☆ रतन टाटा यांची एक अविस्मरणीय मुलाखत ! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजिरी येडूरकर ☆
“मला तुमचा चेहरा आठवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन.”
जेव्हा भारतीय अब्जाधीश रतनजी टाटा यांना एका रेडिओ प्रेजेंटरने टेलिफोन मुलाखतीत विचारले: “सर, तुम्हाला जीवनात सर्वात जास्त आनंद झाला, ती आठवण सांगाल का”?
रतनजी टाटा म्हणाले: “मी जीवनात आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला.”
पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधने जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही.
मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे मला जाणवलं.
त्यानंतर महत्वाचा तिसरा टप्पा आला. तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील 95% डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालकही होतो. पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही.
चौथा टप्पा होता जेव्हा माझ्या एका मित्राने मला काही अपंग मुलांसाठी व्हील चेअर विकत घेण्यास सांगितले. सुमारे 200 मुले होती. मित्राच्या सांगण्यावरून मी लगेच व्हील चेअर घेतली.
पण मित्राने आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन मुलांना व्हील चेअर स्वहस्ते द्यावी . मी त्यांच्यासोबत गेलो. तिथे सर्व पात्र मुलांना मी स्वतःच्या हाताने व्हीलचेअर दिल्या. या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची विचित्र चमक दिसली. मी त्या सगळ्यांना व्हील चेअरवर बसून इकडे तिकडे फिरताना आणि मजा करताना पाहत होतो..जणू ती सगळी मुलं पिकनिक स्पॉटवर पोहोचली होती, जणु काही कसलातरी विजयोत्सवच होता तो. त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला. मी तिथून परत जायला निघालो तेव्हा त्या मुलांपैकी एकाने माझा पाय धरला. मी हळूवारपणे माझा पाय सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाने सोडले नाही आणि त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि माझे पाय घट्ट धरले. मी झुकलो आणि मुलाला विचारले: “तुला आणखी काही हवे आहे का?”
मग मुलाने मला जे उत्तर दिले, त्याने मला धक्काच दिला नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला.
मुलाने म्हटले: “मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन.”
वरील विस्मयकारक कथेचे सार हे आहे की आपण सर्वांनी आपल्या अंतरंगात डोकावून विचार केला पाहिजे की, हे जीवन, संसार आणि सर्व ऐहिक कार्ये सोडल्यानंतर आपली आठवण राहील का?
#कोणीतरी तुमचा चेहरा पुन्हा पाहू इच्छित आहे, ही भावना सगळ्यात जास्त आनंद देणारी असते.
भावपूर्ण श्रध्दांजली
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ उंची आभाळाएवढी… पाय मात्र जमिनीवर… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
एकदा एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीचा मालक आपल्या अतिमहत्वाच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर, एका ठिकाणी तातडीच्या मिटिंगला निघाला होता . . मोठी आलिशान गाडी होती. आणि प्रवास साधारण तीन चार तासाचा होता. सर्वजण सकाळी लवकर निघाले होते.
गाडी वाटेत आल्यावर . . गाडीच्या ड्रायव्हरच्या लक्षात आले की मागील एक चाक पंक्चर आहे, त्याने ती गाडी एका बाजूला घेतली. आणि सर्वाना उतरायला सांगितले. सर्वजण तसे खुश झाले कारण सगळे सकाळीच निघाल्याने आणि मध्ये न थांबल्याने ब्रेक हवाच होता. मालक आणि बाकी सर्वजण उतरून इकडे तिकडे गेले. कोणी जवळच्या धाब्यावर सिगारेट ओढू लागले. कोणी झुडुपाआड गेले.
अर्ध्या तासाने सर्वजण एका ठिकाणी एकत्र जमले पण सर्व टीम एकत्र आली तरी मात्र मालक नाही दिसले. सगळे जण शोधायला लागले पण कुठे दिसेनात. दहा मिनिटानी सर्वजण जिथे गाडी पंक्चर झाली होती तिथे जमले तर, मालक हातात स्पॅनर घेऊन.. शर्टाचे हात कोपरापर्यंत दुमडून.. घामाघूम होऊन.. चेहऱ्यावर मंद स्मित ठेवून ड्रायव्हरला स्टेपनीचे चाक हातात घेऊन मदत करताना दिसले.
आणि तिथेच पहिला धडा सर्व उच्च अधिकाऱ्यांना मिळाला. “थोर व्हायला . . . तुम्हाला जमिनीवर उतरून काम करावे लागते आणि जमिनीवरील प्रॉब्लेम माहित असावे लागतात. नुसते आदेश सोडून अधिकारी बनतात… मालक नाही होता येत. “
त्या उद्योगपतीचे.. म्हणजे मालकाचे नाव.. “श्री. रतन टाटा”.. नाशिक येथे नेल्कोची टीम घेऊन जाताना प्रत्यक्ष घडलेला हा प्रसंग … बरंच काही शिकवून गेलेला.
सिग्मंड फ्राईड हे व्यवसायाने डॉक्टर होते. रोग्याशी प्रत्यक्ष संबंध आणि स्वतःची शास्त्रीय प्रतिभा वापरल्याने फ्राईड यांना मानवासंबंधी विलक्षण साक्षात्कार झाला. त्यांना मानवाचे एक आगळेच दर्शन घडले. त्यांना असे आढळून आले की, माणसाला होणाऱ्या रोगांपैकी कितीतरी रोग असे असतात की ते दिसतात शारीरिक, पण त्यांचे कारण असते मात्र मनात.
त्यांना असेही आढळून आले की रोग्याचे शरीर निकोप असले तरी मन निकोप नसते. काही विशिष्ट वासना, अत्यंत प्रबळ इच्छा, ह्या ना त्या कारणांनी दाबून-दडपून टाकाव्या लागल्यामुळे शरीरात या विशिष्ट रोगाची निर्मिती करतात आणि बाह्य लक्षणे दिसायला लागतात. ह्याचे कारण मनामध्ये आहे. हे फ्राईडच्या लक्षात आलं. मग त्याने मनाचा अभ्यास केला. मनाचे दोन भाग असतात असे त्यांच्या लक्षात आले. पहिल्या भागाला फ्राईडनी नाव दिले ‘जाणीव युक्त मन’ (Conscious Mind) आणि दुसऱ्याला नाव दिले ‘नेणीवयुक्त मन’ (Subconscious Mind). !
फ्राईड यांना असे आढळून आले की स्वतःच दडवून ठेवलेल्या स्वतःच्याच ज्या वासनांची रोग्यांना जाणीव नसते, त्या वासना-इच्छा या ‘नेणीवयुक्त’ मनात डांबल्या गेलेल्या असतात. वासना किंवा इच्छारुपी या प्रबळ प्रेरणांच्या अंगी प्रचंड शक्ती असते. ही शक्ती अशी जबरदस्तीने डांबली गेल्यामुळे ती ज्ञानतंतुंवर दाब आणून शारीरिक विकृती वा रोग निर्माण करतात. मानवी मनाच्या क्रिया-प्रक्रियांचे अध्ययन करणाऱ्या शास्त्राला आपण “मानसशास्त्र”(Psychology) म्हणतो.
बहुतेकांना वाटतं ‘स्वप्ने ही भविष्य दर्शवितात, ‘ पण फ्राईडच्या मते स्वप्ने ही वस्तुतः भूतकाळ अथवा गतकाळाची निदर्शक असतात. त्यात भविष्य असं नसतंच. स्वप्न म्हणजे दाबलेल्या वासनांचे रुप ! असं ते म्हणतात. स्वप्न या अवस्थेत मनुष्य बेसावध असतो. पण बेशुद्ध नसतो. त्या वेळी त्याच्या ‘मनातले’, त्याच्या ‘नेणीवे’तले विचार बाहेर येत असतात. हाच धागा पकडून फ्राईडने नंतर आपल्या कितीतरी रोग्यांचे निदान हे त्यांचे स्वप्न ऐकून.. त्यांच्या मनात काय चाललंय हे आणि नेमकं काय त्यांच्याशी होत आहे.. हे ठरवून थिअरी तयार केली.. अशा पद्धतीने फ्राईडने स्वप्न आणि त्यांचा आपल्या रोग्याशी असलेला संबंध जोडला जो बऱ्याच अंशी खरा ठरला.
… एखाद्याबद्दल चांगली किंवा वाईट बातमी कळली की आपल्या मेंदूतून एक विशिष्ट प्रकारचा द्राव किंवा डोपामाईन रिलीज करण्यात येते.. जे मनुष्याला आनंद देतं किंवा नर्व्हस करतं.. जसं की रील बघितल्यानंतर जर त्या रिलमध्ये कोणी खाली धपकन पडला.. तर आपल्याला एक प्रकारचा आनंद होतो.. हसायला येतं.. पण ह्या मागे एक विज्ञान आहे.. तो पडला.. म्हणजे त्याला लागलं.. आता तो हालचाल करू शकणार नाही.. आपल्यापेक्षा तो दुर्बळ झाला.. आणि आपण आता त्याच्यापेक्षा कुठेतरी श्रेष्ठ झालो. असं काहीसं मेंदूच्या आतमध्ये माणसाला सुखावणार चालू असतं.. त्यामुळे मनुष्य आनंदी होतो.. ह्यूमन सायकॉलॉजी हा खरोखर अभ्यासाचा विषय आहे.. सिग्मंड फ्राईडने ‘इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स’मधे स्वप्न हे आपले नसतातच आपल्या सबकॉन्शिअस माईंडमध्ये जे काही साठवून ठेवलेलं असतं त्याच्यावरची तुमची थॉट प्रोसेस ती असते. स्वप्नात जर तुमचे दात पडताना दिसत आहे तर तुमचा कॉन्फिडन्स कमी आहे. असं तो सांगतो. जर तुम्हांला स्वप्नात तुम्ही नग्न अवस्थेत बघताय तर खऱ्या जगामध्ये तुमचा प्रभाव कमी आहे. असा त्याचा अर्थ त्यांनी सांगितला आहे. आपलाच मेंदू आपल्याला पॅरासाईट बनवून वेगवेगळ्या पद्धतीने वागवत असतो.. भीती घालत असतो.. आता मला परवा स्वप्नात दिसले की मी पप्पांना आयफोन गिफ्ट करतोय मला चांगला जॉब लागला आहे.. आता सबकॉन्शिअसमध्ये माझा जॉब आणि आयफोन याचाच विचार चालू असल्याने त्या पद्धतीचे स्वप्न मला पडलं.. सोसायटीमध्ये रिडेव्हलपमेंटचे काम चर्चेत असल्याने बायकोलाही चांगलं तीन रूमचं घर असल्याचं स्वप्न पडलं. त्यामुळे फ्राईडने सांगितलेली स्वप्नाबाबतची थेअरी खरी वाटते.. आधुनिक काळातल्या माणसाची स्वप्न मात्र फार कॉम्प्लिकेटेड झाल्याचे तो बोलतो.. आधी मनुष्य जंगलात राहायचा त्याच्या एवढ्या सा-या आशा अपेक्षा नव्हत्या. पोट भरणे किंवा अन्न, वस्त्र, निवारा ह्या पलीकडे त्याच डोकं नव्हतं.. पण आता मात्र माणसाचा अन्न, वस्त्र, निवारा खूप मोठा झाला आहे. फ्लॅट, फियाट आणि फ्रिजचे आकार वाढले आहे.. त्यामुळे स्वप्नातही त्याला तेच दिसते.
स्वप्नामध्ये आपल्याला टेक्स्ट किंवा अक्षरं कधी दिसत नाही.. स्वतःचे हात किंवा कुठल्याही प्रकारचा टाईम तुम्हांला दिसत नाही.. स्वप्नामध्ये नेहमी 80% सकाळच असते.. म्हणजे उजेडी स्वप्न जास्त असतात.. रात्रीचे म्हणजे अंधारातील बरीच कमी स्वप्ने असतात.. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी स्वप्नांमध्ये तुम्हांला टेक्स्ट किंवा अक्षरं लिहीता येत नाही.. वाचता येत नाही.. जर स्वप्नांमध्ये काही वाचायचा प्रयत्न केला तर जाग येणार किंवा स्वप्न तुटेल.. स्वप्नामध्ये स्वतःची बोटं सुद्धा आपल्याला मोजता येत नाहीत. म्हणजे काउंटिंग करता येत नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी माणसाच्या नैसर्गिक स्किल नाहीत ! मॅथस, आकडेमोड, टेक्स इंटरप्रिटेशन ह्या सगळ्या गोष्टी आपण खूप नंतर डेव्हलप केलेल्या आहेत.
मात्र आपण स्वप्नांमध्ये पळतो, झाडावर चढतो कारण त्या आपल्या नैसर्गिक स्किल आहेत.. स्वप्नांत आपण बोलत सुद्धा खूप नाही.. कारण सुरुवातीला इशाऱ्याचीच भाषा होती. स्वप्नात त्यामुळे काय बोलतो हे पण नीट कळत नाही! कारण आपला ब्रेन.. आपला मेंदू दहा हजार वर्ष जुनाच आहे मात्र टेक्नॉलॉजी ही अत्याधुनिक आहे.. त्याच्याशी मिळतेजुळते घेणे अजूनही मेंदूला जड जात आहे.
☆ मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय झालं? ☆ श्री आशिष बिवलकर ☆
निकष काय होते? कोणते फायदे मिळणार?
भाषेला अभिजात दर्जा मिळणे म्हणजे काय?
संपूर्ण महाराष्ट्राला व जगभरात पसरलेल्या मराठीजनांना अभिमान वाटावा अशी बातमी नुकतीच समोर आली आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने गेल्या अनेक दशकांपासूनची मराठी जनतेची ही मागणी पूर्ण केली आहे. अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे सर्व निकष मराठी भाषेने पूर्ण केले आहेत. मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीसह पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
दरम्यान, काही लोकांना प्रश्न पडला आहे की, एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं? यामुळे काही फायदे मिळणार? आणि अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे निकष काय असतात? या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देत आहोत.
अभिजात दर्जा मिळणे म्हणजे काय?
देशात आतापर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तमिळ भाषेला सर्वात आधी २००४ साली अभिजात दर्जा प्रदान करण्यात आला. त्यापाठोपाठ संस्कृत (२००५), कन्नड (२००८), तेलुगु (२००८), मल्याळम (२०१३) आणि ओडिया (२०१४) या भाषांना अभिजात दर्जा बहाल केला गेला. हा दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहोर उमटते.
अभिजात दर्जा असलेल्या भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे २५०-३०० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते. भाषा भवन उभारणे, त्या भाषेतील ग्रंथ व साहित्याचा प्रसार करणे, ग्रंथालये उभारणे, देशभरातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रसार यासह इतर प्रकल्पांसाठी आर्थिक पाठबळ दिलं जातं. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास त्या भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात. सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिजची स्थापना केली जाते. प्रत्येक विद्यापीठात त्या त्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारलं जातं. भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची व्यवस्था केली जाणार. प्राचीन ग्रंथांचा अनुवाद केला जाणार.
भाषेला ‘अभिजात दर्जा’ मिळण्याचे निकष काय?
अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा किमान दीड ते दोन हजार वर्षे प्राचीन असायला हवी. त्या भाषेतील समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी. ते मूळ त्याच भाषेतील लिहिलेले असावे, अनुवादित नसावे. भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नाते सुस्पष्ट असावे, अशा सर्वसाधारण अटी आहेत. एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यावर साहित्य अकादमीकडून पुराव्यांची छाननी होते. त्रुटींची पूर्तता झाल्यावर पुरावे योग्य असल्यास केंद्रीय सांस्कृतिक खात्याकडे शिफारस केली जाते व मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर केला जातो. मराठी भाषेने हे सर्व निकष पूर्ण केले आहेत.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री आशिष बिवलकर
बदलापूर – मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “मराठवाडा मुक्ती-संग्रामाचा इतिहास…” लेखक : अज्ञात ☆ माहिती प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
पूर्वपीठिका…
संत ज्ञानेश्वरांच्या कालात आपल्या मराठवाड्यावर आपलेच राज्य होते. देवगिरी ही राजधानी होती आणि रामदेवराय हा राजा होता.
अल्लाउद्दीन खिलजी या परकीय आक्रमकाने इ. स. १२९४-९५ ला आपल्यावर स्वारी केली, रामदेवरायास हरवले आणि आपण परतंत्र झालो. मराठेशाहीत आपल्यावर राज्य करणार्या निजामास थोरला बाजीराव आणि माधवराव पेशवे यांच्याक्डून पराभूत करून मांडलिक तर बनवण्यात आले.
पण मराठवाडा काही हिंदवी स्वराज्यास जोडण्यात आला नाही.
इंग्रज गेल्यानंतर निजामाने स्वत:चे भारतापासून वेगळे असे स्वतंत्र राष्ट्र घोषित केले. १७सप्टेम्बर१९४८पर्यंत आपण त्याच्या गुलामीत होतो.
निजाम घराण्यात सात निजाम झाले. त्यापैकी सातवा निजाम मीर उस्मान अली हा १९११साली गादीवर आला.
त्याने अलीगढ मुस्लीम विद्यापीठात शिक्षण घेतले होते. या निजामाने राज्यातील शाळांची संख्या एकदम कमी केली व १९२२पासून धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी सुरु केली. आमिष दाखवून किंवा बळजबरीने धर्मांतरे करण्यास सुरुवात केली. मजलिसे मुत्तेहादिल मुसल्मिन[एम आय एमMIM] य़ा सैनिकी संघटनेची स्थापना करून तिच्याकरवी जनतेवर अत्याचार सुरु केले. याच संघटनेचे पुढे रजाकार मध्ये रुपांतर झाले. रझाकार प्रमुख कासिम रझवी हा लातूरचा असून अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचाच विद्यार्थी होता. विशेषत: १९४६ ते १९४८ या काळात भयंकर अत्याचार झा्ले. गावे जाळणे, महिलांवर बलात्कार करणे, बळजबरीने धर्मांतर करणे, दलितांना धमकावून सरकारी बाजू घ्यायला लावणे असे प्रकार रझाकारांनी केले.
आर्यसमाज
निजामाच्या या अत्याचारास सर्वप्रथम विरोध आर्यसमाजाने केला व शेवटपर्यंत त्यासाठी लढा दिला. यात अनेक आर्यसमाजी हुतात्मा झाले. सत्याग्रह, जेल भरो, ध्वमस्फोट असे सर्व प्रकार आर्यसमाजाने हाताळले. हुतात्म्यांमध्ये उदगीरचे भाई श्यामलालजी, भीमराव पाटील, शंकरराव सराफ, लोहार्याचे रामा मांग, गुंजोटीचे वेदप्रकाश, शंकर जाधव, एकनाथ भिसे, बहिर्जी वाप्टीकर, धारूरचे काशिनाथ चिंचालकर, किल्ल्रारीचे माधव बिराजदार, जनार्दनमामा, फकीरचंद्रजी आर्य, कल्याणानंदजी, मलखानसिंह, रामनाथ असाना, सुनहराजी, ब्रह्मचारी दयानंद, मानकरणजी, लक्षैयाजी, सत्यानंदजी, विष्णूभगवंत तांदूरकर, इत्यादि. नांवे प्रमुख होत. या सत्याग्रहाचे नेतृत्व एकाच्या अटकेनंतर दुसरा अशा साखळी पद्धतीने पं नरेंद्रजी आणि स्वामी स्वतंत्रानंद यांच्या मार्गदर्शनात महात्मा नारायण स्वामी, श्री चांदकरणजी शारदा, श्री खुशहालचंद खुर्संद, राजगुरु धुरेंद्र शास्त्री, देवव्रत वानप्रस्थ, महाशय कृष्ण, द्न्यानेश्वर सिद्धांतभूषण, विनायकराव विद्यालंकार यांनी केले. गोदावरीबाई किसन टेके यांच्यासारख्या महिलांनीही निजामी अत्याचाराचा प्रतिकार केला. नारायणबाबू यांनी प्रत्यक्ष निजामावर ध्वम फेकला होता पण निजाम बचावला.
स्वा. सावरकर आणि हिंदुमहासभा.
१९३५साली इंग्रजांनी भारतास टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य देण्याचे मान्य करून प्रांतांना स्वायत्तता दिली. त्यानुसार १९३७ला मुंबई प्रांतात कूपर-मेहता मंत्रिमंडळ सत्तेवर आले व त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्त केले. यानंतर सावरकर हिंदुमहासभेचे अध्यक्ष झाले व त्यांनी आर्यसमाजाच्या निजामविरोधी लढ्यास मोलाचे साह्य केले. सावरकरांनी भारतभर दौरे करून या विषयावर व्याख्याने दिली व निजामशाहीत घुसण्यासाठी सत्याग्रही तयार केले तसेच या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी जमवला. सत्याग्रहींचे जत्थेच्या जथे निजामशाहीत घुसले. यांपैकी एका जत्थ्याचे नेतृत्व पंडित नथुराम गोडसे यांनी केले. त्यांना निजाम शासनाने एक वर्षाचा सश्रम कारावास ठोठावला. सावरकरांनी निजामी अत्याचाराबाबत अनेक लेख लिहून जागृती केली आणि निजामाला अत्याचार बंद करण्याचे आवाहन केले. सत्याग्रहींसाठी निजामाचे तुरुंग अपुरे पडू लागले तेव्हा १९३९साली निजामाने सावरकर आणि आर्यसमाज यांना त्याम्च्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले व सत्याग्रह थोड्या काळासाठी स्थगित झाला.
डॊ. आम्बेडकर
निजामाने बाबासाहेबांची धर्मांतराची घोषणा ऐकली. त्याने बाबासाहेबांना दोन कोटी रूपये देऊ केले, त्या बदल्यात मराठवाड्यातील दलित जनतेसोबत इस्लाम कबूल करण्याचे आवाहन केले. बाबासाहेबांनी ते दोन कोटी रूपये ठोकरले. इतकेच नव्हे तर आमिष दाखवून किंवा बळजबरीने धमकावून धर्मांतरित झालेल्या दलित बंधूंना स्वधर्मात परतण्याचे आवाहन केले, आवाहनाचे हे पत्रक त्यांनी नैशनल हेराल्ड या दैनिकात प्रसिद्धीस दिले. बाबासाहेबांचे समविचारी बौद्ध भिक्षु उत्तम यांनी काही काळ बंगाल हिंदुसभेचे प्रदेशाध्यक्ष भूषवले होते. ब्रह्मदेशातून तेरा सत्याग्रही निजामविरोधी लढ्यात सहभागी होण्यास आले होते.
वंदे मातरम आंदोलन
निजामी राज्यात वंदे मातरम हे गीत गाण्यास बंदी होती. महाविद्यालयीन तरुणांनी ही बंदी मोडण्याचे आंदोलन केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या आंदोलनास प्रोत्साहन दिले. बंदी मोडणार्या विद्यार्थ्यांना निजामाने विद्यापीठातून काढले तेव्हा विदर्भ प्रांतातील महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे आवाहन सावरकरांनी त्यांना केले. त्यानुसार अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी नागपूरला आले. या आंदोलनात रामचंद्र राव यांनी पोलीसांचे फटके खात असताना सुद्धा वंदे मातरम च्या घोषणा चालूच ठेवल्या. त्यामुळे त्यांचे वंदे मातरम रामचंद्र राव असेच नांव पडले. ते पुढे हिंदुमहासभा आनि आर्यसमाजाचे सक्रिय कार्यकर्ते झाले. या आंदोलनास पंडित नेहरूंनीही पाठिम्बा दिला होता. त्यांचे अनुयायी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव याच आंदोलनातून पुढे आले.
मुस्लीम सत्याग्रही
अनेक मुस्लीम बांधवांनीही निजामविरोधी लढ्यात आपले योगदान दिले. त्यात शहीद शोएब उल्ला खान आणि सय्यद फय्याज अली हे प्रमुख होत. शहीद शोएब उल्ला खान हे इमरोज या वृत्तपत्राचे संपादक होते. ते आपल्या सम्पादकीयांतून निजामी अत्याचारांवर कठोर टीका करीत. रझाकारांनी २१ औगस्ट १९४८ला रात्री १वाजता पाठीत गोळ्या घालून त्यांची हत्या केली. सय्यद फय्याज अली हे अजमेरचे निवासी. अजमेर आर्यसमाजाच्या प्रेरणेने त्यांनी पुसदच्या आर्य सत्याग्रहात भाग घेतला आ्णि तुरुंगवास भोगला. कताल अहमद, मौलाना सिराजुल हसन तिरमिजी, पंजाबचे मुंशी अहमद्दीन, कराचीचे मियां मौसन अली, सातार्याचे मौलाना कमरुद्दिन यांनीही निजामविरोधी लढ्यात आपले योगदान दिले.
स्वामी रामानंद तीर्थ आणि स्टेट कांग्रेस
स्वामी रामानंद तीर्थ यांनी विविध कारणांसाठी १९२८, १९३८, १९४०, १९४३ या वर्षी कारावास भोगला. स्टेट कांग्रेसवर तिच्या स्थापनेपूर्वीच बंदी घालण्यात आली होती. भारत स्वतंत्र झाला तरी निजामाने आपले राज्य त्यात विलीन न करण्याची घोषणा केली. स्टेट कांग्रेसने या घोषणेविरुद्ध ७ औगस्ट १९४७ ला खूप मोठे मोर्चे काढले. आ. कृ. वाघमारे, शेषराव वाघमारे, अनंत भालेराव, भाई बंशीलाल, दिगंबरराव बिंदू, राजूर तालुक्यातील विधिद्न्य निवृत्ती रेड्डी, कलिदासराव देशपांडे, माणिकराव पागे, राजाराम पाटील, इत्यादि नेते हे त्यावेळी स्वामीजींचे सहकारी होते. १५ औगस्ट १९४७साली लोकांनी आपल्या घरांवर तिरंगे फडकवले. स्वामीजींना पुन्हा तुरुंगात धाडण्यात आले. रझाकारांचे अत्याचार वाढले. सावरकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना सशस्त्र लढा देण्याचे आवाहन केले. ना. य. डोळे यांनी लिहिले आहे की महात्मा गांधींनीही या लढ्यात शस्त्र वापरण्याची अनुमती दिली होती.
रझाकार आणि जनता यांच्यात सशस्त्र लढा पेटला.
सैनिकी कारवाई
भारत सरकारने संघराज्यात विलीन होण्याचा विचार करण्यासाठी निजामास १५ औगस्ट १९४८ पर्यंतची मुदत दिली होती. पण निजाम या मुदतीनंतरही विलीन होण्यास तयार नव्हता. जनता आणि रझाकार यांच्यात संघर्ष पेटला होता. १२सप्टेम्बर १९४८ या दिवशी जिनांचे पाकिस्तानात निधन झाले. त्याच दिवशी मध्यरात्री सरदार पटेल यांनी पं. नेहरूंना बजावले की सैनिकी कारवाईची मान्यता दिली नाही तर आपण मंत्रिमंडळातून बाहेर पडू. तेव्हा नेहरूंनी निजामाविरुद्ध सैनिकी कार्रवाईच्या आदेशावर स्वाक्षरी केली. पटेलांनी १३सप्टेम्बर १९४८ला आपले सैन्य तीन दिशांनी निजामशाहीत घुसवले. रझाकारप्रमुख कासिम रझवी हा चारच दिवसांत पाकिस्तानला पळून गेला. १७सप्टेम्बर १९४८ या दिवशी निजामाने संध्याकाळी ५ वाजता आपले राज्य भारतीय संघराज्यात विलीन केले. त्याने विमानतळावर सरदार पटेलांना वाकून नमस्कार केला. अशा प्रकारे ६५३ वर्षांच्या पारतंत्र्यानंतर मराठवाडा स्वतंत्र झाला.
सर्व नागरिकांना मराठवाडा स्वातंत्र्य दिनाच्या ” हार्दिक ” शुभेच्छा !! 💐
☆ “विज्ञान गड”: “इंजीनियरिंग मधला एक अद्भुत नमुना” – लेखक : इंजि. राम पडगे☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆
(आशिया खंडामधला पहिला प्रकल्प आकाराला येतोय महाबळेश्वर तालुक्यामध्ये “कोट्रोशी” या ठिकाणी.)
नमस्कार अभियंता मित्रांनो,
आपणा सर्वांना अभियंता दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. अभियंता दिनाच्या निमित्ताने आपणाला एका नवीन प्रकल्पाची ओळख करून द्यावी अशा उद्देशाने या प्रकल्पाची थोडक्यात माहिती आपणाला पाठवत आहे.
“विज्ञान गड” गेली १८ वर्ष या प्रकल्पाचे काम सुरू आहे. एक वेगळी संकल्पना, वेगळा विषय आणि विज्ञान आधारित ही थीम असलेले अत्यंत नाविन्यपूर्ण आणि इंजिनिअरिंग मधला एक अद्भुत नमूना या ठिकाणी उभारला जात आहे.
येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये शासनाच्या सर्व परवानक्या प्राप्त होऊन हा प्रकल्प सर्वांसाठी खुला होईल. आशिया खंडा मधला हा अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही. या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा वाहनांसाठी रस्ता उपलब्ध नाही. डोंगराच्या पायथ्याला आपली वाहने लावून या ठिकाणी जवळपास १५० मी उंच असलेल्या डोंगरावर माथ्यावर, वायरच्या मदतीने खेचली जाणारे रेल्वे मधून जावे लागते. याला फिन्यूक्युलर असे म्हटले जाते. सर्वसाधारण ४० लोकांची क्षमता असलेले दोन डबे बॅलन्सिंग पद्धतीने एकावेळी वर खाली होत असतात. सर्वसाधारण सात मिनिट ते दहा मिनिटांचा कालावधी या ठिकाणी जाण्यासाठी लागतो. डोंगराचा तिव्र उतार सर्वसाधारण ३५ डिग्री ते ४० डिग्री च्या आसपास आहे. आपली ही फिनिक्युलर वरती असलेल्या गोल इमारतीच्या आत मध्ये थांबते. प्रत्येक दरवाज्याच्या पुढे फ्लोरिंग येईल अशा प्रकारचे नियोजन केलेले आहे.
आणि इथून पुढे तुमचा सुरुवश होतो….. एक अद्भुत प्रवास!!! आपण नक्की काय पहावे व कोणते प्रथम पाहावे अशा प्रकारची आपली परिस्थिती होते. या इतक्या उंच ठिकाणी, इतका भव्य प्रकल्प असेल असे रस्त्यावरून वाटत नाही. समुद्रसपाटीपासून सर्वसाधारण बाराशे पन्नास मीटर उंचीवर असलेला हा प्रकल्प महाबळेश्वर आणि पाचगणी यांच्या उंची पेक्षाही जास्त आहे. या इमारतीच्या माथ्यावर गेल्यानंतर आजूबाजूचा निसर्ग पाहण्यासाठी कोणताही अडथळा राहत नाही.
या ठिकाणाहून सह्याद्रीच्या अवाढव्य गगनाला भिडणारया रांगा, कोयना जलाशयाचा विस्तीर्ण नजरेत न सामावणारा पसारा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राजमार्ग ,कासचे नयनरम्य पठार, वासोटा किल्ला, उत्तेश्वराचं पुराणतन मंदिर, मकरंद गड, महाबळेश्वर, पाचगणी, लिंगमळा, भिलार हा सगळा परिसर तुमच्या दृष्टिक्षेपामध्ये येतो आणि हे तुम्ही , आशिया खंडा मधला पहिल्या रोटेटिंग डोम मध्ये बसून पाहत असता.
या ठिकाणी अत्यंत मोठ्या क्षमतेचे कॅमेरे बसवून, या सर्व ठिकाणांचे दर्शन स्क्रीन वरती आपणाला पाहता येते. याशिवाय आपली वेळ संध्याकाळची असेल तर आकाशातले ग्रह तारे या स्क्रीनवर तुम्हाला पाहता येतात. या ठिकाणचे फिरणारे हॉटेल आणि या ठिकाणी बसून घेतलेल्या जेवणाचा आस्वाद आपणाला आयुष्यभर स्मरणात राहील असा आहे. तुम्ही ३६० डिग्री मध्ये फिरत, निसर्गाच्या प्रत्येक कानाकोपऱ्याचे दर्शन घेत जेवणाचा आनंद घेत असता. या ठिकाणी आहे अर्थक्वेक मधले सर्व प्रकारचा अभ्यास, या ठिकाणी आहे अभ्यासण्यासाठी विंड एनर्जी प्रोजेक्ट,सोलर एनर्जी प्रोजेक्ट आणि हायड्रो प्रोजेक्ट सुद्धा. पाण्यामध्ये होत असलेले बदल आणि त्यासंबंधीची प्रात्यक्षिके प्रत्यक्ष पाहता येतात. सुनामी प्रत्यक्ष होते तरी कशी? व तिचा इफेक्ट नक्की असतो कसा? हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवाल या ठिकाणी .लाटा मधलं सायन्स आहे तरी काय? हे अभ्यासायचे असेल तर या ठिकाणी भेटायलाच हवं. भारतीय सैन्य दलामध्ये अत्याधुनिक शस्त्र वापरण्यात येतात. ती प्रत्यक्ष असतात कशी व ती वापरली कशी जातात ? याबाबतची उत्सुकता प्रत्येकालाच असते . या ठिकाणी शिकण्यासाठी , अभ्यासण्यासाठी आणि पाहण्यासाठी भरपूर काही आहे. अभियंता म्हणून या प्रकल्पाला एकदा नक्कीच भेट द्यायला हवी. मी या प्रकल्पाची अत्यंत थोडक्यात माहिती दिली प्रत्यक्षात बरेच काही आहे .
तुम्ही कदाचित याल त्यावेळी शिवाजी महाराजांचे अभियंते हिरोजी इंदुलकर यांचं अत्यंत सुंदर शिल्प या ठिकाणी तयार झालेले असेल. या सह्याद्रीच्या रांगांमध्ये हिरोजी इंदुलकर यांनी आपल्या तीव्र बुद्धीमतेने अभियंता म्हणून आपले नाव इतिहासाच्या पानावर कायमचे कोरून ठेवलेले आहे. या अभियंत्याची स्मृती म्हणून या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या सह त्यांचाही पुतळा या ठिकाणी उभारला जाणार आहे.
वयाच्या ६८ व्या वर्षी रात्रंदिवस काम करणारे, या प्रकल्पाचे मालक आणि अभियंते जोशी सर यांची भेट म्हणजे स्फूर्ती आणि संकल्पना याचा अनोखा मिलाफ. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने स्वतःचे स्थान निर्माण करणारे व अभियंता म्हणून नक्की कसे असावे याचे हे जिवंत उदाहरण आहे.
प्रकल्प मालक व अभियंता – इंजि. वसंत जोशी सर
प्रकल्प सल्लागार. – इंजि. राम पडगे
आर्किटेक्ट – आर्कि. विक्रांत पडगे
आर सी सी सल्लागार. – इंजि. अनिल कदम
अभियंत्यांनी एकदा आवर्जून भेट द्यावी असा हा प्रकल्प आहे. या ठिकाणी ज्याला पाहायचे आहे ते भरपूर काही पाहू शकतात ,ज्याला शिकायचं आहे तो भरपूर काही शिकू शकतो. एक अभियंता म्हणून निश्चितच चॅलेंजिंग असा हा प्रकल्प आहे, म्हणूनच आज अभियंता दिनाच्या निमित्ताने आपल्यासमोर मी हे थोडक्यात मांडत आहे.
आपला,
इंजि. राम पडगे
९६८९३५९४७८
प्रस्तुती : डॉ. भारती माटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘सूर जेथे वेल्हाळ होती… – लेखक : डॉ. विद्याधर ओक ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले☆
पं. गोविंदराव पटवर्धन.
भारतात असे काही असामान्य वाद्य-वादक जन्माला आले, की जणू, ते वाद्य ईश्वराने त्यांच्यासाठीच घडवले असावे. उदा. सनईत बिस्मिल्ला खान, तबल्यात अहमदजान तिरखवा, आणि बासरीत हरिप्रसाद चौरासिया! अगदी त्याप्रमाणेच, हार्मोनियमची निर्मिती परमेश्वराने ज्यांच्यासाठी केली असावी, ते होते कै. पं. गोविंदराव पटवर्धन. माझे गुरू, माझे परम दैवत. २१ सप्टेंबर, १९२५ रोजी गुहागरजवळच्या एका खेड्यात जन्म घेऊन ‘पटवर्धन’ घराण्याचे नाव त्यांनी जणू ‘पेटीवर्धन’ असे केले!
हार्मोनियम हे वाद्य तसे गायनाच्या साथीस, तंतुवाद्यांपेक्षा गैरसोयीचे. याचे पहिले कारण म्हणजे, त्यात स्वरांना जोडणारे ‘मधले’ नाद अस्तित्वातच नसतात. दुसरे म्हणजे, हार्मोनियमचे ट्युनिंग गणिती १२ स्वरांचे (युरोपियन) असल्यामुळे तिच्यात, नैसर्गिक (भारतीय) २२ स्वरांपैकी एकही नसतो. म्हणजे, हार्मोनियम हे वाद्य भारतीय संगीतासाठी मुळातच चुकीचेही असते. तिसरे म्हणजे पेटीचा वादकांसाठीचा एक मोठाच अवगुण, की या वाद्यात बोटांची तयारी ‘१२ पट्ट्यात वेगवेगळ्या प्रकारची’ करावी लागते. म्हणजे, तंतुवाद्यातील (व्हायोलिन, सरोद, सतार, वीणा इ. ) तारेवर खुंटी पिळून स्वर बदलता येत असल्यामुळे, बोटांची तयारी ‘एकाच प्रकारची’ असते. म्हणून, पेटी वाजविणे, हे मुळातच तंतुवाद्यापेक्षा बारापट कठीण; तरीही त्यावर गोविंदरावांना जन्मत:च कमालीचे प्रभुत्व लाभले होते.
गोविंदरावांनी स्वत:च्या मुंजीमधे, वयाच्या आठव्या वर्षी, पाऊण तास स्वतंत्र हार्मोनियम वादन केले. मग पुढच्याच वर्षी गिरगावात थेट दीनानाथ मंगेशकर यांना पेटीवर साथ केली (‘काळी पाच सूर होता’… इति गोविंदराव!). म्हणजे, या माणसाला कुणी गुरूच नव्हता, नव्हे; म्हणूनच आमचा गोविंदा उत्तम पेटी वाजवतो, असे पु. ल. देशपांडे कौतुकाने म्हणत! पुढे ७१ वर्षे आयुष्य लाभलेल्या गोविंदरावांनी, हार्मोनियम आणि ऑर्गन या वाद्यांना सुमारे पाच हजार मैफली व तितक्याच नाट्यप्रयोगांना अविस्मरणीय आणि अविश्वसनीय अशी संगत करून स्वतःबरोबरच अमर केले.
गायक-वादकास उत्तम स्वरज्ञान लागतेच. तयारीच्या गायकांनी गायलेले ‘नोटेशन ध्यानात येणे’, हेच मुळात कठीण असते, ‘वाजविणे’ तर सोडाच. या सर्वसाधारण अनुभवाच्या अगदी विरुद्ध, गोविंदराव, कितीही मुश्किल जागा पेटीकडे न पाहता आणि क्षणार्धात वाजवत आणि रसिकांची, ‘वा गोविंदराव’ अशी दाद हमखास घेत. तुम्हाला ‘नोटेशन’ इतक्या लवकर समजते कसे, या माझ्या (५० वर्षांपूर्वी विचारलेल्या) बाळबोध प्रश्नाला, ‘अरे समजते कुठे, माझी बोटे वाजवून झाल्यानंतर मला कळते’, असे उत्तर त्यांनी दिले होते व ते खरेही होते. म्हणून, गोविंदराव स्वर ‘कानाने’ नाही, तर ‘बोटांनीच’ ऐकतात व वाजवतात, असे रसिक म्हणत.
पेटीतील सर्व १२ पट्ट्यात गोविंदराव ‘समान’ नैपुण्याने वाजवत, हे अगाधच. म्हणून त्यांना ‘स्केल-चेंज’ हार्मोनियमची गरज नसे. स्केल-चेंज ‘पेटीत’ नको, ‘हातात’ हवे, असे ते म्हणत. आणि, ‘ते आम्हाला कसे येईल’ या माझ्या प्रश्नाला, ‘एक एक पट्टी एक वर्षभर वाजव, म्हणजे १२ वर्षांत सर्व पट्ट्यांमधे हात फिरेल’ हे सरळसोट उत्तर मिळाले होते. ‘अशी’ बारा वर्षे कुणाच्या आयुष्यात येणार? एकदा मी माझी नवीन स्केल-चेंजर-हार्मोनियम त्यांना वाजविण्यासाठी मोठ्या उत्साहाने घेऊन गेलो होतो. ‘ही कशाला आणलीस’, असे स्वागत झाले. वाजवायचे स्केल सफेत चारवर ठेवले होते. पहिला राग झाल्यावर म्हणाले, ‘आता सफेत तीन कर’. मग पुन्हा काही वेळाने म्हणाले, ‘सफेत दोन कर’. म्हणजे, केवळ ‘गंमत’ म्हणून पट्ट्या बदलत बदलत वाजवणे, हा गोविंदरावांसाठी निव्वळ पोरखेळ होता! तसेच, कोणत्याही पट्टीत कोणताही राग वाजवितांना त्यांना स्वर अजिबात शोधावे कसे लागत नाहीत, या कुतुहलापोटी मी एकदा त्यांना विचारले, की तुम्हाला ‘सर्व’ पट्ट्यांत ‘कोणत्याही’ रागाचे काळ्या-पांढऱ्या पट्टयांचे ‘डिझाइन’ पेटीवर ‘दिसते’ का? चहाची बशी खाली ठेवून त्यांनी केवळ ‘हो’, एवढेच उत्तर दिले होते!
भारतातील यच्ययावत गायकांना गोविंदरावांनी साथ केली. साथीला बसले की ज्याची साथ करायची तो आपला गुरू, या भावनेने वाजवीत. महाराष्ट्रातील तमाम गायकांसाठी ‘अत्युच्च आदर्श’ असलेले आणि त्यांच्याहून ३७ वर्षांनी ज्येष्ठ कै. बालगंधर्व, यांना साथ करण्याचे गोविंदरावांचे योग आले होते. आणि प्रत्यक्ष बालगंधर्वांनी तेव्हाच्या छोट्या गोविंदाबद्दल, ‘तो मुलगा छान वाजवतो हो’ असे काढलेले उद्गार, आणि एकदा तर प्रत्यक्ष भेटीत ‘बाळा, आम्ही गात होतो तेव्हा कुठे होतास रे?’ हे उद्गार, गोविंदराव त्यांच्या आयुष्यातील ‘सर्वात मोठे पारितोषिक’ मानत
कै. पं. राम मराठे यांच्या नोमतोमने भरलेल्या; आग्रा, ग्वाल्हेर आणि जयपूर या तिन्ही घराण्यांचे उत्कृष्ट गुंफण असलेल्या जोशपूर्ण लयदार गायकीची गोविंदरावांनी तितक्याच तयारीने केलेली अशक्य कोटीतील साथ, रसिक अजून विसरलेले नाहीत. या दोघांची शारीरिक आणि सांगीतिक क्षमता तर काय वर्णावी ? त्याची कल्पना त्यांनी एका दिवसात केलेल्या तीन तीन कार्यक्रमांवरूनच करता येईल. ‘माझा संगीतातील गुरू आणि संसारातील मोठा भाऊ’, अशा रामभाऊंचे गाणे, त्यांच्या एवढेच, गोविंदरावांना ठाऊक होते. बोटातून झेरॉक्स कॉपी काढावी तसे ते निघत असे. एखादी तान थांबली, तर बोटातून पुढची सुरू होई. इतरही सर्व वादन ‘गाण्याबरोबरच (!)’ सुरू असे. दोन चालकांची एकच सायकल असते, तसे पुढे रामभाऊ व मागे गोविंदराव! आयुष्यातही रामभाऊ त्यांच्या पुढेच निघून गेले.
वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या दैवी उपज आणि चतुरस्त्र गळा लाभलेल्या गायकाची साथ करणे म्हणजे, साथीदाराची एक परीक्षाच असे. कोणत्या क्षणाला त्यांच्या अतिजलद गळ्यातून काय व कसे निघेल, याची कोणतीही पूर्व-कल्पना साथीदाराला मिळत नसे. शिवाय, त्यांच्या गळ्यातील उत्तर हिंदुस्तानी बाज वाद्यावर उतरवणे सुद्धा गोविंदराव लीलया करीत. साहजिकच ‘तुम्हाला कुणाची साथ आवडते’, या माझ्या प्रश्नाला वसंतरावांनी सुद्धा, ‘तसे सगळेच चांगली करतात, पण ‘अचूक’ साथ फक्त गोविंद पटवर्धन करतो’, असे उत्तर दिले होते.
एकदा भीमसेन जोशी यांच्या साथीला गोविंदराव बसले होते. खासगी मैफल होती. पहिला राग ‘मल्हार’ सुरू झाला. गोविंदरावांनी सुरुवातीला नुसता सूर धरून ठेवला होता. थोड्या वेळानंतर, भीमसेनांनी त्यांना ‘वाजवा’, अशी खूण केली. भीमसेनांच्या ताना धो धो पडणाऱ्या पावसाप्रमाणे कोसळू लागल्या. मी लहानच होतो म्हणून, गोविंदराव या अतिमुश्किल ताना पेटीवर कशा वाजविणार, असे वाटून मलाच छातीत धडधडू लागले. मात्र, गोविंदरावांनी भीमसेनांची प्रत्येक तान व जागा, लख्ख आरशातल्या प्रतिबिंबासारखी उचलली. मधे एक क्षणही जात नव्हता आणि हा अद्भुत प्रकार, मैफलभर चालला होता.
छोटा गंधर्वांची लडिवाळ गायकी सुद्धा त्यांच्या हातात चपखल उतरत असे. छोटा गंधर्व तर नेहमीच आयत्या वेळी, तिथल्या तिथे सुचणाऱ्या नवनवीन जागा घेत. आयुष्यात कधीच न ऐकलेल्या अशा शेकडो जागा, गोविंदराव एका क्षणात ऑर्गनवर अलगद फुलासारख्या झेलीत आणि प्रेक्षकांची, ‘वा गोविंदराव’, अशी दाद मिळे. एकदा एका मैफिलीमधे हे एवढे झाले, की छोटा गंधर्व म्हणाले; ‘अरे, मला’ एकदा तरी वा म्हणा! ‘तुम्हाला कुणाला साथ करणे सर्वात अवघड जाते’ या माझ्या प्रश्नालाही, गोविंदरावांनी; ‘तसे कुणाचेच नाही’, पण दादा (छोटा गंधर्व) गात असले की ‘जरा’ लक्ष ठेवायला लागते’ असे उत्तर दिले होते.
अनेक मैफिलीत किंवा नाटकात, गायकांच्यापेक्षा, गोविंदराव काय व कसे वाजवतात याकडेच रसिकांचे लक्ष लागे आणि तरीही गोविंदराव कधीही अधीरपणा दाखवीत नसत. कुमार गंधर्वांनाही ते नुसताच षड्ज (म्हणजे सा) धरून बसत. याबाबत एकदा कुमारांनाच कुणीतरी विचारले की, नुसता स्वर धरायचा असेल, तर तुम्ही पेटीवर गोविंदरावांसारख्या मोठ्या वादकाला का घेता? यावर कुमारांनी, ‘त्याच्यासारखा सा सुद्धा कुणाला धरता येत नाही’ असे मासलेवाईक उत्तर दिले होते! या सर्वांवर कळस म्हणजे, महाराष्ट्र-गंधर्व सुरेश हळदणकर, गोविंदरावांच्या बद्दल माझ्यापाशी त्यांच्या साथ-संगतीचे कौतुक करतांना तर म्हणाले होते की, तुझ्या गुरूच्या उजव्या हातामध्ये ‘परमेश्वर’ आहे.
विविध घराण्यातील धुरिणांना साथी करता करता गोविंदरावांनी स्वतंत्र वादनातही कमालीचे कौशल्य मिळविले. स्वत:ला उत्तम तबला येत असल्यामुळे वेगवेगळ्या तालांचे वैविध्य व डौल सहज सांभाळला जात असे. तोडी, ललत, यमन, मारुबिहाग, चंद्रकौंस, चंपाकली, नटभैरव, मधुवंती असे अनेक राग ते सारख्याच तयारीने आणि साधारण २०-२५ मिनिटे मध्यलयीत वाजवीत. त्यानंतर; झाले युवतिमना, उगिच का, शरणागता, मधुकर, नरवर इ. नाट्यपदांची खैरात होत असे. पदातला प्रत्येक शब्द त्याच्या ऱ्हस्व-दीर्घ उच्चारानुसार आणि अगदी जोडाक्षरांच्या सकट हातातून वाजे. वेगवेगळ्या गायकांची पदे तर ते वाजवीतच, परंतु, एकाच नाट्यपदात अनेक गायक सुद्धा सहजच दाखवीत. शेवटी तीन भैरव्या ठरलेल्या असत. कै. मधुकर पेडणेकर आणि कै. गोविंदराव टेंबे यांना ते फार मानत. कुणी नन्हेबाबू आणि चौरीकर ही नावे सुद्धा घेत. आणि फारच कौतुक झाले तर, ‘अरे मी काहीच नाही, असा मधू वाजवायचा’, आणि; ‘ते (म्हणजे टेंबे) खरे गोविंद ‘राव’, मी नुसताच ‘गोविंदा’, असे विनयाने म्हणत. प्रत्यक्षात, त्यांचे स्वतंत्र वादनातील ‘लयदार तुकडे’, सतारीसारखे ‘झाले’ आणि ‘सफाई’ वर्णनातीत होती. गवतावर वाऱ्याची झुळूक जावी, अशी सपाट तान जाई. ‘गमकेच्या’ जागा, मनगटाच्या ताकदीने वाजवत. अंगठा तर एवढ्या बेमालूमपणे बोटांना ३ सप्तकात पुढे-मागे नेई, की हाताला १० बोटे आहेत की काय, असे वाटावे. त्यांचे स्वतंत्र पेटीवादन ऐकण्यास प्रत्यक्ष कुमार आणि वसंतराव सुद्धा बसत, यातच सर्व आले!
गोविंदरावांनी ऑर्गनवर केलेली संगीत नाटकांची साथ, हा एक स्वतंत्र प्रबंधाचा विषय होईल. याचे सर्व श्रेय ते त्यांचे ‘नाट्य-गुरू’ भालचंद्र पेंढारकर यांना देत. नाटकाच्या साथीदाराला गाण्यांसकट संपूर्ण गद्य पाठ असावे लागते कारण, गाणे सुरू होण्याआधीचे वाक्य संपले की त्या क्षणाला ऑर्गनचा स्वर द्यावा लागतो, थोडाही आधी किंवा नंतर नाही. शिवाय, ४-५ गायक व त्यांच्या वेगवेगळ्या ६-७ पट्ट्या लक्षात ठेवून, सर्व नाटक सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरतच! यासाठी मैफिलीतील साथीपेक्षा संपूर्ण वेगळे असे तंत्र कमवावे लागते. वयाच्या १४ व्या वर्षी ‘संगीत वेणुनाद’ या नाटकापासून सुरुवात करून गोविंदरावांनी पुढे ‘शाकुंतल’, ‘शारदा’, ‘सौभद्र’, ‘स्वयंवर’, ‘मानापमान’, ‘एकच प्याला’, ‘विद्याहरण’, इ. पारंपरिक नाटकांपासून ‘सुवर्णतुला’, ‘मंदारमाला’, ‘पंडितराज जगन्नाथ’, आणि ‘कट्यार काळजात घुसली’पर्यंत असंख्य नाटकांना ऑर्गन साथ केली. त्यांची १४ संगीत-नाटके गद्य-पद्यासकट तोंडपाठ होती. मी त्यांची ४०० नाट्यपदे ध्वनिमुद्रित करून ठेवली आहेत. दुर्दैवाने, संगीत नाटकेच बंद पडल्यामुळे हा खजिना तसाच दुर्लक्षित रहाणार.
हार्मोनियम आणि ऑर्गन वाजविणे हेच त्यांचे आयुष्य होते. शेवटी मला म्हणाले होते, ‘अरे रामभाऊ गेला, कुमार गेला, वसंतराव गेले, माझे आता इथे उरले आहे काय…’? असे महान कलाकार आपल्या जगात येतात, आणि स्वर्गीय आनंद देऊन जातात, हे रसिकांचे भाग्य! त्यांचे स्मरण ठेवणे, त्यांची कला आपणास जमेल तितकी जोपासणे, आणि ते पुनर्जन्म घेईपर्यंत त्यांची वाट बघणे, एवढेच आपल्या हाती असते. गोविंदरावही यावे आणि मला त्यांच्याकडे पुन्हा शिकायला मिळावे, एवढीच परमेश्वरापाशी प्रार्थना !
लेखक : डॉ. विद्याधर ओक
(लेखक औषधशास्त्र संशोधक असून हार्मोनियम आणि २२ श्रुति पेटी संशोधकही आहेत)
संग्राहिका : डॉ. शुभा गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
☆ “संकटनाशन स्तोत्रातले बारा गणपती…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
आपण असंख्य वेळेला हे…”गणपती स्तोत्र” …. “संकटनाशन स्तोत्र” म्हणतो, परंतु यामध्ये उल्लेख केलेल्या गणेशाची प्रत्यक्ष स्थाने आपल्यापैकी बहुतेकांना माहीत नाहीत…
नारदकृत ‘ संकटनाशन ‘ स्तोत्रात उल्लेखिलेली बारा नावे व त्यांची सद्य स्थाने….
प्रथमं वक्रतुण्डं च
एकदन्तं द्वितीयकम्
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं
गजवक्त्रं चतुर्थकम्
लम्बोदरं पंचमं च
षष्ठ विकटमेव च
सप्तमं विघ्नराजेन्द्रं
धूम्रवर्णं तथाष्टकम्
नवमं भालचन्द्रं च
दशमं तु विनायकम्
एकादशम् तु गणपति
द्वादशं तु गजानन:
१. वक्रतुण्ड :- मद्रास राज्यातील कननूरजवळ
२. एकदन्त :- पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्याजवळ.
३. कृष्णपिंगाक्ष :- मद्रास राज्यातील कन्याकुमारीजवळ.
४. गजवक्त्र :- ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे.
५. लंबोदर :- ह्याची दोन स्थाने उल्लेखिली जातात.
(१) रत्नागिरी जिल्ह्यातील गणपती पुळे क्षेत्रात,
(२) मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर या प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाजवळ असलेला पंचमुखी गणपती.
६. विकट :- हिमालयाच्या पायथ्याशी हृषीकेश येथे.
७. विघ्नराजेन्द्र :- कुरु क्षेत्रात कौरव-पांढवांच्या युद्धभूमीजवळ.
८. धूम्रवर्णं :- १) दक्षिणेकडील केरळ राज्यात कालिकतजवळ.
२) तिबेटमध्ये ल्हासापासून १५ मैलांवर.
९. भालचंद्र :- रामेश्वरजवळ धनुष्कोडी येथे मद्रास राज्य.
१०. विनायक :- काशी क्षेत्रातील अन्नपूर्णा मंदिराजवळचा धुण्डिराज गणेश.
११. गणपती :- क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथील द्विभुज महागणपती.
१२. गजानन :- हिमालयातील शेवटचे तीर्थस्थान पांडुकेसर येथील मुंडकटा गणेश. गौरी कुंडाजवळील ही गणेशमूर्ती शिरविरहित आहे.
समर्थ रामदास स्वामींनी ही बाराही गणेशस्थाने शोधून काढून सर्व गणपतींचे दर्शन घेतले होते, असे म्हणतात
।। जय श्री गणेश ।।
माहिती संकलक : अज्ञात
संग्राहक : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘वंदे भारत ट्रेन’ चे निर्माते : श्री. सुधांशु मणी ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆
या देशात असे अनेक रियल हिरो आहेत जे आपल्याला माहिती नाहीत..
सुमारे ८ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, २०१६ची. सुधांशु मणी नावाचे रेल्वेचे एक मोठे अधिकारी होते. खूप मोठे. पेशाने इंजीनियर होते. यांच्या रिटायरमेंटला केवळ दोन वर्षे बाकी होती.
सहसा रिटायरमेंटच्या वेळी जेव्हा अंतिम पोस्टिंगची वेळ येते तेव्हा कर्मचार्याला त्याची निवड विचारायची पद्धत आहे. पसंतीच्या ठिकाणी अंतिम पोस्टिंग यासाठी की कर्मचार्याने आपल्या शेवटच्या दोन वर्षांत आपल्या आवडीने घर वगैरे बनवावे, स्थिर व्हावे. आरामात रहावे. परंतु या अधिकार्याने आपली अंतिम पोस्टिंग मागितली ICF चेन्नई ला.
ICF म्हणजे Integral Coach Factory …. रेल्वेचे डबे बनविण्याचा कारखाना….
रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने त्यांना विचारले, ‘ काय करणार?’
ते इंजीनियर म्हणाले, ‘ आपल्या देशाची स्वतःची सेमी हायस्पीड ट्रेन बनविण्याची इच्छा आहे…. ‘
ही तेव्हाची घटना आहे जेव्हा ताशी १८० किमी धावणारी Spanish Talgo कंपनीच्या डब्यांची चाचणी सुरू होती. चाचणी सफल होती पण ती कंपनी १० डब्यांच्या गाडीसाठी सुमारे २५० कोटी रुपये मागत होती शिवाय तंत्रज्ञान देण्याचा करारही करत नव्हती. अशा परिस्थितीत या इंजीनियरने संकल्प केला की आपल्याच देशात मी स्वदेशी तंत्रज्ञान वापरून Talgo पेक्षा चांगली गाडी बनवीन. तीही अर्ध्याहून कमी किमतीत.
रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने विचारले…
“ Are You Sure, We Can Do It ? “
उत्तर होते….. ” Yes Sir !”
“ किती पैसे लागतील R&D साठी ?”
“ फक्त १०० कोटी रु सर !”
रेल्वेने त्यांना ICF मध्ये पोस्टिंग आणि 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिले.
त्या अधिकार्याने लगेच रेल्वे इंजीनियर्सची एक टीम उभी केली आणि सर्वजण कामाला लागले. दोन वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर जे निर्दोष प्रॉडक्ट तयार झाले त्याला आपण ‘ ट्रेन १८ ‘ म्हणजेच वन्दे भारत रॅक नावाने ओळखतो.
आपल्याला ठाऊक आहे का… या १८ डब्यांच्या गाडीला खर्च किती लागला? केवळ ९७ कोटी ! जेव्हा की Talgo केवळ १० डब्यांच्या ट्रेनचे २५० कोटी मागत होती. ट्रेन १८ भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासातला निर्दोष असा हिरा आहे.
या गाडीचे वैशिष्ट्य हे आहे की या गाडीला ओढण्यासाठी कोणत्याही इंजिनाची गरज नाही. कारण की हिचा प्रत्येक डबा स्वतःच ‘सेल्फ प्रोपेल्ड’ आहे, म्हणजे त्या प्रत्येक डब्यात मोटर लावलेली आहे.
दोन वर्षात तयार झालेली पहिली रॅक “ वन्दे भारत ट्रेन “ या नावाने वाराणसी ते नवी दिल्ली धावली.
या यशस्वी इंजीनियरचे नाव आहे सुधांशु मणी.
सुधांशु मणी यांच्यासारख्या देशाच्या प्रगतीसाठी ध्येयवेड्या विभूतीला त्रिवार सलाम !
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈