मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एकशे दहा वर्षे चाललेली पावलं!… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ एकशे दहा वर्षे चाललेली पावलं!… ☆ श्री संभाजी बबन गायके 

अर्थात वाळवंटातील वाटाड्या शूर वीर रणछोडदास राबरी !

“साब ! म्हारो थैलो तो नीच्चे रहि गयो!” हेलिकॉप्टरमध्ये बिनधास्तपणे बसलेल्या त्या वृद्धाने म्हणल्याबरोबर त्यांच्यासोबतच्या लष्करी अधिका-यांनी हेलिकॉप्टर ताबडतोब माघारी फिरवलं आणि विमानतळावर उतरवलं ! सुरकतलेलं पण अजूनही काटक शरीर, पीळदार आणि अगदी दाट मिशा, आणि मुख्य म्हणजे दगडासारखे मजबूत पाय असलेल्या त्या आजोबांचे वय होतं १०७ वर्षे फक्त….होय….  अवघे एकशे सात वर्षे !

हे आजोबा हेलिकॉप्टरमध्ये लष्करी अधिका-यांसमवेत कसे?—  

आजोबांना महान सेनापती फिल्ड मार्शल सॅम माणेकशा साहेबांनी खास आणि तेही तातडीनं बोलावणं धाडलं होतं. तामिळनाडूमधील वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले माणेकशासाहेब कधी शुद्धीत तर कधी अर्धवट बेशुद्धीमध्ये सतत ‘पगी…पगी’ असा काहीतरी उच्चार करताना तेथील डॉक्टरांनी ऐकलं होते! “कोण पगी?” असं विचारलं गेल्यावर साहेबांनी ‘पगी’ ची कहाणी अगदी इत्यंभूत सांगितली….आणि त्या ‘पगी’ची भेट व्हावी,अशी इच्छा व्यक्त केली…नव्हे तसा आदेशच दिला ! 

लष्कराने ‘पगी’चा शोध घेतला आणि राजस्थानमधील पाकिस्तानी सीमेवर असलेल्या बनासकांथा येथील ‘निंबाला गावातून या आजोबांना सोबत घेतलं..त्यांच्यासाठी खास हेलिकॉप्टरची व्यवस्थाही करण्यात आली होती. माणेकशा साहेबांचं नाव घेताच आजोबांच्या डोळ्यांत निराळीच चमक आली. त्यांनी घरातील महिलांना काहीतरी सांगितलं. त्या महिलांनीही लगबग करून पंधरा-वीस मिनिटांत एक कापडी थैली आजोबांच्या हाती दिली. जवळच्या लष्करी तळावरून हेलिकॉप्टरने उड्डाण केलं आणि तेवढ्यात आजोबा म्हणाले,”साब  म्हारो थैलो तो नीच्चे रहि गयो!” हेलिकॉप्टर उतरवलं गेलं, थैली शोधली गेली. सुरक्षिततेच्या कारणांसाठी त्या थैलीत काय आहे? याची तपासणी केली…थैलीत दोन कांदे, दोन बाजरीच्या भाकरी आणि पिठलं एवढंच होतं ! “ सॅम साब को बहोत पसंद है! कभी कभी हमरा खाना चखा करते थे बॉर्डर पर ” –आजोबांनी सांगितलं…हेलिकॉप्टरने पुन्हा भरारी घेतली !

रूग्णशय्येवर असलेले सेनापती माणेकशासाहेब या ‘पगी’ला पाहून उठून बसले.

“आओ, पगी…रणछोडदास…..!” साहेब आपल्या खणखणीत आवाजात उदगारले!  ‘पगी’ने त्यांना ताठ उभे राहून आणि थरथरत्या हातांनी सल्यूट बजावला. साहेबांनी त्यांना जवळ बसवून घेतलं….त्यांच्या हातातील पिशवी घेतली ! त्या दिवशी एक सैनिक आणि एक सेनापती एकत्र बसून जेवले ! कृष्ण-सुदामाची भेट आणि पोहे हीच कथा जणू पुन्हा घडत होती…सुदाम्याच्या शिदोरीत पोहे होते…  या सुदाम्याच्या शिदोरीत कांदा-भाकरी आणि पिठलं !

पग म्हणजे पाय हे समजण्यासारखं आहेच. परंतू ‘ पगी म्हणजे पायांच्या ठशांचा माग काढणारा किंवा वाळवंटातून वाट दाखवणारा !’  क्षितिजापर्यंत वाळूच वाळू, त्यात अंधार….नक्की कोणत्या दिशेला जायचं याबद्द्ल नवख्यांचा गोंधळ होणारच. पण राजस्थानातल्या याच वाळूत जन्मलेली, वाढलेली,गुरे-उंट हाकलेली आणि शेवटी याच वाळूत मिसळून गेलेली राजस्थानी माणसं वाळूचा कण न कण ओळखू शकतात…अंधार असला तरी !

१९०१ मध्ये या वाळूत, पशुपालक कुटुंबात आपल्या या कथानायकाचा जन्म झाला. नाव ठेवले गेले ‘रणछोडदास’! भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या जरासंधाशी झालेल्या युद्धात हे नाव जरासंधाकडूनच प्राप्त झाले…असे म्हणतात. युद्धात जनतेची हानी होऊ नये म्हणून श्रीकृष्ण भगवंतांनी, युद्ध योजनेचा एक भाग म्हणून, रणांगणातून तात्पुरते पलायन केले म्हणून ते रण सोडून जाणारे….रणछोड ! पुढे जरासंधाचा नि:पात झाला !

पण हे कलियुगातील आणि मानवी अवतारातील रणछोडदास १९६५ आणि १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात भारतीय सेनेच्या अग्रभागी राहिले होते ! आयुष्यभर वाळवंट तुडवलेले रणछोडदास उंटांच्या वाळूत उमटलेल्या पावलांच्या ठशांवरून, माणसांच्या पायांच्या खुणांवरून, एक ना अनेक गोष्टींचा अचूक अंदाज बांधायचे. किती उंट असतील? त्यावर किती माणसे बसलेली असतील? त्यांच्यासोबत चालणारे प्रवासी किती असतील? त्यात स्त्रिया किती आणि पुरूष किती असतील? त्यांची वजने आणि उंची किती असेल?….रणछोडदास यांचा अंदाज चुकायचा नाही..दिवस असो वा रात्र !

१९६५ मध्ये प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्याआधी पाकिस्तान्यांनी कितीतरी वेळा भारतीय हद्दीमध्ये, कच्छच्या रणात घुसखोरी केलेली होतीच. युद्धाच्या आरंभी त्यांनी कच्छ भागातील विधकोट ठाणे काबीज केले होते. त्यात जवळजवळ १०० भारतीय सैनिक धारातीर्थी पडले होते. भारतीय सैन्याचे एक मोठे दल त्या भागाकडे पाठवले गेले. अंतर जास्त होते आणि रस्ते अनोळखी. तिथून जवळच असलेल्या छारकोटपर्यंत आपले सैन्य वेगाने पोहोचणे गरजेचे होते. पाकिस्तान्याचे १२०० सैनिक सीमेवरील एका गावाजवळच्या जंगलात लपून बसले होते. रणछोडदास यांनी त्यांचा अचूक माग काढला. आपल्या सेनेला अवघड वाटेवरून अचूकपणे आणि अत्यंत त्वरेने म्हणजे अपेक्षित वेळेपेक्षा बारा तास आधीच शत्रूपर्यंत पोहोचवले. इतक्या लवकर भारतीय सैन्य आपल्याला शोधून काढेल याची पाकिस्तान्यांना शक्यताच वाटली नव्हती. भारतीय जवानांनी पाकिस्तान्यांना धूळ चारली ! रणछोडदास या सामान्य ‘पगी’चा, वाटाड्याचा या विजयात मोठाच हातभार लागला ! बी.एस.एफ.अर्थात बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (अर्थात सीमा सुरक्षा दल आणि अर्थातच सीमा सुरक्षा बल) यांनी बनासकांथा येथील एका सैन्यचौकीला ‘रणछोडदास’ यांचे नाव देऊन त्यांच्या कर्तबगारीचा अनोखा गौरव केला आहे.

फिल्ड मार्शल माणेकशासाहेबांनी रणछोडदास यांची अनोखी क्षमता ओळखून त्यांच्यासाठी लष्करात ‘पगी’ (गाईड,वाटाड्या,पथ-मार्गदर्शक) हे विशेष पद निर्माण केले. या दूरदृष्टीच्या निर्णयाचा १९७१ च्या लढाईतही खूप फायदा झाला. पालीनगर ही पोस्ट जिंकून घेण्याच्या यशस्वी मोहिमेत पथ-मार्गदर्शन करणा-या रणछोडदास यांचाही मोठा वाटा होता. हे काम करताना त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. याबद्द्ल माणेकशासाहेबांनी त्यांना स्वत:च्या खिशातून तीनशे रुपयांचे रोख पारितोषिकही दिले होते आणि त्यांना भोजनासाठीही आमंत्रित केले होते ! संग्राम मेडल, पोलिस मेडल आणि समर सेवा स्टार असे पुरस्कारही भारतीय लष्कराने रणछोडदास यांना प्रदान केले ! शौर्याची कदर करावी ती फिल्ड मार्शल सॅम माणेकशा साहेबांसारख्या जिंदादिल सेनानींनीच आणि भारतीय लष्करानेच !

माणेकशासाहेबांना आपल्या या गुणी, देशप्रेमी, धाडसी सैनिकाची आठवण न आली तरच नवल ! आपल्या अंतिम दिवसांत तर ही आठवण अधिकच तीव्र होत गेली….आणि त्यांनी ‘पगी’ रणछोडदास राबरी (राबडी) यांना अत्यंत सन्मानाने बोलावून घेतले.

२७ जून, २००८ रोजी  माणेकशासाहेब निवर्तले. ‘पगी’ रणछोडदास यांनी लगेचच म्हणजे २००९ मध्ये, त्यांच्या वयाच्या तब्बल १०८ व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली….मानवी आयुष्याची १०० वर्षांची मर्यादा ओलांडलेले शरीर काम तरी किती दिवस करणार? वयाच्या ११२ व्या वर्षी अर्थात २०१३ मध्ये हा पगी स्वर्गाची वाट चालण्यासाठी कायमचा निघून गेला ! त्यांच्या पावलांचे ठसे राजस्थानातल्या वाळवंटाच्या मनात अजूनही ताजे असतील. जय हिंद !

आपल्यापैकी अनेकांनी ही माहिती पहिल्यांदाच वाचली असेल….मी ही नुकतीच वाचली. काही सैनिकी ज्येष्ठ अधिका-यांनी ही माहिती इंग्लिशमध्ये लिहिलेली आहे. ब-याच वृत्तपत्रांनीही रणछोडदास साहेबांविषयी भरभरून लिहिले आहे. मराठीत असे काही (माझ्यातरी) वाचनात आले नाही. मी जे वाचले त्याचाच हा स्वैर अनुवाद आहे. तपशीलात अर्थातच काही कमीजास्त असेल..दिलगीर आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या एका हिंदी युद्धपटात रणछोडदास यांची व्यक्तिरेखा दाखवली गेली, असे म्हणतात. संजय दत्तने ‘पगी’ कसा रंगवला असेल,देव जाणे ! हिंदी सिनेमावाले काय काय आणि कसे कसे दाखवतील याचा नेम नाही. असो. गुजराती लोकगीतांमध्ये रणछोडदास यांच्या कर्तृत्वाचा उल्लेख होतो…यापेक्षा अधिक काय नाव मिळवावे एका सामान्य माणसाने? मन:पूर्वक सल्युट …. 

लेखक : संभाजी बबन गायके.

9881298260.

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘संगमनेरमध्ये सुरु आहे आगळी वेगळी परंपरा …’ ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘संगमनेरमध्ये सुरु आहे आगळी वेगळी परंपरा …’ ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

इंग्रजांना झुकवणारी स्त्रीशक्ती . 

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे साजऱ्या होणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाला आगळं वेगळं महत्त्व आहे. 

या दिवशी या ठिकाणी निघणाऱ्या रथ यात्रेत बजरंगबलीचा रथ ओढण्याचा मान महिलांना मिळतो.

महिलांना या ठिकाणी मिळणाऱ्या या मानाला ब्रिटीशकालीन इतिहास आहे. ब्रिटीशांनी या रथ यात्रेवर बंदी घालून अनेक तरुणांना ताब्यात घेतले होते. २३ एप्रिल १९२९ रोजी हनुमान जयंतीच्या पहाटे मंदिराभोवती पोलिसांचा गराडा पडला. पोलीस आपल्या सरकारी ताकदीच्या जोरावर मिरवणुकीस करत असलेला विरोध पाहता नेते मंडळी घरी गेली. एवढ्यात अचानक २०० ते २५० महिलांनी एकत्र येत रथ ताब्यात घेतला. ब्रिटीशांनी बंदी घातलेल्या रथाला,  बंदी झुगारून शेकडो महिलांनी रथ यात्रा काढली होती. पोलिसांनी महिलांबरोबर अनेक युक्तिवाद केले, भीती दाखवली, अटक करण्याची- खटले भरण्याची धमकीही दिली. सरकारी ताकदीचा रुबाब दाखवला.  पण या आदिशक्ती स्वरूप भारतीय नारींनी आपला उत्सव पार पाडण्याचा निर्धार कायम ठेवला.

या गडबडीचा फायदा घेत झुंबरबाई अवसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे आणि इतर मुली, महिलांनी रथावर चढून हनुमान प्रतिमा रथावर ठेऊन ” बलभीम हनुमान की जय ” चा जयघोष केला, आणि रथयात्रा व्यवस्थितपणे पार पाडली.  तेव्हापासून ही परंपरा आजही सुरु आहे.

आता या रथयात्रेदरम्यान पोलिसांना विशेष मान असून पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यावरच रथ ओढला जातो.

माहिती संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २३ – ऋचा ७ ते १५ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २ – ऋचा ७ ते १५  ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २३ (अप्‌सूक्त)

ऋषी – मेधातिथि कण्व

देवता : ७-९ इंद्रमरुत्; १०-१२ विश्वेदेव; १३-१५ पूषन्;

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील तेविसाव्या  सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी अनेक देवतांना आवाहन केलेली असली तरी हे  मुख्यतः जलदेवतेला उद्देशून असल्याने हे अप् सूक्त सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील सात आणि नऊ या  ऋचा इंद्राचे आणि मरुताचे, दहा ते बारा  ऋचा विश्वेदेवाचे आणि तेरा ते पंधरा  या  ऋचा पूषन् देवतेचे आवाहन करतात. या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार  गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी इंद्र, मरुत् विश्वेदेव  आणि पूषन्  या देवतांना उद्देशून रचलेल्या सात ते पंधरा या  ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे. 

मराठी भावानुवाद :: 

म॒रुत्व॑न्तं हवामह॒ इंद्र॒मा सोम॑पीतये स॒जूर्ग॒णेन॑ तृम्पतु

सवे घेउनी मरुद्देवता यावे सोमपाना

गणांनी तुमच्या अंकित केले आहे ना त्यांना 

त्यांचाही सन्मान करावा ही अमुची मनीषा

आवाहन तुम्हासी करितो इंद्राणीच्या ईशा ||७|| 

इंद्र॑ज्येष्ठा॒ मरु॑द्‍गणा॒ देवा॑स॒ः पूष॑रातयः विश्वे॒ मम॑ श्रुता॒ हव॑॑म्

वंदनीय हे मरुद्देव हो सुरेंद्र तुमचा नेता

तुमच्या स्नेहवृंदी पूष मानाची देवता

तुम्हा सकलांना पाचारण यावे यज्ञाला 

प्रार्थनेस प्रतिसाद देऊनी धन्य करा आम्हाला ||८||

ह॒त वृ॒त्रं सु॑दानव॒ इंद्रे॑ण॒ सह॑सा यु॒जा मा नः॑ दु॒ःशंस॑ ईशत

अभद्रभाषी वृत्रासुर तो आहे अतिक्रूर

त्याच्या क्रौर्याचा अमुच्या वर पडू नये भार

उदार देवांनो इंद्राचे सहाय्य घेवोनी 

निर्दाळावी विघ्ने त्यासी पराक्रमे वधुनी ||९||

विश्वा॑न्दे॒वान्ह॑वामहे म॒रुत॒ः सोम॑पीतये उ॒ग्रा हि पृश्नि॑मातरः १०

पृश्नीपुत्र अति भयंकर आम्हास भिवविती

मरुद्देवांनो आम्हा राखी त्यांना निर्दाळुनी

येउनिया अमुच्या यज्ञाला सोम करा प्राशन

सुखरुपतेचे आम्हासाठी द्यावे वरदान ||१०||

जय॑तामिव तन्य॒तुर्म॒रुता॑मेति धृष्णु॒या यच्छुभं॑ या॒थना॑ नरः ११

विजयी वीरासम गर्जत ये मरूत जोशाने

व्योमासही व्यापून टाकितो गगनभेदी स्वराने

कल्याणास्तव अमुच्या जेथे तुम्ही असणे उचित

देवांनो आगमन करावे तेथे तुम्ही खचित ||११||

ह॒स्का॒राद्वि॒द्युत॒स्पर्यतो॑ जा॒ता अ॑वन्तु नः म॒रुतः॑ मृळयन्तु नः १२

कडकडाडते भीषण भेरी सौदामिनीची गगनी

त्यातूनिया अवतीर्ण जाहले मरुद्देव बलवानी

चंडप्रतापी महाधुरंधर पवनराज देवा

कृपादृष्टी ठेवून अम्हावरी सुखात आम्हा ठेवा ||१२||

पू॑षञ्चि॒त्रब॑र्हिष॒माघृ॑णे ध॒रुणं॑ दि॒वः आजा॑ न॒ष्टं यथा॑ प॒शुम् १३

पिसांनी मोराच्या नटवीले बालक गगनाचे

हरविले जणू पाडस  गोठ्यातील कपिलेचे

तेजःपुंज पूषा त्यासी आणी शोधुनिया

समर्थ तुम्ही  त्यासी अपुल्या सवे घेउनी या ||१३||

पू॒षा राजा॑न॒माघृ॑णि॒रप॑गूळ्हं॒ गुहा॑ हि॒तम् अवि॑न्दच्चि॒त्रब॑र्हिषम् १४

रंगीबेरंगी मयुराच्या पुच्छांनी नटलेला 

पळवुनी त्यासी गुंफेमध्ये लपवूनिया ठेविला

अदृश्य जाहल्या अमुच्या राजा शोधाया गेल्या

तेजोमय पूषास अहा तो सहजी सापडला ||१४||

उ॒तो मह्य॒मिन्दु॑भि॒ः षड्यु॒क्ताँ अ॑नु॒सेषि॑धत् गोभि॒र्यवं॒ च॑र्कृषत् १५

आवाहन त्या सहा ऋतूंना भक्तीभावे करतो

कृषीवल जैसा वृषभा जुंपुन धान्य गृही आणितो

सोमपान करुनी अमुच्या वर पूषा तुष्ट व्हावे

शृंखलेसम सहा ऋतूंच्या सवे घेउनी यावे ||१५||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.) 

https://youtu.be/UddnnAJxNRY

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 23 Rucha 7 to15

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “श्री सखी राज्ञी जयति…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “श्री सखी राज्ञी जयति…” ☆ सौ राधिका भांडारकर

युवराज शंभुने कविता लिहिली 

प्राणप्रिय पत्नीसाठी शब्द स्फुरले

 श्री सखी राज्ञी जयति

 ओळीतून या त्यांचे भार्या प्रेम प्रकटले १

 

 स्वराज्याच्या धगधगत्या निखाऱ्याला 

समजून घेत जपले आपल्या पदरात 

कणखर, हळवी ,प्रेमळ सोशिक

 कधी न डगमगली वादांच्या प्रवाहात ..२

 

 पत्नीच असते लक्ष्मी, सखी, राणी 

भावना पतीची आहे गौरवा समान

 या शब्दांच्या अर्थांना जाणले  येसुने

 सदा मानले स्वराज्याचे कर्तव्य महान ..३

 

आज वळून पाहता इतिहासाकडे 

काळाने  दिल्या किती  रणरागिणी

 मूर्तीमंत जणू लखलखत्या तलवारी

 दुःखात हसल्या  या शूर विरहिणी…४

 

 झळकले चार शब्द राजमुद्रेवर

धन्य तो  शिवरायांचा  छावा 

ज्याने केला जय जयकार स्त्रीचा 

शब्द भावनेतून केवळ कसा वर्णवा ?..५

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “कशाला द्यायचे आपण १५०  कोटी रुपये ?”… लेखक – श्री सतीश खाडे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री जितेंद्र जाधव

? इंद्रधनुष्य ?

☆ “कशाला द्यायचे आपण १५०  कोटी रुपये ?”… लेखक – श्री सतीश खाडे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

“ कशाला द्यायचे आपण १५०  कोटी रुपये रशियाला ? आपण पाच कोटी रुपयात तेजस (LCA ) वेपन सिस्टिम बनवू शकतो !”

भारताला त्यावेळी संरक्षण व्यवस्थेसाठी तेजस वेपन सिस्टिम  घायची  होती. जगात त्यावेळी मोजक्याच देशात ती बनवली जात होती. त्या दिवशी रशियाचे शिष्टमंडळ भारतात  होते. दुसऱ्या दिवशी, भारत व रशिया यांच्यात खरेदी विषयी करार होणार होता. वेपन  सिस्टिम  अँड मिसाईल ईंटेग्रेशनची किंमत ₹ १५० कोटी  सांगितली होती. उद्या करार होणार म्हणून पंतप्रधानाचे तत्कालीन प्रमुख सल्लागार डॉक्टर कलाम साहेबांनी भारतातील त्या संबंधित प्रमुख लोकांची बैठक घ्यायला सांगून मतं कळवायला सांगितले होते. 

त्या बैठकीत तेजस वेपन सिस्टिम विषयी  सर्व माहिती ऐकल्यावर एक शास्त्रज्ञ उभा राहिला ….त्याने आत्मविश्वासपूर्वक सांगितले की “ कशाला द्यायचे १५० कोटी रुपये?  ह्याच गुणवत्तेची  वेपन सिस्टिम  मी व माझा विभाग पाच कोटी रुपयात बनवून देऊ.” –   सगळी सभा स्तब्ध झाली !!

ही चर्चा डॉक्टर कलाम सरांना कळवली गेली. त्यांनी या शास्त्रज्ञाला तातडीने भेटायला बोलावले. हा शास्त्रज्ञ त्यांना जाऊन भेटला आणि त्याने  सर्व शंकांचे निरसन केले. डॉक्टर कोटा हरिनारायणा ( LCA -तेजस प्रोग्रॅम डायरेक्टर ) यांनाही त्या सर्व तंत्रज्ञान व नियोजनावर विश्वास बसला. ते म्हणाले, “ तू लाग कामाला.”.. …दुसऱ्या दिवशी  करार होणार होता तो चक्क रद्द  करण्यात आला. भारतभरातील सर्व संबंधितांच्या भुवया उंचावल्या गेल्या. रशियन शिष्टमंडळाला तर मोठा धक्का होता.

पुढे दोन ते तीन  वर्षातच या शास्त्रज्ञाने शब्द दिल्याप्रमाणे  वेपन  सिस्टिम बनवली आणि   मिसाईल चाचणी  तेजस Aircraft  वरून यशस्वी केली. त्याबद्दल त्या शास्त्रज्ञाला  ‘DRDO Scientist of the year’ हा पुरस्कारही मिळाला. 

तेजस fighter  ने आतापर्यन्त २००० हून अधिक weapon release  चाचण्या यशस्वी करून नवीन विश्वविक्रम केला आहे.– नंतर त्या शास्त्रज्ञाची २०१६ मध्ये नॅशनल ऐरोस्पेस  लॅबोरेटरी (NAL )येथे डायरेक्टर म्हणून नियुक्ती झाली. त्याने धडाडीने ७ वर्ष थांबलेला १४ सीटर सारस पॅसेंजर  aircraft  प्रोजेक्ट revive करून, दोन वर्षात तो ट्रॅक वर आणून विमानाने जानेवारी २०१८ मध्ये पहिले उड्डाण केले. सरकारने आता NAL ला १९ सीटर रिजनल  ट्रान्सपोर्ट aircraft डेव्हलपमेंट ची मंजुरी दिली आहे. हे विमान २०२३ मध्ये उड्डाण घेईल. 

आणि आता तर आणखी कमाल केली त्याने…. जगातील सर्वात कमी किमतीचा, तंत्रज्ञानात कोणतीही उंची कमी नसलेला हंसा ट्रेनर aircraft  बनवलाय फक्त एक कोटी रुपयात !! ….. गेल्याच आठवड्यात त्याचेही राष्ट्रार्पण  झाले आहे ……..

तो शास्त्रज्ञ आहे ‘प्रवरा इंजिनीयरिंग कॉलेजच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी  आमचा लाडका मित्र “जितेंद्र जाधव” !! 

मित्रा तुझा खूप खूप अभिमान वाटतो!!! देशाला व जगाला अभिमान वाटावा इतके उत्तुंग यश तू संपादन केले आहेस.  त्रिवार नाही हजारदा अभिनंदन  !!!

— श्री सतीश खाडे

प्रेसिडेंट, माजी विद्यार्थी संघ, प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेज

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अल्बर्ट आईन्स्टाईन… ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

? इंद्रधनुष्य ?

अल्बर्ट आईन्स्टाईन …  ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले

अल्बर्ट आईन्स्टाईन! — आज त्यांचा स्मृतीदिन  ग्रॅंड सॅल्युट! 

(जन्म : मार्च १४, १८७९–मृत्यू : एप्रिल १८, १९५५)

तो बायकोसोबत खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेला…

सतत संशोधनात गुंतलेला आणि व्याख्यानाच्या निमित्तानं जगभर हिंडणारा नवरा आज शाॅपिंगला सोबत आलाय म्हटल्यावर बायकोनं जरा ढिल्या हातानंच खरेदी करायला सुरुवात केली…

बिल द्यायची वेळ आली तेव्हा ह्या नवऱ्यानं दुकानदाराला चेक दिला.

बायकोच्या मनात शंकेची पाल चुकचुकली… त्याच्या दंडाला धरून बाजूला घेत ती कानात कुजबुजली, 

“अहो! मोठ्या ऐटीत चेक दिलात… पण तुमच्या अकाऊंटमध्ये तेवढे पैसे आहेत का?”

अगोदरच पिंजारलेल्या केसांत हात फिरवत, डोळे विस्फारत तिच्याकडे बघत तो गोड हसला… 

…पण ‘पैसे आहेत की नाहीत’, याचं उत्तर काही दिलं नाही !

घरी येत असताना बायकोच्या डोक्यात शंकांचं जाळं विणलं जात होतं…

‘आपला नवरा आपला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ असला तरी कधी कधी हा घरी यायचा रस्ताही विसरतो… 

असल्या विसरभोळ्या नवऱ्याच्या अकाउंटला खरंच पैसे असतील का?’…. ‘नसतील, तर दुकानदार याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करेल का?’ …… ‘बरं… पैसे असतील, तर यानं आजपर्यंत 

माझ्यापासून का बरं लपवले असतील?’

—एक ना अनेक विचार करत ती बाई आपल्या नवऱ्याला प्रश्न विचारून भंडावून सोडत होती…

शेवटी तो म्हणाला, …. 

“अगं! माझ्या अकाउंटला पैसे असले काय अन् नसले काय, काही फरक नाही पडणार… 

कारण तो दुकानदार तो चेक बॅंकेत टाकणारच नाही…!!!”

आता मात्र तिला चक्कर यायची तेवढी बाकी राहीली होती. ती ‘आ’ वासून नवऱ्याकडे बघत राहिली…

तेव्हा तो म्हणाला, …… 

“अगं! वेडे त्या चेकवर ‘माझी’ सही आहे…

आणि माझी सही असलेला चेक दुकानदार बॅंकेत तर टाकणार नाहीच, पण फ्रेम करून दुकानात मात्र नक्की लावेल !”

— आणि खरोखर तस्संच घडलं…!

अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेला हा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ होता…

अल्बर्ट आईन्स्टाईन! — आज त्यांचा स्मृतीदिन  ग्रॅंड सॅल्युट! 

 

संग्राहिका :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगदेव पासष्ठी – भाग-3… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

 

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगदेव पासष्ठी – भाग-३…  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

अलंकारी हेम वसे

अवयव रूपी जीव असे॥११॥

 

नाना आकारे नाना पदार्थ

ज्ञानयोगे जाण तू यथार्थ

परमात्मांश घेत आकार

जरी असे तो निराकार॥१२॥

 

जगदाकारा जरी पाहसी

ज्ञानरूपी परमेश देखिसी

भित्तीचित्रे जरी दिसती

केवळ त्या भिंती असती॥१३॥

 

गूळ असे वा ढेप असे

गोडीस का आकार दिसे?

जग आहे म्हणुनि ज्ञान नसे

ज्ञान मूलभूत गोडीसम असे॥१४॥

 

रूप वस्त्राचे स्पष्ट ते

घडी उलगडताच उमटे

विश्वनिर्मितीच्या मिषे

परमात्मस्वरूप प्रकाशे॥१५॥

 

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ घड्याळाची शिकवण.. ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ घड्याळाची शिकवण…🕓 ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

जप करता करता, एकदा माझे लक्ष घड्याळाकडे गेले. श्री स्वामींनी ज्ञान द्यायला सुरुवात केली..

अशी कोणती वस्तू आहे की जी दाही दिशांना नमस्कार करते? मला आश्चर्यच वाटले… कसे ते पहा..

जेव्हा १२ वाजतात तेव्हा वरच्या दिशेला दोन्ही काटे जवळ येतात, तेव्हा दोन्ही काट्यांनी उर्ध्व दिशेला नमस्कार होतो. ६.३० वा. खालच्या दिशेला दोन्ही काटे जवळ येतात म्हणजे अधर दिशेला नमस्कार होतो.अगदी तसेच पूर्व, पश्चिम दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य अशा दहाही दिशांना घड्याळाचे काटे नमस्काराप्रमाणे एकमेकांजवळ येतात. म्हणजेच निर्जीव वस्तूमध्येही ज्ञान लपले आहे.

घड्याळाची 🕓 अध्यात्मिक बाजू :-

घड्याळाची बॅटरी असेपर्यंत घड्याळ चालू म्हणजे जीवन. बॅटरी संपली की थांबते म्हणजे मृत्यू. आकडे असलेली तबकडी म्हणजे आयुष्य.

मूल कुठल्या वेळेला जन्माला येईल ते आपल्या हातात नाही, परंतु जन्माला आल्याआल्या वेळ पाहिली जाते आणि घड्याळावर आयुष्य सुरु होते. तासकाटा आणि मिनिटकाटा म्हणजे जणू मनुष्याचे दोन हात अथवा दोन पाय, जे दाखवतात की कर्म कर.

सेकंदकाटा जो सतत काट्यांभोवती फिरत असतो तो म्हणजे आयुष्याचा परिघ. हा गतिमान काटा म्हणजे ऊर्जा, चैतन्य. जणू जीवात्म्याच्या श्वास आणि उच्छ्वास.

पृथ्वी जशी स्वतःभोवती फिरता-फिरता सूर्याभोवती फिरते, त्याप्रमाणेच घड्याळाचा केंद्रबिंदू  हा स्वतःभोवती फिरतो आणि त्याला लावलेले काटे हे आकड्यांभोवती फिरतात. अगदी तसेच जीवात्मा हा परमात्म्याभोवती प्रदक्षिणा घालत असतो.

घड्याळातील बॅटरी संपली की हे गतिमान घड्याळ थांबून जाते, त्याप्रमाणेच जीवात्म्यातील चैतन्य निघून गेले/संपले की त्याचे आयुष्य संपते.

मनुष्य येतानाही घड्याळ न बघता येतो आणि जातानाही घड्याळ न बघताच जातो, परंतु संपूर्ण आयुष्य घड्याळाच्या काट्यांवरच असते.

असे हे घड्याळ स्वतःसाठी कधीच जगत नाही. त्याचे आयुष्य फक्त दुसऱ्यांना वेळ दाखवण्यासाठीच असते. असेच घड्याळासारखे जीवन म्हणजे संतांचे आयुष्य– जे सदैव दुसऱ्याच्या कल्याणासाठीच असते.

संग्राहिका : सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ..आणि पदार्थ वाफाळू लागला भाग -1… शेफ शंकर विष्णू मनोहर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ ..आणि पदार्थ वाफाळू लागला भाग -1… शेफ शंकर विष्णू मनोहर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

एकीकडे रेसिपी सांभाळून, सगळं कसं छान आहे असंच शूटिंगच्या वेळी चेहऱ्यावर दाखवणारा शेफ एक उत्तम अभिनेताही असतो. भटारखाना म्हणजे ‘दृष्टीआड सृष्टी’ असते, ती म्हण रेसिपी शोज्ना तंतोतंत लागू पडते!  तिथे वेळ पडली तर काय काय करावं लागतं, हे सांगताहेत प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर.

कोणत्याही भटारखान्यात डोकावून बघू नये.. दृष्टिआड सृष्टीच ठीक , असं म्हणतात पण ते काही फारसं खरं नाही. निदान माझ्याबाबतीत तर नाहीच नाही..माझ्या म्हणजे आमच्या ‘विष्णुजी की रसोई’ बाबतीत.. या ‘रसोई’च्या भटारखान्यात कोणीही जावं..खाण्याची इच्छा मरणार नाही तर तिथला खमंग दरवळ नक्कीच जठराग्नी प्रदीप्त करील!..रसोईचं ओपन किचन असतं..म्हणजे दृष्टी समोरच सृष्टी म्हणायला हरकत नाही! पण ही ‘दृष्टी आड सृष्टी’ असते ना ती म्हण रेसिपी शोज् ना तंतोतंत लागू पडते! तिथे वेळ पडली तर काय-काय करावं लागतं हे नंतर आठवलं तरी आमचं आम्हालाच आश्चर्य वाटतं!

गंमत म्हणून एक आठवण सांगतो, एका हिंदी सिनेमाच्या सेटवर गेलो होतो. मस्त झाडं-नदी वगरेचा सेट लावला होता. नदीत पाणीही होतं. शॉट ओके झाला. हिरो-हिरॉईन निघून गेले आणि मग मी माझ्या दिग्दर्शक मित्राबरोबर बोलत होतो. त्यालाही कोणी तरी बोलावलं म्हणून तोही गेला. इतक्या वेळ गजबजलेला सेट एकदम रिकामा झाला. तो सेट जवळून बघू या म्हणून मी गेलो, एका झाडाला हात लावला आणि ते झाड धाडकन खाली पडलं. माझं चांगलंच धाबं दणाणलं पण त्या सेटवाल्यांना स्वयं असावी. सेटवाला आला त्यानं खिळे वगरे ठोकून दोन मिनिटांत परत ते झाड होतं तसं उभं केलं. तेव्हा मला कुठे माहिती होतं की पुढे हे असं ‘चिटिंग’ आपल्यालाही करायचं आहे ते!

माझा पहिला अनुभव होता तो ‘क्रिम’ करण्याचा. सेटवर खूप लाइट्स, कॅमेरे असतात यामुळे वातावरणात उष्णता भरून राहिलेली असते. अशा वेळी एखाद्या पदार्थात जर क्रीमचा वापरायची वेळ आली तर ते वितळून जातं. मग प्रेक्षकांना दाखवणार काय? मग मी नकली क्रीम करायला शिकलो ते मदा, दूध, कॉर्नस्टार्च आणि तेलाचा वापर करून. पण एकदा तर क्रीम करण्यासाठी हे पदार्थच नव्हते. शूट झाल्यावर पुन्हा फोटोशूटही करायचं होतं म्हणजे क्रीमचा परिणाम फक्त शूटिंगपुरता साधला जाऊन उपयोगाचा नव्हता. आमचा फोटोग्राफर इतका हुशार निघाला की त्यानं क्रीम म्हणून चक्क फेव्हिकॉलचा वापर केला.

जाहिरातीमध्ये किंवा रेसिपी शोमध्ये छान वाफाळता पदार्थ दाखवतात. एकदा केलेला पदार्थ शॉट होईपर्यंत कसा वाफाळता राहील? मग त्यासाठी एक खास तंत्र असतं. टेबलावर मांडलेले पदार्थ असतील तर त्यात कापूस जळत ठेवतात किंवा एखाद्या पदार्थामध्ये कापसाचा जळता बोळा टाकतात. तुम्ही इडली किंवा वडा-सांबारची जाहिरात बघता ना त्या कशा मस्त फुगलेल्या वाफाळत्या असतात. त्या दोन इडल्यांमागे कापसाचा बोळा जळत असतो. पदार्थावर चकचकीतपणा आणण्यासाठी त्यावर ग्लिसरिन टाकतात. तांदळाची जाहिरात दाखवताना छान दाणेदार भात दाखवतात किंवा मग त्यांच्या भाज्या छान हिरव्यागार दिसतात..कोणत्याही गृहिणीला असा भात कसा करायचा? किंवा अशी हिरवीगार भाजी कशी ठेवायची, हा प्रश्न पडल्यावाचून राहत नसेल. पण या भात किंवा भाज्या पूर्ण शिजवलेल्या नसतात तर फक्त उकळत्या पाण्यात घालून बाहेर काढतात.

अशा अनेक गमतीजमती आमचा कार्यक्रम ‘मेजवानी’च्या शूटिंगच्या वेळीही घडतात. सेट लागलेला असतो, चार-चार कॅमेरा सेटअप असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसाला तीन/चार कधी कधी पाच एपिसोड पूर्ण करायचंही बंधन असतं. त्यामुळे सगळ्यांनाच खूप घाई असते. काय सामान हवंय याची मी आधीच यादी दिलेली असते. रेसिपी सांगितलेल्या असतात. तरीही आयत्या वेळी व्हायचा तो घोळ होतोच. चवीपुरतं मीठ घालू, असं मी बोलतो पण लक्षात येतं की तिथे मीठ ठेवलेलंच नाही. कॅमेरा तर ऑन आहे. आता जर शूट थांबवलं तर अर्धा तास वाया जाणार म्हणून मग मी काही तरी बोलत क्षण-दोन क्षण घालवतो आणि तितक्या वेळात त्या ओटय़ावर काय-काय पदार्थ आहेत त्यावर नजर टाकतो आणि मग मदा, तांदळाची पिठी जे काही हाती लागेल ते मीठ म्हणून घालतो. चाट मसाला, धणे-जिरे पावडर, तेल, तूप या पैकी कोणत्याही गोष्टी बाबत हे असं ‘चिट’ करावं लागतं. कधी कधी रेसिपी करताना ही ‘चिट’ करावं लागतं. दुधाची रबडी दाखवायची असेल तर दूध आटेपर्यंत थांबण्याइतका वेळ नसतो. मग दुधाला उकळी आली की भाजलेली कणिक दुधात भिजवून ती पेस्ट दुधाला लावतो. लगेच दूध रबडीसारखं दाट दिसू लागतं. थोडय़ा  वेळात खास शूटिंगसाठीची रबडी तयार! आता ही रेसिपी वाचून घरी प्रयोग करू नका! घरी करताना दूध आटवूनच रबडी किंवा बासुंदी करा.

एकदा हिरव्यागार मिरच्या फोडणीला टाकण्याचा शॉट होता. मी तेलात मिरच्या टाकल्या आणि जो खखाणा उठला त्यानं मला चांगलाच ठसका लागला. शॉट वाया गेला.  पुन्हा तेच घडलं. शेवटी मी लाँग शॉट घ्या म्हणून सुचवलं. पण दिग्दर्शकाला शॉटमध्ये धूरही हवा होता आणि मीही हवा होतो. आता हे दोन्ही साधायचं तर काही तरी युक्ती करायलाच हवी होती. मग सिमला मिरची बारीक चिरून घेतली. बियांसकट ती बारीक चिरलेली सिमला मिरची घातली. त्यामुळे दिग्र्शकाला हवा तसा शॉट मिळाला आणि मला ठसकाही आला नाही. ग्रेव्ही किंवा रश्शाला तेल सुटलेले दाखवण्यासाठी माझी नेहमीची युक्ती म्हणजे तेलात लाल तिखट कालवून, एक उकळी आली की ते वरून घालायचं! मस्त तेलाचा तवंग येतो.

कोणताही शेफ हा वैज्ञानिक आणि तंत्रज्ञसुद्धा असतो! तंत्रज्ञ कारण तो अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं सहजी हाताळतो आणि वैज्ञानिक कारण त्याला पदार्थाच्या रसायनाच्या अनेक युक्त्या माहिती असतात. तुम्हाला माहितेय का की बिटाच्या रसात हळद घातली की केशरी रंग येतो ते! अनेक शेफ ही युक्ती अनेकदा वापरतात. अशा अजूनही युक्त्या आहेत.. बिटाच्या रसात काजूची पेस्ट मिसळा, जांभळा रंग तयार! सोडय़ात हळद मिसळली की लाल रंग येतो. पदार्थाला छान रंग येण्यासाठी शूटिंगच्या वेळी कृत्रिम रंग सर्रास वापरले जातात. पण नंतर चॅनलनं कृत्रिम रंग वापरण्यावर बंदी आणली. माझ्या एका पदार्थासाठी केशराचा रंग हवा होता. आता चांगल्या प्रतीचं केशर आणता येईलच असं नाही. मग मी काही प्रयोग करून बघितले आणि त्यातला यशस्वी झालेला प्रयोग म्हणजे हळदीच्या पाण्यात लिंबू पिळून ते उकळलं आणि त्याचा अगदी केशरासारखा रंग आला. लिंबाचा विषय निघालाच आहे म्हणून एक गंमत आठवली. एकदा एका रेसिपीच्या वेळी मी वरून लिंबू पिळा असं म्हटलं आणि लिंबू पिळू लागलो तो पिळलंच जाईना. ते लिंबू कच्चं होतं. मग मी काय केलं त्या लिंबाच्या अर्ध्या भागावर पाणी घातलं आणि पिळल्याची अ‍ॅक्टिंग केली.. वेळ साधली गेली.

– क्रमशः भाग पहिला

लेखक : शेफ विष्णू मनोहर

संग्रहिका  : मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ती चक्रधर आयुष्याच्या रथाची….! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

अल्प परिचय 

अभिनव विद्यालय हायस्कूल,मराठी माध्यम, कर्वे रस्ता,पुणे या शाळेत मराठी,इंग्रजी हे विषय शिकवतो. पूर्ण वेळ शाळा आणि उर्वरित वेळेत थोडेसे सामाजिक काम आणि लेखन असा दिनक्रम असतो.

? इंद्रधनुष्य ?

☆ “ती चक्रधर आयुष्याच्या रथाची….!” ☆ श्री संभाजी बबन गायके 

आयुष्य संपवण्याचा निश्चय केलेला तो.. तरूण शेतकरी गडी.. आणि त्याचे आयुष्य वाचवण्यासाठी कंबर कसून लढायला उभी असलेली ती!

त्याच्या शरीरात विष पसरत जाण्याचा वेग त्याच्या दवाखान्यात आणल्या जाण्याच्या वेगापेक्षा जास्त होता. त्याच्या खेड्यातल्या घरातून, खाच खळगे असलेल्या वाटेवरून या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याला आणायला झालेला उशीर त्याच्या जीवावर बेतू पाहतो आहे. अशाच एका खेड्यातून जिद्दीने शिकून, वैद्यकीय अभ्यासाचं शिवधनुष्य पेलून डॉक्टर झालेली ती…  दुपार ते रात्र अशा सेकंड शिफ्ट ड्युटीवर तैनात आहे. आणि हो, पाच महिन्यांची गर्भार सुद्धा ! खूप काळजी घ्यावी लागते पोटातल्या जीवाची. मानसिक ताण नको, जोराच्या हालचाली नको आणि धक्के बसतील असा प्रवास तर नकोच नको !

विष प्राशन करण्याचे भलते पाऊल उचलणाऱ्या त्या तरुणाचा देह आता तिच्या टेबलवर आहे. त्याची पत्नी आलीये त्याला घेऊन कशीबशी. तिने बहुदा आशा तशी सोडलीच आहे आणि त्याला तरी कुठे जगायचे होते?

नाशिकच्या ग्रामीण भागात असलेल्या म्हाळसाकोरे या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या सोयी त्याचा जीव वाचविण्याच्या कामात तशा अपुऱ्या पडतील, हे ड्यूटीवर असलेल्या तिला उमगले लगेच. त्याला प्राथमिक उपचार आणि त्याच्या बायकोला धीर देऊन तिने त्वरित निर्णय घेतला!

रुग्ण वेगाने आधुनिक सुविधा असलेल्या निफाडच्या रुग्णालयात पोहोचवता आला तर जीव वाचण्याची शक्यता अधिक! रुग्णवाहिका होती दारात, पण चालक रजेवर असल्याने उपलब्ध नव्हता आणि दुसरा चालक किंवा वाहन मिळवण्यात वेळ लागला असता. रात्रीचे आठ-साडे आठ वाजलेत. रुग्णालय पंधरा किलोमीटर्सच्या अंतरावर. इतर वाहनाने रुग्ण हलवणे जिकिरीचे आणि धोक्याचे होतेच.

तिला चार चाकी स्वयंचलित वाहन हाकता येत होतं, परवानाही होताच. पण रुग्णवाहिका कधीच नव्हती चालवलेली. हो, रूग्णालयाच्या मोकळ्या आवारात काहीवेळा रुग्णवाहिका चालवून थोडा हात साफ करून घेतला होता. तो साफ हात आता उपयोगात आणण्याची वेळ आली होती.

तिने पटकन सूचना दिल्या… आरोग्यसेवकाला सोबत घेतले. रूग्ण वाहनात घेतला आणि ती चक्रधर बनली ! पोटातलं बाळ सुध्दा जीव मुठीत धरून बसलं असावं. तिने स्टार्टर मारला… सायरनचा कान पिळताच त्याने आवाज घुमवायला आरंभ केला.

चार चाकं तिच्या हातातल्या चाकाच्या इशाऱ्यावर डावी उजवी, हळू, वेगात अशा खेळात रमली. सुदैवाने रस्ता उत्तम स्थितीत होता. जे असतील ते खड्डे आज तिला पाहून काहीसे उथळही झाले असावेत…. डॉक्टर रुग्णवाहिका चालवताहेत…. हे त्या खड्ड्यांनी, गतिरोधकांनी, रस्त्यावरच्या मैलांच्या दगडांनी, रात्रीच्या अंधारात चकाकणाऱ्या रिफ्लेक्टर्सनी आज बहुदा पहिल्यांदाच पाहिले असावे…..आज नागमोडी वळणं शहाण्यासारखी वागली… कुणीही मध्ये नाही आलं!….. हा एक प्रकाराचा ग्रीन कॉरीडॉरच.

सुमारे सत्तर किलोमीटर प्रति तास या वेगाने तिने गाडी हाकली. सफाईदारपणे रूग्णालयाच्या आवारात आणली… रुग्णाला व्हीलचेअरवरून वेगाने इमर्जन्सी रूममध्ये आणलं.. रुग्णाच्या श्र्वासांची मालिका समाप्त होण्याआधी त्याचे श्वास तज्ज्ञ डॉक्टर आणि यंत्रांच्या हवाली झाले होते…. रुग्ण वेळेपूर्वी रुग्णालयात पोहोचला होता ! त्याचा जीव बचावला होता…

डॉक्टर प्रियांका पवार यांनी गर्भारावस्थेत, धोका पत्करून, रुग्णाच्या जीवासाठी आपला आणि पोटातल्या तान्हुल्याचा जीव पणाला लावला होता.

प्रभु रामचंद्रांचे पितामह राज दशरथ यांच्या रथाची धुरा ऐन युद्धात तुटली…. राजा दशरथ देव-दानवांच्या युद्धात देवांच्या साहाय्यासाठी लढत होते… राणी कैकेयी सोबत होत्या… त्यांनी आपला हात रथाच्या धुरेत घातला आणि रथाचे चाक निखळू दिले नाही….. युद्ध संपेपर्यंत. अगदी या प्रसंगाची आठवण यावी असा डॉक्टर प्रियांका पवारांचा पराक्रम. कैकेयीने प्रभू रामचंद्रांना वनवासात पाठवले होते… या डॉक्टररूपी शूर स्त्रीने रूग्णाला मृत्यूच्या वनवासातून माघारी आणले !

डॉक्टर साहेबा पुन्हा तीच रूग्णवाहिका घेऊन ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र रूग्णालयातल्या आपल्या ड्यूटीसाठी परतही आल्या. एका कोपऱ्यात शांत, क्लांत उभी असलेली आणि आजवर शेकडो रूग्णांना इकडून तिकडे घेऊन जाण्याचा अनुभव असलेली ती रुग्णवाहिका या आपल्या नव्या चालकाकडे पाहून बहुदा गालातल्या गालत हसत असावी आणि डॉक्टर प्रियांका पवारांचं बाळ, आईनं किती छान राईड मारून आणली म्हणून भलतंच खुशही झालं असावं ! आपल्या आईने कर्तव्यपूर्तीसाठी किती मोठा धोका पत्करला होता हे त्या पिलाला कळलं नसावं… पण ते जेंव्हा जन्माला येऊन मोठं होईल ना तेंव्हा त्याला आपल्या आईचा अभिमान निश्चितच वाटेल… नाही का?

 © श्री संभाजी बबन गायके

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print