मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – ४) – भाग्यद बिभास २ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – ४) – भाग्यद बिभास २ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

(कालच्या भागापासून पुढे चालू….)

पूर्वी उत्तर हिंदुस्थानी संगीतपद्धतीत थाटसंख्या बत्तीस होती. मात्र एकूणात ‘थाट’ ही संकल्पना मुख्यत्वे ‘थिअरॉटिकल’ असल्याने पं. विष्णु नारायण भातखंडेंनी ती जास्त सोपी करत थाटसंख्या दहावर आणली. आता वरती उल्लेखिलेले रागांचे थाट वेगवेगळे कसे हे पाहायचे तर पटकन दहा थाट म्हणजे कोणते स्वरसमूह आहेत हे पाहून घेऊ म्हणजे सगळेच सोपे होऊन जाईल. स्वर लिहीत असताना टायपिंगच्या मर्यादेमुळे प्रचलित नोटेशन सिस्टिम्सनुसार कोमल-तीव्र सुरांच्या खुणा करणे शक्य होत नाहीये. फक्त ह्या लेखापुरती सोय म्हणून असे करूया, ज्या स्वराभोवती कंस असेल तो कोमल व ‘म’च्या बाबतीत तीव्र समजावा. शुद्ध स्वरासाठी काहीच चिन्ह नाही.

१) बिलावल थाट – सा, रे, ग, म, प, ध, नि

२) खमाज थाट – सा, रे, ग, म, प, ध, (नि)

३) काफी थाट – सा, रे, (ग), म, प, ध, (नि)

४) आसावरी थाट – सा, रे, (ग), म, प, (ध), (नि)

५) भैरवी थाट – सा, (रे), (ग), म, प, (ध), (नि)

६) भैरव थाट – सा, (रे), ग, म, प, (ध), नि

७) कल्याण थाट – सा, रे, ग, (म), प, ध, नि

८) मारवा थाट – सा, (रे), ग, (म), प, ध, नि

९) पूर्वी थाट – सा, (रे), ग, (म), प, (ध), नि

१०) तोडी थाट – सा, (रे), (ग), (म), प, (ध), नि

वरचे दहा स्वरसमूह नीट पाहिले कि लक्षात येईल कि भूप हा कल्याण थाटामधील मधील म आणि नि हे दोन स्वर वगळून(वर्ज्य करून) तयार झाला आहे.

देशकार हा बिलावल थाटातील म आणि नि हे दोन स्वर वगळून तयार झाला आहे.

आता भूपाचा थाट कल्याणच का व देशकाराचा बिलावलच का(कल्याण का नाही) हे समजून घेण्यासाठी रागस्वरूपातील फरकाचा सूक्ष्म अभ्यास करणे आवश्यक आहे.

बिभास हा राग भैरव थाटातील म आणि नि हे स्वर वगळून तयार झाला आहे आणि शुद्ध धैवताचा बिभास हा मारवा थाटातून म व नि हे स्वर वगळून तयार झाला आहे.

थोडक्यात ‘इनग्रेडियन्ट्स’च्या सेटमधील एखादा किंवा एकाहून जास्त पदार्थ बदलले तर तयार होणाऱ्या रेसिपीचा स्वादही त्यानुसार बदलेल. त्याचप्रकारे थाटानुसार(वापरल्या गेलेल्या स्वर-समूहानुसार) रागाची प्रकृती बदलत जाते.

गीतरामायणातील ‘चला राघवा चला’ हे गीतही ह्याच रागावर आधारित! ‘सांझ ढले गगन तले’आणि ‘नीलम के नभ छाई’ ही ‘उत्सव’ ह्या एकाच हिंदी चित्रपटातली दोन्ही गीतं रे व ध दोन्ही कोमल असणाऱ्या बिभासावर बेतलेली आहेत.  खरंतर, रागशास्त्रानुसार बिभास गाण्याची वेळ सकाळची आहे, परंतू ‘सांझ ढले’मधेही त्याचं असणं मनोहर वाटतं.

आणखी एक गोष्ट म्हणजे रे, ध कोमल असलेल्या बिभासाचेच आरोह-अवरोह असलेला ‘रेवा’ नावाचा राग हा संध्याकाळी गायला जातो. अगदी भूप-देशकाराप्रमाणेच वादी-संवादीमधे असलेला फरक व त्यानुसार बदललेले रागाचे चलन हाच फरक बिभास व रेवा ह्या दोन रागांमधे आहे. ‘बिभास’ चे वादी-संवादी अनुक्रमे ध आणि ग असून तो उत्तरांगप्रधान राग आहे. तर बरोबर सप्तकाच्या पूर्वांगातला ‘ग’ हा स्वर वादी असल्याने ‘रेवा’ हा पूर्वांगप्रधान राग आहे. बिभास भैरव थाटातला तर रेवा पूर्वी थाटातला!

मारवा थाटातल्या शुद्ध धैवताच्या बिभासाचा विचार करताना मला पटकन एक सुप्रसिद्ध नाट्यपद आठवालं संत कान्होपात्रा नाटकातलं ‘जोहार मायबाप जोहार’! ह्यातील पहिल्या व शेवटच्या दोन-दोन ओळी बिभासातल्या आणि मधल्या दोन ओळींमधे मात्र इतर स्वरांचा वापर झाला आहे. दुसरे एक पूर्वी रेडिओवर लागणारे सर्वांनीच ऐकले असेल असे भक्तिगीत ‘धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया’ ही शुद्ध धैवताच्या बिभासावर बेतलेलं आहे.

सहज नमूद करावेसे वाटले म्हणून लिहितेय, आणखी एक पूर्वी थाटातला बिभास सुद्धा आहे. त्याचे आरोह-अवरोह मात्र वरती आपण माहीत करून घेतलेल्या दोन्ही बिभासांहून पूर्ण वेगळे आहेत. मात्र तो अप्रचलितच म्हणायला हरकत नाही.

आता एक मजेदार गोष्ट पाहूया… ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ हे गीत भूपाची आठवण करून देतं तरीही पूर्ण भूपातलं नाही. कारण पहिल्या दोन्ही कडव्यांतल्या दुसऱ्या ओळीत पं. जितेंद्र अभिषेकींनी ओळीच्या शेवटी कोमल रिषभाचा खुबीने वापर केला आहे. त्यामुळे भूपात रमलेल्या श्रोत्यांना एक सुखद धक्का मिळतो. ह्या चमत्कृतीमुळे त्या ओळीसोबत शुद्ध धैवताच्या बिभासाच्या अंगाने विस्तार करता येतो आणि फक्त एकच स्वर बदलून परत तिसऱ्या ओळीत भूपावर येणे गाणाऱ्यालाही फार कठीण जात नाही. मात्र ही खुबीदार स्वरयोजना पं. अभिषेकीबुवांनी रागसंगीताच्या ज्ञानाच्या आधारेच केली असणार हे निश्चित आणि त्या ज्ञानामुळेच गाताना त्यात वेगळी ‘रंगत’ आणण्याची किमया ते साधू शकत होते! आज मुद्दाम तो अभंग ऐकून पाहावा आणि पहिल्या दोन कडव्यांच्या दुसऱ्या ओळीच्या शेवटी एकदम काही वेगळेपण ‘जाणवतंय’ का हे जरूर शोधावं! अशाचप्रकारे जाणीवपूर्वक कान देताना, संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले नसेल तरीही आपल्याला रागांचे वेगळेपण ‘जाणवायला’ लागेल ह्यात शंका नाही!

 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत  3 – भीमपलासी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  3 – भीमपलासी ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

“मेल न हर प्रिय चतुर मिलावत

रागनि भीमपलासि कहावत।

आरोहनमे रि ध न लगावत

सुर वादी मध्यमको बनावत

समय तृतीय दिन प्रहर कहावत ।।”

भीमपलासि या रागाचे थोडक्यांत वर्णन करणारे हे गीत. शास्रीय संगितात अशा गीतांना लक्षणगीत अशी पारंपारिक संज्ञा आहे.

मागील लेखांत काफी थाटांतील काफी या जनक रागासंबंधी विवेचन केल्यानंतर त्याच थाटांतून उत्पन्न झालेल्या भीमपलासि या रागाविषयी काही सांगावेसे वाटते.

शास्राःनुसार काफी थाटाचे  सा रे ग(कोमल) म प ध नि(कोमल) असे स्वर असतात, त्यामुळे भीमपलासि राग कोमल गंधार व निषाद घेऊनच सादर करायचा असतो. सहाजिकच अनभिज्ञ व्यक्तीस प्रश्न पडेल असे असतांना काफी आणि भीमपलासि हे दोन राग भिन्न कसे? त्याचे उत्तर असे की वर लक्षणगीतांत सांगितल्याप्रमाणे भीमपलासीच्या आरोहांत रिषभ व धैवत वर्ज्य आहेत. म्हणजे

नि(मंद्र कोमल) सा ग(कोमल) म प नि(कोमल)सां ~ आरोह

सां नि(कोमल) ध प म ग(कोमल) रे सा ~ अवरोह.

याप्रमाणे आरोहांत पांच व अवरोहांत सातही स्वर असल्यामुळे या रागाची जाति ओडव संपूर्ण आहे. मानव निर्मित जातींप्रमाणेच शास्रकारांनी स्वरांच्या संख्येनुसार रागांच्या जाति ठरविल्या आहेत. पांच स्वरांचा राग ओडव, सहा स्वरांचा षाडव आणि सात स्वरांचा संपूर्ण.

वादी मध्यम आणि संवादी षडज.पंचम हा स्वर ह्या रागाचे बलस्थान आहे. हा राग सादर करतांना कलावंत ह्या तीन स्वरांभोवती करामत करून आपले नैपुण्य रसिकांपुढे प्रदर्शित करीत असतो. वानगी दाखल हे काही स्वरसमूह पहावेत.

प(मंद्र)नि(कोमल)सा~ प(मंद्र)नि(कोमल) सा ग(कोमल) रे सा~

नि(मंद्र कोमल)सा ग(कोमल) म प~~

ग(कोमल) म प नि(कोमल) ध प~~

ध म प ग(कोमल) म ग रे सा~~

अतिशय विस्ताराने पेश करण्यासारखा हा राग असल्यामुळे बडा ख्याल, छोटा ख्याल,अशा प्रकारे मैफीलीत हा राग प्रस्तूत केला जातो.

अब तो बडी बेर भई

वारि बेगुमान न करिये सजनी साहेब को तो डरिये या विलंबित लयीतील पारंपारिक बंदिशी आजही प्रचलित आहेत. तसेच “गोरे मुखसो मोरे मन भाई, बिरजमे धूम मचायो शाम, जा जा रे अपने मंदरवा या मध्य लयीतील बंदिशी खूपच गोड वाटतात.

रागदारी संगीतात आज आपल्या माहितीप्रमाणे बंदिशींचे दोन भाग असतात. पुर्वार्ध म्हणजे स्थाई आणि उत्तरार्ध म्हणजे अंतरा! परंतु १७/१८व्या शतकांत बंदिशींचे चार भागांत सादरीकरण होत असे. १) स्थाई २) अंतरा ३) संचारी ४) आभोग. या भीमपलासि रागांतही अशा प्रकारच्या बर्‍याच बंदिशी आढळतात. त्या प्रामुख्याने चौताल, आडाचौताल, धमार या तालांत बंदिस्त असतात.

रागदारी बरोबरच भजन, अभंग ह्या गीतप्रकारांसाठी हा राग विशेष उचित वाटतो.

माणिक वर्माजींचे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, विजय पताका श्रीरामांची झळकते अंबरी ही प्रसिद्ध भक्तीगीते भीमपलास रागांतीलच आहेत.संत कान्होपात्रेचा अभंग अवघाची संसार सुखाचा करीन हाही भीमपलासच!

भक्तीरसाचा परिपोष करणारा असा हा राग अतिशय सुमधूर आहे. संगीतांतील विविध घराणी उदाहरणार्थ किशोरीबाईंचे जयपूर अत्री घराणे, भिमसेनजींचे किराणा, जसराजचींचे मेवाती आपापल्या नियमांनुसार जेव्हा राग प्रदर्शन करतात तेव्हा सुरांची क्षमता रसिकांच्या लक्षांत येते. कसेही असले तरी संगीत ही एक दैवी शक्ति आहे आणि त्याचा योग्य तो परिणाम मानवी मनावर झाल्याशिवाय रहात नाही.

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – ३) – राग देशकार ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – ३) – राग देशकार ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

दीप्तिमान देशकार

एकाच आरोह-अवरोहातून अनेक  राग निर्माण होताना जी संकल्पना ‘की रोल’ निभावते ती म्हणजे रागाचा वादी व संवादी स्वर! तर आज, रागाचा वादी स्वर व संवादी स्वर म्हणजे काय? हे समजून घेण्यापासूनच सुरुवात करूया. रागात सर्वात जास्त महत्व ज्या स्वराला दिलं जातं, सर्वात जास्त प्रमाणात सातत्यानं जो स्वर रागविस्तारात वापरला जातो त्याला त्या रागाचा वादी स्वर म्हणतात आणि वादी स्वराच्या खालोखाल जो स्वर महत्वाचा असतो त्याला संवादी स्वर असं म्हणतात.

थोडक्यात रागाच्या राज्यातला राजा म्हणजे वादी स्वर आणि प्रधान म्हणजे संवादी स्वर! आता कोणत्याही दोन व्यक्तींनी स्वत:ला राजा आणि प्रधान म्हणवून घेतल्यानं म्हणजे फक्त आम्ही महत्वाचे आहोत व बाकी कुणीच नाही असं म्हटल्यानं राज्यकारभार चालू शकेल का? तर नाही! इतर पदाधिकारी सकृतदर्शनी थोडीशी कमी महत्वाची का होईना पण आपापली जबाबदारी नीट सांभाळत असतील तरच राज्य सुरळीत चालेल, प्रजा सुखात नांदेल. त्याचप्रमाणे रागाच्या इतर स्वरांच्या पार्श्वभूमीवरच, त्यांच्यासोबत एका धाग्यात गुंफले जात असतानाच खुलून येणारं ठराविक वादी-संवादी स्वरांचं प्रामुख्य एक राग निर्माण करतं.

वादी-संवादी स्वरांशिवाय रागातील इतर स्वरांपैकी काही स्वरही भरपूर प्रमाणात वापरले जातात, तर काही मध्यम प्रमाणात आणि काही अत्यल्प प्रमाणात! त्या-त्या रागस्वरूपानुसार हे प्रमाण ठरतं. विशेष म्हणजे मुळातच निर्गुण-निराकार असलेल्या सुराला मोजमापांची परिमाणं कशी लावणार!? त्यामुळं प्रत्येक रागातील स्वरांच्या वापराचं हे कमी-जास्त प्रमाण आणि वापराची पद्धती ही गुरूसमोर बसून त्यांनी आपल्याला शिकवताना, रागस्वरूप समजावत गायलेला/वाजवलेला राग ऐकून आणि समजून-उमजून घेऊनच जाणून घेता येते. कागदोपत्री अशा बारकाव्यांची कितीही नोंद करून ठेवली तरी प्रत्यक्ष गुरूमुखातून ऐकल्याशिवाय ह्या गोष्टींचे अर्थ अजिबात कळत नाहीत. म्हणून तर आपल्या रागसंगीताला गुरूमुखी विद्या म्हटलं गेलं आहे.

मागच्या लेखात उल्लेखिलेल्या भूपाच्या संदर्भानेच आजचा विषय पुढे जाणार आहे. आता आपण भूपाविषयी बोलतोय आणि त्यात पाच सूर आहेत तर त्यानुसार कल्पना करूया. समजा, अगदी एकसारखं काढलेलं निसर्गचित्र काही जणांना रंगवायला दिलं. त्यासाठी पिवळा, निळा, लाल, हिरवा, जांभळा असे पाच एकसारखे रंगही त्यांना दिले. मात्र कुठे, कोणता रंग, किती प्रमाणात व कोणत्या पद्धतीनं वापरायचा ह्याचं स्वातंत्र्य रंगवणाऱ्याला दिलं. अर्थातच रंगवून आलेल्या चित्रांपैकी एखाद्या चित्रात पिवळ्या आणि हिरव्या रंगाचा जास्त वापर असेल, एखाद्या चित्रात निळा आणि पिवळ्याचा प्रभाव असेल, एखाद्यात लाल आणि हिरवा ठळक असेल तर एखाद्यात पिवळा आणि जांभळा उठून दिसत असेल आणि त्याशिवायच्या इतर तीन रंगांच्या वापराच्या कमी-जास्त प्रमाणातही फरक असेल.

आता एकच चित्र, एकसारख्या पाच रंगात रंगवलेलं असूनही रंगसंगतीतलं रंगांचं कमी-जास्त प्रमाण प्रत्येक चित्राला वेगळं रूप देईल, प्रत्येक चित्राचा `इफेक्ट’ वेगळा असेल, प्रत्येक चित्र पाहाताना बघणाऱ्याच्या मनात उमटणारे भाव वेगळे असतील कारण एकूण रंगसंगतीमुळे चित्राचा होणारा अंतिम परिणाम वेगळा असेल.  हेच उदाहरण अगदी एकसारखेच आरोह-अवरोह असणारे वेगळे राग कसे निर्माण झाले, ही गोष्ट समजून घेण्यासाठी उपयोगी पडेल. रंगांची संख्या सहा किंवा सात केली की हीच गोष्ट आरोह-अवरोहात सहा किंवा सात सूर असतील तेव्हांही लागू पडेल.

वरच्या सर्व परिच्छेदांतील संदर्भ जोडून पाहिले असता एकच आरोह-अवरोह असणारे दोन किंवा त्याहून जास्तही राग कसे असू शकतात ह्याबाबत ढोबळमानाने कल्पना यायला हरकत नाही. आता भूपाचा‘च’ आरोह-अवरोह असणारे आणखी दोन राग म्हणजे एक प्रचलित असलेला ‘देशकार’ आणि दुसरा अप्रचलित ‘जैतकल्याण’! त्यापैकी आज आपण देशकाराविषयी जाणून घेऊया. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे `ग’ आणि `ध’ हे भूपाचे अनुक्रमे वादी-संवादी स्वर अगदी उलट होऊन देशकारात येतात, म्हणजेच देशकारात ‘ध’ हा वादी आणि ‘ग’ हा संवादी होतो. अर्थातच या दोन्ही स्वररंगांच्या वापराचं प्रमाण तर बदलतंच शिवाय इतर स्वरांच्या वापरातही फरक पडतो आणि दोन्ही रागस्वरूपं पूर्ण भिन्न होऊन जातात. तेच रेखाटन(राग उभा करण्याचा ढाचा) त्याच रंगांच्या(तेच आरोह-अवरोह) कमी-जास्त प्रमाणातील ( वादी-संवादी व इतरही स्वरांचं प्रमाणमहत्व) वापरामुळं बघणाऱ्याच्या मनात वेगळे भाव उमटवतं (ऐकणाऱ्याच्या मनात वेगळे भाव निर्माण करतं)…. एकूणात वेगळा परिणाम साधतं!

भूप आणि देशकाराचा विचार करताना वादी-संवादी तर बदलतातच, शिवाय रिषभाचं प्रमाण हे भूपात व्यवस्थित थांब्याचं आहे तर देशकारात अल्प आहे. भूपाची प्रकृती पुन्हापुन्हा गंधाराकडे वळणारी(अधोगामी) आणि देशकाराची प्रकृती सातत्याने धैवताचा ध्यास घेणारी(उर्धवगामी) आहे. म्हणूनच भूप पूर्वांगप्रधान तर देशकार उत्तरांगप्रधान आहे. दोन्ही रागांचा थाटही वेगळा आहे, भूप ‘कल्याण’ थाटातील तर देशकार ‘बिलावल’ थाटातील राग आहे. ह्या दोन्ही रागांची गाण्याची वेळही वेगळी… भूप रात्रीचा पहिल्या प्रहरातला आणि देशकार दिवसाच्या दुसऱ्या प्रहरात गायला जाणारा! ह्या सर्व संज्ञांचा व संकल्पनांचा अर्थ पुढच्या लेखांमधे हळूहळू येणार आहेच. शब्दमर्यादेमुळे आणि विषयाच्या भव्यतेमुळे सगळ्याच गोष्टी एका लेखात उलगडणे शक्य नाही.

ह्या दोन्ही रागांचा विचार करताना मला असं जाणवतं कि सूर्य उगवण्यापूर्वी आणि मावळण्यापूर्वी अनेक रंग आभाळभर पसरलेले असतात. मात्र उगवतीच्या रंगांमधे उषेची चाहूल असते, त्यावेळच्या सूर्यकिरणांच्या प्रखरतेचा प्रभाव दिवस/कामकाज जोमानं सुरू होणार असल्याची चाहूल देतो, आपल्यापर्यंत गतिमान वलयं पोहोचवतो जेणेकरून आपणही ती गतिमानता आत भरून घेऊन कामकाजाला लागतो. याउलट मावळतीच्या रंगामधे निशेची चाहूल असते. अस्ताचलाला चाललेल्या सूर्यकिरणांतली सौम्यता आपल्याला विसाव्याची चाहूल देते, कामकाज थांबवत शांततेत रमण्याचे वेध देते. अगदी त्याचप्रकारे रात्री गायला जाणारा भूप मला शांत प्रकृतीचा वाटतो आणि त्या तुलनेत देशकारात एक गतिमान सळसळ जाणवते.

रागसंगीताशिवाय विचार करताना देशकाराची आठवण करून देणारी दोन नाट्यपदं पटकन माझ्या मनात आली, जी आपण सर्वांनीच निश्चितच बऱ्याचदा ऐकली असणार… संगीत मंदारमाला नाटकातील ‘जयोस्तुते हे उषादेवते’ आणि संगीत सौभद्र मधील ‘प्रिये पहा’! पं. जितेंद्र अभिषेकींची ‘माझे जीवन गाणे’ ही अप्रतिम रचनाही आठवली.  मात्र आता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि अशा एकसारखे स्वर वापरले गेलेल्या रागांमधे उपशास्त्रीय किंवा सुगम संगीतातील नेमकी एखादी रचना सांगणे कठीण असते. वरती पटकन आठवलेल्या रचना ह्या सुरवातीलाच ‘ध’चा उठाव घेऊन आलेल्या म्हणून `देशकार’चा ‘फील’ देणाऱ्या म्हणता येतील. पण प्रत्येकवेळी रागानुसार स्वरांच्या वापराचं कमी-जास्त प्रमाण नेमकेपणी सांभाळणं सुगम संगीतात घडेलच असं नाही, ती त्या गानप्रकाराची आवश्यकताही नाही आणि तिथं स्वरांचे ठहराव, अल्प-बहुप्रमाणत्व सांभाळण्याएवढं अवकाश (स्पेस) मिळणंही शक्य नसतं. क्वचितच ठराविक रागांबरहुकूम बांधल्या गेलेल्या अशा उपशास्त्रीय किंवा सुगम रचना आढळतील.

एक जरूर सांगावंसं वाटतं, भूप आणि देशकार एका पाठोपाठ एक ऐकून पाहिले (कोणत्याही एकाच कलाकाराचे दोन्ही राग ऐकले तर कळायला आणखी उत्तम!) तर दोन्हीवेळी काही वेगळी जाणीव होते का, हे जिज्ञासू श्रोत्यांना समजू शकेल. एकाग्रतेने ऐकताना तशी काही वेगळी अनुभूती आली तर मलाही जरूर कळवावे, जाणून घ्यायला नक्की आवडेल व आनंदही वाटेल!

©  सुश्री आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत – 2 – राग~काफी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

परिचयः

गेल्या आठ वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्य.

शिक्षणः एम्.ए. एलफिन्स्टन काॅलेज, मुंबई युनिव्हर्सिटी.

संगीत विशारद~ अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय.

गद्य/पद्य लेखनाची आवड!

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  2 – राग~काफी ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

मागील लेखांत यमन रागाविषयी लिहिल्यानंतर आज काफी रागाचा परिचय करावा असे मनांत आहे.

कल्पद्रुमांकूर या पुस्तकांत चार ओळीत काफी रागाचे वर्णन आहे.

“काफी रागो भुवनविदितः कोमलाभ्यां गनिभ्यां।

मन्यैस्तीव्रैः परममधुरः पंचमो वादीरूपः।।

संवादी स्यात् स इह कतिचिद्वादिनं गं वदंति।

सांद्रस्निग्धं सरसितिर्भिर्गीयतेsसौ निशायाम।।

अर्थात सर्वांना माहीत असलेला हा राग अतिशय मधूर आहे. गंधार व निषाद कोमल आहेत. वादी पंचम,संवादी षड् गायन समय मध्यरात्र जाति संपूर्ण

आरोहः सा रे ग(कोमल)म प ध नि(कोमल) सां

अवरोहः सां नि(कोमल) ध प म ग(कोमल) रे सा

सर्व रागांना सामावून घेणार्‍या विशाल र्‍hridayii

थाटांतील हा जनक राग! ” अतहि सुहावन लागत निसदिन” असे या रागिणीचे पारंपारिक लक्षणगीतांतून वर्णन केले आहे.एक अत्यंत श्रुतिमधूर रागिणी म्हणून ती रसिकांच्या पसंतीस उतरली आहे कोमल गंधार व निषाद आणि शेष स्वर शुद्ध असलेली ही रागिणी थाटांतील स्वरांचे पालन करते,परंतु कंठाच्या सोयीसाठी याच्या उत्तरार्धात म प ध नि सां असा कोमल निषाद लावणे कठीण जाते म्हणून शुद्ध निषाद लावण्याची मुभा आहे, तसेच पुर्वार्धात क्वचित शुद्ध गंधार घेण्यास परवानगी आहे.मधुनच असा प्रयोग कलात्मकही वाटतो.मात्र वारंवार हा प्रयोग अमान्य आहे,त्यामुळे रागाच्या शुद्धतेला बाधा येईल व रसहानीही होईल.

रागाचे स्वरूप सा सा रे रे ग ग(कोमल) म म प——, रेप मप धप, धनि(कोमल) धप रेप मप मग(कोमल) रेसा अशा स्वर समूहाने स्पष्ट होते.

ख्याल गायनासाठी हा राग प्रचलित नाही.ठुमरी,दादरा,टप्पा,होरी वगैरे उपशास्रीय गायन प्रकारांत हा प्रामुख्याने वावरतांना दिसतो.याचे कारण ह्या रागाचे अंग श्रृंगार रसपरिपोषक आहे. मध्य लयीत बांधलेल्या पारंपारिक बंदिशी पाहिल्या असता असे दिसून येते की त्या राधा कृष्ण, रास लीला, कृष्णाचे गोपींना छेडणे याचेच वर्णन करणार्‍या आहेत.जसे “काहे छेडो मोहे हो शाम” किंवा “जिन डारो रंग मानो गिरिधारी मोरी बात”, “छांडो छांडो छैला मोरी बैंया दुखत मोरी नरम कल्हाई वगैरे.

ठुमरी दादरा प्रकारातही “बतिया काहे को बनाई नटखट कुवर कन्हाई” “मोहे मत मारो शाम भरके रंग तुम पिचकारी” अशीच काव्यरचना असते.

काफी रागावर आधारीत “एक लडकीको देखा तो ऐसा लगा”~1942 लव्ह स्टोरी

“हर घडी बदल रही है धूप जिन्दगी”~कल हो ना हो ही चित्रपटांतील गाणी सर्व श्रुत आहेत.

याठिकाणी असे सांगावेसे वाटते की कलावंताला या शास्राचे नुसते संपूर्ण ज्ञान असणे पुरेसे नाही.कलाविष्कार करतांना योग्य ती रसोत्पत्ती झाली तरच रसिकांचे मन जिंकतां येते.नाट्यशास्रानुसार रागाच्या अभिव्यक्तीचा विचार होणे अत्यावश्यक आहे. नाट्यांतील प्रसंग दृष्य स्वरूपाचे असतात.त्याचा योग्य तो परिणाम साधण्यासाठी नेपथ्य, पात्र,वाच्य या गोष्टींची योजना केली असते. साहित्यांत दृष्याचे वर्णन असते. स्वरभाषेत या तत्वांची फक्त जाणीव असते.स्वरभाषेतून श्रोते,रसिकजन आंतरिकरित्या योग्य तो परिणाम अनुभवत असतात. कलाकाराने रागाचे सादरीकरण करतांना त्या त्या रागांच्या भावाला अपेक्षित अनुकूल सांगितिक वातावरण निर्मिती केली नाही तर मैफीलीत रंग भरणार नाही. जो कलावंत रागभावाच्या पूर्ण स्वरूपाची जाण श्रोत्यांच्या मनांत संक्रमित करतो तोच खरा यशस्वी कलाकार!

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग-२) –रागनृपती भूप ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – २) –रागनृपती भूप ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

मागच्या रविवारचा पहिला लेख वाचल्यावर अनेक वाचकांनी आवर्जून प्रतिक्रिया कळवल्या आणि काहींनी प्रश्नही विचारले. त्यापैकी एक प्रश्न असा होता ‘एकूण स्वर सात असतात की बारा?’ तर आपण शुद्ध, कोमल, तीव्र स्वरांविषयी जाणून घेताना ह्या प्रश्नाचंही नेमकं उत्तर मिळेल. खरंतर ‘सूर अनंत असतात’ असं पं. कुमार गंधर्वांसारख्या गानतपस्व्याकडून एका मुलाखतीत ऐकल्याचं स्मरतं! त्यांच्या सूक्ष्म दृष्टिकोनातून नाही पण आपल्या सामान्य दृष्टिकोनातून तरी ह्याचाही थोडासा उलगडा होतो का पाहूया! मुळात ‘सा’ हा सप्तकाचा आधारस्वर म्हणता येईल. आधारस्वर म्हणजे काय?… तर सोप्या शब्दांत असं म्हणूया ‘नंबर लाईन वरचा झिरो’! आपण कुठेही संख्यारेषा काढत असताना आपले परिमाण(युनिट) काहीही असेल तरी शून्याचा बिंदू ठरल्यावरच त्याच्या आगेमागे आपल्याला संख्यांचे मार्किंग करता येते. तसंच एकदा ‘सा’ ठरला कि त्या स्थानाच्या अनुषंगाने मग इतर स्वर सहजी गाता/वाजवता येतात कारण त्यांची ‘सा’पासूनची अंतरं ठरलेली आहेत.

आपण फूटपट्टी डोळ्यांसमोर आणूया आणि २ इंच हे परिमाण(युनिट) घेऊ. आता शून्यावर ‘सा’(०) आहे असं मानलं तर शुद्ध रे (२), शुद्ध ग (४), शुद्ध म (५) प(७), शुद्ध ध(९), शुद्ध नि (११) आणि त्यापुढं वरचा सा(१२) अशी स्वरांची स्थानं ठरलेली आहेत. ही अशीच का? इतक्या अंतरावरच का? ह्याचं उत्तर ‘स्वर-संवाद’ हे आहे. ‘सा’चा ज्या-ज्या स्थानांवरील सुरांशी चांगला संवाद घडतोय असं वाटलं त्या-त्या स्थानाला सप्तकात मुख्य स्वराचं स्थान दिलं गेलं. आणखी सोपं म्हणजे ‘सा’ची ज्यांच्याशी सुंदर मैत्री झाली त्या सुरांना त्याच्या अंतरंगात म्हणजे सप्तकात स्थान मिळालं. तर असे अगदी घनिष्ट मैत्री होऊ शकणारे (फास्ट फ्रेंडशिपवाले) सहा मित्र ‘सा’ला सापडले आणि त्यापैकी पाच जणांच्या फास्ट फ्रेंडशी ‘सा’चीही चांगली मैत्री झाली. हे पाच जण म्हणजे ‘सा’ आणि शुद्ध रे च्या बरोबर मध्यबिंदूवर असणारा ‘कोमल रे (१)’,  शुद्ध रे आणि शुद्ध ग च्या मध्यबिंदूवरचा ‘कोमल ग(३)’, शुद्ध म आणि ‘प’च्या मध्यबिंदूवरचा ‘तीव्र म(६)’, ‘प’ आणि ‘शुद्ध ध’च्या मध्यबिंदूवरचा ‘कोमल ध(८)’ आणि शुद्ध ध आणि शुद्ध नि च्या मध्यबिंदूवरचा ‘कोमल नि (१०)’! अशाप्रकारे आपल्याला बारा स्वर(शून्य ते अकरा) आहेत असं म्हणता येईल… सात मुख्य स्वर आणि त्यापैकी पाचांचे प्रत्येकी एकेक उपस्वर, ज्याला सांगितिक भाषेत विकृत स्वर असे म्हटले जाते!

एकूण पाहाता असं लक्षात येईल कि ‘सा’ आणि ‘प’ ह्या दोन स्वरांची एकच फिक्स्ड जागा आहे, त्यांचं कोणतंही व्हेरिएशन नाही, म्हणूनच त्यांना ‘अचल’ स्वर म्हटलं जातं. त्यामुळे त्यांना शुद्ध/कोमल/तीव्र असं काहीच संबोधलं जात नाही. उरलेल्या पाचही स्वरांचं प्रत्येकी एकेक व्हेरिएशन आहे. त्यापैकी जे व्हेरिएशन त्या-त्या शुद्ध स्वरापासून अर्धं युनिट खाली आहे त्याला ‘कोमल’ म्हटलं गेलं आणि एक व्हेरिएशन शुद्ध स्वरापासून अर्ध युनिट वरती आहे/ चढं आहे त्याला ‘तीव्र’ असं म्हटलं गेलं आहे.

तर ओळीनं स्वर असे येतील…. सा(०) कोमल रे(१) शुद्ध रे(२) कोमल ग(३) शुद्ध ग(४) शुद्ध म(५) तीव्र म(६) प(७) कोमल ध(८) शुद्ध ध(९) कोमल नि(१०) शुद्ध नि(११) आणि वरचा सा(१२). ह्याच स्थानावर सप्तक पूर्ण का होतं? तर साऊंड फ़्रिक्वेन्सीची संख्या इथं बरोबर दुप्पट होते आणि ती ऐकताना असं जाणवतं कि हा सूर मूळ ‘सा’ सारखाच ऐकू येतो आहे फक्त वेगळ्या, चढ्या स्थानावरून! अशा प्रकारे एका सप्तकात एकूण मुख्य सात स्वर आणि त्यापैकी पाच स्वरांचेच प्रत्येकी एकप्रमाणे पाच विकृत स्वर, असे एकूण बारा स्वर अंतर्भूत असतात असं ढोबळमानाने म्हणता येईल.

आता महत्वाची गोष्ट म्हणजे, हा सप्तकातील स्वरांतरांचा साचा असाच कायम राहातो आणि निसर्गदत्त आवाजानुसार गाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पट्टी (सा/pitch) वेगळी असू शकते.

यापुढं, नंबर लाईनचा विचार करता प्रत्येक दोन संख्यांच्या मधेही कित्येक बारीक रेषा असतातच. त्याचप्रमाणे प्रत्येक दोन स्वरांच्या मधेही अनेक फ्रिक्वेन्सीज असणारच. फक्त त्या प्रत्येक फ्रिक्वेन्सीचा ‘सा’शी अगदी सुखद संवाद होऊ शकत नाही, अतिसूक्ष्म फ्रिक्वेन्सीज तर आपल्या ऐकण्याच्या क्षमतेतच नसतात… पण म्हणून त्या अस्तित्वातच नाहीत असं मात्र म्हणता येणार नाही. जसं पॉईंट(दशांश चिन्ह)नंतर बरेच नॉट (म्हणजे शून्यं) आणि त्यापुढं एखादी संख्या आली तर तिचं वजन आपल्याला वजनकाट्यावर दिसणार नाही, हाताला जाणावणार नाही, पण म्हणून तो सूक्ष्म वजनाचा ‘अणू’ अस्तित्वात नाही असं नाही म्हणता येत. इथं कुमारजींच्या वाक्याचा कदाचित थोडाफार अर्थ लागू शकतो.

संगीत शिकायला सुरू करताना बहुतांशी ज्या रागाने सुरुवात केली जाते त्या ‘भूप’ रागाविषयी आज थोडंसं जाणून घेऊ. शिक्षणाच्या सुरुवातीच्या काळातला राग म्हणून ह्याला प्राथमिक राग असं संबोधणं मात्र संयुक्तिक होणार नाही. कित्येक श्रेष्ठ कलाकारांनी आयुष्यभर रागसंगीताचा अभ्यास केल्यानंतर बऱ्याच पुढच्या टप्प्यावर असं विधान केलेलं आहे कि, ‘असं वाटतं अजून भूप समजलाच नाहीये.’ हा अर्थातच त्यांचा विनय आ्सतो, पण ह्याचा शब्दश: अर्थ न घेता ‘भूपाचा अभ्यास ‘नव्यानं’ करायला हवा आहे’ हे कोणत्याही कलाकाराचं वाटणं अस्थायी म्हणता येणार नाही. शुद्धच असल्यानं पटकन ओळखीचे वाटणारे ‘सा रे ग प ध सां’ हे सूर भूपाच्या आरोहात आणि ‘सां ध प ग रे सा’ हे अवरोहात येतात म्हणून वाटताना राग सोपा वाटतो. मात्र एखाद्याची संगीतसाधना जितकी सखोल होत जाते तितका त्याला एकच राग आणखीआणखी विशाल भासू लागतो. ह्या रागाच्या तर नावातच ‘राजेपण’ आहे! म्हणून रागांचा राजा, रागनृपती तो भूप! किशोरीताई आमोणकरांचं ‘भूपातला गंधार हा स्वयंभू आहे’ हे चिंतनयुक्त विधान केवढं विस्मयचकित करणारं आहे! ताईंचीच भूपातली ‘सहेला रे आ मिल जावे’ ही बंदिश न ऐकलेला संगीतप्रेमी अस्तित्वातच नसेल.

भूप म्हटलं कि पटकन डोळ्यांसमोर येतात ‘ज्योती कलश छलके’ (भाभी की चूडियॉं), ‘सायोनारा सायोनारा’ (लव्ह इन टोकिओ), इन ऑंखो के मस्ती के(उमराव जान), दिल हूं हूं करे(रुदाली) अशी अनेक हिंदी चित्रपटगीतं आणि ‘स्वये श्रीराम प्रभू ऐकती’, ‘खेळ मांडियेला वाळवंटी’ ‘धुंद मधुमती रात रे’ ‘पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव’ अशी कित्येक मराठी मधुर गीतं आणि सकाळी रेडिओवर लागणाऱ्या ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा’ ‘ऊठ पंढरीच्या राया’ ‘उठा उठा हो सकळीक’ वगैरे बऱ्याचशा भूपाळ्या! मात्र गंमतीची गोष्ट अशी कि रागशास्त्रानुसार भूप हा रात्रीच्या पहिल्या प्रहरी गायला जाणारा राग आहे! अर्थात, बहुतांशी रचनांमधे प्रामुख्याने भूप दिसत असला तरी त्यात इतर सूरही वापरलेले आहेत. ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’ ही रचना किंवा ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ ही पं. जितेंद्र अभिषेकींची रचनाही भूपाची आठवण करून देणारी मात्र रागाशिवाय इतर स्वरही अंतर्भूत असलेली! ‘सुजन कसा मन चोरी’ हे संगीत स्वयंवर मधील नाट्यपद मात्र स्पष्ट भूपातलं, कारण त्याला भूपातल्या एका बंदिशीबरहुकूमच भास्करबुवा बखलेंनी स्वरसाज चढवला आहे. शोधायलाच गेलं तर अजून अनेक रचना सापडतील.

आता गंमत अशी आहे कि भूपाचेच आरोह अवरोह असणारा आणखीही एक राग आहे. पण त्याचे वादी-संवादी स्वर वेगळे असल्याने त्याचं रुपडं एकदमच वेगळं भासतं. भूपाचे वादी-संवादी स्वर हे ‘ग’ आणि ‘ध’ आहेत तर त्या रागाचे बरोबर उलट आहेत हा महत्वाचा फरक, दोन्हीचे थाटही वेगळे आहेत आणि अर्थातच फरकाच्या दॄष्टीने इतरही काही बारकावे आहेतच. वादी-संवादी स्वर हा काय प्रकार आहे? केवळ त्यांच्या बदलामुळं आरोह-अवरोह तेच असतानाही अख्खा वेगळा राग कसा निर्माण होऊ शकतो? हाच खरं तर आपल्या रागसंगीताचा आत्मा, वैशिष्ट्य आणि गर्भश्रीमंती आहे! या गोष्टींविषयी पुढच्या लेखात जाणून घेऊया.

©  सुश्री आसावरी केळकर-वाईकर

चेन्नई

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत – राग यमन ☆ सुश्री अरुणा मेल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत – राग यमन ☆ सुश्री अरुणा मेल्हेरकर ☆ 

संगीतापासून दूर रहाणारा अपवादात्मकच कोणी असू शकतो,कारण~~

 

सूर म्हणजे जिव्हाळा

सुख शांतीचा हिंदोळा

 

सुरांतच असते भक्ति

सूर देतात मनास शक्ति

 

सा सर्वांचा सोबती

रे कधी विरह कधी शांती

 

ग ने होतो भावनाविष्कार

म अति कर्ण मधूर

 

प असते विश्रान्ती

धने येते संगीतसागरास भरती

 

नि नाजूक कोमलांगी ललना

सप्तसूर देती आल्हादच जीवना

 

सुरांच्या या प्रकृतीवर हिंदुस्तानी /कर्नाटकी राग संगीत आधारलेले आहे.

सा रे ग म प ध नी ह्या एका सप्तकाच्या २२ श्रुति आहेत. साच्या ४, रेच्या ३, गच्या २, मच्या ४, पच्या ४,धच्या ३, निच्या २. अशा या २२ श्रुति.

हेच सुरांतील नाद होत. ह्या २२ नादांतून शुद्ध व विकृत अशी स्वर निर्मिती शास्रकारांनी केली आणि आजतागायत हे शास्र सर्वमान्य आहे.

अशारीतिने ७ शुद्ध आणि कोमल रे ग ध नि व तीव्र म हे ५ विकृत स्वर, अशा एकूण १२ स्वरांवर संपूर्ण जगतात संगीत विराजमान आहे.

वेदकालापासून संगीत हे शास्र मानलेले आहे. सामवेद हा संगीत विषयावरील वेद आहे. भरतमुनींनी त्यांच्या नाट्यशास्रांत संगीताविषयीचे नियम सांगितले आहेत. २०/२१ व्या शतकांत राग संगीत थोडे थोडे बदलत गेले असले तरी मुख्य पाया अढळच आहे. पं.कुमार गंधर्व, संगीत मार्तंड जसराजजी यांच्यासारख्या कलावंतांनी अनेक नवीन रागांची नीर्मिती केली असली तरी आजही संगीताच्या नवशिक्या विद्यार्थ्यांस यमन,भूप,भैरव काफी हेच पारंपारिक राग प्रथम शिकविले जातात.

या लेखमालेत एका रागाची ओळख करून द्यावयाची आहे म्हणून मी माझा आत्यंतिक आवडीचा प्रारंभिक राग यमनची निवड केली आहे.

यमन हा संपूर्ण राग आहे.म्हणजे या रागांत सा ते नि ह्या सातही स्वरांचा समावेश आहे. यांतील मध्यम(म) मात्र तीव्र आहे. म्हणून हा कल्याण थाटांतील राग.

सा रे ग म (तीव्र)प ध नी सां~आरोह

सां नी ध प म(तीव्र) ग रे सा~अवरोह

नि(मंद्र)रे ग रे सा, प,म(तीव्र) ग, रे, सा~पकड

म्हणजे रागाचे स्वरूप दाखविणारा स्वर समूह.

ग(गंधार),नि(निषाद) अनुक्रमे वादी व संवादी स्वर.

हा राग प्रामुख्याने रात्रीच्या प्रथम प्रहरी गायला/वाजविला जातो.

असे म्हणतात की हा राग चांगला घोटला गेल्यानंतर बाकीचे इतर राग शिकणे सोपे जाते.

येरी आली पियाबिन, तोरी रे बासुरिया, मोरी गगरी ना भरन दे, अवगुण न कीजिये गुनिसन

या पारंंपारिक बंदिशी आजही गायल्या जातात, त्या कर्णमधूरही वाटतात. गायक आपल्या कुवतीनुसार रागांत रंग भरत असतो व रागाचे नवनवे पैलू श्रोत्यांस उलगडून दाखवित असतो.

राग संगीताची हीच तर खासियत आहे.कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करतां त्याला आपले गानचातूर्य दाखवून रसिकांचे मन जिंकायचे असते.

नाट्यसंगीत हा राग संगीताशी निगडीत उपशास्रीय गायन प्रकार आहे. बाल गंधर्वांनी अजरामर केलेल्या नाट्यपदांची गोडी केवळ अवीट आहे. स्वयंवरातील नाथ हा माझा मोही खला, मानापमानांतील नयने लाजवित,कुलवधू नाटकांतील क्षण आला भाग्याचा,सौभद्रातील राधाधर मधुमिलिंद जयजय, किंवा अगदी अलिकडचे देवाघरचे ज्ञात कुणाला ही पदे यमन,यमन कल्याण रागांतीलच आहेत.

आपले सर्वांचे लाडके गायक/संगीत दिग्दर्शक कै.सुधीर फडके उर्फ बाबूजी यांची तर बहुतांशी गाणी यमन रागांत अथवा त्यावर आधारित आढळतात. समाधी साधन हा तुकारामाचा अभंग आणि का रे दुरावा हे भावगीत, दोन्ही यमन मध्येच परंतु संगीत रचना करतांना त्या त्या काव्यातील भावनाविष्कारानुसार बाबूजींनी स्वरसमूहांचे नियोजन केल्यामुळे एकाच रागातील दोन गाणी कानाला वेगळी वाटतात.

हे त्यांचे चातूर्य आहे. हीच सुरांची जादू आहे.यमनमधील एक तीव्र म ही सगळी करामत करतो.

या रागाचा अभ्यास करतांना असे लक्षांत येते की भक्ती आणि शांत रसाबरोबर श्रृंगार रसालाही हा राग पोषक आहे.

ज्यांना संगीताची जाण नाही परंतु खूप आवड आहे त्यांना हा लेख वाचून यमन राग ऐकतांना त्याचा अधिक आनंद मिळेल अशी आशा वाटते.

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत – भारतीय संगीतातील रागांवर आधारित ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

 

 ☆ सूर संगत ☆ सूर संगत – भारतीय संगीतातील रागांवर आधारित ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

(आज दस-यापासून आम्ही सूर संगत हे संगीतातील माहितीवर आधारित नवीन लेखमाला सादर. दर रविवारी एका रागाविषयी सुरेल माहिती क्रमश: सुरू करत आहोत. लेखिका सध्या चेन्नईस्थित असून ऑस्कर विजेते संगीतकार  ए. आर. रहमान ह्यांच्या KM College of Music & Technology मधे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या प्राध्यापिका आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक ठिकाणी शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम गायनाचे कार्यक्रम सादर करतात.)

श्री सरस्वत्यै नम:

शीर्षक लिहीत असताना मनात विचार आला कि सूरसंगत मधे ‘स’ला उकार ऱ्हस्व किंवा दीर्घ कसाही दिला तरी अर्थात काय फारसा फरक पडणार आहे!? सुर म्हणजे देव आणि सूर म्हणजे संगीतातला स्वर! खरं पाहू जाता संगीत हाच देवाशी जोडणारा शीघ्रगतीमार्ग मानलेला आहे. त्यामुळं भाषेतील व्याकरणदृष्ट्या दोन्हींत फरक असला तरी सुर आणि सूर एकच असं म्हटलं तरी हरकत नसावी!

आजचा योगायोग असा कि आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसऱ्याचा, सरस्वतीपूजनाचा दिवस आहे. सरस्वती सर्व कलांची देवता मानली जाते आणि भारतीय शास्त्रीय संगीतात सरस्वती नावाचा रागही असल्याने वाटलं कि, ह्या मालिकेची सुरुवात ‘सरस्वती’ रागानेच करूया. म्हटलं तर फार प्रचलित नसणारा किंवा तसा आधुनिक म्हणता येईल असा हा राग. कर्नाटकी संगीतातून हा राग हिंदुस्थानी पद्धतीत आलीकडच्या काळात आला असंही म्हटलं जातं. मात्र पूर्वीच्या जातीगायन पद्धतीत सुरांच्या केल्या जाणाऱ्या ‘परम्युटेशन कॉम्बिनेशन्स’च्या आधारे हे ‘कॉम्बिनेशन’ हिंदुस्थानी पद्धतीतही असणार, फक्त ते फार प्रचलित झालं नसावं असं म्हणता येईल.

लिहिता लिहिता असंही मनात आलं, भले आवडीचा प्रकार कोणताही असो मात्र संगीतावर प्रेम तर प्रत्येकाचेच असते. संगीताची नावड असलेला फारच विरळा! मात्र रागसंगीताचे शिक्षण प्रत्येकाने घेतलेले असते असे नाही. तर ह्या निमित्ताने सोप्या पद्धतीने तीही थोडी माहिती वाचकवर्गास करून द्यावी! प्रत्यक्ष रागसंगीताचा विद्यार्थी नसलेल्यांना फार सखोल ज्ञान हवं असं निश्चितच नाही. मात्र ह्या शास्त्रातील किमान मूलभूत गोष्टींची माहिती करून घेणं हे रंजक असेल हा विश्वास वाटतो. ही मालिका लिहिताना ह्या मूलभूत गोष्टींचा उल्लेख टाळून मी काहीच लिहू शकणार नाही आणि ह्या गोष्टींचे अर्थ माहीत नसतील तर वाचकांना तितकी मजा येणार नाही, म्हणून तोही खटाटोप!

सगळ्यात पहिलं म्हणजे राग आणि एखादं गाणं ह्यात काय फरक आहे? खरंतर ह्या विषयावर एक पूर्ण लेख होऊ शकेल. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर राग कसा गायचा/वाजवायचा ह्याचे काही ठराविक नियम पाळावे लागतात आणि अशा नियमबद्धतेतही उत्तम संगीतसाधक तासनतास एखादा राग गाऊ शकतोच, शिवाय प्रत्येकवेळी त्याच रागात नवनवीन नक्षीकामही करू शकतो. एखादं गीत मात्र त्याची विशिष्ट स्वररचना निश्चित झाल्यावर प्रत्येकवेळी जसेच्यातसे गायले जाते.

एक ठराविक आरोह-अवरोह असताना राग बराच काळ गाणे कसे शक्य होते? थोडक्यात सांगायचे तर प्रत्येकवेळी ‘कॅलिडोस्कोप’ फिरवला असता त्याच ठराविक काचेच्या तुकड्यांतूनच कशी नवनवीन डिझाईन्स तयार होतात, तसंच रागात जे काही स्वर असतील त्यांचा वापर करून कलाकार नवनवीन ‘स्वरांची डिझाईन्स’ शोधत राहातो. कलाकाराची कल्पनाशक्ती, सृजनशीलता आणि व्यासंग जितका उत्तम तितकी उत्तमोत्तम आणि जास्त संख्येनं डिझाईन्स रेखून तो रागाचं महावस्त्र देखणेपणी विणत राहातो.

मुळात आरोह-अवरोह म्हणजे काय? संगीतातील ‘सा रे ग म प ध नी’ हे सात सूर सर्वांनाच माहिती असतील. मात्र प्रत्येकच रागात सातही स्वर वापरले जातात असं नाही. कमीतकमी पाच सूर रागात असावे लागतात. त्यामुळं रागात कोणतेही पाच, सहा किंवा सात सूर असतात असं ढोबळमानानं म्हणता येईल. खालच्या ‘सा’पासून वरच्या ‘सा’पर्यंत रागात वापरल्या जाणाऱ्या स्वरांच्या चढत्या अनुक्रमास आरोह म्हणतात आणि वरच्या ‘सा’पासून खालच्या ‘सा’पर्यंत उतरत्या क्रमातील स्वरानुक्रमास अवरोह म्हणतात. एकाच रागाच्या आरोह व अवरोहातील स्वरसंख्या व स्वरही सारखेच असतील असेही नसते. मात्र रागाच्या आरोह-अवरोहात कलाकाराला काहीही बदल करता येत नाही किंवा त्यात नसलेला कोणताही दुसरा सूर रागात वापरता येत नाही.

सरस्वती रागाविषयी बोलायचे झाले तर पटकन आठवते ‘हे बंध रेशमाचे’ ह्या संगीत नाटकातील ‘विकल मन आज’ हे पद! हे संपूर्णच गीत पं. जितेंद्र अभिषेकींनी सरस्वती रागावर बेतलेलं आहे. दुसरं एक भावगीत आठवतं ते म्हणजे सुमन कल्याणपुरांच्या आवाजातलं ‘रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात!’ ह्या गाण्यात मात्र ध्रुवपद सरस्वती रागाचा भास निर्माण करत असले तरी पुढे रागात नसलेल्या सुरांचाही वापर झाला आहे. अर्थातच एखादी सुरावट राग म्हणून सादर होत नसेल तर तिथे रागाचे नियमही लागू होत नाहीत. म्हणूनच सुगम व उपशास्त्रीय संगीतात रागाचे बंधन न पाळता संगीतकाराच्या कल्पकतेनुसार स्वररचना तयार होते. आपण फक्त एखाद्या गाण्याला विशिष्ट रागाधारित गीत म्हणतो कारण ती स्वररचना आपल्याला त्या रागाची आठवण करून देते. मात्र त्या रचनेसारखेच त्या विशिष्ट रागाचे स्वरूप आहे असे म्हणणे मात्र संयुक्तिक होणार नाही.

सरस्वती रागाच्या आरोह व अवरोह दोन्हींतही सहा सूर आहेत.  ‘सा, रे, तीव्र म, प, ध, कोमल नि, सां’ असा रागाचा आरोह आणि ‘सां, कोमल नि, ध, प, तीव्र म, रे, सा’ असा अवरोह आहे. हा राग कल्याण थाटातून उत्पन्न झाला आहे. रागशास्त्रानुसार रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी हा राग गायला जातो. वरील गीतांच्या गोड चाली आठवल्या तरी राग अत्यंत मधुर असल्याचे आपल्याला जाणवेल. शुद्ध ‘रे’ वरून ‘तीव्र म’वर जाणं हा प्रत्येकच वेळी मनाला सुखद झोका आहे आणि त्यापुढं येणारी पधनिधसां ही स्वरसंगती अत्यंत लडिवाळ भासते. परंतू हे शुद्ध, कोमल, तीव्र स्वर म्हणजे काय प्रकार आहे? याविषयी आपण पुढच्या लेखात जाणून घेणार आहोत.

मी अत्यंत टाळंटाळ करत असतानाही नेटाने माझ्या मागे लागून मला ह्या विषयावर लिहायला प्रवृत्त केल्याबद्दल उज्वलाताईंना मन:पूर्वक धन्यवाद! जिज्ञासू वाचकांच्या सूचना, प्रतिक्रिया व प्रश्नांचे जरूर स्वागत आहे. ही लेखमाला वाचतावाचता वाचकांच्या मनात रागसंगीताविषयी आस्था निर्माण झाली तर त्याहून मोठा आनंद नाही.

©  सुश्री आसावरी केळकर-वाईकर

चेन्नई

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print