मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हैदराबाद मुक्ती-संग्राम – भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ हैदराबाद मुक्ती-संग्राम – भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(राष्ट्रसेविका समितीच्या यावर्षीच्या हस्तलिखितामघ्ये  सुश्री पुष्पा प्रभुदेसाई यांच्या या लेखाची निवड झाल्याबद्दल ई – अभिव्यक्ती समूहातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, व पुढील साहित्य-वाटचालीसाठी शुभेच्छा.)  

“शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट” हे गाणं मनावर रुंजी घालत होतं. आणि तेव्हाच ‘स्वातंत्र्याची गाथा’, मला डोळ्यासमोर दिसायला लागली. यावर्षी आपल्या भारतमातेला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत आहेत. अमृत महोत्सव साजरा होत आहे.गेल्या 75 वर्षांचा लेखाजोखा पहाण्याची आज गरज आहे. स्वातंत्र्यासाठी कित्येकजण आपल्या संसारावरच काय,पण आयुष्यावरही तुळशीपत्र ठेवून मृत्यूला सामोरे गेले आहेत. इंग्रजी सत्ता संपुष्टात आणण्यात यश मिळालं, पण तरीही पूर्णविराम झालाच नव्हता.

1947 पर्यंत 600 पेक्षा अधिक छोटी मोठी संस्थाने भारतात होती. त्यांना मर्यादित स्वायत्तता असली तरी, सार्वभौमत्व ब्रिटिशांचे होते. महात्मा गांधींची भूमिका, स्वातंत्र्याबरोबरच सरंजामशाही संपुष्टात आणून,खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापन होऊन, अखंड भारत व्हायला हवा, अशी होती. त्यावेळेचे गृहमंत्री श्री वल्लभभाई पटेल यांनी संस्थानिकांशी बोलणे करून, त्यांना पटवून, भारतात विलीन करून घेतले. शेवटी काश्मीर 27 ऑक्टोबर 1947 ला,आणि जुनागढ 20 फेब्रुवारी 1948 ला विलीन झाले. शेवटी राहिले ते हैदराबाद संस्थान. 1900 साली एका करारान्वये,ब्रिटिशांचे संरक्षित राज्य म्हणून दर्जा असलेले हैदराबाद संस्थान, लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे होते. शिवाय दक्षिण- उत्तर भारताच्या मध्ये, म्हणजे भारताच्या ह्रदय स्थानावर असल्याने,  व्यवस्थापनाच्या दृष्टीने अवघड होते. महाराष्ट्र, कर्नाटक, आणि तेलंगणाचे भाग मिळून हे संस्थान होते.तीनही भाषा तेथे बोलल्या जात होत्या. 85 टक्के लोक हिंदू होते. उरलेले मुसलमान, ख्रिश्चन, अशी विभागणी होती. वल्लभभाई पटेल यांची वर्षभर निजामाबरोबर बोलणी चालू होती. पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. स्वातंत्र्यप्राप्तीच्यापूर्वीच 11 जून 1947 रोजी निजामाने, ” आपण कोणत्याही संघराज्यात सामील होणार नाही”,अशी घोषणा केली. ‘आपल्या संस्थानाला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळू शकतो ‘, अशी स्वप्ने तो पहात होता. हैदराबादला समुद्रकिनारा नसल्याने, पोर्तुगीजांकडून गोवा आपण विकत घ्यावे व बंदर वापरण्याचे अधिकार मिळवावेत, असे त्याचे प्रयत्न सुरू झाले.

निजाम उल मुल्क म्हणजे जगाचा प्रशासक. ती एक पदवी होती.सात निजामांनी मिळून, दोनशे वर्षे हैदराबादवर राज्य केले. हा शेवटचा निजाम म्हणजे, उस्मान अली खान.जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती !. त्याकाळात त्याची संपत्ती 250 अरब अमेरिकी डॉलर, शिवाय सोने, आणि आभूषणांची भांडार होती.स्वतःला तो अहम समजत होता. राज्यकारभारात अल्पसंख्य मुस्लिमांना प्राधान्य देऊन, हैदराबाद इस्लामी संस्कृतीचे केंद्र बनावे,यादृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू झाले.

त्या काळात लोकमान्य टिळकांनी शाली बंडा येथे गणेशोत्सवाची सुरुवात केली. आणि पुढे याची व्याप्ती वाढत गेली.त्यामुळे जनतेत चेतना निर्माण झाली. हैदराबादची  जनता भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा  हा एक भाग समजत होती. राज्यात तिरंगा फडकवता  येत नव्हता. मुल्ला अब्दुल कयूम खानानेही  स्वदेशी आंदोलनात भाग घेतला. इतकेच नाही तर,त्याने गणेशोत्सवालाही पाठिंबा दिला होता. रँड खून खटल्यातील चाफेकर यांना सहा महिने हैदराबादला लोकांनी लपवून ठेवले होते. अखेर निजामाच्या पोलिसांनी त्यांना इंग्रजांच्या स्वाधीन केले. न जुमानणाऱ्या ‘ शौकत उल इस्लाम ’ सारख्या सुधारणावादी वृत्तपत्रांची मुस्कटदाबी सुरू झाली. १८८५ च्या काँग्रेसच्या स्थापनेनंतर, जनमत त्यांच्या बाजूनेच होते.पण निजामाने त्यांच्याविरोधात जायला सुरुवात केली. वृत्तपत्रांवर निर्बंध घातले. प्रत्यक्ष भूभागातील 40 टक्के भाग जमीनदारांचा, आणि 60 टक्के निजामाचा. प्रत्यक्ष कारभार असा होता. बेहिशोबी सारावसुली, वेठबिगारी पद्धती, राबवून घेणं, शेतकऱ्यांकडून सक्तीने कामे करून घेणं, जुलूम जबरदस्ती, कर्जफेड न झाल्यास जमिनी बळकावून त्यांना भूमिहीन करणे, हे प्रकार चालू होते. असह्य होऊन अखेर जनता असंतोषाने पेटली. 1946 मध्येच सरंजामशाही विरोधात चळवळ सुरू झाली.  चितल्या ऐलम्मा या नावाच्या एका कर्तबगार स्त्रीने आंदोलनाला सुरुवात केली. आणि ते नंतर 4000 खेड्यात पसरले. दलित समाजानेही संघटित होऊन चळवळ सुरू केली. जनतेने विलीनीकरणासाठी सशस्त्र आंदोलन व सत्याग्रह करायला सुरुवात केली. स्वामी रामानंद तीर्थ,  गोविंद भाई श्रॉफ, नारायण रेड्डी,बाबासाहेब परांजपे यांच्या नेतृत्वाखाली,जीवाची पर्वा न करता, संग्राम सुरु केला, व संस्थानच्या कानाकोपऱ्यापर्यंत पिंजून काढला. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हैदराबाद मुक्ती लढ्याचे साक्षेपी अभ्यासक होते.

क्रमशः....

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पेडोंगी ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ पेडोंगी ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

★★★ पेडोंगी (१९६२ – ९८) ★★★

पेडोंगी नाव वाचून आपण बुचकळ्यात पडू. पेडोंगी हे नाव एका खेचराचं आहे. खरे तर माणसांची किंमत नसणाऱ्यांना ह्या खेचराच्या नावाचा गंधही नसेलच. पण ही कोणी साधीसुधी खेचर नाही, तर भारताच्या संरक्षणात आपलं आयुष्य तिने वेचलेलं आहे. भारतीय सेनेचा एक अविभाज्य भाग म्हणजेच खेचरं. सद्यस्थितीला भारतीय सेनेत ६००० पेक्षा जास्ती खेचरं काम करत आहेत. भारताची सरहद्द उत्तरेत हिमालयाच्या उंच शिखरांनी वेढलेली आहे. समुद्रसपाटीपासून १७,००० फुटापर्यंत जाणाऱ्या शिखरांवर भारतीय सैनिक डोळ्यात तेल घालून भारताच्या सरहद्दीचं संरक्षण करतो. भारतीय सेनेच्या अनेक पोस्ट ह्या अश्या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी कोणतंच वाहन आजही जाऊ शकत नाही.  जिकडे स्वतःचा जीव वाचवणं कसरत असते, तिकडे दारुगोळा, रसद आणि इंधन अश्या गोष्टी वाहून नेणं किती कठीण असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो. ह्याच कठीण काळात भारतीय सेनेच्या मदतीला आजतागायत धावून आली आहेत ती खेचरं. अतिउंचावरील अतिशय थंड आणि विरळ हवेत ही खेचरं काम करू शकतात. अतिशय खडकाळ आणि निसरड्या वाटेवरून मार्गक्रमण करू शकतात.  ह्या पलीकडे खेचरं अतिशय प्रामाणिक असतात. त्यामुळेच आजही भारतीय सेनेचा कणा बनून भारताच्या रक्षणात आपला सहभाग देत आहेत.

पेडोंगीचं खरं सैनिकी नाव होतं Hoof Number 15328. १९६२ साली पेडोंगी भारतीय सैन्यात दाखल झाली. त्या काळात आधुनिक संपर्कप्रणाली आणि प्रगत वाहनं  नसताना भारतीय सैन्याची सगळी दारोमदार खेचरांवर अवलंबून होती. बॉम्बच्या स्फोटात, गोळ्यांच्या वर्षावात, निसर्गाच्या प्रकोपाला न जुमानता पेडोंगी आणि तिच्या सहकाऱ्यांनी भारतीय सैन्याला रसद पुरवण्याचं आपलं काम इमाने इतबारे पार पाडलं. १९७१ साल उजाडलं. भारत- पाकिस्तान युद्ध सुरु झालं. भारतीय सेनेला रसद पुरवताना पेडोंगीला पाकिस्तानी सैन्यानी पकडलं आणि आपल्या पोस्टवर बंदी बनवून, तिला पाकिस्तानी सैन्याला मदत करण्यासाठी जुंपलं. कोण म्हणतं प्राण्यांना भावना नसतात? भारताच्या सरहद्दीच्या रक्षणासाठी आपला जीव धोक्यात टाकणारी पेडोंगी संधी मिळताच पाकिस्तानी सैन्याला गुंगारा देऊन आपल्या पाठीवर असणाऱ्या मिडीयम मशीन गन आणि दोन बॉक्स गोळ्यांसकट निसटली. आपल्या जिवाची पर्वा न करता गोळ्यांच्या वर्षावात जवळपास २५ किलोमीटरचं अंतर कापून (२५ किलोमीटर अंतर १७,००० फुटांवर — पाठीवर एक मशिनगन आणि दोन बॉक्स गोळ्यांचं वजन घेऊन धावणं, ते ही शत्रूच्या प्रदेशात– काय असेल ह्याचा आपण विचारही करू शकत नाही.) भारतीय हद्दीत प्रवेश करून तिने भारतीय पोस्टवर आपली हजेरी नोंदवली.

तिचे आपल्या देशाप्रत असलेले प्रामाणिक  प्रेम बघून भारताच्या त्या पोस्टवरील बटालीयन कमांडरने आपल्या वरिष्ठ ऑफिसरना पेडोंगीच्या पराक्रमाची दखल घेण्याची शिफारस केली. १९८७ ला पेडोंगी भारतीय सेनेच्या 853 AT Company ASC मध्ये काम करत होती. २९ वर्षाची असणारी पेडोंगी सर्वात वयोवृद्ध खेचर होती.  पण त्या वयातही आपल्या पाठीवरचं सामान जवळपास १७,००० फूट उंचीवर वाहून नेत होती. ह्या युनिटचे कमांडिंग ऑफिसर मेजर चुनीलाल शर्मा ह्यांनी पेडोंगीच्या पराक्रमाची नोंद घेताना तिला सामान वाहण्यापासून मुक्त केलं. तिची ऑफिशियल नियुक्ती 53 AT Company ASC कंपनीची (देवदूत) ताईत म्हणून केली. ह्या युनिट च्या १९८९-९० च्या ग्रीटिंग कार्डवरही पेडोंगीला तिच्या सेवेसाठी स्थान दिलं गेलं. ह्याच युनिटसोबत तिची नियुक्ती बरेली, उत्तर प्रदेश इकडे नंतर झाली. इथल्या खूप मोठ्या परिसरात पेडोंगीने आपला काळ आरामात व्यतीत केला.

१९९२ ला पेडोंगीला एका खास कार्यक्रमासाठी दिल्लीला नेण्यात आलं. तिकडे २२३ व्या कॉर्प्स दिवसाच्या कार्यक्रमात पेडोंगीला तिच्या पराक्रमासाठी, देश सेवेसाठी, कर्नल गिरधारी सिंग ह्यांच्या हस्ते मखमली निळ्या घोंगडीने सन्मानित करण्यात आलं. त्याच वेळेस तिला तिचं नावं ‘पेडोंगी’ हे देण्यात आलं. उत्तर सिक्कीममध्ये असलेल्या पेडोंग ह्या युद्धभूमीच्या नावावरून तिचं नामकरण करण्यात आलं. भारतीय सेनेत अतुलनीय शौर्य, सेवा देणाऱ्या घोडयांना आजवर नाव देण्याचा सन्मान मिळालेला होता.  पण पेडोंगी ही पहिली खेचर होती, जिला हा सन्मान देण्यात आला.

 ह्यानंतरचा काळ पेडोंगीने बरेलीतच व्यतीत केला. १९९७ ला पेडोंगीच्या सेवेची नोंद ‘ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ‘ने घेताना “ जगातील कोणत्याही सेनेसाठी सर्वात जास्त कालावधीसाठी सेवा देणारी खेचर “ असं तिचं नाव सुवर्णअक्षरांनी कायमच नोंदवलं. २५ मार्च १९९८ ला पेडोंगीने अतिशय समाधानाने अखेरचा श्वास घेतला आणि एका युगाचा अंत झाला.

असं म्हणतात की खेचराला एकदा रस्ता दाखवला की पुढल्या आख्या आयुष्यात, तो तुम्हाला रस्ता दाखवेल. पण पेडोंगीचा पराक्रम अभूतपूर्व असा होता. आपला शत्रू कोण, मित्र कोण हे ओळखताना संपूर्ण आयुष्य तिने १७,००० फुटांवर भारतीय सरहद्दीचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी वेचलं. ही पण एक प्रकारची देशभक्तीच आहे. कोणी म्हणेल की पेडोंगीला रस्ता माहीत होता म्हणून ती परत आली. पण मग एकटी तीच का? तिच्यासोबत पकडलेली इतर खेचरं  आली नाहीत.  पण ती जिवावर उदार होऊन परत आली. पेडोंगीला आज जाऊन २२ वर्षाचा कालावधी झाला.  पण आपलं जीवन भारतासाठी समर्पित करणारी पेडोंगी भारतीयांच्या मनात आजही उपेक्षित आहे ही एक खंत आहे. तिचा भीमपराक्रम, देशभक्ती, आणि कार्य हे शब्दांपलीकडचं आहे. 

देशासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या पेडोंगीला माझा कडक सॅल्यूट, आणि तिच्या स्मृतीस माझा साष्टांग नमस्कार.

संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मी आहे तुझाच…. ☆ संग्राहक – कालिंदी नवाथे

? इंद्रधनुष्य ?

☆ मी आहे तुझाच….☆ संग्राहक – कालिंदी नवाथे ☆ 

काही वर्षांनी पुन्हा तो आयुष्यात डोकावला,

माझ्याविना आयुष्य कसं वाटतंय ? कानाशी पुटपुटला… ठीक चाललं आहे…. मी म्हटलं 

 

संसाराच्या गाड्यात सहाजिकच तुझं थोडं विस्मरण झालं..

अस्तित्वावर बोट ठेवायला पुन्हा का येणं केलंस ?

 

रोजच्या धावपळीत स्वतःलाच विसरले होते..

चाकोरीत फिरताना नकळत  तुझे बोट सोडले होते..

 

शाळा कॉलेजमध्ये तू सोबत होतास म्हणून

अशक्य ते शक्य झालं,

मेहनतीने का असेना यशाचं शिखर गाठता आलं…

 

आता संसारात सगळ्यांसाठी तडजोड करावी लागते, कधी मनही मारावं लागतं…

एवढं करूनही हिला काही येत नाही असं त्यांना वाटतं…

 

दोन पुस्तकं शिकून मुलं शहाणी होतात..

पहिला गुरु आई,

हेच नेमकं विसरतात..

 

नवऱ्याच्या पाठीशी बायको

खंबीरपणे उभी रहाते,

पण कौतुक सोडून,

‘वेंधळीच आहेस बघ’ हेच ऐकायची सवय होते…

 

मी मात्र मागे राहिले..

स्वतःसाठीचं जगायचं विसरले…

मित्रा आता घे परत हातात हात, पूर्वीसारखी असू दे तुझी कायम साथ..

 

तो म्हणाला, मिळवण्यासाठी मला कणखर व्हावं लागतं,

नवा दिवस उगवण्यासाठी तर पृथ्वीलाच सूर्याभोवती फिरावं लागतं…

 

हसून विचारलं त्याला आहेस कोण एवढा खास ?

तो ही हसला.. म्हणाला,

ओळखलं नाहीस अजून..?

मी आहे तुझाच….

आत्मविश्वास

संग्राहक :– कालिंदी नवाथे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मावशी नावाचे सुख ☆ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

?इंद्रधनुष्य?

मावशी नावाचे सुख ☆ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

मावशी बरोबरचं नातं खरंच खूप छान असतं . हे नातं भावनिक पातळीवर खूप आनंद देणारं असतं.

मावशी भरभरून प्रेम देते…

आपल्या जन्माआधीच, म्हणजे अगदी आपण आईच्या पोटात असतानाच मावशीची आणि आपली एक वेगळीच अदृश्य नाळ जोडलेली असते…

आपल्या जन्माने तिला झालेला आनंद अवर्णनीय असतो.

खरंच मावशी नेमकी कोण असते हो ???

आई नसताना तुमच्यासाठी तुमची हक्काची माया देणारी ,

मावशी.. ही तुमची प्रेमळ हाक ऐकताच तुम्हाला भरभरून प्रेम देणारी…

आपल्या आवडीचं , लपवून ठेवलेलं  खाऊ घालणारी…

आपल्या लहानपणाची साक्षीदार , आपल्या लहानपणीच्या आठवणी तिच्याशिवाय पूर्ण होत नाहीत…

तिचं वाढणारं वय आणि त्यामुळे वाढणार्‍या जबाबदार्‍या आपल्याला तिच्यापासून दूर करतात , पण ते तुम्हाला आवडलेलं नसतं , तुमच्याही नकळत…

‘तू अगदी तुझ्या मावशी वर गेलायेस’… असं कोणी म्हटलं तर एक वेगळंच स्मित हसू आपल्या चेहर्‍यावर उमटतं…

अगदी आजही मावशीसाठी आपण कोण असतो ???

आपल्या जन्मापूर्वीपर्यंत तिला कदाचित लहान मुलं अजिबात आवडत नसावीत…!!!

पण , तरीही तुम्हाला पहिल्यावर तिच्या पोटात मायेचे झरे लोटतातच कसे ??? का कुणास ठाऊक…!!!

आपल्या लहानपणी तुमची केअरटेकर , तुमच्या आईची हक्काची असिस्टंट अशा जबाबदार्‍या तिने यथार्थ पार पाडलेल्या असतात…

आपल्यासाठी एखादं म्हणून गिफ्ट घ्यायला ती जाते … आणि  प्रत्यक्षात … जे जे आवडेल ते ते तुमच्यासाठी ती घेऊन येते , अगदी सहज…

तुमची आवडनिवड मनापासून जपते अन् दर वाढदिवसाला काहीतरी तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट देते…

सर्वात महत्वाचं म्हणजे… तुमच्याप्रती तिची माया आटतंच नाही, तिचे स्वतःचे मूल  झाल्यावरही…

आईएवढेच तुमचे लाड करणारी , कशाचीही अपेक्षा न ठेवणारी , तुमच्या आई-वडिलांची ती सावली असते…

 

संग्राहक : – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डालडा…भाग 2 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ डालडा…भाग 2 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

( भारतात आल्यावर टाटा ऑईल मिल्स येथे कंपनीचे डायरेक्टर कपिलराम वकील यांचे मुख्य मदतनीस म्हणून ते नोकरी करू लागले.) इथून पुढे —–

डालड्याचा शोध एका मराठी माणसाने लावला होता.

पहिल्या महायुद्धाचा हा काळ होता. सैनिकांना  लोण्याची आवश्यकता असायची. पण ते सर्वाना पुरेसं मिळणं  शक्य नव्हतं. थिजवलेल्या तेलापासून लोण्याचा स्वस्त पर्याय म्हणून सैन्यात मार्गारीन वापरायला लागले. ते लोकप्रिय झाले व ते स्वस्त असल्यामुळे मागणी वाढत गेली.

पण भारतीय सैनिकांकडून मात्र या मार्गारीनपेक्षा तुपाची मागणी जास्त व्हायची.

याच काळात जगभरातील संशोधक साजूक तुपाला पर्याय शोधण्याच्या मागे लागले होते.  विशेषतः अमेरिका व जपान मध्ये गोडेतेलापासून तूप तयार करण्याचे प्रयत्न सुरू होते, पण त्यांना यश मिळत नव्हते. पण टाटा कंपनीमध्ये नारायणराव भागवत आणि कपिलराम या दोघांनी त्यात यश मिळवले.

पहिले नैसर्गिक तूप भारतात तयार झाले.

ही गोष्ट टाटा कंपनीचे वित्तीय सल्लागार असलेल्या पिटरसन या गोऱ्या अधिका-याला कळली. त्याने या कृतीची मागणी त्यांच्याकडे केली. पण भागवत आणि कपिलराम उत्तरले, ‘‘या क्षेत्रात आम्ही शोधकर्ते ठरलो आहोत, तर मग त्याचा फायदा आमच्या देशालाच झाला पाहिजे. आमच्या देशालाच त्याचे श्रेय मिळायला हवे ’’.

इंग्रजांच्या सत्तेचा काळ होता. आपण ज्यांच्यावर राज्य करतो ते भारतीय लोक आपली आज्ञा मानत नाहीत याचा राग त्या पिटरसनच्या मनात आला. त्याने थेट टाटांच्या या कंपनीची आर्थिक नाकेबंदी केली. टाटांना ही कंपनी बंद करावी लागली.

कपिलराम आणि नारायणराव दोघेही बेकार झाले. जवळपास सात वर्ष नारायणराव बेकार होते. अमेरिकेतील एक अतिशय चांगल्या पगाराची नोकरी त्यांना चालून आली होती.  पण ‘ वनस्पती तुपाच्या’ शोधाचे श्रेय आपल्या देशालाच द्यायचे ‘ या हट्टापायी त्यांनी ती नाकारली.

या  काळात त्यांच्या एका बहिणीने आपल्या शिक्षिकेच्या नोकरीतून त्यांच अख्खं कुटुंब संभाळलं.

अखेर सात वर्षानी कपिलराम यांनी गुजरातमध्ये सॉल्ट कंपनी सुरु केली व नारायणरावांना तिथे नोकरी मिळाली. या दोघांच्या जोडीने तिथेही रसायनशास्त्रात अनेक महत्त्वाचे शोध लावले. पुढे ही कपिलराम यांची कंपनी टाटांनी विकत घेतली आणि तिचं नांव ठेवलं—” टाटा केमिकल्स “ .

टाटा केमिकल्सची मुख्य जबाबदारी कपिलराम आणि नारायणराव यांच्याकडेच होती.

सर्व घडी नीट बसलेली असतानाच अचानक नारायणरावांना गुजरात सोडून परत यावं लागलं. त्याच्या वडिलांना पॅरालिसीसचा झटका आला होता. मुंबईत येऊन त्यांनी आपले मित्र अनंतराव पटवर्धन यांच्याबरोबर साबण आणि बाकीच्या कंपन्यांना लागणारी केमिकल्स बनवणारी ‘ अनार अँड कंपनी ’ सुरू केली.

याच काळात लिव्हर ब्रदर्सनी भारतात ‘ हिंदुस्तान वनस्पती मॅन्युफॕक्चरिंग ‘ नांवाची कंपनी स्थापन केली होती.

त्यांनी डाडा या डच कंपनीबरोबर करार केला आणि भारतात सेवर येथे वनस्पती तूप बनवणारी फॅक्टरी सुरु केली. हे वर्ष होतं १९३७. पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना संपूर्ण जगभरात वनस्पती तूप पाठवण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आणि तिथून वनस्पती तूप म्हणजे डालडा हा अगदी समानार्थी शब्द पडून गेला,

वनस्पती तुपाचा शोध प्रत्यक्षात नारायणराव भागवत यांनी लावला होता हे जगाबरोबरच आपणही विसरून गेलो,  हे आपले दुर्भाग्य होय. 

नारायणराव भागवतांच्या मुलींनीही त्यांच्या घरची उच्च शिक्षणाची परंपरा पुढे नेली. त्यांच्या दोन्ही मुली म्हणजे सुप्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका दुर्गा भागवत, आणि भारतातल्या पहिल्या डॉक्टरेट मिळवणाऱ्या कमलाबाई भागवत सोहनी. त्यांच्या रूपाने भागवत कुटुंबाचं नाव अजरामर राहिले आहे.

समाप्त

संदर्भ : विज्ञान विशारद, लेखिका – वसुमती धुरू – ग्रंथाली प्रकाशन.

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डालडा…भाग 1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ डालडा…भाग 1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

डालड्याचा शोध एका मराठी माणसाने लावला होता.

डालडा सगळ्यांनाच माहित आहे. एकेकाळी हे पिवळे डब्बे प्रत्येकाच्या घरात दिसायचे. साजूक तुपाचा सब्स्टिट्यूट असलेला हा डालडा–त्याचा तो डबाही मोकळा झाल्यावर भरपूर कामांसाठी उपयोगी पडायचा. तो आपल्या जेवणाशी आणि जीवनाशी एवढा जोडला गेला होता, की डालडा हा एक ब्रँड आहे आणि पदार्थाचं  नाव वनस्पती तूप आहे हे आपण विसरूनच गेलो होतो.

हो वनस्पती तूप– एकेकाळी याच वनस्पती तुपाने संपूर्ण दुसऱ्या महायुद्धात सैनिकांना जगवलं होतं. पण गंमत अशी की आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं  की हे वनस्पती तूप परदेशात शोधलं गेलंय. तर तसं  नाही. या वनस्पती तुपाचा शोध एका मराठी माणसाने लावला आहे.

नारायणराव बाळाजी भागवत हे त्या माणसाचे नाव. 

भागवत घराणे हे मूळचे पंढरपूरचे. घरात अगदी गर्भश्रीमंती होती. पण नारायणरावांचे वडील त्यांच्या वडिलांशी भांडून निराधार अवस्थेत मुंबईस आले. तिथेच हमाली वगैरे करून शिक्षण घेतलं.  मॅट्रिकच्या परीक्षेत  त्यांना मानाची  “जगन्नाथ शंकरशेठ” शिष्यवृत्ती मिळाली. आपल्या मेहनतीने शिक्षण पूर्ण करून ते वकील झाले. नंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. नंतर बाळाजी भागवत इंदोरच्या होळकर संस्थानचे दिवाण बनले.

बाळाजी भागवतांची पत्नी ही त्या काळातली, म्हणजे एकोणिसाव्या शतकातली मॅट्रिक होती, आणि इंग्रजी पुस्तके वाचणे हा तिचा छंद होता.

अशा सुशिक्षित माता-पित्यांच्या पोटी १८८६ मध्ये नारायणरावांचा जन्म झाला. नारायणराव व त्यांची भावंडे अभ्यासात हुशार होती. नारायणरावांनादेखील  आपल्या वडिलांच्याप्रमाणे “जगन्नाथ शंकरशेठ” स्कॉलरशिप मिळवायची होती. त्यासाठी ते संस्कृत भाषेचा अभ्यास फार जोमाने करत होते. पण त्यांच्याच एका आप्ताने त्यांना सांगितले, “ नारायणा, तुझी आर्थिक स्थिती उत्तम आहे, तुझे शिक्षण तुझे आई-वडील सहज करू शकतात. त्यामुळे उगीचच जगन्नाथ शंकरशेठ मिळवून तू दुस-या एका हुशार पण गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण पैशाअभावी अडवू नकोस. आणि जो काही अभ्यास करशील तो आनंदासाठी कर, काही मिळवायचे असे ध्येय ठरवून करू नकोस. “

हा सल्ला नारायणरावांना जन्मभर मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरला. नारायणराव भागवतांनी मुंबईच्या झेवियर्स कॉलेजमधून  रसायनशास्त्रात डिग्री घेतली. याच काळात सर जमशेदजी टाटांच्या संकल्पनेतून कर्नाटकातील बेंगलोरमध्ये “ इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स ”ची स्थापना झाली होती.

भारतातील हे पहिले मूलभूत संशोधन केंद्र होते. नारायणरावांनी तिथल्या पहिल्याच बॅचमध्ये प्रवेश घेतला. रसायनशास्त्रात त्यांनी ऑईल्स आणि फॅट्स यावर संशोधन केले.

ते टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सची संशोधन पदवी पूर्ण करणारे पहिले विद्यार्थी ठरले. त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या भावाने देखील याच संस्थेत प्रवेश घेतला.

पास आउट झाल्यावर नारायणराव येमेन देशातील एडनला गेले. तिथे त्यांच्या वडिलांच्या मित्राचा,  इब्राहिमभाई लालजी यांचा, साबणाचा कारखाना होता. त्यांनी तिथे त्यांना मदत करण्यास सुरवात केली. त्यांच्याच घरात त्यांच्या मुलासारखे राहिले.

पुढे १९१९ मध्ये पत्नीचे निधन झाल्यावर ते भारतात परत आले. भारतात आल्यावर टाटा ऑईल मिल्स येथे कंपनीचे डायरेक्टर कपिलराम वकील यांचे मुख्य मदतनीस म्हणून ते नोकरी करू लागले.

क्रमशः….. 

संदर्भ : विज्ञान विशारद, लेखिका – वसुमती धुरू – ग्रंथाली प्रकाशन.

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खिलाडू वृत्ती जिथे गगनाला गवसणी घालते. ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

? इंद्रधनुष्य ? 

☆ खिलाडू वृत्ती जिथे गगनाला गवसणी घालते ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ☆ 

टोकियो ऑलिंपिकच्या पुरुषांच्या उंच उडी प्रकारातील स्पर्धा शेवटच्या टप्प्यात शिगेला पोहोचली होती…इटलीचा Gianmarco Tanberi व कतारचा Murtaz Essa Barshim हे दोघे, अटीतटीच्या प्रयत्नाने सुवर्णपदक जिंकायचेच या ईर्ष्येने जीवाची बाजी पणाला लावत होते…प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दोघांनी २.३७ मीटर उंचीचा टप्पा बरोबरीनेच कसाबसा, आटोकाट प्रयत्नांती ओलांडला होता. आता प्रत्येकाला पुढील टप्पा तीन प्रयत्नात ओलांडायचा होता…पण दोघेही तो टप्पा तीन प्रयत्नांतीही  ओलांडण्यात अपयशी ठरले. आता ही कोंडी कशी फुटणार ? मोठा गहन प्रश्न उभा ठाकला. ऑलिंपिक अधिकाऱ्यांनी दोघांना आणखी एक संधी देऊन हा पेचप्रसंग सोडवण्याचे ठरवले. पण यापूर्वीच तीन प्रयत्नादरम्यान इटलीच्या खेळाडूच्या- Gianmarco Tanberi च्या पायाला गंभीर दुखापत झाली होती व नाईलाजाने शेवटची संधी घेण्यास आपण असमर्थ असल्याचे सांगत त्याने स्पर्धेतून माघार घेतली. याचा अर्थ कतारचा खेळाडू Murtaz Barshim यास विजयी घोषित करून त्यास सुवर्णपदक दिले जाईल, याची त्याला कल्पना होती. पण त्याचा नाईलाज होता…‌आणि येथे खिलाडूवृत्तीचे विस्मयकारी दर्शन Murtaz Barshim ने दाखवले. त्याने जास्तीचा एक प्रयत्न आजमावून पाहण्याचीही गरज नव्हती. तो गप्प बसला असता तरीही त्यास सुवर्ण पदक मिळाल्याचे घोषित झाले असते. पण त्याने उमदेपणा दाखवित, “मी सुद्धा माघार घेतली तर आम्हा दोघांनाही सुवर्णपदक विभागून दिल्याचे घोषित केले जाईल का? “, अशी पृच्छा ऑलिंपिक अधिकाऱ्यांकडे केली. त्यांनी विचारविमर्श करून —

‘दोघांनाही ते पदक विभागून मिळेल ‘ असे कळवले..‌‌.कतारच्या खेळाडूने आपली पण माघारी घोषित केली व इटलीच्या खेळाडूला गगन ठेंगणे झाले ! आणि कतारच्या खेळाडूने- Murtaz Barshim नेही सुवर्णपदक न चुकवता ही सर्वोच्च कोटीची खिलाडूवृत्ती आपण दाखवू शकलो, या आनंदाने आपल्या प्रतिस्पर्ध्याला मिठी मारली !

पात्रता नसतांनाही स्वयंघोषित सन्मान मिरवणारे ‘ वीर’ कुठे आणि सन्मानाचा हव्यास न दाखवणारे हे ऑलिंपियन कुठे ? बडा जिगरा चाहिए उमदेपणासाठी !

संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पत्त्यांची गंमत ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ? 

☆ पत्त्यांची गंमत  ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुठ्ठ्याचे  किंवा प्लास्टिकचे बनविलेले असतात. बदाम, इस्पिक, किल्वर आणि चौकट,  या चार प्रकारात प्रत्येकी १३ पत्ते मिळून ५२ पत्त्यांचा संच होतो.

पत्त्यांची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दश्शी पर्यन्त, मग गुलाम, राणी, राजा, आणि  याशिवाय 2 जोकर असतात.

१) ५२ पत्ते म्हणजे ५२ आठवडे

2) ४ प्रकारचे पत्ते म्हणजे ४ ऋतु.  प्रत्येक ऋतूचे १३ आठवडे.

3) या सर्व पत्त्याची बेरीज ३६४ 

४) एक जोकर धरला तर ३६५ म्हणजे १ वर्ष.

५) 2 जोकर धरले तर ३६६ म्हणजे लीप वर्ष.

६) ५२ पत्यातील १२ चित्रपत्ते म्हणजे १२ महिने

७) लाल आणि काळा रंग म्हणजे दिवस आणि रात्र.

पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ

१) दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश

2) तिर्री म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश

3) चौकी म्हणजे चार वेद ( ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद,आणि अथर्ववेद, )

४) पंजी म्हणजे  पंच प्राण (प्राण, अपान, व्यान, उदान ,समान)

५) छक्की म्हणजे षड्रिपु (काम ,क्रोध,मद,मोह, मत्सर,लोभ)

६) सत्ती- सात सागर

७) अठ्ठी – आठ सिद्धी

८) नववी- नऊ ग्रह

९) दश्शी – दहा इंद्रिये

१०) गुलाम- मनातील वासना

११) राणी- माया

१२) राजा-सर्वांचा शासक

१३) एक्का- मनुष्याचा विवेक

१४) समोरचा भिडू – प्रारब्ध

पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते!!!

 

 संग्राहक : — सुहास सोहोनी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अर्धा ग्लास ☆ संग्राहक – श्री माधव केळकर

?इंद्रधनुष्य? 

☆ अर्धा ग्लास ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

हॉटेलमध्ये वेटरकडून किंवा इतर ठिकाणी कुणाकडूनही पिण्यासाठी पाणी घेताना कृपया फक्त दोन शब्द म्हणा..‘ अर्धा ग्लास ‘–  कारण आपले दोन शब्द कुणाचे तरी प्राण वाचवू शकतात .

खरं वाटत नाही आहे ना– मग हा संदेश नक्की पूर्ण वाचा .

आज काही मित्रांना भेटायला एका हॉटेल मधे गेलेलो. विषय अर्थातच पाण्याचा होता. गप्पा चालू होत्या.  विषय जसा-जसा पुढे सरकत होता, तसं एक गोष्ट पहात होतो– अनेक टेबल्सवर लोक बिल पे करून निघून जाताना पिऊन उरलेले पाण्याचे अर्धे ग्लास तसेच राहत होते… गोष्ट अतिशय नॉर्मल अन कित्येकदा स्वतः केलेलीही अन पाहिलेलीही…

आमच्याही टेबलवर जाताना मला 4 ग्लास अर्धेच दिसले. आमच्याच नकळत घडलेलं हे—

मनाला काहीतरी खटकत होतं.

मीटिंग संपली. सगळे बाहेर आलो. मित्रांना Bye करून परत हॉटेलमध्ये गेलो. परवानगी घेतली अन वेटर्सचा जो मॅनेजर होता त्याला भेटलो. 

म्हटलं, “ हे आता जे आमच्या टेबलवरचं चार अर्धे  ग्लास पाणी होतं, त्याचं काय केलं ? “ 

तो म्हटला, “  ज्या वेटरने टेबल क्लिअर केलं असेल, त्याने ते पाणी बेसिनमधे ओतून दिलं असणार,  तेच करतो आम्ही. त्या उष्ट्या पाण्याचा काही उपयोग नाही ना आता.! “ 

“  विक-डेज मधे तासाला अंदाजे किती लोक येत असतील? ‘ मी विचारलं

“ नाही म्हटलं तरी १५  ते 20 जण सरासरी– दुपारी लंचला अन रात्री डिनरला जास्त.” त्याने सांगितलं . 

मग मी त्याला म्हटलं, “  म्हणजे १0 तास हॉटेल चालू आहे असं पकडलं, तर साधारण सरासरी २५० जण एका दिवसात हॉटेलला येतात. हेच शनिवार रविवार दुप्पट होणार. त्यातून तुमचं हे छोटं हॉटेल. मोठ्या हॉटेल्सची हीच संख्या हजारात असणार ! म्हणजे सरासरी रोज ३५० जण. यातल्या साधारण 200 जणांनी जरी अर्धा किंवा एक ग्लास पाणी न पिता तसंच ठेवलं, तर अंदाजे १00 लिटर पाणी बेसिनमधे “रोज वाया”. म्हणजे एक हॉटेल कमीतकमी १00 लिटर “अतिशय चांगलं अन प्रोसेस्ड पाणी” बेसिन मधे रोज ओतून देतं. हे पाणी ड्रेनेजमधून जाऊन शेवटी नदीच्या इतर ‘घाण’ पाण्यात मिसळतं. “ 

पुण्यात सध्या अंदाजे छोटे मोठे पकडून ६000 च्या वर हॉटेल्स आहेत– म्हणजे दिवसाला 6000*100 लिटर– म्हणजे 6 लाख लिटर  प्यायचं पाणी आपण रोज नुसतं ओतून देतोय. आता या घडीला हे झालं एका दिवसाचं.  असं आठवड्याचं म्हटलं तर ४2 लाख लिटर, अन वर्षांचं म्हटलं तर 22 कोटी लिटर शुद्ध पिण्याचं पाणी आपण फक्त ओतून देतोय.

या पाण्याला शुद्ध करायचा आलेला खर्च वेगळाच.

हे झालं एका शहराचं– अशी महाराष्ट्रात कमीत कमी १५ मोठी शहरं आहेत .

बरं हे कोणत्या देशात घडतंय??—तर जिथं सरकारी आकडेवारीनुसार दर ४ तासाला एक जण ‘शुद्ध पाण्याअभावी’ होणाऱ्या डायरियासारख्या रोगाने मरतोय, त्या देशात.

म्हणजे एकीकडे लोक पाण्यावाचून तडपून मरतायत.  अन दुसरीकडे  एवढं शुद्ध केलेलं पाणी आपणच मातीत मिसळतोय.

आपण जे वाया घालवतोय, ते शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी आहे— ” उद्या शेतकऱ्याच्या गळ्यात पडणारे फास आपण आपल्या हातानेच एका बाजूला आवळत असताना, दुसऱ्या बाजूला आपणच त्यांना वाचवायच्याही बाता करतोय “…

हे सगळं थांबू शकतं, फक्त तुमच्या ओठातून येणाऱ्या “दोन” शब्दांनी….. 

इथून पुढं कधीही वेटर वा इतर कोणीही तुमच्यासमोर  ग्लासमधे पाणी ओतत असेल, तर त्याला फक्त एवढंच म्हणा —–’ अर्धा ग्लास !! ‘

ह्याने तुम्हाला लागेल एवढंच पाणी तुम्ही घ्याल अन उरलेलं पाणी वाचेल.  हॉटेलचं वाचलं म्हणजे नगरपालिकेचं, नगरपालिकेचं वाचलं म्हणजे धरणांचं अन धरणांचं वाचलं म्हणजे “आपलंच..!!”

हे वाचलेले पाणी शेतकऱ्याला वा पाण्याअभावी मृत्यु पावणाऱ्या लोकांना  मिळेल.

याची सुरुवात आपण फक्त दोन शब्द बोलायची सवय लावून करायची आहे.

फार छोटी गोष्ट,  पण तुमचे दोन शब्द तुमचेच 22 कोटी लिटर पाणी वाचवू शकतात. कृपया आपण जे निर्माण करत नाही, ते कमीतकमी वाचवूयात तरी … आपल्याच माणसांचे प्राण वाचवण्यासाठी…!!

 ( हाच उपाय आपण घरीपण करूया ) 

 

संग्राहक – सुश्री मानवी केळकर/श्री माधव केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीज्ञानेश्वरी ‘जयंती’चा रोचक इतिहास ☆ संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

? इंद्रधनुष्य ? 

☆ श्रीज्ञानेश्वरी ‘जयंती’चा रोचक इतिहास ☆ संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने ☆ 

भाद्रपद वद्य षष्ठी ही तिथी श्री ज्ञानेश्वरी जयंती म्हणून साजरी करण्यात येते. अर्थात श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी हा ग्रंथ या दिवशी लिहून पूर्ण केला असा काहींचा समज झाला असेल.  परंतू  ते खरे नाही. पैठणनिवासी शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांनी इ.स.१५८४ साली याच तिथीस या ग्रंथाची शुद्धप्रत तयार करुन पूर्ण केली. 

झाले असे की, समाधीस्थानात गळ्याभोवती विळखा घातलेली अजानवृक्षाची मुळी काढण्याच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वरमहाराजांनी संत एकनाथमहाराजांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि आळंदीला बोलावून घेतले. नाथमहाराज आळंदीला आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की , माऊलींची समाधी सापडत नाहीये. परिसरात चौकशी केली तर असे कोणते स्थान येथे असल्याचे खात्रीलायक कोणाला माहित नसल्याचे कळले. यदाकदाचित समाधी असली तरी ते स्थान नेमके कोणते हे सांगता येत नाही असे कळले.

आपल्याबरोबर आलेल्या भक्तमंडळीना इंद्रायणी नदीच्या तीरावर थांबायला सांगून नाथमहाराज तेथील जंगलसदृश्य परिसरात गेले. माऊलींच्या समाधीचा परिसर काट्याकुट्यांनी व्यापला होता. त्यातच परिसरात असलेल्या अनेकानेक समाध्या ! मग यातील नेमकी माऊलींची समाधी कोणती? हा प्रश्न पडला. मग एका स्थानावर बसून नाथ महाराजांनी माऊलींचे ध्यान लावले. (हे स्थान म्हणजे हल्ली माउलींच्या समाधी मंदिरात असलेला ‘शांतिब्रह्म श्री संत एकनाथमहाराज पार’ होय.) ज्ञानेश्वरमहाराजांनी समाधीच्या आत येण्याचा निर्देश केला.  त्याप्रमाणे नाथमहाराज नंदीखालील द्वारातून आत गेले. तेथे श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे ते दिव्य अलौकिक स्वरूप पाहून नाथ हरखून गेले.

श्री ज्ञानदेवे येऊनि स्वप्नात !

सांगितली मात मजलागी !!

दिव्य तेज:पुंज मदनाचा पुतळा !

परब्रह्म केवळ बोलतसे !!

अशी त्यांची भावना झाली. चर्चा सुरु असताना श्रीज्ञानेश्वरीमध्ये समाविष्ट झालेल्या, हेतुपुरस्सर टाकल्या गेलेल्या आगंतुक ओव्यांनी माऊली व्यथित झालेे असल्याचे नाथमहाराजांनी जाणले. त्यांना त्यात योग्य ती सुधारणा करण्यासाठी अधिकारसंपन्न व्यक्तीची आवश्यकता होती व ती नाथ महाराजांच्या रुपाने पूर्ण होणार होती. त्यामुळे अजानवृक्षाच्या मुळीचे निमित्त करुन माऊलींनी नाथमहाराजांना बोलावून घेतले होते. या दोन महात्म्यांचा श्रीज्ञानेश्वरीसंदर्भाने समाधीत तब्बल तीन दिवस संवाद चालला. 

तीन दिवस झाले तरी नाथमहाराज परत न आल्याने बरोबर आलेल्या भाविकांच्या मनात घालमेल होऊ लागली. भक्तांचे हाल होऊ नयेत यासाठी श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी वाण्याचे रुप घेतले व नाथ महाराजांनी तुमची शिधापाण्याची व्यवस्था लावण्याचे सांगितले असल्याचे त्यांना सांगितले. 

समाधीस्थानातून बाहेर आल्यावर सर्व भाविकांना माऊलींच्या समाधीचे दर्शन घडावे या हेतूने नाथ सर्वांना त्या स्थानी घेउन आले व सर्वांना माऊलींचे दर्शन घडविले. समाधीचा शोध लावल्यानंतर समाधीचा जीर्णोद्धार केला, मूळ गाभारा बांधला, मंदिर परिसर सुशोभित केला, नित्य पुजेची व्यवस्था लावली व आळंदीची कार्तिकीयात्रा पुन्हा सुरु केली. 

या नंतर वर्षभरातच श्री संत एकनाथमहाराजांनी श्रीक्षेत्र पैठण येथे श्रीज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. त्याची पूर्णता ज्या दिवशी झाली तो दिवस म्हणजे भाद्रपद वद्य षष्ठी ! आणि तोच दिवस 

“ श्रीज्ञानेश्वरी जयंती  ‘ म्हणून वारकरी संप्रदायात साजरा करण्यात येतो.

श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी इ स १२९० मध्ये ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली.  परंतू  समाप्तीची तिथी न लिहिल्याने श्रीज्ञानेश्वरी जयंतीचा नेमका दिवस कोणता ? हे सांगता येत नाही. 

पुढील काही काळात नाथमहाराजांनी महाराष्ट्र आणि बाहेरीलही श्रीज्ञानेश्वरीच्या शेकडो प्रती जमा करुन शुद्ध प्रती  तयार केल्या व शुद्धप्रती परत  पोचत्या केल्या. 

आज ज्या श्रीज्ञानेश्वरीचे आपण पारायण करतो, ती श्री नाथमहाराजांनी शुद्ध केलेली आहे. म्हणून नाथमहाराज हे श्रीज्ञानेश्वरीचे आद्य संपादक आहेत. एवढेच नाही,  तर ते मराठी वाङ्मयाचेही आद्य संपादक ठरतात. श्रीएकनाथमहाराजांनी ग्रंथाच्या शेवटी चार ओव्या लिहून ठेवल्या आहेत,

 त्या अशा –

शके पंधराशे साहोत्तरी ! तारणनाम संवत्सरी !

एकाजनार्दने अत्यादरी ! गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली !!१!!

 

ग्रंथ पुर्वीच अतिशुद्ध ! परि पाठांतरी शुद्ध अबद्ध !

तो शोधुनिया एवंविध ! प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी !!२!!

 

नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका ! जयाची गीतेची वाचितां टीका ! 

ज्ञान होय लोकां ! अतिभाविकां ग्रंथार्थिया !!३!!

 

 बहुकाळ पर्वणी गोमटी ! भाद्रपद मास कपिलाषष्ठी !

 प्रतिष्ठानी गोदातटी ! लेखन कामासाठी संपूर्ण जाहली !!४!!

हा आहे श्रीज्ञानेश्वरी ‘जयंती’चा इतिहास ! 

(संकलन- श्री सद्गुरू ह.भ.प श्री योगीराज महाराज गोसावी ( पैठणकर )- शांतिब्रह्म श्रीमंत  श्रीसंत एकनाथ महाराज यांचे 14 वे वंशज.).

जय ज्ञानेश्वर…. जय एकनाथ—–

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares