☆ अँटनी लैरीस आणि त्याचा पेटता ऊर… भावानुवाद : डॉ. प्रवीण आवटे ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
जाती धर्माच्या नावाखाली समाजात विद्वेष पसरवणाऱ्या सर्वांसाठी एक चपराक
आन्टनी लैरीस त्याचं नाव. त्याच्या फ्रेंच नावाचा उच्चार करणंही महाकठीण. पण परवाच्या पॅरीस हल्ल्यात अतिरेक्याच्या गोळयांना त्याची बायको – हेलन बळी पडली आणि त्यानं आपल्या बायकोला जीवे मारणा-या अतिरेक्याला उद्देशून फेसबुकवर ही पोस्ट लिहिली, पेटत्या उरानं हे शब्द उच्चारणं तितकंच कठीण आहे.
☆ संत माळेतील मणी शेवटचा – लेखक : श्री सुमित्र माडगूळकर ☆ श्री आशिष बिवलकर ☆
“संत माळेतील मणी शेवटला…
आज ओघळला एकाएकी … “
...सुमित्र माडगूळकर
रिक्षावाल्याने अंगात झटका आल्यासारखी एकदम रिक्षा बाजूला घेतली,आत बसलेल्या माय – लेकराकडे बघून म्हणाला, “तुम्ही इथेच उतरा,मी या पुढे जाऊ शकत नाही “.समोर खूप गर्दी जमलेली होती.
माय – लेकराच्या तोंडावर प्रश्नचिन्ह पाहताच तो उत्तरला ” समोर पहा, ती महाकवीची अंतिम महायात्रा चालू आहे, मला त्यात सामील व्हायचे आहे, तुम्हाला माहित नाही? गीतरामायणकार ग.दि.माडगूळकर यांचे काल निधन झाले !”.
आत बसलेल्या माय – लेकराच्या चेहऱ्यावरील राग, प्रश्नचिन्ह क्षणार्धात दूर झाले व नकळत आई उत्तरली ” चल,आपणही पाच मिनिटे का होईना या अंतयात्रेत सामील होऊ, हीच या महाकवीला आपल्याकडून शेवटची श्रद्धांजली…. “.
—-
१५ डिसेंबर १९७७ ची सकाळ. असे अनेक जण त्या अंतिम महायात्रेत सामील झाले होते… आपणहून…त्यांचे बालपण ‘नाच रे मोरा’,’झुक झुक अगीनगाडी’ म्हणत फुलले होते,तरुणपण ‘माझा होशील का?’,’हृदयी प्रीत जागते’ ने रंगविले होते,’देव देव्हाऱ्यात नाही,’इंद्रायणी काठी देवाची आळंदी’ वर त्यांचे मन भक्तीरसात न्हाऊन निघाले होते.आयुष्याच्या संध्याकाळी ‘या कातरवेळी पाहिजेस तू जवळी’ ने मनाला हुरहूर लावली होती,आयुष्यातील प्रत्येक दुःखाच्या क्षणी ‘दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा,पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ सारख्या गीतरामायणातील गीतांनी आधार दिला होता.शाळेच्या बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकात ‘मी सिंह पाहिला होता’,’औंधाचा राजा’,’आचंद्र सूर्य नांदो’,’शशांक मंजिरी’ सारख्या धडा-कविता मनाच्या कोपऱ्यात स्थान मिळवून होत्या ,नक्कीच वाचल्या होत्या.आज ते लाडके गदिमा शेवटच्या प्रवासाला निघाले होते … कोणाला दुःख झाले नसेल त्या दिवशी ?.
— डिसेंबर च्या एका पहाटे गदिमा दरदरून घाम फुटून जागे झाले,त्यांना विचित्र स्वप्न पडले होते “माडगूळच्या दारावरील गणपती” व “पंचवटीचे तुळशी वृदांवन व त्याचा कट्टा” दुभंगलेला दिसला होता. ते खूप अस्वस्थ झाले,विद्याताईंनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण ते म्हणाले “तुझ्या व मुलांच्या मनाची तयारी कर. मी आता अनंताच्या प्रवासाला निघालेला प्रवासी आहे. माझ्या दिव्यातील तेल आता संपत आले आहे “. एका पहाटे त्यांना खूप थंडी वाजून आली विद्याताईंनी घाईने नुकत्याच एका खेड्यातल्या समारंभात भेट मिळालेली उबदार घोंगडी त्यांच्या अंगावर घातली,गदिमा खिन्नपणे हसून म्हणाले “अग आता नको,काही दिवसांनी ती उपयोगी येईल”.
१४ डिसेंबर १९७७,गदिमांची आई ‘बनुताई दिगंबर माडगूळकर’ यांचा आदर्श माता म्हणून सत्कार होणार होता, माडगूळहून गदिमांचे धाकटे बंधू श्यामकाका आले होते. गदिमांना रात्रभर झोप नव्हती, विद्याताईंकडे बघून नुसते केविलवाणे हासत होते… डोळ्यात कारुण्य दाटले होते … ,काहीतरी सांगायचे होते पण …
गदिमा आईला म्हणाले, “आईसाहेब,आज तुमचा सत्कार आहे. विसरू नका. लवकर आवरून ठेवा. तुम्हाला न्यायला गाडी येईल.”
आई म्हणाली “तुम्ही नाही का येणार? “,आपल्या लाडक्या लेकाला बनुताई आदराने आहो जाहोच म्हणत असत. ‘येणार तर,पण आधी तुम्हाला गेले पाहिजे,आम्ही येतोच मागोमाग’. थोड्या वेळाने गदिमा व विद्याताई नातू सुमित्रला घेऊन बकुळीच्या पारावार जाऊन बसले. तितकेच गदिमा बाललीला पाहण्यात रमून गेले होते. तसा बराच वेळ गेला .. आत आल्यावर गदिमा विद्याताईंना म्हणाले “मंदे,तू आज मला तुझ्या हाताने आंघोळ घालशील का?” ,अंगात ताप होता विद्याताईंनी अंग गरम पाण्याने पुसून घेतले. कॉटवर स्वच्छ पांढरी चादर घातली.
”मंदे,आज मस्त वांगी भात आणि साजूक तुपातला शिरा कर,तोंडाची चवच गेली आहे… “,विद्याताईंनी त्यांच्या आवडीचे जेवण केले. गदिमा मनसोक्त जेवले त्या दिवशी. संध्याकाळी कार्यक्रमाला जाण्यासाठी विद्याताईंनी सर्व कपडे तयार करून ठेवले होते, रेशमी झब्बा,जाकीट,धोतर,सेंटवाला रुमाल. गदिमा म्हणाले ” मंदे,आता उशीर करू नकोस,लवकर आटप “. विद्याताई हसून म्हणाल्या “आत्ता आवरते बघा”. गदिमा बाहेरच्या निळ्या कोचावर जाऊन बसले.थोड्या वेळाने अचानक त्यांचा मोठा आवाज आला ” मंदे,अग लवकर इकडे ये, मला बघ कसं होतंय, खूप थंडी वाजते आहे बघ .. “. विद्याताई त्यांना लगबगीने आत खोलीत घेऊन आल्या .. अंगावर दोन तीन रग घातले पण त्यांची थंडी कमी होईना. दात एकमेकांवर आपटून जोरात आवाज येत होता.
विद्याताईंनी घाईघाईने मुलांना, सुनांना बोलवून घेतले, माळीबुवाला पाठवून डॉ.मेहतांना बोलवून घेतले. डॉ.मेहता म्हणाले ” कविराज,फटकन एक इंजेक्शन घेऊन येतो, ते घ्या व मस्त कार्यक्रमाला जा “. मेहता समोरच असलेल्या दवाखान्यात निघून गेले. गदिमांना दरदरून घाम फुटला होता. इकडे छोटा सुमित्र रडवेला चेहरा करून ” पपाआजोबा बोलत का नाहीत “ म्हणून एकटक बघत राहिला होता. त्याला कळत नव्हते “सर्वजण का जमलेत ?,ताईआजी का घाबरली आहे ? डॉक्टर काय करत आहेत ? “.
इकडे गदिमांचे पाय थंड पडले होते, विद्याताई व सुना त्यांच्या पायाला ब्रँडी चोळत होत्या. गदिमा म्हणाले “मला काही करू नका”. तितक्यात डॉ.मेहता परत आले त्यांनी इंजेक्शनची तयारी सुरु केली. तितक्यात गदिमांनी गजानन महाराजांना (शिवपुरी,अक्कलकोट) जोरात हाक मारली. ” महाराज,मला आता सोडवा”. त्याचं बोलणं एकदम बंद पडले, जीभ तोंडात हलू लागली. डॉ. मेहतांनी इंजेक्शन दिले पण ते शिरेत न जाता तसेच बाहेर आले. अखेर संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास गदिमांची प्राणज्योत मालवली.
सकाळचाच प्रसंग.. बाथरूमला जाताना गदिमांनी विद्याताईंचा आधारासाठी दिलेला मदतीचा हात झिडकारून टाकला होता .. १९४२ साली प्रेमाने हातात घेतलेला त्यांचा हात आता कायमचाच सुटलेला होता … बुधवार १४ डिसेंबर १९७७ ची ती भीषण संध्याकाळ .. दोन सूर्य अस्ताला गेले. मृत्यूच्या पराभवाचा दिवस, कारण त्याच्या हाती लागला तो केवळ गदिमांचा नश्वर देह.
फर्ग्युसन रस्त्यावरील उद्योगपती बाबुराव पारखे यांच्या विद्याविलास या बंगल्यात आदर्शमाता पुरस्कार सोहळा चालू होता. बनुताइंचा प.महादेवशास्त्री जोशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, तेव्हड्यात गदिमांची बातमी येऊन पोहचली. बनुताईनसमोर ही बातमी सांगता येत नव्हती, पण त्या महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय परत पंचवटीत जाण्यास तयार नव्हत्या, त्यासाठी अडून बसल्या. शेवटी दर्शन घेऊन त्या निघाल्या, मग कार्यक्रमात प.महादेवशास्त्री जोशी यांनी गदिमांच्या निधनाची वार्ता सांगितली, सगळीकडे शोकछाया पसरली. इकडे पंचवटीत त्या सत्काराच्या हारतुऱ्यांसकट पोहोचल्या, आपल्या लाडक्या लेकाची अवस्था पाहून त्यांचे काय झाले असेल, एकीकडे आई आदर्श माता पुरस्कार स्वीकारीत होती व एकीकडे मुलगा अनंताच्या प्रवासाला निघून गेला होता,सगळाच दैवदुर्विलास !.
पंचवटीच्या हॉलमध्ये पांढऱ्या चादरीखाली काहीतरी झाकलेले होते, माझे लाडके आजोबा कुठेच दिसत नव्हते, अगदी त्यांच्या निळ्या कोचावर सुद्धा. घरातले सगळे रडत होते, प्रचंड माणसे जमली होती,सगळे का रडत आहेत मला काहीच कळत नव्हते. त्यांना हसवावे म्हणून मी जास्तच चेकाळलो होतो, कधी नव्हे ते वेड्यासारखा इकडून तिकडून पळत होतो. शेवटी माझी रवानगी वरच्या मजल्यावर झाली.
— माझा बालहट्ट आता पुरविला जाणार नव्हता,एक महाकवी आपल्या शेवटच्या प्रवासाला निघालेला होता,माझ्या लाडक्या आजोबांचा हात माझ्या हातातून कायमचा सुटलेला होता.
१५ डिसेंबर १९७७. प्रचंड अंतयात्रा निघाली होती,पुणे मुंबई रस्त्याने जाणारी अंतयात्रा वाकडेवाडीच्या लोकांच्या हट्टाने वाकडेवाडीतून वळविण्यात आली. जेव्हा अंतयात्रा डेक्कनवर पोहोचली तेव्हा तिचे दुसरे टोक बालगंधर्व चौकात होते.इतकी मोठी अंत्ययात्रा पुण्याने फार क्वचित बघितली असेल. संगीतकार राम कदम “अण्णा अण्णा” म्हणत आक्रोशाने धावत होते… ,महाराष्ट्र शासनाच्या वतीने शरद पवार सामील होते. स्त्री-पुरुष,वृध्द,राजकारणी,कलावंत,अगदी दप्तर-पुस्तके घेतलेल्या लहान मुलांपासून सर्वजण त्यात सामील झाले होते.
सगळ्यांच्या मुखात आज एकच ओळी होत्या ….
“विठ्ठलाच्या पायी थरारली वीट… “
“संत माळेतील मणी शेवटला… आज ओघळला एकाएकी… “
अनेक घरात त्या दिवशी चुली पेटल्या नाहीत, कारण गदिमा हे त्यांना त्यांच्या घरातलेच एक वाटत होते. .गदिमांना केवळ ५८ वर्षाचे आयुष्य लाभले तरी ते आजही त्यांच्या असंख्य गाण्यांतून, साहित्यातून, चित्रपटातून, गीतरामायणातून मराठी रसिकांच्या हृदयात विराजमान आहेत.
चंदनी चितेत जळाला चंदन…
सुगंधे भरून मर्त्यलोक
लेखक : सुमित्र माडगूळकर
संग्राहक : श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ 20 मुलांची आई ! … सुश्री अंजली कुलथे – लेखक : श्री धनंजय कुरणे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
सुश्री अंजली कुलथे
14 वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला….26/11/2008 च्या रात्री नराधम अतिरेकी ‘अजमल कसाब ‘ त्याच्या एका सहकाऱ्यासोबत ‘कामा हॉस्पिटल’च्या आवारात शिरला आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला..
हॉस्पिटलचे दोन्ही सेक्युरिटी गार्ड्स जागीच ठार झाले.. ते दोघं रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.. जरा पुढे एक नर्स जखमी अवस्थेत पडली होती.. कसाब व त्याचा साथीदार पोर्च ओलांडून पहिल्या मजल्याचा जिना वेगानं चढत होते…
‘अंजली कुलथे’ नावाची 50 वर्षांची नर्स, हे भयानक दृश्य पहिल्या मजल्यावरून पहात होती… 26/11 ला ती ‘नाईट शिफ्ट’ला होती.. ती ‘प्रसूती कक्षाची इन-चार्ज’ होती.. तिच्या वॉर्डमध्ये 20 गर्भवती महिला होत्या….
… हातात बंदूका घेतलेले दोन अतिरेकी जिन्यावरून आपल्याच वॉर्डच्या दिशेनं येतायत हे पाहून अंजली जिवाच्या करारानिशी पुढे सरसावली.. आणि तिनं तिच्या वॉर्डाचे दोन जाडजूड दरवाजे कसेबसे बंद केले..
सर्व 20 महिलांना आणि त्यांच्या काही नातेवाईकांना तिनं त्या मजल्याच्या टोकाला असलेल्या छोट्या ‘पॅन्ट्री’च्या खोलीत हलवलं.. वीस गर्भवती महिलांना अशा आणीबाणीच्या वेळी शिफ्ट करणं ही किती नाजूक आणि जोखमीची गोष्ट होती…
कसाब व त्याचा साथीदार हॉस्पिटलच्या टेरेसवर गेले होते व तिथून खाली जमलेल्या पोलिसांवर गोळया झाडत होते.. ग्रेनेड टाकत होते… ते पाहून अंजलीनं, बाहेर येऊन, ‘जखमी होऊन पडलेल्या नर्सला’ कॅज्युअल्टी मध्ये नेलं आणि तिच्यावर योग्य उपचार सुरु झाले..
इतक्यात वीस पैकी एका महिलेला प्रसववेदना सुरु झाल्या.. अंजलीनं तिला हाताला धरून, भिंतीला चिकटून चालत चालत डिलिव्हरी रूम मध्ये नेलं आणि तिथल्या डॉक्टरच्या साहाय्यानं प्रसूती सुखरूप पार पाडली..
हल्ल्याचा हा थरार संपल्यावर अनेक दिवस अंजली झोपेतून घाबरून उठत असे.. एका महिन्यानी तिला पोलिसांनी पाचारण केलं.. कसाबची ओळख पटवण्यासाठी… नंतर त्याच्या खटल्यात तिला साक्षीला बोलावण्यात आलं.. तिनं कोर्टाला एक विनंती केली… “माझा ‘युनिफॉर्म’ घालून येण्याची परवानगी
मिळावी ! ‘कारण, त्या भीषण रात्री या युनिफॉर्मवर असलेल्या जबाबदारीची मला जाणीव झाली आणि त्यामुळेच मी हे धाडस करू शकले..” असं तिचं म्हणणं होतं…
अंजली कुलथे यांनी त्या रात्री फक्त वीस महिलांचेच नव्हे तर, ‘ ही दुनिया पाहण्याआधीच मृत्युच्या जबड्यात पोहोचलेल्या ‘ वीस बालकांचेही प्राण वाचवले. आज ही मुलं चौदा वर्षांची असतील… त्यांना कदाचित ठाऊकही नसेल की त्यांच्या ‘ दोन जन्मदात्री ‘ आहेत… त्यांना नऊ महिने पोटात वाढवून प्रत्यक्ष जन्म देणारी एक आई …. आणि अंजली कुलथे … जन्माआधीच जीवदान देणारी दुसरी आई !
अंजलीताई तुमच्या अतुलनीय धैर्याला आणि प्रसंगावधानाला सविनय प्रणाम !
लेखक : श्री धनंजय कुरणे
संग्राहिका – सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ll सामान्यातील असामान्य ll – लेखक – अज्ञात ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆
श्री विष्णू झेंडे
अखंड सावधान असावे! दुश्चित कदापि नसावे!
तजविजा करीत बसावे! एकांत स्थळी !!
– समर्थ रामदास.
रेल्वे स्टेशनवर ज्या सूचना पुकारल्या जातात, त्यासाठी वेगळा एक माणूस नेमलेला असतो, जो प्रसंगी रेग्युलर रेकाॅर्डिंग न वाजवता स्वतः माईकवरून सूचना देत असतो. असेच एक ‘अनाऊन्सर’ श्री. विष्णू झेंडे ड्युटीवर असताना रात्री 10 च्या आसपासची वेळ होती. मुंबईतील मोठ्या स्टेशन्सपैकी एक असणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन’वर त्यांची ड्युटी कायमप्रमाणे चालू होती. आणि अचानकपणे कुठेतरी सुतळी बाँब फुटल्यासारखा आवाज यायला लागला. ‘कुठे छोटा-मोठा स्फोट झाला की काय’, असा विचार झेंडेंच्या डोक्यात येऊन गेला. त्यांनी तात्काळ ‘आरपीएफ’ला फोनवर झालेली गोष्ट कळवली, आणि योग्य माहिती घेण्यास सांगितले.
पण असे अनेक आवाज परत परत ऐकू यायला लागले, आणि त्यांना दोन व्यक्ती मोठ्या assault rifles घेऊन प्लॅटफॉर्मवर दिसल्या. ते कसलेही साधे स्फोट वगैरे नव्हते, तर त्या रायफलीतून फायर केले जाणारे राऊंड आणि हँड ग्रेनेड होते, हे एव्हाना स्पष्ट झाले होते.
श्री. झेंडे ज्याठिकाणी बसून रेल्वेच्या सूचना द्यायचे, तिथून सगळ्या प्लॅटफॉर्मवरच्या हालचाली बऱ्यापैकी स्पष्ट दिसायच्या. त्यांना हे दोन्ही रायफलधारी स्पष्ट दिसले होते. त्यातील एक ‘अजमल आमिर कसाब’ आणि दुसरा ‘अबू डेरा इस्माईल खान’ आहे, हे त्यांना त्याक्षणी माहीत नव्हतं, किंवा माहीत असण्याचं कारणही नव्हतं. परंतु हा काही साधासुधा प्रसंग नसून आतंकवादी हल्ला आहे, हे त्यांच्या पटकन लक्षात आलेलं.
असल्या प्रसंगांना सामोरं जाण्याची सवय नसते, तेव्हा भीतीनं गाळण उडणं स्वाभाविक आहे. झेंडेंच्या बाबतीतदेखील वेगळं काय अपेक्षित होतं..? परंतु त्यावेळी त्यांनी ज्याप्रकारे अचानक उद्भवलेल्या परीस्थितीला जे तोंड दिलं, ते अद्भुत होतं.
बुडत्याला काडीचा आधार असतो. इथं तर त्यांच्याजवळ स्टेशनचा पूर्ण आराखडा मेंदूत फिट होता, आणि स्टेशनवर प्रत्येक ठिकाणी स्पीकरशी जोडलेला माईक जवळ होता. आहे त्या परिस्थितीत घाबरून न जाता जे काही करता येईल ते करायचं, असं ठरवून त्यांनी माईक हातात घेतला, आणि लोकांना सावध करायला, सूचना द्यायला सुरुवात केली. मराठी आणि हिंदीमधून ते लोकांना स्टेशनच्या दुसऱ्या मार्गाकडे जाण्यासाठी सूचना करत होते. हे दोन आतंकवादी जिथं होते, तिथून दूर जाण्यासाठी सूचना करत होते.
लोकांवर बेछूट गोळीबार आणि हँड ग्रेनेड्सचा हल्ला चालूच होता, परंतु शेकडो लोक झेंडेंच्या सूचनेनुसार विरुद्ध दिशेला पळून जात होते, संकटापासून वाचत होते.
साहजिकच, त्या दोघांच्या लक्षात आलं, की कुणीतरी लोकांना सावध करतंय, त्यांना सुटकेचा रस्ता दाखवतंय. मग ते या अनाऊन्सरला शोधू लागले.
झेंडेंच्या बाबतीत एक गोष्ट चांगली होती, की त्यांचा आवाज कुठून येतोय, हे कळत नव्हतं, परंतु झेंडे पहिल्या मजल्यावर बसलेले असल्याने दोन्ही आतंकवादी मात्र त्यांच्या नजरेच्या टप्प्यात होते. त्यामुळे त्या दोघांना आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागेल, हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे त्यांनी जितका वेळ शक्य आहे तोवर खिंड लढवायची ठरवली.
नंतरचा अर्धा तास ते माईकवरून लोकांना सूचना देत राहिले. अर्ध्या तासाने जवळजवळ पूर्ण स्टेशन रिकामे झाले होते. तोवर आतंकवाद्यांना देखील ‘ह्या सूचना कुठून येतायत’ ह्याचा सुगावा लागला होता. आता त्यांनी रेल्वे स्टाफच्या लोकांकडे विशेष मोर्चा वळवला,आणि त्यांच्यावर गोळीबार करू लागले. त्यावेळी त्यांनी जिथे झेंडे बसले होते त्या केबिन रूमवरदेखील गोळीबार चालू केला.
त्या गोळीपासून झेंडे बचावले, परन्तु हळूहळू गोळ्यांचा आवाज जवळ जवळ येऊ लागला, तेव्हा त्यांनी काही क्षणांसाठी आपल्या जीवाची आशा सोडलेली. पण स्टेशनवरची गर्दी आता पूर्णपणे कमी झाल्याचं त्यांना समाधान होतं, आणि आता जे होईल त्याला सामोरं जाण्याची मानसिक तयारी केली होती. त्यांचं कर्तव्य त्यांनी दोन पाऊले पूढे जाऊन चोख बजावलं होतं, याचा त्यांना आनंद होता, समाधान होतं.
सुदैवाने ते सुरक्षित ठिकाणी लपले, आणि सुखरूप राहिले.
त्या स्टेशनवर कायम जवळपास हजारो लोक कोणत्याही क्षणी असतात. त्यादिवशी सीएसटी स्टेशनवरच्या हल्ल्यात जवळपास 52 लोकांनी प्राण गमावले. झेंडे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे हा आकडा शेकडोंनी कमी झाला होता. एवढ्यावर त्यांचं योगदान संपलं नाही, तर नंतर खटल्यादरम्यान त्यांनी कसाब विरोधात कोर्टात साक्षदेखील दिली, आणि त्याला शिक्षा मिळवून देण्यातसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली.
अगदी दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून सीएसटी स्टेशनवरील वातावरण निवळून परत नव्याने सगळं सुरू झालं. लोकल्स भरून भरून पाहिल्यासारख्या वाहू लागल्या. परंतु श्री. झेंडे यांचं 26/11 पूर्वीचं आणि नंतरचं जीवन यात प्रचंड बदल घडला असेल. त्या दिवसाच्या आठवणींमधून इतर अनेक प्रभावित लोकांप्रमाणे ते देखील बाहेर पडले नसतील.
आर्मीतील सैनिक आणि पोलीस यांच्याविषयी सदैव अपार आदर आहेच. परंतु श्री. विष्णू झेंडे यांच्याकडे पाहिलं, तरीदेखील मला देशप्रेमाचे भरते तेवढ्याच तीव्रतेने येईल, जेवढे एका सैनिकाकडे पाहून येईल.
लेखक : अनामिक
मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ऋग्वेद व ग्रामोफोन… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆ श्री सुनील देशपांडे ☆
२० नोव्हेंबर १८७७ रोजी एडिसनने पहिला आवाज मुद्रित केला. व तो ग्रामोफोन वर पुन्हा वाजवून दाखवला. अशा प्रकारे ध्वनीचेही मुद्रण म्हणजे तोच आवाज पुन्हा पुन्हा ऐकता येऊ शकतो.
मथळा वाचून आपणास प्रश्न पडेल की ऋग्वेदाचा व ग्रामोफोनचा काय संबंध?
जगातील पहिला आवाज रेकॉर्ड झाला तो मँक्समुल्लर यांच्या आवाजात.
आवाज रेकॉर्ड करुन पुन्हा ऐकवायचा प्रयोग इंग्लंड मधे एका सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.
मॅक्समुल्लर यांना एडिसनने खास जर्मनीहून बोलावून घेतले होते.
मँक्समुल्लर यांनी पहिल्याच रेकॉर्डींगला ऋगवेदातील पहिली ऋचा ‘ अग्नीमिळे पुरोहितम् ‘ ही म्हटली.
ऋग्वेद हा प्राचीन भारतीय वैदिक संस्कृतीतील सर्वात पवित्र ग्रंथ आहे. हिंदू धर्मातील चार वेदांमध्ये ऋग्वेद हा प्रथम वेद आहे. ऋग्वेद हा चार वेदांपैकी एक असून ऋग्वेदाची रचना चार वेदांमध्ये सर्वप्रथम झाली आहे असे समजण्यात येते.
तसेच ऋग्वेद संस्कृत वाङमयातील पहिला ग्रंथ आहे असेही मानले जाते. ऋग्वेदामध्ये एकूण १० मंडले व १०२८ सूक्ते आहेत. निसर्गातील विविध शक्तींना देवता मानले आहे. त्यांची स्तुती गाणारी कवने ऋग्वेदात आहे. ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास ऋचा असे म्हणतात. ऋग्वेद रचनेचा काल सुमारे इ.स.पू.५००० च्या सुमारासचा असावा असा लोकमान्य टिळक यांनी मांडलेला अंदाज आहे. ऋग्वेदाची मांडणी व्यवस्था महर्षी व्यास यांनी पाहिली.
ऋग्वेदातील सूक्तांचे कर्ते ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीनही वर्णांचे आहेत. ऋग्वेदामध्ये पाठभेद नाहीत. ‘अग्निमिळे पुरोहितम्’ हे ऋग्वेदाचे पहिले सूक्त आहे.
पाणिनीच्या काळात ऋग्वेदाचा अर्थ समजण्यासाठी पदे, क्रम इत्यादी व्यवस्था निर्माण झाली. ती पदे न फिरवता तशीच म्हंटली जावीत या साठी जटापाठ आणि घनपाठ म्हणण्याची पद्धत सुरू झाली.
ऋग्वेद हा स्तुतिपर असून पद्यमय आहे. ऋग्वेदाच्या १०व्या मंडलातल्या पुरुषसूक्तात तीनही वेदांचा उल्लेख आहे.
ऋचा रेकॉर्ड झाल्यावर पुढिल प्रक्रियेला काही कालावधी लागला. मधल्या काळात मँक्समुल्लर यांनी म्हंटलेली ऋचा ,त्याचा अर्थ, ऋगवेद व इतर वेद ,संस्कृत भाषा ,हिंदू संस्कृती या बद्दल विवेचन केले.
जगातील पहिल ध्वनी संदेश हा वेदातील ऋचा आहे, याचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे.
महान शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन व मँक्समुल्लर यांना अभिवादन।।।
☆ अवघ्या चाळीस दिवसांचा उशीर ☆ श्री संभाजी बबन गायके☆
मी प्रथम. प्रेमाच्या माणसांसाठी मी यश. मी सुद्धा आपल्या भारताच्या तिन्ही सेनादलांच्या प्रमुख महामहिम राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना मोठ्या अभिमानाने कडक सल्यूट बजावला असता ३० नोव्हेंबरला सकाळी आमच्या पासिंग आऊट परेड मध्ये आणि अंतिम पग पार करून सैन्याधिकारी झालो असतो… पुढे आणखी प्रशिक्षणासाठी गेलो असतो, आणि काही वर्षांत देशाच्या सीमेवर जाऊन उभा राहिलो असतो… पण आता मी नाहीये त्या माझ्या बॅचमेटसच्या शिस्तबद्ध, रुबाबदार रांगेत. माझी जागा दुसरा कुणीतरी भरून काढेलच…. सैन्य थांबत नाही कुणासाठी.
बारा-पंधरा वर्षे हृदयात घट्ट रुतवून ठेवलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरायला केवळ चाळीसच दिवस उरलेले होते… आणि एवढ्यातच प्राणांचं पाखरू उडून गेलं..!
आईला मानलं पाहिजे माझ्या, आणि वडिलांनाही. दोघंही व्यवसायाने शिक्षक. मी एकुलता एक. पण मी लष्कराच्या वाटेने जायचं म्हणालो तेंव्हा त्यांनी नाही अडवलं मला. खेड्यात राहून शिकलो सुरुवातीला, आणि मग सैनिकी शाळेत जागा पटकावली. तसा मी काही फार बलदंड वगैरे नव्हतोच कधी, पण लढायला आणि सैनिकांचं नेतृत्व करायला आवश्यक असणारी मानसिक कणखरता, शास्त्र आणि शस्त्रांचं ज्ञान मात्र मी कष्टपूर्वक प्राप्त केलं होतं एन. डी. ए. मधल्या खडतर प्रशिक्षणात….. थोडीथोडकी नव्हेत तर तब्बल चार वर्षे.
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पासिंग आऊट परेड व्हायची बातमी आई-बाबांना कळाली तेंव्हापासून त्यांनी एन.डी.ए. मध्ये ही परेड पाहण्याची, माझ्या खांद्यावर, छातीवर ऑफिसरची पदकं पाहण्याची स्वप्नं रंगवायला आरंभ केला होता….. फक्त महिना-सव्वा महिन्यांची तर प्रतिक्षा होती. दोघांच्या पगारातून रक्कम शिल्लक ठेवत ठेवत त्यांनी माझा आतापर्यंतचा खर्च भागवला होता. मी अभ्यासात हुशार होतोच, सहज इंजिनियर, डॉक्टर झालो असतोच म्हणा. पण मला लष्करी वर्दीचं आकर्षण लहानपणापासून… नव्हे, तसा माझा हट्टच होता… आणि आई-बाबांनीही या एकुलत्या एका लेकाचं मन नाही मोडवलं.
माझी एन.डी.ए. मध्ये निवड होणं ही किती मोठी गोष्ट असेल हे ज्यांनी प्रवेश परीक्षा, मुलाखत, वैद्यकीय चाचणी, ही दिव्यं पार पाडली असतील त्यांना जास्त चांगले समजू शकेल. आईबाबांना मात्र आपला मुलगा सैन्याधिकारी होणार याचीच मोठी अपूर्वाई होती. प्रशिक्षणास दाखल होताना बाबांनी फॉर्मवर सही करताना वाचलंही होतं…. ‘प्रशिक्षणादरम्यान काही झालं तर, अगदी मृत्यू झाला तरी ‘माजी लष्करी अधिकारी’ अशी ओळख आणि नुकसानभरपाई मिळणार नाही….’ तसा कायदाच आहे लष्कराचा. आता हा नियम मोठ्या लोकांनी तयार केला आहे आणि आजही हा नियम लागू आहे, म्हणजे त्यांनी काहीतरी विचार केला असेलच की!
त्या फॉर्मवर सही करताना बाबांनी आईकडे एकवार पाहिलंही होतं ओझरतं… पण असं काही आपल्या प्रथमबाबतीत होईल असा विचारही त्यांचं मन करू धजत नव्हतं. मूळात सैन्य म्हणजे मृत्यूची शक्यता हे समीकरण त्यांनाही माहीत होतंच… त्यांनी काळजावर दगड ठेवून मला एन.डी.ए. च्या पोलादी प्रवेशद्वारातून निरोप दिला…. “यश यशस्वी हो!” दिवस होता १८ एप्रिल,२०२१.
१९४९ मध्ये स्थापन झालेल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इतिहासात प्रशिक्षणार्थी सैन्याधिकाऱ्यांचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू होण्याच्या तीन घटना घडून गेल्या होत्या…. २ जुलै, २००९ रोजी कॅडेट नितिश गौर, ६ जानेवारी,२०१२ रोजी कॅडेट के. विघ्नेश, ३ फेब्रुवारी,२०१३ रोजी कॅडेट अजितेश अतुल गोएल हे ते तिघे. आता मी चौथा १८ नोव्हेंबर,२०२३ ला या तिघांना जॉईन झालो! लक्ष्य गाठण्याच्या सर्वांत जवळ येणाऱ्यांत मात्र मी प्रथम आलो…
केवळ सव्वा महिना! लष्करात गेलो असतो, लढलो असतो आणि वीरगतीस प्राप्त झालो असतो तर देहाचं सोनं झालं असतं आणि मुख्य म्हणजे आई-बाबांना माझ्या जाण्यानं दु:ख झालं असतं तसा अत्यंत अभिमानही वाटला असता! अर्थात आताही त्यांना माझा अभिमानच वाटत असेल… मी पूर्ण प्रयत्न केले याबद्दल. बाकी एकुलता एक लेक गमावण्याचं त्यांचं दु:ख इतर कुणी समजूही शकणार नाही, हेही खरेच. असो. ईश्वरेच्छा बलियेसी!
असंच काहीसं बोलला असता ना प्रथम ऊर्फ यश महाले जर त्याला आपल्याशी तो आपल्यातून निघून गेल्यानंतरही बोलता आले असते तर?
आजवर एकट्या एन.डी.ए. मधून सुमारे ६००० हजार प्रशिक्षणार्थ्यांपैकी सुमारे २.०६% प्रशिक्षणार्थी विविध वैद्यकीय कारणांनी पुढे प्रशिक्षण सुरू ठेवण्यापासून आणि अर्थातच अधिकारी बनण्यापासून वंचित राहिलेले आहेत. आणि ही गोष्ट अपरिहार्य सुद्धा आहेच… देशाच्या संरक्षणाचा प्रश्न आहे…. पण या मुलांचं पुढे काय होतं? हे फारसं कुणाला ठाऊक नाही असं दिसतं. ही मुलं साधी, सामान्य का असतात? लाखोंमधून शेलकी निवडून काढलेली असतात. त्यांचे पालक काळजावर दगड ठेवून त्यांना लष्करात धाडत असतात. लष्करात घेताना एकही व्यंग चालत नाही आणि तोच लेक आईला परत देताना धड दिला जाईल किंबहुना धडासह दिला जाईल, याची शाश्वती कुणासही देता येत नाही!
प्रशिक्षणादरम्यान उदभवलेल्या वैद्यकीय कारणांनी किंवा मृत्यू झाल्याने प्रशिक्षण पूर्ण झालेले नाही, सबब त्यांना माजी लष्करी कर्मचाऱ्याचा दर्जा देता येणार नाही, आणि अर्थातच माजी लष्करी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या पालकांना लागू होणारे आर्थिक लाभही देता येणार नाहीत… हे सकृतदर्शनी व्यावहारीकच वाटणे साहजिकच आहे…. पण थोडा अधिक विचार केला तर परिस्थिती भयावह आणि अत्यंत निराशाजनक आहे.. आणि मूळात समाजाला शोभणारी नाही.
ही तरणीताठी, बुद्धीमान, देशप्रेमी आणि धाडसी मुलं (आणि हल्ली मुलीही) देशासाठी मरणाच्या वाटेवर स्वत:हून चालायला निघतात…. ती काही स्वखुशीने जखमी होत नाहीत किंवा मरणही पावत नाहीत! जखमी होणाऱ्या या मुलांना देय असलेल्या रकमांचे आकडे पाहून काळजात कसंतरी होतं. विविध योजनांमधून रूपये साडे तीन हजार, रूपये सहा हजार नऊशे, सात लाख असे काहीसे आकडे आहेत हे… त्यात किती टक्के अपंगत्व हा भाग आहेच. शासकीय नोकऱ्यांमधील काही (विशेषत: निम्नस्तरावरील) पदांच्या भरतीत प्राधान्यही देतात! एवढं पुरेसं वाटतं आपल्या व्यवस्थेला. आणि ही व्यवस्था काही आजची नाही!
याच पार्श्वभूमीवर क्रिकेट खेळात बळी घेणाऱ्या आणि बळी जाणाऱ्या, धावा घेणाऱ्या क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या करमुक्त काहींना पाच लाख, काहींना सात-सात कोटी, मॅन ऑफ दी मॅचचे लाखभर रूपये, या रकमा नजरेत भरतात, यात नवल नाही. रणांगणावरील बळी आणि मैदानावरील बळी यात फरक असला पाहिजे.
शिवाय प्रशिक्षणात जखमी झालेल्यांना आयुष्यभर सोसावं लागणारं ‘दिव्यांगत्व’ हा तर निराळाच मुद्दा आहे. मृत प्रशिक्षणार्थ्यांच्या पालकांना काय देत असेल व्यवस्था हे ठाऊक नाही! असो.
गेल्या काही वर्षांत लोकसभेत आणि राज्यसभेत याबाबतीत तत्कालीन सरकारांना बिगरतारांकीत प्रश्न विचारण्यात आले होते. त्याची उत्तरेही दिली गेलीत. काही उपाययोजनाही केल्या गेल्या आहेत, असे समजते. पण त्या पुरेशा नाहीत असं समजायला वाव आहे.
आपल्या यश साठी आपण काही करू शकतो का? ही आर्थिक व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी व्यवस्थेला विनंतीपर पत्र, ईमेल, आवाहन करू शकतो. आपल्या प्रतिनिधींमार्फत आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवू शकतो.
महाराष्ट्र राज्यशासनही आहेच.
रस्ते अपघातात मरण पावलेल्यांच्या जवळच्या नातलगांना त्वरीत लाखो रूपयांची नुकसानभरपाई जाहीर केली जाऊन दिलीही जाते. यश महालेंच्या बाबतीत राज्य सरकारला असे काही करण्याचे सुचवू शकतो.
एक नागरीक म्हणून काही निधी उभारून यश अर्थात प्रथमचे यथोचित स्मारक उभारून, त्याच्या नावाने अकॅडमी स्थापन करून, उदयोन्मुख तरूणांना प्रशिक्षणासाठी आर्थिक साहाय्यासाठी आर्थिक तरतूद करता येईल. किंवा यांसारख्या अन्य सकारात्मक बाबींचा विचार करता येईल.
प्रथमच्या आईबाबांचे नुकसान मात्र आपण काहीकेल्या भरून देऊ शकणार नाही आहोत…. हे मान्य करतानाच आपण काहीतरी केले पाहिजे हे मात्र तितकेच खरे आहे…. कारण देशाला अशा यश आणि प्रथमची गरज कायमच भासणार आहे. यात आपली मुलं कधीच कमी पडणार नाहीत हे खरं असलं तरी आपण काय करणार आहोत… हेही महत्त्वाचे आहे.
दिवंगतSquadron Cadet Captain Pratham Mahale यांना भावपूर्ण श्रद्धांजली… जयहिंद सर !
(मी अनाधिकाराने वरील विचार मांडले आहेत.. व्यवस्थेविरोधी लेखन नाही…. पण काही सुचवू पाहणारे मात्र निश्चित आहे. आणि असा विचार असणारे अनेक लोक आहेत. त्यांनी एकत्र आले पाहिजे. लेखाच्या आरंभीचे लेखन मी यशच्या भूमिकेत जाऊन केले आहे. बाकी आपण सूज्ञ आहातच.)
☆ फ्रान्सच्या भूमीवरच्या भारतीय पावलांचं मराठी नेतृत्व ! ☆ श्री संभाजी बबन गायके☆
भारतीय प्रमाणवेळ फ्रान्सपेक्षा साडेतीन तासांनी पुढे आहे. उद्या अर्थात शुक्रवार, दिनांक १४ जुलै, २०२३ रोजी फ्रान्समध्ये सकाळचे दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटे होतील, त्याच क्षणी एका मराठमोळ्या योद्ध्याचा भरभक्कम आवाज घुमेल आणि आसमंत थरारून उठेल!
त्याच्या एका आज्ञेसरशी एकशे चोपन्न पावलं तिथल्या लष्करी संचलन पथावर आपल्या मजबूत पावलांचा पदरव करीत मोठ्या डौलाने चालू लागतील ! त्यांच्या पुढे असतील महाराष्ट्राचे सुपुत्र कॅप्टन अमन हनुमानराव जगताप…. आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला वीर योद्धा !
फ्रान्समध्ये भारतीय सैनिकांची पडलेली ही काही पहिली पावलं नसतील. दोन्ही महायुद्धांमध्ये भारतीय सैनिक दोस्तसैन्याच्या बाजूने लढले आणि हजारोंच्या संख्येने धारातीर्थीही पडलेत! पहिल्या महायुद्धाने एक लाख तीस हजार भारतीय सैनिकांपैकी सुमारे चौऱ्याहत्तर वीरांचा बळी घेतला तर सदुसष्ट हजार योद्ध्यांना अपंगत्व पत्करावे लागले. दुसऱ्या महायुद्धातून तर तब्बल सत्त्याऐंशी हजार सैनिक माघारी परतले नाहीत!
या युद्धांची कारणे, परिणाम काहीही असली, शत्रू-मित्र देश कोणतेही असले तरी, या युद्धयज्ञात एक लाख एक्केचाळीस हजार भारतीयांनी बलिदान दिले आहे, हा इतिहास आहे. यात पंजाबी वीरांची संख्या सर्वाधिक, अर्थात सुमारे त्र्याऐंशी हजार भरते. कणखर मनाच्या पंजाबी देहांतल्या रक्तात परंपरेने वहात असलेलं सैनिकी रक्त आज आपल्या स्वतंत्र भारताचे एक मोठे बलस्थान आहे!
राष्ट्रगीताच्या पहिल्याच ओळीत आधी पंजाब आणि अखेरीस मराठा हे शब्द येतात, हा एक योगायोग खचितच नसावा!
फ्रेंच राज्यक्रांतीच्या इतिहासात चौदा जुलै हा दिवस एक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आणि फ्रान्स देश या दिवसाच्या स्मृती तेथील जनमानसात कायम रहाव्यात म्हणून या दिवशी खास लष्करी पथसंचलनाचे आयोजन करतो.
आपला भारत आणि फ्रान्स यांचं लष्करी नातं तसं खूप जुनं असलं तरी गेल्या पंचवीस वर्षांत या संबंधांना उत्तम भक्कम परिमाण लाभले आहे. राफेल विमानांनी आपल्या वायूदलाला अधिक बळ प्राप्त झालेले आहे. जागतिक राजकारणातही फ्रान्स आपला मित्रदेश आहे.
भारत-फ्रान्स लष्करी सहकार्याचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याचं निमित्त साधून फ्रान्सने भारताचे सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांना या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. याच बरोबर भारताच्या तिन्ही सेनादलांची प्रत्येकी एक तुकडी या पथसंचलानात सहभागी होत आहे. राजपुताना रायफल्सचा वाद्यवृंदही आमंत्रित केला गेला आहे.
भारताचे लष्करी सामर्थ्य, सैनिकांचा रुबाब जगाला दाखवण्याची ही संधी साधणं हेही खूप महत्त्वाचं आहे. या दृष्टीने हा समारंभ साऱ्या भारतासाठी महत्त्वाचा ठरावा!
यातील वायूदलाच्या संचलनाचे नेतृत्व एक महिलेच्या हाती असणार आहे… स्क्वाड्रन लीडर सिंधु रेड्डी हे त्यांचं नाव. तर भारतीय आरमाराचं प्रतिनिधित्व कमांडर व्रत बघेल करणार आहेत.
पंजाब रेजिमेंटचं राष्ट्रीय दिनांवेळचे राजपथावरील संचलन हे अतिशय नयनरम्य अभिमानास्पद वाटावे असेच असते. फ्रान्स मध्ये ‘बॅस्टील डे परेड’वेळी आपल्या भारतीय पायदळाचे प्रतिनिधित्व पंजाब रेजिमेंट करणार आहे. प्रजासत्ताक दिन संचलनात या रेजिमेंटने २०१८ मध्ये आणि २०२३ मध्ये उत्कृष्ट पथकाचं पारितोषिक पटकावले आहे. यातील २०२३ च्या संचलनाचे नेतृत्व केले होते कॅप्टन अमन हनुमानराव जगताप यांनी!
अर्थातच फ्रान्स मधली ही जबाबदारीही या आपल्या कॅप्टन साहेबांच्या खांद्यांवर आहे आणि ते ती उत्कृष्टपणे निभावतील यात शंकाच नाही.
फ्रान्स मधील संचलनाच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर काही वृत्तपत्रांनी कॅप्टन साहेबांविषयी (विशेषत: दै.सकाळ, पुणे) माहिती प्रसिद्ध केली होतीच. पण त्याच्या आधी काही वर्षांपूर्वी स्वत: कॅप्टन अमन साहेबांनी स्वत:चा एक छोटा जीवनपट एका युट्यूब विडीओच्या माध्यमातून प्रसारीत केला आहे. हा विडीओ खूप प्रेरणादायी आहे. त्यात बालक अमन हे लष्करी गणवेशात सल्यूट करताना दिसतात एका छायाचित्रात. बालपणीचा त्यांचा देशसेवेचा ध्यास आज एका अभिमानास्पद वळणावर येऊन ठेपला आहे.
पुण्यात जन्मलेल्या आणि नगरमध्ये शिक्षण घेतलेल्या कॅप्टन अमन हनुमानराव जगताप साहेबांनी अगदी ठरवून आपले लष्करी जीवन घडवले आहे. राजपथ संचलन हे एका अर्थाने त्यांच्या खूप आवडीचं आणि सवयीचं बनलं आहे, असेच आढळते.
एन.सी.सी. मध्ये विद्यार्थी कडेट असताना दिल्लीच्या राजपथावर एन.सी.सी. पथकाच्या पथसंचलनाचे नेतृत्व अमन साहेबांकडेच होते आणि त्यावर्षी त्याच पथकाला प्रथम क्रमांक मिळाला होता! पुढे सैन्यात भरती झाल्यावर त्यांची नेमणूक पंजाब रेजिमेंटमध्ये झाल्यावर त्यांनी संचलनाचे नेतृत्व करावे, हे जणू ओघाने आलेच! त्यांची शिस्त, पथसंचलनातील जोश, रूबाब, अचूकता, सहकाऱ्यांवर असलेला विश्वास आणि नियंत्रण, त्यात अत्यंत रुबाबदार पंजाबी सैनिक, या गोष्टींमुळे त्यांच्या पथकाला सर्वश्रेष्ठ स्थान न मिळते तरच नवल!
चौदा जुलैच्या पथ संचलनात भारताच्या पायदळाच्या संचलन पथकाच्या अग्रभागी अत्यंत अभिमानाने आणि रुबाबाने चालत नेतृत्व करणाऱ्या या मराठमोळ्या मर्दाला पाहताना प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेलच!