सौ राधिका -माजगावकर- पंडित
इंद्रधनुष्य
☆ ‘पडद्यामागच्या महिला…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
महिला दिनानिमित्त पदवी भूषण महिलांचा सत्कार होतो.आणि त्या उजेडात येतात. पण समाजातला हा कष्टाळू महिला वर्ग अंधारातच राहतो.त्यांच्या मनात प्रसिद्धीची हाव नसते. असतें ती निर्मळ, निरामय,कर्तव्य भावना आणि निरपेक्ष प्रेम. आपलं लक्ष त्यांच्याकडे गेलं की त्यांचा आत्मविश्वास दुणावतो आणि,..आणि त्यांची उमेद वाढते.अश्याच एका लक्ष्मीला आपण भेटूया का ?…
नऊ हा आकडा जणू काही तिच्या आयुष्याला चिकटला होता.घरांत जावा,सासू , मुले, पुतणें अशी खाणारी नऊ माणसे होती, नवऱ्याच्या पगार फक्त 9000.मुलं नववीपर्यंत शिकलेली.आणि त्यात आता नवरात्राचे नऊ दिवस उपास करून थकलेली ती. मंदिराच्या पायरीवर बसलेली मला दिसली. मी म्हणाले, ” लक्ष्मी इतके उपास का करतेस ? अगं कित्ती गळून गेली आहेस तू,!सकाळपासून काहीच खाल्लं नाहीस का ? घाम पुसत ती म्हणाली, “किती काळजी करतासा ताईसाहेब ! आता घरी गेल्यावर भगर खाईनच की,” “अगं पण घरी जाणार कधी ? त्याच्यापुढे करणार कधी?आणि खाणार कधी? ते काही नाही ऐक माझं, हे राजगिऱ्याच्या लाह्यांचे पुडे घेऊन जा,दुधात भिजवून साखर घालून खा.आणि हॊ इतके उपास करतेस,अनवाणी फिरतेस,तूप लावत जा पायाला.”
लाह्याचा पुडा घेतांना तिचे डोळे भरून आले.”ताई या मायेचे ऋण कवा आणि कसे फेडू मी? “असं म्हणून ती पाठमोरी झाली. तापलेल्या डांबरी रस्त्यावर तिच्या अनवाणी पायातली जोडवी खणखण वाजत होती.तिसऱ्या दिवशी टवटवीत चेहऱ्यांनी सुस्नात, हिरव्यागार लुगड्यातली ठसठशीत, हळदी कुंकू लावलेली ती माझ्यासमोर आली, तेव्हां मी बघतच राहयले. उपासाचे,भक्ती,श्रद्धा भावनेचं आणि सात्विकतेचं तेज तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं. माझ्या विस्फारलेल्या नजरेला हंसून दाद देत ती म्हणाली,” वहिनी बाय हा डबा घ्या. अंबाबाईचा प्रसाद. पहाटला देवपूजा करून तुम्ही दिलेल्या राजगिऱ्याच्या वड्या करून निविद दाखवला. हा घ्या प्रसाद . टाका तोंडात.हाँ अक्षी !आता कसं! असं म्हणत ती दिलखुलास हसली. छान कुरकुरीत खुसखुशीत वडी जिभेवर विरघळली. मी आश्चर्याने विचारलं, “लक्ष्मी अगं उपासाच्या लाह्या मी तुला खायला दिल्या होत्या. दिवसभर उपाशी होतीस ना तू?” ऐका नं ताई तुमची मायेची कळकळ कळली मला , तुमच्या शब्दाचा मान राखून मुठभर लाह्या दुधात भिजवल्या. फुलावानी फुलंल्या बघा त्या. खाऊन पोट तवाच गच्च भरलं.त्यातनं थोड्या राखून या चार वड्या केल्या. ईचार केला अंबाबाईला निविद बी व्हईल आणि ताईंना प्रसाद बी देणं व्हईल.” मी अवाक झाले. एका हाताने घेतलं तर दुसऱ्या हाताने परतफेड करणारी कुठल्या मातीची बनली आहेत ही माणसं .
मनात आलं आज सगळीकडे भ्रष्टाचार झालाय. माझं ते माझं आणि तुझं तेही माझंच. अशा प्रवृत्तीच्या सुशिक्षित समाजात राहूनही,वयाने मोठं होतांना कुठल्या विद्यालयातून डिग्री घेऊन बाहेर पडल्या आहेत ह्या महिला ? खरंच देव चरां चरांत आहे .पक्षी कसे उडतात ? मातीत बीज कसं अंकुरतं ? बाळ पावलं टाकून पुढे पुढे धावायला कसं बघतं ? ही दैवी शक्तीच म्हणायची, आणि अशी निर्मळ माणसं देवच घडवतो. ही माणसं सकारात्मक विचारांची कासं धरून, अनुभवाच्या शाळेत शिकून, एकमेकांवर प्रेम करायला शिकत असावीत. असंच असावं हे गणित. शेवटी हेच खरं की ह्या साध्या माणसांकडूनही खूप गोष्टी घेण्यासारख्या असतात. हो ना? धनाचा नाही पण सुविचारांचा सांठा असलेल्या लक्ष्मीला मी मानलं. आजूबाजूला नजर टाकली की कळतं,घासातला घास काढून देणाऱ्या झळाळत्या लक्ष्मी नक्कीच जगात असतील. ही,साधीमाणसं रोज काहीतरी चांगले धडे कुठल्याही विद्यापीठात न जाता शिकत असतात. आणि,मग,सरावाने त्यांचे विचारही चांगले होऊन प्रेमाचं ‘वाण ‘ वाटता वाटता ही माणसं आयुष्याच् गणित सोप्प करून जीवनाचा आनंद गरिबीतही लुटतात. खरंच अशा साध्या सरळ व्यक्तींना मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात. मी म्हणाले, “अगं काय हे ! स्वतः पोटभर न खाता दुसऱ्यासाठी राखून ठेवणाऱ्या तुझ्या स्वभावाला काय म्हणावं,गं,बाई! भाबडे पणाने ती म्हणाली,” ताईबाई मायेची ओंजळ तुम्ही माझ्या पदरात टाकता.मन भरून जातं माझं.घरातले समदे, अगदी मुलं सुद्धा मला धूत्कारत्यात, म्हणत्यात ” तू अडाणी आहेस.डोकंच नाही तुला. साधा हिशोबही येत नाही.” ती रडवेली झाली होती. मी म्हणाले” कोण म्हणतं तू अडाणी आहेस? नाही लक्ष्मी तुझे विचार तुझं वागणं,माणसं जोडणं डिग्री वाल्यांना पण जमणार नाही. स्वभावाने लोकसंग्रह वाढवून जीवनाचं गणित सोप्प करण्याची कला आहे तुझ्या अंगात. स्वतःला अशी कमी लेखू नकोस.आणि जमेल तसं लिहायला शिक. माझी मुलं शिकवतील तुला.कष्टाबरोबर चांगल्या मनाची चांगल्या स्वभावाची आणि प्रत्येकाला मदत करून आपलसं करण्याची कला तुझ्या अंगात असल्याने तुझी एक वेगळी ओळख निर्माण कर..
आणि अहो काय सांगू तुम्हाला! अगदी निरक्षर लक्ष्मी जिद्दीला पेटली आणि साक्षर झाली. हा योगायोगच म्हणायचा. माझी एक मैत्रिण बालवाडी,अंगणवाडी चालवते,.तिला मदतीची जरूर होती. मी लक्ष्मीला आमची सगळी काम सोडून,त्या मैत्रिणीकडे पाठवलं.एका नव्या दालनात, अंगणवाडीच्या प्रांगणात,तिचा प्रवेश झाला.आणि ह्या सुरवंटाचं फुलपांखरू झालं.छोट्या मुलांचे क ख ग घ चे बोबडे बोल ऐकताना लक्ष्मीनेही अ, आ ई चा धडा गिरवला. कष्टाळू मनमिळाऊ आणि मदतीला पुढे होणाऱ्या लक्ष्मीचा लोकसंग्रह वाढला आहे. आणि आता,'”बावळट काहीच येत नाही तुला!”असं म्हणून हिणवणाऱ्या नातलगांकडे आत्मविश्वासाने तिची पावले पडतात. कारण तिने ‘ तिच्यातली ती’ ‘सिद्ध करून दाखवली आहे.ती आता अंगणवाडी शिक्षिका झाली आहे. साध्या विषयातून तिने मोठा आशय मिळवला आहे. मित्र-मैत्रिणींनो कथा साधी आहे पण, कसलेल्या जमिनीत रुजलेल्या बिजाची, रूपांतरित झालेल्या कल्पवृक्षाची आहे. पडद्यामागून पुढे आलेल्या लक्ष्मीची आहे. आज लक्ष्मीने भरपूर शुभेच्छा, मानपत्र, समाजसेविकेचे, प्रशस्ती पत्रक मिळवली आहेत . इतकं करूनही ती थांबली नाही, तर आपल्या वस्तितल्या कितीतरी महिलांना तिने रमाबाई रानडे प्रौढ शिक्षण वर्गात दाखल करून साक्षर केल.अशा ह्या स्वयंसिद्धेने आपल्याबरोबर मैत्रिणींनाही यशाचं दालन खुलं करून दिल आहे….धन्यवाद लक्ष्मी…
© सौ राधिका -माजगावकर- पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈