मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शिवरायांचे आठवणीत असलेलं चित्र(पट)रूप ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

शिवरायांचे आठवणीत असलेलं चित्र(पट)रूप ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज साहेबांचं चरित्र आणि चारित्र्य रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा नजरेस पडलं त्याला २०२३ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली ! व्ही.शांताराम आणि बाबुराव पेंटर यांचे हे चित्रपट-कार्य ‘सिंहगड’ या शीर्षकाने १९२३ मध्ये चित्रपटगृहात झळकले होते…पण हा चित्रपट मूक होता. विशेष म्हणजे या चित्रपटाला एवढा उदंड प्रतिसाद मिळाला की सरकारला चित्रपटांवर मनोरंजन कर लावायची कल्पना सुचली…आणि त्यातून उत्तम महसूल प्राप्त होऊ लागला! १९२३ नंतर असे एकूण आठ मूक चित्रपट आले ज्यांत छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घडले. १९३२ मध्ये व्ही.शांताराम यांनी महाराजांवरील पहिल्या बोलपटाचे दिग्दर्शन केले….आणि या चित्रपटाचेही नाव ‘सिंहगड’ हेच होते. यात मांढरे बंधूंपैकी सूर्यकांत यांनी महाराजांची भूमिका केली होती.    

शिवरायांचे चरित्रच एवढे रोमहर्षक आणि प्रेरणादायी आहे की आजही त्यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट तयार होत आहेत आणि होत राहतीलही. २०२४ पर्यंत या चित्रपटांची संख्या ४३ एवढी होती. शिवाय सर्जा, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, अशांसारख्या चित्रपटांतही शिवराय दिसले.  दरम्यान दोन दूरदर्शन हिंदी मालिका आणि काही मराठी मालिकांमध्ये छत्रपतींचं कलाकारांनी घडवलेलं दर्शन झालं. विषयाचा केंद्रबिंदु असलेली शिवरायांची भूमिका साकारणं हे प्रत्येक कलाकारासाठी आव्हानात्मक असतेच असते. कारण महाराजांच्या एकूण व्यक्तिमत्वाचा आवाकाच अतिविशाल आहे. 

महाराजांची भूमिका करणा-या कलाकारांपैकी अमोल कोल्हे, शंतनु मोघे, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, शरद केळकर, रविंद्र महाजनी, महेश मांजरेकर ही काही नावे नजरेसमोर येतात. रितेश देशमुखही लवकरच आपल्याला छत्रपतींच्या भूमिकेत दिसतील. हिंदीत अक्षयकुमारही हे (भलतेच !) धाडस करून बसला आहेच ! या कलाकारांच्या अभिनयक्षमेतेविषयी आणि देखणेपणाविषयी काही शंका नाही आणि प्रेक्षक त्यांचे आभारीही आहेत… वास्तविक छत्रपतीसाहेबांच्या व्यक्तिमत्वाविषयी काही वर्णनं उपलब्ध आहेत. यात महाराजांची शारीरिक उंची बेताची होती हे सर्वच वर्णनात आढळते. असो. साधारणत: महाराजांएवढी शारीरिक उंची असणारे अमोल कोल्हे आणि चिन्मय मांडलेकर आणि सुबोध भावे हे कलाकार आपण पाहिले आहेत. परंतु साधारणपणे आजपासून सत्तर वर्षे मागील पिढीतील प्रेक्षकांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जर कोणी अढळ स्थान मिळवलेले असेल तर ते चंद्रकांत मांढरे यांनी. अर्थात चंद्रकांत यांची उंची जास्त होती आणि चेहराही महाराजांच्या उपलब्ध चेह-याशी मिळता-जुळता नव्हता. त्यांचे बंधू सूर्यकांतही छत्रपतींची भूमिका करीत. पण भालजी पेंढारकरांनी चंद्रकांत मांढरेंच्या माध्यमातून ज्या रितीने शिवराय उभे केलेत..त्याला तोड नसावी ! चंद्रकांत यांचं या भूमिकेतील वावरणं अतिशय राजबिंडं, देखणं आहे. संवादफेक अतिशय निर्दोष. अभिनय राजांना साजेसा. एका प्रसंगात महाराज अफझलखानाच्या भेटीस निघालेले आहेत..खान दगा करणारच याची खात्री असल्याने महाराजांनी वाघनखे जवळ बाळगली आहेत. ती वाघनखे पोटाशी लपवून ठेवल्यानंतर एका विशिष्ट निग्रहाने,आत्मविश्वासाने छत्रपती आपली नजर समोर करून पाहतात….अतिशय भेदक भासली चंद्रकांत यांची नजर या प्रसंगातील अभिनयात….वाटलं खुद्द शिवराय बघताहेत मृत्यूच्या डोळ्यांत डोळे घालून! 

हा चित्रपट कृष्णधवल अर्थात ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट होता. पण नंतर नजीकच्याच काळात चंद्रकांत यांचं महाराजांच्या भूमिकेतील रंगीत छायाचित्र उपलब्ध झाले ते या लेखात दिलं आहे. 

बहुदा याच चित्रपटाच्या चित्रीकरण प्रसंगी ‘सेट’वर दिग्दर्शक भालजी पेंढारकर आलेले असताना शिवरायांच्या वेशभूषेत असलेल्या चंद्रकांत हे भालजींना नमस्कार करण्यासाठी खाली झुकू पहात असताना भालजींनी त्यांना, “आपण छत्रपतींच्या वेषात आहात..आपण असं कुणाला वंदन करणं योग्य दिसत नाही” अशा आशयाचं सांगितलेलं वाचनात आलं! विषयाचं गांभीर्य जाणणारे भालजींसारखे दिग्दर्शक मराठीला लाभले, हे सुदैवच !   

हरी अनंत..हरी कथा अनंत असं देवाच्या बाबतीत म्हणलं जातं. शिवरायांच्या कथांच्या आणि त्यांच्या रुपांबाबतही असंच म्हणता येईल. मात्र ही रूपं विविध माध्यमांतून साकारणा-या कलाकारांनी विशिष्ट भान बाळगून असावे असे मात्र वाटते. 

जी बाब चित्रपटांची तीच बाब महाराजांच्या चित्रांबाबत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वेगवेगळ्या प्रकारची असंख्य चित्र उपलब्ध आहेत. त्यात अनेक कलाकारांनी त्यांच्या त्यांच्या कल्पनेनुसार चित्रांना चेहरा,उंची आणि वेशभूषा दिलेली दिसते. त्यावरून अनेक प्रतिकृतीही विक्रीसाठी आलेल्या दिसतात. झेंड्यांवरील चित्रेही एका विशिष्ट चेह-याची आढळतात. पण या सर्वांत लक्ष वेधून घेते ते श्रेष्ठ चित्रकार गोपाळ बळवंत कांबळे यांनी १९७४ मध्ये साकारलेलं महाराजांचं तैलचित्र. महाराष्ट्र शासनाने हे अधिकृत चित्र म्हणून स्विकारलेलं आहे आणि सर्व शासकीय कार्यालयांमध्ये हेच चित्र प्रदर्शित केलेलं दिसतं. चित्रपटांची मनमोहक भव्य बॅनर्स रंगवण्यात हातखंडा आणि राष्ट्रीय प्रसिद्धी असेलेल्या गोपाळ बळवंत उर्फ जी.कांबळे यांनी हे चित्र काढण्याबद्दल एक पैसाही मोबदला घेतला नव्हता…ते म्हणाले होते…”देवाच्या चित्राचा मोबदला घ्यायचा नसतो!” या अधिकृत चित्रनिर्मितीचं हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे… (१९७४-२०२४) ही आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवरायांचे हे चित्र सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापरले जावे, असे वाटते. त्यातून एकवाक्यता दिसेल. असो. 

आपल्या राजांना आपल्या नजरेसमोर आणणा-या सर्व कलाकारांना, लेखकांना, शिव अष्टक संकल्प घेतलेल्या दिग्पाल लांजेकरांसारख्या दिग्दर्शकांना, संगीतकारांना, गायकांना, मूर्तीकारांना, शिल्पकारांना, वक्त्यांना, इतिहासकारांना साष्टांग दंडवत ! प्रातिनिधीक स्वरूपात चंद्रकांतजी मांढरे, भालजी, यांचा चित्रांद्वारे उल्लेख केला आहे. हे केवळ शिव-स्मरणरंजन आहे. ऐतिहासिक प्रमाण असलेलं अभ्यासू लिखाण नाही… 

छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा !

© संभाजी बबन गायके

पुणे

मो 9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ऑर्डरिंग द साउंड ऑफ नॉकिंग – लेखक : अज्ञात – संकलक : गिरीश क्षीरसागर ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

ऑर्डरिंग द साउंड ऑफ नॉकिंग – लेखक : अज्ञात – संकलक : गिरीश क्षीरसागर ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(पेपर टाकणाऱ्या मुलाने  (Paper Boy ) सांगितलेला हृदयस्पर्शी किस्सा.) 

मी पेपर देण्याच्या  घरांपैकी एकाचा मेलबॉक्स ब्लॉक होता, म्हणून मी दरवाजा ठोठावला.

श्री.बॅनर्जी नावाच्या वृद्ध माणसाने स्थिर पावलांनी हळूच दरवाजा उघडला. मी विचारले,”सर,मेलबॉक्सचे प्रवेशद्वार का बंद केले आहे?”

त्याने उत्तर दिले,” मी जाणूनबुजून बंद केले आहे.”

तो हसला आणि पुढे म्हणाला,”तुम्ही रोज मला वर्तमानपत्र थेट हातात द्यावं अशी माझी इच्छा आहे… कृपया दार ठोठावा किंवा बेल वाजवा आणि मला पेपर व्यक्तिशः द्या.”

मी आश्चर्यचकित झालो आणि उत्तर दिले,”नक्कीच, पण ते आपल्या दोघांसाठी गैरसोयीचे आणि वेळेचा अपव्यय वाटते.”

तो म्हणाला,”ठीक आहे… मी दर महिन्याला तुम्हाला ५००/- जास्तीची फी म्हणून देईन.”

🌹🌹

विनवणी करून वृद्ध पुढे म्हणाला,”जर कधी असा दिवस आला की तुम्ही दार ठोठावले व प्रतिसाद मिळेनासा झाला तर कृपया पोलिसांना कॉल करा!”

मी हैराण होऊन विचारले, “का?”

त्यावर बॅनर्जी म्हणाले, “माझी पत्नी वारली,माझा मुलगा परदेशात आहे,आणि मी इथे एकटाच राहतो, माझी वेळ कधी येईल कोणास ठाऊक?”

असे सांगतांना त्याच क्षणी मला म्हाताऱ्याचे डोळे पाणावलेले दिसले.

🌹🌹🌹🌹

ते पुढे म्हणाले,”मी पेपर तर कधीच वाचले नाहीत  … फक्त दार ठोठावण्याचा किंवा दारावरची बेल वाजण्याचा आवाज ऐकण्यासाठी मी रोजचे वर्तमानपत्र सुरु केले आहे. एक ओळखीचा चेहरा मला दररोज पाहता यावा आणि दोन शब्द हितगूज करून आनंदाची देवाणघेवाण करता यावी यासाठी !”

🌹🌹

बोलता बोलता वृद्धाने भाऊक होत माझा हात आपल्या हातात घेत म्हणाला, “तरुण मित्रा … कृपया, माझ्यावर एक उपकार कर! हा माझ्या मुलाचा परदेशी फोन नंबर आहे. जर एखाद्या दिवशी तू दार ठोठावले आणि मी उत्तर दिले नाही, तर कृपया माझ्या मुलाला फोन करून त्याची माहिती दे..”

हे वाचल्यानंतर मला विश्वास आहे की आपल्या मित्रमंडळात अनेक एकटे – एकटे वृद्ध लोक आहेत.  काहीवेळा तुम्हाला आश्चर्य वाटेल, की ते त्यांच्या म्हातारपणात अजूनही कार्यरत आहेत तसे व्हॉटस्अप वर संदेश का पाठवतात !

वास्तविक या सकाळ-संध्याकाळच्या शुभेच्छांचे महत्त्व दारावर ठोठावण्याच्या किंवा वाजवण्याच्या अर्थासारखेच आहे. एकमेकांना सुरक्षिततेची शुभेच्छा देण्याचा आणि काळजी घेण्याचा हा एक मार्ग आहे.

आजकाल, व्हाट्सअप खूप सोयीस्कर आहे आणि आम्हाला आता वर्तमानपत्रांचे सदस्यत्व घेण्याची गरज राहिलेली नाही.

तुमच्याकडे वेळ असेल तर तुमच्या कुटुंबातील वृद्ध सदस्यांना व्हाट्सअप अॕप कसे वापरायचे ते शिकवा!

एखाद्या दिवशी जर तुम्हाला त्यांच्या सकाळच्या शुभेच्छा किंवा सामायिक केलेले लेख मिळाले नाहीत, तर ते कदाचित अस्वस्थ असतील किंवा त्यांना काहीतरी झाले असेल.

कृपया,आपल्या मित्रांची आणि कुटुंबाची काळजी घ्या. हे वाचून माझे डोळे पाणावले !!! 

लेखक : अज्ञात 

संकलक : गिरीश क्षीरसागर 

© सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ १५६३२ फुट उंच पहाडावरची पहिली हिमदुर्गा ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ १५६३२ फुट उंच पहाडावरची पहिली हिमदुर्गा ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

सियाचिन…. जगाचं जणू छतच. जगातील सर्वाधिक उंचीवर असलेली युद्धभूमी आहे ही. आणि ह्या बर्फाच्या साम्राज्यावर आपले पाय रोवून उभे राहण्याची फार मोठी किंमत मोजावी लागते आपल्या सैनिकांना. शून्याच्या खाली साठ सत्तर अंश तापमानापर्यंत खाली घसरणारा पारा जगणं हीच मोठी लढाई बनवून टाकतो. एवढं असूनही आपले जवान इथे रात्रंदिवस पहाऱ्यावर सज्ज असतात. यासाठी गरजेची असणारी शारीरिक, मानसिक क्षमता केवळ पुरूषांमध्येच असू शकते, असं वाटणं अगदी साहजिकच आहे. परंतू या समजुतीला खरा छेद दिला तो राजस्थानच्या उष्ण प्रदेशात जन्मलेल्या एका दुर्गेनं. तिचं नाव शिवा चौहान… अर्थात आताच्या कॅप्टन शिवा चौहान मॅडम. 

१८ जुलै १९९७ रोजी राजस्थानच्या उदयपूरमध्ये जन्मलेल्या शिवाचे तिच्या वयाच्या अकराव्या वर्षीच पितृछत्र हरपले. राजेंदसिंह चौहान हे त्यांचं नाव. आईने, अंजली चौहान यांनी मग तिच्या आयुष्याची दोरी आपल्या हाती घेतली.

घरात त्या तिघी. तिची मोठी बहिण कायद्याचं शिक्षण घेण्याच्या प्रयत्नात आणि शिवा मात्र चक्क सैन्यात जाण्याच्या जिद्दीने पेटून उठलेली. पुरूषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचा विचारच हा मूळात मोठ्या हिंमतीचा म्हणावा लागतो. शिवाने सिविल इंजिनियरींगमधली पदवी मिळवली ती केवळ सैन्यात जाण्यासाठीच.

सैन्यात भरती होण्याच्या कठीण मुलाखतीच्या दिव्यातून शिवा प्रथम क्रमांकाने पार पडल्या यातूनच त्यांच्या मनातली प्रखर जिद्द दिसून यावी. २०२० मध्ये त्यांनी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मध्ये प्रवेश मिळवला आणि पुरूषांच्या बरोबरीने कठीण शारीरिक परीक्षा उत्तीर्ण झाल्या. पुढच्याच वर्षी त्यांना भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी रेजिमेंट मध्ये नेमणूक मिळाली. त्यांच्या विभागाचं नावच आहे ‘फायर अ‍ॅन्ड फ्यूरी सॅपर्स….’ अर्थात ‘अग्नि-प्रक्षोप पथक..’ हरत-हेच्या वातावरणात सैन्यासाठी अहोरात्र कार्यरत असणारा विभाग. 

मागील दोन वर्षांपूर्वी चीनी सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजीत संघर्षात भीष्मपराक्रम गाजवलेले कर्नल संतोष बाबू याच विभागाचे शूर अधिकारी होते… त्यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आले होते.

सैन्य म्हणजे केवळ हाती बंदूक घेऊन गोळीबार करणे नव्हे… सैन्याला अनेक विभाग मदत करीत असतात… अभियांत्रिकी विभाग यात खूप महत्वाचा असतो. आपल्या कथानायिका कॅप्टन शिवा चौहान याच ‘फायर अ‍ॅन्ड फ्यूरी’च्या अधिकारी.   

Spade म्हणजे फावडे. याचेच फ्रेंच भाषेतील अपभ्रंशित नाव आहे Sappe…सॅपं! त्या काळातील युद्धात किल्ले महत्त्वाचे होते. किल्ल्यांवर ताबा मिळवण्यासाठी त्यांच्या भिंतींच्या अधिकाधिक जवळ जाणे गरजेचे असे. अशा वेळी त्यावेळचे अभियंते वरून झाकले जातील असे खंदक खणत आणि मग सैन्य त्या खंदकांतून पुढे पुढे सरकत जाऊन किल्ल्याच्या समीप जाई. यावरून सैन्यात सॅपर ही संज्ञा रूढ झाली ती आजपर्यंत. 

आधुनिक काळात या सॅपर्सचं अर्थात अभियांत्रिकी सैनिकांचं मुख्य काम असतं ते सैन्याला पुढे जाता यावं म्हणून रस्ते बांधणे, पूल बांधणे, भूसुरुंग पेरणं आणि शत्रूने पेरलेले भूसुरुंग शोधून ते नष्ट करणं. या कामांमध्ये अतिशय उच्च दर्जाची तांत्रिक क्षमता आणि अनुभव गरजेचा असतो. आपल्या सैन्यात बॉम्बे सॅपर्स, मद्रास सॅपर्स असे अन्य अभियांत्रिकी विभाग कार्यरत आहेत.  

कॅप्टन शिवा चौहान यांनी अगदी कमी कालावधीत अतिशय कर्तव्यतत्पर आणि शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम अधिकारी म्हणून लौकिक प्राप्त केला. उंच बर्फाळ पहाड चढून जाणे, इतक्या उंचीवर अभियांत्रिकी कामांना अंतिम स्वरूप देणे इत्यादी कामांत त्या वाकबगार झाल्या.

त्यांच्या आधी महिला अधिकाऱ्यांना सियाचिन मधल्या १५६३२ फुटांवरील युद्धभूमीच्या खालील ९००० हजार फूट उंचीवर असलेल्या बेस कॅम्पपर्यंतच नेमणूक दिली जाई. उरलेली ६६३२ फूट उंची पार करणं तोपर्यंत एकाही महिलेला शक्य झालं नव्हतं. पण शिवा चौहान यांनी खडतर प्रशिक्षणं लीलया पार पाडली. 

सियाचिन भागात सायकल चालवणारी महिला हे दृश्यच अनेकांना कौतुकाने तोंडात बोट घालायला भाग पाडणारे होते. शिवा चौहान यांनी चक्क ५०८ किलोमीटर अंतर कापणारी सायकल मोहिम हाती घेतली आणि पूर्णही करून दाखवली. कारगिल विजय दिनानिमित्त त्यांनी ही अनोखी मोहिम यशस्वी केली. सियाचिन युद्ध स्मारक ते कारगिल युद्ध स्मारक अशी ही सायकल यात्रा कॅप्टन शिवा चौहान यांनी इतर पुरूष अधिकारी, सैनिक यांचे नेतृत्व करून पूर्ण केली, त्यामुळे त्यांच्या क्षमतेबद्द्ल कुणाच्याही मनात शंका उरली नाही. 

आणि यानंतर मात्र शिवा चौहान यांनी आणखी ६६३२ फूट उंचीवर जाण्याचा चंग बांधला… प्रचंड कष्ट घेऊन आवश्यक ती सर्व प्रशिक्षणं पूर्ण केली आणि जानेवारी २०२३ मध्ये त्यांना भारतीय सैन्यातील पहिली महिला अधिकारी म्हणून सियाचिन वर प्रत्यक्ष कामावर नेमण्यात आले… एका महिलेसाठी हा एक प्रचंड मोठा सन्मान मानला जावा! 

सैनिक हिमवीरांच्या मधोमध मोठ्या अभिमानाने बसलेल्या कॅप्टन शिवा चौहान ह्या नारीशक्तीच्या प्रतीकच आहेत. त्यांच्यापासून समस्त तरूण वर्ग निश्चितच प्रेरणा घेईल. भगवान शिवाचं वास्तव्य असलेल्या हिमाच्छादित पर्वत शिखरांवर शिवा नावाची पार्वतीच जणू भारतमातेच्या रक्षणासाठी बर्फात पाय रोवून उभी आहे! 

कॅप्टन शिवा चौहान, आपणांस अभिमानाने सल्यूट… जय हिंद ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पाचवा : कर्मसंन्यासयोग : श्लोक १ ते १० – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पाचवा : कर्मसंन्यासयोग : श्लोक १ ते १० – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

अर्जुन उवाच :

संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।

यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् ।।१।।

कथित अर्जुन 

कर्मसंन्यास उपदेश दिधला श्रीकृष्णा मजला

तरी सांगता आचरण्याला  आता कर्मयोगाला 

कुंठित झाली माझी प्रज्ञा जावे कोण्या मार्गाला

कल्याणदायी असेल निश्चित कथन करावे तेचि मला ॥१॥

श्रीभगवानुवाच :

संन्यास: कर्मयोगश्च नि:श्रेयसकरावुभौ ।

तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते ।।२।।

कथित श्रीभगवान 

कर्मयोग अन् कर्मसंन्यास उभय कारीकल्याण

कर्मयोग  तयात श्रेष्ठ सुलभ तयाचे आचरण ॥२॥

*

ज्ञेय: स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति ।

निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बंधात्प्रमुच्यते ।।३।।

*

मनी न द्वेष नच आकांक्षा तोच खरा संन्यासी

भावद्वंद्व रहिता महावीरा मुक्ती भावबंधनासी ॥३॥

*

सांख्ययोगौ पृथग्बाला: प्रवदन्ति न पण्डिता: ।

एकमप्यास्थित:सम्यगुभयोर्विन्दते फलम् ।।४।।

*

फलप्राप्ती संन्यासाची तथा कर्मयोगाची

मूढ मानती सांख्ययोगी भिन्न असते तयांची

परमेशाची प्राप्ती ही तर फलप्राप्ती दोन्हीची

पंडित जाणत फला तयांच्या ही किमया ज्ञानाची ॥४॥

*

यत्सांख्यै: प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ।

एकं सांख्यं च योगं च य: पश्यति स पश्यति ।।५।।

*

सांख्य असो वा कर्ममार्गी वा परमधाम तया प्राप्ती 

दोन्हीचे फल एक जाणतो यथार्थ ज्ञानी त्याची दृष्टी ॥५॥

*

संन्यासस्तु महाबाहो दु:खमाप्तुमयोगत: ।

योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति ।।६।।

*

कर्मयोगाविना वीरा नच प्राप्ती संन्यासाची

रत ब्रह्म्याशी कर्मयोग्या प्राप्ती परमात्म्याची ॥६॥ 

*

योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रिय: ।

सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ।।७।।

*

जितेंद्रिय विशुद्धात्मा अद्वैत समस्त जीवांशी

समर्पित कर्म आचरितो राहतो अलिप्त कर्माशी ॥७॥

*

नैव किंचित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् ।

पश्यञ्शृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपञ्श्वसन् ।।८।।

*

प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि ।

इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ।।९।।

*

श्रुती दृष्टी श्वसन गंध भोजन वाचा व्यवहार नेत्रपल्लवी

सकल क्रिया इंद्रियस्वभाव तयांसी मी ना कधी चालवी

दृढनिष्ठा ही मनात ठेवुन अलिप्त वावरी तोचि खरा योगी

कर्म ना करितो मी भाव जागवी ठायी तत्ववेत्ता सांख्ययोगी ॥८,९॥

*

ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति य: ।

लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ।।१०।।

*

समर्पित कर्मे परमात्म्या विनासक्तीने आचरण

अलिप्त तो पापांपासून जैसे जले कमलपर्ण ॥१०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ऑपरेशन रांदोरी बेहाक…. अर्थात थेट भेट गनिमांना ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

ऑपरेशन रांदोरी बेहाक…. अर्थात थेट भेट गनिमांना ! 

जपानी युद्धसदृश खेळांमध्ये प्रतिस्पर्धी एकमेकांवर सर्व शक्तिनिशी चालून जातात… निकराचा हल्ला चढवतात…. आपल्या जीवाची पर्वा न करता… कारण शत्रूही तसाच चालून आलेला असतो… एखाद्या मस्तवाल रानडुकरासारखा. या युद्धप्रकाराला रांदोरी म्हणतात बहुदा. 

एप्रिल, २०२० मधील ही घटना आहे. लोकांना आपल्या जीवाची भ्रांत असल्याने इतर ठिकाणी काय सुरू आहे, याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती! 

कोरोनामुळे सर्व जगासारखाच हिंदुस्थानही थांबला होता. जीवघेण्या रोगाच्या भीतीने रस्ते ओस पडले होते…. पण सीमेवर गस्त सुरू होती. हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर तुफान बर्फवृष्टी होत होती. दोन्ही देशांच्या सीमांना एकमेकांपासून अलग करणारी काटेरी तारांची कुंपणेही बर्फात गाडली गेलेली होती. आसमंतात बर्फाच्या पांढऱ्या रंगाशिवाय दुसरे काहीही दिसत नव्हते. पण अत्याधुनिक यंत्रांना बरेच काही दिसत होते. 

अत्यंत कमी दृश्यमानता असल्याचा आणि सीमेपलीकडून झालेल्या फायरींगचा आडोसा घेत पाच प्रशिक्षित पाकिस्तानी अतिरेकी भारतीय सीमा ओलांडून कश्मिरात दाखल झालेही होते… रक्तपात घडविण्यासाठी… 

स्थळ कुपवाडा सेक्टर मधील केरन भाग. भारताच्या Unmanned Ariel Vehicle अर्थात छोट्या चालक विरहीत विमानांत बसवलेल्या कॅमेऱ्यांनी आणि इतर उपकरणांनी शत्रूच्या त्या पाच जणांच्या पावलांचे ठसे अचूक टिपले आणि नियंत्रण कक्षाला पाठविलेही होते… दिवस होता १ एप्रिल,२०२०. 

अधिकाऱ्यांनी त्वरीत योजना आखली. आदेश दिले गेले आणि जवान त्या तसल्या भयावह हवामानात अतिरेक्यांच्या मागावर निघाले. बर्फवृष्टी, तुफान वारा आणि कमी प्रकाश याची तमा न बाळगता आपले वाघ पिसाळलेल्या लांडग्यांच्या मागावर निघाले. त्यादिवशी अतिरेकी टप्प्यात आले नाहीत. दोन आणि तीन एप्रिल या दोन्ही दिवशी ही शोधमोहिम सुरू राहिली. या दिवशी मात्र एकदा नव्हे तर दोन-तीन वेळा आपले जवान आणि अतिरेकी यांच्यात गोळीबाराच्या फैरी झडल्या…पण त्या अवलादी निसटून जाण्यात यशस्वी ठरल्या. पण पळून जाताना त्यांना त्यांच्याजवळची जड हत्यारे टाकून पळावे लागले होते.

रांदोरीचा आजचा पाचवा दिवस. लांडग्यांना सीमेपलीकडे पळूनही जाऊ द्यायचे नव्हते आणि आपल्या सीमेत घुसूही द्यायचे नव्हते…. त्यांना वर पाठवणे गरजेचे होते. 

ते पाचही जण एक नाल्यात लपून बसले. आधुनिक दळणवळण साधने, खाण्या-पिण्याचे मसालेदार पदार्थ, मद्य, वेदनाशामक औषधे, दारूगोळा…. असा सगळा जामानिमा करून आली होती मंडळी. 

त्यांचा ठावठिकाणा लक्षात आला. पण एकतर शेकडो मीटर्स उंचीवरची रणभूमी. गळ्याइतके बर्फ साठलेले. श्वास घेणे महाकठीण. आता रामबाण सोडायला पाहिजे असे लक्षात आले….

पॅरा एस.एफ. अर्थात स्पेशल फोर्स कमांडोज मैदानात उतरवण्याचे ठरले. भीती आणि अशक्य या शब्दांची साधी तोंडओळखही न झालेले नीडर, उच्च दर्जाचे आणि शारीरिक, मानसिक क्षमातांची अंतिम कसोटी पाहणारे प्रशिक्षण प्राप्त केलेले सहा-सहा कमांडोंचे दोन गट हेलिकॉप्टरमधून अतिरेक्यांच्या लपण्याच्या संभाव्य ठिकाणाच्या जवळ उतरवण्यात आले. शस्त्रसज्ज असलेले हे बहाद्दर जमिनीवर उतरले तेंव्हा त्यांच्या कमरेपेक्षा जास्त उंचीचा बर्फ तिथे साठलेला होता.. जणू ते एखाद्या सरोवरातच उतरलेले असावेत. 

एका तुकडीचे नायक होते सुभेदार संजीव कुमार साहेब. सोबत पॅराट्रूपर बाल कृष्णन, पॅराट्रूपर छत्रपाल सिंग, पॅराट्रूपर अमित कुमार, हवलदार दवेंद्र सिंग आणि ….

दिवसभर माग काढला गेला…. रात्र पडली आणि उलटून जाण्याच्या बेतात होती. 

पहाट झाली. रस्ता कसा होता? मूळात रस्ताच नव्हता. प्रचंड चढ-उतार, काही ठिकाणी गळ्याइतके बर्फ, तर काही ठिकाणी जीवघेणी खोली असलेल्या दऱ्या. एका दरीच्या किनाऱ्यावर जमा झालेले बर्फ घट्ट होऊन दरीच्या बाजूस साठून राहिलेलं. जमीन ते दरीची किनार यातील फरक लक्षात येणं अशक्य झालेलं. पण अतिरेक्यांच्या पावलांचे ठसे तर त्याच आसपास दिसले होते… ते तिथेच लपून बसलेले असावेत! 

सुभेदार संजीवकुमार साहेब नेतृत्व करीत पुढे पावले टाकीत होते… सावधानतेने. त्यांच्या अर्धा पाऊल मागे बाल कृष्णन आणि छत्रपाल सिंग होते… त्यांचे एकत्रित वजन त्या बर्फाच्या तुकड्याला पेलवले नाही आणि ते तिघेही दीडशे फूट खाली कोसळले….. अत्यंत वेगाने. त्यांच्या शरीरातील अनेक हाडं तुटली….. 

पण त्यांना आपल्या वेदनांचा विचार करायला सवडच मिळाली नाही! त्यांच्या समोर ते पाच अतिरेकी उभे होते… म्हणजे ते लपून बसलेले अतिरेकी ही तीन शरीरं आपल्या पुढ्यात अचानक कोसळलेली पाहून ताडकन उभे राहिले होते. यांच्या रायफल्स सज्ज होत्या… नेम धरण्याची गरज नव्हतीच. काही फुटांचंच तर अंतर होतं…. त्यांनी अंदाधुंद फायरींग सुरू केलं. या तिन्ही जखमी वाघांनी डरकाळी फोडत प्रत्युत्तर दिलेच…. 

गोळीबाराचा आवाज ऐकून वर असलेल्या वीरांनी आपल्या सहकाऱ्यांच्या रक्षणार्थ त्या तेवढ्या उंचीवरून बेधडक खाली उड्या घेतल्या…. त्यात पॅराट्रूपर सोनम शेरींग तमंग सुद्धा होते. 

सुभेदार संजीवकुमार साहेब आणि अमितकुमार समोरच्या लांडग्यांवर तुटून पडले होते… जखमी हातांनी मारामारी सुरू केली…. त्यांच्या शरीरात तोवर पंधरा गोळ्यांनी प्रवेश केला होता. इतर दोघांची गतही काही वेगळी नव्हती…

तमंग यांनी एका अतिरेक्याला अगदी जवळून टिपले. एकावर हातगोळा टाकला. अमित कुमार जागीच हुतात्मा झाले होते. संजीवकुमार साहेब गंभीर जखमी होतेच. तमंग यांनी त्यांना मागे खेचलेही होते…. पण उशीर झाला होता. पण या पाचही वाघांनी स्वर्गाकडे प्रयाण करताना त्या पाच जनावरांना नरकात नेऊन फेकण्यासाठी स्वत:च्या दातांत घट्ट धरले होते…! 

एक अतिरेकी तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरला… पण आपल्या इतर जवानांच्या गोळ्या तो चुकवू शकला नाही. 

आपल्या सहकाऱ्यांचा पराक्रम सांगण्यासाठी दैवाने पॅराट्रूपर सोनम शेरींग यांना सुखरूप ठेवले होते जणू! पण देशाने पाच वाघ गमावले होते. देशाने या पाचही योद्ध्यांचा मरणोत्तर यथोचित गौरव केला. 

सोनम शेरींग यांना मा. राष्ट्रपती मा. श्री.रामनाथजी कोविंद साहेबांच्या हस्ते शौर्य चक्र स्विकारताना आपल्या हुतात्मा सहकाऱ्यांच्या आठवणींनी गहिवरून आले होते! 

५ एप्रिल, २०२३ रोजी या बलिदानाला तीन वर्षे झाली! भारतमातेच्या पांढऱ्या शुभ्र हिमभूमीवर आपल्या लालभडक रक्ताचे शिंपण करणाऱ्या या वीरांचे स्मरण होणं साहजिकच आहे, नाही का? 

सामान्य लोकांना या असामान्य बलिदानाची पुन्हा माहिती व्हावी म्हणून हे सामान्य लेखन. प्रतिक्रिया देताना या हुतात्म्यांचं एकदा स्मरण आणि त्यांच्या आत्म्यांच्या कल्याणासाठी आराध्य देवतांकडे प्रार्थना तुम्ही करालच, याची खात्री आहे. 

🇮🇳 जय हिंद. जय हिंद की सेना. 🇮🇳

सोबत दिलेले छायाचित्र शेरींग साहेबांचे आहे. पुरस्काराचे वेळी घडलेल्या प्रसंगाचे थोडक्यात वर्णन केले जाते. ते ऐकत असतानाची त्यांची ही भावमुद्रा आहे !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “करिअर – स्ट्रेस – आणि वांझपण” ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “करिअर – स्ट्रेस – आणि वांझपण” ☆ सौ. अंजोर चाफेकर

ती  त्यादिवशी घरी आली.एकटी असली, नवऱ्याला वेळ असला की नेहमीच यायची.

मलाही तिचं घरात मनमोकळं बागडणं आवडायचं.

त्यादिवशी शेजारणीचे १ वर्षांचे मूल माझ्याकडे बागडत होते. तिने पटकन त्याला मोठ्या प्रेमाने मांडीवर घेतले. इतक्यात तिचा नवरा डाॅ.प्रथमेश तिला न्यायला घरी आला. तिच्या हातात मूल बघून मला म्हणाला,

“ किती छान दिसते ना पियू बाळाबरोबर? “ — मला त्याची व्यथा जाणवली. 

ती दुसऱ्या दिवशी माॅर्निंग वाॅकला भेटली. ती जाॅगिंग करत होती. मी चालत होते.

“ आन्टी, मी चालते तुमच्या बरोबर. “ तिला मन मोकळे करायचे होते.

” बघितले ना, काल कसं बोलला तो ? मला नाही का वाटत मूल व्हावे? आता मी ३५ हून जास्ती आहे.

याला सर्व पाॅश हवे. घर घेतले. इंटिरिअरला दीड कोटी. नवीन क्लिनिकवर इतका खर्च केला. आम्ही दोघे dermatologist. एकेक लेझर मशीन १ कोटीच्या वरती. सर्व लोनचा EMI भरावाच लागतो. मी प्रेगन्सीत घरी बसू शकत नाही. तरी आम्ही मागे ट्राय केले, पण मिसकॅरेज झाले. आता भीतीच वाटते.”

माझ्या कांप्लेक्स मधली सोनिया. इतकी हुषार, एम्.बी.ए.झालेली. सर्व जगाची सफर केलेली. २०-२५ कंन्ट्रीज फिरून आलेली. बाबा गाडीतून रोज जुळ्या मुलींना फिरवते. मुली इतक्या गोड. 

“आन्टी मी ४० वर्षांची होईपर्यंत मूल होऊ देण्याचा विचारच नाही केला. माझी करिअर इतकी छान चालली होती. पण म्हटलं, ४० नंतर विचार करता येणार नाही. माझी तीन ivf cycles फेल गेली. आणि चौथ्या वेळी जुळे detect झाले. मग नऊ महिने बेड रेस्ट. मुलींना सांभाळायला ३ मुली ठेवल्यात. 

आता मुली वर्षांच्या झाल्यावर नवीन जाॅब शोधीन. मी घरी बसूच शकत नाही.”

माझ्या मुलीची नणंद. इतकी हुषार. इतकी सुंदर. स्वभावानी इतकी लाघवी. एम्.बी. बी. एस्. झाली.

लग्नासाठी मुलगा बघून दिला नाही. ती एम्.डी.झाली. मग फेलोशीप घेतली. आता ३६ वर्षांची झाली.

आता म्हणते, मुलगा बघा.

” तुला कुणी आवडला नाही का?”

” मामी ,मी माझ्या अभ्यासात इतकी फोकस्ड होते .मला  माझ्या कॅलीबरचा तर मिळायला नको.”

— तिला एकही मुलगा पसंतच पडत नाही. आता लग्न झाले तरी मूल नैसर्गिक होणे अशक्य. शिवाय पस्तीशीनंतर  मुलींची फर्टिलिटी कमी होते. मुलांचाही स्पर्म काउंट कमी होतो. त्यामुळे आय् व्ही. एफ्.सक्सेसफुल होईल याचीही खात्री नाही. बरं, त्यातूनही चाळिशीनंतर मूल झालेच तर त्याच्यात काॅन्जिनिअल डिफेक्टस, abnormilities राहण्याची शक्यता असते.

माझ्या मैत्रिणीची मुलगी नेहा, ३४ वर्षांची आहे. नुकतीच ती कंपनीची व्हाइस प्रेसिडेंट झाली.

आता नेक्स्ट स्टेप म्हणजे डिरेक्टर. “ आन्टी, मी आता प्रेग्ननसीचा विचार नाही करु शकत. मी मॅटरनिटी लिव्ह घेतली तर माझ्या खालच्याला तो चान्स मिळेल.व ते मी नाही सहन करू शकणार. ३० ते ३८ ही आमच्या करिअरची क्रूशियल वर्षे असतात. मी माझे एग्ज फ्रीज करून ठेवलेत. “

– एग्ज फ्रीज करण्याचा विचार २० ते ३० व्या वर्षी करावा लागतो.

निमाचा जाॅब असा आहे की तिला खूप ट्राव्हल करावे लागते. ती म्हणते, “ मी सरोगसी पसंत करीन. 

म्हणजे मला नऊ महीने अडकून पडायला नको.”

नैसर्गिकरित्या गर्भारोपण हे आता मागे पडत चाललंय. सर्वजण टेक्नाॅलाॅजीचा उपयोग करतात.

१९८६ मधे जेव्हा डाॅ. इंदिरा हिंदुजाने भारतात पहिल्यांदा के ई एम् हाॅस्पिटलमधे टेस्ट ट्यूब बेबीची डिलीव्हरी केली, तेव्हा मूल न होऊ शकणा-यांना दिलासा होता.

नेहा म्हणते, “ काकी, आई सारखी पाठी लागली आहे .. मूल होऊ दे म्हणून. पण मी कामावरून घरी येते तेव्हा मी इतकी थकलेली असते. तो ही दमलेला असतो. इंटिमसी जमत नाही. वीकएन्डला आठवड्याची 

साचलेली कामे असतात. आणि आता इतकं पॅशनही वाटत नाही.”

हल्ली मुलीही दिवसाला सहा सात सिगरेट ओढतात. त्यामुळे एग्ज निर्माण होत नाहीत. फॅलोपिअन  ट्यूब  ब्लॉक होते. मुला मुलींचे कामाचे तास वाढलेत. कामाचा ताण वाढलाय. जाॅबचेही प्रेशर असतेच. त्यामुळे मासिक पाळी अनियमित होते. त्यामुळेही infertility वाढते.

टेक्नाॅलाॅजी कितीही प्रगत झाली तरी स्ट्रेसमुळे ती कमीच पडणार…. आणि काळाबरोबर हा प्रॉब्लेम वाढतच जाणार…. पण विचार कोण करणार ? ….. आणि कधी ? ….

©  सौ.अंजोर चाफेकर, मुंबई.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ व्यक्ती तितक्या प्रकृतीही — ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

व्यक्ती तितक्या प्रकृतीही — ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

काही वेळा आपल्या बघण्यात येते, लोक तरी किती विविध प्रवृत्तीचे असतात ना. कोणी फक्त भविष्यात जगतात तर कोणी भूतकाळात.

वर्तमानात जगायचे, पण भविष्याची स्वप्ने बघायची,हा तर मानवी स्वभाव आहे. त्यात गैर काहीच नाही पण काही लोक असे बघण्यात येतात जे फक्त आणि फक्त भूतकाळातच रमलेले असतात.

मी डॉक्टर असल्याने आपोआपच माझा समाजाशी जास्त संबंध आला,येत असतोही. निरनिराळ्या वेळी माणसे कशी  वागतात, हेही मला चांगलेच अनुभवाला आलेले आहे.

काहीवेळा आडाखे चुकतात पण आपण बांधलेले अंदाज तंतोतंत खरे आले की मजा वाटते. माझ्या बघण्यात आलेले काही लोक खूप मजेशीर आहेत. 

माझी एक मैत्रीण आहे… ती कधीही भेटली तरी मी – माझे – मला, या पलीकडे जातच नाही. कधीही भेटली की “ अग ना, काय सांगू, आमचे हे ! इतके बिझी असतात.. इथपासून,आमची पिंकी कशी हुशार, हे आख्यान सुरू. लोकांना बोलायला मध्ये जागाच नाही. मग मी नुसती श्रोत्यांची भूमिका घेऊन “ हो का ? वावा, “ इतकेच म्हणू शकते.

दवाखान्यात  अप्पा बोडस यायचे. अतिशय सज्जन साधे मध्यमवर्गीय गृहस्थ. पण सतत भूतकाळातच रमलेले… “ काय सांगू  बाई तुम्हाला.. .काय ते वैभव होते आमचे. मोठा वाडा, पूर्वापार चालत आलेला,रोज १५-२० माणसे असत पंक्तीला. गेले ते दिवस.” .. मग मला विचारायचा मोह अनावर व्हायचा की “ अहो, मग ते राखले का नाही कोणी? तुम्ही का चाळीत रहाताय?” पण मी हे नुसते ऐकून घेते. त्यांचा विरस मी का करू? 

मग आठवतात इंदूबाई. सध्या करतात दहा घरी पोळ्या आणि स्वयंपाकाची कामे. पण आल्या की सुरूच करतात. “ काय सांगू बाई तुम्हाला ? किती श्रीमंत होतो आम्ही. काय सुरेख माझं माहेर. पण ही वेळ आली बघा. तुमच्यासारखी शिकले असते, तर हाती पोळपाट नसता आला.” .. मला हसायला येते. मी त्यांना विचारले, “ अहो,मग तेव्हा का नाही शिकलात?” .. उत्तर असे..  “ तेव्हा कंटाळाच यायचा बघा मग दिली शाळा सोडून.” — आता अशा इंदूताईंचे भविष्य सांगायला ज्योतिषी नको. पण त्या रमतात आपल्याच आठवणीत. माझा दवाखाना हे एक चावडीचे ठिकाण होते लोकांना.

निम्न वस्तीत माझा दवाखाना, त्यामुळे उच्चभ्रू लोकांचे नियम यांना लागू नाहीतच. मी जराशी रिकामी बसलेली दिसले की सरळ येऊन,  आपल्या मनीची उकल करायला सुरुवात.

लता एक कॉलेज कन्यका… बुद्धी अतिशय सामान्य, रूप बेताचेच. माना वेळावत दवाखान्यात यायची.     “ बाई,येरहोष्टेश व्हायला काय करावे लागते हो? “ मी कपाळावर हात मारून घेतला.

“लता, तो शब्द एअरहोस्टेस असा आहे. आणि अगं लता तुझे स्वप्न खूप छान आहे, पण त्याला डिग्री लागते. इंग्लिश लागते उत्तम. तू आधी बी ए तर हो, मग मी सांगते पुढचे.” 

मग कधीतरी यायचे एक कवी… “ बाई वेळ आहे का?” नसून कोणाला सांगते. पेशंट नाहीत हे बघूनच ते आलेले असत. “ बघा किती सुंदर कविता केलीय आत्ताच. तुम्हीच पहिल्या हं ऐकणाऱ्या.” – ती निसर्ग कविता,पाने फुले मुले प्रेम,– असली ती बाल कविता ऐकून मला  भयंकर वैताग यायचा. कवी आणि कविता दोन्हीही बालच..

मग आठवतात काळे आजी. या मात्र इतक्या गोड ना. “ बाई,तुमच्यासाठी ही बघा मी स्वतः पर्स विणली आहे.आवडेल का ?वापराल का? “ किती सुंदर विणायच्या त्या. पुन्हा जराही मी मी नाही. ती माझी पर्स बघून माझ्या बहिणीने त्यांना बारा पर्सेस करायची ऑर्डर दिली आणि नकळत त्यांचा तो छोटासा व्यवसाय सुरू झाला. त्यांना चांगले पैसे मिळायला लागले अगदी सहज. असेही उद्योगी लोक मला भेटले.

असेच मला काळेकाका आठवतात. आले की हातात स्मार्ट फोन आणि फेसबुक उघडून, मला त्या पोस्ट दाखवण्याची हौस ! वर,वावा किती छान म्हणावे ही अपेक्षा. सतत यांच्या पोस्ट्स फेसबुकवर. त्याही जुन्या,अगदी जपून ठेवलेल्या. हे फेसबुक प्रकरण माझ्या आकलनापलीकडले आहे.

— काय  ते  अहो रुपम् अहो ध्वनिम्… आपल्या कविता,आपल्या पाककृती लोक वेड्यासारखे टाकत असतात. बघणारे रिकामटेकडे, तयार असतातच, लाईक्स द्यायला,अंगठे वर करायला. काय हा वेळेचा अपव्यय… 

तर हेही  माझे असेच एक पेशंट !!—  मी  2000 साली गेलो होतो ना चीनला, ते बघा फोटो. ही माझी बायको. बघा,कशी दिसतेय चिनी ड्रेस घालून..  हे आम्ही,आफ्रिकेला गेलो होतो तेव्हाचे फोटो. हा माझा लेख बघा बाई..  २०११  साली आला होता .” —-  सतत जुन्या गोष्टींचा यांना नॉस्टॅल्जिया.  हे जपून तरी किती ठेवतात असले फुटकळ लेख , कोणत्यातरी  सदरात आलेले.  मग त्यांनी केलेल्या परदेशीच्या ट्रिप्स. पुन्हा,मी मी आणि मी… लोकांना काय असणार हो त्यात गम्य. नाईलाज म्हणून देतात आपले  भिडेखातर   लाईक्स. पण लोकांनी कौतुक करावे याची केवढी हो हौस. त्यातूनही  खरोखरच चांगले ध्येय  असणारे, काहीतरी करून दाखवायची जिद्द असणारे लोकही भेटले.

अशीच भेटली अबोली. अतिशय हुशार, गुणी, पण दारिद्र्य पाचवीला पुजलेले. बारावीला उत्तम मार्क्स

आणि आईवडील म्हणाले ‘ बस झालं शिक्षण.आता लग्न करून टाकू तुझं.’ बिचारी आली रडत माझ्याकडे. “ बाई,मला नाही लग्न करायचं इतक्यात. मी काय करू ते सांगा. मला पायावर उभं रहायचं आहे माझ्या.”  मी तिला ट्रॅव्हल टुरिझमचा कोर्स करायला आवडेल का ते विचारलं. पहिली फी मी भरली तिची. तिने तो कोर्स मन लावून पूर्ण केला. छान मार्क्स मिळवून पास झाली आणि तिला एका चांगल्या ट्रॅव्हल कंपनीत नोकरीही मिळाली. तिच्या ऑफिसमध्ये मी मुद्दाम तिने बोलावले म्हणून भेटायला गेले होते. सुंदर युनिफॉर्म घातलेली अबोली किती छान दिसत होती ना. मला फार कौतुक वाटलं तिचं. असेही जिद्दी लोक भेटले मला माझ्या आयुष्यात.

असाच अभय अगदी गरीब कुटुंबातला. सहज आला होता भेटायला. तेव्हा माझा  मर्चंट नेव्ही मधला भाचा काही कामासाठी दवाखान्यात आला होता. मी अभयची त्याच्याशी ओळख करून दिली. अभय म्हणाला, “ दादा,मला माहिती सांगाल का मर्चंट नेव्हीची. अभय त्याच्या घरी गेला. माझ्या भाच्याने, अभयला सगळी माहिती नीट सांगितली.अभयकडे एवढी फी भरण्याइतके पैसे नव्हते. इतके  पैसे भरण्याची ऐपतच नव्हती त्यांची. पण मग त्याने माझ्या भाच्याच्या सल्ल्याने इंडियन नेव्हीची परीक्षा दिली. तो पास झाला,आणि आज इंडियन नेव्हीमध्ये छान ऑफिसर आहे तो… त्या मुलाने, मानेवर बसलेले दारिद्र्य मोठ्या जिद्दीने झटकून टाकले. आज त्याचा मोठा फ्लॅट,  छान बायको मुले बघून मला अभिमान वाटतो.

— असेही छान जिद्दी लोक मला भेटले आणि नकळत का होईना, हातून त्यांचे भलेही झाले.

तर लोकहो, असे जुन्या वेळेत सतत भूतकाळात गोठलेले राहू नका. इंग्लिशमध्ये छान शब्द आहे,

‘फ्रोझन  इन  टाईम.’  जुन्या स्मृती खूप रम्य असतात हे मान्य. पण त्या तुमच्या पुरत्याच ठेवा, नाही तर हसू होते  त्याचे. आपला आनंद आपल्या पुरताच असतो… असावा. लोकांना त्यात अजिबात रस नसतो.

म्हणून तर आपले रामदासस्वामी  सांगून गेलेत ना…

                                             आपली आपण करी जो स्तुती,

                                                         तो येक पढत मूर्ख.

आणि केशवसुत म्हणतात …… 

                                         जुने जाऊद्या, मरणा लागुनी

                                          जाळूनी किंवा पुरुनी टाका 

                                          सडत न एक्या ठायी ठाका 

                                           सावध ! ऐका पुढल्या हाका 

— आपणही हे नक्कीच शिकू या.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ Pin-drop silence — ☆ अनुवाद आणि प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ Pin-drop silence — ☆ अनुवाद आणि प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

Pin-drop silence —

तुम्ही कधी निस्तब्ध शांतता अनुभवली आहे ?

टाचणी पडली तरी ऐकायला येईल अशी शांतता ?

Pin drop silence …. याचा नेमका अर्थ सांगणाऱ्या खालील काही घटना आहेत, जेव्हा शांतता आवाजापेक्षाही मोठ्याने बोलू शकली होती.

प्रसंग 1

फील्ड मार्शल सॅम बहादूर माणेकशॉ यांच्या आयुष्यातला एक प्रसंग.

एकदा सर सॅम बहादूर माणेकशॉ एका सभेमध्ये भाषण करण्यासाठी अहमदाबादला गेले होते. सरांनी भाषणाला सुरुवात केली. ते अर्थातच इंग्रजीमधून बोलत होते.. श्रोत्यांमधे अचानक गडबड सुरू झाली… .. 

“ आपण गुजराथीत बोला. गुजराथीत बोललात तरच आम्ही आपले भाषण पुढे ऐकू.”

सर माणेकशॉ बोलायचे थांबले, त्यांनी श्रोत्यांवरून त्यांची करडी नजर फिरवली. आणि काही क्षणांत अगदी ठामपणे ते म्हणाले …. 

“  मित्रांनो, मी माझ्या प्रदीर्घ लष्करी सेवेत अनेक लढाया लढलो आहे, आणि त्या दरम्यान बऱ्याच भाषा बोलायलाही  शिकलो आहे. म्हणजे बघा ….
मी माझ्या शीख रेजिमेंटमधल्या सैनिकांकडून पंजाबी शिकलो…

मराठा रेजिमेंटच्या सैनिकांकडून मराठी शिकलो.

मद्रास सॅपर्समध्ये असणाऱ्या सैनिकांकडून तमीळ शिकलो. बेंगॉल सॅपर्सबरोबर काम करत असतांना  बंगाली शिकलो. हिंदी शिकलो ते बिहार रेजिमेंटबरोबर असतांना.  इतकंच काय, गुरखा रेजिमेंटकडून नेपाळी भाषाही शिकलो…..

… पण दुर्दैवाने …. ज्याच्याकडून मला गुजराथी भाषा शिकता आली असती असा गुजरातमधला एकही माणूस भारतीय सेनेत मला भेटला नाही .. अगदी एकही नाही.”

आणि अहमदाबादच्या त्या भल्यामोठ्या सभागृहात टाचणी पडली तरी ऐकायला येईल एवढी शांतता पसरली होती.

प्रसंग 2

स्थळ : पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ.

नुकत्याच लँड झालेल्या एका अमेरिकन विमानातून रॉबर्ट व्हायटिंग, वय ८३, हे गृहस्थ पँरिस विमानतळावर उतरले. तिथल्या फ्रेंच कस्टमस् ऑफिसपाशी गेल्यावर खिशातला पासपोर्ट काढण्यासाठी ते आपले खिसे चाचपत होते.

” महोदय, फ्रान्सला भेट देण्याची ही आपली पहिलीच वेळ आहे का ? ”  त्यांना जरासा वेळ लागल्याचे पाहून त्यांचा उपहास करण्याच्या हेतूने एका उद्धट कस्टम ऑफिसरने विचारणा केली..

आपण याआधीही फ्रान्सला येऊन गेल्याचं रॉबर्टनी सांगितलं..अजूनही ते पासपोर्टसाठी खिसे चाचपत होते पण हाताला पासपोर्ट काही लागत नव्हता.

“ मग इथे दाखवण्यासाठी तुम्ही तुमचा पासपोर्ट हातात तयार ठेवला पाहिजे हे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे “

“ हो. पण मागच्या वेळी मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा मला कुणालाही पासपोर्ट दाखवावा लागला नव्हता.” — तो वयस्कर अमेरिकन माणूस म्हणाला.

 “ हे शक्यच नाही. अमेरिकन माणसांना फ्रान्समध्ये उतरल्या उतरल्या आपला पासपोर्ट दाखवावाच लागतो. “ .. कस्टम ऑफिसर कुत्सितपणे म्हणाला.

त्या वृद्ध अमेरिकन माणसाने समोरच्या फ्रेंच माणसाकडे काही क्षण जराशा रागानेच रोखून पाहिलं, आणि मग शांतपणे म्हणाला .. “ नीट ऐका ..  १९४४ साली * D-Day*च्या दिवशी पहाटेच्या ४:४० ला तुमच्या ओमाहा समुद्रकिनाऱ्यावर मी आणि माझे सहकारी विमानातून उतरलो होतो …. तुमच्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून मदत करण्यासाठी आम्ही तुमच्या देशात आलो होतो ….  आणि तेव्हा माझा पासपोर्ट दाखवण्यासाठी त्या किनाऱ्यावर एकही फ्रेंच माणूस मला सापडला नव्हता. 

हे ऐकून त्या कक्षात एकदम निस्तब्ध शांतता पसरली होती. टाचणी पडली असती तरी आवाज ऐकू आला असता. 

(दुसऱ्या महायुद्धातील फ्रान्सची नामुष्की कोण विसरेल ? …. * D-Day…* ६ जून १९४४ – दुसऱ्या महायुद्धातला तो पहिला दिवस, ज्या दिवशी मित्रराष्ट्रांच्या सैन्याने नॉर्मनडीच्या समुद्रकिनाऱ्यांवर उतरून उत्तर फ्रान्सवर आक्रमण केले) 

प्रसंग 3

सन १९४७ …. 

ब्रिटिश राजवतीतून भारत मुक्त झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच देशातल्या महत्त्वाच्या पदांवर नेमणुका करण्यासाठी विचार विनिमय करणे चालू झाले होते.  याच कारणासाठी भावी अघोषित पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिन्ही सेनादलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती — भारताचे पहिले “जनरल ऑफ इंडियन आर्मी ‘ यांची निवड करण्यासाठी 

“मला असे सुचवावेसे वाटते की आपण एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याची या पदावर नियुक्ती करावी. कारण हे  पद सांभाळण्यासाठी आवश्यक असणारा पुरेसा अनुभव असणारी व्यक्ती आपल्याकडे नाही.”

… ब्रिटिशांकडून जे आजपर्यंत फक्त आज्ञापालन करायलाच शिकले होते — नेतृत्व करायला नाही –  अशा सर्वांनी.. ज्यात काही प्रतिष्ठित नागरिकही होते आणि सैन्यातले गणवेशधारीही – अशा सर्वांनीच नेहरूंच्या या प्रस्तावाला माना हलवत दुजोरा दिला..

…  मात्र एक वरिष्ठ अधिकारी नथुसिंह राठोड यांनी यावर आपले वेगळे मत मांडण्याची परवानगी मागितली. त्या अधिकाऱ्याचा आपल्यापेक्षा काही वेगळा आणि स्वतंत्र विचार आहे हे नेहरूंसाठी अनपेक्षित होते, त्यांना खरं तर आश्चर्यच वाटले होते . पण तरी त्यांनी राठोड यांना त्यांचे मत मोकळेपणाने मांडायची परवानगी दिली.

“सर, असं बघा की देशाचे नेतृत्व करण्यासाठीसुद्धा पुरेसा अनुभव नाही आहे आपल्याकडे. तर मग भारताचे पहिले पंतप्रधान म्हणूनही आपण एखाद्या ब्रिटिश माणसाची नेमणूक का करू नये ? —–

आणि सभागृहात एकदम निस्तब्ध शांतता पसरली …. टाचणी पडली असती तर तो आवाजही अगदी स्पष्ट ऐकू आला असतं

.. पंडित नेहरूंनी चमकून राठोड यांचेकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिले..  “ तुम्ही तयार आहात का भारताचे पहिले ‘ जनरल ऑफ आर्मी स्टाफ ?’ व्हायला ? “

हा प्रस्ताव नम्रपणे नाकारत राठोड म्हणाले, “ नाही सर, मी नाही. पण आपल्याकडे एक अतिशय बुद्धिमान असे एक लष्करी अधिकारी आहेत .. माझे वरिष्ठ.. जनरल करिअप्पा. आणि ते या पोस्टसाठी आपल्यापैकी सर्वात जास्त अनुभवी आणि सर्वात जास्त योग्य असे आहेत.”

राठोड यांचा प्रस्ताव ऐकून बैठकीत पुन्हा एकदा एक निस्तब्ध शांतता पसरली. कर्नल राठोड यांच्या सूचनेने बैठकीचा नूरच बदलला. पं. नेहरू आणि उपस्थित इतर सर्वांनीच  एकमताने जनरल करिअप्पा यांच्या नावाला संमती दिली.  

अशा रीतीने अत्यंत बुद्धिमान असणारे जनरल करिअप्पा हे भारताचे पहिले ‘जनरल ऑफ आर्मी स्टाफ‘ म्हणून नेमले गेले. आणि  भारतीय सैन्याचे सर्वात पहिले ‘लेफ्टनंट जनरल ऑफ आर्मी स्टाफ’ म्हणून नथू सिंह राठोड यांची नेमणूक झाली.

(लेफ्टनंट जनरल निरंजन मलिक, PVSM (Retd) यांच्या एका इंग्लिश लेखावरून)

अनुवाद आणि प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीराम प्रसवतांना – ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

सुमित्रेचे न परतलेले दोन राम ! – भाग – 2 ☆ श्री संभाजी बबन गायके 

पुरूष असूनही तो एके दिवशी दोन जीवांचा झाला. पण त्याचे गर्भाशय पोटाऐवजी हृदयात वसलं होतं. आई बालकाला जन्म देण्यापूर्वी पोटातल्या गर्भात वागवते. याचं मात्र बाळ त्याच्या बुद्धीत आकार घेत होतं आणि हृदयात नांदत होतं….जन्माची प्रतिक्षा करीत! त्याच्या हृदयगर्भात बालक श्रीराम वाढत होते….आणि या बालकाचं त्याच्या गर्भातलं वय होतं साधारण पाच-सहा वर्षांचं!   

मानवाला नऊ महिने आणि नऊ दिवसांचा प्रतिक्षा काल ठरवून दिला आहे निसर्गानं. पोटी देव जन्माला यायचा म्हणून दैवानं या मनुष्याला प्रतिक्षा कालावधीत मोठी सवलत दिली. 

ग.दि.माडगूळकर गीत रामायण लिहित असताना प्रत्यक्ष श्रीरामजन्माचं गाणं लिहिण्याचा प्रसंग आला. त्यांनी खूप गाणी लिहिली पण त्यातलं त्यांना एकही पसंत होईना. गाणं मनासारखं उतरलं नाही तर ते गाणं लिहिलेला कागद चुरगाळून तो मेजाशेजारी टाकून देण्याची त्यांना सवय होती. त्यांच्या पत्नी विद्या ताई हे सर्व पहात होत्या. शब्दप्रभू गदिमांच्या बाबतीत एकदा गीत लिहिलं की ते पुन्हा बदलण्याचा विषय फारसा उपस्थित होत नसे. एकदा तर त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या गडबडीत असताना, त्या ऐन लग्नाच्या दिवशी संगीतकाराला एक अत्यंत लोकप्रिय गीत लिहून दिल्याचं वाचनात आलं…लळा जिव्हाळा शब्दचि खोटे…मासा माशा खाई…कुणी कुणाचे नाही! स्वत:च्या मुलीच्या लग्नाच्या मंगलदिनीसुद्धा मानवी जीवनावर ठसठशीत भाष्य करणे गदिमांसारख्यांनाच शक्य होते! तर….रामजन्माच्या पसंतीस न उतरलेल्या गाण्यांच्या कागदांचा एवढा मोठा ढीग पाहून त्यांच्या पत्नी विद्याताई आश्चर्यचकित झाल्या…त्यावर गदिमा या अर्थाचं काहीसे म्हणाले होते….जगाचा निर्माता,प्रभु श्रीराम जन्माला यायचाय…कुणी सामान्य माणूस नव्हे!

हा माणूसही गदिमांसारखाच म्हणावा. यालाही श्रीरामच जन्माला आणायचे होते…मात्र ते कागदावर नव्हे तर पाषाणातून. ज्यादिवशी त्याला ही गोड बातमी कळाली तेंव्हापासून तो कुणाचाही उरला नाही. एखाद्या तपोनिष्ठ ऋषीसारखी त्याच्या मनाची अवस्था झाली…जागृती..स्वप्नी राममुर्ती….ऋषी-मुनी तरी कुठं वेगळं काही करतात…सतत देवाच्या नामाचा जपच! याला मात्र नाम स्मरण करण्याची आवश्यकता नव्हती. त्याची बोटं राम राम म्हणत पाषाणावर चालत होती….त्याच्या हातातल्या छिन्नीच्या रूपात. त्याच्या घराण्याची मूर्ती निर्माणाची परंपरा थोडीथोडकी नव्हे तर अगदी तीनशे वर्षांची. देव त्यांच्या रक्तातच भिनला म्हणावा. दगडांतून निर्माण होणा-या आणि अमरत्वाचं वरदान लाभलेल्या मुर्तीच त्यांचे उदरभरणाचे स्रोत झाले होते. त्यातून मिळणारा सात्विक आनंद तर त्यांना न मागताही मिळत होता. हा मूर्तिकार अगदी तरूण वयातला. त्याचे वडीलच त्याचे गुरू. त्यांच्या हाताखाली शिकत शिकत त्याने छिन्नी हातोड्याचा घाव घालून दगडाचा देव करण्याची हातोटी साधली होती. 

आपल्याला बालकरूपातील श्रीराम घडवायचे आहेत हे समजल्यापासून त्याची तहानभूक हरपली. आई जसं पोटातल्या गर्भासाठी अन्न घेते, श्वास घेते, निद्रा घेते आणि डोहाळे मिरवते तशीच याची गत. तीन शतकांच्या पिढीजात अनुभवाच्या जोरावर त्याने जगातला सर्वोत्तम पाषाण निवडला. 

पहाटे अगदी तनमनाने शुचिर्भूत होऊन राऊळात दाखल व्हायचं….आणि त्या पाषाणाकडे पहात बसायचं काहीवेळ. त्यातील मूर्तीला वंदन करायचं मनोमन. आणि मग देव सांगेल तशी हातोडी चालवायची…छिन्नीलाही काळजी होती त्या पाषाणातील गर्भाची…जराही धक्का लागता कामा नये. यातून प्रकट होणारी मूर्ती काही सामान्य नव्हती…आणि बिघडली…पुन्हा केली..असंही करून भागणार नव्हतं. आरंभ करायला लागतो तो मसत्कापासून. जावळ काढून झाल्यानंतरच्या चार-पाच वर्षांत विपुलतेने उगवलेले काळेभोर,कुरळे केश. कपाळावर रूळत वा-यावर मंद उडत असणारे जीवतंतुच जणू. केसालाही धक्का न लागू देणे याचा हा ही एक अर्थ व्हावा,अशी परिस्थिती. पण गर्भातलं बालकही या आईला पूर्ण सहकार्य करीत होतं…कारण त्यालाही घाईच होती तशी….पाचशे वर्षापासूनची प्रतिक्षा होती! 

काहीवेळा तर हे बालक मुर्तिकाराच्या छिन्नी-हातोड्यात येऊन बसायचं….आणि स्वत:लाच घडवू लागायचं! देव जग घडवतो…देव स्वत:ला घडवण्यात कशी बरे कुचराई करेल? 

मुर्तीत संपूर्ण कोमल,निर्व्याज्य बाल्य तंतोतंत उतरावे, यासाठी त्याने या वयोगटातील बालकांची हजारो छायाचित्रे न्याहाळली. त्यातील भावमुद्रा, भावछ्टा डोळ्यांत साठवून ठेवल्या आणि आपल्या मुर्तीत त्या कशा परावर्तीत करता येतील याची मनात शेकडो वेळा उजळण्या केल्या. कागदावर ते भाव रेखाटण्याचा नेम सुरू केला. मनाचं समाधान झालं तरच छिन्नी चालवायची अन्यथा नाही. 

मुर्तिकारालाही स्वत:ची मुलं होती. दीड-दोन वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची कन्या. ही आई आपल्या ह्या लेकीला त्याने पाषाणात कोरलेल्या बाळाच्या मुर्तीचा फोटो दाखवायची…आणि विचारायची….हे मूल किती वर्षांचं वाटतंय? लहान वाटतंय की मोठ्या मुलासारखं दिसतंय? जो पर्यंत मुलगी म्हणाली नाही की ..हो हे मूल खरंच चार-पाच वर्षांचं दिसतंय…तो पर्यंत मुर्तिकारानं काम सुरू ठेवलं….आणि पूर्ण होकार मिळताच त्याच्या छिन्नी हातोड्याचा वेग वाढला! 

या कामात त्याला अनेकांनी साहाय्य केलं. हो…गर्भारशीची काळजी घेतातच की घरातले. पण आता त्याचं घर तर खूप मोठं होतं. अयोध्या या घराचं नाव. काम सुरू असताना काही माकडे आतमध्ये घुसायची…आणि तयार होत असलेल्या मूर्तीकडे काही क्षण पाहून निघून जायची…कुठेही धक्का न लागू देता. त्यांचा उपद्र्व होईल या शक्यतेने त्यांनी मूर्ती घडवण्याच्या कक्षाची दारे पक्की बंद करून घेतली तर ही माकडे त्यांची पूर्ण ताकद लावून ते अडथळे दूर सारायची! लंका जाळणा-या हनुमानाचे वंशज ते….त्यांना कोण अडवणार? त्यांना कुणी तरी पाठवत असावं…हे निश्चित…अन्यथा ज्या जागी केवळ पाषाणाचे तुकडेच पडलेले आहेत..अशा जागी त्यांना येऊन काय लाभ होणार होता?

प्रसुतीकळा सुरू झाल्या! आणि शुभ घडीला शुभ मुहूर्ती या पाच वर्षीय बालकाने हृदयगर्भातून बहेर डोकावले…आणि प्रकट झाले स्वयं बाल श्रीराम! केवढंसं असतं ना अर्भक….किती वेगळं दिसत असतं. आईला जसं आहे तसं प्राणापलीकडं आवडत असतं…कुणी काहीही म्हणो. मात्र हे बालक पाहणा-याच्या मनात कोणताही किंतु आला नाही. श्रीकृष्ण नावाच्या बालकाला पाहून जसं गोकुळच्या नारींना वाटलं होतं…तसंच या बाळाला पाहून वाटलं सर्वांना….रामलल्ला पसंद हैं…प्रसन्न हैं! बाळ-बाळंतीण सुखरूप..त्यातील आईतर सर्वोपरी सुखी. सा-या भारतवर्षांचं लक्ष होतं या प्रसुतीकडे…काळजाच्या वंशाचा दिवा पुन्हा प्रज्वलीत व्हायचा होता मुर्तीरूपात…एवढं लक्ष तर असणार होतंच….याचा ताण प्रत्यक्ष आईवर किती असतो…हे फक्त बाळाला जन्म दिलेल्या माताच सांगू शकतील. बाकीचे फक्त दे कळ आणि हो मोकळी! असं म्हणू शकतात फार तर! 

ही आई आता शांत…क्लांत! कर्तव्यपूर्ती करून घेतली श्रीरामांनी. हे भाग्य म्हणजे गेल्या कित्येक पिढ्यांच्या आशीर्वादांचं फलित. कोट्यवधी डोळे ही मुर्ती पाहतील…आणि शुभाशिर्वाद मिळवतील….माझ्या हातून घडलेली ही मूर्ती…आता माझी एकट्याची राहिलेली नाही! 

या बालकाला नटवण्याची,सजवण्याची,अलंकृत करण्याची जबाबदारी आता इतर सर्वांनी घेतली…अनेक लोक होते…वस्त्रकारागीर,सुवर्णकारागीर…किती तरी लोक! देवाचं काम म्हणून अहोरात्र झटत होते…हे काम शतकानुशतकं टिकणारं आहे…ही त्यांची भावना! आपण या जगातून निघून जाऊ…हे काम राहील! 

मुर्ती घडवणारी आई हे कौतुक पहात होती…मग तिच्या लक्षात आलं….बालक आपलं रूप क्षणाक्षणाला पालटते आहे…अधिकाधिक गोजिरे दिसते आहे. संपूर्ण साजश्रुंगार झाला आणि लक्षात तिच्या लक्षात आलं…..हे मी घडवलेलं बालक नाही….मी तर फक्त पाषाणाला आकार देत होते..आता या पाषाणात चैतन्याचा प्रवेश झाला आहे! नेत्रांतले,गालांवरचे,हनुवटीवरचे भाव मी साकारलेच नव्हते…ते आता प्रत्यक्ष दिसू लागलेत…..ही माझी कला नाही…ही त्या प्रभुची किमया आहे…स्वत:लाच नटवण्याची. त्याची लीला अगाध…मी निमित्तमात्र! यशोदेसारखी! …देवकीला तरी ठाऊक होतं की अवतार जन्माला येणार आहे…पण यशोदा अनभिज्ञ होती? तिला पुत्रप्राप्तीचा आनंद पुरेसा होता! कृष्णाची आई ही उपाधीच तिचा जन्म सार्थक करणारी होती. 

जसे अवतार जन्माला येतात, तसे कलाकारही जन्माला येतात. अवतारांच्या मुर्ती साकारण्याचं भाग्य नशिबात असणारे कलाकारही जन्माला यावे लागतात…कलाकार योगी असावे लागतात…यांच्यातर कर्मातही योग आणि नावातही योग….अरूण योगिराज या कलाकाराचे नाव. यांनी रामलल्लांच्या मुर्तीचं आव्हान पेललं! सात महिने आपल्या हृदयात श्रीरामांना अक्षरश: एखाद्या गर्भार स्त्रीसारखे निगुतीने सांभाळले आणि कोट्यवधी श्रीरामभक्तांच्या ओटीत घातलं ! 

अरूण योगिराजजी…तुम्हांला सामान्यांच्या आशीर्वादांची आता खरोखरीच गरज नाही…..पण तुम्ही आम्हां सामान्यांचे धन्यवाद मात्र अवश्य स्विकारा….या निमित्ताने आमचेही नमस्कार तुम्ही साकारलेल्या रामलल्लांच्या चरणी पोहोचतील !     

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हिरव्या हास्याचा कोलाज आणि गौतम राजर्षी – क्रमश – भाग २ ☆ सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ हिरव्या हास्याचा कोलाज आणि गौतम राजर्षी – क्रमश – भाग २ ☆ सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात आपण बघितले,

‘हरी है ये जमीं कि हम तो इश्क बोते है

हमीं से हँसी सारी, हमीं पलके भिगोते है

धरा सजती मुहब्बत से, गगन सजता मुहब्बत से

मुहब्बत से ही , खुशबू, फूल, सूरज, चाँद होते है… ) आता इथून पुढे — 

कथेच्या ओघात दोन बोचरी सत्ये लेखकाने प्रगट केली आहेत. एनकाऊंटरमधे शहीद झालेल्या आपल्या परममित्राची आठवण काढता काढता, मोहितच्या मनात येतं, जोर्यंत तुम्ही शहीद होत नाही, तोपर्यंत तुम्ही बहादूर नसता. ज्या देशासाठी तुम्ही जीव गमावला, त्या देशवासीयांना क्षणभर थांबून तुमच्यासाठी दु:ख करायला वेळ नसतो. दुसरं सत्य म्हणजे,  आपण बहादूर आहात की नाही, हे दाखवण्यासाठी, आपण कुठे लढलात, ती जागा महत्वाची. दूर चीड – देवदारच्या जंगलात झालेलं राहूलचं युद्ध, दिल्ली-मुंबईच्या परिसरात झालं असतं, तर तो आत्तापर्यंत हीरो झाला असता. आता मात्र न्यूज चॅनेलच्या बातम्यांच्या खाली धावणार्‍या पट्टीपुरतं त्याचं हिरोइझम मर्यादित झालय.

‘इक तो सजन मेरे पास नही रे’ ही संग्रहातील अतिशय सुरेख, भावुक, हळवी कथा. कथेच्या सुरूवातीला एका दृश्याचं वर्णन येतं. झेलमच्या साथीने जाणारा रस्ता जिथे तिची साथ सोडतो, तिथे चिनारचा एक पुरातन वृक्ष आहे. गावाची वस्ती जिथे संपते, तिथे हा वृक्ष आहे. नियमित पेट्रोलिंगसाठी जाणार्‍या विकास पाण्डेयला नेहमी वाटतं, तिथे उभ्या असलेल्या देखण्या, चित्ताकर्षक तरुणीला त्याला काही तरी सांगायचय आणि ते खरंच असतं. एक दिवस आपली जीप थांबवून तो तिची चौकशी करतो. ती सुंदर तर आहेच. पण तिचे डोळे त्याला दल आणि वुलर सरोवराचा तळ गाठणारे वाटतात आणि तिच्या नाजूक देहातून उमटणारा आवाज अतिशय गंभीर वाटतो. वेगळीच ओढ लावणारा. व्याकूळ करणारा. त्याला पाकिस्तानी गायिका रेशमाची आठवण होते. विशेषत: तिचं गाणं,  ‘चार दिना दा प्यार ओ रब्बा बडी लंबी जुदाई.’ तिच्या डोळ्यातली तळ गाठणारी दल आणि वुलरची सरोवरं, तर कधी त्यात उसळलेलं झेलमच तूफान आणि तिचा रेशमासारखा व्याकूळ करणारा आवाज आणि रेशमाचं ते गाणं.. लंबी जुदाई… याची गुंफण कथेमधून अनेक वेळा इतकी मोहकपणे आणि मार्मिकपणे झाली आहे, की सगळी कथा प्रत्यक्ष वाचायलाच हवी.  

ती तरुणी रेहाना. तिचा प्रियकर सुहैल गेल्या महिन्यापासून गायब आहे. त्याचा ठावठिकाणा शोधण्याची विनंती ती मेजर विकास पाण्डेयला करते. तो तिला त्याचा शोध घेण्याचं आश्वासन देतो.

सुहैलचा शोध घेतल्यावर असं लक्षात येतं की तो सरहद्दीपलीकडे जिहादी कॅम्पमधे दहशतवादाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेलाय. सुलतान नावाचा मेंढपाळ पाच हजार रुपये आणि दोन पोती आटा, डाळ याच्या मोबदल्यात, सुहैलशी मोबाईलवर बोलणं करून देण्याचा मान्य करतो. दिल्या शाब्दाला आणि दिल्या पैशाला, आटा-डाळीला तो जागतो. विकासाचं सुहैलशी बोलणं होतं. तो जन्नत म्हणून तिकडे गेलेला असतो. प्रत्यक्षात जहन्नूमचा अनुभव घेत असतो. आपल्याला यातून बाहेर काढण्याची तो विनंती करतो. विकास त्याला ‘सरहद्द पार करून या बाजूला ये, पुढचं सगळं मी बघेन’, असं सांगतो. एका जिहादी गटाबरोबर तो इकडे यायचं ठरवतो पण…

एके दिवशी विकासच्या चौकीवर, सरहद्दीजवळ एनकाऊंटर झाल्याची बातमी येते. सरहद्द पार करून येणार्‍या एका जिहादी दहशतवादी गटाला, आधीपासूनच दबा धरून बसलेल्या सैन्याच्या तुकडीने मारून टाकल्याची ती बातमी असते. सुलताना नावाच्या कुणा मेंढपाळाने पन्नास हजार रुपयांच्या बदल्यात, ही खबर दिलेली असते. मेलेल्यांच्या यादीत सुहैलचंही नाव असतं.

त्या रात्री सायलेंट मोडवर असलेल्या विकासच्या मोबाईलवर रेहानाचा नंबर वारंवार फ्लॅश होत होता आणि त्याच्या लॅपटॉपवर रेशमा गात होती…

‘इक तो साजण मेरे पास नाही रे

दूजे मीलन दी कोई आस नही रे

‘गर्ल फ्रेंड’ ही कथा दहशतवाद्यांशी  प्रत्यक्ष झालेल्या चकमकीचं वर्णन करते. एका मोठ्या घरात दोन अफगाण दहशतवादी लपून बसल्याची माहिती कळते. त्यांचा सफाया करण्याचा प्लॅन ठरतो. त्या प्रमाणे अंमलबजावणी होते, पण अनपेक्षितपणे चकमकीला वेगळं वळण लागतं. मेजर प्रत्यूशचा बड्डी तळघर झाकणारी पट्टी उचकटणार असतो आणि प्रत्यूश आत ग्रेनेड टाकणार असतो. मेजर सिद्धार्थ व त्याचा बड्डी त्यांना फायरिंग कव्हर देणार असतात. सिद्धार्थ म्हणतो, ‘सर, तुम्ही अनेक यशस्वी ऑपरेशन्स पार पाडलीत, यावेळी मला ग्रेनेड आत टाकू द्या. प्रत्यूश मान्य करतो आणि दोघे आपआपल्या जागा बदलतात आणि अनपेक्षितपणे अफगाणीच अंदाधुंद गोळीबार करत, पट्टी उचकटून बाहेर येतात. या गोळीबारात सिद्धार्थ आणि त्याचा बड्डी धराशायी होतात. आपल्यासाठी बाहेर पडलेली गोळी सिद्धार्थचा जीव घेणारी ठरली, या विचाराने प्रत्यूश कासावीस होतो. त्याला सतत वाटत रहातं, आपण सिद्धार्थचं म्हणणं मान्यच केलं नसतं तर…

इतक्या गंभीर कथेचा शेवट मात्र नर्म विनोदाने होतो. इथे नर्स शकुंतलाला तो सांगतो, ‘मृत्यू समोर दिसत असताना मी माझ्या गर्ल फ्रेंडचे नंबर मोबाईलवरून डीलीट करत होतो कारण मी मेल्यानंतर माझ्या सामानासकट मोबाईल माझ्या बायकोकडे जाईल आणि मी तर तिला सांगितलं होतं की आता मी कुठल्याही गर्ल फ्रेंडच्या संपर्कात नाही. तिला हे नंबर बघून काय वाटलं असतं?’

असाच नर्म विनोदी शेवट ‘हॅशटॅग’ कथेचा आहे. ही समर प्रताप सिंह या तरुणाच्या एकतर्फी विफल प्रेमाची कहाणी. या कथेत प्रामुख्याने मिल्ट्री कॅंडिडेट्सना जे कठोर प्रशिक्षण दिलं जातं, त्याची माहिती येते. ही माहिती, समर आपल्या बहिणीला मुनमूनला आपल्या दिनचर्येची माहिती देतो, त्यावरून कळते.

लॅपटॉपवरून जेव्हा त्याला कळतं त्याची प्रेयसी सगुना हिचा साखरपुडा आदित्यशी झाला आहे, तेव्हा तो कासावीस होतो. सगुनाशी प्रत्यक्ष बोललं, तर ती आपलं प्रेम मान्य करेल अशीही त्याला भाबडी आशा आहे. यावेळी त्याच्या कंपनीतली सगळी मुले एकजुटीने कसं कारस्थान रचतात आणि दोन दिवसांसाठी वरिष्ठांच्या नकळत त्याला सगुनाला भेटायला कसं पाठवतात, याचं मोठं खुसखुशीत वर्णन कथेत येतं. हे सारं प्रत्यक्षच वाचायला हवं. तो रात्री तिला  भेटतो. ती अर्थातच त्याचं बोलणं धुडकावून लावते. मग तो त्याचा रहात नाही. फळं कापायची सूरी तो तिच्या पोटात खुपसतो आणि आपल्या कॅम्पसवर निघून येतो.

नंतर त्यांची पहिली टर्म संपते. सगुना सुखरूप असल्याचे त्याला कळते. त्याला आनंद होतो. सगुणा-आदित्यचं लग्नं होतं, हे कळल्याने त्याला दु:ख होतं. घरी आल्यावर सगुनाला एकदा तरी बघावं, म्हणून तो तिच्या घराजवळ रेंगाळतो. त्याला एकदा रिक्षात ती दिसते. त्याला पहाताच ती आदित्यला अधीकच खेटून बसते. त्यावेळी तो दोन प्रतिज्ञा करतो. एक म्हणजे तो आजन्म अविवाहित राहील आणि कधी तरी आपल्या विरह-व्यथेवर एक कथा लिहील, पण त्यात सगुना आदित्यला खेटून बसणार नाही, तर त्याच्यापासून दूर सरकून बसेल. वरील दोन्ही कथांमधून कठोर कथानायकांच्या निरागसतेचं मोठं मनोज्ञ दर्शन घडतं.            

‘चिलब्लेन्स’ म्हणजे हिमदंश. या कथेत ‘दर्ददपुरा’ या कुपवाड शहरापासून सुमारे ७० की.मीटर अंतरावर असणार्‍या खेड्याची आणि त्याच्या ‘दर्द’ची म्हणजे दु:खांची कहाणी येते. गाव इतकं सुंदर, जसं काही भोवतालच्या पहाडांनी आपले बाहू पसरून स्वर्गालाच कवेत घेतलय. पण गावाची दु:खे अनेक. वीज नाही. डॉक्टर नाही. उपचारासाठी लोकांना थेट कुपवाडाला जावं लागतं. मेजर नीलाभचा फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड असलेल्या माजीदचं हे गाव. आपल्या दोन सुंदर मुलींना, शायर नवर्‍याला, भरल्या संसाराला सोडून माजीदची बायको एका जिहादीबरोबर गेलीय. गावात घरटी एक तरी जिहादी. त्यामुळे तरुण मुले बरीचशी गारद झालेली. उपवर मुलींसाठी मुलेच नाहीत. हे दु:ख तर काश्मीर घाटीतल्या अनेक ठिकाणांचे.

माजीदच्या वडलांच्या डाव्या हाताला चार बोटे नाहीत. त्याचे कारण नीलाभने विचारले असता, त्याला कळते, हिमदंशामुळे बोटात होणार्‍या वेदानांपासून सुटका करून घेण्यासाठी त्याने स्वत:च केलेला हा उपचार आहे. बोटंच तोडण्याचा. नीलाभला वाटतं, सगळा ‘दर्ददपुरा’ आपल्याकडे बघून रडतो आहे. तो तिथून परत येताना ठरवतो, ‘हेडक्वार्टरकडे प्रस्ताव द्यायचा, की कंपनीच्या. डॉक्टरांनी आठवड्यातून दोन वेळा ‘दर्ददपुरा’ गावाला व्हिजीट द्यावी आणि त्याला वाटतं ‘दर्ददपुरा’ आता आपल्याकडे बघून हसतोय.

‘द बार इज क्लोज्ड ऑन च्युजडे. ही एक अगदी वेगळ्या प्रकारची कथा. रहस्यमय अशी ही भूतकथा तीन तुकड्यातून आपल्यापुढे येते आणि शेवट तर भन्नाटच. प्रत्यक्ष वाचायलाच हवा असा.

दुसरी शहादत, हैडलाईन, हीरो, आय लव्ह यू फ्लाय बॉय, अशा एकूण 21 कथा यात आहेत. अनेक विषयांवरच्या या सगळ्याच कथा वेधक आहेत. लेखकाची चित्रमय शैली, स्थल, व्यक्ती, घटना-प्रसंग यांचा साक्षात् अनुभव देणारी आहे. याला बिलगून आलेले काव्यात्मकतेचे तरल अस्तर, कथांना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं. ‘गर्ल फ्रेंड’, ‘हॅशटॅग’, ‘एक तो सजन …’ सारख्या काही कथा वाचताना वाटत राहातं, यावर उत्तम दर्जेदार चित्रपट होऊ शकतील. यातील कथांबद्दल किती आणि काय काय लिहावं? प्रत्येकाने प्रत्यक्षच वाचायला आणि अनुभवायला हवा, हिरव्या हास्याचा कोलाज.

– समाप्त – 

© सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print