मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ Lee Kuan Yew – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ Lee Kuan Yew – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे 

Lee Kuan Yew

१९६७ मध्ये जेव्हा Singapore हे Malaysia पासून वेगळे झाले तेव्हा Singapore एक जंगल होते. Mumbai पेक्षा हि लहान असलेल हे एक बेट. Natural resources नाही, कोळश्याच्या किंवा aluminium च्या खाणी नाही, उद्योग धंदे नाही, इतकेच काय तर प्यायचे पाणी पण नाही. प्यायचे पाणी त्यांना Malaysia कडून ५ रुपये लिटरने विकत घ्यावे लागे. उद्योगाच्या नावावर फक्त मासेमारी.

ज्या दिवशी Singapore हे Malaysia  पासून वेगळे करण्यात आले, त्या दिवशी एक माणूस ढसढसा रडला. आता आपल्या देशाचे काय होनार ह्या चिंतेत त्याने स्वतःला १२ दिवस एका खोलीत कोंडून घेतले आणि बाहेर पडला तो एक निर्धार घेवुन. त्याने सरकार स्थापन केले, मंत्रिमंडळात हुशार लोक नेमले आणि लोकांना सांगितलं कि तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभे राहा. 

अत्यंत खंबीर आणि दूरदृष्टी असलेल्या ह्या एका माणसाने पुढील काळात मग Singapore  चा असा काही कायापालट केला कि आज Singapore  हे Asia  मधील सर्वात समृद्ध राष्ट्र म्हणून मानल जात. त्या एका माणसाच्या Vision , Policies आणि Determination मुळेच. Singapore चं आज जन्मलेलं मूल सुद्धा करोडपती आहे. जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या कंपन्या रोज Singapore च्या दरवाज्यात उभ्या असतात, उद्योग सुरु करण्याचं application घेवुन. त्या एका माणसामुळे आज  सिंगापुर citizens ला एवढा मान आहे कि जगातल्या १७० देशात Singaporeans ना  VISA-Free एन्ट्री आहे ! त्या माणसाचे नाव आहे Lee Kuan Yew, Singapore चे पहिले पंतप्रधान.                   

वयाच्या ९१ व्या वर्षी आजाराने त्यांचे निधन काही वर्षांपूर्वीच झाले, त्यांच्या अंत्ययात्रेला 99% सिंगापूरवासी शामील होते, हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे..!!! केवळ एक माणूस एखाद्या संपूर्ण देशाचं भविष्य कसं बदलवू शकतो ह्याचं Lee Kuan Yew पेक्षा उत्तम उदाहरण कदाचितच असावे. 

बहुधा अशी लोकं प्रेरणा देण्यासाठीच जन्माला येतात…. त्यांचा एकच संदेश ……                     

“ धर्मवादी व जातीवादी राहण्यापेक्षा ध्येयवादी राहा. “

*

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सहस्रचंद्रदर्शन शांती — संकलन – श्री अशोककाका कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆  

? इंद्रधनुष्य ?

☆ सहस्रचंद्रदर्शन शांती — संकलन – श्री अशोककाका कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

 वयाच्या ५० व्या वर्षापासून प्राचीन काळी वेगवेगळ्या शांती सांगितल्या आहेत. त्या म्हणजे, ५० व्या वर्षी वैष्णव शांती, ५५ व्या वर्षी वारुणी शांती, ६० व्या वर्षी उग्ररथ शांती, ६५ व्या वर्षी मृत्युंजय महारथी शांती, ७० व्या वर्षी भौमरथी शांती, ७५ व्या वर्षी ऐन्द्री शांती, ८० व्या वर्षी सहस्त्र चंद्र दर्शन शांती, 85 व्या वर्षी रौद्री शांती, ९० व्या वर्षी कालस्वरूप शांती, ९५ व्या वर्षी त्र्यंबक मृत्युंजय शांती आणि १०० व्या वर्षी त्र्यंबक महामृत्युंजय शांती. 

सहस्त्र चंद्र दर्शन म्हणजे त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात १००० वेळा पूर्ण चंद्र पहिला आहे किंवा त्याच्या आयुष्यात १००० वेळा पौर्णिमा येऊन गेल्या. इतके सार्थ आयुष्य खूप कमी लोक जगतात म्हणूनच हे विशेष आहे. आपली मराठी कालगणना चान्द्रवर्षीय आहे म्हणून १००० चंद्र पाहण्याचा सोहळा केला जातो. हे मोजायची पण पद्धत आहे. ती अशी –

८० वर्षात १२ x ८० म्हणजे ९६०, त्यात २७ अधिक महिने येतात म्हणजे ९६० + २७ = ९८७. म्हणजे ८० वर्षात १००० चंद्र पहिले जात नाही म्हणून ८१ वर्ष पूर्ण झाल्यावर येणाऱ्या १००० व्या पौर्णिमेला हा दिवस साजरा करतात. ह्या मध्ये काही ज्योतिष्यांच्या मते ३२ अधिक मास येतात म्हणून ८१ व्या वर्षातील ८ व्या महिन्यात सहस्त्र चंद्र पूर्ण होतात. पुन्हा ह्यामध्ये खग्रास चंद्र ग्रहण पण जमेस धरावे लागते. यावर शौनक ऋषिच्या विवेचनाच्या आधारे “वयोवस्थाभीधशांतीसमुच्चय:” ह्या पुस्तकात धर्मशास्त्र कोविद श्री नारायण शास्त्री जोशी, यांनी दिले आहे. त्यांच्या मते दरवर्षी सुमारे १२ अशी ७९ वर्षात ९४८ चंद्र दर्शने आणि खग्रास चंद्रग्रहणा नंतर नव्याने होणारे चंद्रदर्शन व असे २४ चंद्रदर्शन एव्हडे मिळून ९४८ + २८ + २४ = १००० चंद्रदर्शन होतात. ८० व्या वर्षानंतर ८ व्या महिन्यात केलेला विधी हा सौर कालगणनेनुसार असतो. म्हणजे वैखानस गृह्य सूत्रानुसार रविवर्षेण असते. शांती साठी देवता आणि हवन सामग्री पण ठरलेली आहे. सहस्त्र चंद्र दर्शनाला देवता आहे चंद्र आणि हवन सामग्री आहे आज्य. ह्या शान्तींच्या वेळी देवतेला हवन अर्पून त्या व्यक्तीच्या आयुरारोग्यासाठी प्रार्थना केली जाते. त्यायोगे त्या व्यक्तीचे पुढील आयुष्य सुखात जाते.

सामन्यात: एकसष्ठी, पंचाहत्तरी आणि ८१ वर्षानंतर अशा शान्त्या केल्या जातात. आता सहस्त्रचंद्र दर्शनच का सूर्य दर्शन का नाही? तर “चंद्रमा मनसो जात:” म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे. मला वाटते साठी नंतरच वयस्क लोकांना आपण उपयोगाचे नाही, आपली सद्दी संपली, आपल्याला अडगळीत टाकतील, कोणी विचारणार नाही अशा अनेक शंका घेरून टाकतात. ऐंशी वर्षे म्हणजे फारच जास्त होतात, त्यांचीच मुले साठीला येतात. कधी-कधी जोडीदार पण साथ सोडून जातो. अशा वेळी घरातल्याच लोकांनी त्यांचे मन जाणून घेऊन ते अजून आम्हाला हवे आहेत असे एक सुंदरसा घरगुती का होईना कार्यक्रम करून त्यांना तसे वाटू दिले, त्यांना कपडे किंवा चष्मा, कवळी, चांगली पुस्तके, एखादा छोटासा टीव्ही अशी भेट देऊन, सहस्त्र दिव्यांनी ओवाळले तर त्यांना किती बरे वाटते. आपण अजून हवे आहोत ही भावनाच किती चांगली आहे. म्हणून सहस्त्रचंद्र दर्शन विधी असावा. आता होम करायचा कारण उत्सव मूर्ती ऐंशी वर्षे तंदुरुस्त का राहिली म्हणून कोणी नजर पण लावेल, सगळ्यांच्या नजरा चांगल्या असतात असे नाही. म्हणून होम करून सगळी अरिष्टे दूर करायची.

संकलन : श्री अशोककाका कुलकर्णी

प्रस्तुती – श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नाटकाची बीजे… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ नाटकाची बीजे… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

‘बाबा मला पण तुमच्याबरोबर यायचं’.. म्हणून तो मुलगा मागे लागला.त्याचे बाबा निघाले होते नाटकाच्या तालमीला.हौशीच कलाकार होते सगळे ते.कोणी नोकरी करणारे..कोणी दुकानदार.दिवसभर आपापले उद्योग करुन कधीमधी नाटकं करत‌.

तर सध्या ते अश्याच एका नाटकाची तालीम करत होते.कोणाच्या तरी घरी जमले होते.नाटकाचा जो दिग्दर्शक होता तो आपल्या या पाच सहा वर्षाच्या मुलाला पण घेऊन आला होता.. खुप मागे लागला म्हणून.

पेट्रोमॅक्सच्या.. कंदिलाच्या उजेडात तालीम सुरू झाली.कोणाच्या तरी हातात स्क्रिप्ट होतं..त्यांच्या सुचनेनुसार सगळं सुरू होतं.त्या लहान मुलाला हे सगळं नवीनच होतं.जमलेल्या मंडळीत कोणी अप्पासाहेब होते..कोणी दादा होते.. त्या त्या भुमिकेनुसार ते बोलु लागले.एकजण गडी झाला  होता.खोट्या खोट्या दिवाणखान्यातल्या खोट्या खोट्या खुर्च्यांवर तो फडके मारु लागला.

आणि हे सगळं त्यांच्या नेहमीच्याच कपड्यात.. नेहमीच्याच वेशभूषेत..पण त्यांच्या वागण्यातून.. बोलण्यातुन नवीन जग निर्माण होत होतं.कोणीतरी एकजण स्त्री भुमिका पण करत होता.तो स्त्री सारखं बोलु लागला..चालु लागला.

हे सगळं तो लहानगा बघत होता.त्याच्या वयाच्या द्रुष्टीने ही नाटकाची दुनिया वेगळीच  होती.तो या नाटकाच्या जगात पार हरवुन गेला.. अणि पहाता पहाता झोपी गेला.

काही दिवसांच्या तालमीनंतर आता प्रत्यक्ष प्रयोग.नेपथ्य..प्रॉपर्टी..वेशभुषा..रंगभुषा..मंडळी जरी हौशी होती..तरी जमेल तसं त्यांनी सगळं उभं केलं होतं.तालमीत पाहीलेलंच तो आता पुन्हा नव्याने पहात होता.तेच नट..तेच संवाद..पण आता त्यांनी मेकअप केलेला.. कोणी दाढी.. कोणी मिशी चिकटलेली.स्त्री पार्ट करणारा नट.. त्याच्या चेहऱ्यावरील भडक रंगरंगोटी..नेसलेली साडी.. आणि कंबर लचकत  चालणं..

एखादी जादू घडावी तसं सगळं बदललं होतं.सगळं तेच..पण सगळं नवीन.दु:खाच्या प्रसंगात प्रेक्षक दु:खी होत‌‌.. विनोदी प्रसंगात प्रेक्षकात हास्याचे फवारे उडत होते. प्रयोग रंगत गेला.

इतक्या दिवसांची मेहनत घेऊन केलेला प्रयोग संपतो.घरच्यांच बोट धरुन तो मुलगा रंगमंचामागे जातो.आता तर आणखीनच वेगळं जग.तो मघाचा मिशी लावलेला नट बिडी पेटवतो आहे.. स्त्री पार्ट करणारा नट एका कोपऱ्यात  जाऊन तंबाखू मळतो आहे.कोणी कपडे बदलतं आहे.

तालमीतलं जग.. प्रत्यक्ष रंगमंचावरचा प्रयोग.. आणि आता हे प्रयोगानंतरचं रंगमंचा मागचं जग..

‘नाटक’ या नावाच्या जादूचा.. आणि त्या मुलाचा तो पहिला संबंध.कुठेतरी नाटकाचं बीज मनात रोवली गेलं ते तिथुनच. नंतर थोडं मोठं झाल्यावर त्यानं शाळेत नाटकं पाहिली..वाचली..कांहीं केली..

आणि तेथुन त्याच्या नाटकाच्या कारकिर्दीस सुरुवात झाली.पुढे त्या मुलाला एक जगप्रसिद्ध नाटककार म्हणून जग ओळखू लागले.

तो मुलगा म्हणजेच.. विजय तेंडुलकर.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सोन्याचा मुकुट आणि चांदीचे पाय… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ सोन्याचा मुकुट आणि चांदीचे पाय… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

एका मोठ्या शहरात भगवान श्रीविष्‍णुचे मोठे मंदिर होते. रोज अनेक भक्त त्‍या मंदिरात दर्शनासाठी येत असत. हळूहळू मंदिराची ख्‍याती वाढू लागली, भक्तांची गर्दी होऊ लागली, मंदिराचा विस्‍तार होऊ लागला मग काही लोकांनी ठरविले, भगवान विष्‍णुला एक सोन्‍याचा मुकुट करावा. त्‍यासाठी निधी गोळा करण्‍याचे ठरविले. गावाच्‍या बाजूलाच एक अनाथ, अपंग मुलांचा आश्रम होता. त्‍या आश्रमालाही गावातील काही लोक दानधर्म करत. 

गावात भिकुशेठ नावाचे एक श्रीमंत सावकार राहात होते. भिकुशेट आपल्‍या पैशातून, नफ्यातून काही वाटा हा दानधर्मासाठी वापरत असत. भक्तमंडळींना वाटले की भिकुशेटसारखा दिलदार मनाचा माणूस आपल्‍याला मदत करेल. सगळे मिळून भिकुशेटकडे गेले. भक्तमंडळीना आपल्‍या पेढीवर आलेले पाहून भिकुशेटला मोठा आनंद झाला. त्‍यांनी भक्तांचा मोठा आदरसत्‍कार केला. लोकांनी भगवान श्रीविष्‍णुसाठी सोन्‍याचा मुकुट करण्‍याचे सांगितले व भिकुशेटकडून मदतीची मागणी केली. 

यावर भिकुशेट म्‍हणाले,”मंडळी मी तुमच्‍या कामात काही मदत करू शकत नाही कारण मी विष्‍णुला सोन्‍याचा मुकुट करण्‍यापेक्षा चांदीचे पाय करण्‍याचा विचार करत आहे.” लोक म्‍हणाले आम्‍हाला निश्चित काय ते खरे सांगा. भिकुशेट सर्वांना दोन दिवसांनी येण्‍यासाठी सांगितले. दोन दिवस निघुन गेले. लोक पुन्‍हा भिकुशेटच्‍या पेढीवर गेले असता भिकुशेटच्‍या शेजारी एक लहान मुलगा बसला होता.

भिकुशेटने त्‍या मुलाला उठायला सांगितले. त्‍या मुलाला दोन्‍ही पाय नव्‍हते. मग भिकुशेटच्‍या नोकराने एका पेटीतून दोन वस्‍तू काढल्‍या..  ते कृत्रिम पाय होते.  ते त्‍या नोकराने त्‍या अपंग मुलाला व्‍यवस्थितपणे बसविले. मुलगा हळूहळू चालू लागला.

भिकुशेट म्‍हणाले,” भक्तांनो, या मुलाचे नाव विष्‍णु, हा अपंग असून अनाथ आहे. याला पाय नव्‍हते म्‍हणून मी शहरातून हे पाय विकत आणले असून तो आता हिंडू फिरू शकतो. त्‍या विष्‍णुला सोन्‍याचा मुकुटाचा तसा फारसा उपयोग नव्‍हता पण या विष्‍णुला पायांची गरज होती. मी याला दिलेले कृत्रिम पाय याच्‍या दृष्‍टीने सोन्‍याचांदीपेक्षा जास्‍त महत्‍वाचे आहेत.”

तात्‍पर्य – मानवसेवा हीच खरी ईश्‍वरसेवा

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘डेल्टा-15‘ची कहाणी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

? इंद्रधनुष्य ?

डेल्टा-15‘ची कहाणी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले 

अमेरिकेत “9/11‘ला दहशतवादी हल्ला झाला, त्या वेळची एक हृदयस्पर्शी कथा आहे. 

दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन टॉवरवर आदळली आणि दोन्ही टॉवर जमीनदोस्त झाले, तर दुसऱ्या.मार्गावरून जाणारे आणखी एक विमान पाडण्यात आले. ही खबर मिळताच सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली. जगभरातून जी विमाने अमेरिकेकडे येत होती, त्या सगळ्यांनाच रेडिओ मेसेज केले गेले, की अमेरिकेला येण्याचे रद्द करा, जवळच्याच विमानतळावर विमाने लॅंड करा आणि पुढील आदेशाची वाट पाहा.

“डेल्टा-15‘ या विमानालाही असाच संदेश आला. हे विमान कॅनडाहून येत होते. विमानाचा मार्ग बदलण्याचे कारण काय हे कुणालाच समजले नाही. वैमानिकही याबाबतीत अनभिज्ञ होता. कॅनडातील एका गावातील विमानतळावर विमान उतरले, तेव्हा प्रवाशांना कळाले, की अमेरिकेकडे जाणारी आणखी 52 विमाने तेथेच उतरली आहेत.

या सगळ्या विमानांतील प्रवाशांची संख्या दहा हजारांवर होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या गावात हा विमानतळ होता, त्या गावची लोकसंख्याही दहा हजारांच्या आसपास होती. म्हणजे अक्षरशः गावाच्या लोकसंख्येएवढे पाहुणे तेथे आले होते.

वैमानिकाला पुढील आदेश मिळेपर्यंत तीन दिवस लागले. तोपर्यंत या पाहुण्यांना सांभाळण्याची जबाबदारी गावावर होती. गावातील प्रशासनाने व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली. सर्व शाळा बंद केल्या. जवळपासच्या घरांतून पलंग, खुर्च्या, जेवणाचे सामान प्रत्येक शाळेत पोचविले.

पाहुण्यांची उत्तम सोय करण्यात आली. या सर्व व्यवस्थेचे संयोजन रेड क्रॉस सोसायटी करीत होती.

“डेल्टा-15‘मध्ये एक गर्भवती तरुणीही होती. तिची विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले. तीन दिवस गावातील लोकांनी पाहुण्यांना गावभर फिरविले. बोटीमधून त्यांच्या सहली काढल्या. एकूण काय, गावाने पाहुण्यांना एकटे वाटू दिले नाही. आल्या प्रसंगाची झळ त्यांच्यापर्यंत पोचणार नाही, याची दक्षता घेतली. 

तीन दिवसांनंतर पुन्हा वैमानिकाला संदेश आला. त्याला अमेरिकेला परतायची परवानगी मिळाली होती. प्रवासी विमानात चढू लागले, तसे गावकऱ्यांना व प्रवाशांनाही रडू आवरेना. तीन दिवसांत त्यांच्यात एवढा स्नेह निर्माण झाला होता, की आता स्वगृही जायचे असूनही प्रवाशांचा पाय निघत नव्हता.

एवढ्या लोकांच्या आदरातिथ्याचा ताण पडला, तरी त्याचा त्रास गावकऱ्यांना वाटला नव्हता. गावकऱ्यांनी सर्व खर्च आपसांत वाटून घेतला. अशा कठीण प्रसंगात आपण कोणाच्या तरी उपयोगी पडलो अशी सर्वांची भावना होती.

विमानात गेल्यानंतर एका प्रवाशाने वैमानिकाला सांगितले, की “मी जे बोलणार आहे ते आपल्या नियमात बसत नाही. मला माझ्या सहप्रवाशांशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. विशेष बाब म्हणून मला बोलण्याची परवानगी द्यावी.‘

सहसा वैमानिक अशी परवानगी देत नाहीत. परंतु तो प्रसंगच इतका हळवा होता, की वैमानिकालाही प्रवाशांच्या मनःस्थितीची पूर्ण कल्पना आली होती. ती परिस्थितीच अशी होती, की वैमानिकाने त्या प्रवाशाला बोलायला मनाई केली नाही. 

प्रवासी म्हणाला, “या गावाने तीन दिवस आपली एवढी सेवा केली आणि आपल्याला एवढे सांभाळले, की मला वाटते आपण सर्वांनी त्यांचे कायम कृतज्ञ राहायला हवे. आपण सर्वांनी आपापल्या शक्तीनुसार काहीतरी पैशांची मदत माझ्याकडे द्यावी. मी एक निधी उभारणार आहे. त्यात हे पैसे टाकून या गावातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करावी, असे माझ्या मनात आहे. मी जो ट्रस्ट उघडणार आहे त्याचे नाव ‘डेल्टा-15‘ हेच ठेवणार आहे.”

बघता बघता एकेक प्रवासी पुढे आला. ज्याने त्याने यथाशक्ती जमेल तेवढी रक्कम त्या प्रवाशाकडे सुपूर्द केली. सर्व प्रवाशांकडून आलेली रक्कम मोजली असता, थोडे थोडके नव्हे, तर तब्बल चौदा हजार डॉलर जमले होते. ज्याने हा प्रस्ताव मांडला होता, तो स्वतः अतिश्रीमंत उद्योजक होता. त्याने आपल्या पदरचे तेवढेच पैसे त्या गंगाजळीत घातले. नंतर त्याने वैमानिकाच्या मदतीने ज्या डेल्टा कंपनीचे विमान होते, त्या कंपनीलाही भरघोस निधी देण्याची विनंती केली. विमान कंपनीचे विमानही वाचले होते आणि त्यातील प्रवासी सुखरूप होते. त्यांना काही इजा झाली असती, तर कंपनीला मोठी भरपाई द्यावी लागली असती. विमान अमेरिकेला सुखरूप परतल्यावर कंपनीनेही त्या दानशूराच्या रकमेत भरीव निधी घातला.

‘डेल्टा 15‘ हा ट्रस्ट सुरू झाला, तेव्हा त्यांच्याकडे चक्क दीड कोटी डॉलर गोळा झाले होते.

दरवर्षी ट्रस्टच्या वार्षिक अहवालात किती मुले ट्रस्टच्या पैशातून शिकली हे प्रसिद्ध होत गेले. ज्या लोकांनी ट्रस्टसाठी पैसे दिले होते, त्यांना कॅनडाच्या त्या गावात काढलेले तीन दिवस आठवले. ट्रस्टसाठी आपण दिलेल्या पैशांचे चीज झाले, असे त्यांना वाटले व ते समाधान पावले. कॅनडामधील ते छोटेसे गाव आनंदाने हरखून गेले. ट्रस्टच्या पैशांच्या मदतीने त्या गावातील अनेक मुले विविध क्षेत्रांतील नामवंत म्हणून प्रसिद्ध झाली. अशी ही ‘डेल्टा-15‘ची हृदयस्पर्शी कहाणी.

आपल्याकडे असा काही आणीबाणीचा प्रसंग आला, की आलेल्या पाहुण्यांना कसे लुटले जाते, त्यांचा गैरफायदा कसा घेतला जातो, त्यांच्यासाठी दिलेली मदत दुसरीकडे कशी वळवली जाते, याच्या कथा आपण वर्तमानपत्रातून वाचतो आणि मनोमन दुःखी होतो. मग तो दुष्काळ असो, प्रलय असो अथवा दुसरे कुठले अस्मानी संकट असो. आपली मनोवृत्ती मदत करण्यापेक्षा लुटण्याकडे आहे, असे वारंवार सिद्ध होते.

 ‘डेल्टा-15‘ची ही कहाणी कदाचित आपल्या देशातही असेच देशप्रेम जागृत करेल एवढीच अपेक्षा आहे

लेखक : अज्ञात 

संग्राहिका :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘मेड इन इंडिया’ लिहिण्यासाठी… – लेखक : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘मेड इन इंडिया’ लिहिण्यासाठी… – लेखक : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर  ☆

स्व.अर्देशिर गोदरेज

गोदरेज या भारतीय कंपनीने उत्पादनावर ‘मेड इन इंडिया’ लिहिण्यासाठी साठी  इंग्रजांशी पंगा घेतला.  गोदरेज कंपनी माहीत नाही अशी एकही व्यक्ती असणे शक्य नाही. भारतीय व्यापाराला उंचीवर नेऊन ठेवण्यात या कंपनीचा मोठा हात आहे. या कंपनीच्या संस्थापकांनी आपल्या प्रॉडक्टवर ‘मेड इन इंडिया’ लिहिण्यासाठी इंग्रजांशी पंगा घेतला. त्याची कहाणी :-

१८९४ मध्ये मुंबईच्या दोन तरुण वकिलांनी खळबळ माजवली होती. एकाने साउथ आफ्रिकेत तर एकाने ईस्ट आफ्रिकेत. दोघांचे विचारही एकच होते. वकिली पेशातं असलो तरी अजिबात खोटं बोलायचं नाही. त्यातील एक होते महात्मा गांधी व दुसरे होते अर्देशिर गोदरेज. ज्यांनी  गोदरेज समूह  बनवला. सत्यवचनी असणारे आर्देशीर आपल्या या स्वभावामुळे वकिली पासून लवकरच दूर झाले. व १८९४ मध्ये ते मुंबई येथे परत आले. एका फार्मासिटीकल कंपनीत केमिकल असिस्टंटची नोकरी सुरू केली. परंतु पारसी बाणा असल्यामुळे आपणही आपला स्वतःचा काही व्यवसाय करावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती. काम केमिस्ट चे असल्यामुळे त्यांना एक कल्पना सुचली. आपण शस्त्रक्रियेसाठी लागणारी कात्री आणि ब्लेड तयार करूया. ही उत्पादने फक्त ब्रिटिश कंपन्याच तयार करत होती. म्हणून त्यांचा हा विचार पक्का झाला. 

सुरुवातीच्या भांडवलासाठी त्यांनी पारसी समाजातील एक हितचिंतक श्री मेरवानी यांच्या कडून ३००० रुपये कर्ज घेतले. आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारी साधनं एका ब्रिटीश कंपनीसाठी तयार करायला सुरुवात केली. हे प्रॉडक्ट विकण्याची जबाबदारी त्या कंपनीची होती. गोदरेज यांचे म्हणणे असे होते की, ते त्यांच्या प्रोडक्टवर ‘मेड इन इंडिया’ असे  लिहितील. पण ब्रिटिश कंपनीचे म्हणणे होते की जर प्रोडक्टवर ‘मेड इन इंडिया’ असं लिहिलं तर उत्पादनाची विक्री होणार नाही. म्हणजे प्रॉडक्ट तर गोदरेज यांनी तयार करायचे पण विकणार मात्र ब्रिटिशांच्या नावाने. 

दोन्ही पक्ष आपापल्या बाजूला ठाम राहिल्याने त्याचा परिणाम असा झाला की गोदरेज यांना त्यांचा पहिला वहिला धंदा बंद करावा लागला. त्यांचं प्रोडक्ट चांगलं नव्हतं म्हणून नाही, तर माझ्या देशात तयार झालेल्या वस्तूला मी दुसर्‍या देशाचं नाव का देऊ? या तत्त्वाशी ठाम राहिल्यामुळे. 

पहिलि व्यवसाय बंद पडल्यानंतर आर्देशीर निराश झाले. त्यांनी आपली नोकरी चालूच ठेवली. पण डोक्यातून व्यवसाय जात नव्हता. एक दिवस वर्तमानपत्रातील एका बातमीने त्यावर त्यांची नजर गेली. मुंबईतील चोरीची घटना होती ती आणि त्या बरोबर मुंबई पोलीस आयुक्तांकडून एक निवेदन पण देण्यात आलं होतं की, “सर्व लोकांनी त्यांच्या घराच्या आणि कार्यालयाची सुरक्षा सुधारावी.” आर्देशीर च्या डोक्यात व्यवसायाचा किडा पुन्हा वळवळू लागला. कुलूप तयार करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. त्या वेळी भारतातील सर्व कुलपं हाताने तयार केली जात. ती सुरक्षित नव्हती. त्यांनी अशी कुलपं बनवायचं ठरवलं की, जे तोडणं कठीण असलं पाहिजे. कुलपं तयार करण्याच्या कल्पनेसह ते पुन्हा मेरवानजी कडे गेले. पहिले कर्ज न फेडल्याबद्दल त्यांनी त्यांची माफी मागितली आणि मग त्यांच्या समोर कुलपाची नवी योजना मांडली.

मेरवानी स्वत: एक व्यापारी होते. त्यांनी पण वर्तमान पत्रातील ती बातमी वाचली होती. थोड्या चर्चे नंतर मेरवानींनी त्यांना मदत करण्याचे कबूल केले. सक्सेस हाय वे पुस्तकात मेरवानी आणि त्यांच्यातील संवाद असा लिहिला आहे की, जेव्हा मेरवानींनी त्यांना विचारले, ‘‘मुला, तुमच्या जातीत किंवा घरात असं कोणी आहे का? की ज्यांनी कुलूप तयार केलं आहे?’’ त्यावर त्यांनी उत्तर दिलं, ‘‘मी पहिला आहे की नाही हे मला माहीत नाही, पण तुमच्या सारख्या महान माणसाच्या मदतीनं मी नक्कीच सर्वश्रेष्ठ बनून दाखवीन.’’

जिद्द आणि आत्मविश्‍वास याचं हे उत्तम उदाहरण आहे. तर अशा रितीने मेरवानी कडून आर्देशीर यांना परत कर्ज मिळाले. ७ मे १८५७ गोदरेज यांनी कामाला सुरुवात केली. बॉम्बे गॅस वर्क्सच्या बाजूला कुलपं बनवण्याचं काम सुरू केलं. गुजरात आणि मालबार हून १२ शिकलेले कारागीर आणले गेले. ‘अँकर’ या नावाने कुलपं बाजारात आली. या सगळ्यात महत्त्वाचं होतं ते एक वर्षाच्या गॅरेंटीचं पत्र ज्यामुळे त्याच्या विक्रीला मागणी आली. तेव्हा कोणत्याही कुलपाला गॅरेंटी नव्हती. गोदरेजचं कुलूप दुसर्‍या कोणत्याही चावीने उघडू शकत नव्हते.

अशा तर्‍हेने गोदरेजचं ताळं म्हणजेच कुलूप भारताच्या लोकांचं विश्‍वासाचं स्थान बनलं आणि आर्देशीर गोदरेज यांचा बिझनेस चांगला चालू लागला. आता त्यांना नवीनवीन उद्योगांची कल्पना सुचू लागली. मग गोदरेजचं कपाट बनवलं गेलं. कुलपं आणि कपाट हे गोदरेजचे ब्रँड झाले तरीही आर्देशीर गोदरेज यांना अजून काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती. १९०६ मध्ये ते टिळकांच्या संपर्कात आले आणि स्वदेशी सिद्धांत अवलंबण्याची शपथ घेतली. आत्ता पर्यंत त्यांचा धाकटा भाऊ फिरोजशाह हाही त्यांच्या व्यवसायात सामील झाला. दोन्ही भावांचा कुलूप आणि कपाट व्यवसाय वाढत होता. भारतीयांवर ब्रिटिशांचे राज्य होते. त्यामुळे भारतीयांवर विविध प्रकारचे कर लागू होते.

आर्देशीर गोदरेज त्यामुळे खूप विचलित होते. १९१० मध्ये त्यांच्या आयुष्यात आणखी एक वळण आले. ज्यांच्याकडून त्यांनी कर्ज घेऊन व्यापार सुरू केला होता, त्याला एक भगिनी होती, तिचे नाव बॉयस होते. सीएच्या सल्ल्यानुसार गोदरेजनी बॉयसला आपला पार्टनर बनवले. मग कंपनीचे नाव ठेवले गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. काही दिवसांनी बॉयसने कंपनी सोडली, परंतु आर्देशीरने आजही कंपनीचे नाव तेच ठेवले, ‘गोदरेज अँड बॉयस’.

नंतर आर्देशीर लोकांच्या थेट संपर्कात आले. मग त्यांनी आंघोळीच्या साबणाचे उत्पादन सुरू केले. तेव्हा भारतात असलेल्या साबणात पशूंची चरबी वापरली जात असे. त्यामुळे हिंदूंची मन दुखावली जात म्हणून साबण तयार करण्याची व्यावसायिक संधीचा विचार त्यांनी केला. १९१८ साली गोदरेज कंपनीने दोन साबण तयार केले. असे एकेक उत्पादन वाढू लागली आणि गोदरेजचा कारभार वाढू लागला. हळूहळू कुटुंबातील मेंबर या बिझनेस मध्ये सामील झाले. मग वॉशिंग मशीन, फ्रीज, हेअर डाय, फर्निचर अशी उत्पादनं वाढू लागली आणि गोदरेज कंपनी नावारूपास आली आणि ‘मेड इन इंडिया’ हे वाक्य लिहायला नकार देणार्‍या ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून गादरेज कंपनीने आपला व्यवसाय दिवसेंदिवस वाढवला. मनात तत्त्व होतं, एक सचोटी होती आणि देशाबद्दल प्रखर अभिमान होता. म्हणूनच हे सगळं शक्य झालं. व्यवसायात पाऊल ठेवलं आणि तो व्यवसाय नावारूपाला आणला, इतका की, आज इतकी वर्षं झाली तरी गोदरेजचं स्थान अढळ आहे. 

संकलन – मिलिंद पंडित

कल्याण

प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘एक मोठी रेष…’ – लेखिका – सुश्री मेघना भुस्कूटे ☆ संकलन व प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘एक मोठी रेष…‘ – लेखिका – सुश्री मेघना भुस्कूटे ☆ संकलन व प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

सुनीताबाईंबद्दल मी नव्यानं काय लिहिणार? त्यांचं सगळं आयुष्य महाराष्ट्राच्या पुढ्यात आहे. त्यातला निरलस कष्टाळूपणा, कठोर तत्त्वनिष्ठा, धारदार संवेदनशीलता, कमालीचं औदार्य, शास्त्रकाट्याची कसोटी लावणारी न्यायबुद्धी, कोवळं कविताप्रेम, परिपूर्णतावादी वृत्ती, पुलंच्या कामाचं त्यांनी केलेलं व्यवस्थापन, जीएंशी असलेली त्यांची अपूर्वाईची पत्रमैत्री… सगळंच आपण अनेक दशकं जवळून पाहिलेलं, आदरानं-अप्रूपानं अनुभवलेलं. त्याबद्दल नव्यानं सांगण्याजोगं काही नाही. ते अधिक जवळून बघण्याचं भाग्य मिळालेले, अधिक नेमकीपणी सांगता येणारे, अधिक काळ त्यांना पाहिलेले… अनेक लोक आहेत. मी त्यांच्याहून वेगळं काय सांगणार?

मी वेगळं सांगू शकीन ते बहुतेक माझ्या मनातल्या त्यांच्या प्रतिमेबद्दल आणि त्यातून मला मिळालेल्या गोष्टींबद्दल. 

सुनीताबाईंचं लेखन मी वाचलं ते पुलंच्या भक्तीत पूर्णतः बुडून गेल्यावर. ऐन घडणीच्या वयात. चौदा-पंधराव्या वर्षी. आम्हांला दहावीत असताना ‘आहे मनोहर तरी’मधला एक अंश मराठीच्या पुस्तकात अभ्यासाला होता. त्या निमित्तानं ‘आहे मनोहर तरी’ हातात आलं आणि मला माझ्या पिंडाला मानवणारं, अगदी जवळचं वाटणारं काहीतरी मिळाल्याचा भास झाला. त्या लेखनातली बंडखोरी, स्वातंत्र्यावरचं प्रेम आणि त्याकरता किंमत मोजण्याची तयारी, अतिशय नाजूक आणि सूक्ष्म भावनांचे पदर उलगडून बघण्याची हातोटी आणि त्यामागची अपरिहार्यता… हे सगळं माझ्या तोवरच्या वाचनापेक्षा पूर्ण वेगळं होतं. माझ्या संवेदनाखोर स्वभावाला ते लेखन फार जवळचं वाटलं. 

त्यापेक्षाही निराळी आणखी एक गोष्ट घडली, असं आता जाणवतं. 

आपण घडतो त्यात निरनिराळ्या बाबींचा हात असतो. प्रत्यक्ष आयुष्यातली उदाहरणं आणि बरावाईट वारसा असतो, तसाच नजरेसमोर वावरणार्‍या – समाजातल्या इतर प्रतिष्ठित उदाहरणांचाही भाग असतो. त्यातल्या कुणाचे प्रभाव आपण आपल्यावर पाडून घ्यायचे हे निवडणारे आपणच असतो. पण मुळात अशा प्रकारची उदाहरणं भोवतालात असावी लागतात. 

सुनीताबाई तशा होत्या. 

त्यांचं स्वतःचं कर्तृत्व आणि गुणवत्ता नाकारण्याची आजघडीला कुणाचीही छाती होणार नाही. पण ‘आहे मनोहर तरी’ प्रकाशित झाल्याच्या अल्याडपल्याडच्या काळात पुलंची लोकप्रियता वादातीतपणे त्यांच्याहून मोठी होती. पुल या नावाला एक जादुई वलय होतं. तसं तर ते आजही आहेच. तेव्हा ते किती प्रभावी असेल, याची कल्पना आपण सहजगत्या करू शकतो. पुलंना आणि त्यांची पत्नी म्हणून सुनीताबाईंना मराठी माणसांच्या जगात मानाची जागा होती. मंगला गोडबोलेंनी सुनीताबाईंच्या चरित्रामध्ये पुल आणि सुनीताबाई यांना ‘महाराष्ट्राचं फर्स्ट कपल’ अशी अतिशय चपखल संज्ञा वापरली आहे. खरोखरच त्या दोघांचं स्थान तसंच होतं. अशा ठिकाणी असणार्‍या सुनीताबाईंनी आपल्या लोकप्रिय कलावंत नवर्‍याच्या सोबत संसाराची धुरा निमूट वाहिली असती आणि मनोभावे त्याच्यासह मिरवलं असतं, तरीही त्यांचा उदो-उदोच झाला असता. पण त्यांनी हा सहज मिळू शकणारा मान नाकारला. त्यांनी या भूमिकेच्या बरोबर उलट वागून दाखवलं. 

‘आहे मनोहर तरी’मधून त्यांनी नवरा म्हणून पुलंच्या वागण्याचं रोखठोक विश्लेषण केलं. आणि पुलंचे दोष त्यांच्या पदरात घातले. वास्तविक पुल हे अशा पिंडाचे होते, की त्यांनी सुनीताबाईंच्या कोणत्याही निर्णयांना कधीही काडीमात्र विरोध केला नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या आड येणं तर त्यांच्या स्वभावात नव्हतंच, पण सुनीताबाईंनी स्वतः पुलंच्या बाबतीत घेतलेले निर्णयही त्यांनी विनातक्रार मानले. या व्यवस्थेत सुनीताबाईंची दोन्ही अंगांनी सोयच होती. स्वातंत्र्य तर होतंच, शिवाय कर्कशा न व्हावं लागण्याची सोयही होती. ही व्यावहारिक सोय वापरून मूलभूत प्रश्नांना बगल देता येणं एखादीला सहज शक्य झालं असतं. पण सुनीताबाईंनी तसं केलेलं दिसत नाही. त्यांनी पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या चौकटीबद्दलच प्रश्न उपस्थित केले. ‘वेळोवेळी मी माझे आणि भाईच्याही आयुष्याबाबतचे निर्णय घेत गेले, हे जरी माझ्या पथ्यावर पडत असलं, तरी भाई मात्र वेळोवेळी एखाद्या जाणत्या सहचरासारखं न वागता एखाद्या लहान मुलासारखं आत्मकेंद्री पद्धतीनं वागला आहे,’ या आशयाचा सल त्यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता मोकळेपणी बोलून टाकला. पुलंना गाडी चालवता येत नसतानाही निव्वळ पुरुष असल्यामुळे त्यांना मिळालेल्या ‘शिकिवनाऱ्या बाबा’च्या उपाधीबद्दलचा किस्सा प्रसिद्ध आहे. पण उल्लेखनीय बाब म्हणजे, त्यात पुलंबद्दल कुठलाही कडवट सूर नव्हता. पुलंच्या प्रतिभेबद्दल सुनीताबाईंना आदर आणि अप्रूप होतं. तिला निगुतीनं जपण्याचं काम सुनीताबाईंनी जन्मभर केलं. पण आश्चर्य म्हणजे, पुलंच्या, एखाद्या लहान मुलासारख्या आत्मकेंद्री परावलंबित्वाबद्दल तक्रार नोंदवतानाही पुलंबद्दल त्यांच्या मनात करुणा होती. त्वेष वा राग नव्हता. लग्नगाठीतून जन्माला येणारे स्त्रीवरचे अन्याय हे पुरुषसत्ताक व्यवस्थेची फळं कशी असतात, याबद्दलचं किंचित कडसर – कडवट नव्हे – भान त्या प्रकटनात भरून राहिलं होतं. दलित लेखकांना उद्देशूनही त्यांनी त्या आशयाचे प्रश्न विचारले होते. ‘तुम्ही शोषित. आम्ही स्त्रियाही शोषित. तुम्हांला तरी आमची दुःखं कळतील असं वाटलं होतं…’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.  त्या पुस्तकातली ‘आहे मनोहर तरी गमते उदास’मधल्या उदासरम्य भावाची एक छटा त्यातूनही आलेली होती. 

दुसरं म्हणजे स्त्री म्हणून स्वतःला पडलेल्या शारीर मोहांबद्दल लिहिणं. सुनीताबाई चळवळीत काम करत असताना त्यांना भय्या या आपल्या मित्राविषयी मोह पडला आणि काहीही चुकीचं पाऊल न उचलता त्या मोहातून पार झाल्या, याला कारण भय्याचा भलेपणा, असं त्यांनी प्रामाणिकपणानं नोंदवलं.      

पुल-सुनीताबाईंना मूल नव्हतं. अगदी सुरुवातीच्या काळात एका अगदी साध्याश्या प्रसंगी मन दुखावलं जाण्याचं निमित्त झालं आणि सुनीताबाईंनी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला. पुढे कारणाकारणांनी ते राहतच गेलं. हा किती मोठा निर्णय! पण सुनीताबाईंच्या त्या निर्णयामागे कुठलाही अभिनिवेश जाणवत नाही. व्यक्तिस्वातंत्र्याचा बडिवार न माजवता ते अगदी विनासायास वागवणार्‍या व्यक्तीची सहजता त्यात दिसते. तसंच लग्नसंस्थेबद्दलच्या त्यांच्या चिंतनाचंही. ‘मला त्या बाह्य बंधनाची गरज नव्हती. भाईला हवं होतं, म्हणून लग्न केलं; त्याला ते नको असतं, तर मी सहज घटस्फोट देऊ शकले असते,’ असं त्या शांतपणे म्हणून गेल्या. त्यांना स्वतःच्या असामान्यत्वाची लख्ख जाणीव होती, पण त्याच वेळी पुलंच्या स्वभावातल्या मूलपणाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांना सोडून जाण्यातलं क्रौर्यही जाणवत होतं. त्या काळातल्या – आणि खरं तर आजच्याही – स्त्रीस्वातंत्र्याच्या रूढ कल्पना पाहिल्या, तर कितीही मोठा सर्जनशील कलावंत का असेना, पण अशा कलावंत नवर्‍याच्या कारकिर्दीची व्यवस्था पाहणारी स्त्री, हे वर्णन त्यांच्यासारख्या स्वतंत्र विचारांच्या कर्तृत्ववान व्यक्तीला किती बोचणारं-सलणारं ठरू शकेल! पण त्यामध्ये त्यांनी कधीही कुठलंही शरमिंधेपण बाळगलेलं दिसत नाही. एखाद्या कवितेची निर्मिती मिरवावी तितक्याच अभिमानानं त्यांनी स्वतः निरीक्षणं करून बसवलेल्या तूप कढवण्यासारख्या खास कौशल्यांबद्दलही लिहिलं. मन लावून केलेलं, दर्जा राखून केलेलं कुठलंही काम श्रेष्ठच या मूल्यावरचा ठाम विश्वास त्यामागे होता. हे अशाच एखाद्या व्यक्तीला जमेल, जिच्या विचारांमध्ये लखलखीत स्पष्टता आहे. सुनीताबाईंनी ते सहजगत्या तोलून धरलं होतं. 

हे जगावेगळं होतं.   

सुनीताबाईंनी आपल्या नवर्‍याच्या प्रतिमेची तमा न बाळगता असं जाहीर लिहिण्यामुळे – आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पुलंनी ते अत्यंत उमदेपणानं स्वीकारण्यामुळे – फार वेगळा पायंडा पडला. अजिबात कडवट न होता, पण कुठलीही तडजोड न करता केलेला, स्त्रीवादी विचाराचा फार उन्नत आविष्कार बघायला मिळाला; तोही समाजात मानाच्या स्थानी विराजमान असलेल्या एका जोडप्याकडून. याचं मोल माझ्यासारख्या लोकांच्या दृष्टीनं फार मोठं होतं. स्वतंत्र विचार करणाऱ्या स्त्रीचं आणि ते कुठल्याही अहंकाराशिवाय स्वीकारणाऱ्या पुरुषाचं असंही सहजीवन असू शकतं, असा एक महत्त्वाचा धडा त्यातून मला मिळाला. 

पुढे सुनीताबाईंचं लिहिणं, त्यांची प्रश्नोपनिषद विणत नेणारी शैली, मित्रांच्या काळजी-प्रेमापोटी अतीव कोवळी होऊ शकणारी आणि स्वतःला प्रश्न विचारताना मात्र धारदार शस्त्राचं रूप धारण करणारी  त्यांची संवेदनशक्ती… या गोष्टी वाचनात आल्या. अधिकाधिक आवडत गेल्या. जी. ए. आणि सुनीताबाई या दोघांच्या पत्रव्यवहाराच्या रूपानं निराळ्याच उंचीवरच्या मैत्रीचा आविष्कार बघायला मिळाला, अतिशय कृतज्ञ वाटलं. पण ती सगळी पुढची गोष्ट.   

पुलंच्या नाटकाची रॉयल्टी बुडवून नाटकांचे दडपून प्रयोग होत असत. अशा प्रयोगात सामील होणाऱ्या भल्या-भल्या लोकांना सुनीताबाईंनी कोर्टाच्या नोटिसा बजावल्या. मग ते प्रसिद्ध नट असोत वा पुलंचे मित्र असोत. तसंच दुसऱ्या टोकाचं उदाहरण म्हणजे त्यांनी दिलेल्या एका देणगीचं. पी. एल. फाउंडेशनला भराव्या लागणाऱ्या कराच्या दृष्टीनं विचार करता ही देणगी पुढच्या आर्थिक वर्षात देणं सोयीचं होतं, म्हणून त्यांनी देणगी उशिरा दिली, पण देणगी देण्याचा निर्णय झाल्यापासूनच्या प्रत्येक दिवसाचं व्याजही देणगीत जमा करूनच. एकदा एखाद्या मूल्याविषयी संपूर्ण विचार करून त्याचा स्वीकार केला, की त्याच्या अंमलबजावणीत मागेपुढे पाहणं नाही. पदरी वाईटपणा येवो वा चांगुलपणा येवो. 

न भिता आणि स्वच्छ विचार करता आला, की तो कुठल्याही टोकापर्यंत नेता येण्याचं धैर्य मिळत असेल? कुणास ठाऊक. मला तो विश्वास त्यांच्या लिहिण्यातून मिळाला खरा. त्यांचं स्थान बघता, तो त्यांच्यामुळे अनेकांना मिळाला असणार. 

त्या स्वतः सिद्धहस्त प्रतिभावंत लेखक होत्या, असं म्हणता येत नाही. त्यांनी स्वतःही तसं कधी मानलं नाही. पण तसं नसताही, आपली योग्यता आणि आपल्या मर्यादा नीट समजून घेतल्या आणि स्वतःशी निर्भयपणे प्रामाणिक राहिलं, तर किती प्रकारे निर्मितिशील असता येतं, याचा वस्तुपाठच जणू त्यांनी त्यांच्या जगण्यातून घालून दिला. इतर अनेक लेखकांबद्दल वाटतो तसा सहज मित्रभाव त्यांच्याबद्दल वाटत नाही, एक प्रकारचा धाक वाटतो. त्यांनी जगताना आखून दिलेली रेष तितकी मोठी होती, याचंच ते द्योतक मानलं पाहिजे! 

बाकी कशापेक्षाही हे मला त्यांचं मोठं योगदान वाटतं.

लेखिका – सुश्री मेघना भुस्कूटे

संकलक व प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक ४१ ते ५५) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक ४१ ते ५५) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति।

अजानता महिमानं तवेदंमया प्रमादात्प्रणयेन वापि ॥४१॥

*

यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु ।

एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षंतत्क्षामये त्वामहमप्रमेयम्‌ ॥४२॥

*

तव महानता नव्हतो जाणुन प्रमाद घसटीचा

यादवा हे कृष्ण सख्या अजाणता संबोधण्याचा

विनोद विहार शय्या मजसंगे केलीत मायेने

अनमान जाहला माझ्याकडुनी उद्धरा क्षमेने ॥४१,४२॥

*

पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान्‌।

न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्योलोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव ॥४३॥

*

जगत्पित्या हे महाजगद्गुरो देवा पूजनीय अनुपम 

त्रैलोक्यी श्रेष्ठ वा नाही कोणी प्रभावी तुमच्या सम ॥४३॥

*

तस्मात्प्रणम्य प्रणिधाय कायंप्रसादये त्वामहमीशमीड्यम्‌।

पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम्‌॥४४॥

*

प्रसन्न व्हावे क्षमा करावी जगदीश तव  चरणी देहार्पण

पिता पुत्राचा सखा सखीचा जैसे करीत अपराध सहन ॥४४॥

*

अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे।

तदेव मे दर्शय देवरूपंप्रसीद देवेश जगन्निवास ॥४५॥

*

कधी न देखीले तुमच्या या विराटस्वरूप दर्शने

हर्षनिर्भर मनोमनी तैसा व्याकुळ झालो भयाने

जगदीशा परमेशा घ्या आवरून विश्वरूपाला 

प्रसन्न व्हा चतुर्भुज विष्णुरूप दर्शन द्या मजला ॥४५॥

*

किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव।

तेनैव रूपेण चतुर्भुजेनसहस्रबाहो भव विश्वमूर्ते॥४६॥

*

शिरावरी किरीट हाती गदा तथा चक्र हेच रूप दावा

विश्वस्वरूपा सहस्रबाहो मजला चतुर्भुज रूप दावा ॥४६॥

श्रीभगवानुवाच

मया प्रसन्नेन तवार्जुनेदंरूपं परं दर्शितमात्मयोगात्‌ ।

तेजोमयं विश्वमनन्तमाद्यंयन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम्‌ ॥४७॥

कथित श्रीभगवान

प्रसन्न होउनी तुजवर पार्था तुज दिधले दर्शन 

अनादिअंत परम तेजोमय योगशक्तीचे प्रमाण

तुझ्या आधी ना कधी पाहिले कोणी या रूपाला

करुनी तुझिया वरी अनुग्रह दाविले विराट रूपाला ॥४७॥ 

*

न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः।

एवं रूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर ॥४८॥

*

दानाने ना वेदाध्ययनाने कर्माने ना उग्र तपाने

विश्वरूप हे माझे पार्था कुणा ना गोचर अन्य कशाने ॥४८॥

*

मा ते व्यथा मा च विमूढभावोदृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्‍ममेदम्‌।

व्यतेपभीः प्रीतमनाः पुनस्त्वंतदेव मे रूपमिदं प्रपश्य ॥४९॥

*

नकोस होऊ व्याकूळ ना होई बुद्धीभ्रष्ट विक्राळ रूपाने

त्यागुनिया भय प्रीतीने तुष्ट होई चतुर्भुज माझ्या रूपाने ॥४९॥

संजय उवाच

इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः ।

आश्वासयामास च भीतमेनंभूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा ॥५०॥

कथित संजय

कथूनी ऐसे  वासुदेवे दाविले चतुर्भुज रूप अर्जुनासी

पुनरपि होउनी सौम्यस्वरूपी धैर्य दिधले कौन्तेयासी ॥५०॥

अर्जुन उवाच

दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन।

इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतिं गतः॥५१॥

कथित अर्जुन 

दर्शनाने तव सौम्यस्वरूपी मानवी हे जनार्दना

चित्ता लाभले स्थैर्य माझिया स्वाभाविकता मन्मना॥५१॥

श्रीभगवानुवाच

सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम।

देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्‍क्षिणः॥५२॥

कथित श्रीभगवान 

दर्शन झाले तुजला पार्था सुदर्शनधारी चतुर्भुज रूपाचे

देवदेवता दर्शनाकांक्षी दुर्लभ सहजी ना कुणा व्हायचे ॥५२॥

*

नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया।

शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्ट्वानसि मां यथा ॥५३॥

*

तुला जाहले दिव्य दर्शन चतुर्भुज या रूपाचे

वेद तप वा दान यज्ञे दृष्टी गोचर नच व्हायाचे ॥५३॥

*

भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन ।

ज्ञातुं द्रष्टुं च तत्वेन प्रवेष्टुं च परन्तप ॥५४॥

*

भक्तीनेच केवळ अनन्य परन्तपा साध्य चतुर्भुज दर्शन 

ज्ञान तयाचे प्रवेश तयात  होई तयाने अद्वैताचे दिव्य ज्ञान ॥५४॥

*

मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः सङ्‍गवर्जितः ।

निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥५५॥

*

कर्म समर्पित माझ्या ठायी माझ्या चरणी लीन

मोहाचा ना सङ्ग जयाला मम भक्तीने परिपूर्ण 

चराचरांप्रति वैरभाव ना सौहार्दाने जो युक्त

अनन्यभक्तीयुक्त अर्जुना तयासि मी होतो प्राप्त ॥५५॥

*

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायांयोगशास्त्रे 

श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगो नामैकादशोऽध्यायः ॥११॥

 

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी विश्वरूपदर्शनयोग नामे निशिकान्त भावानुवादित एकादशोऽध्याय संपूर्ण ॥११॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘ढिंचणिया’ — लेखक : मकरंद करंदीकर ☆ श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

 

 ‘ढिंचणिया’ — लेखक : मकरंद करंदीकर ☆ श्री सुनीत मुळे ☆

मांडी घालून जेवतांना अजब टेकू –…!!

भारतात पूर्वींपासून चालत आलेल्या भोजन पद्धती आणि जेवणासाठी वापरली जाणारी  वैशिष्ट्यपूर्ण भांडी, स्वयंपाकघरातील वेगळ्या वस्तू आणि अनेक प्रथा, आताशा लुप्त होत चालल्या आहेत. जमिनीवर मांडी घालून बसणे हा एक सर्वमान्य, सार्वकालिक अस्सल भारतीय प्रकार ..!! म्हणूनच आपण तिला ‘भारतीय बैठक’ म्हणतो ..!! 

मांडी घातल्यावर दोन्ही पावले, गुडघ्यांच्या खाली अशा तऱ्हेने घेतली जायची की त्यामुळे, दोन्हीही मांड्यांना आधार मिळत असे. हा सगळा इतका मोठा व्यायाम होता की ज्यामुळे सांधेदुखी, कंबरदुखी,गुडघ्यातील वेदना, ‘नी रिप्लेसमेंट’ असल्या  गोष्टी लांब राहत असत. कांही अपवाद वगळता भोजनासाठी, न्याहारीसाठी जमिनीवर, पाटावर,आसनावर बसण्याची पद्धत होती ..!! 

खरेतर, माणसाच्या नाभी पासून गुडघ्यापर्यंतच्या शरीराचे सर्वाधिक वजन असते. जमिनीवर बसल्यानंतर, नाभीपासून डोक्यापर्यंतचे वजनही त्यावरच येते ..!! 

मांडी घालून बसल्यावर,अधिक स्थूल मंडळींची गंमतच होत असे. त्यांचे दोन्हीही गुडघे जमिनीपासून खूप वरती राहत असत. अशा टांगलेल्या  अवस्थेत जास्तवेळ जमिनीवर बसणे अशक्य होते. त्यावर शोधून काढलेली वस्तू म्हणजे ‘ढिंचणिया’ म्हणजे ढोपर टेकू ..!! 

जेवायला जमिनीवर मांडी घालून बसल्यावर, अधिक स्थूल मंडळींची गंमतच होत असे. त्यांचे दोन्ही गुढघे जमिनीपासून खूप वरती राहत असत. अशा टांगलेल्या अवस्थेत जास्त वेळ जमिनीवर बसणे अशक्य होते. अशा अवस्थेत राहणाऱ्या मांड्यांच्या खाली द्यायचा आधार म्हणजे ‘ढिंचणिया’ ..!! हा एक ढिंचणिया साधारणत: डमरूसारखा, ५ ते ७ इंच उंच आणि ३ ते ४ इंच रुंद इतक्या आकाराचा असे. दोन गुडघ्यांखाली घेण्यासाठी याची जोडी बनवली जात असे. याचा तळ समईच्या तळासारखा जाड आणि एकसंध असायचा. त्यामुळे ते पटकन उलटत नसे ..!! मांडीला टोचू नये म्हणून याचा वरचा भाग हा कडेने आणि वरून गोल गुळगुळीत असे. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की वरचा अर्धा भाग हा नक्षीचा जाळीदार असायचा. बराच काळ मांडीखाली ठेवल्याने तो शरीराच्या उष्णतेने तापू नये म्हणून ही जाळी असे. हे पितळ आणि कांशापासून बनविले जात असत. तत्कालीन कारागिर त्यावर खूप चांगली नक्षी कोरत असत. तांबे आणि हस्तिदंतापासूनही हे  ढिंचणिया बनविले जात असत. लाकडापासून बनविलेले  ढिंचणिया हे स्वस्त असल्याने अधिक लोकप्रिय होते. त्यावरही अतिशय आकर्षक रंगांमध्ये सुंदर नक्षी रंगविलेली असे. गुजरात (विशेषतः सौराष्ट्र) आणि राजस्थान ह्या भागांमध्ये हे ढिंचणिया वापरले जात असत ..!! अगदी खेडेगावात जेथे ढिंचणिया उपलब्ध नसतील तेथे, एखादा धातूचा डबा, लाकडी ठोकळा, कापडाचा बोळा अशा वस्तूही वापरल्या जात असत ..!!  

आपण एक हस्तटेकूही पहिला असेल. आसनावर हातात जपमाळ घेऊन बसलेल्या संत रामदासस्वामी आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हाताखाली दिसणाऱ्या इंग्रजी टी आकाराच्या टेकूला कुबडी म्हणतात. ह्याच्या आत स्व-संरक्षणासाठी शस्त्रही लपविले जात असे ..!! 

शहरांमध्ये आता जमिनीवर बसणे कायमचे बाद होत चालले आहे. छोटी नगरे आणि खेडीही ‘मॉडर्न’ होत चालली आहेत. आता या ढिंचणियांची गरजच संपली आणि ते दृष्टीआड होता होता सृष्टीआडही होत आहेत ..!!  अजून निदान त्याचा वापर तरी माहिती आहे. कांही वर्षांनी बहुधा या ‘अज्ञात वस्तू’ म्हणून तेथे शिल्लक राहतील ..!! 

लेखक : मकरंद करंदीकर 

प्रस्तुती : सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जिवतीची पूजा ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

? इंद्रधनुष्य ?

☆ जिवतीची पूजा ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

श्रावण जवळ येत आहे , शहरांमध्ये हल्ली बहुतांश घरांमध्ये जिवती पूजन बंद झालेले दिसते, अनेकांना माहितीही नाही हे काय असते, त्यासाठी हा प्रपंच। 

जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ. कोण हि जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय?

आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात.

दिवा हे ज्ञानाचं, वृधिंगततेच प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंश वृद्धीचं प्रतीक मानतात. या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवती.

जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन मातृशक्ती कडून केल्या जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे?

जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध – बृहस्पती (गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पुजले जाते त्याची कारण मिमांसा…

प्रथम भगवान नरसिंहचं का?

भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह, आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले. हि कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात.

म्हणजेच…

नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी

त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण-

यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीपण श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल कि या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळात असतांना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरटपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असतांना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो.

म्हणजेच…

कालियादमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळतांना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्हीदेव बालकांचे रक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान.

नंतर येतात त्या जरा व जिवंतिका –

जरा व जिवंतिका या यक्ष गणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगधनरेश बृह्दरथ याला दोन राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र/ पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतीत असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा- अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अभ्राकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोनीही शकलं सांधते. जरा ते सांधलेले अभ्रक संध्यासमयास बृह्दरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मन देतो. त्याच प्रमाणे जारदेवतेचा वार्षिक महोत्सव सुरु करतो, अशी हि जरा देवी. जारेंचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात.

प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती –

बुध ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो. तर बृहस्पती (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते.

बुधाचं वाहन हत्ती – हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरुन लक्षात येते.

बृहस्पतीचं वाहन वाघ – हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते.

म्हणूनच बुध – बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं.

प्रथम रक्षक देवता.

नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता.

आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम.

एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना …म्हणजेच जिवती पुजन.  

तुम्हाला पूजण्याची ईच्छा असेल पण बाजारात जीवतीचा कागद मिळत नसेल तर याचाच प्रिंटआउट घ्या पूजन करा, गंध-पुष्प-धूप-दीप- दुधसाखरेचा नैवेद्य दाखवा. घरातील मुला बाळांना नमस्कार करायला सांगा त्यांना दुधसाखरेचे तीर्थ द्या व श्रावण संपल्यावर याचे विसर्जन करा (श्रावण अमावास्येला हा कागद उपडा करून ठेवायची व दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्याची प्रथा आहे, श्रावणा नंतर मुलांना दिसता कामा नये).

कवी : म. ना. देशपांडे

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

https://www.facebook.com/majhyaoli/ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print