☆ टेनिस विश्वाचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडरर… – लेखिका : नीलांबरी जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆
टेनिस विश्वाचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडरर
– आणि त्याने सांगितलेले “तीन टेकअवेज”
टेनिस विश्वाचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडररला Dartmouth College नं सन्माननीय डॉक्टरेट दिल्यानंतर त्यानं केलेलं भाषण प्रचंड गाजतं आहे.. फेडररचं भाषण प्रेरणादायी होतंच. पण उत्कृष्ट भाषण कसं असावं याचा नमुना म्हणून ते इतिहासात अजरामर ठरेल याचं कारण म्हणजे प्रत्येक माणसासाठी ते उपयोगी आहे.
आपल्या सुमारे २५ मिनिटांच्या भाषणात त्यानं आजच्या भाषेत बोलायचं तर “तीन टेकअवेज” सांगितले आहेत.
१.Effortless is a myth
एफर्टलेस – एखादी गोष्ट लीलया करणं, ती सहजगत्या अवगत असणं ही केवळ दंतकथा आहे. केवळ एखाद्याकडे टॅलेंट आहे म्हणून त्याला / तिला ते जमतं असं कधीच नसतं. अनेक वर्षांचे परिश्रम त्यामागे असतात. लोक म्हणतात मी लीलया खेळतो. त्यांना माझं कौतुकच करायचं असतं. मात्र “तो किती सहजगत्या खेळतो” हे सारखं ऐकून मी वैतागायचो. खरं तर मला प्रचंड मेहनत करावी लागत होती. मी अनेक वर्षं रडगाणं गायलो, चिडचिड केली, रागानं रॅकेट फेकून दिली आणि मग मी शांत रहायला शिकलो. मी इथपर्यंत केवळ टॅलेंटवर पोचलेलो नाही. माझ्या प्रतिस्पर्ध्यांच्या खेळापेक्षा चांगला खेळ करण्याचा अविरत प्रयत्न करुन मी इथवर पोचलो.
२.It’s only a point
आपण खेळलेल्या १५२६ सिंगल मॅचेसपैकी फेडरर ८० टक्के मॅचेस जिंकला. मात्र पॉईंटस ५४ टक्केच जिंकला.. म्हणजे सर्वोच्च स्थानावरचे टेनिस खेळाडूदेखील निम्मे पॉईंटस गमावतात.. तेव्हा तुम्ही It’s only a point असा विचार करायला स्वत:ला शिकवायला हवं. आयुष्याच्या खेळात सतत आपण असे पॉईंटस गमावत असतो. मात्र तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला नकारात्मक गोष्टींवर मात करायला शिकवतो. आत्मविश्वास त्यातूनच वाढतो. तळमळीनं, स्पष्टपणे आणि लक्ष केंद्रित करुन पुढचा गेम खेळायला तुम्ही तयार होता.
उत्तमोत्तम खेळाडू हे त्या स्थानापर्यंत प्रत्येक पॉईंट जिंकल्यानं पोचत नाहीत, तर आपण वारंवार हरणार आहोत आणि त्यावर कशी मात करायची ते सातत्यानं शिकत रहातात म्हणून उत्कृष्टतेपर्यंत पोचतात.
३.‘Life is bigger than the court’
आयुष्य हे टेनिस कोर्टपेक्षा फार मोठं आहे. मी खूप परिश्रम घेतले, खूप शिकलो आणि टेनिस कोर्टाच्या त्या छोट्या मैदानात कित्येक मैल पळलो. मात्र मी पहिल्या पाचांमध्ये असतानाही मला आयुष्य जगण्याचं महत्व कळत होतं. प्रवास, निरनिराळ्या संस्कृतींचा अनुभव, नातीगोती आणि विशेषत:, माझं कुटुंब. मी माझी मुळं कधी सोडली नाहीत, मी कुठून आलो ते मी कधीच विसरलो नाही.
टेनिसप्रमाणेच तुम्ही तुमच्या आयुष्यात एका बाजूला उभे असता. तुमचं यश तुमच्या प्रशिक्षकावर, तुमच्या टीममधल्या सहका-यांवर, तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर अवलंबून असतं. तुम्ही घडता ते या टीमवर्कमुळे..!
ज्यांचे काळजाचे तुकडे देशाच्या सीमांवर प्रत्यक्ष मृत्यूसमोर अहोरात्र उभे असतात, त्यांच्या डोळ्यांची आणि गाढ झोपेची ओळख खूपच पुसट झालेली असते. रात्रीचा दीड एक वाजला असेल. भाऊंना तशी नुकतीच झोप लागली होती. एखादा डुलका झाला की बाकी वेळ ते जागेच असायचे. त्यांचे चिरंजीव बजरंग आणि त्यांचे सर्वच कुटुंब,गाव त्यांना ‘ भाऊ ‘ म्हणून संबोधत असे. बजरंग फौजेत भरती होऊन तसे स्थिरावला होते. पत्नी,दोन मुलं असा संसारही मार्गी लागला होता. नोकरीची वर्षेही तशी सरत आलेली होती. लवकरच कायम सुट्टी येण्याचा, सेवानिवृत्ती पत्करण्याचा त्यांचा विचार होता. बाकीच्या वेळी अजिबात आवश्यकता पडत नसतानाही केवळ धाकटे चिरंजीव बजरंगराव आणि बाहेरगावी नोकरीत असलेले थोरले चिरंजीव यांचेशी बोलता यावं, त्यांची ख्यालीखुशाली कळत राहावी,म्हणून भाऊंनी घरी टेलिफोन बसवून घेतला होता.
टेलिफोन खणाणला तसे भाऊ ताडकन झोपेतून जागे झाले व उठले. वयोमानाने त्यांच्या पत्नीला ऐकायला कमी यायचे. त्यांच्या पत्नी म्हणजेच बजरंग यांच्या आईसाहेब या आवाजाने जाग्या झाल्या नाहीत. तिकडून बजरंग फोनवर होते. त्याकाळी मुळात सैनिकांसाठी अत्याधुनिक संपर्क व्यवस्था नव्हती. जी काही व्यवस्था होती ती पुरेशी नव्हती. सीमावर्ती भाग आधीच दुर्गम. त्यातच सीमेवर युद्धाचे काळे ढग जमा झाल्याचे दिवस. टेलिफोन करण्यासाठी काही तास लागायचे आणि अर्थातच प्रत्येकालाच घरच्यांशी बोलायचे असायचे! पत्रांतून फार काही लिहिता येत नसे. आणि लिहिलेली पत्रे घरांपर्यंत पोहोचायला उशीर तर लागायचाच!
बजरंग यांचा फोन करण्याचा नंबर रात्री दीड वाजता लागला! एवढ्या उशीरा फोन करण्याचं कारणही तसंच होतं. बजरंग यांची पलटण अंतिम लढाईला निघायची होती. परत येण्याची शाश्वती कधीच नसते! चार शब्द बोलून घ्यावेत, निरोप द्यावा म्हणून बजरंगरावांनी घरी फोन लावला होता. त्यांची पत्नी त्यावेळी ग्वाल्हेरला असल्याने तिच्याशी बोलणे शक्य नव्हते.
सैनिकाला घरी सर्व काही सांगता येत नाही. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप गुप्तता पाळावी लागते. बजरंगराव एरव्ही खूप कठीण काळजाचे…वागण्यात कडक! कर्तव्यात वैय्यक्तिक भावनांचा अडसर येऊ न देणारे शिपाई गडी! पण आज त्यांचा स्वर कातर होत होता..त्यांच्या मनाविरुद्ध! फोनवर फार वेळ बोलताही येणार नव्हते आणि काय बोलावे ते समजतही नव्हते! फोन ठेवताना शेवटी बजरंगरावांच्या तोंडून कसेबसे शब्द निघाले… ” माझ्या पोरांना चांगलं शिकवा!”
भाऊ आता खडबडून जागे झाले होते! बजरंगराव आधी असे कधी काही बोलल्याचे त्यांना आठवेना. आजच असं काय झालं असावं, की त्यांनी ही निरवानिरवीची भाषा बोलावी? फोन बंद झाल्याने काही उलगडाही होईना! पत्नीला उठवून हे सांगावं असं त्यांना वाटेना. ती बिचारी आणखीनच काळजीत पडेल!
भाऊंनीं डोळे मिटले…पांडुरंगाला स्मरत हात जोडले आणि स्वत:शीच काही पुटपुटले. आणि उठून ते देवघरातल्या पांडूरंगाच्या तसबिरीपाशी गेले. अबीर कपाळावर लावला आणि सकाळची वाट पहात डोळे मिटून पडून राहिले….पण डोळ्यांसमोरून बजरंग काही हलत नव्हते. तसा ते सुट्टी संपवून ड्यूटीवर जायला निघाले की, त्यांच्या काळजात कालवाकालव व्हायची. पण ते दाखवायचे नाहीत वरवर. कामाला निघालेल्या माणसाचे चित्त दु:खी करू नये, असा त्यांचा विचार असे. बाकी एकांतात किती आसवं ढाळत असतील ते विठ्ठलालाच ठाऊक! सैनिकांच्या आई-बापांची,पत्नी,मुलांची, बहिण-भावांची अशीच तर असते अवस्था!
आषाढी वारीचे दिवस होते. एरव्ही शेतांमधल्या विठ्ठलाची सेवा करण्यात मग्न असलेल्या भाऊंनी यंदा वारीला जाण्याचे ठरवले. ते समजल्यावर गावातल्या माळकरी मंडळींनाही आनंद झाला. बघता बघता सात वर्षे गेली. इकडे फौजेत कर्तव्य बजावणारे बजरंगराव अनेक जीवघेण्या संकटांतून सहीसलामत बचावले….शत्रूने शेकडो गोळ्या डागल्या…पण कोणत्याही गोळीवर बजरंग हे नाव नव्हतं! उलट त्यांच्याच गोळ्यांवर दुष्मनांची नावे ठळक होती. घरी सुट्टीवर आले की ते दिवस कधी संपूच नयेत,असे वाटायचे सर्वांना…भाऊंना तर जास्तच!
त्यांनी पंढरीची वारी सुरू केल्याला यंदा सात वर्षे पूर्ण होणार होती. खरे तर आधी ते आपल्या मोठ्या जिगरीने कमावलेल्या आणि राखलेल्या शेत-मळ्यातच विठ्ठल शोधायचे सावता महाराजांसारखे. गळ्यात तुळशीमाळा होतीच त्यांच्या जन्माच्या पाचवीला त्यांच्या वडिलांनी आवर्जून घातलेली.
कालांतराने तब्येत ठीक नव्हती तरी भाऊंनीं हा नेम मोडला नव्हता. ‘कशाला पायपीट करता एवढी. खूपच वाटलं तर एस.टी.नं जात जावा की’ असं बजरंग म्हणायचे तेंव्हा भाऊ फक्त हसायचे आणि म्हणायचे…तो चालवत नेतोय तोवर चालायचं!
यंदा भाऊंची सातवी वारी.एक तप पूर्ण करायचं होतं. चालवत नव्हतं तरी भाऊ नेटाने माऊलींसोबत निघाले. बजरंग या वर्षी फौजेतून कायमसाठी घरी यायचे होता. आणि येण्याचे दिवस जवळ आले होते. पण तरीही भाऊ वारीला निघून गेले…बजरंग आणि पांडुरंग त्यांच्यासाठी कुणी वेगळे नव्हते.
आषाढी झाली…पालख्या माघारीच्या रस्त्याला लागल्या. गावातल्या दिंड्या मिळेल त्या वाहनांनी लगोलग माघारी निघाल्या. बजरंग त्या सकाळीच सुट्टीसाठी घरी पोहोचले होते. संध्याकाळच्या सुमारास दिंडीचा ट्रक गावात पोहोचला. भाऊ घराकडे निघाले…थोडे थकले होते, चेहरा काळवंडला होता उन्हातान्हानं, पण त्यावर समाधान झळकत होतं. एक देवाचा वारकरी आणि एक देशाचा धारकरी असे दोघे एकाच दिवशी घरी आले होते…हा योगायोग!
बजरंगरावांनी वडिलांच्या पायांवर मस्तक ठेवले. त्यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवले…’देवा,विठ्ठला.. पांडुरंगा!शब्द राखला तुम्ही!’ भाऊ उद्गारले!
रात्री भाऊंचे पाय चेपताना बजरंग म्हणाले,”भाऊ,आता तुमच्याच्यानं चालवत नाही. बास झाली आता वारी!”
“आणखी आठ वर्षे वारी करणार काहीही झालं तरी! ‘ देह जावो अथवा राहो..पांडुरंगी दृढ भाव!’… पूर्ण होऊ दे नवस माझा! बजरंगरावांना काय किंवा घरातल्या इतर कुणाला काय, नवसाचं काही माहीत नव्हतं. “कसला नवस?” बजरंगरावांनी विचारले.
“त्या दिवशी रात्री तुझा दीड वाजता फोन आला. नीट काही कळालं नाही. पण तू म्हणाला,”पोरांना नीट शिकवा..सांभाळा! ते तुझं बोलणं काळजाला घरं पाडून गेलं. मला माहित होतं, तुला काही उलगडून सांगता येणार नव्हतं. पण मी तर फौजीचा बाप की रे! मला सगळं समजून चुकलं! पोरं लढायला निघालीत….परत नजरेस पडतील की नाही,देव जाणे! म्हणून त्या देवालाच साकडं घातलं…आमच्या सैनिकांना सुरक्षित ठेव…लढाईत त्यांचंच निशाण उंच राहू दे…! पांडुरंगा..तुझ्या बारा वा-या करीन न चुकता! पण माझ्या लेकराच्या पाठीशी उभा रहा!” पांडुरंगाने माझं ऐकलं! आज तू माझ्यासमोर आहेस!” असं बोलताना भाऊंचे डोळे भरून आले होते…त्यांच्या डोळ्यांतून खाली ओघळणा-या अश्रूंच्या धारेत बजरंगराव न्हाऊन निघाले!
दिवसेंदिवस प्रकृती खालावत चालली असतानाही भाऊंनी ‘ केला नेम चालवी माझा ! ‘ असं विठ्ठलाला विनवणी करीत करीत बारा वर्षांचा नवस फेडला!
(माजी सैनिक आणि पत्रकार श्री.बजरंगराव निंबाळकर साहेब यांच्या प्रकाशित होऊ घातलेल्या आत्मचरित्रातील एका प्रसंगाचे हे मी केलेले कथा रूपांतर ! मूळ पुस्तकात या आणि अशा अनेक घटना,गोष्टी आहेत. येत्या सव्वीस-सत्तावीस जुलै रोजी हे आत्मचरित्र प्रकाशित होईल.)
☆ इतिहास पंढरपूर वारीचा – लेखक :अज्ञात☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆
“…आणि म्हणून पंढरीची वारी पंढरीत !” गडबडू नका, बरोबर वाचलंत !
वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधीच चुकू नये हि वारकऱ्यांची भावना असते. अगदी जीवाचा आटापिटा करून तिथपर्यंत जाण्याची ओढ , तळमळ ! कधी एकदा पंढरीला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो हि भावना मानस साद घालत असते.
वारकरी संप्रदायाच्या म्हणजे ओघानेच महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आणि त्यामुळे वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकऱ्यांवर ओढवला. घटना होती इसवीसन १५०८ ते १५११ दरम्यानची. विजयनगर साम्राज्याच्या राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात अनागोंदी (सध्याचे नाव हंपी) येथे नेली. आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण इथवर आलो आहोत तोच पांडुरंग जागेवर नाही हे पाहून सारेजण आलाप करू लागले. परंतु राजाच्या शक्तीसमोर कोणाचे काय चालणार ? सर्व भाविकांनी पांडुरंगाचे निस्सीम भक्त श्रीसंत भानुदास महाराजांना हे कार्य पूर्ण करण्याची विनंती केली. भानुदासांच्या घराण्यात पंढरीची वारी पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती. पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होताच. त्यांनी पुढाकार घेतला आणि दर कोस दर मुक्काम करीत ते हंपीस पोचले. एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यावर सैनिकांच्या कड्या बंदोबस्तात कुलूपबंद गाभाऱ्यात पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती. दरवाजास स्पर्श करताच कुलुपे गळाली व सैनिकांना झोप लागली. भानुदास महाराज मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले. म्हटले देवा, ” अरे सगळे भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत आणि तू येथे आलास ? तुला येथे सर्व राजोपचार प्राप्त होतील परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या भक्ति प्रेमास तू मुकशील. चल माझ्या समवेत !” दोघांचा काही संवाद झाल्यानंतर भगवंताने आपल्या गळ्यातील तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला. बरोबरीने नवरत्नांचा एक हारही त्यांच्या गळ्यात घातला. महाराज बाहेर पडले. परिस्थिती पूर्ववत झाली. सकाळी राजा काकडआरतीस आल्यानंतर त्याच्या लक्षात आले कि देवाच्या गळ्यातील नवरत्नांचा हार गायब झाला आहे. शोधाशोध सुरु झाली. राजाने फर्मान सोडले कि, जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढवा. पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान-संध्या करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेला नवरत्नांचा हार चमकला. चोर सापडला या भावनेने राजाज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले. परंतु चमत्कार झाला.
कोरडीये काष्ठी अंकुर फुटले ! येणे येथे झाले विठोबाचे !!
सुळाला पालवी फुटली. बातमी राजापर्यंत गेली. पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्याच्या भक्ताचा छळ झाल्यास तेथे क्षणभरही राहायचे नाही याप्रमाणे पांडुरंगाने अंगुष्ठ एवढे रूप धारण केले व संत भानुदास महाराजांच्या पडशीत बसले. दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले. पंढरीच्या वेशीजवळ आल्यानंतर वारकर्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगास आणल्याची शुभवार्ता कळली. दोघांच्याही स्वागतासाठी रथ सज्ज झाला. वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेना, ” पुंडलिक वरदा हरिविठ्ठल ” च्या गजराने पंढरी दुमदुमली. वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत आले. पुष्पवृष्टी झाली. स्थानिकांनी सडासारवण केले. सुवासिनींनी पायघड्या घातल्या, ओवाळले. वेशीजवळ आल्यानंतर पांडुरंगाने आपले मूळ रूप धारण केले. पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा ! पांडुरंगाने पुन्हा येथून बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावरील काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली. मंदिरात गेल्यानंतर सोबत भानुदास महाराजांच्या हस्तेच पांडुरंगाची पुनर्स्थापना करण्यात आली. पांडुरंगाने भानुदास महाराजांना आशीर्वादरूपी दोन वर दिले कि, ” तुझ्या वंशात मी जन्म घेईन व तू अखंड माझ्याजवळच असशील.” त्याप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणि त्यांचे पुत्र सूर्यनारायण व त्यांचे पुत्र म्हणजेच शांतिब्रम्ह संत एकनाथ महाराज होय. अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पणतू होय. दुसऱ्या वरा प्रमाणे आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळच आहेत. गाभाऱ्यातून बाहेर पडले कि चार खांबी मंडप लागतो. त्याच्या बाहेर पडले कि सोळा खांबांचा मंडप लागतो त्यास सोळखांबी मंडप असे संबोधण्यात येते. त्याच्या डाव्या हातास पहिली ती संत भानुदास महाराजांची समाधी होय. संत भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध १४ या तिथीस समाधी घेतली. आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंशजांच्या हस्ते पूजाअर्चा आदींद्वारे त्यांचा समाधी सोहळा साजरा करण्यात येतो. तसेच या तिथीचे स्मरण म्हणून कार्तिकी एकादशीस रथोत्सव साजरा करण्यात येतो.
संत भानुदास महाराजांच्या भक्ती आणि कर्तृत्त्वाचे फळ म्हणजे आज पांडुरंगाचे दर्शन आपणांस पंढरीत होत आहे. म्हणूनंच आजही पंढरपूरला जाऊन आपण वारी करतो. नसता ‘हंपीची वारी’ करावी लागली असती. संत ज्ञानेश्वरादिक संतांनी पंढरीचा जो महिमा लिहिला आहे तो गाता आला नसता. संत एकनाथ व संत तुकारामांना पंढरीपर अभंग लिहिता आले नसते. धन्य ते संत भानुदास आणि धन्य त्यांची भक्ती कि ज्यांच्यामुळे आज आपण पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेत आहोत. आजही ज्याठिकाणी हंपीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंगास स्थापित केले होते त्या ठिकाणी गाभाऱ्यात पांडुरंग नाहीये. तेथे एक खाच दिसते कि ज्यात पांडुरंगाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती.
हा इतिहास ८०% भाविकांना माहित नाहीये.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : अस्मिता इनामदार
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ माऊलींचा हरिपाठ१.… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
☆
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी।
तेणें मुक्ती चारी साधियेल्या ।।१।।
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।
पुण्याची गणना कोण करी।।२।।
असोनि संसारी जिव्हे वेगु करी।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा।।३।।
ज्ञानदेव म्हणें व्यासाचिया खुणा।
द्वारकेचा राणा पांडवा घरी।।४।।
विवरण :-
महाराष्ट्रात भागवतधर्माची मुहर्तमेढ संत ज्ञानेश्वरांनी रोवली आणि म्हणूनच “ज्ञानदेवें रचिला पाया, तुका झालासे कळस” असे म्हटले जाते.
घर बांधताना आधी पाया खणला जातो, मग पाया बांधला जातो. जितकी इमारत उंच त्या प्रमाणात पायाचा आकार ठरवला जातो. मागील ७०० वर्ष ही ‘इमारत’ दिमाखात उभी आहे आणि जगाला ज्ञान देण्याचे, परंपरा टिकविण्याचे असिधारा व्रत चालू आहे, म्हणजे हा पाया बांधणारा अभियंता किती कुशल असेल.
आपल्याकडे सर्व संतांना स्वाभाविकपणेच आईची उपमा दिली गेली आहे. आई इतकेच नव्हे, तर त्यापेक्षा खूप जास्त असे सर्व संतांचे आपल्यावर उपकार आहेत. आई लेकराला एक जन्म सांभाळते, तर सद्गुरू शिष्याला मुक्ती मिळवून देईपर्यंत सांभाळतात.
भक्त आणि देव यांच्यातील ऐक्य साधणारा दुवा असेल तर तो म्हणजे संत. एखादवेळेस देव प्रसन्न होणार नाही,पण संतांना मात्र मायेचा पाझर लगेच फुटतो. सर्व संतांनी समाजाचे कल्याण व्हावे म्हणून अपारकष्ट सोसले, अनेक संतांनी समाजाचे हीत व्हावे म्हणून मानहानी पत्करली, त्यांची समाजाकडून हेटाळणी झाली, कोणाचा संसार विस्कटला, कोणाला वाळीत टाकण्यात आले, कोणाची गाढवावरुन धिंड काढण्यात आली. परंतु या कृतीचे प्रतिबिंब कोणत्याही संतांच्या साहित्यात आपल्याला आढळत नाही आणि पुढेही आढळणार नाही कारण संत म्हणजे अकृत्रिम मातृभाव आणि वात्सल्य यांचे आगर. पंढरपूरच्या पांडुरंग पुरुष देव असूनही त्याला सर्व संतांनी माऊली केले आणि सर्व संत सुद्धा त्या विठूमाऊलीप्रमाणे विश्वाची माऊली झाले…..! अखंड नामस्मरणाने अनेक शिष्यांनी संतत्व प्राप्त करून घेतले. परमार्थ आचरण करायला अत्यंत सुलभ आहे. त्याचे सामान्य सूत्र पुढील प्रमाणे सांगता येईल.
“एकतर समोरच्या मनुष्याला आई माना, संपूर्ण जगाला आपली आई माना, अथवा संपूर्ण जगाची आई व्हा!!”
या पाठात माऊली म्हणतात की देवाच्या दारी क्षणभर उभा राहा म्हणजे तुला चारी अर्थात सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या चार मुक्तींचा सहज लाभ होईल. माऊलींनी सांगितलेल्या चार मुक्ती कशा आहेत हे आपण दासबोधाच्या आधारे थोडक्यात समजून घेऊ.
(संदर्भ: दासबोध दशक ४ समास १०)
“येथें ज्या देवाचें भजन करावें | तेथें ते देवलोकीं राहावें । स्वलोकता मुक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ २३॥”
{या मृत्युलोकात असताना ज्या देवतेची उपासना माणूस करतो, त्या देवतेच्या लोकांत तो मृत्यूनंतर जाऊन सहतो. स्वलोकता मुक्तीचे लक्षण हे असे आहे.}
“लोकीं राहावें ते स्वलोकता । समीप असावें ते समीपता । स्वरूपचि व्हावें ते स्वरूपता । तिसरी मुक्ती ॥ २४॥”
{त्या देवतेच्या लोकांत जाऊन राहणे याला स्वलोकता म्हणतात. समीप असावे यास समीपता मुक्ती म्हणतात. त्या देवतेचे स्वरूप प्रास होऊन सहाणे याला स्वरूपता मुक्ती म्हणतात. ही तिसरी मुक्ती आहे.}
“देवस्वरूप जाला देही । श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाहीं । स्वरूपतेचें लक्षण पाहीं । ऐसें असे ॥ २५॥”
{त्याला विष्णूचे रूप मिळाले तरी त्यास श्रीवत्स, कौस्तुभ मणी व लक्ष्मी यांची प्राप्ती होत नाही. स्वरूपता मुक्तीचे लक्षण हे अशा प्रकारचे आहे.}
“सुकृत आहे तों भोगिती । सुकृत सरतांच ढकलून देती । आपण देव ते असती । जैसे तैसे ॥ २६॥”
{पुण्याचा साठा असेपर्यंत त्या त्या लोकातील भोग भोगावयास मिठ्यात. पुण्याचा पूर्ण क्षय झाला की तेधून ढकलून देतात. मात्र त्या लोकातील देव तेथे तसेच पूर्वीप्रमाणेच असतात.}
“म्हणौनि तिनी मुक्ति नासिवंत । सायोज्यमुक्ती ते शाश्वत । तेहि निरोपिजेल सावचित्त । ऐक आतां ॥ २७॥”
{या तिन्ही मुक्ती नाशिवंत आहेत. सायुज्यमुक्ती ही अविनाशी आहे. ते कसे ते आता सांगतो. चित्त सावध ठेवून ऐकावे.}
*ब्रह्मांड नासेल कल्पांतीं । पर्वतासहित जळेल क्षिती । तेव्हां अवघेच देव जाती । मां मुक्ति कैंच्या तेथें ॥ २८॥”
{कल्पांती ब्रह्मांडाचा नाश होतो. पर्वतासहित भूमी जळून जाईल तेव्हा सगळे देवही जातात. तेव्हा मग तेथल्या मुक्ती कशा राहणार ? }
“तेव्हां निर्गुण परमात्मा निश्चळ । निर्गुण भक्ती तेहि अचळ । सायोज्यमुक्ती ते केवळ । जाणिजे ऐसी ॥ २९॥”
{याप्रमाणे कल्पांत जरी ओढवला तरी निर्गुण निश्चळ परमात्मा जशाच्या तसाच असतो. तो नाहीसा होत नाही. त्याचप्रमाणे निर्गुण भक्तीही अचलच असते. तिचाही नाश होत नाही. सायुज्यमुक्ती ही केवळ शाश्वत असते, हे जाणून घ्यावे.}
{निर्गुण परमात्म्याशी अनन्य असणे हीच सायुज्यता होय. सायुज्यता म्हणजे स्वस्वरूपता. तिलाच निर्गुण भक्ती म्हणतात.}
हे सर्व वाचून सामान्य मनुष्याला प्रश्न पडतो की मी क्षणभरच काय तासंतास देवळाच्या समोर उभा असतो, कारण माझे घर देवळाच्या समोरच आहे, पण मुक्तीचे सोडा, कणभर देखील मन:शांती प्राप्त होत नाही, याला काय करावे ? याचे उत्तर माऊली आपल्याला पुढे सांगत आहेत.
संतांची वचनांचे अर्थ कळण्यासाठी मनुष्याची त्या विषयातील थोडी तयारी असावी लागते. मूल सकाळी शाळेत गेले आणि संध्याकाळी शिक्षण पूर्ण करून घरी आले असे होत नाही. तद्वतच संत साहित्याचे आहे. माऊली आपल्याला देवाच्या दारी उभे राहायला सांगत आहेत. सामान्य मनुष्य देवाच्या दारी याचा अर्थ देवळाच्या दारी असा घेत असतो. म्हणून अभंग वाचता वाचता तो मनाने देवळाच्या दारी जाऊन उभा राहतो, पुढची ओळ वाचतो आणि त्याला त्वरित देवाचे दर्शन व्हावे अशी अपेक्षा असते, पण तसे होत नाही. याला अनेक कारणे आहेत.
सर्व संतांनी सांगितले आहे की देव सर्वत्र आहे. देव नाही अशी जागाच नाही. जशी हवा नाही अशी जागा नाही, आकाश नाही अशी जागा नाही, तसे देव नाही अशी जागा नाही. थोडक्यात देव सर्वत्र आहे याचे भान ठेवणे, ते निरंतर टिकणे म्हणजे देवाच्या दारी उभे रहाणे. थोडक्यात आपण नित्य देवाच्या दारी उभे आहोत. याची जाणीव देवाला आहेच, परंतु आपल्या डोळ्यांवर मायेचा पडदा असल्याने देव समोर आहे याची जाणीव आपल्याला अत्यंत क्षीण असते. ही जाणीव विकसित करणे महत्वाचे. ते कार्य भगवंत संतांच्या माध्यमातून करीत असतो.
मनुष्य देवळात जातो, तेव्हा तो देवळाबाहेर आपल्या चपला काढून ठेवतो. देवळाचा उंबरठा ओलांडताना आपला मान, अभिमान, प्रपंच बाहेर ठेवून देवाचे दर्शन घ्यावे असे त्यात अभिप्रेत असते, परंतु मनुष्य देवळात एकटा जात नाही, त्यासोबत वरील सर्व सोबती असतात, त्यामुळे देव त्याला दर्शन देत नाही. एक मनुष्य देवळाबाहेर भिक मागतो आणि हा देवळात जाऊन भीक मागतो.
माऊली क्षणभर उभे रहायला सांगतात. कोणतीही गोष्ट क्षणात होत असते. क्षण युगाचा निर्माता आहे असे म्हटले जाते. काळ अनंत आहे, त्यामानाने आपले आयुष्य क्षणभरच!! बर कोणत्या क्षणाला मृत्यू येईल हे मनुष्याला माहीत नसते, तसे कोणत्या क्षणाला सद्गुरू कृपा करतील हे ज्ञात नसते.
उभा असलेला मनुष्य जागा असतो. त्याचे डोळे उघडे असतात, म्हणजे तो नीट पाहू शकतो. उभा मनुष्य सतत सावध असतो. इथे समर्थांची शिकवण आठवते.
“अखंड सावधान असावे | दुश्चित कदापि नसावे ||” थोडक्यात मनुष्याने क्षणोक्षणी अत्यंत सावध राहून सर्वत्र भरून राहिलेल्या देवाची अनुभूती घेण्यासाठी अखंड नामस्मरण करण्याचा प्रयत्न करायला हवा.
माऊलींनी सांगितल्याप्रमाणे वागले तर आपल्याला त्याला चारी मुक्ती नक्कीच लाभतील. हे संत वचन आहे, ते सत्य असणारच. मग आपल्या मनात प्रश्न होतो, आम्हाला त्याचा लाभ होणार की नाही आणि कसा होणार ? सर्व संत उत्तम शिक्षक असतात. माऊलींनी याचे उत्तर पुढील ओळीत दिले आहे.
“हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा।पुण्याची गणना कोण करी।।२।।”
माऊली म्हणतात, तू सतत हरिचे नाम घे. त्याची गणना करू नकोस. मनुष्याला जिवंत राहण्यासाठी श्वसन करावे लागते. मग मनुष्य असे म्हणत नाही की आज मी फक्त पाचवेळाच श्वसन करेन, मला कंटाळा येतो, सारखे श्वसन करण्याचा. तद्वतच मनुष्याने सतत नामस्मरण करावे, हरिचे नाम घ्यावे असे माऊली आपल्याला सांगतात. नामयोगी असलेले माझे सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात,
“नाम सदा बोलावे, गावे, भावे जनासी सांगावे”
मुखात नाम येणे किंवा नामस्मरण करावेसे वाटणे हेच मुळात मोठे पुण्य आहे. मानव देहधारी असलेला जीवच फक्त नाम घेऊ शकतो, बाकी इतर योनींतील जीवांना
ही सुविधा उपलब्ध नाही आणि त्यामुळे नाम घेण्यासाठीच जीवाला मनुष्य देह प्राप्त झाला आहेस असे सर्व संत सांगतात. मनुष्याने हे ध्यानात ठेवून अखंड नाम घेण्याचा प्रयत्न करावा. हेच मोठे पुण्य.
नाम सतत घेतले पाहिजे. वेळ मिळाला की नाम घेतले पाहिजे. असे करता आले तर नामाशिवाय क्षण ही फुकट जाणार नाही. नामस्मरणाला वेळ मिळत नाही ही लंगडी सबब आहे. जेवढा रिकामा वेळ मिळतो तेवढ्या वेळात जरी रोज नामस्मरण केले तरी नामाच्या राशी पडतील. खरोखर आपण रोज किती वेळ फुकट घालवितो.
नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की, नाम उच्चारणारा व ते ऎकणारा दोघेही उध्दरून जातात. भक्ताचे सर्व दोषहरण करुन नाम त्याला दोषमुक्त करते, म्हणून जड-जीवांना तारणारे नामस्मरणच आहे. एकाच नामस्मरणाची शेकडो-हजारो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात. रामाची भक्ती करणारा राम होतो. कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो. म्हणून मनुष्याने पापपुण्याच्या हिशेबात न गुंतता नाम घेणे जास्त हिताचे.
☆ जानुझ कोरझाक – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
दर शिक्षक दिनाला मला पोलंडमधील जानुझ कोर्झाक या शिक्षकाची आठवण येते. शिक्षणतज्ज्ञ आणि बालमानशास्त्राचा अभ्यास असणारा कोर्झाक मुलांसाठी काम करायचा. आई वडील नसलेली १९२ ज्यू बालकांसाठी त्याने बालगृह काढले. त्या बालगृहात त्याने अनेक उपक्रम केले. तो मुलांना शिकवायचा.
जर्मनी ने पोलंडवर आक्रमण केले.
त्या ज्यू मुले असलेल्या बालगृहाचा ताबा घेतला व ज्यू साठी असलेल्या छळ छावणीत मुलांना नेले. कोर्झाक ला तिथे न थांबण्याची सवलत दिली. पण माझी मुले जिथे राहतील तिथेच मी राहील अशी भूमिका त्याने घेतली. तिथे अतिशय हाल असूनही तो तिथेच राहिला. शेवटी गॅस चेंबर मध्ये त्या मुलांना पाठवण्याचा दिवस आला. कोर्झाक ने मुलांना नवे कपडे घालायला सांगितले. एका लहान मुलाला त्याने कडेवर घेतले व सर्वांच्या पुढे तो चालत राहिला. त्याला पुन्हा जर्मन सैनिकांनी तुम्ही पळून जा अशी सवलत दिली. यापूर्वीही अशी सूचना अनेकदा दिली. पण माझी मुले तुम्ही मारणार असाल तर मग मलाही मारा असे त्याने सांगितले आणि गॅस चेंबर मध्ये त्याने मृत्यू पत्करला…
मुलांवर इतके प्रेम करणाऱ्या या शिक्षकाला शिक्षकदिनाच्या दिवशी सर्वांनी आठवायला हवे…….?
लेखक : हेरंब कुलकर्णी
प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मागील काही भागातून आपण डार्कवेब बद्दल माहिती घेत आहोत. त्यात आपण याचा वापर कोण करते? सरकारचे त्यावर नियंत्रण का नाही तसेच डार्कवेबचा वापर करणे कायद्याने प्रतिबंधित आहे का याचा मागोवा घेतला. आज आपण त्यातीलच एक गोष्ट बघणार आहोत.
‘रेड रूम’
डार्कवेबचा विषय निघाला आणि रेडरूम बद्दल चर्चा झाली नाही असे सहसा होत नाही. ज्यांना डार्कवेब ही गोष्ट माहिती आहे त्यांना रेडरूम हेही माहित असते. अनेकदा तर लोकांना आधी रेडरूम बद्दल माहिती मिळते आणि नंतर त्याबद्दल जास्त माहिती घेताना डार्कवेब बद्दल माहिती मिळते.
सर्वप्रथम ही ‘रेडरूम’ काय भानगड आहे ते पाहू. होय… भानगडच. कारण रेडरूम बद्दल तुम्हाला जी माहिती मिळेल त्यानुसार, रेडरूम म्हणजे अशी जागा ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीवर अत्याचार केले जातात किंवा त्याची हत्या केली जाते आणि ती घटना अनेक जण मनोरंजन म्हणून बघतात. थोडक्यात WWE मध्ये असते ना, दोन, चार जण एकमेकांना हातात येईल त्या गोष्टीने बदडतात आणि लोकांना ते बघण्यात आनंद वाटतो. इथे फक्त दोन गोष्टी बदलतात. पहिली गोष्ट म्हणजे इथे ज्या व्यक्तीवर अत्याचार केले जातात ती व्यक्ती सहन करण्याशिवाय काहीच करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे प्रेक्षक आपल्या घरी डार्कवेब इंटरनेटचा वापर करून आपल्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर हे सगळे बघू शकतात. या साठी ते दिलेल्या लिंकवर बीटकॉईन किंवा इतर एखाद्या डिजिटल करन्सीच्या रुपात पेमेंट करतात.
काही वेळेस तर असेही सांगितले जाते की यात तुम्ही दोन पध्दतीने भाग घेऊ शकतात. एक म्हणजे प्रेक्षक म्हणून. आणि दुसरे म्हणजे कोणत्या पद्धतीचा अत्याचार करायचा हे सांगून. हे सगळे लाइव्ह घडत असते, आणि हे बघण्यासाठी लोक हजारो / लाखो रुपये खर्च करतात.
आता कुणाला असे वाटेल की एखाद्या निर्बल माणसावर अत्याचार करण्यात किंवा पाहण्यात कुणाला काय मजा येत असेल? आणि त्यासाठी कुणी हजारो, लाखो रुपये कुणाला का देतील? हाच विचार माझ्याही मनात आला होता. पण डार्कवेबवर अशा लिंक दिसतात हे मात्र खरे आहे.
तुम्हाला आता रेडरूम म्हणजे काय हे थोडक्यात माहिती झाले असेल. आता याच्या पुढील प्रश्न. हे खरंच अस्तित्वात आहे का?
माझ्या मते अशा कोणत्याही रेडरूम डार्कवेबवर अस्तित्वात असणे जवळपास अशक्य आहे. का? कारण डार्कवेबचे काम करण्याची पद्धत. याआधीच्या भागात आपण पाहिले आहे की डार्कवेब क्लाइंट आणि सर्व्हर याची ओळख पटणे अवघड व्हावे यासाठी मास्किंग करत असते. त्यातून काही जण VPN चाही वापर करतात. त्यानुसार data अनेक वेगवेगळ्या आयपीवर पाठवला जातो. अशा अनेक ठिकाणाहून फिरत तो क्लाइंट पर्यंत पोहोचतो. इंटरनेटचा स्पीड लक्षात घेता अशा ठिकाणी लाइव्ह स्ट्रीमिंग कितपत शक्य आहे? म्हणजे टेक्निकली हे शक्य वाटत नाही. मग यात शक्यता कोणती असेल? तिथे एखादी लिंक देऊन झूम किंवा गुगलमिट सारख्या ठिकाणी सहभागी करून घेणे. पण इथे डार्कवेब वापरले जात नाही. डीपवेबचा यात वापर होऊ शकतो. ( गुगलमिट, झूम या गोष्टी डीपवेब प्रकारात मोडतात. कारण त्याचा वापर करण्यासाठी ज्याने अशी मिटिंग अरेंज केली असेल त्याची परवानगी लागते. )
रेडरूम बद्दल जर आपण कोणत्याही तज्ञाला विचारले तर त्याचे उत्तर असते, ‘मी याबद्दल ऐकले आहे पण कधीही रेडरूममध्ये गेलो नाही.’
काही जण आता असेही विचारतील की युट्युबवर तर याबद्दलचे अनेक व्हिडिओ दाखवले जातात. ते काय आहे? ते सगळे व्हिडिओ हे मुद्दाम बनवले जातात. किंवा अनेकदा वेगवेगळ्या चित्रपटातील क्लिपला ग्रेस्केल मध्ये ( म्हणजे black & white बनवून ) बदलून पोस्ट केले जातात. त्यामागे पोस्ट करणाऱ्याची मानसिकता ही थोडीशी मस्करी करण्याची किंवा आपल्याला काहीतरी जास्त माहिती आहे हे इतरांना सांगण्याची असते.
असे सगळे असूनही मग डार्कवेबवर ‘रेडरूम’ बद्दलच्या लिंक का असतात? किंवा चार दिवसात ‘रेडरूम’ सेशन होणार आहे अशी लिंक का आढळते?
याला दोन कारणे आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे काही जणांच्या मनात अशा विचित्र भावना निर्माण होत असतात. काहीतरी थ्रिल म्हणून ते अशा ठिकाणी रजिस्ट्रेशन करतात. पैसे भरतात आणि फसले जातात. ज्याला पैसे मिळाले तो नंतर गायब होतो. आपण कुणाला पैसे पाठवले हेच माहिती नसेल तर तुम्ही त्याला पकडणार तरी कसे? म्हणजेच फसवणुकीसाठी अशा लिंकचा वापर अनेक hacker करतात.
याचे दुसरे कारण म्हणजे अशा अनेक लिंक काही देशाच्या सुरक्षा यंत्रणाच बनवत असतात. अशा ठिकाणी जे लोक येतात त्यांची माहिती घेऊन त्यांना अटक केली जाते. हा एक प्रकारचा सापळा असतो. अनेक विकृत लोक या सापळ्यात अडकतात आणि त्यांना योग्य ते शासन किंवा समुपदेशन केले जाते.
अनेकदा डार्कवेब पेक्षाही विचित्र गोष्टी आपल्या सर्फेस वेबवर बघायला मिळतात. त्याचे साधे उदाहरण म्हणजे काही जण आत्महत्या करताना फेसबुक लाइव्ह करतात. काही गेम असे असतात की त्याचा उपयोग लहान मुलांना आत्महत्या करण्यास किंवा कुणाची हत्या करण्यास प्रवृत्त करतात. अनेक खेळांवर तर सरकारने बंदीही घातली आहे. आणि हे सगळे सर्फेस वेबवर चालते.
थोडक्यात ‘रेडरूम’ ही गोष्ट डार्कवेबवर प्रत्यक्षात अस्तित्वात असणे जवळपास अशक्य आहे.
मागील आठ भागांच्या लेखमालेतून डार्कवेब बद्दलची माहिती सोपी करून सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. पुढेमागे अशीच एखादी लेखमाला परत घेऊन येईन, तो पर्यंत रामराम… धन्यवाद…
(ही अतिशय महत्वपूर्ण माहिती देणारी लेखमाला दर सोमवारी आणि मंगळवारी प्रकाशित होईल)
मागील एका भागात मी म्हटले होते की, डार्कवेबला सगळ्यात जास्त फंडिंग अमेरिकन सरकार तसेच गुगल सारख्या काही कंपन्या करतात. आता अमेरिकन सरकार जर फंडिंग करत असेल तरी त्याचे नियंत्रण का नाही? याचे कारण आहे नेटवर्कची काम करण्याची पद्धत.
ज्यावेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्त कॉम्प्युटर / मोबाईल किंवा इतर काही डिव्हाईस एकमेकांशी जोडले जात असतील तर त्याला नेटवर्क असे म्हणतात. अशा ठिकाणी एक कॉम्प्युटर हा माहिती मागवणारा आणि दुसरा माहिती पुरवणारा असतो. जो माहिती मागवतो त्याला क्लाइंट असे म्हणतात तर जो माहिती पुरवतो त्याला सर्व्हर असे म्हणतात. वेब कोणतेही असो, सर्फेस / डीप किंवा डार्क, त्याचे कामही असेच चालते.
सर्फेस वेबसाठी वापरले जाणारे सर्व्हर हे फिक्स असतात. ते कोणत्याही कंपनीचे असोत, त्याची नोंद डोमेन रजिस्टर करणाऱ्या ठिकाणी केलेली असते. म्हणून तर गुगलचे मेल याहूला जाऊ शकतात. किंवा रेडीफमेल वरून जीमेलवर मेल पाठवणे शक्य होऊ शकते. अशा ठिकाणी नियंत्रण ठेवणे शक्य असते. पण या उलट डार्कवेबचे असते. इथे निर्माण होणाऱ्या कोणत्याही सर्व्हरची नोंद कुठेही नसते. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही.
एक उदाहरण देतो. आजकाल आपण टीव्हीवर अपहरण कथा बघतो. त्यात अपहरण करणारे गुंड फोन करण्यासाठी एक साधा फोन घेतात, एक खोट्या नावाने सीम घेतात. त्यानंतर एखाद्या मुलाचे अपहरण करतात आणि त्या खोट्या नावाने विकत घेतलेल्या सीमवरून अपहरण केलेल्या मुलाच्या घरच्यांना फोन करतात. एकदा का त्यांना पैसे मिळाले की ते विकत घेतलेले सीम तोडून फेकून देतात. अशा वेळी पोलिसांना त्या गुंडांना पकडणे अवघड बनते. तीच गोष्ट इथेही असते. तिथे पोलीस गुंडांना पकडू शकतात कारण त्यात पैशाची देवाण घेवाण प्रत्यक्षपणे केली जाते. इथे तर व्यवहार देखील बीटकॉईन सारख्या क्रिप्टोकरन्सी मध्ये केले जातात. मग त्यावर नियंत्रण ठेवणार कसे?
अजून एक उदाहरण देतो. अनेकांनी नेटवर्किंगच्या LAN ( Local Area Network ) या प्रकाराबद्दल ऐकले असेल. मोठ्या कंपन्या किंवा ऑफिसमध्ये हा प्रकार अनेकांना बघायला मिळेल. तिथे एक सर्व्हर असतो त्यावर software install केलेले असते. त्याला इतर कॉम्प्युटर ( क्लाइंट ) जोडलेले असतात. क्लाइंटवर तुम्ही केलेले काम सर्व्हरवर सेव्ह होते. समजा अशा ठिकाणी तुम्ही एका क्लाइंटवरून दुसऱ्या क्लाइंटला काही संदेश पाठवला तर तो सरकारी यंत्रणेला माहिती होईल का? नाही होणार, कारण इथे इंटरनेटचा वापर झालेला नाही. LANचा वापर झालेला आहे. अशीच काहीशी गोष्ट डार्कवेब बाबतही लागू होते. उद्या समजा मी माझ्या कॉम्प्युटरवर एखादी .onion साईट बनवली आणि त्याची लिंक तुम्हाला पाठवली, आणि आपले कॉम्प्युटर इंटरनेटशी जोडलेले असतील तर तुम्ही त्या लिंकच्या आधारे माझ्या कॉम्प्युटरवरील ती साईट बघू शकाल. यावेळी तुमचा डिव्हाईस हा क्लाइंट असेल आणि माझा कॉम्प्युटर हा सर्व्हर. पण ज्यावेळी मी माझा कॉम्प्युटर बंद करेन, लिंक काम करणार नाही. इथे इंटरनेटचा वापर फक्त दोन डिव्हाईस जोडण्यासाठी केला आहे. अशा वेळी सरकारला आपल्यात काय संदेश दिले घेतले गेले हे आपल्या दोघांपैकी कुणा एकाच्या डिव्हाईसला hack केल्याशिवाय किंवा आपले डिव्हाईस त्यांच्या ताब्यात घेतल्याशिवाय समजू शकणार नाही. समजा माझा कॉम्प्युटर सरकारी यंत्रणेने hack केलाच आणि त्यावेळी मी VPN (Virtual Private Network) वापरत असेल तर जोपर्यंत सरकारी यंत्रणा माझ्यापर्यंत पोहोचतील, मी माझे स्थान बदललेले असेल. हीच गोष्ट आहे की डार्कवेबवर कोणतेही सरकार नियंत्रण ठेऊ शकत नाही.
आज आपण इथेच थांबू, पुढील भागात आपण डार्कनेटवरील ‘रेड रूम’ या प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत… तोपर्यंत रामराम…
☆ योग्य लेखन — लेखक : श्री अनिल विद्याधर आठलेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
बोलत असताना किंवा लिहिताना केवळ शब्दच नाही तर अंकदेखील आपण चुकीचे उच्चारतो. नक्की कोणता आणि कसा उच्चार योग्य आहे हेच अनेकदा माहीत नसतं त्यामुळे असं होतं.
उदाहरणार्थ –
१९ = एकोणवीस ❎❎❎
एकोणीस ✅✅✅
४४ = चौरेचाळीस ❎❎❎
चव्वेचाळीस ✅✅✅
७८ = अष्टयाहत्तर/अष्टयात्तर ❎❎❎
अठ्ठयाहत्तर ✅✅✅
८८ = अष्टयाऐंशी ❎❎❎
अठ्ठयाऐंशी ✅✅✅
९५ = पंच्यांण्णव ❎❎❎
पंचाण्णव ✅✅✅
(संदर्भ : महाराष्ट्र शासन, ०६ नोव्हेंबर २००९ च्या आदेशानुसार )
क्रमवाचक संख्याविशेषणांच्या बाबतीत एक महत्त्वाचा उल्लेख –
पहिली चार क्रमवाचक संख्याविशेषणे अनियमित आहेत –
– पहिला/ली/ले/ल्या
– दुसरा /री/रे/र्या
– तिसरा/री/रे/र्या
– चौथा/थी/थे/थ्या
पाच अंकापासून मात्र पुढील सर्व अंकांना ‘वा’ हा प्रत्यय लागतो.
उदाहरणार्थ – पाचवा, सातवा, बारावा इ.
#महत्त्वाचा उल्लेख –
ज्या अंकात उपान्त्य ( सोप्या भाषेत – शेवटच्या अक्षराच्या आधीचं ) अक्षर दीर्घ (‘ई’) तर उपान्त्य अक्षर म्हणजेच ‘ई’ स्वर असणारे अक्षर र्हस्व होईल.
उदाहरणार्थ –
एकोणीस – एकोणिसावा
वीस – विसावा
बावीस – बाविसावा
(संदर्भ – मराठी शब्दलेखनकोश, प्रा. यास्मिन शेख)
तसे साधेच नियम आहेत, पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
मराठी आपली मातृभाषा आहे असं आपण म्हणतो. ती अभिजात भाषा म्हणून घोषित झाली पाहिजे अशीही आपली अपेक्षा असते, पण आपल्याच भाषेतील अशा छोट्या-छोट्या चुका टाळण्याच्या दृष्टीने आपण काही खास असे प्रयत्न करतो का?
बघा, विचार करा.
लेखक : श्री अनिल विद्याधर आठलेकर
प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी
मो ९४०३०९८११०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ डॉ. आनंदीबाई जोशी… भाग – २ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
३१ मार्च… भारताच्या पहिल्या एम. बी. बी. एस. महिला वैद्य अर्थात लेडी डॉक्टर म्हणून प्रचंड गाजलेल्या मराठमोळ्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा जन्मदिन
जन्म: ३१ मार्च १८६५, पारनाका, कल्याण.
मंडळी, कल्पना करा आज आपण आपले अपत्य परदेशी जायला निघाले, विशेषतः मुलगी जात असेल तर किती चिंताक्रांत होतो? साधे पुण्याहून मुंबईलाही आज आपण मुलीला एकटे पाठवत नाही. १२५ वर्षापूर्वीचा हा इतिहास वाचा. मुलींना साधे प्राथमिक शाळेतही पाठवत नव्हते त्या काळी आनंदीबाईनी एवढे धाडस केले, काय सोपी गोष्ट आहे? त्यात आनंदीबाई पूर्ण शाकाहारी होत्या, नऊवारी पातळ हाच आनंदीबाईंचा पोशाख होता. जहाजावर देखिल आनंदीबाईची खूप उपासमार झाली. फक्त बटाटा वेफर्स आणि मिळाली तर फळे यावर आनंदीबाईनी दोन महिने काढले, कारण बाकी सर्व पदार्थात काहीना काहीतरी मांसाहारी पदार्थ मिसळल्याचा वास आनंदीबाईंना यायचा. यातच आनंदीबाईंना आजारपण आलं. पुढे अमेरिकेतसुद्धा ४ वर्षे आनंदीबाईंची उपासमारच झाली. भारतीय पद्धतीचं अन्न आनंदीबाईंना कधीच मिळालं नाही. परदेशी कपडे वापरायचे नाहीत म्हणून आनंदीबाई नऊवारी पातळ नेसून धाबळीचे जाड पोलकं घालत असत. अमेरिकेतली बर्फाळ थंडी आनंदीबाईचं शरीर चिरत होती. पुन्हा यात कठीण अभ्यास, स्वत:चा स्वयंपाक स्वत: करणे, समाज-नातलगांची दूषणं सहन करणे हे सर्व सोसून आनंदीबाई आपलं साध्य कार्य करत होत्या. अमेरिकेतही आनंदीबाईंना कुत्सित वागणूक मिळाली. तिथे फक्त कार्पेंटरबाई आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या अशा काही चांगल्या महिला सोडल्या तर बऱ्याच जणांनी आनंदीबाईना खूप त्रास दिला. प्रवासात सुद्धा जहाजावर पुरुषांच्या वासनेच्या नजरा आनंदीबाईना नकोसं करून टाकत असत. जिच्या सोबतीने आनंदीबाई हे सर्व साध्य करण्यास निघाल्या होत्या, त्या अमेरिकन बाईचं वागणंही ठीक नव्हतं. या सर्वाचा आनंदीबाईच्या मनावर व शरीरावरही दुष्परिणाम होत गेला. सतत अर्धपोटी राहिल्याने आजारपण आनंदीबाईंच्या पाठी लागलं. भारतातले कर्मठ लोक तर म्हणत असत की आता आनंदी ख्रिस्ती होऊनच येईल. हाडं चघळायला लागेल. अमेरिकेत आनंदीबाईच्या सहवासात येणाऱ्या मिशनरीज त्यांना ख्रिस्ती हो असा उपदेश करीत. पण स्वदेश, स्वपोशाख (नऊवारी पात्तळ-पोलकं), पूर्ण शाकाहारीपण, पूर्ण मराठी पद्धतीचं आचरण, उपास तापास याची घट्ट बांधिलकी हे सर्व आनंदीबाईंनी कधीच सोडलं नाही. हिंदू आणि मराठी संस्कृतीशी आनंदीबाईंनी कधीच प्रतरणा केली नाही. आज जे आनंदीबाईंचं छायाचित्र सर्वत्र प्रसिद्ध केलं जातं ते गुजराथी पद्धतीने नेसलेली साडी आणि दागिने घातलेलं चित्र दिसते. त्याबद्दल स्वत: डॉ. आनंदीबाईंनी लिहिलं आहे की इथल्या हवेत वारंवार फरक होत राहतो. नऊवारी कासोटा घातल्याने पाय थोडेसे उघडे पडतात. यासाठी पाचवारी गुजराथी पोशाख मी स्वीकारला. तो घातल्याने डोके व सर्व शरीर झाकले जाते. एकूणच पोशाखाबद्दल आनंदीबाईनी आपल्या पत्रात सविस्तर लिहिलं आहे. १६ नोव्हेंबर १८८६ दिवशी आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांना पहायला मुंबई बंदरात लोकांनी तुफान गर्दी केली होती. आनंदीबाईंचं स्वागत पुष्पवृष्टीनं करण्यात आलं. मुंबई बंदरात बोटीतून उतरण्यापूर्वीचं आनंदीबाईंच्या पोशाखाचं वर्णन असं आहेः नारायणपेठी काळी चंद्रकळा (नऊवारी), खणाचं पोलकं, कपाळावर चंद्रकळा, नाकात नथ, कानात कुडी, पायात बूट व स्टॉकिंग्ज असा थाट होता. आल्या तेव्हा आनंदीबाई आजारीच होत्या, परंतु हिंदुस्थानात घरी जायला मिळणार आणि घरचं मराठमोळं अन्न खायला मिळणार म्हणून आनंदीबाईची प्रकृती तात्पुरती सुधारली होती. आनंदीबाईंना अभिनंदनाच्या तारा, मानपत्रे येत होती. मानपत्रात आनंदीबाईंच्या उच्च शिक्षणाचा गौरव केला गेला. अमेरिकेत ११ मार्च १८८६ रोजी फिलाडेल्फिया येथे आनंदीबाईंना वैद्य विद्यापारंगत ही पदवी आणि पुरस्कार देण्यात आला. भारतातील पहिली महिला डॉक्टर म्हणून सर्व उपस्थितांनी आनंदीबाईंची उभे राहून जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात प्रशंसा केली होती. डॉक्टर होऊन आनंदीबाई स्वदेशी आल्या. पण एव्हाना आनंदीबाईंना क्षयाची बाधा झाली होती. बिगरगौरवर्णीय असल्यामुळे जहाजावर कुणाही परदेशी डॉक्टरने आनंदीबाईंना उपचारही दिले नाहीत. मायदेशी आल्यावर समुद्रोल्लंघन करून आलेली, त्यातून स्त्री डॉक्टर म्हणून इथले वैद्यही आनंदीबाईंचा दुस्वास करत होते,इथले डॉक्टर आनंदीबाईंना तपासूनही पाहात नव्हत. आनंदीबाईंना वयाच्या विशीतच क्षयरोग झाला. अमेरिकेत काॅर्पेंटर कुटूबियांनी आपल्या कुटुंबाच्या स्मशानात (ग्रेव्हयार्ड) आनंदीबाईंचे लहानसे थडगे बांधले. त्यावर आनंदी जोशी एक तरुण हिंदू ब्राह्मणकन्या, परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री अशी अक्षरे कोरून तिचे स्मारक केले. हे सगळे वाचल्यावर डॉ. आनंदीबाई जोशी किती थोर होत्या असं आपल्या मनात निनादत राहतं. आजही ते थडगे पहायला मिळते. काही राष्ट्रभक्त मराठी मंडळी आनंदीबाईंच्या थडग्याला आवर्जून भेट देतात, आदरांजली वाहतात. वयाच्या केवळ १८व्या वर्षी बोटीनं परदेशी जाणारी पहिली स्त्री, हालअपेष्टा सहन करीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणारी पहिली स्त्री. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही कुचेष्टा, अवहेलना, अपमान सहन करीत हाती घेतलेले जीवित कार्य जिद्दीने पूर्ण करणारी स्त्री. भारतीय (मराठी) रीतिभाती, शुद्ध शाकाहारी आहार सांभाळणारी, तरीही इंग्रजी भाषा उत्तम आत्मसात करून वैद्यकीय शिक्षण प्रकृती स्वास्थ्य सांभाळीत अभ्यासक्रम पूर्ण करणारी तरुणी. या सर्वाबरोबर पती, नातेवाईक, सुहृद यांना सतत पत्र लिहून त्यांच्याशी संवाद साधणारी डॉ. आनंदीबाई यांच्यावर त्यांच्या समकालीन आणि लेखिका असलेल्या काशीबाई कानिटकर यांनी चरित्र लिहिले आहे. अंजली कीर्तने यांनी संशोधन करून आनंदीबाई या नावाचं एक चरित्र लिहिलं आहे. श्री.ज. जोशी यांनी आनंदीबाईंवर आनंदी गोपाळ ही कादंबरी लिहिली आहे. आनंदीबाईंवर आनंदीबाई हे नाटकही रंगभूमीवर आलं आहे १५०हून अधिक वर्षे झाली तरी डॉ. आनंदीबाई जोशींची वैचारिक संघर्षांच्या संदर्भात भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आजही वाचकांना, अभ्यासकांना, स्त्रियांना भुरळ पडते.
आनंदीबाई जोशी यांचे २६ फेब्रुवारी १८८७ रोजी निधन झाले.
आनंदीबाई जोशी यांना विनम्र अभिवादन.
– समाप्त –
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈