मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “हे नाटक माझे आहे” ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ “हे नाटक माझे आहे” ☆ श्री सुनील शिरवाडकर

साहित्य संघ मंदिरात ‘नटसम्राट’ चा प्रयोग सुरू होता. आयुष्याचा अखेरचा काळ व्यतीत करणारे, थकलेले, खालावलेले नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक तेथे आले. तात्यासाहेब शिरवाडकरांना त्यांनी विचारले…

“ डॉ.लागू कुठे आहेत?मला त्यांना सांगायचं…”

“काय”?

” हे नाटक माझे आहे “

आणि हो..खरोखरच हे नाटक त्यांचे होते. कारण अगदी मागच्याच वर्षीची गोष्ट. नानासाहेब फाटक वि.वा शिरवाडकरांना म्हणाले होते..

” आमच्या सारख्या जुन्या नटांना मानवेल असे एखादे नाटक तुम्ही लिहायला हवे “

त्यांनी ‘किंग लिअर’ चे नावही सुचवले होते आणि मग तात्यासाहेबांना जाणवले.. नानासाहेबांसारख्या नटश्रेष्ठांवरच नाटक लिहायला हवे.

तात्यासाहेब म्हणतात…

नानासाहेबांसारखा एक महान म्हातारा नट माझ्या मनात उभा रहात होता.. आणि किंगलिअर चे नायकत्व स्वतःसाठी मागत होता.

त्याचवेळी साहित्य संघात काही नेहमीचीच मंडळी वाद घालत होती.शंकरराव घाणेकर उच्च स्वरात म्हणाले…

” बस्स.. वाद कशाला? तुम्हा नवीन नटांचे सम्राट दाजी भाटवडेकर.. आणि आम्हा जुन्या नटांचे नटसम्राट.. नानासाहेब.”

आणि त्याचवेळी नाटकाचे नाव ठरले. वास्तविक तात्यासाहेबांना नाटकाचे नाव शोधण्यात नेहमीच तकलीफ होत असे.  हे असे पहिलेच नाटक की ते लिहिण्यास घेण्यापूर्वी त्यांना त्याचे नाव सापडले.

तात्यासाहेबांनी नाटक लिहायला घेतले. पहिल्या अंकांचे वाचन ‘गोवा हिंदू असोसिएशन’ च्या कार्यकर्त्यांपुढे झाले. मुख्य भुमिका डॉ.श्रीराम लागू आणि शांता जोग यांनी करायचे ठरले.

डॉ.लागू यांनी नाटक वाचायला घेतले.. आणि पहिल्या पाच दहा पानात त्यांना त्याचे वेगळेपण जाणवु लागले. ते म्हणतात…. 

” पहिल्या अंकातील सुरुवातीचा तो अप्पासाहेबांचा प्रवेश.. निवृत्त झालेला तो वृध्द नटसम्राट.. हजारो प्रेक्षकांसमोर उभा राहुन आपले भरुन आलेले मन अगदी मोकळेपणाने, भाबडेपणाने पण मोठ्या सकस आणि काव्यमय भाषेत रिकामे करतो आहे. नाजूक, सुगंधी फुलांचा सतत वर्षाव व्हावा तसे सारे प्रेक्षक त्या मनोगताच्या आनंदात, कारुण्यात,रागलोभात आणि प्रेमात न्हाऊन चिंब होताहेत असे लोभसवाणे द्रुष्य मी चांगले अर्धा पाऊण तास सर्वांगाने बघत होतो.”

या नाटकाच्या मानधनाबाबत डॉ.लागू  यांना विचारले गेले तेव्हा त्यांनी निरोप पाठवला..

‘ शून्य रुपयापासुन..सव्वाशे रुपयापर्यंत कितीही.पण मला हे नाटक करायचेच आहे.’ (त्यावेळी डॉक्टर एका प्रयोगाचे सव्वाशे रुपये घेत)

दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर यांना नागपूर येथील नोकरीतून फक्त महीनाभराची सवड मिळणार होती. पण ते येण्यापूर्वीच डॉ.लागुंनी मनातच तालीम करण्यास सुरुवात केली जवळजवळ संपूर्ण संहिता तालीम सुरू होण्यापूर्वीच त्यांनी पाठ केली.

नागपुराहुन दारव्हेकर मास्तर आले आणि नाटकाच्या तालमी सुरु झाल्या आणि एक दोन मुद्द्यावरून वाद सुरू झाले बऱ्याच जणांचे म्हणणे होते.. सुरुवातीचे जे अप्पांचे भाषण आहे, ते फार लांब आहे. ते कमी केले पाहिजे पण डॉ.लागुंनी ठामपणे विरोध दर्शविला. शेवटी असे ठरले की.. प्रत्यक्ष प्रयोगात ते कसे वाटते ते बघू ..  प्रेक्षकांना कंटाळवाणे वाटले तर थोडा भाग कमी करु.

दुसरा वाद होता.. तिसऱ्या अंकातील जंगलातील प्रसंगाचा.दारव्हेकरांना तो अजिबात आवडला नव्हता.

“कुणी घर देता का घर..”

आणि..”जंगलातील जनावरं मोकाट सुटली आहेत..”

पण याही वेळी डॉ.लागूंनी तो भाग हट्टाने नाटकात ठेवायला भाग पाडले.

नाटकाचा पहिला प्रयोग २३ डिसेबल १९७० ला बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.रंगमंदिर जाणकार प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. नाटकाचा पडदा वर उचलल्यापासुन शेवटपर्यंत नाटक रंगत गेले. प्रयोग सुरेख झाला, आणि…

दुसऱ्याच मिनीटाला विठोबाचे काम करणारे नट..बाबुराव सावंत अचानक कोसळले.. बेशुद्ध झाले लगेचच त्यांना जवळीक बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.. पण तासादोन तासात त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

खरंतर पहिल्या अंकानंतरच बाबुरावांच्या छातीत दुखु लागले होते..घाम येत होता.अधुनमधून झोपून रहात.. गोळ्या घेतला ते कसेबसे काम करत होते.तिसऱ्या अंकातील शेवटच्या प्रवेशात ते म्हणाले देखील.. मी स्टेजवर गेलो नाही तर चालणार नाही का?

पण नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगात अशी परवानगी कोण देणार?

शेवटचा प्रवेश संपेपर्यंत त्यांनी मृत्युला थोपवून धरले आणि मग मात्र त्यापुढे शरणागती पत्करली.

सुरुवातीला नाटकाला प्रेक्षकांचा प्रतिसाद फारसा नव्हता. पण हळूहळू प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्ल होऊ लागला.

दिल्लीतील एका प्रयोगाच्या वेळी दुसऱ्या अंकानंतर अचानक पं.रवीशंकर पडद्यामागे आले आणि त्यांनी डॉ.लागूंना मिठीच मारली. गदगदल्या स्वरात ते म्हणाले..”you are killing me”

डॉ. श्रीराम लागू म्हणतात..

“या नाटकाने मला खूप काही भरभरून दिले माझ्या लायकीपेक्षा खुपच जास्त दिले माझ्या फाटक्या झोळीला ते सारे पेलले की नाही.. माहीत नाही. मराठी नाट्यरसिकांच्या मानसात,कोपऱ्यात का होईना, एक पाट बसायला दिला आणि कलावंत म्हणून आत्माविष्काराला एक विस्तीर्ण, मुक्त आनंदाने भरलेले अंगण दिले .. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे माझी जीवनाची जण अधिक विस्तीर्ण करणारा सखोल संस्कार दिला. भाषेचे सौंदर्य, तिची अफाट ताकद, शब्दाशब्दाला फुटणारे आशयाचे धुमारे आणि ह्या साऱ्यांनी जीवनाला मिळणारा भरभक्कम आधार दिला.’नटसम्राट’ करण्याच्या आधीचा मी जो होतो त्यापेक्षा नंतरचा मी अधिक बरा ‘माणूस’ झालो.एका नाटकाने माणसाला यापेक्षा जास्त काय द्यावे?कलावंताचे आपण जन्मभर ऋणी रहायचे ते याकरिताच.”

आणि म्हणूनच मराठी नाट्यस्रुष्टीत ‘नटसम्राट’ चे स्थान अत्युच्च आणि अतुलनीय आहे पाश्चात्य रंगभूमीवर प्रत्येक नटाचे अंतिम स्वप्न हे ‘हँम्लेट’ ची भुमिका करण्याचे असते. त्याचप्रमाणे मराठी रंगभूमीवरील नटाचे स्वप्न ‘नटसम्राट’;ची भुमिका करण्याचे असते डॉ.लागु यांच्यानंतर दत्ता भट,सतिष दुभाषी पासून अगदी अलीकडे मोहन जोशींपर्यंत प्रत्येकाने ही भूमिका पेलण्याचे शिवधनुष्य उचलले आहे 

‘नटसम्राट’ हे नाटक आता केवळ वि.वा.शिरवाडकरांचे राहिले नाही.. तर अवघ्या मराठी जनांचे झाले आहे ज्याप्रमाणे नानासाहेब फाटक म्हणाले होते..

“हे नाटक माझे आहे”

त्याचप्रमाणे प्रत्येक मराठी माणुस, मग तो कलावंत असो की रसिक.. नेहमीच म्हणत राहील…

” हे नाटक माझे आहे ” – – – 

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “स्पाय गर्ल”… लेखक : श्री शिरीष अंबुलगेकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “आजची सावित्री –  डॉ. रीना कैलास राठी”… शब्दांकन. . . ममता प्रितेश पोफळे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

१९२७ मध्ये रंगून (तत्कालीन बर्मा, आत्ताचे म्यानमार) शहरा HVतील एका श्रीमंत घराण्यात एक मुलगी ‘सोन्याचा चमचा’ घेऊन जन्माला आली ! हो, अक्षरशः सोन्याचा चमचा घेऊनच; कारण त्या मुलीचे वडील सोन्याच्या खाणीचे मालक होते! सुखवस्तू घरातील मंडळींनी त्या मुलीचे नाव “राजमणि” ठेवले. राजमणिच्या वडिलांचा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा होता. त्यासाठी ते वेळोवेळी आर्थिक मदतदेखील करीत असत. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित नेते किंवा भारतीय व्यावसायिक रंगूनला गेले तर त्यांच्या घरी आवर्जून जात असत.

एकदा गांधीजी या कुटुंबाच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले होते. घरातील सर्वांचा परिचय झाला. राजामणि मात्र कुठे दिसली नाही म्हणून सर्वजण तिला शोधत असता, घराच्या बागेत राजमणि हातात बंदूक घेऊन निशाणेबाजी करतांना आढळली. दहा वर्षाच्या एका मुलीच्या हातात बंदूक पाहून गांधीजींना आश्चर्य वाटले, ते तिच्या जवळ गेले आणि तिला म्हणाले, “बेटी, तुला बंदुक शिकायची काय गरज?”

“इंग्रजांचा खात्मा करण्यासाठी”, आपले निशाणावरील लक्ष जराही विचलित न होऊ देता राजमणि उत्तरली.

“हिंसा हि काही एखाद्या प्रश्नाचे उत्तर नाही मुली, आम्ही सर्वजण अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांचा विरोध करीत आहोत. तुलादेखील हातात शस्त्र न घेता विरोध करता आलं पाहिजे,” गांधीजींनी तिला समाजावणीच्या सूरात अहिंसेचे महत्व सांगितले.

“का? आम्ही डाकू, लुटारूंना मारीत नाही? हे इंग्रज आमच्या देशाला लुटत आहेत, त्यामुळे ते लुटारू आहेत! त्या लुटारूंना मारणे हि काही हिंसा नाही.” अतिशय निर्भय आणि स्पष्ट शब्दात राजामणि उत्तरली, “मी मोठी झाल्यावर निदान एकातरी इंग्रज अधिकाऱ्याला शूट करणार!”

गांधीजी अवाक होऊन ऐकण्याव्यतिरिक्त काहीच करू शकले नाहीत.

#एके दिवशी राजमणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भाषण ऐकले. त्यांच्या भाषणाने ती पेटून उठली. गांधीजींची ‘अहिंसा’ आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा इंग्रजांविरुद्ध चा ‘सशस्त्र लढा’; यात तिला नेताजींचा प्रखर विरोध अधिक भावला!

#एका सभेमध्ये नेताजींनी लोकांना अपील केले की, त्यांनी इंग्रजांच्या विरुद्धच्या त्यांच्या लढाईसाठी आर्थिक मदत करावी. हे ऐकून सोळा वर्षाच्या राजमणिने आपले सारे सोन्याचे दागिने काढून नेताजींच्या ‘आझाद हिंद सेनेला’ (INA-Indian National Armi- आयएनए) दान केले.

‘एवढे सारे सोन्याचे दागिने कुणी दिले?’ याची चौकशी करत असताना नेताजींना कळाले की, एका सोळा वर्षाच्या मुलीने हे सर्व दागिने दिले आहेत. अधिक चौकशी केल्यानंतर; ते सर्व दागिने परत करण्यासाठी नेताजी स्वतः राजमणिच्या घरी गेले. सर्व दागिने राजामणिच्या वडिलांच्या हाती सुपूर्द करतांना नेताजी म्हणाले, “मला वाटतं, आपल्या मुलीने चुकून हे सर्व दागिने आम्हाला दिले आहेत. मी ते सर्व परत करायला आलो आहे.” खरंतर, राजमणिच्या वडिलांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामासाठी असं दान अनेक वेळा केलं होतं; त्यामुळे त्यांच्या मुलीने जे केलं त्याबद्दल त्यांना अजिबात आश्चर्य वाटलं नाही. नेताजी परत करीत असणाऱ्या त्या दागिन्यांकडे पहात ते फक्त हसले. तेवढ्यात राजमणि तिथे आली. समोरचा प्रकार पाहून ती रागात उद्गारली, “हे सर्व दागिने माझे स्वतःचे आहेत; वडिलांचे नाही! मी आता ते आपल्याला दान केले आहेत आणि दान केलेली वस्तू मी परत घेत नाही.”

#त्या षोडशवर्षीय मुलीचा दृढनिश्चय पाहून नेताजींना तिची प्रशंसा केल्याशिवाय रहावले नाही, ते राजामणीला म्हणाले, “लक्ष्मी येते आणि जाते; परंतु सरस्वतीचं तसं नाही. सरस्वती म्हणजे बुद्धी! ती आली की परत कधीच जात नाही; तर ती सतत वाढत जाते! तू सरस्वती सारखीच बुद्धिमान आहेस; म्हणून मी आजपासून तुझं नाव “सरस्वती” ठेवतो! त्या दिवशीपासून राजमणि आता “सरस्वती राजमणि” या नावाने ओळखू जाऊ लागली.

परंतु राजमणी एवढ्यावरच थांबली नाही. तिने नेताजींच्या शिबिरात जाऊन त्यांची भेट घेतली. तिला त्यांच्या आर्मीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी विनंती केली. सरस्वती राजमणिचा निश्चय एवढा पक्का होता की; नेताजी तिला नाही म्हणू शकले नाहीत. तिला ‘आयएनए’ मध्ये समाविष्ट करून घेण्यात आले!

सुरुवातीला सरस्वती राजमणि सैन्याच्या सेवा-सुश्रुशेचं काम करू लागली. परंतु केवळ या कामावरती सरस्वती राजामणिचे समाधान झालं नाही. तिला अधिक जोखमीचं काम हवं होतं. #तिची जिद्द आणि बुद्धी पाहून नेताजींनी तिला गुप्तहेराची कामगिरी दिली. इंग्रजांच्या छावणीमध्ये जाऊन तिथल्या बातम्या काढणे आणि त्या ‘आयएनए’ च्या कार्यालयापर्यंत पोचवणे अशी महत्वाची जिम्मेदारी देण्यात आली. अशाप्रकारे सरस्वती राजमणि ही सर्वात कमी वयाची गुप्तहेर ठरली!

खरंतर गुप्तहेराचे काम म्हणजे; सदैव प्राण संकटात ठेवणे! गुप्तहेर जर पकडला गेला तर त्याला हाल-हाल करून मारण्यात येतं, शिवाय आपली माहिती शत्रूला जाण्याची शक्यता असते; म्हणून गुप्तहेर जर शत्रूकडून पकडला गेला तर त्याला स्वतःच प्राणार्पण करण्याचे आदेश देण्यात आलेले असतात. आझाद हिंद सेनेसाठी आपले प्राणपणाला लावण्याची जबाबदारी या सोळा वर्षाच्या मुलीने हसत-हसत स्वीकारली!

#लांबसडक केस कापण्यात येऊन मुलांसारखे छोटे केस करून झाले. मुलींच्या पेहरावाऐवजी मुलाचे कपडे घालण्यात आले. राजमणि आता “मणि” नावाने मुलगा झाला! तसेच वेष बदलून नीरा आर्य, मानवती आर्य आणि दुर्गा मल्ल गोरखा या तीन तरुणीदेखील हेरगिरीच्या कामगिरीसाठी नियुक्त केल्या गेल्या.

सफाई-कर्मचारी, लाउंड्री- बॉय आदींच्या माध्यमातून आझाद हिंद सेनेचे हे वीर हेरगिरी करण्यासाठी इंग्रजांच्या छावणीत प्रवेश मिळविते झाले. काकदृष्टीने आणि प्रसंगावधान राखून इंग्रजांच्या छावणीतील हालचाली, गोपनीय माहिती, बातम्याच नव्हे तर प्रसंगी शस्त्रदेखील नेताजींच्या शिबिरापर्यंत पोचवणे सुरु झाले. सुमारे दोन वर्षे त्यांची हेरगिरीची कामगिरी बिनबोभाटपणे चालू होती. दुर्दैवाने एकेदिवशी “दुर्गा” इंग्रजांच्या तावडीत सापडली. तिचे आत्महत्येचे प्रयत्न विफल झाले. इंग्रजांनी तिला पकडून जेलमध्ये बंदिस्त केले! आता सारेच बिंग बाहेर येण्याची परिस्थिती निर्माण झाली. दुर्गाला एकटीला इंग्रजांच्या विळख्यात सोडून पळून जाणे सरस्वती राजामणिच्या मनाला पटेना. शेवटी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने धाडस करायचे ठरवले. पुन्हा आपला वेष बदलून; ती दुर्गाला जिथे डांबून ठेवले होते तिथे पोचली. पिनच्या सहाय्याने कुलूप उघडून दुर्गाला सोडवले आणि पहारेकऱ्यांच्या हातावर तुरी देऊन दुर्गासह पसार होण्यात यशस्वी झाली. परंतु लगेचच हि बाब इंग्रज सैन्याच्या निदर्शनास आली. एकच गोंधळ माजला, “लडकी भाग गयी, लडकी भाग गयी” करीत इंग्रजी सैन्याने शोधाशोध सुरु केली. सरस्वती राजामणि, नीरा आर्य आणि दुर्गा जंगलाच्या दिशेने पळत सुटल्या. त्यांच्या मागे इंग्रजी सैनिक लागले, मुली हाताशी येत नाहीत हे पाहून सैनिकांनी मुलींच्या दिशेने गोळ्या झाडल्या, त्यातील एक गोळी सरस्वती राजामणिच्या पायाला लागली. रक्ताळलेला पाय तसाच घेऊन ती खुरडत खुरडत पळू लागली. कोणत्याही परिस्थितीत त्यांना इंग्रजांच्या हातात सापडायचे नव्हते! आझाद हिंद सेनेच्या त्या शूर सेनानी होत्या! आता पळणे अशक्य झाल्याचे पाहून त्या तिघी एका झाडावर चढल्या… गोळीमुळे झालेली भळभळती जखम घेऊन नि उपाशीपोटी त्यांनी तीन दिवस झाडावरच काढले. केव्हढे ते साहस, धडाडी, सहनशीलता, जिद्द, त्याग नि नेताजींवरील निष्ठा!

जंगलातील शोधाशोध थांबल्याचा अदमास घेऊन त्या खाली उतरल्या आणि नेताजींच्या शिबिरापर्यंत पोचल्या. अवघ्या अठरा वर्षाच्या त्या कोवळ्या सरस्वती राजामणिचे धाडस नि जिद्द पाहून नेताजी खुश झाले. #तीन दिवस पायात बंदुकीची गोळी घुसून राहिल्याने सरस्वती राजामणि एका पायाने कायमची अधू झाली. या साहसाबद्दल नेताजींनी सरस्वती राजमणिला आझाद हिंद सेनेच्या ‘राणी झाँसी ब्रिगेड’ मध्ये “लेफ्टिनेंट” चे पद देऊन तिचा सन्मान केला!

इ. स. १९४५ मध्ये इंग्रजांचा विजय होऊन दुसरे विश्वयुद्ध समाप्त झाले. आझाद हिंद सेना बरखास्त करून नेताजींनी सैनिकांना भारतात परतण्याची मुभा दिली. दुर्दैवाने त्याच दरम्यान तैवानमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विमानाला अपघात झाला आणि आझाद हिंद सेनेचे हजारो देशभक्त पोरके झाले!

#पुढे दोन वर्षात १९४७ ला हिंदुस्थान स्वतंत्र झाला. या नव्या भारताला सरस्वती राजामणि सारख्या आझाद हिंद सेनेच्या सैनिकांची गरज उरली नव्हती. भारतीय स्वतंत्रता संग्रामात आपल्या सुखी नि ऐश्वर्यसंपन्न तारुण्याची राखरांगोळी करून घेणाऱ्या अनेक क्रांतीकारकांच्या वाट्याला उपेक्षाच आली!

#एकेकाळी सोन्याच्या खाणींची वारसदार असलेल्या सरस्वती राजमणि; चेन्नईमधील एका पडझड झालेल्या घरात किरायाने राहू लागल्या. “सुमारे पंचवीस वर्षांनंतर” मिळालेली स्वातंत्र्य सैनिकांची मिळालेली तुटपुंजी पेन्शन यावरच त्यांची गुजराण चाले. तशाही परिस्थितीत त्यांनी समाजसेवाच केली. ड्रेसेस शिवणाऱ्या टेलरकडून उरलेल्या कापडाचे तुकडे त्या आणायच्या. त्यांना जोडून, त्याचे कपडे शिवून; ते गरीब नि गरजू लोकांना फुकटात देऊ करायच्या.

दरम्यान स्वातंत्र्यप्राप्तीची पन्नास वर्षे उलटून गेल्यावर; एका शोध पत्रकाराने ‘सरस्वती राजमणिला’ शोधलं. त्यांची माहिती आणि सद्यस्थिती वर्तमानपत्रात छापली. तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय जयललिता यांच्या निदर्शनास ती बातमी आली; पन्नास वर्षानंतर का होईना पण जयललिताजींनी त्यांचा यथोचित सन्मान केला, सरकारी घर आणि भत्ता देऊ केला!

दिनांक १३ जानेवारी २०१८ रोजी नेताजींच्या आझाद हिंद सेनेतील सरस्वती राजमणि या शूर सेनानीने शेवटचा श्वास घेतला!

#चेन्नईमधील छोट्याशा सरकारी घरात आयुष्य काढणाऱ्या सरस्वती राजामणि, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या अनेक ‘अनसंग हीरोज’ चे प्रतिनिधित्व करतात. ज्यांना ना इतिहासाच्या पानांवर गौरवास्पद स्थान मिळाले, ना राजकीय नेत्यांनी लक्ष दिले, ना हि जनतेने त्यांच्या कर्तृत्वाचे गीत गायले! हा इतिहास आम्हाला कधी शिकवलाच गेला नाही; तो नवीन पिढीपर्यंत पोचला नाही तर कदाचित त्यांना स्वातंत्र्याची किंमत कळणार देखील नाही आणि मग स्वातंत्र्य म्हणजे केवळ “सत्याग्रह आणि अहिंसेचे बक्षीस” अशीच धारणा बनली जाण्याचा धोका संभवतो. सरस्वती राजामणिसारख्या देशभक्तांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आपण सारे त्यांचे ऋणी आहोत, स्वातंत्र्यदिन साजरा करीत असतांना सरस्वती राजामणि सारख्या देशभक्तांचे कर्तृत्व आणि योगदान सर्वदूर पोचवण्याचे काम केलेतरी आपण काही प्रमाणात त्यांचा गौरव करू शकलो असे म्हणता येईल.

“स्पाय गर्ल” “सरस्वती राजमणिला” ही एक श्रद्धांजली ! जय हिंद !

लेखक : श्री शिरीष अंबुलगेकर

मुंबई, मो 7021309583

प्रस्तुती : मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ उडी शेवटची… — लेखिका : सुश्री अंजली राजाध्यक्ष ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ उडी शेवटची… — लेखिका : सुश्री अंजली राजाध्यक्ष ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

व्हेल हा मत्स्य योनीतला राजस मासा, व समुद्रातील सर्वोच्च भक्षक!  (Apex Predator). असं म्हणतात की व्हेल हा पृथ्वीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी. पूर्ण वाढलेला व्हेल जवळजवळ 200 टन वजनाचा आणि शंभर फूट  लांब इतका असतो. Toothed व Baleen असे व्हेल चे दोन प्रकार. डॉल्फिन, पॉर्पोईज या व्हेलच्याच उपजाती.   पृथ्वीवरील सर्व ठिकाणी समुद्रात व्हेल्सचा वास असतो.  त्यांची आवाज काढण्याची एक विशिष्ट पद्धत असते. समुद्राखालून सोनार लावल्यास व्हेलचे आवाज ऐकू येतात. व्हेल्सच्या या आवाजांचा वापर करून युद्धामध्ये गुप्तहेर पाणबुड्या टेहळणीसाठी वापरतात, जेणेकरून त्यांचे अस्तित्व कोणाला समजू नये.

व्हेल बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे, परंतु आज मी व्हेलच्या शेवटच्या उडी बद्दल लिहिणार आहे.  दर्यावर्दी  लोकांची अशी एक म्हण आहे  – “When a whale falls, everything grows” हे कसे काय? तेच सांगणार आहे. असा विश्वास आहे की, व्हेल माशात एक अजब क्षमता असते. मरण जवळ आल्याची पूर्व सूचना! जेव्हा ही वर्दी येते तो चूपचाप आपला समूह सोडतो. आणि कोठेतरी शांत व एकांत स्थळ  निवडतो. तो आता त्याच्या आयुष्यातील काही गंमतीशीर कवायती करणार असतो. त्याचे हे शेवटचे व उत्तम सादरीकरण असणार असते. आहे नाही त्या शक्तीनिशी तो समुद्राच्या पृष्ठभागावर येऊन त्याच्या नेत्रदीपक कवायती करतो. आयुष्याच्या अंताला हसत हसत कवटाळतो अगदी शांतपणे, लयबद्ध व आनंदात ! शरीराचा एक सुंदर पवित्रा घेऊन तो त्याची शेवटची उडी मारतो, डोळे बंद करतो, श्वासही बंद करतो व समुद्रतळाकडे हळूहळू जाऊ लागतो. होय… आता मरणास तो आनंद, संयम व निर्भीडपणे  सामोरा जातो. हीच ती व्हेल ची शेवटची उडी.

व्हेल ची ही शेवटची उडी अनेक नवनिर्मितीला आमंत्रण देत असते.  शार्क व ईल माशांना याचा पहिला सुगावा लागतो.  ते तुटून का पडत नाहीत? कारण एवढा प्रचंड महाकाय मासा त्यांना अनेक दिवस खाद्य म्हणून पुरणार असतो. जेव्हा व्हेलचे शरीर समुद्रतळावर येऊन स्थिर होते तेव्हा समुद्रतळातले छोटे छोटे मासे (Crustaceans) त्यातील प्रोटीन्स व ऑरगॅनिक पदार्थ खाऊ लागतात. ते त्या शरीरात वस्ती करूनच राहतात.  जवळजवळ दोन वर्ष ही प्रक्रिया चालते. व्हेलच्या शरीरातील सर्व काही खाऊन फस्त झाल्यावर जो उरतो तो फक्त त्याचा सांगाडा! त्यांचे प्रजनन तर चालूच असतं. आता यापुढे काम असतं एका बॅक्टेरियाचं. (Anaerobic Bacteria). सांगाडा पोखरून त्यातील लिपिडचे विच्छेदन करून त्यापासून हायड्रोजन सल्फाईड वायू निर्माण केला जातो. ही प्रक्रिया येथेच थांबत नाही तर यातूनही व्हेलचे जे पार्थिव असते त्याचे रूपांतर रिफ (प्रवाळ) मध्ये होते. हेच ते समुद्र जलचरांचे छोटे छोटे निवास. शंभर वर्ष ही प्रक्रिया चालते व एका व्हेल माशाचा शेवटचा अणु रेणू ही वापरला जातो. व अशा प्रकारे एका व्हेलच्या शरीरातून ४३ प्रजाती व जवळपास १२,४९० जीव जीवाणूंना रोजगार  व जीविताचा आधार होतो पुढील जवळ पास शंभर वर्षे … एक व्हेल समुद्र तळाशी जातो, जेणेकरून एवढे सगळे जीव जीवाणू त्यावर जगू शकतील …

लेखिका : सुश्री अंजली राजाध्यक्ष

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘स्पर्श’… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘स्पर्श’… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

अमेरिकेतील एका मोठ्या शहरातील एका हॅास्पिटल मधे जेन नवीन नर्स म्हणून कामाला लागली होती. त्या रात्री तिथे एक बाळ जन्माला आले पण त्या बाळाला severe congenital disorder होती. बाळाच्या मेंदूवर परिणाम झाला होता व ते बाळ जगणार नाही हे डॉक्टरांना दिसत होते. जेनला वाटले की नेमके आपल्या नोकरीच्या पहिल्या आठवड्यात अगदी असे बाळ का जन्माला यावे? माणसाचे मन तरी किती विचित्र असतं..कायम फक्त स्वतःचा विचार करतं.. 

जेनने यापूर्वी अशा प्रकारचे बाळ जन्माला आले तर काय होते बघितले होते. अशा बाळांना  ॲडमिट करून ती जाण्याची वाट बघितली जाते. कारण उपचाराचा काही उपयोग नसतो. 

त्या रात्री मॅटर्निटी वॉर्डची प्रमुख नॅन्सी कामाला आली. जेनने नॅन्सीला या बाळाची माहिती दिली. नॅन्सीने बाळाजवळ जाऊन सर्व रिपोर्ट वाचले. त्यानंतर नॅन्सीने जे केले ते बघून जेनला जी शिकवण मिळाली ती जेन आयुष्यभर विसरली नाही.  

नॅन्सी त्या बाळाजवळ गेली. तिने तिचा चेहरा बाळाच्या अगदी शेजारी आणला आणि ती बाळाशी बोलू लागली. “कसं आहे आमचे बाळ? तू किती सुंदर आहेस हे तुला माहिती आहे का? किती गोड आहेस तू” असे बोलत नॅन्सीने त्या अत्यंत आजारी बाळाला हळुवारपणे उचलून घेतले. त्याला जवळ घेऊन ती थोडावेळ बसून राहिली. तिने गाणे गुणगुणत त्याला दुधाच्या बाटलीने दूध पाजले. परत त्याच्याशी गोड आवाजात बरच काही  बोलली. बाळाला झोपवून तिने त्याला अलगद पाळण्यात ठेवले. हे तिने एकदाच नाही पण त्या रात्री अनेकवेळा केले. जणू काही ते तिचे स्वतःचे बाळ होते.. 

जेन अंतर्बाह्य हलून गेली. तिच्या नर्सिंग कॉलेजमध्ये असे काही शिकवले नव्हते. नॅन्सी म्हणाली,”जिथे मेडीकल उपचार संपतात त्यानंतर सगळं संपलं असं कधीच नसते. प्रत्येक जीवाला प्रेमाचा स्पर्श कळतो. आवाजातलं प्रेम कळतं. कुठल्याही नर्सचं हे कर्तव्य आहे की जोवर एखाद्या जीवाचा श्वासोच्छवास सुरू आहे तोवर त्याची काळजी घ्यायची! सर्व प्रकारे जपायचं! प्रेम द्यायचं!”

स्पर्श ही मानवी जीवाला समजणारी सर्व भाषांपलीकडील भाषा आहे. इतर कोणत्याही औषधांचा उपयोग नसताना नॅन्सीने त्या चिमुकल्या जीवाला प्रेमळ स्पर्शाचे औषध देऊन त्याचा कठीण काळ थोडा का होईना सुलभ केला होता. जिथे डॉक्टरांनी हात टेकले होते तिथे नॅन्सीने एक नवा उपचार शोधून काढला होता.  

जेनला ही महान शिकवण त्या रात्री मिळाली. पुढची ५० वर्षे जेन ने वेगवेगळ्या मॅटर्निटी वॉर्डमध्ये काम केले. तिला उत्तम नर्स म्हणून अनेक बक्षिसे मिळाली. मान- सन्मान मिळाले. तिने कित्येक जाणारी बाळे पण बघितली आणि नॅन्सीची शिकवण डोळ्यापुढे ठेऊन त्या प्रत्येक आजारी बाळाला प्रेमाचा स्पर्श दिला. बाळाच्या शेजारी आपला चेहरा आणून त्या बाळाचे कौतुक केले. त्याला जवळ घेऊन बाटलीतून दूध पाजून ती बसून राहिली आणि त्या पलीकडे जाऊन त्या बाळाच्या आईचे सांत्वन केले. 

स्पर्श ही आपण एखाद्या व्यक्तीला दिलेली अमूल्य भेट आहे. दोन हाताच्या उबेतून एक शब्द न बोलता आपले प्रेम दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोचवणारी! आपल्यातले तेज दुसऱ्याला देऊन त्या व्यक्तीचे जग उजळवून टाकणारी!  एक पाठीवरची प्रेमळ थाप सर्व ताणातून मुक्त करण्यास पुरेशी असते. 

जगात अनेक प्रकारची कनेक्टीव्हीटी आली आहे पण माणसाचा एकटेपणा काही कमी होत नाही..म्हणून एखाद्या व्यक्तीला भेट द्यायची असेल प्रेमळ स्पर्शाची भेट द्यावी. शेजारी श्रोता होऊन बसावे आणि त्या व्यक्तीचा एकटेपणा दूर करावा.

बुद्धिबळपटू बॉबी फिशर ने म्हटले आहे, “Nothing is so healing as the human touch.”

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जंगल फार्म आणि स्मार्ट सॉफ्टवेअर ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

जंगल फार्म आणि स्मार्ट सॉफ्टवेअर ☆  श्री मकरंद पिंपुटकर

गोष्ट खूप जुनी. २००८ सालापूर्वीची. साल नमूद करायचं कारण म्हणजे २००८ साली भारतात गूगल मॅप पहिल्यांदा अवतरलं, त्याच्या आधीचा हा प्रसंग.

तेव्हाच्या ठाणे जिल्ह्यातील (आताच्या पालघर जिल्ह्यातील) बोर्डी/डहाणूजवळील असवाली येथील सूर्यहास चौधरींच्या “जंगल फार्म” येथील हा प्रसंग thejunglefarm.in

निसर्गाच्या सान्निध्यात, जैवविविधता, पर्यावरण, adventure आणि unlimited धमाल याचं अफलातून मिश्रण म्हणजे “जंगल फार्म”. पैसा फेकून AC खोल्यांमध्ये निव्वळ ऐदीपणे लोळणे याच्यापलीकडे ज्यांची बुद्धी चालते अशांसाठी अप्रतिम पर्वणी.

बार्डाचा डोंगर, असवाली धरण, कोसबाड हिल, बोर्डी – घोलवड – डहाणूचे समुद्रकिनारे आणि खुद्द जंगल फार्मवरील अनेकविध उपक्रम या सगळ्याचा आस्वाद घेण्यासाठी दोन तीन दिवससुद्धा कमी पडतात आणि यासाठी वेगवेगळ्या शाळा कॉलेजांतून, मित्रमंडळासोबत अथवा IT/ अन्य कंपन्यांमधून अनेकजण इथे येत असतात, पुन्हा पुन्हा येत असतात.

या वेळी, एका IT कंपनीतून बस भरून ४०-४५ जण मुंबईहून “जंगल फार्म”ला येत होते. पश्चिम द्रुतगती मार्गाने चारोटी टोल नाक्यानंतर त्यांनी डावीकडे डहाणूसाठी वळण घेतले, पुढे सागर नाक्यापर्यंत आले आणि मग त्यांच्यातल्या एकाने सूर्यहास दादांना फोन लावला. 

“सूर्यादादा, आम्ही सागर नाक्यापर्यंत आलो आहोत, आता डावीकडे वळून “पार नाक्या”ला येतो आणि मग बोर्डीच्या रस्त्याला लागतो,” तो फोन करणारा सांगत होता. 

सूर्यादादाने ते कितीजण आहेत, कसे येत आहेत, बसने येत आहेत म्हटल्यावर बसचा नंबर काय वगैरे माहिती विचारून घेतली आणि मग तो बोलू लागला.

“तुम्ही मला वाटत पहिल्यांदाच येत आहात ना जंगल फार्मला ?” दादाने खात्री करून घेतली, “डहाणू ते बोर्डी साधारण २० किलोमीटर अंतर आहे आणि तिथून आपलं जंगल फार्म आणखी १० किलोमीटर. खरं सांगायचं तर रस्ता थोडा confusing आहे. पण माझ्या एका मित्राने मला एक नवीन सॉफ्टवेअर पाठवले आहे. तुम्ही जर फोन चालू ठेवलात आणि तुमचा मोबाईल डाटा चालू ठेवलात, तर तुम्ही कुठे आहात, आजूबाजूला काय आहे, ते मला इथे माझ्या फोनवर समजू शकतं.”

मुंबईहून येणाऱ्या ITवाल्याचे कान टवकारले. असं काही सॉफ्टवेअर ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी दुर्गम भागात राहणाऱ्या माणसाकडे असावं आणि मुंबईत राहणाऱ्या आपल्याला त्याचा थांगपत्ताही नसावा, याचं त्याला अप्रूपही वाटलं आणि वैषम्यही.

“तुम्ही फोन चालू ठेवा,” सूर्यादादा पुढे बोलत होता, “मी जरा ते सॉफ्टवेअर चालतं आहे ना खात्री करून घेतो, म्हणजे कसं यायचं ते मला तुम्हाला सांगता येईल.”

पुढच्या पाच मिनिटात पुढे कसं यायचं ते सूर्यादादा मुंबईच्या ग्रुपला सांगत होता. बस कितीही वेगात धावली किंवा तिची गती कमी झाली, तरी सूर्यादादांच्या सांगण्यातले landmarks चुकत नव्हते. 

पुढे सहज सांगताना जेव्हा दादाने “जरा म्हशींचा घोळका येत आहे, सांभाळून हां” किंवा “तुमच्या मागून स्कूल बस येत आहे” अशा बारीक सारीक खाणाखुणाही सांगितल्या, तेव्हा बसमधल्या समस्त मुंबईकरांसी अचंबा जाहला.

पाऊण एक तासानंतर बस असवाली धरणाजवळील कच्च्या रस्त्यावरून “जंगल फार्म”च्या रस्त्याला लागली, आणि गेटमधून आत वळली. सूर्यादादाचा फोन चालूच होता, त्यामुळे हा सगळा प्रवास निर्धोक निर्वेध पार पडला. 

सगळे जण उतरले, बसमधून सामान काढायला लागत होते, तेवढ्यात सूर्यादादा एका गाडीतून बसपाठोपाठ “जंगल फार्म”मध्ये शिरला. 

बसमधल्या माणसाने त्याचा कॉल कट केला आणि तो सूर्यादादांना भेटायला धावला. त्याला ते सॉफ्टवेअर बघायचे होते, समजावून घ्यायचे होते. 

सूर्यादादा त्याला भेटले आणि म्हणाले, “तुम्ही एवढ्या दुरून मुंबईहून आले आहात, दमला असाल, हात पाय तोंड धुवून घ्या, फ्रेश व्हा, चहा पिताना निवांत बोलू.”

हातात चहाचा कप घेतल्याघेतल्या तो फोनवरचा माणूस दादाच्या खनपटीला बसला, “दादा, हे कसं काय तुम्ही केलंत ते सांगा ना. म्हणजे बस कुठे आहे, कुठे वळायचं, एवढंच नाही तर मागेपुढे म्हशी आहेत, शाळेची बस आहे हे सगळं सगळं तुम्हाला कळत होतं. कोणतं सॉफ्टवेअर आहे ते सांगा तरी आम्हाला. तुम्ही आम्हाला ते विकू शकाल का ?” वगैरे वगैरे. 

चहा पित, मिश्किल हसत सूर्यादादा म्हणाला, “माझं secret मी तुम्हाला सांगतो, पण त्याआधी मी तुमची सगळ्यांची माफी मागतो. 

असलं कुठलं सॉफ्टवेअर माझ्याकडे नाही. अहो, तुमची बस डहाणूला सागर नाक्याला होती, तेव्हा तुमच्या मागोमाग माझी गाडी होती. त्यामुळे कुठे वळण आहे, मागेपुढे कोण आहे हे मला प्रत्यक्ष दिसत होतं आणि मी तुम्हाला तसं सांगत होतो. बाकी ते मोबाईल डाटा चालू ठेवा – सगळं उगाच बनवाबनवी होतं.”

बसमधल्या IT तज्ञांनी कपाळावर हात मारला. सूर्यादादांनी त्यांना सहजी गंडवलं होतं. 

“अर्थात, हे असं नकाशा दाखवणारं सॉफ्टवेअर पुढेमागे येईलही कदाचित,” दादा गंभीरपणे सांगत होते.

“गूगल मॅपच्या रूपाने आता तसं ॲप आलं आहे खरं, पण मागच्यापुढच्या म्हशी ओळखता येण्याची सोय अजूनही गुगलचे सर्वेसर्वा सुंदर पिचाई करू शकले नाहीयेत,” जंगल फार्मची धुरा आता समर्थपणे पेलणाऱ्या आपल्या मुलाला – तपन (8830262319) ला ही जुनी आठवण सांगताना, डोळे मिचकावत सूर्यादादा सांगत होते.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर — लेखक : श्री संतोष भोसेकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर — लेखक : श्री संतोष भोसेकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

(प्रखर राष्ट्रभक्ती आणि शौर्याचा मूर्तिमंत अवतार असलेले क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर) 

भारताच्या स्वातंत्र्यासाठी एकाच घरातील तीन भावंडांनी आपली शिर कमले भारतमातेच्या चरणी अर्पण केली.  जुलमी इंग्रज अधिकारी  रँडचा वध करणारे मोठे बंधू दामोदर हरी चापेकर यांना १८ एप्रिल १८९८ रोजी फाशी देण्यात आले.

हरिकीर्तनकारांच्या घराण्यात जन्मलेले दामोदरपंत, बाळकृष्ण आणि वासुदेव हे तिघे बंधू . बालपणापासूनच त्यांना व्यायामाची आवड होती .त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा प्रचंड प्रभाव होता. तिघेही बंधू हरिकीर्तनात वडिलांना मदत करीत असत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गाऊन लोकांमध्ये क्रांतीसाठी स्फूर्ती घडवीत. मुलांना कवायत शिकवीत. व्यायामाचे महत्त्व पटवून देत असत.

१८९७ मध्ये प्लेगची साथ सुरू झाली. त्यावेळी इंग्रजांनी पुण्यात प्रचंड अत्याचाराचा हैदोस मांडला होता. पुण्याचा कलेक्टर रँड हा अत्यंत क्रूर होता. पुण्यातील नागरिकांवर प्रचंड अत्याचार करू लागला. अत्याचारी रँड विषयी चापेकर बंधूंच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली. त्या अत्याचाराचा सूड घेण्यासाठी दामोदरपंतांनी रँडच्या वधाची योजना आखली.

२२ जून १८९७ या दिवशी पुण्यातील गणेश खिंडीत एका कार्यक्रमाहून परतत असताना उन्मत रँड आणि आयस्टर या दोघांना गोळ्या झाडून वध केला. द्रविड बंधूंच्या फितुरीमुळे दामोदर पंतांना पकडले आणि त्यांना पुण्याच्या येरवडा तुरुंगात आजच्या दिवशी फाशी देण्यात आले. तीनही बंधू अत्यंत धैर्याने फासावर चढले. या सशस्त्र क्रांतिकारकांचा इतिहास अजरामर आणि प्रेरक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्यावर जहाल असा पोवाडा रचला.

स्वार्थ मारुनी लाथ; ठोकिला रँड जनछळ शमनाला l

परार्थसाधू श्री चाफेकर योग्य का न  ते नमनाला ll

पराक्रमाच्या तेजा तुमच्या त्रासुनि निंदिती जरि घुबडे l

वीर कथा तुमची ही गाईल पिढीपिढी नव पुढे पुढे ll

दामोदर चाफेकर फासावर गेले त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले वर्णन..

न्यायाधीश हा जोशी उत्तम उदय मुहूर्ता योग्य गणी l

सत्य देशहित वऱ्हाड जमले कीर्ती नीति ह्या वऱ्हाडणि l

टिळक गजानन नमस्कारिला फास बोहले मग पुरले l

स्मरले गीतमंत्र दामूने मुक्ती- नवरीला हो वरिले l

परी अहाहा! मायावी ही नवरी वर पळवील कुठे l

कुठे हरपले वऱ्हाड सारे अंगाला  बहु कंप सुटे !

भारतमातेला सुद्धा या शूर अशा तीन बंधूंचा अभिमान वाटला असावा. जगाच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण आहे.        

क्रांतिकारक दामोदर हरी चाफेकर यांच्या पराक्रमाला वंदन.

लेखक : संतोष भोसेकर

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डोक्यात राख घालून घेतलेली मुलगी ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

डोक्यात राख घालून घेतलेली मुलगी ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

ती विमनस्क अवस्थेतच स्मशानात पोहोचली. तिचा एकंदर अवतार पाहून ही आजही काहीतरी भलतंच  करणार असा कयास तिथं उपस्थित असलेल्या एकाने लावला आणि त्याने आपल्या मोबाईलचा कॅमेरा सुरू केला. ती जळून राखरांगोळी झालेल्या चितेजवळ जाऊन दोन्ही पायांवर बसली आणि तिने त्या राखेत हात घातला. यातील चिमुटभर राख ती कपाळावर लावेल असं वाटत असतानाच का कुणास ठाऊक तिने अत्यंत आवेगाने दोन्ही हातांच्या ओंजळीत ती राख घेतली…आधी तोंडाला फासली आणि मग आपल्या डोक्यात घातली….बघणारे सर्व स्तब्ध आणि नि:शब्द! काय बोलणार? 

“मी यानंतर कोणालाही असं बेवारस जळू देणार नाही!” असं काहीसं ती पुटपुटत राहिली बराचवेळ आणि तिथून निघून गेली झपाझप पावलं टाकीत. 

कालच दुपारी ती आली होती आपल्या सख़्ख्या भावाचं शव घेऊन इथं. सोबत मोजकीच माणसं. आणि त्यात कुणीही पुरूष नाही. तिच्या भावाला आदल्या संध्याकाळी काही लोकांनी गोळ्या घालून ठार मारलं होतं भररस्त्यात. तिने खूप आरडाओरडा केला पण कुणीही तिच्या मदतीला धाऊन आलं नाही. तिने स्वत: कशीबशी रुग्णवाहिका बोलावून घेऊन रक्तबंबाळ झालेल्या भावाला सरकारी इस्पितळात पोहोचवलं. खरं तर तो जागीच गतप्राण झालेला होता. त्याचा देह उत्तरीय तपासणीसाठी शवागारात हलवला पोलिसांनी..ती ही तिथपर्यंत गेली पाय ओढत ओढत आणि तिथलं भयावह वास्तव पाहून ती मनातून पार हादरून गेली. अगणित शवं पांढ-या कापडांनी गुंडाळून ठेवलेली…नातेवाईकांची वाट पहात. 

   उत्तरीय तपासणी होण्यास काही वेळ तर लागणारच होता….भावाचं शव ताब्यात घेण्याची तिची हिंमत होईना…एकटीच होती ती त्याची नातेवाईक म्हणून. आईचं काहीच महिन्यांपूर्वी अचानक निधन झालं होतं. वडील कामावर गेलेले होते. दिल्लीच्या मेट्रो रेल्वेत ते हंगामी चालक म्हणून कामावर होते. ती इस्पितळातून थेट घरी पोहोचली. आणि अगदी विमनस्क अवस्थेत बसून राहिली. वडील घरी आले…त्यांना ही बातमी समजली होती उडत उडत. पण नेमकं काय झालं हे त्यांना तिच्या तोंडूनच कसे बसे समजले आणि ते धाडकन खाली कोसळले आणि थेट कोमा मध्ये गेले…बेशुद्ध! 

खुनासारखं भयानक प्रकरण ऐकून जवळचा कुणीही नातेवाईक यांच्या घरी फिरकायला तयार नव्हता. आपण भावाला असं एकटं बेवारस टाकून तिथून निघून यायला नको होतं…तिला वाटलं. तो पर्यंत रात्र सरून गेली होती. ती तशीच इस्पितळात पोहोचली. काहूर माजलेल्या काळजानं तिने सोपस्कार उरकले आणि भावाला स्मशनात आणलं. पण अंत्यविधी पार कोण पाडणार. घरचा एकही पुरूष तिथं आलेला नव्हता. महिला तर करूच शकत नाहीत अंत्यविधी. मग तिने आपल्या डोक्यावर एक मोठं फडकं बांधलं…पगडी सारखं. आणि स्वत: पुढे होऊन जे काही करायचं असतं ते केलं भरल्या डोळ्यांनी. “दादा, तुला काल तिथं असं एकट्याला टाकून यायला नको होतं रे मी!” ती त्याचा देह विद्युतदाहिनीच्या मुखात दिसेनासा होईपर्यंत म्हणत होती. तिथं रडायला ती एकटीच होती. स्मशान भूमीत आणखी बरेच देह प्रतिक्षेत होते अंतिम निरोपाच्या. पण त्यापैकी अनेकांच्या देहासमवेत फक्त एखादा पोलिसच होता. अन्य कुणीही नाही. मग तिला समजलं….अशा हजारो बेवारस मृतदेहांची पोलिसांना विल्हेवाट लावावी लागते. २०१८ ते २०२२ या चार वर्षांतली आकडेवारी होती…अकरा हजार बेवारस देह. पैकी केवळ दीड हजारांच्या नातेवाईकांची तपास लागला आणि त्यांना शेवटचा निरोप मिळाला. बाकीचे असेच सरकारी यंत्रणांनी थंडपणे आणि यांत्रिकपणे इथपर्यंत पोहोचवले आणि इथल्यांनी एखादी चीजवस्तू जाळून टाकावी तसे ते देह अग्निच्या हवाली केले होते! 

ती सकाळी एका निश्चयानेच स्मशानभूमीत पोहोचली होती. तिने भावाची राख आपल्या डोक्यात घालून प्रण केला…मी करीन बेवारसांवर अंतिम संस्कार!

वर्ष २०१८…खरं तर तिचं लग्न ठरलं होतं. एका फौजीसोबत तिचं रीतसर लग्न लागणार होतं. ती उच्चशिक्षित समाजसेवा विषयात पदव्युत्तर पदवी. कायद्याचा अभ्यास सुरु होता. एका इस्पितळात एडसग्रस्तांसाठी समुपदेशक म्हणून सेवाही करीत होती. चारचौघींसाराखीच तिचीही स्वप्नं होती. आईने लग्नासाठी दागिने खरेदी करूनही ठेवले होते. पण ती आईच देवाघरी गेली आणि पुढच्याच वर्षी माणसा-माणसांतली करूणा रसातळाला नेणारा कोरोना उपटला. लग्न लांबणीवर पडलं. तिचा भाऊ एका रुग्णवाहिकेवर चालक म्हणून नोकरी करत असे. त्याचे कुणाशी काही वाद झाले आणि त्यात त्याचा खून पडला. 

हिच्या घरात आता आजारी वडील, त्यांची वृद्धा आई एवढीच माणसं शिल्लक राहिली होती. भावाच्या अंत्यसंस्कार प्रसंगी तिने त्याला दिलेला शब्द अक्षरश: खरा करून दाखवला आहे आजवर. गेल्या दोन वर्षात थोड्याथोडक्या नव्हे तर सुमारे चार हजारांना प्रेतांवर तिने विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत. त्यात विविध जातीधर्मांच्या माणसांच्या प्रेतांचा समावेश आहे. दिल्ली सारख्या महानगरामध्ये आसपासच्या राज्यांतून हजारो लोक पोटाची खळगी भरण्यासाठी येत असतात घरंदारं सोडून. यातल्या अनेकांच्या नशिबी अशी एकाकी मरणं येतात. देहांवर ओळखपत्रं सापडत नाहीत. फौजदारी कायद्यामधील तरतुदींनुसार विशिष्ट काळ वाट पाहून या मृतदेहांची विल्हेवाट लावली जाते. 

आपली कथानायिका पुजा शर्मा गेल्या दोन वर्षांपासून दरदिवशी सरासरी तीन-चार मृतदेहांवर स्वखर्चाने अंत्यसंस्कार करते. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हरिद्वार गंगा किनारी जाऊन या बेवारस लोकांची रक्षा विधिवत विसर्जित करते पापक्षालिनी गंगेच्या वाहत्या प्रवाहात…..हे पुण्यकर्मच नाही तर काय? 

नातेवाईक आता पुजा पासून अंतर ठेवून आहेत. तिच्या या कामामुळे तिचे लग्न होण्याची शक्यता कमी झाली आहे. तिच्या घरीही कुणी फारसं येत नाही. हो, पोलिस आणि सरकारी यंत्रणांना मात्र पुजा आता एक हक्काची माणूस झाली आहे. फाटलेल्या आभाळाला हे पुजा नावाचं थिगळ पुरणार नसलं तरी काही भाग झाकणारं तर निश्चितच आहे. पुजाचे वडील तिला त्यांच्या वेतनातून काही रक्कम देत असतात, तर आजी तिच्या निवृत्तीवेतनाचा काही भाग देते. आजीच्या मालकीचा असलेला जमिनीचा एक छोटा तुकडा तिने पुजाला दिला आहे…त्या जागी आता काही बेवारस वृद्धांना,बालकांना आधार मिळतो. पुजाने पुढे जाऊन Bright the Soul Foundation नावाने सामाजिक संस्था स्थापन केली आहे.

डोक्यात राख घालून काहीतरी विध्वंसक करण्याऐवजी पुजाने एक अत्यंत वेगळा मार्ग अनुसरला आहे…आणि म्हणूनच तिचं कौतुक वाटतं. पुजा शर्माच्या या कार्याला समाजाने पाठबळ दिलं तर बरंच होईल! 

सोळा संस्कारांपैकी हा सोळावा संस्कार न लाभणं यापरती दुर्दैवाची गोष्ट नसावी. सोबती काही जीवाचे मात्र यावे न्यावयाला..तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी…असं कविवर्य सुरेशजी भट म्हणून गेलेत…खरा तर हा सर्व जीवांचा हक्क आहे. हा हक्क मिळवून देण्यासाठी झगडणारी अनेक माणसं,संस्था आपल्या आसपास असतील…सांगलीतल्या अशाच एका मित्रमंडळाविषयी वाचल्याचं स्मरतं. या सर्व जिवंत मनाच्या माणसांना मानाचा मुजरा! 

एका गावात बैल विकणारा एक माणूस दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर दूर कुठल्याशा मुलखातून येत असे. त्याच्याकडच्या मोठ्या शिंगांच्या बैलांना स्थानिक भाषेत लोक हेडी बैलं म्हणून ओळखायचे…आणि म्हणून त्या विक्रेत्याला हेड्याबाबा असं नाव पडून गेलं होतं. मशगतीच्या कामाचा मौसम असल्यानं शेतकरी त्याच्याकडचे मोठाल्या शिंगांचे,ताकदवान बैल विकत घेतही असत. एकेवर्षी विकायला आणलेल्या बैलांना पाणी पाजायला म्हणून हा हेड्याबाबा नदीवर गेला आणि नदीतल्या त्याला अनोळखी डोहातल्या चिखलात रुतून बुडाला! दोन दिवसांनी त्याचं प्रेत पाण्यावरती आलं. त्याच्या देहाला हात कोण लावणार? ना ओळखीचा ना पाळखीचा…न जाणो कोणत्या जातीचा? जुना काळ तो. पोलिस पंचनामा असे फारसे सोपस्कार नव्हते त्या काळी. लोक नुसते काठावर उभे राहून दर्शक बनले होते. त्याच गावकुसाबाहेर राहणारा एक मोठ्या काळजाचा माणूस त्या चिखलात उतरला आणि त्याने ते प्रेत काठावर आणले. जनावरांची प्रेतं हाताळणं वेगळं…पण माणसाचा मृतदेह? सोपं काम नसतं हे! त्याने ते प्रेत दोन्ही हातांवर घेतलं आणि थेट त्याच्या मालकीच्या शेतावर नेलं. रीतसर सरण रचलं…आणि त्या अनोळखी,बेवारस देहाला अग्निच्या स्वाधीन केलं…सकाळी राख सावडली आणि ज्या नदीत त्याला मरण आलं होतं त्याच नदीत ती राख प्रवाहीत केली! लोक म्हणतात…हेड्याबाबा त्याच्या शेताची आजही राखण करतो…त्याने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून! असो. 

पूजा शर्माची प्रेरणादायी कहाणी नुकतीच वाचनात आली. ती आपल्या माहितीसाठी लिहिली. पूजा शर्मा यांच्या सामाजिक संस्थेविषयी अधिक माहिती इंटरनेट वर मिळू शकते. ([email protected] या ईमेलवर संपर्क करता येईल.) विषय अप्रिय असला तरी अपरिहार्य आहे. 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ विजयी पांडुरंग – लेखक : अज्ञात ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ विजयी पांडुरंग – लेखक : अज्ञात ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

पैठण गावात जे नाथांचं मंदिर आहे , त्यांच्या देवघरात सर्वात वर तुळशीचं माळ घातलेली पांडुरंगाची मूर्ती आहे. ती सदैव फुल वस्त्र अलंकाराने झाकलेली असते त्यामुळे मूर्तीचे फक्त मुखकमल दर्शन होत असते.

वास्तविक या मूर्तीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे._____

आपण सहसा पांडुरंगाची मूर्ती दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा असलेला पांडुरंग पाहतो पण या मूर्तीत पांडुरंगाचा डावा हात कमरेवर आहे तर उजवा हात कमरेच्या खाली आहे पण समोरच्या बाजूला उघडणारा तळवा किंवा तळहात दिसतो…. म्हणून त्याला” विजयी पांडुरंग” असे म्हणतात.

या विजयी पांडुरंग कसा याची एक सुंदर आख्यायिका आहे ,हा भगवंत नाथांना प्रासादिक रुपाने मिळालेला आहे ही मूर्ती दीड फूट उंचीची आणि अडीच किलो वजनाची पंचधातूंपासून बनवलेली मूर्ती आहे. कर्नाटकातील राजा रामदेवराय हा पंढरपूरच्या पांडुरंगाचा उपासक होता त्यामुळं यानं मंदिर बांधलं आणि सोनाराकरवी पंचधातूंची मूर्ती बनवून घेतली आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करणार तोच पांडुरंग दृष्टांत देऊन त्यांना म्हणाला  “माझी ही मूर्ती तू इथे स्थापलीस तर मी इथे राहणार नाही आणि माझ्या इच्छे विरुद्ध तू तसं केलंस तर तुझा निर्वंश होईल “मग राजाने विचारले की या मूर्ती चे काय करू तेव्हा पांडुरंग म्हणाला की पैठणच्या नाथ महाराजांना नेऊन दे…

त्यानंतर राजाने ती मूर्ती वाजत गाजत पैठणला आणली तेव्हा नाथ महाराज मंदिरात असलेल्या खांबाला टेकून प्रवचन सांगत होते. ते ज्या खांबाला टेकून पुराण सांगायचे त्या खांबाला पुराण खांब असे म्हणतात. राजा रामदेवराय नाथांचे प्रवचन संपेपर्यंत थांबले आणि त्यांनी ही मूर्ती तुमच्याकडे कशी किंवा का आणली हे सर्व नाथांना सांगितले आणि त्यामुळे भगवंतांना तुमच्याकडे ठेवून घ्या असे  सांगितले…

त्यावर नाथांनी मूर्तीला नमस्कार केला आणि म्हणाले की तू राजाच्या घरी राहणारा आहेस माझ्याकडे तुझी रहायची इच्छा आहे पण राजा सारखे पंचपक्वान्न माझ्याकडे तुला मिळणार नाहीत, तेव्हा या भगवंताच्या पायाखालच्या विटेवर अक्षरं उमटली “दास जेवू घाला न.. घाला” म्हणजे हे नाथ महाराज मी तुझ्याकडे दास म्हणून आलोय तू जेवायला दे अथवा न दे मी तुझ्याजवळ राहणार आहे . हे ही या मूर्तीच एक वैशिष्ट्य सांगता येते की विटेवर अजूनही ही उमटलेली अक्षरे आहेत.

प्रत्यक्ष भगवंत घरी आले म्हणल्यावर पूर्वी पाहुणचार म्हणून कोणी बाहेरून आले की गुळ पाणी दिले जायचे पण प्रत्यक्ष भगवंत आलेत म्हटल्यावर त्यांनी आपल्या पत्नीला आवाज दिला. त्यांचे नाव गिरीजाबाई होते त्यांचा पाहुणचार म्हणून बाईंनी चांदीच्या वाटीत लोणी आणि खडीसाखर आणलं नि नाथांच्या समोर धरलं.  हे लोणी घेण्यासाठी म्हणून भगवंतांनी आपला उजवा हात कमरेवरचा काढून पुढे केला नि लोणी चाटले नंतर तो हात लोणचट म्हणजेच थोडा लोणी लागलेला असल्याने परत कमरेवर ठेवताना हात व्यवस्थित कमरेवर ठेवला नाही. म्हणून त्या मूर्तीचा हात असा आहे आणि या मूर्तीच दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आजही प्रत्येक एकादशीला अभिषेकासाठी मूर्ती खाली घेतली जाते तेव्हा संपूर्ण अभिषेकानंतर मूर्तीला पिठीसाखरेने स्वच्छ पुसलं जातं तेव्हा हाताला ही पुसलं जातं तेव्हा त्या हातावरून हात फिरवला तर आजही लोण्याचा चिकटपणा जाणवतो.

याच भगवंतांनी नाथांच्या घरी कावडीने पाणी वाहिले. मूर्तीच्या खांद्यावर पाणी वाहिल्याचे घट्टे आजही दिसतात अशा तीन वैशिष्ठ्याने नटलेली ही विजयी पांडुरंगाची मूर्ती आहे…!

प्रस्तुती : मंजिरी येडूरकर 

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रणजित देसाई ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

रणजित देसाई ☆ श्री प्रसाद जोग

रणजित देसाई

जन्मदिन : ८ एप्रिल,१९२८

कथालेखक, नाटककार म्हणून रणजित देसाई यांचा परिचय असला तरी एक उत्कृष्ट दर्जाचे कादंबरी लेखक म्हणूनच महाराष्ट्राला आवडलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व होते त्यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड आहे. माध्यमिक शाळेत असतानाच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली.

त्यांचे कथा लेखन कोल्हापूरच्या ‘महाद्वार’ मधून प्रसिद्ध होत असे. त्यांच्या ‘भैरव’ या कथेला ‘प्रसाद’ मासिकाने घेतलेल्या कथा स्पर्धेत पारितोषिक मिळाले आणि त्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या कथालेखनाला सुरुवात झाली. ‘रुपमहाल’, ‘कणव’, ‘जाणे’, ‘कातळ’, ‘गंधाली’, ‘कमोदिनी’, ‘मधुमती’, ‘मोरपंखी सावल्या’ इ. त्यांचे अनेक कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ग्रामीण आणि सामाजिक विषयावरच्या कथांमधून आलेल्या शैलीमुळे त्यांचा ठरावीक असा वाचक वर्ग तयार झाला. ग्रामीण जीवनावरील त्यांच्या कथा या एक प्रकारे चित्रकथाच होत्या. इतकी त्यांची जिवंत मांडणी होती. ‘बारी’, ‘माझं गाव’ या कादंबर्‍या सुरुवातीला त्यांनी लिहिल्या.

त्यानंतर १९६२ साली ‘स्वामी’ ही थोरल्या माधवराव पेशव्यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी प्रसिद्ध झाली आणि तिने लोकप्रियतेचे शिखर गाठले. ‘स्वामी’ मुळे एक श्रेष्ठ लेखक म्हणून रणजित देसाईंचे नाव सर्वतोमुखी झाले. एखादी कादंबरी वाचकांनी उचलून धरली म्हणजे काय? हे स्वामी कादंबरीच्या आवृत्या ची लांबलचक यादी वाचल्यावर लक्षात येते . मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे  ते अजुनंच नम्र झाले आणि एका आवृत्तीच्या सुरवातीला त्यांनी लिहिले, 

अहंकाराचा वारा  ना लागो माझ्या चित्ता.

त्यांच्या स्वामी कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.

त्यानंतर शिवाजी महाराजांवर लिहिलेली ‘श्रीमान योगी’ ही कादंबरीसुद्धा अतिशय लोकप्रिय झाली आणि त्यानंतर वाचक वर्ग रणजित देसाई यांच्या नवीन येणार्‍या कादंबरीची वाट पाहू लागला.

‘लक्ष्यवेध’, ‘पावनखिड’, ‘राजा रवी वर्मा’ या सर्व कादंबर्‍यांच्या जोडीनं विशेष गाजलेली, त्यांनी लिहिलेली आणखी एक कादंबरी कर्णाच्या जीवनावरील ‘राधेय’ ही आहे. अशा प्रकारच्या ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबर्‍या लिहिणे ही त्यांची हातोटीच झाली होती. रणजित देसाईंनी पुढील काळात काही नाटकंही लिहिली. ‘रामशास्त्री’, ‘स्वरसम्राट तानसेन’, ‘धन अपुरे’, ‘वारसा’, ‘स्वामी’ आणि त्यातही ‘गरुडझेप’, ‘कांचनमृग’ आणि ‘हे बंध रेशमाचे’ ही नाटकं विशेष गाजली. या व्यतिरिक्त ‘नागीण’, ‘रंगल्या रात्री अशा’ ‘सवाल माझा ऐका’ इ. चित्रपटांच्या पटकथाही त्यांनी लिहिल्या. १९७७ साली झालेल्या गोरेगाव येथील मुंबई उपनगर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर बडोदे साहित्य संमेलनाचे १९६५ मध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषविले. १९८३ मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मानही त्यांना मिळाला.

हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यावर ज्या लोकांना फाळणीमुळे विस्थापित व्हावे लागले त्यांना मध्यवर्ती ठेवून शास्त्रीय संगीत गाणाऱ्या कुटुंबाची होरपळ त्यांनी ” हे बंध रेशमाचे” या नाटकात दाखवली.या नाटकाचे भाग्य काही औरच होते.याची श्रेय नामावली पहा.

दिग्दर्शक : मधुकर तोरडमल

गीते : शान्ता शेळके

संगीत : पंडित जितेंद्र अभिषेकी

नेपथ्य : रघुवीर तळाशिलकर

कलाकार : वसंतराव देशपांडे, रामदास कामत,जोत्स्ना मोहिले ,बकुळ पंडित,क्षमा बाजीकर

निर्माता : मोहन वाघ.

यातल्या शान्ताबाईंच्या गाण्यांनी नाट्य रसिकांवर टाकलेली मोहिनी आजही कायम आहे

आज सुगंध आला लहरत,

का धरिला परदेश,

काटा रुते कुणाला,

छेडियल्या तारा,

दैव किती अविचारी,

विकलं मन आज झुरत असाहाय्य,

संगीत रस सुरस.

हे बंध रेशमाचे या नाटकात लावणी गात असलेला प्रसंग आहे ती लावणी देखील लोकांना खूप आवडते >>दिवस आजचा असाच गेला उद्या तरी याल का अन राया अशी जवळ मला घ्याल का << क्षमा बाजीकर यांनी अगदी ठसक्यात ही लावणी म्हटली आहे .

रणजीत देसाई यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्मिता मांजरे-कोल्हे – लेखिका : डॉ. रमा दत्तात्रय गर्गे ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ स्मिता मांजरे – कोल्हे – लेखिका : डॉ. रमा दत्तात्रय गर्गे ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

स्मिता मांजरे नावाची एक मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबातील मुलगी. बारावी झाल्यावर तिला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. पण घर थोडे जुन्या वळणाचे, काय करायचे मुलीला इतके शिकवून, असा विचार करून जवळच्याच कॉलेजमध्ये तिला बीए साठी प्रवेश घेऊन दिला. या युवतीला थोडे वाईट वाटले, पण आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचे आणि पुढे जायचे हा तिचा मूळ स्वभाव!! बीए करतांना भरपूर वेळ मिळायला लागला . अभ्यास थोडासा असायचा, त्यातून मग खेळाची आवड निर्माण झाली. सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. अभाविप, छात्र युवा संघर्षवाहिनी यांचे आंदोलने कार्यक्रमा यात ती सहभागी होऊ लागली.पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर काहीतरी व्यवसायाभिमुख शिक्षण घेतले पाहिजे असे तिच्या मनात आले. त्यानुसार एलएलबी ला प्रवेश घेतला. पण मनातली वैद्यकीय शिक्षणाची इच्छा परत जागृत झाली आणि मग दहावीच्या गुणपत्रिकेवर तिने डीएचएमएस या होमिओपॅथीच्या पदविकेसाठी पण प्रवेश घेतला! कालानुक्रमे दोन्ही शिक्षणे पूर्ण केली आणि वकिली आणि डॉक्टरी अशा दोन्ही व्यवसायाभिमुख पदव्या स्मिताताईंनी मिळवल्या. त्यानंतर आवडीप्रमाणे नागपुरात स्वतःचा दवाखाना टाकला. तो चांगलाच चालू लागला.डॉ. स्मिताच्या हाताला चांगला गुण होता. भरपूर पेशंट येत असत. त्या आणि त्यांची असिस्टंट दवाखाना संपल्यावर सगळे पैसे मोजत बसायच्या. स्वतःचा दवाखाना झाला, दुचाकी आली आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळाले.यामुळे डॉक्टर स्मिता मांजरे यांना एक वेगळाच आत्मविश्वास मिळाला.

यादरम्यान घरात लग्नाचे वारे वाहू लागले. त्या काळात म्हणजे १९८० च्या दशकात चहा पोहे आणि मुलगी पाहणे असे कार्यक्रम सर्रास होत असत. पण स्मिता ताईंनी एक-दोन कार्यक्रम झाल्यानंतर हे दाखवून घेणे काही बरे नाही, असे वाटून त्यांनी ते थांबवले. 

या दिवसांत त्यांच्या हातामध्ये विनोबा भावे यांचे ‘गीता प्रवचने’ हे पुस्तक पडले.जसजशा स्मिताताई हे पुस्तक वाचत होत्या तसतसे त्या अंतर्मुख होत गेल्या. त्यामध्ये सांगितलेली ‘जीविका आणि उपजीविका’ यांचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. ‘माझा स्वधर्म काय आहे’या विचाराने त्यांना भंडावून सोडले. अंगावर ल्यायला उत्तम कपडे, दाग दागिने, फिरण्यासाठी गाडी , चांगली कमाई हे सगळं असूनही काहीतरी अनुपस्थित आहे , असे व्याकुळ असमाधान या युवतीला जाणवू लागले.

त्याच भागात एक ध्येयवेडा तरुण डॉक्टर एम डी पूर्ण करत होता. एमबीबीएस झाल्यावर तो बैरागड या मेळघाट जिल्ह्यातील गावी जाऊन राहिलेला होता.त्याच लोकांसाठी अधिक शिक्षण घेऊ या हेतूने तो पदव्युत्तर शिक्षण घेत होता. या डॉक्टरचे नाव होते रवींद्र कोल्हे !! बैरागड येथील आदिवासी जनजाती लोकांना आरोग्य सेवा द्यायची हे ध्येय ठरवून बसलेला हा तरुण सुयोग्य जीवनसाथीच्या शोधात होता. यादरम्यान स्मिताताईंचे परिचित सुभाष काळे यांनी ताईंना हे स्थळ सुचवले. पण त्याचबरोबर मुलाच्या वेगळ्या चार अटी सांगितल्या.या अटी काय होत्या 

१) महिन्याला चारशे रुपयांमध्ये संसार करावा लागेल

२) चाळीस किलोमीटर पायी चालता आले पाहिजे 

३) लोकांसाठी समाजासाठी भिक्षा मागण्याची तयारी असली पाहिजे 

४) कोर्ट मॅरेज करावे लागेल.

सुभाष काळेंनी सहजच सुचवले होते. कारण त्यावेळची स्मिताताईंची राहणी ही उच्चभ्रू प्रकारातील होती. जेव्हा या अटी कळाल्या तेव्हा आपण चारशे रुपयांची साडी नेसत होतो, गाडीवरून नागपुरात आरामात फिरत होतो आणि आपली कमाई पण भरभक्कम होती असे स्मिताताई एका मुलाखतीत सांगतात.

मात्र जसजसा त्या या अटींचा विचार करू लागल्या तसतसे त्यांना गीता प्रवचने वाचल्यापासून ज्या असमाधानाने अस्वस्थ केले होते ते असमाधान दूर होऊ लागले असा प्रत्यय आला. त्यांना या अटींमध्येच आपला स्वधर्म आहे, आपले जीवन ध्येय आहे याची आंतरिक जाणीव झाली.आणि मग दोघे भेटले १९८८ साली या ध्येयवेड्यांनी विवाह बंधन स्वीकारले.डॉ.स्मिता मांजरे डॉक्टर स्मिता रवींद्र कोल्हे म्हणून सातपुडा पर्वतरांगातील अरण्यात असलेल्या बैरागडला आली.लग्न कोर्ट पद्धतीने झाल्यामुळे सप्तपदी झाली नाही .मात्र नवऱ्याच्या घरी जाण्यासाठी नव्या नवरीला तालुक्याच्या ठिकाणापासून बैरागड पर्यंत ३५ किलोमीटर चालत जावे लागले.लग्न ठरल्यानंतर स्मिताताईंनी दवाखाना बंद केला. आपले साठवलेले सगळे पैसे त्यांनी बँकेत एकरकमी डिपॉझिट करून ठेवले. स्वस्तातल्या साड्या खरेदी केल्या. महाग महाग साड्या मैत्रिणी आणि बहिणींना दिल्या. उंची सॅंडल्स, पर्सेस, प्रसाधने सारे काही वाटून टाकले आणि खऱ्या अर्थाने नवजीवनचा प्रारंभ केला !

डॉक्टर रवींद्र कोल्हे पूर्वीपासूनच तेथे आरोग्य केंद्र चालवत होते. ते एक रुपया इतकीच फी दवाखान्यात घेत असत. औषधांसाठी शहरातील धनिक लोकांना विनंती करून आदिवासी लोकांना जमतील तितकी औषधेही ते उपलब्ध करून देत. स्मिता ताईंनी जेव्हा बैरागड मध्ये पाऊल टाकले तेव्हा त्यांची स्वतःची झोपडी देखील नव्हती. आजूबाजूच्या जनजाती लोकांनी लाकडे कुडे आणि गवताने साकारलेली झोपडी तयार करण्यासाठी त्यांना मदत केली. सतत शहरी वातावरणात राहिलेल्या स्मिताताईंचा एक वेगळाच प्रवास सुरू झाला. वीज नाही, नळ नाही, पिठाची गिरणी नाही, जवळपास दुकाने नाहीत असा नन्नाचा पाढा सगळीकडे दिसत होता. त्यातच आजूबाजूला दारिद्र्याने गांजलेली आजाराने ग्रस्त आणि अज्ञानी अशी आदिवासी जनजाती कुटूंबे. त्यांची भाषा वेगळी चालीरीती वेगळ्या.किर्र अरण्याचा एक वेगळाच गंध, शहरी सुरक्षिततेची उब नाही अशा सगळ्या गोष्टी त्यांना नव्याने जाणवू लागल्या. पण एकदा मनापासून कार्य स्वीकारले की समस्या भेडसावत नाहीत .थोड्याच दिवसात विहिरीवरून पाणी भरणे, शेण गोळा करून आणणे, घर सारवणे, जात्यावर दळणे ही सगळी कामे त्यांच्या अंगवळणी पडली. नवीन शिकण्याची आवड त्यांना येथे कामाला आली. 

एका मोठ्या लोक वस्तीला एकच डॉक्टर असल्याने कोल्हेना अक्षरशः श्वास घ्यायला फुरसत नसे. खरं म्हणजे स्मिताताईंना पण आपण आरोग्यसेवा द्यावी, पेशंट तपासावे असे वाटत असे. पण सुरुवातीला आदिवासी लोकांचा एक स्त्री डॉक्टर असू शकते यावर विश्वासच नव्हता. त्यांना तेथील लोक कोल्लं आणि कोल्लाणी म्हणत .

एक  घटना घडली आणि लोकांनी कोल्लाणीला वैद्यकीय ज्ञान आहे हे स्वीकारले!!.वाघाने अक्षरशः फाडलेला एक पेशंट आला आणि त्यावेळी  स्मिताताईंना जवळपास ४०० टाके घालावे लागले.अत्यंत चिकाटीने त्यांनी ते काम पूर्ण केले आणि तो पेशंट  वाचला!! काही दिवसांत बरा झाला.नंतर तो चालत दवाखान्यात आला आणि डॉक्टर बाईंना नमस्कार करून गेला!. तेव्हापासून आदिवासी जनजाती लोकांनी ताईंना डॉक्टर म्हणून सहर्ष स्वीकारले!!मग मात्र तपासायला ताईच हव्या अशी आग्रही मागणी पण सुरू झाली!!

मेळघाटात कुपोषणाचे बळी जात असतात. आत्ताही जातात. पण आता प्रमाण कमी आहे. त्यावेळी रवींद्र कोल्हेंनी एमडीला हाच विषय घेऊन प्रबंध लिहिला. त्यांच्या मते हा प्रकार उपासमारीमुळे अर्थात अन्न कमी पडल्यामुळे, पोटाची खळगी न भरल्यामुळे घडतो.त्यांनी नंतर अशाच प्रकारच्या मृत्यूची बातमी एका वृत्तपत्राच्या बातमीदाराला दिली. छोट्या चौकटीतील त्या बातमीने दिल्ली मुंबई हादरली. कारण आपल्या संविधानानुसार ”स्टारव्हेशन कोड” म्हणजे ‘भूकबळी’ हा शासनाचा गुन्हा मानला जातो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा विषय गाजला.दिल्ली मुंबईत सूत्रे हलली. घाईघाईने सारे मंत्री, सरकारी अधिकारी मेळघाटामध्ये येऊन पोहोचले.त्यांनी चर्चा केली. स्मिताताई आणि रवींद्र कोल्हे यांनी तेथील भीषण अन्नटंचाई आणि त्यामुळे घडणारे बालमृत्यू मातामृत्यू यांची माहिती दिली.मात्र या मृत्यूना ‘उपासमारीचे बळी’ असे न म्हणता ‘कुपोषणाचे बळी’ असे म्हणावे अशी शासकीय यंत्रणेने विनंती केली. सर्व प्रकारची मदत शासकीय यंत्रणा करणार आहे या गोष्टीमुळे स्मिताताई आणि रवींद्र कोल्हे यांनी देखील तसे म्हणण्याचे मान्य केले आणि मग एकेकाळी १००० मागे २००मुले दगावत ते प्रमाण खूप कमी होत गेले . शासनाच्या मोठ्या यंत्रणेचा अशिक्षित गरीब लोकांना लाभ मिळवून देणे हे आपले ध्येय आहे.शासनाला समांतर कार्य यंत्रणा उभी करणे हे नव्हे , हे दोघही पती-पत्नींनी ठरवलेले होते.

आपल्या सोबतच्या या रान सवंगड्यांना प्रेरणा मिळावी , अन्नटंचाईला तोंड द्यावे लागू नये म्हणून स्मिता आणि रवींद्र यांनी सुधारित शेतीचे प्रयोग केले. स्वतः दुबार पिके काढून दाखवली. खते बियाणांची माहिती दिली  रेशन धान्याचे दुकान टाकले. कोल्हेंच्या दुकानांमध्ये तीस तारखेपर्यंत धान्य मिळत असे. आजही हे दुकान दिमाखात चालू आहे 

आपले कार्य , त्याच्या मागची प्रेरणा ही पुढच्या पिढीत रुजवण्यातही स्मिताताई आई म्हणून यशस्वी ठरल्या! त्यांचा मोठा मुलगा रोहित सुधारित शेती करतो.त्याचे प्रशिक्षण देतो. तर धाकटा मुलगा राम एमबीबीएस एमडी सर्जन होऊन मेळघाट  बैरागड येथेच वैद्यकीय सेवाकार्य करतो. खास वैदर्भीय शैलीतील आघळपघळ बोलणे, पण आवश्यक तिथे ठामपणे उभे राहणे आणि निर्भयता हे दोन महत्त्वाचे गुण स्मिताताईंच्या अंगी आहेत. नामदार नितीन गडकरी हे त्यांचे एकेकाळचे अभाविप मधले सहकारी कार्यकर्ते! त्यांच्या प्रयत्नांमुळे आज मोठ्या नाल्यांवर मोठमोठे पूल झाले आहेत, बरेच ठिकाणी रस्ते देखील आले आहेत. पण म्हणून प्रश्न सुटलेले नाहीत.

नागपुरातील मध्यमवर्गीय घरातील ही कन्या आता आदिवासी बंधू भगिनींची आई झाली आहे. एखादे व्रत घेणे सोपे पण  सातत्यपूर्ण आचरण अत्यंत कठीण असते. म्हणूनच पद्मश्री डॉक्टर स्मिता कोल्हे आणि पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे यांच्यासारख्या तेजस्वी दीपांचे महत्व असते.

लेखिका : डॉ रमा दत्तात्रय गर्गे

प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares