मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कथा वक्तृत्वाची… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ “कथा वक्तृत्वाची” ☆ श्री सुनील शिरवाडकर

श्री. विश्वास नांगरे पाटील आणि प्रा. शिवाजीराव भोसले 

आपलं पहिलं वहीलं भाषण अनेकांना आठवत असतं. ते बहुतेक वेळा फसलेलं असतं. विश्वास नांगरे पाटील यांचं असंच एक पहिलं भाषण. प्राथमिक शाळेत होते ते.आणि प्रसंग होता टिळक जयंतीचा. व्यवस्थित पाठ केलेलं भाषण ऐनवेळी ते विसरून गेले. सुरुवात तर केली होती..पण पुढे आठवेना.

‘एवढं बोलुन मी माझे भाषण संपवतो’ असं म्हणुन त्यांनी जयहिंद केलं.नंतर त्यांना असं स्टेजवर उभं राहून बोलण्याची संधी मिळाली ती थेट कॉलेज मध्ये.

‘मला पडलेलं स्वप्न ‘ असा विषय दिला होता.सोमवारी ती स्पर्धा होती.आदल्या दिवशी त्यांनी एक चित्रपट बघितला होता..लालपरी नावाचा.एका गरीब मुलाला एक लालपरी भेटते.. त्याच्या आयुष्यातील अडचणी ती दुर करते..त्याची स्वप्न ती पुर्ण करते असं काही तरी ते कथानक होतं.

विश्वास नांगरे पाटलांनी कोणतीही तयारी न करता ते कथानकच अगदी समरसून सांगितलं. भाषणाला टाळ्या मिळवल्या.. पहिला नंबरही मिळाला.

अँकरींग करणे, किंवा आरजे यासाठी पण वक्तृत्व आवश्यक असतेच.कोणाला त्यात करीअर करायचे असते कोणी केवळ हौस म्हणून याकडे बघतात.पण एक उत्तम वक्ताच उत्तम ॲंकर होऊ शकतो.मग उत्तम वक्ता होण्यासाठी नेमकं काय करायला हवं?

” युवकांनी वक्ता होण्याची इच्छा जरूर बाळगावी.. पण त्यात अनिवार अधिरता नसावी.वक्तृत्व हे जोपासलेल्या व्यक्तीमत्वाला आलेले फळ असते.साधनेची सुदिर्घ वाट..आणि त्यानंतर शेवटी शेवटी येणारी प्रसिध्दीची पहाट ” —- हे विचार आहेत प्रा.शिवाजीराव भोसले यांचे. वक्तृत्व म्हणजे काय.. त्यासाठी नेमके काय करावे लागते.. मनाची,विचारांची मशागत कशी करावी,यांचं मार्गदर्शन शिवाजीराव भोसले करत असत.

वक्तृत्व आणि शिवाजीराव यांना आपण वेगळे करुच शकत नाही. ही कला त्यांनी कशी प्राप्त केली? त्यांनी विद्यार्थी दशेत असताना खूप भाषणे ऐकली.. त्यात श्री. म.माटे..बाळशास्त्री हरदास.. ना.सी.फडके..साने गुरुजी.. नंतरच्या काळात बाबासाहेब पुरंदरे.. इंदिरा गांधी.. वाजपेयी असे अनेक वक्ते होते. उत्तम वक्ता होण्यासाठी प्रथम उत्तम श्रोता होणे गरजेचे आहे. 

शिवाजीराव म्हणतात…. 

“एखादा वक्ता बोलण्यामुळे प्रसिध्दिस येतो.. पण तो ऐकण्यामुळे घडतो.. वाढतो हे आपण विसरून जातो. गायनात आणि वक्तृत्वात श्रवणाचे महत्त्व मानावेच लागेल. संगीत श्रवणाने कान तयार होतो, तर व्याख्यान ऐकून मन तयार होते. इतरांना काहीही ऐकवू पाहणाऱ्यांनी आरंभी खूप ऐकले पाहिजे. श्रवणाशिवाय आकलनाचे क्षितिज विस्तारत नाही.. बहुश्रुतपणा प्राप्त होत नाही.”

उत्तम वक्ता होण्यासाठी काय करावे हे जसे शिवाजीराव सांगतात.. तसे काय करु नये याचेही ते मार्गदर्शन करतात.दाद किंवा प्रतिसाद वक्त्याला हवाच असतो.. पण सुरुवातीला तो मिळण्याची शक्यता कमीच. शिवाजीराव सांगतात.. श्रोत्यांचे लक्ष विचारांकडे कमी आणि शब्दांकडे अधिक असते .त्यामुळे नवखा वक्ता चमकदार शब्दांचाच आश्रय घेतो.पण नंतर त्याला ती चटकच लागते. सुमार शब्दयोजना करून टाळ्या मिळवण्यात तो धन्यता मानतो आणि नंतर या पाशातून बाहेर पडणे त्याला अशक्य होते.

ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांना शिवाजीराव सांगतात..

“ वक्तृत्व ही मनाच्या मळ्यात केलेली शब्दांची आणि विचारांची पेरणी असते.. रुजवण असते. जे अभ्यासपूर्वक आणि मनोभावे बोलत रहातात.. त्यांच्यावर वक्तृत्व लक्ष्मी प्रसन्न होते.” 

आपल्या पहिल्या..खरंतर दुसऱ्या भाषणात यश मिळाल्यावर  विश्वास नांगरे पाटलांचा आत्मविश्वास वाढला.त्यांनी ठरवलं..आता झाकली मूठ ठेवायची नाही. कोणत्याही स्पर्धेत उतरायचं .. .. भिडायचं  …लढायचं.. जिंकलो तर उत्तम, हरलो तर विचार मांडल्याचा आनंद व लढाईचा अनुभव तर कुठे जाणार नाही.

आणि हा आत्मविश्वास त्यांना मिळाला तो आपल्या बोलण्यातून….  आपल्या वक्तृत्वातून.

(१ जून – विश्वास नांगरे पाटील यांचा जन्मदिवस… .. त्या निमित्ताने…)

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ९ — राज विद्या राज गुह्यः योग — (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ९ — राज विद्या राज गुह्यः योग — (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्‌ ।

परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्‌ ॥११॥

*

मानवदेही मी अवतार मूढ मला न जाणत

मनुष्य जाणुनिया मजला ते मज अवमानित ॥११॥

*

मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः ।

राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः ॥१२॥

*

चित्तभ्रष्ट हे नर आचरित आसुरी अघोर जीवन

आशा व्यर्थ कर्मे निष्फल निरर्थक त्यांचे ज्ञान ॥१२॥

*

महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः ।

भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्यम्‌ ॥१३॥

*

हे पार्था मोहमुक्त दैवी महदात्मा मज येती शरण

आदिस्थान मी अव्यय जाणुनी करिती माझे स्मरण ॥१३॥

*

सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढ़व्रताः ।

नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥१४॥

*

दृढव्रत होउनि योगयुक्त राहुनी नित्य

कीर्तन करुनी वंदुनिया मलाच उपासत॥१४॥

*

ज्ञानयज्ञेन चाप्यन्ते यजन्तो मामुपासते ।

एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम् ॥१५॥

*

कोणी भजती मजला एकत्वभावाने

कोणी जाणत मजला पृथक्भावाने

ज्ञानयज्ञे भजुनी मजला विविध भावाने

उपासना करिती माझी भक्तीभावाने ॥१५॥

*

अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाहमहमौषधम्‌ ।

मंत्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम्‌ ॥१६॥

*

वैदिक कर्मकाण्डाचा मी कर्ता पितरांचे तर्पण

ओखध मी घृत मंत्र मी आहुती मी मीच हुताशन ॥१६॥

*

पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः ।

वेद्यं पवित्रमोङ्कार ऋक्साम यजुरेव च ॥१७॥

*

पिता मी अन् माता ही मी पितामह मीच 

पवित्र वेद्य ॐकार सर्व वेद आहे मीच ॥१७॥

*

गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत्‌ ।

प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम्‌ ॥१८॥

*

गती साक्षी ईश्वर निवास शरण सखा मीच

अव्यय बीज उत्पत्ती स्थिती निधन  प्रलय मीच ॥१८॥

*

तपाम्यहमहं वर्षं निगृह्‌णाम्युत्सृजामि च ।

अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन ॥ १९॥

*

तप्त करूनीया जलासिया बाष्परूप देतो मी

पुनरपि त्यासी रूप अंबुचे पर्जन्ये वर्षवितो मी

सत्यरुपाने तत्व होउनी विश्वास व्यापितो मी

असत्य त्या सगुण स्वरूपे सर्वत्र वावरतो मी ॥१९॥

*

त्रैविद्या मां सोमपाः पूतपापायज्ञैरिष्ट्‍वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ।

ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान्‌ ॥२०॥

*

त्रिवेदातील कर्म करूनी अर्चिती मज यज्ञाने

सोमप ते स्वर्गप्राप्ती कामना धरिताती मनाने

तयांस खचित होते प्राप्ती पावन इंद्रलोकाची

दिव्य भोग भोगण्या प्राप्ती तयांसी श्रेष्ठ द्युलोकाची ॥२०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पुनरावृत्तीचे सवाल !  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

पुनरावृत्तीचे सवाल ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

लोक ताटकळले होते. अशावेळी यावं लागतं, लोक रीत आहे. उद्या आपल्यावरही ही वेळ आहेच की. म्हणून लोक आले होते. किमान आपल्या बिरादरीतलं कुणी गेलं तर जावंच. कारण बिरादरीतलेच लोक काहीही करून हजर राहतात….निदान शेवटच्या वेळेला तरी!

गेलेला त्यांच्यात सर्वच बाजूंनी उजवा होता. त्याच्या शब्दांची सर यांच्या शब्दांना यायला आणखी चार दोन जन्म घ्यावे लागले असते कित्येकांना. मनातून अतीव दु:ख झालेले काही जण होतेच या जमावात, नाही असं नाही! पण ब-याच जणांना, किंबहुना सर्वांनाच घाई होती. आपण अंत्यविधीला उपस्थित होतो हे किमान चार दोन लोकांनी तरी पाहिले असले पाहिजेच असाच अनेकांचा प्रयत्न होता. त्यातील काहीजण तर स्मशानापर्यंत न येता रस्त्यातून मध्येच सटकून आपल्या कामाधंद्याला पळणार होते. कुणी गेलं म्हणजे व्यवहार का थांबून राहतो? नाही. व्यवहार करणारा थांबला की त्याच्या त्याच्यापुरता व्यवहार थांबतो. हे असंच चालतं जगात. 

पण दिवंगताची पत्नी पतीच्या शवापासून तसूभरही हलायला तयार नाहीत. त्या देहातून चैतन्य पुढच्या प्रवासाला कधीचंच निघून गेलेल्याला तसा आता बराच वेळ लोटून गेला आहे. आप्तांनी कर्तव्यभावनेने सारी तयारी कधीच पूर्ण केलीये. आता फक्त उचलायचं आणि चितेपर्यंत पोहोचवायचं…बस्स! 

बाईंनी त्यांच्या पतीचा, नव्हे त्यांच्या पतीच्या निष्प्राण देहाचे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवलेत. कुणी जाणता माणूस पुढे झाला. “वहिनी….जाऊ द्या दादांना…त्यांच्या प्रवासाला!” त्यावर बाई त्यांच्यावर एकाएकी बरसल्या. म्हणाल्या, “तुम्ही असाल मोठे कवी! पण तुम्हांला बाईच्या हृदयीची पीडा नाही समजणार!”

— तो बिचारा सभ्य सदगृहस्थ आधीच आपल्या परमप्रिय मित्राच्या देहावसानाने  भांबावून गेला होता. तो मागे सरकला. वहिनी त्याच्याशी बोलताना जणू आपल्या पतीच्या काही समजण्यापलीकडे निघून गेलेल्या निष्प्राण देहालाच प्रश्न विचारू लागल्या…बोलू लागल्या.

… “एकटेच आला होतात मला बघायला आणि माझ्या वडीलांकडे माझा हात मागायला. जातपात एकच आणि त्यात पगारी नोकरी. लेक सुखी राहील. बाप दुसरा कोणता विचार करतो? आणि बालविधवा मुलीचा बाप तर कशालाही तयार झाला असता…नव्हे अनेकांना हो सुद्धा म्हणून बसला होता. माझं पहिलं लग्न अकराव्या वर्षी झालं. कपाळावरचं कुंकू अजून माझ्या आणि इतरांच्याही सवयीचं होण्याआधीच,काळाच्याच भाषेत बोलायचं झालं तर, तीनेक एक महिन्यात पुसावं लागलं. कपाळावर कुंकवाचा मागमूसही राहिलेला नव्हता. आणि तुमचं लग्न तुमच्या पिताश्रींनी तुमच्या नकळत्या वयात लावून दिलं होतं. तुमची आई देवाघरी गेल्यावर तुमच्या वडिलांनी स्वत:च्या संसाराचा दुसरा डाव मांडलेला. तुम्ही आणि तुमची ती दुसरी आई. शंभरात नव्याण्णव जणांच्या नशिबी असलीच सावत्र आई येते…मानवी स्वभाव दुसरं काय? म्हणून मग तुम्हांला वडीलांनी लवकरच बोहल्यावर चढवलं होतं.

तुमची पत्नी तशी तुमच्यापेक्षा वयाने मोठी..खानदानी श्रीमंत…लाडावलेली….आई-वडिलांचा लळा अजून न सुटलेली. ती सारखी माहेरी जाण्याच्या तयारीत आणि मन:स्थितीत…बायकोच्या भूमिकेत असली तरी ती बालिकाच की.  लवकरच तुमचे वडीलही परलोकी गेले. तुम्ही बाहेरगावी शिक्षणासाठी असताना तुमच्या सावत्र आईत आणि पत्नीत काहीतरी कुरबूर झाली तर या सूनबाईंनी चक्क स्वत:चाच जीव घ्यायचा प्रयत्न केला. तुम्ही तिच्यावर रागावलात तर ती जी माहेरी गेली ती गेलीच.

आणि मग तुम्ही ठरवलंत…लग्न करायचं ते बालविधवेशीच. या विचाराला हिंमत लागते. ती तुम्ही दाखवलीत. अगदी वडीलांना आधी न विचारता तुम्ही माझ्या वडीलांना तुमची पसंती त्वरीत सांगितली होतीत आणि वडीलांनी दिलेली नाममात्र वरदक्षिणा स्विकारून विवाह निश्चितही करून टाकला. 

केवळ तुमच्यासाठी मी माझं वैधव्य खंडित केलं होतं….वैधव्याचा पदर माझ्या डोईवरून मागे घेतला होता….आणि कपाळी तुमच्या नावाचं कुंकू रेखलं होतं. आणि तुम्ही आता मला तोच पदर पुन्हा तोंड झाकण्यासाठी पुढे ओढून घ्यायला सांगताय….मी बरं ऐकेन? तुम्ही मला मागे टाकून एकटे जाऊच कसे शकता? तुमच्या कित्येक कथांमध्ये मी तुमच्याशी साधलेल्या संवादांचं प्रतिबिंब पाहून मला मनातून सुखावून जायला व्हायचं. तुमच्या लेखनावर कुणी केलेली टीका मला सहन व्हायची नाही. पण तुम्ही ती टीका मला मोठ्या चवीने वाचून दाखवायचात..! पण तुम्ही साहित्यनिर्मितीसाठी लिहीत नव्हताच मुळामध्ये…तुम्ही फक्त स्वत:ला व्यक्त करीत होतात…स्वत:ला मोकळं करीत होतात. तुम्ही भोगलेलं,अनुभवलेलं शब्दांच्या रूपांत पुस्तकांत जाऊन बसायचं….पानांपानांत दडून बसायचं! ” 

देह ऐकू शकत नव्हता आणि आता काही करूही शकत नव्हता. पण इतर जिवंत माणसांच्या काळजाला त्यांच्या या शब्दांनी घरं मात्र पडत चालली होती. सर्व उरकून घरी जाण्याच्या मन:स्थितीतली माणसंही आता मनातून वरमली असावी. सारेच स्तब्ध झाले होते! 

संवादामधला हा अवकाश जीवघेणाच असतो. पण त्यातूनही ते गृहस्थ दुस-या एकाला म्हणाले…बघ! तुला वहिनींना समजावता येतंय का ते!” आणि ते तेथून दोन पावलं मागे सरून खाली मान घालून उभे राहिले! 

बाईंचा विलाप हस्तनक्षत्रातल्या पावसासारखा घनघोर…अविरत.पण तरीही ही नवी जबाबदारी शिरावर अकस्मातपणे आलेला माणूस पुढे झाला….आणि अत्यंत कोमल स्वरांत म्हणाला….” ही तर केवळ माती उरलीये! या मातीत आता तुमचं माणूस उरलेलं नाही ! ”

…एक प्रदीर्घ हंबरडा उमटला आणि बाईंनी शवाच्या छातीवर टेकवलेलं आपलं मस्तक वर उचललं….त्यांच्या कपाळावरचं कुंकू सैरावैरा होऊन कपाळावरून उतरू लागलं होतं !

(हिंदी साहित्याच्या मालेतले मेरूमणि प्रेमचंद निवर्तले तेंव्हाचा हा प्रसंग. त्यांचे स्नेही आणि जीवलग कवी परिपूर्णानंद वर्मा यांनी ‘बीती यादें’ नावाच्या पुस्तकात वर्णन केला आहे. प्रेमचंद यांच्या अर्धांगिनी शिवरानी देवी पतीनिधनाने अति व्याकुळ झाल्या होत्या. प्रेमचंद यांचे सर्वात घनिष्ठ कवी मित्र जयशंकर ‘प्रसाद’ शिवरानी देवींना प्रेमचंद यांचे शव अंत्यविधीसाठी घेऊन जाण्याची विनंती करण्याचा प्रयत्न करीत असताना शिवरानी देवींनी दु:खावेगाच्या, अगतिक रागाच्या भरात ‘तुम्ही कवी असू शकता…पण एका स्त्रीचं हृदय तुम्हांला समजणार नाही’ असे उद्गार काढले होते. त्या प्रसंगाचं मी हे स्वैर भाषांतर आणि गांभिर्यपूर्वक स्वातंत्र्य घेऊन स्वैर रुपांतर केलं आहे. प्रेमचंद आणि त्यांच्या पत्नी शिवरानी देवी यांचं भावजीवन मूळातूनच वाचण्याजोगं आहे. असो. प्रेमचंद यांचे वर उल्लेखिलेले मित्र कवी,कथालेखक श्री. जयशंकर प्रसाद यांना कुणी या प्रसंगानंतर हसलेलं कुणी पाहिलं नाही..इतके ते आपल्या या मित्राच्या जाण्याने दु:खी झाले होते…त्यानंतर अवघ्या सहाच महिन्यांत तेही परलोकी गेले.. प्रेमचंद यांचे हिंदी साहित्य वाचकांच्या भावजीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत हे तर निर्विवादच.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ उडुपी थाळी – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती  – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

? इंद्रधनुष्य ?

☆  उडुपी थाळी – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती  – सौ.अस्मिता इनामदार ☆

महाभारत हे त्या काळातील सर्वात मोठे महायुद्ध होते कारण त्या काळात या युद्धात भाग न घेतलेले क्वचितच एखादे राज्य असेल. कारण या युद्धात भारतासह अफगाणिस्तान आणि इराणचे सर्व राजे कौरव किंवा पांडवांच्या बाजूने उभे राहिले, परंतु एक राज्य असे होते जे या युद्धक्षेत्रात असूनही युद्धापासून दूर राहिले, ते म्हणजे दक्षिणेतील उडुपीचे राज्य.

जेव्हा उडूप्पीचा राजा या युद्धात भाग घेण्यासाठी आपल्या सैन्यासह कुरुक्षेत्रावर पोहोचला तेव्हा कौरव आणि पांडव दोघेही त्यांना आपापल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न करू लागले.

उडुपीचा राजा अत्यंत दूरदर्शी होता, त्यांनी श्रीकृष्णाला विचारले – हे माधव! दोन्ही बाजूंनी जो कोणी पाहतो तो या युद्धासाठी आतुर वाटतो, पण दोन्ही बाजूंनी उपस्थित असलेल्या एवढ्या मोठ्या सैन्यासाठी जेवणाची व्यवस्था कशी होईल याचा कोणी विचार केला आहे का?

त्यावर श्रीकृष्ण म्हणाले- महाराज! तुम्ही अगदी बरोबर शंका उपस्थित केली आहे, तुमच्या या शंकेवरून मला असे वाटते की तुमच्याकडे नक्कीच यासंदर्भात काहीतरी योजना आहे, कृपया ती योजना मला सांगावी.

यावर उडुपीचे राजे म्हणाले की – हे वासुदेव! भावा भावांमध्ये होणारे हे युद्ध मला उचित वाटत नाही त्यामुळे या युद्धात भाग घ्यायची माझी इच्छा नाही.

परंतु हे ही सत्य आहे की हे युद्ध आता टाळता ही येणार नाही, म्हणूनच मी असे ठरवले आहे की माझ्या संपूर्ण सैन्यासह येथे उपस्थित राहून लढणाऱ्या सर्व सैनिकांसाठी भोजनाची व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे.

यावर श्रीकृष्ण आनंदाने म्हणाले – महाराज!  तुमची कल्पना खूप चांगली आहे, या युद्धात 50 लाख योद्धे सहभागी होतील आणि तुमच्यासारखा कुशल राजा त्यांच्या अन्नाचे व्यवस्थापन पाहणार असेल तर या बाजूने ही आम्ही निश्चिंत राहू.

मला हे सुध्दा माहीत आहे की या विशाल महासागराएवढ्या मोठ्या सैन्याच्या अन्नाचे व्यवस्थापन भीमसेन आणि तुमच्या शिवाय कुणालाही शक्य नाही.

भीमसेन या युद्धापासून लांब राहू शकत नाहीत, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्या सैन्यासह दोन्ही सैन्याच्या भोजनाची जबाबदारी घ्या, अशा प्रकारे उडुपीच्या महाराजांनी सैन्याच्या भोजनाची जबाबदारी घेतली.

पहिल्या दिवशी त्यांनी उपस्थित सर्व योद्धांसाठी भोजनाची व्यवस्था केली, त्यांची कार्यक्षमता इतकी अफाट होती की दिवसाच्या शेवटी अन्नाचा एक कण ही वाया गेला नाही.

जसजसे दिवस सरत गेले तसतशी योद्ध्यांची संख्याही दिवसागणिक कमी होत होती आणि दोन्ही बाजूचे योद्धे हे पाहून आश्चर्यचकित होत होते की, प्रत्येक दिवसाच्या शेवटी उडुपीचा राजा कडून एक अन्नाचा कण ही वाया जात नाहीये तर. त्यांना हे कसे समजते की आज एवढ्याच सैन्याचे भोजन बनवायचे आहे?

खर तर तेथील उपस्थित असणाऱ्या सैन्याला एक प्रश्न पडत होता की उडप्पीचा राजांना हे कसे काय समजते की आज किती सैन्य मरणार आहे व ते रोज त्याच आधारे भोजन बनवतात.?

एवढ्या मोठ्या सैन्याच्या अन्नाचे व्यवस्थापन करणे हा खर तर एक चमत्कारच होता आणि अन्नाचा एक दाणाही वाया जाऊ नये अशा पद्धतीने नियोजन करणे हे सुध्दा एका चमत्कारापेक्षा कमी नव्हतेच.

अखेर युद्ध संपले आणि पांडव जिंकले.आपल्या राज्याभिषेकाच्या दिवशी शेवटी युधिष्ठिराने न रहावुन उडुपीच्या राजाला विचारले की – हे महाराज! समस्त देशांचे राजे आमची प्रशंसा करत आहेत की तुमचे लहानसे सैन्य असूनही तुम्ही अशा सैन्याला पराभूत केले की त्या सैन्याचे नेतृत्व स्वतः भीष्म, गुरू द्रोण आणि आमचा थोरला भाऊ कर्ण यांसारखे महापुरुष करत होते. परंतु मला असे वाटते की तुम्ही आम्हा सर्वांच्यापेक्षा जास्त कौतुकास पात्र आहात, कारण ज्यांनी एवढ्या मोठ्या सैन्यासाठी केवळ जेवणाची व्यवस्थाच केली नाही तर ती व्यवस्था अशा प्रकारे चोख पार पाडली की अन्नाचा एक कण ही वाया जाऊ दिला नाही. मला तुमच्याकडून या कौशल्याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे.

यावर उडुपीचे राजे हसले आणि म्हणाले – “सम्राट! या युद्धात तुम्ही मिळवलेल्या विजयाचे श्रेय कोणाला देणार?”

यावर युधिष्ठिर म्हणाले – “याचे श्रेय श्रीकृष्णाशिवाय कोणाला देता येईल? जर ते नसते तर कौरव सैन्याचा पराभव करणे अशक्य झाले असते.”

तेव्हा उडुपीचे राजे म्हणाले,  हे राजा!  ज्याला तुम्ही माझा चमत्कार म्हणत आहात तो सुद्धा श्रीकृष्णाचाच महिमा आहे, हे ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले.

मग उडूप्पीच्या राजांनी या रहस्यावरून पडदा उठवला व व म्हणाले “महाराज! श्रीकृष्ण प्रतिदिन रात्री शेंगदाणे (भुईमुगाच्या शेंगा) खात असे व मी दररोज त्यांच्या शिबिरात मोजून शेंगा ठेवत असे, व त्यांच्या शेंगा खाऊन झाल्या व ते तेथून निघून गेले की मी तेथे जाऊन ती टरफल बाजूला करून त्यांच्या किती शेंगा शिल्लक राहिल्या आहेत त्या मोजत असे.

ते जितक्या शेंगा खात असे दुसऱ्या दिवशी युध्दात १०००  गुणा सैन्य मारले जायचे , समजा त्यांनी ५० शेंगा खाल्या तर दुसऱ्या दिवशी युध्दात ५०००० सैनिक मारले जायचे व मी याच निकषावर दुसऱ्या दिवशी भोजनाची व्यवस्था करत असे आणि त्यामुळेच कधी अन्नाचा एक कण ही वाया जात नसे.

प्रभू श्री कृष्णाचा हा चमत्कार ऐकून उपस्थित असणारे सगळेच त्यांच्यासमोर नतमस्तक झाले, ही कथा महाभारतातील दुर्मिळ कथांपैकी एक आहे, ही कथा कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात असलेल्या कृष्ण मठात नेहमी सांगितली जाते, कर्नाटकच्या या मठाची स्थापना उडुप्पीच्या सम्राटाद्वारा केली गेली आहे.

प्रभू श्रीकृष्णानी स्वत: उडुप्पीच्या महाराजांना आशीर्वाद दिला होता की तुम्ही ज्याप्रकारे भोजनाची व्यवस्था केली होती आणि असे अप्रतिम सात्विक भोजन तयार केले होते, त्याबदल्यात मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुमच्या राज्याच्या सर्व पुरुषांच्या हातात असा नैसर्गिक गुण असेल की ते सात्विक भोजन तयार करतील व ते संपूर्ण जगात सर्वोत्कृष्ट असेल, म्हणूनच आज उडुपीच्या लोकांनी जगभरात अनेक रेस्टॉरंट्स उघडली आहेत आणि त्यांच्या हातांनी बनवलेले जेवण आज जगभर प्रसिद्ध आहे.

भारतात ही असे एक शहर नाही जिथे एकही उडुपीचे रेस्टॉरंट नाही , भारता सोबतच  परदेशातही अनेक उडुपी रेस्टॉरंट आहेत.

आणि या उडुपी रेस्टॉरंट्सची एक खास गोष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या याच आशीर्वादामुळे ते आपल्या हॉटेलमध्ये फक्त सात्विक भोजन बनवतात.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अस्मिता इनामदार 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कृष्णा – आणि तिच्या काठावरची सांगली !! – लेखिका : सुश्री राजलक्ष्मी देशपांडे  ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ कृष्णा – आणि तिच्या काठावरची सांगली !! – लेखिका : सुश्री राजलक्ष्मी देशपांडे  ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

कृष्णा…कसलंही वलय नसलेली नदी..गंगेइतकं तिला आध्यात्मिक महत्त्व नाही, साधुसंन्याशांना तिची ओढ नाही.यमुनेसारखी रासलीलेची अद्भुत कहाणी तिच्या काठावर नाही,की जगातलं कुठलंही आश्चर्य पाहायला लोक तिच्या काठी येत नाहीत.नर्मदेसारखी कुणी तिची परिक्रमा करीत नाही….या कृष्णेच्या काठावरची सांगलीही तशीच.साधीसुधी…खरं म्हणजे किती मोठी माणसं तिच्या अंगाखांद्यावर खेळली आहेत.पण तिला त्यांच्याबद्दल प्रेम आहे.गर्व नाही.

सांगली..नाट्यपंढरी ! पहिलं मराठी नाटक विष्णूदास भावेंनी सांगलीत सादर केलं.आजही त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं हा प्रत्येक अभिनेत्याच्या /अभिनेत्रीच्या कारकीर्दीत मानाचा क्षण असतो.

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, गोविंद बल्लाळ देवल यासारखे नाटककार सांगलीचे.

खाडिलकर हे नाव संगीतासाठीही प्रसिद्ध! महान गायिका इंदिराबाई खाडिलकर, आशा खाडिलकर इथल्या. आज त्यांची नात वर्षा खाडिलकर (भावे) गायकगायिकांची नव्या पिढ्या  घडवतेय आणि त्यांना जुन्या सांगीतिक वारशाशी बांधून ठेवतेय. 

बालगंधर्व मुळात सांगलीच्या नागठाण्याचे. ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, श्री.दा. पानवलकर, कवि सुधांशू, श्रीनिवास जोशी यासारखे अनेक साहित्यिक सांगलीने दिले. नाटककार वसंत कानेटकरांचे वडील कवि गिरीश सांगलीत होते. गरवारेंसारखे उद्योजक सांगलीतच जन्मले आणि पार लंडनला गेले. पारतंत्र्याच्या काळात त्यांनी ब्रिटिश नोकर म्हणून ठेवले. आणि चितळेंची दूध उत्पादने सांगलीत भिलवडीलाच होतात. सराफ बाजारातील अत्यंत विश्वासू नाव पु. ना. गाडगीळ सांगलीचे.त्यांच्या पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील दुकानातही सांगलीच्या राजेसाहेबांचा आणि राणीसाहेबांचा फोटो आहे. 

संपूर्ण हिदुस्थानात प्रसिद्ध असलेली तंतूवाद्ये तयार होतात सांगलीच्या मिरजेत.

आजच्या काळातील क्रिकेटियर स्मृती मानधना सांगलीची.

पण खेळांची परंपरा सांगलीत पूर्वीपासून आहे.इथे मुली उत्तम मलखांब खेळतात. माधवनगरसारख्या सांगलीच्या छोट्या गावात मुलींनी कबड्डीमधे परदेशात नाव कमावलं होतं आणि त्यांचा कोच त्या काळीही एक तरूण मुलगा होता. त्याच्याबरोबर मुली अतिशय सुरक्षित होत्या. मुलींचं झाडावर चढणं,मैदानी खेळ खेळणं माधवनगरला नवं नाही.पण ते इतकं साहजिक होतं,की ‘मुलगी असूनसुध्दा ‘असं कधी कुणी म्हणायचंही नाही…सांगलीतल्या बुधगाव या छोट्या खेड्यात एक स्त्री शाहीर होत्या,ज्यांनी महाराष्ट्राबाहेरही आपल्या डफाची थाप वाजवली होती. यांच्यापैकी कुणीही स्त्री स्वातंत्र्याचा खास डंका मात्र वाजवला नाही. स्त्रीत्वाचे सगळे गुणधर्म, नियम मर्यादा पाळून आपापल्या आवडीच्या क्षेत्रात बिनधास्त मुशाफिरी केली त्यांनी..कोणताही आव न आणता.अशा खूप गोष्टी सांगता  येतील. नावं घेता येतील.हळद, द्राक्षं यांच्या उत्पादनात सांगलीच आजही प्रथम क्रमांकावर आहे.

शहराच्या सोयी असलेलं हे छोट्या गावाचं फीलिंग देणारं शहर मला नेहमीच त्याच्या साधेपणानं मोहवतं. हा साधेपणा इथल्या माणसांमधेही मुरलाय. यांना स्वतःच्या शहराबद्दल प्रेम आहे..गर्व नाही..किंबहुना..कसलाही आव नाही हेच यांचं वैशिष्ट्य! सांगलीकरांना आपल्या गावाबद्दल प्रेम आहे,पण इतर गावांबद्दलही आदर आहे.

माझ्या मुलाचं लग्न जमवताना एक सांगलीचं स्थळ आलं होतं.काही कारणानं आपला योग नाही हे सांगायला मी मुलीच्या आईला फोन केला आणि म्हटलं,”तुम्ही काळजी करू नका. हा योग नसला,तरी खूप छान जोडीदार मिळेल तिला. तिला खूप शुभेच्छा.”

त्या पटकन म्हणाल्या,”तुम्हीपण सांगलीच्या ना?” “हो.” मी म्हटलं.

त्यावर त्या म्हणाल्या,”सांगलीत आलात कधी तर आमच्याकडे जरूर या.माहेरवाशीण म्हणून या.” ज्या बाईशी आपला संबंध येणार नाहीये,तिला असं निमंत्रण सांगलीतून सहज मिळू शकतं……

…२००५ चा पाऊस! कधी नव्हे ते कृष्णेनं मर्यादा सोडली.एरवी पूर आला,तरी आततायी बाईसारखं थैमान घालणं हा तिचा स्वभाव नाही. तिच्या काठच्या लोकांना ती आईच वाटते.पण ते वर्ष वेगळं होतं. माझ्या एका मैत्रिणीच्या घरात पाणी शिरू लागलं. साठवणीतलं सगळंच धान्य ती घेऊन जाणार हे दिसत असूनही तिनं पटकन दोन मुठी तांदूळ,एक खण, नारळ घेऊन कृष्णेची ओटी भरली.आम्हाला सहज साध्या श्रध्देनं नंतर हे सांगताना ती म्हणाली,”अगं,कृष्णामाई एवढी दारात आली,तसंच कसं पाठवायचं तिला?” तिच्या या भावनेत सांगली आहे.

माझ्या आईचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं होतं.ती तेव्हा महिला मंडळाचा एकपात्री प्रयोग बसवत होती. तिनंच लिहिलेला.दोनतीन जणी दुपारी प्रॅक्टिसला येणार होत्या.मी आईच्या ऑपरेशनसाठी माहेरी होते. आईच्या मैत्रिणींसाठी काही करावं म्हणून मी उठले,तर एकजण म्हणाल्या,”हे बघ,मी लिंबू सरबताचं मिक्श्चर करून आणलंय.तू फक्त पाणी घालून दे.” ” तुम्ही कशाला आणलंत मावशी?” म्हटल्यावर त्या म्हणाल्या,”अगं,आमच्या सगळ्यांसाठीच तू माहेरवाशीण. आईची सेवा कर..पण आम्ही नको का मदत करायला?”या प्रेमात सांगली आहे.

माझी मैत्रिण नीता जोशी आकाशवाणीवर बरीच वर्षं काम करत होती.आताही एका एनजीओ ने चालवलेल्या रेडिओ स्टेशनची डायरेक्टर आहे.अंगात असंख्य कला असणारी ही …एका प्रोग्रामसाठी मुंबईत गेली.”आपलं खास वैशिष्ट्य दिसेल अशी वेषभूषा असूदे ..” हा आदेश होता.

ती जशी नेहमी राहते,तशीच गेली..साडी,लांबसडक एक वेणी,हातात बांगड्या,कुंकू…अर्थातच पहिल्यांदा माॅडर्न पोषाखातल्या लोकांनी लक्ष दिल नाही.तिचं प्रेझेंटेशन झालं आणि तिच्याभोवती गराडा पडला..आम्हाला माहितच नाही तुमचं टेक्निकल नाॅलेजही साॅलिड आहे हो…असं म्हणत.

तिचं म्हणणं,”मी ठरवलं होतं, माझा साधेपणा हेच माझं वैशिष्ट्य! वेगळा मेकओव्हर मी करणार नाही.” तिच्या या साधेपणात सांगली आहे.

मुंबईला तिच्या गतीचा अभिमान आहे,आर्थिक सत्तेचा झगमगाट,बाॅलिवूडचा लखलखाट आहे..

पुण्याला पुणं सोडून भारतातलं सारंच कमी दर्जाचं वाटतं..

विदर्भाला आपल्या वैदर्भीय संस्कृतीचा..खाद्य पदार्थांचाही गर्व आहे.

सांगलीचे वैशिष्ट्य एवढंच,की तिला कुठलीच गोष्ट म्हणजे आपलं वैशिष्ट्य वाटत नाही..तिला सगळ्याच गावांचं कौतुक आहे. तिच्या मते असतातच की माणसांमधे कमीजास्त गुण…आणि दोषसुध्दा. साधेपणा, सहजता हेच तिचं वैशिष्ट्य!

लेखिका : सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

पुणे

प्रस्तुती :  श्री सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आणखी एक कोवळा अभिमन्यू ! – भाग-२ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ आणखी एक कोवळा अभिमन्यू ! – भाग-२ ☆ श्री संभाजी बबन गायके 

परमवीर अरूण खेतरपाल !

(आणि लढाईत सर्वांत महत्त्वाचे असते ते सैनिकांचे मनोबल….शस्त्रांपेक्षा ती शस्त्रे चालवणारी मने मजबूत असावी लागतात.) इथून पुढे. — 

हनुतसिंग साहेबांनी मैदानातील सर्वांना आदेश बजावला…कुणीही कोणत्याही परिस्थितीत माघारी फिरायचे नाही! जेथे आणि ज्या स्थितीत असाल तेथूनच लढा…एक तसूभरही मागे सरायचे नाही! प्रमुखांचा आदेश सर्वांनच शिरसावंद्य होता. अरूण साहेबांनीही हा संदेश ऐकला आणि मनात साठवून ठेवला! 

त्यांनी आपल्या रणगाड्यामधील साथीदारांना सांगितलं…सी.ओ.साहब का आदेश सुना है? उन्होंने कहा है..यही रूककर लडना है! 

पाकिस्तानचा हल्ला सूरूच होता…अरूण साहेबांच्या शेजारीच लढत असलेले लेफ़्टनंट अवतार अहलावत साहेब जखमी झाले. त्यांचा रणगाडाही निकामी झाल. मल्होत्रा साहेबांच्या रणगाड्याची तोफ निकामी झाल्याने ते काहीही करू शकत नव्हते…फक्त पाकिस्तानचा मारा सहन करीत युद्धक्षेत्रात निश्चलपणे उभे होते…सेनापतींचा आदेश शिरावर घेऊन…साक्षात मृत्यूच्या डोळ्यांत पहात! 

आता फक्त अरूण साहेबांचा रणगाडा युद्ध करू शकत होता. परंतू तोही आगीने वेढला गेला…मल्होत्रासाहेबांनी अरूणसाहेबांना मागे जावे असे सुचवले…त्यावर अरूण साहेब गरजले…नाही,साहेब! आता माघार नाही….मी शत्रूचा समाचार घेण्यास समर्थ आहे…जीवात जीव असेतोवर! 

प्राकसिंग अरूण साहेबांच्या रणगाड्याचे चालक होते…ते म्हणाले…साहेब…थोडं मागे सरकू…रणगाड्याला लागलेली आग विझवू आणि पुन्हा पुढे येऊ! त्यावर अरूणसाहेबांनी त्याला स्पष्ट नकार दिला…सेनापतींचा आदेश आहे…न मागुती तुवा कधी फिरायचे…सदैव सैनिका पुढेच जायचे! 

याच क्षेत्राच्या आसपास भारतीय रणगाड्यांच्या ब्राव्हो,चार्ली या अन्य तुकड्याही कार्यरत होत्या. पण त्यांच्यावरही पाकिस्तानने तुफान हल्ला चढवला होता. अरूण साहेबांच्या क्षेत्रात आता ते स्वत:च फक्त लढू शकत होते. महाभारत….अभिमन्यू उभा ठाकलेला आहे…त्याने चक्रव्युह भेदला आहे…पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला गवसत नाहीय…संधी पाहताच कौरवांनी जणू सिंहाच्या बछड्याला घेरलं…शिकारी कुत्र्यांसारखं. ..   भारताचे तेथे उपलब्ध असलेले सर्वच रणगाडे आता युद्धात होते. मागून कुमक येण्याची शक्यता नव्हती. परिस्थिती भयावह होती…पराभव समोर होता…आपण हरण्याची शक्यता जास्त होती. 

अरूण साहेबांनी समोर येईल त्या रणगाड्याला अचूक टिपायला आरंभ केला. आपल्या तोफचालकाला, नथूसिंग यांना ते सतत प्रोत्साहन देत राहिले…मार्गदर्शन करीत राहिले.   एक स्थिती अशी आली की, पाकिस्तानचे सर्वच्या सर्व रणगाडे नेस्तनाबूत झाले…फक्त एक सोडून. हा रणगाडा होता….पाकिस्तानच्या स्क्वाड्रन कमांडर मेजर निसार याचा. निसार थेट अरूण साहेबांच्या रणगाड्याच्या अगदी समोर आला…केवळ दोनशे मीटर्सचे अंतर. ही रणगाड्यांची लढाई आहे…हे अंतर दिसायला जास्त दिसत असले तरी रणगाड्यांसाठी अत्यंत कमी…अगदी डोळ्यांत डोळे घालून पाहण्याएवढे. 

अरूण साहेब आणि निसार यांनी एकाच वेळी एकमेकांवर गोळा डागला. निसारचा रणगाडा निकामी होऊन जागीच थांबला. दिवसभर निसार आणि त्याचे सैनिक त्या रणगाड्यामागे लपून राहिले आणि रात्री आपल्या हद्दीत पलायन करते झाले.   इकडे अरूण साहेबांच्या रणगाड्यावर पडलेल्या तोफगोळ्याने रणगाडा ऑपरेटर सवार नंदसिंग धारातीर्थी पडले. आणि अरूणसाहेब प्राणघातक जखमी झाले होते…पण त्यांनी पाकिस्तानचा निकराचा हल्ला प्राणपणाने परतवून लावला होता. अन्यथा आपले खूप नुकसान झाले असते. 

ती रात्र उलटली…पहाटेची महाभयानक थंडी पडली..थोडंसं उजाडलं होतं. जखमी झालेले सवार प्रयाग सिंग आणि नथू सिंग यांनी हा धडधडून पेटून राखरांगोळी होण्याच्या स्थितीत असलेला रणगाडा मागे घेतला…या सेंचुरीयन रणगाड्याचे नाव होते फॅमगस्टा-JX 202.! 

अरूण साहेबांच्या कुडीत काही प्राण शिल्लक होता…त्यांनी पिण्यास पाणी मागितले. या थंडीत थंड पाणी प्यायला दिले तर आहेत ते प्राण उडून जातील म्हणून त्यांनी ताबडतोब एक कप चहा उकळून घेतला…तो कप अरूण साहेबांच्या ओठांपाशी नेला….पण साहेबांनी नथूसिंग यांच्या मांडीवर प्राण सोडला…अरूण साहेब आपल्यातून निघून गेले होते….दिगंताच्या प्रवासाला…आपले कर्तव्य पार पाडून. क्षेत्राचं प्राणपणाने रक्षण करून आपले खेतरपाल हे आडनाव सार्थ करून आणि अरूण हे आपले सूर्याशी आणि सूर्यवंशाशी नाते सांगणारे नाव अमर करून… आणखी एक अभिमन्यू अमर झाला होता ! 

“The sand of the desert is sodden red, —

Red with the wreck of a square that broke; —

The Gatling’s jammed and the Colonel dead,

And the regiment blind with dust and smoke.

The river of death has brimmed his banks,

And England’s far, and Honour a name,

But the voice of a schoolboy rallies the ranks:

‘Play up! play up! and play the game!”

― Henry Newbolt

‘वाळवंटातली वाळू लाल झालेली आहे रक्ताने….

शस्त्र तुटून पडलं आहे…सैन्याधिकारी धारातीर्थी पडला आहे.

सैन्यदल धुराने आणि धुळीने आंधळ्यासारखं झालं आहे.

मृत्यूच्या नदीत दुथडी भरून रक्त वाहतं आहे….

त्या गदारोळातून एका शाळकरी मुलाचा आवाज स्पष्ट उमटतो आहे…

खेळत रहा..खेळत रहा….हा मरणाचा खेळ खेळत रहा….याशिवाय विजय कसा मिळेल?’

सेकंड लेफ्टनंट अरूण खेतरपाल परमवीर ठरले. मरणोपरांत परमवीर चक्र मिळवणारे सर्वांत कमी वयाचे सैन्य अधिकारी ठरले.  खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मधील कवायत मैदानाला अरूण खेतरपाल परेड ग्राऊंड म्हणून ओळखले जाते. त्यांच्या नावाने एक सभागृहसुद्धा असून एका प्रवेशद्वाराला यांचे नाव देण्यात आलेले आहे. नॅशनल वॉर मेमोरिअल मध्ये परमवीर सेकंड लेफ्टनंट अरूण खेतरपाल साहेबांचा अर्धपुतळा उभारण्यात आलेला आहे. इथे येणा-या प्रत्येकाला हुतात्मा अरूण खेतरपाल साहेबांच्या अविस्मरणीय शौर्यामुळे नवी प्रेरणा मिळत राहते. अरूण साहेबांच्या स्मृतींना दंडवत. 

युद्धाची शक्यता निर्माण झाली तेंव्हा अरूण आपल्या घरी सुट्टीवर होते. त्यांना तातडीने रेजिमेंटमध्ये बोलावले गेले. निघण्याच्या दिवशी त्यांच्या मातोश्री त्यांना म्हणाल्या होत्या,” वाघासारखं लढायचं,अरूण. भेकडासारखं पराभूत होऊन परत फिरायचं नाही!” अरूण साहेब विजयी होऊन परतले पण तिरंग्यात लपेटूनच. खरं तर १६ डिसेंबर,१९७१ रोजीच युद्धविराम झाला होता. पण याच दिवशी अरूण साहेब हुतात्मा झाले होते. पण याची बातमी त्यांच्या घरी पोहोचली नव्हती. मात्र युद्ध थांबल्याची बातमी त्यांना रेडिओवरून समजली होती. आपला लेक बसंतरच्या लढाईत आहे, हेही त्यांना ठाऊक होतं. लढाई संपली….अरूण साहेबांच्या मातोश्रींना वाटलं होतं….आपला लेक आता घरी येईल. त्यांनी अरूण साहेबांची खोलीही व्यवस्थित करून ठेवली होती…पण…! 

पुढे काही वर्षांनी घडलेली घटना तर आपल्यला व्यथित करून जाईल….अरूण साहेबांचे वडील निवृत्त ब्रिगेडीअर होते. त्यांचे मूळ घर पाकिस्तानात आहे. त्या घराला एकदा भेट द्यावी म्हणून ते पाकिस्तानात गेले असता त्यांचे यजमान एक ब्रिगेडीअरच होते…त्यांचे नाव नासिर….हो तेच नासिर ज्यांनी अरूण साहेबांच्या रणगाड्यावर गोळा डागला होता….नासिर यांनीच ही गोष्ट अरूणसाहेबांच्या वडीलांना सांगितली…तेंव्हा या बापाच्या मनाची काय अवस्था झाली असेल? कल्पना करवत नाही. मात्र ब्रिगेडीअर नासिर यांनी जेंव्हा त्यांना सांगितले की, तुमचा मुलगा खूप शौर्याने लढला आणि शहीद झाला…तेंव्हा या बापाचा ऊर अभिमनाने भरून आला ! This is Indian Army!

(लेफ्टनंट जनरल हनुत सिंग साहेबांच्या एका विडीओ मुलाखतीवर तसेच इतर बातम्या,लेख,विडीओस इत्यादींवर आधारीत हा लेख लिहिला आहे. लेखात वापरलेल्या हेंरी न्यूबोल्ट यांच्या कवितेचा स्वैर मराठी अनुवाद कथेच्या संदर्भात केला आहे. परमवीर अरूण खेतरपाल यांच्या रणगाड्याचे चालक श्री.प्रयाग सिंग आणि तोफ डागणारे नथू सिंग या धामधुमीत पाकिस्तानचे युद्धकैदी झाले होते. पाकिस्तानी सैन्याने या दोघांनाही वैद्यकीय उपचार दिले आणि नंतर भारताकडे सोपवले. पुढे हे दोघेही ऑनररी कॅप्टन म्हणून सेवानिवृत्त झाले. प्रयाग सिंग हे आता आपल्यात नाहीत. परमवीर खेतरपाल साहेबांचा मृतदेह आणि त्यांचा फॅमागस्टा रणगाडाही पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात घेतला होता. पण काही वेळातच पाकिस्तानला साहेबांचा देह आणि रणगाडा भारताच्या स्वाधीन करावाच लागला.. )

– समाप्त – 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आणखी एक कोवळा अभिमन्यू ! – भाग-१ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ आणखी एक कोवळा अभिमन्यू ! – भाग-१ ☆ श्री संभाजी बबन गायके 

परमवीर अरूण खेतरपाल !

सेना सीमेवर युद्धावर जायला सज्ज आहे. युद्ध तर निश्चितच होणार आणि घनघोर होणार ही तर काळ्या दगडावरची पांढरी रेघच जणू. सैनिकाच्या आयुष्यात युद्ध म्हणजे एक महोत्सवच. आणि हा महोत्सव काही नेहमी नेहमी येत नाही. प्रत्येक सच्च्या सैनिकाला हा अनुभव घ्यायचा असतोच….’अ‍ॅक्शन’ पहायची असते….मर्दुमकी गाजवायची असते. आणि हे करताना धारातीर्थीही पडायची तयारी असते. सेकंड लेफ़्टनंट अरूण खेतरपाल साहेब (१७,हॉर्स रेजिमेंट) सुद्धा याला अपवाद नव्हते. 

सैनिकी प्रशिक्षण संपवून अरूण नुकतेच या रेजिमेंटमध्ये दाखल झाले होते. वर्ष १९७१. प्रशिक्षणत अव्वल दर्जा प्राप्त केलेला असला तरी प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव नव्हता आणि असणार तरी कसा? 

सेकंड लेफ्टनंट अरूण यांना आपली रेजिमेंट युद्धाला निघाली आहे आणि आपल्याला मात्र सोबत नेले जाणार नाही, याचं फार मोठं दु:ख झालं. पण लष्करी नियम होता. अनुनभवी अधिका-याला थेट सीमेवर तैनात करणं म्हणजे प्रत्यक्ष मोहिमेला आणि त्या अधिका-यासोबतच त्याच्या नेतृत्वाखालील सैनिकांच्या जिवितालाही धोकाच की! 

म्हणूनच सेनापतींनी या नव्या अधिकारी तरूणास काही महिन्यांच्या उच्चतर प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील अहमदनगर (रणगाडा प्रशिक्षण केंद्र) येथे पाठवायचा आदेश दिला होता..अन्य अशाच अधिका-यांसोबत. 

सेकंड लेफ्टनंट त्यांचे कमांडींग ऑफिसर लेफ्टनंट जनरल हनुत सिंग साहेबांच्या समोर उभे राहिले. डोळ्यांत पाणी. चेह-यावर अत्यंत अजीजीचे भाव. म्हणाले,”साहेब, आपली रेजिमेंट युद्धला निघालीये. आणि मला सोबत नेले जात नाहीये. युद्धाची ही संधी माझ्या संपूर्ण कारकीर्दीत पुन्हा येईल,याची खात्री नाही. साहेब,मला युद्धावर जायचे आहे….नाही म्हणू नका!” 

सेनापतींनी अरूण यांना परोपरीने समजावून सांगितले. पण अरूण यांच्या डोळ्यांतील भाव,देशसेवेची प्रचंड भावना पाहून ते ही नरमले. पण त्यांनी एक अट घातली. रेजिमेंट सीमेवर जाण्यास आणखी काही दिवसांचा अवधी होता. ज्या उच्चतर प्रशिक्षणासाठी अरूण यांना पाठवण्यात यायचे होते, त्या प्रशिक्षणातील एक अल्पकालीन नमुना अभ्यासक्रम त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण करून दाखवायचा होता. अरूण यांच्यासाठी एक खास प्रशिक्षण सत्र आयोजित केले. अरूण यांनी जीवाचे रान करून हे प्रशिक्षण पूर्ण केले. महाभारतात अभिमन्यूने असा हट्ट केला होता. स्वत: सेनापतींनी, लेफ्टनंट जनरल हनुतसिंग साहेबांनी अरूण त्यांची कसून परीक्षा घेतली…..सेकंड लेफ्टनंट अरूण खेतरपाल या परीक्षेत उच्च श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले…..आणि त्यांची युद्धावर जाण्यासाठी निवड झाली…..एका आधुनिक अभिमन्यूचा हट्ट असा प्रत्यक्षात उतरत होता….१९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाचं महाभारत पुढं घडणार होतं…आणि हा अभिमन्यू कौरवांचं चक्रव्यूह भेदणार होता!    

क्षेत्रपाल या शब्दाचं अपभ्रंशित रूप म्हणजे खेतरपाल. भूमीचे रक्षण करणारे असा या शब्दाचा शब्द्श: अर्थ घेता येईल. प्रभु श्रीरामाशी नाते सांगणा-या आणि खेतरपाल असं आडनाव लावणा-या एका वंशात हे आडनाव सार्थ करणारा एक वीर जन्माला आला….अरूण त्याचं नाव. १४,ऑक्टोबर,१९५० रोजी पुण्यात ब्रिगेडीअर एम.एल.खेतरपाल साहेबांच्या पोटी अरूण यांचा जन्म झाला. आणि १३ जून, १९७१ रोजी त्यांची १७,पुना हॉर्स रेजिमेंट मध्ये सेकंड लेफ्टनंट या पदावर नियुक्ती झाली. ही रेजिमेंट रणगाडा युद्धासाठी जगप्रसिद्ध आहे. 

पाकिस्तानकडे त्यावेळचे अत्यंत बलशाली पॅटन रणगाडे होते. त्यांचं रणगाडा युद्धदळही अतिशय आक्रमक होते. १९६५च्या लढाईत त्याची चुणूक दिसली होती. पाकिस्तान हे रणगाडे भारतीय हद्दीत घुसवण्याच्या पूर्ण तयारीनिशी युद्धात उतरल्याची कुणकुण भारतीय सैन्याधिका-यांना होतीच. पाकिस्तानला रोकलं गेलं नसतं तर युद्धाचं पारडं निश्चितपणे पाकिस्तानच्या बाजूने झुकलं असतं आणि ते भारताला परवडणारं नव्हतं. आणि भारतीय सेना असं काही होऊ देणार नव्हती…भले त्यासाठी कितीही मोठी किंमत द्यावी लागली तरी! 

सीमेवरील शकरगढ येथील बसंतर नदीच्या पुलापर्यंत पोहोचण्यासाठी व त्यावरून रणगाडे पलीकडे नेण्यासाठी एक मोठा भराव टाकण्याचे आदेश पायदळाच्या ब्रिगेडला देण्यात आले….त्यांच्यासोबत १७,पुना हॉर्स रेजिमेंटही होतीच. १५ डिसेंबर,१९७१च्या रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत पायदळाने आपले काम चोख पूर्ण केले. आता शत्रूने रस्त्यात पेरलेले भूसुरुंग शोधून ते निकामी करण्याची जबाबदारी इंजिनिअर्स दलाकडे सोपवली गेली. पण हे काम अत्यंत काळजीपूर्वक करत पुढे जावे लागते. अर्थात यातील धोका लक्षात घेता वेळ हा लागतोच. पण तरीही त्वरा करावी लागत होती…पाकिस्तानी रणगाडे या पुलापर्यंत कोणत्याही क्षणी पोहोचणार होते…त्यांच्या आधी आपले रणगाडे त्यांना सामोरे जाणे गरजेचे होते. आणि भूसुरुंग निकामी करण्याचे काम तर अजून तसे निम्मंच झालं होतं. आता थांबायला वेळ नव्हता…कमांडींग ऑफिसर लेफ्टनंट जनरल हनुतसिंग साहेबांनी त्या भुसुरुंगांनी भरलेल्या रस्त्यातून आपल्या सैन्याला पुढे चाल करण्याचे आदेश दिले…यात सेकंड लेफ्टनंट यांच्या नेतृत्वातील एक रणगाडा तुकडीही होतीच. सुमारे सहाशे मीटर्सचा हा प्रवास. जीवावर उदार होऊन सैन्य पुढे निघाले….आणि दैवाची कमाल म्हणावी…एकही भुसुरुंग उडाला नाही! त्यारात्री सर्व तुकडी पुलापर्यंत सुरक्षित पोहोचली! आता प्रतीक्षा होती ती शत्रूने आडवं येण्याची. 

१६ डिसेंबर,१९७१..सकाळचे आठ वाजलेले आहेत….युद्धभूमी तशी शांत भासते आहे खरी पण ही तर वादळाआधीची भयाण शांतता. पाकिस्तानकडून तोफांचा भडीमार होऊ लागला…..आणि तोफगोळ्यांनी उडवलेल्या मातीच्या धुरळ्याच्या आडोशांनी पाकिस्तानी रणगाडे पुढे सरसावलेही! 

रणगाडे भारतीय सैन्यावर तुफान हल्ला चढवू लागले. त्यांना जारपाल या ठिकाणी काहीही करून पोहोचायचं होतं…आणि यात जर ते यशस्वी झाले असते तर भारतीय सैन्य मोठ्या संकटात सापडणार होतं…कदाचित युद्धाचा निकालच इथे स्पष्ट झाला असता! 

भारताची बी स्क्वाड्रन या चकमकीत संख्येने कमी पडू लागली…पाकिस्तानी संख्येने खूपच जास्त होते. बी स्क्वाड्रनने मागे असलेल्या इतर तुकड्यांना मदतीसाठी येण्याचं आव्हान केलं. हे आव्हान कानी पडताच आपले दोन रणगाडे आणि सैनिक-तुकडी घेऊन अरूण खेतरपाल युद्धभूमीकडे आवेशात धावले. प्रचंड गोळीबाराच्या वर्षावातही अरूण खेतरपाल शत्रूवर थेट समोरासमोर चालून गेले. पाकिस्तानने उभारलेल्या तोफ चौक्यांवरून गोळीबार होत होता..त्याच चौक्या अरूण साहेबांनी पादाक्रांत केल्या…त्यांची शस्त्रं ताब्यात घेतली….पिस्तुलाच्या धाकावर पाकिस्तानी सैनिक कैद केले! या चकमकीत अरूण साहेबांच्या रणगाड्याचा कमांडर हुतात्मा झाला…असे असूनही अरूण साहेबांनी एकट्याने प्रतिहल्ला जारीच ठेवला. पाकिस्तानी रणगाडे माघारी पळू लागले…अरूण साहेबांनी त्यांचा पाठलाग सुरुच ठेवला…पळून जाणारा एक रणगाडा अरूण साहेबांनी अचूक उध्वस्त केला! 

अरूण साहेबांच्या अंगात वीरश्रीचा संचार झाला होता…त्यांना कशचीही पर्वा नव्हती राहिली. त्यांच्या वरीष्ठांनी मोठ्या मुश्किलीने त्यांना पुढे जाण्यापासून परावृत्त केले. या मोठ्या युद्धातील एक चकमक आपण जिंकली होती…युद्ध अजून बाकी होतंच. शत्रू त्याच्या सवयीनुसार आधी शेपूट घालून पलायन करतो आणि संधी साधून पुन्हा माघारी येतो…हा आजवरचा इतिहास! 

शत्रू पुन्हा आला…मोठ्या तयारीनिशी. आता त्यांचे लक्ष्य होते ते अरूण खेतरपाल साहेब आणि इतर दोन अधिकारी यांच्या तुकड्या. कारण भारतीय हद्दीत घुसण्यात त्यांच्यासमोर हेच मोठे अडथळे होते. 

रणगाडे एकमेकांवर आग ओकू लागले. भारताने पाकिस्तानचे दहा रणगाडे अचूक टिपले..त्यातील चार तर एकट्या अरूण साहेबांनी उडवले होते. 

आपल्या तीन रणगाड्यांपैकी दोन रणगाडे निकामी झाले होते…एकावर मोठा रणगाडा-तोफगोळा आदळला होता तर एक रणगाडा नादुरूस्त झाला होता. अरूण साहेबांच्या रणगाड्याला तर आगीने वेढले होते. पण हाच एकमेव रणगाडा होता जो शत्रूला रोखू शकणार होता. 

तोफ नादुरूस्त झालेल्या रणगाड्याच्या प्रमुखांनी कॅप्टन मल्होत्रा साहेबांनी कमांडींग ऑफिसर हनुतसिंग साहेबांकडे हा रणगाडा दुरूस्तीसाठी माघारी आणण्याची परवानगी मागितली. पण युद्धक्षेत्रातून आपला रणगाडा मागे सरतो आहे, हे दृश्य मागील सर्व सैनिकांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम करणारे ठरले असते. आणि लढाईत सर्वांत महत्त्वाचे असते ते सैनिकांचे मनोबल….शस्त्रांपेक्षा ती शस्त्रे चालवणारी मने मजबूत असावी लागतात. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतातली काही निवडक, बिघडलेली, वेडी माणसं..!!! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतातली काही निवडक, बिघडलेली, वेडी माणसं..!!! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

रायगड १००० वेळा चढून जायचा प्रण कोणी करेल का….???

पण श्री सुरेश वाडकरांनी तो केला, आणि आतापर्यंत साधारणपणे ९०० वेळा ते रायगड चढले आहेत. 

सोबत अनेकांना घेऊन जातात आणि गड चढताना गडावरच्या पक्षांसारखा आवाजही काढतात. तो आवाज ऐकून पक्षी त्यांना प्रतिसाद देतात. 

 

ह्या व्यवहारी जगात काही अशी माणसे दिसतात की त्यांनी चालवलेलं काम पाहून त्यांना वेड लागलं असावं असे वाटते. 

 

ही माणसं अशा कामात गढून गेलेली असतात ज्यातून त्यांना स्वतःला काहीच मिळत नाही. उलट पाहणाऱ्यांच्या विचित्र नजरा सहन कराव्या लागतात. तरीही कोणीतरी आज्ञा दिली आहे अशा थाटात ते आपलं काम करत राहतात. 

 

एक  जेधे नावाच्या तरुण आहे. 

हा तरुण २७ जानेवारी आणि १६ ऑगस्टला एक गोणी घेऊन बाहेर पडतो आणि रस्त्यात पडलेले झेंडे, तिरंगी बिल्ले गोळा करतो. सायंकाळपर्यंत जमेल तितकं चालत जातो. शेवटी गोणी भरते. त्या गोणीला एक हार घालतो, नमस्कार करतो आणि ती डम्पिंग ग्राउंडवाल्यांच्या ताब्यात देऊन येतो. हे सगळं कशासाठी तर तिरंग्याचा अपमान होऊ नये म्हणून…!!! कचऱ्यातून आपलं अन्न काढतो असे समजून कुत्रे त्याच्यावर भुंकतात. तो हे काम करतो तेव्हा वेडा वाटतो. त्याला ह्यातून काही मिळत नाही, तरीही तो कर्तव्य समजून दोन दिवस काम करतो.                                      

 

डोंबिवलीतही एक वेडे आजोबा आहेत. 

रेल्वे रूळ ओलांडायला कितीही मनाई केली, दंड केला तरी घाईत असणारे प्रवासी रूळ ओलांडतातच. आजच्या जीवनशैलीमध्ये इतकी धावपळ आहे की प्रसंगी जीवावर उदार होऊन जगावे लागते. पण डोंबिवलीमध्ये एक आजोबा आहेत, ते काय करतात तर जिथून अनेक लोक रेल्वे रुळांवर शिरतात तिथे सकाळी आडवे उभे राहतात. दोन्ही हात लांब पसरवून ते रेल्वे रुळाकडे येणाऱ्यांना अडवतात. मधेच दोन्ही हात जोडून विनंती करतात की रूळ ओलांडू नका, पुलावरून जा. पण समोर लोकल लागली असल्यामुळे अनेकजण त्यांचे हात बाजूला करून रुळावरून धावत सुटतात. डोंबिवली हे तर मृत्यू समोर उभा असेल तरी धावणार शहर. तिथे ह्या आजोबांचं कोण ऐकणार…? तरीही आजोबा नेहमी येऊन उभे राहतात. त्यांना माहित आहे की आज हे रूळ ओलांडतील, पण तसे करणे धोकादायक होते इतके तरी मनात येईलच. आज रूळ ओलांडले तरी उद्या घरातून लवकर निघतील आणि पुलावरून सुरक्षितपणे जातील. 

 

मुंबईच्या लोकलमधून फिरणारा एक असाच “वेडा” सिंधी दिसतो.

दिसायला खरंच गबाळा आहे. पण काम फार मोलाचं करतो. ऐन उन्हाळ्यात जेव्हा सगळी लोकल तापते, जीव तहानेने व्याकुळ होतो तेव्हा हा सिंधी डब्यात चढतो. त्याच्या हातात दोन मोठ्या थैल्या असतात. थैली उघडतो आणि आपल्या चिरक्या आवाजात “जलसेवा” असे ओरडत तो डब्यामध्ये फिरू लागतो. त्यावेळी त्याने थंड पाणी आणले आहे हे पाहून प्रवासी सुखावतात. पाणी पिऊन तृप्त होतात. एकदा एकाने  ह्या सिंध्याला बोलत केलं होतं. त्याने सांगितलं, 

“आम्ही सिंधी लोक तहानलेल्याला पाणी देणं ही झुलेलालची सेवा समजतो.” आम्ही उल्हासनगरमध्ये खूप प्रॉडक्ट निर्माण केले. ते विकून पैसे कमावले. पण आम्ही कधी पाणी विकलं नाही. पण साहब, अब वक्त बदल गया…, आता प्यायला मोफत पाणी मिळत नाही, खरीदना पडता है.

 

ही अशी वेडी मंडळी पाहिली की शहाणी माणसे खुजी वाटू लागतात.

 

खरंच हे जग चालवतो कोण..??? 

 

स्वाध्याय परिवाराचे पांडुरंग शास्त्री म्हणत; खंडाळा घाटात आडवा आलेला डोंगर फोडून त्यात बोगदा बनवण्याचं वेड काहींना लागलं होतं. म्हणून मुंबईची रेल्वे घाटातून वर चढून सगळीकडे गेली.  ज्यांना वेड लागतं तेच हे जग घडवत आहेत, सुंदर बनवत आहेत.

 

वरवर पाहता ही माणसे वेडी वाटतात. कारण जे चारचौघे करत नाहीत ते हे करत असतात. पण त्यांचं काम समजून घेतल्यावर लक्षात येतं की ते जे करतात ती माझीही जबाबदारी आहे. 

 

एका दैनिकात एका वाचकाने लिहिले होते की मी आता ७२ वर्षांचा आहे. ह्या ७२ वर्षात मी एकदाही मातृभूमीवर थुंकलो नाही..!!!

 

किती छोटी प्रतिज्ञा केली ह्या माणसाने. जमिनीवर न थुंकण्याची. 

आज घडीला भारतातील प्रत्येक भाषेत एक वाक्य भाषांतरित झाले आहे आणि ते म्हणजे; थुंकू नका…!!! आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थुंकणे जास्तच घातक बनले आहे. प्रत्येकाने वरील माणसासारखा “वेडा” विचार केला तर स्वच्छतेवर होणार प्रचंड खर्च वाचेल. 

 

एक छोटी प्रतिज्ञा देशाच्या अर्थकारणात बदल घडवेल.

 

अमेरिका, युरोप सुंदर आहेत हे आपण खूप ऐकलं. आता आपला देशही सुंदर घडवू. थोडा वेडेपणा करू. 

 

अजून एक उदाहरण. शर्मा नावाचा एक असाच वेडा आहे. तो कुठेही चारचौघात गप्पा मारताना ऍसिडिटी टाळण्याचे उपाय सांगतो. 

जेवल्यावर लगेच झोपू नका, अति तिखट खाऊ नका. जेलुसील, रॅनटॅक घेण्यापेक्षा डाळिंबाचा रस किंवा कोकमाचा रस प्या असे उपाय सुचवतो.

 

सतत मानसिक ताण असलेल्या व्यक्तीला हमखास ऍसिडिटी होते. म्हणून मानसिक ताण असणाऱ्यांनी कोणती योगासने करावीत हे भर रस्त्यावर करून दाखवतो. 

म्हणून ह्या माणसाला “ऍसिडिटी मॅन” नाव पडलं आहे. कोणाची ओळख असो वा नसो हा माहिती सांगितल्या शिवाय राहत नाही. हे सगळं तो का करतो…??? तो स्वतः एका मोठ्या कंपनीत केमिकल इंजिनिअर आहे. काही मित्रांना ऍसिडिटी होते हे पाहून ह्याने उपाय शोधले. त्यांना करायला लावले. त्यांचा त्रास कमी होताच ह्याने इतरांना सांगायला सुरुवात केली. रसायनशास्त्र शिकून पैसे मिळवून झाले, आता समाजासाठी ज्ञानाचा उपयोग करायचा असे त्याला वाटते. वरवर पाहता हा वेडेपणाच आहे. पण ज्याला सतत आम्लपित्ताचा त्रास होतो त्याला शर्मा हवाहवासा वाटतो. 

 

असेच एक आहेत डॉ. भरत वटवानी.

 पती-पत्नी दोघेही सायकिऍट्रिस्ट आहेत. एकदा त्यांना एक भिकारी दिसला. तो गटारीचं पाणी पीत होता. वटवानींनी त्याला आधी प्यायला शुद्ध पाणी दिलं. मग त्यांना कळलं की हा मुलगा गावातून शहरात आला असून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. पण मानसिक संतुलन बिघडले आणि तो शहरभर भिकाऱ्यासारखा फिरू लागला. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून त्याला त्याच्या घरी पाठवले. पुढे वटवानी पती-पत्नी रस्त्यावर दिसणाऱ्या अनेक मानसिक रुग्णांवर स्वतःच्या खर्चाने उपचार करत गेले. म्हणून त्यांना  Ramon Magsaysay पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले. 

 

अशी ही बिघडलेली माणसे आहेत. आपल्याला समाज, मातृभूमी, आपला देश खूप काही देत असतो. कृतज्ञता म्हणून आपणही खारीचा वाटा द्यायला हवा हा विचार त्यामागे असतो. अशा वेड्या माणसांमुळेच जग सकारात्मक बनतं. 

आपणही पृथ्वीतलावर आलो, भारतात जन्मलो. ह्या समाजाचे, मायभूमीचे पांग फेडण्यासाठी थोडा वेडेपणा करायला हवा.

 

एक अभंग आहे….;

“आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना “

नीट वाचलं की समजतं;  आम्ही “बी घडलो,” तुम्ही “बी घडाना..! “ 

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नारायण ठोसर ते समर्थ रामदास… भाग-२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ नारायण ठोसर ते समर्थ रामदास… भाग-२ ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले 

(‘विश्वाची चिंता करायची म्हणजे काय करायचे असते हे समाजाला दाखवून द्यायचे होते आणि तसे करण्यासाठी हजारो तरुणांना तयार करायचे होते, तसेच त्यांची संघटना बांधून पुढेही अशी व्यवस्था चालू राहील याची रचना करायची होती.) – इथून पुढे —-

“शक्तीने मिळती राज्ये | युक्तीने येत्न होतसे |l शक्ती युक्ती जये ठाई | तेथे श्रीमंत धावती ||३०||”

अध्यात्म सार. – समर्थ रामदास

या उक्तीनुसार स्वतः शक्ती सामर्थ्य कमविणे गरजेचे वाटले म्हणून हा मुलगा आपल्या घरापासून कोसोमैल दूर असलेल्या टाकळीला गेला. टाकळीत पाय ठेवलेल्या दिवसापासून त्याच्या तपश्चर्येला सुरुवात झाली. ‘केल्याने होत आहे रे आधी या केलेची पाहिजे, नव्हे ! आपणच केले पाहिजे’ असे ठरवून त्याने स्वतः रोज सुमारे हजार सूर्यनमस्कार, नंतर सद्ग्रंथाचे वाचन, चिंतन, भिक्षेच्या निमित्ताने समाजमनाचे सूक्ष्म अवलोकन, असे विविध उपक्रम चालू केले. 

साधारण बारा वर्षांनी साधनेचा अर्थात जीवीतकार्याच्या पूर्वतयारीचा एक टप्पा पूर्ण केल्यावर हा तरुण देशाटन करण्याकरिता टाकळीतून बाहेर पडला. अंदाजे चोवीस वर्षाचे वय. स्वयंप्रेरित होऊन स्वतःहून निवडलेला ..  एका अर्थाने जगावेगळं संकल्प !!

 “बहुत लोक मेळवावे| एक विचारे भरावे| कष्ट करोनी घसरावे| म्लेंच्छांवरी||१४||” 

(श्रीसमर्थांचे संभाजी राजांना पत्र) 

हा एकमेव उद्देश मनात ठेऊन संपूर्ण देशभर प्रवास केला. या मुलाने भारताच्या कानाकोपऱ्यात प्रवास करून देश काल परिस्थितीचा अभ्यास केला आणि तो या अनुमानापर्यंत पोचला की आपल्याकडे भारतात कसलीच कमतरता नाही. कमतरता एकाच गोष्टीची आहे ती म्हणजे असलेल्या साधनसंपत्तीचा उपयोग करुन, नीट योजना करून कार्य सिद्धीस नेणाऱ्या ‘योजकाची’. एका शब्दात सांगायचे तर संघटनेची आणि सक्षम, लोकोत्तर नेतृत्वाची. हिंदू मनुष्य पराक्रमात, सामर्थ्यात कुठेच कमी नव्हता. कमतरता एकाच गोष्टीत होती ती म्हणजे ‘मी जिंकू शकतो’ या वृत्तीची.  आणि सर्वात महत्वाचा अभाव होता ‘राष्ट्रीय’ दृष्टिकोनाचा!! संघटनेच्या माध्यमातून समाज आपल्याला हवे ते सर्व करू शकतो हे सिद्ध करण्याची गरज होती. बारा वर्षांच्या देशाटनात श्रीसमर्थानी अशी हुकमी माणसे हेरून देशाच्या विविध भागात शेकडो मठ स्थापन केले. प्रत्येक मठात महंत नेमून मुख्य हनुमान भक्ती आणि बलोपासना ही कार्य सांगितलीच, पण सामान्य मनुष्यात स्वाभिमान जागृत करण्याचे महत्कार्य या तरुणांकरवी करायला सुरुवात केली. 

“मुख्य हरिकथा निरुपण। दुसरे ते राजकारण।। तिसरे ते सावधपण। सर्वा विषई।।” ( दा.११.०५.०४)

त्या काळात दळणवळणाची अल्पस्वल्प साधने असताना देखील या सर्व मठातील संपर्क, सुसंवाद आणि सुसूत्रता  उत्तम होती. याचा उपयोग छत्रपतींना ‘स्वराज्य’ संस्थापनेसाठी झाला हे सर्वज्ञात आहे. अलौकिक जीवनदृष्टीने कार्य करणाऱ्या आणि आपल्या असामान्य कर्तृत्वाने समाजाला दिशा देणाऱ्या या तरुणास समाजाने उस्फूर्तपणे ‘समर्थ’ ही उपाधी बहाल केली. रोज हजार सूर्यनमस्कार घालणारा आणि प्रचलित पद्धतीने मठ स्थापन करुन राजाश्रयावर मठ न चालविणारा हा आगळा संत लोकांना आकर्षित करीत होता. तरुण पिढी हनुमान आणि बलोपासनेमुळे धष्टपुष्ट होत होती आणि संकुचित विचार सोडून समाजाचा म्हणजेच समष्टीचा विचार अंगी बाणवत होती.

छत्रपतींनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला हे खरेच. पण कोणीही एकटा मनुष्य राज्य तोपर्यंत निर्माण करू शकत नाही, जोपर्यंत तत्कालीन समाज ते मनापासून स्वीकारीत नाही. राज्य व्हावे ही श्रींची इच्छा !! ह्या उद्गारांना विशेष मूल्य नक्कीच आहे. पण हे वाक्य त्याकाळातील समाजातील प्रत्येक मनुष्याचे ‘ब्रीदवाक्य’ झाले होते, याचीही आपण दखल घेतली पाहिजे. जेव्हा समाज एका विशिष्ठ ध्येयाने प्रेरित होतो तेंव्हाच शिवाजी महाराजांसारखे असामान्य नेतृत्व आणि कर्तृत्व घडते. शिवाजी महाराजांचे भौगोलिक साम्राज्य  आजच्या दोन-तीन जिल्ह्याइतके मर्यादित असले तरी भावनिकरित्या ते राज्य इथे राहणाऱ्या प्रत्येक मावळ्याचे होते. दिल्लीश्वराने स्वराज्य बुडविण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्याला त्यात कधीही यश मिळाले नाही. शेवटी त्याला स्वतःला दिल्ली सोडून महाराष्ट्रात यावे लागले आणि स्वतःला इथेच गाडून घ्यावे लागले तरीही स्वराज्य जिंकणे त्यास शक्य झाले नाही. ह्याला एकमेव कारण म्हणजे छत्रपतींच्या मागे असलेली समाजाची सात्विक शक्ती आणि विजिगीषू वृत्ती. ही वृत्ती प्रज्वलीत करण्याचे काम ह्या मठातून अखंड चालू राहिले.

त्या काळात युद्ध होतं होतीच, माणसे मरत होती, मारीत होती, जगत होती. फक्त  कशासाठी जगायचे ? कशासाठी मरायचे ? कशासाठी मारायचे? हे सांगणार कोणी नव्हते. ते सांगण्याचे काम कोणी केले असेल तर त्या समर्थांनी. ह्यामुळेच जिवा महाला, बाजीप्रभू तानाजी, येसाजी मरायला तयार झाले. हे जेव्हा मरायला तयार झाले तेव्हा त्यांची पत्नी विधवा होणारच होती, त्यांच्या मुलांचे पितृछत्र हरपणारच होते. पण त्यांनी आपल्या कुटुंबापुरता संकुचित विचार न करता देशाचा, थोडक्यात कर्तव्याचा विचार केला आणि ही शिकवण समर्थांमुळेच शक्य झाली.

आपण संकल्पित केलेलं कार्य ‘याचि देही याचि डोळा’ पाहायला मिळण्याचे भाग्य फार थोड्या लोकांना मिळते. श्रीसमर्थ रामदास स्वामी या बाबतीत भाग्यवान ठरले. श्रीसमर्थांच्या चरित्राचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की श्रीसमर्थ कर्मयोगी होते. शके १७५२ (इसवीसन 1674)  ला शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला. हिंदूना सार्वभौम राजा मिळाला. सुमारे सातशे वर्षांची गुलामी नष्ट झाली. ही फक्त राजकीय गुलामी नव्हती तर सांस्कृतिक गुलामी देखील होती. छत्रपतींनी ही गुलामी झिडकारून टाकली आणि नवी हिंदू राज्यव्यवस्था निर्माण केली. अनेक बाटलेल्या हिंदूंना त्यांनी नवीन विधिविधान निर्माण करुन शुद्धीकरण करुन स्वधर्मात घेतले. छत्रपतींनी समर्थाना आपले गुरु मानले होते. सद्गुरुंची सेवा घडावी म्हणून शिवाजी महाराजांनी आपले सर्व राज्य समर्थांच्या झोळीत टाकले आणि समर्थानी निःस्पृहपणे ते परत देऊन टाकले. त्याकाळात आणि आजही असा संत महात्मा बघायला मिळणे अति दुर्मिळ!  अशा या समर्थांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर ‘आनंदवनभुवनी’ हे काव्य लिहिले. 

“उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करायला।”

एका सामान्य कुटुंबातील मुलगा मनाशी  संकल्प करून प्रतिकूल परिस्थिती असतानाही स्वतःच्या बुद्धिकौशल्याचा उपयोग करून, रामावर प्रचंड श्रद्धा ठेवून सामान्य मनुष्यातील सात्विक शक्तीचे जागरण करून हिंदू सिंहासन निर्माण करु शकतो. हे मराठवाड्यातील जांब गावच्या ठोसरांच्या नारायणाने सिध्द करून दाखविले. फक्त त्यासाठी त्याला ‘नारायणा’चे ‘रामदास’ व्हावे लागले. ‘नारायण ठोसर ते समर्थ रामदास’ हा प्रवास विलक्षण आहे, तो मुळातून अभ्यासायला हवा, खास करून तरूणांनी! आजची समाजाची परिस्थिती फार वेगळी आहे असे नाही. ‘संघशक्ती कलींयुगे’ हेच खरे. 

दासनवमी म्हणजे श्रीसमर्थांचा निर्वाणदिन. संत सूक्ष्मातून जास्त कार्य करतात असे म्हटले जाते. धर्मजागृती चे त्यांचे कार्य चालू असेलच, त्याला आपला हातभार कसा लागेल याचा विचार आपण सर्वांनी करावा असे +नम्रपणे सुचवावेसे वाटते. बलोपासना आणि सगुणभक्ती या दोन गोष्टी सर्वांनी कराव्यात असा त्याचा प्रयत्न असे. प्रयत्न, विवेक आणि वैराग्य अशी त्यांची त्रिसूत्री होती. आजच्या पावनदिनी आपण सर्वांनी त्यांच्या चरित्राचे चिंतन करावे, रामनाम स्मरण करावे आणि राष्ट्रीय विचारसरणीने कार्य करणाऱ्या एखाद्या संघटनेत सक्रीय सहभागी व्हावे. *’समर्थ’ होण्याचा प्रयत्न जरूर करावा पण त्यासाठी आधी ‘दास’ होऊन दाखवावे. आपण प्रयत्न करू.

।।जय जय रघुवीर समर्थ।।

– समाप्त –

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ९ — राज विद्या राज गुह्यः योग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ९ — राज विद्या राज गुह्यः योग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्रीभगवानुवाच

इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।

ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्‌ ॥१॥

*

वृत्ती तुजठायी ना पार्था दोष शोधण्याची

जाणुनिया पात्रता गुह्य ज्ञान जाणण्याची

विज्ञानासह तुला सांगतो गुह्याची युक्ती

या ज्ञानाने मिळेल तुजला कर्मबंधमुक्ती ॥१॥

*

राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम्‌ ।

प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्‌ ॥२॥

*

विद्याराज गुह्यश्रेष्ठ परम पवित्र धर्माचे हे ज्ञान

परमात्म्याची देई अनुभूती सुखकर्तव्य कर्माचरण ॥२॥

*

अश्रद्धानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप । 

अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥३॥

*

धर्मप्रती ना श्रद्धा ज्याची तया न मी प्राप्त

जन्ममृत्युच्या फेऱ्यातुनिया ना हो तो मुक्त ॥३॥ 

*

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना ।

मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेषवस्थितः ॥४॥

*

व्यापिले सकल विश्वाला राहुनी अव्यक्त मी

स्थित सर्वभूते माझ्या ठायी त्यांच्या ठायी नाही मी ॥४॥ 

*

न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम्‌ ।

भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥५॥

*

योगसामर्थ्यासी या मम तू जाणुन घेई रे अर्जुन 

सकल जीवांचा मी निर्माता करितो त्या धारण

जीवांच्या त्या ठायी तरीही नच माझे  वास्तव्य 

माझ्यामध्ये जीवांचे कोणत्याही  नसते वास्तव्य ॥५॥

*

यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान्‌ ।

तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥६॥

*

सर्वत्र लहरतो वायु जैसा अवकाशात स्थित

सकल जीवही माझ्या ठायी सदैव असती स्थित ॥६॥

*

सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम्‌ ।

कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्‌ ॥७॥

*

समस्त जीव माझ्या ठायी विलीन कल्पान्ते

प्रारंभी नव कल्पाच्या पुनर्निर्मितो मी त्याते ॥७॥

*

प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः ।

भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्‌ ॥८॥

*

परावलंबी विलीन होती समस्त जीव मम प्रकृती 

पुनःपुन्हा मी तया निर्मितो यदृच्छेने मम प्रकृती ॥८॥ 

*

न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ।

उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥९॥

*

अलिप्त कर्मांपासुनी मी या सदैव धनंजया

बंधन नाही कर्मांचे त्या अनासक्तासी मया ॥९॥

*

मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरं ।

हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते ॥१०॥

*

मम इच्छेने समस्त चराचर सृष्टीला मी प्रसवितो

निर्मुनिया अन् नाश करूनी संसारा मी परिवर्तितो ॥१०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print