मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नारायण ठोसर ते समर्थ रामदास… भाग-१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ नारायण ठोसर ते समर्थ रामदास… भाग-१ ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले 

इसवी सनाचे सतरावे शतक. तो काळ ‘मोगलाई’चा. ‘दहशतवाद’, ‘असहिष्णुता’ हे शब्द एखादवेळेस त्या काळातील शब्दकोषात देखिल नसतील, पण सामान्य मनुष्य ‘याचि देही याचि डोळा’ ते अनुभवत होता. सुलतानी आणि अस्मानी संकट एकाच वेळेला महाराष्ट्रावर आणि एकूणच भारतावर घिरट्या घालीत होते. ‘स्वधर्म’ नावाचा काही धर्म असतो आणि तो प्राणपणाने जगायचा, जपायचा असतो हे सांगण्याचे धाडस करण्याची तयारी देखील त्या काळात फार कमी लोकांची होती. एखादया भरलेल्या शेतात टोळधाड यावी आणि काही क्षणांत ते शेत फस्त करून टाकावे, अगदी अशाच पद्धतीने मोगल आणि इतर आक्रमक गावावर हल्ला करायचे आणि सोन नाणं लुटून न्यायाचेच, पण गावातील लेकीबाळी एकतर पळवून न्यायचे किंवा ‘नासवून’ टाकायचे. जनतेनं दाद मागायची कोणाकडे? कारण हिंदूंना राजा नव्हताच. काही सरदार होते, पण तेही बादशहाचे मांडलिक. त्यामुळे तेही वतने टिकविण्यासाठी आपल्याच लोकांशी भांडत होते. ब्राह्मण आपल्या कर्मकांडात गुंतले होते, क्षत्रिय तत्कालीन राज्य व्यवस्थेचे मांडलिक झाले होते. वैश्य जीव मुठीत धरून व्यापार करीत होते आणि तथाकथित शूद्र आपापले जीवन कसेतरी जगत होते. काहीही करून फक्त जीव वाचविणे हाच हाच त्याकाळातील जगण्याचा मूलमंत्र झाला होता. या सगळ्याचे वर्णन करण्यासाठी एकच सुयोग्य शब्द आहे ‘मोगलाई’

इसवीसनाच्या तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माची पताका हातात घेतली आणि भक्तिमार्गाच्या माध्यमातून सामान्य मनुष्यात प्राण ओतण्याचे, त्याच्यातील ‘स्व’त्व जागृत करण्याचे कार्य चालू केले. त्या काळात समाजातील सात्विकता जवळ जवळ नष्ट होत चालली होती. चांगुल्यावरील सामान्य जनतेचा विश्वास उरला नव्हता. त्याकाळात मनुष्याचा चांगुलपणा वरील विश्वास निर्माण करणे आणि तो टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे होते. सर्व संतांनी अगदी तेच केले. दुष्काळ पडला तर शेतकरी सर्वप्रथम आपले बियाणे सुरक्षित ठेवतो याच सुत्राप्रमाणे  माऊलींनी आणि नंतर तत्कालीन संतांनी समाजातील सात्विकतेच्या बीजाचे संरक्षण आणि संवर्धन केले. माऊलींचा हरिपाठ, संत एकनाथांचे भारूड आणि इतर संताचे अभंग यामुळे समाजमन भक्तिरसात न्हाऊन निघत होते आणि ईश्वराच्या, नामाच्या सान्निध्याने मनुष्यातील सत्वगुण वृद्धीगंत व्हायला बळ मिळत होते. मनुष्याच मन विकसित करणे, हे फार अवघड काम. त्याहून अवघड म्हणजे निद्रिस्त समाजाला जागृत करून त्यास विशिष्ठ ध्येयाने प्रेरीत करून राष्ट्रकार्य, समाजकार्य करण्यास प्रवृत्त करणे. अर्थात, हे काम हृदयाच्या शस्त्रक्रियेसारखे. माणूस जिवंत ठेऊन जुनं म्हणजे सडलेले हृदय बदलून तिथे नवीन हृदयाचे रोपण करायचे. खरे हृदय बदलणे त्यामानाने एकवेळ सोपे म्हणता येईल, पण मनुष्याचे विचार समूळ बदलणे हे गोवर्धन पर्वत उचलण्यापेक्षा महाकठीण. पण आपल्याकडील संत मंडळी हे उत्तम मानसशास्त्रज्ञ, त्यामुळे त्यांनी ही सर्व शस्त्रक्रिया बेमालुमपणे आणि निष्णात तंत्रज्ञाप्रमाणे पार पाडली. ही शस्त्रक्रिया झाल्याचे सामान्य मनुष्याला कळलेदेखील नाही,  पण त्याचा ‘रोग’ मात्र बरा होण्यास निश्चित मदत झाली असे खात्रीने म्हणता येईल.

“जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ॥२॥” 

(संदर्भ:- अभंग क्रमांक १०१४ सार्थ श्रीतुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था) म्हणतात ते उगीच नव्हे!

मराठवाड्यातील जांब गावातील एका घरात एका मुलाचा जन्म झाला. अर्थात मुलाचा जन्म होणे ही तशी सामान्य घटना. पण त्याच मुलाने पुढील काळात आपल्या असामान्य कर्तृत्वाने आपले आपल्या गावाचे, प्रांताचे नव्हे तर देशाचे नाव जगप्रसिद्ध  केले, इतकेच नव्हे तर आज चारशे वर्षांनंतरही ते नाव एक दीपस्तंभ बनून आजच्या पिढीला मार्गदर्शन करीत आहे. माझ्यासारख्या एका अर्थाने आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्यास त्यांच्या चरित्राचे स्मरण करावेसे वाटते, त्याचे कर्तृत्व पुन्हा एकदा समाजाला सांगावेसे वाटते, यातच त्यांच्या अलौकिक आणि अपौरुषेय कार्याचे महात्म्य दडले आहे.

घरात अनेक पिढ्या चालत आलेली रामभक्ती !! मोठे बंधु त्यामानाने ज्येष्ठच. त्यामुळे हा बाळ आपल्या बालमित्रमंडळीत जास्त रमायचा. सुरपारंब्या आणि इतर तत्कालीन खेळ हे वेळ घालविण्याचे साधन. थोडा मोठा झाल्यानंतर मात्र सूर्यनमस्कार, पोहणे अशा गोष्टीत त्यास रस वाटू लागला. एकीकडे रामभक्ती चालू होतीच. आठव्या वर्षी मुंज झाली आणि अचानक वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या आकस्मिक निधनाचा बाळाच्या मनावर खोल परिणाम झाला. बाळ अंतर्मुख झाला. त्याचवेळेस गावात टोळधाड आली, समाजाची विदारक परिस्थिती त्याच्या लक्षात आली आणि या अंतर्मुखतेस एक वेगळी दिशा मिळाली. त्याच्या जीवनाचे ध्येय निश्चित झाले.

“धर्माच्या करिता आम्हांस जगती रामाने धाडियले।” 

रामकार्य करण्याचे ठरले आणि हनुमंत त्यांचा आदर्श, मार्गदर्शक आणि मित्र झाला. जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी हनुमंताला आपल्या सोबत ठेवले. प्रत्येक गोष्ट हनुमंताला साक्षी ठेऊन आणि समर्पण करून केली. आयुष्यात परमेश्वरावरील अतूट श्रद्धा आणि शुद्ध साक्षीभाव किती काम करतो याचे हे मूर्तिमंत उदाहरण !! आयुष्याचे ध्येय ठरले, निश्चय दृढ झाला, आता कृती !! सामान्य मनुष्याचे असामान्य संकल्प आईच्या अश्रूत वाहून जातात असा आपल्याकडील अनेक लोकांचा अनुभव आहे. ‘हुंडा मला नकोय पण आईसाठी घेतोय’, मला काही नकोय मात्र आईची इच्छा मोडवत नाही’, आई हो म्हणाली असती तर मी सैन्यात भरती झालो असतो, अशी ‘कारणे’ देणारी मंडळी आज देखील आपल्या अवतीभवती पाहायला मिळतात. पण याचे ध्येय पक्के होते, विशाल होते. ध्येय ‘रामराज्य’ प्रत्यक्षात आणण्याचे होते. हिंदूंना स्वतःचे सार्वभौम सिंहासन मिळावे, हिंदूसमाज जिंकू शकतो, हिंदू मनुष्य सार्वभौम राजा होऊ शकतो, इतकेच नव्हे हिंदू राजे जिंकलेल्या राज्याचा विस्तार करु शकतात, हिंदू ‘राज्य’ करु शकतात, हिंदू कारखाने चालवू शकतात, व्यापार करू शकतात, समुद्रावर सत्ता गाजवू शकतात, गडकिल्ले बांधू शकतात, शेती विकसित करू शकतात,  हे दाखवून देण्याचा निश्चय झाला होता, आता हा संकल्प फक्त प्रत्यक्षात आणायचा होता. एका वाक्यात सांगायचे तर *सामान्य मनुष्यात ‘राष्ट्रभक्ती’, ‘राष्ट्रीय दृष्टीकोन’ राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याचे काम करायचे होते. 

जगात कोणतीही गोष्ट दोनदा घडते. एकदा कोणाच्या तरी मनात आणि नंतर प्रत्यक्षात! हा संकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी पारंपरिक पद्धतीने संसारात रमणे सोयीचे नव्हते, म्हणून आईच्या शब्दांसाठी बोहल्यावर चढलेला हा मुलगा, “शुभमंगल सावधान….”  ऐकताच ‘सावधान’ झाला आणि गोरजमुहूर्ताचा फायदा घेऊन बोहल्यावरून पळून गेला. त्याला पारंपरिक संसारात न अडकता विश्वाचा संसार करायचा होता. “चिंता करतो विश्वाची”, असा विचार करणाऱ्या मुलाला ‘विश्वाची चिंता करायची म्हणजे काय करायचे असते हे समाजाला दाखवून द्यायचे होते आणि तसे करण्यासाठी हजारो तरुणांना तयार करायचे होते, तसेच त्यांची संघटना बांधून पुढेही अशी व्यवस्था चालू राहील याची रचना करायची होती.

– क्रमशः भाग पहिला

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “संत जनाबाई”… लेखिका : सुश्री अरुणा ढेरे – संग्राहक : श्री अनिल कुमकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “संत जनाबाई”… लेखिका : सुश्री अरुणा ढेरे – संग्राहक : श्री अनिल कुमकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

तुळशीचे बनी । जनी उकलिते वेणी

हाती घेउनिया लोणी । डोई चोळी चक्रपाणी

माझे जनीला नाही कोणी । म्हणूनी देव घाली पाणी

जनी सांगे सर्व लोकां । न्हाऊ घाली माझा सखा

 …. यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेला जनाबाईचा हा अभंग ऐकला तेव्हा आतून अगदी हलून गेले. बाई म्हणून जनाबाईचा विचार तोपर्यंत इतका थेट, इतका स्पष्ट आणि इतका तीव्र असा मनात आला नव्हता. इतर संतांचे अभंग, तसे जनीचेही अभंग. ऐकता- वाचताना तिच्या स्त्रीत्वाची अशी झणझणून जाणीव नव्हती झाली.

हा अभंग ऐकताना डोळ्यांसमोर सहज आली ती एक तरुण मुलगी. निळ्यासावळ्या मंजिर्‍यांनी बहरलेल्या, हिरव्यागार पानांनी डवरलेल्या तुळशीच्या बनात उभी असलेली. तिच्या विठ्ठलाची आवडती तुळस. जनी त्या तुळसबनात आपली वेणी उकलून केस मोकळे करते आहे. लांब असतील का तिचे केस? आणि दाटही? की असतील लहानसर, पातळ आणि मऊशार? कुरळे असतील, का असतील सरळच? कोण जाणे ! पण तिचा विठू त्या केसांच्या मुळांना लोणी लावून चोळणार आहे. मग गरम पाण्यानं तिला न्हाऊ घालणार आहे. केवढा आनंद आहे जनीला त्या गोष्टीचा ! तिला तिचं असं कुणीच नाही जगात. पण विठू आहे. तो तिचाच आहे. अगदी तिचा. किती साधेपणानं सांगते आहे जनी, की माझा सखा मला न्हाऊ घालणार आहे.

जनीच्या या साधेपणानं मी हलून गेले. तुळशीचा असावा तसा तिच्या बाई असण्याचा वेगळाच दरवळ या अभंगातून आला. त्यानं मी हलून गेले. आणि त्याहीपेक्षा तिच्या आणि विठूच्या जगावेगळ्या जवळिकीनं हलून गेले.

जनाबाईचं महिपतींनी लिहिलेलं लौकिक चरित्र अगदी साधं आणि थोडकं आहे. ती मराठवाड्यातली- परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडची मुलगी. पाच-सात वर्षांची होती तेव्हा तिची आई वारली. पंढरपूरला नामदेवांच्या घरी तिच्या वडलांनी तिला नेऊन ठेवलं. पुढे तेही वारले. जनी नामदेवांच्या घरीच राहिली, वाढली. बस्स. इतकंच तर तिचं चरित्र !

पण माणसाचं जगणं अशा ढोबळ तपशिलांपुरतं थोडंच असतं? त्या पलीकडेच तर ते बहुतेककरून उरलेलं असतं. जनीची सगळी कविता म्हणजे तिचं आंतरचरित्र आहे. आणि मराठी कवितेच्या प्रारंभकाळात अशी धीट, कणखर, नि:संदिग्ध आणि जगण्यात घुसळून आलेली कविता एका बाईनं लिहिली आहे, हे अद्भुतही फार अभिमानाचं आहे.

जनीच्या पोरकेपणाची, अनाथपणाची जाणीव तिच्या अभंगांच्या मुळाशी सारखी उमळते आहे. अगदी एकटी आहे ती. तिला तिचं माणूस कोणी नाहीच. म्हणून तर तिचं विठूशी असलेलं नातं अनेकपदरी आणि दाट, गहिरं आहे.

‘तुजवीण बा विठ्ठला । कोणी नाही रे मजला’

– असं तिनं विठूला कळवळून सांगितलं आहे.

‘माय मेली, बाप मेला । आता सांभाळी विठ्ठला’

– असं स्वत:ला त्याच्यावर निरवलं आहे. आणि त्यानंही तिचा शब्द फुलासारखा झेलला आहे. आई, बाप, सखा, सहचर, मुलगा- तिला हव्या त्या नात्यांनी तो तिला भेटला आहे.

माणसाचं आयुष्य अर्थपूर्ण करणारी जी जी नाती आहेत, ती ती सगळी नाती जनीनं विठ्ठलाशी जोडली आहेत.

‘राना गेली शेणीसाठी । वेचू लागे विठो पाठी’

किंवा

‘पाणी रांजणात भरी । सडासारवण करी ।

धुणे धुऊनिया आणी । म्हणे नामयाची जनी ।’

– असे तिचे अभंग पहा. जनी जी जी कामं करते, ती ती सगळी तिच्याबरोबर तिच्यासाठी विठू करतो आहे. तिचा एक सुंदर अभंग आहे.

साळी कांडायासी काढी । चक्रपाणी उखळ झाडी

कांडिता कांडिता । शीण आला पंढरीनाथा

कांडिताना घाम आला । तेणे पीताम्बर भिजला

पायी पैंजण, हाती कडी । कोंडा पाखडोनी काढी

हाती आले असे फोड । जनी म्हणे, मुसळ सोड

देवच साळी कांडतो आहे. घामेजून जातो आहे. हाताला फोड आले आहेत. शेवटी जनीच म्हणते आहे की, ‘पुरे कर आता. मुसळ बाजूला ठेव.’

जनीला पडणारे कष्ट, तिची होणारी दमणूक, तिचे सोलवटून निघणारे हात- जनीच्या आंतरविश्वात त्या विठ्ठलानं तिचं सगळं दु:ख स्वत:वर ओढून घेतलं आहे. तोच दमला आहे. घामानं भिजला आहे. त्याच्या हातांना फोड आले आहेत. कष्टांचं, दु:खाचं, एकटेपणाचं हे रूपांतर विलक्षण थक्क करणारं आहे.

देवाच्या थोरवीची जाणीव जनीला आहे. अगदी स्पष्ट आहे. त्याच्या पीताम्बराचा, हातातल्या सोन्याच्या कड्याचा, पायातल्या पैजणांचा उल्लेख ती करतेच आहे ना ! पण तिच्यासाठी दोघांमध्ये द्वैत नाहीच आहे. गरीब आणि श्रीमंत, किंवा उपेक्षित, वंचित आणि सुपूजित, प्रतिष्ठित, इतकाच नव्हे तर माणूस आणि परमेश्वर हा भेदही त्यांच्या नात्यात सहज नाहीसा झालेला आहे. म्हणून विठूचं तिच्याबरोबर कष्ट करणं, तिच्यासोबत सतत असणं, हे तिच्यासाठी स्वाभाविकच आहे. ती त्याला इतकी बरोबरीच्या नात्यानं वागवते, इतकी सहज त्याला रागावते, त्याला जवळ घेते, त्याला सलगी देते, की अरूपाला रूप देण्याचं, निर्गुणाला सगुण केल्याचं किंवा अलौकिकाला लौकिकात साक्षात् केल्याचं तिनं जे अपूर्व साहस केलं आहे, त्याची जाणीवच आपल्याला होत नाही. चमत्काराच्या पातळीवर जनी विठूशी नातं सांगतच नाही; ती जणू वस्तुस्थितीचंच निवेदन करते.

पहा ना, तिच्या एका अभंगात- ती धुणं घेऊन नदीकडे निघाली आहे. उपाशी आहे. विठूवर रागावली आहे. तो मागे धावतो आहे. मला का टाळून चाललीस, म्हणून विचारतो आहे. ती फटकारते आहे त्याला. ‘कशाला मागे आलायस?’ म्हणून झिडकारते आहे. आणि तो बिचारा खाली मान घालून मुकाट तिच्यामागे चालतो आहे. इतर कुठे पाहिलं आहे असं दृश्य? फक्त जनीचाच हा अनुभव आहे.

अर्थात् हे तिला शक्य झालं आहे ते केवळ संतपुरुषांमुळेच. तिच्या बाईपणाचा अडसर तिच्या परमार्थाच्या वाटेतून त्यांनी दूर केला. त्यांनी तिच्यावरचं दडपण दूर केलं. आपण बाई आहोत म्हणून बंदिनी आहोत, क्षुद्र आहोत, असहाय आहोत आणि नीचतम आहोत, ही त्या काळात प्रत्येक बाईच्या मनात आणि जीवनात स्पष्ट जागी असणारी जाणीव संतांमुळे मालवली. संतांनी देवापाशी स्त्री-पुरुष भेद नाही, असं आश्वासन दिलं म्हणून जनीसारखीला आपलं स्त्रीपण स्वाभाविकपणे स्वीकारता आलं, ‘स्त्रीजन्म म्हणवुनी न व्हावे उदास’ अशी एक समजूत मिळाली.

या समजुतीनं जनीचं स्त्रीपण फार मनोज्ञ केलं आहे. तिच्या अभंगांमधून ते सारखं जाणवतं. असं वाटतं की, पुरुष जाणतो, पण ते बुद्धीनं जाणतो. बाई जाणते ती हृदयानं जाणते. जनीची प्रगल्भता आणि तिचं शहाणपण हे काही पुस्तकांतून आलेलं, शिक्षणातून आलेलं शहाणपण नव्हे. ते तिच्या जगण्यातून, तिच्या अनुभवांतून, तिच्या बाईपणातून आलेलं शहाणपण आहे.

ती एक शहाणी, बुद्धिमान, प्रतिभावंत आणि अनुभवी अशी बाई आहे. ती बाई आहे म्हणून विठ्ठलाला लेकुरवाळा झालेला पाहते. ती बाई आहे म्हणून त्याला ‘माझे अचडे बचडे’ म्हणून कौतुकानं कुरवाळते. ती बाई आहे म्हणून ‘विठ्या, अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या’ असं त्याला प्रेमानं रागे भरते. ती बाई आहे म्हणून रात्री शेज सजवून त्याची वाट पाहते. आणि ती बाई आहे म्हणून ‘पुरे पुरे रे विठ्ठला, जनीचा अंतरंग धाला’ असा तृप्तीचा उद्गार काढते.

तिच्या बाईपणाचा सर्वात उत्कृष्ट उद्गार मात्र विठूसाठी नाही. तो ज्ञानदेवांसाठी आहे. कदाचित ज्यांच्यासाठीच्या खर्‍याखुर्‍या कळवळ्यानं ज्ञानदेवांनी मराठी गीताभाष्याचा अट्टहास केला, त्या स्त्री-शूद्रांची ती प्रतिनिधी आहे म्हणून असेल, किंवा कदाचित त्या विलक्षण प्रज्ञावंताचं कोवळं वय तिच्यातल्या प्रौढ, जाणत्या बाईला विसरता येत नसेल, किंवा कदाचित- काय असेल सांगता येत नाही, पण ज्ञानदेवांविषयीची आपली आंतर-ओल व्यक्त करताना जनीनं लिहिलं आहे-

‘मरोनिया जावे । बा माझ्या पोटी यावे’

पुढच्या जन्मी माझ्या पोटी ये ज्ञानदेवा ! अविवाहित, एकट्या जनीचे हे विलक्षण उद्गार तिच्या बाईपणाच्या आंतरसालीमधला जो कोवळा गाभा प्रकट करतात, त्या गाभ्यातला तुळस मंजिर्‍यांसारखा निळासावळा अंधार मी इतर कुठे कधी पाहिलेलाच नाही.

(संपादित)

लेखिका : अरुणा ढेरे

संग्राहक : अनिल कुमकर

प्रस्तुती : मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नवरात्र नरसिंहाचे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

☆ “नवरात्र नरसिंहाचे” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

नरसिंहाचे नवरात्र जवळ आलं की तयारी सुरू होते. घर स्वच्छ केले जाते. पूजेची उपकरणे घासली जातात. पूजेचे सामान बाजारातून आणले जाते .अगदी देवही उजळले जातात…

खरं सांगायचं तर नेहमी सगळी स्तोत्र , म्हटली जात नाहीत. नवरात्र जवळ आलं की आधी पुस्तकं बाहेर निघतात .

नृसिंह कवच, स्तवन, प्रार्थना, भक्तीभावाने  म्हटले जाते .प्रल्हादाची आरती म्हणायची.

विष्णुसहस्रनाम म्हटले जाते. द्वादशनाम स्तोत्र, शंकराचार्यांचं संकटनाशन  स्तोत्र म्हणताना वृत्ती लीन होते .

रोज घरी  देवाची नेहमी एकच आरती सवयीने  म्हटली जाते. बाकीच्या आरत्यांची नवरात्रीच्या आधी आठवण येते..त्या म्हणून घ्यायच्या…नरसिंह पुष्पांजली म्हणायची..

या सगळ्यांची आधी जरा उजळणी करून घ्यायची असते. 

 

आता तयारी कशाची करायची  समजले आहे ……

ती करून घेतली की मग नंतर म्हणताना  आनंदाने सहज हे सगळे  म्हटले जाते.

 

आमच्या नरसिंहाचे नवरात्र सुरु होते.

साग्रसंगीत पूजा ,आरती होते.

खरंतर देव देवघरात  रोजच असतात…

पण नवरात्र सुरू झालं की एकदम वेगळं वातावरण होतं.

मंद दिवा समोर तेवत राहतो..

हार फुलं घालून केलेली पूजा बघत रहावीशी वाटते …येता-जाता त्याच्याकडे बघूनही समाधान वाटतं….

आजची आरती खरचं आतून आर्ततेनी  म्हटली जाते .

नमस्कार पंचक वाचताना….

 

दयासागर दीननाथा उदारा

मला ज्ञान देऊन  अज्ञान वारा 

कृपेचा तुझ्या नित्य मेवा मिळावा.

नमस्कार साष्टांग लक्ष्मी नरसिंहा

 

अशी प्रार्थना करायची .

आता त्याची कृपा हाच मेवा आहे हे पूर्णपणे समजले आहे .

भक्ती करत राहू ..

देवाला आळवत राहू..

मनातली श्रद्धा जागृत ठेऊ…

 

सांभाळायला तो  आहेच ही खात्री आहे .

संकटकाळी तोच धावून येणार आहे.

फक्त त्याची सेवा आपल्या हातून प्रामाणिकपणे घडू दे.

हीच त्यांच्या चरणाजवळ अनन्यतेनी प्रार्थना.

नरहरी राया तुमच्या चरणाशी आमच्या सर्वांचा साष्टांग दंडवत.

 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ उगवत्या सूर्याचे तेज लाभलेला वैराग्यवान योद्धा ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ उगवत्या सूर्याचे तेज लाभलेला वैराग्यवान योद्धा ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

 

लेफ्ट्नंट जनरल हनुतसिंग साहेब!

धर्मासाठी संसाराचा त्याग केलेल्या बैराग्यांनी धर्मासाठी, मातृभूमीसाठी शस्त्रे हाती घेऊन प्रसंगी प्राणांची बलिदाने दिल्याची उदाहरणे आपल्या इतिहासात निश्चितपणे आढळतात. नजीकच्या इतिहासात डोकावू जाता एकाच लढाईत थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल दोन हजार साधुंनी लढता लढता प्राणार्पण केल्याची नोंद आहे.

राजस्थानात चौदाव्या शतकात एक विवाहीत संतयोद्धा होऊन गेले….रावल मल्लिनाथ त्यांचे नाव. यांच्याच वंशात विसाव्या शतकात त्यांच्यासम कीर्ती प्राप्त करणारे एक योद्धे जन्मले. सैनिकी जीवनात युद्धभूमीवर आणि आध्यात्मिक जीवनात एक कठोर वैराग्यवान संत म्हणून त्यांची कामगिरी अजोड म्हणावी अशीच आहे. त्यांचं नाव होतं हनुत. हनुत म्हणजे उगवत्या सूर्यासमान तेजस्वी! हेच आपले लेफ्टनंट जनरल हनुतसिंग राठौर साहेब. १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धातले एक महानायक.

लेफ्टनंट कर्नल अर्जुनसिंग यांच्या पोटी ६ जुलै, १९३३ रोजी जन्म घेतलेल्या हनुत सिंग यांनी वडीलांच्या पावलावर पाऊल टाकत १९५२ मध्ये भारतीय सैन्याच्या १७, हॉर्स अर्थात पुना हॉर्स रेजिमेंट मध्ये अधिकारी म्हणून दिमाखात प्रवेश केला. याच रेजिमेंटच्या सर्वोच्च नेतेपदापर्यंत त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर मजल मारली!  द पुना हॉर्स नावामागेही एक रंजक इतिहास दडलेला आहे. दुसरे बाजीराव पेशवे आणि लॉर्ड हॅस्टिंग यांच्यात १३ जून १८१७ या दिवशी एक लष्करी करार झाला होता. यानुसार दी पूना इररेग्युलर हॉर्स नावाचे अश्वदल उभारले गेले. या दलाचा सर्व खर्च दुस-या बाजीराव पेशव्यांनी करायचा आणि हे दल आणि हे दल पेशव्यांच्याच इलाख्यात राहील असे ठरले. पुण्यात करार झाल्याने या रेजिमेंटला पुणे हे नाव चिकटले. या रेजिमेंटमध्ये प्रामुख्याने उत्तम प्रजातींच्या अश्वांचा समावेश असे. पुढे काळानुसार स्वयंचलित वाहने, रणगाडे इत्यादी आधुनिक साधनांचा समावेश केला गेला. मात्र नाव तेच ठेवले गेले हॉर्स रेजिमेंट.

जमिनीवरच्या युद्धात रणगाड्यांचं महत्त्व आजही अपार मानले जाते. विशेषत: पाकिस्तानी सीमेला लागून असलेल्या राजस्थान सारख्या सपाट, वालुकामय प्रदेशातून पुढे मुसंडी मारायाची असेल तर रणगाड्यांना पर्याय नाही. म्हणूनच आजवर झालेल्या युद्धांत दोन्ही बाजूंनी रणगाड्यांचा वापर केला गेल्याचे दिसते. हे रणगाडे म्हणजे मरूभूमीवरचे अश्वच म्हणावेत! १९६५ च्या भारत-पाक युद्धापासून पुना हॉर्सकडे सेंचुरियन नावाचे रणगाडे होते. या युद्धात लेफ्ट्नंट कर्नल ए. बी. तारापोर यांनी प्रचंड कामगिरी करून पाकिसानचे ६० रणगाडे उध्वस्त केले होते. पण दुर्दैवाने तारापोर साहेबांच्या रणगाड्यावर तोफगोळा आदळून साहेब वीरगतीस प्राप्त झाले. त्यांना परमवीर चक्र मरणोत्तर दिले गेले. याच रेजिमेंटमध्ये हनुतसिंग साहेब पुढे सहभागी झाले होते.

१९७१ मध्ये पाकिस्तानशी युद्ध कधीही सुरू होईल अशी चिन्हे होती. आणि तत्कालीन सेनाप्रमुख फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांनी काळाची पावले ओळखून रणगाड्यांची व्युहरचना आधीच निश्चित करून सरावही सुरु केला होता….याला म्हणतात लष्करी नेतृत्व! आणि ही जबाबदारी पेलली होती हनुत सिंग साहेबांनी. पुढे सैन्य इतिहासात अमर झालेली बसंतरची लढाई होणार होती आणि या लढाईचे नायक असणार होते लेफ्टनंट कर्नल हनुतसिंग साहेब.

पाकिस्तानने आगळीक केल्यानंतर भारतानेही प्रतिआक्रमण केले. इंडियन फर्स्ट कोअरचे कमांडींग ऑफिसर लेफ्टनंट जनरल के. के. सिंग साहेबांनी पाकिस्तानी क्षेत्रात जोरदार मुसंडी मारली. त्यांच्यासोबत ५४वी इन्फंट्री डिवीजन, १६वी आर्मर्ड ब्रिगेड होती. परंतू त्यांना पाकिस्तानच्या जोरदार प्रतिकाराला तोंड द्यावे लागले. विशेषत: शत्रूने युद्धक्षेत्रात हजारो भूसुरुंग पेरून ठेवलेले होते. भूसुरुंग निकामी करून रस्ता सुरक्षित केला गेल्यावरच सैन्याला पुढे सरकता येत होते आणि यात वेळ लागत होता. आणि युद्धात तर प्रत्येक क्षण मोलाचा!  

इकडे रस्त्यात भूसुरुंग आणि पाकिस्तान्यांचा बेफाम बॉम्बवर्षाव… परिस्थिती नाजूक होती. एका नदीच्या पुलाजवळ वेगाने पोहोचता आले तर रणगाडे आणि सैन्य पुढे जाऊ शकणार होते. आणि सुमारे सहाशे मीटर्समधील रस्त्यातले सुरुंग निकामी करण्याचे काम शिल्लक होते.

इथे हनुतसिंग साहेबांनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. यात धोका तर प्रचंड होता. जमिनीखाली मृत्यू टपून बसला होता. सरावाने आणि मनोबलाने पाकिस्तानच्याही पुढे दोन पावले असणा-या हनुत सिंग साहेबांच्या सैनिकांनी साहेबांचा शब्द खाली पडू दिला नाही. त्यांनी आपले रणगाडे त्या रस्त्यावरून पुढे हाकारले. कोणत्याही क्षणी सुरुंग फुटू शकला असता आणि रणगाड्याच्या चिथड्या उडाल्या असत्या. पण त्यादिवशी रणदेवता हनुत सिंग साहेबांवर प्रसन्न असावी. कर्तव्यावर असताना मनातल्या मनात अध्यात्मिक उपासना आणि फुरसतीच्या वेळी प्रत्यक्ष उपासना करणा-या हनुत सिंग साहेबांच्या पुण्याचे फळ म्हणावे हवं तर पण त्या दिवशी या रणगाड्यांच्या रस्त्यात एकही सुरुंग फुटला नाही. संपूर्ण दल नदीपर्यंत सुखरूप पोहोचले… एका महाधाडसी निर्णयाला दैवानेच आशीर्वाद दिला होता! दुस-याच दिवशी याच मार्गाने गेलेली आपली दोन लष्करी वाहने भुसुरुंगात नष्ट झाली. याला हनुतसिंग साहेबांनी देवाचा आशीर्वादाचा हात मानले. योगायोगाने पुना हॉर्सच्या मानचिन्हात उंचावलेल्या हाताची प्रतिमा आहे….हाच तो दैवी आशीर्वादाचा हात असावा! 

या कारवाईदरम्यान पाकिस्तान प्रचंड प्रमाणावर बॉम्बवर्षाव, गोळीबार करत होता. परंतू मरण वर्षावातूनही हनुत सिंग साहेब युद्धक्षेत्रात एका जागेवरून दुस-या जागेवर नीडरपणे आणि अतिशय चपळाईने फिरत होते. त्यांनी प्रशिक्षित केलेला प्रत्येक टॅंक कमांडर अर्थात रणगाडा प्रमुख त्यांना वैय्यक्तिकरीत्या माहित होता. प्रत्येक रणगाडा त्यांच्या जणू हाता खालून गेलेला होता. युद्धपूर्व काळात त्यांनी आपल्या रेजिमेंटमध्ये अतीव धैर्य, उत्साह आणि साहस जणू पेरून ठेवले होते… जसा एखादा निष्णात शेतकरी पावसाच्या आधी उत्तम बियाणे पेरून ठेवतो तसा. आणि इथे तर हे बियाणे उगवण्यास आणि फोफावण्यास अगदी उतावीळ होते. या रेजिमेंटमधील कुणालाही उन्हाची, धुळीची आणि जीवाची पर्वा नव्हती. शांतता काळात त्यांनी सरावात गाळलेले घामाचे थेंब युद्धात मोत्यांसारखे शोभून मातृभूमीच्या कंठात विजयमालेत शोभून दिसणार होते.

पुढे गेलेला रणगाडा एक इंचही मागे सरकता कामा नये असा हनुतसिंग साहेबांचा स्पष्ट आदेश होता. एखादा रणगाडा मागे फिरला म्हणजे आपला पराभव होतो आहे, असे सैन्याला वाटून मनोबल खालावू शकते, असा साहेबांचा विचार होता आणि तो योग्यही होता. निशाण पडले की सैन्याची पावलं डगमगू शकतात असा इतिहासही आहेच. अर्थात भारतीय सैनिक असे काहीही होऊ देणार नव्हते. त्यांनी पाकिस्तानी रणगाड्यांना मागे रेटीत रेटीत नेले आणि आपण ती लढाई जिंकलो. यात पाकिस्तानच्या अत्यंत शक्तिशाली १३, लान्सर्स ही रणगाडा दल तुकडी पुरती नेस्तनाबूत झाली होती. त्यांच्याकडे अमेरिकेतून आयात केलेले शक्तीशाली पॅटन रणगाडे होते. पण शस्त्रांमागची मनगटे आणि मने बलवान असावी लागतात. आणि भारतीयांची तशी असतातच हे सिद्ध झाले. खुद्द पाकिस्तानी सैन्याने आपल्या या पुना हॉर्स रेजिमेंटला ‘फक्र-ए-हिंद अर्थात ‘हिंदुस्थानचा अभिमान’ म्हणून गौरवले! 

हनुत सिंग साहेब अंगाने सडपातळ आणि उजळ वर्णाचे. नाक टोकदार. डोळे पाणीदार. रेजिमेंटमधील सर्वसामान्य सैनिकांसाठी भावाप्रमाणे, पित्याप्रमाणे वागणारे. पण शिस्तीत अतिशय नेमके आणि कडक. रेजिमेंटमधील कोणतीही गोष्ट त्यांच्या नजरतून सुटत नसे. आणि महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही अनावश्यक गोष्टीत त्यांना जराही रस नव्हता. मूर्खांसाठी त्यांच्याकडे वेळ नसे. सैन्यात कागदोपत्री कामेही भरपूर आणि महत्त्वाची असतात. पण या कामांमुळे मूळच्या कर्तव्याला पुरेसा वेळ देता येत नसेल तर त्याला काहीही अर्थ नाही, असे ते स्पष्टपणे बजावत असत. सैनिक कागदांत गुंडाळला गेला तर शस्त्रं कधी चालवणार असा त्यांचा खडा सवाल असे. स्वत: साहेबांनी १९५८ मध्ये इंग्लंड येथे सेंन्च्युरीयन रणगाडा अभ्यासक्रम विशेष श्रेणीत उत्तीर्ण केला होता. आणि यामुळेच त्यांना आपल्या महाराष्ट्रातील नगर येथील आर्मर्ड कोअर सेंटर अ‍ॅन्ड स्कूल येथे प्रशिक्षक म्हणून नेमले गेले होते. पायदळ ज्या तत्वावर युद्ध लढते ती तत्वे आणि स्वयंचलित वाहनांच्या साहाय्याने जी लढाई लढली जाते त्यात बराच फरक असतो हे त्यांनी ताडले. स्वयंचलित वाहनांचा लढाईत वापर जर्मनांनी खूप परिणामकारक रितीने केला होता. त्यांच्या पॅन्झर रणगाड्यांच्या व्युव्हरचनेचा हनुतसिंग साहेबांनी खूप बारकाईने अभ्यास केला. आणि भारतीय सैन्याच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शक साहित्य तयार केले. इथून हनुतसिंग साहेबांनी अनेक जबाबदारीच्या पदांवर नेमले गेले. १९७० मध्ये साहेबांना पुन्हा नगर मध्ये नेमले गेले. १९५८ मध्ये केलेल्या नोंदी त्यांनी जपून ठेवल्या होत्या. त्यांच्या साहाय्याने साहेबांनी पुन्हा नवे लेखी साहित्य तयार केले. त्यावर आधारीत युद्धाभ्यास करवून घेतला. मुख्य म्हणजे सैनिकांत नवा जोश भरला. १९७० मध्ये साहेबांना पुना हॉर्समध्ये नेमले गेले. १९७१ च्या युद्धात भारतीय रणगाड्यांनी आणि ते हाकणा-या बहाद्दरांनी जी कामगिरी बजावली ती जगजाहीर आहे. या लढाईत स्वर्गीय अरूण खेत्रपाल यांनी बजावलेली कामगिरी हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्याबद्दल पुढील लेखात लिहीनच.

एक वीर योद्धा, सैनिक प्रशासक, प्रशिक्षक म्हणून ख्यातकीर्त असलेल्या या महान व्यक्तीची दुसरी बाजू सुद्धा तितकीच वेगळी आहे. संसाराच्या जबाबदा-या सैनिक कर्तव्यात बाधा आणतील म्हणून हनुत सिंग साहेबांनी लग्न केले नाही. १९६८ मध्येच त्यांनी शिवबालयोगी नावाच्या विरक्त संतांचे अनुयायीत्व स्विकारले होते. आणि सैन्यजीवनातही अध्यात्मिक साधना सुरूच ठेवली होती. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात स्वत:ला अध्यात्मिक चिंतनात अधिक रममाण करून घेतले. एका सैन्याधिका-याच्या अंगावर आता साधुची वस्त्रे आली होती. आणि याही क्षेत्रात ते अभ्यासू, कडक शिस्तीचे आणि कठोर योगी म्हणून नावारूपास आले. सैनिक तो योगी हा त्यांचा प्रवास अनोखा आणि वंदनीय आहे. १० एप्रिल, २०१५ या दिवशी संत हनुतसिंग साहेबांनी समाधी घेऊन आपले जीवीतकार्य संपवले. समाधी अवस्थेत गेल्यानंतर तिस-या दिवशी त्यांचे प्राण पंचत्वात विलीन झाले. या तिन्ही दिवसांत त्यांचा देह, मुख अत्यंत तेजस्वी दिसत होते….. त्यांच्या नावाला साजेसे… हनुत म्हणजे उगवणा-या सुर्याचे तेज! 

भारतमातेच्या या सुपुत्रास साष्टांग दंडवत आणि श्रद्धांजली.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एकोणतीस प्राण…दोन रक्षक ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ एकोणतीस प्राण…दोन रक्षक ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

… कॅप्टन अमित भारद्वाज आणि हवालदार राजवीर सिंग ! 

“आई,नको हट्ट धरूस माझा चेहरा पाहण्याचा ! मला चेहरा असा उरलाच नाही गेल्या सत्तावन्न दिवसांत. कुडीतून प्राणांचं पाखरू उडून गेलं की पिंजराही चैतन्य गमावून बसतो. मातीतून जन्मलेला हा देह माती पुन्हा आपलासा करू लागते…अगदी पहिल्या क्षणापासून. आणि सत्तावन्न दिवस तसा मोठा कालावधी आहे ना! माती होत चाललेलं माझं शरीर तुझ्यातल्या मातेला पाहवणार नाही गं! तु माझा तो लहानपणीचा गोंडस, तुला मोहवणारा चेहरा आठव आणि तोच ध्यानात ठेव अखेर पर्यंत! ऐकशील माझं? आणि हो…माझ्या वस्तू,माझा युनिफॉर्म आणि आपला तिरंगा देतीलच की तुझ्या ताब्यात! त्या रूपात मी असेनच तुझ्या अवतीभोवती…सतत! 

तु,पपा,दीदी….मला पाहू शकत नव्हतात….पण मी मात्र तुमच्या अवतीभवतीच घोटाळत होतो…इतके दिवस! आता तुमच्या सर्वांच्या देखत माझा देह अग्नित पवित्र होईल…तेंव्हा निघून जाईन मी माझ्या मार्गानं….स्वर्गात!   

दीदीला मात्र मानलं पाहिजे हं…खरी शूर पोरगी आहे. तिला सर्व माहित होतं, पण तुम्हांला त्रास होऊ नये म्हणून ती तुम्हांला खोटा धीर देत राहिली… दादा, आहे… येईल… असं सांगत. तुम्ही दोघंही मग सांत्वनासाठी येणा-यांना छातीठोकपणे सांगत राहिलात….लढाई सुरू आहे…अमित जिंकून येईल! मी जिंकूनच आलो आहे… ममी… पपा! 

१९९७ मध्ये ४,जाट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट म्हणून सीमेवर कर्तव्यावर रुजू झालो तेंव्हा सर्व वरीष्ठांना ‘सर !’ म्हणून सल्यूट बजवावा लागायचा. आणि त्याची सवयही झाली होती दीड वर्षांत. १९९९…आता मी कॅप्टन झालो होतो. 

एके दिवशी तो आला आणि मला “ लेफ्ट्नंट सौरभ कालिया,रिपोर्टींग,सर!” म्हणत त्याने कडक सल्यूट ठोकला. मला ‘सर’ म्हणणारं कुणीतरी आलं होतं याचा मला आनंद वाटला. माझ्यापेक्षा दीड दोन वर्षांनी धाकटा असणारा तो तरूण मला पाहताक्षणीच भावला. चारच महिन्यांपूर्वी माझ्या पलटणीत रुजू झाला होता. तो आता माझ्या हाताखाली असणार होता. मी त्याला या पलटणीच्या परंपरा,इतिहासाबद्दल शिकवू लागलो होतो. मी त्याला ‘बच्चा’ म्हणू शकत होतो…प्रेमानं. 

१९९९ चा मे महिना होता. आणि एकेदिवशी खबर आली की आपल्या सीमेत काही घुसघोर आढळून आले आहेत. बर्फाच्या मोसमात इथे जीवघेणे हवामान असते…जगणे अवघड करून टाकणारे. म्हणून परस्पर सामंजस्य करारानुसार दोन्ही देशांच्या अतिउंचावरील सैनिकी-चौक्या रिकाम्या केल्या जातात. आणि बर्फ वितळताच पुन्हा दोन्ही देशांचे सैनिक आपापल्या चौक्यांमध्ये परततात. पण यावेळी पाकिस्तानने आपल्या लष्कराला टोळीवाल्यांच्या वेशात बर्फ वितळण्यापूर्वीच या चौक्यांमध्ये पोहोचवले होते. आणि त्यातून भारताच्या चौक्यांवर ताबा घ्यायला लावले होते. शत्रू भारतीय सैनिकांची वाटच पहात लपून बसला होता.  भारताला याची खबर खूप उशीरा लागली,दुर्दैवाने! खरी परिस्थिती काय आहे हे पहायला चौक्यांपर्यंत एक पाहणी पथक पाठवायचं ठरलं. एक अधिकारी आणि चार जवानांची पेट्रोलींग पार्टी. तिथली भयावह परिस्थितीच माहित नव्हती. त्यामुळे मोठी कारवाई करण्याचा विचार झाला नाही. फक्त पाहून यायचं होतं माघारी….रिपोर्ट द्यायचा होता.माझा ‘बच्चा’ मोठ्या उत्साहात पुढे आला आणि म्हणाला….सर,मी जातो! आणि पेट्रोल पार्टी निघाली. सोबत नेहमी असतात तेव्हढी शस्त्रं होती….त्यादिवशी बरेच बर्फ पडत होतं. १५ मे, १९९९ चा दिवस होता हा. सौरभ फार तर १६ तारखेला परतायला हवा होता. पण त्याला बजरंग पोस्टजवळ पोहोचायला दुसरा दिवस उजाडला. “जयहिंद सर,बजरंग पोस्टवर मोठ्या संख्येने पाकिस्तानी आक्रमण झालं आहे…आमच्यावर गोळीबार होतो आहे…आमच्याकडे गोळाबारूद पुरेसा नाहीये…पण आम्ही सर्वजण लढू…तुमची मदत पोहोचेपर्यंत..ओव्हर अ‍ॅन्ड आऊट! आणि यानंतर सौरभचा काहीही पत्ता नाही. १६ मेची रात्र सरली. मग मात्र आम्ही सर्वच जण अस्वस्थ झालो. १७ तारखेला लवकरच मी ३० जवान घेऊन निघालो. यावेळेस दारूगोळा पुरेसा घेतला…..दिवसभर चढाई करीत बजरंग पोस्टच्या जवळ पोहोचतो न पोहोचतो तोच पहाडावरून आमच्या पार्टीवर जोरदार गोळीबार,तोफांचा मारा सुरू झाला. पाहतो तर, आमच्यापेक्षा कित्येक पट संख्येने शत्रू वर निवांतपणे लपून आमच्यावर सहज नेम धरून हल्ला चढवतो आहे. सोबतच्या ३० माणसांचे प्राण आता संकटात होते. माघारी फिरणं युद्धशास्त्राला धरून होतं….मी सोबत्यांना पीछे हटो,निकल जाओ, असा आदेश दिला. वरून गोळीबार सुरूच होता. त्यांच्यावर कुणीतरी सतत गोळीबार करीत राहणं गरजेचं होतं..जेणेकरून माघारी जाणारे त्यांच्या गोळीबाराच्या टप्प्यात येणार नाहीत. ही ‘कव्हरींग फायर’ची जबाबदारी मी स्विकरली…मी त्यांचा नेता होतो! एक वगळता बाकी सारे जवान हळूहळू मागे सरकत सरकत सुरक्षित ठिकाणी पोहोचायला निघाले. पण माझा ‘बडी’ ‘सहकारी’ हवालदार राजवीर सिंग यांनी जणू माझा आदेश ऐकूच गेला नाही,असा अभिनय करीत दुश्मनांवर गोळीबार सुरु ठेवला. ‘पीछे जाईये, राजवीर जी!” मी पुन्हा ओरडलो. “नहीं,साहबजी. हम आपको यहां पर अकेला छोड के नहीं जायेंगे!” राजवीर सिंग यांनी हट्ट धरला. “यहां से जिंदा लौट जाना नामुमकीन है! आप बाल बच्चे वाले इन्सान हो! मेरी तो अभी शादी भी नहीं हुई है! निकल जाईये! 

“नहीं,साहब !” राजवीर म्हणाले..त्यांची नजर दुश्मनावर आणि बोटं रायफलच्या ट्रिगरवर…तुफान गोळीबारानं पहाड हादरून जात होते. 

“यह मेरा हुक्म है,हवालदार राजवीर !” मी ओरडलो. त्यावर तो ज्येष्ठ सैनिक म्हणतो कसा…”यहां से जिंदा लौटेंगे तो आप मेरा कोर्ट मार्शल कर सकते हैं,साहब !” आणि असं म्हणत त्यांनी अंगावर गोळ्या झेलायला प्रारंभ केला. माझा नाईलाज झाला….मी नेम धरायला सुरूवात केली….दोघांनी मिळून किमान दहा दुश्मन तरी नष्ट केले असतील…पण त्यांची संख्याच प्रचंड होती. आमच्यावर आता एकत्रितच गोळीबार होऊ लागला…आडोसा कमी पडू लागला…त्यांचे नेम अचूक होते….राजवीर माझ्या आधी शहीद झाले…माझ्याही डोक्याचा दोनदा वेध घेतला दुश्मनांच्या गोळ्यांनी. आमच्या हातांची बोटं ट्रिगरवरच होती…आमचे प्राण निघून गेले होते तरी! 

मग सुरु झाला खरा रणसंग्राम. या धुमश्चक्रीत आमचे देहही आपल्या सैन्याला तब्बल छपन्न दिवस ताब्यात घेता आले नाहीत. पण आमच्या देहांच्या साक्षीने आपल्या सैन्यानं पाकिस्तान्यांना धूळ चारली. आणि मोठ्या सन्मानाने माझा आणि राजवीर यांचा उरलासुरला देह ताब्यात घेतला. सन्मानपूर्वक आदरांजली वाहिली सर्वांनी. राजवीर त्यांच्या घरी आणि मी आपल्या घरी आलो आहे….अखेरचा निरोप घ्यायला! 

ह्या जन्मीचं मातृभूमीप्रती असलेलं माझं कर्तव्य तर पूर्ण झालं आहे…तुझे ऋण फेडायला फिरूनी नवा जन्मेन मी ! जय हिंद ! “

( जुलै, २०२४ मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान कारगील येथे झालेल्या सशस्त्र संघर्षाला पंचवीस वर्षे पूर्ण होताहेत. या संघर्षातले पहिले हुतात्मा ठरले ते कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्यासोबतचे पाच जवान. कालिया साहेबांचा शोध घेण्यास गेलेल्या कॅप्टन अमित भारद्वाज साहेब आणि त्यांच्या सोबतच्या हवालदार राजवीर सिंग यांना १७ मे रोजी हौतात्म्य प्राप्त झाले. कॅप्टन भारद्वाज साहेबांची ही शौर्यगाथा त्यांच्याच भूमिकेत जाऊन लिहिली आहे… त्यांच्या बलिदानाचं स्मरण करून देण्यासाठी. कॅप्टन भारद्वाज साहेबांनी लेफ्टनंट ( पुढे कॅप्टन झालेल्या) सौरभ कालियासाहेबांचे स्वागत करणारी एक हस्तलिखित चिठ्ठी छायाचित्र स्वरूपात इथे दिली आहे. जय हिंद !)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ इडलीकुमारीची कहाणी !! – लेखिका : सौ. माधवी जोशी माहुलकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

इडलीकुमारीची कहाणी !! – लेखिका : सौ. माधवी जोशी माहुलकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

॥ अथश्री इडलीका कुमारी कथा आरंभस्य ॥ 

दक्षिण भारताचे मुख्य अन्न असलेली इडली ही आता संपूर्ण भारतातच नव्हे, तर पार सातासमुद्रापलीकडे आपल्या नावाचा डंका पिटते आहे. दक्षिण भारताची ही लाडकी इडली नावाची राजकुमारी भारतातील तमाम अन्नपदार्थांमध्ये आपल्या पौष्टिक घटकांमुळे मानाचे स्थान पटकावून बसली आहे. इडली हे नाव जितके नटखट आहे, तितकीच या इडलीकुमारीची कहाणी देखील  मनोरंजक आहे बरं का! तुम्हाला जर सांगितले की इडली ही दक्षिण भारतीय पदार्थ नाही, तर तुमचा यावर विश्वास बसेल? नाही ना? माझा पण नव्हता बसला. परंतु मी जेव्हा इडलीच्या इतिहासाचा मागोवा घेतला, तेव्हा या इडलीकुमारीच्या ब-याच रंजक कथा समोर आल्या. तुम्हालाही ऐकायला आवडेल का या इडलीकुमारीची कथा?  चला तर मग, सुरु करु या! 

भारतीय खाद्य इतिहासकार के.टी.अचैय्या यांच्या अभ्यासानुसार कर्नाटकातील काही कवितांमधे इडलीचा उल्लेख आढळतो. ‘इडलीगा वा इडरीका’ असं संस्कृतमधे त्यांना म्हटलं गेलं आहे. इडली, दोसा, वडा सांबार, अप्पे, उतप्पम् अशा विविध पदार्थांची नावे ऐकली की, आपल्या डोळ्यासमोर लुंगीवाला साऊथ इंडीयन अण्णा उभा राहतो. भारताच्या कानाकोप-यात सकाळी सकाळी कपाळाला पांढरे गंध लावलेले हे लुंगीवाले अण्णा इडली, दोसा विकतांना दिसतात. कोणी सायकलवर, तर कोणी हातगाडीवर, आपापली दुकाने घेऊन फिरतांना दिसतात. किती तरी अण्णा लोक या पदार्थांचे हाॅटेल्स टाकून श्रीमंत झालेले दिसतात. कारण साऊथ इंडीयन पदार्थांनी समस्त भारतीयांना  तशी भुरळच पाडलेली आहे. त्यातल्या त्यात पांढरी स्वच्छ, मऊ, लुसलुशीत इडली म्हणजे समस्त आबालवृद्ध लोकांच्या गळ्यातील ताईतच!                                          

तर अशी ही सर्वांची लाडकी इडली मूळ रुपात आपल्या येथील नाहीच आहे. ही इडलीकुमारी आली आहे इंडोनेशियामधून. तुम्ही म्हणाल की, काहीही सांगते. वर्षानुवर्षं आपल्या आहारात असलेली इडली इंडोनेशियाची कशी बरं असेल? परंतु हे खरं आहे. कन्नड खाद्य इतिहासकार श्री. के.टी.अचैय्या यांनी त्यांच्या पुस्तकात इडलीबद्दल लिहीतांना हे सांगितले आहे की, इडली ही दक्षिण भारतीय पदार्थ नाही, तर ती इंडोनेशियामधून भारतात आली आहे. वडा सांबार, दोसा यांना दोन हजार वर्षांपूर्वीचा भारी भक्कम इतिहास आहे. परंतु इडलीला इतका प्राचीन इतिहास नाही. फार पूर्वीपासूनच इंडोनेशिया, चीनमधे वाफवलेले पदार्थ तयार करण्याची परंपरा आहे. आपल्या देशात इडलीसारखा पदार्थ, जो आंबवून व वाफवून तयार केला जातो, हे त्या वेळेस कोणालाच माहीत नसावं आणि त्याच कारणामुळे जेव्हा सातव्या शतकामधे ह्युआन त्सांग नावाचा चीनी बौद्ध भिक्कू प्रवासाकरता भारतामधे आला होता, तेव्हा त्याला पदार्थ वाफवण्याचे भांडे आपल्या देशात कुठेही आढळले नव्हते, हे त्याने आपल्या प्रवास-वर्णनामधे नमूद करुन ठेवले आहे. अचैय्या यांच्या मतानुसार इंडोनेशियातील बल्लवाचार्यांनी पदार्थ वाफवून तयार करण्याची प्रक्रिया भारतात आणली असावी. इडली ही तांदूळ + उडीद डाळ यांना सात आठ तास भिजवून, नंतर रवाळ वाटून व परत सात आठ तास फर्मेंट करुन ज्याला ‘किण्वन’ही म्हटले जाते, अशा पद्धतीने तयार केली जाते.                                                                             

इ.स. ९२०च्या शतकातील शिवाकोटाचार्य यांच्या लेखामधे इडलीचा उल्लेख आढळतो. ते असे लिहीतात की, दक्षिण भारतातील एका स्त्रीकडे एकदा एक ब्रम्हचारी अतिथी म्हणून आला असतांना, तिने बनवलेल्या अठरा प्रकारच्या व्यंजनांमधे ही इडली होती.  इ.स. १०२० मधील एक कवी श्री चामुंडा राय यांच्या एका विवरणामधे इडली बनवण्याची प्रक्रिया अशा प्रकारे होती की, ज्यामधे तांदळाचा उपयोग नव्हता केला व ती किण्वन म्हणजे आंबवलेली सुद्धा नव्हती. तर ही इडली म्हणजे फक्त उडीद डाळ ताकामधे भिजवून, नंतर ती बारीक करुन त्यामधे दह्याचे वरचे ताजे पाणी, काळी मिरी पावडर, हिंग, मीठ व कोथींबीर एकत्र करुन हवा तसा आकार देऊन तयार केलेला पदार्थ होता, जो इडलीसारखा दिसत होता, परंतु ती इडली नव्हती.                                                 

तांदूळ व उडीद डाळीपासून इडली फक्त इंडोनेशियात बनवली जात होती. तिला त्या देशात ‘केडली’ या नावाने संबोधले जात होते. आहे की नाही मजेशीर? आपल्याला इडलीची जुळी बहीण केडली, जी कुंभमेळ्यात हरवली होती, हे माहितीच नव्हतं.                                                      

इ.स. ८०० ते १२०० च्या शतकांमधे काही इंडोनेशियन राजे आपल्या भारतातील नातेवाईंकाकडे  त्यांच्या गाठीभेटींकरता, लग्न समारंभांकरता, तसेच हे राजे वधू संशोधनाकरता देखील यायचे, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे मुदपाकखान्यातील भारतीय आचारीदेखील ते सोबत आणत असत, जे आपापल्या शाही परिवारांच्या जेवणाकरता त्यांचे पारंपरीक पदार्थ तयार करत असत. त्यामधे या तांदूळ व उडीद डाळीचा किण्वन  केलेला हा ‘इडली’ नावाचा पदार्थ होता.  किण्वन म्हणजे आंबवलेला किंवा इंग्रजीत फर्मेंट केलेला पदार्थ असा अर्थ होतो. पदार्थ आंबवून म्हणजे किण्वन करुन व वाफवून करण्याची कला ही चीन, इंडोनेशिया, थायलंड, म्यानमार या देशांमधे जास्त प्रचलित होती. कारण तांदूळ उत्पादनामधे हे देश पहिल्यापासून अग्रेसर आहेत व तांदळाच्या पिठापासून किंवा तांदळापासून अनेक वाफवलेले पदार्थ तयार करता येतात, हे त्यांना माहीत असावं. म्हणून वाफवलेल्या पदार्थांचा त्यांच्या आहारात जास्त समावेश असावा. इंडोनेशियातील राजपरिवारांच्या भारतीय मूळ असलेल्या आचा-यांनी तयार केलेला ‘केडली’ नावाचा हा पदार्थ भारतीय आचा-यांनी पण शिकून घेतला असावा.                                                  

हे आचारी जेव्हा भारतात राहिले, तेव्हा त्यांनीच तांदूळ व उडीद डाळ मिसळून लुसलुशीत पांढरी स्वच्छ इडली तयार करण्याचा आविष्कार केला असेल, जो संपूर्णपणे भारतीय असावा व केवळ त्यामुळेच इंडोनेशियाच्या केडलीच्या या जुळ्या बहीणीचा म्हणजे इडलीचा भारतीयांच्या मनात आदरयुक्त भाव निर्माण झाला असावा. इंडोनेशियाच्या केडलीने आपली जुळी बहीण इडलीला भारतीयांच्या मनामधे स्थान मिळवून दिले व स्वतः केडली इंडोनेशियातच राहिली. 

आपल्या भारतीय बल्लवाचार्यांनी या इडलीची अनेक बाळंतपणे करुन तिची नवनवीन रुपे जन्माला घातली. जुन्या इडलीकुमारीचा जन्म फक्त तांदूळ व उडीद डाळ यांचे मीलन झाले तरच शक्य होता, परंतु ही इडलीकुमारी भारतात आली व तिची अनेक रुपे तयार झाली. भारतामधे तांदळाचे लग्न फक्त उडीद डाळीसोबत न लावता – मूग डाळ, काळे उडीद यांचेसोबत लावून तिला नव्याने जन्माला घातले गेले. तिरुपती बालाजीला गेलात तर तिथे आजही काही ठिकाणी  काळे उडीद वापरुन तयार केलेली काळी इडली मिळते.                                         

आता तर या आधुनिक काळात इडलीची किती तरी रुपे पहायला मिळतात, जी इंडोनेशियातील लोकांनाही माहीत नसतील. यामधे दक्षिण भारत नेहमीच पुढे राहीला आहे. आता २१ व्या शतकामधे थट्टे इडली, मिनी इडली, पोडी इडली, रागी इडली, रवा इडली, मूग डाळ इडली, मिलेट्सची इडली, स्टफ इडली, बटर इडली, इत्यादी नवनवीन खानपानानुसार बनलेल्या इडलीने आपले जग व्यापून गेले आहे. मी तर असेही ऐकले आहे की आमच्या नागपूरमधे मिळणा-या काळ्या इडलीने खवयेगिरी करणा-या लोकांची उत्कंठा वाढीस लावली आहे. एम.टी.आर. व कांचीपूरम इडलीने तर आता लोकप्रियतेचा कळस गाठला आहे. आज इंडोनेशियाच्या केडलीपेक्षा तिच्या या भारतीय जुळ्या बहीणीचा, जिचे ‘नाव एक परंतु रुपे अनेक’ असे वैशिष्ट्य आहे, अशा इडलीचा दबदबा सर्व जगात पसरला आहे. तांदळापासून वाफवलेले इतके सारे पदार्थ बनू शकतात, हे आपण जगाला दाखवून दिले आहे. भारतामधे आजमितीला तांदळाचे दोन लाख वेगवेगळे प्रकार पहायला मिळतात, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

भारताच्या मध्य भागात जर आपण उभे राहीलो, तर उत्तरेकडे विविध प्रकारचे पराठे, छोले भटुरे, कुलछे असे पदार्थ आपले चित्त विचलीत करतात. तर दक्षिणेकडचे वडा सांबार, इडली सांबार, मसाला दोसा हे पदार्थ मुखामधे लाळेची त्सुनामी आणतात. आपल्या देशात विविध प्रांतांनुसार चटपटीत व्यंजनेसुद्धा आपापल्या रंगारुपाने, चवीने विविधतेत एकता साधून आहेत. आपल्या सहिष्णु वृत्तीमुळेच इंडोनेशियातील केडलीला आपण इडलीची नानाविध रुपे देऊन भारतीय खाद्यसंस्कृतीमधे मानाचे स्थान देऊन अजरामर केले आहे. इडलीसारखे असे किती तरी पदार्थ आज भारतीयांच्या आहारात “मिले सूर मेरा तु्म्हारा, तो सूर बने हमारा” असे म्हणत हिंदुस्थानच्या घराघरात विराजमान झाले असतील. कोणालाही “अतिथी देवो भव” म्हणण्याची परंपरा, मग ते परकीय पदार्थ का असेनात, भारतीय लोकांनी परकीय खाद्यसंस्कृतीचे स्वागत करुन व तिला आपलेसे करुन कायम जपलेली आढळते. अशी गरमागरम, मऊ, लुसलुशीत पांढरी स्वच्छ जाळीदार हलकी इडली जेव्हा सांबारच्या आंबटगोड वाटीरुपी तळ्यात डुबक्या मारुन आपल्या जिभेवर विराजमान होते ना, तेव्हा तो स्वर्गीय अनुभव काय वर्णावा? या इडली सांबारासोबत ओल्या नारळाची चटणी खाल्ली की, ब्रम्हानंदी टाळी लागलीच समजा!                                                        

 “अहाहा!!! क्या कहना इडली राजकुमारी, तुम्हारी तारीफ करते करते जबान थकती नही!”                            

आपली ही खाद्ययात्रा पुढेही अशीच चालू ठेवत, मी इथे इडलीकुमारीची कहाणी संपवते. खाद्यपरंपरेत अशीच एक नवीन पदार्थाची कथा मी तुम्हाला पुढील भागात सांगेन. तोपर्यंत अशी नवीन कथा वाचण्याची तुमची उत्कंठा वाढीस लागू द्या. 

॥ इतिश्री इडरीगा कहाणी सुफल संपूर्णम् ॥ 

© सौ. माधवी जोशी माहुलकर 

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “एका राणीची गोष्ट” – लेखक : श्री विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “एका राणीची गोष्ट” – लेखक : श्री विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

राजा राणीच्या अनेक गोष्टी आपण आजवर ऐकलेल्या आहेत, त्यातलीच ही एका राणीची गोष्ट.                                                                   

साधारण २००० वर्षांपूर्वी दक्षिण कोरियात ‘किम सुरो’ नावाचा एक राजा राज्य करत होता. इतर राजांप्रमाणे त्यानेही लग्न करून आपल्या म्हणजेच ‘करक राज्या’चा वंश पुढे वाढवावा, अशी इच्छा त्याच्या घरातील ज्येष्ठ लोकांची होती. पण त्या राजाला अशा एका राणीची गरज होती, जी या भूतलावर एकमेव आणि दैवी आशीर्वाद असलेली असेल. अशा राणीची वाट बघत असताना त्यांच्या राज्यापासून तब्बल ४५०० किलोमीटर लांब असलेल्या एका राजाच्या स्वप्नात ‘किम सुरो’ची इच्छा प्रकट झाली. त्याने आपल्या १६ वर्षांच्या मुलीला दक्षिण कोरिया इकडे किम सुरोशी लग्न करण्यासाठी पाठवलं. किम सुरोच्या स्वप्नातल्या राजकुमारीला समोर बघताच त्याने नकार देण्याचा प्रश्न नव्हताच. किमने तिचं नावं ठेवलं  ‘हिओ वांग ओक’.  त्या दोघांचं लग्न झालं आणि या दाम्पत्याने पुढे १२ मुलांना जन्म दिला. यातील १० मुलांनी राजाची म्हणजेच किम’ची वंशावळ पुढे नेली तर यातील दोन मुलांनी ‘हिओ’ ही वंशावळ पुढे नेली. आज दक्षिण कोरियामधील जवळपास ८० लाख कोरियन याच वंशावळीचं प्रतिनिधित्व करतात. या वंशावळीतील लोक इतर कोरियन लोकांच्या मानाने थोडे उंच आणि गहू वर्णीय असतात (इतर कोरियन रंगाने गोरे असतात). तसेच यांच्याकडे वंशपरंपरागत राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळालेली आहे. आजही अनेक कोरियन प्राईम मिनिस्टर आणि प्रेसिडेंट हे याच वंशाचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळेच त्यांच्या मनात आपल्या वंशाला जन्म देणाऱ्या ४५०० किलोमीटरवरून आलेल्या त्या राणीबद्दल आजही आदर आहे.

पण या दक्षिण कोरियन राणीचा आणि आपला काय संबंध असा प्रश्न आपल्या मनात येणं स्वाभाविक आहे. तर ही राणी दुसरी तिसरीकडून नाही तर प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान असलेल्या आणि जगातील समस्त हिंदुधर्मीयांचे पवित्र स्थान असलेल्या अयोध्येच्या राजाची मुलगी होती. जिचं नावं होतं ‘सुरीरत्न’. त्याकाळी अयोध्येच्या राजकुमारीचा प्रवास हा भारतातून दक्षिण कोरियाच्या गया (ज्याला आज ‘गिम्हे’ असं म्हटलं जातं) पर्यंत झाला. त्याकाळी समुद्रातून प्रवास करताना बोट उलटू नये म्हणून सुरीरत्नच्या बोटीत अयोध्येतील काही दगड ठेवण्यात आले होते. ज्याचा वापर बोटीला बॅलन्स करण्यासाठी केला गेला. हेच दगड आज दक्षिण कोरियात आज पुजले जातात. दक्षिण कोरियन लोकांच्या संस्कृतीत आज या दगडांना अनन्यसाधारण महत्व आहे. राजा किम सुरो आणि राणी सुरीरत्न हे दोघेही जवळपास १५० वर्षं जगले, असं कोरियन इतिहास सांगतो. दक्षिण कोरियाच्या ‘समयुग युसा’ या पौराणिक ग्रंथात राणी सुरीरत्नचा उल्लेख केलेला आहे. यात ही राणी ‘आयुता’ (म्हणजेच आजचं अयोध्या) इकडून आल्याचं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. 

कोरियन संस्कृतीत आपला इतिहास आणि वंशावळ याबद्दल खूप आदर असतो. त्यामुळेच आज २००० वर्षांनंतरही आपल्या वंशावळीचा आलेख एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केला जातो. याच कारणामुळे राणी सुरीरत्न (राणी हिओ वांग ओक) आणि राजा किम सुरो यांच्या वंशातील लोकांनी हा पिढीजात इतिहास जपून ठेवला आहे. भारतातील लोकांना भारताच्या इतिहासाबद्दल नेहमीच अनास्था राहिलेली आहे. भारतात इतिहासापेक्षा, ते कोणत्या जातीचे होते हे बघण्यात आणि त्यावर मते मांडण्यात इतिहासतज्ज्ञ धन्यता मानत असतात. पण आपल्या इतिहासाबद्दल जागरूक असणाऱ्या आणि अभिमान बाळगणाऱ्या कोरियन लोकांनी आपल्या लाडक्या राणीचं मूळ गाव शोधून तिच्या आठवणींना पुढे येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारत सरकारकडे पाठपुरावा केला. त्याचाच भाग म्हणून दक्षिण कोरियातील गिम्हे शहर आणि भारतातील अयोध्या शहरात एक करार झाला. दक्षिण कोरियन सरकारने आपल्या राणीचं एक स्मारक अयोध्येत बांधण्यासाठी भारत सरकारकडे परवानगी मागितली. त्याचाच भाग म्हणून २००१ साली १०० पेक्षा जास्ती इतिहासकार, सरकार अधिकारी ज्यांत चक्क भारतातील उत्तर कोरियाच्या वाणिज्य दूतांचा समावेश होता, ते शरयू नदीच्या तटावर बांधल्या जाणाऱ्या राणी सुरीरत्न (राणी हिओ वांग ओक) हिच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी हजर होते. 

दक्षिण कोरियाचे भूतपूर्व राष्ट्रपती किम-डे जुंग, तसेच दक्षिण कोरियाचे भूतपूर्व पंतप्रधान किम जोंग पिल यांच्यासह दक्षिण कोरियाच्या भूतपूर्व पहिल्या महिला किम जुंग सोक हे सर्व स्वतःला राणी सुरीरत्न (राणी हिओ वांग ओक) च्या वंशावळीतील मानतात. त्यामुळेच आपल्या राणीचं स्मारक भारतात भव्यदिव्य होण्यासाठी त्यांनी २०१६ साली उत्तर प्रदेश सरकारला खूप मोठी मदत केली. दक्षिण कोरियाचे तत्कालीन राष्ट्रपती मून जे इन यांनी सपत्नीक म्हणजेच किम जुंग सोक यांच्यासोबत दिवाळीत अयोध्येला भेट दिली. शरयू नदीच्या काठावर त्यांनी अयोध्येतील दीप सोहळा साजरा तर केलाच पण आपल्या वंशाला जन्म देण्यासाठी राणी सुरीरत्नचे आभारही मानले. 

राणी सुरीरत्न (राणी हिओ वांग ओक) हिच्या अयोध्येतील संबंधांबद्दल आजही इतिहासकारांत वेगळी मते असली, किंवा काही ठोस पुरावे नसले तरी दक्षिण कोरियातील त्यांचे वंशज मात्र भारतातील अयोध्येला आपल्या राणीचं जन्मस्थान मानतात. जिकडे ४०० वर्षं जुन्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या इतिहासावर वेगवेगळे दावे केले जातात, तिकडे २००० वर्षं जुन्या इतिहासाबद्दल बोलायला नको. कसंही असलं तरी राणीचे वंशज मात्र भारतातील आपल्या उगमस्थानाबद्दल ठाम आहेत. त्यामुळेच आजही हजारो कोरियन लोक अयोध्येत राणी सुरीरत्न (राणी हिओ वांग ओक) हिच्या जन्मस्थानाला आठवणीने भेट देतात. ज्यात प्रत्येक वर्षी भर पडत आहे. त्याचवेळी भारतीय मात्र अयोध्येतील या इतिहासाबद्दल संपूर्णपणे अनभिज्ञ आहेत. किंबहुना असा इतिहास जतन करायचा असतो, हे समजण्याची वैचारिक पातळी त्यांनी गाठलेली नाही असे नमूद करावे वाटते. आजही आमचा इतिहास हा प्रभू श्रीरामाची जात ते शिवछत्रपतींची जात कोणती यापर्यंत मर्यादित आहे. कारण जातीपातीच्या राजकारणापलीकडे इतिहास शिकण्याची गरज आणि आवड आमच्यात निर्माण झालेली नाही. 

राणी सुरीरत्न (राणी हिओ वांग ओक) आणि तिने दक्षिण कोरियात नेलेल्या अयोध्येतील दगडांची आठवण म्हणून भारतीय टपाल खात्याने २५ रुपयांचं एक टपाल तिकीट काढलेलं आहे. ज्यात भारताने आपल्या राणीचा थोडा तरी योग्य सन्मान केला आहे, असे वाटते. भारत ते दक्षिण कोरिया हा एका राणीचा प्रवास जसा दक्षिण कोरियन लोकांसाठी खास आहे, तसाच तो भारतीयांसाठीही असावा अशी मनोमन इच्छा…! 

जय हिंद!!!

(आपलं मूळ शोधण्याची ही असोशी जगाला एकत्र आणू शकते… फक्त प्रामाणिक इच्छा हवी… शोध घेण्याची आणि जे सापडेल त्याचा आदर करण्याची…!) 

© श्री विनीत वर्तक 

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ विंचवीची कथा… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

? इंद्रधनुष्य ?

☆ विंचवीची कथा… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

तुम्हाला हे माहिती आहे का?.. विंचवी म्हणजे मादी विंचू हिच्या आयुष्याची एक भयानक कथा आहे… ती मुलांना जन्म दिला की तिचे आयुष्य त्याच क्षणी फक्त आणि फक्त आपल्या पिल्लाना वाचविण्यासाठी पूर्णपणे समर्पित करते … •• विंचू •• विंचवाविषयी आपल्याला काय माहित आहे? विंचू डंख मारतो, इतकच ना?

तुमच्या माहितीत एक अजुन भर घालणार आहे. विंचवाची मादी विंचवी म्हणुयात तिला.

श्रेष्ठ मातृत्व समजायचं असेल तर विंचवीला भेटलंच पाहिजे. विंचवी प्रसवते म्हणजे बाळंत होते तेव्हा सरासरी तिला सहा सात पिलं होतात,अगदी अंगठ्याच्या नखावर मावतील एवढी.काही तासांनी पिलांना भुक लागते,निसर्गाचा कोप झालेल्या जीवापैकी एक म्हणजे विंचवी. तिला पिलांच पोषन करण्यासाठी कुठलीच व्यवस्था नाही. कासवा विषयी आपल्याला माहित असेलच; कासवाची आणि पिलांची केवळ नजरानजर झाली की पिलांच पोट भरतं. ईथे त्याहुनही गंभीर समस्या आहे. विंचवीकडे अशी कुठलीच सोय नाही. आता हळुहळु पिलांची भूक अनावर होऊ लागते. विंचवी बिचारी कासाविस होते, पण द्यायला तर काहीच नाही. पिलं तिला चावा घ्यायला सुरुवात करतात ती अंग चोरुन निमुट बसुन रहाते. आता पिलांची भूक अनावर होते, ते विंचवीचेच लचके तोडायला सुरुवात करतात, पहाता पहाता पिलं पोट भरुन तृप्त झालेली असतात, आणि विंचवी… विंचवी… हो ती स्वतःच्या पिलांना तृप्त करण्यासाठी स्वतः संपूर्णपणे समर्पित झालेली असते !

याला म्हणायचं आईचं आईपण. “आई “मग ती मुंगी, शेळी, वाघीण, गाय असो कि तुमची माझी माय असो, आईपण तेच ! मातृत्व अशी जादु आहे कि जिच्या दातृत्वापुढे देवही फिके आहेत. ज्याला आई समजली त्याला विश्व समजलं. या जगात तुमचा कोणताही अपराध पोटात घालण्याची ताकद फक्त तुमच्या आईबाबांमधे आहे.कारण ते कुठल्याही स्वार्थाशिवाय तुमच्यावर प्रेम करतात. आपल्या आईबाबांना खूप प्रेम द्या. कारण तीच खरी भक्ती आणि देवपूजा आहे. 

तुकोबा म्हणतात,

मायबापे केवळ काशी ।

तेणे न जावे तिर्थाशी ।।

प्रस्तुती : श्री आशिष बिवलकर 

बदलापूर – मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक ‘अग्निसाक्षी’ सैनिक ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

एक ‘अग्निसाक्षी’ सैनिक ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

लेफ्टनंट कमांडर धर्मेंद्रसिंग चौहान

मध्यप्रदेशातील रतलाम नावाचं त्याचं जन्मगाव समुदसपाटीपासून सुमारे ४८० मीटर्स उंचीवर आणि कोणत्याही समुद्रकिना-यापासून शेकडो किलोमीटर्स दूर! पण छोट्या धर्मेंद्रला लहानपणापासूनच समुद्राचं आकर्षण होतं आणि त्यापेक्षा जास्त समुद्रात लाटांवर स्वार होत क्षितीजापर्यंत आणि क्षितीजाच्याही पल्याड जाण्या-या नौकांचं. पावसाळ्यात वाहत्या पाण्यात सोडल्या जाणा-या कागदी होड्या त्याला फारशा भावायच्या नाहीत. उलट इतिहासाच्या पुस्तकातल्या जुन्या लढाऊ जहाजांची मोहिनी त्याला पडली होती. जहाजं एवढी मोठी असतात आणि तरीही ती पाण्यावर सहजपणे तरंगत जातात तरी कशी असा प्रश्न त्याच्या बालमनाला सहज पडत असे.

हे आणि असेच काही प्रश्न मनात घेऊन हा मुलगा इंजिनीअर झाला. अर्थातच उत्तम नोकरी शोधावी आणि गृहस्थाश्रमात पडावं असं त्याला आणि त्याच्या पालकांना वाटणं साहजिकच होतं. पण धर्मेंद्र सिंग यांनी अभियांत्रिकी पदवी मिळवली होती ती सेनादलात जाण्यासाठीच. भारतीय नौदलात नौसैनिक अधिका-यांची भरती निघताच धर्मेंद्रसिंग यांनी आपली सारी बुद्धीमत्ता, शारीरिक क्षमता पणाला लावून भारतीय नौसेनेचा चमकदार सफेद गणवेश अंगावर चढवलाच. त्यांच्या डोक्यावरची नौसेनेची विशिष्ट कॅप त्यांच्या व्यक्तिमत्त्वातल्या तजेलदारपणाला आणखीनच उजाळा देणारी दिसे. वर्ष होतं २०१३.

गावातल्या नदीत, तळ्यात पोहणं, नौकाविहार करणं वेगळं आणि थेट लढाऊ जहाजांवर देशसेवा करायला मिळणं वेगळं. धर्मेंद्र्सिंग आणि समुद्राचं नातं फार लवकर जुळलं आणि अर्थातच लढाऊ जहाज हे त्यांचं दुसरं निवासस्थान बनलं.

त्यांना लाभलेलं पाण्यातलं निवासस्थान काही साधंसुधं नव्हतं. तब्बल बावीस मजली इमारतीएवढी उंची होती या घराची आणि वजन होतं ४४, ५०० टन. लांबी म्हणजे फुटबॉलच्या तीन मैदानं बसतील इतकी आणि रुंदी म्हणाल तर कित्येक लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स सहज मावतील एवढी. आणि नाव होतं आय. एन. एस. विक्रमादित्य! भारताची  सर्वांत शक्तिशाली, आधुनिक युद्धनौका. रशियाकडून खरेदी केली गेलेली ही युद्ध नौका सरतेशेवटी अतिशय सुसज्ज होऊन २०१४ मध्ये भारतीय नौदलात प्रवेश करती झाली आणि तिने शत्रूच्या काळजात धडकी भरवली.

युद्धनौकेवर अतिशय उच्च दर्जाचं प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक असतं. विक्रमादित्य वर जवळ जवळ सव्वाशे अधिकारी आणि पंधराशे नौसैनिक कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यास सदैव सज्ज असतात. धर्मेंद्र सिंग साहेबांनी एका नौसैनिकाला अत्यावश्यक असलेली सर्व कौशल्ये अल्पावधीत शिकून घेतली. आण्विक, जैविक आणि रासायनिक युद्धासाठी आवश्यक कौशल्ये शिकण्यात तर त्यांनी उच्च दर्जा प्राप्त केला होता. अग्निप्रतिबंध या विषयात तर त्यांना खूप गती होती.

आय. एन. एस. अर्थात इंडियन नेवल शिप ‘विक्रमादित्य एप्रिल २०१९ मध्ये मित्रराष्ट्रांच्या सोबत मोठ्या युद्धसरावात सहभागी होणार होतं. यासाठी खूप मोठी तयारीही केली जात होती.

महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या करुणा यांचं स्थळ धर्मेंद्र सिंग साहेबांना सांगून आलं होतं. वयाची तिशी आली होती आणि विवाह योग जुळून आला होता. नौसैनिकांना खूप मोठ्या कालावधीसाठी जहाजांवर वास्तव्य करावं लागतं. युद्धनौका म्हणजे एक तरंगतं शहरच जणू. इथं राहण्यासाठी खूप मजबूत मन:शक्ती आणि संयम आवश्यक असतो.

आपलं आवडतं जहाज सरावात सहभागी असणार आणि आपण त्यावर नसू याविचाराने धर्मेंद्र सिंग साहेबांनी आपल्या विवाहानंतर काही तासांतच समुद्राची वाट धरली. विवाहात अग्निला साक्षीला ठेवून त्यांनी सात प्रदक्षिणा घालतानाही त्यांच्या मनात आपलं कर्तव्य असावं. आणि योगायोगानं विक्रमादित्यवरही त्यांना अशीच एक जीवघेणी अग्नि-प्रदक्षिणा घालावी लागेल, असं कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं.

विक्रमादित्य कर्नाटकातील कारवार बंदरात प्रवेश करण्याच्या अगदी बेतात असताना नौकेच्या इंजिनरूम मध्ये आग भडकल्याचं समजलं. नौकेवरची अग्निशमन यंत्रणा सज्ज होतीच आणि नौसैनिक सुद्धा. लेफ्टनंट कमांडर पदावर पोहोचलेले धर्मेंद्रसिंग चौहान साहेब या अग्निशमन मोहिमेचे धडाडीने नेतृत्व करीत होते. या कामात त्यांना उत्तम गती होती. भारताची एवढी मोठी दौलत, सोळाशेच्या वर नौसैनिकांचे भवितव्य पाण्यात लागलेल्या त्या अग्नितांडवात रसातळाला जाण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती.

धर्मेंद्रसिंग साहेब मोठ्या त्वेषाने धुराने भरलेल्या कक्षामध्ये शिरले. त्यांचा आवेश पाहून इतर नौसैनिकांनाही स्फुरण चढले. आगीवर नियंत्रण मिळण्याची चिन्हे अगदी दृष्टीपथात होती. इतक्यात एक वाफेचा पाईप अचानक फुटला आणि त्यातील अतिशय उष्ण वाफ धर्मेंद्रसिंग साहेबांच्या अंगावर आली आणि ते होरपळून निघाले. नाका-तोंडात आधीच विषारी धूर गेला होताच. समोरचं काही दिसत नव्हतं. पण साहेब मागे हटले नाहीत….. शुद्ध हरपेपर्यंत ते आगीशी सामना करीत राहिले. युद्ध काही मैदानातच लढली जातात असं नव्हे. देशाची संपत्ती जतन करण्यासाठी केलेला संघर्षही युद्धापेक्षा कमी नसतो.

लेफ्टनंट कमांडर धर्मेंद्रसिंग चौहान साहेबांनी विक्रमादित्य आणि त्यावरील सोळाशे सैनिकांचं त्यादिवशी मृत्यूपासून संरक्षण केलं होतं स्वत: अग्निसाक्षी राहून. परिस्थिती नियंत्रणात येताच साहेबांना त्वरीत जवळच्या रुग्णालयात एअरलिफ्ट करून पोहोचवण्यात आलं…. पण अग्निनं डाव साधला होता! चाळीसेक दिवसांपूर्वी विवाहवेदीवर चढलेला तीस वर्षे वयाचा एक उमदा नौसेना अधिकारी आता मृत्यूच्या वेदीवर पहुडला होता. नववधूच्या हातांवरील मेहंदी अजून फिकी पडलेली नव्हती…. मात्र तिच्या सुखी संसाराची नौका मृत्यू नावाच्या खडकावर आदळून अगदी गर्तेत गेली होती… कायमची. आईच्या हृदयचा तर विचार करूनही थरकाप उडावा. मोठ्या सन्मानानं शहीद धर्मेंद्रसिंग साहेबांना रतलामवासियांना अंतिम निरोप दिला. पण भारतीय सैनिकांच्या कुटुंबियांच्या धीरोदात्तपणाची कमाल पहा… काहीच दिवसांत धर्मेंद्र्सिंग साहेबांच्या पत्नीने सैन्यात भरती होण्याची पात्रता पार केली. नौसेनेचा सफेद गणवेश अंगावर परिधान करून प्राणांची बाजी लावलेल्या आपल्या पतील पायदळाचा ऑलिव्ह ग्रीन गणवेश मिळवून श्रीमती करूणा सिंग एक अनोखी भेट देण्यास सज्ज झाल्या. यासाठी झालेल्या मुलाखतीत त्यांनी प्रथम क्रमांकाने बाजी मारली. आणि त्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाल्या! सलाम करूणा सिंग मॅडमच्या जिद्दीला. उण्यापु-या पंधरवड्याचा त्यांचा आणि धर्मेंद्रसिंग साहेबांचा सहवास…. पेशाने प्राध्यापिका असलेल्या एका नाजूक तरूणीस थेट सैनिकाचं काळीज देऊन गेला. शहीद सैनिक असेच आपल्या आठवणींतून, कर्तृत्वातून जगाच्या स्मरणपटावर आपली पावलं ठळक उमटवून जातात. यांच्या ऋणातून उतराई होणं कठीण पण त्यांचे स्मरण करणं सहजी शक्य. जयहिंद! जय हिंद की सेना.

शहीद लेफ़्टनंट कमांडर धर्मेंद्र्सिंग चौहान साहेबांना शतश: नमन.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय आठवा — अक्षरब्रह्मयोग — (श्लोक २१ ते २८) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय आठवा — अक्षरब्रह्मयोग — (श्लोक २१ ते २८) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहु: परमां गतिम् ।

यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ।।२१।।

*

अव्यक्त जे अक्षर तेचि परमगती

तयासी प्राप्त होता ना पुनर्जन्म गती ॥२१॥

*

पुरुष: स पर: पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया ।

यस्यान्त:स्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् ।।२२।।

*

सकल भूतांचे वास्तव्य परमात्म्याअंतरी

तयानेच लाभे समस्त विश्वासी पूर्णतापरी 

प्राप्ती तयाची पार्था असावी आंस तुवा अंतरी

समर्पित भक्तीने होतसे प्राप्ती अव्यक्ताची खरी ॥२२॥

*

यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिन: ।

प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ।।२३।।

*

ज्या काळामध्ये देह त्यागता पुनर्जन्म गती

देहत्यागाचा काळ ज्यात प्राप्तीस्तव परमगती

भरतश्रेष्ठा जाणुनि घ्यावे या कालखंडांना

कथितो तुजला आज मी तुला अगाध या ज्ञाना ॥२३॥

*

अग्निर्ज्योतिरह: शुक्ल: षण्मासा उत्तरायणम् ।

तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जना: ।।२४।।

*

ज्योतिर्मय अग्नी अह शुक्ल उत्तरायण अधिपती 

यांच्या मार्गे देहत्यागुनी ब्रह्मवेत्त्यां होते ब्रह्मप्राप्ती ॥२४॥

*

धूमो रात्रिस्तथा कृष्ण: षण्मासा दक्षिणायनम् ।

तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते ।।२५।।

*

धूम्र निशा कृष्णपक्ष दक्षिणायन देवता अधिपती 

यांच्या मार्गे देहत्यागता फला भोगुनी जन्माला  येती ॥२५॥

*

शुक्लकृष्णे गती ह्येते जगत: शाश्वते मते ।

एकया यात्यनावृत्तिमन्ययावर्तते पुन: ।।२६।।

*

शुक्ल पक्षे मार्गस्थ होता प्राप्ती परम गती 

कृष्ण पक्षे देह त्यागिता  पुनर्जन्माची गती ॥२६॥

*

नैते सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन ।

तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ।।२७।।

*

उभय मार्गांचे तत्व जाणुनी योग्या प्राप्त मोहमुक्ती

योगयुक्त होई अर्जुना निरंतर साधक मम प्राप्ती ॥२७॥

*

वेदेषु यज्ञेषु तप:सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् ।

अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ।।२८।।

*

जाणुनिया हे तत्वगुह्य योगी कर्मफला उल्लंघितो

निःसंशय तो परम पदासी सनातन प्राप्त करितो ॥२८॥

*

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोग नाम अष्टमोऽध्याय: ।।८।।

*

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी अक्षरब्रह्मयोग नामे निशिकान्त भावानुवादित अष्टमोध्याय संपूर्ण ॥८॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print