☆ ‘विश्वमैत्री’ दिन अर्थात ‘मकर संक्रमण’… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
राम राम मंडळी !!
ईश्वर कृपेने आपण सर्वजण सकुशल असाल. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपल्याला हा अक्षररूप तिळगुळ पाठवीत आहे.
” तिळगुळ घ्या गोड गोड बोला।”
पारंपारिक पद्धतीने मकरसंक्रांती साजरी करीत असताना आपण सर्वांना तिळगुळ देतो आणि त्यावेळी आपल्या तोंडात वरील उद्गार सहज येत असतात. हे नुसतं ऐकायलाही किती गोड वाटतं. आज सामाजिक प्रसार माध्यमांच्या काळात सुद्धा एका अर्थाने निर्जीव तिळगुळ आपण एकमेकांस पाठवतो आणि त्यात सुद्धा खरा तिळगुळ मिळाल्याचा, खाल्याचा आनंद मानतो. किती लोकविलक्षण आहे हे! हिंदू धर्म सोडला तर जगाच्या पाठीवरील आज अस्तित्वात असलेल्या आणि नसलेल्या कोणत्याही धर्मात अशी परंपरा असल्याचे ऐकिवात नाही. काय कारण असेल याच्यामागे ? असे कोणाला सुचले नसेल की तशी बुद्धीच झाली नसेल ? हे असे अनेक प्रश्न माझ्या मनात आले. आता एखाद्याच्या मनात प्रश्न का यावेत याचे वस्तुनिष्ठ उत्तर देणे तसे अवघडच. वरील प्रश्नाचा विचार करताना असे जाणवले की केवळ आपला हिंदू धर्म सर्वसमावेशक आहे. तो ‘भोगावर’ आधारित नाही तर ‘त्यागावर’ आधारित आहे. ज्याप्रमाणे निसर्गातील प्रत्येक वस्तू आपल्याजवळील प्रत्येक वस्तू दुसऱ्याला देण्यात समाधान मानते तसे हिंदू धर्म देखील देण्यात समाधान मानणारा, त्यागावर श्रद्धा ठेवणारा आहे. नुसता श्रद्धा ठेवणारा नाही तर तसे आचरण करणारा आहे.
“पेड हमे देते है छाया,
हवा नया जीवन देती है।
भूख मिटाने को हम सबकी,
धरती पर होती खेती है।।”
औरोंका भी हीत हो जिसमे
हम भी तो कुछ करना सिखे।”
मकरसंक्रातीचा सण साजरा करण्यास कधी सुरुवात झाली ? पहिला सण (संक्रांत ) कधी साजरी केली गेली याची नोंद इतिहासास ठाऊक नाही. अर्थात ही झाली पुस्तकी माहिती. पण आपण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हिंदू धर्मात असे लिहून ठेवणे, त्याचे श्रेय (स्वामित्व) घेणे आणि ‘स्वामीत्वा’च्या जीवावर ज्ञान बंदिस्त ठेवणे अपेक्षित नसावे म्हणून तर आपल्याकडील विविध प्राचीन विश्वविद्यालयात ज्ञान निःशुल्क मिळत असे आणि ते सर्वांना सुलभ होते. इतिहासात असे वर्णन आहे की परदेशातून हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रात / विषयांत ज्ञान प्राप्त करण्यासाठी येत असत.
सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून मकर संक्रमण असे म्हटले जाते. सूर्य जेव्हा कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा कर्क संक्रमण अर्थात दक्षिणायन सुरु होते, तर मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा उत्तरायण सुरु होते. उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस आणि दक्षिणायन म्हणजे देवांची रात्र. फार पूर्वी ही संक्रांत २३ डिसेंबर ला साजरी केली जायची. परंतु सूर्याच्या गतीचे गणित लक्षात घेता तर ७८ वर्षांनी ती एकेक दिवस पुढे जात ती आज १४ जानेवारी पर्यंत पुढे आली आहे. अशी हळूहळू ती पुढेच जात राहील. खगोल अभ्यासक असे म्हणतात की की ही संक्रांत काही शे वर्षांनी मार्च महिन्यात अर्थात ऐन उन्हाळ्यात येईल.
मकरसंक्राती आपल्याकडे साधारण तीन दिवस साजरी करण्यात येते. भोगी, संक्रांत आणि किक्रांत. संक्रांत ही देवी असून देवीने शंकासूर आणि किंकरासूर राक्षसांवर मिळविलेला विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. हीचे स्वरुप नेहमीप्रमाणे प्रसन्न, मंगलदायक नसून लांब ओठ, एक तोंड, दीर्घ नाक, नऊ बाहू असे आहे. थोडी अक्राळविक्राळ आहे. दरवर्षी हिचे वाहन, अस्त्र, शस्त्र, अवस्था, अलंकार वेगवेगळे असतात. आपले अलंकार आणि वस्त्र यातून ती भविष्यकाळ सुचवीत असते, असे मानले जाते. ‘संक्रांत आली’ अशी म्हण यामुळेच असावी असे म्हणता येईल.
दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते तो काळ थंडीचा असतो. त्यामुळे त्यावेळी तीळ आणि गूळ खाण्याची पद्धत आहे. तीळ हे थंड, स्निग्ध असतात तर गूळ उष्ण, बलवर्धक आहे. शरीर बळकट होण्यासाठी हे दोन्ही पदार्थ आवश्यक आहेत आणि मुख्य म्हणजे हे दोन्ही पदार्थ सामान्य मनुष्यास सहज उपलब्ध आहेत. हा सण देशाच्या विविध भागात विविध नावाने साजरा केला जातो.
*आपल्याकडील कोणताही सण साजरा करण्याचे मुख्य प्रयोजन ‘सामाजिक बांधिलकी’ हेच असते. खास करुन रक्षाबंधन आणि मकरसंक्राती हे दोन सण विशेष करुन सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही असे मला वाटते. एका सणात भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तसे कंकणच बांधून घेतले आहे. जर अगदी मनापासून आणि व्यापक बुद्धीने हे कंकण प्रत्येक भाऊ (पुरुष) आपल्या मनगटावर बांधेल तर प्रत्येक बहीण (स्त्री )निरंतर सुरक्षित राहील. तसेच मकर संक्रांतीच्या निमित्ताने ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला’ हे सूत्र समाजातील प्रत्येक घटक पाळेल तर सारा भारत एक क्षणात तंटामुक्त होईल.
आपल्याकडे सर्व आहे. ज्ञान, विज्ञान अगदी सर्व आहे. फक्त डोळसपणे त्याकडे बघण्याची गरज आहे, काळानुरूप सणांचे अर्थ लावून ते समजून घेण्याची, आचरणात आणण्याची गरज आहे. पूर्वी उद्योगांचा एकेक आदर्श नमुना आपल्याकडे होता. यास ‘स्वयंपूर्ण खेडी’ असे म्हटले जायचे. बारा बलुतेदार होते. ही बारा लोकं एकत्र येऊन एकदिलाने गावागाडा नुसती हाकत नव्हती तर कुटिरोद्योगाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत आपला सहभाग घेत होती. कोणी मोठा नव्हता आणि छोटा नव्हता. सर्व एकसमान होते. इंग्रज येईपर्यंत ही परंपरा टिकली. परंपरागत व्यवसाय असल्यामुळे कारागीर गुणवत्तावान, कुशल होते. १४ विद्या आणि ६४ कला जगाला अलंकृत करीत होत्या. परंतु हे पांढऱ्या पायाच्या इंग्रजांना रुचले नाही, त्यांनी कारागिरांचे अंगठे तोडले, हात तोडले, पाय तोडले नि देशी उद्योग नष्ट केले. बेकारी हा शाप इंग्रजांनी दिलेला आहे. त्यांनीच जातीपातींना उच्च नीच असा दर्जा दिला. इतक्या वर्षांच्या गुलामगिरीमूळे आपल्याला सुद्धा इंग्रज सांगून, लिहून गेले तेच खरे वाटते, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. ढाक्क्याची मलमल प्रसिद्ध होती. त्यावेळी तलम पातळाची ( साडीची) घडी काडेपेटीत राहत असे वर्णन खुद्द इंग्रजांनी केलेले आहे. आज पुन्हा याचे स्मरण करण्याची गरज आहे. जे आपला इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत असे म्हटले जाते. त्यामुळे आपण आपला जाज्वल्य पराक्रमाचा आणि विजयाचा इतिहास न विसरता पुढील पिढीत संक्रमीत करण्याची गरज आहे. ती काळाची मागणी आहे असे मला वाटते. सर्व काही सरकार करेल ह्या भ्रमात आपण राहू नये यापेक्षा जे मी करु शकतो ते मीच करेन आणि अगदी आत्तापासून करेन असा संकल्प आपण सर्वांनी या संक्रांतीच्या निमित्ताने करुया. *
देवीने शंकासुर आणि किंकरासुरावर विजय मिळविला. आपण मनातील शंकाकुशंका, हेवेदावे, समजगैरसमज, अनिष्ट रूढी, वाईट चालीरीती, भेदाभेद यावर विजय मिळवून एकसंघ, समरस हिंदू समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करुया. आज दुष्ट शक्ति जाणीवपूर्वक हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम करीत आहेत. पण हिंदू विचार जा जोडणारा आहे. आणि दैनंदिन व्यवहारात तोडणाऱ्या पेक्षा जोडणाऱ्यालाच जास्त प्रतिष्ठा मिळते हे कोणीही विसरु नये. ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत’ असे म्हणून किंवा अशी वाक्ये नुसाती तोंडपाठ करुन आता चालणार नाही तर हे सर्व कृतीत आणण्यासाठी आपण आज वचनबद्ध होऊया. माझे घर सोडून शेजारी, गावाच्या शेजारी असलेल्या माझ्या बंधूला मी तिळगूळ देईन आणि परस्परातील सुप्त रुपात असलेला स्नेह प्रगट करुन वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करेन असा निश्चय आपण सर्वांनी करुया आणि ‘विश्वमैत्री दिन’ साजरा करुया
☆ “जुने जाऊ द्या मरणालागुनी…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
खरे तर इतिहासकाळात आपल्या देशावर अनेकवार आक्रमणे का झाली आणि वारंवार हा देश आक्रमकांपुढे का नमला याची कारणे अज्ञात नाहीत. त्या त्या काळातला समाज एकसंध नव्हता. जातीभेदांनी चिरफळ्या उडालेला होता आणि तो काळाबरोबर ‘बदलत नव्हता. तो ‘स्टॅटिक’ होता. ‘श्रुती-स्मृती-पुराणोक्त’ या चक्रात अडकलेला होता. कोण आला, कोणी राज्य केलं याच्याशी इथल्या समाजाला काही देणंघेणं नव्हतं.
आक्रमक नवे विज्ञान आणि तंत्रज्ञान घेऊन आले. घोड्यांच्या रिकिबीचा शोध ज्यांना लागला, ज्यांना माहीत झाला, त्या टोळ्या रणांगणावर प्रबळ ठरल्या आणि मग गझनीचा महंमद आणि चेंगीजखान धाडी घालून आपल्याला लुटून गेले. त्यानंतर आलेले आक्रमक बंदुका घेऊन आले, तोफा घेऊन आले, वाफेची शक्ती घेऊन आले आणि दरवेळी आपल्याला हरवत राहिले. कोणतेही नवीन तंत्रज्ञान निर्माण न करणारा, भविष्यकाळाचा विचार न करणारा आणि ‘श्रुती-स्मृती-पुराणोक्त’ पद्धतीने भूतकाळात रमणारा आपला. समाज सतत हरत राहिला.
दुर्दैवाने आज अशा विचारसरणीला मिळणारा पाठिंबा वाढत आहे. हे पुच्छप्रगतीचे लक्षण आहे. ज्या दोषांमुळे आपल्या इतिहासात अंधारयुग येऊन गेले त्याच दोषांच्या आपण परत आहारी जात आहोत याचे ते लक्षण आहे. ‘श्रुती-स्मृती-पुराणोक्त’ ही भावना आणि पूर्वजांचे गुणगान करण्यात धन्यता मानण्याची भावना या दोन्ही भावना परत बळकट होत असल्याचे हे लक्षण आहे.
युरोपात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्याच्या काळात गॅलिलिओला ख्रिश्चन धर्माच्या संघटनेशी–चर्चशी संघर्ष करावा लागला. आपल्या समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, तर इतिहासात जगण्याच्या आपल्या या प्रवृत्तीशी संघर्ष करावा लागेल. अशा प्रवृत्तीला प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे खतपाणी घालणाऱ्या विचारधारांविरुद्ध संघर्ष करावा लागेल. जरूर पडली तर केशवसुतांसारखा निर्भीडपणे पुकारा करावा लागेल :
‘जुने जाऊ द्या मरणालागुनि, जाळूनी किंवा पुरुनि टाका !
सडत न एक्या ठायी ठाका, सावध ऐका पुढल्या हाका !’
हे काम सोपे नाही. हा संघर्ष सोपा नाही. पण ज्यांना हा देश, हा समाज एकविसाव्या शतकात खऱ्या अर्थाने समर्थ व्हावा असे वाटत असेल, तर त्यांना या संघर्षासाठी सिद्ध व्हावेच लागेल. असा संघर्ष उभा राहतो की नाही आणि तो कोण जिंकतो यावरच ‘भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणार की नाही’ या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे.
98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ तारा भवाळकर यांना सांगलीत काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा पार पडला. काकासाहेब गाडगीळ हे नुसतेच राजकारणी नव्हते तर साहित्यिकही होते. ‘ग्यानबाचे अर्थशास्त्र’ लिहिणाऱ्या काकासाहेब गाडगीळ यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार हा लोकसंस्कृतीच्या अभ्यासक डॉ तारा भवाळकर यांना देण्यात एक औचित्य साधले आहे. याप्रसंगी काकासाहेबांचे नातू अनंत गाडगीळ यांनी काका साहेबांच्या आठवणी जागवल्या, त्याच वेळेला ताराबाईंच्या साहित्याचे मर्मही सांगितले.
याप्रसंगी ताराबाई बोलताना अनेक आठवणीत रमल्या. त्यांच्या भाषणात त्यांनी एक महत्त्वाचे उद्घृत केले. ते म्हणजे ‘शिक्षणाने माणूस साक्षर होतो, शिक्षित होतो, पण सुशिक्षित होईलच असे नाही. माणसाला शिक्षणामुळे शहाणपण येईलच असेही नाही. याची बरीचशी उदाहरणे आज आपण अवतीभवती पाहत आहोत. बहिणाबाई निरक्षर होत्या पण त्यांच्यात जे शहाणपण होते ते आजच्या उच्च शिक्षित माणसातही सापडणे दुर्मिळ आहे. मराठीला नुसता अभिजाततेचा दर्जा मिळून उपयोगी नाही तर मराठी माणसाने मराठी भाषा जगवली पाहिजे. याप्रसंगी त्यांनी संस्कृतीची सोपी सुटसुटीत व्याख्या सांगितली. ती म्हणजे ‘मी माझ्या भोवतीचे लोक जसे वागतात ती संस्कृती होय. ‘
या 80 वर्षाच्या तरुणीने आपल्या खणखणीत आवाजात जवळजवळ तासभर उत्तम ओघवत्या भाषेत भाषण करून श्रोत्यांना भरभरून वैचारिक मेजवानी देऊन मुग्ध केले त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. याप्रसंगी त्यांना मिळालेल्या सत्काराची रक्कम त्यांनी संवेदना वृद्धाश्रम, आकार फाउंडेशन या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना दिली. यात त्यांच्या मनाचे मोठेपण तर दिसून येतेच, पण त्याचबरोबर त्यांच्यात सामाजिक बांधिलकीची जाणही किती खोलवर रुजली आहे हे प्रकर्षाने जाणवते. या नेत्र सुखद आणि मेंदूला वैचारिक खाद्य देणाऱ्या कार्यक्रमाची ही काही क्षणचित्रे…
☆ “आईशी खोटं बोलणारा सैनिक !”☆ श्री संभाजी बबन गायके☆
कान्हा गोपगड्यांसह एखाद्या गवळणीच्या घरात चोरपावलांनी शिरून शिंक्यावर टांगलेलं लोणी फस्त करायचा! गवळणी यशोदेकडे गाऱ्हाणं मांडायच्या… ती बाळकृष्णाचा कान धरायची… पण मेघःश्याम म्हणायचा… ‘मैं नहीं माखन खायो!’ आणि त्या भोळ्या माउलीला तेच खरं वाटायचं… ती उलटून गोपिकांना म्हणायची… ‘तुमची एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी!’
याचीही आई अशीच भोळी यशोदा… पोरगं नुकतंच फौजेत गेलं आहे. काही महिन्यांसाठी त्याला विशेष लढाऊ विभागात पाठवलं गेलं आहे… अतिरेक्यांशी प्रत्यक्ष लढण्याचा अनुभव यावा म्हणून. हा कालावधी लवकरच पूर्ण होणार आहे. तिथून तो माघारी आला रे आला की त्याला चतुर्भुज करण्याचा चंग यशोदेने बांधला आहे.
ती रोज त्याला विडिओ कॉल करून त्याची याची देही याची डोळा ख्यालीखुशाली विचारल्याशिवाय झोपायची नाही.
त्या दिवशीच्या रात्रीही तिने त्याला फोन लावलाच. आधुनिक सोय आहे आणि शक्य आहे तर का नाही बोलायचं लेकाशी? तो बालवर्गात जायचा तेंव्हा ही त्याची शाळा सुटेपर्यंत व्हरांड्यात बसून राहायची शाळेच्या. एकुलता एक, नवसाने झालेला मुलगा तो.. नाव दीपक ठेवलं होतं… कुलदीपक. दोन मुलींच्या पाठीवर झालेला दीपक!
फोन लागला… दीपक बनियान वरच निवांत बसलेला दिसला तिला. नेहमीचा संवाद सुरू झाला मायलेकात.
“दीपक, बेटा, सब ठीक?”
“हां मां, सब ठीक! शांती है!”
“खाना खाया?”
“हां मां!”
आणि असंच बोलणं होत राहिलं… “लवकर सुट्टीवर ये.. तू मामा झाला आहेस… भाचा वाट पाहतोय मामाची! तुझ्या विना घर सुनेसुने वाटते!”
“हां मां.. बस यहाँ का काम पुरा होते ही घर आऊंगा! बस, अब देर हो रही है! तुम सो जावो!”
“और, तुम बेटे? कब सोने जावोगे?”
“बस मां, अभी सोने ही जा रहा था! अच्छा, गुडनाईट!”
कॅप्टन दीपक, राष्ट्रीय रायफल्स. जम्मू – काश्मीर मध्ये तैनात. २०२० मध्ये भरती. वय चोवीस. वडील उत्तराखंड मध्ये पोलिस अधिकारी.
आईशी दीपक विडिओ कॉल वर असताना लांबून स्क्रीनमध्ये डोकावणाऱ्या वडिलांच्या नजरेतून काही गोष्टी सुटायच्या नाहीत! दीपक जरी बनियान घालून बसलेला दिसत असला तरी मागे त्याचे मळलेले बूट दिसताहेत… रायफल टेकवून ठेवलेली असली तरी वापरलेली दिसते बरीच! मागे त्याचे सहकारी थकून भागून बसलेले दिसत आहेत!.. दिपकच्या डोळ्यांत लालसर झाक दिसते आहे आणि आवाजात काहीसा कंप.
दीपक खोटं बोलतोय आईशी! दिवसभर मोहिमेवर होता… आणि आज रात्रीही निघायची तयारी सुरू आहे… आणि आईला म्हणतोय… झोपायला निघालो आहे!
दिपकच्या वडिलांनी पोलिसातून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. ते आपल्या मुलाला पुरते ओळखून आहेत… दीपक धाडसी आहे, पुढे होऊन नेतृत्व करणारा आहे. स्वतः प्रयत्न करून सैनिक अधिकारी झाला आहे. काश्मीर मध्ये गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानी अतिरेक्यांची घुसखोरी वाढली आहे.. काही सैनिक व अधिकाऱ्यांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे.
दीपकचे वडील टीव्हीवर काश्मिरच्या बातम्या लागल्या की टीव्ही बंद करून टाकायचे दीपकची आई खोलीत आली की!
त्याच रात्री कॅप्टन दीपक अतिरेकीविरोधी शोध आणि नाश मोहिमेवर गेला… अतिरेक्यांना शोधले… पुढे होऊन एका अतिरेक्याच्या मेंदूत चार गोळ्या डागल्या… पण बदल्यात आपल्या छातीवर तीन गोळ्या झेलल्या… आणि तरीही लढत राहिला… मोहिमेचे नेतृत्व करीत राहिला!
साथीदारांनी इस्पितळात पोहचवले…. रात्री आईला सांगितल्याप्रमाणे झोपी गेला… कायमचा! एका कुळाचा एक कुलदीपक विझून गेला!
रात्रंदिन युद्धाचा प्रसंग आहे काश्मिरात. या काळोखात जीव तळहातावर घेऊन तरुण कोवळे अधिकारी, जवान मृत्युला आव्हान देत असतात! त्यांना तुमचे आशीर्वाद पाहिजेत!
स्वातंत्र्यदिनाच्या आधल्या रात्री कॅप्टन दीपक सिंग हुतात्मा झाले ! भावपूर्ण श्रद्धांजली !
☆ राष्ट्रमाता जिजाबाई… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
आज विलक्षण योगायोग आहे. आज एका ‘वीरमाते’चा आणि एका ‘संन्यासी योद्धा’ यांचा जन्मदिन आहे. आपल्या लक्षात आलेच असेल की मी कोणाबद्दल बोलत आहे. हो, आपल्या मनात आहे तेच .. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई आणि बंगालमधील भुवनेश्वरी देवींच्या पोटी जन्माला आलेले नरेंद्र दत्त .. अर्थात ज्यांनी पारतंत्र्याच्या काळात आपल्या उण्यापुऱ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात हिंदू धर्म साऱ्या जगाला समजावून सांगितला ते स्वामी विवेकानंद !!!
जिजाबाईंचा काळ लक्षात घेतला तर सुलतानी आणि अस्मानी संकटाचा. जिथे जिजाबाईंच्या जाऊबाईंना (सरदार शहाजीराजांच्या वहिनीला) गोदावरीच्या घाटावरून मुसलमान सरदारांनी पळवून नेली होती, तिथे सामान्य मनुष्याची आणि त्या काळातील आयाबहिणींची अवस्था काय असेल याची कल्पना केली तरी आपल्या अंगावर काटा उभा राहतो. “मोगलाई आहे का ?” असा प्रश्न जिथे दमनशाही होते, तिथे विचारला जातो. पण त्याकाळापासून हा शब्द प्रचलित आहे म्हणजे त्या शब्दाची दाहकता त्यावेळेला किती असेल, याची आपण कल्पनाच केलेली बरी. आजच्या पिढीला ‘मोगलाई’ या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्यांना बाराव्या शतकापासूनचा इतिहास अभ्यासावा लागेल.
संत ज्ञानेश्वरांपासून भागवत धर्माची, म्हणजेच भक्तिमार्गाची मुहूर्तमेढ पुन्हा रोवली गेली… ..
…. “ज्ञानदेवें रचिला पाया, तुका झालासे कळस।”
सात्विक शक्तीचे बीज संवर्धन करण्याचे काम एका अर्थाने बाराव्या शतकापासून सुरु झाले. त्या काळातील संतांनी राजकीय सुधारणांच्या मागे न लागता व्यक्तिगत साधना (पारमार्थिक), शुचिता, भक्तिमार्गातून समाजाचे संघटन, किर्तनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन, कुरुढींचे उच्चाटन करण्याचे महत्त्वाचे कार्य केले… .. त्या काळात ‘शंभर वेळा थुंकणाऱ्या यवनाला प्रतिकार न करता तुझ्यामुळे मला शंभरवेळा गोदावरीचे स्नान घडले’ असे म्हणणारे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज त्या काळात होऊन गेले ..
तसे ” नाठाळाच्या माथी हाणू काठी” म्हणणारे संत तुकाराम देखील झाले.
तसेच “शक्तीने मिळती राज्ये, शक्ती नसता विपन्नता” असे म्हणणारे समर्थ रामदास सुद्धा समकालीन संत होत… .. शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यावेळेस प्रतिकार करु शकत नसतील असे वाटत नाही, पण त्या काळातील संतांचे चरित्र बघितले तर प्रत्येकाचे जीवन हे त्यावेळेच्या समाजपुरुषाचे प्रतिबिंब दाखविणारे होते. संत एकनाथांच्या काळात एका अर्थाने निद्रिस्त असलेल्या हिंदू समाजाचा स्वाभिमान संत तुकारामया आणि समर्थ रामदासांच्या काळात थोडा अधिक जागृत झालेला होता असे म्हटले तर वावगे होणार नाही. या सर्व संतांच्या मांदियाळीचे आपल्यावर अनंत उपकार आहेत आणि म्हणूनच आपण आज हिंदू म्हणून अभिमानाने जगत आहोत.
नारळाचे रोप कोंब फुटून वरती यावयास सहा महिने लागतात, त्यांनंतर ते रोप जमिनीत लावले तर नारळ (फळ) यावयास सामान्यपणे दहा वर्षे लागतात. इथे तर सामान्य मनुष्य अतोनात हालआपेष्टा सहन करीत जीव मुठीत धरून जगत होता. ‘स्वाभिमान’ नावाचा एखादा गुण असतो, हे सामान्य मनुष्याच्या ध्यानीमनीही नव्हते. अशा निद्रिस्त मनात भक्तिमार्गाच्या सहाय्याने संतमंडळींनी स्वत्वाचे, सात्विकतेचे बीज आधी पेरले, रुजवले आणि मग विकसित केले आणि याचे मूर्तीमंत, तेज:पुंज उदाहरण म्हणजे श्रीमानयोगी छत्रपती शिवाजी महाराज !!!
अंगी पराक्रम असताना आपले सरदार जहागिरी आणि वतनासाठी आपल्याच भाऊबंदाना छळत होते आणि परक्या मोगलांची चाकरी करीत होते. या सर्वाला प्रतिकार करणारा कोणी तरी सुपुत्र तयार करावयास हवा. जिजाबाईंनी ही सर्व परिस्थिती अभ्यासली आणि आपल्या मनाशी पक्की खूणगाठ बांधली. हिंदूंचे स्वतःचे सिंहासन असावे, हिंदू राजा होऊ शकतो हे साऱ्या भरतवर्षाला कळावे असा संकल्प जिजाबाईंनी केला आणि ‘याची देहि याचीडोळा’ सत्यात उतरवला. जरी तो काळ मोगलाईचा होता तरी आपला पूर्व इतिहास हा विजयाचाच होता. त्यांनी विजयाचा इतिहास आपल्या मुलाला शिकविला. रामाने पत्नीला पळवणाऱ्या रावणाला वानरांची सेना संघठीत करून स्वसामर्थ्याने युद्धात मारले, अर्जुनाने युद्ध करून आपले धर्माचे राज्य मिळविले, हे शिकविले. कोणतीही गोष्ट किमान दोन वेळा तरी नक्की घडते. त्या प्रमाणे जिजाबाईनी ‘शिवाजी’*ला प्रथम आपल्या मनात जन्मास घातले आणि त्याप्रमाणे आपल्या मुलास घडविले. एक *’आई*ने मनात ठरवले तर काय करु शकते ते छत्रपतींकडे बघितले की लक्षात येते. अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस “मेलास तरी चालेल पण शत्रूला मारल्याशिवाय परत येऊ नकोस” असे म्हणणारं आईचे मन किती कर्तव्यनिष्ठुर असेल. माझ्या अनुमानाप्रमाणे त्याकाळात प्रत्येक घरात एकतरी ‘जिजाऊ’ नक्की असेल. कारण ज्याप्रमाणे वर्गात एकाचाच प्रथम क्रमांक येतो, त्याप्रमाणे *एकच शिवाजी झाला आणि बाकीचे त्यावेळेच्या गरजेनुसार कोणी सरदार झाले तर कोणी मावळे झाले. शिवाजी महाराजांसाठी मरायला तयार होणारे मावळे हे अर्धपोटीच होते, पण त्याच्या माता ह्या जिजाबाईंप्रमाणे शूर होत्या, म्हणून त्यांना आपल्या मुलाच्या ‘करिअर’ची चिंता नव्हती. हिंदवी स्वराज व्हावे ही जशी श्रींची इच्छा होती तशी ती सामान्य मनुष्याची देखील होती. आणि ही ‘ईच्छा’ सामान्य मनुष्याच्या अंतरात प्रकट करण्याचे श्रेय निश्चितच जिजाबाईंना द्यावे लागेल. आणि म्हणूनच त्या काळातील सामान्य आई देखील स्वराज्य हेच मुलाचे ‘करिअर’ मानू लागली. आणि जिजाबाईंप्रमाणे ती देखील लेकराला स्वराज्यासाठी खुशाल बलिदान दे आणि घाबरुन पळून आलास तर मला तोंड देखील दाखवू नकोस असे ठणकावून सांगू लागली.
आजची परिस्थिती फार वेगळी आहे अशातला भाग नाही. फक्त आक्रमकांचे मुखवटे आणि स्वरुप बदलले आहे. सर्वांचे ध्येय एकच आहे ते म्हणजे हिंदुस्तानचा, हिंदूधर्माचा नाश. आज ‘आई’ होणे हे ‘चूल आणि मूल’*ह्या चौकटीत अडकणे, अशा पद्धतीने समाजात प्रस्तुत केले जात आहे. खरंतर ‘आई’ होणे हा प्रत्येक स्त्रीचा निसर्गदत्त विशेषाधिकार आहे. स्त्री जातीचा *’आई’ असणे हा खूप मोठा गौरव आहे. स्त्रीच्या अर्धनग्न देहाचा विविध उत्पादनांच्या जाहिरातीसाठी उपयोग करणाऱ्या तथाकथित पुढारलेल्या समाजाला मुलींनी ‘आई’ व्हावं, आईपण आयुष्यभर निभवावे, चूल आणि मूल सांभाळावे हे मागासलेपणाचे निदर्शक वाटते. याला काय म्हणावे ? स्त्रीच्या कर्तृत्वाबद्दल निदान भारतात तरी कोणी संशय घेऊ नये. कारण ती यमावर विजय मिळवणारी ‘सावित्री’ झाली , ती ‘गार्गी’ झाली, ती ‘मैत्रेयी’ झाली, ती ‘झाशीची राणी’ झाली, ती ‘अहिल्याबाई होळकर’ झाली, ती ‘अरुणा असफली’ झाली, ती ‘इंदिरा गांधी’ झाली. ती काय झाली नाही असे नाहीच. पण ती चूल आणि मूल यातच अडकली होती किंवा अडकवली गेली होती असे म्हणणे मात्र फार मोठी शोकांतिका आहे. आपल्याकडे कर्तृत्ववान स्त्रियांची महान परंपरा आहेच. पण त्यापेक्षा मोठी परंपरा आपल्याकडे जिजाबाईंसारख्या मातांची आहे. स्वामी विवेकानंदांची आई, सरदार भगत सिघांची माता, स्वा. सावरकरांची आई, चाफेकर बंधूंची आई, सर्व क्रांतीकारकांच्या माता, डॉ. रघुनाथ माशेलकराची आई, थोडक्यात सर्व महान पुरुषांच्या माता. कारण चांगल्या प्रतीच्या झाडासच रसाळ आणि मधुर फळे येतात. इकडे शिवजयंतीला महाराज !! तुम्ही परत या, असं म्हणायचं ? आणि दुसरीकडे स्त्रीभ्रूणहत्या करायची, स्त्रियांवर, लहान लहान मुलींवर अत्याचार करायचे, असं आता चालणार नाही. समजा छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न झाले आणि मी जन्म घेतो असे म्हणाले तर आपल्याकडे जिजाबाई कुठे तयार आहेत?
आजच्या शुभदिनी आपण सर्वांनी आपल्या घरात, परिवारात ‘जिजाबाई’ कशा घडवता येतील असा संकल्प करुया. मग शिवाजी महाराज आणि मावळे नक्कीच जन्माला येतील यात शंका नाही.
राष्ट्रमाता जिजाबाई यांच्या चरणी माझे साष्टांग दंडवत…
‘मोबाईल चार्जर मोबाइलला लावला नसेल, पण बटन चालू असेल तर वीज वापरली जाते का? ‘
…हाच प्रश्न टीव्ही, एसीसारख्या उपकरणांसाठी लागू होतो. ज्यांचे बटन चालू असते, पण वापर सुरू नसतो, तर वीज वापरली जाते का?
वीजनिर्मिती होते त्या ठिकाणी एसी वोल्टेज तयार होते आणि ते आपल्या घरापर्यंत त्याच रूपात पोहोचते. जवळ जवळ सगळीच आधुनिक डिजिटल इलेक्ट्रॉनिक उपकरणे डीसी वोल्टेजवर काम करतात. मग या उपकरणांना एसी वोल्टेजपासून डीसी वोल्टेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी काही कन्व्हर्टर सर्किट वापरले जाते. यामध्ये रोहित्र (Transformer), रेक्टिफायर, फिल्टर या तिघांचा वापर होतो.
आता चार्जरचं उदाहरण घेऊ. हे कसं काम करते? ….
चार्जर ५ वोल्ट डीसी आपल्या मोबाईलला देतो. आपण चार्जरला २३० वोल्ट एसी देतो. मग रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) या २३० वोल्ट एसीचे १२ वोल्ट एसीमध्ये रूपांतर करतो. कमीत कमी विजेचे नुकसान करून हे रूपांतर करणे रोहित्राचं (ट्रान्सफॉर्मर) काम. मग रेक्टिफायर नावाचे सर्किट डायोड वापरून एसीचे डीसी वोल्टेजमध्ये रूपांतर करते. चार्जर मोबाईलला लावले नसेल तर रेक्टिफायर, फिल्टर व बाकी सगळं काही काम करत नाही व ऊर्जाही वापरत नाही, पण रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) मात्र आपलं काम करत राहतो. कारण रोहित्रामध्ये (ट्रान्सफॉर्मर) प्राथमिक आणि दुय्यम वायडिंग असतात. प्राथमिक वायडिंमधून विजेचा प्रवाह चालूच असतो. मग तुम्ही चार्जर वापरात असाल किंवा नसाल.
१ साधा ५ वॅटचा चार्जर जर बटन बंद न करता दिवसभर चालू राहिला, तर १ वॅट ऊर्जा वाया जाते. चार्जर सुमार दर्जाचा असेल, तर २०% अजून ऊर्जा वाया जाते. वर्षभर असं होत राहीलं, तर ३६५ वॅट ऊर्जेचं नुकसान. ६ रुपये एका युनिटची किंमत पकडली तर जवळपास २००० रुपयांची वीज वाया जाते. पैशामध्ये मोजलं तर जास्त वाटत नाही. पण कित्येक घरांमध्ये असे कित्येक चार्जर चालू सोडले जात असतील. १ किलोवॅट ऊर्जा वातावरणात १ पाउंड कार्बन डायॉक्सिड उत्सर्जित करते. जगात फक्त या चार्जरमुळे लाखो किलोवॅट ऊर्जा वाया जाते आणि त्याजोगे हरित वायूंचे नाहकच उत्सर्जन होते.
मोबाईलच्या चार्जरचे बटन बंद न करणे, हे अज्ञान किंवा आळस असू शकतो. आळसाला काही पर्याय नाही, पण तुम्हाला आतापर्यंत वाटत असेल, की चार्जर न लावता बटन चालू ठेवल्यामुळे ऊर्जा वापरली जात नसेल, तर तो तुमचा गैरसमज आहे, म्हणून आतापासून चांगली पर्यावरणपूरक सवय अंगीकारूया व चार्जरचे बटन बंद ठेऊ या.
जुने चार्जर ५ वॅटचे आहेत, पण नवीन येणारे चार्जर ३० वॅटपर्यंत येतात. ६ पट ऊर्जा म्हणजे ६ पट नुकसान. आधी घरात सगळ्यांचे मिळून एक चार्जर असायचे, पण आता प्रत्येकाचा एक किंवा आळशी लोकांचा प्रत्येक खोलीमध्ये एक चार्जरसुद्धा असतो. त्या हिशेबाने प्रत्येक व्यक्तीकडून किती ऊर्जेचा अपव्यय होतो, याचा विचार करण्याची गरज आहे. भारतात नेहमीप्रमाणे हा उपेक्षित विषय आहे. पण युरोपियन देशांनी १ वॅट धोरण अवलंबले आहे, म्हणजे उपकरणाचे बटन बंद नसेल केलं तर १ वॅटच्या वर ऊर्जा वापरू नये. तसे कायदे आहेत. विजेची मागणी आणि वापर वाढतच आहे. त्या अनुषंगाने आपल्याला या गोष्टीचा भविष्यात गांभीर्याने विचार करावा लागेल, हे नक्कीच.
मोबाईल चार्ज करत नसाल, तर बटनसुद्धा बंद करा. कारण तो थोडी का होईना वीज वापरतोच. म्हणून शक्य तेवढ्या सर्व उपकरणांना हा नियम लागू करू या. ऊर्जेचा अपव्यय टाळू या, कारण ‘उर्जा बचत’ हीच उर्जा निर्मितीही असते.
चार्जर एक उदाहरण आहे. सर्व इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, लॅपटॉपसाठी वरील नियम लागू आहे. बटन बंद करणे अथवा शटडाऊन करणे, हाच पर्याय आहे.
*आजवर माहीतच नव्हतं हे ठीक आहे! पण आता हे माहित झालं आहे ना? तर किमान आपण आजपासून ठरवूया की, काम नसेल तेव्हा बटन बंद करुया. असा निर्धार केला तर पहा किती मोठा बदल घडू शकेल. थेंबाथेंबातून फक्त तळेच साचत नसते, तर वीज देखील वाचत असते !
विचार करा !!…
(महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) तर्फे )
प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी
मो – 9421053591
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ खोलवर विचार करा – मूळ इंग्रजी लेखक : अनामिक ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆
… तुमचा जीवनरक्षक कोण आहे??
अनीता अल्वारेज, अमेरिकेतील एक व्यावसायिक जलतरणपटू. तीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान स्पर्धक म्हणून इतर स्पर्धकांसह जलतरण तलावात उडी घेतली आणि उडी मारताच ती पाण्याखाली गेल्यावर अचानक बेशुद्ध पडली.
जिथे संपूर्ण जमाव फक्त विजय आणि पराभवाचा विचार करत होता, तिथे अनिता नियोजित वेळेपेक्षा जास्त काळ पाण्याखाली असल्याचे तिच्या प्रशिक्षक अँड्रिया यांच्या लक्षात आले.
जगज्जेतेपदाची स्पर्धा सुरू आहे हे सर्व काही क्षणात अँड्रिया विसरली व एक क्षणही वाया न घालवता आंद्रियाने स्पर्धा सुरू असतांनाही जलतरण तलावात उडी घेतली. तेथे असलेल्या हजारो लोकांच्या काही लक्षात येईपर्यंत अँड्रिया अनितासोबत पाण्याखाली होती.
पाण्याखाली गेल्यावर अँड्रियाने अनिताला स्विमिंग पूलाच्या तळाशी पाण्याखाली बेशुद्ध अवस्थेत पडलेले पाहिले. अशा स्थितीत पाण्याखालून ना हात पाय हलवून इशारा करता येतो, ना मदतीसाठी कुणाला आवाज देणे शक्य होते. अशा परिस्थितीत अँड्रियाने बेशुद्ध अवस्थेतील अनिताला बाहेर काढल्याचे बघून हजारो लोक अक्षरशः सुन्न झाले. आपल्या समयसुचकतेमुळे अँड्रियाने अनिताचा जीव वाचवला.
ही घटना आपल्या आयुष्याशी जोडून बघता आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक मोठा प्रश्न सोडवला असल्याचे जाणवेल !
किती माणसं आपल्या आयुष्याशी जोडलेली असतात हे आपल्या लक्षातही येत नाही, आयुष्यात आपल्याला कितीतरी जण दररोज भेटत असतात, पण मनुष्य प्रत्येकाला आपल्या मनातील गोष्ट काही उकल करून सांगू शकत नाही. आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातही तो कुठेनाकुठेतरी बुडत असतो, कोणत्या ना कोणत्या समस्येला तो सामोरा जात असतो, मनावर कसलातरी दबाव घेऊन तो आयुष्यात अस्वस्थ होत असतो, पण कुणाला ते सांगू शकत नाही, किंवा कुणाला सांगण्याइतपत कुणी जवळचं उपलब्ध नसतं.
जेव्हा माणूस आपल्या वेदना, त्रास कोणाला सांगू शकत नाही, तेव्हा मानसिक ताण इतका वाढतो की तो स्वतःला सगळ्या जगापासून, सगळ्यांच्या नजरेपासून दूर, एकांतात, स्वतः ला चार भिंतीत कैद करून घेतो. ही अशी नाजूक वेळ असते जेव्हा माणूस आतल्याआत बुडायला लागतो, त्याची इच्छा संपलेली असते, सहनशीलतेचा अंत झालेला असतो. ना कोणाशी बोलणे, ना कोणाला भेटणे. ही मानसिक परिस्थिती मानवासाठी सर्वात धोकादायक असते.
जेव्हा माणूस त्याच्या अशा बुडण्याच्या अवस्थेतून जात असतो, तेव्हा इतर सर्व प्रेक्षक ज्याच्या त्याच्या आयुष्यात व्यस्त असतात. हा माणूस मोठ्या संकटात सापडला आहे याची कोणालाच पर्वा रहात नाही. एखादी व्यक्ती काही दिवस गायब झाली तरी काही काळ लोकांच्या ते लक्षातही येत नाही.
अचानक काही घटना घडली तेव्हा लोक जमले तर त्याच्याविषयी विचार करतात, की हा पूर्वी किती बोलायचा, आता तो बदलला आहे किंवा त्याला गर्व झाला आहे की आता तो मोठा माणूस झाला आहे. तो बोलत नाही तर जाऊ द्या, आपल्याला काय करायचं! किंवा त्यांना असं वाटतं की जर तो आपल्याला आता दिसत नाही तर तो त्याच्या आयुष्यात आनंदी आहे, म्हणून तो आपल्याला दिसत नाही.
अनिता एक निष्णात व्यावसायिक जलतरणपटू असूनही ती बुडू शकते तर कोणीही त्यांच्या आयुष्यातील वाईट काळातून जाऊ शकतो, हे समजून घेणे आवश्यक आहे. पण त्या इतर लोकांशिवाय एकादी अशी व्यक्ती असेल जी तुमच्या मनाचा कल, मनःस्थिती ताबडतोब ओळखू शकेल, तिला न सांगता सर्व काही आपसूकच कळेल, तो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूवर नेहमी नजर ठेवेल, थोडासा त्रास झाला तरी तो येऊन तुम्हाला तुमच्या समस्या विचारेल.
तुम्ही तुमची वागणूक ओळखा, स्वतःला प्रोत्साहन द्या, तुम्ही स्वतः ला सकारात्मक बनवा आणि अँड्रियासारखे प्रशिक्षक बनून तुम्ही दूसऱ्याचा जीव वाचवा.
आपल्या सर्वांनाच अशा प्रशिक्षकाची खरी गरज आहे… असा प्रशिक्षक कोणीही असू शकतो. तुमचा भाऊ, बहीण, आई, वडील, तुमचे कोणी मित्र, कोणी तुमचे हितचिंतक, कोणी नातेवाईक, कोणीही, जो न सांगता तुमच्या भावना, स्वभावातील बदल ओळखून लगेच सकारात्मक कारवाई करू शकेल.
खोलवर विचार करा व वेळीच शोधा, जीवनातील तुमचा जीवन प्रशिक्षक कोण आहे ते….
मूळ इंग्रजी लेखक- अनामिक.
मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
रमण नावाचा एक तरुण. त्याचे वडील तीस वर्षे सैन्यात शिपाई होते. उत्तम कामगिरी बजावल्याने त्यांना मानद कॅप्टन अशी बढती मिळाली होती. आपल्याही मुलाने सैनिक व्हावे, नव्हे सैन्य अधिकारी व्हावे, अशी त्यांची इच्छा असणं स्वाभाविक होतं. पण रमण अभ्यासात रमला नाही. त्याला हॉटेलचे क्षेत्र खुणावत राहिले. त्यातून Hotel Managementची पदवी प्राप्त करून तो एका मोठ्या हॉटेलात शेफ म्हणून रुजू झाला…ही नोकरी त्याने तीन वर्षे केली!
पण त्याच्या वडिलांचे स्वप्न त्यालाही पडू लागले होते. वडिलांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद यांच्या जोरावर त्याने आणखी मेहनत घेतली..अभ्यास केला..व्यायाम केला आणि Junior Commissioned Officer म्हणून तो सेनेत भरती झाला. त्याचे पहिले पद होते…नायब सुबेदार. अनुभव आणि ज्ञान पाहून श्री.रमण यांना
इंडीयन मिलिटरी अकॅडमी मध्ये Mess In-Charge पदाची जबाबदारी देण्यात आली.
सैन्य अधिकारी बनत असलेल्या साहेब लोकांना उत्तम भोजन देण्याची त्यांची जबाबदारी बनली. पण इथेच त्यांचा दृष्टिकोन बदलला. प्रशिक्षणार्थी तरुण आणि आपण यांत फरक आहे तो शिक्षणाचा आणि आत्मविश्वासाचा..त्यांनी समजून घेतले. त्या तरुणांशी त्यांनी मैत्री संबंध प्रस्थापित केले. त्यांनी कसा अभ्यास केला, कसे परिश्रम घेतले ते सारे जाणून घेतले. सेवेतील सक्षम लोकांना भारतीय सेनेत अधिकारी होण्याची संधी दिली जाते. श्री.रमण यांनी कठोर मेहनतीच्या जोरावर ही संधी साधली. पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आले..पण रमण खचून गेले नाहीत. त्यांनी अभ्यास आणखी वाढवला…आणि हे करत असताना त्यांनी कर्तव्याकडे दुर्लक्ष केले नाही. याचेच फळ त्यांना तिस-या प्रयत्नात मिळाले. Officer Cadre परीक्षेत त्यांनी घवघवीत यश मिळवले….वयाच्या पस्तीस वर्षांपर्यंत त्यांना संधी होती….अगदी शेवटच्या क्षणी त्यांना यशश्री प्राप्त झाली.
जिथे इतरांना जेवण वाढले, अधिकाऱ्यांना salute बजावले, तिथेच मानाने बसून भोजन करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले ..अधिकारी बनून भारत मातेची सेवा करण्याचे स्वप्न पाहिले…बाप से बेटा सवाई बनून शेवटी अधिकार पदाची वस्त्रे परिधान केलीच!
नुकत्याच झालेल्या IMA passing out parade मध्ये मोठ्या अभिमानाने त्यांनी अंतिम पग पार केलं…त्यावेळी त्यांच्या मनात किती अभिमान दाटून आला असेल नाही?
लेफ्टनंट रमण सक्सेना ….एका अर्थाने यश Success ना म्हणत असताना successful होऊन दाखवणारा लढाऊ तरुण!
चित्रपटात हिरो होणं तसं तुलनेने सोपे असेल…हॉटेलात काम करून चित्परपटात हिरो बनलेले आपण पाहिलेत…पण सैन्लायाधिकारी झालेला असा तरुण विरळा! लाखो सक्षम तरुण मुलांमधून निवडले जाणे म्हणजे एक कठीण कसोटी असते!
सक्सेना साहेबांनी दाखवलेली ही जिद्द प्रत्यक्ष लढाईच्या मैदानात सक्सेना साहेबांना उपयोगी पडेल, यात शंका नाही! जय हिंद! 🇮🇳
जय हिंद की सेना! 🇮🇳
यातून सर्वांना प्रेरणा मिळू शकेल.
माझा उद्देश फक्त आपल्या तरूणांचे कौतुक करण्याचा असतो…त्यातून एखादा मुलगा, मुलगी प्रेरणा घेईल…अशी आशा असते. तशी उदाहरणे मी पाहिली आहेत, म्हणून हा लेखन प्रपंच. ज्ञानी माणसांनी या विषयावर अधिक लिहावे. जय हिंद !
(How is the Josh…! ही आपल्या सैनिकांची हल्लीची घोषणा आहे. उरी सिनेमा आल्यापासून ही घोषणा प्रसिद्ध झाली. तुमच्यात किती उत्साह आहे…यावर High sir असे उत्तर दिले जाते !)
☆ ‘स्थितप्रज्ञ’ अवस्था –लेखक : श्री गिरीश ओक ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
संध्याकाळी घरी देवासमोर दिवा लावणे हे आईचे संस्कार, लावलेले वळण, म्हणून आईला घरी जाऊन आवरून येतो असे सांगून, नर्सताईंना किती वेळाने परतेन ही कल्पना देऊन रस्त्याने भराभर चालत हॉस्पिटलमधून घरी पोहचलो. हातपाय धुवून देवा समोर दिवा लावला व तास दीड तासात घरातील आवरले. स्वतःशीच म्हणालो आता जरा निवांत बसू व मग पुन्हा हॉस्पिटलला आईकडे जाऊ. जेमतेम १५ मिनिटे झाली असतील तर दाराची बेल वाजली, समोर पाहतो तर साहेबराव.
आत ये म्हणून त्यास खुणावले तसे तो म्हणाला ” सिक्युरिटीने सांगितले तुम्ही घरी आला असे, म्हणून आईंची तब्येत कशी आहे ते जाणून घ्यायला इकडेच वळलो. ” मी त्याला खाली बसण्यास खुणावले. त्यास म्हणालो “आईची तब्येत स्थिर आहे. श्री गुरुमाऊली, डॉक्टर व देवमाणसे आहेत सोबतीला मग त्यांच्यावर विश्वास ठेवायचा व आपले प्रयत्न सुरु ठेवायचे, नसती चिंता करून काय साधणार”.
साहेबरावाने माझे उत्तर ऐकून सरळ मुद्दयाला हात घातला, “दादा तुमचं बोलणं कधी कधी उलगडतच नाही. अहो आईंची तब्येत सिरीयस आहे माहित आहे मला, पण मला समाधी अवस्थेबद्दल सांगताना तुम्ही सांगितलेले, तसे काहीसे बोलताना शांत वाटता व आम्ही कोड्यात पडतो”.
मी म्हणालो “साहेबा, अरे मी इतका मोठा निश्चित नाही, बस श्री गुरुसेवक आहे हेच काय ते पुरेसे आहे. अरे बाबा ती पातळी गाठणे फार कर्मकठीण, दुर्लभ अवस्था आहे. पराकोटीच्या श्री गुरुदेवसेवेनंतर श्री गुरुराव कृपेनेच लाभते त्याला ‘स्थितप्रज्ञ’ अवस्था म्हणतात”.
साहेबराव तो काय मला सोडणार नव्हता, “दादा मी सोडतो तुम्हाला हॉस्पिटलला, पण वेळ असेल जवळ तर सांगता का जरा काही स्थितप्रज्ञ अवस्थेबाबत”. मला देखील साहेबरावाच्या विचारण्याचे कौतुक वाटले, परमार्थाच्या वाटेवर, अर्थ जाणून घेण्यास आपण जर उत्साह, आतुरता दाखवली नाही तर आपल पाऊल पुढे पडत नाही.
तासभर अवधी हातात होता त्यामुळे म्हणालो…..
“जेवढे मला आजवर उलगडले ते सांगतो, पहा तूला किती समजते, कारण हा विषय अतिशय खोल आहे. साहेबा अरे समजा एखादया जागी जिथे वारा वाहात नाही अशा ठिकाणी तेवत असलेली समईची ज्योत जशी निश्चल असते, तसेच श्री गुरुदेव मार्गदर्शनानुसार प्रामाणिक साधना करणाऱ्या व्यक्तीचे मन हे स्थितप्रज्ञ म्हणजे निश्चल, स्थिर, ताब्यात, नियंत्रणात असते. अशा गुरुसेवकाचे मन चंचल नसते, त्याची मनःस्थिति डळमळीत, अस्थिर, दोलायमान नसते. आयुष्यात अडचणीच्या, संकटाच्या, अटीतटीच्या, संघर्षप्रसंगी माणसाचे मन जर स्थितप्रज्ञ म्हणजे निश्चल असेल तर तो कोणत्याही बिकट प्रसंगावर श्री गुरुकृपेने मात करू शकतो. ”
“ साहेबा आपण सामान्य माणसे असल्या प्रसंगी फार गोंधळतो, काय करावे ते सुचत नाही, बावरतो, मायेच्या मोहात वेढले जातो. अगदी पुरते भावविवश होतो. परिणामी स्वधर्म, म्हणजे प्रसंगानुरूप कसे वागायला हवे ह्याचा आपणास विसर पडतो. ज्ञान, बुद्धीचे दरवाजे स्वतःच बंद करून, स्वतःस कोंडून घेतो व बुद्धिभ्रंश झाल्याप्रमाणे वागू, बोलू लागतो. ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की तो माणूस आत्मघात, आत्मविनाशाकडे कधी कसा वळला हे त्याचे त्यालाच कळत नाही. ”
“ वास्तविक पाहता प्राणीमात्रात माणूस हा अत्यंत बुद्धिमान प्राणी पण बहुतेक वेळा स्थितप्रज्ञता.. म्हणजे निश्चलतेच्या अभावामुळे जनावरापेक्षा अधिक बहिर्मुख होतो. अति सुखात श्री गुरुरायांनी दर्शविलेला मार्ग विसरतो. यशाच्या धुंदीत बेधुंद होतो, हुरळून जातो. मग कधी कधी आनंदाच्या उकळ्या, तर कधी कधी तो चिडतो, अकारण संतापतो. सत्य मात्र इतकेच की कधी अति आनंदाने तर कधी घोर निराशेने त्याचे मन, त्याची बुद्धी, वादळात सापडलेल्या होडीसारखी हेलकावे खात असते. ह्या सगळ्याचा सर्वात वाईट परिणाम काय तर जणू रात्रीच्या अंधाराने सूर्यप्रकाशास गिळंकृत करावे तसे चंचल माणसाचा बुद्धिभ्रंश अंतरातील ईश्वरास झाकोळून टाकतो. त्या माणसास श्री गुरुदेव दत्त ह्यांचे तसेच त्यांच्या वचनांचे, शिकवणीचे विस्मरण होते. “
“साहेबराव अरे स्थितप्रज्ञ किंवा निश्चल माणसाचे वागणे अगदी ह्याच्या विरुद्ध असते. तो श्री गुरुवचन अनुसरणारा असतो, पूर्णतः अंतर्मुख होऊन विचार करणारा, वागणारा, बोलणारा असतो. प्रारब्धाने, श्री गुरुकृपेने लाभलेल्या भौतिक सुखाने तो हुरळून जात नाही आणि अडचणीत, दुःखात हतबलही होत नाही. सदैव आत्मानंदाच्या नदीत डुंबत असतो, स्वस्थचित्त, शांत, ज्ञानाने परिपूर्ण असतो. त्यास सुख किंवा दुःख ह्या भावना स्पर्शत नाहीत. ”
“स्थितप्रज्ञ किंवा निश्चल मनाच्या व्यक्तीचे मोठे लक्षण म्हणजे तो अहंकारी नसतो. त्याने अहंकार, अहंभाव, घमेंड श्री गुरुचरणी गुरुसेवामार्गे नियंत्रणात राखलेली असते, हेच कारण म्हणून स्थितप्रज्ञ माणसास सर्व जीवाबद्दल आत्मीयता असते, प्रेम असते, जिव्हाळा असतो. तो सदैव श्री गुरुसेवेची संधी मानून दुसऱ्यांना साह्य करण्यासाठी तयार असतो. तो कोणाचे भले करू शकला नाही, तरी त्याच्या मनात कोणाबद्दलही कधीच वाईट येत नाही, अथवा तो कोणाचे वाईट करू अथवा चिंतू शकत नाही. ‘हे विश्वची माझे घर’ ह्या भावनेने प्रेरित होऊन तो सूर्यप्रकाशासारखा उजळून निघालेला असतो. ह्याचे मूळ कारण श्री गुरुकृपेने लाभलेले ज्ञान, सदाचारी वर्तणूक, सद्वर्तन व संयम ह्या अंगी विकसित केलेल्या सद्गुणांमुळे त्याच्या मनावर त्याने ताबा, नियंत्रण मिळवलेले असते. ”
“साहेबा अशी व्यक्ती म्हणजे देवमाणूसच. ज्यांचे अंतरी श्री गुरुदेव अनुभवावे. अखंड श्री गुरुसेवेत रमणारी व सर्वाना शक्य ती मदत सदैव करणारी. अरे ह्या देवमाणसांना माझ्या मते स्वतः श्री गुरुमाऊलीच घडवतात, जागोजागी भक्त रक्षणार्थ योजतात. आज आईचे उपचार शक्य झाले ते ह्यांचे कृपेनेच. अरे श्री गुरुमाऊली स्वस्वरूपात येऊन नाही तर ह्या देवमाणसांच्या हस्ते आपणास साह्य करीत असतात. अशी व्यक्ती आयुष्यात भेटलीच तर त्या क्षणीच विनम्र नमस्कारावे.
अशा व्यक्तीला कशाचाही व कोणाबद्दल राग, लोभ, मत्सर आणि द्वेष नसतो, अशी व्यक्ती सदैव प्रसन्न चित्त असते. एका भांड्यातील पाणी दुसऱ्या भांड्यातील पाण्यात ओत, पाणी पाण्यास काय बुडवणार, ते फक्त मिसळते, पूर्वावस्था कायम असते.. तसेच शरीरधर्मानुसार जरी स्थितप्रज्ञ व्यक्तीचा चेहरा उदास, मलूल किंवा शारीरिक मरगळ आपणास जाणवली तरी ह्यांच्या अंतरंगाची प्रफुल्लित अवस्था, मानसिक प्रसन्नता अखंड कायम स्वरूपी असते. ”
“साहेबा एकदा का आपली बुद्धी अंतरंगातील भगवंताचे ठायी केंद्रित झाली की चित्त, अंतःकरण, मन केव्हाही किंचित देखील सैरभैर, अस्थिर, विचलीत होत नाही. खरच ज्यास असे व्हावे असे वाटते त्यासाठी साधा सरळ सोपा मार्ग म्हणजे म्हणजे नित्य श्री गुरुस्मरण, माझे श्री गुरुदेव दत्त निरंतर माझ्यासोबत आहेत, असा भाव मनात दृढ खोलवर रुजवणे. अरे साहेबा हे तितके सोपे पण नाही आणि मनात दृढ निश्चय केल्यास कठीण देखील नाही. मात्र दृढ श्रद्धा, एकाग्रता, निष्ठा, मनाचा निग्रह आवश्यक आहे. अंतरातील श्री गुरुमूर्तीचा अनुभव, आपण ओठी श्री गुरुस्मरण करीत घ्यायचा आहे. तेव्हा कुठे तुझा अंतरात्मा आणि भगवंत श्री गुरुदेव दत्त भिन्न, वेगळे नाहीत अशी श्री गुरुनाम व श्री गुरुरूपाच्या समरसतेची अंतरंगास अनुभूती येते. ”
“स्थितप्रज्ञ माणसाचे मन हे समुद्रासारखे अक्षुब्ध, क्षोभरहित, दु:खरहित असते. अशी माणसे समाजात कितीही, कशीही, कुठेही वावरली, मिसळली तरी त्यांची मानसिक स्थिती स्थिर, त्यांची प्रज्ञा म्हणजे बुद्धी स्थिर असते. कितीही नद्यांचे पाणी येऊन समुद्रात मिसळले तरी समुद्र पातळी स्थिर असते, नद्यांच्या प्रवाहाच्या मिसळण्याने समुद्रास महापूर आला असे ऐकलेले आठवते का कधी तुला साहेबा ? उन्हाळ्यात जरी सर्व नद्या आटल्या आणि त्यांचे पाणी समुद्रात मिसळले नाही तरी समुद्र पातळी कायम असते, तो कधी आटत नाही. ”
“ज्याचे उभे आयुष्य श्री गुरुदेव दत्त ह्यांचे कृपेने, शिकवणीने उजळून निघाले आहे, तो सूर्यप्रकाशासमक्ष पणती कशी लावेल आणि पणती लावली नाही म्हणून अंधारात सूर्यप्रकाशास कोंडणे जितके अशक्य तितकेच स्थितप्रज्ञ व्यक्तीची मानसिकता विचलीत होणे केवळ असंभव आहे. स्थितप्रज्ञ व्यक्तीच्या समोर सर्व प्रलोभने पुसट ठरतात कारण श्री गुरुदेव दत्त कृपेने लाभलेल्या आत्मज्ञानाने ही व्यक्ती इतकी ऐश्वर्य संपन्न झालेली असते की ह्यांना जगातील कोणतेही इतर ऐश्वर्य कवडीमोल वाटते. सत्यच आहे ज्याचे जवळ श्री गुरुदेव दत्त माउली त्यास कशाची कमतरता जाणवणार. ”
“स्थितप्रज्ञ व्यक्ती आत्मसंधान साधण्यात मग्न असते. अंतरिक परमोच्च सुखाच्या आनंदाने तृप्त असते. श्री गुरुदेव दत्त कृपेने लाभलेल्या अंतर्ज्ञानाने संतुष्ट असते. ज्याचे मनी साक्षात श्री गुरुदेव दत्त अखंड त्याचे सोबत आहेत असा भाव पूर्णतः विकसित झाला आहे अशी स्थितप्रज्ञ व्यक्ती श्री गुरुमाऊली कृपेने परमानंदाने पुष्ट असते, मात्र स्थितप्रज्ञ व्यक्ती कधीच आत्मकेंद्री, स्वार्थी नसते तर त्यांच्या मनात ….
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
…. हीच सर्वांबाबत सद्भावना.. साह्य करण्याची भावना आरूढ झालेली असते. “
“काय साहेबराव, ह्याला म्हणतात स्थितप्रज्ञ अवस्था व अशी असते स्थितप्रज्ञ किंवा निश्चल, स्थिर, न डगमगणारी मानसिकता असलेली व्यक्ती. काय उलगडला का काही अर्थ ? चला आता बाईक काढा आणि सोड मला हॉस्पिटलला आईकडे, चल निघूया “.
साहेबरावाच्या चेहरा समाधानी वाटत होता, बऱ्यापैकी अर्थ लागला होता बहुतेक त्याला, जाणवत होते आणि आम्ही हॉस्पिटलच्या दिशेने निघालो.
*******
लेखक : श्री गिरीश ओक
प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈