मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ इंग्रजांना नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

इंग्रजांना नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

श्री. आबासाहेब गरवारे 

इंग्रजांच्या घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या जेव्हा संपूर्ण भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीत खितपत पडला होता. भारतीयांना आपल्या भविष्याची खात्री नव्हती, गोऱ्यांची क्रूरता निष्पाप भारतीयांचं जगणं मुश्किल करून टाकत होती होती, अशा काळात सांगलीच्या एका चुणचुणीत तरुणाने थेट ब्रिटिश राजकुमाराचीच गाडी विकत घेऊन अख्ख्या इंग्लंडमध्ये ती दिमाखात फिरवली. आपल्या या कृतीने त्यांनी गोऱ्यांच्या मनात खदखद निर्माण केली. त्यांच्याच घरात घुसून भारताचा झेंडा फडकविला. त्याचे हे कार्य त्याकाळात कोणत्याही क्रांतिकारी घटनेपेक्षा कमी नव्हते.

कोण होता कोण हा तरुण? तो कोणी क्रांतिकारक नव्हता, की स्वातंत्र्यसेनानी नव्हता. तो होता सांगलीतील तासगावातला भालचंद्र गरवारे अर्थातच आबासाहेब गरवारे.

गरवारे म्हटलं की आठवतं ते पुण्यातलं गरवारे कॉलेज आणि गरवारे चौक. यापलीकडे आपल्याला काय माहितीये? मित्रांनो पुण्यातल्या या कॉलेजला गरवारे नाव का दिलं गेलं? ते कॉलेज आबासाहेबांनी उभं केलं का? तर नाही. त्या कॉलेजचे संस्थापक आबासाहेब गरवारे नव्हते, मग का बरं गरवारे नाव दिलं गेलं असेल? जे जाणून घेण्यासाठी आपल्याला शंभर वर्ष मागं जावं लागेल.

तासगाव मध्ये 21 डिसेंबर 1903 रोजी एका शेतकरी कुटुंबात भालचंद्रचा जन्म झाला. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे कसेबसे 6वी पर्यंतचे शिक्षण त्याने पूर्ण केले. पूर्ण कसले सहावीच्या मार्कलिस्टवर नापासचा शेरा मिळाला. भालचंद्रच्या वडिलांचं नाव दिगंबर गरवारे. वडिलांनी भालचंद्रला मुंबईला पाठवले. या सहावी नापास भालचंद्राने 1918 साली म्हणजे वयाच्या जेमतेम 15 व्या वर्षी मुंबईच्या झगमगाटात पहिलं पाऊल टाकलं.

ब्रिटिशांचं वर्चस्व असणाऱ्या मुंबईत वावरणं थोडं कठीणच होतं. मुंबईत ब्रिटिशांनी लोकांचं जगणं नकोस करून टाकलं होतं. रस्त्यावरुन एखादा गोरा अधिकारी जात असेल, तर लोक जिथे जागा मिळेल तिथे लपून बसायचे, कारण गोरे कधी काय करतील याचा काही नेम नव्हता. अशा परिस्थितीत भालचंद्र एका गॅरेजमध्ये काम करू लागला. गॅरेजमध्ये राहून तो गाड्या रिपेअरिंगची कामे शिकू लागला. मनापासून काम करून तो चारचाकी आणि दुचाकी गाड्या रिपेयरची कामे शिकला. गॅरेजमध्ये असताना भारतीयांचे होणारे हाल त्याने उघड्या डोळ्यांनी पहिले होते. पण बिचारा एकटा भालचंद्र ब्रिटिशांविरुद्ध कसा आवाज उठवणार होता, त्यामुळे आपण आणि आपलं काम इतक्यापुरताच तो मर्यादित राहायचा. ब्रिटिशांचं प्रगत तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरणामुळे पुढच्या काही वर्षात ही वाहनं भारतीयांची गरज बनणार हे त्याने तेव्हाच हेरलं होतं. गॅरेजमध्ये काम करून भालचंद्रच्या ओळखी वाढल्या. 

वयाच्या 17 व्या वर्षी  गिरगावमध्ये डेक्कन मोटार एजन्सीची स्थापना करून तो जुन्या गाड्या खरेदी-विक्री करणारा एजंट बनला. सोबतच तो स्पेअर पार्ट, टायरची वगैरे विक्री करू लागला. थोड्याच दिवसात या व्यवसायात त्याचा चांगलाच जम बसला. त्याच्या गोडाऊनमध्ये आता गाड्यांना जागा नव्हती. सर्वसामान्य माणसापासून ते मुंबईतल्या राजे-रजवाड्यांपर्यंत सगळेजण डेक्कन मोटार एजन्सीमधून गाड्या घेऊ लागले. मुंबईत गाडी घ्यायचं म्हटलं की, प्रत्येकाच्या ओठांवर फक्त एकच नाव डेक्कन मोटार एजन्सी. एजन्सीचा नावलौकिक वाढला होता. त्यासोबतच भालचंद्र गरवारे मुंबईचे आबासाहेब म्हणून ओळखले जाऊ लागले. आबासाहेबांना पत, प्रतिष्ठा मिळू लागली. खिशात एक रुपयाही नसताना मुंबईत आलेला भालचंद्र आता आबासाहेब झाला होता. ब्रिटिशदेखील आबासाहेबांकडूनच गाड्या विकत घेऊ लागले. 

एकदा एक ब्रिटिश अधिकारी आबासाहेबांकडे गाडी खरेदी करण्यासाठी आला, गाड्यांची किंमत पाहून तो ब्रिटिश म्हणाला, ‘We get cheaper cars in England than here and now prices have fallen considerably due to the recession there.’ हे ऐकताच आबासाहेबांनी त्याच्याकडून अजून माहिती काढून घेतली, इंग्लंडमध्ये कमी किमतीतल्या गाड्या मिळतात हे ऐकल्यावर त्यांना वेध लागले ते इंग्लंड दौऱ्याचे. व्यवसायातून आलेल्या पैशांतून त्यांनी तडक इंग्लंड गाठले. इंग्लंडमधील पहिली सेकंड हँड गाडी त्यांनी 40 पौंडला विकत घेतली. हळूहळू त्यांनी एकापेक्षा एक चांगल्या दर्जाच्या सेकंड हँड गाड्या विकत घेतल्या. सेकंड हँड गाड्यांच्या दुनियेत आबासाहेबांनी लंडनमध्ये चांगलाच जम बसविला आणि तिथूनच ते नवनवीन बनावटीच्या जुन्या गाड्या भारतात पाठवू लागले.

आबासाहेबांनी केवळ गाड्यांचाच व्यवसाय केला नाही, तर त्यांनी प्लॅस्टिक बनविणारे कारखाने देखील विकत घेतले. ज्याकाळात भारतीयांना प्लॅस्टिक म्हणजे काय? हे देखील माहीत नव्हतं, अशा काळात आबासाहेबांनी भारतात प्लॅस्टिक बटणं, नायलॉन यार्न, प्लॅस्टिक इंजेक्‍शन मोल्डिंग, ब्लो मोल्डिंग, नायलॉन ब्रिस्टल्स, फिशिंग नेट अशी प्लॅस्टिकची अनेक उत्पादने घेऊन गरवारे मोटर्स, गरवारे प्लॅस्टिक, गरवारे वॉल रोप्स, गरवारे  नायलॉन्स, गरवारे पेंट्स, गरवारे फिलामेंट कॉर्पोरेशन अशा अनेक कंपन्यांची उभारणी केली. या व्यापारात त्यांनी भरपूर पैसा कमविला. ज्या गोऱ्यांनी भारतीयांचे जिणे हराम करून सोडले होते. त्या गोऱ्यांची नाचक्की करायचं हे आबासाहेबांनी आधीच ठरवलं होतं. लंडनमध्ये असताना बकिंगहॅम पॅलेसमध्ये जाऊन प्रिन्स ऑफ वेल्सची,  इंग्लंडच्या राजपुत्राचीच गाडी विकत घेतली. ती गाडी आणि त्यावर एक गोरा शोफर ठेऊन ते ताठ मानेने लंडनमध्ये फिरू लागले.

इतकंच नाही तर १९३४ साली त्यांनी लंडनमध्ये ३ एकर जमीन आणि काही अन्य मालमत्ता २२०० पौंडाला खरेदी करून त्या मालकालाच आपल्याकडे नोकरीस ठेवले. जेव्हा भारतात गुजराती, मारवाडी उद्योगपतींचा जन्म होऊ लागला होता, महाराष्ट्रात परप्रांतीय आपल्या उद्योगाचे बस्तान बसवत होते. त्याकाळात सांगलीच्या या तरुणाने चक्क इंग्लंडमध्ये आपल्या व्यवसायाचे बस्तान बसवलं. त्यांनी केलेला प्रत्येक उद्योग हा भारतीयांची अस्मिता जपण्यासाठीचा एक प्रयत्न होता.

जे ब्रिटिश भारतीयांना गुलाम म्हणून वागवत होते, त्याच ब्रिटीशांना आबासाहेबांनी त्यांच्यात घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून आपल्या पदरी ठेवून एक स्वाभिमानी, यशस्वी, देशप्रेमी मराठी उद्योजक बनण्याचा मान मिळविला होता. आबासाहेबांनी केवळ उद्योगच केला नाही, तर आपल्या कर्तुत्वाने ब्रिटीशांना तोंडात बोटं घालायला लावली. आबासाहेबांनी केवळ व्यापारच नाही केला तर शैक्षणिक, सामाजिक संस्थांना देखील सढळ हाताने मदत केली. भारत स्वतंत्र झाल्यावर 1959 साली त्यांची मुंबईचे शेरीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली. शेरीफ म्हणजे नगरपाल. आबासाहेबांनी पुणे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला चांगलीच आर्थिक मदत केली आणि त्यामुळेच संस्थेने कॉलेज आणि हायस्कूलला 1945 साली आबासाहेब गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल अशी नावे दिली. मुंबई university च्या अंतर्गत त्यांनी सांगलीत मुलींसाठी महाविद्यालय सुरू केले,

त्यांच्या याच कार्यकर्तुत्वामुळे त्यांना आर्थिक अभ्यास संस्थेतर्फे उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच 1971 मध्ये त्यांना भारत सरकारच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांगलीतील एका खेड्यातल्या मुलाचा गॅरेजमध्ये काम करण्यापासून ते पद्मभूषण पुरस्कार मिळवण्यापर्यंतचा  प्रवास खरच विस्मयकारक होता. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं आपण यशवंतराव चव्हाणांच्या अतुलनीय कामाबद्दल अनेकदा म्हणतो, पण मित्रांनो हा भालचंद्र नामक सह्याद्री देखील हिमालयाच्या प्रत्येक अडीअडचणीत धावून गेला होता हे देखील विसरून चालणार नाही. त्यांच्या विचारांची ज्योत आज प्रत्येकाने आपल्या मनात निरंतर तेवत ठेवली पाहिजे….

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डार्क वेब : भाग – 1 ☆ श्री मिलिंद जोशी ☆

श्री मिलिंद जोशी

? इंद्रधनुष्य ?

 ☆ डार्क वेब : भाग – 1 ☆ श्री मिलिंद जोशी ☆ 

(ही अतिशय महत्वपूर्ण माहिती देणारी लेखमाला दर सोमवारी आणि मंगळवारी प्रकाशित होईल) 

मी महाविद्यालयात शिकत असताना लोकांमध्ये संगणकाबद्दल खूप आकर्षण होते. कारण त्याबद्दल फारशी माहिती नव्हती. मी असेही अनेक महाविद्यालयात शिकवणारे शिक्षक बघितले आहेत जे म्हणायचे, “तुमच्या कांपूटरपेक्षा आमचे कालकूलेटर भारीये.” एक शिक्षक तर त्याही पुढे जाऊन म्हणायचे, “क्याम्पूटर लैच भारी असतो, बटन दाबलं का माहिती भायेर…” महाविद्यालयात शिकविणाऱ्या शिक्षकांची ही गत होती तर सामान्य माणूस कसा असणार? इथे मी त्या शिक्षकांना नावे ठेवत नाही. ठेवणारही नाही. कारण जे विषय ते शिकवत होते त्यात ते पूर्णतः पारंगत होते. आणि संगणक हा त्यांचा विषयही नव्हता. त्यावेळी मला तरी कुठे अंतरजालाबद्दल ( इंटरनेट ) काही माहिती होती? पण हे सांगायचा उद्देश इतकाच की संगणकाबद्दल इतके अज्ञान लोकांमध्ये होते. त्यामुळे त्याबद्दल कुतूहलही जास्तच.

त्यावेळी ‘हम आपके है कौन’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातील नायिका, माधुरी दीक्षित हिच्या तोंडी एक वाक्य देण्यात आले होते. तिला विचारले जाते, “बाई गं, तू काय शिकतेस?” आणि ती सांगते “कम्प्युटर्स…” ( हे संवाद हिंदीत होते हं ) तिच्या तोंडी दिलेला तो शब्द ‘ती किती हुशार आहे’ हे सांगण्याचा प्रयत्न होता. आणि त्यात दिग्दर्शकाला यशही आले होते. 

१९९२ मध्ये शाहरुखखानचा एक चित्रपट आला होता. “राजू बन गया जंटलमन”. त्यात एक प्रसंग येतो. चित्रपटाचा नायक अभियंता ( इंजिनिअर ) म्हणून मुलाखत द्यायला जातो. मुलाखत घेणारे त्याला काही प्रश्न विचारतात. नायक आपली हुशारी दाखवत त्या लोकांनी केलेल्या आधीच्या कामात ५ करोड रुपये कसे वाचवता आले असते हे सांगतो. मुलाखत घेणारे लगेच संगणकासमोर बसलेल्या यंत्रचालकाला (  कॉम्प्युटर ऑपरेटर हो ) विचारतात, ‘बाबारे, तुझा संगणक काय सांगतोय?” आणि संगणकासमोर बसलेला माणूस त्याच्या समोरील कळफलकावर ( कीबोर्ड ) आपली बोटे चालवतो. आणि सांगतो, ‘या व्यक्तीने सांगितलेले पूर्णपणे बरोबर आहे.’ हा चित्रपट श्रीरामपूरमध्ये १९९३ मध्ये मी बघितला होता. आणि तो प्रसंग बघून त्यावेळीही मला हसू आवरले नव्हते. का? अहो जी गोष्ट मुख्य अभियंत्याला जमली नाही, ती गोष्ट एक साधा यंत्रचालक अगदी आठ दहा सेकंदात सांगतो हे कितपत पटू शकेल? बरे हे सांगत असताना संगणकाच्या पडद्यावर काय दिसते तर ‘आज्ञावलींची यादी.’ ( फाईल लिस्ट ). त्यावेळी आम्ही ‘DIR/W’ ही आज्ञा संगणकातील आज्ञावलींची यादी बघण्यासाठी वापरत होतो. मग हसू नाही येणार तर काय? पण ही गोष्टही त्यावेळी प्रेक्षकांनी खपवून घेतली.

आता काळ बराच बदलला आहे. चित्रपटही जास्तीत जास्त लोकांचा विश्वास बसेल अशा गोष्टी दाखवू लागले आहेत. परवानगीशिवाय एखाद्याच्या संगणकाचा वापर करणाऱ्या ( हॅकिंग ) विषयावरील चित्रपट याचे चांगले उदाहरण आहे. पण त्याचसोबत युट्युबवर आजकाल असेही अनेक चलचित्र ( व्हिडिओ ) आपल्याला सापडतात, जे एकतर अर्धवट माहितीवर आधारित असतात किंवा काल्पनिक माहितीवर. आणि विशेष म्हणजे अनेक लोक आजही त्यावर विश्वास ठेवतात. अनेकांच्या मनात त्याबद्दल विनाकारण भीती निर्माण होते. याचे चांगले उदाहरण म्हणजे ‘काळेकुट्ट अंतरजाल’. ( डार्क वेब हो ) त्याबद्दलच्याच अनेक गोष्टी मी अगदी छोट्या छोट्या लेखांमार्फत वाचकांसमोर मांडायचा प्रयत्न करणार आहे. याचा उद्देश फक्त लोकांच्या मनातील विनाकारण भीती कमी करणे इतकाच असेल. 

(या आधीही काही जणांनी मला विचारणा केली होती की मी शक्य तितक्या मराठी शब्दांचा वापर का करतो? हे मी माझ्यासाठी करतो. माझा मराठी भाषेतील शब्दसंग्रह वाढावा यासाठीचा माझा हा प्रयत्न आहे.)

– क्रमशः भाग पहिला 

©  श्री मिलिंद जोशी

वेब डेव्हलपर

नाशिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆वाचाच अन् लाजाही थोडं …– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ वाचाच अन् लाजाही थोडं …– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्रीमंत लोक, जे लोक दिवसभरात २००रु ची दारु ३००रु ची कोंबडी फस्त करतात , ते गरीब लोकांकडून काय शिकू शकतात?

बारीपाडा हे महाराष्ट्रातले एक छोटेसे गाव (ता. साक्रि, जि. धुळे). पलीकडे गुजरातचा डोंगराळ डांग जिल्हा पसरलेला.

मागील महिन्यात शासन जेंव्हा अन्नसुरक्षेच्या ‘भिकमाग्या’ विधेयकाची तयारी करत होतं तेंव्हा हे गाव एका वेगळ्याच गडबडीत होतं. गेली दहा वर्षे वनभाज्यांची पाककला स्पर्धा या गावात आयोजित केली जाते. यावर्षी १८० स्त्रियांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. गावाची लोकसंख्या जेमतेम ७००. गावात १०० च्या जवळपास घरे. जवळपासच्या वाडी वस्त्यांमधील स्त्रीयांनीही या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला. शहरी लोकांना माहित नसलेल्या जवळपास २७ भाज्या या बायकांनी शोधून काढल्या व त्या शिजवून स्पर्धेत मांडल्या.

एका म्हातार्‍या बाईला मी अन्नसुरक्षा विधेयका बाबत विचारले. ती माझ्याकडे बघतच राहिली….

मी परत विचारल्यावर तिने साधा प्रश्न केला…. ‘काय देवून राहिले भाऊ त्यात?’

मी आपलं पोपटपंची केल्याप्रमाणे, ‘१ रूपयाला ज्वारी/बाजरी, २ रूपयाला गहू, ३ रूपयाला तांदूळ’ असं सांगितलं.

ती म्हातारी हसून म्हणाली, ‘ज्वारी आमी खाईना, गहू बी जमत नाई.’ मला वाटले आता हीला तांदूळ तरी उपयोगी पडत असतील.

मी म्हणालो, ‘तांदूळ खाता न तूम्ही?’

तिने मान डोलावली….. ‘मग हा तांदूळ तूम्हाला मिळंल की खायला’….मी.

म्हातारी परत माझ्याच तोंडाकडे टकामका बघत राहिली. ‘त्यो तसला तांदूळ आमी खाईना.’

मला कळेना शासनाच्या या भिकमाग्या धोरणातील तांदूळात नाही म्हणण्यासारखं काय आहे?

मग मला बाजूला उभ्या असलेल्या एका तरूण पोरानं समजावून सांगितलं… ‘साहेब, यांच्याकडं जो तांदूळ होतो त्याला आंबेमोहोरासारखा घमघम वास येतो. त्याचं नाव इंद्रायणी. हा तांदूळ हे लोक शेतात स्वत:पुरता घेतात. बाहेर फारसा विकतही नाहीत.’

मला वाटलं ही बाई शेतकरी असेल म्हणून हिला शासनाचा तांदूळ नको.

मग मी त्या तरूणाला विचारले… ‘गावात इतर गोर गरीब असतील ना. त्यांना तर हे अन्न फायद्याचे ठरेल.’

त्या तरूणाने मला हाताला धरून जवळच असलेल्या ग्रामपंचायतीच्या एका सभागृहात नेले. अतिशय चांगले बांधलेले सभागृह. तिथे विविध माहितीचे फ्लेक्स लावून ठेवलेले होते. त्यात गावची लोकसंख्या, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या असली बरीच माहिती होती. एका मोलाच्या माहितीकडे त्यानं माझे लक्ष वेधले. त्यानं काहीही न बोलताही माझे डोळे खाडकन उघडले.

तिथे लिहिलं होतं…. “दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या शून्य“.

या छोट्या गावात जिथे एकही दोन मजली इमारत नाही, ग्रामपंचायतीचे सभागृह, शाळेच्याखोल्या सोडल्या तर एकही सिमेंटची इमारत नाही, तिथे हे गाव ते अभिमानाने सांगत आहे की आमच्याकडे कोणीही दरिद्री नाही.

म्हणजे तिकडे दिल्लीला ‘सगळा भारत कसा दरिद्री आहे आणि कसा भुकेने मरत आहे. त्याला कसे जगवले पाहिजे.’ असं सर्व नेते सांगत आहेत. आणि इकडे महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरचे एक छोटेसे गाव अभिमानाने सांगत आहे की आमच्या गावात दारिद्य्ररेषेखाली कुणीच नाही.

गावात ४ थी पर्यंत शाळा. शाळेत जाणं प्रत्येक घरातील लहान मुलाला अनिवार्य केलेलं. शाळेत रजा न देता गैरहजर राहणार्‍या शिक्षकाला गावानं ५००० रूपयाचा दंड ठरवून दिला आहे. परिणामी इथे नौकरी करायला दांडीबहाद्दर मास्तर घाबरतात. गावात सर्वत्र सिमेंटचे रस्ते. व्यवस्थीत नाल्या काढलेल्या. कुठेही घाण कचरा साठलेला नाही.

अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवक यांचे मोबाईल नंबर पंचायतीच्या भिंतीवर ठळकपणे लिहून ठेवलेले. सर्व योजनांची निधीची माहिती लिहून ठेवलेली.

मी विचारले, ‘याची काय गरज?’

माझ्या सोबतचा तरूण पोरगा म्हणाला… ‘कुनीबी फोन लावून इचारू शकते ना भाऊ.’

म्हणजे इकडे दिल्लीला संसदेत विरोधपक्षांनी गोंधळ घालावा म्हणून सत्ताधारीच प्रयत्न करतात कारण काय तर गोंधळात महत्त्वाची विधेयके पटापट मंजूर करून घेता येतात. चर्चा होऊ देण्यापेक्षा गुपचूप वाच्यता न होऊ देता काम करण्यावर दिल्लीच्या राजकारणाचा भर. तर इथे एक छोटं गाव आपला कारभार स्वच्छपणे गावकर्‍यांसमोर मांडून पारदर्शी पद्धतीनं काम करत आहे.

एखाद्या गावात जैवविविधता किती आहे, म्हणजे किती झाडे, पशु पक्षी, सजीव या परिसरात आढळतात याची नोंद करण्याचा एक मोठा प्रकल्प शासनानं हाती घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाचे रमेश मुंगीकर मुद्दाम या गावात येवून लोकांशी संवाद साधताना मी पाहिले.

मी त्यांना कारण विचारले असता ते म्हणाले की ‘गेल्या ९ वर्षांपासून अशी नोंद ठेवणारे बारीपाडा हे महाराष्ट्रातले एकमेव गाव आहे. ’म्हणजे इकडे शासकीय नोंदी ठेवायच्या म्हटलं की भल्या भल्यांची कोण धांदल उडते. शिवाय या नोंदी खोट्या असतात हे तर सांगायची गरजच नाही.

या गावानं तब्बल ११०० एकर जंगल राखलं आहे. सकाळी एका घरात मला चहा पिण्यासाठी बोलावलं. घरच्या माणसानं मला आत अगदी आत स्वयंपाकघरात येण्यास सांगितलं. त्या छोट्या खोलीत मला वाटलं चहा चुलीवर उकळत असेल. तर तिथे गॅस चालू होता. या गावानं ११०० एकर जंगल राखलं म्हणून यांना विशेष योजनेखाली एलपीजी गॅस सिलेंडर मिळतात.

डॉ हेडगेवार रूग्णालयातील डॉ आनंद फाटक यांनी या गावात कांहीं वर्षांपूर्वी… अनेक वर्षे आरोग्य सेवा दिली व या बदलाचा ते भाग आहेत….ते आत्ता पण या गावात नियमित भेट देऊन तेथील लोकांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय मार्गदर्शन करत असतात.

या गावाच्या या आगळ्या वेगळ्या कहाणीमागचे नायक चैतराम पवार शांतपणे फारसं काहीच न बोलता सर्वत्र फिरून कामं होतं आहेत की नाहीत हे पहात होते. त्यांना काही विचारलं की हसून अतिशय मोजकं बोलून ते पुढे कामाला निघून जायचे.

वनभाज्यांच्या पाककला स्पर्धेसाठी जवळपासच्या भागातून हजार एक नागरिक तिथे जमा झाले होते. सर्वांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून या गावाने ३० रूपये इतके अल्प शुल्क आकारले होते.

चैतराम पवारांच्या मागे रांगेत उभे राहून आम्हीही ही ३० रूपयांची कुपनं घेतली. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे शुटिंग करायला आलेले ‘एबीपी माझा’चे मिलींद भागवत आणि त्यांच्या सगळ्या टिमनेही कुपनं घेतली.

नागलीची भाकरी, तुरीचे वरण, तेर नावाची वनभाजी व त्या भागातील प्रसिद्ध इंद्रायणी तांदूळाचा सुवासिक भात असं जेवण सगळ्यांसाठी तिथल्या बायकांनी शिजवलं होतं.

कार्यक्रम आटोपला. स्पर्धा संपली. मांडव काढत असताना जवळच्या आंब्याखाली आम्ही बसून होतो. जवळच तिथले गावकरी स्त्री पुरूष बसून दिवसभराचा सगळ्या कार्यक्रमाचा आढावा घेत होते.

एकूण ४०७ लोकांनी कुपनं घेतली आणि ताटं मात्र ५०० च्या पुढे गेली होती. कुपनं न घेता कोण जेवलं असं मी विचारता ते गावकरी लाजले आणि काही बोलेचनात. मला वाटले गावातीलच काही लोक, कार्यकर्ते असतील. पण मला कळले की गावातील एकही माणूस जेवायच्या ठिकाणी आला नव्हता. ते तर बिचारे आपल्या घरीच जेवले होते. कुणीच काही सांगेना.

मला दिवसभर साथ करणार्‍या तरूण मुलाला मी जरा बाजूला घेतले. हळू आवाजात विचारले, ‘काय रे कुणीच काही सांगेना, कोण होते हे फुकटे जेवणारे?’

त्या पोरानं जे उत्तर दिलं त्यानं अन्नसुरक्षेच्या भिकेची खरी गरज कुणाला आहे हे अगदी स्पष्टपणे उघड झालं.

तो पोरगा म्हणाला, ‘अहो साहेब, हे जे शासनाचे लोक आले होते ना, वन विभागाचे, पोलिसांचे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे जे लाचखोरी करतात तसेच महाविद्यालयातले प्राध्यापक ज्यांना सातवा वेतन आयोग मिळतो ते सगळे फुकट जेवून गेले.’

ज्याला गरीब समजून त्याच्यासाठी कळवळा दाखवला जात आहे तो सामान्य गरीब आदिवासी अतिशय स्वाभिमानी आहे.

तो कधीही भीकमाग्या योजनांची मागणी करत नाही. पण या गरीबांचा कळवळा दाखवून ज्यांना आपली पोटं भरायची आहेत त्यांनीच या योजना आणल्या आहेत हे या गावानं काहीच न बोलता आपल्या कृतीनं दाखवून दिलं….

—  असं हे बारीपाडा  गाव –   ता साक्री – जि.धुळे

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुवर्णमध्य… — लेखिका : सुश्री माधुरी बापट ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ सुवर्णमध्य… — लेखिका : सुश्री माधुरी बापट ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे  ☆

अलिकडेच लिहिलेल्या माझ्या एका ‘पोस्ट’ला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाल्याने ही ‘पोस्ट’ लिहायचं ठरवलं. काही वर्षापूर्वी माझ्या बहिणीच्या दहा वर्षाच्या नातवाने मला त्याच्या सायन्सच्या घरच्या अभ्यासात मदत मागितली. आता तो बारावीला आहे. 

..

विषय होता आधुनिक संशोधनाचे माणसावर होणारे वाईट परिणाम. माझ्या शिकवण्याचाच हा एक भाग असल्याने मी उत्साहाने त्याला मदत केली. विमाने, मायक्रोवेव्ह ओव्हन, मोबाईल फोन्स, वाय फाय, मेडिकल एक्स रेज, रेफ्रिजरेटर, प्रेशर कुकर, इलेक्ट्रिक कॅन ओपनर, कॅन फूड , कंप्यूटर मौस, वगैरे वगैरे. यातील प्रत्येकाचाच होणारा वाईट परिणाम ऐकून त्याची आई, माझी भाचे सून म्हणाली, ‘म्हणजे कुठल्याच गोष्टी सुरक्षित नाहीत का?’ माझे उत्तर होते, ‘कुठल्याही गोष्टीत चांगले वाईट असणारच. त्याचा उपयोग आपण मर्यादित ठेवला तर त्यापासून इजा व्हायची शक्यता कमी. त्याच्या आहारी गेलं तर धोका संभवतो.’

..

माझे वडील म्हणायचे माणसानं थोडं शहाणं नि थोडं खुळं असावं. प्लास्टिकचा त्यांना तिटकारा होता. प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी विशेषत: लूक वॅार्म, पिण्यानं त्यातील ॲस्ट्रोजेन सदृश मॅालिक्यूल रक्तात जातो. जो पुरुषांच्यात बायकीपणा व बायकांच्यात कॅन्सर निर्माण करू शकतो.

..

विमाने तीस चाळीस हजार फुटांवरून उडत असतांना नेहमीपेक्षा दहा वीस पटीने सूर्याकडून वा इतरत्र आलेली वाईट रेडिएशन्स ( गॅमा, एक्स रे, अल्ट्रा व्हायोलेट वगैरे) आपल्या शरीरात शिरतात. मी स्वत: एका फ्लाईटमध्ये गायगर कौंटर नेला होता व ३५,०००फुटावर असतांना नेहमीपेक्षा वीसपट रेडिएशन कौंट्स बघितले होते. ज्याने कॅन्सर होऊ शकतो. बहुतेक सर्व पायलट्स, एअर होस्टेसेस कॅन्सरने दगावतात. 

..

न्यूक्लिअर फिजिक्सचा कोर्स शिकवतांना मी विद्यार्थ्याना एक सर्व्हे भरायला देत असे. तुमच्या लाईफ स्टाईलवर आधारीत वर्षात किती रेडिएशन तुमच्या शरीरात जाते, हे अजमावण्यासाठी. यात तुम्ही कुठे रहाता म्हणजे समुद्रसपाटीपासून किती उंचीवर, सिगरेट ओढता का, विमानाने किती तास प्रवास करता, किती एक्स रे काढून घेता यासारख्या गोष्टीवरून ठरवता येते.माझी एक विद्यार्थिनी तीस वर्षापूर्वी कोसोव्हच्या युद्धात दर दोन आठवड्याने मिलिटरी विमानाने सैनिकांना औषधे वगैरे पोहोचवण्यासाठी जात असे. तिने तो सर्व्हे भरला नाही. म्हणाली, ‘मी कॅन्सरने मरणार हे मला माहीत आहे. पण आपल्या सैनिकांसाठी मी ते खुशाल सहन करीन.’

..

भारतात विमानाचा प्रवास तेवढा पॅाप्युलर नाही. पण अमेरिकेत काही लोक सतत विमानाने प्रवास करतात. दर तासाला १० मिलीरिम एवढे रेडिएशन शरीरात जाते. वर्षात ३६० मिलीरिमची मर्यादा घातलेली आहे. त्यातले अर्धे तर नैसर्गिक रीत्याच शरीरात घुसते. अगदी उन्हात रोज तासाभरापेक्षा जास्त वेळ घालवू नये. दर वर्षी अमेरिकेतून भारताच्या एक दोन वाऱ्या करणारी मंडळी आहेत. प्रत्येक वारीत ४०० मिलीरिम रेडिएशन शरीरात जाते. मी स्वत: सरासरी तीन वर्षात भारताची एक वारी करते.

..

मायक्रोवेव्ज ह्रदयाला वाईट असतात. एम. एस. साठी मी लाईव्ह मायक्रोवेव्ज वापरून माझा प्रॅाजेक्ट केला होता. तेव्हा माझ्या ॲडव्हयझरने मला सांगितले होते, ‘Don’t get pregnant while working on your project.’ शिवाय त्यात पदार्थ चांगले शिजत नाहीत. त्यामुळे त्यातील बॅक्टेरिया वगैरे मरत नाहीत. कारण पाण्याचा मॅालीक्यूल २.५ गीगॅ हर्ट्झ फ्रीक्वेन्सीने कंप पावून ते गरम होते. त्या वेव्ज हृदयाला हानिकारक असतात. म्हणून मायक्रोवेव्ह ओव्हनचा उपयोग कमीत कमी करावा.

..

कॅन फूड टाळावे. त्यातील प्रिझर्व्हेटिव्ज वाईट असतात व अलुमिनम रक्तातून मेंदूत जाऊन अल्झायमर होऊ शकतो. इलेक्ट्रिक कॅन ओपनर तर सर्वात वाईट. मायक्रोवेव्हपेक्षाही जास्त रेडिएशन्स त्याने शरीरात घुसतात.

..

मोबईल फोन्स रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालतात. ती जरी तेवढी घातक नसली तरी वर्षानुवर्षे वापरल्याने कॅन्सर होऊ शकतो. तीस वर्षापूर्वी ते टेस्ट करणाऱ्या मोटरोलातील एका शास्त्रज्ञाला कानाजवळ कॅन्सर झाला. भारतात मोबाईल व मायक्रोवेव्ह ओव्हन वापरायचे प्रमाण खूपच वाढलेले आहे, असं माझ्या लक्षात आलं.

..

केवळ इन्शुरन्स पैसे भरतो म्हणून सतत मेडिकल एक्स रेज काढून घेऊ नयेत. त्यानेही कॅन्सर उद्भवू शकतो. केवळ डॅाक्टर म्हणतात म्हणून दिलेल्या औषधाचा पूर्ण डोस घेण्या आधी वा एखादी सर्जरी करण्याआधी दुसऱ्या डॅाक्टर वा सर्जनचे मत अजमावावे. विशेषत: जनरल अनॅस्थेशिया द्यावा लागणार असेल तर. ॲंजियोप्लास्टीचे पण प्रमाण फार वाढले आहे. बहुतेकवेळा प्रॅापर डाएट, व्यायाम, वगैरेनी ती टाळता येते.

..

सतत फ्रिजमधील पाणी वा अन्न खाल्याने तसच प्रेशर कुकरमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्याने वजन वाढते. १९८४ सालापासून मी कंप्यूटरवर टाईप करत आहे. त्याने माझ्या दोन्ही मनगटातील नर्व्हज दाबल्या जाऊन दोन्ही हाताच्या बोटात नम्बनेस आलेला आहे. तो ॲार्थोपेडिक सर्जनकडून शस्त्रक्रिया करून बरे होईल असं डॅाक्टरचं म्हणणं आहे. टी. व्ही. व कंम्प्युटर स्क्रीनकडे सतत बघून डोळ्यांची वाट लागते हे सर्वश्रुतच आहे.

..

अर्थात कामासाठी नोकरीसाठी लोकांना काही गोष्टी कराव्याच लागतात. ते वेगळे. ही सगळी माहिती तुम्हाला घाबरवून टाकण्यासाठी दिलेली नाही तर तुमच्यात एक प्रकारची जाणीव, जागृती यावी म्हणून दिलेली आहे. जुनं ते सोनं म्हणून त्याला कवटाळून रहाणं जेवढं वाईट तेवढंच केवळ आधुनिक म्हणून त्याच्या फशी पडणंही बरोबर नाही. अति तेथे माती म्हटल्याप्रमाणे कुठलीही गोष्ट एका टोकाला जाऊन करू नये. आपणा सर्वांना सुवर्णमध्य शोधता यावा हीच सदिच्छा!

..

पंचवीस वर्षांपूर्वी एकदा माझे बी. पी. वगैरे एकदम पर्फेक्ट आलेले बघून माझ्या अमेरिकन डॅाक्टरने मला विचारले. ‘यावेळी तू वेगळं काय केलस?’ तेव्हा त्याला सांगितलं होतं, ‘काल आमचा उपास होता. (आषाढी एकादशीचा) मी फोनला हात लावला नाही, टी. व्ही. बघितला नाही की कारमध्ये बसले नाही. फक्त भक्तीगीते ऐकली, ध्यान धारणा केली.’ त्यावर तो म्हणाला होता, ‘असं दर रविवारी करत जा. तुला औषधाची कधी गरजच पडणार नाही.

लेखिका : सुश्री माधुरी बापट

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ युद्धग्रस्त आफ्रिकेतील भारतीय शांतिदूत ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ युद्धग्रस्त आफ्रिकेतील भारतीय शांतिदूत ☆ श्री संभाजी बबन गायके 

War is not just a strong wind that blows into our lives; it is a hurricane that rips apart everything we hold dear.

अर्थात, युद्ध म्हणजे काही केवळ आमच्या आयुष्यांत सुटलेला जोराचा वारा नव्हे…हे तर वादळ असतं आमच्यापासून आमचं सर्वस्व हिरावून घेणारं! गांभिर्याने विचार केला तर हे निरीक्षण अत्यंत वास्तववादी म्हणावं लागेल. महिला आणि मुले युद्धात सर्वाधिक प्रमाणत बाधित होतात, असा जगाचा आजवरचा इतिहास आणि वास्तवही आहे. मागील पिढीला पाकिस्तान्यांनी त्यांच्याच देशबांधवांवर आणि विशेषत: भगिनींवर केलेल्या अत्याचाराच्या कथा माहित आहेत. वांशिक संघर्ष हा शब्द केंव्हातरी आपल्या वाचनात येऊन गेला असेल बहुदा! अफ्रिका खंडातील अनेक देश गेली कित्येक दशके वांशिक संघर्षात अडकून पडलेली आहेत. आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषद या देशांमध्ये विविध देशांतील सैन्यातील अधिकारी,सैनिक यांचा समावेश असलेली शांतीसेना पाठवून किमान शांतता राखण्याचा प्रयत्न करत असते. आपला भारत या १२४ देशांपैकी सर्वाधिक सैन्य पाठवण्या-या देशांत ९व्या क्रमांकावर आहे. या उपक्रमात भारतीयांची कामगिरी नेहमीच सर्वोत्तम ठरत आलेली आहे. सध्या सहा हजारांपेक्षा जास्त भारतीय सैनिक अफ्रिकेत कार्यरत आहेत. 

   भारताच्या युएन पीस किपींग फोर्से पथकात पुरूष सैनिकांसोबतच महिला सैनिकांचे एक छोटेखानी पथकही सहभागी असते. एप्रिल २०२३ ते मे २०२४ या कालावधीत मेजर राधिका सेन यांनी ३२ आंतरराष्ट्रीय महिला सैनिक असलेल्या पथकाच्या कमांडींग ऑफिसर म्हणून अतिशय अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. या पथकाला एंगेजमेंट प्लाटून (इंडियन रॅपिड बटालियन) असे नाव आहे. कांगो किंवा कॉंगो या देशात त्यांना कामगिरी सोपवण्यात आली होती. पुरुष सैनिकांचा समावेश असलेल्या आंतरराष्ट्रीय सैन्य पथकासोबत आपल्या महिला सहका-यांसह हिंसाचार ग्रस्त भागांत गस्त घालणे, वेळ पडल्यास सशस्त्र प्रतिकार करणे ही त्यांची कर्तव्ये तर होतीच. पण या सैनिक महिलांकडून एक आणखीही कार्य अपेक्षित होते…ते म्हणजे युद्धमुळे बाधित झालेल्या महिला आणि मुलांना सर्वप्रकारचे साहाय्य करणे. 

   या संघर्षामध्ये प्रतिस्पर्धी वंशातील पुरूष सैनिकांची निर्दयी हत्या करणे ही तर सर्वसामान्य गोष्ट असते. मात्र महिला हाती सापडल्या तर त्यांची अवस्था अगदी जीणं नको अशी करून टाकली जाते. किंबहुना शत्रूचे मर्मस्थान म्हणजे त्यांच्या महिला. त्यांची जितकी जास्त विटंबना करता येईल तेव्हढी विजयी सैन्य करीत असते. दुर्दैवाने काही वंशातील सैन्यातील महिलाही यात मागे नसतात. अर्थात यात भरडल्या जातात त्या महिलाच. 

  या पिडीत महिलांना मानसिक आधार देण्याचं,जीवन प्रशिक्षण देण्याचं काम आपल्या मेजर राधिका सेन यांनी अत्यंत प्रभावीपणानं पार पाडलं. मेजर सेन यांनी या महिलांचा विश्वास जिंकून त्यांना एकत्रित केलं. त्यांच्यासाठी आरोग्य,मानसिक समुपदेशन यांसारख्या सुविधा उपलब्ध होतील याकडे लक्ष दिलं. बलात्कार पिडीत अल्पवयीन मुली, तसेच महिलांना आपलं मन मोकळं करण्यासाठी मेजर राधिका या हक्काचं स्थान ठरलं. 

  आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्याची उर्मी त्यांच्यात जागृत व्हावी यासाठी मेजर राधिका यांनी प्रयत्न केले. त्यांच्यासाठी रात्री-अपरात्री त्या आपल्या पथकासह सज्ज असायच्या. इंग्लिश संभाषणाचे वर्ग सुरु करण्यात त्यांनी यश मिळवले. हल्ला होण्याच्या परिस्थितीत बचाव करण्याची तंत्रेही त्यांनी महिलांना,मुलांना शिकवली. गरज पडली तेंव्हा त्यांनी या महिलांना सशस्त्र संरक्षणही पुरवले..आपल्या जीवाची पर्वा न करता. त्याचबरोबर त्यांनी आपल्या वरीष्ठांच्या सहकार्याने संघर्षग्रस्त पुरुषांना व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधीही त्यांनी उपलब्ध करून दिल्या. त्यांनी कांगोच्या उत्तर किवु या क्षेत्रात आपला ठसा उमटवला. 

   हिमाचल प्रदेशात जन्मलेल्या राधिका सेन या ख-यातर आय.आय.टी. मुंबई येथे बायोटेक्नोलॉजी विषयात इंजिनियरींचे शिक्षण घेत होत्या, पण सैन्यदलात सेवा करण्याच्या त्यांच्या पूर्वीपासूनच्या इच्छेने उचल खाल्ली आणि हे क्षेत्र सोडून त्यांनी सैन्यात प्रवेश मिळवला आणि आठच वर्षांच्या सेवेनंतर त्यांची थेट यु.एन.पीस किपींग फोर्समध्ये मेजर म्हणून नियुक्ती झाली. केवळ एकाच वर्षाच्या कारकीर्दीत मेजर राधिका यांनी अतुलनीय कामगिरी करून प्रतिष्ठेचा मिलिटरी जेंडर अ‍ॅडव्होकेट ऑफ दी इअर पुरस्कार प्राप्त केला आहे. हा पुरस्कार प्राप्त करणा-या ह्या दुस-या भारतीय सैन्य अधिकारी आहेत. या आधी २०१९ मध्ये मेजर सुमन गवानी यांनी संयुक्तरित्या हा पुरस्कार पटकावला होता. 

३० मे २०२४ रोजी हा पुरस्कार प्रदान सोहळा झाला आहे. चला,आपण सर्वजण मिळून मेजर राधिका सेन यांचे अभिनंदन करूयात.! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १० — विभूतियोगः — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १० — विभूतियोगः — (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः । 

नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥ ११ ॥

*

अंतःकरणी त्यांच्या वसुनी ज्ञानदीप तेजवितो

अंधकार त्यांचा अज्ञानज मी ज्ञाने नष्ट करितो ॥११॥

अर्जुन उवाच 

परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान्‌ । 

पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम्‌ ॥ १२ ॥ 

*

आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा । 

असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥ १३ ॥

कथित अर्जुन 

परब्रह्म परमधाम परमपावन तुला जाणती

सनातन ऋषी दिव्यपुरुष तव वर्णन करती

अजन्मा तू आदिदेव सर्वव्यापि तुज म्हणती

ब्रह्मर्षि नारद असित देवल महर्षि व्यास सांगती ॥१२,१३॥

*

सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव । 

न हि ते भगवन्व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः ॥ १४ ॥

*

तव लीला  वा तव स्वरूपा  ना जाणत दानव देव

ज्ञान मला जे दिधले ते मज शिरोधार्य केशव ॥१४॥

*

स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम । 

भूतभावन भूतेष देवदेव जगत्पते ॥ १५ ॥

*

तुम्हीच तुम्हा पूर्ण जाणता पुरुषोत्तम देवा

जीवोत्पत्ती तुमचे कार्य जीवेश्वर देवाधिदेवा ॥१५॥

*

वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः ।

याभिर्विभूतिभिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥ १६ ॥

*

आत्मविभूती योगे दिव्य सर्व लोक व्यापिले

विशद करणे दिव्य विभूति कार्य मात्र आपले ॥१६॥

*

कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन्‌ । 

केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥ १७ ॥

*

चिंतन विद्या  योगेश्वरा करावी मजला कथन 

कैशा भावे निरंतर चिंतन करावे मी भगवन ॥१७॥

*

विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन । 

भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मेऽमृतम्‌ ॥ १८ ॥

*

विभूति तथा योगाचे मज कथन करा पुनरपि

आर्तता मम अतृप्त सतत श्रवण्या अमृतवचन ॥१८॥

श्रीभगवानुवाच 

*

हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः । 

प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥ १९ ॥

कथित श्रीभगवान

कथितो तुजला माझ्या दिव्य विभूती प्रमुख

 विस्ताराला माझ्या  पार्था काहीच नसे अंत ॥१९॥

*

अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः । 

अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥ २० ॥

*

आत्मा मी तर भूतांचा सकल त्यांच्या हृदयात

सर्व जीवांचा गुडाकेशा मीच आदी मध्य अंत ॥२०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “तळ्यातला गणपती” – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “तळ्यातला गणपती” – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

सारसबागेतील गणपती मंदिराला आज २४० वर्षे पूर्ण झाली. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात बांधलेले हे मंदिराला तळ्यातला गणपती या नावाने प्रसिद्ध आहे. सारस बागेतील…. ‘तळ्यातला आपला लाडका सिद्धिविनायक समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ आहे. 

नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे ‘विद्येचे माहेरघर’ मानले जाते. परंतु नवसाला पावणाऱ्या ‘तळ्यातला गणपती’ ने पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अगदी आत्तापर्यंत हे ठिकाण “तळ्यातला गणपती” याच नावाने ओळखले जायचे. 

पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या या बागेतील गणपती पेशव्यांचे पूजास्थान होते. पुण्याची वाढती पाण्याची गरज पाहून श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी १७५४ साली आंबील ओढ्याच्या प्रवाह बदलून मोठे तळे बांधले. या तलावाचे काम १७५० ते १७५३ या कालावधीपर्यंत चालले होते. त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे २५ एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता. या तलावात ‘सारस पक्षी’ सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५००० चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग – बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले. त्या नंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेचे काव्यात्मक ‘सारस बाग’ असे नामकरण केले. 

हैदरअली वर स्वारी करायला जाण्यापूर्वी येथील तळ्यात श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. साहजिकच पर्वती, सारस बाग आणि तलाव ही पुणेकरांची फिरावयास येण्याची व देवदर्शनाची ठिकाणे झाली. 

स्वातंत्र्यपूर्व काळात १८६१ च्या सुमारास शहरातील अनेक जागा पुणे नगरपालिकेकडे देण्यात आल्या. त्यावेळी गणपती मंदिराचे बेट सोडून तलावाची जागा मुंबई सरकारने पुणे नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. मंदिराची सर्व व्यवस्था देवदेवेश्वर संस्थान पाहते. सारसबाग हे उद्यान व तेथील गणपती पुण्यातील एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण आहे.

माहिती संकलक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हर्क्युलस विमानाचा पराक्रम… माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ हर्क्युलस विमानाचा पराक्रम… माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

भारतीय सैन्याने आपल्या दोन दिवसांच्या धाडसी  कामगिरीमुळे  आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविली,  युगांडामध्ये इस्रायलने पूर्वी केलेला पराक्रम व भारताने आता केलेला पराक्रम हा सारखाच आहे.  

 भारतीय वायुसेनेच्या या कृतीने जग आश्चर्यचकित झाले आहे आणि भारताच्या उदयाचे कौतुक करत आहे.  भारतीय युगाची ही सुरुवात आहे असे जग  म्हणू लागले आहे.

सुदान मध्ये घडलेली ही घटना खूप धक्कादायक आणि थरारक होती .  भारतीय हवाई दलाच्या विमानांनी युक्रेन आणि काबूलमधील भारतीयांची सुटका करणे ही फार मोठी गोष्ट नव्हती कारण ते नेहमीच्या औपचारिकतेसह योग्य विमानतळांवर दिवसा उजेडी घडलेल्या होत्या.  

सुदानमध्ये तसे झाले नाही,  सुदानची हवाई हद्द बंद आहे आणि कोणत्याही विमानाला उड्डाण करण्याची परवानगी नाही, फक्त अमेरिकेने आपल्या राजदूतांना वाचवण्यासाठी आपले हेलिकॉप्टर धाडसाने पाठवले आहेत. इतर सर्व देश तेथे ठप्प आहेत, विमानतळावरील लढाईमुळे उड्डाणे अशक्य होतात आणि इतर अनेक मार्गक्रमण  अशक्य होते.    

121 भारतीय देखील असेच अडकले होते आणि त्यांना वाचवणे हे मोठे आव्हान होते

पंतप्रधान मोदींनी भारतीय हवाई दलाला पूर्ण अधिकार दिले आणि भारतीय गुप्तचर सेवा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयासहीत  भारतीय हवाई दल उत्साहाने मैदानात उतरले.

विदेशी विमाने सुदानमध्ये उडू शकत नाहीत आणि उड्डाण केल्यास दोन्ही बाजूंनी भीतीपोटी हल्ला होऊ शकतो, याशिवाय मुख्य विमानतळ जीर्ण आहे, अशा परिस्थितीत सुदानच्या परवानगीशिवाय भारतीयांची सुटका करावी लागणार आहे. हे आव्हान त्यांच्यासमोर होते. 

भारतीय गुप्तचरांनी सुदानची चौकशी केली आणि राजधानीच्या पलीकडे 50 किमी अंतरावर एक मानवरहित, बंद विमानतळ शोधला. तेथे विमान उतरविता येईल पण अनेक अडचणी आहेत.  

सर्व प्रथम, त्या विमानतळावर  कोणीही नाही, वीज नाही, दिवे नाहीत, हवाई वाहतूक नावाचे कोणतेही मार्गदर्शन नाही, येथे विमान लँडिंग किंवा टेक ऑफ करणे असो, धोका जास्त आहे.

विमान आले तरी  सुदानुना  चुकवून येणे अवघड आहे.   तसे पाहिले तर भारतीय विमानांना उड्डाणासाठी पेट्रोलमुक्त मार्ग नाही.  त्यामुळे अनेक समस्या या कार्यात आहेत. 

प्रथम, भारतीय हवाई दलाने आपल्या कमांडोसह एक मोठे विमान सौदी जेद्दाहला पाठवले, तेथून ते सुदानच्या बाजूने होते, जेणेकरून एकच इंधन भरणे पुरेसे होते.

भारतीय हवाई दलाने अत्यंत गुप्ततेत सनसनाटी कामगिरी  पार पाडली  १२१ लोकांना  संध्याकाळी शांतपणे  मानवरहित विमानतळाजवळ गुपचुप आणून लपवून ठेवले.  

त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या हर्क्युलस विमानाचा पराक्रम सुरू झाला. 

विमानात दिवे न लावता  अंधारात उड्डाण केले त्यामुळे कोणाच्याही नजरेस न पडता विमान ईप्सित स्थळी पोहोचले . हे उड्डाण करताना त्यांनी  नाईट व्हिजन अटॅक उपकरणे वापरली आणि उपग्रहाच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विमानाने अंधारात उत्तम प्रकारे उड्डाण केले.

वैमानिकांनी रात्री विमान सुरक्षितपणे उतरवले आणि इंजिन चालूच ठेवले.  

विमानाचा दरवाजा उघडला आणि भारतीय कमांडो धावत आले आणि विजेच्या वेगाने विमानात १२१   जणांना घेऊन गेले. या गोष्टीस सात मिनिटे लागली.   सौदी अरेबियातील जेद्दाह येथे विजेच्या वेगाने जाणारे विमान उतरल्यानंतर भारतीय मायदेशी परतले. 

या घटनेचे जागतिक स्तरावर तीव्र पडसाद उमटत आहेत.  इस्त्राईल वगळता इतर कोणत्याही देशाने असे आव्हान स्वीकारले नाही आणि भारताने ते यशस्वी केले आहे.  हे ऑपरेशन खूप आव्हानात्मक होते , जर विमान अडकले किंवा लढाऊ विमानांनी  घेरले गेले असते  तर फार मोठा धोका होता. शनिवार २९.४.२०२३ रोजी हे घडले. 7 मिनिटांत सुदानमधून भारतीयांची सुटका झाली. 

प्रत्येक प्रकल्प सावधपणे परंतु धैर्याने संकल्पित केला जातो आणि आव्हान असतानाही तो कार्यान्वयीत केला जातो.  हा पराक्रम करणाऱ्या पायलट आणि क्रू चीफचे तपशील अद्याप जाहीर झालेले नाहीत. 

त्यांच्या नावांची पुरस्कारांसाठी घोषणा केव्हा होईल हे नक्की कळेल. 

भारतीय हवाई दलाने मोठी कामगिरी केली असून प्रत्येक भारतीयाने छाती उंच करून अभिमानाने अभिवादन करण्याची वेळ आली आहे.

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : अमोल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हा माणूस परका ? – लेखक – श्री महेश कुलकर्णी ☆ संग्रहिका – सुश्री सुलु साबणेजोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ हा माणूस परका ? – लेखक – श्री महेश कुलकर्णी ☆ संग्रहिका – सुश्री सुलु साबणेजोशी ☆

सिगफ्रीड वुल्फ

हा माणूस परका ?

तर लेखासमवेत असेलला फोटो पाहून तुम्ही म्हणाल, “काय हे, आजच्या दिवशी परक्या माणसाचा फोटो टाकतोय?” पण त्यामागे कारणच तसे आहे. फोटोमधील माणसाचे नाव आहे Mr. Siegfried Wolf. Mr.Wolf हे Universität Heidelberg मध्ये प्राध्यापक आहेत. तर त्यांच्याबद्दल लिहिण्याचे कारण असे की, २०१४ मध्ये आम्ही German भाषा शिकत होतो. भाषेवर बऱ्यापैकी प्रभुत्व मिळवले होते. वीर सावरकर ह्यांच्या ऐतिहासिक उडीबद्दल काही जुने लेख आणि छायाचित्र त्या काळी German वृत्तपत्रांमध्ये झळकली होती, असे आमच्या ऐकिवात होते. ती इंटरनेटवर मी German भाषेत शोधत होतो आणि ते शोधत असताना मला एक  PDF मिळाली. तर ती pdf होती वीर सावरकर ह्यांच्यावर लिहिलेली जवळ जवळ ७०० German पाने आणि लेखक होते हे Mr.Wolf.  Mr.Wolf ह्यांच्या पुस्तकाचे PHD च्या विषयाचे नाव खालीलप्रमाणे: Thesis:  ‘The Construction of a Collective Identity in India: Vinayak Damodar Savarkar and his Hindutva-Concept’, final grade : Magna Cum Laude.

त्यांचा PHD चा विषय पाहून आणि ७०० German पानांचे पुस्तक पाहून मी थक्क झालो. मी त्यांना लगेच ईमेल पाठवून धन्यवाद दिले.

एखादा परकीय माणूस आयुष्याची ६ वर्षं वीर सावरकर ह्यांच्यावर PHD करण्यात घालवतो आणि आपण साधे त्यांचे विचार on to the last man पोहोचवू शकत नाही, ह्याची मला तर शरम वाटते. आम्ही Germany मध्ये असताना ह्या सदगृहस्थांना भेटता आले नाही, पण भविष्यात त्यांना आम्ही नक्की भेटू. वीर सावरकर ह्यांना ‘भारतरत्न’ सन्मान मिळावा म्हणून Germany मधून काही हालचाली करता येतील का? अशा आशयाचे पत्र मी त्यांना आता पाठवणार आहे.

वीर सावरकर अमर रहे… अखंड भारत अमर रहे.!! 

लेखक : श्री महेश कुलकर्णी

प्रस्तुती : सुश्री सुलु साबणे-जोशी.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दासबोधातील समर्थ बोध… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

दासबोधातील समर्थ बोध… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

दासबोधातील समर्थ बोध

मुख्य हरिकथा निरूपण । दुसरें तें राजकरण । तिसरें तें सावधपण । सर्वविषईं ॥ ४ ॥

सरळ अर्थ :- 

लोकसंग्रह करणाऱ्याच्या अंगी कोणती लक्षणे हवीत, ते येथे सांगत आहेत. त्याला उत्तम प्रकारे हरिकथा आणि अध्यात्मनिरूपण करता आले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अंगी मुसद्दीपणा हवा आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वच बाबतीत सावधपणा हवा. 

विवेचन:-

समर्थांचे जीवन चरित्र या ओवीत सामावले असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. समर्थांच्या चरित्राचा ढोबळमानाने अभ्यास केला तर आपल्या असे लक्षात येईल की पहिली बारा वर्षे ते घरी होते, नंतरची बारा वर्षे टाकळी येथे त्यांनी साधना केली. त्यानंतर बारा वर्षे देशाटन करून त्यांनी तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला. त्यानंतर पुढील ३६ वर्षे त्यांनी राष्ट्राचे पूनरूत्थान करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.  

उदंड जाहालें पाणी । स्‍नान संध्‍या करावया । जप तप अनुष्‍ठानें । आनंदवनभुवनीं ।।३६।।

(आनंद वनभुवनी)

वरील ओवी त्याच्या राजकीय आणि धार्मिक कार्यातील यशस्वीतेची ग्वाही देते असे म्हणता येईल.

समर्थ एका ठिकाणी म्हणतात,

“अखंड सावधान असावे | दुश्चित कदापी नसावे | तजविजा करीत बैसावे | येकान्त स्थळी||”

आज आपण जे सुरक्षितता (safety) या विषयाबद्दल बोलतो, लिहितो त्याबद्दल हा विलक्षण आगळावेगळा संत सुमारे चारशे वर्षांपूर्वी लिहून गेला आहे, असे आपल्या लक्षात येईल.

समर्थांनी आधी हरिकथा केली, अर्थात स्वतःला सिद्ध केले. त्यानंतर मिळवलेली विद्या, ज्ञान देशभर भ्रमंती करून तपासून पाहिले आणि त्यानंतर महाराष्ट्रात त्याचा यशस्वी प्रयोग केला…!

समर्थांचे काही आवडते शब्द आहेत. त्यामध्ये विवेक, प्रयत्न आणि सावधान किंवा सावधानता यांचा क्रम खूप वरचा आहे. 

मनुष्याने कोणतेही कार्य करताना आपले विहित कार्य ( अर्थात हरिकथा)  सोडू नये असे समर्थ आपल्याला सांगत आहेत. व्यवहारात असो परमार्थात मनुष्याने अत्यंत सावधान असले  पाहिजे. अन्यथा त्याला कोणीही लुबाडेल.

मनुष्य प्रापंचिक असो किंवा पारमार्थिक त्याने वरील ओवी कायम लक्षात ठेवावी आणि तसे आचरण करण्याचा प्रयत्न करावा असे समर्थ आपल्याला सांगत असावेत.

जय जय रघुवीर समर्थ 

(तळटीप :  या निमित्ताने समर्थांचे चरित्र प्रत्येक वाचकाने वाचावे असे मी आपल्याला सुचवीत आहे.) 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print