☆ ब्रह्मघोटाळा… कवी : आचार्य अत्रे ☆ माहिती संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆
“ब्रह्मघोटाळा” या सिनेमासाठी १९४९ साली आचार्य अत्रे यांनी एका हास्यस्फोटक अंगाईगीताची रचना केली होती. ते गाणं तुम्ही कधी वाचलं किंवा ऐकलं आहे कां? नसल्यास वाचा आणि ऐका.
☘️ निज रे निज बाळा… – गीतकार – आचार्य अत्रे ☘️
संगीत : दादा चांदेकर
गायक : वसंत एरिक
☘️
निज रे निज बाळा, मिट डोळा,
सांगु तुला किती वेळा
निज रे निज बाळा
झोके देऊनि रे, बघ आला
हाताला मम गोळा
वाजवु कां आता, हाडांचा
माझ्या घुंगुरवाळा
वाजुनि तोंड असे, कां रडसी
अक्राळा विक्राळा
तुझिया रडण्याने, बघ झाली
आळी सारी गोळा
रडसि कशास बरे, मिळे आता
स्वातंत्र्यहि देशाला
काही उणे नसता, होशिल तू
मंत्री बडा कळिकाळा
लाल संकटाचे, रशियाचे
वाटे का भय तुजला
देऊ पाठिंबा, आपण रे
नेहरू सरकाराला
काळ्या बाजारी, बागुल तो
काळा काळा बसला
थांबव हा चाळा, ना तर मी
घेऊन येईन त्याला
तुझिया रडण्याचे, हे गाणे
नेऊ का यूनोला
अमेरिकेमधुनी, येऊ कां
घेऊन ॲटम गोळा
😀
☆
कवी : आचार्य अत्रे
माहिती संग्राहक : श्री सुहास सोहोनी
मो ९४०३०९८११०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “जगणे, अनुभवणे, आणि विचार करणे…” – लेखक : श्री यशवंत सुमंत ☆ श्री जगदीश काबरे ☆
जगण्याशिवाय अनुभवांना सामोरे जाता येत नाही. अनुभवाशिवाय विचार संभवत नाही. आणि विचारांशिवाय जगणे उमगत नाही. जगणे अनुभवणे आणि विचार हे असे अन्योन्याश्रयी आहेत. सोयीसाठी आपण कधी कधी त्यांची फारकत करतो. पण या फारकतीचा अतिरेक झाला की ‘विचारांपेक्षा अनुभव श्रेष्ठ’ किंवा अनुभव व्यक्तिसापेक्ष म्हणून मर्यादित तर विचार सार्वत्रिक म्हणून व्यापक यांसारख्या दर्पोक्ती ऐकू येऊ लागतात. अनुभव व विचार यांच्यातील सहकार्य धूसर होत जाऊन अनुभववादी विरुद्ध विचारवादी असे द्वंद्व सुरू होते. या द्वंद्वयुद्धाची नशा योद्ध्यांना धुंद बनवते.
सामान्य माणूस मात्र या द्वंद्वाला काही काळानंतर कंटाळतो. या कंटाळण्यातून त्याचे तीन प्रतिसाद संभवतात.
1) तो विचारांबाबत ‘सिनिक’ – तुच्छतावादी बनतो
2) तो आपले व्यक्तिगत अनुभवच निव्वळ कवटाळून ते सार्वत्रिक सत्य म्हणून सांगू लागतो व स्वतः बंदिस्त होतो
3) तो स्वतःचे अनुभव नाकारता नाकारता स्वतःलाही नाकारू लागतो. हे व्यक्तित्वाचे खच्चीकरण असते.
आपण बंदिस्त होण्याचे कारण नाही. तुच्छतावादीही असता कामा नये आणि स्वतः च्या अनुभवांचा अकारण धिक्कारही करता कामा नये. स्वतःलाच पुसून टाकण्याइतके किंवा नाकारण्याइतके आपले आणि कोणाचेही आयुष्य कवडीमोलाचे नसते. दुःख, अपमान, संकट, जीवन उद्ध्वस्त करणारे अनुभव प्रत्येकाच्या वाट्याला कमीअधिक प्रमाणात येतातच. त्यांना चिवटपणे सामोरे जायला हवे. हे सामोरे जाण्याचे बळ शेवटी विचारच आपल्याला देतात. कारण विचार हा आपण आपल्याशी केलेला तर्कशुद्ध आणि विश्वसनीय संवाद असतो. इतर विचारांची सोबत व मार्गदर्शन हा संवाद अधिक प्रगल्भ बनवते. म्हणूनच माणसाला विचारदर्शनाची गरज लागते.
एकदा आपण आपली ही गरज ओळखली की मग आपल्याला भेडसाविणारे अनेक स्वतः संबंधीचे व समाजासंबंधीचे प्रश्न समजू लागतात. त्यांच्या नजरेला नजर देण्याची ताकद आपल्याला लाभते. विचारांचा व विचारदर्शनांचा आदरपूर्वक स्वीकार वा त्यांना विधायक नकार देण्याची ऋजुता आपल्यापाशी येते. ही ऋजुता आपल्याला स्वतःच्या व इतरांच्याही जीवनाचा आदर करायला शिकवते. या आदरभावातून आपण विनम्र होतो. ही विनम्रता आपल्याला स्वागतशील बनवते.
स्त्रीवादी काय किंवा अन्य आधुनिक विचारदर्शनांची ओळख का करून घ्यायची, तर आपल्या जगण्याचे संदर्भ आपल्या लक्षात यावेत म्हणून. विचारांचे जगण्याशी असलेले नाते असते ते हेच. हे नाते जे नाकारतात ते एका परीने जीवनच नाकारित असतात. वाढत्या आत्मनिवेदनाच्या व आत्याविष्काराच्या या जमान्यात वास्तविक विचारांचे श्रद्धेने उत्तरोत्तर स्वागत व्हायला हवे. त्यांचा उत्सव साजरा व्हायला हवा. पण असे न होता विचारांबाबतची तुच्छता का वाढावी, विचारांच्या अंताची भाषा का बोलली जावी, माहितीच्या स्फोटाने कर्णबधिरता व संवेदनशून्यता का यावी हे प्रश्न विचारल्याशिवाय आधुनिक विचारदर्शनांशी संवाद होणार नाही.
लेखक : श्री यशवंत सुमंत
प्रस्तुती : श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ही कहाणी आहे मागील पिढीतील एक अत्यंत अभ्यासु व्यक्तीमत्व म्हणजे सुमती देवस्थळे यांची. जन्म २७ डिसेंबर १९२७ चा. शालेय शिक्षण पुण्यात. शालेय शिक्षण झाल्यावर त्यांनी एस. पी कॉलेजला बी. ए. ला अँडमिशन घेतली. पहिल्या वर्षाचा रिजल्ट लागला आणि सुमती परांडे हे नाव कॉलेजमध्ये सर्वतोमुखी झाले. कॉलेज मध्ये असताना त्यांनी नाटकात कामे केली आणि अचानकच त्यांचे लग्न ठरले.
सोलापुरच्या देवस्थळे यांचा हा मुलगा. मुंबईत रेल्वेत होता. कायमस्वरूपी नोकरी. लग्न जमण्यासाठी एवढे पुरेसे होते.
पण..
जोडा शोभणारा नव्हता हेही तितकेच खरे. देवस्थळे तसे निरागस.. पापभिरू.. आणि थोडासा न्युनगंड देखील. जोडीला शारिरीक दुर्बलता (असावी).
१९४७-४८ चा काळ. इंटरपर्यंत शिकलेली २० वर्षाची ब्राह्मण मुलगी. सर्वसामान्य पणे परीस्थितीला शरण गेली असती. संसारात रमुन गेली असती. पण इथेच सुमतीबाईंचा वेगळापणा जाणवतो.
त्यांनी नोकरी करायचं ठरवलं. जिथे रहात त्याच आवारात एक शाळा होती. समाजातील निम्न स्तरावरील मुलांची. त्या मुलांना त्यांनी शिकवायला सुरुवात केली.
नोकरी सुरू झाली आणि त्यांना पुढची पायरी खुणावू लागली. आहे त्यात समाधान मानणे हा त्यांचा स्वभावच नव्हता. नवर्याला मिळणाऱ्या पैशात निगुतीने संसार करणे हा त्या काळातील रिवाज त्यांनी झुगारला. आपण पदवीधर व्हायला हवे असे त्यांना वाटु लागले. आणि त्यांनी रुईया कॉलेजला प्रवेश घेतला.
दोन वर्षे मन लावून अभ्यास केला आणि मराठी, संस्कृत हे विषय घेऊन त्या विद्यापीठात पहिल्या आल्या.
मग पुढची पायरी.. एम. ए. तिथेही दैदिप्यमान यश.
छोट्या छोट्या विषयांवर लेखन करताना ६०-६१ च्या दरम्यान त्या बी. एड. झाल्या. आणि साधना कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये प्राध्यापिका, शिक्षण तज्ञ म्हणून रुजु झाल्या.
आता घरी सतत विद्यार्थ्यांचा राबता. त्यांना मार्गदर्शन.. कॉलेजची नाटके बसवणं हेही सुरू. सुटीच्या दिवशी तासनतास वाचन.. लेखन.
प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत त्यांनी स्वतःची गुणवत्ता सिध्द केली. त्यांचं व्यक्तिमत्त्व आता झळाळून उठलं. मध्यम उंची.. सुदृढ बांधा.. करारी चेहरा. जे करायचं ते पुर्णत्वानंच.
एकिकडे स्फुट लेखन करताना त्यांनी वैश्विक प्रतिभावंतांची चरित्र लिहिण्यास सुरुवात केली. अल्बर्ट श्वाईटझर, मँक्झिम गॉर्की यांची त्यांनी लिहिलेली चरित्रे गाजली. टॉलस्टॉयचं ‘वॉर अँड पीस’ वाचलं आणि त्या झपाटुन गेल्या. त्याची स्वभाव वैशिष्ट्ये.. तरल संवेदनक्षमता.. आणि शारीरिक बलदंडताही यामुळे त्या आकर्षिल्या गेल्या.
त्यांना आपल्या गुणांची जाणीव होती. बुद्धिमत्तेचं भान होतं. त्यांनी टॉलस्टॉयचं चरित्र लिहिण्यास घेतलं. खरंतर आताशा त्यांना तब्येत साथ देत नव्हती. वारंवार आजारपणाला तोंड देत होत्या त्या. मुलीनं एका दलिताशी लग्न केलंय हा सल मनाला होताच. हे पुस्तक लिहीताना कदाचित त्यांना जाणवलं असणार.. हे आपलं शेवटचं पुस्तक.
स्वाभाविकच आयुष्यभर कमावलेलं भाषावैभव, संवेदना, मानसिक ऊर्जा सगळं सगळं त्यांनी वापरलं.
कौटुंबिक पातळीवर अपयश आलेलं असताना त्यांनी एक गोष्ट ठरवली होती.. आपलं आयुष्य सर्वसामान्यां सारखं नसावं. पण ते नेमकं कसा असावं याचा शोध आयुष्यभर त्या घेत राहील्या.
‘स्वांत सुखाय’ लिहिलेलं ‘टॉलस्टॉय.. एक प्रवास’ हे पुस्तक मराठी साहित्यात एक मानदंड ठरलं. या पुस्तकाला इतके पुरस्कार मिळतील.. आपल्याला मानसन्मान, प्रसिद्धी मिळेल याची त्यांना जाणीवही नसणार.
शालांत परीक्षेनंतर मुलीचे लग्न करुन देण्याचा तो काळ. अश्या काळात लग्नानंतर पतीची कोणतीही साथ नसताना आपली गुणवत्ता सिध्द करणाऱ्या सुमतीबाई देवस्थळी या कर्तबगार स्त्री-रत्नाला आजच्या महिला दिनी वाहिलेली ही एक आदरांजली..!
☆ यमक…. – माहिती संग्राहक : नंदसुत ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
यमक…
ज्योतीताईंनी एकदा विचारलं, “एका ओळीने शेवट झाला की पुढच्या कडव्याची सुरुवात त्याच ओळीनं होते, या काव्यप्रकाराला काय म्हणतात? ” माझा हक्काचा स्रोत म्हणजे आई-दादा!
दादांचा फोन बंद होता आठ दिवसांपासून! जाम बेचैन झाले. म्हणून आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट करून ठेवलं. पाचव्या मिनिटाला दादांचा फोन!
“अगं, आत्ताच फोन सुरू झाला आणि तुझा मेसेज वाचला. ऐक, यमकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तू म्हणतेस ते दाम-यमकाच्या जवळपास जाणारं यमक असेल, असं आई म्हणत्ये. “
मागून मला आईच्या नाजूक गुणगुणण्याचा आवाज आला. आईची स्मरणशक्ती अफाट! कोणतीही कविता पाठ असते.
‘श्रीपति झाला दशरथ-सुत राम दशाननासि माराया ।
मा राया जनकाची होय सुता त्रिजगदाधि साराया ।
सारा या प्रभुची हे लीला गाती सदैवही सुकवी ।
सुकवी भवजलिं निधितें निरुपमसुख रसिक जन मनीं पिकवी ।’
(पहिल्या ओळीचा शेवट ती पुढच्या ओळीची सुरुवात. पण अर्थ वेगळा)
दादा म्हणाले, “हे बघ ऐक! ” त्यांनी तोवर, ते आठवीत असतानाचं (आईला ८४ वर्षे पूर्ण होतील आता, दादा ८६ वर्षांचे! ) मराठीचं पुस्तक आणलं होतं. पाय प्रचंड दुखतात त्यांचे! पण ब्रिज आणि भाषा हे विषय आले की त्यांना पंख लाभतात!
तर कुमार भा. वि. जोशी, इयत्ता आठवी, असं लिहिलेलं पुस्तक हातात घेऊन त्यांनी मला यमकाचे प्रकार सांगितले. थोडक्यात इथे मांडत आहे.
१) एकाक्षरी यमक:
एक्या पदे भूमि भरोनि थोडी
दुजा पदे अंडकटाह फोडी
(डी ला डी हे एकाक्षरी यमक)
२) द्व्यक्षरी
दे तिसरा पाद म्हणे बळीला
म्हणोनी पाशी दृढ आकळीला
(ळीला हे द्व्यक्षरी)
३) चतुराक्षरी
बाई म्यां उगवताच रवीला
दाट घालुनि दही चरवीला
त्यात गे फिरवितांच रवीला
सार काढुन हरी चरवीला
(काय अफाट आहे ना हे! प्रत्येक ‘चरवीला’ वेगळा आशय मांडतो!)
४) मग एकाचा अन्त्य आणि दुसऱ्याचा आदिचरण सारखा.
सेवुनि संतत पाला, संत तपाला यदर्थ करतात
तो प्रिय या स्तवना की, यास्तव नाकीहि तेंचि वरितात
५)दामयमकाचं उदाहरण वर दिलंच आहे.
६)पुष्पयमक: प्रत्येक चरणात यतीच्या ठिकाणी येणारं यमक.
सुसंगती सदा घडो… पडो.. झडो… नावडो
७)अश्वघाटी: घोड्यासारखी गती असलेलं यमक.
वाजत गाजत साजत आज तया जतन करुनि आणा हो
(वाजत गाजत साजत आजत याजत, अशी गंमत आहे.)
मज मागे मत्स्यांचा हा रिपु-शशि-राहु-बाहु राणा हो
८)युग्मक यमक हा भन्नाट प्रकार आहे.
पायां नमी देइन वंश सारा
पा या न मी दे इनवंशसारा
(इन म्हणजे सूर्य, इनवंशसार म्हणजे सूर्यवंशात जन्मलेल्यांचं सार म्हणजे राम! )
९)समुद्रक यमक (पूर्ण यमक)
हेही अफाट प्रकरण आहे. –
अनलस मी हित साधी राया, वारा महीवरा कामा ।
अनलस मीहि तसा धीरा यावा रामही वराका मा ॥
(-मोरोपंत)
हे (पृथ्वीपते) धर्मा, वारा जसे अग्नीचे कार्य साधतो, तसे तुला साह्य करण्यास मी सदैव तयार आहे. हे धीरा, (बल)रामही हवे तर येतील… मग वराका (लक्ष्मी/संपत्ती) तुझ्या सहाय्यास का येणार नाही?
अशा यमकात चमत्कृती असते; पण काव्याचा ओघ नसतो. हे काव्य कृत्रिम असलं, तरीही हे प्रतिभेचंच देणं, लेणं आहे हे निःसंशय!
आपल्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित माहीत नसेल, माहिती व्हावी म्हणून पाठवत आहे. यमक याविषयी कोणास आणखी काही माहिती मिळाली, तर जरूर शेअर करा.
┉❀꧁꧂❀┉
माहिती संग्राहक : नंदसुत
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “भिजल्या रानात अंतराळ अवतरते तेव्हा!”☆ श्री संभाजी बबन गायके☆
श्री. बजरंग निंबाळकर
भिजल्या रानात अंतराळ अवतरते तेव्हा!
मध्यरात्र उलटून गेली तरी आणखी बरंच रान भिजवायचं शिल्लक होतं. वीज जायच्या आधी सगळं वावर ओलं झालं तरच बरं. नाहीतर ह्या असल्या उन्हात ज्वारी काही तग धरणार नाही हे नक्की!
शिवारात स्मशान शांतता. माणूस नजरेस पडण्याची शक्यता नव्हतीच. झालंच तर भक्ष्य शोधायला बाहेर पडलेला एखादा सरपटणारा जीव जवळून जाईल तेव्हढाच. त्याच अंधारात काम करायचं.. पहाटेपर्यंत. गार हवा आणि डोईवर चांदण्याने भरलेलं आकाश. एरव्ही जमिनीकडे डोळे लावून बसणारे त्याचे डोळे मात्र आज वारंवार आभाळाकडे पहात होते. आज काही चतुर्थी नव्हती.. चंद्र पाहण्यासाठी! पण आकाश तसे निरभ्र होते. एखादा एकाकी, केस पांढरे झालेल्या म्हाता-यासारखा चुकार ढग चंद्रासमोरून जायचा, त्याच्याकडे एकदा बघून घ्यायचं.. त्याच्यात एखादा आकार शोधायचा! मोकळ्या रानात एकाकी असताना करायचं तरी काय? दूरवर कुणाच्या शेतातल्या विहिरीवरची मोटार तेव्हढी कानावर येत होती… ती बिचारी यांत्रिक. आपलं काम इमानेइतबारे करीत पाणी ओढत राहणे, हे तिला ठावे!
आधुनिक तंत्रज्ञानाची कृपा… मोबाईल नावाचं, तळहातावर मावेल एवढं यंत्र, जगाच्याच नव्हे तर विश्वाच्या गोष्टी याचि देही… आणि डोळा दाखवत राहते.. त्याचा मोठा आधार आहे आजकाल. नाही तर पूर्वी रेडीओवर काम भागवावे लागे… त्याचीही बिचा-याची प्रसारण वेळ ठरलेली असायची!
त्याला त्याचे सीमेवरचे दिवस आठवले. शत्रूकडे नजर ठेवत तासान तास उभे राहायचे… अंधार, बर्फ, थंडी, उष्णता यांपैकी काहीच कामाच्या मध्ये येत नसे… मात्र एकाकीपणा जीवघेणा असायचा. डोळ्यासमोर घर आलं की आपण आता जिथे उभे आहोत तिथून घरापर्यंतचं अंतर दिसायचं.. आता निघालं तर किती वेळात पोहचू? असाही विचार यायचा. इथून घरी जाता तरी येईल का असाही विचार येऊन जायचाच… नोकरीच अशी की कशाचा भरवंसा देता येणार नाही.
त्याने मोबाईल मध्ये वेळ पाहिली. सुदैवाने इंटरनेट जिवंत होते… बाकी गाव झोपी गेल्याने रेंजवर ताण कमी असावा…. अजून तसा अवकाश होता थेट प्रक्षेपण सुरु व्हायला… पण आपलं आधीच सुरु केलेलं बरं म्हणून त्याने चिखल माखल्या हातानेच मोबाईलवर गुगल सुरु केलं! ती तिथून निघाली आहे… सतरा तासांनी पोहोचेल… एक दीड तास शिल्लक होता ते सतरा तास खतम व्हायला! इंग्रजीत काहीबाही सांगत होते ते लोक… त्यात त्याला हवं ते नाव उच्चारलं गेलं की बरं वाटत होतं. त्या नावाच्या उच्चाराबरोबर त्याला आणखी एक नाव सारखं सारखं आठवत होतं…. ती अशीच परत येताना जमिनीपर्यंत सदेह पोहचू शकली नव्हती… आज असं नाही ना होणार? शेवटी यंत्र आहे हे… दगा देऊ शकतंच!
शेतातल्या त्या अंधारात त्याच्या चेह-यावर मोबाईलचा उजेड जास्तच स्पष्ट होता आज. पण अधून मधून त्याची नजर आभाळाकडे जाई! सा-या जगाचं आभाळ एकच असलं तर इथून सगळं आभाळ काही नजरेस पडणार नव्हतं.. पण तरीही वाटेकडे डोळे लावणे म्हणतात ते असं प्रत्यक्षात होत होतं..!
थेट प्रक्षेपणात थोडा आवाज वाढला म्हणून त्याकडे लक्षपूर्वक पाहिले तर वरून अत्यंत वेगाने काहीतरी खाली येताना दिसू लागले… ताशी सत्तर हजार किलोमीटर्स एवढा वेग आहे, असं ऐकू आलं. पाहता पाहता ती वस्तू खाली आली आणि तिला दोन पंख फुटले… वेग कमालीचा कमी झाला.. थोड्यावेळाने आणखी दोन पंख उमलले!
अथांग, स्थिर निळा समुद्र. लाटा सुद्धा श्वास रोखून होत्या… आणि ती पाण्याला स्पर्श करती झाली… जमिनीला नाही पण जमिनीवरच्या पाण्याला तरी तिचा स्पर्श झाला होता! पहाटेची ४ वाजून २३ मिनिटे झाली होती…. ती सुखरूप बाहेर आल्याची वेळ त्याने आवर्जून पाहून ठेवली…. आपलं कुणीतरी खूप दिवसांनी, जीवावरच्या संकटातून वाचून परतल्याचा आनंद त्याच्या चेह-यावर झळकत होता… शिवारातल्या वाफ्याताल्या पाण्यामध्ये चंद्रही चमकत होता आणि याचा चेहराही!
खूप दिवसांपूर्वी त्याने ऐकले, वाचले आणि पाहिले होते…. आपली एक महिला दूर अंतराळात अडकून पडली आहे. आपली म्हणजे भारतीय वंशाची.. आणि आता अमेरिकी झालेली अंतराळवीरांगना… सुनीता विल्यम्स. आठ दिवसांसाठी अंतराळात गेलेली ही शूर महिला आज परतणार, उद्या परतणार म्हणून नऊ महिने तिथंच स्थानबद्ध झाल्यासारखी झालेली. तिला परत आणण्याचे प्रयत्न झाले पण त्यातले काही अयशस्वी ठरले. तिच्या परतण्याचा कार्यक्रम निश्चित झाल्यापासून हा गडी त्या बातमीकडे लक्ष ठेवून होता…. ती परत सुखरूप माघारी आल्यावर जणू तिच्याएवढाच आनंद त्यालाही झाला!
त्या रात्री त्या शिवारात ती बातमी कुणाला सांगावी तर तिथे कुणी नव्हतं.. त्याने आपल्या उजव्या हाताची मूठ बंद केली… तो हात उंचावला आणि कोपरापासून खाली खेचला… बहोत अच्छे… तो उद्गारला! आणि दुस-याच क्षणी त्याच्या मनात कल्पना चावलाची छबी तरळून गेली… ती सुद्धा अशीच परत यायला पाहिजे होती!
(भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स या गेली नऊ महिने अंतराळ स्थानकात अडकून पडल्याच्या बातम्या सर्वच देशप्रेमी आणि सहृदय माणसांना तशा अस्वस्थच करत होत्या. त्या परत येण्याच्या प्रक्रियेकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. आमचे स्नेही आणि भारतीय सैन्यात मोलाची कामगिरी बजावून निवृत्त झाल्यानंतर लेखक, पत्रकार, प्राणिसेवक, समाजसेवक म्हणून कार्यरत असणारे, सेनादलाची प्रतिमा उंचावल्याबद्दल सन्मानित झालेले श्री. बजरंग तुकाराम निंबाळकर अजूनही शेतात राबतात. त्यांनी शेतीला पाणी पाजता पाजता सुनीता विल्यम्स यांचा परतीचा प्रवास मोबाईलवर थेट अनुभवला. त्यावेळी त्यांच्या झालेली त्यांच्या मनाची अवस्था बरेच काही सांगून जाते… त्यात देशाबद्दलचे प्रेम तर प्रकर्षाने दिसते.. शेवटी एकदा सैनिक बनलेला माणूस अखेरपर्यंत सैनिकच असतो, हे खरे. जय हिंद, निंबाळकर साहेब!)
☆ “१८ मार्च : जागतिक चष्मा दिवस” – संकलन : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
दृष्टिदोष सुधारावयाचे किंवा हानिकारक किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करणारे ‘चष्मा’ एक साधन. वर्तुळाकृती, अंडाकृती अथवा इतर विविध आकार असलेल्या तारेच्या किंवा प्लॅस्टिकच्या व भिंग बसविण्यासाठी मधे भोक असलेल्या दोन चकत्या डोळ्या समोर ठेवून त्यांना नाकाजवळच्या बाजूस जोडून तो जोड नाकावर नीट बसेल असे करतात. चकत्यांच्या कानाकडील बाजूंना काड्या जोडून त्या कानावर घट्ट बसवितात. चकत्यांत योग्य प्रकारची भिंगे बसविली म्हणजे नेहमी पाहण्यात येत असलेला चष्मा तयार होतो.
इतिहास
काचेच्या गोल भांड्यात पाणी भरून त्याचा उपयोग वस्तू मोठी दिसण्यासाठी पूर्वीचे लोक करीत असत असा उल्लेख ग्रीक व रोमन लेखक करतात, असे इ. स. १५० मध्ये क्लॉडियस टॉलेमस यांनी वर्णन केले आहे. जुनी हस्तलिखिते वाचताना आणि त्याच्या प्रती तयार करताना पूर्वीचे धर्मगुरू जाड भिंगे वापरीत. १२८२ साली निकोलस बुलेट या धर्मगुरूंनी एका करारावर स्वाक्षरी करताना चष्मा वापरला होता. रॉजर बेकन यांनी पारदर्शक स्फटिक किंवा काच यांचा उपयोग अधू दृष्टी असणाऱ्यांना होईल असे म्हटले असल्यामुळे चष्म्याच्या शोधाचे श्रेय त्यांना दिले जाते. पण सु. १२७० मध्ये मार्को पोलो यांनी चीन देशाच्या सफरीत येथील लोक दृष्टी सुधारण्यासाठी भिंगे वापरतात, असा उल्लेख केलेला आढळतो. पंधराव्या शतकात अंतर्गोल भिंगे वापरण्यास प्रारंभ झाल्यावर लघुदृष्टिदोष असणाऱ्यांनाही त्याचा फायदा होऊ लागला. काचेची भिंगे वापरण्यास प्रारंभ झाल्यापासून विसाव्या शतकातील भिंगाची व चष्म्याची प्रगती अनेक टप्प्यांनी झालेली आहे. चकत्यांत बसविलेल्या भिंगांना दांडी बसविली गेली. चष्म्याच्या शोधानंतर तीन साडेतीन शतकांनी तो कानावर घट्ट बसेल अशा तऱ्हेने काड्या जोडण्याची कल्पना १८२७-३० च्या सुमारास एडवर्ड स्कार्लेट यांनी काढली. त्यानंतर सु. १७४९ मध्ये दुर्बिणी सारखे चष्मे प्रचारात आले. एकच भिंग वापरण्याची प्रथा १८०६ पासून सुरू झाली आणि स्प्रिंगच्या साहाय्याने फक्त नाकावरच घट्ट बसून राहील असा दोन भिंगांचा चष्मा १८४० पासून प्रचारात आला. प्रत्यक्ष डोळ्यावरच चिकटून राहतील अशा स्पर्श भिंगांची कल्पना १८४५ साली सर जॉन हर्शेल यांनी पुढे मांडली. कर्करोगाने बुबुळ दूषित झाले असताना स्पर्श भिंगाचा संरक्षक व चष्म्या सारखा उपयोग होतो हे म्यूलर या जर्मन गृहस्थांनी यशस्वीपणे दाखवून दिले. या भिंगाचे कॉन्टॅक्ट लेन्स (स्पर्श-भिंग) हे नाव यूजीन फिक या स्विस वैद्यांनी सुचविले.
दृष्टिदोष
विविध कारणांमुळे डोळ्यांत अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात व त्यांचा दृष्टीवर परिणाम होतो. चाळीस वर्षाच्या वयानंतर जवळचे दिसण्यास किंवा वाचण्यास त्रास होतो याला दीर्घदृष्टी म्हणतात. जवळचे दिसण्यास त्रास पडणे हे लक्षण सर्वसाधारणपणे वृद्धपणात आढळते. डोळ्यातील भिंगाचा लवचिकपणा कमी झाल्यामुळे, अन्य रोगामुळे, विशिष्ट जीवनसत्त्वाच्या उणेपणामुळे डोळ्यांच्या रचनेशी संबंधित असलेल्या स्नायूंच्या हालचाली सुसंगत होत नसल्याने अनेक दृष्टिदोष निर्माण होतात. ज्या प्रकारचा दृष्टिदोष झालेला असेल तो दूर करणारा चष्मा तयार करता येतो.
गोलीय भिंगे
नेत्र अनुकूलन सवयीने व सहकार्याने होते याचा उपयोग जवळची वस्तू पाहताना होतो. अनुकूलन कमी झाले म्हणजे वाचताना किंवा बारीक कामावर दृष्टी लावताना त्रास होऊ लागतो. योग्य अशी बहिर्गोल भिंगे वापरली म्हणजे नेत्रपटलावर प्रकाशकिरण केंद्रीभूत होऊन दोष दूर होतात. अनुकूलन सुधारले म्हणजे हा दोष जाऊन दूरच्या वस्तू स्पष्ट दिसू लागतात. एरवी त्या अस्पष्ट दिसतात. लघुदृष्टिदोषात नेत्रगोलाची लांबी वाढल्यामुळे लांबच्या वस्तूवरून येणारे समांतर किरण नेत्रपटलावर न पडता त्याच्या पुढे केंद्रित होत असल्यामुळे ती वस्तू अस्पष्ट दिसते. योग्य अंतर्गोल भिंग (ऋण शक्तीचे) वापरले म्हणजे किरणांचे अपसरण वाढून हे किरण नेत्रपटलावरच केंद्रित होतात.
चित्याकृती भिंगे
दृष्टिवैषम्य हा दोष मोठ्या प्रमाणात आढळतो. या दृष्टिदोषात नेत्रपटलावर केंद्रीकरण होत नसल्यामुळे सर्व अंतरांवरील वस्तू अस्पष्ट दिसतात. दरम्यानच्या कोनात दृष्टी काम करू शकत असली, तरी डोकेदुखी व डोळ्यावरचा ताण या तक्रारी राहतात. दृष्टिवैषम्य चित्याकृती (दंडगोलाकार) भिंग वापरून दूर करता येते.
लोलक बहुकोनी भिंगे
कमी शक्तीचे लोलक वापरून आपाती किरणांची दिशा बदलता येते. यांचा उपयोग काणे डोळे सुधारण्यासाठी करतात. दोन्ही डोळे एकमेकांना सोईस्कर रीतीने राहतील अशा दिशेला वळविले म्हणजे प्राकृत (नेहमीची) दृष्टी कायम राहते. लोलकाचा उपयोग नेत्रगोलाच्या बाहेरील स्नायूंच्या पक्षाघातावर करतात.
द्विकेंद्री भिंगे
लघु आणि दीर्घदृष्टिदोष असणारांना वारंवार चष्म्याची आलटापालट करावी लागते. हा त्रास द्विकेंद्री भिंगे एकत्र बसवून घालवितात. १९०४ साली दोन भिंगांचा पूर्ण मिलाफ करून किंवा अखंड काचेत द्विकेंद्री भिंगे तयार करण्यात येऊ लागली. दोन्ही भिंगांचा बाहेरील पृष्ठभाग एकसारखा असतो. पण लहान भिंगाच्या आतल्या पृष्ठभागाला जास्त वक्रता असते. त्याने वाचता येते किंवा जवळचे पाहता येते.
त्रिकेंद्री भिंगे
यात लांबचा, मध्यावरचा आणि जवळचा असे तीन वेगवेगळ्या शक्तीचे विभाग असतात. मध्य विभागाच्या खालचा आणि वरचा विभाग सारख्याच शक्तीचा असला, तरी त्यांची प्रकाशीय केंद्रे मात्र वेगवेगळी असतात. ही भिंगे दोन डोळ्यांतील विषम प्रणमन दोष दूर करण्यासाठी वापरतात.
विशेष प्रकार
उष्ण भट्ट्यांजवळ काम करणाऱ्यांच्या, काचेचे फुंककाम करणाऱ्यांच्या, धातूंचे रस गाळणाऱ्यांच्या व इतर तत्सम कामे करणाऱ्यांच्या डोळ्यांना अवरक्त प्रारणा पासून इजा होऊ नये म्हणून विशिष्ट प्रकारचे चष्मे वापरतात. जंबुपार प्रारणा पासून वितळजोडाची (वेल्डिंगची) कामे करणाऱ्यांना, या प्रारणाचा उपयोग करणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या व रुग्णांच्या डोळ्यांना, विशिष्ट परिस्थितीनुसार डोळ्यांचे संरक्षण व्हावे म्हणून विविध प्रकारचे चष्मे तयार करतात. क्ष-किरणांपासून अपाय होऊ नये म्हणूनही चष्मे वापरतात.
प्रायोगिक अवस्थेतील चष्मे
१) अंधांसाठी चष्मा
विशिष्ट रंगाशी विशिष्ट स्वराची सांगड घालणे, दुय्यम रंगांच्या स्वरांचे मिश्रण होणे आणि यांचा संबंध सवयीने लावता येणे या तत्त्वावर डी. बी. फॉस्टर या शास्त्रज्ञांनी अंधांसाठी एक चष्मा तयार केला आहे. या चष्म्यात नेहमीच्या भिंगा ऐवजी प्रकाशीय गाळण्या बसविलेल्या असतात. त्यांवर पडणाऱ्या प्रकाशाचे तीन प्राथमिक रंगांत पृथक्करण होते. या प्रकाशाचे प्रकाशविद्युत घटकाच्या साहाय्याने ध्वनीत रूपांतर होऊन कानाला जोडलेल्या ध्वनिक्षेपकाने त्याची संवेदना मेंदू पर्यंत पोहोचते. अंधांना अशा चष्म्याच्या साहाय्याने संचार करणे सुलभ होईल.
२) अंतरानुसार बदलणारा चष्मा
द्विकेंद्री भिंगांच्या साहाय्याने जवळच्या व लांबच्या वस्तू एकाच चष्म्याच्या साहाय्याने पाहता येणे शक्य असते. तथापि या चष्म्यापेक्षाही अधिक सुधारलेला चष्मा ब्रिटन मधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेतील मार्टिन राइट या शास्त्रज्ञांनी तयार केला आहे. ज्या अंतरावरील वस्तू पहावयाची असेल, त्या अंतराला योग्य प्रकारे जमवून घेणारी भिंगे या चष्म्यात बसविण्यात आलेली आहेत.
संकलन : श्री मिलिंद पंडित, कल्याण
(संदर्भ : मराठी विश्वकोश/गोखले, श्री. पु. टोळे )
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ सैनिकांचा धर्म !!! – मूळ इंग्रजी लेखक : लेफ्टनंट कर्नल दिलबाग सिंग दबास (सेवानिवृत्त) ☆ मराठी अनुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆
इंद्रधनुष्य
२ ) “ सैनिकांचा धर्म “ इंग्रजी लेखक : लेफ्ट. कर्नल दिलबाग सिंग दबास मराठी अनुवाद : कर्नल आनंद बापट
१९३९ साली दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले तेंव्हा ‘४ राजपुताना रायफल्स बटालियन’चे सुभेदार रिछपाल राम दोन महिन्यांच्या रजेवर गावी आलेले होते. गुडगांव जिल्ह्यातल्या त्यांच्या बर्डा गावामध्ये, घरटी किमान एक तरी आजी-माजी सैनिक होताच. बर्डा गावाला ‘फौजियों का गांव’ म्हणूनच ओळखले जात असे.
युद्ध सुरु होताच, बर्डा गावातल्या जवानांना सुट्टी रद्द झाल्याच्या तारा येऊ लागल्या. एक-एक करून बहुतांश जवान आपापल्या पलटणीसोबत युद्धभूमीकडे रवाना होऊ लागले.
काही दिवस गेल्यानंतरही सुभेदार रिछपाल राम यांना त्यांच्या बटालियनकडून बोलावणे आलेले नसल्याने ते अस्वस्थ होते. अखेर एके दिवशी त्यांनी स्वतःच ठरवले की मी बटालियनमध्ये परतणार. त्यांची पत्नी जानकीने त्यांना तार येईपर्यंत थांबण्याचा सल्ला दिला, पण ते ऐकेनात. त्यांचे म्हणणे होते की, एकतर पोस्टातून त्यांची तार गहाळ झाली असावी किंवा ती चुकीच्याच पत्त्यावर पाठवली गेली असावी.
त्यांचा हेका एकच होता – “पलटणीच्या आणि देशाच्या मिठाला जागण्याची वेळ आलेली असताना, नुसते वाट पाहत स्वस्थ बसणे हा सैनिकी धर्मच नव्हे!”
टांग्यात बसून पत्नीचा निरोप घेताना सुभेदार रिछपाल राम तिला म्हणाले, “मैं उल्टो आऊँगो, मोर्चो जीत के आऊँगो। और जे उल्टो ना आ पायो तो ऐसो कुछ कर जाऊँगो, के म्हारी पूरी बिरादरी तेरे पे गर्व करेगी।” (मी परत येईन आणि जिंकूनच येईन. पण जर मी परत नाही येऊ शकलो तर असं काहीतरी करेन, ज्यामुळे आपल्या सर्व समाजाला तुझा अभिमान वाटेल!”)
दुर्दैवाने, सुभेदार रिछपाल राम युद्धभूमीवरून कधीच परतले नाहीत. परंतु, स्वतःचे प्राण आपल्या पलटणीवरून आणि देशावरून ओवाळून टाकण्यापूर्वी, त्यांनी पत्नीला दिलेले वचनही पाळले होते. मरणोपरांत ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ देऊन त्यांच्या शौर्याचा सन्मान केला गेला.
साठ वर्षे लोटली आणि १९९९ साल उजाडले. जम्मू-काश्मीरमध्ये कारगिलवर युद्धाचे ढग दाटून येऊ लागले. ‘१७ जाट’ बटालियनचे काही जवान व अधिकारी रजेवर होते. आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसताच, बटालियनचे अडज्युटन्ट, मेजर एच. एस. मदान यांनी सगळ्यांना तारा पाठवून परत बोलवायला सुरुवात केली.
१७ जाट बटालियनच्या ‘डेल्टा’ कंपनीचे कमांडर, मेजर दीपक रामपाल हेदेखील दीर्घकालीन रजेवर होते. सप्टेंबर १९९९ मध्ये होणाऱ्या स्टाफ कॉलेज प्रवेश परीक्षेसाठी ते कसून तयारी करत होते. बटालियनचे सीओ, कर्नल यू. एस. बावा यांची अशी इच्छा होती की मेजर दीपकच्या अभ्यासामध्ये शक्यतो व्यत्यय येऊ नये. त्यांनी मेजर मदान यांना सांगितले, “दीपकला इतक्यात तार पाठवू नकोस. जरा चित्र स्पष्ट होऊ दे. गरज पडलीच तर आपण त्याला ऐनवेळी बोलावून घेऊ. “
एके दिवशी बटालियनच्या ‘ऑप्स रूम’मध्ये बसलेल्या कर्नल बावांना धक्काच बसला. पाठीवर रकसॅक घेतलेले मेजर दीपक रामपाल ‘ऑप्स रूम’मध्ये येऊन दाखल झाले.
“अरे दीपक, तुला आम्ही परत बोलावलं नव्हतं. तू कसा काय आलास?” असे सीओ साहेबांनी विचारताच मेजर रामपाल उत्तरले, “सर, पाकिस्तान्यांच्या घुसखोरीची बातमी मी रेडिओवर ऐकली. ‘४ जाट’चे मेजर सौरभ कालिया आणि त्याच्या गस्ती पथकाला पाक घुसखोरांनी हालहाल करून मारल्याचं वृत्तही मी वर्तमानपत्रात वाचलं. हुतात्मा सैनिकांच्या शवपेट्या त्यांच्या गावापर्यंत आल्याचं दृश्यही टीव्हीवर दिसलं. त्यानंतर मी काय करायला हवं होतं असं तुमचं म्हणणं आहे, सर?”
बटालियनमध्ये परतल्यानंतर दोन आठवड्याच्या आतच मेजर दीपक रामपाल आपल्या डेल्टा कंपनीसह अत्यंत दुर्गम अशा ‘व्हेल बॅक’ टेकडीवर चाल करून गेले. पाक घुसखोरांनी त्या टेकडीवर मजबूत पकड घेतलेली होती. एक रात्रभर चालेल्या हातघाईच्या लढाईनंतर मेजर दीपक आणि त्यांच्या शूरवीर जाटांनी ‘व्हेल बॅक’ टेकडी काबीज केली.
मेजर दीपक रामपाल यांच्या असाधारण शौर्य आणि असामान्य नेतृत्वाबद्दल त्यांना ‘वीर चक्र’ प्रदान करून सन्मानित केले गेले.
देशाला आपली खरी गरज असताना, हक्काच्या रजेसारख्या मामुली सवलतीचे महत्व ते काय? सुभेदार रिछपाल राम आणि मेजर दीपक रामपाल ही फक्त दोन नावेच आहेत. भारतीय सैन्यदलांमधल्या प्रत्येक जवानांचे जीवनसूत्र ‘राष्ट्र सर्वोपरि’ हेच असते. पलटणीच्या खाल्लेल्या मिठाला वेळप्रसंगी जागणे हाच खरा धर्म!
मूळ इंग्रजी लेखक : लेफ्टनंट कर्नल दिलबाग सिंग दबास (सेवानिवृत्त)
मराठी अनुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)
मो 9422870294
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत !” – भाग- २ ☆ श्री संभाजी बबन गायके☆
नायब सुभेदार संतोष राळे
(प्रचंड गोळीबारामध्ये आपल्या सैनिकांनी जड युद्ध साहित्य जीवाचा धोका पत्करून पोहोचवण्याची कामगिरी यशस्वी केली.) – इथून पुढे
हे पथक एक डोंगर चढू लागले. अंधारले होते… संतोष यांना हलकीशी चाहूल लागली… समोरून डोंगरउतारावरून कुणी तरी येत होते! सर्वांनी त्वरीत पवित्रा घेतला. संतोष साहेबांना त्यांना वाटले की हे आपलेच जवान असण्याची शक्यता आहे. काहीवेळा आपलेच जवान स्थानिक लोकांच्या वेशात त्या भागात फिरून माहिती घेत असतात. त्या दोघांकडे काही शस्त्रेही दिसत नव्हती. संतोष साहेबांनी आपल्याजवळील walki-talkie वरून त्या तिघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला… पण फ्रीकेव्न्सी जुळली नाही! तेंव्हा मागे असलेल्या वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला… काही तरी निर्णय घेणे गरजेचे होते. म्हणून संतोष यांनी सावधपणे त्या दोघांकडे जाण्याचा निर्णय घेतला… त्यांनी सहकारी जवानांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आणि ते पुढे निघाले… एवढ्यात त्यांच्या दिशेने एक गोळी फायर झाली… ती गोळी संतोष यांच्या डोक्याच्या अगदी जवळून मागे गेली आणि दगडावर आदळली… साहेब अगदी थोडक्यात बचावले होते…. सावध असलेल्या संतोष यांच्या एके-४७चा रोख त्या तिघांवर होताच.. त्यांनी एक जोरदार फैर अचूक झाडली… ते तिघेही त्या टेकडीवरून गडगडत खाली आले ते अगदी संतोष साहेब जिथे बसले होते त्याजागेच्या अगदी जवळ…. त्या तिघांच्या हातांतली शस्त्रे ते टेकडीवर खाली गडगडत येताना टेकडीवरच पडली होती… संतोष यांनी तीन अतिरेकी ठार मारले होते!
संतोष साहेबांनी खबरदारी म्हणून या तिघांच्याही मृतदेहांच्या टाळक्यात एक एक गोळी घालण्याचे आदेश त्यांच्या सहका-याला दिले. ते तिघे एकमेकांशेजारीच जणू एका ओळीत पडलेले होते… आपल्या जवानाने पहिल्याच्या डोक्यात एक गोळी घातली…. दुस-याच्याही डोक्यात एक गोळी घातली… त्याच्या डोक्यातील मेंदू बाहेर पडून तिस-याच्या डोक्यावर जाऊन पडला!… जवानाला त्या गडबडीत असे वाटले की तो तिसराही अतिरेकी खलास झालेला आहे.. आता परत गोळी मारण्याची गरज नाही! तो तिसरा जिवंत राहिलेला होता!….. आणि दुर्दैवाने हे लक्षात आले नव्हते!
हे तिघे अतिरेकी जिथून आले तिथेच आणखी काही अतिरेकी लपून बसलेले होते. जोजन साहेबांच्या सोबत झालेल्या चकमकीत त्यांच्यापैकी काहीजण जबर जखमी होते, शिवाय त्यांच्याजवळचा दारूगोळाही बहुदा संपुष्टात आला असावा. या अतिरेक्यांच्या शोधात संतोष आणि त्यांचे पथक पहाड चढू लागले. एकेठिकाणी शंका आली म्हणून ते दोन मोठ्या पत्थरांच्या आडोशाला बसले… अंदाज घेण्यासाठी जरासे डोके वर काढले तेंव्हा एकाचवेळी तीन बाजूंनी जबरदस्त फायरिंग सुरु झाले. संतोष यांनी ताबडतोब जमिनीवर लोळण घेतली… अतिरेकी त्यांच्या वरच्या बाजूला होते.. त्यांना अचूक नेम साधता येत होता… त्यांनी संतोष यांच्यावर फायर सुरु केला… त्यांच्या मस्तकाच्या अगदी वरून गोळ्या सुसाट मागे जात होत्या… माती डोळ्यांत उडत होती… इतक्यात तिथल्या एका झाडाची वाळलेली फांदी साहेबांच्या डोक्यावर पडली! तशाही स्थितीत त्यांनी जवाबी फायरींग जारी ठेवले… त्यातले काही जण बहुदा मागे पळाले असावेत.. एका अतिरेक्याच्या रायफलची magazine तुटली… तो एका झाडाच्या आड ती magazine बदलण्याच्या प्रयत्नात उभा होता… त्याची रायफल कोणत्याही क्षणी गोळीबारास सुरुवात करणार होती…. संतोष यांनी त्याला आपल्या जीवाची पर्वा न करता दुस-या बाजूने जात जबरदस्त ठोकला… त्याचे हात, पाय वेगवेगळ्या दिशेला उडाले…. कोथळा बाहेर पडला… ! आधीचे तीन आणि आता हा चौथा बळी मिळवला होता संतोष यांनी. त्याचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देऊन मग संतोष साहेब खाली आधीच्या जागेपर्यंत आले. रात्री ठार मारलेल्या तिघांपैकी एकाचा मुडदा तिथून गायब होता. रात्री अंधारामुळे काहीसा गोंधळ उडाला असावा… दोनच अतिरेकी असावेत असा समज झाला.. पण तेवढ्यात संतोष यांना तेथील एका झाडामागे काही हालचाल दिसली… तर रात्री ‘मरून’ पडलेला अतिरेकी चक्क जिवंत होता… त्यांना स्वत:ची स्वत: मलमपट्टी केलेली होती! साहेबांनी त्याला लांबूनच आवाज दिला आणि वरिष्ठ अधिका-यांच्या मेसेज नुसार त्याला शरण येण्यास फर्मावले. संतोष साहेबांनी त्याला त्याच्या अंगावरचे सर्व कपडे काढून टाकून पुढे यायला सांगितले..
पण त्याला यांची भाषा काही समजेना. मग वरिष्ठ साहेबांनी एक दुभाषी तिथे धाडला. त्या अतिरेक्याने त्या दुभाषामार्फत सांगितले की तो जखमी असल्याने चालू शकत नाही.. एक पाय निकामी झाला आहे… त्यामुळे कपडे काढणे शक्य नाही… जवळ कुठलेही हत्यार नाही! संतोष यांनी त्या अतिरेक्याजवळ जाण्याचा निर्णय घेतला….. पण सहकारी जवानाला त्याच्यावर नेम धरून बसायला सांगितले.. जरासा जरी हलला तरी लगेच ठोक! संतोष साहेब त्या अतिरेक्याच्या जवळ जात असताना त्याने त्याच्या कपड्यात लपवलेला हातागोळा काढला आणि त्याची पिन उपसून तो साहेबांच्या अंगावर फेकला… पण त्या फेकण्यात विशेष जोर नव्हता… संतोष साहेबांनी त्वरीत जमिनीवर लोळण घेतल्याने त्यांना त्या फुटलेल्या गोळ्याचा काही उपद्रव झाला नाही…. तो गोळा त्या अतिरेक्याच्या अगदी जवळच फुटल्याने आणि त्यात आपल्या जवानाने अचूक निशाणा साधल्याने तो आता मात्र कायमचा गेला! आधीच मेलेल्या दोघांचे मृतदेह तिथून हलवताना साहेबांनी काळजी घेतली… हे अतिरेकी मरताना त्यांच्या जवळचा हातागोळा अंगाखाली लपवून ठेवतात… त्यांचा देह उचलायला जाताच तो गोळा फुटेल अशी व्यवस्था करून ठेवतात. उत्तम प्रशिक्षण घेतलेल्या संतोष यांनी त्यांचा हा डाव ओळखला…. अतिरेक्यांच्या बुटाला दोरी बांधून ती जंगली कुत्री मागे ओढली…. हातगोळ्यांचे स्फोट अतिरेक्यांच्या शरीरांना आणखीनच क्षतविक्षत करत गेले!
आधी डोंगरावर मारल्या गेलेल्या एकाचा साथीदार दुस-या मार्गाने आपल्या मागे असलेल्या तुकडीच्या दिशेने निघाला होता. पण एका प्रामाणिक खबरीने वेळेत सूचना दिल्याने त्याचाही आपल्या जवानबंधूनी खात्मा केला…. सर्वांनी मिळून सहा दिवसांत एकूण अठरा अतिरेक्यांना कंठस्नान घडवले होते.
त्यावेळी हवालदार पदावर कार्यरत असलेले श्री. संतोष राळे यांना पुढे नायब सुबेदार म्हणून बढती मिळाली. नंतर त्यांना लेबानन या आफ्रिकी देशात शांतीसेनेत काम करण्याची संधीही मिळाली!
१८ अतिरेक्यांच्या निर्दालनात सहभागी होण्याची ही अतुलनीय कामगिरी बजावून संतोष साहेब गावी आले… हा मराठी मातीतला रांगडा गाडी…. अगदी down to earth! त्यांनी घरी काहीही सांगितले नव्हते. देशासाठी लढण्याचे आणि शत्रूला ठार मारण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान त्यांच्या हृदयात होते.. ये दिल मांगे मोअर… ही त्यांची इच्छा होती. आता पुढची लढाई कधी याची ते वाट पहात होते. आणि आपण काही फार मोठी कामगिरी केली आहे याचा साधा लवलेशही त्यांच्या बोलण्यात, वागण्यात दिसत नव्हता… आणि आजच्या घडीलाही दिसत नाही.
त्या दिवशी त्यांच्या गावातल्या शाळेत प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम होता. नायब सुबेदार संतोष राळे साहेब या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यादिवशीच्या वर्तमानपत्रात बातमी होती…… आपले सुपुत्र श्री. संतोष राळे यांना अशोक चक्रानंतर दुसरे स्थान असलेले कीर्ती चक्र जाहीर झाले आहे! गावकरी लोकांनीच त्यांना ही खबर दिली… त्यादिवशी दूरदर्शनवरही बातमी दिसली… संतोष साहेबांनी फोन करून खात्री करून घेअली… तेंव्हा त्यांना खरे वाटले… कारण एवढा मोठा पुरस्कार मिळेल असे त्यांना वाटलेही नव्हते. उलट आपले मोठे अधिकारी आणि जवान गमावल्याचे दु:ख त्यांना होते!
२९ मार्च २००९ रोजी भारताच्या तिन्ही सेनादलांच्या सुप्रीम कमांडर तत्कालीन महामहीम राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते कीर्ती चक्र स्वीकारताना नायब सुबेदार श्री. संतोष तानाजीराव राळे यांची छाती अभिमानाने फुलून आली होती… आईच्या गर्भात शिकलेली झुंजाराची रीत त्यांनी प्रत्यक्षात रणभूमीवर उपयोगात आणली होती!
(ही शौर्यगाथा काश्मीरमधील मच्चील सेक्टर, नारनहर नावाच्या ओढ्याच्या परिसरात घडलेली असल्याने त्याला ऑपरेशन नारनहर असे नाव आहे. सदर माहिती मी राळे साहेबांच्या अनेकांनी घेतलेल्या मुलाखती, बातम्या इत्यादी मधून संकलित केली आहे. कर्नल त्यागवीर यादव साहेबांनी संतोषजी यांची मुलाखत खूप छान घेतली आहे.)