मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “माझी मैना…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “माझी मैना…” ☆ सौ राधिका भांडारकर 

आज १ ऑगस्ट …. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन. ( १ ऑगस्ट १९२० ). 

दोन शब्दातच समोरच्या व्यक्तीला जिंकून घेण्याचं सामर्थ्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शब्दात आहे. या राष्ट्रीय पुरुषाने विपुल लेखन केले.

” माझी मैना गावावर राहिली..” हा मला तर त्यांच्या पूर्ण साहित्याचा परमोच्च बिंदूच वाटतो. 

माझी मैना गावाकडे राहिली

माझ्या जीवाची होतीया काहीली

ओतीव बांधा। रंग गव्हाळा।

कोर चंद्राची ।उदात्त गुणांची।

मोठ्या मनाची। सीता ती माझी रामाची ।

हसून बोलायची। मंद चालायची।

सुगंध केतकी। सतेज कांती ।

घडीव पुतळी। सोन्याची।

नव्या नवतीची। काडी दवण्याची।

रेखीव भुवया ।कमान जणू इंद्रधनुची।

हिरकणी हिऱ्याची। काठी आंधळ्याची ।

तशी ती माझी। गरीबाची मैना ।

रत्नाची खाण ।माझा जीव की प्राण।

नसे सुखाला वाण। तिच्या गुणांची छक्कड मी गायली। माझ्या जीवाची होतीया काहिली…।।

ही रचना वाचल्यानंतर सर्वप्रथम मनात येते ती दोन जीवांची झालेली ताटातूट. ती गरिबीमुळे झालेली आहे ..असावी.  राघू— मैने ची जोडी वेगळी होत आहे आणि त्या विरही भावनेत तिच्या प्रेमाचं, देहाचं,तिचं त्याच्या जीवनात असण्याचं नितांत सुंदर आणि ठसकेबाज वर्णन या रचनेत केलेलं आहे.  थोडक्यात हे एक सुंदर प्रेम गीत आहे.

पण ही मैना अधिक व्यापक स्वरूपात समजून घेण्याचा मी प्रयत्न केला आणि मला या रचनेमागचे वेगळे संदर्भ लक्षात आले.  

माझी मैना ही एक छक्कड आहे.  छक्कड हा लावणीचा एक प्रकार आहे.  माझी मैना ही एक राजकीय छक्कड आहे. आणि त्या पाठीमागे अण्णाभाऊंच्या जीवनाची पार्श्वभूमी आहे.

अण्णा भाऊंना गरिबीमुळे त्यांचं मूळ गाव वाटेगाव सोडावं लागलं.  काम धंद्यासाठी त्यांना मुंबई नगरीत यावं लागलं. तिथे त्यांनी मिळेल ते काम केलं.  हेल्पर, बुटपॉलिशवाला, सिनेमागृहात द्वारपाल अशी विविध कामे केली.  ही कामे करता करता कोहिनूर मिलमध्ये ते कामगार म्हणून स्थित झाले.  या ठिकाणी त्यांचा संबंध कामगार चळवळीशी आला आणि त्याच वातावरणात त्यांची लेखन कला बहरली.  ते लेखक, शाहीर बनले.  त्यानंतर याच माध्यमातून त्यांचा संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी संबंध आला.

चळवळीत कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर म्हणून ते काम करायचे पण ते खरे कलाकार होते.  नाटक, वग, पोवाडे आणि लावण्या लिहून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची मशाल पेटती ठेवली.  त्याचवेळी माझी मैना ही छक्कड अतिशय गाजली ती एक रूपकात्मक रचना म्हणून.

ही मैना कोण याचे उत्तर या चळवळीत सापडलं.  संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.( एक मे १९६०) पण बेळगाव आणि कारवार हा भाग महाराष्ट्राच्या सीमेत आला नाही मुंबईतील फाउंटन आणि बेळगाव येथे झालेल्या आंदोलनात शेकडो लोकांनी रक्त सांडले तरी देखील संयुक्त महाराष्ट्र हवा तसा झाला नाही याचं दुःख त्यांच्या मनाला झालं आणि त्यातूनच माझी मैना या छक्कडचा जन्म झाला.  माझी मैना गावावर राहिली हे बेळगाव आणि कारवार या भागासाठी रूपक आहे आणि ही नितांत सुंदर मैना म्हणजेच निसर्गरम्य बेळगाव आणि कारवार.

आजही ही मैना प्रासंगिक आहे. साठ पासष्ट वर्षापूर्वी लिहिलेली ,गायलेली ही छक्कड आजही  तितकीच ताजी तवानी आहे कारण अजूनही सीमा प्रश्न सुटलेला नाही म्हणून “माझी मैना गावावर राहिली” हा सल आहेच.

(कै. विठ्ठल उमप यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीतून आणि अभिनयातून “माझी मैना” प्रचंड लोकप्रिय केली)

तर असा हा अलौकिक लोकशाहीर ! अण्णाभाऊ साठे…..  त्यांनी विपुल लेखन केले. कथा, कविता, गीत, लावण्या, कादंबऱ्या व नाट्य वृत्तांत, प्रवास वर्णने असे सर्व साहित्यप्रकार हाताळले. पण त्यांच्या जीवनातलं श्रेष्ठ साहित्य कार्य म्हणजे त्यांनी लोकसंस्कृतीला रंगभूमीवर प्रतिष्ठा मिळवून दिली. ती गौरवली. जनमानसात रुजवली.

अण्णाभाऊ यांच्या जन्मदिनी या असाधारण लोकशाहीरास  भावपूर्ण श्रद्धांजली.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “गाढवाला सोडलंय? सांभाळा ! सावरा ! …” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “गाढवाला सोडलंय? सांभाळा ! सावरा ! …” ☆ श्री सुनील देशपांडे

(एका इंग्लिश पोस्टवर आधारित)

एका गाढवाला झाडाला बांधले होते.  

एका मूर्खाने काहीही विचार न करता  ते सोडवले.  

गाढव शेतात घुसले आणि जोरजोरात ओरडू लागले.

हे पाहून शेतकऱ्याच्या पत्नीने चिडून गाढवाला गोळ्या घालून ठार केले.

गाढवाचा मालक चिडला.  त्याने शेतकऱ्याच्या पत्नीला गोळ्या घातल्या.

बायको मेलेली पाहून शेतकरी परत आला, त्याने जाऊन गाढवाच्या मालकाला गोळ्या घातल्या.  

गाढवाच्या मालकाच्या पत्नीने आपल्या मुलांना जाऊन शेतकऱ्याचे घर जाळण्यास सांगितले.

पोरांनी संध्याकाळी उशिरा जाऊन आईची आज्ञा आनंदाने पार पाडली, त्यांना वाटले शेतकरीही घरासह जळाला असेल.  

खेदाची गोष्ट म्हणजे तसे झाले नव्हते…..  शेतकरी परत आला.  तो एकटाच असल्याने त्याला असहाय्य वाटू लागले. त्याने आपले जाती बांधव एकत्र केले आणि त्यांना गाढवाच्या मालकाच्या जातीवरून आरोप करून चिथवले आणि त्यांनी गाढवाच्या मालकाच्या पत्नी आणि दोन मुलांना घरासह आग लावून जाळले.

मग गाढवाच्या मालकाचे जाती बांधव एकत्र झाले आणि त्यांनी शेतकऱ्याच्या जाति बांधवांना शिव्या द्यायला सुरुवात केली. त्यानंतर  दोन्ही जातींमध्ये प्रचंड धुमश्चक्री आणि राडा झाला.

त्यानंतर ठिकठिकाणी जाती-जातींमध्ये व धर्माधर्मांमध्ये उद्रेक सुरू झाले. 

खूपच मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक दंगे सुरू झाल्याने ते शमविण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले.

सैन्यबळ देशांतर्गत यादवीमध्ये गुंतलेले पाहून शत्रूने देशावर चाल केली….. 

हे सर्व पाहून व्यथित झालेल्या एका साधूने त्या मूर्ख व्यक्तीला म्हटले,  ” बघ तुझ्यामुळे देशावर किती मोठे संकट ओढवले !”

तो म्हणाला, ” मी काय केले ? मी फक्त गाढवाला सोडले.”

तो साधू म्हणाला,  ” हो, पण, त्यावर सर्वांनी अविचाराने चुकीची प्रतिक्रिया दिली, कुणाचे तरी ऐकून कुणाला तरी दोषी ठरवले,  आणि आपल्या मनातल्या भुताला सोडले.”

आता तरी तुम्हाला कळलं का?—- कुणीही काहीही करत नाही. कुणीतरी मूर्ख  तुमच्यातील अहंकाराला चालना देऊन दुष्प्रवृत्तींना जागृत करतो…..

……  त्यामुळे पुढच्या वेळी प्रत्युत्तर देण्यापूर्वी, प्रतिक्रिया देण्यापूर्वी, तक्रार करण्यापूर्वी, दटावण्यापूर्वी किंवा सूड उगवण्यापूर्वी ……  थांबा आणि विचार करा.  काळजी घ्या……  कारण ….  

…… अनेक वेळा कुणीतरी मूर्ख फक्त गाढवाला सोडतो.

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सेवाव्रती हळबे मावशी ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ सेवाव्रती हळबे मावशी ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी 

सन १९८९.  ‘बजाज फाउंडेशन पुरस्कार’ सोहळ्यासाठी बंगलोर (आता बंगलुरू)इथला सुंदर सजवलेला भव्य हॉल , हळुवार सुरांची वातावरण प्रसन्न करणारी मंद धून, फुलांची आकर्षक सजावट केलेले भले मोठे स्टेज, उंची वस्त्रांची सळसळ आणि अनेक भाषांमधील संमिश्र स्वर! अशा अनोख्या वातावरणात देश विदेशातील अनेक मान्यवर व्यक्तींच्या बरोबरीने,  पांढऱ्यास्वच्छ सुती नऊवारी साडीतील मावशी म्हणजे इंदिराबाई हळबे स्टेजवर अवघडून बसल्या होत्या. थोड्यावेळाने घोषणा झाली.’आता महाराष्ट्रातील कोकण प्रांतातील देवरुख या अत्यंत दुर्गम खेडेगावात महिला आणि बाल कल्याणाच्या कार्यातील प्रशंसनीय योगदानाबद्दल श्रीमती इंदिराबाई हळबे यांना जमनालाल बजाज पुरस्काराने सन्मानित करण्यात  येत आहे.’ सभागृहातील टाळ्यांचा कडकडाट  मावशींच्या कानावर पडत होता. पण डोळे भरून आल्याने सारे अस्पष्ट दिसत होते. मावशी जुन्या आठवणींमध्ये  हरवून गेल्या.

चंपावती खरे ही रत्नागिरी जिल्ह्यात एका  लहानशा खेड्यात १९१३ साली जन्मलेली मुलगी. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे चौथीत असताना लग्न झाले. लग्नानंतर इंदिराबाई हळबे होऊन त्या मुंबईला आल्या.

१९२८ते१९३९ असा अकरा वर्षांचा संसार मावशींच्या वाट्याला आला. त्यातच त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला.नंतर थोड्याशा आजाराने त्यांच्या पतीचा मृत्यू झाला त्यावेळी त्या फक्त २५ वर्षांच्या होत्या. वेळेवर आणि योग्य औषधोपचार न मिळाल्याने हे मृत्यू झाले होते. या दुःखातून बाहेर येण्यासाठी मावशी देवरुख इथे त्यांच्या बहिणीकडे, त्यांची सर्वात धाकटी मुलगी मीनाक्षी हिला घेऊन काही महिने राहिल्या.

राजा राममोहन राय यांच्या प्रखर लढ्यामुळे ब्रिटिशांनी सतीची परंपरा रद्द केली होती. तरीही विधवांच्या शापित जीवनाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला नव्हता.

देवरुख येथील शांत, निसर्गरम्य वातावरणात मावशींना थोडे मानसिक स्वास्थ्य मिळाले. शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या देवरुख संपन्न होते. देवरुखला मावशींना अनेक विचारवंतांचे सहाय्य आणि मार्गदर्शन लाभले. पूज्य साने गुरुजींची भगवत गीतेवरील मार्गदर्शक व्याख्याने ऐकून त्यांनी आपले जीवन मानवतेच्या सेवेत व्यतीत करण्याचा संकल्प केला.

त्यांच्या सर्व आशा आता मीनाक्षीवर केंद्रित झाल्या होत्या. मीनाक्षीच्या पुढील शिक्षणाच्या दृष्टीने  मावशी  मुंबईला परतल्या. डॉक्टर काशीबाई साठे यांच्याशी त्यांची कौटुंबिक मैत्री होती. मीनाक्षीलाही त्यांच्यासारखे डॉक्टर व्हायचे होते. दुर्दैवाने एका छोट्याशा आजाराचे निमित्त होऊन वयाच्या १३ व्या वर्षी मीनाक्षीचे अकस्मात निधन झाले.

या अंध:कारमय आयुष्याचा सामना करण्यासाठी मावशींनी नर्सिंगचा कोर्स करण्याचे ठरविले. त्यासाठी कमलाबाई होस्पेट यांच्या मातृसेवा संघ, नागपूर इथे प्रवेश मिळवून खूप मेहनतीने त्यांनी नर्सिंग कोर्स पूर्ण केला. तथाकथित समाज नियमांना न मानता मावशींनी हे धाडस केले होते. या वेगळ्या वाटेवरून चालण्याचा खंबीर निर्णय मावशींनी निश्चयाने अमलात आणला. देवरुख हे त्यांनी आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले. समाजाच्या जहरी टीकेला आपल्या कृतीतून उत्तर दिले.

मावशींनी जातपात, स्पृश्य- अस्पृश्य, धर्म असली कुठचीही बंधने मानली नाहीत .प्रसूतीमध्ये अडलेल्या बाईसाठी त्या उन्हापावसात, रात्री अपरात्री डोंगरवाटा तुडवीत मदतीला गेल्या. अनेक बालकांना सुखरूपपणे या जगात त्यांनी आणले. एवढेच नाही तर फसलेल्या कुमारीका, बाल विधवा यांनाही आपल्या छत्रछायेखाली घेतले.  त्यांच्या मुलांचे पालकत्वही पत्करले. आजारी, अशक्त, अपंग, अनाथ मुलांच्या त्या आई झाल्या.

रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख इथे त्यांनी उभारलेली ‘मातृमंदिर’ ही संस्था म्हणजे त्यांच्या कार्याची चालती बोलती ओळख आहे. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना मावशींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देवरुखला एका गोठ्यात, दोन खाटांच्या सहाय्याने प्रसूती केंद्राची सुरुवात केली. आज त्यांचे कार्य  एक सुसज्ज हॉस्पिटल, फिरता दवाखाना, रूग्ण वाहिका, निराधार बालकांसाठी गोकुळ अनाथालय, कृषी केंद्र, कौशल्य प्रशिक्षण केंद्र, बचत गट, महिला सक्षमीकरण उपक्रम, आरोग्य केंद्र, बालवाड्या, पाळणाघरे असे वटवृक्षासारखे विस्तारले आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती, शिस्त आणि शुद्ध आचरण यांच्या बळावर समाजाला सावली आणि आधार देणारे अगणित उपक्रम त्यांनी राबविले.  त्याचबरोबर अशा सामाजिक कार्यात झोकून देणाऱ्या तरुणाईच्या पिढ्या घडविल्या. या तरुणाईला त्यांनी पुरोगामी विचारांचे, विज्ञान निष्ठेचे आणि श्रमप्रतिष्ठेचे  शिक्षण स्वकृतीतून दिले. अनेक सामाजिक चळवळींना हक्काचा निवारा दिला. खेड्यापाड्यातून आलेल्या, देवरुख महाविद्यालयात शिकणाऱ्या अनेक गरीब मुलांसाठी मावशींनी शेतावर मोफत होस्टेलची व्यवस्था केली. यातील अनेक मुलांना शेतावर, रुग्णालयात, मेडिकल स्टोअर, आयटीआय, पाणलोट प्रकल्प, कृषी प्रकल्प आदी विविध कार्यामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या मनावर मूल्याधिष्ठित संस्कार केले.

१९९८ मध्ये मावशी गेल्यानंतर काही काळाने संस्थेच्या कार्याला विस्कळीतपणा आला होता .आज श्री अभिजीत हेगशेट्ये  आणि त्यांचे अनेक तडफदार सहकारी यांच्यामुळे मातृमंदिर  पुन्हा जोमाने कार्यरत झालेआहे. त्यांनी दिलेल्या संस्काराचा वारसा जिवंत आहे. याचे  आत्ताचे उदाहरण म्हणजे कोविड काळात मातृमंदिरने शेकडो  कोविडग्रस्तांसाठी ‘ऑक्सिजन आधार प्रकल्प’ उभारला आणि अनेक रूग्णांचे प्राण वाचविले.२०२१ च्या पुरामध्ये उध्वस्त झालेल्या कोकणवासियांना मातृमंदिरने पुढाकार घेऊन  अनेक प्रकारची मदत केली. स्वच्छता अभियान राबविले.

देवरुख परिसरातील ६०-७० गावातील जनतेसाठी आता मातृमंदिर संस्थेतर्फे अद्ययावत सुविधा देणारे सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जात आहे. अनेक दानशूर लोकांनी मातृमंदिर संस्थेला  आर्थिक मदत केली आहे.

समाजाचा पाया सुदृढ व्हावा म्हणून अनेक स्त्रियांनी तत्कालीन सामाजिक रुढी, जाचक निर्बंध दूर सारून स्वतःचे आयुष्य पणाला लावले. साहजिकच त्यांची वाट काट्याकुट्याची होती. शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, विज्ञान अशा अनेक क्षेत्रात या स्त्रियांनी भरीव योगदान दिले. त्या पायाचा दगड बनल्या म्हणून आजची स्त्री अनेक क्षेत्रात ताठ मानेने उभी राहू शकत आहे. अशा अनेक तेजस्वी तारकांमधील सन्माननीय हळबे मावशींना  सहस्र प्रणाम 👏

–++++–

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “शत्रूचं आभाळ झाकोळून टाकणारा मेघ !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “शत्रूचं आभाळ झाकोळून टाकणारा मेघ !” ☆ श्री संभाजी बबन गायके 

— लेफ्टनंट कर्नल मेघ सिंग राठौर ! पॅरा एस.एफ.!

नकळत काही अपराध घडल्यामुळे देवलोकातून शाप दिला जाऊन मृत्यूलोकात ढकलल्या गेलेल्या आणि शापाचा  कालावधी आणि नेमून दिलेलं कर्म पूर्ण केल्यानंतर पुन्हा देवलोकात सन्मानाने प्रवेश दिल्या गेलेल्या गंधर्वांच्या कथा आपण ऐकल्या असतीलच !

मृत्यूलोकातल्या अशाच एका आधुनिक गंधर्वाची ही रोमांचकारी कथा. त्यांचं नाव मेघ सिंग…. 

मेघ सिंग राठौर……एक पक्का राजस्थानी राजपूत लढवय्या ! जन्म मार्च १९२२, म्हणजे आजपासून शंभर वर्षांपूर्वीचा. मेघ सिंग तारुण्यात पदार्पण करताच सेनेत भरती झाले. तो काळ ब्रिटिश राजवटीचा. दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांच्या फौजेत असताना ‘गनिमी कावा’ पद्धतीने लढून जपान्यांच्या सैन्याला नाकी नऊ आणण्याचा, जखमी होण्याचा, युद्धबंदी बनून दिवस काढण्याचा मोठा अनुभव गाठीशी बांधून, पुढे स्वातंत्र्यानंतर मेघ सिंग अर्थातच भारतीय सेनेत अधिकारी बनले. कालांतराने लेफ्टनंट कर्नल हुद्द्यावर असताना एका बटालियनचे नेतृत्व करते झाले.

लष्करी भाषेत एखादा अधिकारी एखाद्या अपराधाबद्दल चौकशीच्या फेऱ्यात अडकला की त्याला ‘to come under cloud’ असं म्हटलं जातं. साहेबांचं नाव मेघ, आणि त्यांच्या बाबतीत वापरल्या गेलेल्या इंग्लिश वाकप्रचारातील शब्द ‘क्लाऊड’ म्हणजेही मेघ (ढग) हा एक योगायोगच म्हणायचा !   

लष्करी न्यायालयाने लेफ्टनंट कर्नल या हुद्द्यावरून मेघ सिंग साहेबांचा हुद्दा मेजर असा केला…. शिक्षा म्हणून. आणि त्यांना एका लष्करी प्रशिक्षण संस्थेत नियुक्तीवर धाडले. वर्ष होते १९६५. 

१९६२ मध्ये चीनकडून प्रचंड फसवणूक आणि लाजीरवाणा पराभव पत्करल्याने भारतीय सैन्याचे मनोधैर्य काहीसे खचलेले होते. याचा फायदा घेऊन पाकिस्तानने, १९४७ मध्ये वेषांतर करून कश्मिरमध्ये आक्रमण केले होते, तसेच पण उघड आक्रमण करण्याचे धारिष्ट्य केले. चवताळलेल्या भारतीय सैन्याने अनेक आघाड्यांवर पाकड्यांवर कुरघोडी करत आणली होती. परंतू काही ठिकाणी ते आपल्याला वरचढ होऊ पहात होते. भारताचा सर्वथैव अविभाज्य भाग असलेलं कश्मीर हातून निसटतं की काय अशी शंका निर्माण व्हावी, अशी विषम परिस्थिती निर्माण झाली होती. अर्थात सैन्य असं काहीही होऊ देणार नव्हतं !

पण आपण पारंपारिक पद्धतीने युद्ध करीत होतो. शत्रू आपल्या हद्दीत आला की त्याला त्याच्या सीमेत पिटाळून लावायचे. शत्रू आपल्या हद्दीत घुसण्याच्या तयारीत असताना त्याला त्याच्याच प्रदेशात घुसून आधीच नेस्तनाबूत करण्याची अतिप्राचीन युद्धनीती आपण बहुदा बाजूला ठेवली होती.  कश्मिरच्या मोर्चावर सेनेचे नेतृत्व करीत असलेले लेफ्टनंट जनरल हरबक्षसिंग साहेब हे आधुनिक विचार, नवीन युद्धनीती या अपरंपरागत बाबींच्या विरोधात अजिबात नव्हते. त्यासाठी ते गरज पडली तर व्यवस्थेच्या विरूद्ध जाऊनही निर्णय घेण्याच्या पक्षात होते.

पदावनत करण्यात आलेल्या आणि अगदी सेनेतून स्वेच्छानिवृत्ती पत्करावी अशा निर्णयाप्रत आलेल्या आपल्या ह्या कथानायकास, मेजर मेघसिंग साहेबांना, युद्धाची परिस्थिती पाहून प्रशिक्षण संस्थेतून पुन्हा युद्धभूमीवर जाण्याचे आदेश प्राप्त झाले ! एका सैनिकास आणखी काय पाहिजे असते? मेजर मेघ सिंग साहेब थेट लेफ्टनंट जनरल हरबक्षसिंग साहेबांना भेटले आणि आपण पाकिस्तानात घुसून, आपल्या सीमेत घुसलेल्या त्यांच्या सैन्याच्या मागे जाऊन त्यांच्यावर प्रतिआक्रमण करण्याचा विचार मांडला. आणि हे काम मी करतो, मला त्याचा पुरेसा अनुभव आहे, असे पटवून दिले…  

मेघसिंग साहेबांचा सैनिकी इतिहास ठाऊक असलेल्या हरबक्षसिंग साहेबांनी त्वरित तशी व्यवस्था केली. आणि यासाठी त्यांनी शासकीय परवानगी घेण्याची औपचारिकता विचारात घेतली नाही. तेव्हढा वेळही नव्हता. आणि आपण आक्रमण करायचे नाही, या आपल्या राष्ट्राच्या सर्वसामान्य विचारप्रणालीच्या ते विरुद्ध समजले जाण्याचीही शक्यता होतीच.   

हरबक्षसिंग साहेबांनी मेघसिंग साहेबांना सांगितलं होतं, ” यशस्वी होऊन आलात तर मी माझ्या हातांनी तुमच्या खांद्यावर तुमच्या बढतीच्या हुद्द्याचं पदक लावेन !”

अपमानाचा डाग धुऊन काढण्याची आंतरीक इच्छा असलेला सच्चा सैनिक ही संधी कशी सोडेल? मेघ सिंग साहेबांच्या अंगी आता दहा हत्तीचं बळ एकवटलं. त्यांनी भारतीय सैन्याच्या पायदळातून त्यांना हवी तशी माणसं काळजीपूर्वक निवडून घेतली, त्यांना केवळ एक दोन आठवड्याचं प्रशिक्षण दिलं. हे प्रशिक्षण जरी कमी कालावधीचं वाटत असलं तरी शत्रू प्रदेशात हलक्या पावलांनी घुसून प्रचंड विध्वंस घडवून आणण्याचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या माणसाकडून दिले गेले होते, हे विसरता कामा नये ! 

या सैनिकांच्या जथ्याला एक अनौपचारीक नाव दिले गेले…. ‘मेघदूत फोर्स !’ मेघ सिंग साहेबांची मेघदूत सेना ! या सेनेच्या बहाद्दर जवानांनी पाकिस्तानी प्रदेशात खोलवर घुसून त्यांच्या अनेक लष्करी महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करून त्यांचे प्रचंड नुकसान केले. मागून अचानक आणि अगदी अनपेक्षितपणे झालेल्या या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी सेनेचे धाबे दणाणून गेले होते. असे एक नव्हे तर तीन यशस्वी हल्ले या ‘मेघ’दूतांनी केले. पाकिस्तानचे अवघे आकाश या मेघांनी काळवंडून टाकले होते ! 

आणि विशेष म्हणजे स्वत:चे फारसे नुकसान होऊ न देता. 

कामगिरी यशस्वी करून मेघसिंग साहेब मेघदूतांसह परतले… पण काहीसे लंगडत. त्यांच्या मांडीमध्ये शत्रूच्या सैनिकाची गोळी घुसून आरपार गेली होती. पण त्या जखमेची त्यांना तमा नव्हती….. दिलेली कामगिरी पूर्णत्वास नेल्याचं खास सैनिकी समाधान त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होतं ! 

पदमभूषण,वीर चक्र विजेते, जनरल ऑफिसर इन कमांड (वेस्टर्न कमांड १९६५) लेफ्टनंट जनरल हरबक्षसिंग साहेबांनी आपल्या या बहादूराच्या खांद्यावर लेफ्टनंट कर्नलचं चिन्ह स्वत:च्या हातांनी लावलं….. गंधर्व पुन्हा देवलोकात परतला होता… ताठ मानेने !

मेघदूतांसारखा आपला असा अधिकृत सैन्यविभाग असावा, ही गोष्ट देशाचा सैन्य कारभार चालवणाऱ्यांच्या लक्षात आली. असा विभाग निर्माण करण्याचं उत्तरदायित्व अर्थातच लेफ्टनंट कर्नल मेघसिंग साहेबांच्याकडे आले… आणि त्यांनी ते निभावले सुद्धा ! 

१ जुलै १९६६ रोजी ‘नाईन पॅरा स्पेशल फोर्स’ हा विभाग अधिकृतरित्या भारतीय लष्कराचा एक अपार महत्त्वाचा भाग बनला. पॅरा म्हणजे पॅराट्रूपर्स अर्थात हवाई मार्गाने शत्रूप्रदेशात उतरणारे सैनिक ! या विभागात भारतीय सैन्यातील अपार शौर्य गाजवण्याची महत्त्वाकांक्षा असलेले सैनिक स्वयंस्फूर्तीने प्रशिक्षणास येतात. या सैनिकांना नव्वद दिवसांच्या कठोरतम अग्निपरीक्षेस सामोरे जावे लागते ! या सैनिकांचे आणि अधिका-यांचे सर्व हुद्दे काढून त्यांना प्रशिक्षणार्थींचा दर्जा दिला जातो. हे सर्व पूर्वप्रशिक्षित आणि अगदी तयार सैनिक असतात हे लक्षात घेतले पाहिजे ! परंतू यातील केवळ पंधरा ते वीस टक्के लोकच अग्निपरीक्षेत उत्तीर्ण होतात.. यावरून पॅरा एस.एफ. च्या प्रशिक्षणाची काठिण्य पातळी ध्यानात यावी !

पहिले पस्तीस दिवस शारीरिक आणि कौशल्य प्रशिक्षण, यात तासनतासांचा शारीरिक व्यायामाचा, डोळ्यांवर पट्टी बांधून विविध प्रशिक्षणे घेण्याचा, हत्यारे चालवण्याचा, एखादे ठिकाण नष्ट करण्याचा सराव करण्याचा, अनोळखी प्रदेशातून, जंगलातून माग काढण्याचे प्रशिक्षण घेण्याचा, विषारी प्राणी हाताळण्याचे प्रशिक्षण, वैद्यकीय ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या, अन्न शिजवण्याच्या शिक्षणाचा आणि इतर कित्येक बाबींचा समावेश असतो. सलग चार दिवस पूर्ण उपाशी राहणे, तीन दिवसांत फक्त एक लिटर पाणी पिणे, आणि सलग सात दिवस अजिबात न झोपणे या गोष्टी अनिवार्य असतात. दहा किलो वजनाची वाळू भरलेली बॅग सतत शरीरावर बांधलेली असते या काळात. सर्व युद्धसाहित्य अंगावर घेऊन दहा, वीस, तीस आणि चाळीस किलोमीटर्स मार्चिंग करीत चालणे हे तर असतेच. 

विमानातून, हेलिकॉप्टरमधून दिवसा आणि रात्रीच्या वेळी किमान पन्नास वेळा अचूक उडी मारण्याचे प्रशिक्षण तर अत्यावश्यकच. युद्धाच्या साहित्यासह एकूण सत्तर किलोचे वजन घेऊन दहा किलोमीटर्स वेगाने चालणे ही असतेच. आपल्या सहकारी सैनिकास आपल्या खांद्यावर सलग कित्येक किलोमीटर्स वाहून घेऊन जाणे आहेच. सलग छत्तीस तासांची शारीरिक, मानसिक क्षमता चाचणी घेतली जाते. चाळीस ते ऐंशी किलो वजनाच्या वस्तू एका ठिकाणाहून उचलून विशिष्ट ठिकाणापर्यंत घेऊन जाव्या लागतात. पाण्यात बुडी घेऊन कित्येक मिनिटे श्वास रोखून धरावा लागतो, हात मागे बांधून पाण्याखाली खेचले जाते. यापैकी सोळा तासाच्या प्रशिक्षणात अन्नाचा एक कण, पाण्याचा एक थेंबही दिला जात नाही. 

अशा स्थितीत स्मरण चाचण्या, परिसराचा शोध घेण्याच्या क्षमतेच्या चाचण्या घेतल्या जातात ! त्यानंतर पुन्हा दहा किलोमीटर्स वेगाने चालणे आणि त्यानंतर सहा तास सलग व्यायाम ! शेवटी शत्रूवर लपून हल्ला करणे, इतरांनी लपून अचानक केलेल्या हल्ल्याला प्रतित्युत्तर देणे, छावण्या उभारणे, जखमी सैनिकांसाठी स्ट्रेचर्स तयार करणे, जखमी सैनिकांना सुखरूप हलवणे इत्यादी क्षमता तपासल्या जातात…. आणि हे कधी तर ….सैनिक गेली सलग कित्येक तास अजिबात झोपलेले नाहीत अशा स्थितीत !

अखेरच्या सत्रात दहा किलो युद्धसाहित्य, सात किलो वजनाची शस्त्रे घेऊन डोंगर, टेकड्यांतून, जंगलातून शंभर किलोमीटर्स धावणे…… याला तेरा ते पंधरा तास लागू शकतात ! या दरम्यान उंचावरच्या ठिकाणी लढण्याचे प्रशिक्षण तर असतेच असते. या सर्वांत टिकून राहिलेल्या सैनिकांना मग शेवटच्या टप्प्यात अतिरेकी विरोधी युद्धाचे अत्यंत खडतर प्रशिक्षण दिले जाते !……  नव्वद दिवस आगीच्या अंगाखांद्यावर खेळलेले हे सैनिकी सोनं शेवटी काय रूप घेऊन बाहेर येत असेल? केवळ अतुलनीय ! केवळ अवर्णनीय ! केवळ शब्दातीत ! 

असे असतात आपले पॅरा एस.एफ.चे जवान…. भारताच्या सार्वभौमत्वाचे संरक्षक ! कमीत कमी माणसांत जास्तीत जास्त मोठं आणि यशस्वी कामगिरी असे ध्येय बाळगणारे! आपल्या बडी वर, अर्थात सहकाऱ्यावर जीव ओवाळून टाकणारे, ‘हू केअर्स हू विन्स…’ म्हणजे कोण जिंकतंय याची तमा न बाळगता फक्त प्राणपणाने लढणारे! कुणी धर्म आणि जात विचारता, “पॅरा एस.एफ.” असं उत्तर देणारे ! या आणि अशा वीरांमुळेच भारत इतक्या आव्हानांना तोंड देऊनही सुरक्षित आहे!

हा अलौकीक सैन्यविभाग निर्माण करणाऱ्या वीरचक्र विजेत्या लेफ्टनंट कर्नल मेघ सिंग साहेबांना मानाचा मुजरा! २०१० मध्ये हा मेघ काळाच्या आभाळात अंतर्धान पावला!

या विभागाचे पहिले प्रमुख लेफ्टनंट जनरल हरबक्षसिंग साहेबांना वंदन ! एक जुलै या स्थापनादिनाच्या निमित्ताने देशभरातील सर्व पॅरा युनिट्सना कडक सॅल्यूट आणि …. 

……  जय् हिंद ! 🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मंडल : १ : ३० : ऋचा १ ते ५ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मंडल : १ : ३० : ऋचा १ ते ५ — मराठी भावानुवाद. ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ३० (इंद्र, अश्विनीकुमार, उषासूक्त)

देवता – १-१६ इंद्र; १७-१९ अश्विनीकुमार; २०-२२ उषा

ऋषी – शुनःशेप आजीगर्ति

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील तिसाव्या  सूक्तात एकंदर बावीस ऋचा आहेत. या सूक्तात शुनःशेप आजीगर्ति या ऋषींनी इंद्र, अश्विनीकुमार आणि उषा या देवतांना आवाहन केलेली असल्याने हे इंद्र-अश्विनीकुमार-उषासूक्त सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिल्या  सोळा ऋचा इंद्राला, सतरा ते एकोणीस  या ऋचा अश्विनिकुमारांना आणि वीस ते बावीस या  ऋचा उषा देवातेला  आवाहन करतात.

या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार  गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी इंद्र देवतेला उद्देशून रचलेल्या पहिल्या पाच ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.

मराठी भावानुवाद :

आ व॒ इंद्रं॒ क्रिविं॑ यथा वाज॒यन्तः॑ श॒तक्र॑तुम् । मंहि॑ष्ठं सिञ्च॒ इन्दु॑भिः ॥ १ ॥

 देवेंद्राचे सामर्थ्य असे शतधेने चंड

सकलांना अति प्रीय जीवाला शचीवल्लभ इंद्र

ऋत्विजांनो हरवून जाता इंद्रस्तुती करिता

बावेसम त्या तुडुंब भरुनी सोमरसा पाजू त्या ||१||

श॒तं वा॒ यः शुची॑नां स॒हस्रं॑ वा॒ समा॑शिराम् । एदु॑ नि॒म्नं न री॑यते ॥ २ ॥

क्षीरासह ते सहस्र वा शत शुद्ध सोम चमस

स्वीकारून घेई प्रेमाने प्रियबहु इंद्रास

 सरितेच्या पाण्याला जैशी ओढ उताराची

शचीपतीला मनापासुनी  आवड सोमरसाची ||२||

सं यन्मदा॑य शु॒ष्मिण॑ ए॒ना ह्यस्यो॒दरे॑ । स॒मु॒द्रो न व्यचो॑ द॒धे ॥ ३ ॥

चंडप्रतापी इंद्राला मोद सोमरसाने

प्रसन्न होई देवराज अति त्याच्या प्राशनाने

तुडुंब भरते त्याचे उदर सोमसेवनाने

प्रसन्न होई आम्हावरती इंद्र सोमरसाने ||३||

अ॒यमु॑ ते॒ सम॑तसि क॒पोत॑ इव गर्भ॒धिम् । वच॒स्तच्चि॑न्न ओहसे ॥ ४ ॥

खग कपोत वेगाने जाई अपुल्या पिल्लांकडे

तसाच येई प्रेमाने सोमाच्या चमसाकडे

तुमच्यासाठी सिद्ध केला सोम भक्तिभावाने

तयासवे स्वीकारावे अमुचे स्तवन प्रेमाने ||४||

स्तो॒त्रं रा॑धानां पते॒ गिर्वा॑हो वीर॒ यस्य॑ ते । विभू॑तिरस्तु सू॒नृता॑ ॥ ५ ॥

अभिष्टस्वामी हे देवेंद्रा स्तुतीप्रीय असशी

आळविता स्तोत्रांना झणी तू धावूनिया येशी

पराक्रमी वीरा  तव स्तोत्रांना आम्ही गातो

अखंड वैभव प्रसन्न होवुनी आम्हाला तू देतो ||५||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.) 

 https://youtu.be/xG5GMiMGTks

Attachments area

Preview YouTube video Rugved Mndal 1 Sukta 30 Rucha 1 to 5

Rugved Mndal 1 Sukta 30 Rucha 1 to 5

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘मिसाईल मॅन’ ए.पी.जे.अब्दुल कलाम ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

‘मिसाईल मॅन’ ए.पी.जे.अब्दुल कलाम ☆ श्री राजीव गजानन पुजारी

आज २७ जुलै – आपले माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन.  

… “यशस्वी होण्याचा माझा निर्धार पुरेसा मजबूत असेल तर अपयश कधीही माझ्या आड येणार नाही” – असा आत्मविश्वास बाळगणारे आणि तो खरा करून दाखवणारे कलामसर, म्हणजे ही मोलाची शिकवण जणू संपूर्ण देशालाच देणारे एक अद्वितीय व्यक्तिमत्व. 

ए.पी.जे. अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तत्कालीन मद्रास इलाख्यातील रामेश्वरम येथे १५ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव अवूल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम होते. त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाब्दिन होते, जे  एक नावाडी असून इमाम म्हणून देखील ते काम बघत. त्यांच्या आईचे नाव आशीअम्मा होते. त्या एक गृहिणी होत्या. कलाम यांना चार भाऊ व एक बहीण होते. सर्व भावंडांमध्ये कलाम हे शेंडेफळ होते.

कलामांचे पूर्वज श्रीमंत व्यापारी होते, पण कालौघात त्या कुटुंबावर कठीण परिस्थिती आली होती. अब्दुल कलाम लहानपणी वृत्तपत्रे विकून कुटुंबाच्या माफक उत्पन्नात भर घालायचे हे आवर्जून सांगण्यासारखे आहे. 

कलाम यांनी रामनाथपुरम् येथे शालेय शिक्षण घेतले आणि सेंट जोसेफ कॉलेज तिरुचिरापल्ली येथून भौतिकशास्त्राची पदवी संपादन केली. १९५५ मध्ये ते एरोस्पेस अभियांत्रिकी करण्यासाठी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये गेले. फायटर पायलट होण्याचे त्यांचे स्वप्न पात्रता फेरीत अगदी काही गुणांनी भंग पावले. ते नवव्या क्रमांकावर होते. पण आय.ए.एफ. कडे फक्त आठ जागाच उपलब्ध होत्या. त्यानंतर त्यांना संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या(DRDO) एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट मध्ये शास्त्रज्ञ म्हणून नोकरी मिळाली. त्यांनी प्रख्यात शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या हाताखाली काम केले. 

१९६९ मध्ये कलाम यांची बदली भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रो मध्ये करण्यात आली. इस्रोमध्ये ते एस.एल.व्ही. या उपग्रह प्रक्षेपण वाहनाचे प्रकल्प संचालक होते. एस एल व्ही प्रक्षेपकाने १९८० मध्ये रोहिणी उपग्रह यशस्वीरित्या पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित केला. एस एल व्ही हा भारताचा पहिला प्रक्षेपक होता. कलाम यांनी ध्रुवीय प्रक्षेपण वाहन (PSLV) विकसित करण्यासाठीही काम केले. एसएलव्ही तंत्रज्ञानातून बॅलॅस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करण्यासाठीच्या प्रोजेक्ट व्हॅलीअंट आणि प्रोजेक्ट डेव्हिल या दोन प्रकल्पांचे ते संचालक देखील होते. त्यांच्या संशोधन आणि नेतृत्वगुणांमुळे त्यांना प्रगत क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे संचालकपद मिळाले. आर्. वेंकटरमन संरक्षण मंत्री असताना कलाम यांची क्षेपणास्त्रांचा ताफा विकसित करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. ‘ बेलास्टिक ‘क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानामुळे, तेव्हापासूनच त्यांना ‘मिसाईल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाऊ  लागले होते.

१९९२ ते १९९९ पर्यंत कलाम हे पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार आणि डीआरडीओ चे सचिव होते. पोखरण-२ चाचण्यांदरम्यान कलाम हे मुख्य प्रकल्प समन्वयक होते. याच काळात कलाम भारतातील  आघाडीचे शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले.

२००२ मध्ये अब्दुल कलाम यांची भारताची ११ वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली. भारताचे राष्ट्रपती बनणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. २००७ पर्यंतचा राष्ट्रपती म्हणून त्यांचा कार्यकाळ देशासाठी महत्त्वाचा ठरला. लोकांमध्ये, विशेषतः शाळकरी मुलांमध्ये ते फार लोकप्रिय ठरले, इतके की त्यांना ‘पीपल्स प्रेसिडेंट’ म्हटले जाऊ लागले. त्यांनी देशाच्या अनेक भागांना भेटी दिल्या. त्यांची भाषणे, त्यात असणाऱ्या प्रेरणादायी विचारांमुळे लोकप्रिय ठरली. राष्ट्रपतीपदासाठी दुसऱ्यांदा उमेदवारी मिळावी म्हणून लोकांचा दबाव  असतांनाही त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रपतीपदानंतर कलाम आय.आय.एम.- अहमदाबाद, आय.आय.एम.-शिलॉंग, आय.आय.एम.- इंदूर,  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, अण्णा विद्यापीठ, आदींमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर बनले.

२७ जुलै २०१५ रोजी आय.आय.एम.- शिलॉंग येथे व्याख्यान देत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मूळ गावी, रामेश्वरम् येथे पूर्ण शासकीय इतमामाने आणि अतिशय सन्मानाने त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. 

अब्दुल कलाम हे त्यांच्या सचोटी व प्रामाणिकपणासाठी ओळखले जात. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी काही पुस्तके व लॅपटॉप व्यतिरिक्त कोणतीही वैयक्तिक संपत्ती मागे सोडली नाही. ते विविध धर्माच्या शिकवणुकींचे जाणकार होते, आणि आंतरधर्मीय संवादाचे प्रतीक होते हे आवर्जून नमूद करायलाच हवे. 

त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यात:

  • India-2020:A vision for the new  Millennium
  • Wings of fire
  • Ignited minds- Unleashing the power within India
  • A manifesto for change: A sequel to India 2020
  • Transcendence: My spiritual experiences with Pramukh swamiji

  — आदि पुस्तकांचा समावेश होतो.

तसेच त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यामध्ये :

  • पद्मभूषण -१९८१
  • पद्मविभुषण – १९९०
  • भारतरत्न – १९९७
  • वीर सावरकर पुरस्कार – १९९८
  • रॉयल सोसायटी, इंग्लंड यांचेकडून दिला जाणारा किंग चार्ल्सII पदक – २००७
  • इडिनबर्ग युनिव्हर्सिटी, इंग्लंड यांचेकडून डॉक्टर ऑफ सायन्स – २०१४

  —– आदि पुरस्कारांचा समावेश होतो.

आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना अतिशय आदरपूर्वक प्रणाम. 

© श्री राजीव गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “’रम डे’ ची  कथा” ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ “’रम डे’ ची  कथा” ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

एवढा धो धो पाऊस पडतोय. अशा वेळेस दोनच गोष्टींची निवड करणे शक्य असते – एक म्हणजे पुस्तक-वाचन आणि दुसरी म्हणजे अपेयपान !    

अशा पावसात अस्सल दर्दी माणसाला व्हिस्की, बीअर, व्होडका, वाईन यातील कुठलेच पेय लागत नाही. या अस्सल दर्दी माणसाची पसंती असते एकाच पेयाला – ते म्हणजे – रम ! हा परिचित ब्रँड तुमच्या जमान्यातला असेल, पण ही ‘रम’ ब्रिटिश जमान्यात मुंबईत बनत होती, हे तुम्हाला माहीत नसेल.  आज तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे. 

१८५३ साली पहिली आगगाडी व्हिक्टोरिया टर्मिनसवरून निघाली. तेव्हा पुढचं स्टेशन होतं – भायखळा. दादर नव्हतं, कुर्ला नव्हतं, मुलुंड नव्हतं, पण एक स्टेशन होतं, ते म्हणजे भांडुप ! आश्चर्याचा धक्का बसेल, पण बाकी कुठलंही स्टेशन नव्हतं. 

आता भांडुप स्टेशन असण्याचं कारण काय?  कारण फार गंमतीदार आहे. भांडुपला गाडी थांबली, तर बरेचसे गोरे भांडुपला उतरले आणि तिथे गावात जाऊन चार-पाच पेग रम मारली आणि परत गाडीत येऊन बसले.  तेव्हा भांडुपची लोकसंख्या असून असून किती असणार? तर तीनशे, चारशे… कारण १८८१ साली जेव्हा जनगणना झाली, तेव्हा भांडुपची लोकसंख्या होती – जेमतेम पाचशे चव्वेचाळीस ! आता एवढ्या छोट्या गावात तेव्हा रम कशी बनवली जायची? …. 

त्याचं झालं असं – मुंबई जेव्हा ब्रिटीशांच्या ताब्यात आली, तेव्हा त्यांनी ल्यूक ॲशबर्नर नावाच्या माणसाला भांडुप हे गाव नाममात्र भाड्याने दिले. हा ल्यूक ॲशबर्नर ‘ बॉम्बे कुरियर ‘ नावाच्या वर्तमानपत्राचा संपादक होता. त्याला सांगितलं गेलं की, ‘ तू वर्तमानपत्र पण सांभाळायचं आणि इथे रम पण बनवायची.’ तो काय करणार बिचारा? तो अग्रलेख लिहिणार की रम बनवणार? मग त्याने एक युक्ती केली. त्याचा कावसजी नावाचा मॅनेजर होता. त्यानं त्याच्या हाती कारभार सोपवला आणि त्याला सांगितलं की, ‘ रम बनवणे तुझं काम आहे.’                                                        

तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की, त्या काळी साडेचार लाख लिटर रम बनवली जायची आणि आख्ख्या भारतभर ब्रिटिश सैनिकांना पुरवली जायची. त्याच्यानंतर गंमत काय झाली की, मॉरिशसला स्वस्त रम तयार व्हायला लागली आणि मग भांडुपचा ‘रम’चा धंदा बंद करावा  लागला .  ‘बॉम्बे गॅझेटियर’च्या चव्वेचाळीसाव्या पानावर ल्यूक ॲशबर्नरच्या नावासकट ही माहिती उपलब्ध आहे.  

आता ही सगळी माहिती आम्हाला कुठून मिळाली? तर आमचे एक मित्र आहेत – श्री. माधव शिरवळकर. त्यांनी ” मुंबई ब्रिटिशांची होती तेव्हा…” या नावाचे पुस्तक लिहिले. त्यात अशा अनेक गंमतीजमती आम्हाला वाचायला मिळाल्या. तेव्हा आज आपल्याला माधव शिरवळकरांचेही आभार मानलेच पाहिजेत. त्यांचे हे पुस्तक आपण जरूर वाचा.

तोवर ….. “ चीअर्स ! “   

लेखक : अज्ञात. 

(https://www.instagram.com/p/Cuej5u-NBh-/) – या सूत्रधाग्यावरून (link) साभार.

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पहा पुणे विद्यापीठातील हे सुंदर  घड्याळ … ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ पहा पुणे विद्यापीठातील हे सुंदर  घड्याळ … ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

◆ 1:00 वाजण्याच्या स्थानावर ब्रह्म लिहिलेले आहे, ज्याचा अर्थ हा आहे की ब्रह्म एकच आहे. 

    एको ब्रह्म द्वितीयो नास्ति 

◆ 2:00 वाजण्याच्या स्थानावर अश्विनौ लिहिलेले आहे, ज्याचे तात्पर्य हे आहे की अश्विनी कुमार दोन     आहेत. 

◆ 3:00 वाजण्याच्या स्थानावर त्रिगुणा: लिहिलेले आहे, ज्याचे तात्पर्य हे आहे की गुण तीन प्रकारचे आहेत. 

     सत्वगूण, रजोगूण आणि तमोगूण. 

◆ 4:00 वाजण्याच्या स्थानावर चतुर्वेदा: लिहिलेले आहे, तात्पर्य हे की वेद चार आहेत. 

    ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। 

◆ 5:00 वाजण्याच्या स्थानावर पंचप्राणा: लिहिलेले आहे, ज्याचे तात्पर्य हे की प्राण पांच प्रकारचे आहेत. 

     अपान, समान, प्राण, उदान आणि व्यान. 

◆ 6:00 वाजण्याच्या स्थानावर षड्र्सा: लिहिलेले आहे, याचा अर्थ असा की रस 6 प्रकारचे आहेत. 

     मधुर, अमल, लवण, कटु, तिक्त आणि कसाय. 

◆ 7:00 वाजण्याच्या स्थानावर सप्तर्षय: लिहिलेले आहे, याचे तात्पर्य हे की सप्त ऋषि आहेत. 

     कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वशिष्ठ. 

◆ 8:00 वाजण्याच्या स्थानावर अष्ट सिद्धिय: लिहिलेले आहे, याचे तात्पर्य हे की सिद्धि आठ प्रकारच्या आहेत. 

     अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ति, प्राकाम्य, इशित्व आणि वशित्व. 

◆ 9:00 वाजण्याच्या स्थानावर नव द्रव्यणि अभियान लिहिले आहे याचे तात्पर्य हे की 9 प्रकारच्या निधी आहेत. 

     पद्म, महापद्म, नील, शंख, मुकुंद, नंद, मकर, कच्छप, आणि खर्व. 

◆ 10:00 वाजण्याच्या स्थानावर दशदिशः लिहिले आहे, याचे तात्पर्य हे की दिशा 10 आहेत. 

     पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षीण, आग्नेय , वायव्य, नैऋत्य, इशान्य, उर्ध्व आणि अध 

◆ 11:00 वाजण्याच्या स्थानावर रुद्रा: लिहिले आहे, तात्पर्य हे की रुद्र 11 आहेत.

     कपाली, पिंगल, भीम, विरुपाक्ष, विलोहित, शास्ता, अजपाद, अहिर्बुध्न्य, शम्भु, चण्ड आणि भव. 

◆ 12:00 वाजण्याच्या स्थानावर आदित्या: लिहिलेले आहे, ज्याचा अर्थ हा आहे की सूर्य 12 आहेत. 

     अंशुमान, आर्यमन, इंद्र, त्वष्टा, धातु, पर्जन्य, पूषा, भग, मित्र, वरुण, विवस्वान आणि विष्णु.

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माझ्याकडे देव माझा पाहतो आहे… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? इंद्रधनुष्य ?

माझ्याकडे देव माझा पाहतो आहे… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

एके दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तेव्हा पाहिले कि एक आकर्षक बांद्याची व्यक्ती सस्मित समोर उभी होती. मी म्हटले, बोला! काय काम आहे?

ते म्हणाले, ठीक आहे भाऊ, तुम्ही रोज माझ्यासमोर प्रार्थना करत होता म्हणून म्हटले आज भेटूनच घेऊ. 

मी म्हटले, “माफ करा मी तुम्हाला ओळखले नाही.”

तेव्हा ते म्हणाले, “बंधू! मी भगवान आहे. तू रोज प्रार्थना करत होतास, म्हणून मी आज पूर्ण दिवस तुझ्या बरोबर राहणार आहे.”

मी चिडत म्हटलं, “ही काय मस्करी आहे?”  “ओह ही मस्करी नाही सत्य आहे. फक्त तूच मला पाहू शकतोस.  तुझ्या शिवाय मला कुणीही पाहू किंवा ऐकू शकणार नाही!

काही बोलणार इतक्यात मागून आई आली. एकटा काय उभा आहेस, इथं काय करतोस? चल आत, चहा तयार आहे आत येऊन चहा पी. आई ला काही तो दिसला नाही.

आईच्या या बोलण्या मुळे आता या आगंतुकच्या बोलण्यावर थोडा विश्वास होऊ लागला. माझ्या मनात थोडी भीती होती. चहाचा पहिला घोट घेतल्या बरोबर मी रागाने ओरडलो. 

अग आई, चहा मध्ये इतकी साखर रोज रोज का घालतेस? एवढे बोलल्या नंतर मनात विचार आला कि, जर  आगंतुक खरोखर भगवान असेल तर त्याला आई वर रागावलेलं आवडणार नाही. मी मनाला शांत केले आणि समजावले कि, अरे बाबा, आज तू नजरेत आहेस. थोडे लक्ष दे… 

“बस् मी जिथं असेंन, प्रत्येक ठिकाणी ते माझ्या आले… थोड्या वेळाने मी आंघोळीसाठी निघालो, तर ते सुद्धा, माझ्या पुढे…..

मी म्हटले ” प्रभू , इथे तरी एकट्याला जाऊदे.”

आंघोळ करून, तयार होऊन मी देव पूजेला बसलो. पहिल्यांदा मी परमेश्वराची मना पासून प्रार्थना केली. कारण आज मला, माझा प्रामाणिक पणा सिद्ध करायचा होता. 

ऑफसला जाण्यास निघालो. प्रवासात एक फोन आला. फोन उचलणार, इतक्यात आठवले, आज माझ्यावर प्रभू ची नजर आहे, गाडी बाजूला थांबवली. फोन वर बोललो आणि बोलत असताना, म्हणणार होतो की, या कामाचे पैसे लागतील, पण का कोण जाणे, तसे न बोलता म्हटले तू ये! तुझे काम होईल आज”

ऑफिस मध्ये पोचल्यावर मी माझे काम करत राहिलो. स्टाफ वर रागावलो नाही किंवा कुठल्याही कर्मचऱ्या बरोबर वादविवाद केला नाही. रोज माझ्या कडून विना कारण अपशब्द बोलले जायचे.  पण त्या दिवशी तसे काहीं न बोलता काही हरकत नाही, ठीक आहे, होऊन जाईल काम, असे म्हणत सहज पणे सर्व कामे केली.

आयुष्यातील हा पहिला दिवस होता. ज्या दिवशी माझया दिनचर्येत राग, लोभ, अभिमान, दृष्टता, अपशब्द, अप्रमाणिकपणा, खोटेपणा कुठे ही नव्हता.

संध्याकाळी ऑफिस मधून निघून घरी जायला निघालो. कार मध्ये बसलो आणि बाजूला बसलेल्या प्रभूंना म्हणालो,

“भगवान, सीटबेल्ट बांधा. तुम्ही पण नियमांचे पालन करा.” प्रभू हसले. माझ्या आणि त्यांच्या चेऱ्यावर समाधान होते. 

घरी पोचलो. 

रात्रीच्या भोजनाची तयारी झाली. मी जेवायला बसलो. प्रभू! प्रथम तुम्ही घास घ्या. मी असे बोलून गेलो. त्यांनीही हसून घास घेतला. 

जेवण झाल्यानंतर आई म्हणाली,” आज पहिल्यांदा तू जेवणाला नावे न ठेवता, काही दोष न काढता जेवलास! काय झाले? आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय?

मी म्हटले, “आई, आज माझ्या मनात सूर्योदय झाला आहे. रोज मी फक्त अन्नच खात होतो. आज प्रसाद घेतला.  माता आणि प्रसादात कधी काही उणीव नसते!”

थोडा वेळ शतपावली केल्यानंतर, मी माझ्या खोलीत गेलो आणि निश्चिन्त व शांत मनाने उशीवर डोके टेकवले… झोपी जाण्यासाठी… प्रभू नि माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, म्हणाले,”आज तुला झोप येण्यासाठी, संगीत किंवा औषध किंवा पुस्तकाची गरज भासणार नाही.”  

खरोखर, मला गाढ झोप लागली.

ज्या दिवशी आपणास कळेल की,  ‘तो’ पहात आहे, आपल्या हातून सर्व काही चांगले घडेल.

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डॉक्टर रखमाबाई ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? इंद्रधनुष्य ?

डॉक्टर रखमाबाई ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी 

भारतातील पहिल्या स्त्री डॉक्टर हा मान निश्चितच डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा आहे .दुर्दैवाने डॉक्टर आनंदीबाई जोशी भारतात परतल्यावर  आजारी पडल्या व मृत्यू पावल्या .भारतातील पहिली व्यावसायिक स्त्री डॉक्टर म्हणून डॉक्टर रखमाबाईंची इतिहासात नोंद आहे.

रखमाबाईंचा जन्म २२ नोव्हेंबर १८६४ रोजी झाला. रखमाबाईंच्या जन्मानंतर अल्पावधीतच  त्यांचे वडील जनार्दन सावे यांचा काविळीने मृत्यू झाला . रखमाबाईंचे आजोबा हरिश्चंद्र चौधरी हे बांधकाम कंत्राटदार होते.  आधुनिक विचारांचे असल्यामुळे, समाजविरोधात जाऊन त्यांनी रखमाबाईंच्या आईचा म्हणजे जयंतीबाईंचा पुनर्विवाह केला. सापत्य विधवेचा विधुरासोबत पुनर्विवाह हा त्या काळातील एक धाडसी निर्णय होता. जयंतीबाईंचे दुसरे पती म्हणजे डॉक्टर सखाराम अर्जुन राऊत. डॉक्टर सखाराम अर्जुन हे जे.जे. हॉस्पिटलमध्ये असिस्टंट सर्जन होते.  बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे ते संस्थापक सदस्य होते.   त्यांच्या घराण्यावर सत्यशोधक विचारांचा पगडा होता. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या रखमाबाईंनी डॉक्टर सखाराम अर्जुन या आपल्या दुसऱ्या पित्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले.

जयंतीबाईंच्या आग्रहामुळे रखमाबाईंचा विवाह अकराव्या वर्षी दादाजी नावाच्या एका नात्यातील मुलाशी करून दिला. विवाहानंतरही रखमाबाई माहेरी राहून शिकत होत्या. त्यांचे विचार प्रगल्भ होत होते.

दादाजींनी सन १८८४ मध्ये, रखमाबाई या लग्न होऊनही नांदायला येत नाहीत यासाठी बॉम्बे हायकोर्टात न्यायमूर्ती पिन्हे यांच्यासमोर कायदेशीर फिर्याद दाखल केली होती. सुशिक्षित, सुसंस्कृत, तडफदार रखमाबाईंनी न्यायमूर्ती पिन्हे यांच्यासमोर स्पष्ट निवेदन केले .त्या म्हणाल्या, ‘अजाणत्या वयात, माझी संमती न घेता हे लग्न लावण्यात आले आहे. अशिक्षीत ,सतत आजारी असलेला, स्वतःचे उत्पन्न नसलेला, मामावर अवलंबून असलेला असा हा पती माझे पालन पोषण करण्यास असमर्थ आहे. त्याच्याविषयी मला जवळीक वाटत नाही. नवरा म्हणून त्याला स्वीकारणे मला मान्य नाही.’

सर्व बाजूंनी सारासार विचार करून न्यायमूर्ती पिन्हे यांनी रखमाबाईंच्या बाजूने निर्णय दिला. ‘बालवयात लग्न झालेली मुलगी आता सज्ञान झाली आहे. निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात आली आहे. चांगले आणि वाईट याची जाणीव झालेल्या स्त्रीला नवऱ्याकडे पाठविण्याची सक्ती करणे रानटीपणाचे ठरेल असे मला वाटते.’ असे मत त्यांनी व्यक्त केले.

या निकालामुळे रखमाबाई आणि न्यायमूर्ती पिन्हे यांच्यावर टीकेची झोड उठली. हा निकाल आमच्या हिंदू धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे. समाजजीवनास घातक आहे. लग्नासाठी हिंदू लोकांना स्त्रियांची संमती आवश्यक नाही. अशी जहरी टीका स्वतःला समाज सुधारक म्हणविणाऱ्या अनेकांनी केली. खटल्याचा निकाल रखमाबाईंच्या बाजूने लागल्याने  अस्वस्थ झालेल्या दादाजींनी या निकालाच्या फेर सुनावणीसाठी अपील केले. त्यांना धर्ममार्तंडांची साथ होती. शिवाय दादाजींना रखमाबाईंच्या नावे असलेल्या पंचवीस हजार रुपयांचा लोभ होता.

रखमाबाईंना साथ देण्यासाठी पंडिता रमाबाई  व इतर अनेक विचारवंत, समाजसुधारक यांच्या पुढाकाराने ‘हिंदू लेडी संरक्षण समिती’ची स्थापना करण्यात आली. रखमाबाईंनी टाईम्स ऑफ इंडियामध्ये ‘हिंदू लेडी’ या नावाने  पत्रे लिहून  हिंदू धर्मातील अमानुष चालीरीतींवर घणाघात केला. बालविवाह, सतीची पद्धत, स्त्रियांना दिली जाणारी अपमानास्पद वागणूक यावर लेख लिहिले. पती मेल्यानंतर स्त्रीने सती जावे असे म्हणणारा समाज, पत्नी मेल्यावर पुरुषांना पत्नीसोबत ‘सता’ म्हणून का पाठवत  नाही? असे त्यांनी लिहिले. हा प्रश्न धर्ममार्तंडांच्या जिव्हारी झोंबला .मृत्यू पावलेल्या पत्नीच्या तेराव्याच्या आधीच दुसरे लग्न करून मोकळे होणारे पुरुष यांना एक न्याय आणि स्त्रियांना वेगळा न्याय असे का? स्त्रीला जाचक ठरणारे हे कायदे कोणी केले? असा चौफेर हल्ला त्यांनी समाजावर, पुरुषी व्यवस्थेवर केला. हा शंभर वर्षांपूर्वीचा कालखंड आहे हे लक्षात घेतले म्हणजे रखमाबाईंनी दिलेल्या लढ्याचे महत्त्व लक्षात येते.

इंग्रजांना येथील धर्म, कायदे यांना धक्का लावायचा नव्हता. ते मतलबी, व्यापारीवृत्तीचे होते. त्यांनी राजकीय स्वार्थ साधला. अपिलीय खटल्यात  न्यायमूर्ती फॅरन यांनी,  ‘रखमाबाईंनी एक महिन्याच्या आत पतीच्या घरी नांदायला जावे नाही तर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा भोगावी’ असा रखमाबाईंच्या विरोधात निकाल दिला. रखमाबाईंनी या अन्यायकारक निकालाला निक्षून नकार दिला आणि तुरुंगवास भोगण्याची तयारी दाखविली.

दादाजी व त्यांचे मामा यांच्या उलट तपासणीत, दादाजी हे कुठल्याही प्रकारे रखमाबाईंसाठी योग्य नाहीत हे कोर्टाच्या लक्षात आले. तेव्हा दादाजींनी रखमाबाईंना तडजोड करण्याची विनंती केली. दादाजींनी रखमाबाईंवरचा हक्क सोडावा आणि रखमाबाईंनी दादाजींना दोन हजार रुपये द्यावेत  अशी तडजोड झाली. तसेही दादाजींना रखमाबाईंच्या संपत्तीमध्येच स्वारस्य होते. तडजोडीनंतर दादाजींनी लगेच दुसरे लग्न केले. हा खटला १८८७ मध्ये संपुष्टात आला.

नको असलेल्या विवाहातून रखमाबाई मुक्त झाल्या त्यावेळी त्या फक्त २२ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावरील खटल्याच्या वेळी डॉक्टर एडिथ पिची आणि फिप्सन  पिची यांनी रखमाबाईंना शेवटपर्यंत साथ दिली होती. डॉक्टर एडिथ १८८३ मध्ये मुंबईला कामा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून रुजू झाल्या होत्या. डॉक्टर सखाराम अर्जुन यांच्या त्या सहकारी होत्या. त्यांचे पती फिप्सन स्त्रियांच्या आरोग्यासाठी स्थापन केलेल्या डफरीन फंडाचे सचिव होते .या पती-पत्नींच्या प्रयत्नामुळे डफरीन फंडातून रखमाबाईंना आर्थिक मदत मिळाली. याच पती-पत्नीने रखमाबाईंना इंग्लंडमध्ये राहण्यासाठी मॅक्लेरन दांपत्याचे पालकत्व मिळवून दिले. रखमाबाई १८८९ मध्ये वैद्यकशास्त्राच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेल्या.१८९४ मध्ये प्रसूती शास्त्र व शस्त्रक्रिया या परीक्षेत ऑनर्स पदवी मिळवून सन्मानाने भारतात परतल्या.

काही दिवस कामा हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून काम केल्यावर त्या सुरत इथे गेल्या. त्यावेळी सुरतमध्ये प्लेग व दुष्काळ यांनी थैमान घातले होते. या प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी रात्रंदिवस काम केले. तेथील स्त्रियांची मागास स्थिती सुधारण्यासाठी, बाळंतपणात होणारे मृत्यू रोखण्यासाठी रखमाबाईंनी खूप प्रयत्न केले .स्त्री शिक्षणासाठी ‘वनिता आश्रम’ ची स्थापना केली. १९१७ मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांनी राजकोट येथील जनाना हॉस्पिटलची जबाबदारी स्वीकारली. सौराष्ट्र व कच्छ प्रांताच्या त्या पहिल्या महिला प्रमुख डॉक्टर होत्या. त्यांनी भारतात रेडक्रॉस सोसायटीची स्थापना केली. आजन्म अविवाहित राहिल्या. महायुद्धाच्या काळात जखमी सैनिकांची शुश्रुषा केली.

रखमाबाईंच्या सुरत सेवेबद्दल शासनाने ‘कैसर ए हिंद ‘अशी पदवी त्यांना दिली. रेड क्रॉस सोसायटीने पदक देऊन त्यांचा सन्मान केला. वयाच्या ९१ व्या वर्षापर्यंत त्या कार्यरत होत्या.२५ डिसेंबर १९५५ रोजी त्या देवत्वात विलीन झाल्या.

प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणूस म्हणून स्वतःचे अधिकार मिळविण्यासाठी  कसा संघर्ष करायचा याचे उत्तम उदाहरण रखमाबाईंनी घालून दिले. आज २१ व्या शतकातही स्त्रीबद्दलचा दृष्टिकोन फारसा बदललेला नाही फक्त त्याची तीव्रता कमी झाली आहे. स्त्रीभ्रूण हत्या, स्त्रियांवरील अत्याचार, स्त्री-पुरुष असमानता या गोष्टी साऱ्या जगभर आहेत. समाज रुढी म्हणून किंवा आर्थिक परिस्थितीमुळे आपल्याकडे अजूनही बालविवाह होतातच. शंभराहून अधिक वर्षांपूर्वीच्या  त्या कठीण काळात, नको असलेल्या बालविवाहाचे संकट रखमाबाईंनी निग्रहाने परतवून लावले .रखमाबाईंचा एकाकी लढा हा निश्चितच प्रेरणादायी, स्फूर्तीदायी आहे. रखमाबाईंनी इतिहास घडविला. त्यांना विनम्र प्रणाम.👏 

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print