मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ महर्षि कृतु… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ महर्षि कृतु… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

ब्रह्मदेवाने स्वतः आणखी प्रजा विस्तार करण्यासाठी अनेक ऋषी उत्पन्न केले. त्यांना प्रजापती  ऋषी असे म्हणतात. त्यापैकीच एक कृतु हे प्रजापती ऋषी. ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते. ब्रह्मदेवाच्या हातातून त्यांचा जन्म झाला.

ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून त्यांनी दक्ष प्रजापती आणि क्रिया यांची कन्या सन्नती हिच्याशी विवाह केला. उभयतांना बालीखिल्य नावाचे साठ हजार पुत्र झाले. त्या पुत्रांचा आकार अंगठ्याएवढा होता. ते सगळे सूर्याचे उपासक होते. ते सदैव सूर्याच्या रथाच्या समोर आपले मुख करून चालत रहात. सूर्याची स्तुती करत. ते सारे ब्रम्हर्षी होते. त्यांची तपस्या आणि शक्ती सूर्य देवाला मिळत असे.

एकदा महर्षी कश्यप ऋषींनी यज्ञ करण्याचे ठरवले. त्यांनी महर्षी कृतुंना सांगितले ,या यज्ञात आपण ब्रम्हाचे स्थान ग्रहण करा. महर्षी कृतुंनी ते मान्य केले. आपल्या साठ हजार पुत्रांना घेऊन ते यज्ञ स्थळी आले. तेथे देवराज इंद्र आणि कृतूंचे पुत्र यांच्यामध्ये वाद सुरू झाला. महर्षी कृतु आणि महर्षी कश्यप दोघांनी मध्यस्थी केली. कृतुंच्या  पुत्रांनी पक्षी राज गरुडाला महर्षी कश्यपांना पुत्र रूपात देऊन टाकले.

महर्षी कृतुंना दोन बहिणी होत्या . त्यांची नावे पुण्य आणि सत्यवती अशी होती. महर्षी कृतु आणि सन्नती यांच्या एका मुलीचे नावही पुण्य होते.

सर्वप्रथम ब्रह्मदेवांनी एकच वेद निर्माण केला. त्यानंतर महर्षी कृतुंनी वेदांचे चार भागात विभाजन करण्यासाठी त्यांना मदत केली. पुढे वराहकल्प युगात महर्षी कृतुच वेदव्यास या नावाने जन्माला आले.

स्वयंभुव मनु आणि शतरूपा यांचा पुत्र उत्तानपाद. उत्तानपादाचा पुत्र ध्रुव. ध्रुववर महर्षी कृतुंचे खूप प्रेम होते. जेव्हा ध्रुव अपमानित होऊन अढळस्थान मिळवण्यासाठी बाहेर पडला, तेव्हा तो प्रथम महर्षी कृतु यांच्याकडेच आला. कृतु ऋषींनी त्याला विष्णूची आराधना करण्यास सांगितले. देवर्षी नारदांनी पाठिंबा दिला. त्यामुळेच ध्रुवाला अढळस्थान मिळाले. ध्रुवावर खूप प्रेम असल्यामुळे महर्षी कृतु अखेर धृवाकडेच गेले. म्हणूनच आजही ध्रुवताऱ्याच्या जवळ कृतु ऋषींचा  तारा आहे.

पुराणात महर्षी कृतुंबद्दल अनेक कथा आहेत. महर्षी अगस्ती यांचा पुत्र ईधवाहा याला त्यांनी दत्तक घेतले होते. शिवाय महाराज भरतने देवांच्या चरित्राविषयी त्यांना अनेक प्रश्न विचारले होते. महर्षींनी त्यांच्या शंकांचे समाधान केले. अशा या थोर महर्षींना कोटी कोटी प्रणाम.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘वसई मधील साने गुरुजी… फादर फ्रान्सिस दिब्रिटो’ ☆ माहिती प्रस्तुती– सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

फादर फ्रान्सिस दिब्रिटो

(४ डिसेंबर, इ. स. १९४३) नंदाखाल, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र – (२५ जुलै २०२४ राहत्या घरी निधन)

वसई मधील साने गुरुजी… फादर फ्रान्सिस दिब्रिटो ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर  ☆

हे महाराष्ट्रातल्या वसई येथील कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू व मराठी लेखक होते. ख्रिस्ती व ज्यू धर्म हे त्यांचे प्रमुख अभ्यासविषय असून त्यांविषयी त्यांनी मराठीतून लेखन केले.

इ. स. २००७ या कालखंडात सुवार्ता या प्रामुख्याने मराठी कॅथॉलिक समाजाशी संबंधित असलेल्या वार्तापत्राचे मुख्य संपादक होते. त्यांचे शिक्षण नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कुलात झाले. इ. स. १९७२ साली त्यांनी कॅथॉलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी. ए., तर धर्मशास्त्रात एम. ए. केले.

फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले, तरी त्यांची खरी ओळख ती नाही. दिब्रिटो हे पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरुद्ध आवाज उठविणारे कार्यकर्ते आणि सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व अशी आहे. ’सुवार्ता’ या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले आणि काही उपक्रमही राबवले. त्यामुळे हे मासिक केवळ ख्रिस्तीधर्मीयांसाठी न राहता मराठी साहित्यातही या मासिकाचा स्वतंत्र ठसा उमटला. ’हरित वसई संरक्षण समिती’ च्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली. वसईतील ’राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण’ यांच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेतला आणि मोठी मोहीम राबविली होती. संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची हे पुस्तक लिहिण्यासाठी दिब्रिटो यांनी बराच काळ इस्रायलमध्ये राहून संशोधन केले होते.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे प्रकाशित साहित्य 

  1. आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा
  2. ओअ‍ॅसिसच्या शोधात (प्रवासानुभव, मूळ – दैनिकातील सदर). इंग्रजी रूपांतर ‘इन सर्च ऑफ दि ओॲसिस’; अनुवादक – फ्रान्सिस दिब्रिटो+रेमंड मच्याडो)
  3. ख्रिस्ताची गोष्ट (चरित्र)
  4. ख्रिस्ती सण आणि उत्सव
  5. तेजाची पाऊले (ललित)
  6. नाही मी एकला (आत्मकथन)
  7. संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास
  8. सुबोध बायबल – नवा करार (’बायबल दि न्यू टेस्टॅमेंट’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद)(पृष्ठसंख्या – ११२५)
  9. सृजनाचा मळा
  10. सृजनाचा मोहोर
  11. परिवर्तनासाठी धर्म (वैचारिक)
  12. मुलांचे बायबल (चरित्र)

सन्मान

  • सुबोध बायबल- नवा करार’ या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा २०१३ सालचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार मिळाला आहे.
  • फ्रान्सिस दिब्रिटो हे पुणे येथे झालेल्या १५व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान (१४-७-२०१७)
  • उस्मानाबाद येथे जानेवारी २०२०मध्ये ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • जळगावला भरलेल्या अकराव्या राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

माहिती प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘तू छुपी है कहाँ, मैं तडपता यहाँ… – लेखिका : सुश्री कल्पना मुळगावकर सबनीस ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘तू छुपी है कहाँ, मैं तडपता यहाँ… – लेखिका : सुश्री कल्पना मुळगावकर सबनीस ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर  ☆

प्रख्यात चित्रकार रघुवीर मुळगावकर हे गिरगावात भाटवडेकर बिल्डिंग मध्ये राहावयास आले, तेथे त्यांनी स्टुडिओ उभारला त्याचे नाव होते.. ‘मुळगावकर आर्ट स्टुडिओ’ मासिके, कॅलेंडर, या वरील देवांची चित्रे यांची मागणी इतकी वाढली की कामे पुरी करायला दिवस अपुरे पडू लागले, मध्यरात्रीपर्यंत ते चित्रात मग्न असायचे.

हातातील कुंचला, व मंगेशाच्या आशीर्वादाने  त्यांनी शून्यातून विश्व उभे केले, लक्ष्मी प्रसन्न होत होती. घरात दोन गाड्या दोन नोकर आले. याच सुमारास त्यांनी सी शोअरवर वाळकेश्वरला कमल बिल्डिंग मध्ये सातव्या मजल्यावर ब्लॉक घेतला. वांद्र्याच्या गर्द झाडीत एक छोटासा  बंगलाही घेतला..

त्यानंतर आम्ही वाळकेश्वरच्या प्रशस्त, हवेशीर फ्लॅट मध्ये राहण्यास आलो. पप्पा सकाळी गिरगावात स्टुडिओ मध्ये कामास जायचे, व सायं सहा वाजेपर्यंत परत यायचे. पण ते नाराज दिसू लागले. ते आईला म्हणायचे, “आपण सारे गिरगावात परत जाऊ या “.

आता एव्हडा सारा हलवलेला संसार पुन्हा गिरगावात हलवण्यास आई तयार नव्हती. शेवटी त्यांनी आईला मनातील खरे खरे सांगितले.

“त्या स्टुडिओत मी एकटा काम करायला बसलो की, मला काही सुचत नाही. ना काही नव्या कल्पना सुचत,

ना काही स्फूर्ती येत. तू जवळपास असल्याशिवाय, तुझ्या बांगड्यांचा किणकिणाट ऐकल्या शिवाय, तुझ्या केसातल्या मोगऱ्याचा सुगंध दरवळत असल्याशिवाय माझा ब्रश मला साद देत नाही.. “

झालं …  आम्ही पुन्हा गिरगावात आलो.

यावरुन एक आठवण आली…..

एकदा निर्माते दिग्दर्शक व्ही शांताराम पप्पांच्या स्टुडिओत काही कामासाठी आले होते. एकापेक्षा एक सुंदर चित्रे पाहून त्यांनी विचारले,

” मुळगावकर, तुम्ही मॉडेल तर घेत नाही, मग इतके सुंदर चेहरे, हा कमनीय बांधा कोणावरून रेखाटता?”

” मी माझ्या बायकोवरुन ही चित्रे काढतो ” पप्पांचे उत्तर..

व्ही शांताराम याना ते पटल्यासारखे दिसले..

मग पुढे कधीतरी त्यांच्या एका चित्रपटाच्या प्रीमियर शो ची आम्हाला चार तिकिटे मिळाली. आम्ही चौघे चित्रपट पाहण्यासाठी गेलो. त्या वेळेस शांतरामानी माझे आईस पाहिले. माझी आई दिसायला छान होती. गोरीपान, नऊवारी साडी, केसांचा अंबाडा, त्यावर फुलांचा गजरा, ठेंगणीच …. पण ती काही मुळगावकरांच्या चित्राइतकी सुंदर नव्हती. मात्र पप्पानी सांगितलेले ऐकून चित्रपटाची कथा-कल्पना शांताराम बापूंच्या मनात रुजली असावी. तो चित्रपट म्हणजे ‘ नवरंग ‘.

या चित्रपटात एका प्रतिभावंत कवीला आपल्या  बायकोला पाहुन सुंदर सुंदर कल्पना सुचत असत. तो आपल्या सामान्य रुप रंग असलेल्या बायकोत मोह घालणारी ‘मोहिनी’ पाहतो. त्याच्या सुंदर सुंदर कविता त्याला राजकवी बनवतात, तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचतो. पण त्याचवेळी त्याच्या बायकोला त्याच्या सुंदर कविता वाचून, कोणातरी सुंदरीला पाहूनच या कविता लिहिल्या असव्यात असा संशय येऊन ती त्याला सोडून कायमची माहेरी जाते..

इथे तिच्या विरहाने या कवीचे कविता लिहिणे बंद होते. एकही ओळ त्याला सुचत नसते. राजदरबारात त्याला कविता पेश करण्याची फर्माईश होते. रिकाम्या हाताने रिकाम्या डोक्याने तो राजदरबारात मध्यावर उभा राहतो, वेड्यासारखा डोके हातात धरून. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वहात असतात. सारा दरबार स्तब्ध असतो. पूर्ण शांतता असते. त्या शांततेत त्याला त्याच्या बायकोच्या पैंजणाचा आवाज ऐकू येऊ लागतो. तिला दरबारात आणले गेलेले असते. त्या आवाजाने ती कुठेतरी जवळपास  आहे एव्हडे त्याला पुरते.

त्याला पुन्हा स्फूर्ती येते व तो एक सुंदर कविता दरबारात पेश करतो-

” तू  छुपी है कहां, मै तडपता यहां.. !”

भारावलेला तो बावरा कवी मूर्च्छित होण्याआधी जाहीरपणे सांगतो की ….

” जमुना तुही है, मेरी मोहिनी.. “

सांगायचे काय तर, त्यांच्या एका साध्या सुध्या बायकोत त्यांना त्यांच्याच चित्रातील सुंदर चेहऱ्याच्या, टपोऱ्या डोळ्यांच्या कमनीय बांध्याच्या, भुरळ घालणारे हास्य असणाऱ्या, ‘ मला बायको हवी तर अशी ‘ अशी तरुण पुरुषांच्या मनाला आस लावणारी स्त्री दिसत होती.

……. ती एका अभिजात कलावंताची अनुभूती होती..

लेखिका – सौ कल्पना मुळगावकर-सबनीस

(रघुवीर मुळगावकर यांच्या कन्या)

प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १२ — भक्तियोग — (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १२ — भक्तियोग — (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

अर्जुन उवाच 

एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते । 

ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ॥ १ ॥

कथित अर्जुन 

कोण भक्त श्रेष्ठ योगवेत्ता समजावा भगवाना

निरंतर सगुण भक्त वा करितो ब्रह्म उपासना ॥१॥

श्रीभगवानुवाच 

मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते । 

श्रद्धा परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥ २ ॥

कथित श्रीभगवान

मजठायी करुनी एकाग्र अपुल्या मनास ध्यानात

श्रेष्ठ योगी श्रद्धेने मज सगुणस्वरूपा भजतात ॥२॥

*

ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते । 

सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम्‌ ॥ ३ ॥ 

सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः । 

ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॥ ४ ॥

*

संयम ज्याचा गात्रांवरती ध्यान मनबुद्धीतीत 

निराकार अचल शाश्वत अविनाशी ब्रह्म्यात

कल्याणास्तव चराचराच्या सदैव जे तत्पर

समानभावी योगी विलीन होत माझ्यात अखेर ॥३,४॥ 

*

क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम्‌ ॥ 

अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥ ५ ॥

*

गुंतला देहाभिमानी त्या ब्रह्मप्राप्ती कष्टप्रद मार्गाची 

सच्चिदानंदघन निराकार ब्रह्मसाधना अधिक कष्टाची  ॥५॥

*

ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः । 

अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥ ६ ॥

*

मत्परायण भक्त कर्मे अर्पण करिती मजला

अनन्य भक्तियोग उपासना ही सगुणरूपाला ॥६॥

*

तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्‌ । 

भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम्‌ ॥ ७ ॥

*

माझ्याठायी गुंतविता पार्था अपुले चित्त

तयासी भवसागरातुनि करितो मी मुक्त  ॥७॥

*

मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय । 

निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः ॥ ८ ॥

*

एकाग्र करुनी मन माझ्यात करी मतीला स्थिर

ममांतरी संशयातीत स्थान असेल तव निरंतर ॥८॥

*

अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्‌ । 

अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय ॥ ९ ॥

*

नसेल निश्चल होत तव मन माझ्या ठायी स्थिर

योगाभ्यासे मम प्राप्तीची धनञ्जया इच्छा कर ॥९॥

*

अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव । 

मदर्थमपि कर्माणि कुर्वन्सिद्धिमवाप्स्यसि ॥ १० ॥

*

असशील जरी असमर्थ तू योगाभ्यासाशी

माझ्यास्तव कर्मपरायण होई मम प्राप्तीशी ॥१०॥

 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ Lee Kuan Yew – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ Lee Kuan Yew – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे 

Lee Kuan Yew

१९६७ मध्ये जेव्हा Singapore हे Malaysia पासून वेगळे झाले तेव्हा Singapore एक जंगल होते. Mumbai पेक्षा हि लहान असलेल हे एक बेट. Natural resources नाही, कोळश्याच्या किंवा aluminium च्या खाणी नाही, उद्योग धंदे नाही, इतकेच काय तर प्यायचे पाणी पण नाही. प्यायचे पाणी त्यांना Malaysia कडून ५ रुपये लिटरने विकत घ्यावे लागे. उद्योगाच्या नावावर फक्त मासेमारी.

ज्या दिवशी Singapore हे Malaysia  पासून वेगळे करण्यात आले, त्या दिवशी एक माणूस ढसढसा रडला. आता आपल्या देशाचे काय होनार ह्या चिंतेत त्याने स्वतःला १२ दिवस एका खोलीत कोंडून घेतले आणि बाहेर पडला तो एक निर्धार घेवुन. त्याने सरकार स्थापन केले, मंत्रिमंडळात हुशार लोक नेमले आणि लोकांना सांगितलं कि तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभे राहा. 

अत्यंत खंबीर आणि दूरदृष्टी असलेल्या ह्या एका माणसाने पुढील काळात मग Singapore  चा असा काही कायापालट केला कि आज Singapore  हे Asia  मधील सर्वात समृद्ध राष्ट्र म्हणून मानल जात. त्या एका माणसाच्या Vision , Policies आणि Determination मुळेच. Singapore चं आज जन्मलेलं मूल सुद्धा करोडपती आहे. जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या कंपन्या रोज Singapore च्या दरवाज्यात उभ्या असतात, उद्योग सुरु करण्याचं application घेवुन. त्या एका माणसामुळे आज  सिंगापुर citizens ला एवढा मान आहे कि जगातल्या १७० देशात Singaporeans ना  VISA-Free एन्ट्री आहे ! त्या माणसाचे नाव आहे Lee Kuan Yew, Singapore चे पहिले पंतप्रधान.                   

वयाच्या ९१ व्या वर्षी आजाराने त्यांचे निधन काही वर्षांपूर्वीच झाले, त्यांच्या अंत्ययात्रेला 99% सिंगापूरवासी शामील होते, हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे..!!! केवळ एक माणूस एखाद्या संपूर्ण देशाचं भविष्य कसं बदलवू शकतो ह्याचं Lee Kuan Yew पेक्षा उत्तम उदाहरण कदाचितच असावे. 

बहुधा अशी लोकं प्रेरणा देण्यासाठीच जन्माला येतात…. त्यांचा एकच संदेश ……                     

“ धर्मवादी व जातीवादी राहण्यापेक्षा ध्येयवादी राहा. “

*

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सहस्रचंद्रदर्शन शांती — संकलन – श्री अशोककाका कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆  

? इंद्रधनुष्य ?

☆ सहस्रचंद्रदर्शन शांती — संकलन – श्री अशोककाका कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

 वयाच्या ५० व्या वर्षापासून प्राचीन काळी वेगवेगळ्या शांती सांगितल्या आहेत. त्या म्हणजे, ५० व्या वर्षी वैष्णव शांती, ५५ व्या वर्षी वारुणी शांती, ६० व्या वर्षी उग्ररथ शांती, ६५ व्या वर्षी मृत्युंजय महारथी शांती, ७० व्या वर्षी भौमरथी शांती, ७५ व्या वर्षी ऐन्द्री शांती, ८० व्या वर्षी सहस्त्र चंद्र दर्शन शांती, 85 व्या वर्षी रौद्री शांती, ९० व्या वर्षी कालस्वरूप शांती, ९५ व्या वर्षी त्र्यंबक मृत्युंजय शांती आणि १०० व्या वर्षी त्र्यंबक महामृत्युंजय शांती. 

सहस्त्र चंद्र दर्शन म्हणजे त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात १००० वेळा पूर्ण चंद्र पहिला आहे किंवा त्याच्या आयुष्यात १००० वेळा पौर्णिमा येऊन गेल्या. इतके सार्थ आयुष्य खूप कमी लोक जगतात म्हणूनच हे विशेष आहे. आपली मराठी कालगणना चान्द्रवर्षीय आहे म्हणून १००० चंद्र पाहण्याचा सोहळा केला जातो. हे मोजायची पण पद्धत आहे. ती अशी –

८० वर्षात १२ x ८० म्हणजे ९६०, त्यात २७ अधिक महिने येतात म्हणजे ९६० + २७ = ९८७. म्हणजे ८० वर्षात १००० चंद्र पहिले जात नाही म्हणून ८१ वर्ष पूर्ण झाल्यावर येणाऱ्या १००० व्या पौर्णिमेला हा दिवस साजरा करतात. ह्या मध्ये काही ज्योतिष्यांच्या मते ३२ अधिक मास येतात म्हणून ८१ व्या वर्षातील ८ व्या महिन्यात सहस्त्र चंद्र पूर्ण होतात. पुन्हा ह्यामध्ये खग्रास चंद्र ग्रहण पण जमेस धरावे लागते. यावर शौनक ऋषिच्या विवेचनाच्या आधारे “वयोवस्थाभीधशांतीसमुच्चय:” ह्या पुस्तकात धर्मशास्त्र कोविद श्री नारायण शास्त्री जोशी, यांनी दिले आहे. त्यांच्या मते दरवर्षी सुमारे १२ अशी ७९ वर्षात ९४८ चंद्र दर्शने आणि खग्रास चंद्रग्रहणा नंतर नव्याने होणारे चंद्रदर्शन व असे २४ चंद्रदर्शन एव्हडे मिळून ९४८ + २८ + २४ = १००० चंद्रदर्शन होतात. ८० व्या वर्षानंतर ८ व्या महिन्यात केलेला विधी हा सौर कालगणनेनुसार असतो. म्हणजे वैखानस गृह्य सूत्रानुसार रविवर्षेण असते. शांती साठी देवता आणि हवन सामग्री पण ठरलेली आहे. सहस्त्र चंद्र दर्शनाला देवता आहे चंद्र आणि हवन सामग्री आहे आज्य. ह्या शान्तींच्या वेळी देवतेला हवन अर्पून त्या व्यक्तीच्या आयुरारोग्यासाठी प्रार्थना केली जाते. त्यायोगे त्या व्यक्तीचे पुढील आयुष्य सुखात जाते.

सामन्यात: एकसष्ठी, पंचाहत्तरी आणि ८१ वर्षानंतर अशा शान्त्या केल्या जातात. आता सहस्त्रचंद्र दर्शनच का सूर्य दर्शन का नाही? तर “चंद्रमा मनसो जात:” म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे. मला वाटते साठी नंतरच वयस्क लोकांना आपण उपयोगाचे नाही, आपली सद्दी संपली, आपल्याला अडगळीत टाकतील, कोणी विचारणार नाही अशा अनेक शंका घेरून टाकतात. ऐंशी वर्षे म्हणजे फारच जास्त होतात, त्यांचीच मुले साठीला येतात. कधी-कधी जोडीदार पण साथ सोडून जातो. अशा वेळी घरातल्याच लोकांनी त्यांचे मन जाणून घेऊन ते अजून आम्हाला हवे आहेत असे एक सुंदरसा घरगुती का होईना कार्यक्रम करून त्यांना तसे वाटू दिले, त्यांना कपडे किंवा चष्मा, कवळी, चांगली पुस्तके, एखादा छोटासा टीव्ही अशी भेट देऊन, सहस्त्र दिव्यांनी ओवाळले तर त्यांना किती बरे वाटते. आपण अजून हवे आहोत ही भावनाच किती चांगली आहे. म्हणून सहस्त्रचंद्र दर्शन विधी असावा. आता होम करायचा कारण उत्सव मूर्ती ऐंशी वर्षे तंदुरुस्त का राहिली म्हणून कोणी नजर पण लावेल, सगळ्यांच्या नजरा चांगल्या असतात असे नाही. म्हणून होम करून सगळी अरिष्टे दूर करायची.

संकलन : श्री अशोककाका कुलकर्णी

प्रस्तुती – श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नाटकाची बीजे… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ नाटकाची बीजे… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

‘बाबा मला पण तुमच्याबरोबर यायचं’.. म्हणून तो मुलगा मागे लागला.त्याचे बाबा निघाले होते नाटकाच्या तालमीला.हौशीच कलाकार होते सगळे ते.कोणी नोकरी करणारे..कोणी दुकानदार.दिवसभर आपापले उद्योग करुन कधीमधी नाटकं करत‌.

तर सध्या ते अश्याच एका नाटकाची तालीम करत होते.कोणाच्या तरी घरी जमले होते.नाटकाचा जो दिग्दर्शक होता तो आपल्या या पाच सहा वर्षाच्या मुलाला पण घेऊन आला होता.. खुप मागे लागला म्हणून.

पेट्रोमॅक्सच्या.. कंदिलाच्या उजेडात तालीम सुरू झाली.कोणाच्या तरी हातात स्क्रिप्ट होतं..त्यांच्या सुचनेनुसार सगळं सुरू होतं.त्या लहान मुलाला हे सगळं नवीनच होतं.जमलेल्या मंडळीत कोणी अप्पासाहेब होते..कोणी दादा होते.. त्या त्या भुमिकेनुसार ते बोलु लागले.एकजण गडी झाला  होता.खोट्या खोट्या दिवाणखान्यातल्या खोट्या खोट्या खुर्च्यांवर तो फडके मारु लागला.

आणि हे सगळं त्यांच्या नेहमीच्याच कपड्यात.. नेहमीच्याच वेशभूषेत..पण त्यांच्या वागण्यातून.. बोलण्यातुन नवीन जग निर्माण होत होतं.कोणीतरी एकजण स्त्री भुमिका पण करत होता.तो स्त्री सारखं बोलु लागला..चालु लागला.

हे सगळं तो लहानगा बघत होता.त्याच्या वयाच्या द्रुष्टीने ही नाटकाची दुनिया वेगळीच  होती.तो या नाटकाच्या जगात पार हरवुन गेला.. अणि पहाता पहाता झोपी गेला.

काही दिवसांच्या तालमीनंतर आता प्रत्यक्ष प्रयोग.नेपथ्य..प्रॉपर्टी..वेशभुषा..रंगभुषा..मंडळी जरी हौशी होती..तरी जमेल तसं त्यांनी सगळं उभं केलं होतं.तालमीत पाहीलेलंच तो आता पुन्हा नव्याने पहात होता.तेच नट..तेच संवाद..पण आता त्यांनी मेकअप केलेला.. कोणी दाढी.. कोणी मिशी चिकटलेली.स्त्री पार्ट करणारा नट.. त्याच्या चेहऱ्यावरील भडक रंगरंगोटी..नेसलेली साडी.. आणि कंबर लचकत  चालणं..

एखादी जादू घडावी तसं सगळं बदललं होतं.सगळं तेच..पण सगळं नवीन.दु:खाच्या प्रसंगात प्रेक्षक दु:खी होत‌‌.. विनोदी प्रसंगात प्रेक्षकात हास्याचे फवारे उडत होते. प्रयोग रंगत गेला.

इतक्या दिवसांची मेहनत घेऊन केलेला प्रयोग संपतो.घरच्यांच बोट धरुन तो मुलगा रंगमंचामागे जातो.आता तर आणखीनच वेगळं जग.तो मघाचा मिशी लावलेला नट बिडी पेटवतो आहे.. स्त्री पार्ट करणारा नट एका कोपऱ्यात  जाऊन तंबाखू मळतो आहे.कोणी कपडे बदलतं आहे.

तालमीतलं जग.. प्रत्यक्ष रंगमंचावरचा प्रयोग.. आणि आता हे प्रयोगानंतरचं रंगमंचा मागचं जग..

‘नाटक’ या नावाच्या जादूचा.. आणि त्या मुलाचा तो पहिला संबंध.कुठेतरी नाटकाचं बीज मनात रोवली गेलं ते तिथुनच. नंतर थोडं मोठं झाल्यावर त्यानं शाळेत नाटकं पाहिली..वाचली..कांहीं केली..

आणि तेथुन त्याच्या नाटकाच्या कारकिर्दीस सुरुवात झाली.पुढे त्या मुलाला एक जगप्रसिद्ध नाटककार म्हणून जग ओळखू लागले.

तो मुलगा म्हणजेच.. विजय तेंडुलकर.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सोन्याचा मुकुट आणि चांदीचे पाय… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ सोन्याचा मुकुट आणि चांदीचे पाय… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

एका मोठ्या शहरात भगवान श्रीविष्‍णुचे मोठे मंदिर होते. रोज अनेक भक्त त्‍या मंदिरात दर्शनासाठी येत असत. हळूहळू मंदिराची ख्‍याती वाढू लागली, भक्तांची गर्दी होऊ लागली, मंदिराचा विस्‍तार होऊ लागला मग काही लोकांनी ठरविले, भगवान विष्‍णुला एक सोन्‍याचा मुकुट करावा. त्‍यासाठी निधी गोळा करण्‍याचे ठरविले. गावाच्‍या बाजूलाच एक अनाथ, अपंग मुलांचा आश्रम होता. त्‍या आश्रमालाही गावातील काही लोक दानधर्म करत. 

गावात भिकुशेठ नावाचे एक श्रीमंत सावकार राहात होते. भिकुशेट आपल्‍या पैशातून, नफ्यातून काही वाटा हा दानधर्मासाठी वापरत असत. भक्तमंडळींना वाटले की भिकुशेटसारखा दिलदार मनाचा माणूस आपल्‍याला मदत करेल. सगळे मिळून भिकुशेटकडे गेले. भक्तमंडळीना आपल्‍या पेढीवर आलेले पाहून भिकुशेटला मोठा आनंद झाला. त्‍यांनी भक्तांचा मोठा आदरसत्‍कार केला. लोकांनी भगवान श्रीविष्‍णुसाठी सोन्‍याचा मुकुट करण्‍याचे सांगितले व भिकुशेटकडून मदतीची मागणी केली. 

यावर भिकुशेट म्‍हणाले,”मंडळी मी तुमच्‍या कामात काही मदत करू शकत नाही कारण मी विष्‍णुला सोन्‍याचा मुकुट करण्‍यापेक्षा चांदीचे पाय करण्‍याचा विचार करत आहे.” लोक म्‍हणाले आम्‍हाला निश्चित काय ते खरे सांगा. भिकुशेट सर्वांना दोन दिवसांनी येण्‍यासाठी सांगितले. दोन दिवस निघुन गेले. लोक पुन्‍हा भिकुशेटच्‍या पेढीवर गेले असता भिकुशेटच्‍या शेजारी एक लहान मुलगा बसला होता.

भिकुशेटने त्‍या मुलाला उठायला सांगितले. त्‍या मुलाला दोन्‍ही पाय नव्‍हते. मग भिकुशेटच्‍या नोकराने एका पेटीतून दोन वस्‍तू काढल्‍या..  ते कृत्रिम पाय होते.  ते त्‍या नोकराने त्‍या अपंग मुलाला व्‍यवस्थितपणे बसविले. मुलगा हळूहळू चालू लागला.

भिकुशेट म्‍हणाले,” भक्तांनो, या मुलाचे नाव विष्‍णु, हा अपंग असून अनाथ आहे. याला पाय नव्‍हते म्‍हणून मी शहरातून हे पाय विकत आणले असून तो आता हिंडू फिरू शकतो. त्‍या विष्‍णुला सोन्‍याचा मुकुटाचा तसा फारसा उपयोग नव्‍हता पण या विष्‍णुला पायांची गरज होती. मी याला दिलेले कृत्रिम पाय याच्‍या दृष्‍टीने सोन्‍याचांदीपेक्षा जास्‍त महत्‍वाचे आहेत.”

तात्‍पर्य – मानवसेवा हीच खरी ईश्‍वरसेवा

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘डेल्टा-15‘ची कहाणी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

? इंद्रधनुष्य ?

डेल्टा-15‘ची कहाणी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले 

अमेरिकेत “9/11‘ला दहशतवादी हल्ला झाला, त्या वेळची एक हृदयस्पर्शी कथा आहे. 

दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन टॉवरवर आदळली आणि दोन्ही टॉवर जमीनदोस्त झाले, तर दुसऱ्या.मार्गावरून जाणारे आणखी एक विमान पाडण्यात आले. ही खबर मिळताच सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली. जगभरातून जी विमाने अमेरिकेकडे येत होती, त्या सगळ्यांनाच रेडिओ मेसेज केले गेले, की अमेरिकेला येण्याचे रद्द करा, जवळच्याच विमानतळावर विमाने लॅंड करा आणि पुढील आदेशाची वाट पाहा.

“डेल्टा-15‘ या विमानालाही असाच संदेश आला. हे विमान कॅनडाहून येत होते. विमानाचा मार्ग बदलण्याचे कारण काय हे कुणालाच समजले नाही. वैमानिकही याबाबतीत अनभिज्ञ होता. कॅनडातील एका गावातील विमानतळावर विमान उतरले, तेव्हा प्रवाशांना कळाले, की अमेरिकेकडे जाणारी आणखी 52 विमाने तेथेच उतरली आहेत.

या सगळ्या विमानांतील प्रवाशांची संख्या दहा हजारांवर होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या गावात हा विमानतळ होता, त्या गावची लोकसंख्याही दहा हजारांच्या आसपास होती. म्हणजे अक्षरशः गावाच्या लोकसंख्येएवढे पाहुणे तेथे आले होते.

वैमानिकाला पुढील आदेश मिळेपर्यंत तीन दिवस लागले. तोपर्यंत या पाहुण्यांना सांभाळण्याची जबाबदारी गावावर होती. गावातील प्रशासनाने व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली. सर्व शाळा बंद केल्या. जवळपासच्या घरांतून पलंग, खुर्च्या, जेवणाचे सामान प्रत्येक शाळेत पोचविले.

पाहुण्यांची उत्तम सोय करण्यात आली. या सर्व व्यवस्थेचे संयोजन रेड क्रॉस सोसायटी करीत होती.

“डेल्टा-15‘मध्ये एक गर्भवती तरुणीही होती. तिची विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले. तीन दिवस गावातील लोकांनी पाहुण्यांना गावभर फिरविले. बोटीमधून त्यांच्या सहली काढल्या. एकूण काय, गावाने पाहुण्यांना एकटे वाटू दिले नाही. आल्या प्रसंगाची झळ त्यांच्यापर्यंत पोचणार नाही, याची दक्षता घेतली. 

तीन दिवसांनंतर पुन्हा वैमानिकाला संदेश आला. त्याला अमेरिकेला परतायची परवानगी मिळाली होती. प्रवासी विमानात चढू लागले, तसे गावकऱ्यांना व प्रवाशांनाही रडू आवरेना. तीन दिवसांत त्यांच्यात एवढा स्नेह निर्माण झाला होता, की आता स्वगृही जायचे असूनही प्रवाशांचा पाय निघत नव्हता.

एवढ्या लोकांच्या आदरातिथ्याचा ताण पडला, तरी त्याचा त्रास गावकऱ्यांना वाटला नव्हता. गावकऱ्यांनी सर्व खर्च आपसांत वाटून घेतला. अशा कठीण प्रसंगात आपण कोणाच्या तरी उपयोगी पडलो अशी सर्वांची भावना होती.

विमानात गेल्यानंतर एका प्रवाशाने वैमानिकाला सांगितले, की “मी जे बोलणार आहे ते आपल्या नियमात बसत नाही. मला माझ्या सहप्रवाशांशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. विशेष बाब म्हणून मला बोलण्याची परवानगी द्यावी.‘

सहसा वैमानिक अशी परवानगी देत नाहीत. परंतु तो प्रसंगच इतका हळवा होता, की वैमानिकालाही प्रवाशांच्या मनःस्थितीची पूर्ण कल्पना आली होती. ती परिस्थितीच अशी होती, की वैमानिकाने त्या प्रवाशाला बोलायला मनाई केली नाही. 

प्रवासी म्हणाला, “या गावाने तीन दिवस आपली एवढी सेवा केली आणि आपल्याला एवढे सांभाळले, की मला वाटते आपण सर्वांनी त्यांचे कायम कृतज्ञ राहायला हवे. आपण सर्वांनी आपापल्या शक्तीनुसार काहीतरी पैशांची मदत माझ्याकडे द्यावी. मी एक निधी उभारणार आहे. त्यात हे पैसे टाकून या गावातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करावी, असे माझ्या मनात आहे. मी जो ट्रस्ट उघडणार आहे त्याचे नाव ‘डेल्टा-15‘ हेच ठेवणार आहे.”

बघता बघता एकेक प्रवासी पुढे आला. ज्याने त्याने यथाशक्ती जमेल तेवढी रक्कम त्या प्रवाशाकडे सुपूर्द केली. सर्व प्रवाशांकडून आलेली रक्कम मोजली असता, थोडे थोडके नव्हे, तर तब्बल चौदा हजार डॉलर जमले होते. ज्याने हा प्रस्ताव मांडला होता, तो स्वतः अतिश्रीमंत उद्योजक होता. त्याने आपल्या पदरचे तेवढेच पैसे त्या गंगाजळीत घातले. नंतर त्याने वैमानिकाच्या मदतीने ज्या डेल्टा कंपनीचे विमान होते, त्या कंपनीलाही भरघोस निधी देण्याची विनंती केली. विमान कंपनीचे विमानही वाचले होते आणि त्यातील प्रवासी सुखरूप होते. त्यांना काही इजा झाली असती, तर कंपनीला मोठी भरपाई द्यावी लागली असती. विमान अमेरिकेला सुखरूप परतल्यावर कंपनीनेही त्या दानशूराच्या रकमेत भरीव निधी घातला.

‘डेल्टा 15‘ हा ट्रस्ट सुरू झाला, तेव्हा त्यांच्याकडे चक्क दीड कोटी डॉलर गोळा झाले होते.

दरवर्षी ट्रस्टच्या वार्षिक अहवालात किती मुले ट्रस्टच्या पैशातून शिकली हे प्रसिद्ध होत गेले. ज्या लोकांनी ट्रस्टसाठी पैसे दिले होते, त्यांना कॅनडाच्या त्या गावात काढलेले तीन दिवस आठवले. ट्रस्टसाठी आपण दिलेल्या पैशांचे चीज झाले, असे त्यांना वाटले व ते समाधान पावले. कॅनडामधील ते छोटेसे गाव आनंदाने हरखून गेले. ट्रस्टच्या पैशांच्या मदतीने त्या गावातील अनेक मुले विविध क्षेत्रांतील नामवंत म्हणून प्रसिद्ध झाली. अशी ही ‘डेल्टा-15‘ची हृदयस्पर्शी कहाणी.

आपल्याकडे असा काही आणीबाणीचा प्रसंग आला, की आलेल्या पाहुण्यांना कसे लुटले जाते, त्यांचा गैरफायदा कसा घेतला जातो, त्यांच्यासाठी दिलेली मदत दुसरीकडे कशी वळवली जाते, याच्या कथा आपण वर्तमानपत्रातून वाचतो आणि मनोमन दुःखी होतो. मग तो दुष्काळ असो, प्रलय असो अथवा दुसरे कुठले अस्मानी संकट असो. आपली मनोवृत्ती मदत करण्यापेक्षा लुटण्याकडे आहे, असे वारंवार सिद्ध होते.

 ‘डेल्टा-15‘ची ही कहाणी कदाचित आपल्या देशातही असेच देशप्रेम जागृत करेल एवढीच अपेक्षा आहे

लेखक : अज्ञात 

संग्राहिका :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘मेड इन इंडिया’ लिहिण्यासाठी… – लेखक : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘मेड इन इंडिया’ लिहिण्यासाठी… – लेखक : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर  ☆

स्व.अर्देशिर गोदरेज

गोदरेज या भारतीय कंपनीने उत्पादनावर ‘मेड इन इंडिया’ लिहिण्यासाठी साठी  इंग्रजांशी पंगा घेतला.  गोदरेज कंपनी माहीत नाही अशी एकही व्यक्ती असणे शक्य नाही. भारतीय व्यापाराला उंचीवर नेऊन ठेवण्यात या कंपनीचा मोठा हात आहे. या कंपनीच्या संस्थापकांनी आपल्या प्रॉडक्टवर ‘मेड इन इंडिया’ लिहिण्यासाठी इंग्रजांशी पंगा घेतला. त्याची कहाणी :-

१८९४ मध्ये मुंबईच्या दोन तरुण वकिलांनी खळबळ माजवली होती. एकाने साउथ आफ्रिकेत तर एकाने ईस्ट आफ्रिकेत. दोघांचे विचारही एकच होते. वकिली पेशातं असलो तरी अजिबात खोटं बोलायचं नाही. त्यातील एक होते महात्मा गांधी व दुसरे होते अर्देशिर गोदरेज. ज्यांनी  गोदरेज समूह  बनवला. सत्यवचनी असणारे आर्देशीर आपल्या या स्वभावामुळे वकिली पासून लवकरच दूर झाले. व १८९४ मध्ये ते मुंबई येथे परत आले. एका फार्मासिटीकल कंपनीत केमिकल असिस्टंटची नोकरी सुरू केली. परंतु पारसी बाणा असल्यामुळे आपणही आपला स्वतःचा काही व्यवसाय करावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती. काम केमिस्ट चे असल्यामुळे त्यांना एक कल्पना सुचली. आपण शस्त्रक्रियेसाठी लागणारी कात्री आणि ब्लेड तयार करूया. ही उत्पादने फक्त ब्रिटिश कंपन्याच तयार करत होती. म्हणून त्यांचा हा विचार पक्का झाला. 

सुरुवातीच्या भांडवलासाठी त्यांनी पारसी समाजातील एक हितचिंतक श्री मेरवानी यांच्या कडून ३००० रुपये कर्ज घेतले. आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारी साधनं एका ब्रिटीश कंपनीसाठी तयार करायला सुरुवात केली. हे प्रॉडक्ट विकण्याची जबाबदारी त्या कंपनीची होती. गोदरेज यांचे म्हणणे असे होते की, ते त्यांच्या प्रोडक्टवर ‘मेड इन इंडिया’ असे  लिहितील. पण ब्रिटिश कंपनीचे म्हणणे होते की जर प्रोडक्टवर ‘मेड इन इंडिया’ असं लिहिलं तर उत्पादनाची विक्री होणार नाही. म्हणजे प्रॉडक्ट तर गोदरेज यांनी तयार करायचे पण विकणार मात्र ब्रिटिशांच्या नावाने. 

दोन्ही पक्ष आपापल्या बाजूला ठाम राहिल्याने त्याचा परिणाम असा झाला की गोदरेज यांना त्यांचा पहिला वहिला धंदा बंद करावा लागला. त्यांचं प्रोडक्ट चांगलं नव्हतं म्हणून नाही, तर माझ्या देशात तयार झालेल्या वस्तूला मी दुसर्‍या देशाचं नाव का देऊ? या तत्त्वाशी ठाम राहिल्यामुळे. 

पहिलि व्यवसाय बंद पडल्यानंतर आर्देशीर निराश झाले. त्यांनी आपली नोकरी चालूच ठेवली. पण डोक्यातून व्यवसाय जात नव्हता. एक दिवस वर्तमानपत्रातील एका बातमीने त्यावर त्यांची नजर गेली. मुंबईतील चोरीची घटना होती ती आणि त्या बरोबर मुंबई पोलीस आयुक्तांकडून एक निवेदन पण देण्यात आलं होतं की, “सर्व लोकांनी त्यांच्या घराच्या आणि कार्यालयाची सुरक्षा सुधारावी.” आर्देशीर च्या डोक्यात व्यवसायाचा किडा पुन्हा वळवळू लागला. कुलूप तयार करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. त्या वेळी भारतातील सर्व कुलपं हाताने तयार केली जात. ती सुरक्षित नव्हती. त्यांनी अशी कुलपं बनवायचं ठरवलं की, जे तोडणं कठीण असलं पाहिजे. कुलपं तयार करण्याच्या कल्पनेसह ते पुन्हा मेरवानजी कडे गेले. पहिले कर्ज न फेडल्याबद्दल त्यांनी त्यांची माफी मागितली आणि मग त्यांच्या समोर कुलपाची नवी योजना मांडली.

मेरवानी स्वत: एक व्यापारी होते. त्यांनी पण वर्तमान पत्रातील ती बातमी वाचली होती. थोड्या चर्चे नंतर मेरवानींनी त्यांना मदत करण्याचे कबूल केले. सक्सेस हाय वे पुस्तकात मेरवानी आणि त्यांच्यातील संवाद असा लिहिला आहे की, जेव्हा मेरवानींनी त्यांना विचारले, ‘‘मुला, तुमच्या जातीत किंवा घरात असं कोणी आहे का? की ज्यांनी कुलूप तयार केलं आहे?’’ त्यावर त्यांनी उत्तर दिलं, ‘‘मी पहिला आहे की नाही हे मला माहीत नाही, पण तुमच्या सारख्या महान माणसाच्या मदतीनं मी नक्कीच सर्वश्रेष्ठ बनून दाखवीन.’’

जिद्द आणि आत्मविश्‍वास याचं हे उत्तम उदाहरण आहे. तर अशा रितीने मेरवानी कडून आर्देशीर यांना परत कर्ज मिळाले. ७ मे १८५७ गोदरेज यांनी कामाला सुरुवात केली. बॉम्बे गॅस वर्क्सच्या बाजूला कुलपं बनवण्याचं काम सुरू केलं. गुजरात आणि मालबार हून १२ शिकलेले कारागीर आणले गेले. ‘अँकर’ या नावाने कुलपं बाजारात आली. या सगळ्यात महत्त्वाचं होतं ते एक वर्षाच्या गॅरेंटीचं पत्र ज्यामुळे त्याच्या विक्रीला मागणी आली. तेव्हा कोणत्याही कुलपाला गॅरेंटी नव्हती. गोदरेजचं कुलूप दुसर्‍या कोणत्याही चावीने उघडू शकत नव्हते.

अशा तर्‍हेने गोदरेजचं ताळं म्हणजेच कुलूप भारताच्या लोकांचं विश्‍वासाचं स्थान बनलं आणि आर्देशीर गोदरेज यांचा बिझनेस चांगला चालू लागला. आता त्यांना नवीनवीन उद्योगांची कल्पना सुचू लागली. मग गोदरेजचं कपाट बनवलं गेलं. कुलपं आणि कपाट हे गोदरेजचे ब्रँड झाले तरीही आर्देशीर गोदरेज यांना अजून काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती. १९०६ मध्ये ते टिळकांच्या संपर्कात आले आणि स्वदेशी सिद्धांत अवलंबण्याची शपथ घेतली. आत्ता पर्यंत त्यांचा धाकटा भाऊ फिरोजशाह हाही त्यांच्या व्यवसायात सामील झाला. दोन्ही भावांचा कुलूप आणि कपाट व्यवसाय वाढत होता. भारतीयांवर ब्रिटिशांचे राज्य होते. त्यामुळे भारतीयांवर विविध प्रकारचे कर लागू होते.

आर्देशीर गोदरेज त्यामुळे खूप विचलित होते. १९१० मध्ये त्यांच्या आयुष्यात आणखी एक वळण आले. ज्यांच्याकडून त्यांनी कर्ज घेऊन व्यापार सुरू केला होता, त्याला एक भगिनी होती, तिचे नाव बॉयस होते. सीएच्या सल्ल्यानुसार गोदरेजनी बॉयसला आपला पार्टनर बनवले. मग कंपनीचे नाव ठेवले गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. काही दिवसांनी बॉयसने कंपनी सोडली, परंतु आर्देशीरने आजही कंपनीचे नाव तेच ठेवले, ‘गोदरेज अँड बॉयस’.

नंतर आर्देशीर लोकांच्या थेट संपर्कात आले. मग त्यांनी आंघोळीच्या साबणाचे उत्पादन सुरू केले. तेव्हा भारतात असलेल्या साबणात पशूंची चरबी वापरली जात असे. त्यामुळे हिंदूंची मन दुखावली जात म्हणून साबण तयार करण्याची व्यावसायिक संधीचा विचार त्यांनी केला. १९१८ साली गोदरेज कंपनीने दोन साबण तयार केले. असे एकेक उत्पादन वाढू लागली आणि गोदरेजचा कारभार वाढू लागला. हळूहळू कुटुंबातील मेंबर या बिझनेस मध्ये सामील झाले. मग वॉशिंग मशीन, फ्रीज, हेअर डाय, फर्निचर अशी उत्पादनं वाढू लागली आणि गोदरेज कंपनी नावारूपास आली आणि ‘मेड इन इंडिया’ हे वाक्य लिहायला नकार देणार्‍या ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून गादरेज कंपनीने आपला व्यवसाय दिवसेंदिवस वाढवला. मनात तत्त्व होतं, एक सचोटी होती आणि देशाबद्दल प्रखर अभिमान होता. म्हणूनच हे सगळं शक्य झालं. व्यवसायात पाऊल ठेवलं आणि तो व्यवसाय नावारूपाला आणला, इतका की, आज इतकी वर्षं झाली तरी गोदरेजचं स्थान अढळ आहे. 

संकलन – मिलिंद पंडित

कल्याण

प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares