मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तुलना ☆ संग्रहिका  – सुश्री मीनल केळकर

?इंद्रधनुष्य? 

☆ तुलना ☆ संग्रहिका  – सुश्री मीनल केळकर ☆ 

तुलना(Comparison) 

श्वेताने एका तासात १० किमी अंतर कापले. आकाशने तेच अंतर दीड तासात पूर्ण केले. 

दोघांपैकी तंदुरुस्त कोण? किंवा कोणाचा फिटनेस चांगला? 

अर्थात सर्वांचे उत्तर श्वेता असेल. 

श्वेताने हे अंतर तयार केलेल्या ट्रॅकवर पूर्ण केले तर आकाशाने दगड-मातीच्या वाटेने चालत असे म्हटले तर ???

मग सर्वांचे उत्तर आकाश असेल. 

पण जेव्हा आम्हाला कळले की श्वेता ५० वर्षांची आहे तर आकाश २५ वर्षांचा आहे ?? 

मग सर्वांचे उत्तर पुन्हा श्वेता असेल. 

पण आम्हाला हे देखील कळले की आकाशचे वजन तब्बल १४० किलो आहे तर श्वेताचे वजन ६५ किलो आहे. 

पुन्हा सर्वांचे उत्तर आकाश असेल 

जसे आपण आकाश आणि श्वेताबद्दल अधिकाधीक माहिती मिळवतो, तसे तसे कोण चांगले आहे याबद्दल आपली मते भिन्न होतात आणि निर्णय बदलतात.

जीवनाचे वास्तवही असेच आहे. आपण प्रत्येकाबद्दल खूप वरवर आणि घाईने आपले मतं तयार करतो, ज्यामुळे आपण स्वतःला आणि इतरांना न्याय देऊ शकत नाही. 

प्रत्येकाला वेगवेगळ्या संधी मिळतात. 

प्रत्येकाचे आयुष्य वेगळे आहे. 

प्रत्येकाची साधन-संपत्ती भिन्न आहे. 

प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. 

प्रत्येकाचे उपाय वेगवेगळे आहेत. 

प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे.

म्हणूनच आपल्या आरोग्याची, संपत्तीची, परिस्थितीची अथवा जीवनाची श्रेष्ठता कोणाशी तुलना करण्यात नाही तर स्वतःची परीक्षा घेण्यामध्ये आहे. तुम्ही सर्वोत्तम आहात,  एकमेकाशी वादविवाद व तुलना करणं टाळा तुम्ही जसे आहात तसेच रहा आणि तुमच्या परिस्थितीनुसार सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करत रहा. निरोगी रहा, समाधानी रहा, हसत रहा, भगवंताच्या भक्तीत राहा, प्रामाणिक प्रयत्न करत रहा.

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कृतज्ञता…. ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ कृतज्ञता…. ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

एका वाळवंटात एक चिमणी रहात होती. ती खूप आजारी होती, तिला पंख नव्हते, तिच्याकडे खाण्यापिण्यासाठी पण काहीच नव्हते आणि रहायला घरही नव्हतं. 

एके दिवशी एक कबूतर तेथून जात होतं. चिमणीने त्या कबुतराला थांबवलं व विचारलं, “तू कुठे जात आहेस?” कबूतराने उत्तर दिलं, “मी स्वर्गात जात आहे.”

ती आजारी चिमणी म्हणाली, “कृपा करून माझा त्रास कधी संपणार या बद्दल माहिती मिळवशील का?” कबूतर म्हणालं, “नक्कीच, मी तपास करेन.” आणि कबुतराने त्या आजारी चिमणीचा निरोप घेतला.

कबुतर स्वर्गात पोहोचलं आणि प्रवेश द्वारावरील देवदूताला आजारी चिमणीचा निरोप सांगितला. 

देवदूत म्हणाला, “तिच्या जीवनातील पुढील सात वर्षे तिला असाच त्रास सहन करावा लागेल व तिच्या आयुष्यात कोणताच आनंद नसेल.”

कबूतर म्हणालं, “हे ऐकून तर ती आजारी चिमणी अजूनच निराश होईल. यावर तुम्ही काही उपाय सांगू शकता का?”

देवदूत म्हणाला, “मी सांगतो तसा तिला जप करायला सांग – परमेश्वरा, तू मला जे काही दिलं आहेस, त्याबद्दल मी तुझी आभारी आहे, धन्यवाद.”

कबूतराने आजारी चिमणीला भेटून देवदूताने पाठविलेला निरोप सांगितला.

सात दिवसानंतर जेव्हा कबुतर तिथून जात होतं तेव्हा त्याने बघितलं की ती चिमणी खूप आनंदी आहे. तिच्या शरीरावर पंख फुटले होते, वाळवंटात एक लहानसे झाड उगवले होते, जवळंच पाण्याचा तलावसुद्धा तयार झाला होता आणि ती चिमणी आनंदाने गात होती, नाचत होती.

हे सर्वं पाहून कबूतर आश्चर्यचकित झालं. कारण देवदूताने सांगितलं होतं की पुढील सात वर्षे त्या चिमणीच्या आयुष्यात कोणताच आनंद नसेल. ह्या  कुतूहलाने कबूतर परत स्वर्गाच्या दरवाजावर असलेल्या देवदूताला भेटयला गेलं.

कबुतराने त्याचे कुतूहल देवदूताला सांगितलं. देवदूताने उत्तर दिलं,  “होय, हे सत्य आहे की पुढील सात वर्षे त्या चिमणीच्या आयुष्यात कोणताच आनंद नव्हता. परंतु प्रत्येक क्षणी चिमणी, “देवा, तू मला जे काही दिलं आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते”, हा जप करीत होती. म्हणून तीचं जीवन बदलून गेलं. 

ती जेव्हा गरम वाळूवर पडत असे, तेव्हा म्हणत असे, “देवा, तू मला जे काही दिलं आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते.”

जेव्हा ती उडू शकत नसे तेव्हा ती म्हणत असे, “देवा, तू मला जे काही दिलं आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते.”

जेव्हा तिला तहान लागत असे आणि आजुबाजूला पाण्याचा थेंब सुद्धा नसे तेव्हा सुद्धा ती हेच म्हणत असे की, “देवा, तू मला जे काही दिलं आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते.”

परिस्थिती कोणतीही असो चिमणी हाच जप आळवित असे म्हणून तिची त्रासदायक सात वर्षे, सात दिवसात बदलून गेली.”

जर आपण लक्षपूर्वक पहिलं तर, आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणे आपल्याला सापडतील जेव्हा कृतज्ञतेच्या भावनेने परिस्थितीला पूर्णपणे बदलून टाकले, इतकेच काय एखाद्याचे संपूर्ण जीवन देखील. 

जर का आपणसुद्धा प्रत्येक प्रसंगी, “हे देवा, तू मला जे काही दिले आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानतो”, हा जप करु शकलो तर त्यात आपल्या आयुष्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे.

ही गोष्ट आपला दृष्टिकोन, आपल्या जवळ काय नाही पासून आपल्या जवळ काय आहे पर्यंत बदलण्यास मदत करते. 

उदाहरणादाखल आपले डोके दुखत असताना जर आपल्या उर्वरित आरोग्याबद्दल आपण देवाचे आभार मानले की, “माझे बाकीचे शरीर पूर्णपणे निरोगी ठेवल्याबद्दल तुमचे आभार” तर आपली डोकेदुखी सुद्धा फारशी त्रास देत नाही.

चला तर मग मिळालेल्या सर्वं आशीर्वादांबद्दल परमेश्वराचे आभार मानूया.. त्यामुळे आपल्या जीवनात नक्कीच सुखद बदल घडून येईल.

संग्राहक – श्री सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ग्रूपचं नातं ☆ संग्राहक – सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

ग्रूपचं नातं ☆ संग्राहक – सुश्री प्रभा हर्षे ☆

पायचं नातं म्हणून,

निर्माण केला ग्रुप..

सगळेच आपले म्हणून,

भावना जपा खूप..

 

कोणी दिला रिप्लाय,

म्हणून हुरळून जायचं नाही..

आणि नाही दिला रिप्लाय,

म्हणून खंत मानायची नाही..

 

सर्वांची मतं कायम,

एकसारखी असतील कशी..

नकारार्थी, सकारार्थी,

प्रत्येकाची वेगळी अशी..

 

राखायची असेल अबाधित,

एकमेकांची साथ..

तर द्यावाच लागतो सर्वांना,

प्रेमाचा हात..

 

प्रत्येकाचं मत,

वेगळं असायलाच हवं..

तरच घडेल इथे,

रोज काहीतरी नवं..

 

काय बरं होईल,

नावडत्या जोकवर हसलं तर..

मनातल्या भावना झाकून,

थोडसं फसलं तर..

 

फक्त एकच करा मित्रांनो,

वेळ काढा थोडा..

प्रत्येक जण असावा,

दुसऱ्यासाठी वेडा..

 

कधी गडबड, कधी बडबड,

कधी बरीच शांतता..

दाखवून द्या ना एकदा,

अंतरंगातील एकात्मता..

 

दुरावलेल्या दोन मनांत,

एक पूल बांधणारा..

एखादा असतोच ना,

निखळणारे दुवे सांधणारा..

 

ग्रुप असो नात्यांचा,

वा असो तो मित्रांचा..

आपल्या हजेरीने बनवा,

स्वप्नांमधल्या चित्रांचा..

 

©  सुश्री प्रभा हर्षे 

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतातील पहिली महिला वैमानिक – सुश्री सरला ठकराल ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतातील पहिली महिला वैमानिक –  सुश्री सरला ठकराल ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

वयाच्या १६ व्या वर्षी तिचं लग्न झालं. लग्नानंतर तिला एक मुलगीही झाली तरी ती वयाच्या २१ व्या वर्षी भारतातील पहिली महिला वैमानिक झाली. वयाच्या २४ व्या वर्षी ती विधवा झाली तरी खचली नाही. वेगवेगळ्या क्षेत्रात तिने आपल्या कर्तुत्वाचा ठसा शेवटपर्यंत उमटवलाचं. कोण होती ही महिला ?

” लग्नानंतर माझ्या करिअरचं काय होणार ? ” असा प्रश्न पडलेल्या फेसबुकवरील हजारो महिलांना आज हा लेख सादर समर्पण.

१९३० चा तो काळ होता. मुलगी १६ वर्षाची झाली म्हणजे ती थोराड झाली असा सार्वत्रिक समज होता. साहजिकच सरलाच्या आई वडिलांनीही तिचं लग्न वयाच्या १६ व्या वर्षीच लावून दिलं आणि ती सरला शर्मा झाली. अखंड भारतातील लाहोरमध्ये ती राहत होती. तिचा नवरा पायलट होता. शिवाय घराण्यातील एकूण ९ माणसे पायलट झाली होती. त्यामुळेच असेल कदाचित तिने एक भव्य स्वप्न पाहिलं- आपणही एक दिवस पायलट व्हायचं. ज्या काळात स्त्रिया कारही चालवत नव्हत्या त्या काळात विमान चालवायचं स्वप्न पाहणं म्हणजे अशक्य कोटीतली गोष्टच होती. त्यात ती एका मुलीची आई झाली होती. आता तिचं ते स्वप्न पूर्ण होणं केवळ अशक्यच होतं. परंतु ज्यांच्याकडे भव्य स्वप्न असतात ते लोक कुठल्याही अडचणींनी कधीच खचून जात नाहीत. उलट त्यांच्यातील इर्ष्या त्यांना अधिक प्रेरित करत राहते. सरला शर्मासुद्धा आपल्या निश्चित ध्येयापासून मुळीच ढळली नाही. नवऱ्याचं प्रोत्साहन होतंच पण त्याहीपेक्षा तिच्या सासऱ्यांनी दिलेलं प्रोत्साहन तिला लाख मोलाचं वाटलं.

जेव्हा ती वयाच्या २१ व्या वर्षी देशातील पहिली महिला वैमानिक झाली तेव्हा तिची मुलगी ४ वर्षाची होती आणि त्यावेळी तिने साडी नेसून विमान चालवलं होतं. त्यामुळे देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. तब्बल एक हजार तासाचा विमान उड्डाणाचा अनुभव तिच्या पाठीशी होता. त्यामुळे साहजिकच तिला ग्रुप ‘ए’ परवाना मिळाला. प्रवासी वाहतुकीचा परवाना मिळवण्यासाठी ग्रुप ‘बी’ परवाना मिळवणं आवश्यक होतं. तिने त्याचीही तयारी सुरु केली. दुर्दैवाने त्याचवेळी तिच्यावर आभाळच कोसळलं. एका अपघातामध्ये तिच्या पतिचं निधन झालं. तरीही ती आपल्या ध्येयापासून ढळली नाही. आपण कमर्शिअल पायलट व्हायचच हे तिचं स्वप्न होतं. पण त्याच वेळी दुसऱ्या महायुद्धाचा भडका उडाला आणि तिचं स्वप्न त्या वणव्यात जळून खाक झालं. युद्धामुळे ट्रेनिंग देणारी ती संस्थाच बंद पडली. दोन मुलींना घेऊन ती लाहोरहून दिल्लीला आली आणि तिने दुसरं लग्न केलं. सरला शर्माची सरला ठकराल झाली.

स्वप्न भंग झालं तरी नाउमेद न होता ती पेंटिंग शिकली. फाईन आर्ट मध्ये तिने डिप्लोमा मिळवला. ती ज्वेलरी डिजाईन आणि कपडे डिजाईनचा व्यवसाय करू लागली. त्यातही तिने नेत्रदीपक यश मिळवलं.ज्या काळात महिलांना शिक्षण घेणंही कठीण होतं त्या काळात सरला आपल्या करिअरचा विचार करायची. वयाच्या अखेरच्या घटकेपर्यंत त्या आपल्या व्यवसायात मग्न राहिल्या. वयाच्या ९५ व्या वर्षी २००९ मध्ये त्यांचं निधन झालं. वयाच्या अखेरपर्यंत त्या कार्यरत राहिल्या.

सरला ठकरालनी देशातील लाखो महिलांना एक नवी वाट दाखवली. त्या काळात फक्त चूल आणि मुल म्हणजेच संसार समजणाऱ्या देशातील महिलांनी आज वैमानिक क्षेत्रात देशाचा झेंडा अटकेपार नेऊन फडकावालय. गेल्या ५ वर्षात परवाना मिळालेल्या ४२६७ वैमानिकांपैकी तब्बल ६२८ महिला वैमानिक आहेत. महिलांची जागतिक टक्केवारी केवळ ३ टक्के असताना भारतीय महिलांनी १४.७ टक्केची मजल गाठून सरला ठकराल यांच्या कर्तुत्वाला एक प्रकारे सलामच केल्याचे म्हणावं लागेल. महाराष्ट्राच्या सौदामिनी देशमुख या देशातील तिस-या महिला वैमानिक ठरल्या. त्यांनी बोईंग ७३७ आणि एअर बस ३२० चालवून देशातील महिलांची मान गर्वाने ताठ केली.

मित्रानो, आज हा लेख आपल्या घरातील महिलांना आवर्जून वाचायला द्या. कदाचित तुमच्या घराण्याचं नाव काढणारी उद्याची सरला ठकराल किंवा सौदामिनी देशमुख तुमच्या घरातही असू शकेल.

संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नागपंचमी : मूळ संदर्भ ☆ संग्राहक – सौ.स्वाती घैसास

? इंद्रधनुष्य ? 

☆ नागपंचमी : मूळ संदर्भ ☆ संग्राहक – सौ.स्वाती घैसास ☆ 

नागपंचमीचा संबंध “नाग” या सरपटणा-या सापासी(सर्प)असंख्य वर्षांपासून लावेल गेलेला आहे. परंतू या सणाला याहून वेगळे आणि वैशिष्टयपूर्ण असे संदर्भही आहेत—–

भारतात नाग हे “टोटेम” असणारे पाच पराक्रमी नाग-राजे होऊन गेले •••

१• अनंत (शेष) नाग

२• नागराजा वासुकी

३• नागराजा तक्षक

४• नागराजा कर्कोटक

५• नागराजा ऐरावत

नागपंचमी ह्या पाच नागराजांशी संबधित आहे. ह्या पाचही नाग-राजांची स्वतंत्र गणतांत्रिक (republican) स्वरुपाची राज्ये होती.  यामध्ये नागराजा अनंत हा सर्वात मोठा. जम्मू-काश्मीर मधील अनंतनाग हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते. 

त्यानंतर दुसरा नागराजा म्हणजे वासुकी नागराजा.  हा कैलास मानसरोवरापासून उत्तर प्रदेश क्षेत्राचा प्रमुख होता.

तिसरा नागराजा तक्षक यानेच जगप्रसिद्ध तक्षशिला विश्वविद्यापीठ स्थापन केले. येथेच प्लेटो, अँरीस्टॉटल सारखे तत्वज्ञ शिकून गेलेत.

चवथा नागराजा कर्कोटकाचे रावी नदीच्या शेजारील प्रदेशात राज्य होते. 

पाचवा नागराजा ऐरावत (पिंगाला) याचा भंडारा प्रांत, जो आजही पिन्गालाई एरीया म्हणून ओळखला जातो.

ह्या पाचही नागराजांच्या गणराज्याच्या सीमा एकमेकांच्या राज्याला लागून होत्या. हे पाचही  नागराजे मृत्यू पावल्यानंतर, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नागवंशीय लोक “नागराजे स्मृति अभिवादन” —“नागपंचमी” म्हणून दरवर्षी साजरा करीत असत.

कालांतराने या राजांच्या “ स्मृती-पूजना”ला जाणते-अजाणतेपणाने वेगळेच वळण लागले आणि आत्तासारखी नागपंचमी रूढ मानण्यात येऊ लागली. आर्थिक परिस्थितीमुळे गरीब बहुजन वर्ग  कागदी नाग नरसोबा ट्रेंडकडे आकर्षित झाला, कारण त्यांच्या पूजेतून पुण्य मिळते हे बहुजनांच्या मनमेंदूमध्ये बिंबवले गेले.  त्याचाच परिणाम म्हणून ‘नाग नरसोबा’ आणि काही पोथ्या प्रसिद्ध झाल्या आणि अशी ही आता साजरी केली जाणारी नागपंचमी रूढ झाली आणि “ नागलोकांची पंचमी “ लुप्त झाली. आज नागाला दूध पाजणे, त्याची पूजा करणे एवढाच नागपंचमीचा अर्थ उरला आहे.  तरीपण बहुजन समाज आजही घराच्या भिंतीवर पाच नाग काढणे विसरलेला नाही. हे पाच नाग म्हणजेच आपले पाच नागराजे होत.

आज जरी नागपंचमी ही सरपटणाऱ्या नागाची म्हणून प्रसिध्द असली तरी त्याबाबतची ऐतिहासिक वस्तूस्थिती वेगळीच आढळते. म्हणूनच बहुजनांनी धार्मिक परिघाच्या बाहेर येऊन, नागपंचमी अशी सणाच्या स्वरूपात साजरी करण्याबरोबरच,  “बहुजन नागराजे” यांच्या स्मृतीलाही आवर्जून  अभिवादन करावे.

 

संग्राहक – स्वाती घैसास

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ह्याला आयुष्य म्हणावं काय ???? ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ ह्याला आयुष्य म्हणावं काय ???? ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

पद, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिध्दी

लोळण घेतात पायात

बिल गेटची पत्नी तरीही

का घटस्फोट घेते ह्या वयात ?

 

शिक्षणाने माणूस समृध्द होतो

आम्ही आहोत अजूनही भ्रमात

उच्चविद्याविभूषकांचे मायबाप

मग का असतात वृध्दाश्रमात ?

 

हा डिप्रेशनचा शिकार

तो आत्महत्या करतो

ज्याला समजावं सेलिब्रिटी

तो एकाकीपणात मरतो

 

ज्यांनी कमावलं नाव

त्याला आनंद का मिळत नाही ?

काय चाटायचं ह्या मोठेपणाला

नातं आपुलकीचं जुळत नाही

 

जळजळीत वास्तव सांगतो

तुमचा विश्वास ह्यावर बसणार नाही

गरीब, आडाणी , प्रामाणिक मजूरांचे

मायबाप वृध्दाश्रमात दिसणार नाही

 

असं नाही त्यांचे घरात

नाहीत वादविवाद

पण घटस्फोट अन् वृध्दाश्रम

बोटावर मोजण्या एवढे अपवाद

 

आजारी मायबापांचा ईलाज 

करतात किडूक मिडूक विकून 

पण जिव्हाळ्याची अजूनही त्यांनी

नाळ ठेवली आहे टिकुन

 

व्यसनी, रागीट,नवरा

त्याला गरीबीची जोड

तरीही त्याची पत्नी बिच्चारी

करतेचं ना तडजोड?

 

दु:ख हलकं करतात

एकमेकांना भेटून

एका शिळ्या भाकरीचा तुकडा

खातात सारेजण वाटून

 

जेवढी लावतात माया

तेवढंच बोलतात फाडफाड

कितीदा तरी भांडतात

पण कुठे येतो ईगो आड ?

 

ऊशाशी दगड घेऊन

भर ऊन्हातही झोपी जातो

काळ्या मातीत घाम गाळणारा

बळीराजा कुठं झोपेची गोळी खातो ?

 

ना तोल ढळतो ना संयम

दु:खातही सावरण्याची आस

कारण अजुनही ह्या माणसांचा

आहे माणूसकीवर विश्वास

 

पण हल्ली इन्सस्टंट रिझल्टचे

आले हे दळभद्री दिवस

देव सुध्दा लगेच बदलतात

जर पावला नाही नवस

 

एकत्रीत कुटूंब हल्ली

सांगा कुणाला हवं ?

कामा शिवाय वाटतं का

आपण कुणाच्या घरी जावं?

 

एकदा तरी बघा जरा

आपल्या आयुष्याचा रोड मॅप

कुणाचं कुणाशी पटत नाही

काय तर म्हणे जनरेशन गॅप

 

सांगा बरं कुणावर ह्या

विकृत विचारांचा पगडा नाही

घर,बंगला, फ्लॅट असु द्या

दरवाजा कुणाचाही ऊघडा नाही

 

बहूत अच्छे, बहूत खुब !

क्या बात है ? बहूत बढीया !

एवढ्या ओसंडून वाहतात प्रतिक्रिया 

जागृत चोवीस तास सोशल मिडीया

 

आभासी दुनियेची चाले

कोरडी कोरडी ख्याली खुशाली

मोबाईलवर साऱ्या शुभेच्छा

मोबाईलवरचं श्रध्दांजली

 

काय बरोबर ? काय चूक ?

मत मांडण्याचीही सत्ता नाही

तो बंद घरात मरून पडला

वास सुटला तरी शेजाऱ्याला पत्ता नाही

 

मुलं पाठवली परदेशात

आई संगे म्हातारा बाप कण्हतो

अंत्यविधी उरकुन घ्या

पैसे पाठवतो असं पोटचा गोळा म्हणतो

 

लेकराला पाॅकेटमनी ,बाईक 

अन् भलेही दिली जरी कार

किती छान झालं असतं

जर दिले असते संस्कार?

 

होस्टेल ,बोर्डींगात बालपणीचं पाठवलं 

तो तुम्हाला का वागवणार ?

जमीन असो की जिवन

येथे जे पेरलं तेच ऊगवणार

 

जिवशास्र शिकवलं

जिवनशास्त्र शिकवा

चुलीत गेली चित्रकला

सांगा चारित्र्याला टीकवा

 

त्रिकोण,चौकोन ,षटकोन

ह्याला सांगा विचारेल कोण ?

ज्याचे जवळ नसेल

आयुष्याचा दृष्टीकोन

 

विपरीत परिस्थीतीतही

जपणूक केली पाहीजे तत्वाची

व्याकरणा पेक्षाही अंत:करणाची

भाषा असते महत्वाची

 

चुकु द्या चुकलं तर

अंकगणित अन् बीजगणित 

माणसांची बेरीज करा

गुण नाहीत पण गुणवत्ता अगणित

 

प्राणपणाने जतन करावे

नाते शहर, खेडे ,गावाचे

मेल्यावरती खांदा द्यायला

असावे चारचौघे जिवाभावाचे

 

मेल्यावर दोन अश्रु 

हीच आयुष्याची कमाई

ज्याने हे कमावलं नसेल

तो आयुष्य जगलाच नाही

 

मिळून मिसळून वागावं

आनंदानं जगावं

तुम्ही सगळी मोठ्ठी माणसं

म्या पामरानं काय सांगावं———

 

संग्राहक – श्री सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी-फारसी भाषेची गंमत… भाग -1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? ?

☆ मराठी-फारसी भाषेची गंमत… भाग -1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

खालील वाक्य वाचा :

“मी दरबारातून घरी येत असताना बाजारात गेलो. तिथं मला फौज दिसली. फौज अदालतखान्यासमोर उभी होती. तिथं सावकार सक्तीने गरिबांचा जमीन-जुमला जप्त करत होता. बाजारातील दिल्ली दरवाजातून मी घरी आलो. किल्ली लावून मी माझ्या घराच्या दरवाजाचे कुलूप उघडले. मुख्य दालनात कारंजाचा फवारा उडत होता.

बाजूच्या हौदातून पाणी काढून मी हातपाय धुतले. नंतर मी रंगमहालात आलो. तिथं नाच बघितला. नाच आवडला म्हणून संदूकखाना उघडून नर्तकीला बक्षीस दिले. नंतर भूक लागली म्हणून खाण्यासाठी मुदपाक खाण्यात गेलो. तिथून मी परत आरामखोलीत आलो. खिडकी उघडली आणि खुर्चीवर कट्यार ठेवुन बाहेरच्या बुरुजाकडे पहात पलंगावर झोपी गेलो.”

(वरील वाक्याचे मराठी भाषांतर लेखाच्या शेवटी दिले आहे.)

ह्या वरील वाक्यात जवळपास सगळेच फारसी शब्द आहेत.

नाही खरे वाटत?

बघा मग : दरबार, बाजार, घर, फौज, अदालतखाना, सावकार, सक्ती, गरीब, जमीन, जुमला,जप्त, दिल्ली दरवाजा, किल्ली, घर, दालन, कारंजे, फवारा, हौद, रंगमहाल, नाच, संदूकखाना, नर्तकी, बक्षीस, भूक, खाना, मुदपाक खाना, आराम, खिडकी, खुर्ची, बाहेर, बुरुज आणि पलंग.

इतके शब्द ह्या वरील वाक्यात फारसी आहेत.

आहे ना गंमत!!

पण मग हे सगळे झाले तरी कधी?

इसवी सन १२९६ म्हणजे बरोबर आजपासून ७२२ वर्षांपूर्वी फारसी भाषा महाराष्ट्रात आली.

फारसी हि आजच्या इराण आणि पूर्वीच्या पर्शियन साम्राज्याची भाषा.

हि भाषा इकडे येण्याचे एक कारण होते आणि ते म्हणजे इसवीसन १२९६ ला दिल्लीचा शासक अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर केलेला हल्ला.

इसवीसन १३१८ पासून १३४७ पर्यंतचा महाराष्ट्राचा कारभार खिलजी सल्तनत दिल्लीत बसून करत होती.

अलाउद्दीन खिलजीच्या मृत्यूनंतर पुढे १३४७ साली त्याचा सुभेदार हसन गंगू ह्याने दिल्लीशी संबंध तोडून दक्षिणेत बहमनी सल्तनतीची स्थापना केली.

इसवीसन १४९२ पर्यंत बिदर, १४८४ पर्यंत वऱ्हाड, १४८९ पर्यंत अहमदनगर, १४८९ पर्यंत विजापूर आणि १५१२ पर्यंत गोवळकोंडा भागात हि बहमनी सल्तनत अस्तित्वात होती.

ह्या वरील बहमनी सल्तनतीच्या वेळेसच मराठ्यांनी आपल्या कर्तृत्वाने सर्व महाराष्ट्र आक्रमिण्याचा उद्योग सुरु केला. इसवीसन १४५० च्या सुमारास खानदेशातील स्वाऱ्यांत निकम, ठाण्यास बिंबदेव राणे, कोळवनात कोळी, रामनगरास

राणे, सोनगड आणि रायरीच्या प्रांतात तेथील राजे, शिरकाणात शिरके, खेळण्यास शंकरदेव, वाडीस सावंत, बेळगावास कर्णराज, मोरगिरीस मोरे, असे अनेक मराठे आपले राज्य स्वतंत्रपणे करीत असत. ह्या वरील प्रांतांमध्ये १४५० पर्यंत अस्सल मराठीचाच प्रचार होत असे. मात्र हे प्रांत सोडून बाकीच्या प्रदेशांत फारसी शब्दांचा सुळसुळाट झाला होता. १४५० नंतर हि लहान लहान राज्ये नष्ट होऊन बहमनी

सल्तनतीच्या अंकित बनली.

ह्या बहमनी सल्तनतीचे पुढे जाऊन बरिदशाही, इमादशाही, निजामशाही, आदिलशाही, आणि कुतुबशाही असे पाच तुकडे पडले.

बरिदशाही-१६५६, इमादशाही-१५७२, निजामशाही-१६३७, आदिलशाही-१६८६, आणि कुतुबशाही-१६८७ पर्यंत अस्तित्वात होत्या.

म्हणजे ह्या राजसत्ता जिवंत असूपर्यंत फारसी भाषेने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला.

हे सगळे मुस्लिम शासक मूळचे पर्शियन असल्यामुळे त्यांची दरबारी भाषा हि फारसी होती.

त्यामुळे फारसी आणि मराठीची टक्कर होऊ लागली. सुलतानांनी राज्य चालविताना आपली भाषा वापरण्यावर भर दिला. त्यामुळे जमीन महसूल असो कि अजून काही. सगळीकडे फारसी शब्द वापरू जावु लागले.

जेथे जेथे म्हणून मुस्लिम शासकांचे राज्य कायम झाले तेथे तेथे दरबारातील सर्व मराठी लिहिण्यात फारसी संबंधांचा भरणा विशेष असे. दरबारापासून दूर अश्या गावी आणि सरकारी अधिकाऱ्यांचा जेथे संबंध नाही अश्या गावकीच्या किंवा धर्माच्या किंवा गोतकीच्या खटल्यात जे कागदपत्र बनत त्यात फारसी शब्दांची संख्या फारच कमी असे.

मात्र त्यात फारसी शब्द बिलकुल नसत असे नाही.

इसवीसन १२९६ ला अलाउद्दीन खिलजी महाराष्ट्रात आल्यापासून १६८७ च्या कुतुबशाहीच्या अस्तापर्यंत ३९१ वर्ष फारसी भाषेला महाराष्ट्रात झाली होती. ह्या ३९१ वर्षात ह्या फारसी भाषेच्या राक्षसाने रूप धारण केले होते.

देशात फारसी भाषेचा इतका प्रचंड संचार झाला होता कि दरबारापासून अलिप्त राहणाऱ्या व्यक्तीच्याही बोलण्यात किंवा लिहिण्यात फारसी शब्द नकळत येत असे.

फारसीतून मराठीत जी विशेषनामे रूढ झाली ती धक्कादायक अशी आहेत. उदाहरणार्थ:

बाबा, मामा, मामी, नाना, नानी, काका, काकी, अबू, अम्मा, अम्मी वगैरे मराठीतील टोपण नावे हि फारसी आहेत.

ह्याशिवाय सुल्तानराव, जानराव, बाजीराव, रुस्तुमराव, शहाजीराव, शाहू, फिरंगोजीराव, सर्जेराव, हैबतराव, सर्फरोजीराव, वगैरे नावेही फारशीच आहेत. ह्या शिवाय अजून सौदागर, मुश्रीफ, सराफ, चिटणीस, फडणीस, पोतनीस, हेजिबराव, दिवाण, पेशवे, वाकनीस, दफ्तरदार अशी आडनांवेही फारसी आहेत.

अश्या स्वरूपाच्या शेकडो फारसी शब्दांनी मराठीत कायमचे ठाण मांडले.

जसे जसे यावनी भाषेचे मराठीवर आक्रमण होऊ लागले तसे तसे संतांनी तातडीने समाजप्रबोधनातून मराठी भाषा वाचविण्याचे कसोशीने प्रयत्न सुरु केले.

संत ज्ञानेश्वर म्हणतात,

“माझा मराठाची बोलू कौतुके।

परी अमृतातेही पैजा जिंके।

ऐसी अक्षरे। रसिके मेळवीन”

संत तुकाराम तर अजुन ओजस्वी म्हणतात कि

“आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने।

शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं ।।

शब्द ची आमुच्या जीवाचे जीवन।

शब्दे वाटू धन जन लोका ।।

तुका म्हणे पहा शब्द चि हा देव।

शब्दे चि गौरव पूजा करू ।।

संत जनाबाई, संत बहिणाबाईं, संत एकनाथांनी जशी मराठी भाषा समृद्ध केली तशीच संत नामदेवांनीही मराठी भाषेचा वारू यथार्थ दौडवला.

संग्राहक – सुश्री सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदना… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदना…… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

(श्री. पु. ल. देशपांडे आणि श्री. आचार्य अत्रे या दोन दिग्गजांचा स्मृतिदिन नुकताच अगदी पाठोपाठ होऊन गेला. या दोघांच्या स्मृती एकत्रपणे जागवणारा हा सुरेख लेख)

काल पुलं स्मृतिदिन आणि आज आचार्य अत्रे स्मृतिदिन. ही नावंच मुळी मराठी मनांच्या सुगंधी कप्प्यात आदरानं विसावली आहेत. शांता शेळकेंनी श्री. म. माटेंना एकदा विचारलं होतं की, ‘माणसाचं आयुष्य किती?’ माटेंचं उत्तर होतं…. “माणूस मेल्यावर जितका काळ लोक त्याची आठवण काढतात तितकं…!”  या अर्थानं‌ अत्रे-पुलं ही जोडगोळी अमरच म्हणायला हवी!!!!!

दोघांनीही साहित्याच्या सर्वच क्षेत्रात मुशाफिरी केली आणि दर्जा ही काय चीज असते त्याची अवघ्या रसिकजनास ओळख तर करविलीच, पण न्हाऊनच काढलं, असं म्हटल्यास वावगं ठरू नये…..!

असो. तर त्या मानवंदनेचा इतिहास असा…..

नांदेडच्या नाट्यसंमेलनाचे पु.ल. अध्यक्ष आणि आचार्य अत्रे आणि पु.ल.देशपांडे संमेलनात एकाच व्यासपीठावर!!!   मराठवाड्यातल्या रस्त्यांची तत्कालीन अवस्था फारच दारूण अशी होती. रस्त्यावरचे खड्डे, प्रचंड धूळ यांमुळे अत्रे वैतागलेले होते. आपल्या भाषणात त्यांनी राज्यकर्त्यांवर यथेच्छ टीका केली. कोडग्या राजकारण्यांची चर्म सोलणं काय असतं, तेच श्रोत्यांनी अत्र्यांच्या वाग्बाण आणि वाक्ताडनातून जाणलं. अत्रेंचं तोंडसुख घेऊन झालं आणि तत्पश्चात पु.ल. भाषणासाठी उभे राहिले. महाराष्ट्र साहित्य परीषदेच्या प्रा. मिलिंद जोशींनी हा प्रसंग फार छान वर्णन केला आहे….

अत्र्यांच्या खड्डे आणि धूळ यावरील भाषणाचा धागा पु.ल.नी अचूक पकडला आणि म्हणाले,

‘‘ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली, त्या आचार्यांना या धुळीची इतकी भीति का वाटावी? ही मराठी भाषेच्या आजोळची धूळ आहे. या धुळीतून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास, जिजाऊ, छत्रपती शिवाजीमहाराज अशी मोठी माणसं गेली आहेत. ही धूळ अंगावर घेत असताना त्यांच्यातील माणसांचे दर्शन आम्हाला घडते आहे, असेच वाटते. ज्याला पैठण आवडत नाही असा पुरुष शोधून सापडणार नाही आणि जिला पैठणी आवडत नाही अशी बाई शोधून सापडणार नाही, अशा मराठवाड्यात, अत्रेसाहेब आपण आहात.’’

टाळ्यांचा कडकडाट तर झालाच पण नियमावली किंवा आचारसंहित किंवा सभाशास्त्राचे सर्व नियम मोडून अत्रे उभे राहिले. त्यांनी पुलंच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले,

“मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे. महाराष्ट्राला हसवण्याचे काम आता यापुढे पुलंनी करावे. मी मरायला मोकळा झालो आहे.”

आचार्य अत्र्यांचा शब्द पु.ल.नी खोटा ठरू दिला नाही.  अत्र्यांच्यानंतर अवघा महाराष्ट्र निरंतर हसवण्याचे काम पु.ल.नी चोख केले….!!!

गुणि गुणं वेत्ति, न निर्गुणा:…. याचंच मनोहारी दर्शन वरील प्रसंगातून सतेज दृग्गोचर झालं…!!!

संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ व्हिंटेज – सौरभ साठे ☆ प्रस्तुती..सौ.स्मिता पंडित

?इंद्रधनुष्य?

☆ व्हिंटेज – सौरभ साठे ☆ प्रस्तुती..सौ.स्मिता पंडित ☆ 

माझ्या एकटेपणाच्या दुःखाने आता बाळस धरायला सुरुवात केली आहे. 5 वर्षांपूर्वी रिटायर झाल्यावर खर तर खूप काही प्लॅनिंग केलं होतं, पण आमची ही सहा महिन्यापूर्वी पुढच्या प्रवासाला निघून गेली.. एकटीच….

आता मी माझं रुटीन सेट करून घेतलंय.. सकाळी जरा लवकरच उठतो, त्याच काय आहे मुलगा आणि सून दोघेही नोकरी करतात यायला जरा उशीरच होतो त्यांना म्हणुन सकाळी चहा बरोबर जरा गप्पा पण होतील असं मला वाटायचं.. हो वाटायच.. कारण त्यांना माझ्याशी बोलायला वेळच नाही मिळत.. नाही नाही गैरसमज करून घेऊ नका सिनेमा किंवा सिरियल मध्ये दाखवतात तसे काही माझे मुलगा किंवा सुन नाहियेत… वडिलांची आणि सासर्‍यांची जेवढी काळजी घ्यायला पाहिजे तेवढी नक्कीच घेतात.. माझी तक्रार काही नाही.. पण एकदा सकाळी इतरांपेक्षा लवकर जाग आली म्हणुन चहा करायला घेतला पण नेमकं दूध उतू गेलं  सगळा ओटा खराब झाला..सुन नाराज झाली.. मला काही बोलली नाही पण तीच्या हालचाली मधून ते स्पष्ट जाणवत होत.. त्या दिवशी मुलानी लगेच फर्मान काढले..”बाबा उद्यापासून आमच आवरल्यावर मी तुम्हाला चहा आणून देईन रूम मधे” असाच एकदा नातवाला एकदा म्हणालो चल तुला स्कूल बस पर्यंत येतो सोडायला.. तर म्हणतो कसा “आबा मी मोठा झालोय आता मी एकटा जाऊ शकतो तू आलास तर बाकीच्या मुलांना वाटेल मी घाबरतो एकटा यायला..हसतील मला सगळे..”

म्हणुन सध्या उठल्यावर मी माझ्या खोलीतच असतो.. बाहेरचा अंदाज घेऊनच हॉल मधे येतो.. मला कळून चुकलय की त्यांच्या आयुष्यातला फक्त एक भाग आहे कदाचीत थोडासा दुर्लक्षित…

आता मी संध्याकाळी फिरायला जातो.. तेवढाच माझाही वेळ जातो.. रोजचा मार्ग ठरलाय माझा agricultural college च्या चौकातून सरळ जाऊन विद्यापीठाच्या चौकातून परत घरी.. त्या मार्गावर एक दोन शोरूम आहेत चार-चाकी गाड्यांच्या.. पहिल्यापासूनच गाड्यांचे आकर्षण होते.. म्हणुन मग येता जाता त्या शोरूम मधल्या गाड्या बघत बघत जायचो अर्थात बाहेरूनच..

पण एक दिवस त्या शोरूम मधे एक वेगळीच गाडी दिसली काहीशी जुनी होती पण त्या गाडीला वेगळी जागा होती, तीला वेगळ्या पद्धतीने सजवल होत. कुतुहल वाटल म्हणून आत गेलो.. एक चकचकीत कपड्यातला सेल्समन आला.”yes sir कुठली गाडी बघताय” नाही….म्हणजे हो बघतोय पण विकत नाही घ्यायची मला.. ही एव्हढी जुनी तुमच्या शोरूममधे कशी काय हा विचार करतोय. “सर ही vintage car आहे 1965 साली बडोद्याच्या महाराजांनी घेतली होती.”

का हो सगळ्या गाड्यांवर किमतीचा कागद लावला आहे या गाडीवर मात्र तो नाही.”सर ही विंटेज कार आहे हिची किंमत ठरवता येत नाही..ज्याला या गाडीच मोल कळेल तो कस्टमर ही गाडी घेईल. थोडक्यात ही गाडी महाग नाही तर मौल्यवान आहे.”

मी शोरूम मधून बाहेर पडलो..कसला तरी विचार येत होता मनामधे पण नक्की कळतं नव्हत काय ते..

असेच मध्ये काही दिवस गेले रोज मी येता जाता ती गाडी कौतुकाने बघायचो.

गुढी पाडव्याच्या दिवशी सुट्टी असल्याने सगळे घरीच होते.. ही गेल्या नंतरचा पाहिलाच गुढी पाडवा..जरा  उदासच होतो मी पण नातवाशी खेळण्यात वेळ जात होता.. “आबा तुला माहितीये का आमच्या शाळेच्या समोर ना 100 पेक्षा जास्त वर्षे जुने पिंपळाचे झाड होते रोड वायडिंग मधे ते पाडणार होते.. मग कुठले तरी लोक आले मोर्चा घेऊन आणि ते झाड दुसरीकडे नेऊन पुन्हा लावलं.. आमच्या टीचरनी सांगितलं ते झाड जुनं असलं तरी 24 तास ऑक्सिजन देत म्हणुन ते महत्वाचं आहे.”

त्या गाड्यांच्या शोरूम मधून बाहेर पडल्यावर जस वाटलं होतं तसच काहीसं वाटून गेलं.

सुनबाई म्हणाली “बाबा तुम्ही पूजा कराल का गुढीची..इतकी वर्षे आई करायच्या म्हणुन वाटत आज तुम्ही करावी..” मी पण तयार झालो..

आम्ही सगळे जेवायला बसलो सूनबाईने छान तयारी केली होती.. जेवायला तांब्याची ताट काढली.. मुलगा म्हणाला ” अगं आज तो काचेचा सेट काढायचा ना”

“अरे असू दे आईने पाहिल्या दिवाळसणाला दिला होता हा तांब्याच्या सेट… त्या सेट मधली आता फक्त ताटचं उरली आहेत म्हणुन मुद्दाम जपून ठेवली आहेत सणासुदीसाठी आईची आठवण म्हणून.”आणि सूनबाईने नकळत हातातले फडके खाली ठेवले आणि ती ताटं स्वतःच्या पदराने पुसली.

अचानक मला त्या शोरूम मधून बाहेर पडल्यावर मनात जो विचार आला होता त्याचा अर्थ कळायला लागला..मौल्यवान या शब्दाचा.. ती विंटेज गाडी, ते पिंपळाचे झाड काही तरी इशारा करत होते..

आता माझे मला समजले होते मी म्हातारा असलो तरी टाकाऊ नव्हतो..

आता मुलाच्या आणि सुनेच्या रोजच्या आयुष्याचा भाग होण्याचा अट्टाहास मी सोडून दिलाय स्वखुशीने.. कारण मला माहितीये त्यांच्या आयुष्यातील माझं स्थान त्या विंटेज कार सारखं आहे… एकदम स्पेशल..

✍ सौरभ साठे 

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पु.ल… विवाह  सोहळा. ☆ स्व सुनीता देशपांडे 

?इंद्रधनुष्य? 

(स्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (पु. ल. देशपांडे))

☆ पु.ल… विवाह  सोहळा ☆ स्व सुनीता देशपांडे  ☆

(महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे निवर्तल्याला १२ जून रोजी एकवीस वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांच्या लग्नाची ही कथा)

साठ-बासष्ट वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात जुवळे आडनावाचे एक शिक्षणप्रेमी गृहस्थ मुंबईच्या दादर-माटूंगा विभागात ‘ओरिएंट हायस्कूल’ नावाची शाळा चालवत होते. या ना त्या कारणाने इतरत्र प्रवेश मिळू न शकलेले विद्यार्थी आणि नोकरीच्या शोधत असलेले शिक्षक यांना या शाळेचा आधार होता. असाच भाईने (पु.ल. देशपांडे) त्या शाळॆत शिक्षक म्हणून प्रवेश केला आणि काही काळाने मीही! भाई वरच्या वर्गाना शिकवत असे आणि मी खालच्या वर्गाना. (तिथेच बाळ ठाकरे हा भाईचा विद्यार्थी होता आणि राज ठाकरेचे वडील श्रीकांत हा माझा विद्यार्थी होता.)

शिक्षक म्हणून काम करतानाच भाईची आणि माझी ओळख वाढत गेली आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. मग ‘आपण लग्न करूया’ असा भाईचा आग्रह सुरू झाला… वाढतच राहिला.

लग्न हे मला कृत्रिम बंधन वाटे. समजा, उद्या आपलं पटेनासं झालं, तर लग्नात ‘शुभ मंगल सावधान’ म्हणणारा तो भटजी किंवा नोंदणी पद्धतीने लग्न केलं असेल तर ते रजिस्टर करणारा तो कायदेतज्ज्ञ हे आपली भांडणं मिटवायला येणार आहेत का? मग त्यांच्या उपस्थितीची आपल्या लग्नाला गरजच काय? माझं ताठ मन वाकायला तयार नव्हतं आणि भाईचा आग्रह चालूच राहिला होता. शेवटी `माझ्यासाठी तू इतकंच कर. लग्नविधीला फक्त ‘हो’ म्हण. मग तू म्हणशील तशा लग्नाला माझी तयारी आहे,’  या त्याच्या आग्रहाला मी मान्यता दिली खरी! खरं तर तत्पूर्वी एकदा भाईचं लग्न झालेलं होतं. या गुणी मुलाला आपली लाडकी लेक देऊन मोठ्या थाटामाटात कर्जतच्या दिवाडकर लोकांनी त्याला जावई करून घेतला होता. पण लग्नानंतर १५-२० दिवसांतच ती मुलगी तापाने आजारी पडली आणि डॉक्टरी उपचारांचाही उपयोग न होऊन बिचारी मृत्यू पावली.

माझ्या आईने लेकीसाठी काही स्थळं हेरून ठेवली होती. एक तर तिला या बिजवराशी मी लग्न करणं मुळीच पसंत नव्हतं. शिवाय परजातीतला जावई हेही खटकत होतं. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आणि मी आमच्या गावी रत्नागिरीला आले. ‘भाईने टपाल घेऊन येणाऱ्या बसने यावे, ती गाडी आधी पोस्टात येते, तिथे टपालाच्या थैल्या टाकून मग गावात गाडीतळावर जाते. पोस्टाच्या कंपाऊंडला लागूनच आमचा वाडा आहे, मी त्याला उतरून घेऊन आमच्या घरी आणीन,’ असे मी भाईला सांगितले होते. प्रत्यक्षात भाई एकटाच न येता त्याचा भाऊ उमाकांत आणि जुवळे सरांचा हरकाम्या बाळू तेंडुलकर यांच्यासह आला. मी आप्पा-आईशी त्यांची ओळख करून दिली. त्यांनी उभयतांना वाकून नमस्कार केले आणि पुढल्या १०-१५ मिनिटांतच भाईने सर्वांना हसवून आपलेसे करून घेतले. ‘हसवण्याचा माझा धंदा’ या नावे पुढच्या काळात भाई रंगभूमीवर एक कार्यक्रम करत असे. माझा अनुभव मात्र सांगतो- हसवणं हा त्याचा धंदा नव्हता, त्याचा तो धर्मच होता.

पुढल्या ४-५ दिवसांत लग्न रजिस्टर करायचं होतं. त्यावेळी भरायचा छापिल फॉर्म आठ आण्याला मिळे, तेवढाही खर्च इतर कुणावर पडू नये म्हणून मी तो फॉर्मही विकत आणून ठेवला होता आणि आप्पांनाही दाखवला होता.

आमचे आप्पा – म्हणजे माझे वडील हे स्वत: रत्नागिरीतले नामवंत वकिल तर होतेच, पण संत प्रवृत्तीचा माणूस म्हणूनही त्यांचा लौकिक होता. भाई रत्नागिरीला आल्यावर दोन-तीन दिवसांतच लग्न रजिस्टर करून टाकावे, असे आई-आप्पांना मनातून वाटत होते. त्याप्रमाणे आप्पांनी कोर्टातून परतताना आपल्या वकील स्नेह्यांना “मुलीचं लग्न रजिस्टर करायचं आहे, साक्षीदार म्हणून सह्या करायला तुम्ही केव्हा येऊ शकाल?” असे विचारले आणि फॉर्म वगैरे सर्व तयार आहे, वगैरे सांगितले. त्यावर, “मग आत्ताच जाऊ या की!” म्हणून ते आप्पांबरोबरच निघाले.

रत्नागिरीचे मुख्य ऑफिस आमच्या शेजारच्या कंपाऊंडमध्ये होते. तसेच घरासमोरच जिल्हा न्यायालय होते. दुपारी आप्पा घरी परतत तेव्हा दुपारचा चहा होत असे. त्या सुमाराला आमच्या वाड्याला फाटकाची खिटी वाजली की आप्पा आले, असे आम्ही खूशाल मानत असू. आईने चहाला आधण ठेवले होते. खिटी वाजली म्हणून मी सहज तिकडे पाहिले, तर आप्पांच्या सोबत आणखी तीन-चारजण येताना दिसले. मी आईला ते सांगतच तिने आधणात आणखी चार-पाच कप पाणी वाढवले.

हे लोक साक्षीदार म्हणून सह्या करायला आले आहेत आणि पुढच्या दहा-पंधरा मिनीटांत आमचे लग्न होणार आहे, याची घरच्या आम्हाला कुणालाच पूर्वकल्पना नव्हती. उन्हाळयाचे दिवस. वधू घरच्याच साध्या, खादीच्या सुती साडीतच होती आणि नवरदेव घरी धुतलेल्या पायजम्यावर साधा, बिनबाह्यांचा बनियन घालून, चहाची वाट पाहत, गप्पा मारत ऊर्फ सर्वांना हसवत बसलेले. आप्पांनी आल्या आल्या मला हाक मारली. जावयाशी त्या लोकांची ओळख करून दिली आणि त्या फॉर्मवर आम्हा उभयतांना त्या साक्षीदारांसमोर सह्या करायला सांगितले. आमच्या आणि साक्षीदारांच्याही सह्या झाल्या आणि लग्न ‘समारंभ’ संपला. नेहमीच्या दुपारच्या चहाबरोबरच लग्नही झाले आणि माझ्या लक्षात आले की, आपण केवळ त्या छापील फॉर्मवर सह्या करून ‘कु. सुनीता ठाकूर’ हिचे नाव ‘सौ. सुनीता देशपांडे’ करण्याचे काम फक्त आठ आण्यात आणि दोन-चार मिनीटांत उरकले.

एका योगायोगाचे मात्र मला नवल वाटते. आमच्या या लग्नाच्या दिवसाची तारीख होती १२ जून, आणि त्यानंतर बरोबर चोपन्न वर्षांनी १२ जूनलाच भाईचा मृत्यू झाला. आठ आण्यात आणि दोन-तीन मिनिटांत जोडलेलं ते लग्नबंधन तुटलं. पण त्या चोपन्न वर्षाचं एकत्र जीवन खूप रंगीबेरंगी आणि एकूण विचार करता खूप संपन्नही जगलो खरं!

 – स्व. सुनीता देशपांडे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print