मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “एका गांधी टोपीचा प्रवास …” ☆ श्री हेमंत तांबे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “एका गांधी टोपीचा प्रवास …” ☆ श्री हेमंत तांबे ☆

आपण स्व. पु.ल.देशपांडे यांचं खिल्ली हे पुस्तक वाचलं असेलच.

त्यातील ” एका गांधी टोपीचा प्रवास ” पु.लं.च्या भाषेत देतो….. 

स्वातंत्र्याला फक्त पंचवीस वर्षे झाली होती !

पु.ल. लिहितात……

राष्ट्रीय चळवळीत भाग घेतलेल्या एका वृद्ध स्नेह्याला मी विचारलं, ” गेल्या पंचवीस वर्षांत कशात जास्त परिवर्तन झालं, असं तुम्हाला वाटतं?”

” गांधी टोपीत ! ” ते म्हणाले.

” ते कसं काय? ” 

” पूर्वी गांधी टोपी घालायला इंग्रज सरकारची भीति वाटत असे. आता आपल्याच जनतेची भीती वाटते.”

“असं का म्हणता? “

” तूच पाहा, गांधी टोपी, पायघोळ धोतर, खादीचा झब्बा आणि जाकीट घालून हातात कातडी ॲटॅची घेतलेल्या माणसाविषयी तुझं प्रथमदर्शनी काय मत होतं? “

पु.ल. बोलले नाहीत !

या गांधी टोपीचा प्रवास मला पु.लं.कडून नीट कळला आणि मोठं झाल्यावर मी अनुभव सुध्दा घेतला.

पण या टोपीचा उगम कसा झाला ? हा प्रश्न त्रास देत असे ! मग तो शोध सुरू झाला…… 

 १) १९१९ साली मोहनदास रामपूरच्या नवाबाला भेटायला गेले होते. त्यावेळी डोक्यावर काहीतरी हवं म्हणून तिथल्याच एका दर्जीकडून त्यांनी एक टोपी शिवून घेतली होती…  ती गांधी टोपी !

२) एका ठिकाणी कै. काका कालेलकर यांच्यासोबत मोहनदास बोलत असताना, आपल्या डोक्याला सूट होणारी टोपी शोधत असताना, या टोपीचा शोध लागला, असं मोहनदास म्हणतात….. असा तो जन्म !

ही टोपी मोहनदासांनी १९१९ — १९२१ घातली… लोकमान्य १९२० मध्ये स्वर्गवासी झाल्यावर स्वातंत्र्य चळवळ मोहनदासांच्या हातात आली…. तोपर्यंत टोपीचा उपयोग मोहनदासांनी शिकून घेतला होता !

१९२१ नंतरचा मोहनदासांचा टोपी घातलेला फोटो शोधून मिळत नाही….. 

….

मला भविष्य सांगता येत नाही, पण भूतकाळ थोडा माहिती आहे.

ती जुनी, छान, ‘ टोपीवाला आणि माकडं ‘ ही गोष्ट तुम्हाला माहीत आहेच… तिची पुनरावृत्ती करत नाही !

पण त्या गोष्टीचा दुसरा भाग तुम्हाला माहीत नाही. तो असा —                                                                                

तो मूळ टोपीवाला, म्हातारा होऊन मरण्यापूर्वी त्यानं आपल्या मुलाला ती गोष्ट सांगून बजावलं, ” कधी तुझ्यावर जर माझ्यासारखी वेळ आली, तर लक्षात ठेव आपल्या डोक्यावरील टोपी खाली काढून टाकायची, आपल्या सर्व टोप्या परत मिळतात.”….आणि त्या म्हाताऱ्यानं डोळे मिटले !

मुलगा टोप्यांचाच व्यवसाय करत होता. दररोज फिरून टोप्या विकत असे… एकदा फिरून थकला, भागला आणि एका झाडाखाली बसला. जेवून जरा झप्पी घेऊन उठला तर टोप्या गायब… वर पाहतो तर माकडांच्या डोक्यात टोप्या. त्याला बापानं माकडांची मानसिकता सांगितली होती…. त्यानं आपल्या डोक्यावरील टोपी काढून खाली टाकली… चटकन एक टोपी न मिळालेलं माकड खाली येऊन ती टोपी घेऊन झाडावर गेलं !

हा विचार करू लागला, ‘असं कसं घडलं? ….’ .तोपर्यंत ती माकडं टोप्या घेऊन जाताना दिसली. यानं विनवणी केली, ‘ असं करू नका, माझ्या टोप्या परत द्या, please.’ 

एक माकड थांबून म्हणालं, ” आता आपली भेट २०१४ साली, तोपर्यंत टोप्या आमच्या डोक्यावर  ….. ! “

© श्री हेमंत तांबे

पाटगाव. 

मो – 9403461688

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ असाही एक सफाई कामगार !  ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? इंद्रधनुष्य ?

असाही एक सफाई कामगार !  ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆

१९९८ सालची गोष्ट. क्षेपणास्त्रे (मिसाईल) बनवण्यासाठी भारताचे जोरदार प्रयत्न चालू होते. अमेरिकेच्या उपग्रहांना सुगावा लागू नये म्हणून क्षेपणास्त्रांच्या प्रकल्पाबाबत कमालीची गुप्तता राखली जात होती. क्षेपणास्त्रांकरिता आवश्यक असलेली क्रायोजेनिक इंजिन्स गुप्तपणे चेन्नई बंदरामध्ये आणली जात होती. तेथून ती इंजिन्स हवाई मार्गाने पुढे नेण्याची योजना होती. त्यासाठी भारतीय वायुसेनेची हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर्स वापरली जाणार होती.

चेन्नई बंदरापासून क्षेपणास्त्रांच्या लॉन्च पॅडपर्यंत पोहोचण्याकरता हेलिकॉप्टरला दोन तास पुरेसे होते. परंतु, अमेरिकेच्या उपग्रहांना चकवण्यासाठी, नागमोडी मार्गाने उडत, आणि चार वेगवेगळ्या ठिकाणी दोन-दोन तास थांबे घेत जाण्याचे आदेश हेलिकॉप्टर्सच्या वैमानिकांना दिले गेले होते. त्यामुळे, प्रत्यक्षात दोन तासांचा असलेला प्रवास आम्ही सोळा तासांमध्ये पूर्ण करणार होतो. अर्थात, आपल्या राष्ट्रीय उद्दिष्टांबाबत गुप्तता राखण्यासाठी मोजली जाणारी ही किंमत अगदीच नगण्य होती.

हेलिकॉप्टरमध्ये वजनदार क्रायोजेनिक इंजिने ठेवलेली असल्याने, प्रवासी क्षमतेवर खूपच मर्यादा आली होती. क्षेपणास्त्र प्रकल्पाचे फक्त १२ कर्मचारीच एकावेळी इंजिनसोबत प्रवास करू शकणार होते. या १२ कर्मचाऱ्यांमध्ये दोन सफाई कामगारांचाही समावेश होता. त्याचे कारण असे की, क्रायोजेनिक इंजिनमधून सतत गळून  हेलिकॉप्टरमध्ये सांडणारे तेल व क्रायोजेनिक इंधन वेळोवेळी स्वच्छ करत राहणे आवश्यक होते. 

भारत सरकारच्या सर्वोच्च पातळीवर ज्यांची नावे मंजूर झालेली होती अशा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही हेलिकॉप्टरमध्ये प्रवेश देऊ नये असे स्पष्ट आदेश आम्हाला होते. परंतु, सफाई कामगारांपैकी एखादा कामगार बदलून त्याच्या जागी ऐनवेळी दुसरा कामगार नेमण्याचे अपवादात्मक विशेषाधिकार क्षेपणास्त्र प्रकल्प निदेशकांना दिलेले होते. मात्र त्यासाठी प्रकल्प निदेशकांची लेखी परवानगी त्या कामगाराच्या हातात असणे आवश्यक होते.

चेन्नईहून आम्ही निघण्याच्या तयारीत होतो. इतक्यात, भुरकट लांब केस असलेला एक माणूस आमच्यापाशी येऊन म्हणाला, ” मला लॉंच साईटवर पोहोचणं अत्यावश्यक आहे, पण माझी फ्लाईट चुकलीय. मला तुमच्यासोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. प्लीज मला घेऊन चला.” …. पण आमच्या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त एकही जादा मनुष्य आम्ही सोबत नेऊ शकणार नव्हतो. त्यामुळे आमच्यापाशीही त्याला नकार देण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता.

आम्ही अगदी उड्डाण करण्याच्या तयारीत असताना तो मनुष्य पुन्हा आमच्यापाशी धावत-धावत आला आणि म्हणाला, ” हे पहा, माझ्यापाशी प्रकल्प निदेशकांचे लेखी परवानापत्र आहे. अमुक-अमुक सफाई कामगाराच्या ऐवजी मला जागा दिली गेली आहे.” … आता काहीच हरकत नसल्यामुळे, मुख्य वैमानिकाने त्याला चढायची परवानगी दिली. एखाद्या लहान मुलाप्रमाणे आनंदाने उडी मारून तो मनुष्य हेलिकॉप्टर मध्ये चढला. 

आमच्या प्रवासाचा एक टप्पा पूर्ण करून आम्ही एके ठिकाणी थांबलो होतो. चार तासांचा हॉल्ट होता. आम्ही निवांत चहा पीत बसलो होतो. तिथूनच आम्हाला दिसले की तो मनुष्य हेलिकॉप्टरचा अंतर्भाग अगदी काळजीपूर्वक पुसून काढत होता. आमच्या सोबतच्या कर्मचारीवर्गात काही वरिष्ठ शास्त्रज्ञ देखील होते. ते त्या माणसाशी काहीतरी बोलत असल्याचे आम्हाला दिसले. 

इतक्यातच एक शास्त्रज्ञ धावत आमच्यापाशी आला आणि म्हणाला, “अहो, ते जे हेलिकॉप्टर स्वच्छ करतायत त्यांना प्लीज थांबवा. ते आमचं ऐकत नाहीयेत. ते स्वतःच आमच्या क्षेपणास्त्र प्रकल्पाचे निदेशक आहेत, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम !”

हे ऐकून आम्हाला धक्काच बसला. आमच्या मुख्य वैमानिकाने लगेच जाऊन त्यांना ते काम थांबवण्याची विनंती केली. त्यावर हसून ते इतकेच म्हणाले, ” मी या हेलिकॉप्टरमध्ये एक सफाई कामगार म्हणून प्रवास करत आहे. माझे कर्तव्य बजावण्यापासून तुम्ही कृपया मला रोखू नका.” आमचा नाईलाज झाला. त्यापुढच्या हॉल्टमध्येही या सद्गृहस्थांची कर्तव्यपूर्ती अव्याहत चालू राहिली. अक्षरशः हतबुद्ध होऊन पाहत राहण्यापलीकडे आम्ही काहीच करू शकत नव्हतो. गंतव्यस्थानी पोहोचल्यानंतर आम्ही या अजब प्रकल्प निदेशकाचा आणि त्याच्या टीमचा हसतमुखाने निरोप घेतला. 

या घटनेनंतर बऱ्याच वर्षांनी मला राष्ट्रपती भवनातून एक निमंत्रणपत्र आले. राष्ट्रपतींनी तेथील ‘ मुघल गार्डन्स ‘ चा केलेला कायापालट मी पहावा आणि राष्ट्रपती एक सफाई कामगार म्हणून चांगले आहेत की ते त्याहून अधिक चांगले माळी आहेत हे मी सांगावे, असे त्या पत्रात लिहिले होते ! 

त्या काळी मी परदेशात असल्याने, आमंत्रण स्वीकारू शकत नसल्याचे मी विनम्रतापूर्वक कळवले. 

कालांतराने, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची मी आवर्जून भेट घेतली. तेंव्हाही त्यांनी खळखळून हसत त्या जुन्या प्रसंगाची आठवण जागवली. 

… एका असामान्य भारतीयाला माझा सॅल्यूट !

मूळ इंग्रजी अनुभव लेखक: विंग कमांडर अब्दुल नासिर हनफी, वीर चक्र, (सेवानिवृत्त)

मराठी भावानुवाद  : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

संग्राहक : मेघ:शाम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नागपंचमी …नागपूजेच्या पलिकडे…” – माहिती संकलन : सतीश खाडे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ “नागपंचमी …नागपूजेच्या पलिकडे…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर

साप आपले मित्र आहेत, निरुपद्रवी आहेत हे प्रत्यक्ष कृतीतून निलिमकुमार खैरेंनी दाखवले…त्यासाठी किती मोठे धाडस केले…त्याचा हा छोटासा वृत्तांत…

थोड्याच दिवसांत प्रकाश कर्दळे (निवासी संपादक, इंडीयन एक्सप्रेस) यांनी ही बातमी देशभर व्हायरल केली … ‘नीलिमकुमार खैरे बहात्तर विषारी सापांच्या सान्निध्यात बहात्तर तास राहून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करणार…’

बातमी देशभर पसरली. आम्ही सगळेच जोशात तयारीला लागलो. अण्णा (निलिमकुमार खैरे) त्या वेळी ब्लू डायमंडमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होता. जगप्रसिद्ध उद्योगपती शंतनुराव किर्लोस्करांचे धाकटे बंधू कै. पी. एल. किर्लोस्कर हे त्यावेळी ब्लू डायमंड हॉटेलचे कार्यकारी संचालक होते. खूपच सरळमार्गी आणि  सज्जन उद्योगपती असा त्यांचा लौकिक होता. अण्णाच्या आगामी विश्वविक्रमाची योजना आम्ही त्यांच्यासमोर मांडली. त्यांना ती पसंत पडली. आपल्या कंपनीचा एक तरुण कर्मचारी जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न करतोय याचं त्यांना समाधान वाटलं. त्यांनी आर्थिक सहाय्य करण्याचंही मान्य केलं. माझा मित्र सुहास बुलबुले तेव्हा बी. जे. मेडिकल कॉलेजचा ‘कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह’ होता. त्याच्यामुळे बी.जे.च्या मैदानावर हे वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचं ठरलं. आवश्यक त्या परवानग्या मिळवल्या आणि आम्ही खोली बांधण्याच्या मागे लागलो. ॲक्रिलिक शीट्स वापरून १० फूट बाय १० फूट आकाराची पारदर्शक खोली तयार केली. खाली वाळू पसरली. आतमध्ये बसण्यासाठी एक आरामखुर्ची ठेवली. दुसरीकडे विषारी साप गोळा काम सुरू होतं. आमचा सर्पप्रेमी मित्र राजन शिर्के याच्या नेतृत्वाखाली पुण्यातल्या सर्व सर्पमित्रांनी विषारी साप जमवायला सुरुवात केली. कलकत्ता स्नेक पार्कचे संस्थापक दीपक मित्रा अण्णाबद्दलची बातमी वाचून त्यांच्याकडचे विषारी साप घेऊन स्वतः पुण्यात आले. अखेर ठिकठिकाणाहून नाग, माया घोणस, फुरसं आणि पट्टेरी मण्यार अशा एकूण ७२ विषारी सापांची जमवाजम झाली. दरम्यान, मी इंग्लंडच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या कंपनी संपर्क साधून होतो. या रेकॉर्ड्ससाठी त्याच क्षेत्रातील दोन व्यक्तींची रेफरी किंवा पंच म्हणून नेमणूक केली जाते. मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटचे उपसंचालक तसंच सर्पविषतज्ज्ञ डॉ. नीलकंठ वाड आणि पुण्याच्या मॉडर्न कॉलेजच्या प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. वाय. परांजपे या दोन प्रतियश शास्त्रज्ञांची अण्णाच्या वर्ल्ड रेकॉर्डसाठी रेफरी म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी एक रजिस्टर तयार केलं होतं. दर तासाला अण्णाच्या आणि सापांच्या हालचालीच्या डोळ्यात तेल घालून नोंदी घेऊन त्यावर दोघांना सह्या करायच्या होत्या.अखेर सगळी तयारी झाली आणि २० जानेवारी १९८० रविवारी या दिवशी दुपारी चार वाजता अण्णाने सापांच्या खोलीत प्रवेश केला. पुढचे बहात्तर तास नाट्यमय असणार होते. अण्णाला काही होणार नाही याची मनोमन खात्री होती. तरीही थोडी धाकधूक होतीच. अण्णा आत गेला तेव्हा त्याच्या आरामखुचीवर काही साप आरामात विराजमान झालेले होते. बऱ्याच वेळाने अण्णाला खुर्चीवर बसायला जागा मिळाली. या काळात काही सापांनी एकमेकांशी भांडणं उकरून काढली. अण्णानेच ती सोडवली. थंडीमुळे काही साप त्याच्या टी- शर्टमध्ये घुसले. अण्णाने एकेका सापाला हलकेच धरून बाहेर काढलं पण एकाला काढलं की त्याच्या जागी दुसरा हजर! शेवटी हताश होऊन अण्णा तसाच झोपून गेला. दहा-बारा सापही त्याच्या टी-शर्टमध्येच झोपले. आम्हालाही बाहेर डोळा लागला. सकाळ झाल्यावर अण्णाने एकेका सापाला हलकेच बाहेर काढून बाजूला ठेवलं आणि चहा घेतला. नियोजित वर्ल्ड रेकॉर्डच्या बहात्तरपैकी चौदा तास संपून गेले होते. अजूनही अठावन्न तास बाकी होते. दरम्यान, ब्लू डायमंड हॉटेलमधून खास अण्णासाठी सॅण्डविचेस आणि फुट ज्यूस आला होता. अण्णाने फक्त थोडा ज्यूस घेतला. सॅण्डविचेस आम्ही संपवली.

आता अण्णा आणि साप जणू एकमेकांसोबत एकरूप झाले होते. सुरुवातीला त्या खोलीत ७२ साप आणि एक माणूस होता. पण आता मात्र एका खोलीत एकत्र नांदणारे ते ७३ प्राणी होते.

अण्णाचा हा विक्रम बघण्यासाठी तीनही दिवस पुणेकरांची प्रचंड गर्दी होत होती. एवढे विषारी साप अंगाखांद्यावर खेळत असूनही माणसाला चावत नाहीत, हा लोकांसाठी चमत्कारच होता. त्यामुळे थक्क होऊन लोक त्याकडे पाहत राहत. ज्या कारणासाठी आम्ही काम करत होतो आणि ज्यासाठी अण्णाने हा जागतिक विक्रम करण्याचा घाट घातला होता तो सफल होताना पाहून समाधान वाटत होतं. अत्यंत थरारक आणि नाट्यमय असे तीन दिवस होते ते. अण्णासाठी तर होतेच, पण आमच्यासाठीही होते. त्या तीन दिवसांत आई-दादांची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. ते दोघंही खाणंपिणं आणि झोप -सोडून घरीच थांबले होते. आई तर तीन दिवस देव पाण्यात ठेवून बसली होती.

अखेर ७२ तास संपत आले. जागतिक विक्रम घडण्याची वेळ आली! या आगळ्यावेगळ्या विक्रमाच्या पूर्ततेप्रसंगी शंतनुराव किर्लोस्कर स्वतः जातीने हजर होते. पुण्यातले आणि राज्यातले आमचे सर्प आणि प्राणिमित्रही गोळा झाले होते. दीपक मित्रांसारखी राज्याबाहेरून आलेली मंडळीही होती. बुधवारी, २३ जानेवारीला दुपारी चार वाजता दीपकने केबिनच्या दाराची कडी काढली. बाहेर येताच अण्णाने त्याला आलिंगन दिलं. त्या दोघांचे आणि आमचेही डोळे आनंदाश्रूंनी भरून वाहत होते. त्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. अण्णाचे अनेक फोटो काढले गेले. त्यानंतर मी ‘गिनीज बुक’च्या लंडनमधल्या मुख्य कार्यालयात जागतिक विक्रम प्रस्थापित झाल्याचं वृत्त विश्रामबाग- वाड्याजवळच्या ऑफिसमधून तारेने कळवून टाकलं. अण्णाने जागतिक विक्रम कला होता. ७२ तासांपूर्वी माणसांचा एक प्रतिनिधी सापांच्या सान्निध्यात रहायला गेला आणि ७२ तासांनंतर तो सापांचा प्रतिनिधी बनून माणसांत आला होता! पुढे आयुष्यभर अण्णा सापांचा अन् प्राण्यांचा प्रतिनिधी म्हणूनच काम करत राहिला. आजही करतो आहे.

— ‘सोयरे वनचरे’ (ले.अनिल खैरे) या पुस्तकातून

(माहिती संकलन : सतीश खाडे,पुणे)

प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “गावांच्या नावातही मजा आहे…” ☆ श्री कचरू चांभारे ☆

श्री कचरू चांभारे

? इंद्रधनुष्य ?

☆ “गावांच्या नावातही मजा आहे…” ☆ श्री कचरू चांभारे ☆

गावांच्या नावातही मजा आहे. चला जरा शोधू या 

एकदा मुंबईला जाताना रोडवर एका गावाच्या नावाचा बोर्ड दिसला. गावाचे नाव आहे सरळगाव, ता.मुरबाड जि.ठाणे. .. यात काय नवल ? असं वाटेल. पण नावातच नवल आहे. कारण गाव कधीच सरळ नसतं, पण हे गाव नावाने सरळ आहे.अन् मग काय सरळगावावरून मला अनेक गंमतीशीर गावांची नावे आठवली.

विरुद्ध अर्थी नावाची गावे— उदा.  सरळगाव ×वाकडगाव, वाकडेवाडी, आनंदवाडी ×वैतागवाडी, राजापूर ×राणीपूर,  मोठीवाडी × छोटीवाडी, नवापूर, नवेगाव× जुनेगाव , प्रकाशा × अंधारवाडी, ,लहानगाव × मोटेगाव 

समानार्थी गावाची नावे  — आनंदवाडी – सुखापूर , हातकणंगले — करचुंडी 

प्राण्यांच्या नावावरून गावे — नागपूर ,पालघर ,शेळगाव, हस्तिनापूर, कोल्हापूर,वाघापूर ,डुक्करवाडी , चितेगाव, मोरगाव, धामणगाव, ढेकणमोहा, मांजरसुंबा, मयुर नगर, मन्यारवाडी, म्हैसमाळ,  बकरवाडी, बोकुडदरा ,मासापुरी,

वनस्पतीजन्य गावांची  नावे   — लातूर ,मुगगाव ,परतूर ,शेवगाव , पिंपळवंडी ,आंबेगाव ,वडवणी,  वडगाव ,पिंपळनेर ,बेलगाव ,बाभुळगाव  ,बोरगाव, बोरफडी, जांभळी, जांबसमर्थ, पिंपळगाव, बोरजाई,  बेलापुरी, चिंचपूर ,चिंचाळा, आंबेसावळी ,आंबेजोगाई ,मोहगाव, जामनेर, हिंगणघाट ,पळसगाव, पिंपरी-चिंचवड, कुसळंब, आंबेत

पदार्थ दर्शक नावे   — तेलगाव ,करंजी, जिरेवाडी, मिरी ,दूधगाव ,दुधनी ,साखरखेर्डा , गुळज, हवेली, मालेगाव, वरणगाव, भुसावळ,धनेगाव, इचलकरंजी, ईट

धातू-अधातू दर्शक नावे  — पोलादपूर ,लोखंडी सावरगाव , पारा ,सोनेगाव , तांबाराजुरी ,पौळाचीवाडी,

वनस्पती, प्राणी, शरीर-अवयव दर्शक गावे  —-  हातकणंगले , मानकुरवाडी ,पायतळवाडी ,कानडी, मुळशी, फूलसांगवी, कुंभेफळ ,केसापुरी, कोपरगाव, मानगाव, कानपूर ,डोकेवाडी , तोंडापूर, डोकेवाडा, माथेरान,कोपरा हातनाका, सुरत ,पानगाव,घोटेवाडी,

क्रियापद दर्शक गावे  — जातेगाव , मोजवाडी , करचुंडी, जालना, जळगाव, पळशी, चाटगाव, मांडवजाळी,

संख्यादर्शक गावांची  गावे   — चाळीसगाव ,तीसगाव ,विसापूर ,आठवडी , नवेगाव , नवापूर , सातेफळ,  सातोना, पंचवटी ,पाचेगाव , पाचगणी,सप्तश्रुंगी,चौका, नवरगाव, एकदरा ,त्रिधारा ,चौका

भौगोलिक संज्ञादर्शक गावांची नावे —  चंद्रपूर ,दर्यापूर ,चिखलदरा, मेळघाट, घाटसावळी, घाटजवळा, समुद्रपूर, घाटंजी ,गडचिरोली, गढी, रानमळा , पोलादपूर, मंगळवेढा, संगमनेर

प्राण्यांच्या निवासस्थानावरून पडलेली नावे.… वारूळा, गुहागर

मूल्यदर्शक गावांची नावे.….  समतानगर ,

भावदर्शक गावांची नावे.…  विजयवाडा,पुणे (पुण्य),मौज, तामसा ,महाबळेश्वर 

नातेसंबंध दर्शविणारी गावे….   बापेवाडा, भाऊनगर ,मूल, पणजी, आजेगाव, सासवड

रंगवाचक गावांची नावे….  पांढरवाडी ,काळेगाव, पांढरकवडा, काळेवाडी, तांबडेवाडी, काळभोर

स्त्रीनामवाचक गावांची नावे...   पर्वती ,उमापूर ,सीताबर्डी, गयानगर, द्वारका, भागानगर

पुरूषनामवाचक गावांची नावे…  रामपुरी ,गोरखपूर ,पुरूषोत्तमपुरी ,रामसगाव, दौलताबाद, महादेवदरा,परशू

नदीच्या नावावरून असलेली गावे .… गोदावरी, नर्मदा, वर्धा, गंगानगर

— असंच तुम्हीही काहीतरी शोधा म्हणजे मौज सापडेल.  

© श्री कचरू चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ Let’s HOPE ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ Let’s HOPE ☆ श्री संभाजी बबन गायके 

HOPE (Help One Person Everyday !)

होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ! …. 

त्याच्या आई-बापाने त्याला कोणतंही नाव द्यायला नकार दिला होता. तिथले सगळेच इतर जगाच्या तुलनेत तसे रंगाने काळे. पण हे पिल्लू त्यांच्यापेक्षाही वेगळं निपजलं होतं. हातापायाच्या काड्या आणि मोठाले डोळे,बसकं नाक. आईनं कसंबसं त्याला अंगावर पाजलं काही दिवस.जसं जसं हे पोर मोठं होऊ लागलं तसं बघणारे इतर त्याला विचित्र नजरेनं पाहू लागले! त्यांच्या त्या देशात चेटकीणी मुलांच्या रुपात जन्माला येऊन लोकांना छळतात म्हणे. हे बाळ म्हणजे तशाच एखाद्या चेटकीणीचा मानवी अवतार! बरं,मानवी अवतार म्हणावं तर तसं फारसं माणसासारखं तरी कुठं दिसतंय? लोकांची कुजबूज वाढली. तो पर्यंत बाळ एक वर्षांचा झाला. 

दारिद्र्य,अज्ञान आणि अंधश्रद्धा कायमची वस्तीला आलेल्या त्या पृथ्वीवरच्या नरकाच्या जिवंत देखाव्यात माणुसकी,कणव,सदसदविवेकबुद्धी इत्यादी मानवी गुण औषधालाही आढळत नव्हते. सर्वांनी मिळून त्या बाळाच्या आईबापाला दमदाटी केली…..तुझं पोरगं माणूस नाही…चेटकीण आहे….फेकून दे लगेच ही ब्याद ! … आईबापाला ऐकावं लागलं…आणि त्यांचीही तशीच खात्री पटत चाललेली होतीच काही महिन्यांपासून. त्यांच्या आसपास त्यांनी अशी अनेक चेटकी मुलं पाहिली होती….की ज्यांना लोकांनी दगडांनी ठेचून मारून टाकलं होतं….आपल्या पदरातही असाच निखारा पडला की काय?

एके दिवशी रात्रीच्या अंधारात त्या दोघांनी त्या झोपेत असलेल्या लेकरास उचललं आणि रस्त्यावर आणून टाकलं. त्याला ठेचून मारून टाकण्याची हिंमत नव्हती त्यांच्यात….हे त्या बाळाचं दैव बलवत्तर असल्याचं लक्षण ! 

सकाळ झाली…बाळाने टाहो फोडला. येणा-या-जाणा-यांनी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं…अशी अनेक मुलं असतात रस्त्यावर फेकलेली. त्यातून हे तर चेटकीणीसारखं दिसणारं पोर….. आठ महिने कशाला म्हणतात? इतक्या दिवस हे बालक जगलं हे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हतंच. कुत्र्याच्या एखाद्या पिलासारखं हे माणसाचं पिलू जमेल तसं जगलं…रस्त्यावर रांगता रांगता हाती लागेल ते तोंडात घातलं….पुढे काही दिवसांत स्वत:च्या पायांवर चालू लागलं…अठरा महिने झाले होते त्याला जन्मून. जंगलात हरीणीची पाडसं जन्मल्या नंतर काही तासांतच उड्या मारू लागतात. खरं तर माणसाच्या अपत्यांना ही सवलत नसते. पण हे मूल आता आपल्या मनानेच मोठं झालं होतं !

ती…समाजसेवेसाठी होतं-नव्हतं ते सारं विकून घराबाहेरच नव्हे तर देशाबाहेर पडलेली तरूणी. उत्तम शिकलेली. एका कापड कंपनीत व्यवस्थापक पदावर नोकरी करीत होती आधी. तत्पूर्वी निम्मं अधिक जग फिरून आलेली. कधी कधी एकटीनं प्रवास केलेला होता तिने. तो ही युरोपात नव्हे तर दारिद्र्य,रोगराई,गुंडगिरी,अंधश्रद्धा यांनी ग्रासलेल्या आफ्रिकी देशांमध्ये. नायजेरीया सारख्या देशांत वेगळं रूप घेऊन जन्मलेल्या मुलांना चेटकीणी समजून त्यांच्या हत्या केल्या जातात, हे तिने पाहिले आणि अनुभवलेही होते. 

नोकरीतून साठवलेले काही पैसे, स्वत:च्या नावे असलेली स्थावर, जंगम मालमत्ता विकून आलेले काही पैसे तिने गाठीशी बांधले आणि ती निघाली….या चेटकीण बालकांना वाचवायला. तिला तिथल्या लोकांनी शक्य तो सर्व त्रास दिला, ती काही महिन्यांची पोटुशी असताना तर तिचं तिच्या एका स्थानिक कार्यकर्त्यासह चक्क अपहरणही झालं होतं पैशांसाठी. तिला अनेकवेळा धमकावण्यातही आलं होतं….ध्येयासाठी सर्वस्व पणाला लावून घर सोडलेली ती….आपलं मानवीय कार्य करीत राहिली. तिचा लाईफ पार्टनरही तिच्या सोबत आला होता या कामात तिला मदत करायला. 

टळटळीट दुपारची वेळ. आफ्रिकेतील ऊन ते. सगळीकडे धुरळा उठलेला. रस्त्यावर शेकडो लोक आहेत. त्यांच्या गर्दीत तिला ते मूल दिसलं…कसंबसं हालचाल करीत एक एक पाऊल पुढे टाकीत निघालेलं दिसेल त्या दिशेला. ती गाडीतून खाली उतरली. तिने त्या लोकांना विचारलं…कुणाचं मूल आहे? नाव काय याचं? कुणी याला खायला घातलंय की नाही गेल्या कित्येक दिवसांत? कुणाकडेही काहीही उत्तर नव्हतं. गेली आठ महिने अन्नान दशेत जगलेलं हे मूल…शरीर कसंबसं तग धरून होतं…..  तिने आपल्या हातातील बिस्कीटांपैकी एक बिस्कीट त्याच्या हातात दिलं…त्यानं ते लगेच घेतलं आणि तो अत्यंत हळूहळू आणि काळजीपूर्वक एक एक घास खाऊ लागला. तिने पाण्याची बाटली त्याच्या सुकलेल्या ओठांपाशी नेली. त्याने तिच्याकडे बघत बघत एक एक घोट पाणी प्यायला आरंभ केला. खपाटीला गेलेलं पोट..सर्व बरगड्या सताड उघड्या. दुस-याच क्षणी तिने निर्णय घेतला….या कुणाच्याही नसलेल्या बाळाला सोबत घेऊन  जायचं ! 

तिने त्याला कपड्यात गुंडाळलं अलगद. कारमध्ये बसली त्याला मांडीवर घेऊन. तिच्या नव-याने तिच्याकडे पाहिलं…त्याचे डोळे तिला जणू सांगत होते..हे बाळ काही फार दिवसांचं सोबती नाहीये! ती म्हणाली….मला आशा आहे हे जगू शकेल! आपण याचं नाव होप ठेऊयात का? हो,छान आहे…तो म्हणाला. आणि ते दोघं त्यांनी उभारलेल्या एका बालकाश्रमात आले. तिथं अशीच काही मुलं होती लोकांनी चेटकीण म्हणून हाकलून दिलेली…मारून टाकण्याचा प्रयत्न केलेली. 

माणसाला जगायला अन्न लागते,पण जीवनाला प्रेम,वात्सल्य गरजेचं असतं. मथुरेतून आलेल्या कन्हैय्याला यशोदेनं दूधही पाजलं आणि प्रेमामृतही…म्हणूनच कान्हा वाढला. या कृष्णवर्णीय बालकाला तिने आपल्या बालकाश्रमात आणून भरती केलं. जणू ते काल-परवाच जन्माला आलंय अशी त्याची काळजी घ्यायला सुरूवात केली…जणू त्याचं आयुष्य अठरा महिन्यांनी मागे गेलं होतं…नव्यानं आरंभ करण्यासाठी. 

तिच्या मनातील आशेने आता बाळसं धरायला प्रारंभ केला. साजेसं अन्न,स्वच्छता,निवारा आणि नि:स्वार्थ प्रेम या चार गोष्टींनी आपला परिणाम दाखवला काहीच दिवसांत….खुरटलेलं,रोगानं ग्रासलेलं,सुकलेलं हे मानवी रोपटं आता अंग धरू लागलं…..आता ते जिवंत राहण्याचं स्वप्न पाहू शकत होतं…आणि ते जगावं अशी तिला आशा होती….आणि तसं झालंच! त्या कुरूप वेड्या पिलाचं एका राजहंसात रूपांतर झालं! चेटकीणीचा शिक्का बसलेलं ते मूल आता देवदूतासारखं दिसू लागलं होतं! होप आता शाळेत जाऊ लागला आहे. (ही काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे…आता होप बराच मोठा झाला असेल.) 

तिचं नाव Anja Loven. यातील j चा उच्चार ‘य’ असा करायचा. अन्या लोवेन तिचं नाव. आडनावात तर Love आधीपासूनच असलेलं..जणू देवानंच दिलेलं नाव….. अन्या डेन्मार्क मध्ये जन्मलेली. पदवीधर. शिक्षणानंतर जग पाहण्यासाठी हिंडली. एका हवाई कंपनीत नोकरी केली काही दिवस. तिच्या आईला जीवघेणा कॅन्सर झाला म्हणून तिच्या सेवेसाठी ती घरीच राहिली…आई गेल्यानंतर तिने आपलं गाव सोडलं. एका कापड व्यवसायात व्यवस्थापकपदी पोहोचली. एका वर्षी सामाजिक कामाच्या निमित्ताने मालावी देशात जाऊन आली. टांझानियातील शाळांच्या मदतीसाठी तिने निधी जमवायला सुरूवात केली. २०१२ मध्ये अन्याने एक सामाजिक संस्था स्थापन केली. नायजेरीय सारख्या देशातील बालक-चेटकीण अंधश्रद्धेविषयी तिने ऐकलं आणि तिला ध्येय गवसलं…जवळचे सर्व विकून ती नायजेरीयात राहायला गेली…तिथे एक बालक संगोपन केंद्र काढलं जिथे अशा चेटकीण-बालकांना आसरा,शिक्षण दिलं जातं. नायजेरीयातील एका कायदेतज्ज्ञ माणसाशी, इम्यानुअल उमेम शी विवाह केला….त्यांना एक मुलगा आहे आता. अन्याने २०१५ मध्ये स्वत:ची जागा विकत घेऊन काम वाढवलं आणि लॅन्ड ऑफ होप चिल्ड्रेन्स सेंटर सुरू झालं. इथं आता शंभरच्या आसपास मुलं आहेत….चेटकीणींचं रूपांतर देवदूतात करण्याचा प्रयत्न सुरू आहे….कारण तिच्या मनात अखंडीत आशा आहे ! 

(इंटरनेटवरील प्रोजेक्ट नाईटफॉल पेजवरील एका विडीओमध्ये अन्याची गोष्ट पाहिली आणि तुम्हांला सांगावीशी वाटली. आपल्याकडेही सिंधुताई सपकाळांसारख्या माई होऊन गेल्या…त्यांची आठवण झाली यानिमित्ताने. अन्या म्हणते… HOPE means Help One Person Everyday!अन्याचं खरंच आहे…हे आपण करूच शकतो !)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चंद्रयान -३ ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ चंद्रयान -३ ☆ श्री राजीव गजानन पुजारी

चंद्राने माणसाला नक्की केव्हा भूल घातली हे सांगता येणे कठीण आहे. पण चंद्राशी अगदी ‘मामा’ चे नाते जोडण्यापासून ते त्याच्या शीतल चांदण्याच्या कौतुकापर्यंत आणि चंद्राशी जोडलेल्या अनेक धार्मिक संकेतांपर्यंत चंद्राने आपले भावविश्व् व्यापलेले आढळते.

माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले त्याला चोपन्न वर्षे पूर्ण झाली. पण नील आर्मस्ट्रॉंगने प्रत्यक्ष पाऊल ठेवल्याच्या शंभर वर्षे आधी ज्युल्स व्हर्न नावाच्या विज्ञान लेखकाने त्याच्या ‘फ्रॉम अर्थ टू मून’ या विज्ञान कादंबरीत चंद्रयात्रेचे स्वप्न पाहिले होते.

भारताच्या चांद्रमोहिमांची सुरुवात चंद्रयान -१ पासून झाली. २२ ऑक्टोबर २००८ रोजी चंद्रयान-१ चे यशस्वी प्रक्षेपण करून इस्रोने चांद्रमोहिमांचा श्रीगणेशा केला. १४ नोव्हेंबर २००८ रोजी या यानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘इम्पॅक्ट प्रोब’ नामक उपकरण जाणूनबुजून आदळविले. या उपकरणामध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील हवामान व तेथील भुपृष्ठ यांचा अभ्यास करणारी साधने होती. चंद्रवतरणाची ती एकप्रकारे नांदीच होती. याच मोहिमेद्वारा चंद्रावर गोठलेल्या अवस्थेत पाणी आहे हे सर्वप्रथम सिद्ध झाले.

२२ जुलै २०१९ रोजी आखलेल्या चंद्रयान-२ मोहिमेद्वारे इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अलगद अवतरण करण्याचा प्रयत्न केला, पण कांही तांत्रिक अडचणींमुळे तो अयशस्वी झाला. मात्र त्याचा ऑर्बिटर त्यापूर्वीच चंद्रकक्षेत प्रस्थापित केला गेला होता. चंद्राचा अभ्यास करून मिळणारी माहिती पृथ्वीवर पाठविण्याचे काम हा ऑर्बिटर आजही चोखपणे करीत आहे. तसेच चंद्रयान -३ कडून मिळणाऱ्या माहितीचे प्रक्षेपण करण्यासाठी आपण हाच ऑर्बिटर वापरणार आहोत. त्यामुळे ही मोहिम सत्तर टक्क्यापर्यंत यशस्वी झाली असे इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मत आहे.

याच मोहिमेचा पुढचा भाग म्हणून इस्रोने चंद्रयान – ३ मोहिमेचे नियोजन केले होते. १४ जुलै २०२३ रोजी प्रक्षेपीत केलेले चंद्रयान पृथ्वीभोवतालच्या कक्षा वाढवत चंद्राच्या कक्षेत प्रवेश करते झाले. चंद्राभोवती भ्रमण करतांना कक्षा कमी करत करत २३ ऑगस्ट २०२३ रोजी विक्रम लँडर चंद्रावर अलगद उतरले आणि भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश ठरला. त्यानंतर कांही वेळाने प्रज्ञान रोव्हर लँडर मधून बाहेर येऊन चंद्राच्या भुपृष्ठावर विहार करण्यास सज्ज झाला. हा रोव्हर चंद्रावर १४ पृथ्वी दिवस म्हणजेच एक चांद्र दिवस भ्रमण करून उतरलेल्या जागेभोवतालच्या चंद्राच्या भूपृष्ठाच्या मुलजैविक संरचनेचा अभ्यास दोन उपकरणांच्या सहाय्याने करेल व ती माहिती पृथ्वीकडे पाठवेल.

त्याचवेळी विक्रम लँडर त्याच्यावरील उपकरणांच्या सहाय्याने चंद्राच्या भूपृष्ठाची औष्मिक प्रवाहकता (thermal conductivity), तापमान, अवतरणाच्या जागेभोवतालची भूकंपशीलता (seismicity), चंद्राच्या भुपृष्ठाजवळील प्लाविकाची (plasma) घनता व त्याच्यातील फेरफार आणि चंद्राचे लेसर श्रेणीय अध्ययन आदि गोष्टींचा अभ्यास करून त्याची माहिती इस्रोकडे पाठवेल.

चंद्रयान -३ चे प्रॉपल्शन मॉड्युल पृथ्वीच्या वर्णक्रमिय (spectral) आणि ध्रुवमितीय (pilarimetric) मोजमापांचा अभ्यास करेल. या अभ्यासाचा वापर असूर्यवर्ती ग्रहांवर (exoplanets) जीवसृष्टी आहे का, हे पडताळण्यासाठी केला जाईल.

एकंदरीत चंद्रयान -३ मोहीम अत्यंत यशस्वी ठरली असून, त्याद्वारे भारत हा चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरला आहे आणि ही आपणा भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

© श्री राजीव गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कॅप्टन  सचिन गोगटे – कॅडेट नंबर ३४५० ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ कॅप्टन  सचिन गोगटे – कॅडेट नंबर ३४५० ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

कॅप्टन सचिन गोगटे यांनी मर्चंट नेव्हीमध्ये अनेक वर्षं काम केलं. साध्या शिकाऊ कॅडेटपासून प्रचंड मोठ्या ऑइलटँकरचे कॅप्टन म्हणून अनेक वर्षं ते कार्यरत होते.  या कार्यकाळातील स्वानुभवांवर आधारीत लेखनातून त्यांनी आपल्याला या वेगळ्या क्षेत्राचा थरारक आणि सखोल परिचय करून दिला आहे.

मेकॅनिकल इंजिनिअर झाल्यावर सचिन यांनी ‘टीएस राजेंद्र’ या भारत सरकारच्या जहाजावर मर्चंट नेव्हीचे प्रशिक्षण घेतले. नंतर काही वर्षं व्यापारी जहाजांवर काम केले.डेक कॅडेटपासून सुरू झालेला त्यांचा जीवनप्रवास चाळीस वर्षं अव्याहत या क्षेत्रात सजगतेने काम करून  ऑइल टँकरचे तज्ज्ञ कॅप्टन या पदापर्यंत पोहोचला. अनेक परदेशी व्यापारी  जहाजांवर त्यांनी कॅप्टन म्हणून उत्कृष्ट काम केले.तसेच ऑइल टँकर व ऑइल फील्ड्स यातील तज्ज्ञ व्यक्ती म्हणून  जगभर नाव कमावले. कंपनीच्या विविध जहाजावर जाऊन तिथल्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना आवर्जून बोलाविले जाई. त्यासाठी त्यांना  सततचा विमान प्रवास करावा लागला. त्यांनी जगातल्या १२० देशांना भेटी दिल्या. सहावेळा पृथ्वी प्रदक्षिणा घडली.

एखाद्या परदेशी बंदरात पोचल्यावर पाच सहा तासात तिथले व्यापार-व्यवहार समजून घेणे आणि त्याबद्दल बोटीवरील सहकाऱ्यांना व्यावहारिक प्रशिक्षण देणं त्यांनी महत्त्वाचं मानलं. जहाजाच्या आणि सहकाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं.

इराण- इराक लढाई, अंगोला, सिरीया अशा युद्धक्षेत्रात  काम करताना जीवावरच्या प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. समुद्री चाचेगिरीच्या प्रदेशात सुरक्षित राहणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते. ही सुरक्षितता कशी मिळवावी याचं प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी अनेकदा सोमालीया, पश्चिम आफ्रिका, इंडोनेशियाच्या प्रदेशात जाऊन काम केलं. ऑइल टँकर्सवर काम करताना तिथल्या सुविधा वापरून जहाजांवरच्या मोठ्या आगींना तोंड देण्याचे प्रशिक्षण त्यांनी बारा वर्षे दिलं.

कॅप्टन सचिन यांनी आधुनिक विज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचे अत्याधुनिक  शिक्षण घेऊन स्वतःला सतत काळाबरोबर ठेवलं. त्यामुळे ते अनेक जहाजांचे दूर संपर्काने (रिमोटली) जहाजाच्या ब्लॅक बॉक्सचं विश्लेषण करणे,नेव्हिगेशन ऑडिट करणे अशी कामे करू शकले.

या धाडसी क्षेत्रातला पैसा आपल्याला दिसतो पण त्यासाठी भरपूर शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक कष्ट  करावे लागतात. सलग ३६ तास ड्युटी बऱ्याच वेळा करावी लागते. जमिनीचं दर्शनाही न होता अथांग सागरात अनेक दिवस काढावे लागतात. भर समुद्रात भयानक वादळांना तोंड द्यावे लागते.कुटुंबापासून महिनो महिने दूर राहावं लागतं. अनेकदा सचिन यांनी सागरी चाचेगिरीच्या संकटातून शक्तीने आणि युक्तीने जहाजाला सहीसलामत बाहेर काढले. कुठल्याही व्यापारी जहाजाचा किंवा ऑईलटँकरचा त्या त्या बंदरातील व्यवहार आपल्याला वाटतो तितका सरळ, साधा, सोपा कधीच नसतो. त्याला राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि दहशतवादाचे अनेक पैलू असतात.

सचिन  कॅप्टन असलेल्या सर्व जहाजांवर खूप कडक शिस्त स्वतःसह सर्वांनी पाळावी यासाठी ते  आग्रही असंत. तसेच सहकाऱ्यांच्या आरोग्याची, कुटुंबीयांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाईल यावरही त्यांचे लक्ष असे .स्वतःच्या निर्व्यसनी, निर्भिड,धाडसी वागणुकीमुळे तसेच स्वच्छ चारित्र्यामुळे त्यांचा दरारा होता. बंदराला बोट लागल्यानंतर अनेक गैरव्यवहार  (बाई, बाटली, स्मगलिंग , अमली पदार्थ) होत असतात. सचिन यांनी कुणाकडूनही कसलीही भेट स्वीकारली नाही आणि स्वतःच्या जहाजावर कुठलाही गैरव्यवहार होऊ दिला नाही. यामुळे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर नेहमी खुश असत.

या त्यांच्या साऱ्या प्रवासात त्यांच्या पत्नी मीना यांनी मोलाची साथ दिली. लहानग्या ईशानसाठी आई आणि वडील दोघांची भूमिका समर्थपणे निभावली. निगुतीने संसार केला. सचिन यांना कसल्याही कौटुंबिक अडचणी न कळवता हसतमुखाने पाठिंबा दिला.ईशानचे शिक्षण आणि सर्व आर्थिक व्यवहार, नातेसंबंध उत्तम रीतीने सांभाळले. त्यावेळी आजच्यासारख्या मोबाइल ,इंटरनेट अशा कुठल्याही सोयीसुविधा नव्हत्या. जेव्हा कधी मीना यांना सचिन यांच्या जहाजावर जाण्याची संधी मिळाली तेव्हा लहानग्या ईशानसह सगळे आंतरराष्ट्रीय प्रवास एकटीने  करून ज्या बंदरात सचिन यांचे जहाज असेल ते बंदर गाठावे  लागे. जहाजावरही कॅप्टनची बायको म्हणून वेगळेपणाने न वागता मीना यांनी जेवणघरातील कूकपासून सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवले.

मीना यांना एकदा अशा प्रवासात एका भयानक प्रसंगाला तोंड द्यावे लागले. मीना यांना इजिप्तच्या कैरो या विमानतळावर पोहोचून तिथून प्रवासी गाडीने २२० किलोमीटर प्रवास करून अलेक्झांड्रिया या बंदरात सचिन यांची बोट गाठण्यासाठी जायचे होते. त्यांच्याबरोबर सचिन यांचे एक सहकारी होते. हा प्रवास थोडा आडवळणाचा आणि वाळवंटातील होता. वाटेत रानटी टोळ्यांची भीती असे. म्हणून काळोख व्हायच्या आत अलेक्झांड्रिया इथे पोहोचणे आवश्यक होते. परंतु विमानतळावरील एजंटच्या हलगर्जीपणामुळे प्रवास सुरू व्हायलाच संध्याकाळचे चार वाजले. थोडा प्रवास झाल्यावर ड्रायव्हरने त्यांना वाळवंटातील एका छोट्या हॉटेलमध्ये नेले व रात्र इथेच काढा असे सांगून तो पसार झाला. हॉटेलमधील त्या आडदांड परपुरुषांच्या वखवखलेल्या नजरा त्यांच्यावरून फिरत होत्या. धोका ओळखून त्यांनी  रूममधील सर्व फर्निचर ढकलत नेऊन दाराला टेकवून ठेवले. रात्रभर त्यांच्या दरवाजावर मोठ मोठ्या थापा मारल्या जात होत्या. पण मीना मुलाला कवटाळून गप्पपणे कॉटवर बसून होत्या. सकाळी उजाडल्यावर तो ड्रायव्हर आला आणि त्या कशाबशा अलेक्झांड्रियाला पोहोचल्या. संपर्काचे कुठलेही साधन नसल्यामुळे सचिन खूप काळजीत होते पण मीनाने विलक्षण धैर्याने साऱ्या प्रसंगाला तोंड दिले.

दैवगती खूप अनाकलनीय असते. सचिन एकदा कामासाठी तुर्कस्तानमध्ये इस्तंबूल इथे गेले होते. त्यांना रात्रीचं विमान पकडून सिंगापूर इथे जायचं होतं. संध्याकाळी काहीतरी खायला म्हणून ते रेल्वेस्टेशनकडे निघाले होते तेवढ्यात कानठळ्या बसवणारा स्फोटाचा आवाज आला आणि सचिन उलटे लांबवर फेकले गेले. त्यांच्या नाकातून कानातून रक्त वाहत होते अतिरेक अतिरेक्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटचा त्यांना असा फटका बसला. कसबसे उठून त्यांनी विमानतळ गाठला. सिंगापूरला पोहोचले. पण तिथे गेल्यावर त्यांना चालायला खूप त्रास होऊ लागला. हालचालीवर बंधनं आली. त्या रोगाचे निदान एम एन डी (मोटर न्यूरॉन डिसीज) असे झाले. शरीरातील सर्व नर्व्हस सिस्टीम क्षीण होत गेली. कुटुंबीयांसोबत या आजाराबरोबर चार-पाच वर्षे झगडून सचिन यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या कर्तृत्वाला मनःपूर्वक नमस्कार 🙏

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ प्रिय मित्र प्रदीप,… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ प्रिय मित्र प्रदीप,… ☆ श्री सुनील देशपांडे

प्रिय मित्र प्रदीप, 

कालपासून फक्त डोळ्यातून पाण्याच्या धारा वहात आहेत. गळा गदगदून आला आहे. तुझ्याशी बोलण्याची खूप इच्छा होती. तू तिकडे साता समुद्रापार !  कुणास ठाऊक रात्र आहे की दिवस आहे आणि माझ्याही तोंडातून शब्द निघणे अशक्य होते आहे.  टीव्हीवर वर्तमानातील सत्य पाहिल्यानंतर भूतकाळाचा इतिहास नजरेसमोरून सरकत आहे. 

ऊर अभिमानाने भरून आला आहे.  आपण आज जिवंत आहोत हे केवढे मोठे भाग्य ! 

या क्षणी आपले मित्र जे आज हयात नाहीत पण आपल्याबरोबर होते, अशांच्या सुद्धा आठवणी मनात दाटून येत आहेत. बालपणापासून आपल्या परिस्थितीच्या आठवणी येत आहेत,  अर्थात आपली परिस्थिती ही देशाच्या आर्थिक परिस्थितीवरच अवलंबून असणार. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करता लहानपणी अमेरिकेच्या मदतीचा रेशनवर तासंतास उभे राहून मिळवलेला निकृष्ट प्रतीचा गहू, मिलो, मका असे पदार्थ खाण्याची वेळ मध्यमवर्गीयांवर सुद्धा आली होती. या परिस्थितीतून आपला देश आजच्या परिस्थितीवर आला आहे. लहानपणी दिवाळीसाठी प्रत्येकी ४०० ग्रॅम जादा साखर मिळेल अशी बातमी आज मुलांना, नातवंडांना सांगितली तर त्यांना हसू येते. पण ती वस्तुस्थिती आपण विसरू शकत नाही. या सर्व परिस्थितीतून आपल्या आई-वडिलांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाच्या सोयी व संधी आपल्या स्वतंत्र देशामध्ये चांगल्या प्रकारे उपलब्ध झाल्या हे आपले केवढे मोठे भाग्य !  महाविद्यालयीन शिक्षणानंतर तू इस्रोमध्ये जॉईन झाल्याचे ऐकल्यानंतर आणि आर्यभट्टच्या शास्त्रज्ञांच्या टीममध्ये तुझी निवड झाल्याचे समजल्यानंतर सर्वप्रथम आमचा उर अभिमानाने भरून आला होता.  आता तुला परत बाळू म्हणून हाक मारून मिठी घालता येईल का हा प्रश्न आम्हाला पडला होता. परंतु त्यानंतरच्या कित्येक  वर्षांनंतर झालेल्या भेटीने तू त्याचे उत्तर दिलेस.  परंतु सुरुवातीच्या काळात पेपरमध्ये आलेल्या बातम्या पाहून मन व्यथित होत होते.  तसेच अभिमानाने भरूनही येत होते. थुंबा स्पेस सेंटरमध्ये सुरुवातीच्या काळात रॉकेटचे पार्ट असेंब्लीसाठी सायकल आणि बैलगाडी मधून नेत असलेले फोटो बघून मन व्यथितही होत असे आणि अभिमानाने भरूनही येत असे. अशा परिस्थितीतून आपण मंगळ आणि चंद्र यांच्या यशस्वी मोहिमा आणि तेही एखाद्या पाश्चिमात्य चित्रपटाच्या बजेटपेक्षा कमी बजेटमध्ये यशस्वी करून दाखवल्या ही आपल्या देशाला आपण ज्या परिस्थितीतून वर आलो त्या परिस्थितीने दिलेली देणगी आहे असे नाही का वाटत ?  हे सर्व आठवून, आठवून डोळ्यातून निघणारे पाणी अजूनही थांबत नाही. मी प्रचंड भावुक झालो आहे. तुला कशा परिस्थितीतून इस्रो वर आली हे जास्त चांगले माहित आहे.  आम्ही फक्त पेपर मधून वाचलेल्या बातम्यांवर मत बनवणारी माणसं.  पण तरीही या सर्व शास्त्रज्ञांनी शून्यातूनच नव्हे तर शून्यापेक्षाही खालून या सर्व गोष्टींना जो उठाव मिळवून दिला त्याबद्दल त्यांना किती वंदन करू हेच समजत नाही. तुम्ही सर्व सुरुवातीच्या टीममध्ये होतात. तुम्ही पायवाट निर्माण केली. आता त्याचा राजमार्ग झाला. नव्हे अंतराळ मार्ग झाला. 

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जगामध्ये पहिल्यांदाच पंधरा-वीस मिनिटे का होईना सैर करणारा माणूस  शिवकर बापूजी तळपदे हा भारतीय होता हे आठवल्याशिवाय राहत नाही. त्याच्या आयुष्यावर ‘हवाईजादा’ नावाचा एक चित्रपट निर्माण झालेला आहे.  तो युट्युबवर उपलब्ध आहे. परंतु तोही किती जणांनी पाहिला आहे कुणास ठाऊक ?  ही काल्पनिक गोष्ट नव्हे तर त्याकाळची वस्तुस्थिती आहे, हे सुद्धा कित्येक जणांना माहीत नाही. ब्रिटिश गॅझेट मध्ये त्याचा उल्लेख आहे.  त्या काळच्या केसरीमध्ये त्याबाबतच्या बातम्या आहेत. त्यामुळे हे सत्य नाकारता येत नाही. राइट बंधूंच्या आधी अधांतरी सफर करणारा पहिला भारतीय आज आठवतो आहे.  त्यांनी जे  विमान ‘मरुत्सखा’ नावाने बनवले होते ते सोलर पॉवर वर चालले होते हे सुद्धा विशेष !  कारण आज या अंतराळ मोहिमेत सोलर पॉवरचा खूप मोठा उपयोग केला गेला आहे. 

या सगळ्या स्मृती एकत्र दाटून येत आहेत. 

खरं म्हणजे मला माझ्या भावना नीटपणाने मांडताच येत नाहीत. मनात खूप दाटून आले आहे. खूप बोलायचं आहे. खूप व्यक्त करायचं आहे. परंतु कसं करावं समजत नाही. एखाद्या वेळेस हे ॲब्सर्ड वाटत असेल. पण काय करू ? व्यक्त झाल्याशिवाय राहवतही नाही. भावना समजून घ्याव्यात. अर्थात हे तुला वैयक्तिक नव्हे तर हे जाहीर पत्र आहे. माझ्या सगळ्या मित्रांना….  सगळ्या ओळखीच्यांना या सगळ्या भावना समजाव्यात म्हणून हे तुझे पत्र मी सगळ्यांनाच पाठवीत आहे.  परंतु तुझ्या त्याकाळच्या किंवा इसरोमधील शास्त्रज्ञ मित्रांना ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांच्यापर्यंत आमच्या भावना पोहोचवाव्यात ही विनंती.  कालच मी यावर एकच पोस्ट टाकली होती ती अशी …. 

“इस्रोच्या सर्व आजी-माजी शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, इंजिनियर्स, जे जे कोणी सर्व तांत्रिक गोष्टी शून्यातून उभे करण्यामध्ये यशस्वी झाले आहेत.  त्या सर्वांना माझे साष्टांग नमस्कार. मनापासून वंदन, वंदन, वंदन. 

एकच शब्द माझ्या तोंडून फुटत होता या सर्वांसाठी…

नमोस्तुभ्यम!

नमोस्तुभ्यम!! 

नमोस्तुभ्यम!!!.. 

या क्षणी वसंत बापटांची एक कविता आठवते आहे त्याचा उल्लेख करतो,

गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी

पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥

ही वडीलांची वाडी तुमची तुम्हास ती लखलाभ असो

खुशाल फुटक्या बुरुजांवरती पणजोबांचे भूत वसो

चंद्रावरती महाल बांधू, नको आम्हाला जीर्ण गढी ॥१॥

देव्हाऱ्यातील गंधफुलांतच झाकून ठेवा ती पोथी

अशी बुद्धीची भूक लागता कशी पुरेल अम्हा बोथी

रविबिंबाच्या घासासंगे हवी, कुणाला शिळी कढी? ॥२॥

शेषफणेवर पृथ्वी डोले! मेरूवरती सूर्य फिरे!

स्वर्गामध्ये इंद्र नांदतो! चंद्र राहूच्या मुखी शिरे!

काय अहाहा बालकथा या, एकावरती एक कडी ॥३॥

दहा दिशांतून अवकाशातून विमान अमुचे भिरभिरते

अणूरेणूंचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उलगडते

नव्या जगाचे नायक आम्ही, तुम्ही पुजावी जुनी मढी ॥४॥

गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी

पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥

जुन्या पिढीला वंदन आणि नव्या पिढीला सलाम !  कालच्या चंद्रयान मोहिमेवर बऱ्याचशा राजकीय टिपण्या आज वाचल्या आणि वाईट वाटले.  विज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान हे राजकारणाचे विषय नाहीत हे जोपर्यंत आपल्या लोकांना समजणार नाही तोपर्यंत आपल्या दुर्दैवाचे फेरे थांबतील का? असा प्रश्न पडतो. तुमचे राजकीय मत काही असेल तरीसुद्धा वैज्ञानिक मत एकच असते आणि तेच असले पाहिजे.  आपण प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक व्यवहारांमध्ये राजकारण न आणता जगू शकत नाही का ?  अत्यंत वाईट वाटते आणि या राजकीय गोष्टींचा कंटाळाच येऊ लागतो.  असो..  वस्तुस्थितीला आपला इलाज नाही आणि आपल्या मताशी इतर माणसे सहमत असतीलच असेही नाही.  त्यामुळे जे असेल ते स्वीकारत, परंतु या यशस्वितेच्या आनंदात आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या या अत्युच्च क्षणाचा साक्षीदार झाल्याच्या आनंदात, भविष्यात केव्हाही आता मृत्यू आला तरी आनंदाने सामोरे जावसं वाटेल यात शंका नाही. 

जय हिंद ! भारत माता की जय !! 🇮🇳

तुझा प्रिय मित्र,  

सुनील

(माझा तिसरीपासून ते कॉलेज पर्यंतचा वर्गमित्र प्रदीप शिंदे, जो पूर्वी इस्रो या संस्थेमध्ये नोकरी करीत होता. त्यास पाठवलेले हे पत्र. सर्वांच्या माहितीसाठी प्रकट करीत आहे)

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ क्रोध जिंकायचा आहे ?… – डाॅ.सुरेश महाजन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ क्रोध जिंकायचा आहे ?… – डाॅ.सुरेश महाजन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

रशियात 90 ते 110 वर्षे वयाची 1कोटी लोक आहेत.…

सकाळी 5 वाजता उठुन….…

10 मिनिट मेडीटेशन 

6 किलोमिटर फिरणे 

अतिशय नियंत्रीत आहार..

खातांना आणि बोलतांना जिभेवर नियंत्रण. दैनंदिनी निर्व्यसनी

आणि आत्मविश्वास चिकाटी व नियोजन या शिदोरीवर हे रशियन औषधीची एक मात्रा/ गोळी न घेता द्रुष्ट लागावी असे आनंदी जीवन जगत आहेत. 

या नास्तीक मंडळींना राग /क्रोध  तिरस्कार द्वेष आणि अहंकार काय असतो हे संसारी असुनही  माहीत नाही.

एका  संमेलनापासून  त्यांच्या सहवासात आलेल्या माझ्या सारख्या अनेकांचा हा अनुभव.

त्यांच्या मते क्रोध हा लुळा असतो.

राग हा पांगळा असतो …

जसे उकाड्याने शुध्द दुध नासते तसे क्रोधाने स्नेह/ प्रेम/ जीवन नासते…

या लोकांना मी बुद्धाचे / विवेकानंदाचे /ज्ञानेश्वरीचे/ रामायण/ महाभारत/ सर्व संतांचे तत्वज्ञान सांगितले त्यावर या वयोवृद्धांनी या सर्वांचा सार एका वाक्यात आम्हाला सांगितला….. 

शांतीने रागाला.. 

नम्रतेने अभिमानाला..

सरळतेने मायेला 

तसेच 

समाधानाने लोभीपणाना जिंकले पाहिजे…

राग/ क्रोधावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे मौन.. 

विनय/संयमाचा त्याग केला की क्रोधाचा जन्म होतो. 

नम्रतेच्या  उंचीला माप नसते. 

ज्याने क्रोध जिंकला त्याने सर्व जग जिंकले असे समजावे.

भारतात मात्र राग/क्रोध दुसर्यावर काढायचा असतो हे गृहीतचं धरले जाते… सर्वात मोठा अधिकारी सहकार्यावर रागावतो. 

हे सहकारी खालच्या  लोकांवर राग काढतात. 

हे लोक घरी येऊन बायकोवर विनाकारण राग काढतात. 

बायको लहान मुलांवर अकारण राग / क्रोध व्यक्त करते. 

निष्पाप मुलं चकित होऊन ते सुध्दा तोचं राग खेळणीला मोडूनतोडून ,  रडून व्यक्त करतात….

म्हणुनच भारतात सर्वात जास्त खेळणी तयार करण्याचे कारखाने आहेत.

संपूर्ण युरोपात राग क्रोध तर नाहीच….

पण दिवसभर हे लोकं

Sorry. 

Thank you.

Welcome किमान शंभरवेळा अगदीच आनंदाने म्हणतात…

याच्या उलट आपल्या कडे असते…

हे लोक देवपूजा कधीच करत नाही पण चोविस तास देशपुजा करतात…

 परिणामी या देशावर गुलामगिरी कधीच आली नाही. 

लंडन ते पॅरिस हा रेल्वेचा 790 किलोमिटरचा समुद्राखालुनचा दोन तासाचा प्रवास चालु असतांना अचानक आमच्या बोगीत दोन सुरक्षा महिला अतिशय नम्रपणे sorry म्हणून मला बाजूला खुर्चीच्या दिशेनं बसण्याची विनंती केली आणि मी बसलेल्या सीटवर एका मशीनद्वारे  किंचित छिद्र पडलेली सीट … फक्त 2 मिनिटात शिऊन स्वच्छ करून आभार मानून अगदी आनंदाने Welcome म्हणून निघून गेल्या…

आपल्या कडे भारतात आपण एस टी ने  /रेल्वेने प्रवास करतो. कागद/ कचरा/ थुंकी टाकून/ काही प्रसंगी सीट खराब करूनचं उतरतो आणि त्या जागी नविन प्रवाशांना Happy Journey प्रवास सुखाचा होवो म्हणुन शुभेच्छा देतो.

हि आहे गुलामगिरीत जगण्याची सवय असलेल्या भारतीयांची मनोवृत्ती….

आम्ही विमानतळावर पोहोचलो नंतर लक्षात आले की आपले मंगळसुत्र हरविले आहे. 

विमानतळावर तक्रार केली. 

एका तासात ऑटोरिक्षात पडलेले मंगळसुत्र आम्हाला अतिशय आनंदाने पोलीसांनी परत केले तेही त्यांनी आमची क्षमा मागून. 

कारण आमच्या देशाची तुमच्या देशात कृपया बदनामी करु नये या एकच अपेक्षेने… 

आपण भारतीय खुप हट्टी. 

हट्ट ही क्रोधाची बहिण. 

ती सदैव मानवासोबत असते.

क्रोधाच्या पत्नीचे नांव हिंसा. 

ती सदैव लपलेली असते. 

अहंकार क्रोधाचा मोठा भाऊ. 

निंदा/ चुगली हया  क्रोधाच्या आवडत्या कन्या. 

एक तोंडाजवळ दुसरी कानाजवळ.

 वैर  हा क्रोधाचा सुपुत्र. 

घृणा ही नात. 

अपेक्षा ही क्रोधाची आई. 

हर्षा (आनंदी) ही आपल्या परिवारातील  नावडती सुन. 

तिला या परिवारात स्थानच नसते. 

प्रत्येक भारतीय हा या परिवाराचा पारंपारिक घटक… 

परिवार त्याला सोडत नाही.. 

त्याला परिवाराला सोडवत नाही. 

अहंकार सुखाने  वाढतो..

दुःखाने कमी होतो.. 

अहंकारी (भारतीय) दुबळा असतो… 

दुबळे (ते वयोवृद्ध रशियन) अहंकारी नाहीत….

… म्हणून नेहमी हसत रहा आनंदी रहा .

लेखक : डॉ सुरेश महाजन, मुंबई

मुंबई  

माहिती संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सोमवती अमावस्या… या नावामागची कथा ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ सोमवती अमावस्या… या नावामागची कथा ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सोमवारी येणाऱ्या अमावस्येला ” सोमवती अमावस्या ” म्हणतात. यासंदर्भात महाभारतात एक कथा आहे. 

कौरव-पांडव यांच्यात घनघोर युद्ध झाले. पांडवांचा जय झाला पण त्यासाठी त्यांना पूज्य गुरुवर्य व इतर कुटुंबीयांना मारावे लागले. या हत्या दोषाने ते व्यथित झाले व श्रीकृष्णाकडे आले. व पाप मुक्तीसाठी साकडे घातले. श्रीकृष्ण म्हणाले….. “नैमिषारण्यात जाऊन अखंड तपस्या करा. जेव्हा सोमवती अमावस्या येईल तेव्हा तेथील चक्रतिर्थावर स्नान, दान करा.” पांडवांनी बारा वर्षे तपस्या केली.  पण सोमवती अमावस्या आली नाही. तेव्हा त्यांनी तिला शाप दिला…  ” कलियुगात तुला दरवर्षी एकदा किंवा दोनदा यावेच लागेल व या दिवशी जे पवित्र स्नान, दान करतील त्यांना पाप मुक्त करावे लागेल.”

दुसरी कथा अशी आहे की कांचीपुरी गावात देवस्वामी व धनवती हे जोडपे राहत होते. त्यांच्या कन्येचे नाव गुणवती. एका साधूने सांगितले,…. ” ही सप्तपदीतच विधवा होईल. तो दोष टाळण्यासाठी तुम्ही सोमा पूजन करा. सिंहलद्वीप येथे “सोमा” नावाची परटीण आहे. तिला विवाहाला बोलवा.” …. गुणवती स्वत: तिथे गेली तिची सेवा केली व तिला घेऊन आली. गुणवतीच्या विवाहात सप्तपदी  सुरू झाली . नवरदेव चक्कर येऊन पडले. सोमाने आपले पुण्यबल देऊन त्याला जिवंत केले व ती घरी गेली. वाटेत सोमवती अमावस्या आली तिने विधीपूर्वक स्नान, दान व पिंपळ वृक्षाच्या छायेत विष्णू पूजन केले. ती घरी पोहोचली तर तिचा नवरा, मुलगा व जावई मृतावस्थेत दिसले. तिने आपले पुण्य बळ देऊन त्यांना  जिवंत केले…. तेव्हापासून तिचे हे व्रत सर्वजण करू लागले. दिव्यांची पूजा, पिंपळाची पूजा व भगवान शिव शंकराची पूजा करा. सात्विक अन्न, नैवेद्य, शक्यतो मौनव्रत,भाविकता असावी.व खालील प्रार्थना करावी….. 

दीपज्योती परब्रम्ह

दीपज्योतीर्जनार्दन

दीपो हरतु मे पापम् 

दीपज्योतीर्नमोस्तुते.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares