मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फुलराणी.. ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ फुलराणी … ☆ श्री सुनील शिरवाडकर

खूप खूप वर्षांनी काल बालकवींचा “फुलराणी” हातात घेतला. एक एक कविता वाचत गेलो. किती मोठ्या आनंदास आपण मुकलो होतो. शाळेत असताना ‘आनंदी आनंद गडे..’, श्रावणमासी हर्ष मानसी..’ या कविता अभ्यासाला होत्या. पण त्याच्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच केवळ त्या वाचल्या होत्या.

लहान मुल ज्या उत्कटतेने.. आनंदाने चहुकडे पाहत असते.. अगदी त्याचप्रमाणे बालकवी निसर्गाकडे बघत.म्हणून तर ते ‘आनंदी आनंद गडे..’ सारखी नादावुन टाकणारी कविता लिहू शकले. या कवितेत वारा वाहतो..चांदणे फुलते..पक्षी गातात. साध्याच गोष्टी.. पण किती नादमाधुर्य.

कल्पना विलास करणे हे बालकवींचे अजून एक वैशिष्ट्य. निसर्गातील द्रुष्ये पाहून कल्पनेने ते त्यावर शब्दांचा साज चढवतात.

इवलाच अधर हलवून

जल मंद सोडीते श्वास..

इवलाच वेल लववुन

ये नीज पुन्हा पवनास..

किती सुंदर कल्पना. पण असे जरी असले तरी कधी कधी ते कल्पनाविलासाच्या बाहेर येऊन निसर्गाचे चित्रण करतात. यातली मला सर्वाधिक भावलेली कविता म्हणजे “औदुंबर”. फक्त आठ ओळीतून बालकवी आपल्या एखादे  डोळ्यासमोर एक लँडस्केप उभे करतात.

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन

निळासावळा झरा वाहतो बेटांबेटांतुन.

चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे

शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे

*

पायवाट पांढरी तयांतून अडवीतिडवी पडे

हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे.

झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर

पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.

रंगांची किती मुक्त उधळण आहे या कवितेत.बालकवींना रंगाची विलक्षण आसक्ती.एका कवितेत ते म्हणतात..

पुर्वसमुद्री छटा पसरली रम्य सुवर्णाची

कुणी उधळली मुठ नभी ही लाल गुलालाची.

“फुलराणी” ही तर अजरामर कविता….

हिरवे हिरवे गार गालिचे

हरीत तृणांच्या मखमालींचे.

त्या सुंदर मखमालीवरती

फुलराणी ही खेळत होती.

अशीच एक कविता. ” तू तर चाफेकळी “ नावाची.त्यातील कल्पनाविलास पहा..

क्रीडांगण जणू चंचल सुंदर भाल तुझे हे गडे

भुरुभुरु त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळे उडे.

श्रावणातील वातावरणाचे वर्णन करताना बालकवी म्हणतात..

क्षणात येते सरसर शिरवे

क्षणात फिरुनी ऊन पडे.

पहाटेच्या दाट धुक्याचे वर्णन करताना कवी म्हणतो..

 शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनी

हर्षनिर्भरा नटली अवनी.

 लाल सुवर्णी झगे घालुनी

हासत हासत आले कोणी.

पानापानातुन.. ओळीओळीतुन शब्दांची श्रीमंती उधळणारा हा निसर्गकवी.”आनंदी आनंद गडे..इकडे तिकडे चोहीकडे” असे म्हणणारा..पण त्याला आयुष्य लाभले जेमतेम अठ्ठावीस वर्षांचे.१९०७ साली पहिले मराठी कवी संमेलन जळगाव येथे झाले. त्या संमेलनात त्यांना “बालकवी” ही पदवी देण्यात आली.आणि त्यानंतर अकरा वर्षांनी रेल्वे अपघातात त्यांचा करुण अंत झाला. शेवटच्या काळात त्यांच्या मनात उदासिनतेची छाया पसरली होती का? कारण एका कवितेत ते म्हणतात..

सुंदर सगळे, मोहक सगळे

खिन्नपणा परि मनिचा न गळे,

नुसती हुरहूर होय जिवाला

कां न कळे काही.

आणि मग..

कोठुनी येते मला कळेना

उदासीनता ही हृदयाला

काय बोचते ते समजेना

ह्रदयाच्या अंतरह्रदयाला.

बालकवींनी या जगाचा निरोप घेतला त्याला मागच्या वर्षी शंभर वर्षे पुर्ण झाली.आणि “फुलराणी” च्या प्रकाशनाला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण झाली. विस्मरणात गेलेल्या या प्रतिभावंत कवीच्या स्मृतींना वाहिलेली ही एक आदरांजली.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जागतिक कठपुतळी दिवस २१ मार्च ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

जागतिक कठपुतळी दिवस २१ मार्च ☆ श्री प्रसाद जोग

साऱ्या जगभर २१ मार्च हा दिवस कठपुतळी दिवस म्हणून साजरा केला जातो.इराणचे कठपुतळी कलाकार जावेद जोलपाघरी यांनी हा डायस साजरा करण्याची कल्पना मांडली आणि २००३ पासून हा दिवस जागतिक कठपुतळी दिवस म्हणून साजरा केला जातो.

इसवीसन पूर्व ४ थ्या शतकात महाकवी पाणिनी यांच्या अष्टाध्याई ग्रंथामधे पुतळा नाटकाचा उल्लेख आढळतो. भगवान शंकरानी लाकडी मूर्तीमध्ये प्रवेश करून माता पार्वतीचे मनोरंजन करून या कलेची सुरवात केली. उज्जैन नगरी च्या राजा विक्रमादित्याच्या सिंहासनाला ३२ पुतळे जोडले होते आणि त्यातील प्रत्येक बाहुलीच्या तोंडी एक गोष्ट सांगितली आहे .त्या गोष्टी सिंहासन बत्तीशी म्हणून प्रसिद्ध आहेत.

जगातील जवळपास सर्वच संस्कृतींमध्ये कठपुतळीचा खेळ बघायला मिळतो. ह्याला मानवी हालचालींचे चित्रण म्हणता येईल. मनोरंजन ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती आधीपासूनच्या संस्कृतीमध्ये होती. कुठल्याही कथांना सत्यात उतरवण्याची क्षमता. कथा सांगण्यासाठी अभिनय ही गोष्ट वापरली जाते आणि अभिनय ही सुद्धा एक कला आहे जी त्या कथेला जिवंतपणा आणते. इतिहासात कथा दाखवण्यासाठी भारतातील लेणी आणि मंदिरांमध्ये छान छान प्रसंग हे दगडांमध्ये कोरून दाखवले आहेत. इजिप्तमधील भित्तिचित्रामध्ये देखील असे खूप प्रसंग आहेत. आपण मानवी हालचालींचे असे सूंदर चित्रण कुठेही पाहिले नसतील असे चित्रण त्या कलाकारांनी करुन ठेवले आहेत.

प्राचीन ग्रीक आणि इतर संस्कृतींमध्ये दहाव्या शतकातच ‘झेट्रोपे’ ह्या गोल आकाराच्या फिरणाऱ्या अशा यंत्राचा शोध लागला होता. ज्यात वेगामुळे आकृती हलण्याचा भास निर्माण व्हायचा.

चार्ल्स एमिल रेनॉड ह्याने मानवी चित्रांच्या कात्रणांचा वापर करुन त्यांचे हात पाय हलवून पाहिले ऍनिमेशन बनविले आणि तेसुद्धा कुठल्याही फिल्म विना. ते बनवून त्याने लोकांना आश्चर्यचकित केले.

विष्णुदास भावे हे सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या पदरी असणाऱ्या अमृतराव भावे यांचे पुत्र. विष्णुदास भावे हे स्वतः अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाल करवून घेता येऊ शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या विष्णुदास भावे यांनी बनवल्या होत्या. रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग बाहु्ल्या वापरून करावयाचा त्यांचा इरादा होता. परंतु तत्पूर्वी, कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी ‘खेळ’ करीत, त्याप्रमाणे खेळ रचण्याची चिंतामणराव पटवर्धनांनी भाव्यांना आज्ञा केली. १८४३ साली राजांच्या पाठबळावर भाव्यांनी सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणले. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील ‘दरबार हॉल’मध्ये नोव्हेंबर ५, १८४३ रोजी या नाटकाचा पहिला खेळ झाला. पुढे नाट्यलेखन व निर्मिती करून विष्णुदास भावे यांनी अनेक ठिकाणी प्रयोग केले. ९ मार्च १८५३ रोजी मुंबईला ‘ग्रांट रोड थिएटर’ येथे ‘इंद्रजित वध’ हा पहिला नाट्यप्रयोग केला. यानंतर विष्णुदास भावे यांनी १८६१ पर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्या नाटकांचे प्रयोग केले. मात्र १८६२ मध्ये त्‍यांनी आपला नाट्यव्यवसाय काही कारणाने बंद केला.

विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्ये या बोलक्या बाहुल्यांचा प्रयोग करणाऱ्या कलावंताच्या हातात आल्या. त्यांनी व त्यांच्या पत्‍नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांचे रहस्य उलगडले आणि विष्णुदास भाव्याना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला.

Attachments area

Preview YouTube video Amazing Puppet Street Show, in Manhattan – Ricky Syers

Amazing Puppet Street Show, in Manhattan – Ricky Syers

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सातवा — ज्ञानविज्ञानयोग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सातवा — ज्ञानविज्ञानयोग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्रीभगवानुवाच :

मय्यासक्तमना: पार्थ योगं युंजन्मदाश्रय: ।

असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ।।१।।

कथिय श्री भगवंत 

ऐश्वर्या विभूती सामर्थ्य गुणांनी पार्था तू युक्त 

माझ्या ठायी अनन्य भावे मत्परायण तू भक्त

सकल जीवांचा आत्मरूप मी सर्वांचा प्राण

चित्त करुनी एकाग्र ऐकुनी स्वरूप माझे जाण ॥१॥

*

ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषत: ।

यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ।।२॥

*

अतिगहन हे ज्ञान सांगतो तुजला पूर्ण विश्वाचे

यानंतर ना काही  उरते ज्ञान जाणुनी घ्यायाचे ॥२॥

*

मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।

यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वत: ।।३।।

*

सहस्रातुनी एखादा असतो यत्न करी मम प्राप्तीचा

मत्परायण होउनी एखाद्या आकलन मम स्वरूपाचा ॥३॥

*

भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च ।

अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ।।४।।

अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् ।

जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ।।५।।

*

पृथ्वी आप वायु अग्नी व्योम बुद्धी मन अहंकार

मम अपरा प्रकृतीचे हे तर असती  अष्ट प्रकार

सामग्र विश्व जिने धारिले जाण तिला अर्जुना

परा प्रकृती माझी तीच शाश्वत जाणावी चेतना ॥४,५॥

*

एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय ।

अहं कृत्स्नस्य जगत: प्रभवः प्रलयस्तथा ।।६।।

*

उत्पत्ती समस्त जीवांची प्रकृतीतूनी या उभय

जगताचे मी कारण मूळ निर्माण असो वा प्रलय ॥६॥

*

मत्त: परतरं नान्यत्किंचिदस्ति धनंजय ।

मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ।।७।।

*

जग माझ्यात ओवलेले सूत्रात ओवले मणि जैसे 

माझ्याविना यत्किंचितही जगात दुसरे काही नसे॥७॥

*

रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो: ।

प्रणवः सर्ववेदेषु शब्द: खे पौरुषं नृषु ।।८।।

*

हे कौंतेया जाणी मजला जलातील प्रवाह मी

चंद्राचे चांदणे मी तर  सूर्याचा प्रकाश मी

गगन घुमटाचा शब्द मी वेदांचा ॐकार मी

पुरुषांचे षुरुषत्व मी विश्वाचा तर या गुण मी ॥८॥

*

पुण्यो गन्ध: पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ ।

जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ।।९।।

*

पवित्र सुगंध मी वसुंधरेचा पावकाचे  तेज मी

सकल तपस्व्यांचे तप मी जीवसृष्टीचे जीवन मी ॥९॥

*

बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् ।

बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।।१०।।

*

धनंजया हे भूतसृष्टीचे बीज जाण मज 

विद्वानांची मी प्रज्ञा मी तेजस्व्यांचे तेज ॥१०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वेबच्या जाळ्यात गुंतलेले स्पायडरमॅन… भाग – 2 – लेखिका : डॉ. कल्पना सांगळे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ वेबच्या जाळ्यात गुंतलेले स्पायडरमॅन… भाग – 2 – लेखिका : डॉ. कल्पना सांगळे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

(IAP म्हणजे भारतातील बालरोगतज्ञांच्या संघटनेने काही guidelines दिलेले आहेत ज्यामध्ये ‘स्क्रीन time’ म्हणजेच तुमच्या मुलांचा दूरदर्शन, संगणक, मोबाईल, किंवा अजून अनेक स्क्रीन असलेली उपकरणे यावर जाणारा वेळ, तो किती असावा, व तो कोणत्या प्रकारे वापरला जावा ह्यावर मार्गदर्शन केलेले आहे.) 

इथून पुढे —

बाळाच्या आयुष्यातील पहिली दोन वर्ष ही त्याच्या मेंदूच्या वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतात. ह्या वेळेत त्याला योग्य चालना मिळाली तर बाळाचा मानसिक, बौद्धिक, आणि त्याच्या भाषेच्या वाढीचा आलेख उंचावतो.

IAP च्या guidelines अनुसार पाहिले दोन वर्ष बाळाला स्क्रीन टाइम अजिबात नको ! बाळ रडत आहे, लाव मोबाईल वर कार्टून, बाळ जेवत नाही लाव टीव्ही, आईला काम आहे तो एका जागी बसत नाही, दे लावून कॉम्प्युटर आणि बसू दे त्यासमोर! ह्या सवयी आपण लावत आहोत आणि त्यामुळे त्यांच्या जडणघडणीवर परिणाम होतोय हे कुणाच्या गावीही नाही!

दोन ते पाच वर्षापर्यंत एक तास किंवा कमी स्क्रीन time असावा. स्क्रीन मोठी असावी, म्हणजे लॅपटॉप किंवा टीव्ही, त्याच्या बरोबर पालकांनी देखील बसावे. तो काय बघत आहे ह्याकडे लक्ष द्यावे. शक्यतो शैक्षणिक गोष्टींसाठी यांचा वापर व्हावा. 

मनोरंजनासाठी स्क्रीन time ठेवला की नकळत त्याचा वापर वाढतो. त्याच बरोबर मैदानी खेळ, पुस्तके, त्याच्या वयाच्या इतर मुलांमध्ये मिसळणे, गोष्टी सांगणे, गोष्ट सांगताना आपण हावभाव करत गोष्ट सांगणे, जेणेकरून मुले आपल्या चेहऱ्याकडे नीट निरखून बघत असतात, त्यांना मग emotions चेहरा बघून कळायला लागतात. 

मुलांचे घरातील इतर लोकांबरोबर मिसळणे ही व्हायला हवे. दोन ते पाच ह्या वयामध्ये मुलांचे सोशल स्किल्स देखील घडत असतात. इथे जर स्क्रीन time जास्त झाला तर ते अनेक गोष्टीत मागे पडतात. 

आणि सर्वात महत्वाचे हे की आधी पालकांनी आपला स्क्रीन time कमी करावा. मुले अनुकरणातून शिकतात. त्यांच्यापुढे आपण आदर्श घालून दिला तर ते लवकर शिकतील.

पाच सहा वर्षाचे मुल असेल तर त्याला आपण काही नियम घालून द्यावेत. ह्या वयात मुले नियम नीट पाळतात, त्यांना ते पाळल्यामुळे एक प्रकारे आपण सुरक्षित आहोत अशी भावना निर्माण होते. आपण डिजिटल नियम घालावे ते वयानुरूप असावेत. वय वाढले की नवीन नियम आपण त्यात टाकावेत.

उदाहरणार्थ…

  1. स्क्रीन हे मुलांना शांत किंवा इतर गोष्टींवरून लक्ष हटवण्यासाठी वापरू नये.
  2. स्क्रीन time, मैदानी खेळ, अभ्यास, जेवण, कौंटुबिक वेळ आणि छंद ह्यांची योग्य सांगड घालावी. स्क्रीन झोपेच्या आधी किमान एक तास बंद असावा. त्यामधील नील प्रकाश झोप उडवण्यासाठी कारणीभूत ठरतो.
  3. ह्याच वयात मुलांना कॉम्प्युटर समोर योग्य पद्धतीने कसे बसावे ते शिकवावे, पोक काढून किंवा मान वाकवून बसू नये. 
  4. स्क्रीन चालू ठेवून multy tasking करायचा प्रयत्न करू नये, म्हणजे शाळेचा अभ्यास किंवा गृहपाठ करत असताना कॉम्प्युटर किंवा मोबाईल बंद ठेवावा.
  5. मुले कॉम्प्युटर वर असताना आपण अधून मधून त्यांच्याकडे लक्ष ठेवावे, ते काय बघत आहेत ह्यावर बारीक लक्ष ठेवावे. कुठले ही गेम्स किंवा प्रोग्राम, ज्यात हिंसा आहे किंवा addiction लागण्या सारख्या गोष्टी आहेत ते टाळावे. Privacy setting, browser आणि app साठी safe search engine, आणि योग्य antivirus आहे ना ते खात्री करून घ्यावी.
  6. मुलांना शांतपणे चिडचिड न करता आणि ठामपणे, “आता स्क्रीन time ची वेळ संपली आहे” हे सांगणे महत्वाचे आहे. असे सांगितले तर मुले ऐकतात.

जरा मुले मोठी झाली, टीन एज जवळ यायला लागले की त्यांना insagram, ट्विटर, What’sapp, telegram ची भुरळ पडायला लागते. आपण घरी कितीही बंधने लादायचा प्रयत्न केला तरी शाळेत, क्लास मध्ये, मित्रांच्या मार्फत त्यांना ह्या गोष्टी कळणारच आहेत. अश्या सोशल साईटचा वापर कुठल्या वयात करू द्यावा हे त्या प्लॅटफॉर्मवरच लिहिलेले असते. मुले हे platforms वापरायला लागली की काही गोष्टी आपण त्यांना सांगायलाच हव्यात.

  1. सोशल मीडिया वर आपण दुसऱ्यांना तसेच वागवले पाहिजे, जसे त्यांनी आपल्याशी वागावे याची आपण अपेक्षा करतो.
  2. आपली भाषा सुसंस्कृत असायला हवी. 
  3. इथे लिहिलेले किंवा पोस्ट केलेले फोटो हे कायम स्वरुपी राहू शकतात ह्याची त्यांना कल्पना द्यावी. त्याचा वापर कोणी वाईट कामासाठी करू शकतो हे ही समजावून सांगावे.
  4. आपल्या घरचा पत्ता, फोटो, किंवा कुठले ही password आपण सोशल मीडिया वर टाकू नये.
  5. सोशल मीडिया फ्रेंड ला भेटायला एकटे कधी ही जाऊ नये, घरातील मोठ्यांना बरोबर घेऊन जाणे.
  6. येथे कोणी तुम्हाला वाईट वागणूक देत असेल, bulling करत असेल तर तात्काळ घरातील जबाबदार व्यक्तीला सांगणे.

आणि इतके करून ही कोणी व्यक्ती तुमच्या मुलांना सोशल मीडिया वर त्रास देत असल्यास.. तुम्ही

  1. मुलाला कळू द्या की तुम्ही त्याच्यावर खूप प्रेम करता आणि कायम त्याच्या बरोबर असणार आहात.
  2. मुलाला सोशल मीडिया पासून काही काळ ब्रेक घेऊ द्या.
  3. वाईट मेसेजला उत्तर देऊ नका.
  4. ते मेसेज save करून ठेवा, नंतर reporting साठी कामी येतात.
  5. हा bully माहीत असल्यास त्याच्या पालकांशी बोला.
  6. शाळेत शिक्षकांना कल्पना द्या, बऱ्याच शाळेत काही पॉलिसीज असतात अश्या bully साठी.
  7. तरीही हा त्रास थांबला नाही तर आपण सायबर पोलिसांकडे तक्रार करू शकता. हे आपण childline phone no 1098 वर रिपोर्ट करू शकतो

थोडक्यात आताच्या वातावरणात, म्हणजेच ह्या माहितीच्या अणुस्फोट झालेल्या सोशल मीडियाच्या जाळ्यात आपण अडकलो आहोत. आपली मुले तर पुरती गुरफटून गेली आहेत. त्यांना ह्या वेब च्या जाळ्यातून सही सलामत बाहेर काढून त्या जाळ्याचा चांगला वापर करायला आपल्याला शिकवायचे आहे. काट्याने काटा काढायचा हा प्रकार आहे.

प्रयत्न नक्कीच करूयात ! 

– समाप्त – 

लेखिका :  डॉ. कल्पना सांगळे

पुणे.

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वेबच्या जाळ्यात गुंतलेले स्पायडरमॅन… भाग – 1 – लेखिका : डॉ. कल्पना सांगळे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ वेबच्या जाळ्यात गुंतलेले स्पायडरमॅन… भाग – 1 – लेखिका : डॉ. कल्पना सांगळे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

“मॅडम …मी ना … इंस्टावर माझ्या डान्स चे रील टाकत असते, ते तुम्ही लाईक करा हां …” वय वर्ष सहा असलेली आदिती मला सांगत होती.

“मी बाळाला तो चार महिन्यांचा असल्यापासून स्क्रीनवर सुंदर सुंदर कार्टून दाखवते, तो ते बघत असतो शांतपणे.”

“जेवतांना त्याला टीव्ही लावून द्यावाच लागतो मॅडम, त्याशिवाय त्याच्या घशाखाली घास उतरत नाही, आणि लावला की तो एक ऐवजी तीन पोळ्या पण खातो !”

हे संवाद ऐकल्यासारखे वाटतात ना ? आपल्याला आपल्या घरी, शेजारी, नातेवाईकांकडे ही अशी मुले नक्कीच सापडतील. ही तर फक्त सुरुवात असते, पुढचे डायलॉग मी सांगते तुम्हाला!

“मॅडम, दिवसातील निम्मा वेळ हा स्क्रीन समोर असतो, आता भिंगाचा चष्मा लागायचा बाकी आहे फक्त !” 

“टीव्ही बंद केला की चिडचिड आणि हातातील वस्तू फेकून मारतो, टीव्ही फोडेल म्हणतो ! मग चालू करूनच द्यावा लागतो.”

“COVID च्या काळात त्याला स्मार्ट फोन घेऊन दिला होता, रात्री चॅटिंग करत असतो, कसले कसले व्हिडिओ बघत असतो, सकाळी त्यामुळे लवकर जाग येत नाही, शाळा बुडते, यंदा दहावीला आहे, फोन पण काढून घेता येत नाहीये, काय करू मलाच समजत नाहीये !”

“मॅडम ह्याला online games ची चटक लागली आहे, कॉलेज मध्ये आहे, सारखे पैसे मागत असतो‌ एकदा दुसऱ्याच्या गाडीतील पेट्रोल चोरत असातांना पकडला गेला होता, ते शेजारी चांगले म्हणून पोलिसात नाही गेले पण उद्या दरोडे टाकायला लागला तर मी काय करू?”

अशा अनेक संवादांना मी सामोरी जात आहे सध्या.

मुद्दा एकच !       

माहितीचा (चांगली – वाईट / खरी – खोटी /उपयोगी – निरुपयोगी ) अमर्याद स्त्रोत्र मोबाइलच्या माध्यमातून, आपल्या हातात अणुबॉम्ब प्रमाणे आहे .त्याचा विस्फोट होतोय आणि ह्या माहितीच्या स्फोटामधून आपल्याला हवी ती आणि तेवढीच माहिती कशी मिळवावी हे आपल्याला शिकवले गेलेले नाहीये !

मागच्या पिढीच्या पालकांचे काम तसे सोपे होते. आताच्या इतकी स्पर्धा तेव्हा नव्हती, एकेका घरात किमान चार पाच मुले असायची. आजी, आजोबा आणि इतर मुलांबरोबर ती आपोआप मोठी होत गेली‌. फार तर दूरदर्शन होते, तो ही सवय लागण्या इतपत लावला जात नव्हता. एकत्र कुटुंब असायचे, शेजारी पण मुलांवर लक्ष्य ठेवून असत. एकंदर काळच वेगळा होता. आपली जडणघडण अशा वातावरणात झाली.

आताची मुले जन्मापासून इंटरनेट बाळे झालेली आहेत‌. आई वडील हौशी, आपल्या मुलाने सर्व आघाड्यांवर पुढेच असले पाहिजे ह्या हट्टापायी त्याला खूप लवकर स्क्रीन exposure देतात. जन्मानंतर देण्यात येणारी BCG लस देताना मोबाईल वर नर्सरी rhymes लावणारी फोन addict आई बघतली आहे मी. बाळाला स्क्रीन ची सवय आपण लावून देतो आणि मग ती सोडवायला मानसोपचारतज्ज्ञ आपल्याला हवे असतात. किती विरोधाभास आहे हा !

त्यात अजून भर म्हणजे रिॲलिटी शोज !

लहान मुलांचे रिॲलिटी शो आले आणि आपली मुले त्याचा भाग व्हावी अशी अनेकांची इच्छा व्हायला लागली. त्यात जरा बरे गाणारे किंवा नाचणारे असतील तर लगेच विविध क्लासेस लावून त्यांना बॉलिवूड नाच, हीप होप, लावणी, contemprary नाच, ब्रेक डान्स वगैरेंमध्ये पारंगत करून शो मध्ये टाकले जाते. अवघ्या सहा ते चौदा पंधरा वर्षांच्या मुलामुलींसाठी जी गाणी आणि नाच निवडला जातो तो कधी कधी त्या वयाला अजिबात शोभणारा नसतो. पण मुलांना मिळणारी प्रसिद्धी आणि पैसा पाहून पालक त्यांना प्रोत्साहन देतात. 

आठ वर्षाची मुलगी जेव्हा, “तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंगमहाल..” किंवा, “बाई गं.. कस्स करमत न्हाई….” गाण्यावर बैठकीची लावणी पेश करते, ते हावभाव अगदी बेमालूम करते, त्यावर शिट्ट्या आणि टाळ्या वाजवल्या जातात, शो चे परीक्षक कौतुक करतात आणि पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात तेव्हा मला हसावे की रडावे हेच समजत नाही.

हे सर्व बघणारा कमी वयाचा प्रेक्षकवर्ग, लैंगिक भावना कमी वयातच जागृत झाल्यावर काय करणार ? हे नक्की काय होतंय ते ही समजत नसते. मग मदतीला इंटरनेट असतेच. नको ते पोर्न बघायला एका बोटाच्या क्लिकचा अवकाश ! न कळत्या वयात नको ते दिसते. लहान वयात लैंगिक गुन्हेगारी मग वाढीस लागते. मुलींमध्ये फार लवकर हार्मोन्स वर परिणाम होऊन पाळी लवकर सुरू होण्याचे हे ही एक कारण असू शकते, अर्थात इतर अनेक कारणे आहेतच! 

त्याच बरोबर OTT नावाच्या प्लॅटफॉर्म वर सेन्सॉरशिप नसल्यामुळे सॉफ्ट पोर्न नावाचा जो प्रकार बोकाळला आहे, आणि त्याचा easy access हा भयावह आहे. इथे पालकांचे लक्ष नसेल तर आपली मुले नक्की काय बघतील आणि त्याचे काय परिणाम होतील त्याची कल्पनाच न केलेली बरी ! 

आपण आता मुलांना सोशल मीडिया, OTT, online games, ह्या आणि इतर अनेक गोष्टींपासून लांब ठेवूच शकणार नाही, हे आधी नीट समजून घ्यायला हवे. आपल्या हातात आता त्यांना इंटरनेट साक्षर करणे एवढेच आहे. ह्या सर्व अमर्याद माहितीतून आपण आपल्याला हवी ती माहिती कशी घ्यावी, स्क्रीन time किती असावा आणि तो कसा असावा ते मुलांना समजावून सांगणे गरजेचे आहे. ह्यावर आपण काय करू शकतो ते आता आपण बघूयात.

IAP म्हणजे भारतातील बालरोगतज्ञांच्या संघटनेने काही guidelines दिलेले आहेत ज्यामध्ये ‘स्क्रीन time’ म्हणजेच तुमच्या मुलांचा दूरदर्शन, संगणक, मोबाईल, किंवा अजून अनेक स्क्रीन असलेली उपकरणे यावर जाणारा वेळ, तो किती असावा, व तो कोणत्या प्रकारे वापरला जावा ह्यावर मार्गदर्शन केलेले आहे.

      – क्रमशः भाग पहिला 

लेखिका :  डॉ. कल्पना सांगळे

पुणे.

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आम्ही असे घडलो – लेखिका : सुश्री प्रज्ञा पावगी ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ आम्ही असे घडलो – लेखिका : सुश्री प्रज्ञा पावगी ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

डॉ. हिम्मतराव बावस्कर

३५ वर्ष सतत ग्रामीण भागात वास्तव्य करून ग्रामीण जनतेच्या आरोग्याविषयीच्या समस्या जाणून घेणं आणि त्यावर संशोधन करून त्या समस्या सोडवणं ही डॉ. हिम्मतराव बावस्कर यांच्या जीवनाची व जगण्याची नित्याची बाब झाली आहे. विंचूदंशावर संशोधन करून त्यावर नेमकी व साधी उपाययोजना केल्यामुळे विंचूदंशानं होणारं ४०% मृत्यूच प्रमाण १ टक्क्यावर आलं, याचे श्रेय त्यांना आहे. त्यांचं हे संशोधन जगप्रसिद्ध ‘ लॅन्सेट ‘ या वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध झालं. तसंच त्यांचे सर्पदंश, फ्लूरोसिस, हृदयरोग, थायरॉइड इ. आजारावरील संशोधनाचे ४५ प्रबंध प्रसिध्द झाले आहेत. जगभरातून याविषयी सल्ला मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे विचारणा होते. शून्यातून वर येऊन जागतिक संशोधनाचा पल्ला गाठणाऱ्या डॉ बावसकर यांची ही जडणघडण…

फुटलेल्या दगडी पाटीच्या तुकड्यावर अभ्यास करून शिक्षणाची सुरुवात, घरची गरिबी एवढी की शिक्षण बंद करून शेतात काम करावं अशी परिस्थिती. शिक्षण बंद होऊ नये म्हणून मग सुटीच्या दिवशी स्टँडवर कॅलेंडर, डायऱ्या, पंचांग विकणे; लाकड फोडणं, मोळ्या बांधणं अगदी बांधकामावर बिगारीच काम करणे अशी हिम्मतरावांच्या शिक्षणाची सुरुवात. त्यामुळे ते म्हणतात, मी जरी व्यवसायाने व बुद्धीने डॉक्टर असलो तरी हाडाचा शेतकरी आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच, हा अभ्यास पुढे मानव जातीला उपयुक्त ठरणार आहे हा विचार नेहमीच त्यांच्या मनात येत असे. त्यामुळे फक्त परीक्षेपुरता अभ्यास त्यांनी कधीच केला नाही.

“पॅथाॉलॉजी ही वैद्यकीय शास्त्राची जननी आहे ” हे प्राध्यापकांच वाक्य कानी पडताच “बाॉइडची पॅथाॉलॉजी” हे हजार पानांचे पुस्तक पाठ करण्याचा प्रयत्न केला, ते पाठ करण्यासाठी पहिल्या परीक्षेला ते मुद्दाम बसले नाहीत. नेटाने अभ्यास करून परीक्षा देताना काचेच्या स्लाईडवर लावलेले रक्त स्त्रीचे आहे, हे ओळखलं. मायक्रोस्कोप खाली बघितल्यावर तेव्हा जगप्रसिद्ध पॅथाॉलॉजिस्ट डॉ.के. डी. शर्मा यांनी पैकीच्या पैकी गुण दिले. त्यामुळे हिम्मतराव त्यांचे आवडते विद्यार्थी बनले. त्यांनीच पुढे त्यांना एम. डी. साठी मदत केली. पुढील शिक्षण घेणे कठीण असल्यामुळे त्यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून सरकारी नोकरी इमानदारीत १७ वर्षे केली. खाजगी प्रॅक्टिस केली नाही. विशेष म्हणजे जिथे कोणी वैद्यकीय अधिकारी जायला तयार नव्हता, त्या त्या ठिकाणी ते रूजू झाले.

कोकणामध्ये लाल जातीचे विंचू भयंकर विषारी आहेत, या भागात विंचूदंशाने मृत्यूच प्रमाण ४०% वर होतं, परंतु त्याबद्दल काहीही संशोधन झालेले नव्हते. हिम्मतरावानी विंचूदंशाच्या रुग्णांचा सखोल अभ्यास करायचं ठरवलं. विंचुदंश झालेल्या रुग्णांच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात केली..

नाडीचे ठोके, रक्तदाब, थंड पडलेले हातपाय, हृदयात वाढलेला दाब आणि हृदय कमकुवत होऊन फुफ्फुसात पाणी साचून व दम लागून शॉकने रुग्ण दगावतात असे त्यातून सिद्ध झाले. त्याबद्दलचे हिंमतरावांचे प्राथमिक पत्र  “लॅन्सेन्ट” (वैद्यकीय क्षेत्रातील जगातले एक अत्यंत मानाचे जर्नल) मध्ये १९७८ ला प्रसिद्ध झाले. हे पत्र पाहून त्यांचे शिक्षक डॉ के. डी. शर्मा अतोनात खूष झाले. पुढील काळात संशोधनालाच चिकटून रहायचे असे हिम्मतरावानी ठरवले. संशोधनाने व ज्ञानाने मानव जातीवर उपकार होतात व जगात सर्वांना त्याचा लाभ मिळतो, पुढील काळात हीच संपत्ती मानली जाणार होती.

विंचूदंशाचे रुग्ण ज्ञात असलेल्या उपायाला दाद देत नव्हते. विंचूदंशावर प्रतिलस काढा, ही सर्वत्र मागणी होत होती. एम. बी.बी. एस. चे ज्ञान संशोधनाला कमी पडत आहे असे वाटल्यामुळे हिम्मतराव एम. डी. करण्यासाठी पुण्याला बी. जे. मेडिकल कॉलेज मध्ये रूजू झाले. त्यावेळेस त्यांनी अभ्यासलेल्या ५१ केसेस चा ” विंचूदंशाची प्राथमिक लक्षणे” हा प्रबंध १९८२ मध्ये “लॅन्सेन्ट ” मध्ये प्रसिद्ध झाला. विंचूदंशाच्या गंभीर रुग्णावर ‘प्राझोसीन ‘ हे औषध सापडले त्यांना. एका वर्षात २०० केसेस या औषधाने त्यांनी चांगल्या केल्या. “प्राझोसिन” हेच विंचूदंशावर योग्य औषध म्हणून १९८६ मध्ये “लॅन्सेन्ट” मध्ये प्रसिद्ध झालं. विंचुदंशाने शरीरातील अल्फा रिसेप्टर उत्तेजित होतात तर “प्राझोसीन ” हे अल्फा ब्लॉकर आहे. ह्यामुळे विंचूदंशाने होणाऱ्या परिणामावर “प्रोझोसीन ” मारा करते, म्हणून त्याला अँटिडोट असे म्हणतात.

भारतामध्ये पाँडीचेरी, कर्नुल , बेलारी, कच्छ या भागामध्ये कोकणासारखे विंचू आहेत. या भागातही प्राझोसीन वापरून मृत्यूचे प्रमाण घटले आहे. तसेच टर्की, अरेबियन देशात वेगळ्या जातीच्या विंचूदंशावरही ‘ प्राझोसीन ‘ वापरणं सुरू झालं आहे . आता बाजारात प्रतिलस ही आली आहे. 

लंडन येथील “सीबा फाऊंडेशन” द्वारा आयोजित वैज्ञानिकांच्या चर्चासत्रास डॉ हिम्मतराव बाविस्कर उपस्थित होते. त्यावेळी प्रतिलस विरुद्ध  ‘प्राझोसीन’ असा वाद सुरू झाला. तेव्हा अध्यक्षांनी हिम्मतरावाना त्यांचे विचार मांडण्यासाठी पाचारण केले. ते म्हणतात, एक भारतीय म्हणून माझे विचार तेथे मांडताना मला भरून आले. अनेक शास्त्रज्ञांना समक्ष भेटण्याची संधी मिळाली.

कुठल्याही आधुनिक सुविधा जिथे पोहोचल्या नाहीत, अशा खेड्यातील एका अशिक्षित कुटुंबात जन्म घेऊनही हे जगप्रसिद्ध संशोधन त्यांच्याकडून कसं घडलं, याचं वारंवार कुतूहल आणि आश्चर्य व्यक्त होत आहे. ते म्हणतात, या संशोधनाच्या कामात गरिबी, शिक्षणातील अडचणी, इतरांच्या टीका काही काही आडवं आलं नाही.

लेखिका : सुश्री प्रज्ञा पावगी

संकलक : गिरीश क्षीरसागर 

© सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ….आणि मृत्यूही गहिवरला !!! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

…आणि मृत्यूही गहिवरला !!! ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले 

समर्थांनी दासबोधातील एक अख्खा समास मृत्यूवर खर्च केला आहे, याचा अर्थ मृत्यूचे आपले जीवनातील महत्व वादातीत आहे. आज मा. मनोहर पर्रिकरांच्या मृत्यूची बातमी येऊन थडकली आणि मनात पहिला विचार मनात आला की आज मृत्यूही गहिवरला असेल. 

यमाने तर आपले यमदूत अनेक दिवस त्यांच्या मागावर धाडले होते. अनेक युक्त्याप्रयुक्त्या करुन ते यमदूत त्यांना घेऊन जाण्याचा  प्रयत्न करीत होते. आज मात्र त्यांनी घाला घातला. यमदूतांचे काम यमाचा आदेश पाळणे, त्यामुळे त्यांचा काही दोष आहे, असे म्हणणे योग्य होणार नाही.

या धरतीवर अनेक जीव जन्मास येतात आणि यथाकाल आपले जीवन संपवतात. पण काही लोक नुसते जगत नाहीत तर  आपली ‘पात्रता’ वाढवत जातात. अशा लोकांचा मृत्यू  सुद्धा एका वेगळ्या अर्थाने ‘सोहळा’ होतो. आज यमाच्या दरबारात आनंदोत्सव असेल कारण आज एक ‘कर्मयोगी’ मृत्यूलोकातून यमलोकात प्रवेश करीत असेल.

एक तरुण साधारण २५-३० वर्षांपूर्वी IIT सारख्या नामांकित संस्थेतून पदवीधर होतो आणि नोकरीसाठी परदेशात न जाता परत गोव्यात येतो. त्याकाळी उपेक्षित असलेल्या राजकीय पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतो आणि अनेक साथीदार सोबत घेऊन, चांगले संघटन करून गोव्याची सत्ता ताब्यात घेतो आणि एखाद्या चित्रपटाच्या कथेला लागू होईल असे जीवन जगतो. हे सर्व विलक्षण नव्हे काय ?

मुख्यमंत्री झाल्यावर ही पोशाख न बदलणारा पर्रिकरांसारखा एकमेव मुख्यमंत्री असावा. त्यांनी ना कधी आपला पोशाख बदलला ना कधी आपले माणूसपण बदलले.  हे लिहायला जितके सोपे तितके आचरणात आणायला भयंकर अवघड!!. पण मा. पर्रिकरांनी ते ‘जगून’ दाखवले.

स्कुटर वर फिरणारा, सर्वाना सहज उपलब्ध होणारा मुख्यमंत्री असा लौकिक त्यांनी मरेपर्यंत टिकवला, नव्हे तो  त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला असे म्हणता येईल.

“कार्यमग्नता’ जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती” हे काव्य मा.मनोहर पंतांनी जगून सिद्ध केले. मनुष्याचे काम बोलते हे  वचन आणि अशी अनेक वचने त्यांच्या जीवनाची अविभाज्य भाग होती असेच म्हणावे लागते. त्यांच्या बद्दल बोलताना माझे शब्दभांडार अपुरे पडत आहे पण लिहिणारा  हात थांबायला तयार नाही. 

आज मृत्यू ही त्यांच्या आत्म्यास नेताना गहिवरला असेल. या आधी जेव्हा जेव्हा यमदूत त्यांना न्यावयास आले असतील तितक्या वेळा  परममंगल  अशा भारतमातेने त्या यमदूतांस नक्कीच अडवले असेल. ती म्हणाली असेल, “माझ्या या लाडक्या लेकास नको घेऊन जाऊ.”  पण शेवटी नीयतीच्या पुढे कोणाचेच चालत नाही, हेच खरे…!!

श्री मनोहर पंतांचे सारे जीवन भारतमातेच्या सेवेत खर्ची पडले. 

इंग्रजी मध्ये एक ‘म्हण’ आहे.

It’s very easy,

To give an Example,

But

It’s Very Difficult, 

To become an Example.Try to be an Example.

मा. मनोहरपंत असेच जगले. त्यांच्या जीवनचारित्रास मी ही शब्द सुमनांजली अर्पण करीत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शापित आहे श्रीकृष्णाचा गोवर्धन पर्वत – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

शापित आहे श्रीकृष्णाचा गोवर्धन पर्वत –  लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

वृंदावनमध्ये गोवर्धन पर्वताचा खास महिमा आहे. वैष्णव लोक या पर्वताला श्रीकृष्ण समान मानतात. मान्यतेनुसार, गोवर्धन पवर्ताची परिक्रमा आणि पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. पृथ्वीवर गोवर्धन पर्वत स्वतः श्रीकृष्णाचे धाम गोलोकमधून आला होता. मान्यतेनुसार, एका शापामुळे या पर्वताची हळू-हळू झीज होत आहे.

गोवर्धन पर्वताला का देण्यात आला होता शाप ?? 

कथेनुसार श्रीकृष्णाच्या प्रेरणेने शाल्मली द्वीप मध्ये द्रोणाचल पत्नीच्या गर्भातून गोवर्धन पर्वताचा जन्म झाला. गोवर्धनला परमेश्वराचे रूप मानून हिमालय, सुमेरु इ. पर्वतांनी त्याची गिरीराज रुपात पूजा केली. एकदा तीर्थयात्रा करत पुलत्स्य ऋषी गोवर्धन पर्वताच्या जवळ आले. पर्वताचे सौंदर्य पाहून ऋषी मंत्रमुग्ध झाले आणि द्रोणाचल पर्वताला म्हणाले की, मी काशीला राहतो आणि तुम्ही तुमचा मुलगा गोवर्धन मला द्या. मी त्याला काशीमध्ये स्थापित करून तेथेच त्याचे पूजन करेल.

द्रोणाचल मुलाला देण्यासाठी तयार नव्हते परंतु गोवर्धन ऋषीसोबत जाण्यास तयार झाला. त्यापूर्वी गोवर्धन पर्वताने ऋषींना एक अट घातली. तुम्ही मला ज्या ठिकाणी ठेवाल त्या ठिकाणी मी स्थापित होईल. पुलत्स्य ऋषींनी गोवर्धनची अट मान्य केली. गोवर्धन पर्वत ऋषींना म्हणाला की, मी दोन योजन उंच आणि पाच योजन विस्तीर्ण आहे. तुम्ही मला कसे घेऊन जाल?

पुलत्स्य ऋषींनी सांगितले की, मी तुला माझ्या तपोबलावर हातावर उचलून घेऊन जाईल. त्यानंतर ऋषी गोवर्धनला घेऊन निघाले. वाटेत वृंदावन आले. वृंदावन पाहून गोवर्धनची पूर्वस्मृती जागृत झाली आणि त्याला आठवले की, याठिकाणी श्रीकृष्ण आणि देवी राधा बाल्यावस्था आणि तारुण्य काळात विविध लीला करणार आहेत. हा विचार करून गोवर्धन पर्वताने स्वतःचा भार आणखी वाढवला. यामुळे ऋषींना विश्राम करण्याची आवश्यकता वाटू लागली आणि त्यांनी गोवर्धनला हातावरून खाली ठेवले. गोवर्धन पर्वताला या मार्गात कोठेही ठेवायचे नाही, ही अट ऋषी विसरले.

काही काळानंतर ऋषी पर्वताजवळ आले आणि उचलण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा गोवर्धनने सांगितले की आता मी कोठेही जाऊ शकत नाही. मी तुम्हाला निघतानाच माझी अट सांगितली होती. त्यानंतर ऋषींनी गोवर्धनला सोबत येण्याचा खूप आग्रह केला परंतु गोवर्धनने नकार दिला. त्यानंतर संतप्त झालेल्या ऋषींनी गोवर्धन पर्वताला शाप दिला की, तुझ्यामुळे माझे कार्य अपूर्ण राहिले त्यामुळे आजपासून दररोज तीळ-तीळ तुझी झीज होईल आणि काही काळानंतर तू या जमिनीत सामावाशील. तेव्हापासून गोवर्धन पर्वत झिजत आहे. कलियुगाच्या अंतापर्यंत हा जमिनीमध्ये सामावलेला असेल……. 

लेखक : अज्ञात 

संग्राहक : अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नाना फडणवीस ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

☆ नाना फडणवीस ☆ श्री प्रसाद जोग

बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस ( निधन: १३ मार्च, १८००.)

पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील ते एक मुत्सद्दी होते. नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते.लहानपणापासून नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या २० व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले.आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. 

पेशवाईच्या काळात त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर माधवराव खुश असायचे.हिशोबातील काटेकोरपणा स्वतःला संभाळून काम करण्याची त्यांची वृत्ती माधवरावांना माहित होती. नानांच्या बाहेरख्यालीपणाबद्दल पेशव्यांना माहिती नव्हती असे नाही,पण त्याचा कोणताही त्रास राज्याला होत नाही ना हे ते पाहायचे. सेवकाच्या खाजगी आयुष्यात ते लक्ष घालत नसत. अंतकाळी थेऊर येथे नारायणरावांच्या हात विश्वासाने नानाच्या हाती दिला व त्यांना सांभाळून राज्य चालवा असे सांगितले.

माधवरावांच्या मृत्यूनंतर पेशवे बनलेल्या नारायणरावांचा राज्यकारभार चालवण्या इतका वकूब नव्हता.त्यांचा खून केला गेला त्या वेळी त्यांची पत्नी गंगाबाई गरोदर होती.राघोबादादांच्या वर्तुणुकीला उबगलेले सारे कारभारी एकत्र झाले त्यातूनच बारभाई हा गट सक्रिय झाला आणि त्याचे प्रमुखपद नाना फडणवीसांनी सांभाळले आणि त्यांनी गंगाबाईला झालेल्या पुत्राला माधवराव (दुसरे) याना पुढे करून राज्यकारभार केला. 

थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा पूर्वपदावर  आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचं वर्चस्व टिकवून ठेवले. पुण्याचे वैभव वाढवले.

वाई (मेणवली) येथे नाना फडणीसांचा वाडा आजही आहे. मेणवली येथील त्यांच्या वाड्यात खूप चित्रपटांचे चित्रीकरण होत असते.

पेशवाईमध्ये साडेतीन शहाणे प्रसिद्धीस पावले होते.१) नागपूरकर भोसल्याचे “देवाजीपंत”२)हैद्राबादच्या निजामाचे “विठ्ठल सुंदर”३)पेशव्यांच्या दरबारातील “सखारामपंत बोकील”(बापू)

वरील तिघांना पूर्ण शहाणे म्हटले जायचे कारण हे तिघेही मुत्सदी तर  होतेच त्याच बरोबर त्यांना युद्धकला देखील अवगत होती.

चवथे शहाणे पेशव्यांच्या दरबारातील :नाना फडणवीस,मुत्सद्दी असले तरी यांच्या जवळ युद्ध कला नव्हती तेव्ह्ड्यासाठी त्यांना अर्धे शहाणे म्हटले गेले.

नाना फडणवीस यांची नऊ लग्ने झाली होती; शिवाय त्यांना दोन रखेल्या होत्या. नानांचे पहिले लग्न दहाव्या वर्षी झाले.  नानांच्या नऊ बायकांपैकी सात त्यांच्या हयातीत वारल्या; नाना वारले तेव्हा त्यांची आठवी पत्‍नी बगाबाई व नववी जिऊबाई या देवसेवेसाठी सिद्धटेकला होत्या; त्यांना ही बातमी समजताच त्या पुण्यास येण्यास निघाल्या. वाटेत त्यांना ताब्यांत घेण्यासाठी पेशव्यांनी फौज पाठविली. परंतु तिला या बायकांच्या सोबत असलेल्या अरबांनी हुसकावून दिले, असे इंग्रज इतिहासकार मॅकडोनल्ड म्हणतो. या स्त्रिया पुण्यास आल्यावर बगाबाई नानांच्या पश्चात चौदा दिवसांनी वारली. जिऊबाईचे वय यावेळी नऊ वर्षांचे होते. तिने नानांनी अर्धवट ठेवलेले भीमाशंकराचे देऊळ बांधून पुरे केले.

रावबाजीच्या म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या स्वभावाचा धसका नाना फडणवीस यांच्या जिऊबाई या पत्नीनेही घेतला होता. नाना गेल्यावर या बाजीरावाने नानांच्या अरबांचा पगार चुकता करून नानांचे वाडे, जहागीर व इनामी गावे जप्त केली. नानांजवळील अफाट संपत्ती हाती येण्यासाठी जिऊबाईस शनवारवाड्यात आणून ठेवले. दौलतराव शिंद्याचीहि त्या संपत्तीवर दृष्टी असल्याने, त्याने बाईस दत्तक देऊन आपल्या ताब्यात देण्याबद्दल पेशव्यांस विनंती केली, पण पेशव्यानी ती नाकारली, आणि नानांचा पक्का सूड उगवला.

यानंतर नानांच्या पक्षाच्या सर्व मंडळींस पेशव्यानीं  नजरकैदेत ठेवले. यशवंतराव होळकराने पुणे जाळले, तेव्हा रावबाजी पळून गेले होते. तेव्हा जिऊबाई वाड्यातच होती. नानांचा व आपल्या घराण्याचा पूर्वापार संबंध जाणून यशवंतरावाने बाईस लोहगड (हा किल्ला नानांस सरकारांतून बक्षीस मिळाला होता) किल्ल्यावर नानांचा विश्वासू नोकर धोंडोपंत नित्सुरे याच्या स्वाधीन केले. नानांचा मुख्य खजिना तेथेच असे.

इंग्रजी राज्य झाल्यावर एलफिन्स्टनने बाईस पुण्यास आणून वार्षिक हजारांची नेमणूक कायम करून, बेलबाग संस्थान व मेणवली गाव जप्तीतून मोकळे केले. नंतर बाई मेणवलीस जाऊन राहिली. तिने १८२७ मध्ये मिरजेच्या गंगाधरराव भानू नावाच्या मुलास इंग्रजांच्या संमतीने दत्तक घेऊन त्याचे नाव माधवराव ठेविले व त्यास आपली बारा हजारांची नेमणूक, बेलबाग संस्थान व मेणवलीची वहिवाट मिळावी म्हणून फार खटपट केली; परंतु इंग्रजांनी तिचे काही एक ऐकले नाही.१८५४ च्या मार्चमध्ये जिऊबाई वारली. 

नाना फडणवीस यांच्या माधवरावांच्या पश्चातल्या कालखंडामधील जीवनावर लेखक विजय तेंडुलकर यांनी “घाशीराम कोतवाल”हे नाटक लिहिले आणि त्याचा पहिला प्रयोग,१६ डिसेंबर,१९७२ रोजी पुण्यातल्या भरत नाट्य मंदिरात झाला.या नाटकाने पुण्यात प्रचंड वादळ उद्भवले होते.

पेशवाईमधील इतिहासात स्वतःचे नाव नाव अधोरेखित करणाऱ्या नाना फडणवीस याना अभिवादन.

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सहावा — आत्मसंयमयोग — (श्लोक ४१ ते ४७) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सहावा — आत्मसंयमयोग — (श्लोक ४१ ते ४७) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः ।

शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥ ४१ ॥

*

पुण्यवान जाहला असेल जरी योगभ्रष्ट

स्वर्गप्राप्तीपश्चात तया श्रीमान वंश इष्ट ॥४१॥

*

अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम्‌ ।

एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम्‌ ॥ ४२ ॥

*

प्रज्ञावान कुळात अथवा येई तो जन्माला

ऐसा जन्म या संसारे दुर्लभ प्राप्त व्हायाला ॥४२॥

*

तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम्‌ ।

यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥ ४३ ॥

*

पुर्वसुकृते तयास मिळतो योगसंस्कार पूर्वदेहाचा

तयामुळे यत्न करी अधिक तो परमात्मप्राप्तीचा ॥४३॥

*

पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः ।

जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ॥ ४४ ॥

*

पूर्वाभ्यासे अवश त्यासी भगवंताचे आकर्षण 

योगजिज्ञासू जाई सकाम कर्मफला उल्लंघुन ॥४४॥

*

प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः ।

अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम्‌ ॥ ४५ ॥

*

सायासाने करी अभ्यास योगी बहुजन्मसिद्ध 

संस्कारसामर्थ्ये पापमुक्त त्वरित परमगती प्राप्त ॥४५॥

*

तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः ।

कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ॥४६॥

*

तपस्वी तथा शास्त्रज्ञाहुनी श्रेष्ठ असे योगी

सकाम कर्मे कर्त्याहुनिया खचित श्रेष्ठ योगी

समस्त जीवितांमध्ये योगाचरणे सर्वश्रेष्ठ योगी

कौन्तेया हे वीर अर्जुना एतदेव तू होई योगी ॥४६॥

*

योगिनामपि सर्वेषां मद्‍गतेनान्तरात्मना ।

श्रद्धावान्भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥४७॥

*

योग्याने ज्या भजिले मजला श्रद्धावान अंतरात्म्याने

परमऱश्रेष्ठ योगी म्हणुनी त्या स्वीकारिले मी  आत्मियतेने  ॥४७॥

*

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥

*

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी आत्मसंयमयोग  नामे निशिकान्त भावानुवादित षष्ठोऽध्याय संपूर्ण ॥६॥

– क्रमशः …

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print