श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ बापाच्या काळजावरचा गोवर्धन ! – भाग – 2 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
(योगायोगच म्हणावा की यशोदाही याचवेळी आई होणार होती. पण मीही बाप होणार होतो याचा मला विसरच पडून गेला होता म्हणा !) – इथून पुढे —
व्यवहारी मनाला हा हिशेब पटला होता. माझी मुलगी वासुदेवाच्या हातून कंसाच्या हाती पडेल. आठवा मुलगा असणार होता… आणि हे तर स्त्री जातीचं अर्भक. स्त्री काय करणार या कंसराजाचं? असा विचार अविचारी कंस नक्कीच करणार. कंस तिला देवकीच्या हाती परत सोपवेल आणि निघून जाईल. देवकीचा कृष्ण माझ्याकडे आणि माझी माया देवकीकडे सुरक्षित वाढतील. पुढचं पुढं बघता येईल की… फक्त ही वेळ निभावून नेणं गरजेचं आहे. आणि काळाचंही हेच मागणं होतं माझ्याकडे.
मनावरचा गोवर्धन सावरून धरीत मी तिला दोन्ही हातांवर तोलून धरलं आणि छातीशी कवटाळलं. तिचे डोळे आता मिटलेले होते. आईच्या आधी ती बापाच्या काळजाला बिलगली होती. ती माझ्या हृदयाची कंपनं ऐकत असावी कदाचित. पण मला मात्र ते ठोके निश्चित ऐकू येत होते… नव्हे कानठळ्या बसत होत्या त्या श्वासांच्या आंदोलनांनी. चिखल तुडवीत निघालो. पाऊस थांबला होता. यमुनेपर्यंतची वाट हजारो वेळा तुडवलेली होती… पायांना सवयीची होती. तरीही वीजा वाट दाखवायचं सोडत नव्हत्या. मी आज चुकून चालणार नव्हतं हे त्यांना कुणीतरी बजावलेलं असावं बहुदा! पण माझी पावलंच जड झालेली होती. काही विपरीत घडलं तर या आशंकेने मनाच्या यमुनेत भयानक भोवरा फिरू लागला. योजनेनुसार नाहीच घडलं तर? कंसाशी गाठ होती. कंसाची मिठी सुटली तरच आयुष्याचं प्रमेय सुटण्याची आशा. अन्यथा त्याच्यात अडकून पडावं लागणार हे निश्चित होतं. तीरावर पोहोचलो. आता अंगावर खरे शहारे यायला सुरूवात झाली. यमुना दावं सोडलेल्या कालवडींसारखी उधळलेली होती रानोमाळ. वासुदेव येणार कसा या तीरावर? यमुनेच्या धारांच्या आवाजाने काही ऐकूही येण्यासारखी स्थिती नव्हती आणि त्यात त्या वीजा! माझ्या कुशीत मला बिलगून असलेल्या तिनं… डोळे किलकिले केले आणि यमुना दुभंगली! वाटेवर पाणी असतं, वाटेत पाणी असतं… इथं पाण्यात वाट अवतरली होती. आणि त्या अंधारातून दोन पावलं घाईघाईत या किना-याकडे निघालेली होती. त्या पावलांच्या वर जे शरीर होतं त्या शरीराच्या माथ्यावर एक टोपलं होतं… भिजलेलं. आणि त्यातून दोन कोमल पावलं बाहेर डोकावत होती… जणू ती पावलंच या पावलांना गती देत होती. इकडं माझ्या हातातल्या तिनं डोळे मिटून घेतले होते.
वासुदेव जवळ आला. बोलायला उसंत नव्हती. पण आधीच भिजलेल्या डोळ्यांत आसवं आणखी ओली झाली आणि बोलावंच लागलं नाही फारसं. त्याने टोपली खाली ठेवली. तो माझ्याकडे पाहू लागला. मी तिला वासुदेवाच्या हाती देताना शहारून गेलो. हातांना आधीच कापरं भरलं होतं. आणि त्यात ती माझ्याकडे पहात होती… मायेच्या डोळ्यांतली माया त्या अंधारातही ठळक जाणवत होती. वासुदेवानं तिला त्याच्याकडे अलगद घेतलं. मी त्याच्या मुलाला उचलून घेतलं. वासुदेवानं रिकाम्या टोपलीत तिला ठेवलं. तिने आता डोळे मिटले होते…. ती आता मथुरेकडे निघाली होती.. तिथून ती कुठं जाणार होती हे दैवालाच ठाऊक होतं.
“मुलगी आहे असं पाहून कंस हिला काही करणार नाही. ” वासुदेव जणू सांगत होता पण मला मात्र ते काही पटत नव्हतं… मला म्हणजे माझ्यातल्या पित्याला! धर्माच्या स्थापनेसाठी हा एवढा मोठा धोका पत्करावा लागणारच हे देहाला समजलं होतं पण मनाची समजूत काढणं अशक्य…. आणि त्या बालिकेच्या डोळ्यांत पाहिल्यापासून तर केवळ अशक्य! वासुदेव झपाझप पावलं टाकीत निघूनही गेला…. कंस कधीही कारागृहाचा दरवाजा ठोठावू शकत होता. त्याला त्या रात्री झोप लागू शकतच नव्हती. पण त्याच्या पापण्या क्षणार्धासाठी एकमेकींना स्पर्शल्या होत्या मात्र आणि लगोलग उघडल्या सुद्धा… पण या मिटण्या-उघडण्यामधला निमिष खूप लांबला होता त्या रात्री…. दोन जीवांची अदलबदल जगाला यत्किंचितही सुगावा लागू न देता घडून गेली होती. कृष्ण गोकुळात अवतरले होते आणि नंदनंदिनी माया कारागृहात देवकीच्या पदराखाली निजली होती.
माझ्या मनाने आता माझ्याच वै-याच्या भुमिकेत प्रवेश केला होता नव्हे परकाया प्रवेशच केला जणू. प्रत्यक्ष भगवंत माझ्या हातांत असताना मला कुशंकांनी घेरलं होतं पुरतं. कंस आधीच कारागृहात पोहोचला असेल तर? पहारेकरी जागे झाले असतील तर? कंसाला संशय आला तर? मन जणू यमुनेचे दोन्ही काठ…. प्रश्नांच्या पुराला व्यापायला आता जमीनही उरली नव्हती…. काळजाच्या आभाळापर्यंत काळजीचं पाणी पोहोचू पहात होतं…. विचारांचा गोवर्धन त्यात बुडून गेला होता…. पण त्याचं ओझं कमी मात्र झालं नव्हतं.
पण वाटेत एक गोष्ट लक्षात आली. मघासारखी थंडी नव्हती वाजत आता. बाळाला छातीशी धरलं होतं तिथं तर मुर्तिमंत ऊबदारपण भरून राहिलं होतं. बाळाचे आणि माझे श्वास आता एकाच गतीनं आणि एकच वाट चालत होते. तसाच यशोदेच्या कक्षात शिरलो आणि बाळाला तिच्या उजव्या कुशीशेजारी अलगद ठेवले आणि त्यानं आपण अवतरल्याचा उदघोष उच्चरवाने केला…. सारं गोकुळ जागं झालं…. अमावस्येच्या रात्री पूर्ण चंद्र आकाराला आला होता… हजारो वर्षांपूर्वी अयोध्येत भरदुपारी उगवलेला सूर्य आता गोकुळात चंद्राचं रूपडं लेऊन मध्यरात्री अवतरला होता. जगाच्या लेखी यशोदेला पुत्र झाला होता… नंदाला लेक झाला होता…. गायींना गोपाळ मिळाला होता आणि गवळणींना त्यांचा कान्हा! मी मात्र मथुरेकडे दृष्टी लावून बसलेलो!
वासुदेवही आता मथुरेत पोहोचला असेल… माझी लेक आता देवकीवहिनीच्या कुशीत विसावली असेल. माझी वासुदेवाच्या वाटेकडे पाठ असली तरी माझ्या मनाचे डोळे मात्र त्याचीच वाट चालत होते. मी बाळाला यशोदेच्या हवाली करून राजवाड्याच्या मथुरेकडे उघडणा-या गवाक्षाजवळ जाऊ उभा राहिलो…. !
नीटसं पाहूही शकलो नव्हतो तिला. डोळेच लक्षात राहिले होते फक्त… अत्यंत तेजस्वी. मूर्तीमंत शक्तीच. या मानवी डोळ्यांनी ते तेज स्मृतींमध्ये साठवून ठेवणं शक्तीपलीकडचं होतं. मथुरेकडच्या आभाळात वीजा आता जास्तच चमकू लागल्या होत्या. ढगांचा गडगडाट वाढलेला होता. काय घडलं असेल रात्री मथुरेच्या त्या कारागृहात? कंस कसा वागला असेल मुलगा जन्माला येण्याऐवजी मुलगी जन्मल्याचं पाहून? नियतीची भविष्यवाणी एवढी खोटी ठरेल यावर त्याचा विश्वास बसला असेल सहजी?
आणि एवढ्यात सारं काही भयाण शांत झालं घटकाभर…. सारं संपून तर नाही ना गेलं?
यानंतरचा एक क्षण म्हणजे एक युग. कित्येक युगं उलटून गेली असतील माझ्या हृदयातल्या पृथ्वीवरची. आणि तो क्षण मात्र आलाच…. अग्निची एक महाकाय ज्वाळा आभाळात शिरून अंतरीक्षात दिसेनाशी झाली… तिने मागे सोडलेला प्रकाशझोत मथुरेलाच नव्हे तर अवघ्या गोकुळालाही प्रकाशमान करून गेला…. मायाच ती… ती बरं कुणाच्या बंदिवासात राहील… सारं जग तिच्या बंधनात बांधले गेलेले असताना ती य:कश्चित मानवाच्या कारागृहातील साखळदंडांनी जखडून राहीलच कशी?
कंसाच्या हातून निसटून माझी लेक आता ब्रम्हांड झाली होती. माझी ओंजळ कदाचित तिचं तेज सांभाळून ठेवू शकली नसती म्हणून दैवानं तिला माझ्याच हातून इप्सित ठिकाणी पोहोचवलं असावं… परंतू तिचं जनकत्व माझ्या दैवात लिहून नियतीनं माझ्यावर अनंत उपकार करून ठेवले होते.
मायेने जाताना माझ्या काळजावरचा काळजीचा गोवर्धन अलगद उचलून बाजूला ठेवला होता… एका बापाचं काळीज आता हलकं झालेलं होतं !
पुत्रप्राप्तीच्या आनंदात यशोदा मग्न झाली आहे.. आता पुढे कित्येक वर्षे तिला हे कौतुक पुरेल.. अक्रूर गोकुळात येईपर्यंत. काही घडलंच नाही अशी भावना आता माझ्या मनात घर करू लागली आहे… नव्हे निश्चित झाली आहे… ही सुद्धा तिचीच माया!
(भगवान श्रीकृष्णांच्या जीवनकथा अलौकिक. त्यांचा जन्म आणि त्यांचं गोकुळात यशोदेकडे जाणं यावर करोडो वेळा लिहिलं, बोललं गेलं आहे. घटनाक्रम, संदर्भात काही ठिकाणी बदलही आहेत. पण ते सारे एकच गोष्ट सांगतात… श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव ! हरी अनंत आणि हरिकथा अनंत ! नंदराजाचा विचार आला मनात आणि त्यांच्या मनात डोकावलं. आणि हे काल्पनिक शब्दांमध्ये उतरलं… प्रत्यक्षात जे काही घडून गेलं असेल ते समजायला माझ्या बुद्धीच्या मर्यादा आहेत. जय श्रीकृष्ण.)
– समाप्त –
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈