इंद्रधनुष्य
☆ सुग्रीवाचा नकाशा… भाग – २ – लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना) ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
(श्री. निलेश नीलकंठ ओक यांच्या भाषणावर आधारित.)
आता आपण दक्षिण अमेरिकेत जाऊ या. Paleontology, Archaeology and Astronomy या सगळ्यांचा मिळून उत्तम असा पुरावा मिळतो. सुग्रीव सांगतो आहे की क्षीरसागर ओलांडून गेलात की तिथे तुम्हाला मंदेहा नावाचे नाना प्रकारचे डोंगरावरून खाली उलटे टांगलेले असे भयावह राक्षस दिसतील. उलटे टांगलेले म्हटल्याक्षणी आपल्या डोळ्यासमोर येतात ती वटवाघुळे. आता कोरोनाच्या संदर्भात तर आपल्याला माहितीय की या वटवाघूळांच्या मुळेच बॅक्टेरिया पसरले. आपल्या प्राचीन ग्रँथात या विषाणू जिवाणूंनाच राक्षस म्हणून संबोधले गेले आहे. उदा. आपल्या शतपथ ब्राह्मणात असे वर्णन आले आहे की आपल्या मृगाजीनावर बसण्यापूर्वी ते नीट झटकून साफ करून घ्या म्हणजे त्यातले सगळे राक्षस निघून जातील. वटवाघळे खरे तर जगभर पहायला मिळतात, मग इथल्याच वटवाघूळांच्या मध्ये काय विशेष आहे? तर इतर ठिकाणची वटवाघळे frugivorous असतात, बहुतेक करून छोटे किडे, फळे इ वर जगतात, पण दक्षिण अमेरिकेतली ही वटवाघळे म्हणजे vampire bats ही प्राण्यांच्या रक्तावर जगतात. मेलेल्या वटवाघूळांची कवटी बघितली तर समजते त्यांचे दात, सुळे आणि जबडे किती तीक्ष्ण असतात ते. त्यामुळे त्यांच्या पासून जपून रहायला सुग्रीव सांगतो आहे.
आता कोणी म्हणेल की एवढाच एक पुरावा आहे का तुमच्याकडे तर नाही. तिथे एक विलक्षण जबरदस्त असा पुरातत्वीय पुरावा आहे. तो पुरावा म्हणजे तिथल्या डोंगरावर असलेली त्रिशूळाच्या आकाराची आकृती. श्री. चमनलाल आणि पुण्याच्या डॉ. प. वि. वर्तकांनीही याबद्दल लिहिले आहे. जेव्हा स्पॅनिश लोक तिथे आले तेव्हा त्यांनी तिथल्या स्थानिक रहिवाश्यांना विचारले की हे तुम्ही तयार केले आहे का तर त्यांनी सांगितले आम्ही नाही आणि आमच्या पूर्वजांनी पण नाही हे केलेले. त्यामुळे तिथल्या रहिवाश्यांना सुद्धा माहीत नाही की हे कोणी केले आणि का केले आहे ते. मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरे वाल्मिकी रामायणात मिळतात. आताच्या काळात त्याला Candelabra of Andes असे म्हणतात. तिथल्या डोंगरावर ६०० ते ८०० फूट उंच त्रिशूळाची आकृती आहे. त्यात खणलेले चर २ ते ३ फूट खोल आहेत. समुद्रावरून १२ मैल दूरपर्यंत ते दिसू शकतात. डॉ. वर्तकांच्या पुस्तकात तर असेही लिहिले आहे की या आकृत्या फक्त आकाशमार्गाने जाणाऱ्यांना म्हणजे विमानातून जाणाऱ्यांनाच दिसू शकतात. सुग्रीव सांगतोय..
त्रिशिरा: कांचन: केतूस्तालस्तस्य महात्मन:
स्थापित: पर्वतस्याग्रे विराजति सवेदिक:
(त्रिशूळाच्या आकाराचा सुवर्ण ध्वज तिथे पर्वताच्या शिखरावर चमकताना दिसेल. त्याच्या पायाशी वेदिका पण दिसेल.)
त्या नंतर सुग्रीव हे कोणी केले त्याबद्दल सांगतो आहे.
पूर्वस्यां दिशी निर्माणं कृतं तत् त्रिदशेश्वरै:
तत: परं हेममय श्रीमानुदयपर्वत:
(या आकृत्या उदय पर्वतावर इंद्राने पूर्व दिशा दर्शविण्यासाठी बनवल्या आहेत. पूर्व दिशेचा देव म्हणून सुद्धा इंद्र मानला जातो. इथे कृतं चे दोन अर्थ निघू शकतात. एक तर केले अशा अर्थी. दुसरं म्हणजे रामायण जर त्रेता युगात घडले असे धरले तर त्याच्याही आधी कृत युगात इंद्राने हे तयार केले असे म्हणावे लागेल.)
आता दक्षिण दिशा-
सुग्रीव आता दक्षिणेला जाणाऱ्या गटाला सूचना देतोय. दक्षिणेला जाणाऱ्या गटात त्याने तीन महत्वाच्या लोकांना घेतले आहे कारण सीतेला घेऊन रावण दक्षिणेला गेला हे त्यांना समजले होते. सीतेचे अलंकारही त्यांनी ओळखले होते. त्यामुळे ही दिशा महत्वाची होती. त्या तीन महत्वाच्या व्यक्ती म्हणजे अंगद, जांबवान आणि हनुमान.
सुग्रीव वर्णन करायला सुरुवात करतो ते पार नर्मदा नदी पासून. नर्मदा, गोदावरी, कृष्णा, वेण्णा इ. नद्या आणि त्यांच्या भोवतीच्या प्रदेशाचे वर्णन तो करतोय. नंतर येते कावेरी. त्यानंतर मलय पर्वतावर तुम्ही जाल तेव्हा तिथून तुम्हाला अगस्त्य तारा दिसेल ,तो तारा जो आदित्या एवढा तेजस्वी आहे. याच्या उत्तरेला इतर कुठल्याही ठिकाणाहून हा तारा दिसणार नाही. ताम्रपर्णी नदीच्या जवळ हा भाग आहे. अगस्त्य तिथे कसा दिसेल तर जणू त्याचा एक पाय महासागरात आणि एक त्या पर्वतावर. नकाशात जिथे आडवी रेषा दिसते तिथपर्यंतच रामायण काळात अगस्त्य तारा दिसत होता. (आता पार दिल्ली पर्यंत दिसतो.)
दक्षिण दिशेकडे जात जात तुम्ही शेवटी कुठे जाणार आहात तर तो प्रदेश आहे यमाची राजधानी आताचे अंटार्क्टिका. पितृ लोक आहे देवांचा लोक नाही. अतिशय अवघड अशी ती जागा आहे. तिथे जाणेही अवघड आणि गेलात तर परत येणे अवघड. आपल्याला आताही माहिती आहे की अंटार्क्टिकाला भेट देणे किती अवघड आहे ते. तर सुग्रीव सांगतोय असा असा प्रदेश तिथे आहे पण तुम्ही तिथे जाऊ नका.
पाश्चात्य समजुती प्रमाणे अंटार्क्टिका चा शोध इ स 1773 च्या आसपास लागला. पण इथे 14000 वर्षांच्या पूर्वी सुग्रीव त्याच भागाचे वर्णन करतो आहे. काही अतिशय जुन्या इटालियन navigators कडच्या नकाशाच्या मध्ये अंटार्क्टिका खंड दाखवला आहे आणि एवढेच नाही तर त्यावर नद्या दिसत आहेत. आताचा अंटार्क्टिका खंड पूर्णपणे बर्फ़ाने झाकलेला आहे. एक काळ असाही होता जेव्हा अंटार्क्टिकावर बर्फ नव्हते. तेव्हा तिथे नद्या होत्या.
चार्ल्स हॅपगुड यांच्या पुस्तकात असा नकाशा दाखवला आहे जो मृगाजीनावर चितारला आहे. त्याला ‘पिरी रीस मॅप’ असे म्हणतात. त्यात actually अंटार्क्टिका खंड दक्षिण अमेरिकेशी जमिनीने जोडलेला आहे. (16 th century मॅप) ऑटोमन साम्राज्यातील Turkish admirer या नकाशा बद्दल सांगतोय की त्याने हा नकाशा हिंद चा अरेबिक नकाशा,पोर्तुगीज, सिंध, हिंद आणि चीन इथल्या नकाशांवरून बनवला आहे. इथे हिंद हा शब्द येतोय.
१६ व्या शतकातला नकाशा, सुग्रीवाचा नकाशा यांच्या तुलनेत १९ व्या शतकातल्या युरोपियन लोकांच्या नकाशात अंटार्क्टिका चा भाग रिकामा दाखवला आहे. याचाच अर्थ पिरी रीस नकाशाचा मूळ स्रोत खूप प्राचीन असला पाहिजे. ज्या अंटार्क्टिका खंडा बद्दल पाश्चात्यांना १८,१९ व्या शतका पर्यंत खात्रीलायक माहिती नव्हती त्याची सविस्तर माहिती सुग्रीव १४००० वर्षांच्या पूर्वी देतोय. भारतीयांनो आपल्याला अत्यन्त अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे, नाही का?
– समाप्त –
लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना)
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈