीमेच्या आसपास) भारताचे सुजाण अन देशभक्त नागरिक या नात्याने आपण मनगटी घड्याळाची मर्जी सांभाळा, अन स्मार्ट फोनला आवरा! आम्ही हा अनुभव बऱ्याच ठिकाणी घेतला. आणखीन गम्मतच (हायेच की) येते, बांगला देशच्या सीमेच्या अन आपल्या अंतराप्रमाणे स्मार्ट घड्याळ किती पुढे जायचे ते ठरवत असते!        

मेघजलसुंदरी चेरापुंजी! (इथल्या जनजातींमध्ये सोहरा हेच नांव प्रसिद्ध!) 

मेघालयाला भेट देतांना नयनरम्य चेरापुंजी हे पर्यटकांचे आकर्षण असणारच अशी याची ख्याती! शिलाँगपासून ५६ किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण म्हणजे अमोप धबधबे, कधी धुक्यात हरवलेले तर कधी ते विरळ झाल्यावर आपल्याला दर्शन देणारे! इथे वर्षभर जलधरांच्या मर्जीप्रमाणे अन त्यांच्या लयीप्रमाणे बरसणाऱ्या जलधारांचे नृत्य सुरूच असते! वृक्षवल्लींच्या हिरवाईच्या रंगात फुलांची बुट्टी, अशा श्रीमंत शाली पांघरलेले पर्वत असे निसर्गरम्य चेरापुंजी (सोहरा)! हे ठिकाण समुद्र सपाटीपासून १४८४ मीटर उंचावर आहे. जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या चेरापुंजीने सर्वाधिक पाऊस झेलण्याचे विक्रम वेळोवेळी नोंदवले आहेत, गुगल गुरुजी वेळोवेळी याची माहिती देतच असतात!

आता या गावाच्या नावाबद्दल! १८३० सालच्या दशकात इंग्रजांनी सोहराला त्यांचे प्रादेशिक मुख्यालय बनवले होते, त्यांना यात स्कॉटलंडसारखे चित्र दिसत होते. वर्षा अन धुके यांनी हे छोटे गाव व्यापले होते, म्हणून त्यांनी या गावाला “पूर्वेकडील स्कॉटलंड” अशी उपाधी दिली. मात्र त्यांना याचे नाव उच्चारतांना भारीच त्रास व्हायचा! मग काय सोहराचे चेहरा/चेरा झाले, कोण्या बंगाली नोकरशहांनी त्यात पुंजो (म्हणजे पुंजका) अशी पुस्ती जोडली अन गावाचे नामकरण “चेरापुंजी” असे झाले. चेरापुंजीचा दुसरा अर्थ आहे संत्र्यांचे गाव. खासी लोकांना मात्र अर्थातच हे बदल मंजूर नव्हते, या नावाकरता बरीच आंदोलने झालीत. स्थानिक मंडळी या गावाला सोहराच म्हणतात. आश्चर्य म्हणजे इथे इतका धो धो पाऊस असूनही स्थानिकांना मात्र पेयजलाची ददात जाणवते. मित्रांनो, इथे सुद्धा मातृसत्ताक पद्धत आहे, स्त्रियांना स्वातंत्र्य आहे व त्यांनी विविध क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य हेच खासी स्त्रियांचे सक्षमीकरण होण्याचे मूळ आहे!

आम्ही चेरापुंजी येथे क्लीफ साइड होम स्टे (cliffside home stay) येथे दोन दिवस वास्तव्य केले. या घराच्या मालकीणबाई अंजना! त्यांचे यजमान गेल्यावर त्यांनी स्वबळावर मुलांना मोठे केले. अत्यंत कर्तृत्ववान, तडफदार व आत्मविश्वासाने भरपूर अश्या या अंजनाचे मला फार कौतुक वाटले. त्यांचे घर काँक्रीटचे, घराच्या ग्यालरीतून अन खिडकीतून चेरापुंजीच्या मेघाच्छादित अन धुक्याने कवटाळलेल्या परिसराचे अद्भुत दर्शन बघून डोळे तृप्त झालेत! याशिवाय त्यांनी एका रात्री स्वतः कष्टाने रांधून आणलेले गरम जेवण म्हणजे आमच्यासाठी “खासमखास” पाहुणचारच म्हणा ना! प्रिय अंजना, किती धन्यवाद देऊ तुला! फक्त दोन दिवसांकरता आलेल्या आमच्यासारख्या पर्यटकांसाठी तू दाखवलेला जिव्हाळा न विसरण्याजोगाच!               

मित्रांनो,चेरापुंजीच्या पावसाचा आनंद न्याराच! नेम नसणं हाच त्याचा स्थायी भाव. आम्ही मारे जरासे पावसाचे थेंब झेलून रेनकोट घातला की हा अदृश्य, अन ऊन आहे म्हणून छत्री किंवा रेनकोट न घेता बाहेर पडलो की हा बिनदिक्कत बरसणार| पाव्हण्यांची कशी खासी जिरली असा याचा आविर्भाव! मंडळी, मला वाटते, आपल्या पुणे येथील वेधशाळेतून याने स्पेशल कोर्स केला असावा! आम्ही इथे दोनच दिवस होतो, त्यात आम्ही सेव्हन सिस्टर्स फॉल्स Nohsngithiang Falls/Mawsmai Falls बघितले. सप्तसुरांसम दुग्धधवल धारा पर्वतराजींमधून कोसळत असतांना बघणे म्हणजे दिव्यानुभव! १०३३ फुटांवरून पूर्व खासी पर्वतरांगांतून धो धो वाहणारे हे जलप्रपात भारतातील सर्वाधिक उंचीवरून पडणाऱ्या धबधब्यांपैकी एक! मौसमयी गावापासून १ किलोमीटर दूर असून यांची खळाळणारी मस्ती बघावी पावसाळ्यातच, इतर वेळी हे जरा कोमेजलेले असतात, बरं का! आमचे नशीब थोर म्हणून ही निसर्गशोभा बघायला मिळाली. नाहीतर ऐन यौवनातली सौंदर्यवती “घूंघट की आड़ में” जसा मुखचंद्र लपवते तसे हे जलौघ (निर्झर) घनदाट धुक्याच्या आत लपतात, अन पर्यटक बिचारे निराश होतात. हा धुक्याच्या ओढणीचा लपंडाव आम्ही देखील काही काळ अनुभवला! (यू ट्यूब वरील विडिओ शेअर केलाय)

कॅनरेम धबधबा (The Kynrem Falls) पूर्व खासी पर्वत या जिल्ह्यात, चेरापुंजीहून १२ किलोमीटर अंतरावर आहे. थान्गखरांग पार्कच्या आत असलेला हा धबधबा उंचीत भारतातल्या धबधब्यातल्या ७ व्या क्रमांकावर आहे. हा त्रिस्तरीय जलप्रपात आहे, त्याचं पाणी 305 मीटर (१००१ फूट) उंचीवरून कोसळतं!  

प्रिय वाचकहो पुढील प्रवासात आपण चेरापुंजी आणि मेघालयातील इतर ठिकाणी अद्भुत प्रवास करणार आहोत. चालतंय ना मंडळी!!! 

तर आतापुरते परत एकदा खुबलेई! (Khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

टीप – लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेटवर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो आणि वीडियो (काही अपवाद वगळून)

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मनोवेधक मेघालय…भाग -३ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग -३ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(मनमोहिनी मॉलीन्नोन्ग व मेघालयाच्या कुशीतले लिव्हिंग रूट ब्रिज)

प्रिय वाचकांनो,

कुमनो! (मेघालयच्या खासी या खास भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

मॉलीन्नोन्गच्या निमित्याने आपणा सर्वांना ही सफर आनंददायी वाटत आहे, याचा मला कोण आनंद होत आहे!

तर मॉलीन्नोन्गबद्दल थोडके राहून गेले सांगायाचे, ते म्हणजे इथले जेवण अन नाश्ता. माझा सल्ला आहे की इथं निसर्गाचेच अधिक सेवन करावे. इथे बरीच घरे (६०-७०%) होम स्टे करता उपलब्ध आहेत, अग्रिम आरक्षण केले तर उत्तम! मात्र थोडकी घरे (मी पाहिली ती ४-५) जेवण व नाश्ता पुरवतात! जास्त अपेक्षा ठेऊ नयेत, म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही! ब्रेड बटर, ब्रेड आम्लेट, मॅगी अन चहा-कॉफी, इथे नाश्त्याची यादी संपते! तर जेवणात थाळी, २ भाज्या (त्यातली एक पर्मनन्ट बटाट्याची), डाळ अन भात, पोळ्या एका ठिकाणी होत्या, दुसरीकडे ऑर्डर देऊन मिळतात. जेवणात नॉनवेज थाळीत अंडी, चिकन आणि मटन असतं. हे घरगुती सर्विंग टाइम बॉउंड बरं का. जेवणाचे अन नाश्त्याचे दर एकदम स्वस्त! कारभार कारभारणीच्या हातात! इथे भाज्या जवळच्या मोठ्या गावातून (pynursa) आणतात,  आठवड्यातून दोनदा भरणाऱ्या बाजारातून! सामानाची ने-आण करण्यासठी बेसिक गाडी मारुती ८००!. मुलांची मोठ्या गावात शिक्षणाकरता ने-आण करण्यासाठी पण हीच, पावसाळी वातावरण नेहमीचेच अन दुचाकी मुळे अपघात होऊ शकतात, म्हणून गावकरी वापरत नाहीत, असं कळलं. इथे ATM  नाही, नेटवर्क नसल्यामुळे जी पे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरे उपयोगाचे नाहीत. म्हणून आपल्याजवळ रोख रक्कम हवीच!              

स्काय पॉईंट (Nohwet Viewpoint)

या भागात फिरतांना बांगला देशाची सीमा वारंवार दर्शन देते. मात्र बांगलादेशाचे दर्शन घडवणारा एक स्काय पॉईंट अतिशय सुंदर आहे. मॉलीन्नोन्गपासून केवळ दोनच किलोमीटर असलेला हा पॉईंट न चुकता बघावा. बांबूने बनलेल्या पुलावरचा प्रवास मस्त झुलत झुलत करावा, एका ट्री हाऊस वरील ह्या पॉईंटवर जावे अन समोरचा नजारा बघून थक्क व्हावे. हा पॉईंट ८५ फूट उंच आहे, संपूर्ण बांबूने बनवलेला अन झाडांना बांबू तसेच जूटच्या दोरांनी मजबूत बांधलेला हा इको फ्रेंडली पॉईंट, समोरील नयनरम्य नजाऱ्यांचे फोटो काढणे आलेच! मात्र सेल्फी पासून सावधान, मित्रांनो! येथून सुंदर मावलींनॉन्ग दिसतेच शिवाय बांगलादेशची सपाट जमीन व जलसंपदा यांचेही प्रेक्षणीय दृश्य दिसते!                   

सिंगल डेकर अन डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज मेघालय पर्यटनाचा अविभाज्य भाग आहेत जिवंत पूल! अन ते पाहिल्यावर कवतिकाचे आणि प्रशंसेचे पूल बांधायला पर्यटक मोकळे!  म्हणजे जुन्या झाडांची मुळे एकमेकात “गुंतता हृदय हे” सारखी हवेत, अर्थात अधांतरी (आणि एखाद-दुसरी चुकलेल्या पोरांसारखी जमिनीत) अशी गुंतत गुंतत जातात, अन हे सगळं घडतं नदीपात्राच्या साक्षीनं, “जलगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला” असं गुणगुणत! जसजशी वर्षे जातात, जलाचा अन प्रेमाचा शिडकावा मिळतो, तसतशी ही मुळे जन्मोजमीच्या ऋणानुबंधासारखी एकमेकांना घट्ट कव घालतात अन दिवसागणिक घालताच राहतात, मित्रांनो, म्हणूनच तर हे “लिव्हिंग रूट ब्रिज”, अर्थात जिवंत ब्रिज आहेत, काँकिटचे हृदयशून्य ब्रिज नव्हे, अन यामुळेच आपल्याला दिसतो तो प्रेमाच्या घट्ट पाशासारखा मजबूत जीता जागता मूळ पूल!

आता या मुळांच्या पुलाची मूळ कथा सांगते! साधारण १८० वर्षांपूर्वी मेघालयच्या खासी जमातीतील जेष्ठ व श्रेष्ठ लोकांनी नदी पात्राच्या अर्ध्या अंतरापर्यंत अधांतरी आलेली रबराच्या (Ficus elastica tree) झाडांची मुळे, अरेका नट पाम (Areca nut palm) जातीच्या पोकळ छड्यांमध्ये घातली, नंतर त्यांची निगा राखून काळजी घेतली. मग ती मुळे, (अर्थातच अधांतरी) वाढत वाढत विरुद्ध किनाऱ्यापर्यंत पोचलीत. तीही एकेकटी नाहीत तर एकमेकांच्या गळ्यात अन हातात हात गुंफून. या रीतीने माणसांचे वजन वाहून नेणारा आगळावेगळा असा या जिवंत पूल माणसाच्या कल्पनाशक्तीतून तयार झाला! आम्ही पाहिलेल्या सिंगल डेकर लिव्हिंग रूट ब्रिजला मजबूत बनवण्यासाठी भारतीय लष्कराने बांबूचे टेकू तयार केलेत. हे आश्चर्यकारक पूल पाहण्याकरता पर्यटकांची संख्या वाढतेच आहे! म्हणूनच असे आधार आवश्यक आहेत, असे कळले. नदीवर असा एक अधांतरी पूल असेल तर तो असेल सिंगल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज, मात्र एकावर एक (अर्थात अधांतरी) असे दोन पूल असतील तर तो असेल डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज!!! मी केवळ डबल-डेकर बस पाहिल्या होत्या, पण हे प्रकरण म्हणजे खासी लोकांची खासमखास मूळची डबल गुंतवणूक! खासी समाजाच्या त्या सनातन बायो इंजिनीयर्सला माझा साष्टांग कुमनो! असे कांही पूल १०० फूट लांब आहेत. ते सक्षमरित्या साकार व्हायला १५ ते २५ वर्षे लागू शकतात, एकदाची अशी तयारी झाली, की मग पुढची ५०० वर्षे बघायला नको! यातील कांही मुळे पाण्याच्या सतत संपर्कामुळे सडतात, मात्र काळजी नसावी, कारण इतर मुळे वाढत जातात अन त्यांची जागा घेऊन पुलाला आवश्यक अशी स्थिरता प्रदान करतात. हीच वंशावळ खासियत आहे जिवंत रूट ब्रिजची! अर्थात हा स्थानिक बायो इंजिनिअरींगचा उत्तम नमुनाच म्हणायला हवा. काही विशेषज्ञांच्या मते या परिसरात(बहुदा चेरापुंजी आणि शिलाँग) असे शेकडो ब्रिज आहेत, मात्र त्यांच्यापर्यंत पोचणे हे खासी लोकांचच काम! फार थोडे पूल पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत, कारण तिथं पोचायला जंगलातील वाट आपली सत्वपरीक्षा पाहणारी, कधी निसरड्या पायऱ्या तर कधी दगड धोंडे तर कधी ओल्या मातीची घसरण!

या सर्वात “नव नवल नयनोत्सव” घडवणारा, पण ट्रेकिंग करणाऱ्या भल्या भल्या पर्यटकांना जेरीस आणणारा पूल म्हणजे “चेरापुंजीचा डबल डेकर (दोन मजली) लिव्हींग रूट ब्रिज!” मंडळी आपण शक्य असल्यास हे (एकाखाली एक ऋणानुबंध असलेले) चमत्काराचे शिखर अन मेघालयची शान असलेले “डबल डेकर लिव्हींग रूट ब्रिज” नामक महदाश्चर्य जरूर बघावे!  मात्र तिथे पोचायला जबरदस्त ट्रेकिंग करावे लागते. मी मात्र त्याचे फोटो बघूनच त्याला मनोमन साष्टांग कुमनो घातला! ‘Jingkieng Nongriat’ हे नाव असलेला, सर्वात लांब (तीस मीटर) असा हा जिवंत पूल २४०० फूट उंचीवर आहे, चेरापुंजीहून ४५ किलोमीटर दूर Nongriat या गावात! हे पूल “जागतिक वारसा स्थळ” म्हणून घोषित केलेले आहेत. 

मित्रांनो असा कुठलाही जिवंत पूल नदीवर लटकत असतो, नदीजवळ पोचायला वरच्या पर्वतराजीतून (उपलब्ध) वाटेने खाली उतरा, पूल बघा, जमत असेल तर देवाचे अन गाईडचे नाव घेत घेत तो पूल पार करा, वनसृष्टीचा आनंद घ्या.  गाईडच्या किंवा स्थानिकांच्या आदेशाप्रमाणेच पाण्याजवळ जाणे, उतरणे वगैरे कार्यक्रम उरका अन पर्वताची चढण चढा! हे जास्त दमवणारे, कारण उत्साह कमी अन थकवा जास्त! सोबत पेयजल अन जंगलातलीच काठी असू द्यावी.  कॅमेरा अन आपला तोल सांभाळत, जमेल तसे फोटो काढा! (सेल्फीचे काम जपून करावे, तिथे जागोजागी सेल्फी करता डेंजर झोन निर्देशित केले आहेत, “पण लक्षात कोण घेतो!!!”)    

मॉलीन्नोन्गपासून रस्ता आहे सिंगल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज बघायचा! मेघालयातील हे अप्रूप पहिल्यांदा बघितल्यावर त्या पुलावर चालतांना आपण कुणाच्या हृदयावर घाला घालीत आहोत असा मला खराखुरा भास झाला! आम्ही सिंगल रूट ब्रिज बघितला, तिथे जायला दोन रस्ते आहेत, मॉलीन्नोन्गपासून जाणारा कठीण, बराच निसरडा, वेडावाकडा, पायऱ्या अन कठडे नसलेला, रस्त्यात लहान मोठे दगड. मी मुश्किलीने तो पार केला.  दुसऱ्याच दिवशी एक अजून ब्रिज बघायच्या तयारीने मालिनॉन्ग मधून बाहेर पडलो, Pynursa पार केलं, इथल्या हॉटेल मध्ये बरेच पदार्थ होते. या मोठ्या गावात ATM तर आहे, पण कधी बंद असते, कधी मशीन मध्ये पैसे नसतात, म्हणून आपल्याजवळ कॅश हवीच! Nohwet या ठिकाणून खाली चांगल्या कठड्यांसहित असलेल्या पायऱ्या उतरून पोचलो तर काय, कालचाच सिंगल रूट ब्रिज दिसला की! हे डबल दर्शन सुखावणारे होते, पण इथे येणारा हा (आपल्या माहितीसाठी) सोपा मार्ग गावला.

आम्ही Mawkyrnot या गावातून वाट काढत अजून एक सिंगल रूट ब्रिज बघितला. हे गाव पूर्व खासी पर्वतातील Pynursla सब डिव्हिजन येथे वसलेले आहे. नदीकाठी पोचायला चांगल्या बांधलेल्या अन कठडे असलेल्या १००० च्या वर पायऱ्या उतरून आम्ही खाली पोचलो. पुलाच्या नावाखाली (पण नदीच्या वर तरंगत असलेला) ४-५ बांबूचा बनलेला झुलता पूल पाहून, मी याच किनारी थांबले! माझ्या घरची मंडळी (मुलगी, जावई अन नात) स्थानिक गाईडची मदत घेऊन उस-पार पोचलेत अन तिथले निसर्ग दर्शन घेऊन तिथून (बहुदा २० मीटर अंतरावरच्या) दुसऱ्याच तत्सम पुलावरून इस-पार परत आलेत. तवरीक मी इकडे देवाचे नाव घेत, जमेल तसे त्यांचे अन पुलाचे फोटो काढले. या स्थानिक गाईडने मला पायऱ्या उतरणे अन चढणे यात खूप मदत तर केलीच पण माझे मनोबल कित्येक पटीने वाढवले. या अतिशय नम्र अन होतकरू मुलाचे नाव Walbis, अन वय अवघे २१! दुपारी जेवणानंतर माझ्या घरच्या मंडळींना या पेक्षाही जास्त काठिण्यपातळी असलेल्या शिलियांग जशार (Shilliang Jashar) या गावातील बांबू ब्रिजवर जायचे होते, मी मात्र गाईडच्या सल्ल्यानुसार व माझ्या आवाक्यानुसार त्या पुलाच्या वाटेकडे वळलेच नाही.   

प्रिय वाचकहो, पुढील प्रवासात आपण डॉकी आणि चेरापुंजी येथे अद्भुत प्रवास करणार आहोत. तयारीत ऱ्हावा

तर आतापुरते खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

टीप – लेखातील माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेटवर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो आणि वीडियो (काही अपवाद वगळून) व्यक्तिगत आहेत!

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ पर्यटक की डायरी से – मनोवेधक मेघालय – भाग-४ ☆ डॉ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

☆ पर्यटक की डायरी से – मनोवेधक मेघालय – भाग-४ ☆ डॉ. मीना श्रीवास्तव ☆

(पिछला मॉलीन्नोन्ग, चेरापुंजी और भी कुछ)

प्रिय पाठकगण,

कुमनो! (मेघालय की खास भाषामें नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कैसे हैं आप?)

मुझे यकीन है कि, मॉलीन्नोन्ग का यह सफर आपको आनंददायक लग रहा होगा| इस प्यारे गाँव के बारे में कुछ रह गया था बताना, वह है यहाँ का खाना और नाश्ता, मेरी सलाह है कि यहाँ प्रकृति का ही अधिक सेवन करें। यहाँ काफी घरों में (६०-७०%) ‘होम स्टे’ उपलब्ध है| अग्रिम आरक्षण उत्तम रहेगा! मात्र कुछ एक घरों में ही (मैनें ४-५ देखे) खाना और नाश्ता मिलता है! ज्यादा अपेक्षाऐं न रखें,  इससे अपेक्षाभंग नहीं होगा! ब्रेड बटर, ब्रेड आम्लेट, मॅगी और चाय-कॉफी, बस नाश्ते की लिस्ट ख़त्म! खाने में थाली मिलती है, २ सब्जियां (उसमें एक पर्मनन्ट आलू की), दाल और चावल, एक जगह रोटियां थीं, दूसरी जगह आर्डर देकर मिलती हैं| नॉन वेज थाली में अंडे, चिकन और मटन रहता है| यह घरेलु सर्विंग टाइम बॉउंड है, इसका ध्यान रखें। खाने के और नाश्ते की दरें एकदम सस्ती! कारोबार घर की महिला सदस्यों के हाथों में (मातृसत्ताक राज)! यहाँ सब्जियां निकट के बड़े गांव से (pynursa)लायी जाती हैं, हफ्ते में दो बार भरने वाले बाजार से! मालवाहक होती है बेसिक गाडी मारुती ८००! बड़े गांव में बच्चों को लाना, ले जाना भी इसमें ही होता है| यहाँ सदैव वर्षा होने के कारण दोपहिये वाली गाड़ी का इस्तेमाल नहीं होता, गांव वाले कहते हैं कि, इससे अपघात होने का अंदेशा हो सकता है. यहाँ ATM नही है, नेटवर्क न रहने की स्थिति में जी पे, क्रेडिट कार्ड और डेबिट कार्ड किसी काम के नहीं, इसलिए अपने पास हमेशा नकद राशि होनी चाहिए!

स्काय पॉईंट (Nohwet Viewpoint)

इस क्षेत्र का दौरा करते समय, बांग्लादेश की सीमा का बारम्बार दर्शन होता है। परन्तु बांग्लादेश का एक स्काई पॉइंट बेहद खूबसूरत है। यह पॉइंट मॉलीन्नोन्ग से केवल दो किलोमीटर की दूरी पर है। बांस के पुल पर बड़े मजे से झूलते झूलते यात्रा कीजिये, एक ट्री हाउस पर स्थित इस पॉइंट तक जाइये तथा सामने का नज़ारा विस्मय चकित नज़र से देखिये| यह पॉईंट ८५ फ़ीट ऊँचाई पर है| पूरी तरह बांस से बना और पेड़ों को बांस तथा जूट की रस्सियोंसे कसकर बंधा यह इको फ्रेंडली पॉईंट, सामने के नयनाभिराम नज़ारोंके फोटो तो बनते ही हैं! परन्तु सेल्फी से सावधान मित्रों! यहाँसे सुंदर मॉलीन्नोन्ग तो दिखता ही है, अलावा इसके बांग्लादेश का मैदानी इलाका और जलसम्पदा के भी रम्य दृश्य के दर्शन होते हैं!

सिंगल डेकर और डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज

मेघालय पर्यटनका अविभाज्य भाग है जीते जागते पुल! और वे देखने के उपरांत कौतुक के और प्रशंसा के पुल बाँधनेको पर्यटक हैं ही! जीते जागते पुल यानि पुराने पेड़ों की जड़ें एक दूजे में “दिल के तार तार से बंधकर” हवा में अर्थात तैरते हुए (और एकाध रास्ता भटके हुए बच्चे की भांति जमीन में) ऐसी उलझते जाते हैं, और इसका साक्षी होता है नदी का जलपात्र, “जलगंगा के किनारे तुमने मुझे वचन दिया है” यह गीत गुनगुनाते हुए! जैसे जैसे वर्ष बीतते हैं, जल और प्रेम की वर्षा मिलती रहती है, वैसे वैसे ये जड़ एक दूजे को आलिंगन में कस कर जकड लेते हैं, मान लो, जनम जनम का ऋणानुबंध हो! यह दिनों दिन चलता ही रहता है| मित्रों, इसीलिये तो यह “लिव्हिंग रूट ब्रिज” है, अर्थात जीता जागता ब्रिज, कॉन्क्रीट का हृदयशून्य ब्रिज नहीं और इसीलिये हमें यह नज़र आता है प्रेमबन्धन के अटूट पाश जैसा मजबूत जडों का पुल!

अब इन जडोंकी मूल कथा बताती हूँ! लगभग १८० वर्षों पूर्व मेघालय के खासी जमात के जेष्ठ व श्रेष्ठ लोगों ने नदीपात्र के आधे अंतर तक लटकते आए रबर के (Ficus elastica tree) पेड़ों के जड़ों को अरेका नट पाम(Areca nut palm) जाति के खोखली छड़ों में डाला, उसके पश्चात् उनकी जतन से देखभाल की| फिर वे जड़ें (अर्थात हवा में तैरते हुए) लम्बाई में वृद्धिंगत होते हुए दूसरे किनारे तक पहुंच गईं| और वह भी अकेले अकेले नहीं, बल्कि एक दूजे के गले में और हाथों में हाथ डालकर| इस प्रकार मानव का भार वहन करने वाला अलगथलग ऐसा जिंदादिल पुल आदमी की कल्पनाशक्ति से साकार हुआ! हमने देखे हुए सिंगल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज को मजबूती प्रदान करने हेतु भारतीय सेना ने बांस के सहारे टिकाव तैयार किये हैं| ये आश्चर्यजनक पुल देखने हेतु पर्यटकों की संख्या बढ़ती ही जा रही है! इसीलिये ऐसे सहारों की आवश्यकता है, ऐसा बताया गया| अगर नदी पर ऐसा एक हवा में तैरता पुल हो, तो वह सिंगल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज होगा, परन्तु एक के ऊपर एक (अर्थात हवा में तैरते हुए) ऐसे दो पुल हो तो वह होगा डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज!!! मैने केवल डबल-डेकर बस देखी थी, परन्तु यह अनोखी चीज़ यानि खासी लोगोंकी खासमखास जड़ों की डबल इन्वेस्टमेंट ही समझ लीजिए! खासी समाज के इन सनातन बायो-इंजीनियरोंको मेरा साष्टांग कुमनो! ऐसे कुछ पुल १०० फ़ीट लम्बे हैं| उन्हें सक्षमता से साकार होने को १५ से २५ वर्ष लग सकते हैं| एक बार ऐसी तैयारी हो गई, तो आगे के ५०० वर्षों की फुर्सत हो गई समझिये! यहाँ की कुछ एक जड़ें पानी से लगातार संपर्क होने के कारण सड़ जाती हैं, परन्तु चिंता की कोई बात नहीं, क्यों कि दूसरी जड़ें बढ़ती रहती हैं और पुराने जड़ों की जगह लेकर पुल को आवश्यक स्थिरता प्रदान करती हैं| यहीं वंशावली खासियत है जिंदा रूट ब्रिजकी! अर्थात यह स्थानिक बायो इंजिनिअरींग का उत्तम नमूना ही कहना होगा| कुछ विशेषज्ञों के मतानुसार इस क्षेत्र में (ज्यादातर चेरापुंजी और शिलाँग) ऐसे सैकड़ों ब्रिज हैं, पर उन तक पहुंचना खासी लोगों के ही बस की बात है! केवल थोडे ही पुल पर्यटकों के लिए उपलब्ध हैं क्योंकि, वहां तक पहुंचनेवाली जंगल की राह है हमारी सत्वपरीक्षा लेने वाली, कभी फिसलन भरी सीढ़ियाँ, कभी छोटी बड़ी चट्टानें, तो कभी गीली मिट्टी की गिरती हुए ढलान!

अगले भाग में सफर करेंगे चेरापुंजी के डबल डेकर (दो मंजिला) लिव्हींग रूट ब्रिज की और आप देखेंगे सिंगल लिव्हींग रूट ब्रिज साक्षात मेरी नजरों से! आइये, तब तक हम और आप सर्दियों की सुर्ख़ियों से आनन्द विभोर होते रहें!

फिर एक बार खुबलेई! (khublei) यानि खास खासी भाषा में धन्यवाद!

टिप्पणी

*लेख में दी जानकारी लेखिका के अनुभव और इंटरनेट पर उपलब्ध जानकारी पर आधारित है| यहाँ की तसवीरें और वीडियो (कुछ को छोड़) व्यक्तिगत हैं!

*गाने और विडिओ की लिंक साथ में जोड़ रही हूँ, उन्हें सुनकर और देखकर आपका आनंद द्विगुणित होगा ऐसी आशा करती हूँ!

मेघालय की छात्राओं द्वारा प्रस्तुत किया हुआ परंपरागत खासी नृत्य

“पिरपिर पिरपिर पावसाची, त्रेधा तिरपिट सगळ्यांची” बालगीत

गायिका-शमा खळे, गीत वंदना विटणकर, संगीत मीना खडीकर, नृत्य -अल्ट्रा किड्स झोन

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मनोवेधक  मेघालय…भाग -२ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग -२ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(मनमोहिनी मॉलीन्नोन्ग, डिव्हाईन, डिजिटल डिटॉक्स (divine, digital detox)

प्रिय वाचकांनो,

कुमनो! (मेघालयच्या खासी या खास भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

मावलीन्नोन्ग (Mawlynnong) हे अगम्य नाव असलेले गाव पृथ्वीतलावर आहे, हे माझ्या गावीही नव्हते! तिथे गेल्यानंतर या गावाचे नाव शिकता-शिकता चार दिवस लागले (१७ ते २० मे २०२२), अन गावाला रामराम करायची वेळ येऊन ठेपली. शिलाँग पासून ९० किलोमीटर  दूर असलेले हे गाव. तिथवर पोचणारी ही वाट दूर होती, घाटा-घाटावर वळणे घेता घेता गावलेले हे अगम्य अन “स्वप्नामधील गाव” आता मनात बांबूचं घर करून बसलय! त्या गावाकडचे ते चार दिवस ना माझे होते ना माझ्या मोबाइलचे! ते होते फक्त निसर्गराजाचे अन त्याच्याबरोबर झिम्मा खेळणाऱ्या पावसाचे! आजवर मी बरेच पावसाळे पाहिलेत! मुंबईचा पाऊस मला सगळ्यात भारी वाटायचा! पन या गावाच्या पावसानं पुरती वाट लावली बगा म्हमईच्या पावसाची! अन तिथल्या लोकांना त्याचे अप्रूप वगैरे काही नाही! बहुदा त्यांच्यासाठी हा सार्वजनिक शॉवर नित्याची बाब असावी! आता मेघालय मेघांचे आलय (hometown म्हणा की) मग हे त्याचेच घर झाले की, अन आपण तिथे पाहुणे असा एकंदरीत प्रकार! तो तिथं एन्ट्री देतोय हेच त्याचे उपकार, शिवाय झिम्मा खेळून पोरी दमतात, अन घडीभर विसावा घेतात, असा तो मध्ये मध्ये कमी होत होता. आम्ही नशीबवान म्हणून त्याची विश्रांतीची वेळ अन आमची तिथली निसर्गरम्य ठिकाणे पाहायची वेळ कशी का कोण जाणे पण चारही दिवस मस्त मॅच झाली! रात्री मात्र त्याची अन विजेची इतकी मस्ती चालायची, त्याला धुडगूस, धिंगाणा, धम्माल, धरपकड, अन गावातल्या (आकाशातल्या नव्हे) विजेला धराशायी करणारीच नावें शोधावी लागतील!       

मॉलीन्नोन्ग सुंदरी: सॅली!

खासी समाजात मातृसत्ताक पद्धत अस्तित्वात आहे. महिला सक्षमीकरण हा तर इथला बीजमंत्र. घर, दुकान, घरगुती हॉटेल अन जिथवर नजर जाईल तिथे स्त्रिया,  त्यांच्या साक्षरतेचे प्रमाण ९५-१००%. आर्थिक गणित याच सांभाळणार! बाहेर काम करणाऱ्या प्रत्येकीच्या गळ्यात स्लिंग बॅग(पैसे घेणे अन देणे यासाठी सुटसुटीत व्यवस्था). आम्ही देखील एक दिवस एका घरात अन तीन दिवस अन्य घरात वास्तव्य केले! तिथल्या मालकीणबाईंचे नाव Salinda Khongjee, (सॅली)! ही मॉलीन्नोन्ग सुंदरी म्हणजे इथल्या गोड गोजिऱ्या यौवनाची प्रतिनिधीच जणू! चटपटीत, द्रुत लयीत कामे उरकणारी, चेहेऱ्यावर कायम मधुर स्मित! इथल्या सगळ्या स्त्रिया मी अश्याच प्रकारे कामे उरकतांना बघितल्या! मी अन माझ्या मुलीने या सुंदर सॅलीची छोटी मुलाखत घेतली.(ही माहिती छापण्याकरता तिची परवानगी घेतली आहे) तिचं वय अवघे २९! पदरात, अर्थात जेन्सेम मध्ये (खासी पोशाखाचा सुंदर आविष्कार म्हणजे जेन्सेम, jainsem)  दोन मुली, ५ वर्षे अन ४ महिने वयाच्या, तिचा पती, Eveline Khongjee (एव्हलिन), वय अवघं २५ वर्षे! आम्ही ज्या घरात होम स्टे करून राहिलो ते घर सॅलीचं, अन ती राहत होती ते आमच्या घराच्या डाव्या बाजूचं घर परत तिचच! आमच्या घराच्या उजव्या बाजूचं घर तिच्या नवऱ्याच माहेर अर्थात तिच्या सासूचं अन नंतर वारसा हक्कानं तिच्या नणंदेचं! तिची आई हाकेच्या अंतरावर राहते. सॅलीचे शिक्षण स्थानिक अन थेट शिलाँगला जाऊन बी ए दुसऱ्या वर्षापर्यंत. (वडिलांचे निधन झाल्याने फायनल राहिले!) लग्न झालं चर्च मध्ये (धर्म ख्रिश्चन).  इथे नवरा लग्नानंतर आपल्या बायकोच्या घरी जातो! आता तिचा नवरा आमच्या घराच्या समोरून (त्याच्या अन तिच्या) माहेरी अन सासरी जातांना बघायला मजा यायची. सॅली पण काही हवं असेल तर पटकन आपल्या सासरी जाऊन  कधी चहाचे कप, तर कधी ट्रे अशा वस्तू जेन्सेमच्या आत लपवून घेऊन जातांना बघायची मजा औरच! सर्व आर्थिक व्यवहार अर्थातच सैलीकडे बरं का! नवरा बहुतेक मेहनतीची अन बाहेरची कामे करायचा असा मी निष्कर्ष काढला! घरची भरपूर कामे अन मुलींना सांभाळून देखील सॅलीनं आम्हाला मुलाखत देण्याकरता वेळ काढला, त्याबद्दल मी तिची ऋणी आहे! मुलाखतीत राहिलेला एक प्रश्न मी तिला शेवटी, शेवटच्या दिवशी हळूच विचारलाच, “तुझं लग्न ठरवून की प्रेमविवाह?” त्यावर ती लाजून चूर झाली अन “प्रेमविवाह” अस म्हणत स्वतःच्या घरात अक्षरशः पळून गेली!                          

सॅलीकडून मिळालेली माहिती अशी:

गावकरी गावचे स्वच्छतेचे नियम कसोशीने पाळतात. समजा स्वच्छता मोहिमेत भाग नाहीच घेतला तर? गावाचे नियम मोडल्याबद्दल गावप्रमुखाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाते! तिने सांगितले, “माझ्या आजीने अन आईने गावाचे नियम पाळण्याचे मला लहानपणापासून धडे दिलेत”. इथली घरे कशी चालतात त्याचे उत्तर तिने असे दिले: “होम स्टे” हे आता उत्पन्नाचे चांगले साधन आहे! याशिवाय शाली अन जेन्सेम बनवणे  किंवा बाहेरून आणून विकणे, बांबूच्या आकर्षक वस्तू बनवणे अन त्या पर्यटकांना विकणे. इथली प्रमुख पिके म्हणजे तांदूळ,  सुपारी  आणि अननस, संत्री, लीची अन केळी  ही फळं! प्रत्येक स्त्री समृद्ध, स्वतःचं घर, जमीन आणि बागा असलेली! कुटुंबानं धान अन फळे स्वतःच पिकवायची.  तिथे फळविक्रेतीने ताजे अननस कापून बुंध्याच्या सालीत सर्व्ह केले, ती अप्रतिम चव अजून रेंगाळतेय जिभेवर!  याचे कारण “सेंद्रिय शेती”! फळे निर्यात करून पैसे मिळतात, शिवाय पर्यटक “बारो मास” असतातच! (मात्र लॉकडाऊन मध्ये पर्यटन थंडावले होते.)

या गावात सर्वात प्रेक्षणीय काय, तर इथली हिरवाई, हा रंग इथला स्थायी भाव! पानाफुलांनी डवरलेल्या स्वच्छ रस्त्यांवर मनमुराद भटकंती करावी. प्रत्येक घरासमोर रम्य उपवनाचा भास व्हावा असे विविधरंगी पानांनी अन फुलांनी फुललेले ताटवे, घरात लहान मोठ्या वयाची गोबरी मुले! त्यांच्यासाठी पर्यटकांना टाटा करणे अन फोटोसाठी पोझ देणे हे नित्याचेच! मंडळी, हा अख्खा गावाच फोटोजेनिक, कॅमेरा असेल तर हे टिपू की ते टिपू ही भानगडच नाहीय! पण मी असा सल्ला देईन की आधी डोळ्यांच्या कॅमेऱ्याने डोळे भरून ही निसर्गाच्या रंगांची रंगपंचमी बघावी अन मग निर्जीव कॅमेऱ्याकडे प्रस्थान करावे! गावकुसाला एक ओढा आहे (नाला नाही हं!). त्याच्या किनारी फेरफटका मारावा! पाण्यात हुंदडावे पण काहीबाही खाऊन कचरा कुठेही फेकला तर? मला खात्री आहे की, नुकत्याच न्हायलेल्या सौंदर्यवतीसम प्रतीत होणारे हे रम्य स्थान अनुभवल्यावर तिळाइतका देखील कचरा तुम्ही कुठेही टाकणार नाही! इथे एक “balancing rock” हा निसर्गदत्त चमत्कार आहे, फोटो काढावा असा पाषाण! ट्री हाउस, अर्थात झाडावरील घर, स्थानिकांनी उपलब्ध साहित्यातून बांधलेले, तिकीट काढून बघायचं, बांबूनिर्मित वळणदार वळणाच्या वर वर जाणाऱ्या आवृत्त्या संपल्या की झाडावरील घरात जाऊन आपण किती वर आहोत याचा एहसास होतो! खालच्या अन घरातल्या परिसराचे फोटो हवेतच! शहरात घरांसाठी जागा नसेल तर हा उपाय विचारणीय, मात्र शहरात तशी झाडे आहेत का हो? इथे तीन चर्च आहेत. त्यापैकी एक “चर्च ऑफ द एपिफॅनी”, सुंदर रचना आणि बांधकाम, तसेच पानाफुलांनी बहरलेला संपूर्ण स्वच्छ परिसर. आतून बघायची संधी मिळाली नाही, कारण चर्च ठराविक दिवशी अन ठराविक वेळी उघडते!

मित्रांनो, जर तुम्हाला टीव्ही, इंटरनेट, व्हाट्सअँप अन चॅटची सवय असेल (मला आहे), तर इथे येऊन ती मोडावी लागणार! आम्ही या गावात होतो तेव्हा ९०% वेळा गावची वीज गावाला गेलेली होती! एकला सोलर-दिवा सोडून बाकी दिवे नाहीत, गिझर नाही, नेटवर्क नाही, सॅलीकडे टीव्ही नाही! आधी मला वाटले, आता जगायचे कसे? पण हा अनुभव अनोखाच होता! निसर्गाच्या कुशीतली एक अद्भुत अविस्मरणीय अन अनवट अनुभूती! माझ्या सुदैवाने घडलेला डिव्हाईन, डिजिटल डिटॉक्स!

प्रिय वाचकहो, मॉलीन्नोन्गची महती अजून गायची आहे, तर आतापुरते खुबलेई!  (Khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

डॉ. मीना श्रीवास्तव                                       

टीप – लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो (एखादा अपवाद वगळून)आणि वीडियो व्यक्तिगत आहेत!

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मनोवेधक  मेघालय…भाग -१ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग -१ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(मनमोहिनी मॉलीन्नोन्ग, डिव्हाईन, डिजिटल डिटॉक्स(divine, digital detox) 

निसर्ग हे या जगातील सर्वांगसुंदर चित्रकलेचे दालन आहे, रोज नवनवीन चित्रं घेऊन येणारं!

प्रिय वाचकांनो,

कुमनो! (मेघालयच्या खासी या खास भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

भारताच्या उत्तरपूर्व सीमेवर नांदणाऱ्या सात बहिणी अर्थात “सेव्हन सिस्टर्स”  पैकी एक बहीण मेघालय! दीर्घ हिरव्यागार पर्वतश्रृंखला, खळखळ वाहणारे निर्झर, अन पर्वतातच कुठे कुठे वसलेली लहान मोठी गावे! अर्थात मेघालयची राजधानी शिलाँग हिला आधुनिकतेचा स्पर्श आहे! (मंडळी, मी पाहिलेल्या शिलाँग सहित मेघालयाच्या अन्य मोजक्या ठिकाणांची सफर पुढील भागात!). आजची सफर अविस्मरणीय अन अनुपमेय अशीच होणार मित्र हो, खात्री असू द्या! अगदी इवलसं एक गाव अन मॉलीन्नोन्ग हे नांव! या गावाचे हे नाव जरा विचित्रच वाटते नाही का? ७० किंवा अधिकच वर्षांपूर्वी हे गाव जळून खाक झाले, गावकरी दुसरीकडे गेलेत, पण लगेचच परत येऊन त्यांनी नव्या दमाने हे गाव वसवले. खासी भाषेत “maw” चा अर्थ दगड अन ‘lynnong’ चा अर्थ विखुरलेले! येथील घरांपर्यंत घेऊन जाणाऱ्या दगडी वाटा याची साक्ष देतात.

कुठल्याही महानगरातल्या एखाद्या गगनचुंबी बिल्डिंगच्या रहिवास्यांच्या संख्येपेक्षाही कमी (२०१९ च्या नोंदीप्रमाणे लोकसंख्या अवघी ९००) गावकऱ्यांची वस्ती असणारं हे गाव (पर्यटकांना विसरा, कारण ते येत अन {नाईलाजाने} जात असतात!) “पूर्व खासी पर्वतरांगा”हे खास नाव असलेल्या जिल्ह्यात येणारं (in Pynursla community development block)! पर्यावरणाशी सुंदर समन्वय साधत माणूस तितकेच सुंदर जीवन कसे जगू शकतो, याचे आजवर मी पाहिलेले हे गाव सर्वोत्तम उदाहरण! म्हणूनच जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त्याने हा भाग फक्त  या मनमोहिनीच्या कदमोंपे निछावर! काय आहे या गावात इतकं की “तारीफ करूँ क्या उसकी, जिसने इसे बसाया!!!” असं(शर्मिला समोर नसतांनाही) गावंस वाटतंय! स्वच्छ अन शुचिर्भूत गाव कसं असावं, तर असं! डिस्कवरी इंडिया या मासिकाने आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव (२००३), भारतातील सर्वात स्वच्छ गाव (२००५), असे गौरविल्यानंतर अनेकदा स्वच्छतेसाठी हे गाव प्रसिद्धीच्या झोतात राहिलय! सध्या मेघालयातील सर्वात सुंदर स्वच्छ गाव म्हणून त्याचा लौकिक आहे! कुठेही आपल्याला परिचित अशी दंडुकेशाही नाही, कागदी घोडे नाहीत. इथले बहुसंख्य लोक ख्रिश्चन धर्मीय  आणि “खासी” जमातीचे आहेत (मेघालयात तीन मुख्य जमाती आहेत: Khasis, Garos व Jaintias). ग्राम पंचायत अस्तित्वात आहे, निवडणूकीत गावप्रमुख ठरतो. सध्या श्री थोम्बदिन (Thombdin) हे गावप्रमुख आहेत. (ते व्यस्त असल्याकारणाने त्यांची मुलाखत घेता आली नाही!) इथे आहे एक फलक, स्वच्छतेचं आवाहन करणारा!स्वयंशिस्त (आपल्याकडे फक्त स्वयं आहे), अर्थात, सेल्फ डिसिप्लिन काय असते (भारतात सुद्धा) हे इथं याची देही याची डोळी बघावे असे मी आवाहन करीन!सामाजिक पुढाकाराने गावातील प्रत्येकजण गाव स्वच्छता-मोहिमेत असतोच असतो. दर शनिवारी हे स्वच्छता अभियान स्वयंस्फूर्तीने राबवल्या जाते. प्रत्येक स्थानिकाची हजेरी अनिवार्य अन गावप्रमुखाचा शब्द प्रमाण! याचे मूळ गावकऱ्यांच्या नसानसात भिनलंय, कुठल्याही राजकीय पक्ष किंवा नेत्याच्या आवाक्यातले हे काम नोहे! अन हीच प्रवृत्ती पर्यटकांनी ठेवावी, निदान या गावात असेपर्यंत, असा या गावकऱ्यांचा आग्रह असतो!

इथे नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या बांबूच्या बनाचे किती अन कसे कवतिक करावे! मला बांबू म्हटले की शाळेत बहुतेक रोज खाल्लेले केनचे फटके (रोज किमान ५) आठवतात, त्यातील ९९. ९९% वेळा  फटके शाळेत उशिरा पोचण्याकरता असत. (मित्रांनो, तसं काही विशेष नाही, शाळेची घंटा घरी ऐकू यायची म्हणून, जाऊ की निवांत, बाजूलाच तर आहे शाळा, हे कारण!) इथे बांबूचा वावर सर्वव्यापी! कचरा टाकण्यास जागोजागी बांबूच्या बास्केट, म्हणजेच खोह(khoh) , त्याची वीण इतकी सुंदर, की त्यात कचरा टाकूच नये असे वाटते! तिथल्या बायामाणसांना ऊन अन पावसापासून रक्षण करण्यास परत याच बांबूच्या अतिशय बारकाईने सौंदर्यपूर्ण दृष्टीने विणलेले प्रोटेक्टिव्ह असे कव्हर! अन्न साठवायला, मासे पकडायला अन दागिने घडवायला बांबूच! बांबूची पुढील महिमा पुढील भागात!

इथे सकाळी उठोनि स्वच्छता-सेविका कचरा गोळा करायच्या कामाला लागतात, प्लास्टिकचा वापर बहुदा नाहीच, कारण पॅकिंग लहान-मोठ्या पानांचे! उपलब्ध अशा नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून घरे बांधलेली( परत बांबूच)! जैविक कचरा जमा करून खत निर्माण करतात. इथे आहे open drainage system, पण कहर हा की त्यातले सुद्धा पाणी प्रवाही अन स्वच्छ, गटारे तुंबलेली नाहीत (प्रत्यक्ष बघा अन मग विश्वास ठेवा!)  सौर-ऊर्जेचा वापर करून इथले पथदिवे स्वच्छ रस्त्यांना प्रकाशाचा उजाळा देत असतात. शिवाय प्रत्येक घरी सौर-दिवे अन सौर-विजेरी (टॉर्च) असतातच, पावसाने वीज गेली की या वस्तू येऊन काम भागवतात! प्रिय वाचकहो, लक्षात घ्या, हे मेघालयातील गाव आहे, इथे मेघांची दाटी नेहमीचीच, तरीही सूर्यनारायण दिसेल तेव्हा सौर ऊर्जा साठवल्या जाते! अन इथे आपण सूर्य किती आग ओततोय, हा उन्हाळा भारीच गरम बर का, असा उहापोह करतोय! इथे हॉटेल नाही,  तुम्ही म्हणाल मग राहायचे कुठे अन खायचे काय? कारण पर्यटक म्हणून ही सोय हवीच! इथे आहे होम् स्टे(home stay), आल्यासारखे चार दिवस राहा अन आपापल्या घरी गुमान जा बाबांनो, असा कार्यक्रम! तुम्ही इथे फक्त पाहुणे असता  किंवा भाडेकरू!  मालक इथले गावकरी! आपण आपल्या औकातीत रहायचं, बर का, कायदा thy name!  कुठलाही धूर नाही, प्लास्टिकचा वापर नाही आणिक पाण्याचे व्यवस्थापन आहेच (rain harvesting). आता तर “स्वच्छ गाव” हाच या गावाचा USP (Unique salient Point), मानबिंदू अन प्रमुख आकर्षण! गावचा प्रमुख म्हणतो की यामुळे २००३ पासून या गावाकडे पर्यटकांचा ओघ वाढतोच आहे! गावकऱ्यांचे उत्पन्न ६०%+++ वाढलेय आणि या कारणाने देखील इथल्या स्वच्छतेकडे गावकरी आणखीनच प्रेमाने बघतात, सगळे गाव जणू आपले घरच अशी गावकी अन भावकी! विचार करण्यासारखी गोष्ट! स्वच्छ रस्ते अन घरं इतकी दुर्मिळ झाली आहेत, हेच आपल्याला लाजेनं मान खाली घालायला लावणारे कारण! 

प्रिय वाचकहो, मॉलीन्नोन्गची महती अजून गायची आहे, अन माझा मेघालयातील उर्वरित प्रवास हायेच की, पुढल्या भागांसाठी!!!

तवरिक वाट बगा बरं का मेघालयचं पाव्हनं!

तर आतापुरते खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

टीप-

  • लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो (एखादा अपवाद वगळून) व्यक्तिगत आहेत!    
  • एका गाण्याची लिंक सोबत जोडत आहे! 

https://youtu.be/obiMFcuEx6M “Manik Raitong”

अत्यंत सुमधुर असं मूळ खासी भाषेतील गाणं, गायिका “Kheinkor Mylliemngap”   

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग-3 – सुंदर, शालीन आणि अभिमानी जपान ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग- 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ सुंदर, शालीन आणि अभिमानी जपान ✈️

रात्री अकराच्या बसने टोकियोला जायचे होते. आमचा जपान रेल्वे पास या बससाठी चालत होता. तीस जणांची झोपायची सोय असलेली डबल डेकर मोठी बस होती. बसण्याच्या जागेचे आरामदायी झोपण्याच्या जागेत रूपांतर केले आणि छान झोपून गेलो. पहाटे साडेपाच-सहाला जाग आली. सहज बाहेर पाहिले. अरे व्वा! बसमधून दूरवर फुजियामा पर्वत दिसत होता. निळसर राखाडी रंगाच्या त्या भव्य पर्वताच्या माथ्यावर बर्फाचा मुकुट चकाकत होता. सारे खूश झाले. ट्रॅफिक जॅममुळे टोक्यो स्टेशनला पोहोचायला नऊ वाजले. स्टेशनवरच सारे आवरले. आज आम्ही फुजियामाला जाणार होतो व उद्याची टोक्यो दर्शनची तिकीटं काढली होती. आजची रात्र आम्ही टोक्योचे एक उपनगर असलेल्या कावासकी इथे सीमा आणि संदीप लेले यांच्याकडे राहणार होतो. त्यामुळे जवळ थोडे सामान होते.

फुजियामाला जाताना हे सामान नाचवायला नको म्हणून आम्ही ते टोक्यो स्टेशनवरील लॉकरमध्ये ठेवायचे ठरविले. जपानमध्ये सर्व रेल्वे स्टेशन्सवर लॉकर्सची व्यवस्था आहे. आपल्या सामानाच्या साइजप्रमाणे लॉकर निवडून त्यात सामान ठेवायचे. किती तासांचे किती भाडे हे त्यावर लिहिलेले असते. सामान ठेवून लॉकरला असलेली किल्ली लावून ती किल्ली आपल्याजवळच ठेवायची. मात्र सामान परत घेताना योग्य ते भाडे त्या लॉकरला असलेल्या होलमधून टाकल्याशिवाय लॉकर उघडत नाही. तिथल्या एका लॉकरमध्ये सामान ठेवून आम्ही फुजियामाला जाण्यासाठी निघालो. तीन-चार गाड्या बदलून, अनेकांना विचारत शेवटी माथेरानसारख्या छोट्या गाडीने कावागुचिकोला पोहोचलो.फुजियामा  इथे असलेल्या पाच लेक्सपैकी हा एक लेक आहे. तिथून फुजियामाचे सुंदर दर्शन होत होते. हळूहळू थंडी, बोचरे वारे वाढू लागले. तेव्हा परतीचा तसाच प्रवास करून टोक्यो स्टेशनवर आलो.

जगातले सर्वात वर्दळीचे स्टेशन म्हणून टोक्यो ओळखले जाते. जमिनीखाली आणि जमिनीवर  पाच-सहा मजले अवाढव्य रेल्वे स्टेशन्सचे जाळे पसरले आहे. दररोज लक्षावधी लोक या स्टेशन मधून जा- ये करत असतात. त्या प्रचंड वाहत्या गर्दीत आम्ही हरवल्यासारखे झालो. आम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर उतरलो तिथून सकाळी आम्ही ज्या दिशेच्या गेटजवळ सामान ठेवले होते, तो लॉकर काही सापडेना. त्यात भाषेची मोठीच पंचाईत. सगळेजण त्या गर्दीत लॉकर शोधत बसायला नको म्हणून आम्ही तिघे- चौघे एका ठिकाणी बसून राहिलो. लॉकर शोधायला गेलेल्या दोघा जणांना लॉकर सापडून परत आम्ही सर्व एकमेकांना सापडण्यात चांगले दोन तास गेले.

ट्रीपचा शेवटचा दिवस टोक्योदर्शनचा होता. हवामानाच्या अंदाजाप्रमाणे पाऊस पडतच होता .आयफेलटॉवरसारख्या असणाऱ्या टोक्यो टॉवरवरून शहराचे दर्शन घडले. जपानचा पारंपारिक चहा समारंभ पाहिला. तो हिरव्या रंगाचा, भातुकलीच्या कपांमधून दिलेला कोमट चहा आपल्याला आवडत नाही पण सुंदर किमोनोमधल्या त्या बाहुल्यांसारख्या स्त्रिया, चहा बनविण्याचे हळुवार सोपस्कार वगैरे पाहायला गंमत वाटत होती. नंतर एम्परर गार्डनमध्ये थोडे फिरून जेवायला गेलो. एका मोठ्या हॉटेलात सर्वांसाठी बार्बेक्यू पद्धतीचे जेवण होते. टेबलावर प्रत्येकाजवळ छोटीशी शेगडी ठेवलेली होती. त्यावर कांदा, बटाटा, वांगी, रताळे, मशरूम, लाल भोपळा, लाल मिरची असे सारे गरम गरम भाजून दिलेले होते. जोडीला भात, हिरवा चहा, रताळ्याचा गोड पदार्थ असे आमचे शाकाहारी जेवण होते. परंतु काड्यांनी जेवायची कसरत काही जमली नाही. मग काटे- चमचेच वापरले. त्या दिवशी त्या हॉटेलात बरीच लग्नं होती. ती पाहायला मिळाली. लग्नाच्या वऱ्हाडात उंची किमोनो घालून जपानी गजगामिनी मिरवत होत्या.

आता पाऊस थांबला होता. सुमिडा नदीतून क्रूझने सहल करायची होती. बसमधून तिथे जाताना टोक्योचा आपल्या फोर्टसारखा विभाग दिसला. तेरा ब्रिजच्या खालून आमची क्रूज गेली. ब्रिजवरून कुठे रेल्वे तर कुठे रस्ते होते. इकडून तिकडे सतत वाहतूक चालू होती. बोटीतून उतरल्यावर दोन्ही बाजूंच्या खरेदीच्या दुकानांवर एक नजर टाकून नंतर पॅगोडा पाहिला. टोक्योदर्शनच्या बसमधून उतरण्यापूर्वी गाइडला “आरीगाटो गोसाईमास” म्हटले. म्हणजे जपानी भाषेत त्याचे आभार मानले.

जपानी लोक हे अत्यंत मेहनती, शिस्तप्रिय आणि शांत वृत्तीचे आहेत. आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा याचा त्यांना विलक्षण अभिमान आहे. हा देश सतत भूकंपाच्या छायेत वावरत असला तरी कुठेही भीतीचा लवलेश नसतो. सर्व नवीन बांधकामे भूकंपाला तोंड देण्यास योग्य अशीच बांधलेली आहेत. नियमाप्रमाणे प्रत्येक घरामध्ये दरवाज्याजवळ पिण्याच्या पाण्याच्या दोन बाटल्या, बॅटरी, मेणबत्त्या, काड्यापेटी, एका वेळचे घरातील सर्वांचे कपडे व थोडी बिस्किट्स, चॉकलेट्स अशी जय्यत तयारी एका बॅगमध्ये करून ठेवलेली असते. जपानमधील राहणीमान खूपच खर्चिक आहे. इथे सगळीकडे झाडे, फुले आहेत पण सारी झाडे, फुले अगदी सैनिकी शिस्तीत वाढल्याप्रमाणे आहेत. नैसर्गिकरित्या वाढलेले, फळाफुलांनी डवरलेले असे एकही झाड आढळत नाही. जपानी लोक ठरवतील तसेच झाडांनी वाढायचे, फुलांनी फुलायचे, बोन्सायरुपाने  दिवाणखाने सजवायचे! तरुण पिढीवर अमेरिकन जीवनशैलीचा फार मोठा प्रभाव आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचं वेड व प्रचंड महागाई यामुळे लग्न, मुलंबाळं, एकत्र कुटुंबपद्धती हळूहळू कमी होत आहे. जपानमध्ये अतिवृद्धांची संख्या वाढते आहे तर लहान मुलांची संख्या कमी होत आहे. कोणी सांगावे, उद्या जपानी शास्त्रज्ञ यावरही काही उपाय शोधून काढतील.

आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. पहाटेच्या थोड्याशा पावसाळी धुक्यातून उगवत्या सूर्यदेवाचे लांबलचक किरणांचे हात आम्हाला निरोप देत होते. डोळ्यांपुढे दिसत होते–

  प्रशांत महासागराच्या हिंदोळ्यावर झुलणारे,

  पाचूच्या कंठ्यामधल्या रत्नासारखे शोभणारे,

   आकाराने लहान, कर्तृत्वाने महान,

   फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उभे राहिलेले,

   अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या गरुडझेपेने,

   आकाशाला कवेत घेणारे,

    एक स्वच्छ, सुंदर ,शालीन राष्ट्र, जपान!

भाग ३ व जपान समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares