श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ हलधर… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
कोण मारतो फुंकर आहे
विझत चालल्या अंगारावर
चिथावणीने नाचत होते
कुडामुडाचे थकलेले घर
*
संध्याकाळी मावळतीला
तुफान झाले होते वादळ
आभाळाला कळले नाही
तारे होते फिरले गरगर
*
दिवस उगवला प्रभात झाली
डोंगर माथा बघत राहिला
चमकत होती पूर्व दिशेने
पांघरलेली भगवी चादर
*
दवात भिजल्या पानफुलांनी
हार घातले गळ्यात सुंदर
भिडला वारा आनंदाने
दवमोत्यांची झाली थरथर
*
भिजली माती रानामधली
स्वागतकरण्या तयार झाली
ताडमाड ही उभे ठाकले
झुकवत माथा राखत आदर
*
हासत खेळत अखंड होते
बरसत पाणी आभाळाचे
रानामधल्या दगडाला ही
मग मायेचे फुटले पाझर
*
तेज धरेवर येते तेव्हा
माणसातला फुलतो मानव
मरगळलेला जीव येथला
उत्साहाने होतो नवथर
*
घामगाळतो मातीवरती
करतो सेवा तिची निरंतर
स्वतंत्रतेने अविरत राबत
अभिमानाने जगतो हलधर
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈