मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मिले सूर मेरा तुम्हारा…sss… अजरामर गाण्याची अद्भुत कहाणी” – लेखक :  डॉ. धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

? इंद्रधनुष्य 

भारतरत्न पं. भीमसेन जोशी

☆ “मिले सूर मेरा तुम्हारा…sss… अजरामर गाण्याची अद्भुत कहाणी” – लेखक :  डॉ. धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर ☆

मिले सूर मेरा तुम्हारा ssssss हे गाणे माहित नाही असा एकही भारतीय नसेल. इतकं हे गाणं सगळ्यांच्या हृदयात वसलेलं आहे. हे गाणे जितके श्रवणीय तितकीच त्याच्या निर्मितीची कहाणी देखील अद्भुत आहे.

झालं असं की, पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या मनात एक विचार आला की, तरुणांना विशेषतः लहान मुलांना प्रेरित करणारे आणि एकतेचा संदेश देणारे एखादं गाणे तयार करून ते दूरदर्शनवरून सर्वत्र पोचवावे. ज्यातून “मेरा भारत महान” हि संकल्पना तर सर्वत्र जाईलच शिवाय प्रत्येकाला यात आपला प्रांत सामावून घेईल. त्यांच्या इच्छेनुसार मग एक प्रस्ताव तयार करण्यात आला. आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्याकडे हे गाणे कंपोज करण्यासाठी आले.

*

संपूर्ण फिल्म इंडस्ट्री एकत्र :

या एकूणच गाण्याची व ते कसे कसे आणि कुठे कुठं शूट करायचे, यात कुणाकुणाला घ्यायचे इत्यादींची संकल्पना सुरेश मलिक आणि प्रसिद्ध ऍड फिल्ममेकर कैलाश सुरेंद्रनाथ यांची आहे. विशेषतः यातील सिनेकलाकार यांच्या तारखा मिळवताना त्रास होईल असा या जोडगोळीचा अंदाज होता मात्र एकूण एक कलाकारांनी अगदी हव्या त्या तारखा यांना दिल्या त्यामुळे जवळपास पूर्ण फिल्म इंडस्ट्री यात दिसते.

*

विश्वविक्रमी गाणे :

15 ऑगस्ट 1988 रोजी दूरदर्शनवरून हे गाणे प्रथमच रिलीज करण्यात आले. याचे संगीतकार पं. भीमसेन जोशी, भैरवी रागातील या गाण्याचे गीतकार होते प्रसिद्ध कवी पियुष पांडे. भारतातील प्रमुख अशा चौदा भाषेत प्रथमच असं हे गाणं तयार झालं असून तोही एक विश्वविक्रम आहे. हिंदी, काश्मीरी, पंजाबी, सिंधी, उर्दू, तामिळ, कन्नड, तेलगू, मल्याळम, बांगला, आसामी, उडिया, गुजराती आणि मराठी भाषेत दोन दोन ओळी रचल्या गेल्यात.

*

लतादीदीची एन्ट्री :

खरेतर सुरुवातीला यातील गायिकेच्या आवाजातील सर्व ओळी भारतरत्न लता मंगेशकर गाणार असं ठरलं होत. मात्र जेव्हा गाणे रेकॉर्डिंग करण्यासाठी स्टुडिओ बुक करण्यात आला, तेव्हा नेमक्या लतादीदी परदेशात होत्या. त्यामुळे मग कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात ते गाणे सुरुवातीला रेकॉर्ड करण्यात आले. मात्र गाणे रिलीज होण्याच्या दोन दिवस आधी लता दीदी भारतात परतल्या. त्यांना हे गाणे रेकॉर्ड झाल्याचे कळले. त्यांनी स्टुडिओत जाऊन ते गाणे ऐकले आणि म्हणाल्या, “पंडितजी…. मला हि संधी सोडायची नाहीय. काहीतरी जुळवून आणा. मी आजच रेकॉर्डिंगसाठी वेळ देते”

आता पंचाईत झाली. कारण त्यामुळे कविताजीचे नाव आणि गायन वगळून तिथं दीदीचे बसवायचे…. कविताजी नाराज झाल्या खऱ्या पण मन मोठं करून त्यांनी यासाठी आनंदाने होकार दिला याबद्दल दीदी इतक्या ज्येष्ठ असूनही त्यांनी कविताजी यांचे आभार मानले. आणि मग लता दीदी तिरंगी ध्वज रंगाचा पदर असलेली पांढरी साडी परिधान करून स्टुडिओत आल्या आणि त्यांच्या स्वरात हे गाणे रेकॉर्ड झाले. मात्र परस्पर सामंजस्याने नंतर असं ठरलं की कविताजी यांनीही मेहनत घेतलेली आहे तर किमान एक दोन ओळी त्यांच्या पण असूद्यात ! त्याप्रमाणे मग गाण्यात शबाना आझमीच्या तोंडी असलेल्या ओळी या कविता यांच्या आहेत तशाच ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते.

*

प्रसिद्ध धबधबा :

या गाण्यात सुरुवातीला पं. भीमसेनजी ज्या धबधब्याजवळ उभे राहून गाणे गाताना दिसतात तो कोडईकनाल पम्बर फॉल्स आहे ! हाच तो धबधबा आहे जिथं लिरिल साबणाची त्या काळात सुपर हिट झालेली जाहिरात शूट करण्यात आली होती. त्यामुळे त्याला नंतर “लिरिल फॉल्स” असेच नाव पडले !

*

ताजमहाल शूटिंग किस्सा :

या गाण्यातील एका कडव्यात ताजमहाल दिसतोय जो एरियल व्ह्यू स्टाईलने शूट करण्यात आला आहे. खरेतर वर्ल्ड हेरिटेज जाहीर झालेल्या वास्तूच्या भोवती असं एरियल शूट करण्याची परवानगी नसते. मात्र कैलाशजी याना तसेच शूट हवे होते मग प्रॉडक्शन टीमसह भीमेसनजी यांनी थेट एयर मार्शल यांची भेट घेऊन इच्छा सांगितली. शिवाय हा प्रोजेक्ट खुद्द पंतप्रधान यांच्या मनातला आहे हेही सांगितलं आणि त्यानंतर परमिशन मिळाली. इतकंच नव्हे तर भारतीय सेनेच्या हेलिकॉप्टरमधून ते एरियल व्ह्यू शूट घेण्यात आलं.

*

गाण्यातील एका कडव्यात पाण्यात हत्ती खेळताना दिसतात, ते शूटिंग केरळ येथील पेरियार नॅशनल पार्कमधील असून हत्तीही तिथलेच आहेत. यासाठीही वन विभागाने तातडीने हालचाल करून सर्व त्या परवानग्या दिल्या. नाहीतर अशा रिजर्व पार्क मध्ये शूटिंगला परवानगी नसते.

*

दोन महत्वाच्या रेल्वे :

या गाण्यात दोन ठिकाणी दोन वेगवेगळ्या रेल्वे दिसतात. त्या दोन्ही पूर्ण देशभरात प्रसिद्ध अशा रेल्वे आहेत. पहिली आहे ती कलकत्याची मेट्रो रेल्वे आणि दुसरी आहे आपल्या महाराष्ट्राची शान असलेली डेक्कन क्वीन ! तनुजा जेव्हा मराठी ओळी गाताना दिसतात त्यावेळी हि रेल्वे येते !

आहे न अभिमानाची गोष्ट !

*

कोरस मंडळींचा मोठेपणा :

या गाण्यात सर्वात शेवटी भारताच्या नकाशाच्या आकारात अनेक माणसे उभी असलेली दिसतात न ते सगळं शूटिंग मुंबईच्या फिल्मसिटीत करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा कोरस शॉटसाठी माणसे पुरवणारी एजंसी असते त्यांनी नेहमीप्रमाणे पैसे ठरवून माणसे बोलावली. शूटिंग झालं आणि शूट झाल्यावर लोकांना कळलं की ते किती मोठ्या प्रोजेक्ट मध्ये सहभागी आहेत आणि देशासाठीचे हे गीत आहे म्हटल्यावर त्यातल्या एकानेही एक रुपयाही मानधन घेतलं नाही. तसेच यातील एका ओळीत शाळेतील लहान मुले तिरंगी गणवेशात एकत्र धावत येतात त्याचे शूटिंग उटी येथील बोर्डिंग स्कुल मध्ये झाले आहे.

*

स्वतःचे कपडे वापरणारे कलाकार :

गाण्यात एका सीनमध्ये अमिताभ, जितेंद्र आणि मिथुन चक्रवर्ती आहेत. या तिघांचे शूटिंग भल्या सकाळी एका बंगल्याच्या खाजगी बागेत करण्यात आले. आणि अवघ्या दहा मिनिटात तो सिन वन टेक शूट झाला. विशेष म्हणजे यात त्यांच्या अंगावर जे कपडे आहेत ते त्यांचे त्यांचे स्वतःचे आहेत. अन्यथा इतरवेळी शुटिंगवाल्याकडून कपडे पुरवले जातात. ज्याला बऱ्यापैकी खर्च येतो मात्र या तिघांनी त्याला नम्र नकार देऊन स्वतःचे कपडे आणले होते.

*

कमल हसन यांची ऐनवेळी एंट्री

दाक्षिणात्य प्रसिद्ध गायक एम. बालमुरलीकृष्ण यांचे या गाण्यातील दोन ओळीचे रेकॉर्डिंग होते. त्यावेळी स्टुडिओत अचानक कमल हसन आले. ते कसे काय आले इथं ? असं विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, “माझे गुरु आहेत बालमुरलीकृष्ण…. त्यामुळे त्यांचे गाणे रेकॉर्ड होताना पाहावे म्हणून आलोय”

यावर कैलाशजी म्हणाले की, ” संध्याकाळी या ओळीचे शूटिंग आहे समुद्र किनारी तर वेळ असेल तर या की तिथेही “

आणि कमल हसन तिथं नंतर पोचले आणि चक्क त्यांनाच शूटिंग मध्ये सहभागी करून घेण्यात आले आणि अशारितीने ऐनवेळी त्यांची एंट्री यात झाली.

*

जगाच्या पाठीवर प्रथमच असे काहीतरी :

एकतेचा संदेश देणाऱ्या या गाण्यात जवळपास सर्वच क्षेत्रातील दिग्गज मंडळी दिसतात. जगाच्या पाठीवर प्रथमच एका गाण्यासाठी हे घडलं आहे. फिल्म लाईन, क्रीडा, गायक, वादक, चित्रकार, कार्टूनिस्ट, फिल्म निर्माता, आर्किटेक्ट, टेलिव्हिजन होस्ट असं सगळं सुंदर मिश्रण यात जुळून आले आहे. एखादं गाणं इतकं अजरामर का होतं…. त्या मागे किती काय काय घडत असत अन किती जणांचे कष्ट असतात हे आपल्यापैकी अनेकांना माहित नसतं. ते माहित असावं म्हणून हा पोस्ट प्रपंच !

थोडक्यात सांगायचं तर… 

… असं गाणं पुन्हा होणे नाही !!!

*

लेखक :  डॉ. धनंजय देशपांडे 

प्रस्तुती : सुलभा तेरणीकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ योजकस्तत्र दुर्लभ:! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

योजकस्तत्र दुर्लभ:! ☆ श्री संभाजी बबन गायके 

कै. संतोष नरहर काळे

योजकस्तत्र दुर्लभ:! 

अयोग्य: पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभ:! 

अर्थात कोणतीही व्यक्ती (पूर्णांशाने) अयोग्य नसतेच. फक्त त्या व्यक्तीचा योग्य त्या कार्यात उपयोग करणारे दुर्लभ असतात. हे आठवायचं कारण म्हणजे अशा एका योजक व्यक्तीचं तसं अकाली निघून जाणं होय. कदाचित या योजकाची जगाच्या योजकाला आवश्यकता काहीशी तातडीने भासली असावी. अन्यथा धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सेवा कार्यात अग्रेसर राहून अगणित लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण करीत पूजनीय स्थान प्राप्त करण्याच्या मार्गावर खूप पुढे गेलेल्या माणसाचं, अर्थात संतोष नरहर काळे गुरुजी यांचे वयाच्या पासष्टीमध्ये निधन होणं मनाला पटणारं नाही. त्याचं जाणं अकाली म्हणता येत नसलं तरी अशा माणसाची समाजाला आणखी गरज होती, हे मात्र त्या दिवशी अंत्यसंस्काराला उपस्थित असलेला विविध क्षेत्रांमधील समुदाय पाहून दिसले. असो.

पुण्याच्या जवळच्या निगडीच्या काहीशा ओबडधोबड माळरानामध्ये प्राधिकरण नावाची एक सुनियोजित वस्ती उभारण्यात आली. नियोजनानुसार ही वस्ती चहूबाजूंनी फुलली सुद्धा. येथे समान शील… सख्यम न्यायाने एकसमान विचारधारेची माणसं एकत्रित येणंही साहजिकच आणि त्यांच्या नेतृत्वाची गरजही तितकीच नैसर्गिक.

नेमक्या याच पोकळीत बी. एस्सी. पदवी प्राप्त एक तरुण, अक्षरश: हरहुन्नरी कार्यकर्ता येऊन स्थिरावला आणि त्याने माणसं जमवायला सुरुवात केली. नोकरी हा त्याच्या पत्रिकेत अजिबात नसलेला ग्रह. त्यामुळे नोकरीच्या फंदात सहसा न पडता त्याने आपला बराचसा वेळ ज्योतिषाचा अभ्यास, गड-किल्ल्यांचा अभ्यास, पोवाडे गायन, इतिहास संशोधन आणि या क्षेत्रातील दिग्गज मंडळींच्या सहवासात आणि चौफेर भ्रमंती यात व्यतीत करायला आरंभ केला आणि हाच क्रम शेवटपर्यंत राहिला. नाही म्हणायला दहावीपर्यंतचे गणित-शास्राच्या शिकवण्या घेणे, किल्ल्यांची स्वत: काढलेली छायाचित्रे ग्रीटींग कार्ड स्वरुपात छापून त्यांची विक्री करणे, वैशिष्ट्यपूर्ण दैनंदिनी छापून घेणे, मसाला-लोणची घाऊक विक्री अशा अनेक उद्योगांतून त्याने पैसे वगळता अनेक गोष्टी कमावल्या! यातील अनेक उद्योग तर त्याने संपर्कातील तरुणांना चांगल्या अर्थाने ‘चांगलेच कामाला’ लावण्यासाठीच केले असावेत! 

पण यातील शिकवणी घेणे या एका गृहोद्योगातून त्याच्या प्रभावक्षेत्रात कित्येक युवक युवती आले. मग हीच लहान मोठी मुले-मुली त्याच्यासोबत किल्यावर बागडताना दिसू लागली. काहीजण त्याच्या सोबत पोवाड्यात साथ करायला जाऊ लागली. हे कार्य करता करता अनेक मुलांच्यात असलेला कार्यकर्ता तो विकसित करूही शकला.

छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळी मुक्कामी राहून तेथे त्यांचा पोवाडा सादर करण्याची कल्पनाही त्याचीच. त्या कार्यक्रमासाठी साठी दरवेळी नवनवीन मुलांना तेथे घेऊन जाणे याकडे त्याचा कटाक्ष असे.

आपल्या भाग्यात काय लिहिले आहे किंबहुना आपल्या भाग्यरेषा आपल्या जीवनाला कुठे घेऊन जाताहेत, हे समजून घेण्याची सामान्यजणांची ओढ आणि निकड त्याने खूप आधी ओळखली होती. पत्रिका दाखवायला आलेल्या माणसांच्या पत्रिकेत समाजसेवेचा अगदी सामान्यातला सामान्य ग्रह जरी याला दिसला… की त्या माणसाच्या सामाजिक पत्रिकेतील भाग्यस्थानी एखादा तरी चांगला कर्मग्रह अलगद येऊन बसायचा. व्यक्तीची एकूण सर्वसाधारण मनोवृत्ती लक्षात घेऊन, त्या व्यक्तीला बिलकुल घाबरवून न ठेवता त्याचे भविष्य तो अचूक वर्तवायाचा. त्यामुळे त्याच्या घरी विद्यार्थ्यांचा, पालकांचा, राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा सतत राबता असायचा. जोडीला अनेक व्याधींवरील देशी उपचार ज्ञात असलेल्या या माणसाकडे औषधीविषयक सल्लाही उत्तम मिळायचा! 

निगडी प्राधिकरणात महामार्ग ते रेल्वे रूळ असा श्री संत ज्ञानेश्वर महाराज चौक असा एक भाळा मोठा, रुंद रस्ता आहे. या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक आहेत. या दुभाजकाच्या मधल्या जागेत कचरा टाकावा असे कुणाला कधी सांगावे लागले नाही. ही समस्या लक्षात घेऊन आपल्या या लेख नायकाने या जागेत शोभेची झाडे, वनस्पती लावाव्यात अशी कल्पना मांडली. ज्यांनी या कल्पनेला अनुमोदन दिले ते लोक ही बाब काही गांभीर्याने घेत बसले नाहीत. पण या महाशयांनी मात्र संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करीत राहून ते काम सुरु होईल असे पाहिले. आणि आरंभी स्वत: त्या कामाचा ठेका घेतला… अर्थात केवळ ठेका. अर्थप्राप्ती आणि हा माणूस यांत आधीपासून होता तो दुभाजक कायमच राहिला. आज हा दोन तीन किलोमीटर्सचा रस्ता वाहतुकीतला एक प्रेक्षणीय भाग आहे.

हा माणूस बहुदा जन्मत:च ज्येष्ठ वगैरे असावा. कारण तो तरुण कधी दिसलाच नाही, पण कायम तरुणांमध्ये दिसला, लहान मुलांमध्ये दिसला. पोरांना किल्ले दाखवायचे आणि मग ते दिवाळीत करायला लावायचे त्याला जमायचे. लहान मुलांचा काका व्हायला तर त्याने अजिबात वेळ लावला नाही. इतरांसाठी दादा तर तो होताच पण त्याच्यापेक्षा वयाने बरीच लहान पोरं त्याला एकेरीत सुद्धा हाक मारू शकायची, यातच त्यांचं सामाजिक यश सामावलेलं होतं.

डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा. त्यातून दिसणारे चमकदार डोळे. आणि त्या डोळ्यांतून त्याचं ते माणसांकडे पाहणे… एकदम स्पष्ट असे. बोलता बोलता उजवा हात नाकावरून घासत थेट कपाळापर्यंत नेणे, ही लकब. आणि हसणं अगदी खळखळून. सर्व वयाच्या लोकांसाठी त्याच्याकडे स्वतंत्र किस्से आणि विनोद होते.

त्याचे बाबा सुद्धा अगदी लहान मुलांची इंग्लिशची शिकवणी घेत असत. त्यामुळे हे लहानगेच पुढे बढती मिळून याचे विद्यार्थी बनत.

ज्योतिषाचा पसारा वाढत गेल्यावर हे मग गुरुजी म्हणून जास्त ओळखले जाऊ लागले. पत्रिका दाखवायला येणारा माणूस सुरुवातीला क्लाएन्ट असायचा आणि थोड्याच वेळात त्याचे स्नेह्यात रुपांतर व्हायचे.

एक अफाट उपक्रम काळे गुरुजींनी हाती आणि डोक्यात घेतला होता. आणि तो म्हणजे वेदअध्ययन आणि अध्यापन. त्यासाठी या आधुनिक काळात किती साधना करावी लागत असेल याची कल्पना आपल्यासारख्या सामान्य लोकांना येणार नाही.

पुण्याजवळच्या ग्रामीण भागात त्यांनी एक रीतसर आश्रमसुद्धा उभारला होता. यासाठीची आर्थिक तरतूद ही केवळ त्यांचे समाजाशी असलेले आणि जोपासलेले वैय्यक्तिक संबंध आणि प्रामाणिक हेतू यांमुळेच होत असावी. अन्यथा अर्थप्राप्तीचा कुठलाही मोठा स्रोत नसताना अशी मोठी कामे उभी राहणे, केवळ अशक्य. आणि एवढं सगळं होत असताना संसारिक माणूस सुख-दुखा:चे, वैद्यकीय समस्यांचे प्रसंग जे अपरिहार्यपणे भोगतो… ते त्यांनाही चुकले नाहीत. पण एक मोठा माणूस होण्याच्या त्यांच्या अखंड प्रवासात हे भोग त्यांनी शांतपणे पचवले! त्यांच्या निधनाची वार्ता कानी येताच त्यांच्या घराकडे लागलेली रीघ पाहून सौर्हादाची श्रीमंती कमावलेला मनुष्य समाजाने गमावला आहे, ही जाणीव गडद होत होती!

पण गेली काही वर्षे ते त्यांच्या संपर्कात येणा-या प्रत्येकाला एक स्वप्नवत योजना सांगत असतच… भव्य चौसष्ठ योगिनी मंदिर! या मंदिराची सर्व योजना, आराखडा, रेखाटने त्यांच्या खिशात कायम असत. या कामासाठी त्यांनी अनेक माणसं योजून ठेवली होती. ही भव्य योजना ऐकून ही योजना यशस्वी होईल किंवा कशी होईल, अशी काळजी ऐकणा-याच्या चेहर-यावर दिसू लागली की काळे त्याच्याकडे पाहून फक्त गूढ हसत… जणू म्हणत…. बरंचसं काम झालंय रे… तू फक्त तुझा वाटा उचल! आणि खरोखरच मागील काही दिवसांत चौसष्ठ योगिनीच्या मूर्ती तयार झाल्याही होत्या. आता योजनेचा पुढील अध्याय सुरु व्हायचा होता… पण संतोष काळे गुरुजींच्या श्वासांचा अध्याय समाप्त झाला !

असे योजक दुर्लभ असतात हे खरे ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हे आपल्याला माहीत आहे का ? ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

हे आपल्याला माहीत आहे का ? ☆ सुश्री प्रभा हर्षे  ☆

हे आपल्याला माहीत आहे का ?

डेक्कन क्विन express कल्याणला का थांबत नाहीं?

कल्याण ! मध्य रेल्वेवरील एक अतिशय महत्वाचे जंक्शन ! मुंबईला उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारे एक महत्वाचे स्थानक ! कोणतीही लांब पल्ल्याची गाडी सामान्यपणे कल्याणला थांबतेच थांबते ! पण कल्याणला एक गाडी अजिबात थांबत नाही, ती म्हणजे ‘ दक्षिणेची राणी ‘ ‘ डेक्कन क्वीन ‘ ! मुंबईहून पुण्याला धावणारी ही गाडी कल्याणला थांबत नाही ह्याचे नवल वाटतेय ना ! बरोबर !!

त्याचे कारण असे आहे की कल्याण नगरपालिकेच्या हद्दीतून रेल्वे धावत होती ह्याबद्दल रेल्वे काही कर कल्याण नगरपालिकेला देऊ लागत असे. पण पुढे काही वर्षे रेल्वेने तो कर नगरपालिकेला दिला नाही. त्यामुळे संतापलेल्या कल्याण नगरपालिकेने रेल्वेला कोर्टात खेचले. कोर्टाने कल्याण नगरपालिकेच्या बाजूने निकाल दिला आणि कल्याण नगरपालिकेने डेक्कन क्वीन ह्या गाडीचे इंजिन जप्त केले. रेल्वेचे अधिकारी दुसऱ्या दिवशी आले, त्यांनी तो कर भरला आणि मग कल्याण नगरपालिकेने ते जप्त करून एक रात्र स्वतःच्या ताब्यात ठेवलेले डेक्कन क्वीनचे इंजिन रेल्वेला परत केले.

आपला हा अपमान आणि नामुष्की रेल्वे विसरली नाही आणि तिने कल्याणला डेक्कन क्वीन ही गाडी कधीच न थांबवण्याचा निर्णय घेतला ! 

ह्या खटल्यात कल्याण नगरपालिकेची बाजू समर्थपणे मांडणारे वकील होते डॉ बाबासाहेब आंबेडकर !!

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आजची दुर्गा वैष्णवी अशोक खरे ”… माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “आजची दुर्गा वैष्णवी अशोक खरे ”… माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर

आजची दुर्गा – वैष्णवी अशोक खरे

. . . कम से कम एक साल देश के नाम

– इयत्ता तिसरी पर्यंत साताऱ्यात शिकलेली. चवथीत पुण्यात आल्यावर स्कॉलरशिप मिळवणारी

– दहावी बारावी अव्वल मार्क(96 %) मिळवून मेरिटवर Cummins college मध्ये कॉम्प्युटर सायन्स ला एडमिशन मिळवणारी.

– त्याचवेळेला समिती, कीर्तन, मल्लखांब शिकणारी 

– मल्लखांब मध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक मिळवणारी

इथेच ओळख संपत नाही

– आईबाबांची एकुलती एक लाडकी, कॅम्पस प्लेसमेंट मध्येच दहा लाखाची(सात आकडी) नोकरी मिळवणारी. दोन वर्षात पॅकेज सोळा लाख मिळवणारी

– आता प्रमोशन झाले तर वीस लाखाच्या पुढे जाऊ शकणारी,

– पण

मोहात पडण्याची शक्यता पण नको म्हणून लगेच नोकरी सोडून देव, देश, धर्म यांच्या कामासाठी समितीची प्रचारिका म्हणून बाहेर पडणारी, महाराष्ट्र, पंजाब राज्यात समिती सांगेल ते खडतर काम करणारी.

– कम से कम एक साल देश के नाम हे प्रत्यक्ष आचरणारी 

– देशाच्या तरुण पिढीतील आश्वासक दुर्गा. . . .

या वैष्णवीचा जन्म सातारचा. लहानपणापासून वैष्णवीला वडिलांकडून संघ विचारांचे संस्कार मिळाले. तिचे वडील संघाचे कार्यकर्ते तर आई समितीची कार्यकर्ती. वैष्णवीची सातवीत समितीच्या शाखेशी ओळख झाली, तेंव्हापासून समिती हा वैष्णवीच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला. लहानपणी वैष्णवी बाबांचे संघ काम बघत होती, घरी येणारे संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते, त्यांचे समर्पण, त्यांचे विचार बघत ती मोठी झाली. चांगले लौकिक शिक्षण घेऊन खोऱ्याने पैसे कमवायचे सोडून लोक पूर्ण वेळ संघाचे काम करतात हे तिच्या मनावर कोरले गेले. त्याचाच परिणाम स्वरूप आज गलेलठ्ठ पगाराची नोकरी सहजपणे सोडून ती पूर्णवेळ विस्तारिका म्हणून बाहेर पडली.

सहा वेळा राष्ट्रीय स्तरावर मल्लखांब खेळात सहभागी झालेली वैष्णवी सातत्याने चांगले गुण मिळवत संगणक अभियंता झाली. अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात असताना Baxter नावाच्या अमेरिकन कंपनीने R & D मध्ये काम करण्यासाठी तिची निवड झाली. गेली दोन वर्षे तिने Baxter मध्ये software Enginner म्हणून काम केले. या दोन वर्षात ऑफिसमध्ये तिने स्वतःची ओळख तयार केली. या छोट्या कालावधीत तिने rewards, recognition आणि प्रमोशन देखील मिळवले. तिने नोकरी सोडून जाऊ नये यासाठी तिच्या ऑफिसने तिला बरेच समजावून सांगतिले, परंतु वैष्णवी तिच्या विचारांवर कायमच ठाम असते.

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पाण्यावर तरंगणारी मूर्ती…” – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “पाण्यावर तरंगणारी मूर्ती”  – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆

भगवान विष्णूची शेषशय्येवर, विश्रांती घेत असलेली मूर्ती… 

  • आता येणारी आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी होय. विष्णु समुद्रात शेष शय्येवर चार महिने चातुर्मास विश्रांती घेतात.
  • गेली १३०० वर्षे पाण्यावर तरंगत असलेली ही श्री भगवान विष्णूंची १४ फुटी दगडी मूर्ती.
  • काठमांडूपासून ९ कि. मी. अंतरावर असलेल्या ‘बुद्धनिकंध’ या गावी हे देऊळ आहे.
  • एवढी मोठी एकसंध दगडी मूर्ती गेली १३०० वर्षे पाण्यावर तरंगते आहे, हा ईश्वरी चमत्कारच !

माहिती प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ठकी – कायमची हरवलेली जुनी लाकडी बाहुली… लेखक : श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलभा तेरणीकर☆

सुश्री सुलभा तेरणीकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ठकी – कायमची हरवलेली जुनी लाकडी बाहुली… लेखक : श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलभा तेरणीकर 

“ठकी”- कायमची हरवलेली जुनी लाकडी बाहुली !

पूर्वी लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळत असत. भातुक या शब्दाचा अर्थ खाऊ असा आहे ! भगवान श्रीकृष्णाच्या बालपणातील विटी दांडू आणि चेंडू, सुमारे ५००० वर्षांपूर्वी मोहेंजोदारो मध्ये सापडलेली मातीची खेळणी, एका इटालियन बेटावर ४००० वर्षांपूर्वी सापडलेली दगडी बाहुली, ग्रीस – चीन – रोममध्ये सापडलेली खेळणी ही माणसाच्या या अशा क्रीडा प्रेमाचे विश्वरूप दर्शन घडवितात.

आपल्याकडे पूर्वी प्रत्येक घरातील स्वयंपाक या विभागाचे प्रमुखपद हे नात्याने, वयाने ज्येष्ठ असलेल्या स्त्रीकडे आपोआपच यायचे. शालेय शिक्षणाचा प्रसार कमी होता. पुढच्या पिढीला पारंपरिक ज्ञान हे घरातूनच मिळायचे. मुलींना ते घरातील स्त्रियांबरोबर वावरतांना मिळत असे. खेळामध्ये मातीची भांडी, लाकडी बोळकी – बुडकुली असायची. या खेळण्यांच्या साहाय्याने घरातील मोठ्या स्त्रिया जशा वागतात तसे वागण्याचा प्रयत्न म्हणजे पूर्वीचा भातुकलीचा खेळ ! आपल्याकडे पूर्वी घरोघरी ठकी नावाची, लाकडाची एक ओबडधोबड बाहुली असायची. एका लाकडाच्या त्रिकोणी ठोकळ्यातून ही ठकी कोरली जात असे. अनेकदा ही ठकी ठसठशीत कुंकू लावलेली, लुगडे नेसलेली, नाकात नथ व डोक्यात फुलांची वेणी घातलेली असे. तरीही या बाहुलीला अंघोळ घालणे, कपडे घालणे, दूध पाजणे, भरविणे, झोपविणे हा त्यावेळच्या मुलींच्या खेळण्याचा भाग असे. कांही ठिकाणी ही ठकी रंगविलेली असायची. ठकी, ठेंगणी – ठुसकी, ठकूताई, ठमाबाई, ठेंगाबाई अशी मराठीतील ठ वरून सुरु होणारी नावे आणि विशेषणे या बाहुलीसाठी कायमची राखीव असत. ठकी ही फारशी स्मार्ट वगैरे न वाटता कांहीशी गावंढळ, मंद, ढ वाटत असे. त्या काळात शिक्षणामध्ये फारशी गती नसलेल्या मुलींचे लग्न लवकर उरकून टाकत असत. सर्वात महत्वाचे म्हणजे अस्सल मराठी बाहुलीचे रुप ल्यालेली ही ठकी बाहुली अशा मुलींचे एक प्रतीक ठरले होते. पुलंचे चितळे मास्तर हे त्यांच्या वर्गातल्या गोदी गुळवणीला गोदाक्का म्हणून हाक मारीत असत. तिचे वर्णन या ठकीला साजेलसे आहे. अशा ठक्या संसार मात्र चांगला करीत असत. ठकीची घराघरातील एकच बाहुली ही अनेक वर्षे लहान मुलींना खेळायला पुरत असे. पण ती फारच तुटकी फुटकी झाली तर तिचा उपयोग जात्याचा खुंटा ठोकणे, कुणाला तरी फेकून मारणे असल्या हलक्यासलक्या कामांसाठी केला जात असे. परंपरांच्या चाकोरीतच अडकलेल्या स्त्रीचे प्रतीक म्हणून ठकीचे छायाचित्र अनेक पुस्तकांमध्ये, मुखपृष्ठांवर पाहायला मिळते. दूरदर्शनवरील वृत्त निवेदिका आणि विविध कार्यक्रम सादर करणाऱ्या सौ. दिपाली केळकर यांनी ठकी, भातुकली, भातुकलीची विविध छोटी भांडी, खेळणी इत्यादींवर आधारित, ” खेळ मांडीयेला ” हे एक सुंदर पुस्तक लिहिले आहे.

भातुकली या खेळात केव्हांतरी एकदा बाहुला बाहुलीच्या लग्नाचा कार्यक्रम होत असे. फक्त मुलींच्या या खेळात मग अशा वेळी भटजी, वऱ्हाडी म्हणून मुलगेही सामील होत असत. या ठकीला नवरा म्हणून मग एक तितकाच ओबडधोबड बाहुला असायचा. त्याचे नावही देवजी घासाड्या, ठोंब्या, ठक्या असे काहीतरी असायचे.

आपली आई, आजी, आत्या, मावशी या दिसायला रूपवान असणे कधीच अपेक्षित नसते. तसेच या ठकीचे सुद्धा होते. ती भलेही सुंदर नसेल पण तिचे अस्तित्वच खूप सुंदर होते, भावपूर्ण होते. अनेक मुलींना तिने मोठे होताना पाहिलेले होते. ठकी ही केवळ एक बाहुली नसून ती अनेक पिढ्या, मुलींशी गुजगोष्टी केलेली एक संस्कृती होती.

अशा या ठकीची गरज आणि अस्तित्व जगभर होते, असे दिसते. भारतातच अनेक प्रांतांमध्ये अशा त्रिकोनी आकारात साकारलेल्या अनेक बाहुल्या आढळतात. (सोबतचे फोटो अवश्य पाहा). पण ठकीच्या तुलनेत त्या सौंदर्यवती दिसतात. रशियन बाहुली मातृष्का या नावाने ओळखली जाते. तर ९ मार्च १९५९ रोजी जन्माला आलेली अमेरिकन सुंदर बार्बी बाहुली आता ६७ वर्षांची होईल.

अशा सुंदर, रूपवान, फॅशनेबल आधुनिक बाहुल्यांपेक्षा ठकी म्हणजे मायेच्या आई, आजी, आत्या, मावशी यांच्यासारखी वाटते. पण तिची कायमची रवानगी आता पुरातन वस्तू संग्रहालयात झाली आहे.

लेखक : श्री मकरंद करंदीकर

प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर 

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “महान विचारवंतांचे ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलचे विचार…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “महान विचारवंतांचे ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलचे विचार…☆ संकलन व प्रस्तुती : जगदीश काबरे ☆

महान विचारवंतांचे ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलचे विचार –

1) प्रसिद्ध दिवंगत शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग म्हणतात, “ईशनिंदेबाबत मी देवाला घाबरत नाही (कारण तो नाहीच हे मला माहितीये) मी त्याच्या भक्तांना मात्र घाबरतो. विश्वात कोणी सिद्ध केलं, की देव आहे, तर मी स्वतःचं सर्वस्व त्याला देऊन टाकीन”.

2) तत्त्वज्ञ सॉक्रेटिस म्हणतात, “ईश्वर हे केवळ शोषणाचं साधन आहे”.

3) तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्सच्या मते ईश्वराचा जन्मच मुळात आपले वर्चस्व राखण्यासाठी हितसंबंधीयांनी केलेला आहे.

4) ”जो देव देवळात उजेड पाडू शकत नाही, तो तुमच्या जीवनात काय पाडणार?” अशा शब्दांत संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनांतून लोकांना खडसावतात.

5) शहीद भगतसिंग म्हणतात, “या देशातले आस्तिक तरुण माझ्या नजरेत नामर्द आहेत. “

6) प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या मते, “नास्तिक माणसाचा स्वतःवर विश्वास असतो आणि तो इतरांवर प्रेम करतो”.

7) डॉ. श्रीराम लागू यांनी तर ‘देवाला रिटायर करा!’ अशी हाळी दिली.

8) बिल गेट भारतीय लोकांविषयी म्हणतात, ”या देशातल्या मंदीरं आणि मस्जीदमध्ये जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल. “

9) स्वामी विवेकानंद म्हणतात, ”माझा देश बिनडोक्याचा बाजार आहे. इथे चटणी कोरडी खातील, अन् तेल दगडावर ओततील!” 

10) “देव दगडात नसून माणसांत आहे. देव-देवळं आणि देवाधर्माच्या नावानं चाललेली कर्मकांडं ही पुरोहितांची रोजगार हमी योजना आहे. देवळात आपलं शोषण होतं, हेच भक्तांना कळत नाही. देव असलाच तर भटांच्या पोटात आहे, मंदीरात नाही…   ” हे प्रबोधनकार ठाकरे सर्वसामान्यांच्या मनावर ठसवत आले.

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक ५१ ते ६०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक ५१ ते ६०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

बुद्ध्या विशुद्ध्या युक्तो धृत्यात्मानं नियम्य च ।

शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च ॥ ५१ ॥ 

*

विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः । 

ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः ॥ ५२ ॥ 

*

अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम्‌ । 

विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ॥ ५३ ॥ 

*

शब्दादी विषयत्याग भोजन हलके नियमित शुद्ध  

एकान्ती वास गात्रांतःकरण सात्विक संयमात शुद्ध

कायामनवैखरी अंकित राग-द्वेष करितो पूर्ण विनाश

अहंकार बल दर्प काम क्रोध परिग्रह त्याग वैराग्याश्रय

ध्यानयोगपरायण नित्य निर्मम मनुज  जो शांतियुक्त 

एकरूप  ब्रह्म्यालागी व्हाया स्थिर खचित होतसे पात्र ॥५१, ५२, ५३॥

*

ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति । 

समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्‌ ॥ ५४ ॥ 

*

ब्रह्मभूत प्रसन्न योगी नाही शोक ना वासना त्याते 

सर्वभूतांपरी समभाव परा भक्ती मम तया लाभते ॥५४॥

*

भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः । 

ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम्‌ ॥ ५५ ॥ 

*

पराभक्तीच्या योगाने यथार्थ जाणे तो मजला

माझ्याठायी प्रविष्ट होतो जाणूनी मग तो मजला ॥५५॥

*

सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः । 

मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्‌ ॥ ५६ ॥ 

*

समग्र कर्मे करितो राहुनी परायण माझिया चरणा

मम कृपे त्या अखंड प्राप्ती परमपदाची सनातना ॥५६॥

*

तसा सर्वकर्माणि मयि संन्यस्य मत्परः । 

बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव ॥ ५७ ॥ 

*

तुझ्या सर्व कर्मा मजसी अर्पुनिया मनाने

निरंतर मत्परायण हो मजठायी चित्त बुद्धीने ॥५७॥

*

मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि । 

अथ चेत्त्वमहङ्कारान्न श्रोष्यसि विनङ्क्ष्यसि ॥ ५८ ॥ 

*

चित्त तुझे मजठायी असता सकल संकटे तू तरशील 

अहंकारे लंघता मम वचने परमार्थी भ्रष्ट तू होशील ॥५८॥

*

यदहङ्कारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे । 

मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति ॥ ५९ ॥ 

*

अहंकार धरुनी म्हणशी युद्ध ना मज करवेल

व्यर्थ तुझा हा निश्चय प्रकृती तव युद्ध करवेल ॥५९॥

*

स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा । 

कर्तुं नेच्छसि यन्मोहात्करिष्यस्यवशोऽपि तत्‌ ॥ ६० ॥ 

*

स्वभावाने अपुल्या कौंतेया निबद्ध असती अपुली कर्मे

अनिच्छा तरी स्वाभाविकता करशिल परवशतेने कर्मे ॥६०॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ||◆||  नंदकुमार  सप्रे  ||◆|| – लेखक : श्री सुनील होरणे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ ||◆||  नंदकुमार  सप्रे  ||◆|| – लेखक : श्री सुनील होरणे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

मध्यंतरी  एका अंत्यविधीसाठी अमरधाम मध्ये गेलो होतो. जवळचे नातेवाईक आणि

मृताच्या घरचे लोक चितेच्या ओट्याजवळ तयारी करत होते. इतर जे परिचित हजेरी लावण्यासाठी आले होते, ते नेहमी प्रमाणे समोरच्या पायऱ्यांवर एकमेकांची ख्याली खुशाली विचारत हास्य विनोदात दंग होते. 

सर्व विधी पूर्ण झाल्यावर एक गृहस्थ तिथे आले. त्यांच्या हातात एक पिशवी होती. त्या पिशवीत दोन तीन पाण्याच्या बाटल्या आणि एक थर्मास होता. मृताच्या घरच्या लोकांना त्याने पाणी पिण्यास दिलं आणि नंतर पेपर कपमध्ये चहा प्यायला दिला. कोणी नातेवाईक असावेत असं मला वाटलं.

या घटनेनंतर बऱ्याच दिवसांनी मी नोबल हॉस्पिटलमध्ये कोणाला तरी भेटायला गेलो होतो. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बरेच लोक बसले होते. बहुधा त्यांच्या कोणा नातेवाईकांचं आत ऑपरेशन चालू असावं. आणि अचानक बघितलं तर त्या दिवशी अमरधाम मध्ये दिसलेले ते गृहस्थ इथं देखील त्या बसलेल्या लोकांना चहा देत होते. आता माझी उत्सुकता वाढली. थोड्या वेळाने सर्वांना चहा देऊन ते थोडे बाजूला आले, मी ताबडतोब त्यांच्या जवळ गेलो….. 

” नमस्कार !” मी म्हटलं. त्यांना हे अपेक्षित नसावं… ते कावरे बावरे होऊन माझ्याकडं बघू लागले. मी

पुन्हा नमस्कार केला, या वेळी त्यांनी फक्त मान हलवली. 

” आपलं नाव काय? ” मी विचारलं. त्यांचा पुन्हा प्रश्नार्थक चेहरा. यावेळी कपाळावर आठया देखील.  

“तुमचं नाव सांगा.” त्यांनी तुटकपणे मलाच उलटा प्रश्न केला. आता मी त्यांच्या जवळ गेलो, त्यांचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणालो, 

” अहो महाराज, माझं नाव प्रशांत कदम. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून नाव विचारलं.

आपण दोन मिनिटं बोलू शकता का?”

“नाही.” समोरून फटकन उत्तर आलं. आता मला धक्के पचवायची सवय झाली होती.

“नाही म्हणजे आत्ता नाही कारण आत्ता मला आणखी बऱ्याच ठिकाणी जायचंय. आपण नंतर कधीतरी

भेटू. आणि माझं नाव नंदू… म्हणजे नंदकुमार सप्रे.”

…. एवढं बोलून ते तरा तरा चालायला लागले. मी त्यांच्या पाठमोऱ्या छबी कडे बघतच राहिलो. साधारण साडेपाच फूट उंची,  मध्यम किंवा त्यापेक्षा बारीक शरीरयष्टी, अंगात पांढरा शर्ट आणि पायजमा, पायात चपला…  अहो हा माणूस बोलायला तयार नाही.

…. पण एक गोष्ट लक्षात आली. याला कुठंतरी काहीतरी दुःख आहे, वेदना आहेत. आणि त्या दिवसापासून

माझा त्याच्यातील इंटरेस्ट वाढू लागला. आता याला पुन्हा एकदा भेटलं पाहिजे.

आणि तो दिवस लवकरच आला. मी कुठंतरी चाललो होतो आणि हे महाराज रस्त्याच्या कडेला सायकल हातात धरून उभे होते. बहुधा कोणाची तरी वाट पहात असावेत. मी ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला सांगितले आणि पटकन खाली उतरून सप्रेच्या समोर जाऊन उभा राहिलो.

“सप्रे कोणाची वाट बघताय?” मी.

“नाही वाट नाही बघत, सायकल पंक्चर झालीय.”

“अरेच्चा, थांबा आपण पंक्चर काढायची व्यवस्था करू.” मी ड्रायव्हरला बोलावून सायकल पंक्चर

काढायला पाठवलं.

“अहो तुम्ही कशाला त्रास घेता, मी आणली असती करून.” सप्रे कसनुसा चेहरा करून म्हणाले.

“असू द्या हो सप्रे, चला आपण तोपर्यंत गाडीत बसून बोलू.”  सप्रे अक्षरशः बळजबरीने गाडीत येऊन बसले.

अतिशय अस्वस्थ झाले होते. मी बोलायला सुरुवात केली, 

“सप्रे ही चहाची काय भानगड आहे? जरा सांगता का?”  सप्रे गप्प. मला कळेना हा माणूस असा का वागतोय, धड बोलत देखील नाही… आणि माझं लक्ष्य त्यांच्या चेहऱ्याकडे गेलं, अहो हा माणूस रडत होता. त्याच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा वहात होत्या. मला एकदम अपराधी असल्यासारखं वाटलं. मी दोन्ही हातांनी सप्रेना धरलं … 

“सप्रे मला माफ करा. तुम्हाला दुखवायचा माझा हेतू नव्हता. जाऊ द्या, मला काही सांगू नका पण

कृपा करून तुम्ही शांत व्हा. पुन्हा मी तुम्हाला असले प्रश्न विचारणार नाही. I am sorry.”

दोन तीन मिनिटांनी सप्रे शांत झाले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली…. 

 ” प्रशांतजी, आजपर्यंत या विषयावर मी कोणाशी बोललो नाही. पण आज मी तुम्हाला सगळं सांगणार, याचं कारण असं आहे की, फक्त तुम्ही एकट्यानेच हा प्रश्न मला विचारला. मी आणि माझी पत्नी दोघेही सरकारी अधिकारी. मुलगा आणि सून दोघेही अमेरिकेत. तीन वर्षांपूर्वी पत्नीचे कोविडमध्ये निधन झाले. आम्ही दोघेही बाधित होतो. मला हॉस्पिटल मिळालं, तिला खाजगी हॉस्पिटल मिळालं नाही म्हणून सरकारी दवाखान्यात ऍडमिट केलं आणि चौथ्या दिवशी ती गेली.  इथं मी कोणालाही दोष देऊ इच्छित नाही, कारण

परमेश्वरावर माझा पूर्ण विश्वास आहे. तिची वेळ भरली होती, त्यामुळे ती गेली, एवढंच सत्य आहे. आणि मुळातच एकदा माणूस गेल्यावर त्याची कारणमीमांसा तपासत बसू नये असं मला वाटतं. तिला चहा फार आवडायचा, दिवसातून चार पाच वेळा तरी ती चहा घेत असे. दुर्दैवाचा भाग असा की तिला हॉस्पिटलमध्ये चार दिवसात एकदाही चहा मिळाला नाही. आणि या गोष्टीचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटलं आणि त्याच वेळी मी ठरवलं की आपण काहीतरी करायचं.  माणूस गेल्यानंतर त्याचे जवळचे नातेवाईक जास्त दुःखी असतात. आणि त्यांना काही हवंय का? हे देखील कुणी विचारत नाही. म्हणून मी थेट स्मशानभूमीत जाऊन ही सेवा देतो. त्यांच्या समाधानी चेहऱ्यात मला माझ्या पत्नीचा चेहरा दिसतो. हॉस्पिटलमध्ये गंभीर पेशंटचे नातेवाईक अतिशय तणावात असतात. त्यांना मी जाऊन भेटतो. चहा देतो, चौकशी करतो आणि दिलासा देतो. थोडा वेळ का होईना पण त्यांना बरं वाटतं. मी रिटायर असल्याने माझ्याकडे भरपूर वेळ आहे. सुदैवाने आर्थिक परिस्थिती चांगली आहे. मोठा बंगला आहे आणि मी एकटाच आहे. म्हणून तिथं

पंधरा अनाथ विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केलीय.”

……. मी प्रचंड भारावून गेलो होतो. काय बोलावे हे देखील मला कळत नव्हते….. 

“सप्रे तुम्ही फार मोठं काम करताय, You are great.” एवढंच मी बोलू शकलो. 

सप्रेची सायकल तयार होऊन आली होती. सप्रे गाडीतून उतरले, मला त्यांचं व्हिजिटिंग कार्ड दिलं आणि ते निघून गेले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मी फक्त नतमस्तक झालो.

त्यानंतर सप्रेची आणि माझी गाठ भेट नाही. एक दिवस कोणीतरी सप्रे गेले असं सांगितलं. मी सप्रेच्या घरी गेलो. बंगल्याच्या गेटवर मोठा बोर्ड होता .. “मालती सप्रे मेमोरियल ट्रस्ट” . आत एक जोशी नावाचे मॅनेजर होते. त्यांनी सांगितलं इथं राहणारे विद्यार्थीच आता सप्रेचं काम करतात.

…… मला आनंद चित्रपटातला शेवटचा प्रसंग आठवला.

….. राजेश खन्ना मरतो आणि नंतर अमिताभ तिथं येतो. त्यावेळी तो दोन वाक्य बोलतो.

“आनंद मरा नहीं,  आनंद मरते नहीं।” 

लेखक : श्री सुनील होरणे 

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जुवे बेट…” – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “जुवे बेट”  – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆

‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ असे कोकणाचे वर्णन केले जाते. याच कोकणात सुंदर समुद्र किनाऱ्यांसह अनेक छुपी पर्यटनस्थळ आहेत. यापैकीच एक आहे चारही बाजूने पाण्याने वेढलेले छुपं गाव. इथं घराबाहेर होड्या पार्क केलेल्या असतात. रत्नागिरीतून राजापूर आणि मग जैतापूर असा बस प्रवास. यानंतर मग जैतापूरहून होडी किंवा बोटीतून जुवे गावात पोहचता येते. पर्यटन दृष्ट्या या गावाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला नाही. यामुळे हे ठिकाण पर्यटकांपासून अलिप्त आहे. नारळी पोफळीच्या बागा. मधोमध भुई आणि चहुबाजूंनी निळेशार पाणी. या गावचे निसर्ग सौंदर्य मन मोहून टाकणारे आहे. राजापूरची अर्जुना नदी अर्धचंद्राकृती आकार जिथे घेते तिथेच हे सुंदर ठिकाण आहे. चारही बाजूंनी समुद्रांनी वेढलेल्या या गावात जाण्यास होडी शिवाय पर्याय नाही. जैतापूर, बुरंबेवाडी, धाऊलवल्ली यांच्या मध्ये जैतापूर खाडीत जुवे हे गाव आहे. जैतापूर जवळ धाऊलवल्ली जवळ हे जुवे बेट आहे. कोकणातील या छुप्या बेटाचे नाव आहे जुवे बेट.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares