श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ तुका आकाशाएवढा…! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
संत तुकाराम बीज —. फाल्गुन कृ. २, शके १९४५ – (या वर्षी दि. २७. ०३. २०२४)
सुमारे चारशे वर्षांपूर्वीचा काळ ! भारतातील एक गांव !! गावात बारा बलुतेदार !!! पैकी एक सावकार ! आता सावकार म्हटलं की आपल्या समोर नमुनेदार सावकाराचे चित्र उभे राहिले असेल. स्वाभाविक आहे कारण सावकार म्हटलं की तो लालची असलाच पाहिजे, तो लांडीलबाडी करणारा असलाच पाहिजे अशी प्रतिमा आपल्या समोर उभी राहते. पण हे सावकारी करणारे कुटुंब याहून वेगळे होते. सगळ्याच दगडांच्या मूर्ती घडवता येत नाहीत, कारण मूर्तिकार कितीही माहीर असला तरी दगड ही त्या प्रतीचा लागतो. हे अख्खे कुटुंब वेगळेच होते. आपले कर्तव्य म्हणून, पांडुरंगाने सोपवलेलेले पांडुरंगाचे काम म्हणून हे कुटुंब पिढीजात सावकारी करीत होते. घरात पंढरीची वारी होती, पैपाहुण्याचे स्वागत होत होते, गावातील प्रत्येकाला या कुटुंबाचा, घराचा आधार होता.
चारशे वर्षापूर्वीचा काळ म्हणजे मोगलाई !!! आता मोगलाई म्हणजे काय हे आमच्या पिढीला, आजच्या पिढीला कळणे तसे अवघड आहे, कारण ना आम्ही पारतंत्र्य अनुभवले ना मोगलाई !! पण या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर इतकेच सांगता येईल, ‘मोगलाई’ म्हणजे ‘मोगलाई’!!!
‘मोगलाई’चा अधिक चांगला अर्थ ज्याला समजून घ्यायचा असेल त्याने आपल्याच देशात स्वतःच्या राज्यातून परागंदा होण्याची पाळी ज्या ‘काश्मीरी पंडितां’वर आली त्यांची भेट जरूर घ्यावी. ‘ सर्वधर्मसमभावा ‘बद्दल असलेले सर्व समज (खरे तर गैरसमज ! ) आपसूक स्पष्ट होतील आणि विशेष म्हणजे आजची ती गरज देखील आहे. हे सर्व थोडे विषय सोडून आहे असे वाचकांना वाटू शकेल परंतु ज्यांच्याबद्दल हा लेखन प्रपंच करीत आहे त्यांची शिकवण डोळेझाक करणे मला जमण्यासारखे नाही. ते स्वच्छ शब्दात सांगतात,
मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जें जें मागे तें तें देऊं ॥ध्रु. ॥
“मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥
भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठाळाचे काठीं देऊं माथां ॥२॥
मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥३॥
अमृत तें काय गोड आम्हांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥४॥
तुका म्हणे आम्ही अवघेचि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥५॥”
(अभंग क्रमांक ६२१, सार्थ श्रीतुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)
त्याकाळातील मोगलाईचा सुद्धा ‘सात्विकतेचे बीज’ जीवावर उदार होऊन टिकवून ठेवणारी काही मंडळी होतीच. त्यापैकीच हे कुटुंब!! मूळ आडनाव आंबिले!! पंचक्रोशीत मान होता, वकुब होता. ही तीन भावंडे!! तिघेही भाऊच!! त्याकाळातील प्रचलित पद्धतीनुसार मुलांनी बापाचा व्यवसाय पुढे चालवायचा असा दंडक त्याकाळी होता. त्यामुळे या तिघांनी सुद्धा हेच करावे असे त्यांच्या बाबांना वाटणे हे त्याकाळातील रितीला धरूनच होते. पण मोठा भाऊ ‘संसारात’ पडला पण तसा तो विरक्तच होता. म्हणून सावकारी दुसरा मुलगा, ‘तुक्या’वर आली. त्याने ती जबाबदारी सचोटीने पार पाडण्याचा प्रयत्न देखील केला.
आपण मनात एक चिंतीतो, पण नियतीच्या मनात काही वेगळं असतं. इथेही तसेच झाले. आईवडिलांचे छत्र हरपले, मोठा भाऊ संसार सोडून तीर्थयात्रेला निघून गेला आणि धाकट्या भावाने वाटणी मागितली, त्यात अस्मानी संकट आले. “न भूतो… !” असा दुष्काळ आला. महाभयंकर दुष्काळ होता तो. त्याकाळात लाखो माणसे देशोधडीला लागली, लाखों जीव प्राणास मुकले, याची झळ तूक्याच्या कुटुंबाला बसणे हे ही स्वाभाविक होते. तसा तो बसलाही आहे. कुटुंबातील अनेक माणसे अन्न अन्न करीत प्राणास मुकली. एक काळी सावकार असलेल्या कुटुंबास घासभर अन्नास मोताद व्हावे लागले. कल्पना करा, सावकार असलेल्या कुटुंबावर अन्न-अन्न करण्याची पाळी आली तर त्यांची काय मनःस्थिती असेल. जे कुटुंब अनेकांचा पोशिंदा होते त्यावर भिकेची पाळी यावी!! यापेक्षा ‘दैवदुर्विलास’ काय असू शकतो. त्याकाळातील शेतकरी दुष्काळ आला म्हणून आत्महत्या करून कर्तव्यच्युत होत नव्हते, त्यामुळे या तुक्यानेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न सोडून देऊ, कधी विचारही केला नाही. त्याने यातून धीराने मार्ग काढायचा प्रयत्न केला आणि ‘प्रयत्नांनी परमेश्वर’ या उक्तीनुसार ते यशस्वीही झाले.
या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी ‘हरिनामाचा’ उपयोग करून घेतला. आपल्याकडे एखादा संत झाला की त्याची पूजा करायची, त्याला देवत्व प्रदान करायचे आणि आपण निवांत रहायचे अशी पद्धत पडून गेली आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते, आपलेही हेच मत असेल असा विश्वास आहे. पण आज मात्र नुसती पूजा करून भागेल अशी परिस्थिती नाही, आज या संतांच्या चरित्राचा वस्तुनिष्ठ अभ्यास करण्याची आणि त्यानुसार आचरण करण्याची गरज आहे. ऐकणे म्हणजे कृती करणे आणि अभ्यासणे म्हणजे आत्मसात करणे, आत्मानुभूती घेणे, हे समजून घ्यायला हवे.
‘श्रीमान तुका आंबिले’ हे ‘संत तुकाराम’ होऊ शकले कारण त्यांनी जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्ट समजून घेतली आणि कृतीत आणली. नुसती कृतीत न आणता ती आत्मसात केली. “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” या पंक्तीनुसार ते जीवन जगले. हे सर्व लिहायला जितके सोपे तितकेच करायला अवघड.
*अखंड नामस्मरण, त्याला ‘सम्यक’ चिंतनाची जोड आणि ‘अरण्यवास’ यामुळे श्रीमान तुकाराम आंबिले संवेदनशील होऊ लागले, निसर्गाशी समरस होऊ लागले. एक दिवस सोनपावलांनी आला, तुक्याची वाचा अनावर झाली, ती सारखी नाम घेऊ लागली.
….. आणि मग ‘जीवा-शिवाची भेट झाली
तुक्याची ब्रह्मानंदी टाळी लागली. ‘अवघा’ रंग एक झाला नि तुक्या विठ्ठल रंगात न्हाऊन गेला!! तुक्या अंतर्बाह्य बदलून गेला. सर्व ठिकाणी एकच हरी भरून राहिला आहे याची त्यास अनुभूती आली, एक चैतन्य सर्व सृष्टीत भरून राहिले आहे याची चिरजाणीव त्यास झाली. सर्व ठिकाणी त्यास एक विठ्ठल दिसू लागला, देह विठ्ठल झाला, चित्त विठ्ठल झाले, भाव विठ्ठल झाला, क्षेत्र विठ्ठल झाले, आकाश विठ्ठल झाले, चराचर सृष्टि विठ्ठल झाली, आणि असे होता होता तुका तुकाराम झाला नव्हे तुका आकाशा एवढा झाला!!!* सामान्य मनुष्य अथक परिश्रमानें, साधनेने ‘आकाशा एवढा’ होऊ शकतो, हे त्यांनी स्वानुभवाने सिद्ध करुन दाखवले आणि सामान्य जनांना भगवंत प्राप्तीचा सोपान सुगम करून दिला.
‘आकाशा’ एवढ्या झालेल्या तुकारामांना वैकुंठाला नेण्यासाठी भगवंताने विमान पाठवले. तोच आजचा दिवस!! आजचा दिवस आपण तुकाराम बीज म्हणून साजरा करतो. आजच्या पावनदिनी अल्पमतीने वाहिलेली ही शब्द सुमनांजली श्री संतश्रेष्ठ तुकारामांच्या चरणी अर्पण करीत आहे.
या लेखाचा समारोप त्यांच्याच एका अभंगाने करतो…
विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध । तेथे मज बोध काय कळे ॥धृ. ॥
संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे । काय म्या गव्हारे जाणावे हे ॥१॥
करितो कवित्व बोबडा उत्तरी । झणी मजवरी कोप धरा ॥२॥
काय माझी याति नेणा हा विचार । काय मी ते फार बोलो नेणे ॥३॥
तुका म्हणे मज बोलवितो देव । अर्थ गुह्य भाव तोचि जाणे ॥४॥”*
(अभंग क्रमांक ५५३, सार्थ श्रीतुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)
जय जय राम कृष्ण हरि…
© श्री संदीप रामचंद्र सुंकले
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈